ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

अजः सर्वेश्वरःसिध्दः सिध्दिः सर्वादिरच्युतः ।
वृषाकपिरयेमात्मा सर्वयोगविनिःसृतः ॥११॥


९५. अज
अज म्हणजे न जन्मणारा, अर्थात् जन्माबरोबर येणारे सर्व विकार हि न पावणारा, असा परमात्मा. जन्मतो तो जन्तु होय, जीव होय, जायते अस्ति वर्धते विपरिणमते जीर्यते वा अपक्षीयते आणि नश्यति वा नियते हे जे जन्मादि नि मरणान्त षड्भाव ते जन्मणाऱ्या जीवाला लागू होतात. जो जन्मच पावत नाही त्या परमात्म्याला नव्हे. परमात्मा असा अज आणि अविकार आहे.

अजा एकां लोहित-शुक्ल-कृष्णां
बहवी: प्रजा: सृजमानां सरूपाः ।
अजो ह्येको जुषमाणोऽनुशेते
जहात्येनां भुक्तभोगां अजोऽन्यः ॥

असा अज शब्द जीवाच्या (आणि आत्म्याच्या) विषयी उपनिषदांनी वापरला आहे खरा, पण तो लक्षणेनेच घ्यावयाचा आहे. अज जो परमात्मा त्याचे अंगभूत जीव आणि प्रकृति हि लक्षणेनें अज आणि अजा म्हटली आहेत. प्रकृति ही परमात्म्याची शक्ति आहे, जीव हा अंश आहे. गुळाची गोडी आणि गुळाचा रवा गुळाहून भिन्न म्हणता येत नाही,

९६. सर्वेश्वर
जगांत अनेक ईश्वर आहेत, खागी आहेत. कोणी जनेश्वर, कोणी वनेश्वर, कोणी भुवनेश्वर, पण सर्वेश्वर एक परमेश्वरच आहे. तो सर्व ईश्वनांचा ईश्वर आहे. तो भूत भविष्य वर्तमान या तिन्ही काळांचा, अधो मध्य ऊर्ध्व या तिन्ही लोकांचा आणि जागृति स्वप्न सुषुप्ति या तिन्ही अवस्थांचा स्वामी आहे. कर्तु अकर्तु अन्यथाकर्तुं समर्थ असा तो सर्वसमर्थ सर्वेश्वर आहे. परमेश्वर सर्वेश्वर आहे, कारण तो निजेश्वर आहे. सर्वांचा अंतर्यामी आहे. अंतर्यामी रूपानें तो सर्वांचा शास्ता आहे. जगत्-शासकांचा हि शास्ता आहे. सर्व शासक आपल्या बुद्धीला अनुसरून शासन करीत असतात. पण त्या बुद्धीचे शासन कोण करतो ? "यो बुद्धेः परतस्तु सः" जो बुद्धीच्या पलीकडे तिचा अधिपति बसला आहे, तोच तिचें शासन करीत असतो म्हणून तो परमात्मा सर्वेश्वर नटला आहे. अर्थात् सर्वेश्वर म्हणजे सर्व ईशन तत्त्वांचा ईश्वर, शास्त्यांचा शास्ता.

९७. सिद्ध
ज्यांनी सिद्धि म्हणजे अलौकिक सामर्थ्य अणिमा गरिमा लघिमा इत्यादि संपादिले आहे, त्यांना सिद्ध म्हणतात. परंतु हे सामर्थ्य अलौकिक असले तरी अद्भुत नव्हे. ईश्वराला हे आणि याहून हि अचिन्त्य असें सामर्थ्य आहे. खरी सिद्धि म्हणजे मोक्षसिद्धि होय. इतर साऱ्या सिद्धि म्हणजे आडनावाच्या. ती बरी सिद्धि ज्यांना सहज-प्राप्त असते ते सिद्ध होत, त्यासाठी ज्यांना प्रवास करावा लागतो, ते साधक होत. जगांत एका परमेश्वराविना सिद्ध कोण म्हणता येईल ? तोच एक सिद्ध आहे. बाकी सारे जीब साधकच होत. त्यांनाच गौरवाने आणि भविष्य-पत्तीने सिद्ध म्हटले जातें इतकेंच, त्यांच्या साधकतेची खूण म्हणजे त्यांचा देह होय. ते साधक नसते, तर त्यांना देहाची गरजच नसती. देह आहे तोवर साधना शेष आहेच, उरलीच आहे. प्रयाणकालीन साधना तेवड्याचसाठी सांगितली आहे. परमेश्वराला अशी कांहीं साधना करावी लागत नाही. म्हणून तो सिद्ध; आणि तोच सिद्ध.

९८. सिद्धि
सिद्धि म्हणजे सफलता, कोणत्या हि प्रकारची सफलता म्हणजे सिद्धिच होय. आत्मा सत्यसंकल्प आहे. म्हणून तो जो जो ध्यास घेतो तो तो सफल व्हावा असा त्याचा प्रयल असतो आणि त्यांत त्याला सफलता मिळते. ही सर्व सिद्धिच होय. अंतिम सिद्धि जी मोक्षसिद्धि तिचेच अंश म्हणजे या सर्व उच्चावच मनोरव-सिद्धि होत. कारण या सर्व सिद्धि जीवाला वासनामुक्त होण्यात मदत करीत असतात. प्रत्येक सिद्धि ही वस्तुतः वासना-तानवरूपच असते आणि तितक्या अंशाने ती मोक्षसिद्धिच म्हटली पाहिजे, म्हणून सिद्धिमात्र भगवत्स्वरूपच होय. अर्थात् वासनातानव हीच सिद्धि असून तेच परमात्मस्वरूप होय, परमात्म्याला कशाचीच वासना नसते, कामना नसते. त्याला काहीएक मिळवावयाचे असत नाही. तो पूर्ण-काम, स्वयंतृप्त असतो. हीच सिद्धि. गीतेत म्हटलेच आहे भगवंतानें :

"न मे पास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तं अवाप्तव्यम् । " गीता ३ - २२

९९. सर्वादि
सर्वादि म्हणजे सर्वांचें मूळ, विश्वमूल. परमेश्वर ह्या सर्वांचे मूळ आहे. पण त्याचे मूळ वेगळे नाही. मुळाला मूळ कुठले ? मुळाला प्ररोह, स्कंध, शाखा, पल्लवादिच असावयाचे. हे सर्व दृश्य त्याचा विस्तार आहे, तो ह्या दृश्य विस्ताराचें अव्यक्त मळ आहे. म्हणून तो सर्वादि. हे सर्व सादि आहे. या सर्वांचा तो आदि आहे, पण स्वतः तो अनादि आहे. सर्वादि असल्यामुळे तो सर्वांना पूज्य आहे, सर्वांचें तो मातृस्थान आहे, पितृस्थान आहे, गुरुस्थान आहे. परमेश्वर सर्वादि आहे म्हणजे सर्व आविभूत कारणांचा कारण आहे, या सर्व कारणांची मालिका गीतेने अशी दिली आहे:

अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्याद् अन्नसंभवः ।
यज्ञाद् भवति पर्जन्यो यज्ञ: कर्म-समुद्भवः ॥ गीता ३-१४

कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर-समुद्भवम् । गीता ३- १५.१

कोणतीहि मालिका घ्या, तिचा आरंभ अक्षर परमात्म्यापासूनच व्हावयाचा.

१००. अच्युत
अच्युत म्हणजे स्वरुपासून, स्वभावापासून, स्वधर्मापासून केव्हांहि न ढळणारा. नित्य-शुद्ध-बुद्धमुक्त हे आहे त्या अक्षर ब्रह्माचे स्वरूप. त्यापासून तें केव्हांहि च्युत होत नाही, त्यामुळे त्याला अच्युत म्हणावयाचे. सुवर्णाच्या लगडीचे अलंकार बनविले तरी सुवर्ण हे सुवर्णच राहते, त्यांत काहींच भिन्नत्व म्हणजे नानात्व येत नाही. हे जे अविकृतत्व तेच अच्युत तत्त्व होय. ज्ञानेश्वरांनी हें अच्युत तत्त्व ह्याच दृष्टांतानें असें मांडले आहे :

विश्वालंकाराचे विसुरे । जरी आहाति नाना आकारें ।
तरी घडिले एकें चि भांगारें । परब्रह्में ॥ <

हा वस्तुत: परिणाम नसून विवर्तच आहे. सुवर्ण अविकृतच राहत असल्यामुळे हवाला परिणाम का म्हणावें ? अलकारत्वरूप नानात्व हें नामरूपात्मक असल्यामुळे ते विवर्तरूप मिथ्या होय. दुधाचे दही हा परिणाम म्हणता येईल, पण सोन्याचा अलंकार हा विवर्त होय. कारण तिर्थ सुवणरूप वस्तु अविकृतच राहते. सलें विश्वाकारासकट ब्रह्म अविकृत आहे, अच्युत आहे.

शतक दुसरे

१०१. वृषाकपि
वृषाकापि हा एक वैदिक शब्द आहे. हा शब्द विश्वामित्र शब्दाप्रमाणे प्रथम पदांती दीर्घ झाला आहे. म्हणजे तो वृषश्च असी कपिश्च' असा कर्मधारय समास आहे आणि त्याचा अर्थ होतो नर कपि वा कपिपुंगव. सृष्टीत निरनिराळ्या योनीत जे सामर्थ्यशाली, मेतृत्वशाली, थोर थोर प्राणी आढळले त्यांनी मनुष्याचे चित्त नेहमीच वेधून घेतले आहे. सिंह, व्याघ्र, गजयूथप, वृषभ, तुरंगम, हरिणयूथप म्हणजे काळवीट इत्यादि पशु, कोकिळ, हंस, मोर, गरुड इत्यादि पक्षी यांच्या ऐटदार व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाला नाही असा कोण आहे ? यांच्याचप्रमाणे कपिपुंगवाने दि मानवाचें मन मोहून घेतले असल्यास नवल नाही. मानवाकृतीशी निकटसाम्य असलेला तो स्वच्छंद शाखामृग मानवाला आवडला; तो त्याला इतका आकर्षक वाटला की, त्याने ते नांव देवाला देऊन टाकलें !

ग्राम्य जीवनाचा त्याग करून अरण्यवास, कंदमूल-फलाशन इत्यादि धर्माचरणामुळे तपस्व्याचा तो आदर्श आहे. अर्थात् धर्मासाठी कपिवत् आचार करणारा तो वृषाकपि, हा तत्पुरुष समास झाला. अशा त-हेचे धर्माचरण करणारा परमात्म्याहून महान् तपस्वी दुसरा कोण आहे ? म्हणून परमात्मा वृषाकपि, त्या अव्यक्त परमात्म्याचा प्रतिनिधि म्हणून अग्नि हि वृषाकपि म्हणून ओळखला जातो. तो हि आरण्यक आणि धडपडणारा आहे. तो वनांत वसतो, सर्व पाश जाळून मोकळा होतो. सतत आपलें निजधाम जो सर्य त्याचे स्मरण राखून त्याशी संगत होण्यासाठी तो विरही उसळत असतो, धडपडत असतो ज्वाला रूपाने.

१०२. अमेयात्मा
व्यक्तमात्र परिछिन्न आहे मय आहे. परमात्मा हा तसा व्यक्त नसल्याने तो अमेयात्मा म्हटला आहे. द्रव्य हटलें , की त्याला नाम रूप गुण कर्म लागले. मग तें द्रव्या सूक्ष्मातिसूक्ष्म का असेना, तें परमाणुरूप असले तरी त्या परमाणूला वरील सर्व उपाधि लागलेच म्हणून समजा. ह्या सर्व समुच्चयालाच व्यक्ति म्हणावयाचे. म्हणूनच उपनिषदांनी ब्रह्माचे वर्णन करतांना अच्छाय अनणु इत्यादि द्रव्यगुण-क्रिया-निषेधाची भाषा वापरली आहे आणि त्याला निर्गुण ठरविले आहे. अर्थातच त्याला कोणतेंहि क्रियापद लागू शकत नाही. वाणीने त्याचे वर्णन आणि मनाने त्याचे मनन होऊ शकत नाहीं. तसे झाल्यास तो " मेय " होईल, तो शब्दाच्या आणि मननाच्या पकडींत येईल. परंतु तो तर अमेयात्मा आहे. कोठल्याहि प्रकारे त्याचे मान होऊ शकत नाही. उपनिषदांनी म्हटलेच आहे " यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह ".

१०३. सर्वयोग-विनिःसृत
आपल्यास जगाचे ज्ञान आपल्या पंच ज्ञानेंद्रियांच्या 'योगें होत असते. हाच विषयेद्रियसंयोग होय. असल्या कोणत्याहि विषयेंद्रिययोगापासून परमाल्याचे ज्ञान होत नाही. म्हणून तो सर्वयोग-विनिःसृत म्हणावयाचा. इन्द्रिये बाह्य करणे, वाणी बाह्याबाह्य करण, आणि मन व बुद्धि ही अन्त:करणे होत. अग्नि, विद्युत्, सोम आणि सूर्य ह्या त्यांच्या अधिष्ठात्री देवता मानिल्या आहेत. त्यांच्या योगें परमात्म्याचे आकलन होत नाही. म्हटलेंच आहे-"न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकाः । नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः ॥ त्या कोणाहि प्रकाशकांच्या पकडीत तो निर्गुण परमात्मा येत नाही म्हणून तो "सर्वयोगविनि:सृत' होय, सर्व पकडीतून निसटलेला होय. पार्याचा रवा चिमटीत धरता येत नाही. धरतांच तो निसटतो. तसा हा परमात्मा कोणत्याहि पकडींत पकडला जात नाही. पकडला को निसटताच तो ! असा हा परमात्मा निसटू आहे.

योग म्हणजे आत्मलाभाचे उपाय. तद्वारा निष्पन्न होणारा म्हणून हि परमात्मा सर्वयोग-विनिःसृत म्हणता येईल.

वसुर्वसुमनाः सत्य: स्ममात्मा सम्मितः समः ।
अमोघः पुण्डरीकाक्षो वृषकर्मावृषाकृतिः ॥१२॥


१०४. वसु
"जिथे ज्याचें धन, तिथे त्याचे मन' अशी म्हणच आहे. धन म्हणजे जीवनाधार होय. पुत्रगर्धी द्रोणानें अश्वत्थामा जीवनाधार मानिला होता. त्यामुळे अश्वत्थामा मेला असे कळतांच जगण्यांत कांहीं अर्थ नाही असे समजून त्याने आपले जीवन संपविलें. अशाच प्रकारे नाना जीव आपल्या आपल्या आवडीप्रमाणे आपापले धन कल्पीत असतात आणि त्यासाठी जगत आणि मरत असतात. ही जी प्रत्येकाची आंतरिक अनपहार्य आवड आणि कल्पना ती परमेश्वरच होत असतो. तद्वाराच जीवाला सुख आणि समाधान लाभत असतें. तद्द्वाराच तो उच्चावच सिद्धि मिळवीत असतो. कान्होपात्रा, पिंगला याहि अशाच प्रकारे सिद्ध झाल्या. जीवाच्या विभिन्न आवडी व कल्पना यांना अनुसरूनच त्यांचे जीवनमार्ग, साधन आणि सिद्धि आकारल्या आहेत. जीवाचे सर्वस्व ज्यांत वसलें आहे तो त्याचा वसु म्हणावयाचा.

तसे सर्वसामान्य अष्टावतु प्रसिद्धच आहेत. ज्यांच्या योगें वसति सुखावह होते आणि ज्यांच्या वियोगें ती दुष्कर होते, त्या अष्ट वसूत हि अग्नि हा प्रधान होय. कारण त्याच्या योगेंच जंगलांत माणसाला वास्तव्य करणे शक्य झाले आहे. विषारी वायु, व्याघ्रादि हिन श्वापदें आणि थंडीवारा यांच्यापासून निवारा अग्नीनेच दिला आहे. परंतु अग्नीचें हें बाहय रूप झाले. त्याचे आंतरिक रूम म्हणजे क्रतु वा जीवाचा संकल्प होय आणि तोच त्याचा वसु.

१०५. वसुमना
जीव हा वसुमना म्हणजेच संकल्पात्मा आहे. " श्रद्धामयोऽयं पुरुषः " गी. १७.३ असे म्हटलेच आहे गीतेने. परंतु हा संकल्प आला कोठून ? तो परमात्म्यापासूनच आला आहे. ज्याचे मुळ परमात्म्यांत सापडत नाही असे काहीं एक या जगांत मुळीं नाहींच. म्हणून मूलत: परमात्मा हा संकल्पात्मा आहे आणि त्याचमुळे जीवहि संकल्पात्मा झाला आहे. अंतर इतकेंच की, ईश्वर सत्य-संकल्प आहे आणि जीव अनीश्वरत्वामुळे मोघसंकल्प आहे. मोघाशा मोध-कर्माणो मोघज्ञाना विचेतसः । राक्षसी आसुरी चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः ॥ गीता ९ - १२ ।

मोघत्वाचे कारण जीवाची मूढता होय. ती जितक्या अंशाने कमी होईल तितकी सिद्धि, तितकी सफलता अधिक. याचाच अर्थ झाला, संपूर्ण आत्मशुद्धि म्हणजेच संपूर्ण सिद्धि. ज्याच्यांत संकल्पाची आग नाहीं, तो मुर्दा माणूस होय, परमात्मा जिन्दादिल आहे. ही अपरंपार नित्यनूतन सृष्टि त्याची संकल्प-स्फूर्ति आणि पूर्ति होय.

पारशांच्या झेंद अवेस्तांत याशी तुल्य असा बहुमना शब्द आला आहे. स चा ह करण्याची लकब त्यांची प्रसिद्धच आहे. सिन्धुस्थान-हिन्दुस्थान, सुरत-हुरत, असुर अहुर इत्यादि शब्द त्याच लकबेचे निदर्शक होत.

१०६. सत्य
सत् आणि सत्य एकच. तथापि, दोन शब्द ज्याअर्थी आहेत त्याअर्थी त्यांत काही विशेष हि असलाच पाहिजे. तो विशेष असा म्हणता येईल. सत् म्हणजे कूटस्थ-नित्य आणि सत्य म्हणजे त्याला लक्षुन केलेला सरळ व्यवहार, नीतीचा, न्यायाचा व्यवहार, परमेश्वर सत्-स्वरूप आहे म्हणजे तो कूटस्थ-नित्य आहे. आणि त्याचे कायदे सत्य आहेत, अपरिवर्तनीय आहेत. जो त्यांना अनुसरेल तो सरळ मार्गाने त्या सत्याला पोचेल. जो अनुसरणार नाहीं तो आडवाटेला लागून सत्यापासून दूर पडेल. म्हणजेच वंचित होईल. सताला अनुसरणारे सर्व सत्यच होय. म्हणून दया, क्षमा, शांति इत्यादि सर्व 'सद्गुण सत्यच होत. सत्यांत असत्य सोडून बाकी सारेंच येतें. परमेश्वराचें नांव सत्, त्याचे रूप सत्, त्याचे कायदे सत्, त्यांना अनुसरणाराला मिळणारे फळ सत्. असा हा परमात्मा सत्य आणि केवळ सत्य आहे.

१०७. समात्मा
"निर्दोष हि समं ब्रह्म !" गीता ५ - १९ या गीतोक्त लक्षणाप्रमाणे परमात्मा हा समात्मा म्हणजे साम्यस्वरूप आहे. सर्वदा आणि सर्वत्र तो अविकृत असतो, एकरूप असतो. वैषम्य हा जगाचा स्वभाव आहे, तर साम्य हा परमात्म्याचा स्वभाव आहे. परमेश्वर अंतर्यामिरूपाने सर्वांच्या ठाई समान वसला आहे. 'जसें कर्म तसें फळ' या न्यायाने तो सर्वांवर समान अनुग्रह करीत आहे. तसेंच कालरूपानें तो सर्वाचा समान संहार करीत आहे. अशा प्रकारें तो केवल नि:पक्षपात आहे. म्हटलेच आहे. गीतेंत-"समोऽहं सर्व-भूतेषु न मे देष्योऽस्ति न प्रियः" गीता ९ - २९. तात्पर्य, तत्त्वत: आणि व्यहारतः हि तो सम आहे. म्हणून तो समात्मा. परमेश्वर साम्यरूप आहे म्हणून त्याला पोचण्याचा उपाय हि साम्यच होय. तोच योग. इतर सारे योग आडनांवाचे आणि आडवळणाचे होत.

१०८, संमित
संमित म्हणजे आत्मसंमित, आपल्याजोगा आपल्या आकारा-प्रकाराचा. परमात्मा देही होऊन त्या त्या योनीच्या आकाराप्रकाराचा होतो. तो गजांत गजाकार आणि रजांत रजाकार म्हणजे परमाणुरूप होतो. तो ब्रह्मदेवाच्या ठाई ब्रह्माभिमानी आणि तृणाच्या ठाई तृणाभिमानी होतो. त्यामुळे तो ज्याला त्याला आत्मसंमित होय.

असंमित असा हि पाठ संभवतो. असंमित म्हणजे कोणाहिजोगा नसलेला, अप्रतिम. परमात्मा हा कोणासारखा म्हणावा ? तो अनन्य-साधारण आहे. ज्याचें नांव घेऊं त्याहून तो वेगळा आणि विलक्षण आहे. तो अशा प्रकारे आपल्यासारखा आपणच असण्यामुळे सहजच असंमित ठरतो.

तुका म्हणे जें जें बोला । तें तें साजे या विठ्ठला ॥

१०९. सम
सम म्हपाजे वैषम्यरहित, त्रैगुण्य हें वैषम्य होय. परमात्मा हा त्रिगुणातीत असल्यामुळे तो सम आहे. या त्याच्या निस्त्रैगुण्य तुरीय प्रतिष्ठेमुळे कोणत्याहि शीतोष्ण-सुखदुःखादि द्वंद्वाचा त्याच्यावर काही एक परिणाम होत नाही. द्वंद्वांचा कसला हि परिणाम होत नसल्यामुळे तो आपले कार्य रागद्वेषवश न होता स्वाधीनपणे करतो. तो विश्वाची सृष्टि आसक्तीने करीत नाही किंवा संहार द्वेषाने करीत नाही. तो कार्य स्वाधीनपणे विकारवश न होता करीत असल्यामुळे अर्थात् आत्मतृप्त असल्यामुळे कर्मफळांविषयीं तो सम असतो. सिद्धि मिळो वा असिद्धि, तो कर्तव्य-विमुख होत नाही.

अशा प्रकारे तत्त्वत: आणि व्यवहारतः तो सम असतो आणि ही जी त्याची समता तीच त्याची मा म्हणजे सुषमा होय. त्या लक्ष्मीनें तो सदैव युक्त असतो म्हणून तो सम. 'सहितो मया समः । '

११०. अमोघ
अमोघ म्हणजे ज्याचा संकल्प कधी व्यर्थ जात नाही तो, सत्य-संकल्प परमात्मा, जीवाचे संकल्प सिद्धीस जात नाहीत. जे जातात ते त्याच्या सामर्थ्यामुळे नव्हेत, तर परमेश्वराच्या कृपेमुळे होत. परमेश्वराचा संकल्प, त्याची वाणी, त्याची करणी सर्वच अमोघआहेत. कारण असत्याची छाया हि परमेश्वरास स्पर्शूं शकत नाही. जे सत्याची म्हणजेच परमेश्वराची अनन्य भावानें उपासना करतात, त्याचा ठाई हि हें सामर्थ प्रकट होते, अर्थात् सामर्थ्यमात्र सत्याचे आहे आणि तें अमोघ आहे. जेथे सत्य तेथे शक्ति, जेथे शक्ति तेथे सामर्थ्य, जेथें सामर्थ्य तेथें सिद्धि. असे असल्यामुळे सत्यस्वरूप परमात्मा हा अमोघ म्हटला आहे आणि अमोघाची उपासना हि अमोघच, त्याचे स्मरण अमोघ आहे, त्याचे कीर्तन अमोघ आहे, त्याचें वन्दन अमोघ आहे. जे सत्यविमुख होत त्यांचे सारेच मोघ म्हणजे व्यर्थ होय. त्यांनाच गीतेने आसुरी आणि राक्षसी म्हटल आहे :

मोघाशा मोधकर्माणो मोघज्ञाना विचेतसः ।
राक्षसी आसुरीं चैव प्रकृतिं मोहिनी श्रिता: ॥ गीता ९ - १२

१११. पुण्डरीकाक्ष
पुण्डरीक म्हणजे श्वेत कमल आणि अक्ष म्हणजे डोळा. कमळ उमलतें, मिटते. प्रसन्नता, खिन्नता इत्यादि नाना भाव विखरतें, तें इकडे-तिकडे डोलतें. आतील मधु-गोलकाचे त्याची दले रक्षण करतात इत्यादि सादृश्यामुळे नेत्राला कमलाची उपमा कवींनी दिली आहे. कवि नेत्राला त्याच्या तांबुसपणामुळे राजीवाची, त्यांतील कनीनिकेच्या व पापण्यांच्या काळेशारपणामुळे इन्दीवराची आणि त्याच्या शुभ्र अपांगामुळे पुण्डरीकाची उपमा देतात. त्यांत जे काळे बुबुळ आहे ते जणूं भुंगा होय. शिवाय कमलपत्रावर जल जसें चिकटून बसत नाही, त्याप्रमाणे नेत्रावर कोणते हि रूप चिकटून बसत नाही. या दृश्यजगत्कासारांत पोहणारे नेत्र-कमल अलिप्त राहून सर्वत्र संचरत असतें. भगवंताचा नेत्र म्हणजे सूर्य. तो पुण्डरीकाप्रमाणे केवळ विशुभ आहे. तो सर्व जगद्व्यापार अलिप्त राहून पाहत आहे. म्हणून भगवंताला पुण्डरीकाक्ष म्हणतात. इतर कोणा हि जीवाला पुण्डरीकाक्ष पद लावले जात नाही.

११२. वृषकर्मा
वृक्ष म्हणजे वृषभ, सिंह हिंसक आणि विघातक शक्तीचा प्रतीक आहे. पण वृषभ अहिसक आणि विधायक शक्तीचा प्रतीक आहे. त्यामुळे तो धर्माचा पर्याय झाला आहे. कारण धर्म म्हणजे दयाधर्म होय, प्रजांचे पालन हा धर्म आहे. त्याचे एक अंग म्हणजे सज्जनांचा अनुग्रह आणि दुसरे दुर्जनांचा निग्रह होगा, निग्रह हा हि सज्जनांच्या रक्षणासाठीच असल्यामुळे तो हि धर्मरूपच आहे, यालाच धर्म-संस्थापन म्हणतात. आणि हे कार्य म्हणजे वृषकर्म होय. धर्मरूप कर्म होय. हे असें निग्रहानुग्रहरूप धर्म-संस्थापन परमेश्वर करीत असतो म्हणून त्याला वृषकर्मा म्हणावयाचे, वृथ म्हणजे वृषभ खतामुताची वृष्टि करून शेती सुपीक करतो. शेतीसाठी गोर्हे आणि दुधासाठी कालवडी देतो. शेती आणि दूधदुभते यांच्यायोगें तो प्रजांचे पालन करतो. शेती नांगरून आणि वखरून तणाचा नायनाट करतो. त्यामुळे तो धर्माचा प्रतिनिधि झाला आहे, पर्याय झाला आहे. गोब्राह्मण-प्रतिपालन म्हणजे धर्म आणि धार्मिक यांचे प्रतिपालन होय. केवळ गाय या जनावराचे आणि ब्राह्मण या जातीचे प्रतिपालन नव्हे.

११३. वृषाकृति
वृष हीच ज्याची आकृति आहे तो वृषाकृति. परमात्मा हा अव्यक्तमूर्ति आहे. त्याची व्यक्त मूर्ति कोणती म्हणावी ? धर्म हीच त्याची मूर्ति होय, खूण होय. जिथे जिथे दयाधर्म नांदतो ती ती परमेश्वराची मूर्ति होय. " तोचि भगवंताची मूर्ति " म्हणून तुकारामाने म्हटलेच आहे. स्वार्थ म्हणजे आपला देह व तदनुबद्ध पुत्रकलत्रादि यांच्यासाठी जगणे. हा स्वार्थ जिथें नाहीं ती परार्थैकजीवितता म्हणजे धर्म होय, दया होय. वृष म्हणजे गोजाति त्याची मूर्ति मानिली आहे. जणू ती परार्थंकजीवित आहे. ती गवत खाऊन आम्हांला अमृत देतें. स्वत: शेतांत राबून शेण-मूत आणि घाम गाळून आम्हाला धन-धान्याने समृद्ध करते. जिवंतपणी आपल्या प्रत्येक दानाने ती आम्हांला सुखवितेच, पण मेल्यावरहि हे व्रत सोडीत नाही. गरतांनाहि ती आपलें चामडे, हाडे, शिगें, खुरें आणि रक्तमांस देऊन जाते. अशा परोपकारी जीयाला साक्षात् धर्म म्हणावयाचें नाही तर कोणाला म्हणायचे ? गाईप्रमाणेच ब्राह्मणहि परार्थैक-जीवित मानिला आहे. दधीचीने आपली हा. देवकार्यासाठी दिली.

ब्राह्मणस्य हि देहोऽयं क्षुद्रकामाय नेष्यते ।
तपसे ब्रह्मणे चेह प्रेत्यानन्त-सुखाय च ॥ -मनु

म्हणून गोब्राह्मणांचा, द्विपादचतुष्पादांचा, एक वर्ग होतो. आणि "गोब्राह्मणेभ्य: शुभमस्तु नित्यम्" अशी प्रार्थना केली जाते. अर्थात् निःस्वार्थ ज्ञानवृत्ति हेच धर्माचे स्वरूप होय आणि तीच परमात्म्याची कुडी. म्हणून परमात्मा वृषाकृति.
सत्त्वशुद्धीसाठी तपश्चरण आणि स्वाध्याय हा त्याचा देह असे तोवर एकमेव उद्देश आणि उद्योग असतो आणि तो उद्देश व उद्योग आटोपला हणजे देहपातोत्तर अनन्त असें ब्रह्मसुख त्याच्या वाटयास ठेवलेले असते. त्याचसाठी त्याचा जन्म असतो. गोवंशावर निःस्वार्थतेचा, परार्थंक जीविततेचा, गुणारोप केला जातो, परंतु ब्राह्मण हा त्या गुणाबरोबरच ज्ञानमय होऊन राहतो हा विशेष. गो केवळ वात्सल्याची मूर्ति तर ब्राह्मण हा भूतहितेरतीची व ज्ञानाची हि मूर्ति होय.

रुद्रो बहुशिरा बभ्रूर्विश्वयोनिः शुचिश्रवाः ।
अमृतः शाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः ॥१३॥


११४. रुद्र
परमेश्वर वासना देऊन जीवांना रडवितो म्हणुन तो रुद्र. रुद्र ही गणदेवता आहे. रुद्र एकादश मानिले आहेत हे एकादश कोणते ? पांच प्राण, पांच ज्ञानेंद्रिये आणि एक मन यांचा संघ म्हणजे रुद्रगण होय. हा गण जेव्हां देहांतून बाहेर पडतो तेव्हां तो जीवाला आणि त्याच्या आप्तांनाहि रडवितो म्हणून तो रुद्र. त्याला आत्मज्ञानाने शमविलें म्हणजेच तो शिव होतो.

समाजातील उपेक्षित लोक जे (१) अनाथ मुलें, (२) असहाय वृद्ध, (३) तिरस्कृत रुग्ण, (४) अपहृतस्व विधवा, आणि (५) बेकार म्हणजे समर्थ पण उद्योग-वंचित लोक तसेच, (६) ब्राह्मण निरक्षर, (७) क्षत्रिय अन्यायी, (८) वैश्य कृपण आणि (९) शूद्र वंचक त्याचप्रमाणे, (१०) दरिद्ध अनुद्यमी आणि (११) श्रीमंत अदाता हे एकादश गण हि समाजांतील रुद्र होत. जे स्वतः रडतातच, पण समाजाला हि रडायला लावतात. ह्याना संतुष्ट ठेवले आणि यांची व्यवस्था केली तरच रुद्र प्रसन्न होतो आणि समाजाला रडवीत नाही.

अशा प्रकारे व्यक्ति आणि समाज रुद्रोपासना करील तर ती उपासना व्यक्तीला आणि समाजाला सुखावह होईल. परंतु रुद्राची उपेक्षा झाल्यास तो रडवीलच.

११५. बहुशिरा
रुद्र ही गणदेवता तेज:स्वरूप आहे. या तेजाची तीन शिरें आहेत. पैकी एक स्वर्गात, एक अन्तरिक्षांत आणि एक पृथ्वीवर आहे. अनुक्रमें सूर्य, विद्युत् आणि अग्नि हीं तीं शिरें होत. दोहोंहून अधिक संख्येला बहु म्हणतात. अर्थात् बहुवचनासाठी किमान तीन तरी संख्या हवीच. तशी ती इथे आहे म्हणून रुद्रस्वरूप परमात्मा हा बहुशिरा म्हटला आहे. अर्थात् बहुशिरा म्हणजे त्रिशिरा होय. बहुशिरा आणि सहस्रमूर्धा दोन्ही परमेश्वराचीच नांवें. परंतु त्यांचे तात्पर्य वेगळे आहे. बहुपद संख्यावाचक आहे. पण सहस्र हें संख्यावाचक विशेषण असंख्यत्ववाचक आहे. तें परमात्म्याच्या असंख्येयत्वाचा, अनन्तत्वाचा निर्देश करतें. जीवन सुखावह करणारा आधिभौतिक अग्नि, जीवनधारक वैश्वानर-संज्ञक आधिदैविक कायाग्नि हे दोन्ही अग्नि ज्याचे आविष्कार आहेत तो चित्संज्ञक आध्यात्मिक अग्नि ही त्या रुद्राची तीन शिरें होत. पहिली तीन लौकिक असून ही दुसरी तीन अलौकिक होत.

११६.बभ्रु
या रुद्रादि महातपान्त श्लोकांतील पदें रुद्रदेवतावाचक आहेत. अर्थात् रुद्रस्वरूप परमात्मवाचक, बभ्रु हे पद हि अर्थातच रुद्रवाचक घ्यायचे आहे. बभ्रुम्हणजे विचित्र. काळा निळा लाल पिवळा. एका शब्दांत नीललोहित. अग्नि हा नील-लोहित आहे. काळसर, पिवळी, लाल, निळी, हिरवी, जांभळी आणि पांढरी अशा सप्तरंगी वा बहुविध ज्वालांनी अग्नि पेटतो आणि प्रकटतो. अशा अनेक रंगी ज्वालांनी नटलेला म्हणून बभ्रु. वस्तुत: तेजोराशि परमात्मा निरञ्जन आहे. पण तें अव्यक्त तेज जेव्हां गुणद्वारा प्रकटते तेव्हां गुणसंगानें तें शबल होतें. त्यामुळेच त्याला म्हणावयाचे. ते सत्त्वगुणाश्रयाने शुभ, रजोगुणाश्रयाने लोहित आणि तमोगुणाश्रयाने कृष्ण वाटतें, त्रिवेणींत जसे गंगायमुनांचेच प्रवाह दिसतात आणि सरस्वती गुप्त असते, तसे या गुणप्रवाहांतील शुक्ल प्रवाह लुप्तसा असून रक्त व कृष्ण प्रवाह उठून दिसतात. म्हणून अव्यक्त निरञ्जन परमात्म्याचा व्यक्त प्रकाश नीललोहित म्हटला आहे. बभ्रुवाहन शब्दांत बभ्रु शब्द अग्निवाचकच असून बभ्रुवाहन म्हणजे अग्नि ज्यांचे वाहन आहे ते देव होत. " स देवां एह वक्षति ' ऋ. १.१.२ असे म्हणूनच अग्नीस प्रार्थिलें आहे.

११७. विश्वयोनि
परमात्म्याचें तें निरंजन तेज, ज्याचें ध्यान गायत्री मंत्रांत म्हटल्याप्रमाणे आपण करावयाचे आहे, या विचित्र नानावर्णाकृति विश्वाचे मूळ आहे. म्हणून त्याला विश्वयोनि म्हटलें आहे. सूर्यमालादि विश्व हें तेजोनीहारिकेपासून निर्माण झाले आहे असें पदार्यशास्त्रज्ञ मानितात. वेदान्तीहि विश्वोत्पत्ति परमात्मस्वरूप तेजापासूनच चित्तत्त्वापासूनच झाली आहे असे मानितात. तें तेजच सर्व-मूळ आहे. जडाचे मूळ चेतनच असणार. व्यक्ताचे मूळ अव्यक्तच असणार. क्षराचे मूळ अक्षरच असणार. असा तो परम पुरुष आहे. तोच या विश्वाचा आदि पुरुष. जो आदि पुरुष तोच विश्वयोनि. आदिपुरुष ऊर्णनाभवत् आपणच आणि आपल्यापासूनच विश्व निर्मितो. त्यामुळे तोच या विश्वाचे निमित्त आणि उपादान कारण हि झाला आहे. निमित्त कारण या नात्याने तो पुरुष आहे. विश्वरेता आहे. उपादान कारण या नात्याने तो प्रकृति आहे, विश्वयोनि आहे. दोन्ही एकस्थ आणि परसर संपृक्त आहेत. या तत्त्वज्ञानाचे चित्र अर्धनारीनटेशाच्या रूपाने कवींनी रेखाटलें आहे. शक्तिमान् आणि शक्ति अभिन्न आहेत, असें तें सुचवितें.

११८, शुचिश्रवा
श्रवस् म्हणजे नाम, कीर्ति. ज्याची कीर्ति, ज्याचें नाम, शुचि म्हणजे उज्ज्वल आहे, तो शुचिश्रवा. नाम वा कीर्ति करणीवरून होते. करणी जर उज्ज्वल नसेल तर नाम वा कीर्ति कशी उज्ज्वल होईल ? अग्नि-स्वरूप रुद्रपरमात्याची करणी प्रकटच उज्ज्वल आहे. म्हणूनच तो शुचिश्रवा होय. ज्याची ही सर्वाश्चर्यमय विश्वरुप कृति सर्वांना प्रकट आहे, त्याचे नाम, त्याची कीर्ति किती उज्ज्वल म्हणावी ! तो शुचिश्रवा आहे, उच्चैःश्रवा आहे. त्याची कीर्ति सर्वांच्या कीर्तीला मागे टाकून पुढे सरसावलेली आहे, सर्वातिशायी आहे. अग्नि प्रकाशतो, प्रकाशित करतो, म्हणून तो देव होय, विश्व हा त्या परमात्मसंज्ञक अग्निदेवाचा प्रकाश होय. त्यामुळे तो शुचिश्रवा आहे, उज्ज्चलकीर्ति आहे.

११९. अमृत
" विद्यया अमृतं अश्नुते " विद्येच्या योगें प्राप्त होणारें जें, तें अमृत होय. विद्येच्या योगें अविद्या-निरसन होऊन आत्मोपलब्धि होते. ती आत्मोपलब्धिच अमृत होय. आत्मोपलब्धीनेच जीव सर्वदैन्यमुक्त होऊन "स्वे महिम्नि" प्रतिष्ठित होतो. अज अजर अमर होऊन अभय होतो. हे अभयच अमृत होय.

अमृत स्वर्गात आहे. आणि स्वर्ग मेल्याशिवाय दिसत नाही. याचा अर्थ हा की देह आहे तोवर स्वर्ग मिळत नाही आणि स्वर्गीय सुख अमृतहि मिळत नाही. "न हि सशरीरस्य सत: प्रियाप्रिययो: अपहति: अस्ति" देह आहे तोवर सुखदुःखोपपत्ति होतच राहणार. आणि असा सुखदु:खांचा उपद्रव जिथे नाहीं तोच स्वर्ग होय आणि ती सुखदुःखातीत साम्यावस्था म्हणजेच अमृत होय.

संसार-समुद्राचे मंधन करून निघालेलें हें जें अमृत तें देवांनी प्राशिलें म्हणून ते अमर झाले. जे हें परमात्मस्वरूप अमृत आत्मसात् करतात ते अमृतच होतात. "निर्दोषं हि समं ब्रह्म, तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः । " गीता ५ - १९

१२०. शाश्वत-स्थाणु
प्रतिक्षणी बदलणाऱ्या या जगांत काय शाश्वत आहे ? आणि स्थाणु म्हणजे स्थितिशील तरी काय आहे ? काल क्षणशः परिवर्तनशील आहे, तसें द्रव्यजात हि कणश: परिवर्तनशील आहे. सापेक्षतेने समस्त ग्रासले आहे. समस्त अनिश्चित आहे. द्रव्य गुण क्रिया फल सर्व काहीं अस्थिर आहे. हा अस्थिरतेचा प्रवाह गुणजन्य आहे. परंतु जे गुणविलक्षण आहे तें निर्गुण ब्रह्म मात्र गुणांच्या चांचल्यापासून सर्वथा मुक्त असून तेंच कालतः शाश्वत आणि वस्तुतः स्थाणु आहे. म्हणूनच परमात्मा हा शाश्वत-स्थाणु म्हटला आहे. कसली हि विक्रिया त्याच्या ठायीं संभवत नाहीं, म्हणून तो शाश्वत, म्हणून तो स्थाणु. स्थाणु पद पूर्वी येऊन गेलें आहे. इथे तें शाश्वतपदाशीं समस्त होऊन आले आहे. त्यामुळे तें कालत: आणि वस्तुतः परमात्ल्याचे दिक्कालाधनवच्छिन्नत्व विभागशः प्रकट करीत आहे.

"युगे अठ्ठावीस विटेवर उभा असलेला पांडुरंग हा शाश्वत-स्थाणु होय. शाश्वत-स्थाणु परब्रह्माची ती खूण आहे. संसाररूप भीमानदीचा अनित्यताम प्रवाह त्याच्या समोरून वाहत आहे आणि तो त्याचा सनातन साक्षी आहे.

१२१. वरारोह
ज्याचा आरोह म्हणजे उन्नति वर म्हणजे श्रेष्ठ आहे. तो वरारोह. परमेश्वराहून समुन्नत दुसरे काय आहे ? तो उच्चाहून उच्च आहे. तो परात्पर आहे. तो तेजोराशि परमेश्वर अग्निस्तंभ रूपाने प्रकटला. त्याचे आदिअन्त जाणायला ब्रह्मा आणि विष्णु निघाले. परंतु दीर्घ काळ शोध करून हि त्यांना ते आदि अन्त गाठता आले नाहीत; तेव्हा ते नम्र झाले आणि परमेश्वराच्या अचित्य वैभवाचे स्तवन करीत बसले. अशी आख्यायिका प्रसिद्धच आहे. त्याची उंची किती आहे हे आजवर कोणाला कळलेच नाही. आणि त्याची खोली किती आहे हे हि कळलें नाहीं. असें हें भगवत्तेज वरेण्य आणि वरणीय आहे.

जे वर आहेत ब्रह्म-विष्णुवत् त्यांनाच ते आरोहणीय आहे. इतर प्राकृत त्याच्या जवळ हि जाऊं शकत नाहीत. म्हणूनहि तो परमात्मा वरारोह म्हटला आहे.

तवैश्वर्यं यत्नाद् यदुपरि विरिञ्चिर हरिरघः परिच्छेत्तुं यातौ अनलमनस-स्कन्ध-वपुषः ।
ततो भक्ति-श्रद्धाभर-गुरु-गृणद्भ्यां गिरिश यत् स्वयं तस्थे ताभ्यां; तव किमनुवृत्तिर्न फलति ॥ - महिम्नस्तोत्र १०

१२२. महातपा
आत्मशुद्धीसाठी जे केले जाते त्याला तप म्हणतात. मग ते कायिक वाचिक वा मानसिक कमें हि असा. ते सार तपच हाय. सोने अग्नीस टाकलें म्हणजे त्याचे हीण जलन गळून जाते आणि तें निवास होते. तसें योगी तपाच्या भटटीत आपली आत्मशुद्धि करतात. योगाग्नीने देशकारण अज्ञान अर्थात् कारणदेह जाळून निखळ आत्मरुप गांठतात, हेच महातप होय. भगवान् रुद्र हा योगीश्वर आहे. तो गोगाग्नि पेटवून देहांतील वासनांना रडायला लावतो त्यांना जाळून भस्म करतो. सारा देह-गेह-स्नेह जाळून सार्या अशिव संसाराचें श्मशान करून तो शिव बसला आहे. देह शिल्लक ठेवून केलेली शुद्धि ही खरी आणि पुरी शुद्धि नहे. "शौचात् स्वांग-जुगुप्सा" असें योगसूत्र आहे. ज्याने आपला देह आणि वेहनिदान अज्ञान जाळून खाक केलें त्याहून अधिक शुचि कोण ? शिव हा असा आहे, म्हणून तो महातपा. परमात्माच सदैव देह-संबंध रहित असल्यामुळे तोच एक महातपा म्हणावयाचा, बाकी सारे बेहधारी ते किती हि मोठे असले तरी अल्पतपाच किंबहुना अतपस्वीच म्हणावयाचे.

सर्वगः सर्वविद् भानुर्विष्वक्सेनो जनार्दनः ।
वेदो वेदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित् कविः ॥१४॥


१२३. सर्वंग
सर्वग म्हणजे सर्वगत. परमात्मा या समस्त सृष्टीचे कारण असल्यामुळे तो सर्वगत आहे, सर्वव्यापी आहे. भाजन-भेद असख्य असल तरी ती सर्व भाजनें मृण्मात्र होत, मृण्मय होत, मृद्व्याप्त होत. तसें हे सर्व विश्व चिन्मात्र आहे, चिन्मय आहे, चिद्व्याप्त आहे.कारण हे कार्यानुगत, कार्यमात्रानुगत असल्यामुळे ते सर्वग म्हटले आहे. आणि जें सर्वग तेच बृहत् म्हणजे ब्रह्म होय, कारण हें कार्या-कार्याहून मोठे आहेच, पण ते सर्व कार्याना पुरून उरणारे म्हणून हि मोठे आहे. म्हणूनच म्हटले आहे " पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपाद् अस्यामृतं दिवि । " कार्य हे एकदेशीच असावयाचे. अल्पीयसच असावयाचे, कारण हें तसें एकतेशी नाही. म्हणून में सर्वगः महणून ते बृहत्कार्य-विम्नार-व्यापी म्हणून कारण मग म्हणावयाचे, पण कार्य-विस्तारतिरिक्त म्हणून ते बृहत वा ब्रह्म म्हणावयाचे. कारणाधीनच कार्य असते, पण कारण कार्याधीन नहे, तें स्वतंत्र असते. म्हणून ते सर्वग म्हणजे सर्वच्यापीच नव्हे, तर सर्वातिशायी आहे.

१२४. सर्वविद्-भानु
भानु म्हणजे सूर्य हा विश्व-प्रकाशक म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु तो वस्तुत: केवळ बाह्य-प्रकाशक आहे. तो बाह्याबरोबर अभ्यन्तराचें हि प्रकाशन करीत असता तर त्याला अन्वर्थकपणे विश्व-प्रकाशक म्हणतां आलें असते परंतु तो तसा नसल्यामुळे त्याला सर्वविद् हे विशेषण जोडून परमेश्वराचे वर्णन केले आहे. परमेश्वर हाच एक असा भानु आहे, प्रकाशक आहे, की जो बाहयाभ्यंतर समस्त विश्व प्रकाशित करतो. सूर्य पृथ्वी अंतरिक्ष आणि आकाश हे तिन्ही हि लोक प्रकाशित करतो, त्यामुळे तोहि जणू सर्वविद् झाला. तो विश्वाचा वरचा, मधला आणि खालचा भाग जाणतो म्हणून तो हि सर्वविद् म्हटला. आणि त्यामुळेच त्याची उपमा परमेश्वराला दिली आहे. तथापि तसे करतांना तो असर्ववित् आहे असेहि सुचवून अनुपम परमात्म्याला, सर्ववित् परमात्म्याला, त्याची उपमा देता येण्यासारखी नाही. याचे हि भान राखले आहे. सूर्य त्रिलोकीचे प्रकाशन करीत असला तरीहि त्रिलोकी केवळ सूर्यमालेतीलच असणार. तिच्या बाहेर तिच्याहून मोठ्या किती त्रिलोकी आहेत याची गणना नाही. म्हणजे अन्तर्बाह्य दोन्ही क्षेत्रे सूर्य जाणत नाहीच पण बाहयहि नि:शेष जाणत नाही. अशा सूर्याची उपमा परमेश्वराला कशी देतां येईल ?

१२५. विष्वक्सेन
विष्वक म्हणजे सर्वतोदिश आणि सेना म्हणजे सैन्य, ज्याची सेना सर्वत्र आहे, तो विष्वक-सेन. सेना हे प्रभुत्वाचे साधन आहे. ज्याच्या पदरी सेना असते, तो राज्य करतो. पृथ्वीवरील राजाची सेना मोजकीन असते. त्या लहान मोठ्या सेनेच्या बळावर ते राणे आपलें लहान मोठे राज्य चालवीत असतात. एखादा राजा सार्वभौम म्हणवितो. परंतु, त्याचे साईभौमत्व आपल्या प्रदेशा-पुरतेच असते. संपर्ण पृथ्वीचे राज्य कोणाच असत नाही. पुन्हांसर्व क्षेत्रांतहि त्याची सत्ता चालत नाही. विद्या, कला, कुशलता इत्यादि क्षेत्रांत त्याची सत्ता आपल्या प्रदेशात हि चालत नाही. सर्वांच्याच देहावर राजाची सत्ता मानिली, तरी सर्वांच्या मनातर त्याची सत्ता नाहीच चालत, सर्वाच्याच काय पण स्वतःच्या मनावर तरी राजाची सत्ता चालते काय ? सारांश, सेनापति म्हणविणारे राजे हे आडनांवाचेच राजे होत. त्यांची सत्ता नाममात्रच. परमेश्वरच एकमात्र सर्व सत्ताधीश आहे. कारण, त्याची सेना सर्वत्र पसरलेली आहे. त्यामुळे सर्वत्र त्यानेच राज्य आहे. या विष्वक्सेनाचा सैनिक म्हणजे भूतमात्राचा प्रत्यगात्मा, अन्तर्यामी होय.

१२६. जनार्दन
जन म्हणजे जीव आणि अर्दन म्हणजे पीडणारा !. परमेश्वर जीवांना त्यांच्या कर्माप्रमाणे शुभाशुभ फल देऊन पीडत असतो. पाप कर्माचे फळ दुर्गति देऊन जीवांना तो पाप कर्माचे प्रायश्चित्त करायला लावतो आणि पुण्य कर्माचे फळ सुगति देऊन आणि तद्द्वारा पुण्यकर्माचा क्षय करुन कर्मचित लोकांचे अनित्यत्व दाखवून देत असतो. अनित्यत्व आणि दु:खरुप दोन्ही हि त्याज्य होत, हे त्यांना तो स्वानुभवाने पटवीत असतो. "अनित्यं असुखं लोकं " इमं प्राप्य भजस्व माम् " गी. ९.३३ असें तो जीवाना उपदेशीत असतो. अशुभ गतीने उघडच दु:ख होत असते आणि शुभ गतीच्या अनित्यत्वाने हि, त्या लोकांतून पुनरागति झाल्याने दुःखच होते. अशा प्रकारें उभयथा परमेश्वर जीवांचे अर्दनच करीत असतो.
या अर्दनांत त्याचा हेतु जीवांच्या ठाई जिज्ञासुता पेरण्याचा असतो, अर्दन करण्याचा नसतो. आणि सदर अर्वनाचे फलित हि शेवटी जिज्ञासुतोत्पत्ति द्वारा आत्मज्ञानलाभच असते. या दोन्ही कारणांनी जनार्दन जनाना , भक्ताना त्यांनी यजिला असता परम-पुरुषार्थ-लाभ साभ करून देणारा असा अर्थ निष्पन्न होतो.

१२७. वेद
वेद अक्षरस्वरुप आहेत. आणि ब्रह्माचेंहि तेंच लक्षण आहे. " अक्षरं ब्रह्म परमम् " त्यामुळे वेदाला ब्रह्म आणि ब्रह्माला वेद ही पर्याय नामें झाली आहेत. वेदाचें हे रहस्य जर ओळखले नाही तर वेदाची किंमत कितीशी ? ती हि अक्षरमात्रच म्हणावी लागेल. शब्दाला अर्थ असतो, अक्षराला नाहीं, अक्षर अव्यक्तस्वरूप आहे. शब्द व्यक्त आहे. व्यक्ताची कितीहि किंमत केली तरी ती परिमितच. अव्यक्ताची सर त्याला यायचीच नाही. अक्षर अव्यक्त आहे, म्हणून त्याची किंमत अगणितच आहे. वेद हे तसे हि अक्षर-स्वरूपच आहेत. म्हणूनच त्यांना अक्षरराशि म्हटले जाते. आणि त्यांच्या अन्वयार्थाची व्यर्थ लावालाव वैदिक करीत नाहीत. कारण त्यांचा एकच अर्थ सुनिश्चित आहे, अक्षर (ब्रहा). त्याचा परत अर्थ तो काय करायचा ? आणि करून हि त्याहून अधिक उंच अर्थ कोणता होणार ध्रुवाहुन वर कुठे जाणार ? तिथून जाणे म्हणजे खालीच जाणे. म्हणून वेद म्हणजे अक्षर आणि अक्षर म्हणजे तेच.

१२८. वेदवित्
वेदवित् म्हणजे वेद जाणणारा, अर्थात् अक्षरवित्, ब्रह्मवित्. वेदवित् तो नव्हे, जो वेदाची अक्षरे जाणतो, तर तो होय जो आत्मज्ञ आहे. वेदाची अक्षरे घोकणारा आणि षडंगांचे अध्ययन करणारा ब्रह्मचारी, यज्ञयागांत आणि संस्कारांत त्यांचा विनियोग करणारा गृहस्थ, तपस्या करून महावाक्य-विचाराने आत्म-चिंतन करणारा वानप्रस्थ आणि "अहं ब्रह्मास्मि' म्हणून विदेह विहार करणारा संन्यासी हे सगळे वेदवित् आहेत. सगळ्यांचा उद्देश वेद आत्मसात् करण्याचा आहे. तदर्थच त्यांचे जीवन आहे म्हणजे प्रयास आहे. त्यांतच परिणति आहे. संकल्प, साधन आणि सिद्धि जर वेदरूप आहे, तर तो वेदवित्च म्हणावयाचा.

ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माम्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥ गीता ४ - २४

अशी ब्रह्मकर्मसमाधि ज्याची लागली तो वेदवित् होय. परमात्माच असा वेदवित् आहे. असा वेदवित् परमात्माच होय.

१२९. अव्यङ्ग
विकलांग म्हणजे व्यंग, जो व्यंग नके तो अव्यंग. परमेश्वर सर्वांग-संपूर्ण आहे. त्याच्यांत अमुक एक अंग उणे आहे असे म्हणता येत नाही, म्हणून तो अव्यंग. परमेश्वर वस्तुतः अव्यक्त-मूर्ति आहे. आणि त्यामुळेच व्यक्ताबरोबर येणारे जे गुणदोष त्यांतून तो मुक्त आहे. कोणतीहि व्यक्ति कितीहि सर्वांग-सुंदर कल्पिली तरी तिच्या ठायीं कांहींना कांहीं न्यून आढळतेच आढळते, कोणी रूपवान् आहे, तर तो गुणवान् नाही, कोणी गुणवान् आहे, तर रूपवान् नाही. कोणी गुण-रूपवान् आढळलाच तर तो शीलवान् नाही. शीलवान असला तर ज्ञानवान् नाही, ज्ञानवान् असला तर चिरंजीव नाही. तात्पर्य व्यक्ति म्हटली की ती निर्दोष नसायचीच. म्हणून परमेश्वर जो सर्वांग-सुंदर , निर्दोष आहे तो अव्यक्त-मूर्ति आहे. आणि म्हणूनच तो अव्यंग. अनित्यता वा मिथ्यात्व सर्वांत मोठे व्यंग होय. ते सर्व गुणांची माती करते. परमेश्वराच्या ठाई तें नाही. म्हणून तो अव्यंग आणि सर्वगुणाधार होय.

१३०. वेदाङ्ग
वृक्षाचे मूळ, स्कंध, शाखा, विटप, पत्र, पुष्प, फळ ही सर्व अंगें म्हणजे वृक्षच. वृक्ष आणि वृक्षांगें अभिन्नच होत. तद्वत् वेद आणि वेदांगें वेदच, ती दोन नाहींत. तो सगळा वेदच होय. परमात्मा वेद-स्वरूप आहे तर वेदांची अंगेंहि तोच आहे. गूळ आणि गुळाचा रवा वेगळा नाही. दोन्ही गूळच. वेदाची अंगें कोणती ? शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष ही सहा वेदांगें मानिली आहेत. त्यांच्याशिवाय वेदांचें यथावत् ज्ञान होत नाही, वेद हे नुसते मंत्र नाहीत, त्या सोबत तंत्र हि आहे यज्ञाचे. या दोहोंच्या ज्ञानासाठी ही अंगें आवश्यक आहेत. शिक्षेनें मंत्रोच्चार कसा करावा ते कळते. निरुक्ताने शब्द-ज्ञान होते. व्याकरणाने पदज्ञान होतें. तर छन्दानें चरण-ज्ञान होतें. चाल कळते. हे मंत्रज्ञान झालें. तंत्रज्ञानासाठी कल्प आणि ज्योतिष ही दोन अंगे आहेत. ज्योतिषाने कर्म-काल आणि कल्पाने अधिष्ठानोपकरणादि-सहित विधिज्ञान होते. हे तंत्रज्ञान होय. मंत्र-तंत्र मिळून पूर्ण ज्ञान. हे वर्ण-ज्ञान झालें. वस्तु-ज्ञानासाठी आवश्यक अंगें म्हणजे पंच ज्ञानेंद्रियें आणि अन्तःकरण ही षडङ्गे होत. यांच्या द्वारा आत्म्याचे बाह्याभ्यंतर-ज्ञान होतें. हें ज्ञान हाच वेद होय, ऊर्ध्वमूल अधःशाख असलेला हा संसारच त्रैगुण्यविषय वेद आहे. त्याच्या ज्ञानाची ही षडङ्गे. आणि ती सर्व ज्ञानमय परमात्म-स्वरूपच होत.

१३१. वेदवित्
मत्स्यावतारांत देवाने वेदांचा उद्धार केला आहे. या वेदोद्धारामुळे तो बेदवित् झाला. अर्थात् " वेदान्विन्दति इति " वेदवित् म्हटला गेला. देवाने शंखासुराला मारून त्याने कल्पांती चोरून नेलेले वेद परत मिळविले, म्हणून तो वेदवित्. शंख हा जलचराचे कवच आहे. त्या शंखांतून जो अवर्ण ध्वनि निघाला तोच वेद होय. त्यांतूनच पुढे सर्व वर्ण निघाले. त्यांचा समाहार तो ॐ. तो एकाक्षर वेद होय. त्याचा विस्तार ती त्रयी. तिचे परिशिष्ट म्हणजे अथर्ववेद. आणि तिचे उपबृंहण म्हणजे पंचम घेद भारत होय. या सर्व संख्यात आणि असंख्यात वेदांना कारणत्वानें, अव्यक्ताक्षररूपानें धारण करणारा म्हणून परमेश्वर हा वेदवित म्हटला आहे. तो ' वेदान् वेत्ति ’ तसा ' वेदान् विन्दति ' म्हणूनहि वेदवित् आहे.

१३२. कवि
कवि म्हणजे क्रांतदर्शी. आणि क्रांतदर्शी म्हणजे पारदर्शी. जो हें ऐहिक जीवन तेव्हढे पाहतो, ज्याला पलीकडचे दिसत नाही, तो कवि नहे. जो या देहाच्या पलीकडचे आत्म्याचे जीवन पहातो तो कवि होय. परमेश्वर विश्वरूपाच्या पलीकडे असलेल्या स्वरूपाला पाहतो म्हणून काय म्हणायचे ? ते निजरुपच तो आहे. म्हणून तो कवि म्हणजे तत्त्वज्ञ आहे, एवढेच नव्हे तर तें स्वतत्त्वच तो आहे.

काव्य करतो त्यालाहि कवि म्हणतात. परमेश्वराचें काव्य कोणते ? ही सृष्टिच परमेश्वराची काव्य-कृति होय-जी नित्य-नूतन आहे, जी अजर आणि अमर आहे. अशी दिव्य भव्य सर्वाश्चर्यमय चिरंतन कलाकृति परमेश्वराहून अन्य कोण करू शकतो ? तुम्ही म्हणाल, काव्य तर शब्दमय अप्सते. आणि ही सृष्टि म्हणजे तर काही शब्द नव्हे. त्याचे पहिले उत्तर हे की कवीचे कर्म म्हणजे काव्य अशी व्याख्या आहे. मग ते कर्म शब्द, स्वर, रंग, धातु कशांत हि आकृत होवो. तें सारें काव्यच होय. दुसरे उत्तर असें की ही सृष्टि नामरूपात्मक आहे. पैकी नाम प्रथम असून सूक्ष्म आहे. रूपाचा क्रम त्यानंतरचा. तें स्यूल असून सूक्ष्माचे कार्य आहे. आणि असे म्हटलें म्हणजे ही सृष्टि शब्दसृष्टिच ठरते. सृष्टिमूल संकल्पहि वाङ्मयच असतो. त्या वाणीची परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी ही रुपे होत. वर्णाकृतिहि त्या शब्दाचेच रूप आहे, हे आधुनिक चित्रवाणीवरून सहज लक्षांत यावें.

लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः ।
चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्र्श्चतुर्भुजः ॥१५॥


१३३. लोकाध्यक्ष
लोक्यन्ते इति लोका: । जे प्रकाशित होतात, गोचर होतात, ते लोक होत. ग्रह, नक्षत्र, तारका हे सारे लोकच होत. लोकालोक नामक विश्वक्षितिज-पर्वतमंडलाच्या आतील सर्व भुवनें म्हणजे लोक. त्याच्या पलीकडील ते अलोक. तो स्वत: लोकालोक. कारण त्याची एक बाजू तेवढी अवलोकिली जाते आणि दुसरी अवलोकनांत येत नाही. तो जणू लोक आणि अलोक यांचा सांधा आहे. वस्तुत: तो विभाजक आहे लोकालोकांचा. परमेश्वराचें तें अध्यासन आहे. परमेश्वर त्यावरून या सर्व लोकांचे निरीक्षण करीत असतो. म्हणून तो लोकाध्यक्ष म्हटला आहे.

तो लोकाभिमुख आहे म्हणून लोकाध्यक्ष. त्याची पाठ जिकडे आहे तिकडे अलोक आहे. वस्तुत: परमेश्वर सर्वतोमुख आहे. त्याची पाठ कुणीकडेच नाही. तो सर्वांच्याकडे समान पहातो आहे आणि म्हणूनच त्याला लोकाध्यक्ष म्हणावयाचें, अर्थात् लोकाध्यक्ष म्हणजे समदृक्. स्वाभिमुख म्हणून लोक त्याला लोकाध्यक्ष म्हणतात. पण ज्यांना आम्ही अलोक म्हणतो त्यांनाहि तो अभिमुखच आहे. सूर्य नारायणाचा प्रतिनिधि आहे, प्रतिमा आहे. प्रत्येकालाच तो "मां प्रति मां प्रति पश्यति' असे वाटते. सूर्य हि म्हणून लोकाध्यक्ष, आमच्यापुरता लोकाध्यक्षच आहे.

१३४. सुराध्यक्ष
सुर म्हणजे देव हे लोकाध्यक्षच आहेत. पण त्या देवांचा अध्यक्ष कोण ? त्यांचा हि वरिष्ठ, त्यांचा हि निरीक्षक, कोणी असेलच.. तो जो लोकाध्यक्षांचा हि अध्यक्ष तो परमेश्वर होय. "महोच्चैः पदानां नियन्ता' तो आहे. अधिकार-पदांची श्रेणी आपण मानवी राज्यांत पाहतो. दैवी राज्यांत हि तशी ती आहे अशी मानवी कल्पना. तिला अनुसरून लोक-पाल, त्यांत इन्द्र श्रेष्ठ, त्याहून हि परमेष्ठी श्रेष्ठ, हे सर्व सुरवर्य होत. पण त्यांचा हि चरम आणि परम वरिष्ठ तो परमेश्वर होय. तो सुरचक्रवर्ती, सुरमंडलाधीश होय. लोकाध्यक्षांहून हे उच्चतर पद आहे. याहून पर वस्तुत: दुसरे नाही.

१३५. धर्माध्यक्ष
लोकाध्यक्षाहन हराध्यक्ष बरिष्ठ आणि दुराध्यक्षाहन बरिष्ठ धर्माध्यक्ष होय, हे तिन्ही परमेश्वरच आहेत, तर त्यात उच्चावचता कशी ? उच्चावचता वस्तूत: नाही, पण अधिकारत: कल्पिली जाते. नियत्र-पद हे सर्वोच्च न्हटले पाहिजे. नियम्यपद किती हि उच्च असले तरी ते नियन्त्रकाधीनच म्हणावें लागतें. हे नियमाक तत्त्व धर्म होय. त्याचा जो शास्ता लो सर्वनियन्ता म्हटला जातो. परमेश्वर हा तसा "धर्मस्य शास्ताआहे " धर्मस्य प्रभु: " आहेम्हणून तो धर्माध्यक्ष म्हटला आहे आणि हे पद सर्व पदाहून वरिष्ठ आहे. व्यवहारातही असाच क्रम आहे. अधिकारी वर्ग त्यावर विधायक मंडळ , त्यावर संविधान आणि संविधान संरक्षक राष्ट्रपति. संविधान संरक्षकाहून वरिष्ठ कोणी नाही तो सार्वभूम सर्वसत्ताधिशा असतो. त्यालाच विश्वव्यवहारात धर्माध्यक्ष म्हटले आहे ओच परमेश्वर त्याचा प्रतिनिधि भूत राजा होय.

१३६. कृताकृतः
कृत हिणजे कार्य आणि अकृत म्हणजे कारण, परमेश्वर हा कृताकृत आहे म्हणणे तो कार्यकारणरूप आहे.

कृताने आकृत तो कृताकृत असा तत्पुरुष समास हि घेता येईल. परमात्मा अव्यक्त स्वरूप आहे. तो व्यक्ताच्या योगें आकृत झाला आहे, आकारास आला आहे.

परमात्मा कार्य कारणरूप आहे असे म्हणणे म्हणजे तो उभयरूप आहे असेंच नव्हे, तर सर्वरूप आहे असें म्हणणे होय. कारण, जे कारण नाहीं वा कार्य नाहीं अथवा कार्यकारण नाही असे या जगात काय आहे ? ब्रह्मरूपाने तो कारण, विश्वरूपाने तो कार्य आणि प्रकृति-गुण-तत्त्वरूपाने तो कार्यकारण आहे.

वस्तुतः परमात्मा कार्यकारण-संपर्करहित केवलस्वरूप आहे. कार्य आभासिक असल्याकारणाने कारणाचे कारणत्व हि मिथ्याच म्हटले पाहिजे.

" न सत् तत्‌ नासदुच्यते " गी. १३‍ - १२

१३७. चतुरात्मा
पाञ्चभौतिक, लिङ्गख्य आणि कारणरूप अशी तीन शरीरें जीवाची मानिली आहेत. पाञ्चभौतिक शरीर साडून जीव लिङ्गरूपाने लोकान्तरास जातो येतो या लिंङ्गदेहातून तो ज्ञानाने मुक्त झाला तरी कारणरूप देह कल्पान्तापर्यंत राहतो. जेव्हां परमेश्वरी संकल्प मावळतो, तेव्हाच तो कारणरूप देह हि मावळून जीव परिपूर्ण मुक्त होतो. जीवाच्या ह्या ज्या तीन अवस्था तेच तीन आत्मे होत आणि चौथा आत्मा तो निरुपाधिक तुरोय होय. अशा प्रकारे परमात्मा चतुरात्मा म्हटला जाहे.

अथवा विश्वाचा उत्पत्ति स्थिति आणि संहृति करणारे जे अधिकारी ब्रम्हा विष्णु महेश ते तीन आणि गुणातीत तो तुरीय जसे हि चातुरात्म्य कल्पिता येईल. पहिला कल्प व्यष्टिदृष्टीने आहे, दुसरा समष्टिदृष्टीनें.

१३८. चतुर्व्यूह
व्यूह हा वैष्णव वा सात्वत तंत्राचा पारिभाषिक शब्द आहे. मन्त्र मननाचे साधन आहे. तन्त्र तननाचे, म्हणजे कर्म-विस्ताराचे साधन आहे. मन्त्र-सिद्धि म्हणजे मंत्राच्या योगें निगूढ आध्यात्मिक ज्ञान आत्मसात् करणे, तन्त्र-सिद्धि म्हणजे क्रियाकलापाच्या योगे मन्त्रार्थाला मूर्तिमंत करणे. " देहवंतास अव्यक्ती सुखें बोध घडे चि ना " अशी वस्तुस्थिति असल्यामुळे तन्त्राची चलती झाली. यज्ञ हे वैदिक तंत्र आहे. मूर्तिपूजाविधि सात्वत तंत्र आहे. त्यांत वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे चार चतुर्व्यूह म्हटले आहेत. हे कृष्णपरमात्म्याचे चार भाव होत. ते या जगाचे परिपालन करीत आहेत.

समूहन म्हणजे एकीकरण. व्यूहन म्हणणे विस्तरण, एकाच आद्या शक्तीचे कार्यानुषंगानें जें विभजन कल्पिलें, तो व्यूह होय. तो व्यूह आवश्यकतेप्रमाणे चतुर्धा, अष्टधा, दशधा अथवा नैकधा कल्पिला जातो. चार ही संख्या इजा, बिजा, तिजा यांच्या पलीकडची असून लक्षणने ती समग्रतावाचक आहे. चोहोंकडे म्हणजे सगळीकडे, चतुरात्मा, चतुरर्व्यूह, चतुर्दंष्ट्र, चतुर्भुज या चतुरादि पदांत ती अभिधेने तशी लक्षणे हि घ्यावयाची आहे.

१३९. चतुर्दंष्ट्र
दंष्ट्रा म्हणजे दाढ. ज्याला चार दाढा आहेत तो चतुरदंष्ट्र होय. सिंह, व्याघ्र, नाग इत्यादि हिंस्र श्वापदाना चार सुळे असतात. त्याना चतुर्द्ष्ट्रं म्हणता येइल. सुळे आणि दाढा हा वस्तुत: भिन्न आहत. दाढा चाराहून अधिक असू शकताल परतु सुळे मात्र, भारच असतात. हत्ती द्विरद आह आणि सिहादि हिंस्र चतुर्दंष्ट्र आहेत. हस्ता हस्तवानहि आहे, पण सिंहादि शस्त्री आहेत, शस्त्रवान् आहत. दष्ट्रा आणि नखें ही त्याची शस्त्रे होत. त्यामुळेच ता ’ वनराज ', मृगाधिपति' झाला आहे. इथे चतुर्दंष्ट्र म्हणून सिह आणि नरसिंह दोन्हीचा हि निर्देश समजावयाचा आहे. सिंह भगवद्विभूति आहे, तर नरसिंह भगदवतार आहे.

दंष्ट्रा ह संहाराचे प्रतीक आहे. भगवान् कालरूपाने विश्वाचा संहार करीत आहे. तो काळ असा आहे की त्याचा प्रतिकार कोणी करू शकत नाही. म्हणून तो चतुर्दष्ट्र सिंह म्हणावयाचा. त्याच्या दाढातून कोण सुटला आहे ? नित्य, नैमित्तिक, प्राकृतिक आणि आत्यन्तिक प्रलय हेच त्या काळाचे चार सुळे होत. त्यांनी तो सर्वांना ग्रासत आहे. वस्तुत: तो सर्वतो-ग्रासी आहे, सर्व-ग्रासी आहे.

१४०, चतुर्भुज
चतुष्पाद, चतुर्भुभुज, चतुर्मुख इत्यादि पदांत चतुर् हे संख्यावाचक नसून ते सर्ववाचक, संपूर्णतावाचक आहे, असें पूर्वी म्हटलेंच आहे. चतुष्पाद पदामध्ये चतुर्शब्द समग्रतावाचक, पूर्णतावाचक आहे. कारण पादशब्द चतुर्थांश-वाचक आहे. पण त्यामुळे पुढे चार या संख्येला पूर्णत्ववाचकता आली आहे. चतुर्भुजादि शब्दांत हि ती तशी आहे. भुज म्हणण बाहु हा सत्त्वमयी पालनशक्तीचे प्रतीक आहे. ईश्वर चतुर्भुज आहे म्हणजे तो सर्वतः सर्वांचें पालन करीत आहे. तो समग्र पालन-शक्ति आहे. ईश्वर हा सर्वाधीश आहे. त्याला निखिल विश्वाचे परिपालन करावयाचे आहे. त्याला माणसाप्रमाणे दोन हात असून कसे चालल, त्याला तर चोहीकडे पहायचे आहे, सांभाळायचे आहे, सावरायचे आहे. त्यामळे तो चतुर्मुख आहे, चतुर्भुज आहे, चतुर्दंष्ट्र आहे. त्याला सर्वतोदिश उत्पत्ति स्थिति आणि संहृति करावयाची आहे. त्याचा हा सर्वविध व्याप सर्वतोदिश आहे, म्हणून तोच व्यूह आहे. सर्वश्वराचे सर्व काही चौरस आहे. सर्वश्वर सर्व काही असू शकेल, एकांगी असू शकणार नाही. तो विकल असणार नाही. सकलच असणार, समग्रच असणार.

॥ हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP