ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

ॐ विश्वं विष्णुं वषट्कारो भूतभव्य भवत् प्रभु
भूतकृत् भूतभृत्‌भावो भूतात्मा भूतभावनः ॥ १ ॥


१. विश्वम्
विष्णु-सहस्रांत वस्तुतः आरंभ विष्णु ह्या नामापासून व्हायला पाहिजे. परंतु तो झाला आहे 'विश्व' ह्या नामापासून. अर्थात् 'विश्व' हे परमेश्वराचे पहिले नाम होय. आणि ते योग्यच आहे. कारण अव्यक्त परमात्म्याचे मुख्य गमक त्याचें हें व्यक्त विश्वरूप आणि नामच होय. ब्रह्मसूत्रादि शास्त्रांत म्हणूनच तर 'जन्माद्यस्य यतः" असें त्याचे द्योतन केले आहे. 'नदीमुखेनैव समुद्रमाविशेत्' या न्यायाने व्यक्त मुखानेंच अव्यक्त आकळावयाचे आहे. हेहि या विश्व नामाने सुचविले आहे.

वस्तुतः परमात्मा अचिन्त्य व अप्रमेय आहे. त्याचे वर्णन करों होणार ? पण वर्णनच करावयाचें शालें तर तो सर्वकाही आहे असे म्हणूनच करावें लागेल. 'विश्व' ह्या नामानें तेंच प्रारंभीं केलें आहे, आणि मगच ह्या विश्वाचे म्हणजे पूर्णाचे अंश पुढे विवरिले आहेत-शतशोऽय सहस्रशः नामांचे मागें नामें घेऊन, परंतु ती सारी नामें घेऊन हि विश्वाचे म्हणजे पूर्णाचे पूर्णत्व अबाधितच राहतें. तें रितें म्हणजे न्यून वा अपूर्ण होत नाही. ईशोपनिषदाचा शान्तिमन्त्र त्याचे यथार्थ वर्णन करतो.

"पूर्ण अदः पूर्ण इदं पूर्णात् पूर्ण उदच्यते । पूर्णस्य पूर्ण आदाय पूर्णमेव अवशिष्यते ॥"विश्व नामाने केवळ व्यक्तच घ्यावयाचें नाहीं, तर अव्यक्तहि घ्यावयाचे. कारण कोणाचाहि निषेध वेश्च करीत नाही. आणि म्हणूनच तें विश्व हणावयाचे. सर्व निषेधांचा निषेध म्हणजेच अशेष वेश्व. असे हे विश्वनाम देगाचे पहिले, मधले आणि शेवटलें नाम होय. या विश्वनामांत (१) व्यक्त, (२) अव्यक्त, (३) व्यक्ताव्यक्त आणि (४) नव्यक्त, नाव्यक्त म्हणजेच तुरीय अशा चारी कोटी सामावल्या आहेत. असें हें चतुरमुख ब्रह्म आहे, विश्वरूप आहे. प्रारंभीच त्याचे आवाहन करून मागाहून त्याचे यथेष्ट विवरण केले आहे. विश्व हा सहननामाचा संक्षेप आहे, सहस्रनाम विश्वाचा विस्तार आहे. संक्षेप एक आहे, विस्तार अनन्त आहे. सहनशब्द अनन्ताचें उपलक्षण आहे.

२. विष्णु
विष्णु-सहस्रनामांत विष्णु नामाला दुसरा क्रम मिळाला ! चमत्कारिक वाटते. परंतु तें साभिप्राय आहे. विष्णु म्हणजे वेशनशील, व्यापनशील, जो जो आवास तयार झाला त्यांत त्यांत हा शिरून बसला म्हणून विष्णु. "तत् सृष्ट्‍वा तदेवानुप्राविशत्" अशी श्रुति आहे. आधी विश्व निर्माण झाले आणि मग त्यांत त्याने वसति केली. पण हा नुसता प्रवेश नाही, तर अनुप्रवेश आहे. अनुप्रवेश म्हणजे सहप्रवेश. निर्मितीबरोबरच प्रवेश, जसा बीजाचा प्ररोहांत होतो. विष्णु तसा ह्या विश्वाकारांत प्रविष्ट झाला आहे. तो बीजरूपानें अन्तर्धान पावून वृक्षरूपाने प्रकटला आहे. आतां बीज दिसत नाही, पण वृक्ष दिसतो आहे. भागवतकार म्हणतात : "जातेऽङ्कुरे कथमु होपलभेत बीजम्" बीजाचे रोप तयार झाल्यावर ते बीज कसें बरें दिसणार ? तें रोपच बीज आहे. तो त्याचा नवा अवतार आहे. देवाचे अनेक अवतार झाले. पण ते सर्व ह्या विश्वावताराच्या पोटांत. खरे म्हणजे त्याचा एकच अवतार झाला आहे आणि तो म्हणजे हा विश्वावतार, तोच मुख्य म्हणूनच त्याचे स्मरण आधीं केले आणि त्यांत लपलेल्या विष्णूचे मागाहून.

"विश्वं विष्णुः" ही दोन पदें असून शिवाय तें एक स्वतंत्र वाक्य आहे. वैष्णवांचें तें जीवनसूत्र आहे. तोच त्यांचा धर्म. तुकारामाने त्याचेंच अभंगगायन केलें आहे-"विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगल" इत्यादि.

अंकांना दुहेरी मूल्य असते : (१) निरपेक्ष, (२) सापेक्ष वा स्थानीय. त्याचप्रमाणे पदाचें आहे. त्याचें हि निरपेक्ष आणि अन्यसापेक्ष मूल्य असते, अर्थ असतो. विश्व आणि विष्णु पदांचे स्वतंत्र अर्थ आहेत ते आपण पाहिलेच, पण ती दोन्ही एकत्र वाचून होणारा अर्थ हि वाचावयाचा. मूळ प्रत्येक पद अनन्त अर्थाचे आणि त्या पदांचा प्रस्तारभेदाने होणारा विस्तार हि तसाच अनन्त.

३. वषट्कार
"विश्वं विष्णुः" म्हणजे "विष्णुमय जग" हें दर्शन ज्याला झालें त्याची वृत्ति आणि ज्याला हे दर्शन झाले नाही त्याची वृत्ति समान कशी असेल ? ज्याला दृष्टि आहे त्याचे चालणे आणि ज्याला ती नाहीं त्याचें चालणे समान असणार नाही. एक दृष्टिपूत चालेल. दुसरा अंधभूत ठेचाळेल. अशा या दोन गति आहेत. पैकी दर्शनवंताची जी वृत्ति वा जीवनसरणी तिचें नांव यज्ञ होय. ती सत्यमूलक आणि संयमप्रधान आहे. उलट अदर्शनवंताची जी वृत्ति तिचें नांव आहे गृधवृत्ति. ती मिथ्यादृष्टिमूलक आणि भोगासक्त आहे. एकीचा आश्रय करून साधक अपरिहार्य म्हणून प्राणवृत्तीनें आहारादि सेवून जगतो, दुसरीचा आग्रह धरून सांसारिक अपरिहार्य म्हणूनच त्याग करतो. एरवीं इंद्रियवृत्तीनें जगून, मेला तरी भोग सोडीत नाही. मेल्यावर हि परत भोगाची तरतूद करून मरतो. अशा अयज्ञवृत्तीने इहलोक हि साधत नाही मग परलोक कुठला असें गीता म्हणते : "नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य, कुतोऽन्यः कुरुसत्तम". ही जी इहपर-साधक यज्ञवृत्ति तिचा उद्‌गार म्हणजे 'वषट्कार' होय. "विश्वं विष्णुः" या वैष्णव महामंत्राचा विनियोग म्हणजे वषट्कार. यज्ञमय जीवन ही दर्शन असल्याची खूण होय. दर्शनाची पात्रता आणि तद्‌द्वारा दर्शन मिळविण्याचा मार्ग हि यज्ञ होय, "यज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः" या वचनांत हाच आशय वैदिक ऋषींनी सांठविला आहे. वषट्कार शब्द या सर्व अर्थाचा संग्राहक आहे. "विश्व विष्णर्वषट्कारः" हा क्रम संनिकर्षाने आणि समुच्चयाने वरील अर्थ प्रकट करतो. पृथक्त्वाने त्याचे वेगळे वेगळे अर्थ हि यथावत् आहेतच. यापुढे हा संगतीकरणाचा गागोवा क्वचित् विवक्षेनुसार घेऊ.

४. भूत-भव्य-भवत्-प्रभु
भूत म्हणजे या सृष्टीत जन्मास आलेलें, भव्य म्हणजे जन्मास यावयाचे आणि भवत् म्हणजे या क्षणीं में जन्मत आहे ते. या तिहींचा जो स्वामी तो भूत-भव्य-भवत्- प्रभु होय. म्हणजेच विश्वप्रभु. विश्वांत या तिन्हींहून वेगळे दुसरें काय आहे ? परमेश्वर हा या विश्वाचा एक मात्र स्वामी आहे. त्याची उत्पत्ति स्थिति आणि गति यांचा म्हणजे समग्र जीवनाचाच तो स्वामी आहे. जीवन शब्दाने त्याची उत्पति-पूर्व स्थिति, उत्पन्न-स्थिति आणि मरणोत्तर गति सर्वांचा निर्देश होतो. थोडक्यांत म्हणजे परमेश्वर हा विश्वाचा म्हणजेच समग्र जीवनाचा स्वामी आहे. भूत-भव्य-भवत्-प्रभु या नामानें हाच आशय व्यक्त केला आहे.

५. भूतकृत
भूत म्हणजे अव्यक्तांतून व्यक्त दशेस आलेलें म्हणजे जन्मलेलें सत्त्व आणि प्रेत म्हणजे व्यक्त दशेंतून अंतर्धान पावलेलें, मरण पावलेलें सत्त्व. सत्त्व म्हणजे सत्तावान् जीव. तो सुप्तचेतन वृक्ष-पाषाण असेल वा चालता बोलता प्राणी असेल. दोन्ही हि सत्वेंच, भूत हें सत्त्व आहे तसें प्रेत हि सत्त्वच आहे. कारण तें हि आहेच. ते आम्हांला चर्मचमूनें दिसत नाही इतकेंच. परमात्मा हा भूतकृत् आहे. म्हणजे जगांत जें काही व्यक्त झाले आहे, जी जी व्यक्ति आहे ती ती सर्व परमेश्वराने निर्मिलेली आहे, ती परमेश्वराची कृति आहे. परमेश्वराच्या कृतीचा आपण अनादर करूं नये, प्रत्येक व्यक्ति ही परमेश्वरी कृति आहे याचें भान जर आपण राखलें तर आपल्या हातून पाप होणार नाही.

६. भूतभृत्
परमेश्वर भूतकृत् म्हणजे भूतमात्राला निर्माण करणारा आहे इतकेंच नव्हे तर त्या निर्माण केलेल्या जीवाचें भरण, पोषण करणाराहि, भूतभृत् हि, तोच आहे. आई मुलाला जन्म देते आणि जन्मलेल्या तान्हुल्याला ती पाजते, त्याला ती भरवते त्याप्रमाणे परमेश्वर या विश्वाला जन्म देतो आणि त्याचे भरण-पोषणहि तोच करतो. तो विश्वंभर आहे.

७. भाव
भाव म्हणजे अस्तित्व. 'भू सत्तायाम्' म्हणजे भू हा धातु सत्तावाचक आहे. अर्थात् भाव म्हणजे अस्तित्व, असणेपणा परमेश्वर हा भाव-स्वरूप आहे. जी जी वस्तु आहे, क्रिया आहे ती सारी अस्तित्ववाचक आहे. शून्य म्हणजे कांही नसणें. म्हणजे अभाव, परंतु तीहि एक वस्तु आहे, एक क्रिया आहे. आकाशाला शून्य म्हणतात. पण शून्य म्हणजे कांहींच नसणें नव्हे. आकाश नसेल तर या विश्वाला प्रकटायला अवकाश कोठून मिळेल ? म्हणजे शून्यहि भावरूपच झालें. आतां मरणें अथवा नाहीसे होणें म्हणजे तरी काय ? काय ते अभावरूप आहे ? नाहीं. कारण व्यक्त दशेंतून अव्यक्त दशेंत जाणें म्हणजे मरणें होय. म्हणजे तें देखील भावरूपच आहे. नितांत अभाव म्हणून काही वस्तु नाहींच, जे आहे ते सारें भावरूप आहे. म्हणूनच परमेश्वराला 'भाव' म्हटले आहे. अभाव शब्दांत देखील भाव शब्द गृहीत आहे त्याच्या आधारेंच अभावाची रचना झाली आहे. अंधार म्हणजे स्वतंत्र वस्तु नाहीं, तर प्रकाशाचा अभाव म्हणजे अल्प भाव होय. अशा प्रकारें सर्व कांहीं भावरूप आहे. आणि तो भाव सर्वाधार आहे, कारण तो परमेश्वर आहे.

भाव म्हणजे वस्तु. मग तो कल्पित असो, वा वास्तविक, व्यक्त असो वा अव्यक्त, भावरूप असो वा अभावरूप. कोणत्याहि प्रकारच्या भावाला भावत्व देणारें जें तत्त्व तें म्हणजे भाव, सत्व, कोणत्याहि वस्तूविषयी तुम्ही काहींहि निधान कराल त्यापूर्वीं तिचे अस्तित्व तुम्हांला गृहीत धरावेंच लागते. तें जें सर्वाना भावत्व वा सत्ता देणारे तत्व तेंच भाव होय. तेंच परमेश्वरी तत्त्व. तेंच एक भावरूप आहे, सत् आहे. बाकी सर्व अभाव आहे, असत् आहे.

८. भूतात्मा
भूतात्मा म्हणजे भूतरूप. परमेश्वर विश्वरूपानें प्रकटला आहे. हे जें प्रकटीकरण तेंच म्हणजे भूतरूप होय. आपणाला ज्या ज्या वस्तूचें ज्ञान होतें ती ती वस्तु भूत होय. कारण जी वस्तु आपल्या मनाच्या, वाणीच्या आटोक्यात येत नाहीं तिच्याविषयीं आपण कांहींच विधान करूं शकत नाही.

९. भूतभावन
परमेश्वर भूतभावन म्हणजे भूतमात्राला उत्पन्न करणारा आहे . भूतकृत आणि भूतभावन दोहोंचाहि अर्थ एकच; परंतु भूतकृत् म्हणजे भूतमात्राला अव्यक्तांतून व्यक्त दशेस आणणारा, त्यांना देहव्यक्ति देणारा असा आशय, आणि भूतभावन म्हणजे भूतमात्राला आत्मरूपानें, जीवरूपानें जीवत्व देणारा, वस्तुरूपानें सत्ता देणारा असा आशय.

"भूत-भव्य-भवत्-प्रभु" पासून "भूतभावन" पर्यंत सहस्रकाराने परमेश्वर आणि भूतमात्र यांचा संबंध विशद केला आहे. परोपरीने आळविला आहे. त्याच्यांत एकरूपता म्हणजे सदृशता आणि त्याचबरोबर विविधताहि आहे. परंतु त्यांत विरोध नाहीं. ती विविध नामें परमेश्वराचे विविध आणि विरोधी भासणारेहि गुण वर्णितात. परंतु ते सर्व निर्विरोध आणि परस्परपूरक असे आहेत.

परमेश्वराची नामें ही त्याचें नाम, रूप, गुणआणि कर्म त्याचप्रमाणे त्याचे अचिंत्य आणि अनंत स्वरूप प्रकट करण्याचा एक असफल परंतु सूचक प्रयत्न मात्र होय.

भूतभावन म्हणजे भूतांचें भावन संतोषण करणारा असाहि आशय व्यक्त होतो. 'परस्परं भावयन्तःश्रेयः परमवाप्स्यथ' या वचनांत भावन चा हा आशय स्पष्ट झाला आहे.

पूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमा गतिः ।
अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च ॥२॥


१०. पूतात्मा
पूतात्मा म्हणजे ज्याचे हृदय पवित्र आहे असा. या जगांत परमात्याहून पवित्र दुसरे काय असेल ? परमेश्वर हा ज्ञानस्वरूप आहे आणि ज्ञान हे गीतेत म्हटल्याप्रमाणे परम पवित्र आहे. म्हणून परमात्मा हा पूतात्मा म्हटला.

११. परमात्मा
परमात्मा म्हणजे परम आत्मा, सर्व श्रेष्ठ आत्मा. आत्मा या शब्दानें जड देहापासून तों चिन्मय आत्मतत्त्वापर्यंत सर्वाचा बोध होतो. (१) देह, (२) इन्द्रियें, (३) मन, (४) बुद्धि आणि (५) आत्मा ही उत्तरोत्तर अंतरतर तत्त्वे होत. ही सर्वच आत्म-शब्दाने उल्लेखिली गेली आहेत, त्यात देह हा आम्हाला सर्वात जवळचा आणि आत्मा हा सर्वात दुरचा वाटतो. वस्तुतः तो आम्हांला सर्वात जवळचा म्हणजे अगदी 'स्व'तत्त्व आहे, 'पर तत्त्व नव्हे. परंतु बहिर्मुख वृत्तीमूळे ते स्वतत्त्वच आम्हांला पर तत्त्व होऊन बसले आहे. हे "स्व" तत्त्व म्हणा, की "पर"तत्त्व म्हणा तेंच परम म्हणजे सर्वोत्तम तत्त्व होय. कारण तेच सर्वाधार असून नित्य शुद्ध, बुद्ध, मुक्त असें आहे म्हणूनच त्याला परमात्मा म्हटले आहे. सर्वच आत्ममय आहे म्हणून प्रत्येकच आत्मा म्हणावयाचा, पण हे स्वतत्त्व परम आत्मा होय. " पूतात्मा परमात्मा च " या क्रमांतून असाहि अर्थ सूचित होतो, की जो पूतात्मा आहे तोच परमात्मा म्हणावा. परमात्याला प्राप्त करून घेण्याचा उपाय म्हणजे पूतात्मा बनणे. आत्मशुद्धीचें अंतिम टोक म्हणजे परमात्मा. जीवात्मा हा साधनेचा आरंभ-बिंदु, परमात्मा हा साधनेचा समापन-बिंदु आणि पूतात्मा ही साधना-रेखा, साधनेची सुरेखा जीवात्म्यापासून निघून परमात्म्याला पोहचते. दरम्यानची जी साधनधारा ती म्हणजे आत्मशुद्धीचा अजस्र प्रयास. हा अजस्र प्रयासच गीतेने " बहूनां जन्मनां अन्ते ज्ञानवान मां प्रपद्यते " आणि "अनेक जन्म-संसिद्धस् ततो याति परां गतिम् " या वचनांत उल्लेखिला आहे.

भगवान् बुद्धानें आत्मा हा पंचस्कंधात्मक मानिला आहे. हा आत्मा म्हणजे स्थूल देह होय. उपनिषदांत इन्द्र आणि विरोचन हे दोघे सुर आणि असुर बंधु प्रजापतीकडे शिकावयाला गेले. त्यांना गुरुनें क्षौरादि करून शुचिर्भूत होऊन यायला सांगितले, ते आल्यानंतर त्यांना तळ्याच्या आरशांत आपले रूप पाहायला सांगितले. म्हटले, हें जें सुंदर रूप तुम्हांला दिसते, तोच आत्मा. विरोचनाचें तेवढ्याने समाधान झाले आणि तो देहात्मवादी होऊन बसला. हाच आसुर संप्रदाय, इन्द्राचे समाधान झाले नाही. त्याला शंका आली आणि गुरुने त्याला उत्तरोत्तर सूक्ष्म विचार सांगितला. या परिप्रश्न-प्रक्रियेनें इन्द्रानें परम आत्मतत्त्व गांठलें. हाच दैव-संप्रदाय होय, आसुर संप्रदाय अवर आत्म्यापाशींच कुंठित. झाला म्हणून तत्त्वापासून तो च्युत झाला. भगवान् बुद्धहि जणू त्यांतच सापडला आहे.

१२. मुक्तानां परमा गति
'गति' म्हणजे इहलोकांतून देह सोडून परलोकाला जाणे. 'आगति' म्हणजे परलोकांतून इहलोकांत जन्मास येणे. अशी ही जीवनाची चक्रगति आहे. हिलाच संसार असे म्हणतात. संसारालाच पुनरावर्तन म्हणजेच पुनःपुनरावर्तन असेंहि दुसरें नांव आहे. या पुनरावर्तनांतून, या वर्ग करण्यांतून सुटण्यालाच अपवर्ग असें नाव आहे. अपवर्ग म्हणजे संसारांतून मुक्ति. पुनरावर्तनांतून सुटका, निकाल, हा निकाल म्हणजे सर्व निकालांचा निकाल आहे. मुक्त पुरुष ज्या अंतिम अवस्येला जाऊन पोहोंचतात ती स्थिति. परमात्मा हीच मुक्तांची परमा गति होय. म्हणून परमेश्वराला 'मुक्तानां परमा गतिः' असें ठीकच म्हटलें आहे.

जगांत जे सर्व जीव आहेत ते आणि परमेश्वर यांच्यांत तत्त्वतः कांहींच अंतर नाही. ते सर्व एकरूपच आहेत. म्हणून मुक्तामुक्त हा भेदहि मिथ्याच आहे. पण हे मिथ्यात्व परमेश्वराच्या दृष्टीने आहे. जीवाच्या दृष्टीने तर असंख्यच भेद आहेत. परमेश्वर आणि जीव यांच्यांत आकाश-पाताळाचें अंतर आहेच, परंतु जीवाजीवांतील अंतरहि अपरिमित आहे. मुक्ति म्हणजे ही सर्व अंतरें पार नाहीशी होणे, ही सर्व अंतरें उपाधींच्यामुळे आहेत. सर्व उपाधि गर्न पडतील तेव्हां हे अंतरहि गळून पडेल आणि परिपूर्ण सामरस्य होईल. परिपूर्ण सामरस्य म्हणजेच एकमेवाद्वितीयत्व होय. असें सामरस्य जोपर्यंत होत नाहीं, जोपर्यंत हे एकमेवाद्वितीयत्व सिद्ध होत नाही तोपर्यत भेद आहेच आणि जोपर्यंत भेद आहे तोपर्यंत भय आहे, तोपर्यंत मुक्ति नाही. कारण मुक्ति म्हणजे भयमुक्तिच होय.

आपल्याकडे मृत जीवाचे श्राद्ध करतात. परंतु मुक्ताचे श्राद्ध नाही. मुक्ताला कसलीहि वासना राहत नाही. अपेक्षाहि राहत नाही. अमुक्ताला म्हणजे जीवाला वासना असते, अपेक्षा असते.. तो त्या वासनामय देहाने परलोकांत फिरत राहतो. आणि इहलोकांत जन्म घेतो. त्यामुळे त्याची ती वासना पूर्ण करून त्याला तिच्यांतून मुक्त होण्याला मदत करणें हें आप्तांचे कर्तव्य ठरतें म्हणून श्राद्ध. श्राद्ध म्हणजे प्रेताचे हितचिंतन आणि हितसाधन. जगांत भूतें, प्रेते आणि मुक्त अशा तीन कोटी आहेत. भूतांच्याविषयी भूतांचे कर्तव्य म्हणजे स्वधर्माचरण होय, जे भूतकोटींतून प्रेतकोटींत गेले त्यांच्याविषयीं, कर्तव्य म्हणजे श्राद्ध-धर्म होय. भूतांच्या स्वधर्मात याचाहि अंतर्भाव होतो. जे मुक्त आहेत त्यांच्याविषयींहि भूतांचे कर्तव्य असतेच. परंतु हे कर्तव्य त्या मुक्त पुरुषांच्या गरजेमुळे नके तर भूतांच्या गरजेमुळे असते. भूतप्रेतांविषयींचे कर्तव्य हे भूतांच्या आणि प्रेतांच्याहि गरजेचे असते, असा फरक. मुक्ताचे स्मरण आणि अनुकरण करून जीव गुमुक्षु बनतो आणि वासनाक्षयानंतर ज्ञानोदय होऊन यथाकाल मुक्त होतो. मुक्तांच्या स्मरणाचे हेच प्रयोजन. या तिन्ही जीवकोटींबाबतचे मनुष्याचे कर्तव्य म्हणजे त्याचा स्वधर्म होय.

१३. अव्यय
'अव्यय' म्हणजे ज्याला व्यय नाहीं, वेंच नाही असा. जगांत जें जें आपण पाहातों तें सारे व्ययधर्मी,क्षयिष्णु आहे. परमात्मा त्या सर्वांहून वेगळा आहे. तो अक्षय आहे, अव्यय आहे. चयापचय हा सृष्टीचा धर्म आहे. परमात्मा सृष्ट नाही, सृष्टा आहे. त्यामुळे तो तद्विलक्षण आहे. त्याचे हे वैलक्षण्य सृष्टीचे एकेक लक्षण घेऊन तदभिन्नत्वानें वर्णिले जाते. परमात्मा सर्वांहून वेगळा, सर्ववरिष्ठ आणि आपल्यासारखा आपणच आहे.

१४. पुरुष
'पुरुष' म्हणजे आत्मा. पुरुष-सूक्तांत वर्णिलेला परमात्मा. पुरुष म्हणजे पुंल्लिंग नर नव्हे, तो तर अलिंग आहे. पुरुष म्हणजे नर असा अर्थ घेतला तर तो सर्वांचा भर्ता आहे. स्वामी आहे. सर्व त्याच्या भार्या आहेत, भृत्य आहेत. हा पुरुष एकशिरा पुरुष नाही. हा सहस्रशीर्षा पुरुष आहे. सर्व विश्वाला व्यापून अनंत उरणारा हा परमेश्वर आहे. ज्याचे वर्णन करतांना वेदांनी हात टेकले आहेत, तो हा परम पुरुष होय, व्याकरणांतील उत्तम पुरुष आणि वेदान्तांतील पुरुषोत्तम तो हाच.

१५. साक्षी
जगांत पदार्थांचे दोन वर्ग पडतात. एक द्रष्टा आणि दुसरा दृश्य. जें जें दृश्य वर्गात आलें तें तें विषय झाले आणि त्याला पाहणारें में तत्त्व उरलें तें झालें द्रष्टा. म्हणजे विषयी. हा जो विषयी द्रष्टा तीच साक्षी होय. जे सर्व ज्ञान होतें तें सर्व द्रष्टदृश्यभेदानेंच होते.

१६. क्षेत्रज्ञ
साक्षी म्हणजे विश्वसाक्षी. प्रत्यगात्माहि साक्षी आहे. पण तो सोपाधिक असल्याकारणाने त्याला विश्वसाक्षी, विश्वात्मा म्हटलें नाही. तो क्षेत्रज्ञ म्हटला आहे. साक्षी आणि क्षेत्र दोन्ही एकच. साक्षी निल्पाधिक आगि क्षेत्रज्ञ सोपाधिक आहे, इतकेंच.

पुरुष, साक्षी आणि क्षेत्रज्ञ हे तिन्ही शब्द समानार्थकच आहेत. पुरुष शब्द परमत्मावाचक, साक्षी शब्द आत्मवाचक आणि क्षेत्रज्ञ शब्द जीवात्मवाचक आहे असा त्यांत विवेक करता येईल, या तीन शब्दांच्या आरंभी अव्यय शब्द आणि अंती अक्षर शब्द आला आहे. तेहि त्याचेच स्वरूप आविष्कृत करतात. सर्व विषय हे व्ययशील आणि क्षरणशील आहेत. पुरुष, साक्षी आणि क्षेत्रज्ञ म्हणून ओळखले जाणारे चित्तत्त्व हे तविपरीत अव्यय आणि अक्षर असें कूटस्थ स्वरूपाचे आहे. अशा प्रकारे हा संपूर्ण श्लोकच कूटस्थ ब्रह्मा, निरूपण करतो. पहिला श्लोक विश्वं विष्णु:' इत्यादि, विश्वोपाधिक, विश्वनाथ परमेश्वराचे, सगणाचे वर्णन करणारा आहे आणि दुसरा श्लोक. 'पूतात्मा परमात्मा' इत्यादि, निरुपाधिक कूटस्थ ब्रह्माचे, निगुणाचे निरूपण करतो असे म्हणता येईल. उपासनेच्या दृष्टीने सगुणाचे महत्त्व निर्विवाद आहे. म्हणून प्रथम सगुणांचे आवाहन केले आणि नंतर निर्गुणाचें. सगुणाचे निरूपण उपासनेच्या दृष्टीने आवश्यक असले तरी तत्त्वविचाराच्या दृष्टीने अंतिम आदर्श म्हणून निर्गुणच शिरोधार्य करावे लागते. त्यामुळे ते अपरिहार्य होऊन बसते. एवढ्याचसाठी सगुण-निरूपणानंतर लगेच निर्गुण-निरूपण केले आहे. गीतेतहि ठायी ठायी सगुण-निर्गुणाची अशी जोडी हातात हात घालून चाललेली दिसते.

१७. अक्षर
अक्षर म्हणजे न क्षरणारा, न झिजणारा, कूटस्थ, उपनिषदांत या अक्षराचे परोपरीने वर्णन केले आहे. त्यांत "अच्छायं, अनणु "असेंहि वर्णन येते. ज्या वस्तूला छाया आहे, तिला देह आहे. मग तो अणु-प्रमाण का असेना ! परंतु परमात्म-तत्त्व हें द्रव्याणु -घटित हि नाही किंवा छायादिगुणवत् हि नाहीं. आणि असें तें द्रव्य-गुण-क्रियादि-विलक्षण निर्गुण असल्यामुळेच तें. अक्षर म्हणजे कूटस्थ-नित्य म्हटलें आहे. नित्याचे प्रवाह-नित्य व कूटस्थ-नित्य असे दोन प्रकार केले जातात. पैकीं प्रवाह-नित्यता ही वास्तविक नित्यता नव्हे. ती आभासिक आहे. दिव्याची ज्योत एकसारखी तेवत असते. परंतु वस्तुतः प्रतिक्षणी नव-नवे तैलकण पेटून विझत असतात तींत. त्यांनाच आपण ज्योत म्हणून पाहत असतो. परंतु तेल संपलें की हा संततप्रवाह संपणारच, म्हणून ही नित्यता खरी नव्हे, रत्नकिरण त्यामानाने नित्य म्हणता येईल. पण तो हि एक द्रव्यशक्ति-प्रवाहच आहे. म्हणून तो हि कधीकाळी संपणारच. जिथे म्हणून द्रव्य, गुण, क्रिया इत्यादींचा संबंध आहे तिथे क्षरण आहेच आहे. ब्रह्म तद्विलक्षण असें अक्षर आहे. म्हणून ब्रह्माला अक्षर हें नाम प्राप्त झालें. म्हणून तीच त्याची व्याख्या, गीतेत "अक्षरं ब्रह्म परमम् " या वचनांत ती आली आहे. ब्रह्माशिवाय इतर कशालाच अक्षरत्व नसल्यामुळे तेच एकमात्र अक्षर होय.

अव्यय आणि अक्षर दोन्ही समानार्थकच आहेत. परंतु त्यांत सूक्ष्म भेद करता येईल. अव्यय म्हणजे समुद्रवत् समृद्ध, समुद्रांतून किती हि पाणी घेतलें तरी तो घटत नाही अथवा कितीही पाणी त्यांत ओतलें तरी वाढत नाही. पण अक्षर म्हणजे आकाशवत् अच्छेद्य. आकाशातून तुम्ही थोडे आकाश तोडू शकत नाही किंवा त्याला जो५ चकत नाही, त्याशी तुम्ही कसलेंच आदान-प्रदान करू शकत नाही. अव्यय पद सगुण, तर अक्षर पद निर्गुण आहे असे म्हणता येईल.

योगो योगविदां नेता प्रधानपुरुषेश्वरः ।
नारसिंहवपुः श्रीमान केशवः पुरुषोत्तमः ॥३॥


१८. योग (योगो योगविदाम्)
ध्येयभूत ब्रह्माशी, सगुणाशी वा निर्गुगाशीं साधकाला संगत करून देणारा जो उपाय तो म्हणजे योग होय, यावेगळा जो, तो सर्व अपाय होय, वियोग होय. योग म्हणजे स्वरूपयोग आणि वियोग म्हणजे स्वरूप-वियोग होय. अर्थात् योग म्हणजे वियोगाचा वियोग. गीतेत "तं विद्याद् दुःखसंयोग-वियोगं योगसंज्ञितम् " या वचनात अशीच व्याख्या केली आहे योगाची.

सगुण-निर्गुण-निरूपण केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे त्याचा उपायच होय. आणि तोच योग या पदाने इथे सहास्रकाराने नेमका स्मरला आहे.

आता हा योग फलतः एक म्हणजे परमानंद-योगरूप असला तरी त्याचे असंख्य मार्ग असू शकतात केंद्र-किरणवत. प्रत्येक जीव हा ईश्वरांश असल्याने तो आपल्या अंशीतच शेवटी मिळावयाचा आहे. म्हणून त्याची जीवनसरणी एक योगच होय. अशा सर्व योगवेत्त्यांचा जो योग तोच सामान्यतः ' योगविदां योगः ' होय. हा योग " रुचीना वैचिच्यात् " ऋजुकुटिल कसा हि असूशकेल. हा योग सहवर्त्मच असणार, अनेकच असणार.

हे सर्वच जीवन-मार्ग योग असले तरी ज्या प्रमाणे ज्या मार्गाने विनायास आणि लवकरात लवकर मुक्कामाला पोचता येतें त्यालाच आपण मार्ग वा राजमार्ग म्हणतो, त्याप्रमाणे ज्या उपायाने जीव सुगमपणे शिवत्व पावतो तोच योग म्हणावयाचा. अशा मुख्य योगाचे जे विशेष शाते म्हणजे आचार्य त्यांचा जो योग तो योगच विशेषतः इथें " योगविदा योगः " म्हणून घ्यावयाचा. हा योग एकच असणार. समत्व हा तो एक योग होय.

समत्वच योग होय आणि समत्वच अन्तिम लक्ष्य होय हे गीतेच्या पुढील दोन वचनांवरून लक्षात यावे. 'योऽयं योगस् त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन' आणि ' निर्दोष हि समं ब्रह्म '. साध्य वा साधन कोणत्याहि रूपाने समत्व हे परमात्मस्वरूप आहे. म्हणून तो परमात्मा योग म्हटला आहे.

१९. नेता (योगविदां नेता)
नेता म्हणजे पुढारी असे आपण समजतो. पण पुढारी कोण ? संकटांत हि पुढे राहून जो मार्ग काढील आणि अनुयायांना मुक्कामाला पोहोंचवील तोच पुढारी ! असें पुढारीपण, असें नेतृत्व ज्याच्या ठायीं नीति असेल तोच करु शकतो. अर्थात् जो नीतिमान् तोच नेता.

आमचा नेता अमुक म्हणून आजकाल लोक एखाद्या प्रतापी व्यक्तीचा जयजयकार करीत असतात. परंतु त्याहि व्यक्तीचे नेतृत्व करणारे जें अंतरतर तत्त्व तेंच खरोखर आमचा नेता आहे. तेंच व्यक्तिमात्राच्या हृदयांत वसलेलें परमात्म-तत्त्व या विश्वाला चालवीत आहे. आणि म्हणून तेच एकमात्र नेता असून सारे जग हे नीत आहे.
(१) सत्येन लभ्यस् तपसा ह्येष आत्मा
सम्यग्ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम् ।
अन्तःशरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रो
यं पश्यन्ति यतयः क्षीणदोषाः ॥

(२) सत्यमेव जयते नानृतं
सत्येन पन्था विततो देवयानः ।
येनाक्रमन्ति ऋषयो ह्याप्त-कामा
यत्र तत् सत्यस्य परं निधानम् ॥

या उपनिषदांतील लोकांत ती नीति थोडक्यांत पण समग्र आलेली आहे. एका शब्दांत सांगावयाचें तर सत्यनिष्ठा ही ती नीति होय, हिचा आरंभ सत्यापासून, मार्ग सत्याचा आणि परिसमाप्तिहि सत्यांतच. अशी ही सत्यनीति आहे आणि तिचा जो स्वामी तो परमेश्वरच आमचा नेता आहे.

विष्णु-सहस्रांत अन्यत्र नेता हे पद आले आहे. यामुळे इथे "योगविदां नेता" असें नाम कल्पूनहि व्याख्या करता येण्यासारखी आहे, आणि तशी ती केलेलीहि आहे. परंतु विष्णुसहस्रांत एकच नाम अनेकदां आलेलें आढळून येते. त्यामुळे भिन्नतेसाठी पदभिन्नता कल्पिलीच पाहिजे असें नाहीं.

'योगविदां ' हे षष्ठ्यन्त पद पूर्ववर्ती योगपदाशी संबद्ध न करता परवर्ती नेता पदाशी संबद्ध केले तर त्याची व्याख्या योगवेत्त्यांचा नेता, अग्रणी अशी होईल. योगमार्गानं जाऊन सिद्धि मिळविणारा परमात्म्यापूर्वी दुसरा कोण बरे असू शकेल ? तो स्वतःच ज्ञातृ-ज्ञान-ज्ञेयस्वरूप आहे. त्यामुळे तो सहजच " योगविदां नेता " झाला.

२०. प्रधान-पुरुषेश्वर
प्रधान-पुरुषेश्वर म्हणजे प्रधान आणि पुरुष, अष्टधा प्रकृति आणि असंख्य जीव, यांचा ईश्वर. सांख्य तत्त्वज्ञानाप्रमाणे जगांत अष्टधा प्रकृति आणि असंख्य जीव आहेत. वेदान्त आत्म्याचे नानात्व पारमार्थिक मानीत नाही. त्याच्या दृष्टीने प्रकृति आणि चेतन या दोहोंचा ईश्वर, कोणत्याहि प्रकारें घेतले तरी परमात्मा हा जडचेतन सर्वांचा स्वामी आहे. जड हे स्वतःचा स्वामी बनू शकत नाही. त्यामुळे चेतन हेच त्याचा स्वामी होय. चेतनाचाहि स्वामी अचेतन होऊ शकत नाही. अर्थात् त्याचा स्वामी तेच. परंतु उपाधियोगामुळे चेतनामध्ये नानात्व कल्पिल्यास त्यांचे स्वामित्व कोणा एकाकडेच मानावे लागेल. तो जो एक तोच ईश्वर. अंशी हा सर्व अंशांचा स्वामी होय, बिंब हे सर्व प्रतिबिंबांचे स्वामी होय, त्याप्रमाणे ईश्वर हा सर्व जीवांचा स्वामी आहे. आणि जड प्रकृतीचा तर आहेच आहे. त्यामुळे त्याला यथार्थत्वानें प्रधान-पुरुषेश्वर असे म्हटले आहे.

या श्लोकार्धात योग, सांख्य आणि वेदान्त या तिन्ही दर्शनांचा विचार येऊन गेला आहे. योग, प्रधान-पुरुष, आणि ईश्वर या तीन पदांनी त्या तिन्हींचें सूचन होतें.

२१. नारसिंहवपु
या श्लोकार्धात संध्येतील चोवीस नामांपैकी तीन नामें आली आहेत. संध्येतील चोवीसहि नामें विष्णुसहस्रातूनच घेतली आहेत. वैदिक संध्येचें हें पौराणिक रूप होय. ही चोवीस संख्या आली कोठून ? तीहि वेदांतूनच आली आहे. वेदाचें सार मंत्र होय. " गायत्री छन्दसां अहम् " असें गीतेंत म्हटलें आहे. आणि म्हणूनच संपूर्ण वेद किंवा त्याचा एक भाग मंडल अथवा त्याचा हि एक अंश जें सूक्त तें हि स्वाध्याय म्हणून म्हणतां न आलं तरी द्विजानें गायत्री तरी जपावी. तोच त्याचा स्वधर्म, स्वाध्याय होय. बीजात संपूर्ण वृक्ष सांठवलेला असतो, तसा या गायत्रीरूप वेदसारांत संपूर्ण वेद सामावला आहे म्हणून नित्य वेदाध्ययनासाठी एक गायत्री मंत्र हि जपला तरी पुरें. पण हा अधिकार सर्वाना नाही. तो फक्त त्रैवर्णिकांना मानिला आहे. तेवढयासाठी त्याचें सार संतांनी रामनामात आणून ठेवलें आणि हा " उघडा मंत्र श्रीराम " सर्वांना सुलभ झाला. गायत्री मंत्र आचार्य शिष्याला जवळ घेऊन एकांतात पडद्याआड, कानांत सांगतात. अर्थात् तो दीक्षेशिवाय कोणाला मिळत नाही. आणि ही दीक्षा फक्त अधिकृतालाच मिळू शकते. म्हणून हा गायत्री मंत्र झांकला मंत्र आहे, रहस्यभूत मंत्र आहे. तसा रामनामाचा प्रकार नाही. तो उघद्य मंत्र आहे. परंतु वेद हे आपलें धर्ममूल आहे. त्याची खूण आपल्या धर्माचारांत असली पाहिजे. त्याचे हें ऋण आपण सदैव मनांत बाळगलें पाहिजे. यासाठी गायत्री मंत्रांतील अक्षर-संख्या घेतली, तेव्हां चोवीस अक्षरांची चोवीस नामें ही झाली आपली पौराणिक वा प्राकृत गायत्री. आता ही चौवीस नावें कोणती घ्यायची ? तर ती वैष्णवांच्या प्रसिद्ध विष्णुसहस्रातून घेतली. ती मुख्यतः कृष्णपर आहेत. हे त्यांचा आरंभ केशव नामापासून होत असून अंत श्रीकृष्णनामांत होत आहे आणि मध्यंतरींची त्रिविक्रम, वामन, नारसिंह ही दोन तीन नावे सोडून दिली तर बाकीची सारी कृष्णवाचकच आहेत पावरून उघड आहे. भागवत संप्रदायाच्या सद्दीत यांचे प्रचलन झालें असले पाहिजे. विष्णुसहस्र हे देखील वेदमुलकच आहे. पुरुषसूक्तांतील "सहसशीर्षा पुरुषः" इत्यादि पदांवरूनच सहस्र नामांची कल्पना स्फुरलेली आहे. त्यामुळे विष्णुसहस्र हे वेद-संमितच होय. आणि त्याचे सार म्हणजे ही चोवीस नामें होत. अशा प्रकारे वेदांचा सरळ संबंध विष्णुसहस्राशी आणि त्यातून निवडलेल्या पोवीस नामांशी मोहोपतो. तुकारामांनी म्हटले आहे

"वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाचि साधिला । विठोबासी शरण जावें, निज निष्ठे नाम गावें । " संतांनी काढलेलें हें वेदांचे सार म्हणजे साराचें सार होय. वेदांचे सार गायत्री आणि गायत्रीचे सार देवाचें नाम होय. ॐ म्हणा, नाही तर राम म्हणा; ते एक असून अनंत आहे. तें शतशोऽथ सहस्रशः मनाच्या आवडीनें गायचे, हें नामस्मरण मी समर्थांच्या पुढील ओवीच्या चिंतनांत संपवितों.

चोविसनामी सहस्रनामी । अनंतनामी तो अनामी ।
तो कैसा आहे अंतर्यामी । विवेकें ओळखावा ।

आतां नारसिंह-वपु पदाकडे वळू. नारसिंह-वपु म्हणजे ज्याच्या देहाकृतीत नर आणि सिंह या दोहोंचें दर्शन होतें तो. विष्णूच्या दशावतारांत सृष्टीतील जीवोत्क्रांतीचा संकेत मिळतो. प्रथम मत्स्य केवल जलचर, नंतर कच्छ अधिकतर जलचर आणि कवचधारी पण त्याच बरोबर अंशतः सर्पटणारा स्थलचर, पुढे वराह अंशतः जलचर पण अधिकतर स्थलचर आणि दंतायुध, त्यापाठी नरसिंह पूर्ण स्थलचर आणि नखदंतायुध, या स्थलचरांत हि पुनः नवी उत्कांति दिसून येते. "वराहापर्यंत केवळ तिर्यक् योनि आहे, तर या नरसिंहापासून मानुष तृष्टीचा आरंभ होत आहे. हा आदि मानुष अर्थात् पशु आणि मानव दोहोंचा सांधा आहे. तो मानवपशु नाहीं तर पशुमानव आहे. त्याची गति मानवत्वाकडे आहे. ही ऊर्ध्वगति आहे. उत्क्रांति आहे. सर्व जीवांचे डोके जमिनीकडे तर याचे उंच आकाशाकडे आहे. ह्याचा मुखवटा सिंहाचा आहे, पण आहे तो नर. मुखवटा सिंहाचा कां ? तर सिंहाप्रमाणे त्याच्या मानेवर लांब केसांचे झुबके पिंजारलेले आहेत. नखें वाढलेली आणि तीक्ष्ण 'आहेत. दांतानी तो फाडतो तोडतो आहे. कृत्रिम हत्यारे त्याने अद्याप निर्मिलेली नाहीत. तो नखदन्तायुधच आहे. म्हणून तो सिंह. असा हा नरसिंह देवाचा जीवसृष्टीतील पहिला पुरुषावतार आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व आगळे आहे. तों अभक्तांना, परपीडकांना भयंकर, पण भक्तांना जीव-वत्सलांना अभयंकरच आहे, वरदच आहे. मनुष्य हा ' जीवसृष्टीतील दुर्बल-जिघांसु, हिस्रांचा पहिला शास्ता होय. तो द्रोहाचा द्रोह करणारा आणि दयेचा पोशिंदा आहे. त्यामुळेच सर्व जीवांचे राजेपण, नृसिंहत्व त्याचेकडे आले आहे. नृसिंहाची उपासना ही भूतहितेरतीची, अभयाची, दीक्षा होय. मानुषजन्माच्या साफल्याचे तें दिग्दर्शन आहे. नरसिंहाची उपासना माणसाला पशुत्वांतून, मात्स्यन्यायांतून सोडवून दयेच्या दिव्यत्वाकडे अग्रसर करते.

उद् वयं तमसः परि, ज्योतिः पश्यन्त उत्तरम् ।
देवं देवत्रा सूर्यम्, अगन्म ज्योतिर्उत्तमम् ॥
दयेचा दिव्य किरण जो निर्दयतेच्या तमिस्राचा भेद करून उगवतो त्यावर दृष्टि लावून आम्ही उत्तरोत्तर प्रगति करीत त्या दयासहस्ररश्मीला गांठू.

सिंह हा भयंकर आहे. नर अभयंकर आहे. ' नरसिंह हा सज्जनांना अभयंकर असून दुर्जनतेला भयंकर आहे. तात्पर्य, नरसिंहाचें नरसिंहत्व त्याच्या निग्रहसामर्थ्यगर्भ सज्जनानुग्रहरूप अभयंकरत्वांतच आहे. निर्भय होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सर्वांना अभय देगें. आन्द्रोक्लिज आणि सिंह यांच्या गोष्टींत अभयाचें हें सामर्थ्य चांगलें प्रकट झाले आहे. सिंह सर्वांना भयंकर पण तो हि आंद्रोक्लिजापुढे नमला, अभयंकर झाला. कारण नराने आपल्या दयारूप नरत्वाने सिंहाचें हिंस्रत्वरूप भयंकरत्व हिरावून घेतले आणि त्याला आपला भक्त बनवलें. ' बुभुक्षितः कि न करोति पापम् ' म्हणून म्हटले आहे. पण आंद्रोक्लिजानें आपल्या दयालुत्वरूप नरत्वानें तें खोटें पाडले. अत्यंत भुकेल्या सिंहाने हि आंद्रोक्लिजाला फाडून खाल्ले नाही, कृतज्ञतेने त्याचे पायच चाटले. अशा प्रकारे नराने आपलें सिंहत्व, श्रेष्ठत्व, प्रस्थापित केलें. हे श्रेष्ठत्व, त्याच्या सर्वाभयदानांत आहे, अहिंसेंत आहे, अहिंस्रतेत आहे. सिंहाचें सिंहत्व त्याच्या सर्वाधिक हिंमतेंत, भयंकरतेंत आहे, तर नरसिंहाचे सिंहत्व त्याच्या अभयंकरतेतच आहे.

नरसिंहाचें जें महाभयानक रूप दिसतें तें वस्तुतः नरसिंहाचे नसून हिरण्यकशिपूच्या दुर्जनतेचे आहे. त्याच्या विश्वद्रोहाचे रूप आहे तें. भगवान् नृसिंह तर आदर्शवत् निरञ्जन आहे. त्यांत दिसणारें अक्राळविक्राळ रूप त्याचे नाही, समोरच्याचे आहे.

२२ श्रीमान्
श्रीमान् म्हणजे श्रीयुक्त असे समजले जाते. परंतु धीयुक्त आणि श्रीमान् यांत मी अंतर करतो. श्रीयुक्त म्हणजे एखाद्या बाह्य श्री नामक द्रव्यार्थ पदार्थाने युक्त. परंतु श्रीमान् म्हणजे सहज अशा श्रीनामक भावाने, गुणानें संपन्न. युक्त पद बाह्य पदार्थाचे स्वामित्व सूचित करते. मत्-प्रत्यय अंगभूत विभूतीचे स्वामित्व दर्शित करतो. परंतु हा सूक्ष्म विचार व्यवहारांत, पाळला जात नाही आणि नेमकेपणाने व्यवहाराचें साधन होणारी शब्दशक्ति अयथावत् अर्थ म्हणजे प्रांति निर्माण करते, गैरसमजास कारण होते. म्हणून सरस्वतीची उपासना केली पाहिजे. तिच्या उपासनेनेच सर्व सिद्धि होईल. अशी ती सिद्धिदात्री आहे, म्हणूनच तिला सार-दा म्हणतात.

लक्ष्मी आणि सरस्वती यांचे पटत नाही अशी समजूत आहे. पण ती खरी नसून गैर आहे. कारण सर्व सद्गुणांचे परस्परांशी सख्यच नव्हे तर ऐक्य आहे म्हटले तरी चालेल. कारण ते सर्व सन्मूलक आहेत. मग लक्ष्मी आणि सरस्वती यांचे पटत नाहीं असें जें म्हटले जाते ते का ? त्याचे कारण लक्ष्मीविषयींची, विपरीत धारणा होय. लक्ष्मी म्हणजे पैसा नव्हे. लक्ष्मी म्हणजे आत्म्याची प्रभा. लक्ष्मी म्हणजे कोणाचा द्रोह न करतां स्व-परिश्रमाने व नेकीने संपादन केलेली संपत्ति. अर्थात् लक्ष्मी म्हणजे ती संपत्ति की जी दैवी गुणांची द्योतक आहे. हिचा सरस्वतीशी मुळीच विरोध नाही. उलट ती पोषकच आहे सरस्वतीला. सुभाषितकारानें "अकृत्वा परसंतापं, अगत्वा खलनम्रताम् । अनुत्सृज्य संतां वर्त्म, यत् स्वल्पमपि तद् बहु ॥ " म्हणून ज्या धनाचा उल्लेख केला आहे ती लक्ष्मी होय. परंतु जो असत्य व हिंसा करून लुबाडला जातो तो पैसा म्हणजे लक्ष्मी नसून अवदसा होय. या अवदसेचा सरस्वतीशी, की जी सर्व-शुक्ला आहे, पूर्ण विरोध आहे. लक्ष्मी ही विष्णूच्या पायाची दासी आहे. अशेष गिळून शेष उरलेला जो आत्ममहिमा त्याच्या अंकावर पहुडलेला जो परमात्मा त्याला चरण-शरण असलेली जी सत्चिद्आनंदमयी अनपायिनी स्वरूप-शोभा ती म्हणजे लक्ष्मी होय. जी लक्ष्मी तीच भागवताने म्हटल्याप्रमाणे, "श्रीगुणा नैरपेक्ष्याद्याः" होत, परमेश्वर हा सदैव श्रीमानच असावयाचा. जसा सूर्य हा शुतिमान, चंद्र कौमुदीमान्, अग्नि उष्णतामानच असू शकतो, तसा परमेश्वर हा श्रीमान् आहे. तो श्रीवियुक्त असूच शकत नाही. श्री ही त्याची निजशक्ति आहे. अंगभूत आहे आणि म्हणून श्रीमान् हें परमेश्वराचे नित्य-विशेषण होय. त्यामुळेच त्याला भगवान् म्हणतात. त्याचमुळे त्याचा नव्हे तर त्याच्या विभूतींचादि उल्लेख श्रीपदपूर्वकच केला जातो. जीवाचा उल्लेख तसा श्रीपदपूर्वक केला जात नाही, तोहि त्याचमुळे. 'श्रीभगवान् उवाच' असे बोलले जाते, पण 'श्री अर्जुन उयाच नव्हे तर नुसते "अर्जुन उवाच", "संजय उवाच", "धृतराष्ट्र उवाच', असेंच म्हटले जाते. कारण, ते सर्व अनीश्वर आहेत. लक्ष्मी ही ईश्वराची निजशक्ति आहे, अर्धागिनी आहे. तोच एक लक्ष्मी-पति आहे, बाकी सारे भिक्षापति !

विष्णुसहस्रांत श्रीमान् हे पद तीनदा आलें आहे. त्याशिवाय श्रीश, श्रीपति, श्रीधर, श्रीनिधि, श्रीवास, श्रीनिवास आणि लक्ष्मीवान् इत्यादि हि पदें आलेलींच आहेत. ती सर्व समानार्थक असून शिवाय विविध आणि विशिष्ट अर्थाची वाचक आहेत.

२३. केशव .
केशव पदाची व्युत्पत्ति वा निरुक्ति दोन-तीन प्रकारें लावली जाते. (१) केशव म्हणजे सुंदरं केश धारण करणारा, (२) क् अ आणि ईश यांचा अर्थात् ब्रह्मा विष्णु महेश यांचा प्रभु आणि (३) केशी- नामक दैत्याचा वध करणारा. यांपैकी पहिली व्युत्पत्ति ही शब्द-शास्त्रानुसार ठीक असली तरी ती ईश्वराचे काही चिंतनीय वैशिष्ट्य प्रकट करीत नाही. प्रशस्त स्निग्ध नील कुंचित कुंतल धारण करणारा हे वर्णन सामान्य आहे. तें अलौकिक म्हणतां यायचे नाही. सुंदर केशकलापाने युक्त अनेक असू शकतील. त्यांत परमेश्वरी विभूतिमत्त्व कोणतें ? इतर दोन अर्थ परमेश्वराचे माहात्म्य आणि पराक्रम सूचित करणारे आहेत खरे, पण ते कृत्रिम आहेत. ते मनास येत नाहींत. म्हणून मी वेगळीच व्युत्पत्ति, निरुक्ति लावतों. ’ के जले शवायते इति केशवः' जलशायी. सृष्टीच्या आरंभी जें अव्यक्तसंज्ञक जसच जल भरून होते त्याच्या तळाशी जो विश्वाचा अव्यय कंद "आनीत् अवातं स्वधया " प्राणापानाशिवाय स्वशक्तीने स्पंदत होता, तोच केशव होय. तो श्वसन आणि चलनवलन करीत नव्हता. म्हणून त्याला "शवायते" म्हणावयाचे, पण तो शव नव्हे. शव असता तर पाण्यावर तरंगला असता. हा तर बुडाशी असणारा अर्थात् तो सर्व प्राणांचें स्तंभन करून बसला होता. बसला होता म्हणणेहि बरोबर होणार नाही. कारण बसण्याला शरीर तोलून धरावे लागते. तेवढी हि क्रिया तो करीत नव्हता. म्हणून तो निजला म्हणायचे. पण निजण्यांतहि गुणाधीनता येते. तमोगुणाच्या अधीन झाल्याशिवाय निजता येत नाही. म्हणून म्हणावयाचें की तो पहुडला होता. पहुडण्यांत स्वातंत्र्य आहे. तेव्हा केशव म्हणजे सृष्टीपूर्वी अव्यक्ताधार होऊन राहिलेला ' स्वे महिम्नि ' प्रतिष्ठित परमात्मा, याचेच ध्यान "शांताकारं भुजगशयनं " इत्यादि श्लोकांत केले आहे. तिथे केशव ऐवजी विष्णु पद घेतले आहे. पण त्याचाहि आशय केशव पदासारखा आहे. सर्व विश्वाकार गिळून अव्यक्ताच्या अंतरांत खोल खोल शिरून बसलेला अक्षर परमात्मा असाच आहे. सर्वांच्या मुळाशी स्वयंभु निराधार असें कूटस्थ अक्षरब्रहा निमित्तकारण. त्यानंतर तदाधार अव्यक्त, सर्व व्यक्ताचे उपादान कारण. त्यांतून हे व्यक्त सगुण-साकार ब्रह्माण्ड आणि त्या ब्रह्माण्डाचा एक अंश म्हणजे ही सर्वजीवनिवास अशी पृथ्वी. असा हा सृष्टीचा वंशवृक्ष आहे.

नारायणः परोऽव्यक्तात्
अण्डं अव्यक्त-संभवम् ।
अण्डस्यान्तस् त्विमे लोकाः
सप्त-दीपा च मेदिनी ॥
या श्लोकांत हाच आशय ग्रथित झाला आहे. इथे जो नारायण म्हटला तोच केशव होय

२४. पुरुषोत्तम
पुरुषोत्तम म्हणजे सर्व पुरुषांमध्ये वरिष्ठ पुरुष, पुरुष म्हणजे चेतन. सृष्टींत (१) जड प्रकृति, (२) सवासन जीव, आणि (३) निर्वासन परमात्मा असे तीन पुरुष दिसून येतात. पैकी जड प्रकृतीला पुरुष मानायला अडचण भासते. जिच्या ठिकाणी चेतनाचा प्रमुख गुण जो.साक्षित्व तो दिसत नाही तिला पुरुष कसे मानावयाचें ? परंतु हे सारे विश्व पुरुषरूप आहे, आत्मरूप आहे असें श्रुति सांगते : "पुरुष एव इदं सर्वम्' त्या अर्थी ज्याला आम्ही जड प्रकृति म्हणतों ती हि जड नसून चेतनच आहे असे मानले पाहिजे. त्या जडाच्या ठिकाणी असणारे चेतन परमर्षीच्या सूक्ष्म दृष्टीला दिसते. म्हणून ते समोर पहात असल्याप्रमाणे म्हणतात :- " ईशावास्यमिदं सर्व यत्किंच जगत्यां जगत् " जगांत में कांहीं जीवन आहे तें सारे ईश्वराने वसविलेले आहे. जडाचे ठायीं असलेलें चेतन हे गुप्त आणि सुप्त असे आहे. तें सामान्य दृष्टीला आकळलें नाहीं तरी त्यामुळे तें अचेतन ठरत नाही आणि म्हणून त्याचीहि गणना परमार्थात चेतनांतच करावी लागते. शिवाय चेतनापासून जड आणि जडापासून चेतन निर्माण होत असलेले आपण पाहतच आहोत. याचा अर्थ ती दोन्ही एकराशिच आहेत असा होतो. त्यांतील फरक हा औपधिक आहे, वास्तविक नाही. प्रकृतिगत चेतन आणि जीवरूप चेतन ही दोन्ही चेतनें, हे दोन्ही पुरुष सोपाधिक आहेत. आणि म्हणून या दोहोहून वेगळा आणि वरिष्ठ असा तिसरा पुरुष परमात्मा हा पुरुषोत्तम म्हटला आहे. "अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः " असें भगवद्-गीतेत स्पष्टच म्हटलें आहे. देवाच्या सहस्रनामांत हे नाम सर्वोपरि आहे. देतानी सर्व नामें त्याच्य्च्च या तीन रूपांनी, तीन पुरुषांचींच नामें होत. "या उपाधीमाजी गुप्त । चैतन्य असे सर्वगत । तें तत्त्वज्ञ संत | स्वीकरिती ॥" ज्ञानदेवांनी या शब्दांत त्याच सर्वगत चैतन्याचे, परमात्म्याचे, पुरुषोत्तमाचे निरूपण केलें आहे.
व्यवहारांत आपण "मी" हा उत्तम पुरुष, " तूं" हा मध्यम पुरुष, आणि "तो" हा तृतीय पुरुष म्हणतों. आणि या सर्वांना पुरुष-वाचक मानतों. अर्थात् या सर्वांनी व्यक्त होणारे जडचेतन सर्व पदार्थ पुरुषच आहेत, चेतनच आहेत, असें मान्य करतों में उघड आहे.

या सर्व पुरुष वाचकांत मी हा उत्तम पुरुष मानिला आहे. कारण तो अंतरतर आहे, आत्मरूप आहे, ज्ञातृस्वरूप आहे. आणि बाकीचे सारे ज्ञेयस्वरूप आहेत, मानविषय झालेले आहेत. अर्थात् भिन्नत्वाने मानविषय न होऊ शकणारें में सर्वांतर्यामी निजरूप ते म्हणजे उत्तम पुरुष उर्फ पुरुषोत्तम होय.

अशा प्रकारे लोकांत म्हणजे व्यवहारांत आणि वेदांत म्हणजे शास्त्रांत अर्थात् सर्वत्रच एकच तत्त्व पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे.

हे पुरुषोत्तम-तत्त्व इतकें प्रसिद्ध आहे की त्याला शोधायला निघणार्‍याचा उपहास व्हावा. अतिप्रसिद्धत्वामुळे ते विस्मृत होऊन गेलें आहे. म्हणूनच संतांनी म्हटलें आहे -

पानीमें मीन पियासी ।
मोहे सुन सुन आवत हांसी ॥

पुरुषोत्तम म्हणजे पुरुषांमध्ये उत्तम किंवा पुरुषांहून उत्तम, असा विविध विग्रह केला जाईल. वेदान्तांतील पुरुषोत्तम हा पुरुषांहून उत्तम आहे, तर व्याकरणांतील पुरुषांत उत्तम आहे. दोहोंनें तात्पर्य अभिन्नच आहे.

सर्वः शर्वः शिव: स्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः ।
सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः ॥४॥


२५. सर्व
परमेश्वराचें यथार्थ वर्णन कोणत्या शब्दाने करता येईल ? शब्दशक्ति परिमित आहे. परिमितता हेच तिचें स्वत्त्व आहे. जो शब्द एकमेवाद्वितीय अर्थ व्यक्त करीत नाहीं तो कसला शब्द ! त्याला अशब्दच म्हणावे लागेल. आणि असे जर आहे तर शब्दानें परमेश्वराचे वर्णन कसे करता येईल. तो परमेश्वराचे असर्वच वर्णन करतो. पण म्हणून शब्द आपलें शब्दत्व, आपला स्वभाव कसा सोडील ? तो यथाशक्ति आणि सामर्थ्य एकवटून परमेश्वराला "सर्व' म्हणून संबोधितो. आता त्याचे निःशेष संपूर्ण वर्णन झालें. तुम्ही त्यांत अमुक एक न्यून म्हणतांच "सर्वांत त्याचा अंतर्भाव आहेच' असे शब्द बजावणार ! या सर्वांत असर्वहि आलें इतकी आहे सर्वाची व्याप्ति. कारण आणि कार्य दोन्ही मिळून सर्व होते. दोन्ही एकएकटी असर्व. आतां कारणांत कार्य निहित आणि कार्यात कारण गृहीत असल्यामुळे त्यांनाहि सर्व म्हणतां येईल. पण मग त्या स्थितीत ती भिव्रत्वाने कार्यकारण म्हणून राहणार नाहीत. परमेश्वर कारण आणि कार्य दोन्ही असल्यामुळे तो सर्व आहे. 'सर्व समाप्नोषि ततोऽसि सर्वः' असें गीतेंत ठीकच म्हटले आहे.

ज्ञातृ, ज्ञेय आणि ज्ञान' ही तिन्ही तोच असल्यामुळेहि परमेश्वराचे 'सर्व' नाम अन्वर्थक होय.

२६. शर्व
शर्व म्हणजे शीर्ण करणारा, परमेश्वर हा कालरूपाने आयुष्याचा, स्वजनांचा, धनाचा र्हास करीत असतो. अशा प्रकारे जीवापासून त्याचे हे सारे पाश तो छेदीत असतो. जीवाला या संहार-प्रक्रियेने तो वैराग्य आणि ज्ञान यांची पुरवणीच करीत असतो. ही त्याची परम कृपाळूता होय. या कृपाळतेचा चरम टप्पा म्हणजे जीवाला आपलें केवळ निरुपाधि शिवस्वरूप, निजरूप लाभणे. नांव शर्व म्हणजे संहर्ता, अपहर्ता, पण करणीने उपकर्ता, भर्ता, " नांव सोनूबाई हाती कयलाचा वाळा " त्याचा हा उलटा प्रकार. ही ' नाथांच्या घरची उलटी खूण आहे. म्हणूनच जो शर्व, जो हर, तोच शिव, तोच शंकर म्हटला आहे; आणि ठीकच म्हटला आहे.

२७. शिव
शिव म्हणजे केवल-स्वरूप. जिथें त्रिगुण-प्रपंच शमला आहे. जिथे केवल नैर्गुण्य आहे, जिथे अद्वैत आहे असें तें तुरीय पद म्हणजे शिव. तद्व्यतिरिक्त तें सारें शव. कारण तिथे ना सत्, ना चित्, ना आनंद, श्मशानच म्हणायचे तें. त्या या जगद्प श्मशानांत जड जीवरूप शवाच्या मेळाव्यांत शिव ध्यानस्थ बसला आहे. प्रपंचाच्या चितेचे भस्म त्याने आपल्या सर्वागावर चर्चिलें आहे. नर-रुंडमुंडांच्या मालिका (त्यांचा शिरच्छेद न करतांच) सूत्रात्मक त्यानें धारण केल्या आहेत. इथे केवल-रूपाने शिव तोच विष्णु आणि विष्णु तोच शिव होय. कारण, वस्तु एक, नांवें अनेक, असा हा प्रकार आहे. जो शिव तोच ब्रह्मा आणि तोच विष्णु. ही मूर्तित्रयी असेल, वस्तुत्रयी नव्हेच. वस्तु एकमेवाद्वितीयच आहे आणि ती तुरीय म्हटली आहे.

२८. स्थाणु
स्थाणु म्हणजे स्थिर, स्थितिशील, परमात्मा पूर्ण आहे. सर्वार्थ-सिद्ध आहे. त्याला काही एक मिळवावयाचे नाही आणि त्यासाठी म्हणून कांहीं हालचालहि करावयाचे कारण नाही. म्हणूनच तो स्थाणु. ज्याला वासना असतात तो जीव वासनांच्या योगें जळत आणि चळत असतो. परंतु जो स्वयंतृप्त आहे तो परमात्मा कशासाठी घडपड करील ? तो निरग्नि आणि निष्क्रिय असा संन्यासी आहे. संन्यासी असा या जगांत तोच आहे.

जियें अपूर्णता असते, तिथेंच गति संभवते. समुद्र पूर्ण आहे म्हणून त्यांत नदीसारखा प्रवाह नाही. पण त्यांतहि भरती ओहोटी आहेच. पण ती आकाशांत नाही. कारण ते परिपूर्ण आहे. परमात्मा हा त्यापेक्षा किती परिपूर्ण म्हणावा ? आकाश आणि अनीश्वर सारेंच सद्वितीय आहे, तर परमात्मा हा एकमेवाद्वितीय आहे. त्यामुळे तो स्थाणु, कूटस्थ म्हटला. त्याची वाढ-घट होऊ शकत नाही, म्हणून स्थाणु, स्थाणु म्हणजे खुंट हा जसा पाना-फलांनी वाढत नाहीं, तसा तो ती गळून घटत नाही. तसा हा परमात्मा आहे. त्याला जन्मादि षड्भाव नाहींत. म्हणून तो स्थाणु.

"सर्वः शर्वः शिवः स्थाणु :" या चरणांत हरिपाठांत हरपाठ मिसळला आहे. सारेच पाठ त्यांत मिसळले आहेत वस्तुतः, कारण हरिनाम हें सर्व-व्यापी आहे. ज्ञानदेवाने म्हटलेच आहे. " एकनाम हरि द्वैत नाम दुरी " एक हरिनाम घेतल्यावर दुसरें नांव घ्यायला मुळी काही उरतच नाही. . असें अद्वैत जिथे झालें, तिथे जे कोणतें नाम घेऊ ते सारेच हरिनाम झालें, या दृष्टीने ह्या चरणांत आरंभीच आलेलें सर्वनाम साभिप्राय म्हटले पाहिजे. हत्तीच्या पावलांत जशी सर्व पावलें येऊन गेली तशी हरिनामांत सर्व नामें. कारण तें नुसतें सर्वच नाही तर अति-सर्व आहे.

मुलाच्या मुखाला चाळा असतो. तो बाराखडी घोकू लागतो. तसा भक्ताच्या मुखाचा चाळा सहस्रांत वारंवार प्रकटला आहे. आरंभी जे अक्षर आलें मुखांत, त्यानेंच नाममाला सुचली आणि रचली आहे. 'विश्वं विष्णुर वषट्कारः' ही व ची बाराखडी. "भूत-भव्यभवत्-प्रभु !" ही आणि त्या पुढीलहि "भूतकृत भूतभृत् भावो भूतात्मा भूतभावनः" ही भची बाराखडी. तशी इथे " सर्वः शर्वः शिवः स्थाणुः" ही स-शची बाराखडी आली आहे अथवा म्हणा पाढा आला आहे.

मनाच्या उड्या विलक्षण आहेत. ते कधी साधर्म्य तर कधी वैधर्म्य, कधीं संगति तर कधी विसंगति, कधी संश्लेषण तर कधी विश्लेषण, असे नाना भाव लक्षून ' एकत्वेन पृथकत्वेन ब्शुधा विश्वतोमुखम् ' संचार करीत असते. मनाचा हा मनस्वीपणा सहस्रांत सर्वत्र पहायला मिळतो.

२९. भूतादि
भूतादि म्हणजे भूतांचा उगम. ज्याप्रमाणे आपल्या उद्गमस्थानांतून सहस्रावधि बिंदुमालिकांच्या रूपाने प्रवाहित होऊन नदी समुद्राला मिळते, त्याप्रमाणे ही समस्तभूत-सृष्टि परमात्यापासून उद्भूत झाली आहे, उद्गत झाली आहे. नदीला एक उद्गम असतो, एक परायण असते. परायण म्हणजे अंतिम मुक्काम. आणि या दोहोंच्या दरम्यान ती तरंगित होत असते. त्याप्रमाणे ही सृष्टिहि अक्षर परमात्म्यापासून उद्गत होऊन, अव्यय निधिरूप त्याशींच संगत होत असते. मध्यंतही तिचें व्यक्त जीवन, हा सारा प्रपंच, क्षणिक होय, क्षर होय, एखाद्या झाडाचे जीवन केव्हां सफल मानले जाते ? जेव्हां में बीज पेरलें तेंच बीज फलरूपाने तें धारण करते तेव्हा. तसें जेव्हां ही भूतसृष्टि परमात्म्यापासून उद्गत होऊन परत परमात्म्यास गांठते तेव्हांच ती सफल होते, कृतार्थ होते. हाच आशय तुकारामानें

"तुका म्हणे बीजें, बीज दाखविलें
पत्र पुष्प आले, गेलें वायां ॥ "

अशा शब्दांत प्रकट केला आहे. मधली सृष्टि ही सारी अशी अनित्य आहे. नित्य एक अक्षर परमात्माच आहे, जो ह्या सृष्टीचा उद्गम तसाच परायण आहे. पुढील नाम " अव्ययः निधिः" हे 'भूतादिः" या पदाबरोबर वाचलें म्हणजे दोहोंची अशी संगति लागते. त्याचसाठी भूतादीच्या पाठोपाठ " अव्यय निधि' हे नाम उच्चारिलें आहे.

३०. अव्यय निधि
अव्यय निधि म्हणजे अक्षय सांठा, संग्रह. सर्व सृष्टि ही परमात्म्याच्या ठायीं मिळून समाप्त होते. त्यांतच . ती भरलेली असते, निहित असते. म्हणून तो निधि, आणि ज्या अर्थी ही सृष्टि त्या परमात्यापासून असंख्य वार निघून त्यांतच निमाली आहे, त्याअर्थी तो अव्यय होय. कितीहि वेळा ती त्यापासून निघाली तरी त्याचा सांठा अणूमात्र हि रिता झाला नाही. एखाद्या जलाशयांतून जर खूप पाट काढले तर तें जलाशय उधळ होते; प्रसंगी संपूहि शकते. परंतु समुद्र हा कधी असा रिता वा शून्य होणे नाही. त्याप्रमाणे परमात्मा हा अक्षय आहे, नव्हे, अक्षय्य आहे. म्हणून त्याला अव्यय निधि म्हटलें तें युक्तच आहे.

३१. संभव
संभव म्हणजे सर्वत्र आणि सर्वदा होणारा. होणारा खरा, पण काय होणारा ? ज्या अर्थी अमुक एक होणारा असें कांहीं उपपद जोडलेलें नाहीं त्या अर्थी ( अर्थात् निरुपपद प्रयोगावरून ) सर्व-संभव, सर्व काही होणारा, असा त्याचा अर्थ होतो. में संभवनीय आहे ते सारें तो आहे आणि असंभवनीय खरोखर काय आहे ? कल्पद्रुमाला सारेंच संभवनीय आहे. तो साक्षात् संभव आहे.

३२. भावन
भावन म्हणजे भाव, सत्ता, अस्तित्व देणारा. परमेश्वर सर्व-भावन आहे. तो या चराचर विश्वाला आणि अविश्वाला हि निर्माण करणारा आहे. परमेश्वर विश्व आणि शून्य दोहोंचा हि स्वामी आहे. तो कल्पारंभी विश्वभावन होतो आणि कल्पांती शून्य-भावन होतो. दोन्ही हि स्थितीत तो भावनच आहे. दिसायला तो कल्पारंभी विश्वसृक्दिसतो आणि कल्पांती विश्वांतक भासतो. परंतु वस्तुतः तो अविश्वाची शून्याची, सृष्टि करीत असतो. शून्याची सृष्टि म्हणजे अभावाची सृष्टि नव्हे. शून्याची सष्टि म्हणजे स्वरूप-स्थिति होय, अशुन्याची सृष्टि म्हणजे विश्वरूप स्थिति होय. आणि म्हणूनच तो, सदैव म्हणा वा सर्वत्र म्हणा, भावनच आहे.

३३. भर्ता
भर्ता म्हणजे भरण करणारा, जीवाचे जनन झाल्यानंतर त्याचे भरण करावे लागते. तो स्वतः आपलें भरण करण्यास अक्षम असतो. अशा कृपण म्हणजे कीव करण्याजोग्या पराधीन जीवांना जो मातापित्यांच्या आणि इतर सर्वच पूर्वजांच्या हृदयांत प्रेमाचा, वत्सलतेचा, पान्हा पुरवून त्यांचे भरण आणि पोषण करतो तो परमेश्वर हाच एकमेव भर्ता होय. हे परमेश्वराचे विश्व-भर्तृत्व परोक्ष आहे. त्यामुळे ते आम्हाला दिसत नाही. परंतु देवांची रीत ही अशीच असते, ते परोक्षप्रिय आहेत. ते गुप्तपणे सर्व कांही करीत असतात आणि तेच करीत असतात. आम्हांला वाटते, हा करतो तो करतो, आई भरवते, बाप पाळतो. पण हा सर्व वरवरचा देखावा आहे. सूत्रधार वेगळाच आहे. शकुंतलेला पक्ष्यांनी भरवलें, कण्वाने वाढविलें. वृक्ष-वनस्पतींनी आणि मृगमृगींनी तिला स्वजन मानिले इत्यादि. हे खरे शाकुंतल आहे. त्यांतच परमेश्वराचें भर्तृत्व भरलेलें आहे. ते भर्तृत्व लक्षून तिला जो पुत्र झाला त्याला ऋषीने भरत नांव दिलें ज्यावरून आपल्या देशाचे व प्रजेचें नांव भारत पडलें आहे.

३४. प्रभव प्रभव म्हणजे प्रकृष्ट भव. प्रथम भव. विश्वोत्पत्तीस कारणीभूत कारणांचा जन्म. परमेश्वर ब्रह्मदेवादि विश्वस्रष्ट्यांना आणि महाभूतादि कारणांना उत्पन्न करून त्यांच्या करवीं विश्वरचना करतो. हे जे प्रथम भवन, ही जी आद्या सृष्टि, तोच प्रभव होय. परमेश्वर अव्यक्त होता तो प्रथम व्यक्त झाला. अव्यक्त म्हणून सूक्ष्म होता, तो व्यक्त होऊन प्रभूत झाला. म्हणून त्याच्या ह्या प्रथम आणि प्रभूत प्रकटीभवनाला प्रभव म्हणावयाचे. या प्रभवांतूनच मग सर्व सृष्टीचा संभव होतो. म्हटलेंच आहे गीतेंत
मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भ दधाम्यहम् ।
संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत ॥ गीता १४- ३

३५. प्रभु
परमेश्वर विश्वाचा प्रभव आहे, जननी जनक आहे; तसा ह्या सृष्ट विश्वाचा तो प्रभु म्हणजे पालक हि आहे. या सृष्टीतील चराचर जीवांना तो वासना कर्म आणि ज्ञान देऊन त्यांचे पालन करीत आहे. वासनाधीन होऊन जीव देह धारण करतो, देहाने वासनापूर्तीसाठी नाना कर्में करतो, त्यांचे बरे-वाईट फळ भोगतो आणि तद्वारा सृष्टीचे आणि आपलें स्वरूप समजू लागतो. प्राप्त ज्ञानानुसार हळूहळू प्रगति करीत "बहूनां जन्मनां अन्ते," परमेश्वराला म्हणजे पूर्ण ज्ञानाला प्राप्त होतो. या साऱ्या प्रवासांत परमेश्वर त्याचा " सोयरा सांगाती" असतो, प्रभु असतो. "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हातीं घरुनिया" असें हें प्रभुत्व, परमेश्वराचे पालकत्व व चालकत्व, भक्त ओळखतो, अभक्त ओळखत नाहीं इतकेंच. परंतु तो प्रभु तर विश्वप्रभु आहे. भक्तांचा तसा अभवतांचा हि प्रभु आहे. तो सर्वांना सांभाळीत आहे.

३६. ईश्वर
परमेश्वर विश्वाचा प्रभव, प्रभु तथा ईश्वर महणजे नियन्ता आहे, शास्ता आहे. हे विश्व त्याच्या आत आहे. त्याच्या आदेशावांचून झाडाचे पान हि हलू शकत नाही. त्याच्या भयाने सूर्य तापतो आहे, मेघ वर्षत आहेत, वारे वाहत आहेत. त्याच्या भयाने पर्वत जागचे हलत नाहीत आणि नद्या सारख्या धावतच आहेत. ईश्वराचे हे ईश्वरत्व म्हणजे वस्तूंचा स्वभावधर्म होय. आपला स्वभावधर्म कोणी सोडूं शकत नाही, त्याविरुद्ध कोणी जाऊ शकत नाही. हे ईश्वरी शासन जो मोडूं पाहील, तो मोडेल. जो तें ओळखून स्वधर्माचरण करील तो ईश्वरी कृपेस पात्र होईल. हिंदु धर्माचे म्हणजे वर्णाश्रम-धर्माचें हें प्राणतत्त्व आहे. गीतेंत भगवान् कृष्णाने हेच परोपरीने प्रतिपादिले आहे. गीतेचा मुख्य संदेश हाच आहे :
(१)
ये मे मतं इदं नित्यं अनुतिष्ठन्ति मानवाः ।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ गीता ३ - ३१

ये त्वेतद् अभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् ।
सर्वज्ञानविमूढांस् तान् विद्धि नष्टान् अचेतसः ॥ गीता ३ - ३२

(२)
यद् अहंकारमाश्रित्य न योत्स्ये इति मन्यसे ।
मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति ॥ गीता १८ - ५९

स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा ।
कर्तु नेच्छसि यत् मोहात् करिष्यस्यवशोऽपि तत् ॥ गीता १८ - ६०

. (३)
ईश्वरः सर्वभूतानां हृदेशेऽर्जुन तिष्ठति ।
भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूदानि मायया || गीता १८ -६१

तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत ।
तत्प्रसादात् परां शान्ति स्थान प्राप्यसि शाश्वतम् ॥ गीता १८ - ६२

प्रभव, प्रभु आणि ईश्वर ही त्रिपदी आहे. ती संपूर्ण विश्वजीवन परमेश्वराधीन आहे हे प्रकट करीत आहे.

स्वयंभूः शम्भूरादित्य: पुष्कराक्षो महास्वनः ।
अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः ॥५॥


३७. स्वयंभू
ईश्वर आणि अनीश्वर यांत एक महत्त्वाचा भेद असा की अनीश्वर म्हणजे जीव, हा स्वयंभू असत नाहीं, तो कर्म-परतंत्र असून कोणापासून तरी जन्मतो. परंतु ईश्वर,हा स्वाधीन आणि स्वयंभू आहे. तो कोणापासून झालेला नाही. ईश्वराचा हा भाव दुसऱ्या कोणालाच प्राप्त नाही. ते सर्व ईश्वरापासून निर्माण झाले आहेत. पण ईश्वर हा दुसऱ्या कोणापासून, कोणा परमेश्वरापासून, झालेला आहे असें म्हटलें तर तो ईश्वर न राहता अनीश्ववर होईल. जगाचें मूल कारण हे एकमेव आणि स्वयंभूच मानावें लागेल. तसें न मानले तर अनवस्था-प्रसंग ओढवेल. पुराणांतील ती गोष्ट प्रसिद्धच आहे सत्राजिताची. अमक्याचा बाप सत्राजित्, सत्राजिताचा बाप कोण ? तर विनोदी पुराणिक म्हणतात, अठराजित् आणि अठराजिताचा ? एकोणीसजित्. आतां ही मालिका संपायची कुठे ? कुठेतरी जाऊन ती संपवावीच लागेल, आणि त्याला एक आणि स्वयंभूच मानावें लागेल. परमेश्वर हा तसा या सर्व विश्वाचे आदिकारण आहे, आणि एक म्हणजे तो एकमेवाद्वितीय आणि स्वयंभू आहे.

स्वयंभू शब्दानें तो परमेश्वर स्वतःच म्हणजे (१) आपलेंच उपादान घेऊन आणि (२) आपल्याच शक्तीने हे विश्व निर्माण करतो असे सुचविलें आहे, असें म्हणता येईल. कुंभाराला मडकें तयार करावयाचे झाले तर त्याला माती लागते, चाक लागते, चाक फिरवायला दंड लागतो. अशा प्रकारें बाह्य द्रव्य आणि साधनें त्याला लागतात. परंतु परमेश्वर हा हें विश्व कोळयाप्रमाणे आपल्या स्वतःपासून आपल्याच शक्तीने निर्माण करीत असतो. त्याला कुठल्याहि वाद्य उपादानाची आणि उपकरणांची आवश्यकता असत नाही. अशा प्रकारें विश्वरूपानें परमात्मा प्रकटला आहे. हे त्याचे स्वयंभूत्वच होय.

ब्रह्मदेवालाहि स्वयंभू म्हटले जाते. तें तो तत्सृष्ट सृष्टीतील एक जीव नव्हे एवढ्यापुरतेच होय. वस्तुतः तो पद्मसंभव आहे. परमार्थाने त्याला स्वयंभू मानिल्यास तोच परमेश्वर होईल.

३८. शंभु
शम् म्हणजे शांति, शम् म्हणजे सुख, जो शांति म्हणजे विकार-शमनरूप निर्वाण देऊन जीवाला ब्रह्म पदवी प्राप्त करुन देतो, ब्रह्म-निर्वाण, परम सुख देतो तो शंभु, जीवमात्राच्या सर्व प्रवृत्ति या सुखासाठी आहेत. परंतु "ज्यों ज्यों दवाकी, मर्ज बढता गया" या उक्तीप्रमाणे जीवाच्या धडपडीचा परिणाम सुखांत होण्याऐवजी दुःखांतच होतांना आढळून येतो. असें कां ? कारण, सुखाची विपरीत कल्पना. सुख म्हणजे विषयोपभोग, असें सामान्यतः मानले जाते. परंतु वस्तुतः जिला तृप्ति म्हणतात, तिचे स्वरूप भोगवृत्ति-निवृत्ति असेंच नसते का ? विषय-वितृष्णता हे वस्तुतः तृप्तीचे स्वरूप आहे. जेव्हा माणसाला परमतृप्ति होते, त्यावेळी त्याला बुभुक्षा असत नाही, आणि तेव्हांच त्याला सुखानुभव होतो. सुखाचा अनुभव भोगलालसेंत वा तद्वश होऊन भोग-संपादन क्रियेत नसतो. तो लालसानिवृत्तींत आणि क्रियोपरमांतच येतो. शंभु असा शांत शिव अद्वैत अनुभवाचा स्वामी आहे. म्हणून दाताहि तोच आहे.

३९. आदित्य
आदित्य म्हणजे अदिति-पुत्र, देव. अदिति म्हणजे पूर्व दिशा. पूर्व दिशेकडून सर्व तेजःपुंज ग्रहतारे उगवतात. ते जगाला प्रकाश देतात. त्या प्रकाश देणाऱ्या देवांत, आदित्यांत, सूर्य हा सर्वांत अधिक प्रकाश देणारा म्हणून आदित्य म्हणजे सूर्य हा भगवंताची विभूति मानिली आहे.-" आदित्यानां अहं विष्णुः"- यात सूर्याचा निर्देश विष्णुपदाने केला आहे. तो भगवान् सूर्य आपल्या किरणांनीं विश्व व्यापून टाकतो म्हणून तो विष्णु. सर्व आदित्यांत, देवांत, प्रकाशकांत, सूर्य हा सर्वाधिक प्रकाशक, म्हणून तो अर्क म्हणजे पूजनीय झाला. पूर्व दिशेकडून जसा प्रकाश प्रकटतो त्याप्रमाणे पश्चिम दिशेकडून अंधार येतो. हाच दैत्य होय. दिति जी पश्चिम तिचे जे पुत्र ते दैत्य होत. ते सारे अंधाराचे नाना प्रकार होत, या दैत्यांचे आणि आदित्यांचे अनादि कालापासून हाडवैर असून त्यांचे सनातन युद्ध सुरू आहे आणि त्यांत देव हेच विजयी होत आले आहेत. या भौतिक सृष्टीच्या कवचांत दैविक सष्टि आणि त्या दैविक सृष्टीच्या पोटांत आध्यात्मिक सृष्टि लपलेली आहे. त्यामुळे प्रत्येक घटनेचे तिहेरी अर्थ होत असतात. तमः-प्रकाश हे आधिभौतिक दंद, त्यांच्या अभिमानी देवता इंद्र आणि वृत्र अथवा देव आणि सैतान. तेच आधिदैविक द्वंद्व आणि त्यांच्यांतील सदसद् हे आध्यात्मिक बंद होय. तेंच वेदोपनिषदांनी आणि पुराणेतिहासांनी आपापल्या शैलीने विवरिलें आहे. त्यामुळे में विविध वाङ्मय निर्माण झाले आहे त्याच्या जाळयांत जनता सांपडली आहे. जो आधिभौतिक सूर्य तोच आधिदैविक विष्णु आणि जो आधिदैविक विष्णु तोच आध्यात्मिक परमात्मा. गीतेंत:

"आदित्यानां अहं विष्णुः,
ज्योतिषां रविरंशुमान्"

या श्लोकार्धात प्रथम आधिदैविक आणि नंतर आधिभौतिक सत्य प्रकट झाले आहे. रवि आणि विष्णु या दोहोंना विभूति म्हणून संबोधून भगवत्तत्त्व हे आध्यात्मिक होय असें स्पष्ट केले आहे. प्रकरणार्थ आणि एकूण गीताग्रंथार्थहि तोच आहे.

४०. पुष्कराक्ष
पुष्कराक्ष म्हणजे कमलनयन, परमात्मा हा असंग आहे. त्याची ही असंगता, त्याची ही निर्लेपता, दाखविण्यासाठी त्याची सर्वेन्द्रिय कमलरूप वर्णिली आहेत. मुख-कमल, नेत्रकमल, करकमल, चरणकमल, हृदयकमल; अशा प्रकारे परमात्मा हा असंगतेची, निर्लिप्ततेची मूर्ति आहे असें वर्णिले जाते. परंतु या सर्वेन्द्रियांत प्रधान डोळा आहे. त्यामुळे पुष्कराक्ष, पुंडरीकाक्ष इत्यादि भगवन्-नामें विशेष प्रसिद्ध आहेत. आपल्या शरीरांतील प्रकाश म्हणजे हा डोळा आहे. तो जर शुद्ध राहिला तर सारे शरीर, सारे जीवन शुद्ध होईल. म्हणून दृष्टीची निर्मलता ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. हृदयाने सारे भाव नेत्रांत उमटतात; नेत्र म्हणजे अंत:करणाचा आरसाच. दृष्टि निर्मल असेल तर हृदय निर्मल आहे, असे आपण समजतो. हृदयाला खिडकी नाही, त्यामुळे एखाद्याच्या मनात काय आहे ते पाहता येत नाही. हा ब्रह्मदेवाचा दोष होय असें ब्रह्मदेवाची जी' सर्वोत्तम कृति मानव त्यांत दोषेकदृक् परीक्षकाने काढलेला दोष होय. पण त्या परीक्षकाच्याच दृष्टीचा हा दोष आहे. त्याला दिसायला पाहिजे की डोळा हा हृदयाचा आदर्श आहे. तो शरीररूप छायालेखन-यंत्रांतील दृश्य-वेधी खिडकीच आहे. छायालेखन-यंत्रांतील दृश्यवेधी खिडकी बाहेरीलच दृश्यांचा वेध घेते. पण ही खिडकी बाहेरील तसेच आंतील दृश्याचेंहि दर्शन करवून देते. असे यंत्र आजवर माणूस निर्मू शकला नाही. करणाची बरोबरी उपकरण कसे करणार ? भगवंताची निःसंग दृष्टि कमलोपमानानें वर्णिली. पण त्यांतहि पुण्डरीक पदानें निरंजनतेचा, विशुद्धतेचा, अतिशय सूचित केला आहे.

४१. महास्वन
महास्वन म्हणजे ज्याचा शब्द मोठा आहे तो. जो शब्द दुसन्या शब्दाने झांकला जातो, बुडविला जातो तो शब्द कितीहि मोठा असला तरी तो लहानच म्हणावा लागेल. परमात्मा अंतरात्मरूपाने सर्वांच्या हृदयांत बसला आहे. पुण्याचे अनुमोदन आणि पापाचें निषेधन करणारा त्याचा अति सूक्ष्म शब्द, बाहेरचा केवढाहि मोठा कोलाहल बुडवून टाकू शकत नाही. त्यामुळे तो महास्वन म्हणावयाचा. शब्द ऐकायला कान लागतो. पण जो शब्द बहिराहि ऐकू शकतो, तो शब्द किती शक्तिशाली म्हणावा ? अंतरात्म्याचा शब्द हा तसा आहे. म्हणून परमात्याला महास्वन म्हणावयाचें.

४२. अनादिनिधन
आदि म्हणजे आरंभ आणि निधन म्हणजे अंत. ज्याला आदि असतो, त्याला अंतहि असतो असें आपण सृष्टीत पाहतो. ज्या वस्तूला आदि आहे आणि अंत नाही, अशी एकहि वस्तु या सृष्टीत आपल्याला दाखविता येईल का ? म्हणून या सृष्टीला मृत्युलोक असें ठीक च म्हटले आहे. ही सारी सृष्टि आद्यन्तवंत आहे. ती स्वतः नाशवंत असून तिच्यांतील यच्चयावत् चराचर मृत्युग्रस्त आहेत. परंतु या सृष्टीचा आदि आणि अंत हे स्वतः मात्र अविनाशी आहेत. सृष्टीचा आरंभ होतो पण त्या आरंभाचा आरंभ होत नाही. सृष्टीचा अंत होतो परंतु अंताचा अंत होत नाही. सृष्टीचा हा जो अनादि आदि आणि अनंत अंत तोच परमेश्वर होय आणि म्हणून त्याला अनादिनिधन म्हटले आहे. अनादिनिधन एकत्र म्हणण्यांतील हेतु हा की ज्याला आदि आहे त्याला अंतहि आहेच आणि ज्याला अंत आहे त्याला आदिहि आहेच, हे तत्त्व प्रकट व्हावें, आदि आणि अंत एकाच वस्तुची दोन टोकें आहेत. कोणतेंहि टोक धरा, दुसरें त्यांत गृहीतच आहे. एका तीराची अथवा नुसत्याच मुखाची वा उगमाची नदी तुम्ही कधी पाहिली आहे का ? नदीला तीर आहेत, उद्गम-संगम आहेत, परंतु समुद्राला हे काहीच नाही. सृष्टि नदीवत् आहे. परमेश्वर समुद्रवत् आहे.

४३. धाता
धाता म्हणजे या विश्वाचे गर्भाधान करणारा परमेश्वर, मूल हें पित्याचे मानले जाते. जो आधान करतो, त्याचे मानले जाते. झाड बीजाचे मानले जातें, भूमीचे नाही. म्हटलेंच आहे गीतेत :

मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भ दधाम्यहम् ।
संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत ॥ गीता १४ - ३

अशा प्रकारें या सृष्टीची प्रकृति ही माता आणि परम पुरुष हा पिता म्हणजे धाता होय. पिता म्हणजे पालनकर्ता. हे पिते अनेक असू शकतात, राजा हा प्रजेचा पिता म्हटला जातो. गुरुहि पिता होय आणि जनकहि पिता होय, परंतु या सर्व पित्यांत जो जन्महेतु असतो तोच धाता म्हणावयाचा. त्याला कालिदासाने " केवळ जन्महेतु" म्हणून गौणत्व दिले. परंतु तोच मूळ आहे. आधीं जन्म होईल तेव्हांच मग पुढे त्या जीवाचे रक्षण भरण आणि विनयन होणार.

४४. विधाता
परमात्मा हा या विश्वाचा धाता आहेच. पण नुसताच धाता नाहीं, विधाताहि आहे तो. जीवांचे गर्भाधानच करीत नाही, त्यांचे विनयाधानहि करतो. त्यांना नुसतें जन्मच देत नाही. त्यांचे जन्म जेणेकरून सफल होईल, ते रक्षण, भरण-पोषण आणि शिक्षणहि तो त्यांना देतो. त्या सर्व आवश्यक तत्वांची पुरवणी भरवणी तो करीत असतो. तो सकल-पुरुषार्थाची बासना, तत्पूर्त्यर्थ कर्म चोदना आणि तद्वारा विषय-विषयींचें तत्त्वतः जान देऊन निवृत्ति व निवृति यांचेंहि विधान करीत असतो. त्यामुळे तो विधाताहि म्हटला जातो. संसारांतील सामान्य लोकहि आपल्या अपत्याचे नुसतें आधान करून स्वस्थ बसत नाहीत. ते त्यांच्या सकल जीवनाचेंहि विधान करतात, तरतूद करतात. मग परमेश्वर असे विधान करायला कसा चुकेल ? विधानाशिवाय नुसतें आधान दोषास्पद ठरतें म्हणून धाता आणि विधाता ही जोड-नामें आलीं आहेत, असे समजावें. ४५. उत्तम धातु
धातुः उत्तमः ही दोन पदे आहेत. ह्यांचा एक नाम म्हणून वा दोन नामें म्हणूनहि विचार होऊ शकेल. एक नाम म्हणून विचार संख्येच्या हिशोबाने करणे, कदाचित् आवश्यक असेल. तसें तें आवश्यक आहे हिं आणि शिवाय संस्कृत भाषेच्या वा ग्रंथकाराच्या लकबी प्रमाणे नामापुढे त्याचे विशेषण घातले आहे समजून हे एकच नाम मानणे योग्य, सामान्यत: विशेषण नामाच्या आधी लावण्यांत येते. परंतु नामाला च वस्तु-प्राधान्य आहे. विशेषण तदावितच असते. त्यामुळे ते मागाहून घेणे अर्थपूर्ण च म्हणावे लागेल. तेव्हां "उत्तमः धातुः" म्हणजे सर्वोत्तम धातु, विश्वाचें निरुपम उपादान, असें घेणे बरें. परमेश्वररूप चित्धातु हे विश्वाचें उपादान होय, ज्यापासून हा विचित्र विश्वालंकार घडवला आहे.
धातुः आणि उत्तमः ही दोन नामें कल्पिल्यास संख्या-परिगणना बिघडेल वा वेगळी कल्यावी लागेल. म्हणून त्या कल्पाचा विचार करायचे कारण नाही.



॥ हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP