ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

अनादिर्भूर्भुवो लक्ष्मीः सुवीरो रुचिराङ्गदः ।
जननो जनजन्मादिर्भीमो भीमपराक्रमः ॥१०१॥


९४१. अनादि
न आदिः कारणं यस्य सः अनादिः । ज्याला आदि म्हणजे कारण नाहीं तोअनादि म्हणावयाचा. झाडाला मूळ असते. पण मुळाला पुनः मूळ नसते. म्हणूनच तें मूळ म्हटले जाते. परमात्मा हा तसा या विश्वकदंबाचें मूळ आहे. त्याला दुसरें मूळ नाहीं, कारण नाही, म्हणून तो अनादि म्हटला आहे. या विश्वांतील प्रत्येक वस्तु आदिमत् आहे. म्हणजे कुठल्यातरी कारणापासून कार्यरूपानें परिणत झालेली आहे आणि प्रत्येक आदिमत् वस्तु अन्तवत्हि असते. म्हणून ती नाशवन्तहि आहे. अशा प्रकारें हे समस्त विश्व कार्यकारणबद्ध असून नाशवन्त आहे. परमात्मतत्त्वच हे एक असें आहे की त्याला आदि नाही. आणि आदि नाही म्हणून अन्तहि नाही. तें "जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते म्रियते" या वस्तूंच्या षड्भावांतून परिमुक्त आहे. अर्थात् . कार्यकारणभावाच्या मालिकेंत ते कुठेच सांपडणारें नाहीं. एक कण वा क्षण दुसऱ्या कणाला वा क्षणाला जन्म देतो. तो स्वतःहि कुठल्या तरी कणा वा क्षणापासून जन्म पावलेला असतो. अशा प्रकारे प्रत्येक वस्तु ही कारणहि असते आणि कार्यहि असते. परमात्मा हा तसा नाही. तो विश्वाचे कारण मानिला जातो खरा, पण तोहि त्याच्यावर आरोपच आहे. रज्जूवर सर्पाचा आभास होतो आणि आम्ही रज्जूला सर्पकारण म्हणतो. परंतु रज्जूच्या बाजूनें पाहिल्यास ती केव्हांहि सर्पालाच नव्हे तर त्याच्या आभासालाहि जन्म देत नाही. तो आरोप आम्ही आमच्या दृष्टिदोषामुळे भ्रमामुळे करीत असतो. तद्वत् परमात्म्याला या विश्वाचा आदि म्हणणेहि गैरच आहे आणि याहि दृष्टीनें तो परमात्मा अनादि म्हणजे कारणभूत नसलेला असा आहे. अशा प्रकारें अनादि हे पद बहुव्रीहि तसें तत्पुरुषहि घेतां येण्यासारखे आहे. कसेंहि पहा तो परमात्मा अनादिच आहे.

९४२. भूर् (भुर् भुवः)
"भूर् भुवो लक्ष्मीः' हे एक पद की अनेक ? शंकराचार्यांनी ते अनेक मानिले असून अनेक प्रकारें विवरिलें आहे. (१) भुवो भूः (२) भुवो भूः लक्ष्मीश् च (३) भूरभुवो लक्ष्मीः अशा तन्हांनी त्यांनी व्याख्यान केले आहे. भू म्हणजे पृथिवी ही सर्व भूतांचा आधार आहे तिचीहि.भू म्हणजे आधार परमात्मा होय. म्हणून तो भुवो भूः म्हणावयाचा. तो नुसता भूचा भूच नाही, या पृथ्वीचा आधारच नाहीं, तिची लक्ष्मी म्हणजे शोभाहि आहे. म्हणून तो म्हणावयाचा भूर् भुवो लक्ष्मीश् (च) या दोन व्याख्या भूर्भुवः आणि लक्ष्मीः ही तीन वेगळी असमस्त पदें मानून केल्या आहेत. तिसरी व्याख्या तें एक समस्त पद घेऊन केली आहे. भूलोक व भुवोक यांची लक्ष्मी म्हणजे शोभा असलेली जी अध्यात्मविद्या ती म्हणावयाची भूर् भुवो लक्ष्मीः आतां हें एक नाम घ्यायचे की दोन याचा निर्णय सहस्रसंख्येला जें अनुकूल असेल तदनुरोधानें करावयाचा. एक च नाम घेणे गरजेचे असल्यास भूर्भुवो-लक्ष्मीः असें एक सामासिक पद घेणे बरें. दोन नामें घेणे गरजचें असल्यास ही तिन्ही पदें असमस्त राहतील आणि भूवः हे षष्ठ्यन्तपद घेऊन देहली दीपकन्यायानें ते दोन्ही कडे अन्वित होईल. भूवः भूः आणि भुवः लक्ष्मीः अशी ती दोन नामें होतील. आणि संख्यापूर्वपक्षेनें इथें तशी ही दोन नामें घ्यावयाची आहेत. अर्थात् हे नाम भुवो भूः असें झालें. परमात्मा हा आधाराचाहि आधार आहे, मूलाधार आहे. म्हणून तो उघडच भुवो भूः म्हणावयाचा.

९४२. (भूर्) भुवः (लक्ष्मीः)
भूर् भुवो लक्ष्मीः या पदांची दोन नामें जरी संख्यापूर्तीसाठी कल्पिली तरी ती तिन्ही स्वतंत्र पदें घेणे गैर नाही. कारण संख्या-निर्वाहासाठी भुवो भूः आणि भुवो लक्ष्मीः अशी दोन नामें कल्पिली तरी ती कृत्रिम आहेत. भुवो भूः म्हणण्यांत काही विशेष स्वारस्य नाही. परमात्मा विश्वाधार आहे तिथे तो भूमीचा वा भूलोकाचा आधार आहे असे म्हणण्यांत काय अर्थ ? त्याच प्रमाणें भुवो लक्ष्मीः हे नामहि कृत्रिमच आहे. तो परमात्मा साक्षात् विश्वलक्ष्मी असतांना त्याला केवळ भूलोकाची लक्ष्मी म्हणण्यांत काय स्वारस्य ? तेव्हां संख्यानिर्वाहाचा बाऊ न करतां भूर्भुवर् लक्ष्मीः अशी तीन पदें घेणेच प्रशस्त. पण तसे करूं जातां दुसरीच अडचण उपस्थित होते पुनरुक्तीची. पण पुनरुक्तीचा दोष पत्करला, कृत्रिमता हा महादोष आहे. बळेच ओढून ताणून एखादें नाम कल्पिणे अयोग्य होय. "यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः । ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये । " या प्रतिज्ञेशीहि तें विसंगत होईल (१) गौण म्हणजे गुणवाचक अर्थात् विशिष्ट गुण प्रकट करणारी, (२) मंत्र-द्रष्ट्यांनी (वेदांत) गाइलेली आणि (३) लोकांत विख्यात अशी ही सहस्र नामें आहेत. जें नाम या तिहीं पैकी एकाहि प्रकारांत बसत नसेल तें अप्रशस्त होय, अप्रस्तुत होय. पुनरुक्तिदोष- परिहार अनेक प्रकारे होऊं शकतो.. (१) समानवर्ण असून अर्थभिन्नता असणे, (२) समान अर्थ असून वर्णभिन्नता असणे आणि (३) समानवर्ण व समान अर्थ असून क्रमभिन्नता असणे अशा तिन्ही प्रकारे पुनरुक्तिहि अपुनरुक्ति होते. शिवाय सर्व नामें एका विष्णूचींच म्हटल्यानंतर पुनरुक्ति अपुनरुक्ति हा प्रश्नच उत्पन्न होत नाही आणि पुनरुक्ति झाली तरी ती दोषास्पद नव्हे. म्हणून भुवर् हें नाम भुवः असें भूचे षष्ठ्यन्त न घेतां भुवर् लोक म्हणून स्वतंत्रहि घेता येईल. परमात्मा हा भू आहे आणि भूरतिरिक्त भुवर्हि आहे म्हणून भुवर्.

९४३. लक्ष्मी (लक्ष्मी, लक्ष्मीः)
लक्ष्मीः हे पद लक्ष्मी असें इन्‍नन्तहि घेणे शक्य आहे. लक्ष्मवान् तो लक्ष्मण वा लक्ष्मी म्हणावयाचा. आणि लक्ष्मीः असें स्त्रीलिंग घेतलें तरी अर्थात फरक नाही. ती देवता झाली. पुंल्लिंग देव झाला. तर नपुंसकलिंग दैवत झालें. सर्व नामें विशेषणेच होत आणि ती विशेष्यनिघ्नच असावयाची. म्हणून लिंगव्यवस्था देव देवता दैवत या पुंस्त्रीनपुंसकलिंगी विशेष्यानुसार सहजच बसते. तेव्हां लक्ष्मीः घ्या की लक्ष्मी अर्थात अंतर नाही. लक्ष्मी म्हणजे सर्व सुलक्षण-संपन्न, परमात्म्याचे ठाईं सर्व शुभ लक्षणे एकवटली आहेत, म्हणून तो लक्ष्मी होय. परमात्म्याच्या ठाईं सर्व शुभ लक्षणे एकवटली ती कोणकोणती ? पहिले लक्षण अव्यंगता, दुसरें निर्मलता, तिसरें सुरूपता, आणि चौथे सुगुणता. या शिवाय परमेश्वरी तेज हे पांचवें लक्षण होय. ही पंचलक्षणे जिथे एकवटली आहेत तिथें लक्ष्मी आहे. ही लक्ष्मी जिथे आहे तिथे लक्ष्मीपति आहे आणि जिथें लक्ष्मीपति आहे तिथें लक्ष्मी आहे. लक्ष्मी नि लक्ष्मीनारायण दोन नाहीत. सूर्य नि सौरी प्रभा वेगळी नाहीत त्या प्रमाणें. हा सूर्य आहे हे कोणत्या लक्ष्मावरून ओळखायचे ? त्याच्या प्रभेवरून. तसा हा भगवान् आहे हे कोणत्या लक्ष्मावरून ओळखायचे ? त्याच्या भगवत्तेवरून, लक्ष्मीवरून. जगांत खरोखर कांहीं सर्वातिरिक्त आकर्षक असेल तर ते सौंदर्य आहे, लक्ष्मी आहे. म्हणून गीतेंत भगवद्विभूतितत्त्व सांगतांना श्रीमत् पद आधीं योजिलें आहे, मागाहून ऊर्जित चा उल्लेख केला आहे. "यद् यद् विभूतिमत् सत्त्वं श्रीमद् ऊर्जितमेव वा " मानव जीवनाची जी सारभूत मूल्ये आहेत ती 'सत्य शिव सुन्दर अशी त्रिविध वर्णिली आहेत. ही तिन्ही वस्तुतः एकरूपच आहेत. परंतु त्यांत डावें उजवें करायचे झाल्यास सुन्दर हे सर्वोपरी म्हणावे लागेल. तिथे तुमची बुद्धि कुंठित च होते. ते पाहिल्या बरोबर तुम्ही तद्वश च होता. त्याचा प्रतिकार करण्याचे सामर्थ्य कुणांतच नाही. असें में हे तत्त्व तेंच लक्ष्मी होय.

९४४. सुवीर
सु शोभनो वीरः सुवीरः ! जो उत्कृष्ट वीर आहे तो म्हणावयाचा सुवीर. जो आपल्या प्रतिपक्षाला नामोहरम करतो तो वीर म्हटला जातो. जो एकसाथ अनेक शत्रूशी एकटा लढा देतो आणि विजयी होतो तो महावीर म्हणावयाचा. पण हे वीर नि महावीर बाह्य शत्रूवर विजय मिळवीत असले तरी ते आपल्या अन्तःशत्रुंवर विजय मिळविण्यास असमर्थ असतात. रावणानें त्रिभुवन जिंकलें पण आपला कामविकार त्याला जिंकता आला नाही. कंभकर्ण महापराक्रमी परंतु निद्रेपुढे त्याचे काही चाललें नाही. सारे जग हे असें रजतमादि गुण आणि गुणकार्ये यांना वश आहे. त्यामुळे त्यांतील कोणीहि वीर नि महावीर हा सुवीर नव्हे. सुवीर तर तो परमात्मा आहे जो गुणातीत आहे, गुणस्वामी आहे. त्याच्यावर प्रकाश प्रवृत्ति नि मोह या सत्त्वरजस्तमांच्या कार्याची मात्रा चालत नाही. ही कार्ये येतात नि जातात तो आपला केवळ साक्षी अविकृत राहतो. असा तो अविकृत राहिल्यामुळे तो शोभन होय आणि वीरहि होय. म्हणून तोच एक सुवीर म्हणावयाचा.
न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः ।
सत्त्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात्त्रिभिर्गुणैः ॥ गीता १८ - ४०

" हे विश्व म्हणजे गुणांचा पसारा आहे. यांत . काहीएक गुणमुक्त आढळावयाचे नाहीं. गुणमुक्त आहे तें ब्रह्मच. म्हणून त्याला सुवीर म्हणावयाचे. तेच या सगळ्या गबाळ काल्यांत. केवळ अलिप्त असून त्याला शिवायचे लेशमात्रहि सामर्थ्य प्रकृतीच्या गुणांत नाही. म्हणून तो परमात्मा म्हणावयाचा सुवीर.

९४५. रुचिरागद
रुचिराणि अगदानि यस्य सः रुचिराङ्गदः । ज्याची बाहुभूषणे म्हणजे बाजूबंद सुंदर आहेत तो म्हणावयाचा रुचिराङ्गद, नामें परमात्म्याची असून परमात्मा हा निर्गुण सगुण दोन्ही आहे. त्यामुळे ही नामेंहि द्विविध विवरिलीं जातील. कुठे सगुणाची पाठ दृष्टीस पडते, तर कुठे निर्गुणाचे पोट. पण पाठपोट मिळून वस्तु एकच आहे. त्यामुळे केव्हां पाठीकडून पोटाकडे दृष्टि जाते तर केव्हां पोटाकडून पाठीकडेहि. पाण्यांत मासा इकडून तिकडे सुळकन् जात येत असतो. त्यावेळी जसे कधी त्याचे पोट तर कधी पाठ दृष्टीस पडते. आणि पाहणारा पाहत राहतो तसेंच इथेहि आहे. परमात्म्याच्या अनंत गुणसागरांत नामाच्या ह्या सहस्र मासोळ्या खेळत आहेत. त्यांचा हा खेळ पाहतांना केव्हां त्याची पाठ तर केव्हां पोट नजरेस पडते. निर्गुण केवलस्वरूप आहे तर सगुण नानावर्णाकृति आहे. आणि नुसते नानावर्णाकृतिच नव्हे तर अनेकदिव्याभरणहि. त्या दिव्य आभरणांपैकीं इथे अंगद म्हणजे केयूर वा बाहुभूषणे यांचा उल्लेख आला आहे. ही नाना रूपें वस्त्रे आभरणे गंधे नि माल्ये अवतारानुसार आली आहेत. तथापि त्या सर्व अवतारांत मुख्यतः इथे कृष्णावताराकडे अधिक दृष्टि आहे. कारण तो ग्रंथकाराला वर्तमान अवतार आहे. भगवान् रामचंद्र राजा होता पण त्याचें ध्यान तापस आहे. उरुजटामंडलधारी आहे. उलट कृष्ण गवळी, पण त्याचें ध्यान राजस आहे. तो नखशिखांत नटला आहे राजासारखा. परमात्मा सुवीर आहे त्या अर्थी तो या सर्व भुवनांचा अधिपति आहे आणि अर्थातच सर्व ऐश्वर्याचा नि वैभवाचा स्वामी आहे. त्याचे द्योतक त्याचे लेणे होय. रुचिरांगद त्याचेच दिग्दर्शन.

९४६. जनन.
जनन म्हणजे जन्मास घालणारा, जनक. परमात्मा हा या विश्वाचा जनक आहे. राणी माशी जशी निरंतर अंडी घालीत असते, त्या प्रमाणें परमात्मा सारखा हे विश्व निर्मीत आहे. प्रतिक्षणी काल वाढतो आहे, दिग्देश वाढतो आहे आणि भूतेंहि सारखी वाढतच आहेत. या जननप्रक्रियेत अणुमात्रहि खंड कधी पडला नाही. पडायचा नाही. सृजनशीलता हा स्रष्ट्याचा स्वभाव आहे आणि स्वभावाला अन्त असत नाही. त्यामुळे सृष्टिकर्म निरंतर चालूच राहणार. कोणताहि जीव स्वस्थ बसून राहत नाही. काही तरी नवीन करण्याची त्याची सारखी खटपट सुरू असते. एक बीज वाऱ्याच्या झोताबरोबर उडून कुठल्या तरी डोंगराच्या दरीत पडते. तिथे दगडधोंड्यांतहि तें अंकुरतें, पल्लवते आणि त्याचा मोठा वटवृक्ष होतो. त्याची मुळे पाताळांत पसरतात. . त्याचा विस्तार पृथ्वीला व्यापतो. पारंब्यांच्या रूपानें जणूं तो सहस्रपाद होतो आणि चारी दिशांत चालू लागतो. त्याच्या शाखा आकाशाला आलिंगितात. त्याचे शिर स्वर्गाला टेकतें. एवढें अचाट सामर्थ्य त्या एवढ्याशा बीजकणिकेंत असतें. तो तिचा स्वभाव होय. तोच जनन. प्रत्येकाच्या ठाईं तो निहित आहे. नवनवनिर्मितीची ही सहज आणि अनिवार प्रेरणा च या सृष्टींचे कारण आहे. "एकाकी न रमते । एको ऽहं बहुः स्याम्, प्रजायेय । " या संकल्पाच्या रूपानें तीच सृष्टीच्या आरंभी अवतरते आणि त्या संकल्पांतून सृष्टि होते. असा मूल संकल्प आणि सृष्टि यांचा आधारभूत तो चेतन परमात्माच जनन होय.

९४७. जन-जन्मादि
जनस्य जन्मनः आदिः जनजन्मादिः । जो जीवांच्या जन्माचा हेतु तो परमात्मा जनजन्मादि म्हणावयाचा. जायते इति जनः । जो जन्मतो तो जन होय. अर्थात् जीवमात्र. जन म्हणजे केवळ मानव योनीतील च जीव नव्हेत, तर चराचर स्थूलसूक्ष्म समस्त जीव-जन्तु. या सर्व जीवयोनींचा जन्म प्रकृतीतून होतो. म्हणून ती प्रकृतिच सर्व जीवांचे जन्म आहे, जन्मस्थान आहे, सर्व जीव चेतन वा अवचेतन प्रकृतींतूनच उत्पन्न होतात. अव्यक्त प्रकृतीच्याच गर्भातून हा सगळा व्यक्ताकार जन्मास आलेला आहे. म्हणून जीवांचें मूळ, जन्म प्रकृति म्हणावयाची. पण प्रकृति हे अव्यक्त तत्व असलें आणि त्यांतूनच व्यक्ताकार आलेला असला तरी तें अन्तिम तत्त्व नव्हे, चरम तत्त्व नव्हे. चरम तत्त्व आहे अक्षर परमात्मा. कारण तो चेतन आहे. प्रकृति जड आहे. ती मूल असू शकत नाहीं अचेतनापासून चेतन निर्माण होत नाहीं. चेतनापासूनच चेतन आणि अवचेतन (ज्याला अज्ञानामुळे अचेतन म्हटले जातें) निर्माण होतात. म्हणून तो अव्यक्त आणि अक्षर परमात्माच या व्यक्त आणि क्षर विश्वाचा आदि होय. भूतें, प्रकृति आणि परमात्मा असा हा मूलानुसारी क्रम आहे. गीतेनें याचाच उल्लेख पुढील प्रमाणें केला आहेः
अव्यक्ताद् व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे ।
रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके|| गीता ८-१८
भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते ।
रात्र्यागमे ऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे ॥ गीता ८-१९
परस्तस्मात्तु भावोऽन्यो ऽव्यक्तोऽध्यक्तात्सनातनः ।
यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ॥ गीता ८-२०
अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस् तमाहुः परमां गतिम् । गीता ८-२१.१

तो जो अक्षर पुरुष तोच परमगति होय. आणि त्यालाच इथें जनजन्मादि म्हटले आहे.

९४८. भीम
भीम म्हणजे भयंकर, माणसाला अंधाराचे भय वाटते. कारण अंधारांत कांही दिसत नाहीं, सुचत नाही. कुठल्या खड्ड्यांत पडू वा कुठल्या धोंड्यावर आपटूं याचा काही नेम नाही. परंतु प्रकाशांत असें भय वाटत नाही. तिथे सर्वकांहीं ज्ञात आहे. खड्डा असला तर तो टाळता येतो. धोंडा असला तर तो वाळतां येतो. वाघ आला तर त्याशी दोन हात करता येतात. पण अंधारांत जिथे कांहींच कळत नाहीं तिथे मनुष्य असहाय बनतो. त्याला भय भरते. परमात्मा हा अज्ञात आणि अज्ञेय असल्यामुळे भयंकर होय.
आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनं, आश्चर्यवद् वदति तथैव चान्यः ।
आश्चर्यवच् चैनमन्यः श्रुणोति, श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ॥ गीता २ - २९

त्याला पाहणारा आ वासून पाहत राहतो. त्याची बोबडीच वळते. त्यांतून एखादा सावरला आणि बोलूं लागला तर तो काय बोलतो तें चमत्कारिकच असते. असलें असंबद्ध चमत्कारिक कोण ऐकतो ? आणि कोणी एखादा निघालाच तें ऐकणारा तर तें एक आश्चर्यच म्हणावयाचें ! आणि ऐकलें तरी त्याला कळणार काय कपाळ ? असें जें केवळ अगोचर परमात्मतत्त्व तें भीम म्हणजे भयंकर नव्हे तर काय म्हणावयाचें ? खरोखर मृत्यूचे भयहि अज्ञात-भयच आहे. मृत्यु म्हणजे काय ? मृत्यूनंतर काय होते ? तिथे कोणत्या यातना आहेत वा काय व्यवस्था आहे याचें जें माणसाला अज्ञान आहे तेंच भयंकर आहे. परमात्मा हा या विश्वाचा अन्तकच आहे. त्यांत हे सारे विश्व विलीन होते. त्यामुळे तो भीम म्हटला आहे.

९४९. भीम-पराक्रम
भीमः पराक्रमः यस्य सः भीम-पराक्रमः । ज्याचा पराक्रम भयंकर आहे तो म्हणावयाचा भीम-पराक्रम, पर म्हणजे परका, शत्रु. त्याच्या विरुद्ध जो आक्रम म्हणजे चाल तो पराक्रम होय. परमात्म्याची शक्ति अनंत आहे. तो सर्वशक्तिमान् आहे. कर्तुं अकर्ता अन्यथा कर्तुं समर्थ आहे तो. तसें सामर्थ्य कोणाचें नाही. म्हणून तो परमात्मा उघडच भीम-पराक्रम म्हणावयाचा. त्याच्या विरुद्ध जो उभा झाला तो पडलाच म्हणून समजा. आपले पाय तोडून कोणी उभा राहूं शकत नाहीं. तसा कोणीहि परमात्म्याविरुद्ध उभा होऊं शकत नाही. परमात्माच सर्वाधार आहे. तोच जीवरूपानें सर्वांचा निजात्मा आहे. त्याच्याविरुद्ध कोण कसा उभा राहणार. रज्जूसर्पाचा उद्‌भव स्थिति आणि संहार जसा केवळ रज्ज्वधीन असतो तसा या विश्वाचा परमात्माधीन. म्हणून तो भीमपराक्रम म्हणावयाचा. आणि अवतारदृष्ट्याहि तो भीम-पराक्रम तर आहेच. प्रत्येक अवतारांत त्यानें आपल्या प्रतिपक्षाला लोळवलें आहे आणि धर्माची द्वाही फिरविली आहे. जगांत सत्याचे राज्य आहे, धर्माचे राज्य आहे, न्यायाचे राज्य आहे, असत्य, अधर्म, अन्याय यांचे नव्हे. कारण या जगाचा शास्ता परमात्मा आहे. तो सर्वांच्या हृदयांत राहून त्या सर्वांना व्यक्तिशः आणि संघशः धर्म-प्रेरणा देत असतो. हिरण्यकशिपूच्या घरीच प्रह्लाद निर्माण होतो. माणसाच्या हृदयांत च सदसद्-द्वंद्व सुरू होतें आणि परमात्मा आपलें बळ सत्पक्षाला देऊन त्याला विजयी करतो. या अंतरतर धर्मगोप्त्यापुढे मोठमोठे जुलमी सम्राट् आणि त्यांची साम्राज्ये यांचे कांहीं चालत नाही. ती शेवटीं नष्टच होतात. म्हणून तो परमात्मा भीम-पराक्रम म्हणावयाचा.


आधारनिलयोऽधाता पुष्पहासः प्रजागरः ।
ऊर्ध्वगः सत्पथाचारः प्राणदः प्रणवः पणः ॥१०२॥


९५०. आधार-निलय
आधाराणां निलयः आधार निलयः । अथवा आधारश्च असौ निलयश्च आधारनिलयः । सर्व आधारांचे माहेर असलेला परमात्मा हा आधारनिलय म्हणावयाचा. अथवा तो आधार असून निलयहि आहे म्हणून आधार निलय म्हणावयाचा. ज्या गोष्टींवर जीवाची मदार असते त्या गोष्टी त्याचे आधार होत. शरीर, करणे, अंतःकरणे आणि प्राण हे जीवाचे आधार होत. यांच्या आधारेंच त्याचे सर्व जीवन चाललेले असते. पण जीवासगट या सर्वांचा आधार तो परमात्मा आहे. त्या परमात्म-सत्तेच्या आधारेंच हे सारे जीव जगत असतात. सूर्याच्या आधारेंच जसे सर्व किरण, विद्युद्‌कण आणि अग्निकण जगत असतात त्याप्रमाणेंच सर्व जीवांचे जीवन परमात्मसत्तेच्या आधारें चाललेलें आहे. सूर्य मावळला तर दिवसहि नाहीं, इन्द्रधनुष्यहि नाहीं, नि मृगजळ हि नाही. सूर्याची सत्ता आहे म्हणून विद्युन्माला आहेत, अग्निज्वाला आहेत. अशा प्रकारें सूर्य हा तेजोमात्राचा मूळ आधार आहे, उद्गम आहे. तसेंच सारें तेज शेवटी सूर्यातच विलीन होते म्हणून तोच निलयहि होय. त्याप्रमाणेंच परमात्म-सत्तेच्या आधारेंच हे जग प्रतीत होत आहे आणि ते त्या परमात्मसत्तेतच निलीन होणारे आहे. मृगजळ सूर्य-किरणांवर भासमान होते म्हणून सूर्य हा आधार म्हणावयाचा. किरण अस्तसमयीं सूर्यांत निलीन होतात. त्याबरोबर मृगजळहि निलीन होतें, लुप्त होते. म्हणून सूर्य हा निलय म्हणावयाचा. अशा प्रकारें सूर्य हा मृगजळाचा आधार आणि निलय दोन्ही झाला. तसा अव्यक्त परमात्मा हा या व्यक्ताकाराचा आधारहि आहे आणि निलयहि आहे. अव्यक्ताच्या आधारावर हा व्यक्ताकार भासत आहे आणि त्या अव्यक्तांतच तो शेवटीं विलीन व्हावयाचा आहे. आणि व्यक्त रूपानें आभासित होण्यापूर्वीहि तो तिथेच निलीन होता. अशा प्रकारें तो परमात्मा आधारांचा निलय आहे आणि आधार व निलयहि आहे.

९५१. (धाता) अधाता
दधाति इति धाता । जो धारण पोषण करतो तो म्हणावयाचा धाता. आधार-निलयो धाता, हीं पदें मिळून एक संपूर्ण विचार प्रकट झाला आहे. परमात्मा या विश्वाचें मूळ आहे म्हणून तो आधार म्हणावयाचा. तोच या विश्वाचें जीवन आहे, त्याचें धारण पोषण करणारा आहे म्हणून तो धाता म्हणावयाचा. आणि या विश्वाचे पर्यवसानहि शेवटी त्यांतच व्हावयाचे आहे, त्यांतच विश्व विलीन व्हावयाचे आहे म्हणून तो निलय म्हणावयाचा. अर्थात् उत्पत्ति स्थिति आणि लय हे समग्र विश्वजीवन तदधीन आहे. तोच या विश्वाचे आदि अन्त आणि मध्य आहे. मृगजळ सूर्य किरणांवाचून संभवत नाहीं म्हणून सूर्यकिरणे त्याचा उद्‌भव वा आदि होत. सूर्य किरणांवरच तें भासनान होत असते. म्हणून सूर्य किरणेंच त्याची स्थिति वा मध्य होत. आणि सूर्य किरणांबरोबरच तेंहि संहार पावतें म्हणून सूर्य किरणेंच त्याचा संहार वा अन्त होत. त्याप्रमाणेंच परमात्मा या विश्वाभासाचा आधार, धाता आणि निलय आहे, उद्‌भव स्थिति संहार आहे. धाता हे पद पूर्वीहि येऊन गेले आहे. म्हणून इथे धाता ऐवजी अधाता असा पाठ कल्पिता येण्यासारखा आहे आणि शंकराचार्यानीं तो तसा कल्पिलाहि आहे. परंतु आनुपूर्वी लक्षात घेतां धाता हाच पाठ समीचीन वाटतो. तथापि अधाता पदाचीहि उपपत्ति बसवता येण्यासारखी आहेच. सूर्य किरणांवर मृगजळाचा भास होत असला तरी तें अज्ञानकार्य आहे. तो द्रष्ट्याचा दृग्भ्रम आहे. वस्तुतः सूर्यकिरणें त्या आभासाला ना जन्म देत, ना त्याचे धारण करीत, ना त्याचा संहार करीत असतात. तसा परमात्माहि या विश्वाभासाचा ना आधार ना संहार होय. म्हणून तो अधाता.

९५२. पुष्पहास
पुष्पाणि एव हासः यस्य सः पुष्पहासः । पुष्पे हीच ज्याचे हास्य होत तो म्हणावयाचा पुष्पहास. पुष्पहास हा शब्द चंद्रहास शब्दासारखा आहे, पण त्याचा विग्रह चंद्र इव हासः यस्य सः, असा होईल. हा उपमानपूर्वपद बहुव्रीहि झाला. पुष्पहास हा अवधारण पूर्वपद बहुव्रीहि आहे. - हे विश्व म्हणजे परमात्म्याची मूर्ति होय, परमात्म्याचे शरीर होय. देहवान् जसा हसतो रुसतो, तसा हा विश्वरूप परमात्माहि हसत रुसत आहे. त्याचे हास्य कुठे दिसते ? कवि तें पुष्पांत पाहतो. पुष्पे म्हणजे त्या परमात्म्याचे हास्य होय. हसणारा जीव आपली प्रसन्नता प्रगट करीत असतो आणि सभोंवती ती पसरीत असतो, पेरीत असतो. फुललेली वाटिका पाहून खिन्न मन प्रसन्न होते. तें निर्मल होतें. उज्जवल होतें सुंदर होतें. तें सुखावतें व सुख देऊ लागते. अशा रीतीनें बाहेरची फुलबाग अंतरांत फुलते आणि आजूबाजूलाहि अशा फुलबागा फुलवू लागते. कारंज्यांतून ज्याप्रमाणें संतत तुषारवृष्टि होत राहते त्याप्रमाणें पुष्पांतून निरंतर श्रीवृष्टि होत राहते. शौच सौरभ सौन्दर्य सौख्य यांचा अजम्न स्रोत म्हणजे. पुष्प होय. तें मनाला सुखवितें म्हणून ते सुमन म्हटले जाते. सु-मनच सुखवतें, दुर्मन दुखवतें. म्हणून सुमनाची लागवड हाच मानव-धर्म. विश्वरूप परमात्म्याचे हास्य पुष्पांत, भ्रूभंग विजांत, क्रोध प्रलयांत, भूक अग्नीत, करुणा नदींत, क्षमा पृथ्वींत, स्थैर्य पर्वतांत, गांभीर्य समुद्रांत, ज्ञान गुरुत, वात्सल्य गाईत, त्याग वृक्षांत, सत्ता सत्यांत आणि मत्ता सर्वत्र प्रकट आहे.

९५३. प्रजागर
प्रकर्षेण जागर्ति इति प्रजागरः । प्रकृष्ट म्हणजे निरवकाश आणि जागर म्हणजे जागरण वा जागृति. अर्थात् प्रजागर म्हणजे परम जागरूक. परमात्मा हा जाग्रत् स्वप्न सुषुप्ति या अवस्थात्रयाहून भिन्न आहे. अवस्था ह्या येतात जातात. त्या अनित्य आहेत आणि परमात्मा तर नित्य आहे. त्यामुळे कोणतीहि अवस्था तो असू शकत नाही. परंतु आम्हांला या अवस्थांहून भिन्न वस्तूची जाणीव नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याच पैकी एकीच्या सादृश्यानें परमात्म्याला जागृति-स्वरूप म्हणतों. जागृतींत स्मृति आहे, जाणीव आहे, स्वप्नांतहि ती आहेच पण विकृत आहे, विसंगत आहे. सुषुप्तीत ती नाहींशीच आहे. आत्मा हा स्वयं ज्ञानस्वरूप असल्यामुळे कोणत्याहि अवस्थेत केवळ अज्ञान वा विस्मृति असू शकत नाही. ज्ञान वा स्मृति न्यूनाधिक उपहित असते. सुषुप्तींत ज्ञान तमसावृत, स्वप्नांत रजसावृत आणि जागृतींत तें सत्त्वावृत असते. सत्त्वांतच आत्मप्रकाश अधिक स्थिर व स्वच्छ असतो. म्हणून ती अवस्था, ती उपाधि आत्म्याला अधिक जवळची म्हणावयाची. म्हणून त्याला जागर म्हणावयाचे. परंतु आत्म्याची स्थिति ही अवस्था-निरपेक्ष अशी केवलस्वरूपाची आहे. ती अवस्थांप्रमाणें गतागतकारी नाहीं, अखंडमंडलाकार आहे. ही नित्यनिरन्तरता आणि ज्ञानरूपता प्रजागर पद प्रकट करतें. एकादशीला शिवरात्रीला जागर करण्याचा प्रघात आहे. त्याला हरिजागर वा शिवजागर म्हणतात. तो जागर म्हणजे प्रजागराचा अभ्यासच होय, शेवटी आम्हाला प्रजागर पद प्राप्त करून घ्यावयाचे आहे. प्रकाश-प्रवृत्ति-मोहरूप गुणकर्मांचा नि गुणांचा अत्यय करूनच तें निस्वैगुण्यपद, ती तुरीय स्थिति वा ती गणेशचतुर्थी साधता येईल.

९५४. ऊर्ध्वग
ऊर्ध्व गच्छति इति ऊर्ध्वगः । परमात्मा हा गुणातीत असल्यामुळे तो ऊर्ध्वग होय. दुधांत वा पाण्यांत लोणी जसे आपल्या विजातीयत्वामुळे सदैव वर राहते, त्याप्रमाणें परमात्मा हा विश्वाचा विजातीय असून तो सदैव त्याच्यावर विराजमान आहे. पाणी आणि लोणी दोन भिन्न राशि विजातीय वस्तु होत. पाण्यांत लोणी मिसळत नाही. ते वेगळेच राहते आणि पाण्यावर तरंगतें. तसा परमात्मा हा या गुणकार्यरूप प्रपंचापासून अगदी भिन्न असून तो त्यांत मिसळत नाही. तो उसळतो. त्यामुळे तो ऊर्ध्वग होय. ऊर्ध्वगमन हा आत्म्याचा स्वभावच आहे. 'केला जरी पोत बळेंचि खालें । ज्वाला तरी ते वरती उफाळे" ऊर्ध्वज्वलन हा अग्नीचा धर्म आहे. मशाल उलटी केली तरी ज्वाला वरच उठणार. अंशी सूर्य वर आकाशांत स्थित आहे. त्याला भेटायला अंशरूप ज्वाला वर उठतात. परमात्माहि तसा या विश्व-प्रपंचापासून वर आहे. त्याला भेटायला सारे जीव धडपडत असतात. त्यामुळे तो अंशी परमात्मा तसे त्याचे अंशभूत जीवहि ऊर्ध्वग होत. परमात्मा सिद्ध आहे. जीव साधक आहे. ब्रह्म निष्ठारूप आहे, जीवन साधनरूप आहे, इतकेंच. गुणांचे बंधन असल्यामुळे जीव प्रकृतिपराधीनसा भासला तरी तो ऊर्ध्वमुख असतो, ऊर्ध्वगति असतो. पतंगाची झेप वरच असते, पण दोरा त्याला खाली खेचीत असतो. तो त्याला उडून जाऊ देत नाही. तें बंधन तुटलें म्हणजे तो ऊर्ध्वग झाला. त्याची अधोगति संपली. आत्मा स्वभावतः ऊर्ध्वग आहे. तो उत्तरोत्तर वरवरच चढण्याचा प्रयत्न करीत राहतो. याला कोणतीहि सीमा नाही. कारण सीमा दुःखरूप होईल म्हणून हा ऊर्ध्व आणि ऊर्ध्वतर गमन करीतच राहणार.

९५५. सत्पथाचार -
सतः पथं आचरति इति सत्पथाचारः । जो सत्याच्या मार्गाचे अनुसरण करतो तो सत्पथाचार म्हणावयाचा. प्रजागर स्वरूप आदर्शाला पोचायचे, त्या तुरीय पदाला पोचायचे तर गुणांचा अतिक्रम करून त्या ऊर्ध्वगतीला लागले पाहिजे. परंतु तें देहोपाधि जीवाला कसें जमणार ? तो उत्तुंग आदर्श आहे देहनिरपेक्ष, आणि आम्ही आहों देहबद्ध. दोहोंतील हे महत् अंतर ज्या मार्गानें कमी करावयाचे त्याचे नांव आहे सत्पथ. परमात्म्याला पोचायला पथहि परमात्माच आहे. कारण सत्याला सत्यानेच गांठतां येईल, असत्यानें केव्हांहि नाही. म्हणून सत्यस्वरूप परमात्म्याला गांठायचा मार्ग सत्पथ होय. आणि तो आचारणारा हा सत्पथाचार म्हणावयाचा. सारांश तो परमात्माच साध्य आहे. त्याचे साधनहि तोच आहे आणि साधनाचा अवलंब करणारा साधकहि तोच आहे. तो सत् आहे, तो सत्-पथ आहे आणि तोच सत्पथाचार आहे. त्या गुणातीत उत्तुंग आदर्शाला कसे पोंचायचे ? ती ऊर्ध्वगति कशी लाभायची ? कोणत्या क्रमानें हे साधायचे ? हा सगळा विचार गीतेच्या चौदाव्या अध्यायांत आला आहे. त्याचे सार हे की माणसानें तीन गुण व त्यांची कार्ये लक्षात घ्यावी. सत्त्व गुणाचे सेवन केल्यानें ऊर्ध्वगति लाभते, हे लक्षात घेऊन देह आहे तोवर सत्त्वस्थ होऊन रहावें. परंतु त्याबरोबर हे ओळखून असावें की आपण गुण आणि गुणकार्ये ह्यांहून वेगळे आहो. असा विवेक केला म्हणजे गुणांच्या बऱ्या वाईट कर्मांपासून, व त्यांच्या कर्मफलांपासून आपण मुक्त होतो. आणि हीच परम सिद्धि होय, गुणातीतता होय. "निस्त्रैगुण्ये पथि विचारतां को विधिः को निषेधः" असें म्हणून कोणी जर स्वैराचार करील तर तें मान्य नाही. कारण देह आहे तोवर कोणीहि गुणातीत झाला असें मानता येणार नाही. एवढ्याचसाठी सोळाव्या अध्यायाशेवटीं स्पष्ट सूचना दिली आहे
यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः ।
न स सिद्धिं अवाप्नोति न सुखं न परां गतिम् ॥ गीता १६-२३


९५६. प्राणद
प्राणद हें नाम वारंवार आले आहे. प्राण्याला प्राणाचे महत्त्व किती आहे तेंच त्यावरून दिसून येते. प्राण हेच मुख्य अन्न आहे. त्यावरच सर्व जीव जगतात. जीव हे जें कांहीं आहरतात तें सर्व प्राणरूपच आहे. श्वास हा उघडच प्राणरूप आहे. पाणी म्हणजे दोन भाग उद्वायु व एक भाग प्राणवायु आहे. अर्थात् पाणी हे प्राणरूपच होय. आणि धान्यादि सर्व अन्नेहि प्राणरूपच होत; कारण ती सर्व जठराच्या भट्टीत जळणारी असून कर्बप्रधान आहेत. अशा प्रकारें जीवमात्राचा सर्व आहार हा प्राणरूपच होय. मन प्राण उदक आणि अन्न ही उत्तरोत्तर स्थूल अन्नें होत. परमात्माच प्राण उदक अन्न आणि तत्पुष्ट मन या चतुर्विध आहाराचा दाता आहे. म्हणून तो चार वेळा प्राणद म्हटला आहे. आकाशकल्प परमात्म्याच्या ठाई वायुकल्प हें विश्व निहित आहे. वायूचे वीजन कोणाच्या प्रेरणेनें सुरू होते ? तें चेतन परमात्म्याच्या प्रेरणेनेच होते. म्हणून तो परमात्माच प्राणद होय.
वायूची हालचाल मेघमाला घेऊन येते तशी अग्निज्वालाहि घेऊन येते, विजाहि घेऊन येते. म्हणून परमात्मा हा प्राण देणारा तसा हरण करणाराहि म्हटला जातो. 'प्राणान् द्यति खण्डयति इति प्राणदः' असा त्याचा व्युत्पाद होईल. सर्व कर्तृत्व चेतनाचे आहे. अचेतनाला स्वातंत्र्य नाही. अचेतन परतंत्र म्हणजे परमात्माधीनच राहू शकते. आणि म्हणून तो प्राणद म्हणजे प्राण देणारा तसा प्राण हरणाराहि आहे. सारांश सर्वच जीवन जन्म, स्थिति आणि संहार परमात्माधीन आहे म्हणून कोणत्याहि प्रकारे पाहिले तरी तो परमात्मा प्राणद च होय. तो देही जीवा च्या ठाई प्राणसंचार करून त्याला जन्मास घालतो. अन्नोदक देऊन पोसतो आणि तें अन्न क्षीण करून त्याचा संहार करतो.

९५७. प्रणव
प्रणौति इति प्रणवः । प्रणव म्हणजे प्रकृष्ट नव. ' नु स्तुतौ ' पासून नव शब्द आला आहे. आणि त्याचा अर्थ स्तव असा होतो. अर्थात् प्रणव म्हणजे प्रकृष्ट स्तव, सर्वोत्तम नाम. ॐ हे परमात्म्याचे सर्वोत्तम नाम होय, म्हणून त्यालाच प्रणव असें म्हणतात. सर्वोत्तम -स्तव म्हणजे तो स्तव की ज्यांत परमात्म्याचे निःसंशय आणि समग्र वर्णन आले आहे. अर्थात यथार्थ वर्णन. पण हे कसे शक्य आहे ? बुद्धिमंतांना सर्व काही शक्य आहे. सर्व ज्ञान म्हणजे वेद वाङ्मय आहेत. वाक् वर्णमय आहे. आणि त्या वर्णाचा संक्षेप आहे अ उ म. अ कंठय, उ ओष्ठ्य आणि म नासिक्य आहे. आणि या तीनच सर्व वर्णांच्या परिसीमा होत. म्हणून अउम चा समाहार असलेला ॐकार हा सर्वज्ञानाचा समाहार झाला आणि म्हणून तोच प्रणव म्हणजे प्रकृष्ट स्तुति, सर्वोत्तम नाग म्हटला गेला. ॐकार हा एकाक्षर ब्रह्म होय, एकाक्षर वेद होय. यालाच अक्षर ब्रह्म म्हणतात. अक्षर म्हणजे अक्षररूप आणि क्षर नसलेलें. तसेंच ब्रह्म म्हणजे वेद आणि परब्रह्म. . अशा दुहेरी श्लिष्ट अर्थानें अक्षर ब्रह्म हा शब्द योजिला आणि म्हणून तो प्रणव म्हणजे सर्वोत्तम स्तुति आणि सर्वोत्तम स्तुत्य होय. असा हा प्रणव म्हटलेला ॐ साक्षात् परब्रह्म आहे. त्यालाच कवींनीं नि मूर्तिकारांनी गणेश बनविलें आहे. त्याचा महिमा गायला वेद नि उपनिषदें सरसावली आहेत. वेदारंभी तो उच्चारिला जातो. पूजारंभी तो पूजिला जातो. मांडुक्य हे संपूर्ण उपनिषद् त्याचेच व्याख्यान करते. असा हा प्रणव सर्वोत्तम होय. विष्णुसहस्रनामाचाहि आरंभ ॐ म्हणूनच झाला आहे, जरी वैष्णवांनी हरिः ॐ असा नवा शब्दप्रयोग रूढविला आहे. महिम्नांत त्याचा महिमा असा गाइला आहे
त्रयीं तिस्रो वृत्तीस त्रिभुवनम् अथो त्रीन् अपि सुरान् अकाराद्यैर् वर्णैस् त्रिभिर् अभिदधत् तीर्णविकृति ।
तुरीयं ते धाम ध्वनिभिर् अवरुन्धानम् अणुभिस् समस्तं व्यस्तं त्वां शरणद गृणात्योमिति पदम् ॥


९५८. पण
पणति मूल्ये व्यवहारं करोति इति पणः । बदल्यांत देवघेव करतो तो म्हणावयाचा पण. अर्थात् 'पण' म्हणजे सौदागर, व्यापारी, दुकानदार, गि-हाइक. 'आपण' म्हणजे बाजारओळ, 'पण्य' म्हणजे देवघेवीची खरेदीविक्रीची वस्तु, सौदा. 'पण्' धातूचींच ही कृदन्तें, मानव आणि पशु यांच्यात अनेक भेद आहेत. त्यांत 'पणन' हाहि एक आहे. मानव- समाजांत पणन आहे, पशुपक्ष्यादिकांत हा प्रकार नाही. पणन जर वगळलें तर मानव-समाज परत पशुदशेला. पोचायला वेळ लागायचा नाही. पणन हा असा मानव-समाजाचा विशेष आहे. मानवाचे समाजीकरण त्यामुळेच झाले आहे. तें जर वगळलें तर मानवाचे जीवन संकोच पावून तो एक द्विपाद पशु होईल. जीवन अनन्त आहे आणि त्याचा विकासहि अनन्त आहे. परंतु कोणत्याहि एका देहांत तें सामग्नानें एकवटणे शक्य नाही. त्यामुळे भिन्न भिन्न क्षमतेच्या व्यक्तींना परस्परांशी सहकार करावाच लागतो. या सहकाराचे स्वरूपच देवाणघेवाण होय. देवाणघेवाण सोनें नाणे, चीजवस्तु या वस्तूंची, श्रम कौशल्य या क्रिया-गुणांची अथवा वात्सल्य, प्रणय, मैत्री इत्यादि कोमल भावनांची असेल, पण देवाणघेवाणी शिवाय सहकार नाही. आम्ही कुत्र्याला पाळतों कारण तो आम्हांला सोबत रक्षण आणि भक्ति देत असतो. हे पणनच आहे. अशा प्रकारें जीव परस्परांशी देवघेवीचा व्यवहार करून जगत असतात. हा जो जीवांच्या जीवनाचा स्थायी भाव तोच पण होय. मी कोणाला काही देणार नाही आणि कोणापासून कांहीं घेणार नाही, असें म्हणणे म्हणजे व्यवहारच खुंटला; आणि त्याबरोबरच जीवनहि. मी विश्वांतून मुक्त दान घेऊनच जन्माला आलों, तें घेऊनच जगत आहे आणि तसेंच मुक्त दान करीत जाणे हा माझा धर्म आहे. तो मी सोडणे म्हणजे मी आपल्याला विश्वाला सोडचिट्ठी देण्यासारखेच आहे.


प्रमाणं प्राणनिलयः प्राणभृत्प्राणजीवनः ।
तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्ममृत्युजरातिगः ॥१०३॥


९५९. प्रमाण
प्रमाणं प्राणनिलयः प्राणभृत् प्राणजीवनः । हा 'प्र'चापाठ आहे, अथवा प्राणाचा पाठ आहे म्हणा. पुढील श्लोकार्थ तत्त्वाचा पाठ आहे, असे म्हणतां येईल. जगांत म्हणा वा जीवनांत म्हणा, दोनच तत्त्वें आढळून येतात. एक क्रियाशील, दुसरें अक्रिय. क्रियाशील म्हणजे सतत हालचाल करणारे तत्त्व प्राण. आणि अक्रिय म्हणजे केवळ साक्षिरूप आत्मतत्त्व. पहिल्या श्लोकार्धात प्राणाचें महिमान तर दुसऱ्यांत द्रष्ट्याचें महिमान गाइलें आहे. इतर पदें आनुषंगिक असून त्यांचा अर्थ प्रकरणानुरोधानें घ्यावयाचा. प्रमाण म्हणजे प्रमेयाचे ज्ञान करून देणारे साधन, प्रमेय कोणतें ? परब्रह्म हे प्रमेय होय. कारण अन्तिम सत्य तेंच आहे. त्या निर्गुण निराकाराचा साक्षात्कार वा अनुभव कशानें होतो ? तो होतो अन्तरात्म्याच्या वा प्रत्यगात्म्याच्या द्वारा. संस्फुरत् संविद्रूप म्हणून स्वात्माच प्रमाण होय. ज्ञानदेवानें म्हटलेंच आहे "ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान" सर्व अनुभव आत्म्याच्याच द्वारा येत असल्यामुळे आत्मतत्त्वच प्रमाण होय. हाच विचार गीतेंत
ब्रह्मणोहि प्रतिष्ठाहं अमृतस्याव्ययस्य च ।
शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च ॥ गीता १४-२७

या श्लोकांत आला आहे. निजात्माच परमात्म्याची उपलब्धि करून घेतो. म्हणून तोच ब्रह्माची प्रतिष्ठा होय, आधार होय. अमृत म्हणजे मोक्ष. त्याचाहि आधार तोच होय. कारण मोक्षप्राप्ति त्यालाच व्हायची आहे. तो नसेल तर ज्ञान आणि तत्फलित मोक्ष लाभणार कोणाला ? प्रेम आणि तद्जनित सायुज्य वा ऐक्य अथवा जीवाशिवाची भेट याचाहि आधार आत्मा च आहे. निजात्मा नसेल तर कुणाची भक्ति आणि कुणाची नामरूप-विभक्ति ? स्वरूपभूत आत्मा हा आपला आधार असून तो पररूपभूत परमात्म्याचा' वा परब्रह्माचा आधार आहे. प्रथम पुरुष 'तो', मध्यम पुरुष 'तू', यांचाहि आधार 'मी' च होय. म्हणून च तो उत्तम पुरुष म्हणावयाचा आणि म्हणून च तो प्रमाण.

९६०. प्राण-निलय
विश्वाची घडामोड करणारा प्राण होय. तोच विश्वकर्मा आहे. विश्वाची उत्पत्ति स्थिति आणि लय तोच करतो. पण प्राण हे कांहीं अन्तिम तत्त्व नाही. कारण तें सक्रिय आहे. अन्तिम तत्त्व आहे अक्रिय. त्या अकाशकल्प अक्रिय ब्रह्माच्या ठाई हे सक्रिय प्राणतत्त्व निहित आहे. म्हणून त्या ब्रह्माला, त्या परमात्म्याला म्हणावयाचे प्राणनिलय. निलीयते अस्मिन् इति निलयः । प्राणस्य प्राणानां वा निलयः प्राणनिलयः । प्राणाच्या हालचालीबरोबर जीवन प्रकट होतें. जन्मतांच मूल रडलें नाही, त्यानें काही हालचाल केली नाही, तर तें मृतजात (Still borm) मानले जाते. प्राणाची हालचाल थांबली, नाडी बंद पडली म्हणजे प्राणी मेला असे समजले जाते. मरणान्याच्या नाकासमोर सूत धरतात. प्राणापानाच्या गतीनें तें हलत राहते. तें हलणे यांबलें की प्राण शांत झाला असे मानले जाते. हाच मृत्यु. जिजीविषा सोडून प्राण जेव्हां स्वेच्छेनें निरोधून आत्याच्या ठाईं विलीन केले जातात तेव्हां त्या प्राणशांतीला समाधि असें म्हणतात. जेव्हां जिजीविषा तर सुटलेली नसते पण वार्धक्यानें वा रोगानें प्राण-धारणाची क्षमताच उरत नाही म्हणून अनिच्छेनें प्राणत्याग करावा लागतो तेव्हां त्याला मृत्यु म्हणतात. जेव्हां एखादा ब्राह्मण वा श्रमण कृतकृत्य झाल्यामुळे वा होण्यासाठी प्रायोपवेशन करून वा पूर्ण जीवन जगून प्राणत्याग करतो तेव्हां त्याला निर्वाण वा धीरगति म्हणावयाचे. जेव्हा एखादा क्षत्रिय धर्मयुद्धांत लढता लढतां धारातीर्थी देह ठेवतो तेव्हां ती वीरगति म्हणावयाची. जेव्हा एखाद्या जिजीविषूचें बलानें वा छलानें प्राण-हरण केले जातें तेव्हां त्याला हत्या म्हणतात. जेव्हा एखादा मनुष्य जिजीविषा असूनहि हताश होऊन मोहावेशांत स्वतःच जीव देतो तेव्हां त्याला आत्महत्या म्हणतात. जिजीविषा असून जगण्याची क्षमता नाहीं, मुमूर्षा करूनहि मृत्यु लवकर येत नाही. आत्महत्या करण्याचे बल नाही. अशा जीवाला गाय, बैल, वासरूं यांना तत्काळ ठार मारून यातना-मुक्ति देणे हा हत्यापराध नसून हत्योपकार आहे. या सर्व प्राणगतिच होत आणि त्या सर्व परमात्म्याच्या ठाई संपतात म्हणून तो प्राण-निलय.

९६१. प्राणभृत्
प्राणान् बिभर्ति इति प्राणभृत् । तो प्राणांचें धारण करतो तो प्राणभृत् म्हणावयाचा. परमात्मा हा प्राणांचा निलय आहे. जल-प्रवाह जसे समुद्रांत तसें सर्व प्राण-प्रवाह परमात्म्यांत अस्तंगत होतात. पण तो नुसताच प्राण-निलय नाही. तो प्राणांचा उद्गमहि आहे. सर्व प्राण-प्रवाह त्याच्यापासूनच उगम पावतात तिथूनच त्यांना पुरवठा होत राहतो. म्हणून तो म्हटला आहे प्राणभृत्. अक्रिय आकांशाच्या अंकावर सक्रिय प्राणाची चळवळ चाललेली असते. अनन्तपार आकाशांत कुठल्या कोपऱ्यांत जिरून निःस्पंद झालेला वायु स्वभावतः प्रेरित होऊन परत वाहूं लागतो, परत उसळी मारतो. त्याच्या ह्या उसळीला आधार तो आकाशकल्प अविचल परमात्मा आहे. म्हणून तो प्राणभृत् म्हटला आहे. त्या परमात्म्याच्या धक्क्यापासूनच सगळया प्राण-नौका जीवनाच्या सागरांत सुटतात. सर्व जलप्रवाह शेवटी समुद्रांत विलीन होतात म्हणून समुद्र हा जलनिलय होय, सर्व जलप्रवाह मूलतः समुद्रांतूनच उगम पावलेले असतात. म्हणून समुद्र हा जलभृत् होय. तद्वतच परमात्मा हाहि प्राणनिलय आणि प्राणभृत् आहे. परमात्मा हा प्राण-प्रवाहांचा उद्गम म्हणणे आदि आणि निलय म्हणजे अन्त आहे. एवढेच नव्हे तर ह्या दोन अंतांच्या मध्ये प्रवाहरूपानें विद्यमान असणारा जो मध्य तोहि तोच आहे हे पुढील प्राणजीवन सांगत आहे. अशा प्रकारे ह्या त्रिपदीनें एक पूर्ण विचार इथे मांडला आहे. परमात्मा हाच सर्वतोपरी प्राणाधार आहे, प्राणसर्वस्व आहे-मग हा प्राण पिंडांतला घ्या की ब्रह्मांडांतला घ्या. "केन प्राणः प्रथमः प्रैति युक्तः" अशी उपनिषदें पृच्छा करतात आणि त्याचे उत्तर तो प्राणभृत् परमात्मा असें देतात.

९६२. प्राण-जीवन
प्राणस्य प्राणानां वा जीवनः प्राण-जीवनः । जो प्राणाचें 'जीवन आहे तो प्राणजीवन म्हणावयाचा. आम्ही प्राणानें जगतो. पण प्राण कशानें जगतो ? त्याचा प्राण कोणता ? जो तो प्राणांचाहि प्राण तोच प्राणजीवन होय. आम्ही प्राणीहि वस्तुतः त्याच्याच आधारें प्राणधारण करीत असतों-जगत असतों, प्राणाच्या आधारे नव्हे. परंतु चर्मदृष्टीला तर प्राणच दिसत असतो, तो प्राणांचा प्राण दिसत नाही. तो जो न दिसणारा प्राणांचा प्राण त्यालाच प्राण-जीवन म्हटले आहेः न प्राणेन नापानेन मर्यो जीवति कश्चन । इतरेण तु जीवन्ति यस्मिन्नेतौ उपाधितौ ॥ - मर्त्य प्राणी प्राणापानाच्या योगें नाहीं जगत. वेगळ्याच कुठल्यातरी तत्त्वाच्या आधारें तो जगत असतो. त्याच तत्त्वाला प्राणापान दोन्ही जुंपलेले असतात. तें जें मुलखावेगळे आत्मतत्त्व तेंच प्राणजीवन होय. तुकारामानें त्यालाच "जीवाचें जीवन अमृताची तनु । ब्रह्माण्डभूषणू नारायण' म्हणून आळविले आहे. पिण्डब्रह्माण्डाचे सर्व व्यापार प्राणाधीन आहेत. मनोवाककायक, प्राणबलानेच चालतात. प्राण क्षीण झाले तर देह काम करू शकत नाही. इन्द्रियांची शक्ति क्षीण होते. वाणीहि क्षीण होते. बोलणे मन्द आणि बन्द पडतें. मनोव्यापारहि क्षीण आणि क्षीणतर होऊन मोहाचे म्हणजे अचेतनतेचे साम्राज्य पसरतें. अशा अवस्थेत प्राणोत्क्रमण झाल्यास जीव दुर्गतीस जातो. म्हणून योगी जीवनभर प्राणोपासना करतात. आणि प्रयाणकालीं प्राणनिरोध करून केवल अक्रिय व साक्षिरूप प्राणजीवनास प्राप्त होतात. "भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् । "

९६३. तत्त्व
प्राण हे सगुण सक्रिय तत्त्व आहे तर चित् हें निगुण निष्क्रिय तत्त्व आहे. इथे तत्त्व या पदानें हे चित्तत्त्वच अभिप्रेत आहे. मागील श्लोकार्धात सगुणाचा, प्राणाचा, महिमा गाइला आहे, तर इथे तत्त्वाचा म्हणजे निगुणाचा गाइला आहे. जे हे नव्हे तें तें होय. तें चा भाव तो तत्त्व म्हणावयाचा. इन्द्रियांना वाणीला मनाला में गोचर आहे, ते हे म्हटलें जातें. जें हे नव्हे तें तें होय, तें म्हटले जातें तें तेंच राहते. कारण ते ह्या गोचराच्या आवरणामागे दडलेलें आहे. ऋषि त्याच्या दर्शनासाठी प्रार्थना करतातः
हिण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् ।
तत् त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये ॥

हे प्राणपोषक परमात्म्या ! आम्हा सत्यशोधकांना सत्याचे दर्शन करव, तें निर्मोह सत्य या असत्य जगाच्या मोहक आवरणानें झांकलेलें आहे. तें इन्द्रियांना भुरळ पाडणारे विषयांचे आवरण बाजूला सारून आम्हांला त्या अंतरतर निर्गुण निष्क्रिय निराकाराचे मुख पाहूं दे. हे तत्त्वदर्शन वा आत्मदर्शन केव्हां होतें ? गीतेनें तें एका श्लोकांत स्पष्ट विवरिलें आहे
बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम् ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमथुते ॥ गीता ५-२१

जोंवर देह आहे तोवर बाह्य विषय-स्पर्श होतच राहणार. पण त्यांत शरीरानें यावदर्थ व्यवहार करून जो मनानें असक्त राहतो त्याला आत्मसुखाचा आस्वाद म्हणजे मधून मधून अनुभव होत राहतो. तोच जेव्हां विदेह होतो म्हणजे प्रारब्धक्षयानें त्याचा देह गळून पडतो तेव्हां मात्र तो ब्रह्माचा योग झाल्या कारणानें निरन्तर आत्मसुख भोगीत राहतो. अर्थात् देहाचा संबंध संपल्याकारणानें त्याच्या आत्मसुखांत अंतरायच उरत नाही. तें अक्षय होतें. जो सत्चित्सुखरूप अकृत सहज भाव तोच तत्त्व होय. तोच परमात्मा.

९६४. तत्त्ववित्
तत्त्वं वेत्ति इति तत्त्ववित् । जो तत्त्व जाणतो तो तत्त्वविद् म्हणावयाचा. परमात्माच तत्त्व आहे. आणि तोच तत्त्वविद् आहे. कारण तो स्वसंवेद्य आहे. तो विषय नाहीं, विषयी आहे, जें जें ज्ञान विषयभूत होऊन जाणलें जातें तें सगळे क्षेत्र होय. पण तो क्षेत्रज्ञ आहे. आमचे सगळे ज्ञान क्षेत्र-क्षेत्रज्ञविभागानेच होतें. जिथे असा विभाग होत नाही तिथे ज्ञान संभवत नाही. आत्मतत्त्व हे क्षेत्रज्ञ असल्यामुळे त्याचे ज्ञान होऊं शकत नाही. "विज्ञातारं अरे केन विजानीयातू" जो स्वतःच जाणारा आहे, त्याला कसें जाणणार ? कशानें जाणणार ? त्याला जाणणे शक्य नाही, पण त्याला आपली संवेदना मात्र होते, उपलब्धि मात्र होते. म्हणून त्याला संवित् म्हणतात. दगडाला ज्ञान नाही. कारण त्याला संवेदन नाहीं. ज्याला संवेदन आहे तेंच तत्त्व होय. आणि तेंच स्वतःला अनुभवू शकत असल्यामुळे, स्वोपलब्धि करूं शकत असल्यामुळे तेंच तत्त्ववित् होय. त्यालाच विषयज्ञानहि होऊं शकते. म्हणून तेंच क्षेत्रज्ञहि होय. गीतेंत ह्यालाच अनुलक्षून म्हटले आहेः
"नहि ते भगवन् व्यक्ति विदुर्देवा न दानवाः । गीता १० - १४.२
स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम ॥ गीता १० - १५.१
तसेंच "वेत्तासि वेद्यं च " म्हणूनहि म्हटले आहे. सारांश, जगांत सर्वत्र क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असा विभाग आहे. क्षेत्र हे क्षेत्रज्ञ होऊं शकत नाही आणि क्षेत्रज्ञ क्षेत्र होऊं शकत नाही. मात्र क्षेत्रज्ञाला आपली जाणीव असते. किंबहुना आपली जाणीव असणे हेच, त्याचे स्वरूप होय. त्याच्याच आधारे त्याला क्षेत्राचेहि ज्ञान होत असते. हे सगळे तत्त्व होय आणि हे जो स्वच्छ जाणतो तो तत्त्ववित् म्हणावयाचा. ज्या ज्ञानाचा विषय आणि विषयी अभिन्न असतात तें आत्मज्ञान होय. आणि तें ज्याला झालें तोच आत्मवित् होय आणि तोच तत्त्ववित्.

९६५. एकात्मा
एकश्च असौ आत्माच इति एकात्मा । जो एक असून आत्मा आहे तो एकात्मा म्हणावयाचा. एकात्मा म्हणजे एकरूप आत्मा. सुवर्णाचे नाना अलंकार घडवले जातात पण त्यांची सुवर्णात्मता एकरूपच राहते. तींत कुठलाहि बदल होत नाही. तिचंच नांव एकात्मता होय. हे विश्व-वैचित्र्यहि तसेंच एकात्म आहे. हा सगळा विश्वाकार चिदात्मक आहे. ज्ञानदेवानें विश्ववैचित्र्याची एकात्मता सुवर्णालंकाराच्या दृष्टान्तानेंच विवरिली आहे. विश्वालंकाराचे विसुरे । जही आहाति नाना आकारें । तन्ही घडिले एकें चि भांगारें । परब्रह्मे ॥ उपनिषदें पंचमहाभूतांच्या दृष्टांतांनीं तेंच ऐकात्म्य विवरितात. इथे त्यांपैकी अग्नीचा दृष्टांत दिला आहे. "अग्निर् यथैको भुवनं प्रविष्टो रूपं रूपं प्रतिरूपो बहिश्च । एकस् तथा सर्वभूतान्तरात्मा रूपं रूपं प्रतिरूपो बभूव ॥ " ठिणगी दिवा वीज वा सूर्य सर्व एकाच तेजाची विविध रूपें होत. तसें हें उच्चावच सर्व विश्व एक आत्मरूप आहे. वेदोपनिषदांत गीतेंत एकत्वावर भर दिला आहेः (१) एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति । -वेद् (२) तत्र को मोहः कः शोकः एकत्वं अनुपश्यतः । -उपनिषत् (३) भजत्येकत्वमास्थितः । - गीता पण शंकराचार्य एकत्वाऐवजी अद्वैत हा शब्द अधिक पसंत करतात. त्यांत त्यांचा हेतु आहे. जग भिन्नात्मक दिसत आहे. त्याचा इन्कार करता येत नाहीं, मडकें नि माती एक म्हणता येत नाही. मडके नि माती एकच असल्यास 'आमची माती आम्हांला द्या व आपलें मडकें खुशाल घेऊन जा' असें मृद्वादी म्हणू शकेल. उलट घटवादीहि म्हणू शकेल 'ही घ्या आपली माती नि भरा पाणी. दोन्ही प्रकारें अनवस्था प्रसंग ओढवेल म्हणून जगद्ब्रह्म संबंध हा अद्वैतरूप आहे. जग एक नाहीं, एकात्म आहे.

९६६. जन्ममृत्युजरातिग
जन्ममृत्युजरादि-षड्भावविकारान् अतिगच्छति इति जन्ममृत्युजरातिगः । जन्म मृत्यु जरादि पदार्थांच्या सहा विकृतींना वा अवस्थांना उल्लंघून जातो तो म्हणावयाचा जन्म-मृत्यु-जरातिग, आत्मतत्त्व हे अनात्म-धर्मात कुठेच सांपडत नाही. "जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते म्रियते वा नश्यति" हे आहेत भावांचे म्हणजे वस्तुमात्राचे षड् विकार. त्यांत तो कुठेच सापडत नाही. तो आधी जन्मतच नाहीं. म्हणून त्याला जन्माबरोबर येणारी विकाररूप अनर्थपरंपराहि बाधत नाही. जो जन्मतो त्याला नामरूपात्मक अस्तित्व संभवतें. ज्याला अस्तित्व आहे त्याचीच वाढ होते. सशाचे शिंग वाढत नाहीं. तें विपरिणाम पावत नाही म्हणजे भुयाचे काळे इत्यादि होत नाही. तें अपक्षय पावत नाही. जशी त्याची वाढ होत नाही तशी झीज ही होत नाही आणि शेवटीं तें नाहींसेंहि होत नाही. असे हे पदार्थमात्राचे षड्विकार, हे सहा अनात्मधर्म आत्मतत्त्वाला संभवत नाहीत म्हणून ते म्हणावयाचें जन्ममृत्युजरातिग. इथे या पदांत जन्म हा आदि विकार मृत्यु हा अन्त्य विकार आणि जरा हा आद्यन्तांमधील सर्व विकारांचा वाचक विकार समजावयाचा आहे. तसा जरा हा प्रकार म्हणजे विपरिणाम व अपक्षय हे दोन विकार एकत्र होत. जरेंत काळे केस पांढरे होतात. जीवनशक्ति क्षीण होते. पदार्थांचे हे सहा विकार स्पष्ट स्वतंत्र आहेत आणि ते क्रमिक आहेत. एकाचा दुसऱ्यांत समावेश होत नाही आणि पूर्वपूर्वावांचून उत्तरोत्तर संभवत नाही. जन्मावांचून अस्तित्व नाहीं. अस्तित्वावांचून वृद्धि नाहीं इत्यादि. जन्ममृत्यु स्पष्ट दिसतात. मधल्या अवस्था केव्हां केव्हां दिसतहि नाहींत. त्या सूक्ष्म आणि त्वरित होऊं शकतात. मृतजात वा बालमृत व्यक्तीच्या बाबतींत मधल्या अवस्था दिसत नाहीत पण त्या होऊन गेलेल्या असतात. अध्याहृत असतात.


भूर्भुवः स्वस्तरुस्तारः सविता प्रपितामहः ।
यज्ञोयज्ञपतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाहनः ॥१०४॥


९६७. भूर्-भुवस्-स्वस्-तरु (१)
भूलोक भुवोक आणि स्वर्लोक या त्रिकांडांचा मिळून बनलेला जो तरु तो म्हणावयाचा भूर्भुवःस्वस्तरु. वृक्षाचे तीन मुख्य अवयव म्हणजे मूळ, बुंधा आणि शाखा-पत्र-फळादि विस्तार होय. संसाराला गीतेनें अश्वत्थवृक्षाची उपमा दिली आहे. वृक्ष हा खुडला तोडला तरी तो पुनः पुनः वाढतो. कारण तो सुविरूढमूल असतो. त्याची मुळे खोल रुजलेली असतात. ती मूळेच तोडली पाहिजेत, उपटून टाकलीं पाहिजेत. तेव्हांच तो निर्मुळ होतो, त्याचा बीमोड करायचा तर त्याची सगळी फळे जाळून टाकली पाहिजेत. गीतेचे तत्त्वज्ञान हेंचः
कामनारूप मूळे उपटून टाका, फळवासनारूप बीजें जाळून टाका, सकाम कर्में करू नका. निष्काम कर्में करून त्यांची फळे सोडून द्या. ती ज्ञानाग्निदग्ध करा.
शेती करायची म्हणजे खोडे खणून टाकावीं लागतात आणि तृणबीजें जाळून टाकावी लागतात. कृष्ण-हलधर शेतकरीच होते. त्यांनी आपली धंद्याची भाषा तत्त्वज्ञानांत वापरली आहे. आणि म्हणून संसारावर वृक्षाचे रूपक केले आहे. जीवाचा वासनासंसार हा वृक्ष आहे. वृक्ष हा वृश्च्य म्हणजे छेद्य आहे. परंतु हा परमात्म्याचा विश्वकदंब तरु आहे. तरु म्हणजे तरणसाधन. तरु पाण्यांत तरतो आणि तारतो. म्हणून तो तरु म्हटला आहे. परमात्म्याच्या सृष्टीचे चिंतन केल्यास तें तारक होते. परमात्मा सृष्टीच्या द्वारेंच जीवाला रक्षण पोषण आणि शिक्षण देत आहे. त्यानें विवस्वानाला योग देऊन ठेवला. त्याच्या पासून तो मनूला म्हणजे आद्य विचारी मानवाला मिळाला. अशा प्रकारें तो विश्वतरु झाला आहे.

९६७. भूर्-भुवस्-स्वस्-तरु (२)
स्वःस्थ सूर्यापासून योग शिकायचा. तो आमचा योगविद्येचा गुरु. अनंत सृष्टीपैकी सूर्यच कां ? कारण आमची ही पृथ्वी सूर्यमालेत आहे. सूर्यमालेचा गुरु तोच. तोच आम्हांला प्रत्यक्ष उपलब्ध आहे तो स्वर लोकांत राहतो आणि आपल्या तेजानें आम्हांला प्रचोदित करतो. त्याचे तेज पिऊनच आमची ही पृथ्वी आणि तिच्यावरील जीव जगत आहेत. म्हणून म्हटलें आहेः "सूर्य आत्मा जगतस् तस्थुषश् च" सूर्य हा चर आणि अचर, स्थावर आणि जंगम, दोहोंचाहि आत्मा आहे. म्हणून आम्ही त्याचें ध्यान करतो. त्याच्या त्या तेजाचे पान करतो. ॐ तत् सवितुर् वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ॥ असें गान करतो. सूर्य जसा नैश तमावर मात करून उदित होतो त्याप्रमाणें अज्ञानावर मात करून आम्हांला उन्नत व्हावयाचे आहे. सर्व दुष्प्रवृत्तींवर नि दुवृत्तींवर आम्हांला विजय मिळवायचा आहे. यासाठी आम्हांला सूर्याप्रमाणें अविरत कर्मयोग आचरला पाहिजे. देह आहे तोंवर कर्मत्याग करतांच येत नाही. तें कर्म आपल्या स्वाभाविक गुणांनी नियत झालेच असलें पाहिजे. तें नियत कर्म कष्ट भयानें टाळतां कामा नये, किंवा सुख-लोभानें कवटाळता कामा नये. तर केवळ राग-द्वेषरहित वृत्तीनें करावयाचें. कर्म करण्यापूर्वी काम- संकल्प, करतांना राग-द्वेष आणि केल्यानंतर त्याच्या फळाची आकांक्षा असता कामा नये. असें जो करतो तो कर्म करून कर्म-किल्मिषांतून मुक्त होतो. सूर्यानें शिकविलेला योग तो हाच.

९६७. भूर्-भुवस्-स्वस्-तरु (३)
हा योगोपदेष्टा सूर्य स्वर्गात राहिला. त्याचा अंतरिक्षांतील अवतार म्हणजे विद्युगर्भ मेघ होत. ते विजांची आणि जलधारांची वृष्टि करून या पृथ्वीला सस्य-शालिनी व पुष्पमालिनी करतात. तेहि हे आपले कर्म सूर्याप्रमाणेंच योगयुक्त होऊन करीत असतात.
नापेक्षा न च दाक्षिण्यं न प्रीतिर्न च संगतिः ।
तथापि हरते तापं लोकानां उन्नतो घनः ॥

कारण तो त्यांचा स्वधर्म आहे. स्वधर्म हा केव्हांहि टाकावयाचा नसतो. तसे करणे अधर्म विधर्म वा परधर्म आचरणे होय. आणि तें भयावह आहे. भय आहे कर्मबन्धनाचें. जो स्वभाव-नियत कर्म निष्काम बुद्धीनें, रागद्वेषरहित वृत्तीनें आणि फलाशा न धरतां करीत नाही त्याला कर्माचे बरे वाईट फळ अवश्य चिकटते आणि त्यायोगे तो संसारचक्रांत सांपडतो. त्याला कर्मफलभोगासाठी स्वर्गनरकादि गति आणि पुनर्जन्म याची यातायात करावी लागते. आणि ही अशी यातायात म्हणजे नुसता क्लेश होय. हा मुक्तीचा मार्ग नव्हे. मुक्ति म्हणजे नैष्कर्म्य. त्याचा उपाय निष्काम स्वधर्माचरण च होय. तोच योग. तो "ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान" सर्व अनुभव आत्म्याच्याच द्वारा येत असल्यामुळे आत्मतत्त्वच प्रमाण होय. हाच विचार गीतेंत
ब्रह्मणोहि प्रतिष्ठाहं अमृतस्याव्ययस्य च ।
शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च ॥ गीता १४ - २७

या श्लोकांत आला आहे. निजात्माच परमात्म्याची उपलब्धि करून घेतो. म्हणून तोच ब्रह्माची प्रतिष्ठा होय, आधार होय. अमृत म्हणजे मोक्ष. त्याचाहि आधार तोच होय. कारण मोक्षप्राप्ति त्यालाच व्हायची आहे. तो नसेल तर ज्ञान आणि तत्फलित मोक्ष लाभणार कोणाला ? प्रेम आणि तद्जनित सायुज्य वा ऐक्य अथवा जीवाशिवाची भेट याचाहि आधार आत्मा च आहे. निजात्मा नसेल तर कुणाची भक्ति आणि कुणाची नामरूप-विभक्ति ? स्वरूपभूत आत्मा हा आपला आधार असून तो पररूपभूत परमात्म्याचा' वा परब्रह्माचा आधार आहे. प्रथम पुरुष 'तो', मध्यम पुरुष 'तू', यांचाहि आधार 'मी' च होय. म्हणून च तो उत्तम पुरुष म्हणावयाचा आणि म्हणून च तो प्रमाण.

९६८. तार
तारयति इति तार:| जो संसारसागरांतून स्वभक्ताला तारतो तो तार म्हणावयाचा. गीतेंत भगवंतानें म्हटलेंच आहे:
ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परा:।
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते।। गीता १२ - ६
तेषां अहं समुद्धर्ता मृत्यु-संसार-सागरात्।
भवामि नचिरात् पार्थ मय्यावेशित-चेतसाम्।। गीता १२ - ७

परमात्म्याचा भक्त म्हणजे सत्याचा शोधक, विश्वाचे तत्त्व काय आहे ते शोधणारा. त्याला सृष्टीतील पदार्थमात्र षड्विकार-ग्रस्त आहे हे लक्षात येते, त्याच बरोबर त्या विकारांतून मुक्त असलेलें आत्मतत्त्व हि परिलक्षित होते. विश्वतरूची पाने फुटतात वाढतात पिकतात, गळतात, पण तरु कायमच राहतो. तसें कायम राहणारे एक तत्त्व आहे आणि तदितर सारें नश्वर आहे, हे त्याच्या लक्षांत येते. तदनुसार. तो शाश्वताची कास धरतो आणि अशाश्वताचा त्याग करतो. शाश्वताविषयीं सोऽहंता धरून अशाश्वताविषयीं तो निरहं निर्मम होतो. आणि अशा प्रकारें मृत्युसंसार-सागरांतून त्याचे तारण होते. जें सत्चित्सुखरूप असून जें स्वप्नजागरसुषुप्त या अवस्थांचे नित्य साक्षी आहे तें ब्रह्म मी आहे, हा पांचभौतिक देह मी नव्हें, असा बोध जेव्हां होतो तेव्हां तो पुरुष "मिथिलायां प्रदीप्तायां न मे दह्यति किंचन' असे म्हणू शकतो. मिथिलाच काय सारी सृष्टि प्रलीन झाली तरी त्याचे कांहीं जात नाही. आत्मतत्त्व हे असें तार म्हणजे तारक आहे. जो तार सोडील तो मार खाईल हे उघडच आहे. भगवंतानें म्हटलेच आहे:
"अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसार-वर्त्मनि” 'मृत्यूची धरिती वाट संसारीं मज सोडुनी.'

९६९. सपिता (सविता)
"स पिता स पितामहः" असा पाठ असू शकेल. आज तो 'सपिता प्रपितामहः' असा आहे. सपिता ऐवजी 'सविता' असा हि एक पाठभेद आहे. परंतु सविता पद पूर्वी हि येऊन गेलें आहे हे एक, आणि दोन म्हणजे प्रपितामह पदाच्या सांनिध्यामुळे सदर पद सपिता असेंच अधिक संभाव्य दिसतें, शंकराचार्यांनी हि तें तसेंच घेतले आहे. पण त्यांनी सपिता हे एक पद मानिलें आहे. त्याऐवजी 'स पिता स पितामहः', असें वाक्यरूप घेतल्यास सपिता हा एक कृत्रिम समास घ्यावा लागत नाही. “स सर्वस्य पिता सपिता' असा विग्रह शंकराचार्य करतात. एकच पद घेणे झाल्यास मग पुढील पदाच्या सांनिध्याने आणि सहस्राच्या संवई प्रमाणे तें प्रपिता (प्रपितामहः) असें घेणे योग्य होईल. प्राचीन हस्तलिखितांत प्र चा स झाला असणे शक्य आहे. परंतु या पाठांत थोडी अडचण निर्माण झाली. प्रपिता असा शब्द कल्पावा लागतो. तो रुढ नाहीं. तथापि सपिता या कृत्रिम समासा पेक्षां तो व्याकरणशास्त्राला नि व्यवहाराला हि मान्य होणार आहे. त्याचा अर्थ पितामह होईल. आणि परमात्मा हा पितामह आहे, प्रपितामह असा सुसंगत अर्थ त्यांतून निघेल. पाठ ‘स पिता स पितामहः' असा घ्या वा 'प्रपिता प्रपितामहः' असा घ्या. दोन्ही पाठांत क्रमिकता साधली जाईल. प्रवाहाचा हि निर्वाह होईल. 'सपिता प्रपितामहः' या आजच्या रुढ पाठांत दोन्ही नाही. परमात्मा हा आमचा प्रपिता आहे म्हणजे आमच्या जनकांचा जनक आहे, तो प्रत्यक्ष जनक नाही. म्हणून तो प्रपिता म्हटला जाणे योग्य च आहे. तो आमचा सरळ जनक नाही इतकेच नव्हे तर आमच्या जनकांचा हि सरळ जनक नव्हे. म्हणून तो प्रपितामहः म्हटला आहे. तात्पर्य, तो पूर्वज आहे, प्रपूर्वज आहे.

९७०. प्रपितामहः
परमात्मा पिता नाहीं पितामह हि नाही तर तो प्रपितामह आहे. म्हणजे या सृष्टीशी आणि जीवांशी त्याचा अत्यन्त दूरचा संबध आहे. त्याचे नातें फार दूरचे आहे अगदीं अनादि. सृष्टि ही पांचभौतिक आहे. पंचभूतें ही तिचे सरळ वा प्रत्यक्ष कारण होत. भूतें ही अव्यक्तजनित आहेत. आणि अव्यक्त हे अक्षर ब्रह्माधित आहे. म्हणजे अक्षर हे प्रपितामह झालें आणि अव्यक्त हे पितामह झालें. या अव्यक्तालाच ब्रह्म वा ब्रह्मा अशी हि संज्ञा आहे. याचे स्वरूप त्रिगुणात्मक आहे. म्हणून तो त्रिगुण यज्ञोपवीत धारण करतो आहे आणि चार वेद वैगुण्याचेच प्रतिपादन करीत असल्यामुळे तो चतुर्मुख झाला आहे. तो यज्ञशील असल्यामुळे त्याच्या हातांत मुक्सुवादि यज्ञोपकरणे आहेत. गीता आणि सहस्र दोन्ही महाभारतांतीलच आहेत. आणि त्यांचा घनिष्ट संबंध आहे. गीतेंत "प्रजापतिस् त्वं प्रपितामहश् च" हे वचन आले आहे. त्याचाच इथे "प्रपिता प्रपितामहः". असा अनुवाद आला आहे असे म्हणता येईल. प्रपिता वा सपिता म्हणजे सर्वांचा पिता अर्थात् प्रजापति. ब्रह्मदेवालाच प्रजापति म्हटले जाते. पहा : “सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः" म्हणून प्रपिता पद घेणे आणि तें 'प्रजानां पिता प्रपिता' असें लावणे शक्य आहे. स हा जर सर्वार्थी येऊ शकतो तर प्र हा प्रजार्थी घ्यायला हरकत नसावी. शिवाय तो प्रपितामह इत्यादि पदांत आला आहे. या आणि असल्या कारणांनी 'सपिता 'सविता' या पदांपेक्षां प्रपिता हा पाठ अधिक सयुक्तिक होय. जिथे नानात्व आहे तिथेच पितृपुत्रादि संबंध कल्पितां येतो.-परंतु जिथे मुगत अद्वैत आहे, किंबहुना एकत्वच आहे तिथे कुठल्याहि संबंधाची कल्पना कशी करता येईल? केली तरी ती परमार्थत: स्वीकारता येणार नाही. म्हणून व्यवहारतः जरी परमात्म्याला पिता प्रपिता प्रपितामह इत्यादि संबंध चिकटविले तरी ते मिथ्या होत. कल्पित सृष्टीच्या आणि जीवाच्या दृष्टीने ते आरोपिलेले आहेत. वस्तुत: तर "नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः।" "नह नानास्ति किंचन।" "आत्मैव इदं सर्वम्।" हीच परमार्थता आहे.

९७१. यज्ञ
यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञाङ्गो यज्ञ-वाहन:। हा संपूर्ण उत्तर श्लोकार्ध आणि पुढील संपूर्ण श्लोक प्राय: यज्ञाला वाहिलेला आहे. यज्ञ हा अति प्राचीन काळापासून वैदिक आर्यांच्या जीवनाचा गाभा राहिला आहे. त्यांच्या विचाराचें, जीवन-पद्धतीचे म्हणजे संस्कृतीचे आणि प्रत्यक्ष दैनंदिन जीवनाचें केन्द्र यज्ञच होता. यज्ञासाठी मंत्र, यज्ञासाठी तंत्र. सर्व विद्यांचा, कलांचा विकास त्यांतून झाला. जेव्हां एखादा समाज अशा एखाद्या विचाराने झपाटला जातो तेव्हा त्याचा सर्वांगीण विकास त्यांतूनच कसा होतो ह्याचें भारतीय आर्यांची यज्ञप्रधान संस्कृति हे एक उत्तम निदर्शन आहे. घराची उभारणी जशी पायावर होते तशी जीवनाची उभारणी ज्या तत्त्वावर होते त्याचे नांव श्रद्धा. आजतागायत भारतीय आर्यांचे हे श्रद्धास्थान यज्ञच राहिले आहे. कोणताहि विचार, कोणता हि उच्चार आणि कोणता हि आचार यज्ञाशी जोडल्यावांचून त्याला समाधान वाटत नाही. त्याविना तो पावन होत नाहीं, ग्राह्य होत नाही. विचारक ब्रह्मविचार करतो. त्याला तो यज्ञाच्याच परिभाषेत मांडतो.
ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना|| गीता ४ - २४

कवि काव्य करतो आणि म्हणतो माझा हा वाग्यज्ञ आहे. शूर लढतो आणि म्हणतों, मी हा समर-यज्ञ करीत आहे. कोणी धनी उतारूंसाठी घर बांधतो त्याला तो नांव देतो धर्मशाळा म्हणजे यज्ञशाळा. कोणी सदाव्रत घालतो त्याला म्हणतात अन्नसत्र म्हणजे अन्नयज्ञ. सारांश संपूर्ण जीवन यज्ञमय बनविण्याची ही प्रेरणाच, आमचे मूल धन असून त्याभावनेने केलेलें प्रत्येक कर्म यज्ञ होय.

९७२. यज्ञपति
कोणता हि मंत्र घेतला तर त्याला ऋषि, दैवत आणि छंद ह्या तीन गोष्टी असावयाच्याच. ऋषि म्हणजे तो मंत्र पाहणारा मंत्रद्रष्टा. दैवत म्हणजे ज्या भावाला उद्देशून तो मंत्र संबोधिला आहे तो भाव वा विषय. आणि छंद म्हणजे मंत्र-वर्णांची रचना ज्या विशिष्ट पद्य प्रकारांत झाली आहे तो गायत्री अनुष्टुभ् इत्यादि वाग्बंध, मंत्र म्हणजे वैदिक शब्द ही एक कृति आहे आणि कृति म्हटली म्हणजे तिला कर्ता, उद्दिष्ट वा हेतु आणि क्रिया ही अंगें असलीच पाहिजेत. तदनुसारच ऋषि दैवत छंद ही मंत्रांची कारणे होत. यज्ञ ही देखील अशीच एक कृति आहे, कर्म आहे. म्हणून त्याला कर्माचा कायदा लागू होतो. यज्ञकर्माचा जो उद्देश तोच यज्ञाचा नियामक असल्यामुळे त्यालाच यज्ञपति म्हटले आहे. परमात्म्यालाच उद्देशून यज्ञ होतो. म्हणून तो परमात्माच यज्ञपति होय. परंतु प्रत्येक यज्ञाचे प्रयोजन परमात्मा असतो असें कसें म्हणतां येईल? याचे उत्तर हे की जे प्रयोजन असतें तोच त्याचा परमात्मा समजा. दशरथाने पुत्रासाठी यज्ञ केला. तेव्हां दशरथाच्या त्या यज्ञाचा देव, त्याचा यज्ञपति, तो पुत्र झाला. तो भगवान् रामचंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने पित्याचा पुत्र-काम पुरविला आणि विश्वामित्राच्या यज्ञाचे रक्षण केलें. जीवाच्या सर्व कामना, ज्यांनी प्रेरित होऊन तो नाना कर्मे करतो अन्तरात्याची जीवनाच्या दर्पणांत उमटलेली प्रतिबिंबें होत. प्रतिबिंब हे जसें बिंबाहून वेगळे म्हणजे स्वतंत्र नसते तशा पुरुषाच्या कामना त्याच्याहून स्वतंत्र नाहीत. म्हणून सगळे पुरुषार्थ हे वस्तुत: परमात्मरूपच होत. म्हणूनच म्हटले आहे वेदांत : हे देवा तूं गाय मागणाराची गाय होतोस नि अश्व मागणाराचा अश्व होतोस. "गोकामाय गव्यसे, अश्वकामाय अश्वसे।" सारांश, यज्ञांत पूजिला जाणारा यज्ञपुरुष हा यजमानाचा कामरूप आत्मभावच असतो. म्हणून तो यज्ञपति म्हणावयाचा.

९७३. यज्वा
यज्वा म्हणजे यज्ञकर्ता यजमान. परमात्मा हा हेतु रूपाने यज्ञकर्माचा प्रेरक आहे म्हणून तो यज्ञपति म्हटला. पण प्रत्यक्ष यज्ञकर्म करणारां जो जीव तो हि तोच आहे. म्हणून तो यज्वा म्हणावयाचा. 'कर्ता करविता नारायण' असे म्हटले आहेच. परोक्षरूपाने प्रेरणा देऊन करविणारा आणि प्रत्यक्ष यज्ञकर्म करणारा हे दिसायला वेगळे आहेत, परंतु तत्त्वत: ते एकच आहेत. कर्माचा प्रेरक काम हा एक आत्मशक्तीचा आविर्भाव आहे. त्याच आत्मशक्तीचा दुसरा आविर्भाव म्हणजे कर्मक्षम कर्तृत्व आहे. एक भाव प्रेरणा देतो, एक तद्नुसार उद्यम करतो, कर्म करतो. एक पूर्वरूप आहे, एक उत्तररूप आहे. सर्व खेळ एकाच तत्त्वाचा आहे. ऐंद्रजालिक म्हणजे मायावी एकच असतो. तो आपल्या मायेच्या योगें नाना रूपें, नाना नामें, नाना कर्मे आणि नाना फळे धारण करीत असतो. तद्वत् या विचित्र विश्वाचे हे बहुरंगी जीवन एकाच चिच्छक्तीचा विलास आहे. या वस्तुस्थितीला उद्देशूनच म्हटलें आहे: “इन्द्रो मायाभिः पुरुरूप ईयते." यज्ञाची भाषा बोलतांना इथे यज्ञ आणि तत्संबंद्ध सारें तो परमात्माच आहे, हा विचार आला आहे. तो परमात्मा यज्ञ आहे म्हणजे तो यज्ञपति आहे, यज्वा आहे, यज्ञांगें आहे, यज्ञकर्म आहे, यज्ञफल आहे आणि यज्ञफल-भोक्ताहि तोच आहे, असें सामग्रयाने समाजावयाचे आहे. यज्ञ हे ब्रह्म म्हणजे सर्वकारण म्हटल्यानंतर यज्ञसिद्धीसाठी आवश्यक असणारे सगळे कांहीं तोच आहे. हे ओघानेच आलें. तेंच परोपरीने विस्तारून सांगितले आहे. आणि तसे करतांना कित्येक नामें समानार्थक पूर्णत: वा अंशत: आली आहेत.

९७४. यज्ञाङ्ग
यज्ञस्य अङ्गानि एव अङ्गानि यस्य सः यज्ञाङ्गः। यज्ञांगें हीच ज्याची अंगें होत तो यज्ञाङ्ग म्हणावयाचा. परमात्मा हा यज्ञ आहे म्हटल्यानंतर यज्ञाची जी अंगें ती सर्व त्याची अंगें झाली हे सांगायला नकोच. शंकराचार्यांनी "यज्ञा अंगानि अस्य इति यज्ञाङ्गो वराहमूर्ति:" असे म्हणून यज्ञमूर्ति वराहाचे हरिवंशांत केलेलें वर्णन उद्धृत केले आहे. यज्ञांगाचा परिचय त्यावरून होतो. ती अंगें क्रमाने वा सामग्रयाने आली आहेत असे नाही किंवा तीच घेतली पाहिजेत असें हि नाहीं. महानारायणीयोपनिषदांत त्रिसुपर्णाच्या शेवटी यज्ञमय झालेल्या पुरुषाचे वर्णन आले आहे. त्यांत हि यज्ञांगें आली आहेत. ही दोन्ही रूपकात्मक उद्धरणे पुढे दिली आहेत.
वेद-पादो यूप-दंष्ट्रः क्रतु-हस्तश् चितीमुखः।
अग्निजिह्वो दर्भ-रोमा ब्रह्म-शीर्षों महातपाः।।
अहोरात्रेक्षणो दिव्यो वेदान्तश्रुति-भूषण:।
आज्य-नासः सुव-तुण्डः सामघोष-स्वनो महान्।।
धर्मसत्यमयः श्रीमान् क्रमविक्रम-सक्रियः।
प्रायश्चित्तनखो घोरः पशु-जानुर् महाभुजः।।
उद्गात्रन्त्रो होम-लिङ्गः फलबीजमहौषधिः।
वायवन्तरात्मा मन्त्र: स्फिक् विकृत: सोमशोणित:।।
वेदी-स्कन्धो हविर-गन्धो हव्यकव्यास्थिवेगवान् ।
प्राग्वंश-कायो द्युतिमान् नानादीक्षाभिरर्चितः।।
दक्षिणा-हृदयो योगी महासत्रमयो महान्।
उपाकर्मेष्टि ऋचकः प्रवर्यावर्तभूषणः।।
नानाछन्दो गतिपथो गुह्योपनिषदासनः।
छायापत्नीसहायो वै मेरुशृङ्ग इवोच्छ्रितः।। --हरिवंश


तस्य एवं विदुषो यज्ञस्य, आत्मा यजमान:, श्रद्धा पत्नी, शरीरं इध्म, उरो वेदी, लोमानि बर्हिः इत्यादि -- तैत्तिरीयोपनिषत्
सत् कर्माने मनुष्य सद्गतीला जातो ही श्रद्धा आहे. सर्व कर्मांत पवित्रतम कर्म म्हणजे यज्ञ होय. यज्ञाच्यायोगें क्षपित-कल्मष होत्साता मनुष्य केवल दोषरहित असा पुण्यमय यज्ञरूपच होऊन जातो. याच परिणतीला स्वर्ग म्हटले आहे. पण कर्माच्या योगें प्राप्त होणारी उत्तमोत्तम गति हि सदोषच असणार अशा विचाराने नैष्कर्म्यवादी ज्ञानोपासनेवरच भर देतात. 'सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते असा त्यांचा सिद्धान्त आहे या दोन्ही विचारांना एकवटून जीवाची मरणोत्तरगति यथाकर्म व यथाश्रुत होते असें निष्कर्षिलें आहे. स्थूल यज्ञक्रिया शेवटी सूक्ष्म विचारप्रक्रियेत परिणत होऊन ब्रह्मकर्मसमाधींत पर्यवसित झाली आहे आणि कर्म व ज्ञान यांचे अद्वैत साधले आहे. अन्तिम निष्ठेत आदर्शात द्वैत राहूं शकत नाही.

९७५. यज्ञ-वाहन
यज्ञं वाहयति इति यज्ञवाहन:। यज्ञस्य वाहन: इति यज्ञ-वाहनः। यज्ञो वाहनं अस्य इति वा यज्ञ-वाहनः। यज्ञाला वाहतो. तो यज्ञवाहन म्हणावयाचा अथवा यज्ञच ज्याचें वाहन आहे तो यज्ञवाहन म्हणावयाचा. यज्ञकर्माची प्रेरणा, यज्ञकर्माची शक्ति नि साधनें, आणि शेवटी यज्ञकर्माचे फळ हि तो परमात्माच देतो आणि म्हणून तो परमात्मा यज्ञ-वाहन म्हणावयाचा. कोणत्याहि कर्माच्या निर्वाहासाठी, सिद्धीसाठी संकल्प, शक्ति नि फल-निष्पत्ति या तीन गोष्टी आवश्यक आहेत. यापैकी एका हि गोष्टीची उणीव असल्यास त्या कर्माचा निर्वाह होत नाही. तें कर्म लंगडें होतें. तें कर्म उभे राहूं शकत नाही. तिपाईचा एक हि पाय नसल्यास ती उभी राहू शकत नाही त्याप्रमाणे. या तीन तत्त्वांचा हि आधार एक महान् तत्त्व आहे श्रद्धा. ती आत्मश्रद्धा नसेल तर या कर्मनिष्पादक तत्त्वांचा कांही उपयोग नाही. त्यांना कर्म-रचनेला अधिष्ठानच लाभत नाही. म्हणून म्हटले आहे:
अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत्।
असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह।। गीता १७ - २८

श्रद्धयाग्निः समिध्यते श्रद्धया हूयते हविः।
श्रद्धां भगस्य मूर्धनि श्रद्धे श्रद्धापयेह नः॥ ऋग्वेद

असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम् ही नास्तिकता म्हणजे जगांत शाश्वत कांहीं नाहीं हा शून्यवाद अश्रद्धा होय.या उलट अशाश्वत,परस्परांच्या संयोगाने निर्माण झालेल्या आणि अकर्तृक भासणाऱ्या जगाच्या पसाऱ्याच्या बुडाशीं एक शाश्वत तत्त्व आहे, त्याच्याच आधारे हे जग निर्माण झाले आहे, चाललें आहे आणि शेवटी त्यांतच विलीन व्हायचे आहे किंबहुना होत आहे या दर्शनाचें नांव आहे श्रद्धा. ही श्रद्धा नसेल तर सर्व कर्मांचा खटाटोप व्यर्थच होय. कारण त्या सर्वांचा परिणाम शून्य होय. आस्तिक शून्यवादी नाही. तो ब्रह्मवादी आहे, पूर्णवादी आहे. त्या आधारे त्याचे जीवन चालतें, सफल होतें. पूर्ण होतें. दक्ष नास्तिक होता. म्हणून त्याचा यज्ञ ध्वस्त झाला. "ध्रुवं कर्तुः श्रद्धाविधुरमभिचारायहि मखाः" परमात्मा हा अशा प्रकारें श्रद्धवंतांचा यज्ञ-वाहन तर अश्रद्धांना यज्ञ-विध्वंसक आहे.
परमात्मा हा अधियज्ञ असल्यामुळे म्हणजे यज्ञ द्वारा आत्मशुद्धि होत असल्यामुळे तो 'यज्ञ आहे वाहन ज्याचा असा' यज्ञवाहन होय. इन्द्र जीमूतवाहन आहे कुबेर नरवाहन आहे तसा परमात्मा यज्ञवाहन.


यज्ञभृद्‍ यज्ञकृद्‍ यज्ञी यज्ञभुग् यज्ञसाधनः ।
यज्ञान्तकृद्‍ यज्ञगुह्यमन्नमन्नद एव च ॥१०५॥


९७६. यज्ञभृत्
यज्ञं बिभर्ति इति यज्ञभृत्। जो यज्ञाला धारण करतो तो यज्ञभृत् म्हणावयाचा. आम्ही सर्व जीव देहभृत् आहों म्हणजे देहधारी आहों. पण यज्ञभृत् ही पदवी त्यांतील फार थोड्यांनाच लाभते. हे जग काय आहे? याचे स्वरूप काय आहे? आम्ही जीव कोण आहोत? आमचे स्वरूप काय आहे.? अशी तत्त्वजिज्ञासा असे मानव प्राणी या जीवविश्वांत, या चौन्यांशी लक्ष योनीत कितीसे आहेत ? योनि या नात्यानें आधीं मानव असंख्यांपैकी एक. त्या मानव योनीतहि खाणे पिणे विणे या पलीकडे ज्यांची दृष्टि जाते असे थोडे. तेहि साहित्य संगीत कला इत्यादि आत्ममोहनाच्या मागे लागलेले. म्हणजे व्यसनी, एकांना दृष्टिच आलेली नाही, तर एक दृष्टि असून मदान्ध आहेत. या दोन कोटी सोडल्या म्हणजे मनुष्य समाजांत फारच थोड्या व्यक्ति अशा आढळतात की ज्यांना तत्त्व-जिज्ञासा शिवली आहे असे म्हणता येईल. या जिज्ञासूंतहि क्षणिकच फार, ज्यांची जिज्ञासा टिकाऊ स्वरूपाची आहे असे चिवट जिज्ञासेचे कितीसे आढळतात ? जे कांहीं आढळतात त्यांतून संप्रदायरूप जडतेंत सांपडणारेच अधिक. देहनिरपेक्ष विशुद्ध आदर्श डोळ्यासमोर अविचल ठेवून तदर्थ काया वाचा मनें निरन्तर निरलस झटणारे केवळ विविक्त दृष्टीचे परम हंस पुरुष खरोखरच सुदुर्लभ. त्या अशांनाच उद्देशून गीतेत म्हटले आहे. 'मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये । यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः ॥ हे पुरुष यज्ञभृतां वर होत. परंतु आत्मशुद्धीचा ज्यांचा निश्चय झाला असून त्या वाटेला जे लागले आहेत ते सगळे साधक यज्ञभृत् होत. परमशुद्धिस्वरूप आदर्श म्हणजे ब्रह्म होय, आणि त्याच्या प्राप्तीचे म्हणजे आत्मशुद्धीचे सर्व उपाय यज्ञ होत. हाच विचार गीतेच्या भाषेत 'एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे । कर्मजान् विद्धि तान् सर्वांन्' असा आला आहे. अंश हा अंशीहून वेगळा नसतो. म्हणून प्रत्येक यज्ञभृत् हा यज्ञपुरुष परमात्माच होयः

९७७ यज्ञकृत्
यज्ञं करोति इति यज्ञकृत् । जो यज्ञ करतो तो यज्ञकृत् म्हणावयाचा. गुण आणि गुणकार्ये यांच्याशी अज्ञानामुळे मनुष्य में आपलें तादात्म्य कल्पितो आणि त्या कल्पनेत में कांहीं करतो ते सगळे त्याला स्वरूपापासून दूर नेतें, आडवाटेस लावतें. याचंच नांव आहे 'जुहुराण एन' वांकडे जाणारे पाप. हे पाप ज्या ज्ञानदृष्टीनें नाहीसे होते तिचे नाव पुण्य आहे. त्या ज्ञानदृष्टीला पोषक जो विचार उच्चार वा आचार तोहि उपचारानें पुण्य म्हटला जातो. तोच यज्ञ होय. स्वरूपज्ञान हे अव्यक्त आहे. तें देहवंताला व्यक्त क्रियेच्या द्वारा हळू हळू आकलन होते. सामान्य विषयशानहि आपल्याला व्यक्त पदार्थांच्या व क्रियांच्या साहाय्यानेच अवगत होते. दोन नि दोन चार होतात. मुलाला ते आपण दोन चिंचोक्यांत आणखी दोन चिंचोके घालून आणि मोजायची क्रिया करायला लावून शिकवतो आणि अशा प्रकारें तें शमूर्त ज्ञान तो मूर्ताच्या साहाय्यानें शिकतो. यज्ञ हाहि असाच एक पदार्थपाठ आहे. त्यांत हवनीय अग्नि, हवन-द्रव्य आणि हवन-क्रिया यांच्या द्वारा आपण 'अग्नये स्वाहा, इदं न मम असें म्हणत गुण आणि गुणकार्य यांहून मी वेगळा आहे हे आत्म-ज्ञान आत्मसात् करीत असतो. हा देह मी नव्हे, हे कलत्रपुत्रमित्रादि देहसंबंध आणि हयगजरथादि वा सूवर्णरजतादि द्रव्ये माझी नव्हेत. हे सगळे अनात्म होत आणि मी यांचा ज्ञाता केवळ चितिस्वरूप आत्मा आहे हे ज्ञान यज्ञाच्या द्वारा माणसाच्या ठाई उगवू लागते. किंबहुना ज्या स्थूल कर्माच्या द्वारा हा ज्ञानोपकार होतो ती सगळी कर्मच यज्ञ होत. अग्निदेवता द्रव्य आणि क्रिया या यज्ञीयांचे स्वरूप शेवटी ब्रह्मच होते. कारण
"ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म-समाधिना ॥ गीता ३ -२४

'सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञानें परिसमाप्यते' हे आहे कर्ममय यज्ञाचे पर्यवसान. तें लक्षून जें केलें जातें तेंच कर्म यज्ञ होय. आणि तेंच मोचक, अन्य, सर्व कर्म बन्धक होय.. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्म-बन्धनः परमात्मा हा कर्मबन्ध-मुक्त असल्यामुळे तो उघडच यज्ञकृत् होय.

९७८. यज्ञी
यज्ञी म्हणजे यज्ञवान्. जीव जसा स्वभावतः देही आहे, देही जसा स्वभावतः कर्मी आहे, तसा कर्मी हा स्वभावतः यज्ञी नाही. तो तशी इच्छा करील तर यज्ञी होऊं शकतो इतकेंच. स्वाभाविक गुणानुसार देह आणि कर्में जर लाभतात तर त्याच स्वाभाविक गुणांना अनुसरून स्वधर्मरूप यज्ञहि माणसाला लाभला आहे असे म्हणणे योग्य होईल आणि तसा तो स्वभावतः यज्ञी आहे हे
सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः ।
अनेन प्रसविष्यध्वम् एष वोऽस्त्विष्टकामधुक् ॥ गीता ३ - १०

या वचनावरून दिसूनहि येते. परंतु हा स्वधर्मरूप सहज यज्ञ माणसाकडून सहजासहजी आचरला जात नाही, त्यासाठी त्याला आत्मज्ञान आणि तज्जनित आत्मसंयम याची आवश्यकता असते. ज्ञानं आणि संयम यांच्या अभावीं सहजहि असलेला स्वधर्म आचरला जात नाही. मनुष्य स्वरूपानुसंधान ठेवण्या ऐवजी विषयध्यान करूं लागतो आणि त्यांतून संग काम क्रोध मोह स्मृतिभ्रंश या परंपरेनें बुद्धिनाशाची निष्पत्ति होते. विषय-ध्यानाऐवजी जेव्हां मनुष्य आत्मस्मृतिमान् होऊन जितात्मा होतो तेव्हां तो स्वधर्मरूप यज्ञ करण्यास समर्थ होतो. असा आत्मबलवान् धीर पुरुषच स्वधर्मयज्ञक्षम असून तोच यज्ञी होय. इतर नुसते कर्मी वा कर्मसंगी होत. आम्हीं गुण-संग, गुणकर्म-संग आणि गुणकर्मफल-संग टाकून आत्मस्मृतिमान् स्वधर्मनिष्ठ आणि कर्मफलत्यागी व्हायला पाहिजे. अशालाच गीता. यज्ञी म्हणजे कर्मयोगी आणि संन्यासी म्हणजे कर्मफलसंन्यासी म्हणते. केवळ अग्निहोत्र राखल्यानेच कोणी योगी होत नाही, तर आत्मा कर्ता भोक्ता नाही ह्या आत्मज्ञानाची ज्योति प्रज्वलित राखल्यानेच तो योगी होतो. केवळ कोणतें कर्म न करण्यामुळेच कोणी संन्यासी होत नाही तर सर्व कर्माच्या फलाचा त्याग केल्यानेच तो संन्यासी होतो.
अनाश्रितः कर्मफलं कार्य कर्म करोति यः ।
स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥ गीता ६ - १

गीतेनें अशा उभयदोषरहित व उभयगुणसमन्वित आदर्शाचा पुरस्कार केला आहे. हा आदर्श आचारणारा यज्ञी होय. परमात्मा हा सदैव स्वरूपस्थित असल्यामुळे तो सूर्यवत् यज्ञी आहे. कर्में करीत असूनहि फलाशा त्याला नाहीं, फलाशा नसूनहि तो सदैव कर्मरत आहे.

९७९. यज्ञभुक्
यज्ञं भुञ्जते भुनक्ति इति वा यज्ञभुक् । जो यज्ञाचा भोक्ता आहे अथवा रक्षिता आहे तो यज्ञभुक् म्हणावयाचा. परमात्मा च सर्व यज्ञ दान त आणि कर्में यांचा हेतु असल्यामुळे त्याच्याच प्रीत्यर्थ सगळे यज्ञ, सगळी दानें, सगळी त आणि सगळी कर्में होत असल्यामुळे तो यज्ञभुक् होय. 'सत्य संकल्पाचा दाता भगवान् सर्व करी पूर्ण मनोरथ' या लोकोक्तीप्रमाणें तो परमात्मा सर्व संकल्पांना सर्व ऋतूंना, जन्म देऊन त्यांना तडीस नेणारा आहे. म्हणून तो यज्ञभुक् म्हणजे यज्ञरक्षणकर्ताहि आहे. हे दोन्ही अर्थ गीतेच्या 'अहंहि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च'. या वचनांत क्रमानें आले आहेत, असे म्हणता येईल. सर्व भूतांच्या अन्तर्यामी वास करणारा तो परमात्मा त्यांच्या त्या त्या क्रतूंना, त्यांच्या त्या त्या संकल्पांना वा मनोरथांना सुफलित करून त्यांच्या योगें प्रसन्न होत असतो, प्रीयमाण होत असतो. आत्मप्रसादच शेवटी सर्व फलितांचे फलित आहे. तें फलित जोंवर हातीं लागत नाहीं तोंवरच सर्व स्वाध्याय यज्ञ दान तप आदि साधनें करावयाची. आत्मप्रसाद लाभल्यानंतर मग ती सगळी निष्प्रयोजन होतात, पण त्याआधी केव्हांहि नाही. आणि ज्या अर्थी आत्मप्रसाद हा जोंवर देह आहे तोंवर पूर्ण झाला आहे असे म्हणताच येत नाहीं. त्याअर्थी साधनेंहि निष्प्रयोजन होऊन कुंठित झाली असें कधीच होत नाही. जो सदेह असून तशी कल्पना करील तो मिथ्यावादी आहे, वा भ्रान्त आहे, वा भविष्यवृत्तीनें बोलत आहे असे समजावें. गीतेंत एवढयाच साठी म्हटले आहे ः "अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्" ज्यांनी आत्मतत्त्व ओळखलें आहे त्यांच्या निकट देहाच्या अंतरपटाच्या आड ब्रह्मा, निर्वाण म्हणजे भावरूप पूर्ण शान्ति बसत असते. ब्राह्मी स्थिति अनुभवणाऱ्या, विदितात्म पुरुषांचीहि प्रयाण-साधना तरी अवशिष्ट राहतेच. सर्वसाधना-पर्यवसानभूत ब्रह्मनिर्वाण आत्म्याचे स्वरूपच असल्यामुळे तो परमात्मा यज्ञभुक् होय.

९८०. यज्ञ-साधन
यज्ञं साधयति, यज्ञस्य साधनः इति वा यज्ञसाधनः । अथवा यज्ञः साधनं अस्य इति यज्ञ-साधनः । यज्ञ साधतो तो यज्ञ-साधन म्हणावयाचा. यज्ञाचें साधन म्हणूनहि तो यज्ञ-साधन म्हटला जाईल. अथवा यज्ञ हेच ज्याचे साधन आहे तो यज्ञ-साधन म्हणावयाचा. क्रियोपकारक तें कारक म्हटले जाते. सर्व कारकांत कर्ता प्रधान म्हणून प्रथम तें कारक झालें, परंतु इतरहि कारकें आहेतच आणि ती गौण म्हटली तरी कारकेंच आहेत. यज्ञ ही एक क्रिया आहे, तेव्हा तिची कारकें वा करणेहि असणारच ती सगळी यज्ञक्रियोपकारक वा यज्ञसाधक असल्यामुळे त्यांना साधन म्हटले आहे. यज्ञाची सगळी साधनें अग्नि, हविव्य, हवन-क्रिया, हवनोपकरणे, हवनमंत्र, होता आणि स्वतः पत्नीसह यजमान हे सगळे यज्ञसाधनीभूत झालेले परमात्मस्वरूपच होत. कारण त्यांच्यावांचून यज्ञ-सिद्धि होत नाही. चंदनाचे अवयव जसे चंदनच होत, तद्वत् यज्ञ-पुरुषाची अंगोपांगेंहि यज्ञच होत. म्हणून तो यज्ञपुरुष परमात्मा यज्ञसाधन म्हटला आहे. यज्ञ हे साधन आहे ज्याचें तो यज्ञ-साधन, असा बहुब्रीहि समास घेऊन वेगळा अर्थ करतां येतो आणि तोहि समर्पकच आहे. कारण परमात्मा हा यज्ञक्षपित-कल्मष पुरुषांनाच भेटतो. आमची बुद्धि गुणावृत असल्यामुळे निर्गुण परमात्म्याचा बोध होत नाही. ते गुणावरण जेव्हां दूर होते तेव्हांच आत्मदर्शन होते. यासाठीच योगी काया वाचा मनें म्हणजे सर्वात्मना सतत झटत असतात. या झटण्याचे खपण्याचेच नांव यज्ञ आहे. हा.आत्मशुद्धीचा यज्ञ अप्रमत्त राहून रात्रंदिवस वर्षानुवर्ष नि जन्मानुजन्म करावा तेव्हां कुठे तें आत्मदर्शन होतें, "बहूनां जन्मनां अन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते" ज्ञानदेवो म्हणे "बहुतां जन्मांचा अभ्यासु । तरीचि होय सोरसु परब्रह्मीं ॥ "

९८१. यज्ञान्तकृत्
यज्ञस्य अन्तं करोति इति यज्ञान्तकृत् । जो यज्ञाचा अन्त करतो तो यज्ञान्तकृत् म्हणावयाचा. कोणतीहि क्रिया ही कितीहि दीर्घ काल चालली तरी ती केव्हांना केव्हां तरी संपणारच. ज्या गोष्टीला आरंभ आहे तिला अंतहि असलाच पाहिजे. आत्मशुद्धीच्या अभीष्ट प्रक्रियेलाहि हा नियम लागू आहे. तीहि कुंठित होते. ती जिथे कुण्ठित होते. तो यज्ञान्त होय आणि जो यज्ञान्त तोच यज्ञान्तकृत्. परमात्मा हा सर्व साधनांचे अन्तिम फलित असल्यामुळे त्याच्या दर्शनाबरोबर सर्व क्रिया निरुद्ध होऊन निवृत्त होतात. तो अक्रिय आहे. अ-क्रियाविषय आहे. त्याच्यांत कोणतीहि क्रिया प्रविष्ट होत नाही. "यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह' असे त्याचे स्वरूप आहे. देहेन्द्रियांची गति स्थूल व परिमित आहे. त्या पलीकडे प्राणाची आणि प्राणात्म वाणीची गति होते. कारण ती सूक्ष्म आहेत. पण मनाची गति या दोहोंहून फार फार मोठी आहे. तुलनाच होऊं शकणार नाही इतकी ती विलक्षण आहे. कारण मन हे अत्यन्त सूक्ष्म आहे आणि त्याचा वेग प्रचंड आहे. पण त्याचाहि लाग आत्मतत्त्वाच्या ठाईं लागत नाही. कारण तें आत्मतत्त्व निर्गुण आहे आणि मन आहे गुणजनित. तात्पर्य, कियामात्र जिथे निरुद्ध होते तें आत्मतत्त्वच यज्ञान्तकृत् होय. पण त्याला इथे विशेषतः यज्ञान्तकृत् म्हणण्यांत एक हेतु आहे. यज्ञ ही आत्मशुद्धीची क्रिया आहे. आत्मशुद्धीची जी परिसीमा, ती तो नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव आत्मा आहे, ती परिसीमा गांठल्यानंतर आत्मशुद्धीची प्रक्रिया सफल होऊन आपोआपच कुंठित होते. गन्तव्य गांठल्यानंतर गति कुंठित होते हे खरे पण या कुंठित होण्याला कुंठितता न म्हणतां सफलता म्हटले जातें, कृतार्थता म्हटले जाते. म्हणून या स्थितीला वैकुंठ असें नांव आहे. इथे सर्व कुंठा कुंठित झाली आहे म्हणून तिचे नांव वैकुंठ होय. तोच यज्ञान्तकृत् नि यज्ञान्त. कारण, स्वभाववंताहून स्वभाव वेगळा असत नाही.

९८२. यज्ञ-गुह्य
यज्ञस्य गुह्यम् यज्ञगुह्यम् । यज्ञाचें गुह्य तें यज्ञगुह्य म्हणावयाचे, प्रत्येक गोष्टीचें एक बाह्य व एक आभ्यंतर रूप असते. बाह्य तो देह होय, आभ्यंतर तो आत्मा, जीवात्म्यासाठी देह असतो, देहासाठी आत्मा नसतो. त्याप्रमाणें प्रत्येक कर्माचे आहे, कलेचे आहे, विद्येचे आहे. त्यांचे बाह्य रूप त्यांच्या अन्तरतर आत्म्याच्या प्रकाशनासाठी असते. जिथे तें अन्तरतर अन्तर्यामी तत्त्व प्रकाशित होत नाही तिथे तें अन्तरतर कर्म, ती कला, ती विद्या विकल नि विफल होते. द्रोणाचार्यापासून धनुर्विद्या सर्वच कौरव पाण्डव शिकले होते, परंतु त्या विद्येचे गृह्य वा रहस्य जसें अर्जुनानें आत्मसात् केलें होतें तसे इतर कोणी करूं शकला नाहीं; म्हणून सर्व वीरांत तो एकवीर झाला. अभिमन्युहि महारथ होता, परंतु त्याची विद्या रहस्यज्ञानांत उणी होती. त्यामुळे चक्रव्यूह भेदूं शकला तरी त्यांतून त्याला बाहेर पडतां आलें नाहीं. तो मारला गेला. जी गोष्ट समरयज्ञाची तीच ब्रह्मयज्ञाची, वा कोणत्याहि यज्ञाची. जोवर त्या कर्माचे, धर्माचें, कलेचे वा विद्येचे रहस्य आत्मसात् केले जात नाहीं तोवर त्याचे उत्तम फल, समग्र फल आणि यथाकाल फळ मिळत नाही. "तत् तत् कर्म कृतं यदेव मुनिभिस् तत्तत्फलैर् वञ्चितम्" असें म्हणण्याची पाळी त्या रहस्य-ज्ञान नसणारावर येते. म्हणून यज्ञकान यज्ञगुह्य आधी समजून घेतलें .पाहिजे. तदधीनच यज्ञाचें साफल्य आहे. यज्ञो यज्ञपतिर् यज्वा इत्यादि यज्ञ-प्रकरण संपवतांना म्हणूनच शेवटी यज्ञगुह्य हें नाम आले आहे. कोणतें आहे हे यज्ञ-गुह्य ? फलहेतु ठेवून कर्म न करणे आणि कर्म करून फलाकांक्षा न धरणें हें तें गुह्य होय. (१) शास्त्रविहित, (२) केवळ धर्मबुद्धीनें, (३) समत्वयुक्त चित्तानें आणि फलाकांक्षा न धरता जो यज्ञ केला जातो तोच निर्दोष म्हणजे सात्विक यज्ञ होय. त्यांतहि फलत्याग रहस्य होय.

९८३. अन्न
अद्यते इति अन्नम् । जें अदन केलें जातें तें अन्न होय. या विश्वाचे विश्लेषण अनेक प्रकारें संभवते. त्यापैकी अन्न आणि अन्नाद हा एक प्रकार आहे. या दृष्टीनें पाहिल्यास विश्वांत दोनच वस्तु दिसून येतात. अन्न आणि अन्नाद. यांनाच जीव आणि जगत् म्हणावयाचे. जीवाच्यासाठी जगत् आहे. म्हणून ते अन्न होय. अन्नाचा अन्नाला काही उपयोग नाही. तें अन्नादाच्या च उपयोगाचें. जडाचा जडाला कांहीं उपयोग नाही. तें चेतनाच्याच उपयोगाचें. गर्भ राहिला की स्तन्य वाढू लागते. स्तनंधयाच्या जन्माबरोबर तें वाहू लागते. स्तनधय तर्णक झाल्यावर ते आटू लागते. तद्वत् पुरुषार्थ सिद्ध झाला म्हणजे प्रकृतीचे कृतकृत्य गुण प्रतिप्रसूत होऊन निलीन होतात. पण जोवर पुरुषाचा अर्थ सिद्ध होत नाहीं तोवर प्रकृतीच्या गुणांचा खेळ चालूच रहायचा. परमात्मा चेतन आहे, तेव्हा त्याला अन्न कसें म्हणता येईल ?.तो तर अन्नादच म्हटला पाहिजे. पण अन्न आणि अन्नाद, जड आणि चेतन हा विभाग वरवरचा आहे. वस्तुतः तें उभयात्मक एकंच तत्त्व आहे. अनात्म वस्तु, असात्म्य वस्तु आत्मसात् कशी होईल. सात्य वस्तुच आत्मसात् होऊं शकते. म्हणून अन्न आणि अन्नाद, जड आणि चेतन एकराशिच होत. एक गूढ चेतन आहे, दुसरें रूढ चेतन आहे इतकेंच. "पुरुष एव इदं सर्वं यद् भूतं यच्च भव्यम् । उतामृतस्य ईशानो यद् अन्नेनातिरोहति । " या ऋचेचाच अनुवाद "अन्नं अन्नाद एव च" हा चरण करीत आहे. या जगांतील सर्व चराचर जीवन, जीव आणि जगत् दोन्ही, शेवटीं परमात्मसात् व्हावयाचे असल्यामुळे तें अन्न होय.

९८४. अन्नाद (एव च)
परमात्मा हा नुसतें अन्न नाहीं, तो त्याबरोबरच अन्नादहि आहे. एव च या पदद्वयांतून हा अर्थ निघतो. "सहस्रांत सर्वत्र नामेंच आली आहेत, नामेंच आहेत. त्यांत चवैतुहि पादपूरण क्वचितच आहे. आणि जिथे तें आलें आहे तिथें तें पादपूरण नाहीं तर साभिप्राय आले आहे इथल्या सारखें. जगांत प्रकृति आणि पुरुष, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अथवा क्षर आणि अक्षर अशी दोन तत्त्वे दिसून येतात. आणि ती दोन्ही परमात्म्याची च नामरूपें होत. म्हणजे प्रकृति होत. परमात्मा हा त्या दोहोंहून वेगळा आणि वरिष्ठ आहे, असें पुरुषोत्तमयोगांत म्हटले आहे. वेदान्ताचा हा सिद्धान्त आहे. सांख्यशास्त्र प्रकृति आणि पुरुष म्हणजे जड आणि चेतन असें द्वैत प्रतिपादितें. योगशास्त्र त्याला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असें रूप देते. हे द्वैत नसून विभाग मात्र आहे. पण वेदान्तशास्त्र या दोहोंना क्षर व अक्षर पुरुष म्हणून अद्वैतच प्रतिपादितें. ती दोन जड चेतन अशी परस्पर भिन्न तत्त्वे न म्हणतां ती दोन्ही पुरुष म्हणजे चेतनच होत असें म्हणते. अन्न आणि अन्नाद ही परिभाषा वेदोपनिषदांची आहे. प्राचीनतर आहे. अन्न खाऊन अन्नाद वाढतो. परमात्मा हा क्षर जगत् नि अक्षर जीव या दोहोंनाहि आपलें अन्न करतो. या दोन्ही परा अपरा प्रकृतींना गिळतो. म्हणून तोच शेवटीं एक अन्नाद होय, जगद्‌भाव आणि जीवभाव दोन्ही औपाधिकच होत. परम तत्त्व म्हणा वा सनातन पुरुष म्हणा एक परमात्माच आहे.
द्वाविमौ पुरुषौ लोके, क्षरश्चाक्षर एव च ।
क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थो अक्षर उच्यते ॥ गीता १५ - १६
उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः ।
यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः ॥ गीता १५ - १७
यस्मात्क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः ।
अतोऽस्मिलोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः ॥ गीता १५ - १८.


आत्मयोनिः स्वयंजातो वैखानः सामगायनः ।
देवकीनन्दनः स्रष्टा क्षितीशः पापनाशनः ॥१०६॥


९८५. आत्म-योनि
आत्मा एव योनि यस्य सः आत्मयोनिः । आत्माच ज्याचे उपादान कारण होय तो आत्मयोनि म्हणावयाचा. घट-शरावादिकांचे उपादान मृतिका होय. कटककुंडलादिकांचे उपादान सुवर्ण होय. पण मृतिकेचें वा सुवर्णाचे उपादान घट-शरावादिकांच्या वा मणि-कुंडलादिकांच्या पुरतें बोलायचे झाल्यास दुसरें नाही. मृत् सुवर्ण स्वोपादान होय, आत्मयोनि होय. परमात्माहि तसाच या विश्वाचे उपादान असून त्याचे आपलें उपादानहि तोच आहे. कारण, तो सर्वकारण आहे. झाडाला मूळ असते, पण मुळाला मूळ असत नाही. कारण स्वतःच ते मूळ आहे. ते स्वतःच झाडाचें मूळ असते, त्याचे दुसरे मूळ नसते. म्हणूनच तर त्याला मूळ म्हटले जाते. तद्वत् या विश्वकदंबाचें मूळ तो परमात्मा असून तो स्वतः आत्ममूळ म्हणजेच आत्मयोनि आहे. योनि शब्द कारण या अर्थानें प्राचीन वाङ्मयांत रूढ आहे. 'शास्त्रयोनित्वात् हें ब्रह्मसूत्र प्रसिद्धच आहे. लिंगशब्दहि तसाच कारण या अर्थानें रूढ आहे. जगाचे उपादान आणि निमित्त उभय कारण परमात्मा आहे हे योनि (साळुका) व (शिव) लिंग यांच्या प्रतीकाच्या रूपानें प्रतिभावंत कवींनी कल्पिलें आहे. पुढचें नाम स्वयंजात परमात्म्याचे निमित्त-कारणत्व सुचवीत आहे.

९८६. स्वयंजात
स्वयं स्वतो वा स्वेच्छया वा जातः स्वयंज़ातः । जो . आपल्याच प्रेरणेनें झाला आहे तो स्वयंजात वा स्वयंभू म्हणावयाचा. परमात्मा हा अज असल्यामुळे त्याला स्वयंजात असे म्हटले असले तरी तें लाक्षणिक होय. त्याचे तात्पर्य इतकेंच की त्याच्या सत्तेचे निमित्तहि तोच स्वतः आहे. मडके घडते तेव्हां त्या मडक्यासाठी माती लागते आणि मडकें घडविणारा कुंभारहि लागतो. ही दोन्ही असल्यावाचून मडकें घडू शकत नाही. तरों कोणतेंहि कार्य घडावयाचे झाले म्हणजे त्याला मृद्वत् उपादान कारण लागते आणि कुलालवत् निमित्तकारणहि लागते. परमात्म्याच्या सत्तेला ही दोन्ही कारणे स्वतःच आहे तो. आपल्याच चित् धातूपासून आणि आपल्याच चिद्बलानें आपली सत्ता घडवून आहे म्हणून तो म्हटला आहे आत्ायोनि नि स्वयंजात, आमच्याजवळ देहाच्या भाषेहून वेगळी दुसरी भाषा नसल्यामुळे आम्ही अयीनिजाला आत्मयोनि नि आणि अजाताला स्वयंजात म्हणून संबोधीत आहोत. वस्तुतः त्याला ना माता, ना पिता. प्रसवपवनाचा त्याला मुळी सार्शच नाही. तो या विश्वाचें कारण आहे पण स्वतः तो अ-कारण आहे.खरे म्हणजे त्याला विश्वाचे कारण म्हणणे हाहि आरोपच करणे होय. कारण तेहि विश्वाच्या अपेक्षेनें बोलणे झालें आणि तो आहे विश्वनिरपेक्ष केवलस्वरूप. त्याच्या दृष्टीनें आपल्यावेगळे दुसरें मुळी कांहीं नाहींच. त्यामुळे कार्यकारणभाषाच मुळीं लटकी ठरते तथापि भावनेच्या भरांत आई जशी बाळाला अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं म्हणून आळवीत असते तसे भक्त भगवंताला सहस्रावधि नामांनी आळवतांना दिसते. त्या सर्वांनी त्याचे निरतिशय प्रेमास्पदत्व मात्र प्रकट होते. अन्य सर्व शून्यच होय.

९८७. वैखान
विशेषेण खनति इति विखानः । तस्य अयं इति वैखानः । जो विशेषतः खणतो तो विखान म्हणावयाचा. त्याचा जो पुत्र तो म्हणावयाचा वैखान. सामान्य खनक खणून आपल्या शेतांतील खोड-कुंदा काढून टाकतो. परंतु विशिष्ट खनक संसाराची पाळें मुळे खणून टाकतो. कर्माची मुळे खोलवर पसरलेली आहेत. त्याचे मुख्य मूळ अविद्या आहे. तज्जनित काम सर्व कर्माचा हेतु आहे. त्या कर्माच्या फलांची वासना ह्या नवनवीन फुटणाऱ्या आणि परत परत रुजणाऱ्या पारंब्या होत. असा हा जीवाचा संसारवृक्ष जन्मोजन्मीं वाढत जाऊन त्याचे वनच बनले आहे. तें जो सर्व कर्मजटा खणून काढून साफ - करतो आणि तिथे नैष्काचे पीक घेतो तो विखान होय. आणि त्याचे तें नैष्कर्म्य, त्याचा तो स्वरूप-लाभ हाच वैखान. पूर्वरूप जीव होय. उत्तररूप परमात्मा होय, म्हणून तो परमात्मा जणू त्या विखान जीवाचा, साधकाचा पुत्र म्हणावयाचा, वैखान म्हणावयाचा. हा संसारवृक्ष, त्याचा छेद करणारा साधक, त्याचें असंगरूप शस्त्र आणि त्यानें कापून साफ करावयाचा मार्ग आणि तद्द्वारा गांठावयाचें तें वनाच्या पलीकडचे गन्तव्य म्हणजे मुक्काम, परमधाम हा सगळा चित्रपट गीतेनें पंधराव्या अध्यायाच्या आरंभी फार थोड्या आणि म्हणून सूचक शब्दांत चितारला आहे. तिथे विखान आणि वैखान याचे वर्णन पुढीलप्रमाणें क्रमानें आलें आहेः
निर्मानमोहा जितसंगदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त-कामाः ।
द्वंद्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् ॥ गीता १५ - ५
न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः ।
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ गीता १५ - ६


९८८. साम-गायन
सामानि गायति इति साम-गायनः । जो सामें गातो तो सामगायन म्हणावयाचा. पण साम म्हणजे काय ? साम म्हणजे इतिकर्तव्यता झाल्यावर माणसाला प्राप्त होणारी धन्यता. जीत कुठल्याहि विषमाला स्थान नाहीं त्या साम्य-दशेरें नांव होय साम. काम हे एक टोक, साम हे दुसरें टोंक. जोवर काम आहे, कर्तव्याची जाणीव आहे, तोंवर माणसाला चैन कुठली ? तो सदैव बेचैन च रहायचा. पण ज्याचे काम-संकल्प संपले आहेत, कुठलें कर्तव्य म्हणून शेष राहिलेलें नाहीं त्याचे काम एकच, स्वानंदांत डुंबत रहायचे आणि स्वानन्दोद्गार काढत जायचे. हे जे धन्योद्गार त्याचंच नांव साम होय. आणि ते जो काढत राहतो तो होय साम-गायन. इथे गायक न म्हणतां गायन म्हटले आहे. त्यांत हेतु आहे. गायक हा कर्मवाचक शब्द आहे, तर गायन हा स्वभाववाचक शब्द आहे. तो नैष्कास पोंचलेला साधक स्वभावतः सामगान करीत राहतो. तो दुसरे काय करणार ? स्वधर्माच्या रगड्यांत ज्ञानाचा सोमरस गाळून तो पिऊन जे तरी झाले ते सामगान करीत राहतात. हाउ हाउ हाउ असें साम आलापत राहतात. हाउ हाउ हाउ या शब्दाचा काय अर्थ ? इथे शब्दाला अर्थाला, भावाला वाव नाहीं. हा त्या स्थूल सूक्ष्म आणि सूक्ष्मतर भूमिकांच्या पलीकडचा निभृत आनंदाचा कल्लोळ आहे. तृप्तीचा तो ढेकर आहे. उपाशी माणसाला जसा तृप्तीचा ढेकर येणें नाहीं तसा परमसाम्यरूप परमात्म्याला पोंचल्या वांचून सामगायनहि करता यावयाचे नाही. अर्थात् जो सामगायन करील तो सामरूप झालेलाच समजला पाहिजे. म्हणून तो परमात्माच सामगायन होय. उपचारानें त्या अवस्थेला पोचण्याची पात्रता बाळगणारेहि सामगायन म्हणावयाचे !
इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः ।
निर्दोषंहि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः ॥ गीता ५ - १९


९८९. देवकी-नन्दन
देवक्याः नन्दनः देवकी-नन्दनः । देवकी नन्दयति इति वा देवकी-नन्दनः । देवकीच्या पोटी जन्मून ज्यानें तिला कंसाच्या कैदेतून मुक्त करून आनन्दित केलें तो देवकीनन्दन म्हणावयाचा. प्रत्येक पुत्रच आपल्या जन्मानें आईला आनन्दवीत असतो, म्हणून तो नन्दन होय. तसा देवकीचा प्रत्येक पुत्रच देवकीनन्दन होय. परंतु इथे देवकीनंदन म्हणजे भगवान् कृष्ण होय. कारण त्यानेंच कंसाला मारून आपल्या आईबापांची कैदेतून सुटका केली आणि त्यांना विशेषतः सुखविलें आहे. आईचे व बापाचे दुःख समानच होते. परंतु आईच्या नितान्त असहायताजनित तीव्र भावनेमुळे तिचे दुःख परमावधीचे होते. म्हणून तिलाच तो विशेषतः नन्दन म्हणजे सुखविणारा झाल्यास नवल नाही. म्हणूनहि तो कृष्ण परमात्मा देवकीनन्दन म्हणविला आहे. हाच भाव प्रसिद्ध नमनाच्या श्लोकांत 'देवकीपरमानन्दं' म्हणून प्रकट झाला आहे. चन्द्र सर्व जगालाच आलादवीत असतो, परंतु अनन्यगतिक चकोराला तो विशेषतः सुखवीत असतो. हा विशेष चन्द्रांत तितका नाहीं जितका तो चकोरांत आहे. म्हणून तो कृष्ण परमात्मा वसुदेव-सुत असला तरी देवकी-नन्दन आहे. परमानन्द आहे, देवकी-परमानन्नद आहे. जोवर जीव आपल्याला देवकीप्रमाणें सर्वस्वीं असहाय समजून परमात्म्याला अनन्यभावानें शरण जात नाही तोवर त्याला तो देवकीनन्दन या जीवत्वाच्या कारेंतून मुक्त करून तो आत्मानन्द देत नाही. इथून पुढे ग्रंथ-समाप्तीपर्यंत सर्व नामें कृष्ण परमात्म्याला अनुलक्षून आली आहेत. कारण भीष्माला आणि व्यासाला कृष्ण हा वर्तमान अवतार होता.

९९०. स्रष्टा
सृजति इति स्रष्टा । जो सृष्टि करतो तो म्रष्टा म्हणावयाचा, देवकीचा नंदन हा मर्त्य-बुद्धीनें पाहतां कामा नये. तो देव आहे. या पटीचा कर्ता आहे, या पृथ्वीचा पनि आहे, क्षितीश आहे, तो सर्व पाप नाहींसें करणार पाप-नाशन आहे. दिवकीनन्दनः स्रष्टा क्षितीशः पापनाशनः" हा संपूर्ण श्लोकार्ध कृष्णाचें दिव्य जन्म कर्म सांगणारा आहे, अर्थात् त्याचे मर्त्यत्व निरस्त करणारा आहे. कृष्णाचें विश्वरूप पाहून अर्थात् त्याचे दिव्यत्व ओळखून आपण आजवर त्याच्याशी मर्त्यबुद्धीनें वागलों याबद्दल अर्जुन खेद करतो, क्षमा मागतो आणि प्रसन्न हो म्हणून विनवितो आहेः
सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति ।
अजानंता महिमानं तवेदं मया प्रमादात् प्रणयेन वापि ॥गीता ११ - ४१
यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहार-शय्यासन-भोजनेषु ।
एको ऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत् क्षामये त्वामहमप्रमेयम् ॥ गीता ११ - ४२
तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कार्य प्रसादेत्वामहमीशमीड्यम् ॥ गीता ११ - ४४.१

जोंवर दिव्यत्वाची प्रतीति होत नाही, तोवर जीव इतरांशी मर्त्यबुद्धीनें वागत राहतो. पण जेव्हां त्याला दिव्यत्वाची ओळख पटते, त्याला खेद होतो. तो क्षमा मागतो. तो कृपा भाखतो. भगवन्तानें स्वतःच म्हटलें आहेः
नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया-समावृतः ।
मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ॥ गीता ७ - २५

भगवन्ताचें हें अभिज्ञान करून घेण्याची आस्था न बाळगणारे ते दुष्कृति होत, पापी होत. स्वरूपाची ओळख करून न घेतल्यामुळे ते शेवटीं आसुर भावास प्राप्त होतात. परंतु जे हे अभिज्ञान करून घेऊ इच्छितात ते' मोहांतून सुटून पुण्यमागनिं शेवटी देवत्वास पावतात. अशा चतुर्विध भक्तांमध्ये ज्ञानी हा शिरोमणि होय. कारण तो परमात्म्याचे तत्त्वतः ज्ञान राखतो. "आस्थितः सहि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् । " इतर भक्त जिज्ञासु असतात. श्रद्धेनें भजत असतात. परमात्मा ह्या सृष्टीचा कर्ता आहे या पृथ्वीचा पालक आहे, आम्हा भक्तांचे पाप हरण करणारा आहे, असें म्हणून ते त्याला भजत असतात. परमात्मा अशा श्रद्धावंत पुण्यात्म्यांनाहि बुद्धियोग देऊन स्वरूप-साक्षात्कार करवितो.

.९९१. क्षितीश
क्षितेः ईशः क्षितीशः । क्षितीचा म्हणजे पृथ्वीचा जो ईश तो क्षितीश म्हणावयाचा. सृष्टि क्षिति आणि देह हे उत्तरोत्तर निकटवर्ती परिधि होत. आमचे अगदी लगतचे आवरण म्हणजे देह. हाच भूलोक होय. आमचा देह ज्या लोकांत वावरत आहे तो भूलोक म्हणजे भुवोक होय. आणि आमचा भूगोल आणि इतर सगळे गोल ज्या विश्वांत वावरत आहेत तो स्वोक होय, अशी ही आमची त्रिलोकी आहे. हेच आमचे विश्व, या विश्वाची सृष्टि करणारा तो स्रष्टा होय. त्यांतील ज्या भूगोलाशी आमचे जीवन विशेषतः निगडित आहे त्या भूगोलाचा शास्ता तो क्षितीश होय. आणि ज्या विशिष्ट देहांत राहून आम्ही सुख-दुःख अनुभवतो आहों, जो घेऊन आम्ही स्वर्गनरकादि उच्चावच लोकांत संसरत आहों, तो देहच पाप होय, आणि त्या पापाचा नायनाट करणारा तो पाप-नाशन होय. तो देवकीनन्दन कृष्ण परमात्माच स्रष्टा आहे, क्षितीश आहे आणि पापनाशनहि तोच आहे. म्हणून क्रमानें स्रष्टा क्षितीशः पापनाशनः हीं पदें आली आहेत. या पृथ्वीवर मानवाचे शासन चालत नाहीं तें त्या परमात्म्याचे आहे. परमात्मा धर्माचे रक्षण आणि अधर्माचे पारिपत्य करून या क्षितीचें ईशन करीत आहे. जे राजे महाराजे आणि शासकवर्ग या ईश्वरी कार्यात सहायभूत होतात ते तितक्या अंशानें ईश्वरी कार्यच करतात. जे त्याच्या विरुद्ध वागतात ते धर्मद्रोही रावण-दुर्योधनाप्रमाणें नाश पावतात. परमात्म्याचे हे ईशन अत्यंत व्यापक आणि सूक्ष्म असल्यामुळे जीवाच्या लक्षात येत नाही आणि वृथाच हा आपल्याला राजा म्हणवत असतो. वस्तुतः राजा तो आहे, क्षितीश तो आहे.

९९२. पाप-नाशन
पापं नाशयति इति पाप-नाशनः । पाप नाहींसें करतो तो पापनाशन म्हणावयाचा. स्वरूपाचे विस्मरण म्हणजे मरण होय आणि तेच पाप, हे पाप कशामुळे घडते ? देहात्मबुद्धीमुळे घडते. म्हणून ती देहात्मबुद्धि नि तो देह पाप होय. याच गोष्टीला अनुलक्षून आम्ही म्हणतोंः
पापो ऽहं पापकर्माहं पापात्मा पापसंभवः ।
त्राहि मां पुण्डरीकाक्ष सर्वपापहरो हरिः ॥

देहात्मबुद्धीच्या योगेंच आम्ही देहधारी होतों, म्हणून म्हणावयाचें पाप-संभव, पापापासून जन्मलेला. जो पापाचा झालेला तो म्हणावयाचा पाप, म्हणजेच पापी. जो पापी असतो त्याचे बाह्य कर्म तर पापमय असतेंच पण त्याचे अंतरहि पापमय च असते. कारण, जसें अंतर तसेंच त्याचे कर्म होत असते. म्हणून म्हटलें आहे- पापकर्मा आणि पापात्मा. अशा या पापी जीवाचें पाप कोण नाहींसें करतो ? तें तो पुण्डरीकाक्ष हरि करतो. पुण्डरीक म्हणजे श्वेतकमल. त्याप्रमाणें ज्याची निर्मल शानदृष्टि अनात्म देहादिकांच्या ठाई सर्वत्र असक्त आहे तो विविक्तदृक् परमात्मा पुण्डरीकाक्ष होय आणि तोच देहात्मबुद्धीचे हरण करतो म्हणून तो हरि. आणि जो हरितोच पापनाशन. देहात्मबुद्धीच्या अंधाऱ्या रात्री माणूस सहजच पापाच्या आडवाटेस लागतो आणि जितका जितका तो भटकत जातो तितका तितका तो अधिकच मार्गापासून नि मुक्कामापासून दूर पडतो.हे सगळे पाप आत्मबुद्धि-रूप दिवाकराच्या उदया बरोबर नाहींसें होते म्हणून तो हरि, म्हणून तो पाप-नाशन म्हणावयाचा.


शङ्खभृन्नन्दकी चक्री शार्ङ्गधन्वा गदाधरः ।
रथाङ्गपाणिरक्षोभ्यः सर्वप्रहरणायुधः ॥१०७॥


९९३. शंखभृत्
शङ्खभृत् शंखं बिभर्ति इति शंखभृत् । जो शंख धारण करतो तो म्हणावयाचा शंखभृत्. "शंखभृत् नन्दकी चक्री" इत्यादि हा श्लोक सहस्राचा शेवटचा श्लोक आहे. इथे परमात्याचे नुसतें नाम नाहीं गाइलेलें, त्याचे रूप रेखाटलेलें आहे. डोळ्यांसमोर त्याची मूर्ति उभी केली आहे. कशी आहे ती मूर्ति ? अक्षोभ्य, म्हणजे शान्ताकार. तो सर्वलोकैकनाथ परमात्मा आपल्या अचिन्त्य शक्तीच्या सामर्थ्याच्या प्रभावामुळे शान्त आहे. सर्व भयें केवळ त्याच्या सत्तेनेच निरस्त झालेली आहेत. सर्व दुष्टांचा कायमचा बन्दोबस्त झाला आहे आणि सर्व सज्जनांचा सांभाळ झाला आहे. सदासर्वकाळ सर्वत्र धर्माची स्थापना झाली आहे. अशुभाचे कुठे नांव उरलेलें नाहीं. सर्वत्र परिपूर्ण मंगल आहे. हे आश्वासन गर्जत त्याचा पाञ्चजन्य शंख त्याच्या हातांत विराजमान आहे. म्हणून तो म्हटला आहे शंखभृत्. आरंभीच हे आश्वासन देणारे त्याचे शंखभृत् ध्यान अगदी योग्य असेंच आहे. शंखचक्रगदापद्मधारी चतुर्भुज विष्णूच्या ध्यानांतहि आधीं शंखच येतो. तिथे तो दिग्रतत्त्वाचा वाचक आहे. सगळया दिशा त्याच्या मुठींत आहेत. चक्र कालतत्त्वाचे वाचक आहे. सर्व काल त्याच्या हातांत आहे. भूतभविष्यवर्तमानात्मक कालचक्राचा तो नियन्ता आहे. गदाभृत् हे निग्रह-शक्तीचे गमक असून पद्म हे अनुग्रहशक्तीचे गमक होय. तो सर्वशक्तिमान् परमात्मा दिक्कालातीत असून सर्व लोकांचा नि सर्व काळांचा शास्ता आहे. निग्रहानुग्रहसामर्थ्य त्याचे आहे. हे रहस्य त्याचे शंखचक्रगदापद्मधारी चतुर्भुज रूप उलगडून सांगते. शंख हा जसा दिक्तत्त्वाचा वाचक आहे तसा तो शब्दगुण आकाशाचाहि वाचक आहे. सत्यस्वरूप परमात्म्याचा शब्द म्हणजे वेदशास्त्र होय. सर्वज्ञान त्यांत निहित आहे. त्या सत्यज्ञानमय वेदशास्त्राचे प्रतीकच असा तो शंख भगवंताच्या हातांत आहे. तो विधिनिषेधमुखानें दुहेरी घोष करतो. निषिद्ध आचराल तर तुम्हांला भय आहे. विहित आचराल तर अभय आहे, असें तो गर्जून सांगत आहे. त्यांतच दुष्टांना शिक्षण व सज्जनांना रक्षण आहे. आणि सर्व अमंगल नष्ट होऊन केवल मंगलच मंगल नांदेल याचे आश्वासन आहे.

९९४. नन्दकी
नन्दकी म्हणजे नन्दक नांवाचे खड्ग धारण करणारा. शिवाजी महाराजांची भवानी तलवार प्रसिद्ध आहे, तसें भगवंताचें नन्दक खड्ग. वीरांची शस्त्रे त्यांच्या पराक्रमी धर्मकार्यामुळे नावानें प्रसिद्ध आहेत, मग भगवंताची आयुधे, त्याचा रथ, त्याचे अश्व, त्याचा सारथि इत्यादि नांवानें प्रसिद्ध असल्यास नवल नाही. कारण तो परमात्मा तर जगदेकवीर आहे. तिन्ही लोकी आणि तिन्ही काळी तो दुष्टांचे निर्दलन, सज्जनांचे पालन आणि सद्धर्माची स्थापना करणारा आहे. या भगवत्कार्यास सहायभूत नन्दक असीला पाहून जगाला अभय मिळतें आणि तें आश्वस्त होतें, आनंदित होते. म्हणून त्या भवभयभंजन, मुनिजनरंजन खड्गाचें नांव नन्दक होय. शत्रु-संकटांत सांपडलेल्यांना आपली सुटका करण्यासाठी आलेल्या मुक्तिसेनेची शस्त्रे पाहून किती आनंद होतो ! तशी भगवंताची सगळी शस्त्रे सुदर्शन आहेत, नन्दक आहेत. ती परमानन्द देणारी आहेत, परम दुःखांतून भवभयांतून सोडवणारी आहेत. निरनिराळ्या रोगावरील निरनिराळ्या शस्त्रक्रियांसाठी शल्यचिकित्सक ज्या प्रमाणें निरनिराळी शस्त्रे बाळगतो आणि वापरतो त्याप्रमाणें भगवंताचीं नाना शस्त्रे भवरोगनिवारणांतील नाना कार्यासाठी वापरली जाणारी आहेत. धडापासून मुंडके वेगळे करायला तलवार वापरली जाते, त्याप्रमाणें अविद्येचे मूळच छेदून टाकण्यासाठी विद्यामय नन्दक असि वापरला जातो. यमनियमांच्या वा शमदमांच्या गदा-घातानें अर्धमेल्या झालेल्या अविद्येची उरली सुरली धुगधुगी तिचे मुंडके मारलें जातांच संपते. हा अंतिम सफाईचा हात विद्यामय नंदक मारतो. त्यानंतरच निर्भेळ परमानन्द लाभायचा, म्हणून भगवंताच्या हातांतील असीचे नाव नंदक.

९९५. चक्री
चक्री म्हणजे सुदर्शनचक्रधारी, शंखचक्रगदापद्म ही आहेत चतुर्भुज विष्णूची मुख्य आयुधे वा आभूषणें. जें जीवितकार्य असते त्याची उपकरणे म्हणजे आयुधेच त्याची आभूषणे होतात. कृषिवला. कृषि हे जीवितकार्य होय. त्या कृषिकार्याची जी उपकरणें तींच त्याची आयुधे म्हणावयाची, आयुध शब्दापासूनच आउत शब्द आलेला आहे. मनुष्यसमाज हा मुख्यतः कृषिजीवी आहे. त्यामुळे चक्र हल मुसल ही त्याची सहजच आयुधे झाली. चक्री म्हणजे गाडीवान. शेताचे बांधबंधारे बांधण्यासाठी दगडमाती वहावी लागते. शेतांत खतमूत वहावे लागते, कुंपणासाठी कांट्या वाहाव्या लागतात. शेतांतून घरी लाकूडफाटा आणावा लागतो, शेतमाल आणावा लागतो, कडबा कुटार आणावे लागते. गाड्या वांचून हे होऊं शकत नाही म्हणून तो चक्री हवा. कृष्ण धाकटा भाऊ म्हणून त्याच्या कडे गाईगुरे राखायचे व गाडी हांकायचे हलकें काम आलें. बलराम वडील भाऊ म्हणून त्याच्याकडे नांगर धरायचे व मुसळानें मळणी करायचें भारी काम आलें. ह्या कामाच्या वाटणीमुळे कृष्ण गोपाळ व चक्री म्हणजे चक्रधर म्हणून प्रसिद्ध आहे तर बलराम हली व मुसली म्हणून प्रसिद्ध आहे. मनुष्याचा देव मनुष्याकृति आणि त्याचा धंदा करणाराच असावयाचा. तदनुसार आमचा देव चक्री म्हणजे गाडीवान गडी आहे. तो कृषि गौरक्ष्य वाणिज्य काम करणारा आहे. त्याच्या रक्षणासाठी. त्याला केव्हां केव्हां आउत सोडून हत्यारहि धरावें लागतें हाती. त्याहि कारणानें तो मग रथांगपाणि होतो. शस्त्रपाणि होतो. प्रसंगी कर्तव्यमोह होऊन क्षोभ झाला असतां त्याला आउत नि आयुधहि बाजूला ठेवून अक्षोभ्य वृत्तीनें ज्ञानोपदेश देऊन मोहनिवारणहि करावे लागते. अशाहि प्रकारें तो धर्मचक्रप्रवर्तनामुळे चक्री होय.

९९६. शार्ङ्गधन्वा
शार्ङ्गनाम धनुः अस्य अस्ति इति शार्ङ्गधन्वा । ज्याचे धनुष्य शृंगाचे बनलेलें आहे तो म्हणावयाचा शार्ङ्गधन्वा. भगवान् विष्णु शार्ङ्गधन्वा म्हटला आहे. विष्णूचे म्हणजे आदि पुरुषाचे हत्यार गदा आहे. परंतु त्याच्या दश अवतारांत धनुर्धारी म्हणून प्रसिद्ध दाशरथी रामच आहे. एक दगडाचा गोळा आणि त्याला सुलभतेनें हाताळायला एक दांडा जोडला की झाली तयार गदा, अश्मयुगीन मानवाचें तें हत्यार आहे. पण त्याला धार नव्हती. त्यालाच धार करून आणि वजनानेहि हलकें करून परशु बनला आहे. पण हा काळ पर्यंत लोहाचा शोध लागला होता. तेव्हां प्रस्तर व ताम्र मागे पडून हत्यारे लोखंडाची बनूं लागली व लोहयुगांत पहिले महत्त्वाचे हत्यार तयार झालें परशु म्हणजे नवकुठार. त्याचा जंगी प्रयोग भार्गव रामानें केला म्हणून तो परशुराम म्हणून प्रसिद्ध आहे. पण परशूला धार आली तरी तो लांब फेकतां येत नव्हता. दूरच्या सावजाला त्यानें मारतां येत नव्हते. त्यासाठी धनुष्याचा शोध झाला. धनुष्यानें बाण म्हणजे सूक्ष्म भाला फेकून मारतां येऊ लागला. हे धनुष्य म्हणजे बाण फेकायचे साधन, ज्याला चाप वा इष्वास म्हणतात, शिकारी मानवानें प्रथम धनुराकार सावजाच्या जोड-शिंगापासून, शिंगाच्या कांबीपासून व त्याच्याच आंतड्याची तांत जोडून करणे अगदी स्वाभाविक होय. आणि त्यामुळेच आदिपुरुष भगवान् विष्णु हा शाईधन्वा झाला आहे. गदा हे अमुक्त शस्त्र आहे. बाण हे मुक्त शस्त्र आहे आणि भाला हे मुक्तामुक्त शस्त्र आहे. हे सगळे प्रकार माणसाला यथावसर वापरावे लागतात त्यामुळे तो सर्वप्रहरणायुध होतो. आणि त्यामुळेच त्याचा आदर्श तो सर्वशक्ति परमात्मा परम पुरुषहि सर्वप्रहरणायुध म्हटला आहे शेवटी. पण तत्पूर्वी गदा, असि म्हणजे भाला आणि धनुर्वाण यांचा व चक्राचाहि उल्लेख केला आहे. तो केवळ सूचक समजावयाचा. तो इयत्तावाचक

९९७. गदाधर
गदां धारयति इति गदाधरः । जो गदा धारण करतो तो म्हणावयाचा गदाधर, आदि मानवाचें हत्यार गदाच होते. म्हणून त्याचा तत्कालीन आदर्शहि गदाधर भगवान् झाला. पण पुढे जसजशी नवीं नवीं हत्यारें आली. तशी ती त्याच्या हाती देणे जरूर होतें. परंतु इतके हात आणि इतकी शस्त्रे कशी दाखविणार ? म्हणूनच चतुर्भुज रूपच असंख्य हस्तांचे प्रतीक मानून घ्यावयाचे. दोन हात त्या अव्यक्त परमात्म्याचे आणि दोन हात व्यक्त परमात्म्याचे म्हणजे विश्वाचे मिळून परमात्म्याची सांगसंपूर्ण चतुरभुज मूर्ति झाली. तिच्या हातांत सर्व सत्ता आहे. निग्रह शक्तीचे प्रतीक गदा ही अन प्रकारें नुसती गदा नसून सर्व शस्त्रास्त्रांची प्रतिनिधि होय. हा भाव सर्वप्रहरणायुध या अन्तिम पदानें शेवटीं स्पष्टच व्यक्त केला आहे. विष्णूचें ध्यान चतुर्भुज, आणि त्यानें धारण केली आहेत असंख्य शस्वे ! ह्याचा मेळ कसा बसवावयाचा ? गदेंत सर्व शस्त्रांचा समावेश करून. केकावलींत "गदारिदरनन्दकांबुजधरा नमस् ते सदा असा चरण आला आहे. तिथे प्रश्न उत्पन्न झाला की हात चार आणि धारण करावयाच्या वस्तु तर पांच उल्लेखिल्या आहेत-(१) गदा, (२) अरि म्हणजे चक्र, (३) दर म्हणजे शंख, (४) नन्दक खड्ग आणि (५) अम्बुज म्हणजे कमळ, लोकमान्यांनी नन्दक खड्ग कमरेला अडकवून त्याची व्यवस्था लावून दिली. धनुष्याचा उल्लेख असतां तर तें खांद्याला देतां आलें असतें अडकवून. परंतु सर्व प्रहरणे म्हटल्यानंतर ही युक्ति चालणार नाही. तिथे ती सर्व शस्त्रे एका गदेंतच समाविष्ट समजावयाची. अर्थात् गदा म्हणजे निग्रहशक्ति समजावयाची. तींत भूत भविष्य वर्तमान सर्व शस्त्रे निहित आहेत.

९९८. रथाङ्गपाणि
रथाङ्गं पाणौ यस्य सः रथाङ्ग-पाणिः । ज्याच्या हाती रांग म्हणजे चक्र आहे तो म्हणावयाचा रथांगपाणि. याच श्लोकांत चक्री हे पद येऊन गेलें आहे आणि पुनः हे रथांग पद आले आहे. ही उघडच पुनरुक्ति आहे. त्याऐवजी अम्भोजपाणि असते तर शंखचक्रगदापद्म या चारी भगवत्-चिह्नांचा क्रमानें उल्लेख आला असे झाले असते. म्हणजे पुनरुक्तीचा दोष टळून अपेक्षापूर्तीचा गुण जोडला गेला असता. परंतु वक्ता वक्तृत्वाच्या ओघांत पुष्कळदा पुनरुक्ति करतो, एखादा मुद्दा मांडायचा योजलेला असूनहि बोलतांना विसरून जातो. त्या प्रमाणेंच हे इथे झालें आहे. हा दोष असला तरी त्यांत स्वाभाविकता वा अकृत्रिमता हा महान् गुण आहे. तें जिवंतपणाचें लक्षण आहे. एखादी मूर्ति अगदीं सर्वांगसुंदर असेल, तिच्यात शोधूनहि दोष सांपडावयाचा नाही. पण तिथे जिवंतपणा तेवढा नसतो. तसें हे आहे. हे सहस्र सदोष भासले तरी जिवंत आहे. निर्दोष आणि निरजीवं नाही. त्याच्या जिवंतपणानें त्याचे किरकोळ दोष क्षम्य ठरतात. पण निर्दोषत्वानें निर्जीवपण समर्थनीय ठरणार नाही. मढ्यांत गुण शोधून सांपडावयाचा नाही. तें संपूर्णच त्याज्य. जित्यांत दोष न शोधतांहि आढळतील, पण ते त्याच्या जिवंतपणांत बुडून जातात. म्हणून ते दोषांसगटहि गोड होय. भगवंताच्या शंख चक्र गदा पद्म या चतुरंग चिह्नांत चक्र हे वस्तुतः आयुध नव्हेच. शंख व पद्म ही आयुधे नव्हेत. एक गदा तेवढे आयुध आहे. आणि ही सगळी भगवत्चिहें भगवत्तेची भगवत्-शक्तीची प्रतीकें आहेत. काल ही भगवंतांच्या हातांतील म्हणजे भगवद्धीन एक महान् शक्ति आहे. आणि तिच्या अधीन हें सारें विश्व आहे. सारें व्यक्त विश्व अव्यक्त कालाच्या अधीन आहे. तें कालवश होते. म्हणून कालचक्र हे भगवंताच्या हातात शस्त्ररूपानें विराजमान आहे. इतर कोणी अनीश तें शस्त्र हाताळू शकत नाही. ते केवळ भगवच्छस्त्र आहे.

९९९. अक्षोभ्य
क्षोभ्यः क्षोभार्हः । न क्षोभ्यः अक्षोभ्यः जो क्षोभणे शक्य नाहीं तो म्हणावयाचा अक्षोभ्य, क्षोभ कुणाला होतो ? ज्याला योगक्षेमाची चिंता असेल त्याला. ज्याला काही मिळवावयाचे आहे आणि मिळवलेलें राखावयाचे आहे त्याला.जो परमात्मा परिपूर्णतास्वरूप आहे त्याला काय मिळवावयाचे असणार आणि काय राखावयाचे असणार ? पूर्णात्मा कुठल्याहि वस्तूच्या अभावानें पीडित होत नसल्यामुळे तो वीतराग आहे. रजोगुणसमुद्‌भव राग हा तृष्णा आणि संग यांना जन्म देतो. अप्राप्त इष्ट वस्तूची आकांक्षा म्हणजे तृष्णा होय. प्राप्त इष्ट वस्तूचा वियोग होऊं नये, ती आपल्याजवळ सतत रहावी असें वाटणे हा संग होय. राग हा असा उभयात्मक आहे. ज्याला हा राग असतो त्याला इष्टानिष्टवस्तूंच्या वियोगायोगांचे सतत भय राहतें. आणि जिथे हे भय असते तिथे क्रोध म्हणजेच क्षोभ असतो, कंप असतो. आणि जिथे अन्तःकरण कंपित आहे तिथे स्वच्छ आणि स्थिर आत्मदर्शन होत नाही. म्हणजेच तिथे आत्म-स्वरूपोपलब्धि नसते, स्वरूपावस्थान नसते. हीच जीवदशा होय. परंतु परमात्मा हा सदैव स्वरूपावस्थित असल्यामुळे तो या राग-भय-क्षोभरूप अनर्थ-परंपरेतून सर्वथा मुक्त असतो. म्हणून तो म्हणावयाचा अक्षोभ्य, अक्षोभ हे निवर्तक पद आहे. त्याचेच प्रवर्तक वा भाव रूप शम होय. परमात्मा हा शमस्वरूप आहे, शान्ताकार आहे. अक्षोभ आणि शम ही दोन्हीं पदें निवर्तक व प्रवर्तक स्वरूपाची असून ती सापेक्ष आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू होत त्या. मग इथे नाणे कोणतें ? नाणे आहे साम्य, परिपूर्ण साम्य. तेंच पूर्ण होय. या पूर्णाचे पूर्णत्व वेदोपनिषदांनी
ॐ पूर्णं अदः पूर्णं इदं, पूर्णात् पूर्णं उदच्यते ।
पूर्णस्य पूर्णं आदाय पूर्णमेवावशिष्यते ।
असें पूर्णपणे गाइलें आहे.

१०००. सर्वप्रहरणायुध
सर्वाणि प्रहरणानि आयुधानि यस्य सः सर्वप्रहराणायुधः । सर्वच हत्यारें ज्याची आयुधे होत तो म्हणावयाचा सर्वप्रहरणायुधः. परमात्मा हा सर्वशक्तिमान् आहे. त्यामुळे तो सर्व प्रहरणायुध होय. त्याच्या वर कोणाची मात्रा चालत नाही, पण तो मात्र सर्वांवर मात करतो म्हणून तो सर्वशक्तिमान् म्हणावयाचा, सर्वप्रहरणायुध म्हणावयाचा. अमुक एक त्याचे शस्त्र नाहीं असें नाहीं. जी जी प्रहरणे म्हणजे हत्यारे होणे संभवतें तीं ती सर्व त्याची आयुधे होत. ढाल आणि तरवार ही दोन्ही हत्यारेंच. एक बचावाचे, दुसरें उठावाचें. दोहों मिळून संरक्षण. शंख हे जलचराचे संरक्षक कवच त्याचे हत्यारच होय. कच्छपाचें कठिण पृष्ठ त्याचे हत्यार होय. वराहाचा सुळा हे त्याचे खड्ग होय. नरसिंहाची नखें हे त्याचे शस्त्र होय. वामनाची गूढ वाणी त्याचे हत्यार होय. परशुरामाचा परशु, रामाचे धनुष्य, कृष्णाचे चक्र तर उघडच शस्त्रे होत. पण बुद्धाची सत्यपूत व दयामय वाणीहि शस्त्र होय, कारण ती प्रतिपक्षावर मात करते. शेवटी शस्त्रास्त्रांच्या विकासांत सत्याग्रह म्हणजे अहिंसक तपच सर्वोत्तम आयुध होय. जीवाच्या उत्क्रांतींत आणि मानव्याच्या विकासांत गांठला गेलेला परमोच्च बिंदु होय. उर्वशी हे इन्द्राचे सुकुमार प्रहरण होय, तसें सत्याग्रह म्हणजे अहिंसक तप हें परमात्म्याचे कुसुम-कोमल वज्र आहे. दधीचि ऋषीच्या अस्थींपासून बनलेल्या ह्या वज्रानेच तर इन्द्र परमात्यानें वृत्रासुराचा वध केला आहे. आणि हे अहिंसक तप करीत तो नर-नारायण बदरिकाश्रमांत आजहि विराजमान आहे. चिन्यांची धाड त्यानेच परतविली आहे.

१००१. "सर्वप्रहरणायुध ॐ नम इति"
द्विर्वचन म्हणजे अन्तिम पदाचा पुनरुच्चार, ग्रंथसमाप्ति सुचवितो. जणू दोन रेघा मारून खातें बंद केलें आहे. शेवटी एकाक्षर ब्रह्माचा, ॐकाराचा उच्चार करून नमस्कार केला आहे. ॐकार सर्वांचें मूळ आहे म्हणून तो आरंभी उच्चारला जातो. ॐ विश्वम् म्हणून सहस्राचा आरंभ झाला आहे. ॐकार च सर्वांचें फळ आहे, म्हणून तो अन्ती उच्चारला जातो. 'ॐ नमः' म्हणून सहस्राचा समारोप केला आहे. ॐ ही वैदिक धर्माची मुद्रा आहे. देवमंदिरांत देवमूर्ति षोडषोपचार-पूजित विराजमान असते. आपण दर्शन घेतों, प्रदक्षिणा करतो आणि नमस्कार करून देवदर्शन संपवितो. तसे इथे केलें आहे. अनन्ताच्या या विश्वमंदिरांत त्याच्या सहस्रावधि मूर्तीचे दर्शन घेऊन त्यांची सहस्र प्रदक्षिणा करून नमः म्हणून नमस्कार केला आहे. कायेनें दण्डवत् प्रणिपात केला आहे, वाणीनें जप केला आहे, चित्त लीन झाले आहे. सर्वात्मना त्याच्या चरणी हा जीवभाव समर्पित आहे. ॐ तत् सत्.
घेई घेई माझे वाचे ।गोड नाम विठोबाचें।
डोळे तुम्ही घ्या रे सुख । पहा विठोबाचें मुख ।
तुम्ही आइका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ।
मना तेथे धांव घेईं । राहें विठोबाचे पाईं ।
तुका म्हणणे माझ्या जीवा । नको सोडू या केशवा ।
॥ हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP