ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

स्वक्षः स्वङ्ग शतानन्द नन्दिर्ज्योतिर्गणेश्वरः ।
विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्छिन्नसंशयः ॥६६॥


६१५. स्वक्ष
सु शोभनें सोमसूर्यवत् अक्षिणी यस्य सः स्वक्षः । ज्याचे डोळे चंद्रसूर्यासारखे सुंदर आहेत तो परमात्मा स्वक्ष म्हणावयाचा. पण डोळ्यांचे साजरेपण कशांत म्हणावयाचें ? निर्मल, आरक्त, पाणीदार, विशाल, काळीभोर बुभुळे व कडा आरक्त, आणि लांबसडक पापण्या व बांकदार सुरेख भुवया असलेले डोळे सुंदर म्हटले जातात. पण हे असे सुंदर डोळे निद्राधीन होतात, मलिन होतात. परंतु परमात्म्याचे डोळे हे अनिमेष अतन्द्रित रात्रंदिवस पहात असतात. दिवसां सूर्य रात्री चंद्र आणि जेव्हां चंद्र सूर्य नसतील तेव्हां अग्नि हा परमात्म्याचा डोळा जागत असतो नि बघत असतो. म्हणून परमात्म्याचे हे सर्वसाक्षित्व व नित्यसाक्षित्व प्रकट करण्यासाठी त्याला कधी स्वक्ष तर कधीं त्र्यक्ष म्हणतात. स्वक्ष नि त्र्यक्ष दोहोंचेहि तात्पर्य एकच. सर्वसाक्षित्व व नित्यसाक्षित्व हेच स्वक्षत्व होय आणि तें परमेश्वराचे अनन्यसाधारण आहे. म्हणून परमात्माच एक स्वक्ष होय. आतां डोळा दृश्य पाहतो आणि त्यायोगें रागद्वेषादि विकारांनी विकृत होतो. हा असा विकाराधीन होणारा डोळा स्वक्ष म्हटला जाणार नाही. ज्याची दृष्टि बाह्य विषयांच्या इष्टानिष्टतेनें दूषित होत नाही तोच स्वक्ष म्हणावयाचा. परमात्मा विश्वाचे सर्व व्यवहार पाहतो परंतु त्यांचा कांहीं एक परिणाम त्यावर होत नाही. तो अविषक्तदृष्टिच राहतो. आणि हे अविषक्तदृष्टित्वच मुख्यतः स्वक्षत्व होय. दुसरा असा कोणता डोळा आहे जो दृश्याच्या इष्टानिष्टतेनें सुखी वा दुःखी होत नाही, विकृत होत नाही ?

६१६. स्वङ्ग
सु शोभनानि अंगानि यस्य सः स्वगः । ज्याची सर्व अंगें शुभ आहेत तो स्वङ्ग म्हणावयाचा. पूर्वी याच अर्थाचा शुभाङ्ग शब्द येऊन गेला आहे. मग शुभाङ्ग आणि स्वग यांत अन्तर काय ? अन्तर कांहीं नाहीं, पण विशेष आहे असे म्हणता येईल. सौंदर्य दोन प्रकारची आहेत. एक चर्मचक्षूला दिसणारे, दुसरें दिव्यचक्षूला दिसणारे. पहिल्या प्रकारच्या सौंदयनि युक्त व्यक्तीला आपण रूपसुंदर म्हणतों, तर दुसऱ्या प्रकारच्या सौंदर्यानें युक्त व्यक्तीला गुणसुन्दर म्हणतों. दोन्ही सौन्दर्ये एकवटलेली क्वचितच पहायला मिळतात. मोर रूपसुंदर आहे, तर कोकिल गुणसुंदर आहे. परमेश्वरानें प्रत्येक जीवाच्या ठाई स्वाभिमानासाठी काही गुण व अनतिमानासाठी म्हणजे अगर्वासाठी काहीं न्यून ठेवून दिलें आहे. पण स्वतः तो परमात्मा केवळ निर्दोष परिपूर्ण आहे. जेव्हा आपण त्याच्या सकलसुंदरसंनिवेश रूपानें अभिभूत होतो तेव्हां आपण त्याला स्वङ्ग म्हणतों. जेव्हां त्याच्या दैवीगुण संपदेनें, त्याच्या ज्ञानवैराग्यादि गुणांनी अभिभूत होतो तेव्हां त्याला शुभाग म्हणतों. "शुभानि अगानि यस्य सः शुभाङ्गः" तसा "शुभं एव अङ्गं यस्य सः शुभागः" असाहि विग्रह समजावयाचा. भेलीचे कोणतेंहि अंग चाखले तरी ते जसें गोडच लागते तसे ज्याचे कोणतेंहि अंग सुरूप आहे सुखकर आहे तो परमात्मा स्वङ्ग होय. कापूर जसा सर्वांगी निर्मल उज्ज्वल सुंदर तसा परमात्मा हा आंत बाहेर खाली वर इकडून-तिकडून चोहीकडून सु-अंग आहे, अव्यङ्ग सुंदर आहे.. • स्वङ्ग, पद सुषमाङ्गत्वहि प्रकट करते. सूर्य कुणीकडूनहि पहा तो संमुख आहे. ज्याला त्याला तो आपल्याकडेच बघतो आहे असे वाटते. इतर कोणीहि असा स्वङ्ग नाही. तो एकाकडे पहात असेल तर दुसऱ्याकडे पाठ करून बसेल. तसें परमात्म्याचें नाहीं. तो सर्वांना संमुख आहे. म्हणूनहि तो स्वङ्ग म्हणावयाचा. तो सर्वतोमुख आणि सर्वतोभद्र म्हणून स्वङ्ग होय.

६१७. शतानन्द
शतं आनन्दाः यस्य सः शतानन्दः| शंभर आनंद ज्याचे आहेत तो शतानन्द म्हणावयाचा. शत संख्या इथे पूर्णार्थ वाचक आहे. अर्थात् शतानन्द म्हणजे पूर्णानन्द. परमात्मा हा पूर्णानन्द आहे. त्याचा आनन्द अन्यून परिपूर्ण आहे. कारण तो चिन्मात्रमूर्ति आहे. अचेतनाला आनन्दोपलब्धि होऊं शकत नाही.हिमालय प्रचंड मोठे धूड आहे, पण त्यापेक्षा एक लहान मुंगीहि महान् आहे. कारण ती चेतन आहे. तिला सुखदुःखाचा अनुभव घेता येतो. जगांत पांच विषय आहेतः शब्द स्पर्श रूप रस गन्ध. पांचच कां ? सहावें इन्द्रिय कुणाला नाही म्हणून. पण या पांच विषयांचा आस्वाद सर्वच जीवांना मिळतो असें नाहीं. कांहीं जीव एकेन्द्रिय कांहीं द्वीन्द्रिय कांहीं त्रीन्द्रिय कांहीं चतुरिन्द्रिय आणि कांहीं पंचेन्द्रिय असतील. पुन्हां हीं इन्द्रियें पूर्ण समर्थ असतीलच असे नाही. दिवाभीताला दिवसां काही दिसत नाहीं तर इतर प्राण्यांना रात्रीं कांहीं दिसत नाही. म्हणून माणूस थोड्याच अंतरावरचे पाहूं शकतो, तर गिधाड घारी खूप दूरचे पाहू शकतात. म्हणजे या इन्द्रियांच्याहि शक्ति वेगवेगळ्या आहेत. या परिमित शक्तींमुळे त्यांचा आनंदहि परिमितच म्हणावा लागेल. म्हणजे विषयहि मित आहेत आणि त्यांचे ग्रहण करणाऱ्या इन्द्रियांची शक्तिहि परिमित आहे, तेव्हां त्यांच्यापासून जीवांना मिळणारा आनंद हा सुपरिमितच म्हटला पाहिजे. त्यामुळे विषयेंद्रियसंनिकर्षज आनंद भोगणाऱ्या जीवांना मितानन्द च म्हणणे भाग आहे. परंतु आनन्दोपलब्धीसाठी ज्याला विषयेन्द्रियांवर अवलंबून रहावें लागत नाही त्याच्या आनंदाला मिति नाही. म्हणून तो 'आत्मन्येवात्मना तुष्ट परमात्मा म्हणावयाचा शतानन्द उर्फ पूर्णानन्द. या पूर्णानन्दाचे अंशांशु सेवन करीत ब्रह्मादिस्तंबपर्यंत सर्व जीव जगत असतात. स्तंब म्हणजे गवताचा योंब सुप्तचेतन असतो, तर ब्रह्मा हा जीवांत सर्वात पूर्ण जागृत चेतन असा मानला गेला आहे. त्याला जो आनंद लाभतो तो त्याच्याहून चेतनेच्या खालच्या भूमिकेवर असलेल्या जीवांना कुठून लाभणार ? पण ब्रह्माहि ज्या अर्थी अभिमानी जीवच आहे त्याअर्थी त्याचाहि आनंद हा अशतानंद होय, न्यूनच होय. अतीन्द्रिय आत्मानन्दच शतानन्द म्हटला जाईलः म्हणून परमात्मा हा शतानन्द. इन्द्र म्हणजे परमात्मा हा शतमख तसा तो शतानन्दहि म्हणावयाचा.

६१८. नन्दि
हे पद नन्दि की नन्दी ? दोन्ही पाठान्तरें आढळतात. शंकराचार्यांनी नन्दी असें इन्नन्त घेतलेलें आहे. तथापि इकारान्त पाठच बरा. नन्दिवर्धन इत्यादि नामांत तो आलेला आहे. नन्दि म्हणजे साक्षात् आनन्द आणि नन्दी म्हणजे आनन्दवान्. मागील पदांत म्हटले आहे की तो शतानन्द आहे, तर इथे म्हटले आहे तो आनन्दस्वरूप आहे. आत्मप्रतीति ही अविभाज्य एकरूप एकरस आहे. तथापि तिचेहि विश्लेषण वेदान्तांत सत् चित् आनन्द अथवा अस्ति भाति प्रियः या तीन पदांनी केले जाते. पण "दे पदांत मज उत्तर एका" असें जर कोणी म्हणेल तर त्याला आनन्द हे पद सांगावे लागेल. आनंदांत सत् आणि चित् ही दोन्ही संगृहीतच आहेत. आनंदाची उपलब्धि जडाला होऊं शकत नाही म्हणून परमात्मा हा आनन्दस्वरूप म्हटला म्हणजे तो चित्स्वरूपहि ठरलाच. आणि त्याबरोबरच सत्स्वरूपहि. कारण कोणत्याहि वस्तूला सत्ता असल्याशिवाय तिच्या विषयी बरें वाईट कुठलेंहि विधान मुळी करतांच यावयाचें नाहीं. बरें, पण आत्मस्वरूप हे आनंदात्मकच आहे कशावरून ? कारण कोणाहि जीवाला आपण कधीं नसावें. असें मुळी वाढूच शकत नाही म्हणून. त्याच बरोबर जीव दुःख नसावें असेंच सदैव इच्छीत असतो म्हणूनहि. अर्थात् दुःखाभावरूपच त्याचे स्वरूप असले पाहिजे. आणि म्हणून त्याला आनन्दरूप म्हणावयाचे, नन्दि पद तोच आशय व्यक्त करीत आहे. तो परमात्मा आनन्दी नव्हे, तर साक्षात् आनन्दरूप आहे. म्हणून मी उपनिषदाच्या भाषेत म्हणेन ः "आनन्द उपलब्धव्यश् चिदात्मकतयैव सः । सदात्मैवोपलभ्येत सच्चिदानन्द ईश्वरः । "

६१९. ज्योतिर्गणेश्वर
ज्योतिषां गणः ज्योतिर्गणः, तस्य ईश्वरः सः ज्योतिर्गणेश्वरः परमात्मा ज्योति म्हणजे तेजोगोल, त्यांचा जो गण म्हणजे समुदाय त्याचा जो ईश्वर म्हणजे नियन्ता तो ज्योतिर्गणेश्वर परमात्मा म्हणावयाचा. गीतेत "नक्षत्राणां अहं शशी' आणि "ज्योतिषां रविरंशुमान्” अशी दोन वचनें आली आहेत. आतां नक्षत्र काय नि ज्योतिःपुंज काय दोन्ही तेजोगोलच होत. ग्रह-पथांतील जे सप्तविंशतिसंख्यक तारका-पुंज आणि इतर दृश्य तारागण तेच मुख्यतः नक्षत्र पदानें अभिप्रेत आहेत. ही नक्षत्र नयनालादक आहेत. परंतु विजा आणि असलेच दुष्प्रेक्ष्य प्रखर किरणपुंज हे ज्योतिर्गण होत. आणि सौम्य नयनालादक तेजःपुंजांचा राजा तो चंद्र होय आणि दुष्प्रेक्ष्य उग्र तेजःपुंजांचा राजा तो सूर्य होय. गीतेच्या वरील दोन वचनांचा हाच आशय. अर्थात् ज्योतिर्गणेश्वर म्हणजे मुख्यतः भगवद्-विभूति सूर्य समजावयाचा, परंतु सूर्य हा कितीहि दुष्प्रेक्ष्य असला तरी तो नयनविषय होणारा आहे. त्या दृष्टीनें तो कांही तितका दुष्प्रेक्ष्य म्हणतां यावयाचा नाहीं की जितका जो मुळी चर्मचडूंनी पाहतांच येत नाहीं तो म्हणता येईल. म्हणून त्याला सूर्यकोटिसमप्रभ म्हणतात. गीतेत ह्यालाच उद्देशून म्हटले आहेः
दिवि सूर्यसहस्रस्य भवेद् युगपदुत्थिता ।
यदि भाः सदृशी सा स्यात् भासस् तस्य महात्मनः ॥ गीता ११ - १२

तसेंच पुढेहि म्हटले आहे तिथेच "तेजोभिरापूर्य जगत् समग्रं, भासस् तवोग्राः प्रतपन्ति विष्णो । "
परमात्मा हा प्रकाशक असल्यामुळे तो तेजोरुप आहे आणि तें तेज अलौकिक असल्यामुळे तें चर्मचडूंना असह्य आहे आणि त्यामुळेच तो ज्योतिर्गणेश्वर झाला आहे. त्याच्या प्रचंड तेजापुढें सूर्यादिकांची तेजें हीं कांहींच नव्हत; ती खद्योतवत् होत किंबहुना दिवाचंद्रवत् होत.

६२०. विजितात्मा
विजितात्मा आणि लगेच पुढील पद विधेयात्मा ही दोन पदे मिळून एक विचार पूर्ण होतो. दोहोंनी मिळून पूर्ण जय सूचित केला आहे. शत्रुंना बाह्यतः जिंकून घेतलें तरी मनांतून ते बंडखोरच राहतात. पण त्यांची ही बंडखोरी जाऊन तिथे आज्ञानुवर्तित्व, अनुकूलत्व आले म्हणजे मग ते पूर्ण जिंकले गेले असें म्हणावयाचे. विजितात्मा हे पद बाह्य विजय सूचित करतें तर विधेयात्मा हे पद आभ्यंतर विजय सूचित करीत आहे. विजय संपादावयाचा तो ब्राह्माभ्यन्तर संपूर्ण संपादावयाचा. आता इथे बाह्य विजय म्हणजे इंद्रियजय समजावयाचा. आधी इंद्रियजय संपादावयाचा आणि मग मनोजय साधावयाचा.
वशेहि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता.
तस्मात् त्वं इन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।
पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञान-नाशनम् ॥ गीता ३-४३


इत्यादि गीतावचनांत हाच क्रम वारंवार विस्तारानें विशद केला आहे. इंद्रियजय प्राथमिक स्वरूपाचा आहे. त्याची परिणति मनोजयांत झाली पाहिजे. त्याशिवाय तो पूर्ण म्हणतां यावयाचा नाही. ज्याची इंद्रियें दान्त आणि मन शान्त झाले आहे तो योगी म्हणजे ब्रह्मभूत झाला समजावा. म्हटलेच आहेः
जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः ।
शीतोष्ण-सुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥ गीता ६-७


माणसाची शान्ति आणि समता बाह्यतः शीतोष्ण-जनित सुखदुःखांच्या योगे आणि अभ्यन्तरतः मानापमानजनित असंतोषाच्या योगें भंग पावत असते. परंतु ज्याची इन्द्रियें दान्त आणि मन शान्त आहे, तो मात्र बाह्याभ्यन्तर कोणत्याहि कारणानें क्षोभ पावत नाही. हीच ब्राह्मी स्थिति होय.

६२१. अविधेयात्मा (विधेयात्मा)
विधेयो आज्ञानुवर्ती आत्मा अन्तःकरणं यस्य सः विधेयात्मा । ज्याचा आत्मा म्हणजे अन्तःकरण आज्ञाधारक आहे तो विधेयात्मा म्हणावयाचा. आमची इन्द्रिये मोठी चपल आहेत; जाऊं नये तिथे पाय धावतात, पाहूं नये ते डोळे पहातात, करूं नये तें हात करतात, ऐकू नये तें कान ऐकतात, बोलूं नये तें तोंड बोलतें, चावू नये तें जीभ चाखते अशा प्रकारे आमची कर्मेंन्द्रिये आणि ज्ञानेन्द्रियें स्वैर वागत असतात. आपल्या स्वामीचा द्रोह करीत असतात. पण ह्यांना लगाम घालणे तितकेंसें कठिण नाही. चपळ पायांना एकहात भर दोरी बांधून टाकू शकते. चवचाल डोळ्यांना चार बोटांची पट्टी बंद करूं शकते. पण मनाला तुम्ही अशा प्रकारे लगाम घालू शकत नाही. तें अशरीर, गुहाशय, एकट, दूरंगम, यत्रकामनिपाति, चपल आणि चंचल असें आहे. त्यामुळे तें दुर्निवार आणि सुदुर्धर आहे. त्याचा निग्रह कसा करायचा ? निग्रह दुष्कर आहे, पण अशक्य नाही. त्याचा हा निग्रह अतिमानस भूमिकेवरूनच होऊं शकतो. हेच अध्यात्म होय. आत्मा हा गुणातीत आहे. त्याच्याच आश्रयानें गुणांवर प्रभुत्व मिळविता येते. किंबहुना तो आत्माच विधेयात्मा आहे. त्याला गुणांचा प्रवाह वाहून नेत नाही. तो तटस्थ पांडुरंग गुणप्रवाह पाहतो आहे. या भीमेच्या प्रवाहांत क्षणोक्षणीं बदल होत आहेत, पण पांडुरंग आपला जसाचा तसा ! अठ्ठावीस युगे लोटली तरी त्यांत पालट नाही. त्याच्या चरणांना जो धरून राहिला, तोच या प्रवाहांतून तरला. तोच विधेयात्मा. म्हणून ज्ञानदेव काकुळतीनें म्हणतात
अरे मना तूं पापिष्ठा । कितीहिंडसी रे नष्टा ।
सैरा शिणसी रे फुकटा । विठ्ठलीं विनटा तूं होई ॥
तूं अनिवार नावरसी । तुझेनि संगें नाडले ऋषि ।
तूं तंव अपभ्रंशीं पाडिसी । म्हणोनि गेले गुरुसी शरण ॥
न संडी हरिचरण । नाहीं नाहीं जन्म मरण ।
अवीट सेवी नारायण । तेणें मीतूंपण एकसिद्ध ॥
ज्ञानदेव शरण हरी| मनहिंडे चराचरी ।
न संडी चरण अभ्यंतरीं । नित्य श्रीहरि हृदयीं वसे ॥

पाठान्तर अविधेयात्माहि संभवनीय आहे. त्याचा अर्थ परमात्मा कोणालाहि कार्य नाही. तो स्वयंभू आहे तो अकृत्रिम आहे. तो स्वतंत्र, स्ववश आहे.

६२२. सत्कीर्ति
सत् इत्येवंरूपा कीर्तिर्यस्य सः सत्कीर्तिः । परमात्मा प्रसिद्ध आहे याचा अर्थ तो आहे म्हणून प्रसिद्ध आहे, नाही म्हणून नव्हे. त्यामुळे त्याला म्हणावयाचे सत्कीर्ति, गीतेत म्हटले आहे.
सद्‌भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते ।
प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते । गीता १७-२६

अर्थात् सत्पद अस्तित्व साधुत्व आणि सदाचार याअर्थी प्रयुक्त होते. हा अर्थक्रम विकासक्रमहि सुचवीत आहे. एखादी वस्तु आधीं असेल तरच तिथे गुण आणि कर्म मागाहून लक्षात घेता येतील. तिन्ही धर्म जेव्हां प्रकटतात तेव्हांच त्या वस्तूचे खरे आणि पुरें सत्त्व सिद्ध होते. ईश्वर आहे, तो सर्वगुणसंपन्न आहे आणि त्याचे हे विश्वरूप कर्म प्रशस्त आहे, सुंदर आहे. ह्या कारणानें तो सत्कीर्ति म्हटला आहे. नुसतें अस्तित्व निर्गुण आहे, निर्विशेष आहे. अव्यक्त आहे. त्यावरून व्यक्तीची ओळख पटत नाही. त्यासाठी त्याच्या गुणांची, सत् चित् आनंद धर्मांची ओळख व्हायला पाहिजे. पण गुण हेहि अमूर्तच आहेत. ते गम्य असले तरी तिथे साकारता नाही. त्यासाठी रूप हवें. तें कर्मात साकार होते. कृतीच्या रूपानें आपल्याला व्यक्तीचा परिचय होतो. अग्नि आहे, उष्णता हा त्याचा धर्म आहे आणि पाक वा रसोई हे त्याचे कार्य आहे. त्या कार्यावरून त्याचा पूर्ण परिचय होतो. परमात्मा हा सत्कीर्ति आहे हे त्याच्या ह्या विश्वरूप कृतीवरून प्रत्ययास येते. या कृतीवरून त्याचे अचिंत्य सामर्थ्य प्रकट होतें. व्यक्तीचा पूर्ण परिचय त्याच्या नामरूपगुणकर्मावरून होत असतो. आणि तसा तो विश्वरूपानें परमात्म्याचा होतो. म्हणून तो सत्कीर्ति होय, सत् कार्यरूपं विश्व कीर्तिर् यस्य सः सत्कीर्तिः । हे विश्वच ज्याचें ज्ञापन आहे तो सत्कीर्ति म्हणावयाचा. विश्वाचा उद्‌भव स्थिति आणि लय सर्वच त्या परमात्म्याचे ख्यापन करतात. जे त्याचें ख्यापन वा कीर्तन करीत नाहीं असें मुळी कांहीं नाहींच.

६२३. छिन्न-संशय -
छिन्नः संशयो यस्य सः छिन्नसंशयः । छिन्न झाला आहे संशय ज्याचा तो छिन्नसंशय होय. परंतु संशय छिन्न व्हायचा म्हणजे आधीं तो व्हायला पाहिजे. अर्थात् हे सिद्धीस पोंचलेल्या साधकाचे लक्षण झाले. ज्याला मुळी संशयच होत नाही आणि जो दुसऱ्याचे संशय दूर करतो त्याला म्हणावे लागेल संशयच्छेत्ता. आणि गीतेंत गुरुरूप परमात्म्याला म्हणूनच म्हटलें आहे "त्वदन्यः संशयस्यास्य च्छेता न ह्युपपद्यते ।" हे गुरुदेवा ह्या कर्तव्यमोहरूप संशयाचा निराकर्ता तुजहून वेगळा मला इथे कोणी दिसत नाही. अर्थात् गुरुदेव आहे संशयच्छेता आणि अधिकारी शिष्य आहे छिन्न-संशय, छिन्नसंशय पद इथे तो विद्यासंप्रदाय सूचित करीत आहे. या संप्रदायांत विद्या अविद्येचें निरसन गुरुशिष्यरूपानें करीत आहे असे दाखविलें जाते. विक्रेता आणि ग्राहक मिळून व्यवहार होतो. त्या प्रमाणें गुरुशिष्य मिळून विद्या-संप्रदाय चालतो. त्यामुळे इथे गुरु वा शिष्य यांना गौणत्व आहे, प्राधान्य आहे विद्यासंप्रदायाला. दोन्ही मिळूनच तो संप्रदाय चालवितात. त्यामुळे गुरूबरोबरच शिष्यालाहि महत्त्व आले आहे. मग परमात्मा छिन्नसंशय साधक सिद्ध म्हटला म्हणून बिघडलें कोठे ? छिन्नसंशय पदाचा "छिन्नः संशयो येन सः छिन्न-संशयः" असाहि विग्रह करता येईल. तो गुरुलक्षण सूचित करतो. अशा प्रकारें गुरु-शिष्य उभयरूप तो विद्यासंप्रदाय-प्रवर्तक आहे. संशय, संशयच्छेदन आणि निःसंशयता मिळून ही प्रक्रिया पूर्ण होते आणि ती सगळीच तो परमात्मा आहे. छिन्नसंशय पद ती समग्र सूचित करीत आहे. अर्जुनाप्रमाणें संशयसंप्राप्ति होणे हेहि मोठ्या योग्यतेचे आहे. ज्याला जगांत जगतांना कुठलाहि संशयच उत्पन्न होत नाहीं तो मनुष्य नसून पशुच म्हणावा लागेल.


उदीर्णः सर्वतश्चक्षुरनीशः शाश्वतस्थिरः ।
भूशयो भूषणो भूतिर्विशोकः शोकनाशनः॥६७॥


६२४. उदीर्ण
उद् उपसर्ग ईर् धातु आणि निष्ठा प्रत्यय त यांच्यापासून उदीर्ण हे पद व्युत्पादिले आहे. त्याचा अर्थ होतो उदित, उद्गत. उदीर्ण आणि उदार एकच. उदीर्ण म्हणजे ओसंडणारा, उद्रिक्त. झरा आपलें पाणी आपल्या ठाईं सामावू शकत नाही, तो तें जगाला देत सुटतो. आणि तसा जो आपली शक्ति आपल्या ठाई सामावू शकत नाही आणि म्हणून बाहेर ओतीत असतो तो उदीर्ण होय. परमात्मशक्तीचा हा असा उद्रेक म्हणजे हें विश्व होय. दिककालद्रव्यात्मक या विश्वाचा सारखा प्रवाह चालला आहे. त्यांत कुठे खंड नाहीं. तें सारखे वाढत आहे, ओसंडत आहे. नलाचें दातृत्व वर्णितांना कवि म्हणतो की तो नल इतका उदार होता की त्याच्याकडे येणारे याचकच दाते बनले. त्यांना नलाकडून इतकें दान मिळाले की त्यांनी तें वाहून नेता येत नाही म्हणून रस्त्यांत भेटलेल्या इतर याचकांना देऊन टाकले आणि त्यामुळे त्या याचकांना नलाकडे जाण्याचे कारणच उरलें नाहीं. परमात्माहि तसाच उदार आहे. त्याच्या उदारतेचे दर्शन प्रत्येक जीवाच्या ठाई होत आहे. कोणताहि जीव स्वस्थ नाही. तो सारखा खटपट करीत आहे. ही सगळी खटपट त्याच्या शक्तीचा उद्रेक नाही तर काय म्हणायचे ? आस्तंबब्रह्मपर्यंत सारे जीव नव सृष्टि करीत आहेत. प्रति क्षणी ती वाढत आहे. हा सगळा उद्रेक त्या उदीर्णाचा आहे. वेलीवर किती कळ्या आल्या किती गळाल्या त्याचाहिशोब तिच्यापाशी नाही. ती आपली असंख्य फुलें फुलवीतच राहते. तशी उदीर्णाच्या वेलीवर किती विश्वं लागली नि किती गळाली याचा त्यालाहि पत्ता.नाही. तो आपला ही विश्वें फुलवीत चालला आहे. त्याच्या त्या विश्वसृजनशक्तीला पार नाही. म्हणून तो उदीर्ण होय.

६२५. सर्वतश्चक्षु
सर्वतः सर्वदिक्षु चढूंषि यस्य सः सर्वतश्चक्षुः । ज्याला सगळीकडे डोळे आहेत तो सर्वतश्चक्षु म्हणावयाचा. आम्हांला एकीकडेच डोळे आहेत. त्यामुळे पाठीमागे काय चालले आहे ते आम्हाला दिसत नाही. तिकडे डोळे फिरवावे तर इकडचे दिसत नाही. परंतु परमात्मा हा एकसमयावच्छेदेंकरून सर्वसाक्षी आहे. त्याला एकाच वेळी सगळीकडचे सर्व कांहीं दिसते आहे. सर्वतश्चक्षु आणि सर्वसाक्षी दोहींचा आशय एकच, पण सर्वतश्चक्षु सर्व दिशांत पाहणारा तर सर्व साक्षी म्हणजे सर्व कांहीं पाहणारा असा अर्थभेद सूचित होतो. परमात्मा चिन्मात्र मूर्ति आहे. त्यामुळे जे काही घडतें तें सर्व त्याच्या साक्षित्वानेच घडते. किंबहुना साक्षित्व नसेल तर घडणें या क्रियेला मुळी अस्तित्वच येणार नाही. म्हणून परमात्मा हा सर्वतश्चक्षु सर्वसाक्षी म्हटला आहे. कोणतेंहि विधान होते तेव्हां त्याचें ज्ञातृत्व तिथे आधींचेंच आहे हे गृहीत धरावे लागते. ज्ञातृतत्त्व नसेल तर कोणत्याहि वस्तूचे वा घटनेचे अस्तित्व सिद्ध होऊं शकणार नाही. चित्सत्तेचे हे सर्वसाक्षित्व नि सर्वाधारत्व परोपरीनें वर्णिले आहे. सहनाक्षः सहस्रपात् या पदांचेहि तेंच तात्पर्य आहे. तो सर्व काही पाहतो, तो सर्व मार्गांनी चालतो. म्हणजे सर्व ज्ञातृत्व त्याचे आहे, सर्व कर्तृत्व त्याचे आहे. त्याच्या वांचून कांहीं नाहीं नि कांहीं होत नाही. जो परमात्म्याचे हे सर्वतश्चक्षुष्टुत्व ओळखतो तो चोरून लपून कांहीं करूं शकणार नाही.जें कांहीं त्याच्याकडून घडेल त्याचाहि तो साक्षीच राहील. म्हणजे त्याचाहि अभिमान तो बाळगणार नाही. हे कर्म मी केलें, ह्याचे हे फळ मी भोगीन असें तो म्हणू शकणार नाहीं. केवळ साक्षी होऊन राहील. सर्वतश्चक्षु म्हणजे त्याला सर्व बाजूंनी नुसते डोळेच डोळे आहेत. इतर कोणतेहि अवयव त्याला नाहीत. तो नुसता चक्षु आहे, द्रष्टा .

६२६. अनीश
(अ-निश, अन् ईश) अनिशः की अनीशः ? अनिश हा पाठ संभवनीय आहे. न निशा यस्य सः अनिशः आम्हांला दिवस रात्रि हा भेद आहे. पण सूर्याला तसा कुठला ? बिचायला अंधार आणि रात्र हां काय प्रकार असतो तें माहीतच नाही. बरें त्याला तो दाखविणेहि शक्य नाही. या दृष्टीनें सूर्य-विभूति परमात्मा हा अनिश आहेच, शिवाय रात्र रात्र म्हणून जिला म्हणतात ती तुम्हां आम्हांला रात्र आहे, पण ज्यांना आपण रात्रिंचर म्हणतो त्या दिवाभीतादि पशुपक्ष्यांना रात्रच दिवस होय. तुमची रात्र झाली की त्यांचा दिवस उजाडतो. अशा स्थितींत वस्तुतः रात्र मुळी कोणती नाहींच. परमात्मा हा सर्वतश्चक्षु आहे, तसा तो सर्वत्रचक्षुहि आहे. त्याला दिवसां दिसते तसें रात्रीहि दिसते. तो सर्वसाक्षी आहे. तो नित्यसाक्षी आहे.
अनीश हा रूढ पाठ स्पष्टच आहे "न ईशः अनीशः । " जो ईश नव्हे तो अनीश. पण ज्याला आम्ही सतत ईश ईश्वर परमेश्वर म्हणतो त्याला अनीश कसे म्हणावयाचें ? म्हणून मग त्याचा विग्रह "न ईशः यस्य सः अनीशः" असा केला जातो. ज्याचा कोणी ईश नाहीं तो अनीश. म्हणजे ईश्वरांचाहि ईश्वर, परमेश्वर, परंतु अनीश पदाचे रहस्य वेगळेच आहे. ईशन वा शासन हेहि एक कर्तव्य आहे. तो एक भार आहे. तो भार भारवाही वाहील, परमात्मा त्यांतुन मुक्त आहे. तो शिष्य म्हणजे शासनाधीन नाही इतकेंच नव्हे तर शास्ता म्हणजे शासनाधिकारीहि नाही. या दोहोंतूनहि तो परिपूर्ण मुक्त आहे. शासन-मुक्तीच्या योगें शासनाधीन मुक्त होतात इतकेच नव्हे तर शासनाधिकारीहि मुक्त होतात. भारताला स्वातंत्र्य लाभल्यानें भारतच मुक्त झाला नाही तर इंग्लंडहि शासनभारांतून मुक्त झाला आहे. मुक्ति ही उभय मुक्ति, उभय पक्षांची मुक्ति असते. म्हणून ईश असणे म्हणजे एक प्रकारें गुलामच असणे होय. खरी मुक्ति अधिकार सहन करीत नाहीं, ईशन सहन करीत नाहीं आपल्यावर दुसऱ्याचे आणि त्याच बरोबर आपलेंहि दुसऱ्यावर ईशन ती सहन करीत नाही. परमात्मा हा तसा अनीश आहे.

६२७. शाश्वत-स्थिर
"शाश्वतस्थिरः' हे एक पद की अनेक ? शंकराचार्यांनी तें एक घेतले आहे. बहुत करून संख्यासंतोषासाठीच तें असावें, नाहीतर शाश्वत आणि स्थिर या दोन भिन्न विशेषणांचा समास किमर्थ ? असें वाटेल. पण तसे नाही. त्यांत खोल अर्थ आहे. शाश्वत म्हणजे त्रिकालाबाधित आणि स्थिर म्हणजे दिगबाधित वा अविचल. ही दोन विशेषणे दिक्कालव्यापित्व द्योतित करणारी आहेत. एक विशेषण तो परमात्मा कालव्यापक, तर दुसरें तो दिग्व्यापक आहे. असे सांगत आहे. ही दोन स्वतंत्र घेतली वा एकत्र घेतली तरी अर्थात फरक होण्याचे कारण नाहीं. पण एक समास घेण्यांत कदाचित् असा आशय असावा की हे दृश्य विश्व स्थलकालात्मक आहे. कोणतीहि घटना घेतली तर तिला काळाचे तसें स्थलाचें अधिकरण हवें. त्या उभयविध अधिकरणावांचून कोणत्याहि घटनेची स्थिति असू शकत नाही. आणि म्हणून तो सर्वाधार परमात्मा एकसमयावच्छेदेंकरून शाश्वतस्थिर म्हटला आहे. काल-प्रवाह आणि दिक्प्रवाह दोहोंचाहि तो आधार आहे. त्याच्याच अंकावर काल आणि दिक् बागडत आहेत. परमात्मा आम्ही आमच्या आकलनासाठी उभयाधिकरणरूप शाश्वतस्थिर म्हटला तरी वस्तुतः तो एकच आहे. अन्ततः काल आणि दिशाहि अभिन्नच आहेत. त्यामुळेच आमच्या भाषेत स्थलवाचक व कालवाचक अव्ययें उभय अर्थांनी येतात. पुढे ये, पुढे येईन; मागे सर, मागें असें झालें" या प्रयोगांत पुढे व मागें ही अव्ययें क्रमशः स्थलवाचक (वा दिग्वाचक) आणि कालवाचक आहेत. कां बरें ही अव्ययें उभयवाचक आहेत ? दिककालांचे अद्वैत आहे म्हणूनच नव्हे काय ? शाश्वत- स्थिर उभयाधिकरण-वाचक एक पद त्याचमुळे आले आहे. त्याचमुळे तें समस्त झाले आहे.

६२८. भूशय
भुवि शेते इति भूशयः । जो भुईवर झोपला तो भूशय म्हणावयाचा. भुईवर कोण झोपतो ? सर्व जण पर्यंकावर झोपत नाहींत, खाटेवर झोपत नाहीत, एवढयाच मुळे ते भूशय म्हणतां यावयाचे नाहीत, पलंगावर वा खाटेवर न झोपले तरी लोक आंथरुणावर झोपत असतात. तें आंथरुण गादी, सतरंजी, घोंगडी तरट वा तृणपर्णाचें का असेना, तें जमिनीवर झोपत नाहींत. जमिनीवर दोनच पुरुष झोपतात. एक अवधूत आणि दुसरा रणांगणांवर देह ठेवणारा वीर पुरुष, अवधूत हा देहत्यागापूर्वीच आत्मज्ञानामुळे विदेह झालेला असतो. देह उभा आहे, का पडला आहे याची शुद्ध. त्याला नाही. दारुड्याला जशी आपल्या वस्त्राची शुद्ध नसते तशी अवधूताला आपल्या देहाची. शेगांव विदर्भचे गजानन महाराज हे असे अवधूत होऊन गेले. त्यांचा देह केव्हां केव्हां घोड्याच्या पायांतळीहि पडलेला राही. पण त्या विदेह म्हणजे निरहंकार पुरुषाला घोड्यानें कधी तुडविलें नाहीं. अशांच्याच विषयीं भारतीय हृदयाला परमादर वाटतो. अवधूतांहून मोठा या जगांत दुसरा कोणी नाही. त्यांच्या खालोखाल जे स्वामिकार्यासाठी अंगीकृत कार्यासाठी देहाची तमा न बाळगतां वीरगतीस पोंचले त्या परम वीरांची कदर जग करतें. ते जरी ज्ञानी नव्हते तरी त्यांचा त्याग असामान्य आहे. अलौकिक आहे. ते जिवंतपणीं अवधूतासारखें धराशायी जरी झाले नाहीत तरी मरतांना होतात. मरणारा प्रत्येक धराशायी होतो असें म्हणूं नका. मरायला टेकलेल्याला घोंगड्यावर काढतात आणि सरणावर ठेवतात, जमिनीवर नव्हे. खरोखर भूशय कोणी विरळाच सांपडतो की ज्यानें ज्ञानामुळे देहाला फेकून दिलेलें आहे, वा कार्य-गौरवामुळे देहाला तृणप्राय लेखिलें आहे. उरलेलें सारे जग पिंडपोषक देहाभिमानी आहे. म्हणूनच वरील दोहोंची गौरवगाथा गाइली आहेः द्वौ अस्मिन् पुरुषौ लोके सूर्यमण्डल-भेदिनौ । परिवाड् योगयुक्तश्च रणे चाभिमुखो हतः ॥ परंतु परमात्मा भूशय कसा ? खरोखर तो भूशय नाहीं वा दिविशय नाहीं, तो केवल-स्वरूप आहे. पण जो भूशय आहे जो परमात्माच आहे. कारण त्यानें सर्वस्वाचा त्याग केला आहे. अहंताममतेचा त्याग केला आहे.

६२९. भूषण
"भूशयो भूषणो भूतिः" हे भूसूत्र आहे. प्रत्येक पद स्वतंत्र असून तिन्ही मिळूनहि एक आशय व्यक्त होत आहे. भूशय म्हणजे अवधूत पुरुष या विश्वाचें भूषण आहे. तो या विश्वाची भूति म्हणजे समृद्धि आहे. भूशय म्हणजे भुईवर रांगणारा मुलगा जसा घराचे भूषण होय, घराची भूति होय, समृद्धि होय, त्या प्रमाणें परमानन्द-मग्न अवधूत हा या विश्वाचे भूषण होय, विश्वाचे वैभव होय. वंशकर पुत्राला आपण कुलदीपक म्हणतो. तो कुलाला दीपवितो भूषवितो, त्याला आपण सोन्याहिऱ्या लाल म्हणून आळवतो. म्हणजे तें कुलाचें धन म्हणून गौरवितों.
तस्स अवधूत हा या विश्वांचे भूषण होय, विश्वाचे वैभव होय. आत्मज्ञानाहून अधिक मोलाची वस्तु या जगांत कांहीं नाहींच, आणि तें आत्मज्ञान ज्यानें मूर्तिमंत केलें त्याहून अधिक भूषणावह आणि अधिक मोठे वैभव दुसरे काय असू शकेल ? अशाच ब्रह्मभूत पुरुषाविषयीं भगवान् म्हणतात "न ब्राह्मणैस् तुलये भूतमन्यत् पश्यामि विप्राः किमतः परं नु ?" त्या अवधूताच्या बरोबरीचेहि मला कोणी दिसत नाही, मग त्याहून वरचढ कुठून बरे असणार ? सूर्य आणि सूर्याचे किरण जसे या जगाचे प्रकाशक आहेत, शोभा आहेत, तसे परमात्मा आणि परमात्मस्वरूप त्याचे भक्त हे या जगाचे भूषण होत, जगाला भूषविणारे होत, भूषण पदाचे भूषणभूत आणि भूषविणार असे दोन्ही अर्थ होतात. परमात्मा हा या जगाचे भूषणहि आहे आणि त्याला भूषविणाराहि आहे. अवधूतरूपानें तो भूषणभूत आहे आणि विश्व-चैतन्यरूपानें तो भूषविणार आहे. जंडाला अस्तित्व आणि सौंदर्य चेतनामुळेच प्राप्त होते. म्हणून परमात्मा हा भूषण म्हणावयाचा. प्रेताला ना जाणीव ना शोभा. चेतनावांचून ते मढे आहे, दूषण आहे. म्हणून चिप परमात्मा भूषण म्हणावयाचा.

६३०. भूति
भूति म्हणजे भाव, आविष्कार. परमात्मा हा सद्रूप आहे. पण त्याची सत्ता आम्हांला प्रतीत होते त्याच्या विश्वरूप भूतीवरूनच. म्हणून त्याला म्हणावयाचे भूति. जे आहे, तेच होते. जें नाहीं, तें होत नाही. आकाशांत बाष्परूपानें जल असते. तेंच शीतल वायुस्पनिं घनीभूत होऊन जलकण बनतें आणि वृष्टि रूपानें वर्षते. जेव्हां त्या अव्यक्त रूपाची ही भूति होते तेव्हांच आम्हांला तें व्यक्त होते. हीच भवभूति होय. भव म्हणजे अव्यक्त सत्ता. तिचा आविर्भाव म्हणजे भूति. अतिसूक्ष्म तृणबीज भूमिगत आहे. ते आम्हांला दिसत नाही. परंतु वृष्टि होतांच तें अंकुरतें आणिहिरवळीच्या रूपानें दृग्गोचर होते.
ही दृग्गोचरताच भूति म्हणावयाची. ह्या भूतीवांचून त्या भूमिगत वा भूशय तृणबीजाची सत्ता आम्हांला उपलब्ध होत नाही. भूति वा विभूति म्हणजे भस्म असाहि अर्थ रूढ आहे. भवभूति म्हणजे शंकराचें अंगभस्म, शंकर हा अग्निस्वरूप आहे. आग्नितत्त्व अव्यक्त आहे. पण त्याचे अस्तित्व भस्मावरून प्रकट होतें. रानांत वणवा पेटतो. तो रान जाळून शांत होतो. उरते त्याची भूति भस्म राख. ती सांगते की इथे द्र येऊन गेला आहे. त्याचे हे अंग भस्म इथे पडलेलें आहे. अशा प्रकारे सद्वस्तूचा आविर्भाव त्या अव्यक्त सद्वस्तूला प्रकट करीत असतो. तो आविर्भावच भूति होय. मग ती भस्म असो वा विश्वाकार असो.

६३१. विशोक
"विशोकः शोकनाशनः” हे पदद्वय मिळून एक सूत्र आहे. एक विचार त्यांत आला आहे. विद्याभ्यास द्विविध म्हणता येईल. गृहीतागम आणि प्रदेयागम. पोहायला येऊन जो स्वतः परीर गां; शकतो तो गृहीतागम म्हणावयाचा. पण तो जो स्वतः तर परतीर गांठतोच पण इतरांनाहि परतीराला पोचवितो तो प्रदेयागम म्हणावयाचा. गृहीतागम हा तरणक्षम आहे, तर प्रदेयागम हा तारणक्षम आहे. जो तरणक्षम नाहीं, तो तारणक्षम असू शकत नाहीं पूर्ण पुरुष हा तरणक्षम तसा तारणक्षमहि असतो. परमात्म्याहून पूर्ण पुरुष दुसरा कोण असणार ? नारद गुरु सनत्कुमाराकडे जातो आणि म्हणतो हे भगवन् आपण शोक तरून गेलेले आहां, विशोक आहां. मला शोकाच्या पैल तीराला घेऊन चला. "शोकस्य परं पारं तारयतु भगवान्” नारद चौदा विद्यांत पारंगत असूनहि शोकांत बुडाला होता. त्याला ती परा विद्या येत नव्हती, जिनें मनुष्य शोकनदी तरून जाऊन आनंदाच्या मधुवनांत पोचतो. पंडित आणि नाविक यांची आख्यायिका आठवते इथे. सर्व शास्त्र पढलेला पंडित जीवनाचे शास्त्र शिकला नाही, त्यामुळे नौका उलटतांच गटंगळ्या खाऊ लागला. हे जीवनाचे शास्त्रच अध्यात्मशास्त्र होय. यालाच पराविद्या म्हणतात.हिच्या बळावरच मनुष्य विशोक होतो. परमात्मा हा सर्वशास्त्रयोनि असल्यामुळे तो विशोक तसा शोकनाशन आहे यांत नवल काय ? विशोकपद इथे मुख्यतः निर्मोह ज्ञानी अशा अर्थानें आलेलें आहे. असा आत्मज्ञानी पुरुषच शोक-नाश करूं शकतो आणि म्हणू शकतोः
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावांश्च भाषसे ।
गतासूनगतातूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः । गीता २-११


६३२. शोक-नाशन
शोकनाशन म्हणजे शोक नाहींसा करणारा, शोकाचे निराकरण करणारा. उपनिषदें गीता इत्यादि वेदान्तविचाराचे अभियान मोह-शोकांच्या विरुद्ध आहे. तो विचार, तें अध्यात्मज्ञानच शोकनाशन आहे. ईशोपनिषदांत म्हटले आहेः "तत्र को मोहः कः शोकः एकत्वं अनुपश्यतः" गीतेत आले आहेः "पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः" आणि "नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यत् शोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्' म्हणजे दोन्हीकडे मोह आणि शोक ही जोडी आली असून त्यांतील क्रमहि समानच आहे. मोह हे कारण आहे, शोक हे त्याचे कार्य आहे. मोह गेला की शोकहि जातो. म्हणून अर्जुनानें शेवटीं कबूली दिली आहे "नष्टो मोहः, करिष्ये वचनं तव". अशा प्रकारें उपनिषदांच्या अध्यात्मविद्येनें मोह आणि शोक नाहीसे होऊन मनुष्य निर्भय होतो, कृतकृत्य होतो. त्या आत्मविद्येचा "गुरूणां गुरुः" जो परमात्मा तो म्हणूनच शोकनाशन म्हटला आहे. गीतेचा वक्ता तोच आहे तो ऐतिहासिक पुरुष नाही. कारण, ऐतिहासिक म्हणजे अमुक एका काळी होऊन गेलेला. परंतु गीतावक्ता तसा नाही. त्या विषयी त्याचा श्रोता अर्जुन म्हणतो आहेः "सनातनस् त्वं पुरुषो मतो में" तो सनातन आहे, त्रिकालाबाधित आहे. तो सदैव सर्वांचा हृदयस्य आहे. त्याला शरण जा. तो आपला मोह दूर करून शोक नाहींसा करतो आणि आपल्याला अकुतोभय करून सोडतो, परमानन्दमग्न करतो.


अर्चिष्मानर्चितः कुम्भो विशुद्धात्मा विशोधनः ।
अनिरुद्धोऽप्रतिरथः प्रद्युम्नोऽमितविक्रमः ॥६८॥


६३३. अर्चिष्मान्
अर्चिष्मान् म्हणजे निधूम उज्ज्वल अग्नि. यज्ञोपासक ऋषींनी अग्नीच्या दोन अवस्था पाहिल्या, एक सधूम मलिन आणि दुसरी निधूम उज्ज्वल. आणि त्या आपल्या अनुभवाप्रमाणें असुखावह व सुखावह असल्याचेहि त्यांच्या सहजच लक्षात आले. जीवनाचेहि असेंच आहे असे त्यांनी पाहिले. म्हणून त्यांनी शुक्ल कृष्ण गति मानल्या. शुक्ल गतीनें इष्ट लोक आणि कृष्ण गतीनें अनिष्ट लोक लाभतो असें त्यांना दिसून आलें. इह लोक घ्या परलोक घ्या, त्या उभय लोकांत तारक शक्ति दोनच आहेत, एक मार्गदर्शक आणि दुसरी मार्गक्रमक. एकीचे प्रतिनिधि आहेत डोळे आणि बुद्धि, दुसरीचे प्रतिनिधि आहेत पाय आणि स्फूर्ति (उर्फ आरोग्य वा कर्मशक्ति). अग्नि जेव्हां निधूम उज्ज्वल जळत असतो तेव्हां मार्गदर्शनहि चांगलें होतें व शीतभयादींचे निवारण होऊन मार्गक्रमणहि चांगले होते. त्या उलट सधूम अनुज्ज्वल स्थितीचे आहे. तींत डोळ्यांत धूर भरतो व शीतभयादींचेहि निवारण होत नाही. यालाच अनुलक्षून उपनिषदांच्या गीतेच्या ऋषींनीं अर्चिरादि मार्ग म्हणजे देवयान आणि धूमादि मार्ग म्हणजे पितृयाण कल्पिले. त्याचे सरळ तात्पर्य आहे की जीवन जितकें ज्ञान आणि उद्यम यांनी शुद्ध आणि समृद्ध होईल तितकें तें इहपर सुखाचे होईल. आणि जितकें तें ह्या दोन साधनांत क्षीण वा न्यून राहील तितकें तें दुःखाचें होईल. परमात्मा अग्निवत् उत्तम बुद्धि-स्फूर्तियुक्त प्रकाशक नि प्रेरक असल्यामुळे तो अर्चिष्मान् म्हटला आहे.

६३४. अर्चित
अर्चित म्हणजे पूजित. पूजिलेला खरा, पण कोणी ? ज्या अर्थी कोणा एका पूजकाचे नांव दिलेलें नाहीं त्या अर्थी विश्वानें पूजिलेला असा आशय. तो परमात्मा विश्वपूजित आहे. सर्वाश्चर्यमय हें विश्व निर्माण करणारी, सर्व ज्ञानाचे आणि सर्व शक्तीचे माहेर अशी एक अचिन्त्य शक्ति आहे अशी श्रद्धा म्हणजे सामान्य तर्कानें सिद्ध न करता येणारी पण अपरिहार्य अशी जाणीव सुप्त गुप्त अस्फुट स्फुट अशा स्वरूपांत प्रत्येक जीवाच्या जीवांत निहित असते. तिच्यायोगे तो त्या सर्वशक्तिमान् परमेश्वराला मानत असतो आणि आपल्या परंपरेनुसार आणि बुद्धिशक्तीनुसार ध्यान भक्ति कर्म योगांनी म्हणजेच मनोवाक्काय-क्रियांनी त्याला पूजीत असतो. पूजीत नाही असा कोणीच नाही. कारण नाही म्हणणारा स्वतः आणि त्याचें तें नास्तिदर्शन त्या परमात्म्याचीच एक छटा आहे. आणि नास्ति वा शून्य म्हणून तो त्यालाच पूजीत असतो. पण हे त्या नास्तिकाला कळत. नाही, इतकेंच, जसा एखादा वेडा लपावा आणि त्यानें ओरडून सांगावें की "अहो मी पहा हा लपलों आहे' तसें तें वदतोव्याघातरूप आहे. नास्ति हेहि ईश्वराचेंच रूप आहे आणि त्याची पूजा न करणेहि त्याची पूजा आहे असे म्हटल्यानंतर त्या परमेश्वराच्या पूजेंतून कोण कसा सुटणार ? परमात्म्याची शक्ति ही अशी अचिन्त्य आहे की ती अनुकूल प्रतिकूल तटस्थ आणि मध्यस्थ अशा विविध वादांची विषयीभूत झाली आहे, क्षेत्र बनली आहे, आखाडा झाली आहे. सर्व नद्या जशा एका समुद्रासच मिळतात तशी सर्व ध्यानें भाषणे आणि कर्में त्या एका परमात्म-शक्तीलाच शरण जातात. म्हणून तो पूजित.

६३५. कुम्भ
कुम्भ म्हणजे कलश. परमात्म्याला कुम्भ, कलश म्हणण्यांत काय बरें हेतु ? आपण पूजेंत कलश-पूजन करतों, घट-स्थापना करतो, भरल्या घागरीचे दर्शन शुभ शकुन म्हटला आहे. अशा प्रकारे घट कलश कुम्भ अत्यंत शुभ मानला आहे. कारण तो वरुणालय आहे, परमात्म्याचे वासस्थान आहे. परमात्म्याच्या ठाईं सर्व शक्ति, सर्व देवता निहित आहेत. म्हणून कलश-पूजन करतांना म्हणतातः "कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रः समाश्रितः । कुक्षौ तु सागराः सर्वे." सारांश, कलश म्हणजे सर्वात्मा वा सर्वदेवतात्मा होय. म्हणून परमात्मा कुम्भ म्हटला आहे. अर्थात् कार्यारम्भी घटाची स्थापना म्हणजे परमात्म्याचे अधिष्ठान होय. रामदासांनी म्हटले आहे की आपल्या प्रत्येक कार्याला भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तरच तें सफल होईल. म्हणून आपण घट-स्थापना करीत असतों. कलश-पूजन करीत असतो. कलश-जलानें राजाला मूर्धाभिषेक होतो. म्हणजे परमात्म्याच्या आशीर्वादानें तो राजा बनतो. त्यासाठी वरुणालयाचे, चारी महासागरांचें, जल आणावे लागते. म्हणजे तो जो सर्वव्यापी परमात्मा म्हणजेच वरुण त्याची जलरूप संमति आणि आशीर्वाद आणून मगच राजा मान्य व्हावयाचा.
हा झाला तात्त्विक वा आध्यात्मिक अर्थ. व्यावहारिक अर्थानेहि कुम्भ म्हणजे हातचा जलाशय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्या वांचून शुद्धि व्हावयाची नाही. तहान भागावयाची नाही. जीवन चालावयाचे नाही. जीवनाची शुद्धि आणि समृद्धि त्याच्या अधीन आहे. म्हणूनहि परमात्मा हा ठीकच कुम्भ म्हटला आहे. पुढील पदें "विशुद्धात्मा विशोधनः" ही कुम्भाच्या गौरवाची फोड करतात, तसें मागील अर्चित पदहि त्याची पूजनीयता प्रकट करतें. किंबहुना "अर्चितः कुम्भः " हे एक सविशेषण पदहि म्हणायला हरकत नाही.

६३६. विशुद्धात्मा
विशुद्धः आत्मा देहेन्द्रियमनोबुद्धयः यस्य सः विशुद्धात्मा. ज्याचा आत्मा म्हणजे देह, इन्द्रियें, मन, बुद्धि परिशुद्ध आहेत तो विशुद्धात्मा होय. योगी आत्मशुद्धीसाठी सतत झटत असतात. देहें प्राणें मनें जी शुद्धि ती त्रिशुद्धि म्हणजे पूर्ण शुद्धि म्हटली जाते. या तीन कर्मपथांनी शुद्ध झाल्याखेरीज आत्मशुद्धि म्हणजे आत्याचा शोध होत नाही. आत्म्याचे भान आणि ज्ञान व्हायला सर्वांगीण शुद्धीची अत्यंत आवश्यकता आहे. महाभारतांत उत्तंकाची आख्यायिका प्रसिद्ध आहे. तो गुरुदक्षिणा म्हणून राणीची कुंडलें मागायला जातो, पण राजगृहांत राणी त्याला दिसत नाही. कारण तो अशुचि होता. भक्षण केल्यानंतर त्यानें मुख-प्रक्षालन केले नव्हते. त्या प्रमाणें हृदयमंदिरांतील त्या परम सुंदर आत्ममूर्तीचे दर्शन संपूर्ण आत्मशुद्धीवांचून होत नाही. आत्मशुद्धीच्या शिखराचेंच नांव विशुद्धात्मा आहे. आत्मशुद्धीच्या एकापेक्षा एक उंच टेकड्यांचे आरोहण करीत करीत तें सर्वोच्च शिखर तो स्वर्गमाथा, गांठायचा आहे. पतंजलि मुनींनी अशा त्रिशुद्धीचा प्रयास केला होता म्हणून त्यांचे स्मरण असे केले आहे.
योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्यच वैद्यकेन ।
योऽपाकरोत् तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतो ऽस्मि ।

गंगेचा प्रवाह जसा समुद्राला अविरत मिळत असतो तसा ज्याचा आत्मशुद्धीचा अविरत प्रयत्न आहे तोच गौरवानें विशुद्धात्मा म्हणावयाचा. वस्तुतः परमात्मा हा आत्मशुद्धीचा समुद्र आहे. त्या समुद्राला आमचे शुद्धीचे प्रयल-प्रवाह मिळावयाचे आहेत. तो सहजच नित्य शुद्ध-बुद्ध-मुक्त-स्वभाव आहे आणि आम्हांला आत्मशुद्धीच्या द्वारे त्या निजपदवीस पोंचावयाचे आहे.

६३७. विशोधन
विशेषेण शोधयति इति विशोधनः । जो विशेषतः शोधन करतो तो विशोधन म्हणावयाचा. शोधन करणारी द्रव्ये आणि क्रिया अनेक आहेत. परंतु त्या सर्वांत आत्मज्ञान हे परम शोधन म्हटले आहे. "नहि ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते " असें गीतेनें म्हटलेंच आहे. निरनिराळ्या पदार्थांच्या शुद्धीसाठी निरनिराळी द्रव्ये व प्रक्रिया वापरल्या जातात. वस्त्र पात्र गात्र वेगवेगळ्या प्रकारें शुद्ध केले जाते. त्याच प्रमाणें काय वाक् चित्त यांचेहि शोधन केले जाते. परंतु तेवढ्यानें खरी वा पुरी शुद्धि होत नाही. त्यांची ही शुद्धि विशुद्धीच्या ऐल यडीच राहून जाते. विशुद्धि म्हणजे ज्या अविद्येच्या योगें जीव जन्म-कर्म-फल-परंपरेंत सांपडतो, त्या परंपरेतूनच, त्या संसारांतूनच सुटणे होय. जन्माच्या पाठी व्याधि, जरा, मृत्यु, दुःख आणि दोष लागतात. म्हणून तो जन्मच नाहींसा करणारे जें आत्मज्ञान तें विशोधन म्हणजे परम पवित्र म्हटले जाते. मृगजळच आटल्यावर त्यांत पडणे बुडणें नि रडणे कुठून ? तत्र को मोहः कः शोकः एकत्वं अनुपश्यतः ? स्वप्नांतल्या अनर्थानी मनुष्य ओसणावतो, पण जागृत झाल्यावर स्वप्नासकट ते सारे अनर्थ आणि तो विलाप विलयास जातो. त्यासाठी धावाधाव आणाआण नि लावालाव कांहींच करावी लागत नाही. आत्मज्ञान हे तसें विशोधन आहे. आत्मा आणि आत्मज्ञान हे अभिन्न असल्यामुळे तो परमात्मा विशोधन होय.

६३८. अनिरुद्ध
अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण आणि वासुदेव हा वैष्णव तंत्राचा चतुर्व्यूह म्हटला जातो. सांख्यांचे प्रकृतीचे तीन गुण आणि आत्मा हा जसें एक चतुष्टय आहे तसाच हा चतुर्व्यूह. त्यापैकी इथे अनिरुद्ध आणि प्रद्युम्न हे दोन व्यूह "अनिरुद्धो प्रतिरथः प्रद्युम्नो ऽमितविक्रमः" या श्लोकार्धात आले आहेत. शंकराचार्य ही चार नामें घेतात. परंतु ती सविशेषण दोन नामें असावीं अप्रतिरथ अनिरुद्ध आणि अमितविक्रम प्रद्युम्न. अप्रतिरथ आणि अमितविक्रम ही त्यांची नित्य विशेषणे होत. "मुकुंदो ऽमित विक्रमः" हें नामहि असेंच सविशेषण एक पद आहे "संकर्षणो ऽच्युतः" हे देखील तसें मानणे शक्य आहे. चतुर्व्यूहांपैकी प्रत्येक नित्य-विशेषण-युक्त असावा.
महाभारतांत बलराम कृष्ण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे चौघे तुल्यबलसामर्थ्य अप्रतिरथ अमितविक्रम मानिले आहेत. रूप गुण शीलानें ते सर्व समान तळपणारे होते. व्यूहकल्पना बाजूला सारून स्वतंत्रपणेहि त्यांचा विचार करता येतोच. आणि तसा तो करणे श्रेयस्करच आहे. तथापि मानवी जीवन हे एकेरी नाही. तें अनेकपदरी आहे. बटमोगऱ्यांत जसे एकाच फुलांत सात थर असतात तसें मानवी जीवनहि अनेक थरांचे बनले आहे. त्यांत पारमार्थिक सत्य, आणि व्यावहारिक अनृत या दोन टोकांच्या मधे या दोहोंच्या मिश्रणाच्या अनेक छटा पसरल्या आहेत. म्हणूनच म्हटले आहे शंकराचार्यांनी की "सत्यानृते मिथुनीकृत्य प्रवर्तितो ऽयं लोकव्यवहारः” अनिरुद्ध पदहि तसेंच पारमार्थिक तत्त्वविचार, ऐतिहासिक व्यक्ति आणि कविकल्पना यांच्या पदरांचा अनेकपदरी आणि अनेक रंगी गोफ आहे. तत्त्वविचार निश्चित, तिह्य अनिश्चित आणि कविकल्पना अनियंत्रित आहे. त्यांचे फलित त्यामुळे वैचित्र्यपूर्णच असणार. तथापि दाणा आणि भूस उपणले वा पाखडलें म्हणजे भूस उडून जातें व दाणा हाती लागतो. परमात्मशक्ति ही निरगुण असल्यामुळे ती अनिरुद्ध होय. इतर सारें निरुद्ध होतें.

६३९. अप्रतिरथ
नास्ति प्रतिरथः प्रतिभटः यस्य सः अप्रतिरथः । ज्याला प्रतिरथ म्हणजे प्रतियोद्धा नाहीं तो अप्रतिरथ म्हणावयाचा. परमात्मा हा एकमेवाद्वितीय आहे त्याला प्रतिस्पर्धी कुठून असणार ? त्याची बरोबरी करणाराहि कोणी नाही मग त्याहून वरचढ कसा असेल ? म्हणून म्हटले आहे अर्जुनानें ः "न त्वत् समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो, लोकत्रयेऽ प्यप्रतिमप्रभावः" देवा, तुझा प्रभाव तिन्ही लोकांत अतुल आहे. अप्रतिरथ पदाचा वाच्यार्थ आहे, ज्याला प्रति म्हणजे प्रतिपक्षीय अर्थात् तोंड देणारा रथ नाहीं असा. लक्ष्यार्थानें रथ म्हणजे रथी, योद्धा, वीर असा अर्थ घ्यावयाचा. कारण, कोणताहि रथच कोणाला अनुकूल वा प्रतिकूल असत नाही. तें एक जड साधन आहे. शत्रुमित्रत्व हा चेतनाचा धर्म आहे. परमात्म्याचा निरोध होऊं शकत नाही, कारण तो सर्वगत आहे. तसा त्याचा विरोधहि होऊं शकत नाही कारण तो एकमेवाद्वितीय आहे. असा तो निर्विरोध आणि निर्विरोध आहे. प्रद्युम्नपुत्र आणि कृष्णपौत्र अनिरुद्ध तर बाणाच्या किल्यांत कैद झाला होता आणि त्याची सुटका कृष्णाला बाणाचा विरोध मोडून काढून करावी लागली होती. अव्यक्त सर्वगत तत्त्वाची बरोबरी व्यक्त एकदेशी महापराक्रमीहि सत्व कशी करणार ? पण गौरवानें निरुद्धाला अनिरुद्ध आणि प्रतिरथीनें हटकलेल्याला अप्रतिरथ, अप्रतिमल्ल म्हटले जाते. कारण तो विजयी झालेला आणि महापराक्रमी असतो.

६४०. प्रद्युम्न
'सखू मरो बकू मरो डुमन्या माझा कामाचा ! इतर सगळ्या कला विद्या भले जावोत पण माझा वीर्यसंग्रह शाबूत राहो. तो जीवनशक्ति-स्रोत आहे. प्रकृष्टं द्युम्नं लिङ्गं यस्य सः प्रद्युम्नः । ज्याचे द्युम्न म्हणजे पौरुष प्रकृष्ट आहे तो प्रद्युम्न म्हणावयाचा. ज्याच्या ठाई पौरुष म्हणजे स्त्रीत्व वा पुरुषत्व दुर्बल आहे, प्रक्षीण आहे तो प्राणी निस्तेज आणि बावळट दिसतो. तो जगांत शोभा पावत नाही. त्याची शोभा होते. अशा क्लीबाची जगांत कदर होत नाही. त्यांत नवल नाही, पण तो आपल्याच दृष्टीनें पतित दीन हीन होतो. तो आत्मग्लानीच्या खोल गर्तेत पडतो. नरक नरक ज्याला म्हणतात तो हाच होय. असे नरक-पतित केव्हां केव्हां आत्महत्या करून बसतात. हाच रौरव नरक होय. या स्थितीचे दुसरे टोक म्हणजे प्रद्युम्नत्व होय. त्यालाच स्वर्गीय नंदनवन म्हणावयाचे. तिथे जीवनाच्या सर्व सुखोपभोगांची क्षमता षोडशकलांनी नांदत असते. जग सदैव उपभोग्य सामग्रीनें परिपूर्ण आहे. पण आमच्या जवळ उपभोगक्षमता कुठे असते ? आम्हांला तहान भूक मैथुनेच्छा सारखी असत नाही. त्यामुळे तेवढ्यापुरतें भोग्यजात असून नसल्यासारखे होते. पण ज्यानें आपले हे उपभोगक्षमतारूप यौवन आणि पौरुष अक्षीण राखलें आहे तोच यावदर्थ उपभोक्ता प्रद्युम्न म्हणावयाचा. त्याला यथासमय तृषा क्षुधा निद्रा काम इत्यादि सर्व भाव आहूतवत् उपस्थित होतात, आणि तो यावदर्थच त्यांचे सेवन करतो. निद्रा घ्यायची गरज असतांना तो एका क्षणांत निद्राधीन होतो, घोरूं लागतो. त्यासाठी त्याला निद्रागुटिका घ्याव्या लागत नाहींत. किंवा संभोगासाठी मकरध्वजवटिका घ्याव्या लागत नाहीत. तो यथाप्रसंग सर्वकार्यक्षम असतो. परंतु कोणी कितीहि दक्षतेनें ही क्षमता-सिद्धि साधली तरी ती क्षीण आणि क्षीणतर होतेच होते. कारण ती देह-सापेक्ष आहे. परंतु परमात्म्याची ही क्षमता केव्हांहि क्षीण होत नाही. कारण ती देहसापेक्ष नाहीं, निरपेक्ष आहे. त्यामुळे तोच एक प्रद्युम्न म्हणावयाचा. आम्ही सापेक्ष पौरुष साधलें तरी पुष्कळ.

६४१. अमित-विक्रम
न मितः अमितः । अमितः विक्रमः यस्य सः अमित-विक्रमः । ज्याचा विक्रम अमित म्हणजे इयत्तेनें मापलेला मोजलेला नाहीं तो म्हणायचा अमित-विक्रम. ज्या गोष्टी मूर्त आहेत, व्यक्त आहेत, सगुण आहेत त्यांचे मोजमाप उत्तरोत्तर कठिण होत जाते. हे दृश्य विश्व मूर्त आहे. पण याची गणति करता येते का ? ग्रह नक्षत्र तारका मोजतां येणे शक्य आहे ? ऋतुपर्णाला गणितविद्या अवगत होती. त्यानें एका प्रचंड वृक्षाची पानें किती ते गणितानें सांगितले होते. पण त्यालाहि पृथ्वीचे रजःकण आणि आकाशांतील ग्रहगण मोजणे शक्य झाले नसते कदाचित्. पण हल्लींचे ज्योतिर्गणिती ग्रहांची वजनें, त्यांच्या कक्षांची लांबी, त्यांची अंतरें इत्यादींचे गणित अचूक करतात. पण दिशा, काल, मन, प्रकृतीचे गुण इत्यादींचे मोजमाप अद्याप कोणाला काढतां आलें नाही. मग गुणांच्या पलीकडे असलेले निर्गुण आत्मतत्त्व त्याचे मोजमाप कोण कसे घेणार ? जिथे द्रव्य गुण क्रिया दिक्काल संभवतात तिथे मोजमापहि संभवतें. आणि कोणाला तसें मोजमाप काढतां न आले, तरी ते काढणे शक्य आहे. पण जिथें या कशाचाच लाग नाही तिथे तुम्ही काय मोजणार ? म्हणून परमात्मा हा अप्रमेय होय. त्याची ही अप्रमेयताच त्याचा अमितविक्रम.
निरगुण परमात्म्याचा महिमा अमित आहेच पण सगुण परमात्म्याचा महिमाहि अमितच आहे. निर्गुण-महिम्यांत मितीला प्रवेशच नसल्यानें अमित तो आहे, तर सगुण-महिमा नित्य वर्धिष्णु आणि अनन्त असल्यामुळे अमित आहे. हे विश्वच सगुण परमात्याचा विक्रम आहे आणि तो स्वभावतः अनन्त आहे.


कालनेमीनिहा वीरः शौरिः शूरजनेश्वरः ।
त्रिलोकात्मा त्रिलोकेशः केशवः केशिहा हरि: ॥६९॥


६४२. कालनेमि-निहा
भगवान् विष्णु ही परमात्म्याची पालनी कला असल्यामुळे विश्वद्रोही असुरांचा नाश आणि परद्रोह परनिन्दा आणि परस्वापहार वर्ण करून जे काया वाचा मनें विश्वरूप परमात्म्याची सेवा करतात त्या भक्तांचा प्रतिपाळ हे त्याचे ब्रीद आहे आणि तद्द्वारा धर्मसंस्थापना हे त्याचे अवतार कार्य आहे. असा हा सत्त्वावतार भगवान् विष्णु आपला स्वधर्म पालन करीत असतांना त्याला किती असूरांचा नाश करावा लागला त्याची गणति नाही. तथापि कांहीं मोठी धेंडें पुराणान्तरी नोंदलेली आहेत. त्यांपैकी कालनेमि हा एक असुर होय. त्यानें विश्वद्रोह कसा केला आणि त्याबद्दल भगवंतानें त्याला कसें शासन केलें हेंहि तिथेच पहावयाचे. तथापि त्या सर्वांचे सामान्य चरित्र गीतेच्या सोळाव्या अध्यायांत दिलेलें आहे.
अहंकारं बलं दर्प काम क्रोधं च संश्रिताः ।
मां आत्म-पर-देहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः ॥ गीता १६-१८
तान् अहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् ।
क्षिपाम्यजनं अशुभान् आसुरीष्वेव योनिषु ॥ गीता १६-१९

संक्षेपानें असुरांचे हे गुण आणि ही कर्में आहेत आणि त्यांची गतिहि काय होते तेंहि इथे दिलें आहे. काम क्रोध लोभ हे त्याचेच अतिसंक्षेपरूप होय. तलवार बोथट असेल तर ती हनन करू शकणार नाही. काम क्रोध लोभ हे त्रितय ती धार होय जिनें तो काल जगाचा संहार करीत असतो. हाच कालनेमि असुर म्हणावयाचा. त्याचा संहार भगवान् विष्णु करतो आणि प्रजेला सुखवितो. म्हणून तो कालनेमि-निहा म्हटला आहे.

६४३. वीर
ज्यानें कालनेमि राक्षसाला ठार केलें तो उघडच वीर म्हणावयाचा. वीर म्हणजे वीर्यवान्, बलशाली. ज्याच्या ठाई वीर्य नाहीं तो निर्भयहि असत नाहीं नि पराक्रमीहि असत नाही. भीम हा वीर होता. तो बकासुराकडे जायला भ्यालाहि नाही आणि त्याच्याकडे जाऊन त्याचा पराभव, त्याचा नाश केल्याशिवाय तो राहिलाहि नाही. याच शूरत्वाचे नि पराक्रमित्वाचे कारण त्याचे वीर्य, त्याचे बलच होय. वीर्याशिवाय म्हणजे शारीरिक व मानसिक बलाशिवाय अशी निर्भयता आणि असा पराक्रम संभवत नाही. वीर हा आपल्या स्वतःच्या बळावर एकाकी पराक्रम करतो. तो गणाची अपेक्षा करीत नाही. म्हणून अशा वीर पुरुषाला पुरुषसिंह म्हणतात. सिंहाच्या ठाई हस्तीसारख्या महासत्वावर त्याच्या कळपावर, एकट्यानें धाड घालण्याचीहिंमत असते. तो आपल्या शक्तीनें आणि युक्तीनें गजाचें गंडस्थळ फोडतो. इतकें असतें त्याचे बल आणि पराक्रम. परमात्मा हा असा वीर आहे. तो काळालाहि भीत नाही. तो एकटाच सर्वांचा संहार करतो. त्याला कुणा दुसऱ्याच्या मदतीची गरज नाही. असा तो निडर, ताकतवान आणि शत्रूवर तुटून पडून काम फत्ते करणारा आहे. "एकेनापिहि शूरेण पादाक्रान्तं महीतलम् । क्रियते भास्करेणेव स्फारस्फुरितरोचिषा !" सूर्य जसा एकाकी पौरुष करणारा शूरवीर आहे तसा परमात्माहि एकाकीच पराक्रम करणारा आहे. त्यानें एकट्यानें हें विश्व निर्मिलें पाळले आणि संहरिलें आहे. म्हणून तो वीर. त्याच्या इतकें वीर्य दुसऱ्या कोणाच्या ठाईं आहे ? कालनेमिनिहा वीर हे एक सविशेषण पदहि घेणे शक्य आहे.

६४४. शौरि
शूरस्य अपत्यं पुमान् शौरिः । शूर वंशीय वसुदेवाचा पुत्र म्हणून कृष्ण हा शौरि म्हटला आहे. पूर्वी ३७ व्या श्लोकांतहि हे पद येऊन गेलें आहे. किंचित् क्रमभेदानें हाच चरण तिथे आला आहे. येथील पाठ हा मूळचा वा समीचीनतर म्हणता येईल. हे नामसहस्र विष्णूचे असले तरी ते कृष्णावतारांत रचलेलें आहे. त्यामुळे त्यांत कृष्णपरता वारंवार प्रकट झालेली आढळणे स्वाभाविक आहे. तथापि गोपाळ कृष्णाचा आणि त्याच्या गोकुललीलांचा इथे पत्ता नाही. एवढ्याच साठी मागाहून विष्णुसहस्राच्या धर्तीवर गोपाल-नामसहस्र. गोपाळकृष्ण नाम कोणी भक्तानें रचिलें आहे. इतकेच काय पण इथे तो कंसहन्ताहि नाहीं, जरी चाणूरान्ध्र-निषूदन तो आहे. त्याची वेणू वा मुरली इथे नाही, नवनीत-चौर्य नाही, गोवर्धनधारण नाहीं, राधा नाहीं, गोपीरास नाहीं, तो रुक्मिणी-नाथ नि द्रौपदीबन्धुनाही. पाण्डवांचा कैवारीहि तो नाही. तें सारें कृष्णचरित्र पुष्कळ मागाहून कविजनांनी कल्पिलें व रंगविलेले आहे. उपनिषदांतील देवकीपुत्र कृष्ण, भारतांतील वासुदेव कृष्ण, हरिवंशादि पुराणांतील गोपाळकृष्ण आणि परवर्ती कवींचा राधाकृष्ण ही कृष्णचरित्राची उतरती भांजणी आहे. रामचरित्र उत्तरोत्तर उदात्त रंगविलें गेलें आहे, तर कृष्णचरित्र उत्तरोत्तर रंगेल झाले आहे. खरा कृष्ण गुप्तच राहिला आहे. त्यानें आपल्या चरित्राचें रहस्य गीतेंत सांगून ठेवले आहेः
अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मां अबुद्धयः ।
परं भावं अजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥ गीता ७-२४

याचाच अनुवाद रामदासांनी "जगी थोरला देव तो चोरलासे” म्हणून केला आहे. तथापि हे आपलें थोरलें देवपण मनुष्यरूपांत अवतरतें आणि ते आपण अवमानितां कामा नये असेहि गीतेत स्पष्ट केले आहे.
अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाथितम् ।
परंभावं अजानन्तो मम भूत-महेश्वरम् ॥ गीता ९.११

कृष्ण हा मानव कृष्ण नाहीं, तो कृष्ण देव आहे. मानव हा मानव नाहीं तो देव आहे हे गीतेनें विशद केले आहे. व्यक्त हा अव्यक्ताचाच प्रकाश आहे, म्हणून व्यक्ताव्यक्त भेद वा सगुण निर्गुण भेद गौण होय. हाच अद्वैत विचार. सहस्रांत कृष्ण-चरित्र असें नामांकित झाले आहे. (१) अमृतांशूद्‌भव (२) यदु श्रेष्ठ (३) शौरि (४) वासुदेव (५) देवकीनंदन (६) कृष्ण (७) गदाग्रज (८) वेदवित्.

६४५. शूरजनेश्वर
चंद्रवंशांत जन्मला म्हणून अमृतांशूद्‌भव, चंद्रवंशांतील यदुकुलांतं जन्मला म्हणून यदुश्रेष्ठ, यदुकुलांतील शूर गोत्रांत जन्मला म्हणून शौरि, शूर गोत्रांतील वसुदेवाचा पुत्र म्हणून वासुदेव, आणि देवकीच्या पोटी जन्मला म्हणून देवकीनंदन, कृष्ण हे त्या ठेवलेलें व्यक्तिवाचक नांव म्हणून कृष्ण, त्याचा धाकटा भाऊ गद म्हणून गदाग्रज, आणि ज्ञानी म्हणून वेदविद् इत्यादि नामें त्याला प्राप्त झालेली आहेत. एवढाच त्याचा वैयक्तिक परिचय सहनांतून आढळतो. गरुडध्वज, शंखचक्रगदापद्मधारी, चाणूरान्ध्रनिषूदन इत्यादि विशेषणे ही जुनींच विष्णूची आहेत. ती खास कृष्णाची म्हणता येत नाहीत. तो शूर गोत्रांतील लोकांचा नायक म्हणून त्याला शूरजनेश्वर म्हटलें आहे. सहस्रांत त्याची वैयक्तिक माहिती मिळते ती एवढीच. या राईचा कविजनांनी पढें पर्वत केला त्याला कारण कृष्णाचे अलौकिक ज्ञान होय. मनुष्य हा दिसतो तसा मृण्मय नाहीं, तो चिन्मय आहे, हे ज्ञान वेद-वेदान्ताचें मथित म्हणून कृष्णानें जगाला दिले. त्यामुळे तो अवतार गणला गेल्यास नवल काय ? आणि जिथें सामान्य व्यक्तिहि मूलतः परमात्म-स्वरूपच आहे तिथे कृष्णासारखी विभूति जगद्गुरु, परमात्मा म्हणून गौरविली आणि चित्रिली गेल्यास काय नवल ? तुम्ही कोणाहि व्यक्तीची अथवा दगडाची का उपासना करा ना पण हे विसरू नका की उपासना त्या निर्गुण निराकार परमात्म्याची होत आहे. त्याचा हा व्यक्ताकार प्रकाश आहे. हे अभिज्ञान झाल्यावर मग कशाची फिकीर नाही. पण तें नसेल तर तुमचे सर्व धर्मकर्म अशास्त्र-विहित झाले म्हणून समजा.

६४६. त्रिलोकात्मा
शूरसेनजनपदांत बसणाऱ्या शूर प्रजेचा नायक तो कृष्ण मानव देहानें जरी साडेतीन हात आकाराचा असला तरी तो आत्मरूपानें त्रिलोकव्यापी आहे, त्रिलोकात्मा आहे. या त्रिभुवनांत एकच एक आत्मतत्त्व भरून राहिले आहे. आंव्यांतील लहान बोळक्यापासून महान् रांजणापर्यंत सगळे जसें मृण्मय आहे तसेंच्या तसें या विश्वांतील अणुरेणूपासून ब्रह्माण्डा पर्यंत सर्व चिन्मय आहे. तिथे दुसरें कांहीं नाही. आंव्यांतील मडकी जशी पेटलेल्या अग्नीत भाजून निघतात तसें हें चराचर विश्वब्रह्माण्ड दाही दिशांत भरून पेटून राहिलेल्या चित्तेजांत भाजून निघत आहे. किंबहुना अग्नीत पडलेलें तृण जसें अग्निसात् होतें तसें हें विश्व ब्रह्मसात् झालें आहे. म्हणून विश्वरूप पाहणारा तो अर्जुन शौरि शुरजनेश्वर त्या कृष्णाला म्हणतो आहेः "तेजोभिरापूर्य जगत् समग्रं, भासस् तवोग्राः प्रतपन्ति विष्णों " हे औटहात मोटक्या कृष्णा, तूं तो त्रिलोकात्मा विष्णु आहेस. तुझ्या उग्र तेजानें दाही दिशा केवल तेजोमय होऊन राहिल्या आहेत. मूर्त व्यक्त सगुणाला मर्यादा आहे. त्यामुळे ते एकदेशी आहे. पण जें अमूर्त अव्यक्त निर्गुण त्याला मर्यादा कुठली ? म्हणून ते त्रिलोकात्मा आहे, सर्वव्यापी आहे. व्यक्त हा अव्यक्ताचाच प्रकाशकिरण आहे याची ओळख पटल्यावर मग द्वैत उरत नाहीं. पण अशी ओळख पटेपर्यंत हा औट हात आकाराचा कृष्ण जो या कालांत जन्मलेला त्यानें प्राचीन काळच्या विवस्वानाला योग कसा काय सांगितला आहे, प्रश्न पडतो. आणि म्हणून तो अर्जुनमुखानें म्हणतोः "या काळचा तुझा जन्म सूर्याचा तो पुरातन । तूं बोलिलास आरंभी हे मी जाणूं कसें बरें ?" पण जेव्हां त्याला व्यक्ताव्यक्तांच्या अद्वैताचे अभिज्ञान होते तेव्हां मग तो म्हणतोः "सनातनस् त्वं पुरुषो मतो में"-'मी मानितों तूं परमात्मतत्त्व' अशा प्रकारें जो शौरि शूर-जनेश्वर तोच त्रिलोकात्मा त्रिलोकेश होय.

६४७. त्रिलोकेश
त्रिपद इथे बहुवचन वाचक नाही, तर समग्रतावाचक आहे. आदि अंत आणि मध्य हे त्रि मिळून पूर्ण होतें. म्हणून त्रिलोक म्हणजे संपूर्ण विश्व होय. त्याचा जो ईश तो त्रिलोकेश म्हणावयाचा. समग्राचा स्वामी असमग्र वा एकदेशी कसा होणार ? जो सर्वव्यापी आहे, अनन्त आहे, तोच स्वामी होऊं शकेल या विश्वाचा. आणि म्हणून जिच्या पासून हे सारे विश्व निर्माण झालें, जिच्या अंकावर ते खेळत आहे, जिच्या ठाईंच तें अन्तीं विलीन व्हायचे आहे ती जी चित्सत्ता तीच त्रिलोकेश होय, समुद्रापासून लाटा निर्माण होतात, त्याच्याच पृष्ठावर त्या लोळत व खेळत असतात आणि शेवटी त्यांतच त्या विलीन होतात तद्वत्. अथवा रज्जूपासून सर्पाभास निर्माण होतो, त्या रज्जूवरच तो भासत राहतो आणि शेवटी सत्यज्ञानानें त्या रज्जूच्याच ठाई विलीन होतो तद्वत्. समुद्राची सत्ता वास्तविक आहे, रज्जूची सत्ताहि तशीच वास्तविक आहे. त्यावर भासमान् होणारा तरंग वा सर्प हेच खरोखर आभासिक अवास्तविक आहेत. या दोन आभासांत फरक नाहीं असें नाही. पण तो फरक अप्रस्तुत आहे, अकिंचित्कर आहे. वस्तूच्या सत्तेवरच अवस्तु वस्तुज्ञानाच्या अभावी भासमान होत आहे ह्यांत संदेह नाही. आणि तेंच अभिप्रेत आहे. वस्तूवरच अवस्तूचा भास उत्पन्न होतो, वस्तुवरच तो टिकून असतो आणि शेवटी वस्तुच्या ठाईच तो विलीन होतो म्हणून, म्हणजे वस्तु उरते व तो नाहीसा होतो म्हणून, त्रिलोकाभासाचा स्वामी त्रिलोकेश ती चिद्वस्तु होय, जिला ब्रह्म म्हणतात.

६४८. केशव
केशव म्हणजे केशवान्. पण केश म्हणजे काय ? सगुण पक्षी केश म्हणजे अलक. केश हे अलंकाररूप होत. सिंहाची आयाळ, घोड्याची आयाळ किती सुंदर दिसते ! खल्वाट पुरुष चांगला दिसत नाही. त्याची टकल्या म्हणून हेटाळणी होते. उलट बाल वृद्ध स्त्री पुरुष यांच्या सुंदर केशकलापाबद्दल त्यांची प्रशंसा होते. अर्भकाचे जावळ, बालकाची झुल, तरुणाचे कुरळे वा मोडदार केस तशा टोकदार दाढीमिशा, तरुणींचे केशपाश, वृद्धाचे रुबाबदार मानेवर रुळणारे केस व छातीवर रुळणाऱ्या दाड्या यांच्या वर्णनांनी काव्ये व व्यवहार भरला आहे. केसांचे आकर्षण ऋषिमुनींनाहि फार. गृहस्थांचे केस त्यांच्या विपुल सौभाग्याचे व विलासाचे द्योतक तर वनस्थांचे त्यांच्या विरक्तीचें व सुदीर्घ तपाचे द्योतक. दोघांनाहि आपल्या केसांचा अभिमान. असे हे सगळे केशवच होत, भगवान् कृष्ण ह्यांचा शिरोमणि, म्हणून तो केशव म्हणून विशेष प्रसिद्ध. सहस्रनामांतून संध्येची २४ नामें निवडली गेली आणि त्यांतहि पहिले नाम केशव आहे. असें आहे केशव नामाचे आगळे महत्त्व. पण हे महत्त्व त्याच्या आध्यात्मिक आशयामुळेच असू शकतें. तो आध्यात्मिक आशय निरगुण पक्षी असा आहेः केस म्हणजे पुरुषावयवांचा अति सूक्ष्म अंश. पुरुषेन्द्रिये म्हणजे त्याच्या विविध शक्ति होत. अर्थात् सर्व स्थूल सूक्ष्म आणि अति सूक्ष्म शक्तींचा जो स्वामी तो केशव म्हणावयाचा. हाच भाव भागवताच्या पुढील श्लोकांत विशद झाला आहेः
योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना ।
अन्यांश् च हस्तचरण-श्रवणत्वगादीन् प्राणान्, नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ॥

अर्थात् केशव म्हणजे अखिल शक्तिधर परमात्मा होय.

६४९. केशिहा
केशिनं हन्ति इति केशिहा । जो केशीनामक दैत्याचा वध करिता झाला तो केशिहा कृष्ण. जे जे वधार्ह त्यांचा वध देव करीत आला आहे. केशी हाहि त्यापैकीच. सत्य संयम दया क्षमा शान्ति इत्यादि संजीवनरूप दैवी गुणांचे जे मारक जीवन-द्रोही काम क्रोध लोभादि आसुर गुण तेच वधार्ह होत. त्यांचे अभिमानी जे भ्रांत आणि उद्दाम जीव तेच राक्षस, तेच असुर, त्यांचा नाश म्हणजे त्या आसुर गुणांचा नाश भगवान् करीत असतो. ते जीव तर आत्मरूप असल्यामुळे त्यांचा नाश होऊच शकत नाही. आणि म्हणून पुराणांत वर्णिले जाते की त्या त्या असुराचा नाश देवानें केला आणि त्याची प्राण-ज्योत देवांत मिसळून गेली, देवाच्या ठाईं विलीन झाली. अशा प्रकारें देव त्यांचा उद्धार करतो, त्यांना सद्गति देतो. आत्मा अमर असल्यामुळे तो केव्हांहि मरत नाहीं आणि देह मर्त्य असल्यामुळे तो मेल्याशिवाय रहात नाही. अशा स्थितीत दोन्ही दृष्टींनी वध म्हणजे एक निरर्थक क्रिया होते. म्हणून वधाचा खरा आशय अभिमाननाश, अज्ञान-नाश एवढाच होऊं शकतो. तें अज्ञान, तो अभिमान कायम आहे तोवर त्या आसुर जीवाचा नाश होऊच शकत नाही. स्थूल देह पडल्यावरहि तो लिंगदेहानें कायमच असतो. आणि तो परत जन्मत राहतो. मधु कैटभ,हिरण्याक्षहिरण्यकशिपु, रावण कुम्भकर्ण अशा तीन जन्मांत ते शप्त असुर वावरत राहिले. त्यांची मुक्ति झाली नाही. ह्याचेहि कारण तेंच. रक्तबीजाच्या रक्तबिन्दूगणिक नवे रक्तबीज तयार होत ह्याचेहि कारण तेच. तात्पर्य अज्ञाननाश झाल्याखेरीज देहांतून मुक्ति नाही. परमात्माच तो अज्ञाननाश करण्यास समर्थ म्हणून तो असुरहन्ता, म्हणून तो केशिहा, म्हणून तो कंसहृत्.

६५०. हरि
हरति इति हरिः । जो हरण करतो तो हरि म्हणावयाचा. पण कशाचे हरण ? दुःखाचें ? नाही. कारण, दुःखें असंख्य आहेत. मग कशाचें ? दुःखमूळाचें. दुःखमूळ उपटलें की सर्व दुःखें उन्मूळतात. हे दुःखमूळ कोणते ? पाप. पण पापांतहि तर असंख्य प्रकार आहेत. होय, पण त्यांचे सर्वांचे मूल स्वरूप अज्ञान आहे. म्हणून हरि म्हणजे अविद्यार्हता. ज्यामुळे जीव अविद्या काम कर्म जन्म मृत्यु जराव्याधि दुःखांत सांपडतो तें सर्वदोषमय मूळ अज्ञानच तो नाहींसें करतो आणि म्हणून तो हरि म्हणावयाचा. जीवाचें दुःखजंजाळ अन्यथा दूर व्हायचे नाहीं. जागृत जीवाला आपल्या पापाचे सतत भान होत राहतें दुःखानुभवामुळे. त्यामुळे तो "पापोऽ हं पापकर्माहं पापात्मा पापसंभवः । त्राहि मां पुण्डरीकाक्ष सर्वपापहरो हरिः ॥ " असें पुकारीत हरीला शरण जात असतो. आणि हरि त्याचे अज्ञान हरण करून त्याला "तत् त्वं असि” म्हणून दाखवून देत असतो. आणि तोहि मग "पापो ऽहं पापकर्माहं" हे रडगाणे सोडून देऊन 'सोऽ हची ललकारी देत मुक्तविहार करूं लागतो.
हरि शब्दाचा सिंह असाहि अर्थ आहे. आणि तोहि इथे लागू पडतो. हा हरि, हा आत्मसिंह मेंढ्यांच्या कळपांत सांपडून में में करणाऱ्या आपल्या छाव्याला, जीवाला, पाहतो आणि त्याचा कान धरून ग्राम्य कळपांतून त्याला अरण्यांत घेऊन जातो आणि म्हणतो लेका, हे में में काय करतोस ? अरे सोऽहं ची गर्जना कर ही अशी माझ्या सारखी. आणि मग तोहि आत्मज्ञानवान् मुक्तात्मा में में सोडून सोऽहं ची गर्जना करूं लागतो. अशा प्रकारें तो हरि आपल्या छाव्याचे हरण करीत असतो म्हणून तो हरि म्हणावयाचा.


कामदेवः कामपालः कामी कान्तः कृतागमः ।
अनिर्देश्यवपुर्विष्णुर्वीरोऽनन्तो धनंजयः ॥७०॥


६५१. कामदेव
जीवाच्या हृदयांत अनेक ज्ञात अज्ञात बऱ्यावाईट स्थूल सूक्ष्म वासना वास करीत असतात. किंबहुना या वासनांचेच तें बनलेलें आहे. कोशकीटक आपल्या उदरांतून तंतु काढून त्याचा कोश बनवितो आणि त्यांत आपल्याला सुरक्षित समजतो. तद्वत् जीवहि नाना वासनांच्या कोशात आपल्याला संवृत करून राहतो. कोशावांचून जणू तो जगूच शकत नाही. कुठल्या ना कुठल्या वासनेचे वसन त्याला हवेंच. तो नग्न दिगंबर राहू शकत नाही. या सर्व वासनांचें वर्गीकरण धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चतुर्वर्गात प्राचीन विचारकांनी केले आहे. आधुनिक कदाचित् काही वेगळे करतील. वर्गीकरण कसेहि केलें तरी तात्पर्यात फरक नाही. वासनामय कोश आहेच आहे. प्राचीनांनी तर कमालच केली आहे. निर्वासन होणाच्या आकांक्षेलाहि त्यांनी वासनाच मानले आहे. तिला त्यांनी पुरुषार्थ, परम् पुरुषार्थ असें भव्य नांव दिलें आहे इतकेंच. हे जें वासनेचे आकाशवत् सर्व व्यापकत्व तोच कामदेव होय. म्हणजे काम हा मूलतः आत्मभिन्न पण छायावत् आत्मज नि आत्मानुगत भार आहे. "कामस् तदग्रे समवर्तनाधि । मनसो रेतः प्रथम यद् आसीत्' अशा शब्दांत त्याचे वर्णन वेदांत केलें गेलें आहे. विश्व-सृष्टि करणारा जो पहिला देव निर्माण झाला तो हा प्रजापति कामदेव होय. हा कामदेव आत्मदेवाचा आत्मज आहे. त्यामुळे तो आत्मा आणि जीव यांच्या मध्ये अंतरपाट झाला आहे. तो दूर झाला म्हणजे जिवाशिवांचे लग्न होतें. याला ओळखायचे आहे. त्याची ओळख होणे म्हणजे त्याच्या कचाट्यातून सुटणे, सुटका होणे. त्याला ओळखतांच तो चोरासारखा पलायन करतो. भगवान् बुद्धानें याला ओळखले तेव्हां त्यांना साक्षात्कार झाला आणि ते म्हणालेः
अनेक जन्म-संसार आलों घावेत सारखा ।
गृहकारक शोधीत, दुःख हें जन्मजन्मणे ॥
देखिला गेहकारा तूं करिशी न पुनः घर ।
भंगले सगळे वांसे तुझें आढ़ेहि मोडलें ।
निर्वाणगत चित्तानें तृष्णांचा क्षय गांठिला ॥

जीवाचें कारागार निर्मिणाऱ्या या माराला ओळखलें की तो मरतो. त्याचे कारागार जमीन दोस्त होतें आणि जीव निजधामास जातो. अशा या माराला देव कां म्हटलें ? 'आत्मा वै पुत्रनामासि म्हणून, तो आत्मज आहे म्हणून.

६५२. कामपाल
काम हा आत्मज भाव असल्यामुळे परमात्मा हा उघडच कामपाल झाला. काम हा इष्ट असो अनिष्ट असो, तो कोणाला टळत नाही. कारण तो प्रकृतिगत आहे. त्याचे स्वरूप शुद्ध आणि शुद्धतर करीत जाणे एवढेच माणसाला करणे शक्य आहे. पण त्याला अजिबात नाहींसा करणे कसे शक्य आहे ? कारण सर्वांचा प्रभव आत्मा आहे. आणि तो तर नित्य आहे. त्यामुळे आत्यन्तिक नाश कोणत्याच वस्तूचा संभवत नाही. तो काम वा अन्य कोणताहि भाव शुद्ध सूक्ष्म आणि व्यापक होत होत अखेर आत्मरूप होऊन जातो. आत्म्याचें जें हें सर्वाश्रयत्व तेंच त्याचे पालकत्व होय. आणि त्या अर्थानें तो कामपाल म्हटला आहे.
कामापासूनच ही सर्व सृष्टि होत असल्यामुळे त्या प्रजापतिकामाचा आश्रय म्हणून तो परमात्मा विशेषतः कामपाल म्हटला आहे. "ब्रह्मा देवानां प्रथमः संबभूव । विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता । " हा जो आदि प्रजापति ब्रह्मा तोच कामदेव असून त्याचा जनिता आणि पालक तो परमात्मा आहे. म्हणून त्याला कामपाल म्हटले आहे. कामपाल म्हटल्यानंतर कामसृष्ट विश्वाचाहि तो पालक आहे हे नव्यानें सांगण्याची गरजच राहत नाही. याहि अभिप्रायानें तो कामपाल म्हटला आहे. या ठिकाणी काम शब्द जो आला आहे तो मूल सूक्ष्मतम अर्थाचा आहे. मदन वा मैथुनेच्छा या अति स्थूल आणि ग्राम्य अर्थाचा तो नाही. भगवान् विष्णु परमात्म्याची पालनी कला म्हणून तो कामपाल म्हटला अथवा रुद्र संहारिणी कला म्हणून तो कामहा म्हटला तरी त्यांत स्थूल अर्थ नाही. त्याचा आशय आध्यात्मिक आणि पारमार्थिक आहे. इथे सहस्रांत तोच अभिप्रेत आहे. आणि म्हणून कामपाल आणि कामहा ही दोन्हीहि पदें इथे आली आहेत.

६५३. कामी
कामी म्हणजे कामवान् विषयैषी. कामदेव म्हणजे कामात्मा, कामपाल म्हणजे कामाश्रय आणि कामी म्हणजे कामक्रियावान् ही तीन पदें बीज-शक्तिकीलकसूचक आहेत. तिन्ही मिळून वस्तु संपूर्ण होते. आधीं बीज पाहिजे. त्या बीजांत अंकुरण्याची शक्ति असतेच. पण ती सुप्त असते. ती सक्रिय व्हायला पाहिजे. ही सक्रियता म्हणजेच प्रेरणाशक्ति होय. आणि ती प्रेरणा. सफल झाली, कृतार्थ झाली म्हणजे तिला म्हणायचें कीलक. इथे. म्हणजे कीलकरूप फलदर्शनांत बीजाचे आणि प्रेरणेचे कार्य संपतें असें नव्हे. ही एक आवृत्ति झाली. बीजगत सर्व शक्ति निःशेष रिक्त होईपर्यंत अशा अनेक आवृत्त्या होतच राहतात. आणि तेव्हांच बीजाचे व प्रेरणेचे कार्य संपते.
परमात्मा हा कामाचे बीज आहे. कामप्रेरणाहि तोच आहे आणि कामभोगसंपन्नहि तोच आहे. हे विश्व म्हणजे भोग्यजात आहे. तें जीवमात्राच्या रूपानें परमात्मा भोगून राहिला आहे. तो हे विश्व विषयीभूत करीत आहे. आणि म्हणूनहि तो कामी म्हणावयाचा. काम शब्द संस्कृतांत तीन अर्थांनी येतो (१) मूल मनोभाव वा वृत्ति या अर्थानें हा प्रायः एकवचनी येतो. उदाहरणार्थ-काम एष क्रोध एष" कामं क्रोधंच संश्रिताः" इत्यादि. (२) आंतरिक वासना या अर्थी हा प्रायः बहुवचनी येतो आणि त्या सोबत त्यागणे क्रियापदाची अपेक्षा असते. उदाहरणार्थ (१) प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् (२) विहाय कामान् यः सर्वान् (३) संकल्पप्रभवान् कामान् त्यक्त्वा सर्वान् अशेषतः" इत्यादि. (४) बाह्य भोग्य पदार्थ या अर्थान. या अर्थीहि हा प्रायः बहुवचनी आणि इच्छिणे, घेणे, भोगणें या क्रियापदांची अपेक्षा राखणारा असतो. उदाहरणार्थ(१) लभतेच ततः कामान्मयैव विहितान्हि तान् (२) तद्वत् कामा यं प्रविशन्ति सर्वे (३) कामैस्तैस्तैर्हृतज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः" इत्यादि. इथे इनन्त पद तयुक्त या अनि आले असल्यामुळे कामी म्हणजे भोग्यजातसंपन्न असा . अर्थ घ्यावयाचा, भोगाभिलाषी असा नव्हे.

६५४. कान्त
शम् पासून शान्त तसें कम् पासून कान्त पद आलें आहे. कान्त म्हणजे कमनीय, सुंदर, प्रिय. परमात्मा हा नितान्त कान्त आहे. परम सुंदर आहे. स्त्रीला पुरुष कान्त वाटतो, पुरुषाला स्त्री कान्ता वाटते. वस्तुतः कान्तत्व न स्त्री ना पुरुष असें तें आत्मरूप आहे. आणि त्यालाच इयें कान्त म्हटले आहे. पण ही प्रतीति अज्ञ जीवाला होत नाही. त्याला वाटते, तें जें स्त्रीरूप वा पुरुषरूप आहे तेंच कान्त होय. पण त्याची त्याची कान्ति रोग, जरा, मरण यांच्यायोगें क्षणोक्षणी क्षीण व नष्ट होत असते, पण त्यामुळे कान्ता विषयींची प्रीति क्षीण होत नाहींच उलट वाढते आणि मरणाला पुरून उरते. अर्थात् या अव्याहित अजर अमर प्रीतीचा विषय असलेलें कान्त तत्त्व देहाहून भिन्न आहे हे उघड आहे. जाणून वा नेणून जीव त्यावरच प्रेम करीत असतो. म्हणून तो उपनिषदाचा ऋषि म्हणतो "न वै अरे पत्युः कामाय पतिः प्रियो भवति आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति । न वै अरे जायायाः कामाय जाया प्रिया भवति, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति । ” इत्यादि. सारांश, परम सुंदर, परम प्रेमास्पद या विश्वांत जर काहीं असेल तर तें परमात्मतत्त्वच होय. कारण तें कधींच दगा देत नाही. त्याची कान्ति कधीच काळवंडत नाही. स्त्री पुरुषांची अंगकांति अत्यंत दगाबाज आहे. ती व्याधिजरामरण यांनी सदैव ग्रासलेलीच आहे. देहा इतकी बेभरंवशाची वस्तु दुसरी कोणती आहे ? आणि त्याच्या इतकें दुःखदोषास्पद तरी दुसरे काय आहे ? म्हणून परमात्मा हाच कान्त म्हणावयाचा.
कः ब्रह्मा, कल्पान्ते तस्य अन्तं करोति इति कान्तः । ही व्युत्पत्ति कृत्रिम आहे आणि अनावश्यक

६५५. कृतागम (१)
कृताः आगमाः वेदशास्त्राणि येन सः कृतागमः । ज्यानें वेदशास्त्र केलीं तो. कृतागम म्हणावयाचा. सर्व ज्ञान चिद्वस्तूपासूनच संभवत असल्यामुळे तो चिन्मात्रमूर्ति परमात्मा कृतागम म्हटला आहे. आगम हे मानवी भाषेत प्रकट झालेले असले तरी त्यांची मूळ प्रेरणा दैवी आहे आणि म्हणून ते ईश्वरी शब्द म्हटले जातात, अपौरुषेय मानले जातात. ज्या प्रमाणें मूल होते आईला पण तें बापाच्याच बीजाचे मानले जाते. त्या प्रमाणें शास्त्रांची मानवी भाषाहि आईप्रमाणें होय आणि विचारबीज दैवी होय. म्हणून आगम अपौरुषेय आणि दैवी वा ईश्वरी मानिले गेले आहेत. सर्व धर्म आणि धर्मग्रंथ ईश्वरी आहेत. पण त्याच बरोबर मानवी भाषेत आणि मानवी आचारांत प्रकट झाल्याकारणानें ते निर्दोष राहिले नाहीत. निर्दोष केवळ एक परमात्मा आहे आणि त्याच्या ठाईच असलेलें धर्मज्ञानहि तसेंच निर्दोष आहे. आणि त्याचाच तो कर्ता आहे म्हणून तो कृतागम म्हणावयाचा.
वेद कुराण बायबल इत्यादि धर्मग्रंथ कांहीं अपौरुषेय नव्हत, ते पुरुषकृतच आहेत आणि त्यांत हीण मिसळलेलें आहे. त्यांतील निर्मल ज्ञानाचा मूल्यवान् धातुभाग शोधूनच घेतला पाहिजे. आपण तामस राजस आहार सोडून जसे सात्त्विक दूध फळे घेतों, केळे खातों तेव्हांहि साल काढून टाकतों आणि गर खातों. खाल्यावरहि आपलें आंतडे त्यांतील सार भाग घेते आणि असार टाकून देतें अशी ही सारग्राही विश्लेषणप्रक्रिया जो निरंतर करीत राहतो तोच खरोखर कृतागम म्हणजे परिष्कृतागम म्हणावयाचा. चिन्मात्रमूर्ति परमात्मा सहजच परिष्कृतागम आहे. मानवाला परिश्रम पूर्वक तसें व्हावयाचे आहे. तो सतत ज्ञानाची चाळणी करीत राहिल्यास यथाकाळी त्याला निखळ ज्ञान लाभेल आणि तो कृतागम होईल.

६५५. कृतागम (२)
कृतागम म्हणजे वेदशात्रकृत्‌ अशा अर्थानें आपण तें पद पाहिले. पण खरोखर इथे आगम पदानें वेदशास्त्र असा अभिप्राय घेण्याचे कारण नाही. वस्तुतः आगम पद निगम पदाच्या वेगळे आणि विरुद्ध म्हणूनहि घेतले जाते. निःशेषं गम्यते एभिः इति निगमाः वेदाः अशी निगमपदाची व्युत्पत्ति आहे, तर आ किंचित् गम्यते एभिः इति आगमाः अशी आगमपदाची व्युत्पत्ति आहे. वेद आणि वेदानुसारी सारी शास्त्रे प्रायः निगम म्हटली जातात. वेद हेच वस्तुतः निगम म्हणायचे, पण गौरवानें आणि तात्पर्यानें वेदानुसारी शास्त्रेहि निगम पर्दात अन्तर्भूत होतात. पण आगम हे विशेषतः वेद प्रमाण न मानणाऱ्या संप्रदायांचे धर्मग्रंथ होत. जैन आणि बौद्ध संप्रदायांच्या प्रमाण ग्रंथांना जैनागम बौद्धागम म्हटले जाते. इथे कृतागम पदानें सुचविलें आहे की तो परमात्मा केवळ वेदच नव्हे तर जैन बौद्ध ईसाई महंमदी इत्यादि संप्रदायांच्या धर्मशास्त्रांचाहि कर्ता आहे. जगांत जेवढे म्हणून धर्म-ग्रंथ आहेत आस्तिक नास्तिक अज्ञेयवादी एकेश्वरवादी अनेकदेवतोपासक आणि असलेच इतर त्या सर्वांचे मूळ तो परमात्मा आहे. म्हणून स्वधर्मनिष्ठानें इतर निष्ठांचा निषेध निन्दा निरादर न करता त्यांच्या योगें स्वधर्मनिष्ठेचे उपबृंहण करावें. स्वधर्म हा परिशुद्ध आणि परिपूर्ण आहे, त्यांत जे दोष आढळतील ते बाहेरचे आहेत, इतरत्र जे गुण आढळतील ते मुळ स्वधर्माचेच अंगभूत आहेत असें लक्षात घेऊन दोषांचे वर्जन आणि गुणांचे अर्जन करीत चलावें. या योगें अधर्म-विधर्माचा छेद उडून स्वधर्म नि धर्म दृढावेल. नीष्ठा डोळस व प्रवाही होईल, खोल होईल. तिचे डबके होणार नाही.

६५६. अनिर्देश्य-वपु
अनिदेश्य एव वपुः यस्य सः अनिर्देश्यवपुः । जें हे म्हणून कोणाला दाखवतां येत नाहीं तें अनिर्देश्य म्हणावयाचे. तें अनिर्देश्यच वपु म्हणजे शरीर वा मूर्ति आहे ज्याची तो अनिर्देश्यवपु म्हणावयाचा. परमात्मा हा असा अनिर्देश्यवपु आहे. हा पहा परमात्मा म्हणून कधी कोणाला दाखवतां आलेला नाही. जें कांहीं दाखवले जाईल तें 'हे' होईल तें होणार नाही. परमात्मा हें नाहीं तें आहे. आणि 'तत् त्वं असि' या महावाक्यांत जीवहि वस्तुतः तेंच आहे हे अभिज्ञान करून दिले आहे. पण जगांत तर कोणी रामकृष्ण कोणा विवेकानंदाला मी देव पाहिला आहे म्हणतात. हे कसे ? कोणा नामदेवापाशी प्रत्यक्ष देव येऊन दूध पितो हे कसे ? हे वाच्यार्थानें सत्य नव्हे. त्याचा आशय इतकाच की त्यांना परमात्म्याची अपरोक्षानुभूति झाली. अतीन्द्रिय आणि स्वसंवेद्य अशा आत्मतत्त्वाचा साक्षात्कार झाला. यावेगळें जें कांहीं अज्ञजन-रोचनार्थ सांगितले जाते आणि नसत्या चमत्कारांनी पुराणादिक वाङ्मय भरून वाहते आहे तें सारें भ्रामक आहे, हेच अनिर्देश्यवपु हे पद सांगतें आहे. गीतेनें हेच स्पष्ट केले आहे.
अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मां अबुद्धयः ।
परं भावं अजानन्तो ममाव्ययमनुत्तमम । गीता ७ - २४

अव्यक्तस्वरूप परमात्म्याला व्यक्त मानणे, तो जन्मतो आणि लीला करतो म्हणणें, अबुद्धीचें आहे, मूर्खपणाचे आहे. उपासनेसाठी त्या अव्यक्ताचे आम्ही ध्यान कल्पितों, त्याचे आवाहन करतो आणि विसर्जनहि करतो. पण तसें करतांना आम्ही हे विसरून चालणार नाहीं की तो परमात्मा तर अनिर्देश्यवपु आहे, अरूप आहे.

६५७. विष्णु
विश्वं वेवेष्टि व्याप्नोति इति विष्णुः । जो हे सर्व व्यापून राहिला आहे तो विष्णु, विष् ३ प आणि विश् ६ प या दोन्ही धातूंपासून हा शब्द व्युत्पादिला जातो. विष हें तत्काल सर्व शरीरांत पसरतें, व्याप्त होते, म्हणून ते विष म्हटले आहे. विष्णुहि विषवत् व्यापक आहे, केवल तो संजीवनौषधवत् संजीवक आहे इतकेंच. विष मारक आहे. तर विष्णु जीवक आहे. एखाद्याला सर्पदंश झाला तर सर्पविष वेगानें त्याच्या अंगांत पसरतें. तें हृदयापर्यंत पोचण्यापूर्वी आणि त्यायोगें हृदय निःस्संद होण्यापूर्वी जर दुसरें अतिवेगवान् संजीवन रक्तवाहिनींत सूचिप्रविष्ट केलें तर ते त्या विषाला मारून त्या पुरुषाला वाचवतें. म्हणून असलें हें व्याधिविनाशनहि विष्णु म्हणतां येईल. औषध हे रोगविषाहून अधिक वेगवान आणि अधिक समर्थ असायला पाहिजे. विष्णु नाम हे तसे आहे. ते सर्व रोगांचे औषध आहे. कारण त्याच्या वेगाहून अधिक वेग आणि त्याच्या सामर्थ्याहून अधिक सामर्थ्य दुसऱ्या कशाचेच संभवत नाही. त्याच्या वेगाचे सामर्थ्याचे नि व्याप्तीचे वर्णन ईशोपनिषत् असें करतेः
"तें एकलें न हालेचि मनाहूनिहि वेगवान् ।
न पवे इंद्रियांनीं तो तेणें पूर्वीचि गांठिलीं ॥
उगें चि धावत्या गात्रां टाकी मागे बसूनि तें ।
त्याच्या बळेंचि प्राणाचे सारें चलन चाललें ॥
तें चळे न चळे तेंचि तें समीप.नि दूर तें ।
भरूनि सर्व तें राहे राहे वेष्ट्रनि सर्व तें ॥ "

इन्द्रिय प्राण आणि मन यांना क्रिया करावी लागते, पण तें चिद्रूप विष्णुतत्त्व अक्रिय आहे. कांहीं न करतांच तें सर्वत्र नि सर्व आहे. त्यामुळे त्याची बरोबरी दुसरें कांहींहि करूं शकणे संभवनीय नाही. त्यामुळे म्हणतात "अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम् । विष्णुपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम् ॥ " ज्यानें हे आत्मतत्त्वामृत घेतले त्याला देह नि देहानुगत आधि व्याधि उपाधि कसे बाधणार ? प्रकाशाला अंधार भिववू शकत नाही. अमृत प्यालेला पुरुष जसा मरणाला भीत नाही तसा आत्मज्ञान झालेला पुरुष देहाच्या योगाला वा वियोगाला भीत नाही. कारण तो सर्व स्थितीत तुल्यार्थदर्शी असतो. हे सर्वत्र दर्शनच वैष्णव धर्म होय.

६५८. वीर
वीरपद सहस्रांत अनेकदा आले आहे. शिवाय वीरहा पदांतहि ते आले आहे. धीर पदाची व्याख्या "विकारहेतौ सति विक्रियन्ते येषां न चेतांसि त एव धीराः" अशी केली जाते. अर्थात् ज्यांच्या बुद्धीत ज्ञान प्रकाशित झाले आहे आणि त्याचा प्रकाश इंद्रियद्वारा आचरणांत फांकत आहे, ते धीर होत. म्हणजे ज्यांना कळते आणि वळतेंहि ते धीर होत. त्याप्रमाणें संग्रामांत जो मनांतून निःशंक आणि जिवावर उदार होऊन पराक्रमाची पराकाष्ठा करणारा अनिवर्ती योद्धा तो वीर होय. म्हणजे ज्याच्या अंतरांत निर्भयता असून ती ज्याच्या व्यवहारांत प्रकर्षानें प्रकटते तो वीर होय. मृत्यु म्हणजे देहपात हा सर्वांत कठिण प्रसंग मानला आहे. त्याप्रसंगी "बिरुदाचे दादुलेहिंवताती " मोठ्या मोठ्यांची पांचावर धारण बसते. त्या वेळीहि ज्याची बुद्धि निष्कंप राहते तो साक्रेटिसासारखा पुरुष स्थितप्रज्ञ होय, धीर होय. ही धीरता समाधि घेतांना परीक्षिली जाते. तशीच रणांगणांत जिवावर उदार होऊन लढता लढतां देह ठेवतांना जी परीक्षिली जाते ती वीरता होय. हे दोघेहि, धीर नि वीर, सूर्यमंडल, भेदी म्हणून समान गौरविले आहेतः "द्वौ एव पुरुषौ लोके सूर्यमण्डल-भेदिनौ । परिवाड् योगयुक्तश्च रणे चाभिमुखो हतः ॥ " ब्राह्मणानें धीर आणि क्षत्रियानें वीर असणे हे परम श्रेयस्कर होय आणि समान गौरवास्पद होय. याचे वास्तविक तात्पर्य हे आहे की प्रत्येक आत्यन्तिक त्याग हा समान गौरवास्पद आहे. वर्णाश्रमधर्माचे हे रहस्य आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे आपआपले कर्तव्य सर्वस्वाचा त्याग करून पार पाडतील तर ते सर्व मोक्षाचे म्हणजे परम श्रेयाचे समान अधिकारी होतील. स्वकर्तव्य पार पाडतांना जो देह म्हणजे जीवित समर्पून मोकळा होतो त्याहून अधिक कोणी काही करू शकत नाही असे वैश्य स्त्री शूद्रहि ब्राह्मणक्षत्रियांइतकेंच सूर्य मंडळभेदी होत. ही आत्यंतिक स्वधर्मनिष्ठाच मोक्ष -दायिनी आहे. आणि म्हणूनच म्हटले आहे स्वर्धर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ।

६५९. अनन्त
नास्ति अन्तः देशतः कालतः वस्तुतश्च यस्य सः अनन्तः । ज्याला देशतः कालतः आणि वस्तुतःहि अन्त नाहीं तो अनन्त होय. हे विश्व देश-कालद्रव्यात्मक त्रिविध आहे. आणि तें सान्त आहे. याहून सर्वथा भिन्न तें अनन्त म्हणावयाचें. कल्पान्ती पंचभूतात्मक द्रव्य आणि देश व काल सर्व निरगण ब्रह्माच्या ठाईं विलीन होतात. त्यानंतर निरुपाधि निराकार अव्यक्त आणि निर्गुण असें जें अचिंत्य तत्त्व उरतें म्हणजे शेष राहतें तेंच अनन्त होय. त्याचा केव्हांहि अन्त होत नाही आणि त्याला अगुणत्वामुळे कुठलीहि सीमा, मर्यादा, अन्तहि संभवत नाही त्यामुळेहि तें अनन्त होय. कोठलाहि द्रव्याणु घेतला म्हणजे त्याच्या पाठीमागे देश आणि काल लागतात. अणु म्हटला म्हणजे त्याला आकार आला अर्थात् तिथे पूर्वपश्चिम दक्षिणोत्तर अधरोर्ध्व आणि अवान्तर दिशा आल्याच. त्याच बरोबर हा विशिष्ट अणू या क्षणी आहे, यापूर्वी तो नव्हता, यानंतर तो नाहीसा होणार, ही भाषाहि आलीच. म्हणजे काल तत्त्व तिथे दाखल झाले. परंतु जिथे द्रव्याणुच नाही तिथे गुण, क्रिया, देश, काल कांहींच संभवत नाही आणि असें निगुण तत्त्वच अनन्त पदवीस पात्र आहे. अन्यत् सर्व सान्त होय. या अनन्ताची सगुण मूर्ति उपासनेसाठी कल्पिली तीहि "अनन्तश्चास्मि नागानाम् " म्हणून अनन्त म्हटली गेली. याच्या आधारावर विश्व आणि विश्वात्मा पहुडला आहे, विराजमान आहे. हे सत्य कविजन आपल्या आवडीप्रमाणें नाना प्रकारें वर्णितात. "एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति" या वेदवचनांत हाच आशय प्रकट झाला आहे. हे अनन्त तत्त्व जड नसून चेतन आहे म्हणून त्याला 'न अग' नाग म्हटले आहे. हे स्वप्न जाग्रत् सुषुप्त अवस्थांचे नित्य साक्षी आहे म्हणूनहि ते नाग होय. नागाचे डोळे पक्ष्मरहित अनिमेष असतात. नागाची चाहूल लागत नाही. हे तत्त्वहि तसेंच अविज्ञातगति आहे. नाग आपल्या अपत्याला खाऊन टाकतो. तसें हे तत्त्व विश्वाला गिळून टाकतें. इत्यादि भाव लक्षून अनन्ताला नाग कल्पिलें आहे. या कविकल्पनेत दर्शन आहे. अनन्ताची कल्पना अनन्ताची बरोबरी करू शकत नाही. म्हणून त्या कल्पिताला चतरदशी दिली. पंचदशी म्हणजे पौर्णिमा त्या अचिन्त्य अनन्ताची होय. या अनन्ताच्या नागफण्यांत आणि चतुर्दशी तिथि कल्पनेत दर्शनाइतकेंच काव्यहि भरले आहे. किंबहुना दर्शन आहे म्हणूनच काव्य आहे.

६६०. धनंजय
धनं जयति इति धनंजयः । जो धन जिंकतो तो धनंजय म्हणावयाचा. जिंकणे धातूवरून युद्ध वा द्यूत यांत धन जिंकणारा असा अर्थ निष्पन्न होतो. म्हणजे जो बलसामनिं वा बुद्धिसामनिं दुसऱ्याला द्वंद्वांत परास्त करून त्याचें धन जिंकतो तो धनंजय, जो धोपट मार्गानें मेहनत मजुरी करून, कलाकौशल्याची कामें करून, व्यापार उदीम करून वा कारखानदारी करून धनोपार्जन करतो तो काही धनंजय नव्हे. तो वैश्य, तो शूद्र होय. तो धन उत्पन्न करणारा आहे, जिंकणारा नव्हे. ब्राह्मणहि धनंजय नव्हे. तो भिक्षुक आहे. तो निरीच्छ राहून विद्याध्यन आणि तप करीत राहतो. उरला एक क्षत्रिय तोच धनंजय. तो धनाचे उत्पादनहि करीत नाही किंवा तें मागतहि नाही. आपल्या बाहुबलानें वा बुद्धिबलानें तें तो दुसऱ्या पासून जिंकून घेतो. आणि हे गौरवास्पद मानलें आहे. मेहनत मजुरी करणे हीन, भीक मागणे लाजीरवाणे, मग धनोपार्जनाचा एकच मार्ग उरतो आणि तो म्हणजे अपहार. चोर डाकू तो धनापहार रात्रीं चोरून लपून करतात, क्षत्रिय दिवसा ढवळ्या राजरोस एकमेकांशी भांडून करतात. ज्याच्या 54 आणि मेंदूत अधिक बळ असेल त्यानें दुसऱ्याला पराभूत करून धनापहार करावा. त्याचंच नांव धनंजयत्व, महाभारत काळी अर्जुन हा एकवीर मानला जात होता. म्हणून तो धनंजय. भारतीय युद्धहि त्यानें च जिंकलें. म्हणूनच तो "पाण्डवानां धनंजयः" म्हणून भगवद्विभुति गणला गेलाः आतां महाभारत काळापेक्षां मानवसमाज प्रगत झाला आहे. आणि हे धनंजयत्व आतां गौरवास्पद न रहतां रौरवास्पद झाले आहे. टोजोहिटलर यांनी हा रौरव गांठला. आतां सर्वोदयाचा उदय झाला आहे. आणि ऐतखाऊ लोकांना धनंजय म्हणून गौरविले जाणार नाहीं. जो यथाशक्ति काम करील आणि यज्ञशेष भक्षील तोच धनंजय.



॥ हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP