ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

सुधन्वा खण्डपरशुर्दारुणो द्रविणप्रदः ।
दिवःस्पृक्सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयोनिजः ॥६१॥


५६७. सुधन्वा
सु शोभनं धनुः अस्य इति सुधन्वा । लक्ष्यभेदक्षम धनुच चांगले म्हटले जाईल. आणि लक्ष्य म्हणजे पुमर्थ. त्याचा अचुक वेध घेणारे आणि त्याला संपादणारें शार्ङ्ग धनु म्हणजे हा नरदेह होय. 'शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्' म्हणून म्हटलेच आहे. धर्माचरणानें माणसाला सर्व पुरुषार्थ प्राप्त करून घेता येतात. पण तो धर्म नरदेहानेंच आचरतां येतो म्हणून नरदेहच सु म्हणजे उत्तम, धनु म्हणजे साधन होय. परमात्मा नाना देह धारण करण्याचे प्रयोग करीत करीत नरदेह धारण करता झाला आणि तिथे तो कृतकृत्य झाला. त्या देहानें त्यानें परम पुरुषार्थ संपादिला. म्हणून तो नरदेहच त्याचे उत्तम धनु, उत्तम साधन होय. म्हणून असें समर्थ साधन स्वामित्वानें बाळगणारा म्हणून तो सुधन्वा म्हणावयाचा.
प्रणवो धनुः शरो ह्यात्मा ब्रह्म तल्लक्ष्यमुच्यते ।
अप्रमत्तेन वेद्धव्यं शरवत् तन्मयो भवेत् ॥

प्रणव म्हणजे प्रणवोपासन हे धनुष्य होय. तद्द्वारा प्रेषित आत्मशर लक्ष्य ब्रह्माचा वेध घेतो. ह्या विचारानुसार जो अक्षरोपासक तो सुधन्वा झाला. लक्ष्यरूपानें परमात्मा ब्रह्म आहे, पण वेधकर्ता या नात्यानें तोच सुधन्वा आहे, योद्धा आहे. तोच आत्मराज्य मिळवतो.
हा पारमार्थिक अभिप्राय झाला. लौकिक अभिप्रायानेहि परमात्मा हा सुधन्वा आहे. त्याचे धनुष्य सर्वांत मोठे आणि मजबूत आहे. तें दरपात करणारे आहे. शत्रु त्याच्या प्राणांतक बाणापासून बचावू शकत नाही. तें अमोघ आहे. इंद्रधनुष्याहून मोठे मजबूत आणि सुंदर धनुष्य कोणते आहे ? शस्त्रांच्या उत्क्रांतींत धनुर्बाणाला दारूच्या बंदुकीच्या शोधापूर्वी विशेष महत्त्व होते. त्यामुळे त्या काळच्या माणसानें तत्कालीन उत्तम शस्त्रानें परमात्मा सुसज्ज कल्पिणे रास्तच आहे. आज तो सुधन्वा न म्हटला जातां परमाणविक शस्त्रधारी म्हटला जाईल. सुधन्वाचाहि तोच आशय समजावयाचा. तो सर्वातिशायी आहे. आपल्या कालांतील सर्वांत शूरवीर पराक्रमी आहे. अग्रेसर आहे. तो धनुर्धारी राम आहे. ॲटमबाँबवाला नाहीं आतम बाँबवाला !

५६८. खण्ड-परशु (अखण्ड-परशु)
'सुधन्वा खण्डपरशुर् दारुणो द्रविणप्रदः' हा श्लोकार्ध भगवान् परशुरामाचे स्मरण करणारा आहे. भगवान् परशुराम ही विभूति इतर सर्व विभूतींहून आगळी आहे. मत्स्य कच्छ वराह हे तीन अवतार तिर्यक् योनीतील होत. सृष्टीच्या प्रारंभींचे होत. त्यानंतर जेव्हां या पृथ्वीतलावर मनुष्यावतार झाला तेव्हां त्या मनुजावतारांत आरंभीच्या काळी नरसिंह वामन परशुराम हे तीन ब्राह्म अवतार झाले त्यानंतर राम कृष्ण बुद्ध हे क्षात्र अवतार झाले. यापुढे वैश्य-शूद्रावतार व्हायचे आहेत. आणि व्हावयाचे आहेत नारी-अवतार. ही एक उत्क्रांति-प्रक्रिया आहे. परशुरामावताराचे वैशिष्ट्य पुढील श्लोकांत असें वर्णिलें आहेः "अग्रतश्चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः ।
इदं ब्राह्म इदं क्षात्रं शापादपि शरादपि ॥ "

तो समितिंजय अवतार आहे. तो विद्वानांची समिति आपल्या बुद्धिबळानें जिंकतो तसा शूरवीरांची समिति आपल्या बाहुबळानें जिंकतो. त्याच्याजवळ शापसामर्थ्य आहे, तसें शस्त्र-सामर्थ्यहि आहे. तो मुत्सद्दीहि आहे आणि लढवय्याहि आहे. तो पूर्ण शहाणा आहे. तो शान्तिनेताहि आहे नि युद्धनेताहि आहे. तो कोणत्याहि आघाडीवर पुढारीच आहे. इतर सर्व अवतार एकेरी आहेत. परशुराम हा असा दुहेरी वा संपूर्ण अवतार होय. परशुरामाजवळ जरी धनुष्य होते तरी त्याचा मुख्य खंड म्हणजे परशु. परशु नें म्हणजे कुऱ्हाडीनें जंगल तोडायचे आणि धनुर्बाणानें मृगया करायची अशा प्रकारें नर्मदचा परिसर वसवून मग तो अपरान्ताकडे वळला. त्यानें नर्मदेच्या मुखापासून थेट कन्याकुमारी पर्यंत असह्य सह्याद्रीला जंगलें तोडून सह्य बनविलें. तिथे वसति वसवली. तेथील अपावनांना पावन करून त्यांना आर्य बनवलें. अगस्त्यानंतर एवढा मोठा राष्ट्रनिर्माता दुसरा झाला नाही. दक्षिणेचा पूर्व घाट अगस्त्यानें तर पश्चिम घाट परशुरामानें वसविला आहे. या दोहोंचे कार्य पुढे रामानें लंकाविजय करून पूर्ण केलें. अखण्ड-परशु असाहि पाठ घेणे शक्य आहे. ज्याच्या परशूत खण्ड पडला नाहीं तो अखंड-परशु म्हणावयाचा.परमात्म्याचा काल-कुठार कुठे खंडित वा बोथट झालेला नाही. म्हणून तो अखण्ड-परशु म्हणावयाचा.

५६९. दारुण
परशूच्या खांड्यानें जंगलें तुटली तशी नर - राक्षसांची मुंडकेंहि तुटली. आर्यांची वसाहत जी दक्षिणेला सरकत गेली ती का दारुण कर्म केल्याशिवायच झाली असेल ? वनांचा नि जनांचा दारुण संहार करूनच हे शक्य झालेलें आहे. लोक म्हणतात आमचा इतिहास का नाही ? त्यांना हे कळत नाहीं की हा असा दारुण इतिहास लिहिण्यांत आणि तो जपून ठेवण्यांत स्वारस्य काय ? तो विसरलेलाच बरा. तो इतिहास नकोच. आणि हवाच असेल तर ह्या दारुण शब्दांत लपलेला बघा. काळ चाळणी मारीत आहे. जें शुभ, मंगल, महनीय आहे तें राहो, अशुभ अमंगल क्षुद्र जावो. हाच खरा इतिहास. परशुरामानें, त्याच्या पूर्वजांनी आणि वंशजांनीहि दारुण कर्म केलें आहे. त्यामुळे तो तद्रूप परमात्मा दारुण म्हटला आहे. कोणतेंहि महद् भाग्य दारुण कर्म केल्यावांचून मिळत नाहीं हाच तर मुळीं इतिहास आहे. रामायण, भारत, भागवत आणि पुराणे यांचा सर्वांचा हाच निष्कर्ष आहेः "अकृत्वा दारुणं कर्म नाप्नोति महतीं श्रियम्". परशुरामानें कुरुक्षेत्रांत उन्मत्त क्षत्रियांना मारून त्यांच्या रुधिरानें पांच ह्रद भरून ठेवले. आणि ही संपूर्ण पृथिवी जिंकून ब्राह्मणांना दान केली. स्वतः अकिंचन राहून महेंद्र पर्वतावर तो तपश्चर्या करीत आहे. तत्पूर्वीहि पित्याच्या आज्ञेनें त्यानें आईचा शिरच्छेद केलाच होता. हे सगळे चरित्र दारुण नाहीं असें कोण म्हणेल ? रामानेहि पित्याच्या वचनासाठी चौदा वर्षे वनवास केला व राक्षसांचा संहार करून लंका जिंकली. कृष्णानेहि कंस, जरासंध, कौरवांचा निःपात केला. हे असें दारुण कर्म प्रत्येक अवताराच्या वांट्यास आलेच आहे. कोणत्याहि महद्यशाचें कोणत्याहि महद्‌भाग्याचें तें एक अपरिहार्य अंग आहे. पण ती बाजू प्रायः दडून असते, दडवून ठेवली जाते. परंतु जिथे जिथे तुम्हाला कळस दिसेल तिथे तिथे पाया हा जसा असलाच पाहिजे. त्या प्रमाणें जिथे जिथे वैभव आढळून येईल तिथे तिथे त्याच्या बुडाशी, दारुण कर्म आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

५७०, द्रविणप्रद
परमात्मा दारुण आहे तसा तो द्रविणप्रदहि आहे. तो उग्र तप करवून मनो-वाक्-काय-गत मलाचे निर्दहन करतो खरा आणि त्यायोगें तो दारुण वाटतो हेहि खरें, पण तत्परिणामीं तो आत्मधनाचा परम लाभहि करवून देतो. ती साधना संपेपर्यंत तो दारुण आहे. जोवर यत्किंचित् मल आहे तोवर त्याच्या शुद्धीसाठी तो तपाचे चटके देत नि जपाचे नगारे वाजवीत राहतो. त्यांत तो अगदी निर्दय बनतो. पण आत्मशुद्धीचा गड चढून आत्मदर्शन झालें की त्याची दारुणता मावळते व द्रविणप्रदता उगवते. तो परम आल्हाददायक आत्मधन साधकाच्या हवाली करतो. अशा प्रकारें तो द्रविणप्रद होतो. आत्मलाभ जो करून देतो तो राज्यादि भौतिक लाभ देतो ह्यांत काय नवल ? "नहि वित्तेन तर्पणीयो मनुष्यः" जीवाला वित्तमात्रानें परितोष होण्यासारखा नाही तर परमात्मा आपल्या भक्तांना हे असलें हीन द्रव्य कां देतो ? तो भक्ताची आस्था आणि रुचि वाढविण्यासाठी असें करीत असतो. तो त्याच्या उच्चावच कामना पुरवीत असतो. आणि त्याला आपल्याकडे खेचीत असतो. असली सकामभक्ति गौण खरी, पण तीहि भक्तिच आहे आणि म्हणून असल्या भक्तीलाहि शास्त्रांत स्थान आहे. आणि त्यामुळेच सर्वशास्त्रांत तोंड भरून फलश्रुति दिल्या आहेतः "यशः प्राप्नोति विपुलं ज्ञाति-प्राधान्यमेव च । अचला श्रियमाप्नोति श्रेयः प्राप्नोत्यनुत्तमम् । "
इत्यादि आणि सगळ्या पुराणांत याच्या असंख्य साक्षी दिलेल्या आहेत. परशुरामानें सबंध पृथ्वी ब्राह्मणांना दान दिली. रामानें बिभीषणाला नि सुग्रीवाला राज्य दिले. कृष्णानें पांडवांना साम्राज्य मिळवून दिलें. सुदाम्याला सुवर्णनगरी दिली. दामाजीची रसीद भरली इत्यादि भगवंताच्या द्रविणप्रदत्वाच्या कथांना खरोखर मिति नाही. 'भौमं दिव्यं चान्तरिक्षं वित्तं अच्युतनिर्मितम्” भूमि, अंतरिक्ष आणि आकाश यांत आढळणारे सर्व द्रव्य त्या परमात्म्यानें निर्मिलेलें आहे आणि उपजीविकेसाठी जगाला दिलेले आहे. त्यामुळे तो परमात्मा उघडच द्रविणप्रद आहे. ज्या कोणाला जें कांहीं द्रविण मिळाले आहे तें सारें त्या परमात्म्यानेच दिले आहे. म्हणून तो द्रविणप्रद म्हणावयाचा.

५७१. दिवःस्पृक् (दिविस्पृक्)
दिवि दिवं स्पृशति व्याप्नोति इति. दिविस्पृक् । जो स्वर्गाला पोचला आहे, जो स्वर्गात भरला आहे तो दिविस्मृक् म्हणावयाचा. परमात्मा आम्हांला दिसत नाही.जे दिसतें तें हें दृश्य विश्व आहे. तें जरी ईश्वरनिर्मित आहे तरी तें कांहीं ईश्वर म्हणतां येत नाही. त्याहून तो वेगळाच असला पाहिजे. या व्यक्त विश्वाहून जर तो वेगळा आणि वरिष्ठ आहे आणि तो जर या व्यक्ताकारांत कुठें सांपडत नाही तर मग त्याचा शोध घ्यायचा कुठं ? जिथे घ्यायचा त्याचेच नांव दिव्यलोक स्वर्ग. त्या अलौकिक अगोचर अव्यक्त दिव्य लोकांत तो परमात्मा राहतो..जे त्या अव्यक्त अक्षराला जाणतात तेहि दिविस्पृक् होतात. स्वर्गीय स्पर्श अनुभवतात. ऐहिक स्पर्श हा मृतस्पर्श आहे. स्वर्गीय स्पर्श म्हणजे अमृतस्पर्श होय. स्पर्श म्हणजे त्वगिन्द्रियाचा आपल्या स्पर्शनीय विषयाशी संनिकर्ष एवढाच अर्थ नाही, तर विषयमात्राचा स्पर्श, विषयेद्रिय-संनिकर्षज सुखदुःखादि अनुभव. जीवाला बाह्याभ्यन्तर स्पर्श आहे त्यामुळे तो स्पर्शज सुख स्मरतो, तदितर सुख विस्मरतो. परंतु परमात्म्याला बाह्य-स्पर्शच नाहीं; तो सदैव स्वान्तःसुख-परितृप्त आहे. म्हणूनच त्याला म्हणायचे दिविस्मृक. वस्तुतः तें आभ्यन्तर सुख स्पर्शरूप नव्हे, पण स्पर्शभिन्न सुखाची कल्पनाच जीवाला होत नसल्यामुळे त्या अस्पर्श-सुखाला, त्या दिव्य सुखानुभूतीला तो दिविस्पृक्ता वा दिव्य स्पर्श म्हणतो. दिव्यत्वाची कल्पना पार्थिवाच्या तुलनेनें वा विरोधानें, साम्यानें बा वैषम्यानेहि देणे शक्य नाही. पण जीवाला त्याहून वेगळी भाषाच बोलता येत नसल्यामुळे त्याचा काय अपराध ? आणि त्यामुळेच तो परमात्मा "शब्दातिगः शब्दसहः" म्हटला आहे. त्याचा अनुभव शब्दाच्या पार पलीकडला आहे पण तरी तो शब्दांत मांडावा लागतो आणि तो परमात्मा तें सहन करून घेतो.

५७२. सर्वदृक् व्यास
'सर्वदृग्व्यासः' हे एक नाम की दोन नामें ? एक नाम मानिल्यास तें एक समस्तपदहि मानणे शक्य आहे. अथवा सविशेषण नाम आहे म्हणून ती दोन पदें मानतां येतील. एक नाम मानिल्यास ती उघडच दोन पदें होणार, शंकराचार्यांनी हे एक समस्त नाम मानिलें आहे. पूर्वी बाविसाव्या श्लोकांत सर्वदृक् पद येऊन गेले आहे. त्यामुळेहि सर्वदृगव्यास असें एक पद मानणे बरे असा त्यांचा अभिप्राय दिसतो. तथापि मला तो त्या कारणानें अपरिहार्य वा आवश्यक वाटत नाही. सर्वदृक् पद दुसऱ्या अनेक नामांप्रमाणें पुनः येऊ शकते. व्यास पदाला त्याची खास अपेक्षा आहे असेंहि नाही. तथापि सहस्रसंख्या-परिमिति-परिपालनार्थ एक नाम घेणे आवश्यक मानल्यास सर्वदृग्व्यास म्हणजे सर्वदर्शी त्रिकालज्ञ व्यास असा अर्थ होईल. व्यासांची विभूति इतकी मोठी आहे की गीतेंतहि भगवंताला "मुनीनां अप्यहं व्यासः" असे म्हणावें लागले आहे. त्याचाच हा पुनरुच्चार आहे. व्यस्यति इति व्यासः । जो वेदांचा व्यास म्हणजे विभाग करतो तो व्यास होय. त्याच बरोबर जो विस्तार करतो तोहि व्यासच म्हणावयाचा. व्यासांनी वेदमंत्रांचे प्रथम ऋक् (पद्य), यजुस् (गद्य), साम (गेय) असे तीन विभाग केले आणि त्यांना परिशिष्ट म्हणून अथर्ववेद जोडून दिला. ह्या मुख्य वेदविभागांचे परत शाखाभेद केले. ऋग्वेदाचे २१, यजुर्वेदाचे १०१, सामवेदाचे १००० आणि अथर्ववेदाचे ९ पोट विभाग केले. वेदांचा हा व्यास मंत्राक्षरांपुरता झाला. अर्थाचे काय ? त्यासाठी परत त्यांनी महाभारत रचिलें. वेदाचें तात्पर्य गीतेच्या व आख्यानांच्या रूपानें त्यांत विशद केलें आहे-समासानें व व्यासानें. आणि शेवटी भगवद्गान म्हणून भागवत रचून ते कृतकृत्य झाले आहेत. आणि त्यामुळेच परमात्म्याला व्यास म्हणवून घ्यावे लागले आहे. संपूर्ण ज्ञान-वर्तुळाचा तो व्यासरूप आहे. त्याच्या या सर्वदृक्तेमुळेच तो सर्वदृक् व्यास म्हटला गेला. म्हणूनच म्हटले आहे. 'अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरिः । अभाललोचनः शंभुः ज्याच्या भक्ताचा एवढा महिमा तो परमात्मा केवढा मोठा म्हणावयाचा ? त्याचे सर्वदृग-व्यासत्व केवढ़ें म्हणावयाचें ?

५७३. वाचस्पति (अयोनिज)
"वाचस्पतिः उदारधीः” पूर्वी तेविसाव्या श्लोकांत येऊन गेला आहे. इथे एकसष्टाव्या श्लोकांत तो पुनः आला आहे "वाचस्पतिः अयोनिजः" ब्रह्मणस्पति बृहस्पति वाचस्पति हे आणि असलेच इतर शब्द अलुक् समास म्हणायचे की ब्रह्मणस् बृहस् वाचस् हे शब्द मनस् वचस् सरस् शब्दाप्रमाणें सकारान्त शब्द म्हणावयाचें ? ज्या अर्थी ब्रह्मणस् बृहस् वाचस् अशी सकारान्त प्रातिपदिकें आढळत नाहीत त्याअर्थी ती षष्ठ्यन्त पदें मानणेच भाग आहे. तथापि प्राचीनतर वैदिक भाषेत ती प्रातिपदिकवत् असावीत अशी शक्यता आहे. मराठी देवाशपथ', 'दीनानाथ' प्रमाणें वाचस्पति इत्यादि अलुक् समास वैदिक भाषेत विशेष रूढ असावेत. दोन तीन शब्दांचे सुटसुटीत सोपे समास हे मराठीप्रमाणें वैदिकभाषेचे वैशिष्ट्य आहे. अभिजात संस्कृतांत आगगाडीच्या डब्यांच्या मालिकेसारखे लांबच लचक समास मराठींत तसेंच वैदिक संस्कृतांत आढळत नाहीत. वैदिक आणि मराठी या भाषांत असे आणि असलें साम्य पुष्कळच आहे. पण हा वाचस्पति कोण ? जो बृहस्पति, जो ब्रह्मणस्पति, जो गणपति तोच वाचस्पति होय. जी सगळी स्तुति आहे, जो उच्चार आहे, जें वर्णन आहे त्या सर्वाचा स्वामी तो अक्षर परमात्मा आहे आणि तोच इथे वाचस्पति म्हटला आहे. या अक्षर परमात्म्याला ॐ म्हणतात. ते एकाक्षर ब्रह्मच वाचस्पति होय. त्याचेच प्रतिपादन सगळे वेद, सगळ्या वाणी, सगळे वर्ण करतात आणि म्हणूनच तो वाचस्पति म्हणावयाचा. त्यामुळेच कोणत्याहि वेदमंत्राचा उच्चार करावयाचा झाल्यास आरंभी ॐकाराचा घोष केला जातो. कारण, त्या सर्ववर्णोच्चारांचा तोच प्रतिपाद्य अर्थ होय, विषय होय. वाक् आणि अर्थ हे नेहमी संयुक्तच असावयाचे. म्हणूनहि कोणताहि मंत्र म्हणावयाचा झाला की ॐकाराचा उच्चार हा आधी करावा लागतो. वाणी निरर्थक असू शकत नाही. ती अर्थाधीनच असावयाची. अर्थाश्रितच असावयाची. तो जो अर्थ तोच वाचस्पति होय. तोच वाणी-विनायक होय.

५७३. (वाचस्पति) अयोनि-ज वाचस्पति
सर्वदृग् व्यासः या पूर्ववर्ती नामाप्रमाणेंच "वाचस्पतिः अ-योनिजः" हे नामहि सविशेषण एक नाम मानिले आहे. वाचस्पति जगांत पुष्कळ असू शकतील, पण ते सगळे योनिज आहेत. जन्मलेले जन्तु आहेत. परमात्मा हा त्यांच्या पंक्तीला कसा बसणार ? तो वाचस्पति खरा, पण अ-योनिज आहे. तो न जन्मतांच वाचस्पति आहे. तो स्वयंभू वाचस्पति आहे. जगांत जन्मलेले जे वाचस्पति आहेत त्यांनी 'वाचां आचार्यतायाः पदमनुभवितुं कोऽस्ति धन्यो मदन्यः अशा बढाया कितीहि मारल्या तरी त्यांच्या वाणीला अर्थाच अनुसरण करावे लागते. परंतु हा स्वयंभू अयोनिज परमात्मा असा वाचस्पति आहे की त्याच्या वाणीच्या मागे अर्थ धावून येतो. 'वाचं अर्थोऽनुधावति तो 'भूः' म्हणतो आणि त्या मागोमाग भूर्लोक तिथे प्रकट होतो. तो 'भूवः' म्हणतो आणि भुवर्लोक तिथे आविर्भूत होतो. तो 'स्वः' म्हणतो आणि त्या सरशी स्वर्लोक तिथे उपस्थित होतो. हे सामर्थ्य दुसऱ्या कोणत्या वाचस्पतीचे आहे ? ते आडनांवाचे वाचस्पति ईश्वरी सृष्टि पाहतात आणि तिच्या सौंदर्याने भारले जाऊन गाऊं लागतात. कवन करू लागतात. त्यांना या सृष्टींत नाहीं असें कांहीं एक करता येत नाहीं. इसापनीतीतील बेडकीला जसा बैलाचा मोठेपणा आकळू शकला नाही आणि ती आपल्या त्या महासत्वाच्या इयत्तेच्या कल्पनेत फुगून गतप्राण झाली त्याप्रमाणें परमात्म्याच्या सृष्टीची म्हणजे त्या परमात्म्याच्या इयत्तेची कल्पना करतांना कविजनांची, वाचस्पतींची वाक्शक्ति फुगून फुगून फाटून जाते पण तिला त्या महासत्वाची परमात्म्याची, त्या अयोनिज वाचस्पतीची यत्किंचित्हि यथार्थ कल्पना होत नाही. आयोनिज पद स्वतंत्र मानिल्यास अयोनिज म्हणजे स्वयंभू अज परमात्मा असा अर्थ होईल. परमेश्वरी अवताराचें दिव्यत्व द्योतित करण्यासाठी तेहि अयोनिज वर्णिले जातात. नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव आत्मतत्त्व योनिज असू शकत नाही. तें कोणाचा पुत्र नाही, कोणाचा पिता नाही. देवकी-पुत्र वासुदेव रुक्मिणीरमण सत्यभामापति प्रद्युम्न-पिता इत्यादि कोणत्याहि नात्यांच्या गोत्यांत तो येत नाहीं. म्हणून तो अयोनिज म्हटला आहे.


त्रिसामा सामगः साम निर्वाणं भेषजं भिषक् ।
संन्यासकृच्छमः शान्तो निष्ठा शान्तिः परायणम् ॥६२॥


५७४. त्रिसामा
त्रीणि सामानि अस्यास्तीति त्रिसामा । ज्याची तीन सामें म्हणजे वैदिक गीतें प्रसिद्ध आहेत तो त्रिसामा होय, परमात्मा ऋचांनी स्तुत, यजूंनीं हुत आणि सामांनी गीत झाला आहे. कोणतीं हीं तीन सामें ? बृहत्साम तथा दुसरी दोन सामें म्हणजे रथंतर आणि वामदेव्य ही होत. आज सामगायन स्मृतिशेष झाल्यासारखे आहे. पण साम म्हणजे काय ? साम म्हणजे परमात्म्याशी समरस झालेल्या भक्तांचा परमानंदानुभूतीचा हर्षोद्गार, धन्योद्गार. उद्गारांचा शब्दार्थ पहायचा नसतो, भावार्थ घ्यायचा असतो. हुरा, वाहवा, ओहो इत्यादि उद्गारांचा शब्दार्थ कांहीं सांगणे कठिण आहे, पण त्यांचा भाव हर्षोल्लास आनंदातिशय व्यक्त करणारा आहे एवढें निश्चित. तसेंच "हावु हावु हावु " या सामगानाचा अर्थ काय म्हणून विचाराल तर कांहीं सांगतां यावयाचें नाहीं, पण त्यांचा भाव परमानन्द व्यक्त करणारा आहे. मनुष्य खातो पितो आणि खुशीत आला म्हणजे गातो. तसा वेदानुयायी जेव्हां यज्ञ करून सोमपान करतो तेव्हां अत्यंत प्रसन्न होऊन सामगायन करूं लागतो. अशी जी अनेक सामें गाइली गेली त्यांतील तीन विशेष प्रसिद्ध म्हणून तो सामगीत परमात्मा त्रिसामा म्हटला गेला. त्रयी म्हणजे तीन वेद हे जसे त्रिविध (गद्य पद्य आणि गेय) होत, तशी ही तीन सामेंहि त्रिविध असू शकतील. एक क्रियावस्था व्यक्त करणारे, दुसरें ज्ञानावस्था व्यक्त करणारे आणि तिसरे भावावस्था व्यक्त करणारें. क्रियावस्थेत तो विवेकी केवळ सक्रिया करतो आणि तिचेंच साम गातो. ज्ञानावस्थेत तो एकत्वोपासक बरेवाईट कोणतेंहि कर्म करीत नाही आणि अक्रियेतेचेंच, अकर्माचेच साम गातो. भावावस्थेत तो बरी-वाईट सारींच कर्में करतो आणि विश्वात्मभावाचेच साम गातो. असा तो परमात्मा त्रिसामा आहे.

५७५. साम-ग
परमात्मा साम-गीतच नाहीं, साम-गायकहि आहे. सामस्वरूप परमात्मा साम-गान करणार नाही, तर काय अ-साम-गान करील ? यज्ञ, सोमपान आणि सामगान ह्या वैदिक परिभाषेचे आधिभौतिक आधिदैविक आणि आध्यात्मिक असे तिन्ही अर्थ लक्षांत घ्यावयाचे आहेत. केवळ एकच अर्थ घेण्यानें वैदिकांना अन्याय होईल. कोणतीहि उपासना घ्या तिच्यांत हे तिन्ही भाग असावयाचेच. कोणतेंहि उपासनीय कर्म घेतल्यास त्याचे बाह्य विधि-विधान व अनुष्ठान, त्याची अधिष्ठात्री उपास्य देवता आणि तिचे आध्यात्मिक स्वरूप त्यांत गृहीत असते. इथे वैदिक उपासनेत साम्यस्वरूप साम हे अध्यात्म, इन्द्र देवता हे अधिदैव आणि यजन व प्रसादस्वरूप सोमपान हे अधिभूत होय. 'देहवंतास अव्यक्ती सुखें बोध घडेचिना' ही आहे वस्तुस्थिति. आणि देवतेचे स्वरूप असतें अव्यक्त, आध्यात्मिक हेहि तितकेंच निश्चित. अशा स्थितींत देहवंतानें त्या विदेह अव्यक्त स्वरूपाला आकळायचे कसे ? त्याची जी पद्धति तिचंच नांव उपासना होय. शास्त्रकार त्या अव्यक्ताला आकळण्यासाठी त्याचे एक रूप व नाम कल्पितात. तीच उपास्य-देवता. तिच्या नामरूपाविषयी त्यांचा कांहीं आग्रह नाही. "एकं सत्, विप्रा बहुधा वदन्ति अग्नि यमं मातरिश्वानमाहुः" असे त्यांनी स्पष्टच सांगून टाकले आहे. त्या देवतेच्या उपासनेचा विधिहि त्यांनी यथा- दैवत कल्पिलेला आहे. तो विधि देहेन्द्रियांनी अनुसरायचा, वाणीनें देवतेचे स्तवन करायचे, मनानें तिच्या अचिन्त्य महिम्याचे स्मरण करायचे, श्रद्धाभक्तिपूर्वक तिला आत्मनिवेदन करायचे आणि अशा प्रकारे तिच्या आध्यात्मिक स्वरूपाचें अनुसंधान करून तिशी स्वात्मभावानें समरस व्हायचे. अशी आहे ही ऋषिमुनि-साधुसंतांची उपासना पद्धति. या उपासनेला दृढ चालवून जेव्हां साधक सिद्ध होतो तेव्हां तो सामग बनतो, साम्याला प्राप्त होऊन सामगान गातो असा सिद्ध परमात्म-निर्विशेषत्वामुळे परमात्माच होय. त्यालाच इथे सामग म्हटले आहे.

५७६. साम
"त्रिसामा सामगः साम' हे एक सूत्र आहे. ह्यांत साध्य साधक आणि साधन तिहींचा अन्तर्भाव झालेला आहे. तिन्ही मिळून एकच वस्तु सिद्ध होत असल्यामुळे ती तिन्ही अभिन्नच होत, एकरूपच होत, परमात्माच साधक बनून साधन अंगीकारतो आणि साध्य गांठतो. त्याचा हा छंद आहे. त्याचा हा स्वभाव आहे. तो सामग साधक बनून सामाच्या साधनानें त्रिसामा जो परमात्मा त्याला गांठतो.
सागराला मिळूनहि गंगा वहातच राहते तसा तो साध्याला गांठूनिहि साधन आचरीतच राहतो. साध्याला गांठणे ही सिद्धि होय. पण सिद्धि मिळाल्यावरहि साधन चालूच ठेवणे ही संसिद्धि होय.
सामन् हा शब्द ब्रह्मन्, कर्मन्, धर्मन्, शर्मन् इत्यादि मन्प्रत्ययान्त कृदन्तांप्रमाणें सा-मन् असा आहे. मन् प्रत्यय हा करणार्थक आहे. ब्रहमन् म्हणजे स्तवनोपयोगी साधन अर्थात् स्तोत्र. ना-मन् म्हणजे नमनोपयोगी साधन अर्थात् अभिवादन. तसेंच समनोपयोगी वा शमनोपयोगी साधन तें साम म्हणावयाचे. सामगायनानें, साधक-विश्व साम्य पावतो. "निर्दोषं हि समं ब्रह्म' निर्दोष म्हणजे निष्प्रपञ्च आणि सम म्हणजे निर्विशेष निरहं जें तत्त्व तेच ब्रह्म होय आणि त्या ब्रह्माच्या साम्याला पोचण्याचे साधन तें साम होय. त्या सामाच्या योगें सर्व दुःख प्रपंचाचा उपशम, सर्व सुख-शान्तीची उपलब्धि अर्थात् परिपूर्ण साम्यलाभ होतो. या परम साम्यदशेची प्राप्ति साम-गायनानें होते. शब्द हा स्पन्दरूप आहे. त्या स्पन्दापासून जशी सृष्टि होते तसा सामोपासनेनें शब्दस्पन्द-निरोध होऊन सृष्टि-वैषम्योपशम होतो. आणि उरते एक केवळ साम्यरूप शान्ति वा शान्तिरूप साम्य, हे साम साक्षात् परमात्माच आहे. 'वेदानां सामवेदोऽस्मि' म्हणून जे म्हटले आहे ते ह्याचमुळे होय.

५७७. निर्वाण
हा बासष्टावा श्लोक संपूर्णच अति उच्च भूमिकेचा आहे. यांत जीवनांतील परम साध्य आणि त्याची साधनें या दोन्ही मूल्यांचा विचार येऊन गेला आहे. जीवनाला अर्थ मोल आणि साफल्य देणारी ही मूल्ये आहेत. यांची उपेक्षा म्हणजे जीवनद्रोहच होय, आत्मद्रोहच होय. साम, निर्वाण, शम, शान्ति, परायण, संन्यास, निष्ठा अशी ही महनीय पदें आहेत. या पदांना कोण श्रेयस्काम सोडील ?
निर्वाण म्हणजे ज्वलनशान्ति, आग विझणे. ज्याला आपण जीवन म्हणतो तें दैहिक जीवन वस्तुतः जीवन नसून आग आहे. ती आग जोवर जळत आहे तोंवर निर्वाण, शान्ति कुठली ? जीवन हें आग विझवून शान्ति शीतलता सुख तृप्ति देणारे असते. अर्थात् तिथे आग असू शकत नाही. उलट तिचा अभाव हे त्याचे पहिले लक्षण आहे. म्हणजे सर्व दुःखदाहोपशमलक्षण हें निर्वाण जीवनाचे अभावात्मक निवृत्त लक्षण होय. त्याचे स्वरूप तर परमानन्द आहे.
दैहिक जीवन वासनामूलक कर्मप्रधान आणि दुःखोदर्क आहे. वासनेचा अग्नि सारखा धुमसत असतो. त्याचा कर्ममय धूर आणि धग माणसाला सतत धडपडायला लावत असतात. परिणाम हा की सुखासाठी खटपट करायची व दुःखी कष्टी व्हायचे. यांतून, या सतत जळत राहण्यांतून माणसाची सुटका म्हणजेच निर्वाण होय.
पण ह्यांतून सुटका व्हायची कशी ? ज्ञानानें, ज्ञानच मोचक आहे. आधी ही आग म्हणजे आगच आहे हे लक्षांत यायला पाहिजे. हे पहिलें आर्य सत्य होय. याचे नांव संसार-दुःख. नंतर त्याचे कारण अविद्या, वासना होय हे लक्षात घ्यायचे. तदनुसार अविद्या हे दुसरें आर्यसत्य होय. रोग आणि रोगनिदान ही जशी कार्यकारणांची जोडी तशी पुढची जोडी आरोग्य आणि आरोग्योपाय ही होय. तदनुसार अनामयपद, मोक्ष वा निर्वाण हे तिसरें आर्यसत्य होय. आणि चौथे आर्यसत्य म्हणजे मोक्षकारण विद्या. या चार आर्य सत्यांच्या ज्ञानानें आणि ज्ञानपूर्वक जीवनानें निर्वाणलाभ व्हायचा.

५७८. भेषज
परमात्मा हा भेषज आहे, औषध आहे. कशाचें ? संसाररोगाचें, भवरोगाचें. भव म्हणजे जन्म आणि त्यापाठोपाठ येणारी व्याधिजरामृत्यु इत्यादि अनर्थ-परंपरा म्हणजे संसार. या सर्व परंपरेचा दिसणारा आरंभ भवापासून होत असल्यामुळे या संपूर्ण परंपरेला भवरोग असें नांव मिळाले आहे. पण या भवाचे तरी मूळ काय ? प्राक्तन कर्म. त्या कर्माचे मूळ वासना वा तृष्णा. तिचे मूळ अज्ञान, अविद्या. अर्थात् सर्व अनर्थाचे निदान अज्ञान वा अविद्याच होय. आणि परमात्मा हा स्वतः ज्ञानस्वरूप असल्यामुळे तो त्या अज्ञानरोगाचे औषध म्हटला आहे.
रोग आणि रोगनिदान, आरोग्य आणि आरोग्याचे उपाय हा जसा चिकित्साशास्त्राचा चतुव्यूह होय त्याच प्रमाणें संसार आणि तत् कारण अविद्या, मोक्ष आणि तत्कारण विद्या हा अध्यात्मशास्त्राचा चतुह होय. दोन्हीकडे जो उपाय आहे तेंच भेषज होय. आणि तें आहे ज्ञान, इथे क्रमानें निर्वाण आणि भेषज ही दोन पदें मोक्ष आणि त्याचे कारण ज्ञान या अर्थाची आहेत. चतुर्व्यूहांपैकी आरंभीची दोन पदें संसार आणि अविद्या इथें अध्याहृत समजावयाची. निर्वाणपद भेषज आध्यात्मिक आहे हे सुचविते. भेषजपद निर्वाण हे अनामयपद आहे असे सुचवितें. "पदं गच्छन्त्यनामयम्" म्हणून निर्वाणाला अनामयपद गीतेनें म्हटलेच आहे. चिकित्साशास्त्रीय परिभाषा अध्यात्मशास्त्राला लाविली आहे. कारण चिकित्साशास्त्र लोक-प्रथित आहे. अध्यात्मशास्त्र गूढ आहे, रहस्य आहे. ज्ञाताची उपमा अज्ञाताला दिली जाते. तद्विपरीत नव्हे. आणि म्हणूनच पुढील पदांत परमात्म्याला भिषक् म्हणजे वैद्य म्हटले आहे.

५७९. भिषक्
परमात्मा भिषक् आहे, म्हणजे वैद्य आहे. तो जीवाला विद्या म्हणजे ज्ञान देऊन भवरोगांतून मुक्त करतो. सामान्य वैद्य रोग्याला नुसते औषध देतात. त्यामुळे रोगी आपल्या पीडेंतून तात्पुरता मुक्त होतो. पण रोग कशामुळे आला आणि गेला तो कशामुळे गेला याचे सोपत्तिक ज्ञान त्याला होत नाही. आणि त्यामुळे तो परत परत रोगाच्या तावडीत सांपडत राहतो. परंतु परमात्मा हा
"ददामि बुद्धियोगं तं येन मां उपयान्ति ते । गीता १० - १०.२
तेषामेवानुकम्पार्थं अहं अज्ञानजं तमः ।
नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता । गीता १०-११

या गीतावचनांत प्रतिज्ञात केल्याप्रमाणें आपल्या भक्तांना हृदयस्थ गुरुरूपानें ज्ञान देऊन अज्ञानमुक्त करीत असतो. शास्त्र-प्रतीति गुरु-प्रतीति आणि आत्म-प्रतीति अशा तीन पायऱ्या आहेत ज्ञानाच्या. शास्त्रांत सगळे ज्ञान सुव्यवस्थित मांडलेले असतें. त्यावरून अधिकारी जिज्ञासूला ज्ञान मिळते, पण कांहीं संशयहि राहतो. तो संशय अनुभवी गुरूच्यामुखानें श्रवण करून दूर होतो. पण खरी आत्मप्रतीति तेव्हांच बाणते की जेव्हां शास्त्र द्वारा आणि गुरुमुखानें मिळालेलें ज्ञान आपणच आपल्या ठाई पडताळून पाहून सुप्रतीत आणि सुप्रीत होतो. हीच खरी प्रतीति होय. आणि ही आत्मभावांतूनच येत असते. म्हणून म्हटलें आहे भगवंतांनी "आत्मभावस्थो ज्ञानदीपेन अज्ञानजं तमः नाशयामि" ही प्रतीति देणारा जो हृदस्थ परमात्मा तोच इथें भिषक् म्हटला आहे. त्या प्रतीतिरूप औषधानें भवरोग नाहीसा होतो, भवभय नाहींसें होतें. हा सर्प नसून रज्जूच आहे असा प्रत्यय आल्यानंतर सर्प गेला मग त्याचे भय कुठून राहणार ? " तत्र को मोहः कः शोकः एकत्वं अनुपश्यतः ? " जिथे देहात्मबुद्धिरूप मोह गेला तिथे देह गेल्याचा शोक कुठला ? तिथे केवळ आत्म्याचे एकत्व, निर्मोह ज्ञान नांदत असते. परमात्मा हे असें निर्मोह ज्ञान देऊन स्वभक्तांवर परम अनुकंपा करीत असतो. वैद्य हा परम कारुणिक असावा असे म्हटले जाते. परंतु ज्ञान हे स्वभावतःच करुणा असल्यामुळे ज्ञानी गुरूचे परम कारुणिक हे नित्य विशेषण होय. परमात्मा हा असा परम कारुणिक भिषक् आहे.

५८०. संन्यासकृत्
परमात्मा संन्यासकृत् म्हणजे सर्वकर्म-संन्यासी आहे. ज्ञानी आहे. तो कोणतेहि कर्म करीत नाही. कर्ममात्र अविद्यामूलक आणि देहग्रहणहेतुभूत अर्थात् संसारदायक असल्यामुळे तो सर्व कर्मांचा संन्यास करतो." नहि अकृतः कृतेन" परमपुरुषार्थ मोक्ष हा अकृत म्हणजे कोणत्याहि कर्मानें संपादिला जाणारा नहे. तो आत्म्याचा स्वभाव आहे. म्हणून कर्म साधन नव्हे. तें मोचक साधन नाही, इतकेच नव्हे तर तें बन्धन आहे. कर्माच्या योगें प्राप्त होणारे सर्व लोक नश्वर आहेत, पुनरावर्तनदायी आहेत, संसारावह आहेत. मग वर्णाश्रमधर्म सर्व निरर्थकच, किंबहुना अनर्थावहच म्हणावयाचे ? नाही. ते निष्काम आचरले तर ज्ञाननिष्ठायोग्यता प्राप्त करून देतात. वर्णाश्रमधर्माचरण न करणे म्हणजे स्वैर वागणे होय, त्या योगें ज्ञाननिष्ठायोग्यता प्राप्त होणें नाही. आणि म्हणून निष्काम स्वधर्माचरण हे निरर्थक नव्हे. तद्द्वारा ज्ञाननिष्ठायोग्यता मिळवून आणि ती योग्यता आल्यानंतर सर्वकर्म-संन्यास करून साधक मोक्षास पात्र होतो. पण स्वतंत्ररीत्या कर्माला मोक्षोपाय म्हणून कांहीं किंमत नाही. ती ज्ञानालाच आहे. कारण मिथ्या-ज्ञानजनित दोषांचा परिहार कोणत्याहि कर्मानें होऊं शकत नाही. तो केवळ ज्ञानानेंच संभवतो. म्हणूनच म्हटले आहे "त्यागेन एकेन अमृतत्वं आनशुः" ज्ञानमूलक सर्वकर्मत्यागानेंच अमृतत्व म्हणजे मोक्ष सिद्ध होतो. मोक्षसिद्धि अविद्यादोषमूलक कमें सारीच गळून पडली म्हणजे होते. आणि ही मोक्षप्रतिबंधककर्म-निवृत्ति केवळ ज्ञानानेंच होते, कोणत्याहि कर्मानें नव्हे. अविद्या आणि तन्मूलक दोष हे कर्माचे कारण होय. आणि स्वर्गनरकादिलोकप्राप्ति हे त्याचे कार्य म्हणजे फळ होय आणि ही अशी स-कार्यकारण कमें सगळीच मोक्षप्रतिबंधरूप आहेत. हा प्रतिबंध तेवढा नाहीसा होणे म्हणजे मोक्ष होय. तो आयताच आहे. कोठल्याहि कर्माने ठोकून पिटून घडवायचा नाही आहे. अर्थात् आत्मज्ञानानें होणारा सर्वकर्म-संन्यास हीच मोक्ष-सिद्धि आहे. म्हणून परमात्मा हा संन्यासकृत् म्हटला आहे. कांहीं कर्में करायची कांहीं सोडायची हा संन्यास नव्हे. संन्यास म्हणजे संपूर्ण न्यास, कर्ममात्राचा न्यास. आणि असा संपूर्ण न्यास एक परमात्मा करू शकतो. देहधारी केवळ लाक्षणिक संन्यासच करू शकावयाचा.

५८१. शम
परमात्मा संन्यासकृत् म्हणजे संन्यासी आहे, तसा संन्याशांचा धर्म जो शम तोहि तो आहे. शम म्हणजे निवृत्ति. कर्मयोग्यांचा धर्म प्रवृत्ति तर ज्ञानयोग्यांचा, संन्याशांचा धर्म निवृत्ति होय.
आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते ।
योगारुढस्थ तस्यैव शमः कारणमुच्यते ॥ गीता ६ - ३

योगी ब्रह्मचर्याश्रमांत गुरुशुश्रूषा, गृहस्थाश्रमांत दान आणि वानप्रस्थाश्रमांत नियम-पालन वा व्रताचरण करून प्रवृत्तिद्वारा आपलें श्रेयःसाधन करीत असतो. तेंच तो संन्यासाश्रमांत प्रवृत्तीचा त्याग करून शम सेवून निवृत्तिद्वारा साधीत असतो. साधकाला सतत आपला विकास साधायचा असतो. हा विकास कृत्रिम नियम-पालनानें होत नाही तर आंतरिक वृत्तींना अनुसरून होत असतो. या स्वाभाविक वृत्तींना अनुसरून होणाऱ्या कर्मांनाच गीतेनें सहज कर्म म्हटले आहे. आणि ते सहज कर्म, सदोष असले तरी हट्टानें सोडता कामा नये. कारण तद्द्वारा हळू हळू वृत्ति पालटत जाते. जसजशी वृत्ति पालटत जाते तसतसा धर्महि पालटत जातो आणि शेवटीं साधकाला शम उर्फ निवृत्तिधर्म प्राप्त होतो. तोच इथे संन्यासकृत् पदानंतर त्या संन्याशाचा परम धर्म आणि चरम धर्म आला आहे. चरम धर्म चरम दशेलाच प्राप्त होईल. कच्च्या केळ्यांत परिपक्व केळ्याचा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध कसा येणार ? क्रमाक्रमानें स्वाभाविक वाढ होऊन परिपाकास आल्यावांचून जबरदस्तीनें तो आणतां येणार नाही. पण तो आल्यावांचून पूर्णताहि नाही. पूर्व अवस्थेत कर्म उर्फ प्रवृत्ति स्वास्थ्ययोगाचे कारण आहे. जो पर्यंत गन्तव्य गांठलें, नाहीं तो पर्यंत चालत रहाणेच श्रेयस्कर, गन्तव्य गांठल्यानंतर चालणे बंद करणेंच श्रेयस्कर, स्वस्थ राहणेच श्रेयस्कर.
परमात्म्यानें नरनारायणरूपानें संन्यास आश्रमाची स्थापना केली, शम हा धर्म उपदेशिला आणि स्वतः शान्त होऊन तो बदरिकाश्रमांत विराजमान आहे. "संन्यासकृत् शमः शान्तः" हा चरण नरनारायणाचें हे चरित्र सांगत आहे.

५८२. शान्त
शान्त म्हणजे निवृत्त, स्वस्थ. अशान्त पुरुष मिथ्याज्ञानजनित वासनेनें प्रेरित होऊन अपार कर्में करीत असतो. तो त्या कर्मात इतका गढून जातो की त्या कर्मांचा काय परिणाम आहे, काय फळ आहे याचा विचार करायलाहि त्याला अवकाश होत नाहीं. जन्मायचे, कर्में करायची, त्या कर्मानुसार स्वर्गनरकादि फल भोगायचे आणि फल भोगून झालें म्हणजे परत जन्मायचे असा त्याचा कार्यक्रम अव्याहत सुरू असतो. याचंच नांव आहे संसार. पण कोणी एखादा धीर पुरुष ही कोंडी फोडतो. तो कर्मप्रवाहांत वाहून न जातां विचाराची लव्हाळी पकडून शास्त्राच्या भूमिकेला लागतो. शास्त्राधारें कार्याकार्याचा निश्चय करतो. चोरी मारी जोरी इत्यादि निषिद्ध कर्म तो करीत नाही. पुत्रैषणा, वित्तैषणा, लोकैषणा सोडून तत्प्रेरित सारी काम्य कर्मेंहि तो करीत नाही. पण देहयात्रेसाठी आणि समाजधारणेसाठी स्वभावनियत वर्णाश्रमधर्म तो फलकामना सोडून आचरीत रहातो आणि त्याबरोबर चित्तशुद्धीसाठी तपःस्वाध्यायरूप उपासना साक्षेपानें करीत राहतो. असें जीवन जगतां जगतां आपली संपूर्ण चित्तशुद्धि केव्हां झाली याचीहि त्याला शुद्ध रहात नाही आणि तो संन्यासी होतो. त्याचे सर्व संकल्प मावळतात आणि तो शान्त म्हणजे समाहित होतो, स्वस्थ होतो.
यदाहि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते
सर्वसंकल्प-संन्यासी योगारूढस्तदोच्यते ॥ गीता ६ - ४

असा जो कर्म-प्रवाह तरून ज्ञानाच्या भूमिकेला लागलेला आणि वैराग्य अनासक्ति आणि सर्वसंकल्पसंन्यास या उत्तरोत्तर उन्नत शिखरांवर आरोहण करून ब्रह्मनिर्वाणाचे परम पद पावलेला पुरुषच शान्त होय. तोच परमात्मा. कारण त्याहन परम दुसरें कांही नाहीच. त्यालाच पुढील पदांत निष्ठा म्हटले आहे. निष्ठा म्हणजे पराकाष्ठा, आत्मशुद्धीची पराकाष्ठा, अर्थात् ब्रह्मनिर्वाण.

५८३. निष्ठा
निष्ठा म्हणजे निःशेष स्थिति, मुक्काम. गंगा सागराला मिळेपर्यंत वाहते. पण सागर-संगम झाल्यानंतर तिचा प्रवाह संपतो. अर्थात् सागर हा गंगेची, समुद्र हा नद्यांची, निष्ठा होय. त्याप्रमाणें सर्व साधनांची परिसमाप्ति म्हणजे परमात्मा होय. म्हणून तो निष्ठा म्हटला आहे. निष्ठा दोन असू शकत नाहीत. सर्वोच्च शिखर एकच असू शकते, दोन स्वर्गमाथा (एव्हरेस्ट) असू शकत नाहीत त्याप्रमाणें, म्हणूनच गीतेंत 'द्वे निष्ठे असा अनेकवचनी प्रयोग आला नाही, तर द्विविधा निष्ठा असा एकवचनी प्रयोग आला आहे.
लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ।
ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम् ॥ गीता ५ - ४

कर्मयोग आणि कर्मसंन्यास एकाच निष्ठेची दोन अंगें आहेत. एका अंगाला कर्मयोगाची तर दुसऱ्या अंगाला कर्मसंन्यासाची मुद्रा असलेलें हें एक नाणे आहे. नाण्याचे सोनें एकच आहे. मूल्य एकच आहे. म्हणूनच म्हटले आहे गीतेनेंः
सांख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति, न पण्डिताः ।
एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम् ॥ गीता ५ - ४

दोहोंचें फळ एकच आहे. अर्थात् गन्तव्य स्थानदृष्ट्या दोन्ही एक आहेत. मार्गतः ते वेगळाले आहेत. एखादी नदी पश्चिमवाहिनी असेल एखादी पूर्ववाहिनी. त्यांचे प्रवाह दिसायला वेगवेगळे आणि परस्पर-विरुद्ध असूनहि शेवटी दोन्ही जसे समुद्रांतच मिळतात त्या प्रमाणें सर्व साधनांची परिणति शेवटी परमात्म-दर्शनांतच होते. म्हणून तो परमात्माच एक निष्ठा होय. महिम्नाच्या पुढील श्लोकांत हाच आशय व्यक्त झाला आहेः
त्रयी सांख्यं योगः पशुपति-मतं वैष्णवमिति,
प्रभिन्नें प्रस्थानें परमिदमदः पथ्यमिति च ।
रुचीनां वैचित्र्याद् ऋजुकुटिल-नानापथ-जुषां,
नृणां एको गम्यस् त्वमसि पयसां अर्णव इव ॥


५८४. शान्ति
'संन्यासकृत् शमः शान्तः' हा चरण पुंल्लिंग आहे, पुरुषवाचक आहे; तर 'निष्ठा शान्तिः परायणम्' हा चरण अलिंग आहे, पद-वाचक आहे. दोहोंचेहि तात्पर्य एकच आहे. दोन्ही सर्वोच्च आदर्श व्यक्त करतात. पहिल्या चरणांत तो सगुण साकार आहे, तर दुसऱ्यांत निर्गुण निराकार. एक व्यावहारिक आदर्श आहे, दुसरा पारमार्थिक वा शास्त्रीय आदर्श आहे. बिन्दूची व्याख्या करायची झाल्यास ती शास्त्रीय परिभाषेत ज्याला लांबी नाही रुंदी नाही अशा सारखीच करावी लागणार. म्हणून तीच वास्तविक होय. पण प्रत्यक्ष फळयावर बिंदु काढावयाचा झाल्यास तो कांहीं तरी आकार घेणारच. आणि आकार म्हटला की त्याला मोजमाप आलेच. म्हणजे व्याख्या काल्पनिक झाली. सारांश परमार्थतः व्यवहार काल्पनिक आणि व्यवहारतः परमार्थ काल्पनिक अशी विप्रतिपत्ति येते. पण हे मानव जीवनाचेंच कोडे आहे. आदर्श हा देहनिरपेक्ष आहे. आणि आमचे जीवन आहे देहसाक्षेप. त्यामुळे तेवढा फरक पडावयाचाच. पण तो आम्हांला बाधक नाहीं साधकच आहे. आदर्श हा देहनिरपेक्ष असल्यामुळे, निरगुण असल्यामुळे देही मानवाला उत्तरोत्तर प्रगति करावयाला संपूर्ण वाव आहे. सत्य अहिंसा ब्रह्मचर्य यांच्यांत तो उत्तरोत्तर प्रगति करू शकतो. त्यामुळेच राम, कृष्ण, हरि (शाक्यसिंह), हे सत्य, प्रेम, करुणा यांचे प्रगततर अवतार होतात. आदर्शाला पोचण्याच्या मानवाच्या प्रयत्नाचे ते उच्चांक आहेत. ईश, गांधी, विनोबा हेहि असेच नवे उच्चांक आहेत. ते सारे मानवाचे चिर अभिलषित जी निर्वाण-परमा शान्ति तिचे पाईक आहेत. त्या शान्तीवरून ते आपले देह ओवाळून टाकीत आहेत. ओवाळून टाकायला मानवाला शिकवीत आहेत.अशी ती शान्ति परम आहे. तिलाच पुढील पदांत परायण म्हटले आहे.

५८५. परायण (म्), परायणः
परायणम् की परायणः ? दोन्ही पाठ आहेत. शंकराचार्यांनी त्यांचा उल्लेख केला आहे. आणि मागील पदाच्या चिंतनांत केलेल्या विवेचनानुसार दोन्ही घेणे शक्य आहे. तथापि तिथेच विवरिल्याप्रमाणें निर्गुणपर घेणें मी पसंत करतो. कारण अन्तिम आदर्श निर्गुणच आहे.
"निष्ठा शान्तिः परायणम्” ही तिन्हीं पदें जर समानार्थकच आहेत तर ती तीन हवींच कशाला ? समानार्थक असूनहि त्यांत आपआपलें वैशिष्ट्य आहे. निष्ठा सर्व सामान्य आदर्शवाचक पद आहे. त्या निष्ठेचे सगुण अंग म्हणजे शान्ति आणि निर्गुण अंग म्हणजे परायण होय.
स्थितप्रज्ञाची जी ब्राह्मी स्थिति वर्णिली आहे ती शान्तिपदानें अभिप्रेत आहे. तिचा उल्लेखहि तिथे आलेलाच आहे. आणि तिलाच ब्राह्मी स्थिति म्हणतात असेंहि म्हटले आहे.
विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः ।
निर्ममो निरहंकारः स शान्तिं अधिगच्छति । गीता २ - ७१
एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ । "

या पलीकडची पायरी म्हणजे ब्रह्मनिर्वाण, काय अंतर आहे या दोहोंत ? ब्राह्मी स्थितीत आणि ब्रह्मनिर्वाणांत ? ब्राह्मी स्थिति आणि ब्रह्मनिर्वाण या दोहोंच्या मध्ये देहाचा अंतरपाट आहे. तो पडदा तेवढा दूर झाला की दोहोंचे द्वैत फिटते आणि दोन्ही एक होतात. एक साकार, दुसरें निराकार; एक लाट, दूसरे पाणी सपाट. दोन्ही एक. तरंगाकार दिसत होता तो गेला. बाकी वस्तुतः अंतर काहीच नाही. तथापि साकाराला परायण म्हणतां यावयाचें नाही. निराकारच परायण, परायण पदाचे हेच तात्पर्य, पर म्हणजे पलीकडलें, परम आणि अयन म्हणजे धाम. अर्थात् परायण म्हणजे अनिर्देश्य अव्यक्त अक्षर असें तें परंधाम, आकार-विकार-प्रकारातीत कांहीं तरी,


शुभाङ्गः शान्तिदः स्रष्टा कुमुदः कुवलेशयः ।
गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः ॥६३॥


५८६. शुभाङ्ग
शुभानि अङ्गानि यस्य सः शुभाङ्गः । ज्याची अंगोपांगें शुभ आहेत तो शुभांग होय. देह हा बोलून चालून विटाळाचा गोळा आहे. तो ज्यानें धारण केला त्याला शुभांग कसें म्हणावें ? देहाचा जन्मच शुक्र शोणितांतून झालेला. मलमूत्र, लालाश्लेष्म, रक्त मांस, अस्थिचर्म इत्यादींनीं तो आंतून बाहेरून भरलेला. त्याला तुम्ही कितीहि निर्मल ठेवण्याचा प्रयत्न केला तरी तो कितीसा शुद्ध होणार ? त्यामुळे देहाभिमानी जीवाला केव्हांहि शुभांग म्हणतां यावयाचे नाही. त्यामुळे केवळ कपड्यालत्त्यांच्या व शरीराच्या बाह्य स्वच्छतेकडे व सौंदर्याकडे लक्ष देणाऱ्या आणि आन्तरिक ज्ञान आणि सद्गुण यांची उपेक्षा करणाऱ्या गाजरपारखी लोकांचा संत उपहास करतात. "असें कैसें हें सोवळे । शिवतां होतसे ओवळे ? महारासि शिवे| कोपे, ब्राह्मण तो नव्हे' असे ते सवाल करतात आणि बजावतातः
ज्या अविद्याकामकर्माच्या योगें देहरूप विटाळाचा गोळा उत्पन्न होतो तें सकार्यकारण समग्र अज्ञानच जिथे संभवत नाहीं तें आत्मतत्त्वच वस्तुतः शुभांग होय. तिथे आंतबाहेर, खालींवर, मागे पुढे, इकडे तिकडे चोहीकडे एकच एक निखळ ज्ञान ओतप्रोत भरलें आहे. "चंदनाचे हात पायहि चंदन चंदनचि अंग चंदनासि" असा जो चिन्मात्रमूर्ति परमात्मा तोच शुभांग होय. असें जें सर्वांगशुभ ज्ञान त्याच्या साठीच जो काया वाचा मनें रात्रंदिवस झटतो आहे, तोहि भविष्यवृत्तीनें शुभांग म्हणावयाचा. हाच आशय गीतेच्या पुढील श्लोकांत आला आहे.
नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत् स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥ गीता ४ - ३८

अविद्या हा महाफळ होय. तिचा ज्याला यत्किंचित्हि स्पर्श नाहीं तो परमात्माच शुभांग म्हणावयाचा.

५८७. शान्तिद
विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः ।
निर्ममो निरहंकारः स शान्तिं अधिगच्छति ॥ गीता २ - ७१

या श्लोकांत शान्ति कशी प्राप्त होते हे गीतेनें थोडक्यांत सांगितले आहे. मनुष्य बाह्य भोग आणि ते भोग भोगण्याची मनांतील लालसा दोन्ही सोडून देतो, शरीरासकट कोणत्याहि वस्तुला माझी म्हणत नाहीं आणि मी म्हणजे कोणी अमुक असा अभिमान धरीत नाहीं तेव्हां त्याला शान्ति लाभते. जो सतत मला हे हवें तें पाहिजे असे म्हणत असतो, त्याला नहे. सुखशान्ति सर्वांनाच पाहिजे आहे. पण 'पाहिजे सोडल्यावांचून ती कोणालाच मिळत नाही. हाच पेंच आहे. "न मागे तयाची रमा होय दासी । " रमा दासी होते खरी, पण जो आपल्या कामनेचा दास झाला त्याची नव्हे, तर जो तिचा स्वामी आहे त्याची ! हे स्वामित्व कसे लाभावें ? त्याची रीत अशीः
रागद्वेषवियुक्तैस्तु विषयान् इन्द्रियैश्चरन् ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसाद अधिगच्छति ॥ गीता २ - ६४

रागद्वेष परी जातां आली हातांत इन्द्रियें । स्वामित्वें विषयीं वर्ते त्यास लाभे प्रसन्नता ॥

प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥ गीता २ - ६५

प्रसन्नतेपुढे सर्व दुःखें जाती झडूनियां । प्रसन्नतेनें बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे ॥

पुढे थोडक्यांत सार सांगितले आहेः
नास्ति बुद्धिरयुक्तस्य, न चायुक्तस्य भावना ।
न चाभावयतः शान्तिः अशान्तस्य कुतः सुखम् ॥ गीता २ - ६६

अयुक्तास नसे बुद्धि त्यामुळे भावना नसे । म्हणूनि न मिळे शान्ति शान्तीविण कसें सुख । इन्द्रियसंयम, स्थिरबुद्धि, भावना, शान्ति आणि सुख असा हा क्रम आहे. पूर्व पूर्व उत्तरोत्तराचे कारण आहे. इन्द्रियसंयम बीज आहे. बुद्धि भावना शक्ति आहे आणि शांतिसुख फलित आहे. हे जें फलरूप शांतिसुख साधकाला मिळतें तें त्याला अंतरात्म्यांतून मिळत असतें. तें दुसर्‍या कशाहि पासून मिळत नाही. म्हणून सर्वान्तर्यामी परमात्मा हा शान्ति म्हटला आहे. ही शान्ति आत्मभिन्न कोणी देऊ शकत नाही. ती अनन्य भक्तीनेच मिळते.

५८८. स्रष्टा
कृतीहून कर्ता हा केव्हांहि मोठाच. पण मोठेपणाचा अंदाज त्या कृतीहून येतो. कोणी रामायणासारखें साहित्य, हरिकीर्तनासारखें संगीत, कैलासासारखें कलाशिल्प निर्मिलें तर त्याची आपण कोण प्रशंसा करतो. पण या सर्वांहून अनंत पटीनें अद्‌भुत अशी ही अनन्तपार विचित्र सृष्टि ज्यानें सृजिली त्या स्रष्ट्याचा महिमा किती म्हणून वर्णावा ? त्याचा महिमा स्रष्टा या पदाहून कमी आणि स्रष्टा या पदाहून अधिक वर्णितां येत नाही. म्हणून परमात्मा स्रष्टा म्हणावयाचा. नामाहून कमी परिचय काय देणार ? म्हणून परमात्म्याचें नाम स्रष्टा. महत्तम पराक्रमाहून, कार्याहून, वाखाणणी काय करणार ? आणि सृष्टीहून अधिक मोठी कलाकृति कोणती ? म्हणून स्रष्टा ही त्या परमात्म्याची उत्तम स्तुति होय, सर्वोत्तम प्रशस्ति होय. परमात्मा ह्या विश्वसृष्टीचा जनक असल्यामुळे त्याचे आज्ञांकित होऊन राहणे हा आमचा परम धर्म होय. पित्राज्ञेचे पालन याहून मोठा धर्म नाही. रामानें परशुरामानें आपल्या आचरणानें तो धर्म उपदेशिला आहे. आमचे जीवन आणि जीवनांतील सर्व लाभ ज्याच्यामुळे आम्हांला प्राप्त झाले त्याचे ऋण आमच्यावर किती म्हणावें ? तें आम्हांला केव्हांहि फेडणे शक्य नाही, पण तें मनांत बाळगुन जर आम्ही त्याची प्रीति संपादण्यांसाठी सतत झटत राहिलों तर अंशतः आम्ही उतराई झालों असें होईल. त्यासाठी सतत आम्ही त्याची सेवा करूं आणि मेवा मिळवू. त्याची प्रीति संपादिल्यानेच आमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. म्हणून म्हटले आहेः "एतावत्येव शुश्रूषा कार्या पितरि पुत्रकैः । बाढं इत्यनुमन्येत गौरवेण पितुर् वचः ॥ असें झाले पाहिजे. तेणे करूनच ते कृतार्थ होतील. वेदाज्ञा वा शास्त्राज्ञा ही परमात्म्याची परम पित्याची आज्ञा होय. ती जो पाळतो तोच आज्ञाकारी पुत्र. 'शान्तिदः स्रष्टा । ' हा क्रम असेंहि सुचवितो की परमात्मा हा ज्यांनी विविधतापतप्त होऊन मोक्षरूप शान्तीची हौस बाळगली त्यांना तो शांति देतो; आणि ज्यांनी अद्याप संसाराचा अनुभव पुरा घेतला नाही, त्याचा मोह ज्यांना अद्याप उरला आहे त्यांना तो संसार देत जन्मास घालतो. सारांश, 'आवडीचें दान देतो नारायण'. तो मुमुक्षूला मुक्ति आणि बुभुक्षूला भुक्ति देतो. याचेच नांव 'शान्तिदः स्रष्टा'

५८९. कुमुद
कौ भूम्यादिसृष्टौ मोदते इति कुमुदः । कु म्हणजे भूरादि सृष्टि, जो तिच्या ठाई मोद पावतो तो कुमुद. परमात्मा स्रष्टा आहे हे मागील पदांत सांगून या पुढीलच पदांत सांगत आहेत की तो या पृथिव्यादि सृष्टीत मोद पावत आहे. कर्ता आपल्या कृतींत मोद पावत असतो. तो मोदासाठी कृति करतो. कृतीच्या संकल्पांत तो मोद पावत असतो. कृति करतांना मोद पावत असतो,कृति झाल्यावर तिच्यायोगें तो मोद पावत असतो. सृष्टि हे आनंदाचे कर्म आहे. परमात्मा स्रष्टा बनून जीवांना आपलें अनुकरण करायला सांगत आहे. काही नवीन उत्पन्न करून त्या स्रष्ट्याची पूजा करा. कर्म हे त्या सृष्टिकर्त्याची पूजा होय. जे सृष्टीची झीजच करतात, ती भरून काढण्यासाठी आणि जीवनासाठी नवनिर्मिति कांहीं करीत नाहीत, ते सृष्टिकर्त्यांचा अवमान करतात. त्याची अवज्ञा करतात. परमात्म्यानें ही अनन्त कोटि ब्रह्माण्ड सृष्टि सृजिली आणि तो स्रष्टा झाला. पण तेवढ्यानें तो कृतकृत्य झाला नाही. सृष्टि निर्मून तिच्या विषयीं तो उदासीन झाला नाही. तर तींत तो मोद पावतो आहे. तिच्यांत तो रस घेत आहे. जीवांच्या सकल पुरुषार्थांची तो तरतूद करीत आहे कर्म आणि ज्ञान यांच्या योगें, आणि अशा प्रकारे तो या लोकांत, जीवलोकांत, मोद पावत आहे. बालक शंखशिंपले आणि रंगी बेरंगी कांचेचे तुकडे गोळा करण्यांत रमतो, पालक सोने-नाणे आणि हिरे माणकें गोळा करण्यांत रमतो. परंतु तत्क्षणीं दोहोंनाहि जर समानच संतोष होत आहे तर संग्राह्य वस्तुविशेषांचा विशेष तो काय राहिला ? 'निर्विशेषो विशेषः' असेंच म्हटले पाहिजे. जीवांच्याहि ज्या तुच्छातितुच्छ वा उच्चातिउच्च अभिलाषा आहेत त्यांच्यांत तरी विशेष काय आहे ? सर्व पुरुषार्थ या दृष्टीनें समानच आहेत. परमात्मा जीवरूपानें त्या सर्वांत समान रमत आहे, समान मोद पावत आहे. मुंगीला साखरेचा कण वेचतांना जो आनंद, तोच हत्तीला उसाची मोळी चघळतांना होतो. एका कीटकाला कीटकीशी रमतांना जो रस मिळतो तोच इंद्राला उर्वशीशी रमतांना आणि तोच योग्याला समाधींत. संतोष जर समान आहे तर अवांतर उच्चावच परिग्रहभेदाची किंबहुना भोगाची वा त्यागाचीहि किंमत सारखीच. या दृष्टीनें परम पुरुषार्थ नि अवर पुरुषार्थ वा सामान्य पुरुषार्थ हा भेद अकिंचित्कर आहे. जीव एकाच ठाई रमत नाही. त्याला बदल हवा असतो. चंचरीक या फुलावरून त्या फुलावर बागडत जातो. तसा जीव एका ठाई थारत नाही. त्याला मोक्ष मिळाला तरी तिथेहि तो फार वेळ रमत नाही. तो अवताराकडे वळतो आणि याचंच नांव कुमुद. 'कौ पृथिव्यां अवतारशतं गृह्णन् मोदते इति कुमुदः' म्हटलेंच आहे,
"परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्म-संस्थापनार्थाय, संभवामि युगे युगे ॥ " गीता ४ - ८

मुक्तांना आणि मुक्तेश्वराला वैकुंठांत काम काय ? वैकुंठांतहि आराम हरामच आहे. तिथे स्वस्थ बसून करमलें तर पाहिजे ? मग ते मुक्त आणि मुक्तेश्वर या पृथ्वीवर, या जीवलोकांत मोद करायला येतात. ते सगळी कर्में करतात, पण त्यांत फलहेतु नसतो. आणि अशा प्रकारे ते मोक्ष च धरेवर आणीत असतात.

५९०. कुवलेशय
कुं पृथिवीं वलति वेष्टते इति कुवलं जलम्, तस्मिन् जले अव्यक्तसंज्ञके शेते इति कुवलेशयः । कुवल म्हणजे पृथ्वीला वेढून असणारे पाणी. त्या अव्यक्त संज्ञक जलराशीत जो तळाला पहुडला आहे तो अव्यक्तमूल अक्षर परमात्मा कुवलेशय म्हणावयाचा. हे अनंत कोटि ब्रह्माण्ड, हा सगळा अपरंपार सृष्टीचा पसारा कोठून आला ? हे व्यक्त त्या अव्यक्तांतून आलें आहे. हे व्यक्त विश्व प्रकट आहे, सुज्ञात आहे. तें प्रत्यक्षादि लक्षणांनी मेय आहे, तर्कादींनी अनुमेय आहे. तें इन्द्रियगोचर आहे, तें सक्रिय आहे. परंतु अव्यक्त तद्‌विपरीत आहे. त्याचे वर्णन मनूनें असें केलें आहेः
असीत् इदं तमोभूतं अप्रज्ञातं अलक्षणम् ।
अप्रतयं अविज्ञेयं प्रसुप्तमिव सर्वतः ॥

अशा या अव्यक्तार्णवाच्या तळाशीं तें अक्षर विश्वबीज निलीन आहे. तिथून हा विश्वाचा प्ररोह प्रसृत झाला आहे. तोच कुवलेशय म्हणावयाचा.
परमात्म्याची, भगवान् विष्णुची, क्षीरसागरशायी तशी शेषशायी म्हणूनहि प्रसिद्धि आहे. जलाप्रमाणें हा शेषहि अव्यक्तस्वरूपच आहे. सर्व व्यक्ताकार मावळल्यानंतर जो शेष म्हणजे अवशेष राहतो तो अव्यक्तच म्हणावयाचा आणि त्याच्याच तल्पावर विश्वाधार परमात्मा पहुडलेला असतो. म्हणून कुवल म्हणजे शेष नाग. या अर्थी कुवल शब्द असा व्युत्पादिला जाईल.
"कु कुत्सितं वक्राकारं वलति सर्पति इति कुवलः सर्पः तस्मिन् शेते इति कुवले शयः"

कुः कुहकं अन्धकारः, तस्य वलं मण्डलं कुवलम् ।
तस्मिन् कुवले अन्धकार-मण्डले दिनात्यये शेते इति कुवलेशयः सूर्यः ।

सूर्य दिवसभर चालतो आणि सायंकाळी अस्तास जाऊन अंधकाराच्या वळ्यांत पडद्या आड जणूं आराम करतो, झोप घेतो म्हणून तो कुवलेशय होय. ध्रुव प्रदेशांत ४ । ४ महिन्यांची रात्र असते. त्या काळांत सूर्य त्या अंधारांत जणूं झोपून राहतो म्हणूनहि तो कुवलेशय. या अंधकारालाच वेदांत वृत्र म्हटले आहे आणि वृत्र हा एक साप आहे अशीहि कल्पना केली आहे. त्यामुळे त्याच्या वेटोळ्यांत अडकून राहिलेला सूर्य हा कुवलेशय म्हटला आहे. दीर्घकाल अज्ञानांधकारांत निश्चेष्ट पडून राहणारा जीव कुवलेशय म्हणावयाचा. तो सूर्यवत् निशात्ययीं अंधकाराला परास्त करून प्रकाशमान् व्हावयाचा आहे इतकेंच.

५९१. गोहित
गोभ्यःहितः गोहितः । गोजातीला हितकर तो गोहित म्हणावयाचा. "गोहितो गोपतिर् गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः" हा श्लोकार्ध गोमहिमा गाणारा आहे. गोसेवा हा हिंदु धर्माचा, आर्य धर्माचा, वैदिक धर्माचा वर्णाश्रम धर्माचा एक अनन्यसाधारण विशेष आहे. जैन बौद्ध ख्रिस्ती महंमदी शिंतो ताओ कन्फ्यूशस इत्यादि कोणत्याहि धर्मात तुम्हांला हा विशेष आढळावयाचा नाहीं. गोजातींत काय विशेष आहे की तिची सेवा हा धर्माचा एक महत्त्वाचा घटक व्हावा ? वैदिक धर्मातील इंद्राचा मख बंद करून गोपालकृष्णानें गोवर्धनाची पूजा सुरू केली. इतकें गोसेवेला महत्त्व कशानें प्राप्त झाले ? राजे गोब्राह्मणप्रतिपालक असे बिरुद मिरविण्यांत भूषण मानू लागले तें कां ? प्रार्थनेंतहि "गो-ब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यम्" अशी गोहितकामना केली जाते ती का ? मानवजीवनाच्या साफल्यांत गोसेवेचा तसाच काहीं तरी महत्त्वाचा वाटा असला पाहिजे हे उघड आहे. आयुष्य बल आणि बुद्धि या सर्वांची वाढ गोरसावर अवलंबून आहे. गोरसामुळे हिंसारूप मांसाहारांतून मानव मुक्त होऊं शकतो. भारतीय कृषीची उत्पादक शक्ति गोजातीवर अवलंबून आहे. मशागत आणि खत पाणी तिच्या पासूनच मिळतें. मानवाच्या प्रेमाचा विकास मानवेतरापर्यंत होण्यांत मानवाचा संतोष भरला आहे. इत्यादि अनेक महनीय कारणांस्तव गोसेवा म्हणजे मानव-सेवा, सर्व-सेवा होऊन बसली आहे. आणि म्हणून मानवाचा परमात्मा गोहित झाला आहे. गोहित म्हणजे गोवंशाचा हितकर्ता. गोसेवेचें इतकें महात्म्य आहे की गवाश लोकहि गोसेवेकडे वळले आहेत आणि गोरसावांचून दुसरें दूध त्यांच्या देशांत नाहींच. मुळाला पाणी घातलें म्हणजे ते जसें सर्व झाडाला पोंचतें त्याप्रमाणें गोसेवा केली म्हणजे ती विश्व-सेवा होते. म्हणून परमात्मा हा गोहित म्हटला.

५९२. गोपति
जो विश्वपति आहे तो परमात्मा गोपतिहि आहे हे सांगायला नको. तथापि ब्राह्मणपरिव्राजकन्यायानें इथे तो गोपति म्हटला आहे. गोपालनानें विश्वपालन होतें. झाडाला पाणी घालायचे म्हणजे जसे आपण तें मुळाला घालतो तसें गोपालनानें विश्वपालन होते. म्हणून तो परमात्मा विशेषेकरून गोपति म्हटला आहे. गोरस भूलोकींचे अमृत आहे. अमृत हे जसें संजीवन आहे तसें दूध संजीवन आहे. तें औषध आहे. सर्व ओषधींचा रस त्यांत आहे. गाई रानावनांत नाना ओषधिवनस्पतींचा तृणलतांचा सरस कोमल अग्राग्रभाग चरतात आणि त्यांचे सारच असें दूध आपल्या आपत्यां बरोबर आम्हांला देतात. त्यांचा हा केवढा उपकार ! सर्व धातुमय भूमीचा रस आणि कस वनस्पतींत येतो. त्या वनस्पतींचाहि रस आणि कस दुधांत उतरतो. त्यामुळे दूध म्हणजे साराचेंहि सार होय, त्याहून अधिक पोषकहितकर दुसरें नाही. मध काही अंशी त्याच्या सारखें म्हणता येईल. पण त्यांत मांस आणि मेद वाढविणारी ओजोद्रव्ये आणि तेजोद्रव्यें (प्रोटीनस्, फॅट्स्) मुळीच नाहीत. पण मधुरस आणि क्षार तेवढे आहेत आणि ते फार मोलाचे आहेत. दोहों मिळून पूर्ण अन्न होतें. मांसाहाररूप हिंसेंतून सुटायचे तर मांसाहारांतील तत्त्वे मिळवून देणारे आणि अहिंसक असें साधन हवें, तेंच गोपालन होय, गोरसांतून प्राणिज प्रोटीन फॅट पुरेसें मिळतें. तेंच पूरक नि तारक खाद्यान्न होय. निव्वळ धान्य फलाहारानें पूर्ण आरोग्य-साधन होऊं शकत नाही. म्हणून परमात्मा गोपति म्हटला आहे तें ठीकच आहे. गो म्हणजे बुद्धि वाणी किरण इत्यादि अर्थ घेऊनहि गोपति शब्द व्युत्पादिला जाईल. पण ते सर्व लाक्षणिक आहेत. वाच्य अर्थ तर गो म्हणजे गाय बैलच होय.

५९३. गोप्ता
गोप्ता म्हणजे रक्षक, पालक. कुणाचा रक्षक ? व्यक्तींचा ? नाही. तो धर्मरक्षक आहे. भारतीय धर्मयुद्धांत अठरा अक्षौहिणी वीर, निवडक जवान, कामास आले. त्यांचे रक्षण त्यानें केले नाही. उलट त्याचा नाशच त्यानें केला असे म्हटले जाईल. पण त्याची पर्वा त्यानें केली नाही. त्यानें धर्मरक्षण केलें. न्याय-रक्षण केलें. असत्य अन्याय दंडेली चालू दिली. नाही. "सत्यमेव जयते' हे सिद्ध केलें, हेच धर्मरक्षण. हेच तो करतो म्हणून तो गोप्ता म्हटला आहे. तो धर्माचा, धर्ममर्यादचा रक्षक आहे. प्राण आणि धन यांचा रक्षक नाही. ह्या वस्तु सर्व नश्वर आहेत. अनश्वर एक धर्मच आहे. आणि तोच एक रक्षणीय आहे. म्हणून गीतेनें त्याला नुसते गोप्ता न म्हणतां धर्मगोप्ता म्हटले आहे. त्या धर्माचे प्रतिनिधि वा प्रतीक म्हणजे गो आणि ब्राह्मण होत, गो अभ्युदयाचे प्रतीक तर ब्राह्मण निःश्रेयसाचे प्रतीक; अभ्युदय निःश्रेयस दोहों मिळून धर्म पूर्ण होतो. म्हणून त्या धर्म-गोप्त्याचे प्रतिनिधि राजे गोब्राह्मण-प्रतिपालक असें बिरुद मिरवतात. त्याचे तात्पर्य अर्थात् धर्म-गोप्ता हेच आहे. परमात्मा धर्म-गोप्ता नसेल तर धर्माचरण कोण करील ? नीतीचा धर्माचा अन्तिम आधार आस्तिक्य आहे. जे नास्तिक आहेत त्यांची नीति, त्यांचा धर्म अत्यन्त विषम परिस्थितीत टिकणार नाही. सर्वसाक्षी परम न्यायी सर्वशक्तिमान् फलदाता परमेश्वर बसला आहे अशी दृढ श्रद्धा असेल तरच धर्माचरण व्हायचे. अशा श्रद्धेच्या अभावी "यावत् जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् । भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ॥ असे अभद्र विचारच सुचायचे आणि असली नास्तिकताच सर्व पापाचे मूळ आहे. म्हणून परमात्मा हा गोप्ता म्हणजे धर्मगोप्ता म्हटला आहे.

५९४. वृषभाक्ष
वृषभस्य अक्षिणी इव अक्षिणी यस्य सः वृषभाक्षः | ज्याचे डोळे बैलाच्या डोळ्यांसारखे मोठाले आणि कृष्णाजन सुरेख आहेत तो वृषभाक्ष म्हणावयाचा. सुंदर डोळयांना सामान्यतः मत्स्याची, हरिणाच्या वा खंजपक्षाच्या डोळ्यांची उपमा देतात. अथवा कमलदलाची देतात. परंतु बैलाच्या डोळ्यांची उपमा क्वचितच आढळेल. इथेहि गाईंच्या डोळ्यांची नव्हे तर बैलांच्या डोळ्यांची उपमा दिली आहे हे विशेषतः अवधेय आहे. गाईच्या डोळ्यांपेक्षा बैलांचे डोळे अधिक पाणीदार आणि आकर्षक असतात. (आकर्ण) विशालता, कमनीयाकृति, तेजस्विता हे डोळ्याचे मुख्य सौंदर्य गुण होत. प्रसन्नता, गंभीरता वा चंचलता, धीरता वा लज्जालुता इत्यादि भाव त्याची वृद्धि करतात. बारीक रेखीव कमानदार काळ्याभोर भुवया आणि लांब कृष्णस्निग्ध पापण्या हीहि डोळयांच्या सौंदर्याची महत्वाची अंगें होत. अशा डोळयांनी युक्त पुरुषाला म्हणजे व्यक्तीला देखणा देखणी म्हटले जाते. म्हणजे सौंदर्याचे डोळा हे मुख्य उपादान होय. एखादा मनुष्य कितीहि सुंदर असला आणि तो जर का आंधळा असला तर त्याच्या सौंदर्याची अति हानि होते, बरबादी होते. असा अंध म्हणजे अदेखणा केवळ सौंदर्यराज्यालाच नहे तर प्रत्यक्ष राज्यालाहि अपात्र ठरतो धृतराष्ट्राप्रमाणें. परमात्म्याला वृषभाक्ष म्हणण्यांत केवळ त्याच्या डोळ्याची सर्वदर्शित्वरूप विशालता, मनोज्ञतारूप अन्तर्दर्शिता, ज्ञानदृष्टिरूप तेजस्विता इत्यादि महद्गुणच सूचित करायचे नाहीत, तर वृषभ आणि अक्ष या शब्दांमुळे त्याची धर्मदृष्टि विशेषतः व्यक्त करावयाची आहे. धर्म हा चतुष्पाद वृष वा वृषभ म्हणून कल्पिला गेला आहे. सत्य, दम, दया आणि दान हे त्याचे चार पाद होत. या चार गुणांशांनी मिळून धर्म संपूर्ण होतो. अक्षि शब्द उघडच दृष्टिवाचक आहे. सारांश परमात्मा हा धर्मदृष्टि आहे हे सूचित करण्यासाठी त्याला वृषभाक्ष म्हटले आहे.

५९५. वृषप्रिय
वृषः प्रियः यस्य सः वृषप्रियः । ज्याला वृष प्रिय आहे तो वृषप्रिय वा प्रिय वृष म्हणावयाचा. धर्म चतुष्पाद कल्पिला असल्यामुळे वृष म्हणजे धर्म असा अर्थ होतो. शिवाय धर्मच सर्व सुखाची वृष्टि करतो म्हणूनहि तो वृष म्हटला आहे. वृषभ खतामुताची व दूध दुभत्याची वृष्टि करून सुखाची सृष्टि करतो त्या प्रमाणें सत्य संयम दया दान रूप चतुष्पाद धर्म चारी पुरुषार्थांची सृष्टि करतो म्हणून तो वृष होय.
जगांत आत्मद्रोही कोणीच असू शकत नाही. भ्रमामुळे आत्मद्रोहाचे कृत्य माणसाकडून होऊं शकते. पण म्हणून तो आत्मद्रोही नाही म्हटला जाणार. भ्रान्त म्हटला जाईल. स्वभावतःच सर्व जण सुखकाम असल्यामुळे आणि सुखाचाच हेतु धर्म असल्यामुळे सर्व जीव वृषप्रियच होत, धर्मप्रियच होत. म्हणून सर्वात्मा परमात्मा हा वृषप्रिय म्हटला आहे.
सत्य म्हणजे सत्यज्ञान हा धर्माचा पहिला पाद होय. सर्व कार्याकार्य-निर्णय ज्ञानाधीन आहे. म्हणून तो पहिला. ते सत्यज्ञान ज्या योगें आटोक्यांत येतें तो संयम हा दुसरा पाद म्हणावयाचा. त्या सत्यज्ञानाची व तत्साधनभूत संयमाची ओळखण ज्या गुणावरून मिळावयाची तो दयाभाव हा तिसरा पाद होय. पण सत्य ज्ञानाची व संयमाची बैठक असल्याची खूण दयाभाव हा भाववाचक गुण झाला. त्याचे प्रत्यक्ष अनुभवास येणारे कार्य त्याचा विनियोग म्हणजे दान होय. तो चौथा पाद म्हणावयाचा. या चारांपैकी एकहि अधू वा उणा असला तर सांग संपूर्ण धर्म होत नाहीं आणि अर्थातच जीवितसाफल्य साधत नाही. असा हा जीवितसाफल्य-हेतु, सर्वसुख-हेतु चतुष्पाद धर्म म्हणजे वृष ज्याला प्रिय नाही असा करंटा कोण आहे ? म्हणून तो सर्वात्मा परमात्मा वृषप्रिय म्हटला आहे.


अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः ।
श्रीवत्सवक्षाः श्रीवासः श्रीपतिः श्रीमतां वरः ॥६४॥


५९६. अनिवर्ती
निवर्तणे म्हणजे परत फिरणे, पाठ दाखविणे अर्थात् अनिवर्ती म्हणजे माघारा न फिरणारा, रणांत अभिमुख मरणारा, निर्भय जिवावर उदार होऊन लढणारा परम वीर पुरुष, परमात्मा हा असा परम वीर आहे. त्याला परत फिरणे ठाऊक नाही. तो कार्याकार्यनिर्णय करून जें कार्य तेंच करतो. आणि एकदा हाती घेतलें कीं तें तडीस नेल्याखेरीज सोडत नाही. पण या जगांत परमात्म्याला काय कार्य आहे ? जो पूर्णकाम त्याला कार्य कसले ? जिथे काम तिथे कर्म, तिथे कर्मफल-वासना. पण परमात्म्याच्या ठाईं या दैन्याचा पूर्ण अभाव असल्यामुळे त्याला मुळी काम कर्म नि वासना यांचा संपर्कच नाही. तो अकर्ता आहे, अभोक्ता आहे, आणि या आपल्या स्वभावापासून तो केव्हांहि मागे पाय घेत नाहीं, माघारा फिरत नाहीं. म्हटलेंच आहेः
आत्मा कत्रादिरूपश्चेत् मा काङ्क्षीस्तर्हि मुक्तताम् ।
नहि स्वभावो भावानां व्यावर्तेत् औष्ण्यवद् रवेः ॥

आत्मा हा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव असल्यामुळे तो कर्तृत्व भोक्तृत्वादि धर्मापासून नित्य निवृत्त आहे, पण आपल्या अकर्तृत्वादि स्वभावाबाबत अनिवर्ती आहे. आणि त्याच मुळे मुक्तीची आशा मनुष्य करू शकतो आणि इतर सर्व आशा त्याच्या व्यर्थच होत. पण मग याचा अर्थ मानवाला काही कर्तव्यच नाही असा होईल ? होय, कर्तव्यबुद्धि सोडणे एवढेच त्याचे कर्तव्य आहे आणि तेंच पुढील पद सांगत आहे. निवृत्तात्मा. निवृत्ति, सर्वकर्मसंन्यास हेच त्याचे कर्तव्य, कर्म, योग, भक्ति आणि ज्ञान या सर्व योगांचें हेच तात्पर्य आहे. जीव संसारांत येतो म्हणून परत जातो, निवर्ततो. परंतु जो जन्मतच नाहीं त्या अज परमात्म्याला निवर्तणे संभवत नाही. म्हणून तो अनिवर्ती.

५९७. निवृत्तात्मा
निवृत्तात्मा म्हणजे निवृत्तस्वरूप, शान्त. परमात्मा सर्व प्रवृत्तींपासून निवृत्त आहे. तो संकल्पवृत्ति आणि प्रवृत्ति म्हणजे क्रिया यांच्यापासून मुक्त आहे. मनुष्य जेव्हा एखादी क्रिया करतो तेव्हां आधी त्याच्या मनांत रागद्वेषरूप तरंग उठतात. हीच वृत्ति मनांत उंचबळली म्हणजे मग मनुष्य स्वस्थ बसू शकत नाही. तो तदनुसार हालचाल करू लागतो. हीच प्रवृत्ति परंतु अविद्या-जनित म्हणजे मी अपूर्ण आहे, मला काही मिळवायचे आहे, अशा कल्पनेतून उत्पन्न कामच जिथे संभवत नाही तिथे रागद्वेष कुठून उठणार ? आणि जिथें वृत्तिच नाही तिथे प्रवृत्ति कशी होणार ? म्हणून चिन्मात्रमूर्ति पूर्णकाम परमात्मा हा नित्य निवृत्तात्मा आहे. नित्य शुद्ध बुद्ध मुक्तस्वभाव असें आत्मतत्त्व स्वयंसिद्ध असल्यावर क्रियाकर्माला मुळी वावच कुठे आहे ? वाव फक्त त्या क्रियाकर्माच्या 'क्रियाकर्माला' च आहे. आत्मतत्त्व आणि त्याचा स्वभाव मुक्ति आप्य नाही, कार्य नाही. संस्कार्य नाही. त्यामुळे त्याच्या प्राप्तीसाठी कांहीं कर्तव्य असू शकत नाही. तें नैष्कर्म्यरूप आहे. त्याच्या प्राप्तीसाठी कार्य हा वदतो व्याघात झाला. श्रुति "आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यो मन्तव्यो निदिध्यासितव्यः असें म्हणते. 'कर्तव्यः' म्हणत नाही. कोणी म्हणेल अहो पाहणे ऐकणे चिन्तणें ध्यास घेणे हीहि कर्मेंच ! पण ही निवृत्त कर्में आहेत. ज्ञाननिष्ठायोग्यता बाणेपर्यंत त्यांचे प्रयोजन. त्यानंतर तीहि नको. वाक्यविचार प्रतीति झाल्यानंतर संपतो. उरते केवळ आत्मप्रतीति. आणि ती आहे केवळ शमस्वरूप. म्हणून परमात्मा हा निवृत्तात्मा म्हटला आहे.

५९८. संक्षेप्ता
कल्पारंभी परमात्मा हा विश्वपट उलगडून पसरतो. तेव्हां ही सर्वतोऽनन्तरूप सर्वाश्चर्यमय विचित्र सृष्टि प्रकट होते. देशतः कालतः त्या विश्वरूपाचा कुठे अन्तच लागत नाही. अगणित अमित अप्रमेय अचिन्त्य असें हें विस्तृत आणि प्रतिक्षण विस्तारशील विश्व आहे. पण ह्या विश्वपटाची तो परमात्मा कल्पान्ती घडी घालतो. तेव्हां हा समस्त विचित्र व्यक्ताकार एका एकरूप अव्यक्तांत समाविष्ट होतो. ही संक्षेप-प्रक्रिया भागवतांत अशी वर्णिली आहेः
ठपता लय धातूंचा काल आदि न अंत ज्या ।
अव्यक्ती करितो लीन व्यक्ता द्रव्यगुणात्मका ॥
होय घोर अनावृष्टि भूलोकीं शतवार्षिकी ।
तेव्हां तो सूर्य अत्युग्र जाळी हे लोक तीनहि||
पाताळांतूनि शेषाचा मुखानल उफाळला !
वातें भडकला जाय सर्वतोदिश जाळित ॥
प्रलयंकर मेघांची वर्षा मुसळधार ती ।
चाले अखंड शें वर्षे बुडे तेथ विराट् जळीं ॥
तेव्हां पुरुष वैराज देह टाकूनिया विराट् ।
विलीन होय अव्यक्ती जसा अग्नि निरिंधन||
हरूनि गंध घे वायु तेव्हां भूमि विरे जळीं |
जळ तें मिसळे तेजी वायूनें हरतां रस ॥
तमानें हरतां रूप तेज वायूंत तें मिळे ।
अवकाशें हृतस्पर्श वायु पावे नभी लय ॥
कालात्में हरता शब्द अहंकारी शिरे नभ ।
इंद्रियें बुद्धि तेथेंचि मन वैकारिकांसह ॥
गुणांसह अहंकार महत् तत्त्वांत तो शिरे ।
होय लीन महत्तत्त्व ईशमायेंत शेवटीं ॥

ही विश्वसंक्षेपरूप ईशमाया म्हणजे परमात्म्याची अंगभूत अव्यक्त प्रकृति होय. ज्या क्रमानें सृष्टि अव्यक्तांतून प्रसृत होते त्याच्या उलट क्रमानें ती अव्यक्तांत निलीन व विलीन होऊन संक्षेप पावते. हे ज्याच्या शक्तीनें होते तो परमात्मा संक्षेप्ता म्हणावयाचा. विश्लेषण आणि संश्लेषण अथवा व्यूहन आणि समूहन मिळून ज्ञानाची पूर्णता होत असते. परमात्म्याचा सृष्टिकल्पहि तसाच व्यूह आणि समूह मिळून झाला आहे. स्रष्टा व्यूहन करतो, संक्षेप्ता सृष्टीचे समूहन करतो. हा संपूर्ण सृष्टिकल्प ज्यानें ओळखून घेतला तो मग त्यांत सांपडत नाही. तो मुक्त होतो.

५९९. क्षेमकृत्
क्षेम म्हणजे निर्भय स्थान, सुरक्षित आश्रय,शरण. रक्षणासाठी माणसें घराचा, किल्ल्याचा, रानावनाचा वा डोंगरद-यांचा आश्रय घेतात. परंतु हा आश्रय माणसांना अविद्येपासून कुबुद्धीपासून कुवासनेपासून सोडवू शकत नाही.जन्म मृत्यु जराव्याधि दुःखदोषांपासून सोडवू शकत नाही. मग असल्या शरणांची मातब्बरी ती काय ? ही शरणे म्हणजे आश्रय-स्थानें सुरक्षित नाहींत. म्हणजे ती क्षेम नाहीत.
घेती आश्रय रानांचा पर्वतांचाहि पुष्कळ ।
उद्यान-वृक्ष चैत्यांचा भयसंत्रस्त मानव||
न हा आश्रय कल्याण न हा आथय उत्तम|
न हा आश्रय पावूनि दुःखांतूनि सुटे नर ॥
गेला शरण बुद्धास धर्मा संघास जो तसा ।
सम्यक् प्रलाबलें देखे आर्यसत्यें चतुर्विध ॥
दुःख दुःख-समुत्पत्ति दुःखांचा समतिक्रम ।
दुःखोपशमगामी तो आर्य अष्टांग मार्गहि ।
हाचि आश्रय कल्याण हाचि आश्रय उत्तम|
हाचि आश्रय पावूनि दुःखांतूनि सुटे नर ॥
सुख उत्पत्ति बुद्धांची सुख धर्मोपदेश तो ।
सुख संहति संघाची तपस्या सुख सांघिक ॥

वरील धर्म वचनांत म्हटले आहे की सद्गुरु, सद्गुरूपदिष्ट धर्म-संप्रदाय आणि त्या सद्गुरूचे व गुरूपदिष्ट संप्रदायाचे भक्तगण हाच क्षेम असा आश्रय आहे. या शरणांत आश्रय घेणारेच भवभयांतून मुक्त होतात. हे त्रिशरण कोण निर्माण करतो ? तो परमात्माच हे क्षेम, हे रक्षण, निर्मितो. कारण तोच "गुरूणां गुरुः" आहे. तोच शास्त्रयोनि आहे, तोच भक्तसंघाचा संघटक आहे. म्हणून तो सर्वादि च क्षेमकृत् म्हणावयाचा. आत्मज्ञानरूप क्षेम परमात्म्यानें सर्व जीवांच्या परम कल्याणासाठी कायमचे करून ठेवले आहे. गुरुरूपानें तोच त्याचा उपदेश देतो. तोच शास्त्ररूपानें धर्म-मार्ग होतो आणि तोच भक्तसंघरूपानें त्याचे अनुसरण करीत त्याचा परस्परांना बोध देत आणि त्याचे कीर्तन करीत मोद पावत आणि रमत असतो. (पहा गीता १०, ८-११).

६००. शिव
"संक्षेप्ता क्षेमकृत् शिवः' हा चरण एक-सूत्र आहे. विश्वाचा संक्षेप म्हणजे संहार करून क्षेम म्हणजे संपादित संरक्षण करणारा तो परमात्मा आत्मवान् शिव म्हणजे परमपवित्र आहे, सर्व अज्ञानरूप अशिवांपासून मुक्त केवल मंगलस्वरूप आहे..आनंदस्वरूप आहे. संक्षेप्ता व क्षेमकृत् हीं पदें जणूं व्यावृत्तीनें व वस्तु-विधानानें शिवाची व्याख्याच करीत आहेत. संक्षेप्ता म्हणजे प्रपंचोपशम करणारा आणि क्षेमकृत् म्हणजे आत्मनिष्ठ असें जें तत्त्व तें म्हणावयाचें शिव. "प्रपंचोपशमं शान्तं शिवं अद्वैतं चतुर्थ मन्यन्ते' या वचनांत या शिवाला तुरीय म्हटले आहे. महिम्न त्याचाच महिमा असा गातेंः
बहल-रजसे विश्वोत्पतौ भवाय नमोनमः
प्रबल-तमसे तत्-संहारे हराय नमोनमः ।
जन-सुखकृते सत्त्वोद्रिक्तौ मृडाय नमोनमः
प्रमहसि पदे निस्वैगुण्ये शिवाय नमोनमः ॥

भव मृड हर ही अर्वाचीन पदें होत. शिव हे सर्वोत्कृष्ट सर्वातीत परात्पर पद आहे. तें चरम आणि परम पद आहे.
सत्त्वोदय, सत्त्वोत्कर्ष, सत्त्वोद्रेक म्हणजे दया क्षमा शान्ति हा वैष्णवांचा सगुण संप्रदाय, वैराग्य वाक्यविचार संन्यास हा शैवांचा निर्गुण संप्रदाय हे दोन्ही योग-संन्यास मार्ग मुक्कामाला एक होतात. तीच हरिहर भेट, शैव त्या पदाला शिवरूप पाहून 'नमः शिवाय' हा पंचाक्षरी मंत्र जपतात, वैष्णव त्या पदाला भगवद्प पाहून "नमो भगवते वासुदेवाय" असा एकादशाक्षरी मंत्र जपतात, इतकेंच. वैष्णवांचा संक्षिप्त मंत्र "राम" आहे तर शैवांचा "शिव आहे. दोहोंचे तात्पर्य अभिन्न आहे हे ओळखणारे म्हणून शिवराम नाम धारण करीत असतात. आवडीप्रमाणें हवें तें नाम घ्यावें. वैदिक आरंभी ॐ जोडून देतात.

शतक सातवें

६०१. श्रीवत्स-वक्षा
श्रीवत्स नामक चिह्न ज्याच्या वक्षःस्थळी आहे तो श्रीवत्सवक्षा म्हणावयाचा. माणसाच्या काय पण सर्वच प्राण्यांच्या शरीरावर निरनिराळी चिह्ने जन्मतःच असतात. काळे पांढरे लहान मोठे नाना आकृतीचे तीळ आणि डाग असतात. असले डाग वा लांछनें ही जन्मखूण म्हणून ओळखली जाते. ती कोणाला बदलता येत नाही. भगवान् विष्णूच्या छातीवरील असलीच जी खूण तिचे नांव श्रीवत्स. म्हणून तो श्रीवत्सवक्षा म्हटला आहे. लांछन म्हणजे चिह्न असण्यांत काही विशेष नाहीं. पण प्रिय व्यक्तीचे सारेंच कौतुकास्पद वाटते त्यामुळे त्याच्या गुणांचे तसें दोषांचे सर्वांचेच कौतुक होत असते. हा सारा प्रेमाचा पागलपणा आहे. आपल्या प्रेमानें न्हाऊ घालून आणि लेववून ज्याच्या कडे पाहूं तो सुंदरच वाटायचा. म्हणजे सौंदर्य हे वस्तुनिष्ठ न राहतां आत्मनिष्ठ झालें. समोरची वस्तु कशीहि असली तरी जशी ती मी पाहीन तशी ती मला दिसेल. अर्थात् "आत्मनस्तु कामाय सर्व प्रियं भवति". म्हणजे परम प्रेमास्पद आत्मा आहे आणि तो ज्याला जेव्हां जितकें चाहील तितका तेव्हां तो गोड वाटेल. चंद्र आम्हांला प्रिय आहे म्हणजे आत्मीय आहे त्यामुळे त्याचा डागहि आम्हांला गोडच वाटतो. आणि आम्ही त्याला मोठ्या प्रेमानें शशलाञ्छन म्हणतों. खरोखर लाञ्छन केव्हांहि वाईटच, पण ते देखील कौतुकास्पद झालें आत्मीयतेमुळे परमात्मा हा साक्षात् सर्वान्तरयामी सर्वात्मा त्यामुळे तो नि त्याचे अवतारादि सारे आम्हांला गोड झाल्यास नवल काय ? "मधुराधिपतेर्अखिलं मधुरम् ! " परम पुरुषाची आदिशक्ति म्हणजे श्री. तिचें वत्स म्हणजे हे विश्व. तें विश्व ज्याच्या वक्षःस्थळी विराजमान आहे तो धीवत्सवक्षा म्हणावयाचा. खरोखर हे विश्वच परमात्म्याचे लाञ्छन म्हणजे खूण वा गमक होय. आणि म्हणूनच तो श्रीवत्सलाञ्छन म्हणावयाचा.

६०२. श्रीवास
श्रीवत्सवक्षा पासून श्रीमान् पर्यंत श्रीचा पाढा आला आहे. श्रीपूर्व जितकीं पदें आठवली तितकी एका सूत्रांत इथे ग्रथित झाली आहेत. श्रीवास आणि श्रीनिवास असली केवळ एका उपसगनिंच भिन्न असलेलीहि पदें आलीं आहेत, तर ज्याचा श्रीशी नाममात्रच संबंध आहे असें श्रेय सारखेंहि पद येऊन गेले आहे. शब्द म्हणजे ध्वनि आणि अर्थ म्हणजे अभिप्राय ह्या दोन वाणीच्या चाकोऱ्या आहेत. या चाकोन्यांनी वाणीचा संचार होत असतो. केव्हां ती शब्दाच्या चाकोरीकडे कलते, केव्हां अर्थाच्या केव्हां दोन्ही वर समान चालते. इथे ती नादलुब्ध झाली आहे, शब्दाकडे झुकली आहे, असे म्हणता येईल. सरस्वतीचे उपासक प्रायः अकिंचनच राहिले आहेत. त्यामुळे श्रीचे आकर्षण त्यांना स्वाभाविकच विशेष आहे. बिचारे सारखे श्री घोकीत असतात. सगळ्या गोष्टींचा आरंभ श्रीनें करतात. पत्र असो पोथी असो जमाखर्चाची चोपडी असो आरंभी श्रीची स्थापना होते. पण श्री त्यांना प्रसन्न होत नाहीं ती नाहींच, कारण त्यांच्यापाशी साहस नाही. आणि "साहसे श्रीः प्रतिवसति." जिथे साहस तिथे श्रीचा वास असतो, परमात्मा हा श्रीवास आहे अर्थात् तो साहसरूप आहे. जे निष्किय विचारच करीत बसतात त्यांच्या ठाई उद्यम कुठला ? आणि उद्यम नाहीं, उद्योग नाही त्यांना लक्ष्मी कुठून मिळणार ? "उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीः । दैवं बलीय इति कापुरुषा वदन्ति ॥ " उद्योगी आणि पराक्रमी पुरुषांना लक्ष्मी वरीत असते. आळशी आणि पराक्रमशून्य म्हणजेच साहसहीन कायरांना भ्याडांना लक्ष्मी वरीत नाहीं, ती कधी लाभत नाही. परमात्मा हा श्रीवास आहे म्हणजे तो साहसमूर्ति आहे, निरलस उद्योगी आणि संकटांवर मात करणारा पराक्रमी आहे, "अनारम्भोहि कार्याणां प्रथमं बुद्धिलक्षणम्" म्हणणारा नाकर्ता नामर्द नाही.

६०३. श्रीपति
जो श्रीचा वास म्हणजे आश्रय आहे तोच तिचा पति म्हणजे स्वामीहि असावयाचा. कार्य हे सदैव कारणाश्रित असते. पण कारण हे केहांहि कार्याधीन असत नाही. तें स्वतंत्र असते आणि म्हणूनच तें पति संज्ञेस पात्र होय. अलंकार सूवर्णाधित आहेत. ते सोन्याला वगळून राहू शकत नाहीत. परंतु सोनें अलंकाराधीन नाही. ते अलंकारावांचूनहि लगडीच्या रूपानें असू शकते आणि म्हणून कारण हे स्वाधीन असून तें कार्याचे स्वामित्व राखतें असें म्हटले जाईल. तद्नुसार सर्वकारण परमात्मा हाच श्रीपति म्हणजे सर्व श्रीचा, कार्यरूपानें फांकलेल्या ह्या संपत्तीचा स्वामी होय. गुण द्रव्याश्रित म्हटले जातात. पण द्रव्य आणि गुण यांत द्रव्य स्थूल आणि गुण सूक्ष्म म्हटले जातील. आणि कार्य स्थूल, कारण सूक्ष्म असते. या दृष्टीनें पाहतां द्रव्यच गुणाश्रित म्हटले पाहिजे. गुण तन्मात्रस्वरूप होत. पाणी स्थूल आहे. त्याचे कारण एच् टू ओ वायुरूप सूक्ष्म आहे. तो वायुच रसरूप आणि जलाचें तन्मात्र म्हणावयाचे. पण द्रव्याहून गुणरूप तन्मात्र सूक्ष्म म्हटले तरी ते व्यक्त च होय. त्याहून सूक्ष्म म्हणजे अव्यक्तच. आणि तेच या विश्वाचे कारण म्हटले जाईल. अशा प्रकारें मूल कारणाचा शोध घेतां घेतां विचारक त्या अव्यक्त अक्षराला जाऊन पोचतो. आणि तोच अक्षर पुरुष या समस्त विश्वधीचा पति आहे असे लक्षात येते. म्हणून त्याला श्रीपति म्हटले आहे. या श्रीपतीचाच दक्षिण भारतांत तिरुपति बनला आहे. श्रीचे द्रविड भाषेत तिरु असें रूप झाले आहे. त्या तिरुपतीचे मंदिर गिरीवर आहे. तें सूचित करते की तो जगावेगळा परात्पर कूटस्थ आहे. भक्तजन सर्वसंपत्ति त्याच्या चरणी अर्पण करतात. आणि आपण नव्हे तर परमात्मा श्री-पति आहे हे तथ्य व्यक्त करतात.

६०४. श्रीमतांवर
परमात्मा हा श्रीमतांवर म्हणजे श्रीमंतांतील श्रीमंत आहे. याचा अर्थ असा झाला की श्री बाळगणे, श्रीमंत होणे चांगले आहे. त्यांत गैर कांहीं नाहीं, इतकेच नव्हे तर ते प्रशस्त आहे. आणि ज्याअर्थी कोणाचेहि जीवन श्रीविना चालू शकत नाही त्याअर्थी ती संपादणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. पण मग "अर्थमनर्थं भावय नित्यं नास्ति ततः सुखलेशः सत्यम्" इत्यादि अर्थनिन्दा परमार्थाच्या, वेदान्ताच्या, ग्रंथांत केली आहे, हे कसे ? या तथाकथित वेदान्त ग्रंथांत आणि परमार्थग्रंथांत कनक आणि कांता यांची भरपूर निंदा केलेली आहे. तिचे तात्पर्य ह्या दोन विषयांसंबंधी जीवाच्या ठाईं असलेली अविवेकपूर्ण आसक्ति आणि अतिरेक दूर व्हावा इतकेंच आहे. लोक एका टोकाला जातात तेव्हां त्यांना रस्त्यावर आणण्यासाठी शास्त्र दुसऱ्या टोकाला खेंचतें. आणि त्यामुळे ते त्यांच्या विषयीं वैराग्यभावना जागृत होईल अशी आशा आणि अपेक्षा बाळगते. पण वैराग्यभावना मोहापगमाचा, सत्य ज्ञानाचा, परिणाम आहे. तो खोट्या स्तुतिनिन्दांनी कसा येणार ? या मुळेच पुराणादिकांतील असल्या स्तुतिनिंदा अकिंचित्कर झाल्या आहेत. अर्थ हा अर्थनीय आहे म्हणूनच अर्थ म्हटला आहे. तो अनर्थ कसा ? स्त्री ही दयिता आहे. ती स्त्री जीवघेणी म्हणण्यांत काय अर्थ ? असें अवास्तव बोलणेच वस्तुतः अनर्थ होय. जो अर्थ सद्गुणांचा परिणाम आणि सत्कार्याचा कारक आहे तो श्री होय. अशी श्री संपादून श्रीमंत होणे स्पृहणीय आहे, कर्तव्य आहे. परोपजीवी होऊन म्हणजे परद्रोह करून पिंड पोसणे म्हणजे पापच पोसणे होय. आणि श्रीमंत तर पुण्यशील पुण्यात्मा असतो. गीतेंत म्हणूनच भगवान् म्हणतात "शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते' जिथे दैवी संपद् आहे आणि भौतिक अनुकूलता आहे अशा पवित्र श्रीमंताच्या घरी अपूर्ण योगसाधनेचा योगी जन्म पावतो.


श्रीदः श्रीशः श्रीनिवासः श्रीनिधिः श्रीविभावनः ।
श्रीधरः श्रीकरः श्रेयः श्रीमाँल्लोकत्रयाश्रयः ॥६५॥


६०५. श्रीद
श्री-द म्हणजे श्री देणारा. उघडच आहे की जो श्रीमंत असेल तोच श्रीद होईल. म्हणूनच 'श्रीमतांवर पदापाठोपाठ 'श्रीद पद आले आहे. त्याच बरोबर तें असेंहि सूचित करीत आहे की श्रीमतांवर कोण, तर जो श्रीद असेल तो. कंजूष माणसाला कृपण म्हणतात. "तो धनवान् भलें असो पण तो श्रीमान् नव्हें त्याच्या ठाई कार्पण्य आहे, दीनता आहे. श्रीमान् हा उदारच असावयाचा. त्याच्या ठाईं कृपणतारूप कद्रूपता, श्रीहीन करंटपणा नाहीं, अदातृत्व नाहीं. त्याच्या ठाईं आपण जें देतो त्याचे फळ, त्याचा मोबदला मिळावा अशीहि वासना नाही. निःसंकोच निरपेक्ष दातव्य म्हणून तो देत असतो. तोच श्रीद म्हणावयाचा. अर्थात् त्याची श्रीमंती ही त्याच्या हृदयाची उदारता होय. ती त्याच्या द्रव्यसंपत्तीवर अवलंबून नाही. सर्वांतर्यामी परमात्मा जो प्रसन्न होतो तो ह्या हृदयाच्या उदारतेवरच होय.हिचेंच नांव हृदयशुद्धि,हिचेंच नांव आत्मशुद्धि.हिलाच प्रयतात्मता म्हटले आहे.
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्तः प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥ गीता ९ - २६

अर्थात् श्रीदतेंत श्रीमत्ता हवी, दातृत्व हवें, फलनिरपेक्षता हवी. हे तिन्ही गुण जिथे एकवटले आहेत तोच श्रीद म्हणावयाचा. परमात्मा हा असा श्रीद आहे आणि आम्हांला तो अनुकरणीय आहे. लोकांना तुमच्या धनाची मातब्बरी नाहीं, तुमच्या हृदयाच्या उदारतेची, तुमच्या निरपेक्ष प्रेमभावनेची मातब्बरी वाटते. ती निरपेक्ष प्रेमभावना ज्याच्यांतून ओसंडत आहे खरोखर तोच श्रीद म्हणावयाचा. ज्याला ज्याचे महत्त्व वाटते त्याला तें श्री होय. आणि असली सारी श्री आत्मशक्तीनेच मिळत असते. म्हणून तो परमात्मा श्रीद म्हणावयाचा. या श्रींत मुक्ति नि भुक्ति दोन्हीहि येऊन जातात.

६०६. श्रीश
श्रीश म्हणजे श्रीचा ईश. श्रीश आणि श्रीपति यांत खरोखर काय फरक आहे ? जल-ज नीर-ज, वारि-ज यांत जेवढा फरक आहे तेवढाच इथेहि. केवळ शाब्दिक फरक आहे. जो पति तोच ईश आणि जो ईश तोच पति. पति शब्द भर्तृभार्यासंबंध सुचवितो तर ईश शब्द राजप्रजासंबंध सुचवितो असा श्लेष काढणे शक्य आहे. पति पदांत पालन तर ईश शब्दांत ईशन म्हणजे शासन सूचित होत आहे असे म्हणता येईल. परंतु ईशनालाच पालन व पालनालाच ईशन म्हणतात. त्यांत खरोखर कांहींच फरक नाही. राजा राज्य करतो म्हणजे प्रजापालन करतो. यालाच गीतेत क्षात्रकर्म सांगतांना ईश्वरभाव म्हटले आहे. "दानं ईश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम्" ईश्वरभाव म्हणजे ईशन, म्हणजे प्रजापालन. सारांश, जो श्लेष काढला तोहि उडून गेला. पति आणि ईश या दोन शब्दांत धातु भिन्न असले तरी त्यांचा अर्थ एकच आहे. त्यामुळे त्या बाजूनें दोन पदांची उपपत्ति नीट लागत नाही. आतां श्री पदाचा विचार करूं. श्रीपति पदांत श्री म्हणजे लक्ष्मी असा व्यक्तिवाचक अर्थ घेणे शक्य आहे. कारण समुद्रमंथनाच्या वेळी निघालेल्या लक्ष्मी नें सर्व सुरासुरांना सोडून विष्णुलाच वरले आहे. म्हणून तो श्रीवर श्रीपति म्हणावयाचा आणि विश्वांत ज्या कोणत्या श्री म्हणजे संपदा आहेत त्यांचा स्वामी तो श्रीश म्हणावयाचा.
पण जगांत श्री तरी किती आहेत ? जितके देह तितक्या श्री आहेत असें म्हणता येईल. त्या देहांनाच पुर उर्फ धानी अशी संज्ञा आहे. आणि त्यांचे ईशन करणारा जो आत्मराजा तोच श्रीश म्हणावयाचा. प्रत्यगात्मरूपानें परमात्मा हा सर्व पुरींचा ईश पुरीश वा पुरुष होय. तोच इथे श्रीश पदानें अभिप्रेत आहे. असें म्हणता येईल.
जडाला स्वतःचा काही उपयोग नाही त्यामुळे तें सदैव चेतनोपयोगी चेतनाधीनच रहायचे. म्हणून श्री म्हणजे ती जड प्रकृति आणि श्रीश म्हणजे तो प्रकृतिस्वामी परमात्मा होय.

६०७. श्रीनिवास
श्रीपति आणि श्रीश पदें दोन पण अर्थ एक. तशीच श्रीवास आणि श्रीनिवास ही नामें होत. दोहोंत खरोखर तसें कांहीं अंतर नाही. पण ज्या अर्थी दोन पदें आली आहेत त्याअर्थी त्यांच्यांत कांहीं फरक असलाच पाहिजे. शंकराचार्यांनी तसा तो सूचित केला आहे. श्रीवास म्हणजे श्रीचा वास, तर श्रीनिवास म्हणजे श्रीमंतांत वास असा अर्थ शंकराचार्य करतात. श्री पदानें श्रीमंत सूचित होतात असे त्यांनी म्हटले आहे. मला तर तो जगन्-निवास पदासारखाच बहुव्रीहि वाटतो. तथापि शंकराचार्यासारख्यांचा अर्थहि गोड आहे. तुलसीदासजींनीहि आपल्या रामायणांत रामानें निवास कुठे करावा हे सांगतांना बहार केली आहे. त्यांनी म्हटले आहे की भगवंताचा निवास दैवी संपदेच्या पुरुषांत असतो. अशांच्याच हृदयांत रामानें निवास करावा, असे ते म्हणतातः "जिनके कपट दंभ नहिं माया तिन्हके हृदय बसहु रघुराया" सत्य हे सद्गुणांत वास करीत असते. गुण हे कार्यरूप व्यक्त आहेत, सत्य हे कारणरूप अव्यक्त आहे. दोहोंचे साहचर्य नित्य आहे. पण कोण कोणाचा आधार आहे याबाबत भ्रम राहूं नये. "पात्राधारं घृतं घृताधारं वा पात्रम्" असा संशय नसावा. कार्यच कारणाश्रित असावयाचे, कारण केव्हांहि कार्याधार नव्हे-हा निर्णय आहे. म्हणून सर्वसद्गुण-संपत्तीचा आश्रय सद्‌रुप परमात्माच होय. म्हणूनच तो श्रीचा निवास म्हणावयाचा. सौरी प्रभा सूर्याची, कौमुदी कुमदबांधवाची, तशी श्री म्हणजे लक्ष्मी ही भगवंताची अंगभूत आहे, नित्य आश्रित आहे. तद्विपरीत नव्हे. या श्रीच्या पाढ्याचे हेच तात्पर्य आहे.

६०८. श्रीनिधि
तेजोनिधि म्हणजे जसा सूर्य, जलधि म्हणजे जसा समुद्र तसा श्रीनिधि म्हणजे परमात्मा होय. जलधींतून सर्वं जलें बाष्परूपानें अंतराळांत वर जातात. प्रावृड्पानें ती परत भूमीवर खाली येतात आणि प्रवाहित होऊन परत समुद्रांत निहित होतात. त्या प्रमाणें विश्वरूपानें प्रकटलेली आणि अनादि कालापासून प्रवाहित झालेली ही सृष्टिश्रीसरिता ज्या अचिन्त्यशक्ति परमात्म्यापासून निघून परत त्यांतच मिळून मिळतच आहे तो परमात्माच श्रीनिधि म्हणावयाचा. ही जडचेतन सर्व सृष्टि त्या चिन्मात्रमूर्ति परमात्म्यापासून निर्माण होऊन त्यांतच शेवटीं विलीन व्हावयाची आहे. म्हणून तो श्रीनिधि, संपत्ति स्थावर जंगम म्हणून दोन कोटींत विभागिली जाते. जड प्रकृति ती स्थावर संपत्ति आणि जीव ही जंगम संपत्ति होय. या द्विविध संपत्तीचा, श्रीचा, निधि तो परमात्माच आहे.
परमात्म्याचे हे श्रीनिधित्व प्रकट करण्यासाठी त्याच्या अंगोपांगी रत्नजडित सुवर्ण भूषणे लेवविली जातात. नखशिखान्त तो अलंकारांनी मढविला जातो. पण परमात्मा हा सहजसुंदर आहे. त्याला बाहेरच्या जड जवाहरांनी नटविण्याची गरज नाही. त्याची सृष्टिहि तशीच सहज सुंदर आहे. त्या सृष्टीचा अंशभूत मानव प्राणीहि तसाच सहजसुंदर आहे. पण हे मूढ जन ओळखत नाही आणि कृत्रिम शोभा करतो. पण त्यायोगे त्याची शोभा मात्र होते. उसनी ऐट, कृत्रिम भूषा आत्म्याच्या स्वाभाविक प्रतिष्ठेला दूषण आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. आणि दूषणालाच भूषण म्हणून तो मिरवतो.

६०९. श्रीविभावन
श्रीविभावन म्हणजे श्री-विविध-भावन, नानाविध आविर्भाव करणारा, परमात्म्यानें ही स्थावर जंगम सृष्टिरूप विविध शोभा निर्माण केली आहे. त्यानें नाना जीव, नाना कर्में आणि नाना कर्मफलें निर्मिलीं आहेत. अनेक पुण्यलोक आणि अनेक पापलोक त्यानें निर्मिले आहेत. सात्त्विक राजस तामस प्रकृतींच्या असंख्य जीवयोनि या विश्वांत नांदत आहेत. पुराणकारांनी त्यांची संख्या ८४ लक्ष दिली आहे. अगणित वा असंख्येय योनींचे गणन वा संख्यान कसे केलें त्यांनी ? प्रथम त्यांनी सर्व त्रिगुणात्मक म्हणून तीन ही संख्या घेतली. प्रत्येक गुणाच्या योनि शुद्ध आणि मिश्र अशा द्विविध कल्पिल्या. शुद्ध तर एकच असणार, पण मिश्र सत्त्वप्रधान रजःप्रधान व तम प्रधान अशा तीन होणार. एकूण चार उपशाखा झाल्या. यांच्या प्रत्येकी पुनः सात छटा कल्पिल्या सप्तलोकानुसार, सप्तलोक भूर् भुवर् स्वर् महर् जन तपस् आणि सत्यम् असे कल्पिले असून सर्व विश्व या सप्तांनी मिळून बनलेलें आहे अशी कल्पना आहे. म्हणजे ३ x ४ x ७-८४ ही संख्या आली. शुद्ध गुणांच्या योनि एकलक्ष मानून घेतल्या. मिश्र गुणांच्या त्या प्रत्येकी १ लक्षाप्रमाणें तीन लक्ष झाल्या आणि त्यांच्या गुणांच्या व लोकांच्या पटींनी त्या एकूण ८४ लक्ष गणल्या, लक्षाची संख्या कोणती तरी एक संख्या घेणे जरूर म्हणून मानून घेतली. सहस्र आणि कोटि या संख्यांच्या मधली अशी ती मध्यम संख्या आहे. कमी नाहीं नि अधिकहि नाही. बोलायला कुठली तरी एक संख्या हवी असते. आपण म्हणतो "तुझ्या सारखे ५६ पाहिले."आतां ५६ या संख्येला काय अर्थ आहे ? तिचा अर्थ पुष्कळ एवढाच घ्यावयाचा. तो घेऊन शिवाय एखादा सांख्यवादी असे म्हणू शकेल की दिशा आठ आहेत आणि प्रत्येक दिशेला सात सात अशा प्रकारे ७४८५६ ही संख्या आलेली आहे. असेलहि तसें. ८४ लक्ष योनि या संख्येलाहि तोच न्याय लागू होतो. हा सगळा वि या उपसर्गाचा विस्तार आहे.

६१०. श्रीधर
श्रियं धारयति इति श्रीधरः । जो श्रीला धारण करतो तो श्रीधरः जलधर मेघ हा जलधारण करतो म्हणजे तो जलगर्भ असतो. तसा परमात्मा हा श्रीधर म्हणजे श्रीगर्भ आहे. त्याच्या ठाई श्रीगर्भ वाढत आहे. त्याच्यापासूनच श्रीचा जन्म होतो. सूर्यापासून जसें तेज प्रकटते, अग्निपासून जसें औष्ण्य, चन्द्रापासून जशी आह्लादकता त्या प्रमाणें परमात्म्यापासून श्री प्रस्फुटित होते. म्हणून तो म्हणावयाचा श्रीधर, श्रीगर्भ पद तसें पूर्वी येऊनच गेलें आहे. त्यामुळे त्याच अर्थानं श्रीधर शब्द लावणें गतार्थ होईल, तर श्रीला पत्नीत्वानें स्वीकारणारा, तिला आपल्या अंकावर धारण करणारा असा अर्थ करावयाचा. "पण मग त्याच अर्थाचें पद श्रीपति आलेलेंच आहे. अर्थ जरी समान झाला तरी अक्षरे वेगळी आहेत असें म्हणावें तर श्रीनिवाससारखीं पदें दोनदां आली आहेत आणि श्रीमान् हे पद तर चारदां आले आहे. जिथें अर्थहि भिन्न नाही आणि अक्षरसमामायहि वेगळा नाही तिथे आनुपूर्वी वेगळी आहे असे म्हणतां येते आणि तेवढ्यापुरतें तरी तें पद वेगळे ठरतें. बरें हें आनुपूर्वीभिन्नत्व सोडले तरी अभ्यास हे एक मोठे तत्त्व त्यांत आढळते. त्या योगे त्या पदाचे ग्रंथकाराला विशेष महत्त्व आहे, त्याचे ते प्रतिपाद्य आहे, हे स्पष्ट न सांगतां प्रकट होते. त्या योगें ग्रंथतात्पर्य-निर्णयाला साहाय्य मिळतें. ग्रंथकाराच्या मनोवृत्तीवर प्रकाश पडतो. जुनें बहुतेक सर्व ग्रंथकार ऋषिमुनि ब्राह्मण होते आणि ब्राह्मण म्हणजे परलोकपरायण दरिद्र लोक; त्यामुळे त्यांच्या लिखाणांत श्रीविषयी संपत्तीविषयी अभिलाष वारंवार दिसून आल्यावांचून राहिला नाही. वेदांतील श्रीसूक्तापासून तो आजच्या हरिदासाच्या "जोंवर पैसा तोंवर बैसा' या उक्तीपर्यंत आपल्याला तो अखंड आढळून येतो. परंतु असे असले तरी बिचारे आजतागायत शब्दश्रीधरच राहिले आहेत. कारण लाजिरवाणी भिक्षावृत्ति त्यांनी अवलंबिली. भीक मागून का कोणी सुखी झाला आहे ?

६११. श्रीकर
श्रीकर हे सामासिक पद दोन प्रकारे सोडवितां येतें श्रियं करोति इति श्रीकरः । अथवा श्रीः एव कराः यस्य सः श्रीकरः । पहिला उपपद तत्पुरुष तर दुसरा बहुव्रीहि समास आहे. तदनुसार उभयथा अर्थ केला जाईल. परमात्मा उघडच श्री म्हणजे संपत्ति निर्माण करणारा आहे. तो जीवांची वेगवेगळी शरीरें, त्यांची वेगवेगळी कर्में आणि त्या कर्मांची वेगवेगळी फळे निर्मीत आहे. जीवांच्या भोगासाठी त्यानें हा जीवलोक कर्मभूमि म्हणून निर्मिला आहे. तर स्वर्गनरकादि अन्य लोक भोगभूमि म्हणून निर्मिले आहेत. लोक जीव कर्में आणि फळे अशी चतुर्विध श्री त्यानें केलेली आहे. म्हणून तो श्रीकर होय.
ही लोक जीव कर्म फल अशी चतुर्विध श्री म्हणजे शोभा ज्याचे किरण होत तो परमात्मा श्रीकर म्हणावयाचा. तो या विश्वश्रीच्या प्रभावळींत विराजमान आहे. लोकरूपानें जीवरूपानें कर्मरूपानें आणि फलरूपानें जो हा प्रकाश चोहोंकडे पसरलेला दिसतो आहे तो सर्व त्याचा आहे. तो लोक जीव कर्म फल किरणमाली परमात्मा श्रीकर होय.
परंतु ही सगळी विश्वधी अर्वाचीन आहे. वरवरची आहे. ह्या हिरण्मय पात्रानें झांकलेली जी परा श्री आहे मोक्षाख्य, तीहि तो परमात्मा आपल्या अनन्य भक्तांसाठी करीत असतो. तो अनन्यभक्त ही विलोभनीय विश्वधी पाहून मोहित होत नाही. तिच्यांत गुंगून आणि गुंतून राहत नाही. तो म्हणतो
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् ।
तत् त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥

देवा, तुझें खरें श्रीमुख जें या मोहक विश्वरूपानें मुखवट्यानें झांकलें आहे ते हा मुखवटा दूर करून मला दाखव. आणि भक्तवत्सल देवहि आपल्या अनन्य भक्ताला आपलें तें निजरूप हा मायेचा पसारा दूर सारून दाखवीत असतो. आणि म्हणूनहि तो परमात्मा श्रीकर म्हणावयाचा "यं एव एष वृणते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनु स्वाम् ॥ "

६१२. श्रेय
श्रेय म्हणजे हित, पथ्य, परमात्मा हा हिततम आहे, म्हणून तो श्रेय म्हणावयाचा. जें जें हितकर आहे तें तें श्रेयस्कर होय. परंतु श्रेय, परमहित तर एक परमात्माच आहे. या परम श्रेयालाच दुसरें नांव मोक्ष असें आहे. तत्साधनभूत तें तें श्रेयस्कर म्हणावयाचे. अनुमोक्ष म्हणावयाचे. तत्प्रतिकूल तें तें अश्रेयस्कर, प्रतिमोक्ष वा वृजिन म्हणावयाचें. उपनिषदांत म्हटलें आहेः
श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः । तौ संपरीत्य विविनक्ति धीरः ।
श्रेयोहि धीये ऽभिप्रेयसो वृणीते । प्रेयो मन्दो योगक्षेमाद् वृणीते ॥

जीवनांत माणसापुढे पदोपदीं हित आणि प्रिय उपस्थित होत असतात. गुणदोषज्ञ त्यांची पारख करून निवड करीत असतो. तो प्रिय सोडून हितच निवडून घेतो, पण पारख नसलेला अडाणी संसारोपयोगी म्हणून प्रिय पसंत करतो. सारांश, जीवन म्हणजे एक परीक्षा आहे. एक सुदीर्घ परीक्षा. पदोपदी येणारे मोहाचे प्रसंग हे प्रश्न होत. ते तुम्ही कसे सोडवितां, श्रेय निवडता की प्रेय, यावरून तुम्ही पास नापास ठरणार. जो प्रतिक्षणी अप्रमत्त राहून सदैव श्रेयच निवडत राहतो तो जीवनाच्या शेवटच्या क्षणीहि श्रेयाचीच निवड करून श्रेयोरूप होतो. श्रेयोमंदिराचा कळस श्रेयाची एक एक वीट रचूनच गांठतां येईल. तीव्र मुमुक्षुता हा या श्रेयोमंदिराचा भक्कम पाया होय. या परमार्थनिश्चयानंतर अप्रमाद आणि वीर्य म्हणजे अतंद्रित आणि सोत्साह साधना त्या मंदिराचा मध्य होय, अभयरूप मोक्ष हा कळस त्या मंदिरावर शेवटी चढावयाचा. असें हें श्रेयोमंदिर श्रेयःकाम पुरुषाला रचावयाचे आहे. एका जन्मांत तें बांधून झालें तर उत्तमच. अन्यथा अनेक जन्मांत तें बांधून पूर्ण करावयाचे. तें पूर्ण करूनच अनपायिसुखरूप श्रेय लाभावयाचे, श्री पदावरून श्रेय म्हणजे श्रीचे हे पद लावले जाईल. श्रेयस् हे पद तुल्य म्हणतां येईल म्हणूनच तें श्रीच्या पाढ्यांत आले आहे.

६१३. श्रीमान्
श्रीमान् हे परमात्म्याचे नित्य विशेषण आहे. कारण तो सदैव स्वरूपस्थित आहे. जीव हा स्वरूपच्युत असल्यामुळे तो सदैव दीनच असावयाचा. परमात्मा नित्य परितृप्त असल्यामुळे त्याच्या ठिकाणी कसलेंहि दैन्य संभवत नाही. उलट जीवाला नाना कामना क्षणोक्षणीं तोडीत असतात. "बहव्यढ्यः सपत्‍न इव गेहपति लुनन्ति". अनेक बायकांच्या दादल्यासारखी त्याच्या जीवाची सारखी ओढाताण चाललेली असते. अशा दुर्भग पुरुषाला श्रीमान् कसे म्हणतां येईल ? परंतु व्यवहारांत तर आपण प्रत्येकालाच श्रीयुत श्रीमान् म्हणत असतों हे कसे ? त्याचेहि कारण वर दिलें तेंच आहे. जीवाचें जीवत्व हें औपाधिक असल्यामुळे ते क्षणिक आहे. तो मूळचा निरुपाधिक शिवच आहे. अर्थात् तो परमात्मस्वरूपच आहे. अशा स्थितींत तो श्रीमानच नव्हे काय ? आणि म्हणूनच सर्वांना परमात्मस्वरूप लक्षून आपण श्री हे उपपद चिकटवीत असतो. श्री अमुक म्हणजे परमात्मस्वरूप अमुक आणि श्री तमुक म्हणजे परमात्मस्वरूप तमुक होय. सर्वत्र एक आत्मश्री परिलक्षित होत आहे. तिनें रिता असा ठाव नाही. ज्याला सर्वत्र हे आत्मश्रीचें दर्शन झालें खरोखर तोच श्रीमान् होय. "तत्र को मोहः कः शोकः एकत्वं अनुपश्यतः" जो सर्वत्र एक आत्मश्रीच विराजमान पाहतो आहे त्याला मग मोह कसचा आणि शोक कसचा ? कुठल्या वस्तूची आसक्ति त्याला वाटेल आणि कुठल्या वस्तूच्या साठी तो शोक करील ? सर्वत्र त्याला तर एकच एक आत्मश्री भरून राहिलेली आहे. सर्व व्यवहाराचा आधार तत्त्वदर्शन आहे. सर्वांना श्रीपूर्वक संबोधणे सर्वांना नमस्कार करणे म्हणजे तें दर्शन प्रकट करणे होय. भगवान् शंकर हे रहस्य पार्वतीला सांगत आहेतः
प्रत्युद्गम-प्रथयणाभिवादनं विधीयते साधु मिथः सुमध्यमे ।
प्राज्ञैः परस्मै पुरुषाय भूयसे गुहाशयायैव, न देहमानिनें ॥


६१४. लोकत्रयाश्रय
परमात्मा अधोमध्योर्ध्व तिन्ही लोकांचा आश्रय आहे. म्हणजे लोकमात्राचा तो आश्रय आहे. आदि अन्त आणि मध्य मिळून पूर्णता होते म्हणून तीन ही संख्या घेतली आहे. अर्थात् ती पूर्णतावाचक आहे, संख्यावाचक नाही. देह प्राण मनो-लोक म्हणा, वा जागृति स्वप्न सुषुप्ति-लोक म्हणा, किंवा भूमि अन्तरिक्ष द्युलोक म्हणा, अथवा भूत भवत् भविष्यत् सृष्टि म्हणा, कोणत्याहि प्रकारें या त्रिधा विभक्त विश्वाचा, या व्यष्टि समष्टि, चेतनाचेतन, अन्तर्बाह्य, स्थलकालात्मक समग्राचा मूल आधार तो परमात्मा आहे. त्याच्याच सत्तेच्या अंकावर हे तिन्ही लोक लोळत आहेत, खेळत आहेत. पण परमात्मा या विश्वाला आश्रय आहे तो कसा ? डोक्यावर घागर 'अंसते तशा प्रकारें का तो या लोकत्रयाला धारण करतो ? शेषाच्या डोक्यावर ही पृथ्वी आहे म्हणतात. ती का डोक्यावर धारण केलेल्या घागरीसारखी आहे ? नाही, हे विश्वरूप कार्य तो परमात्मा कारण रूपानें धारण करीत आहे. सर्पाभासाला रज्जू कारण व्हावी तसा तो परमात्मा या विश्वाकाराला कारण झाला आहे. वस्तुतः रज्जूचा आणि सर्पाचा कांहीं एक संबंध नाही. तसा या विश्वाकारचा आणि त्या निराकार परमात्म्याचाहि काही संबंध नाही. तरी रज्जूची सत्ताच जशी त्या असदरूप सांभासाची आश्रयभूमि होते, त्याप्रमाणें परमात्मा या लोकत्रयाचा आश्रय होय. गीतेत म्हटलेच आहेः अव्यक्तं व्यक्तिमापत्रं मन्यन्ते मां अबुद्धयः । परं भावं अजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥ थोरांच्या मते हा विवर्त आहे. बहुतेक तो रज्जुसर्पवत् म्हणतात, कोणी सुवर्णकंकणवत् म्हणतात. कारणाचे अपरिणामित्व आणि कार्यासंसृष्टत्व हे आहे विवर्ताचे रहस्य, मग तो विवर्त तुम्ही कसाहि का म्हणा ना ?
॥ हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP