ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - उपसंहार

इतीदं कीर्तनीयस्य केशवस्य महात्मनः ।
नाम्नां सहस्रं दिव्यानां अशेषेण प्रकीर्तितम् ॥१॥


अर्थ
असे हे कीर्तनीय विश्वात्मा विष्णूच्या दिव्य नामांचें सहस्र संपूर्ण सांगून झाले
टिप्पणी

१. इथे सहस्रसंख्येचा उल्लेख उक्त नामें सहन-परिमित आहेत, एक न्यून वा एक अतिरिक्त नाही, हे सांगण्यासाठी आले आहे. अर्थात् कुणालाहि ती न्यून-अधिक कल्पिण्याची अनुज्ञा नाही.

२. कीर्तनीय म्हणजे भक्तांनी एकत्र मिळून गावयाचा. हे नामसहस्र जेव्हां उपासक एकान्तांत एकटाच जपतो तेव्हां तें जप्य होय. जेव्हां अनेक भक्त त्याचा घोष करतात तेव्हां तें कीर्तनीय म्हणावयाचे. अर्थात् हे स्तोत्र जप्य हि आहे आणि कीर्तनीय हि आहे. भगवान् हा मनोमन मौनाने ध्येय आहे, एकान्तांत उपांशुजपाने जप्य आहे, आणि भक्त-समाजांत कण्ठरवाने कीर्तनीय आहे, गेय आहे.

३. महात्मा म्हणजे विदेह विश्वव्यापक परमात्मा. जोवर देह-बद्धता आहे तोवर महात्मता कुठली? ज्याची देहासक्ति अहंता ममता परिक्षीण झाली आहे, जो समदर्शी आहे, त्याला आपण गौरवाने महात्मा म्हणतों. पण खरा महात्मा हा कधीं देहवंत असत नाही. कारण देह ही अहंकार असल्याचीच खूण आहे.

४. दिव्य हें नामांचे विशेषण त्यांची अलौकिकता सूचित करते. ही नामें प्राकृत म्हणजे प्रकृतिगुणांच्या कार्याची म्हणजे संसाराची द्योतक नाहीत, तर त्या संसाराचा उपशम करणारी, त्या संसाराच्या पलीकडे असलेल्या परमात्म्याची वाचक आहेत.

य इदं शृणुयान् नित्यं यश् चापि परिकीर्तयेत् ।
नाशुभं प्राप्नुयात् किंचित् सो ऽमुत्रेह च मानव: ॥ २॥


अर्थ
जो हें नामसहस्र नित्य स्वत: श्रवण करील अथवा इतरांना श्रवण करवील त्या मानवावर इह लोकीं वा परलोकी कसले हि अरिष्ट ओढवणार नाही.

टिप्पणी
१. श्रवण म्हणजे स्वत:च उपांशु जप करणे अथवा पाठ करणे. कीर्तन म्हणजे इतरांच्या कानी आणि तद्वारा त्यांच्या अंतरीं पोंचविणे. नित्य श्रवण करायचे म्हणजे दुसरा कोणी तरी पाठ वा कीर्तन करणारा हवा. नित्य कीर्तन करायचे म्हणजे दुसरा कोणी तरी श्रोता हवा. ही पराधीनता होईल. म्हणून श्रवण आणि कीर्तन यांचा अर्थ अनुक्रमें उपांशु जप आणि घोष असा घ्यावयाचा. जप आपला आपण ऐकतो म्हणून ते श्रवण होय. घोष इतरांच्या कानी जातो म्हणून तें कीर्तन होय.

२. अशुभ म्हणजे अनिष्ट-योग आणि इष्टवियोग. पुरुषार्थांची सिद्धि हे शुभ होय. त्यांची असिद्धि अशुभ होय. देहधारी जीवाला प्रियाप्रियांचा योग नित्यच होत राहतो. त्यांतून त्याची सुटका नाही. त्यांच्या योगे होणाऱ्या सुखदुःखाची धार आत्मज्ञान-जनित समत्व-बुद्धीनें बोथट होते आणि विदेह झाल्यानंतर तें सुख दु:ख मुळीच उरत नाहीं, निर्विषय निःसुखदुःख साम्यरूप स्वानन्दानुभूति तेवढी उरते. हाच परम पुरुषार्थ.

३. इह आणि अमुत्र म्हणजे सदेहतेंत आणि विदेहतेंत. आम्ही देहधारी जीव सदेहावस्थेत सुखदु:ख अनुभवतच असतो. पण हा चालू देह सुटल्यावर आणि नवा असलाच देह धारण करण्यापूर्वी जी गति होते तींत आमचे कसे होणार याची चिंता विचारी माणसाला वाटणे स्वाभाविकच आहे. पण जो निर्योगक्षेम झाल्यामुळे निश्चिन्त झाला आहे त्या तत्परायण पुरुषाला इहलोकाची वा परलोकाची चिंता रहात नाही, आणि त्या परग साम्याला ज्यांची अशी पोच अद्याप झालेली नाही असे हि का सद्विचार सद्वाणी आणि सदाचार यांच्यायोगें सत्परायण होऊन तसेच निश्चिन्त होतात. कारण सदनुवर्तनाचें फल इथे या देहीं वा मरणोत्तर सत्च असणार असा त्यांचा पक्का विश्वास असतो. नामस्मरणाचें असें दुहेरी फल आहे.

वेदान्तगो ब्राह्मण: स्यात् क्षत्रियो विजयी भवेत् ।
वैश्यो धन-समृद्धः स्यात् शूद्रः सुखमवाप्नुयात् ॥३ ॥


अर्थ

(सहस्राचा श्रवणकर्ता) ब्राह्मण आपल्या वेदविद्येचा अन्त गाठून पंडित होईल. क्षत्रीय शत्रूवर जय मिळवून विजयी होईल. वैश्य आपल्या व्यापारांत यशस्वी होऊन धन-समृद्ध होईल आणि शूद्र पडेल ती सेवा करीत खाऊन पिऊन सुखी होईल.

टिप्पणी
१. मागील श्लोकांत श्रवणाचे फल अशुभनिवारण सांगितलें. इथे शुभ-प्राप्ति सांगत आहेत. अनिष्ट-परिहार आणि इष्ट-संप्राप्ति मिळून पूर्ण कल्याण होते.

२. समाजाचे जे घटक ब्राह्मण क्षत्रीय वैश्य आणि शूद्र ते आपआपल्या अधिकृत कार्यांत श्रवणाने सफल होतात. बागेला दिलेल्या पाण्याने जशी बागेतली सर्व झाडे फुलून फळतात, त्याप्रमाणे सारा समाज परमात्म-स्मरणानेच सफल होतो, कृतकृत्य होतो. सर्वसाफल्याचे मूळ परमात्मनिष्ठा आहे.

जीवनांत ब्राह्मणाचें प्राप्तव्य ब्रह्म आहे. वेदांचें सांग संपूर्ण अध्ययन आहे. त्याचसाठी त्याची सारी धडपड चाललेली असते. त्यालाच वेदान्त म्हणजे वेदाचें फळ म्हटले आहे. वेदाचे शिखर म्हटले आहे. स्वाध्यायाने आणि तपानें तें तो गांठतो.
क्षत्रियाची मुख्य अभिलाषा विजयाची असते. आपल्या शत्रूवर विजय मिळविण्यांत त्याला धन्यता वाटते. त्यापाईं देह पडला तरी बेहत्तर अशी त्याची वृत्ति असते. आणि त्या प्रमाणे तो करतो.

वैश्य हा धनप्राण आहे. ब्राह्मण विद्येसाठी, क्षत्रिय विजयासाठी जीवावर उदार होईल. पण वैश्य आपल्या पुंजीला प्राणापलीकडे जपेल. एका एका कवडीसाठी तो जीव टाकतो. पुंजी दिवसेंदिवस वाढत असलेली पाहून तो सुखी होतो. त्यांतच त्याला धन्यता वाटते.

परंतु शुद्राला असा कोणताच ध्येयध्यास नाहीं की ज्यासाठी त्याने जिवावर उदार व्हावें, प्राणसंकटासकट सर्व संकटें आनंदाने झेलावी. त्याला आपलें खायला प्यायला मिळालें की तो सुखी. तो आपल्या देहाच्या पलीकडे आणि आजच्या पलीकडे पाहत नाही. आज आपली पोळी पिकली ना ? बस मग दुसरी चिंता क.मनी? त्याचें हेंच अभीष्ट, सर्वस्व.

सारांश, ज्याचे जें सर्वस्व, ज्यांत ज्याचा परमसंतोष तें त्याला परमात्म-प्रसादानें लाभते आणि तो कृतकृत्य होतो व त्याबरोबर समाज हि.

धर्मार्थी प्राप्नुयाद् धर्म अर्थार्थी चार्थमाप्नुयात् ।
कामान् अवाप्नुयात् कामी प्रजार्थी चाप्नुयात् प्रजाम् ॥४ ॥


अर्थ

(सहस्रनामाचे नित्य श्रवण करणारा) धर्मार्थी असेल त्याला धर्म,अर्थार्थी असेल त्याला अर्थ कामार्थी असेल त्याला काम आणि प्रजार्थी असेल त्याला प्रजा लाभेल

टिप्पणी

१. मागील श्लोकांत समाजाचे घटक जे ब्राह्मणादि चतुर्वर्ण त्यांना त्यांचे अभिलषित सभेत, रणांत, उद्यमांत आणि जगण्यांत जय व सुख लाभेल म्हणून सांगितलें. इथे व्यक्तिश: ज्याचा जो अभिलाष, तो पूर्ण होईल म्हणून आश्वासन दिले आहे.

२. समाज हा स्थूल आणि बाह्य आहे. व्यक्ति ही सूक्ष्म आणि आन्तरिक आहे. समाजाचे जीवनसाफल्य व्यक्तीच्या जीवन-साफल्यावरच अवलंबून आहे. म्हणून समाजांतील घटक वर्ग आणि त्यांचे इष्ट त्याचबरोबर समाजनिरपेक्ष व्यक्ति व तिचे इष्ट असा दुहेरी विचार केला आहे. समाजधारणा आणि व्यक्तिसंतोष ही दोन्ही मूल्ये इथे अभिप्रेत आहेत.

३. इथे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाचा म्हणजे जीवाच्या जिव्हाळ्यांचा क्रमाने उल्लेख केला आहे. प्रजा हा प्रजामृतत्वाचा म्हणजे प्रजारूप मोक्षाचा उल्लेख आहे. जीवाच्या ज्या कांहीं अभिलाषा असू शकतात त्या सर्व या चारीत वर्गीकृत केल्या आहेत. पहिला वर्ग धर्म. धर्म म्हणजे सद्गतीचा उपाय, धर्म हा सर्व पुरुषार्थाचें मूळ म्हणून आधी उल्लेखिला जातो. तदधीनच अर्थ आणि काम हे पुरुषार्थ असून मोक्ष हि धर्माधिष्ठितच आहे. कारण धर्म हा चित्तशुद्धीच्या द्वारा ज्ञानोदयाला उपकारक होतो आणि ज्ञानोदय झाला म्हणजेच अज्ञान-निवृत्ति होऊन मोक्ष-सिद्धि होते. योगक्षेमाच्या चिंतेने जीव अर्थ आणि काम यांची म्हणजे द्रव्य आणि दारा (वा मैथुनसुख) यांची अभिलाषा करीत असतो. परंतु द्रव्य आणि दारा यांची प्राप्ति धर्माची उपेक्षा आणि अनादर करून केल्यास ती सुखावह होत नाही आणि ती अनित्य तर आहेतच. धर्माचे फल में स्वर्ग वा सद्गति तें धर्माचरण न केल्यास मिळावयाचें नाही. हे उघडच आहे. महाभारतांत कौरवपांडवांच्या इतिहासाच्या मिषाने व्यासांनी हेच तत्त्व विशद केलें आहे. कौरवांनी अधनि पांडवांचे राज्य व त्यांची स्त्री उपटण्याचा प्रयत्न केला आणि त्यांत ते शेवटी राज्यश्री, स्त्री नि स्वर्ग सर्वच गमावून बसले, उलट पांडव धर्मानं वागून त्रिवर्ग मिळवते झाले असे दाखविले आहे. व्यासांनी हे तात्पर्य स्वमुखाने हि सांगून टाकले आहे.

अधर्मेणघते तावत् ततो भद्राणि पश्यति ।
ततः सपत्‍नाञ् जयति समूलं च विनश्यति ॥

याचे उदाहरण कौरव होत.
ऊर्ध्वबाहुर्विरौम्येष न च कश्चित् शृणोति मे ।
धर्माद् अर्थश्च कामश्च स धर्मः किं न सेव्यते ॥


यांतील मुख्य प्रतिपाद्य धर्माद् अर्थश्च याचे उदाहरण पांडव होत. धर्म म्हणजे सज्जीवन हेच या लोकाचें नि परलोकाचे हि साधन आहे. परंतु दीर्घदर्शन नसलेल्या सामान्य माणसाला प्रत्यक्षाचा मोह पडतो, तात्कालिकाचा मोह पडतो आणि तो धर्मविमुख होतो. परिणामी ' तेल गेलें तूप गेलें, धुपाटणे हाती आले' अशी त्याची फसगत होते. म्हणून व्यासांनी गहाभारत सांगितले आणि भीष्णांनी त्याचे लोणी आपल्या राजस्वी-विरक्त जीवनाने नि भगवद्भक्तीच्या उपवेशाने लोकांना दिले आहे.

४. परम पुरुषार्थ मोक्ष असला तरी अर्थ आणि काम यांची आकांक्षा जीविताकांक्षेमुळे माणसाला राहतेच. ती कोणाला हि टाळतां येणारी नाही. त्याच बरोबर मरणोत्तर जीवनाची हि माणसाला चिंता राहणारच, त्यामुळे धर्माची हि आस्था बाळगावीच लागते. असे हे चारी, पुरुषाचे म्हणजे जीवाचे, जिव्हाळे आहेत. जीव त्यांत गुंतून राहिला आहे.

५. प्रजा हा प्रजामृतत्वामुळे पुरुषार्थच आहे. प्रजेच्या रूपानें, संतानाच्या रूपाने जीव हा चिरंजीव होत असतो. म्हणून तो प्रजेची कामना करतो. मोक्षाची आकांक्षा म्हणजे अमृतत्वाचीच आकांक्षा होय. ती सन्तानरूपानें तो सफल झालेली पाहतो. आणि म्हणून प्रजेचा स्वतंत्र उल्लेख केलेला आहे. काम या पुरुषार्थाहून हा वेगळा पुरुषार्थ आहे. तो कामान्तर्गत नाही.

६. तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकांत सर्व सामान्य जीवांचे जे अभिलाष आहेत ते सारे श्रवणानें पूर्ण होतील असे सांगितल्या नंतर आणखी काही फळ सांगायचे उरत नाही. म्हणून मुख्य फलश्रुति इसेंच संपली असे म्हटले पाहिजे.

भक्तिमान् यः सदोत्थाय शुचिस् तद्गत-मानसः ।
सहस्रं वासुदेवस्य नाम्नां एतत् प्रकीर्तयेत् ॥५ ॥
यशः प्राप्नोति विपुलं ज्ञाति-प्राधान्यमेव च ।
अचलां श्रियमाप्नोति श्रेयः प्राप्नोत्यनुत्तमम् ॥६॥
न भयं क्वचिदाप्नोति वीर्य तेजश्च विन्दति ।
भवत्यरोगो द्युतिमान् बलरूपगुणान्वितः ॥७ ॥


अर्थ
५. जो भक्तिमान् पुरुष प्रत्यहीं उठून शौचादि आटोपून हृदयस्थ परमात्माच्या ठाई चित्त स्थिर करून त्याचे हे नामसहस्र म्हणतो -

६. त्याला विपुल यश लाभते, तो आपल्या ज्ञातिबान्धवांत गौरव पावतो. त्याला स्थिर वैभवलाभ होतो. (शेवटी) त्याचे सर्वोत्तम कल्याण होतें.

७. तो अकुतोभय होतो. त्याचे वीर्य म्हणजे आत्मबल वाढते आणि तेज म्हणजे दरारा व प्रभाव पसरतो. अनारोग्याची विवर्णता जाऊन आरोग्याने तो तेज:पुंज दिसतो. त्याचे बल वाढते. तसा त्याचा आकार भरदार व उठावदार होऊन त्याच्या व्यक्तिमत्त्वाची सर्वत्र छाप पडते.

टिप्पणी

१. "'सदोत्थाय प्रकीर्तयेत्" या पदांनी पुनः फलश्रुति सांगायला सुरवात झालेली आहे हे दिसून येते. आरंभी "श्रुणुयात् नित्यम्" ही पदें येऊन गेलेलीच आहेत. म्हणजे ही एक प्रकारें फलश्रुतीची आवृत्ति होत आहे.

२. "सहस्रं वासुदेवस्य नाम्नाम्" या पदांवरून हे फलश्रुतीचे आवर्तन वासुदेवसंप्रदायाने प्रक्षिप्त केलेले दिसते. पुढील श्लोकांत वासुदेव हे नाम पांच वेळां आले आहे. इतर नामें हि तसा संशय येऊ नये म्हणून वापरलेली आहेतच. पण प्राधान्य वासुदेवनामालाच आहे. "ॐ नमो भगवते वासुदेवाय" हा त्यांचा द्वादशाक्षरी मंत्र आहे. हे विष्ण-सहस्र आहे, वासुदेव-सहन नाही आणि गोपाल-सहस्र तर मुळीच नाही. वासुदेव हें नाम प्राचीनच आहे. परंतु विष्णु प्राचीनतर. आणि गोपाळ तर अर्वाचीनतरच म्हणावें लागेल. विष्णु हे नाम वेदांत येतें, वासुदेव वेदांत आढळत नाही. तें पुराणकालीन दिसतें.

३. "भक्तिमान् यः सदोत्थाय" या श्लोकांत नित्य उपासना कशी करावी त्याचा विधि सांगितला आहे. नित्य सकाळी उठावें, शुचिर्भूत हावें. ध्यान धरावें आणि पाठ करावा. यांत "तद्गतमानस" पद आले आहे. तद्गतमानस होणे म्हणजे हृदयस्थ परमात्म्याच्या ठाई चित्त स्थिर करून राहणे होय. लहान मूल जेव्हां शौचविधि करतें तेव्हां तें तद्गतमानस झालेले असते. त्याचे इतर बाह्य व्यापार मंदावलेले असतात, दृष्टि अन्तर्मुख झालेली असते आणि मन तत् (क्रिया) गत झालेले असतें. त्याची शौचक्रिया संपली की तें त्या समाधींतुन व्युत्थित होते आणि परत सामान्य व्यवहार करूं लागते. तद्वत् हृदयस्थ परमात्मगत चित्ताने पाठ करावा, तद्भावभावित होऊन पाठ करावा.

४. "वीर्य तेजश्च विन्दति' वीर्य आणि तेज ही एक कार्यकारणांची जोडी आहे. ज्याच्या ठाईं वीर्य म्हणजे आत्मबल आहे, संकल्पशक्तीचे बळ आहे, त्याचेंच तेज म्हणजे प्रभाव लोकांत पडतो. ज्याच्या ठाई संयमाचे बळ नाही त्याच्या बोलण्यांत नि वागण्यांत तें तेज येत नाही. धमक असेल त्याचा धाक वाटेल. तेल असेल तर ज्योत पाजळेल.

५. "भवत्यरोगो द्युतिमान् बलरूपगुणान्वितः" या वाक्यांत एक कार्यकारण-शृंखला आहे. रोगाने शरीर विवर्ण होतें, दुर्बळ होते, त्याचा गुण म्हणजे व्यक्तिमत्त्व पुसट होते. उलट आरोग्याने वर्ण उजळतो, गात्रांत बल संचरतें आणि माणसाचे व्यक्तिमत्त्व उमटते. सारांश अनारोग्याने सर्वतोपरी हास होतो तर आरोग्याने सर्वतोमुखी विकास होतो.

बल म्हणजे सर्वेन्द्रियांची कार्यक्षमता, रूप म्हणजे सर्वावयवांची प्रविभक्तता आणि पुष्टता, आणि गुण म्हणजे माणसाचे एकूण व्यक्तिमत्त्व. गुण तसे असंख्य आहेत. पण त्या सर्व गुणांचा समाहार म्हणजे व्यक्तिमत्त्व होय. हे ज्याचे त्याचे आपलें स्वतंत्र आहे.


रोगार्तो मुच्यते रोगात् बद्धो मुच्येत बन्धनात् ।
भयात् मुच्येत भीतस् तु मुच्येतापन्न आपदः ॥८ ॥
दुर्गाण्यतितरत्याशु पुरुषः पुरुषोत्तमम् ।
स्तुवन् नाम-सहग्रेण नित्यं भक्तिसमन्वितः ॥९ ॥


अर्थ

८. (सहस्राचा पाठ करणारा भाविक) अल्पमहारोगानें पीडिलेला असल्यास त्या रोगांतून तो मुक्त होतो; राजा, सावकार, चोर वगैरेंच्या बंधनांत पडला असल्यास त्यांतून तो सुटतो; तस्कराच्या, राजाच्या वा यमाच्या भयाने भयभीत असल्यास त्या भयापासून त्याची सुटका होते आणि कुठल्या धन जन प्राणसंकटांत सांपडला असल्यास त्या संकटांतून तो बचावतो.

९. (सारांश) या नामसहस्राच्या द्वारा परमात्म्याचे नित्य भक्तियुक्त अन्त:करणानें स्तवन करणारा पुरुष अविलम्बें सर्व प्रकारच्या संकटांतून पार पडतो.

टिप्पणी

१. नामस्मरणाने जीव सर्व संकटांतून सही सलामत पार पडतो हे प्रतिपाद्य आहे. सर्व इष्टलाभ हीच गुख्य फलश्रुति आहे. त्याच बरोबर सर्व अनिलांना परिहार ही गौण फलश्रुति होय. ती इथे दिली आहे. रोग, राजादिकांचे बन्धन म्हणजे कारागार, भूतप्रेत-चौरव्याघ्रादि भय आणि लहान मोठया आपत्ति ही सर्व नानाविध संकटें होत. या सगळया दु:खांना त्रिविध दु:ख म्हणजे आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक म्हणून संबोधिलें आहे. ही सगळी दुःखें नामस्मरणानें निरस्त होऊन जीव परगानन्दभाक् होतो. सर्व अनिष्टांचा परिहार झाल्यावांचून सर्व इष्टांची संप्राप्ति होऊ शकत नाही. तसेंच सर्व इष्टांची प्राप्ति म्हटली की त्या सर्व अनिष्टांची निवृत्ति ही गृहीत च असते. परंतु नि:संदेहतेसाठी आणि शास्त्रपूर्तीसाठी दोन्ही अंगांचा उल्लेख केला जातो. आधीं आरंभीच्या फलश्रुतीत मुख्यत: इष्टसंप्राप्ति उल्लेखिली आहे. आणि नंतरच्या ह्या फलश्रुतींत विशेषतः अनिष्टपरिहार उल्लेखिला आहे. अशा प्रकारे या दुसऱ्या फलश्रुतीच्या भागाची हि अपयुक्तता सिद्ध होत आहे.

२. फलश्रुतीची इष्ट-संप्राप्ति आणि अनिष्टपरिहार ही दोन अंगें आपण पाहिली. आतां एक तिसरेंच फलश्रुतीचे उत्तमांग आपल्याला पहावयाचे आहे. पुढील श्लोकांत त्याचाच प्रामुख्याने विचार आला आहे-विकारमुक्ति आणि आत्मगुणलब्धि,

वासुदेवाश्रयो मर्त्यो वासुदेवपरायणः ।
सर्वपाप-विशुद्धात्मा याति ब्रह्म सनातनम् ॥१० ॥
न वासुदेवभक्तानां अशुभं विद्यते क्वचित् ।
जन्ममृत्युजराव्याधि-भयं नैवोपजायते ॥११ ॥
इमं स्तवं अधीयान: श्रद्धाभक्तिसमन्वितः ।
युज्येतात्मसुख-क्षान्ति-थी-घृति-स्मृति-कीर्तिभिः ॥१२ ॥
न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मतिः ।
भवन्ति कृत-पुण्यानां भक्तानां पुरुषोत्तमे ॥१३ ॥


अर्थ
१०. जो वासुदेवाचा शरणागत आहे, वासुदेवच. ज्याची परम गति आहे. तो गनुष्य सर्व पापांतून परिमुक्त होऊन सनातन ब्रह्माला पावतो.

११. वासुदेव-भक्ताचे इह वा परत्र कुठे हि अशुभ होत नाही. इतकेच नव्हे तर जन्म मृत्यु जरा व्याधि यांचे हि भय त्याला उरत नाही.

१२. या नामसहस्र-स्तोत्राचा जो श्रद्धेने आणि भक्तिभावाने पाठ करतो त्याला आत्मसुख, तितिक्षा, श्री, धृति, स्मृति आणि कीर्ति यांचा लाभ होतो.

१३. पुरुषोत्तमाचे जे भक्त आहेत अर्थात् जे पुण्यशील आहेत त्यांच्या ठाई क्रोध मत्सर लोभ वा अहंता ममता इत्यादि अशुभ मति असत नाही.

टिप्पणी

१. सर्व अशुभाचे म्हणजे पापाचे नि दु:खाचें गूळ अशुभ मति आहे. अशुभ गति म्हणजे अविद्या, आत्म्याविषयींचे अज्ञान. या अज्ञानांतूनच अहंता ममता म्हणजे देहात्मबुद्धि वा स्वपरभेदभाव निर्माण होतो. आणि त्यांतूनच सर्व पापें घडतात व त्या पापांची फळे भोगावी लागतात. परंतु जो “वासुदेव: सर्वम्" अशा सर्वत्र समदृष्टीने पाहतो तो वासुदेवभक्त कोणावर क्रोध आणि कोणाचा मत्सर करणार? आणि लोभ तरी कशाचा धरणार? तो सर्वत्र सम पाहत असल्यामुळे त्याला आत्मसुख लाभते. तो स्वस्थ असतो. आणि त्या स्वाथ्यांतूनच क्षांति म्हणजे सर्व-सहिष्णुता श्री म्हणजे प्रसन्नता, धृति म्हणजे अविक्रियता, स्मृति म्हणजे निरनिमानतापूर्वक स्वरूपस्थिति आणि कीर्ति म्हणजे सर्व भूतात्मभूतता वा सर्वात्मकता इत्यादि दैवी गुणगण त्याच्या ठाई येऊन वास करतात. उत्तमोत्तम फल तें हेच आणि म्हणून फलश्रुतीचे हे उत्तमांग होय.

द्यौः सचन्द्रार्कनक्षत्रा खं दिशो भूर्महोदधिः ।
वासुदेवस्य वीर्येण विधृतानि महात्मनः ॥१४ ॥
ससुरासुरगन्धर्व सयक्षोरगराक्षसम् ।
जगद् वशे वर्ततेदं कृष्णस्य सचराचरम् ॥१५ ॥
इन्द्रियाणि मनो बुद्धिः सत्त्वं तेजो बलं धृतिः ।
वासुदेवात्मकान्याहुः क्षेत्र क्षेत्रज्ञ एव च ॥१६ ॥


अर्थ

१४. चन्द्र सूर्य नक्षत्रे यांनी युक्त दिसणारा हा ऊर्ध्वलोक, उर्ध्व लोक व पृथ्वी यांच्या मध्ये पसरलेलें अंतराल, या दश दिशा, ही भूमि आणि तिला वेष्टून असलेला हा महासागर हे सर्व त्या विश्वात्म्या वासुदेवाच्या सत्तेनें धारण केलेले आहे.

१५. या तिन्ही लोकांत वसणारे सुर असुर गन्धर्व यक्षा रक्ष नि सर्प यांच्या सगट हे सर्व चराचर जगत् त्या सर्वंकश कृष्णा परगाल्याच्या अधीन आहे.

१६. प्रत्येक देहधारी जीवाच्या ठाई वसणारी सगळी इन्द्रियें मन बुद्धि आणि सत्त्व तेज बल धृति सारांश सगळे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ही वासुदेवसंज्ञक त्या चिद्रूपाचेच आविर्भाव होत, ते सर्व चिन्मयच होत.r> टिप्पणी
१. ज्याचें स्तोत्र हे नामसहस्र आहे तो भगवान् विष्णु म्हणा, वासुदेव म्हणा, सर्वाधार सर्वरूप आणि सर्वेश आहे. त्यामुळे त्याच्या स्मरणाचे फळ हे मिथ्या नव्हे, ते यथार्थ च आहे असा विश्वास त्याचे माहात्यज्ञान झाल्याने होतो. म्हणून या त्रिकांत त्याचे माहात्म्य वर्णिलें आहे. हा अर्थवाद नव्हे. रोचनार्थ फलश्रुति नव्हे.

२. माहात्म्य हे की त्या भगवान् वासुदेवाच्या अधीन हे सगळे भूरादि लोक, त्यांत बसणारे जीव आणि त्यांच्या ठाईं असणाऱ्या सर्व शक्ति आहेत.

३. वर्ततेदं 'वर्तते' व 'इदम्' या दोन पदांचा पूर्वस्म सन्धि आर्ष वा छांदस समजावयाचा.

सर्वांगमाना आचारः प्रथमं परिकल्प्यते ।
आचार-प्रभवो धर्मो धर्मस्य प्रभुरच्युतः ॥१७ ॥
ऋषयः पितरो देवा महाभूतानि धातवः ।
जङ्गमाजङ्गमं चेदं जगन् नारायणोद्भवम् ॥१८ ॥
योगो ज्ञान तथा सांख्य विद्या: शिल्पादि कर्म च ।
वेदाः शास्त्राणि विज्ञानं एतत् सर्वं जनार्दनात् ॥१९ ॥
एको विष्णुर्महद्भूतं पृथग् भूतान्यनेकशः ।
त्रींल्लोकान् व्याप्य भूतात्मा भुक्ते विश्वभुगव्ययः ॥२० ॥


अर्थ

१७. सर्व शास्त्रांत आचाराला प्राथम्य दिलेलें आहे. कारण आचार-मूलक धर्म आहे आणि धर्माचा प्रभु म्हणजे धर्मफलदाता तो सनातन परमात्मा आहे.

१८. ऋषि, पितर, देव, त्याच प्रमाणे पंच महाभूतें नि सगळे धातु असे हे सगळे चराचर जगत् त्या नरसमाजाच्या दैवत परमात्यापासूनच झालेलें आहे.

१९. योग आणि ज्ञान, सांख्य आणि विद्या त्याचप्रमाणे शिल्पादि सर्व कला, सारांश सर्व वेदशास्त्र नि विज्ञान हे सगळे त्या जनन्नियन्त्या परमात्म्यापासूनच झालेलें आहे.

२०. किंबहुना, तो सनातन विश्वव्यापक विष्णुच एकमात्र महासत्व असून इतर सगळी भूतें त्याचे अंश होत. त्यांच्या योगें ही तिन्ही भुवनें व्यापून तो विश्वात्मा या सर्वांचे (सूर्यवत्) साक्षित्वानें ग्रहण करीत आहे.

टिप्पणी

१. वेदोक्त धर्म हा सर्व विधिनिषेधरूप आहे. म्हणजे अमुक कर्म करा अमुक करू नका अशा स्वरूपाचा आहे. अर्थात् धर्म हा आचारमुलक आहे. जो वर्णाश्रगकर्तव्यरूप स्वधर्माचें, यज्ञ दान तप आदि रुप चित्तशुनिकारक उपासनेचे आणि वेदशास्त्र नामसहस्रादि श्रवणरूप स्वाध्यायाचे आचरण करणार नाही, त्याला धर्म घडणार नाही आणि धर्म-फल लाभणार नाही. म्हणून आचारवान्च खरा धार्मिक होतो आणि तोच धर्मफळाचा अधिकारी, हा मुद्दा मुद्दाम सर्वशास्त्रार्थसार म्हणून इथे फलश्रुतींत उल्लेखिला आहे. वेदस्योपनिषत् सत्यम् । सत्यस्योपनिषद् दमः ।

२. सूर्यापासून सर्व किरणें जशी निघतात त्याप्रगाणे एका परमात्म्यापासून ही सर्व भुवने त्यांतील थोर अधिकारी पुरुष आणि त्यांची सर्व थोर थोर ज्ञाने निघालेली आहेत. म्हणून त्याची उपासना या स्तवाच्या रूपाने करणे हा थोर धर्म होय आणि त्यापासून सर्व फलप्राप्ति होते, असा आशय.

इमं स्तवं भगवतो विष्णोर्व्यासेन कीर्तितम् ।
पठेन् य इच्छेत्पुरुष: श्रेय: प्राप्तुं सुखानि च ॥२१ ॥
विश्वेश्वर अजं देवं जगतः प्रभवाप्ययम् ।
भजन्ति ये पुष्कराक्षं न ते यान्ति पराभवम् ॥ २२॥


अर्थ

२१. असे हे भगवान् विष्णूचे नामसहस्रस्तोत्र व्यासमहर्षीनी गाइलेलें आहे. ज्या पुरुषाला आपल्याला सर्व सुखें मिळावीं व आपलें मोक्षरूप कल्याण व्हावें अशी इच्छा असेल त्याने ह्याचा पाठ करावा.

२२. ज्याच्यापासून हे जग झाले आहे आणि ज्याच्या ठाईंच लीन व्हायचे आहे त्या विश्वेश्वराला, त्या सनातन देवाला जे भजतात, त्यांना कुठे हि अपयश येत नाही. सर्वत्र ते विजयी होतात.

टिप्पणी

१. व्यासेन कीर्तितम् । हे विष्णु-सहस्रनाम स्तोत्र व्यासांनी म्हणजे विष्णूच्याच एका अवताराने नि विभूतीने गाइलेलें आहे. कारण विष्णूचा महिमा विष्णूहून वेगळा दुसरा कोण बरें जाणूं शकतो? नाटकांत थोर पात्रांच्या तोंडी घातलेली वाणी आणि विचार ही जशी नाटककाराची होत तशी काव्यांत निरनिराळ्या थोर विभूतींच्या मुखाने व्यक्त झालेली वाणी आणि विचार कवींचीच होत. महाभारताचा महाकवि कृष्ण द्वैपायन व्यास. कृष्णमुखाने त्याने गीता वदविली, भीष्म मुखाने नामसहस्र वदविलें,आपणाकडे कर्तृत्व घेतले नाही. "तस्य कर्तारमपि मां विध्यकर्तारमव्ययम् । " अशी त्याची कुशलता आहे ही.

बहुरूपी नाना सोंगें घेतो पण शेवटी सर्व सोंगे टाकून देऊन आपल्या खऱ्या रूपाने लोकापुढे येतो तसे इथे झाले आहे. भीष्ममुखांत हे नामसहस्र घातले असले तरी ते व्यासकृत आहे हे "व्यासेन कीर्तितम्' या पदांनी प्रकट झाले आहे. इथे बुरखा टाकून दिलेला आहे, मुखवटा काढून टाकला आहे. गीतेत हि शेवटी "व्यासप्रसादात् श्रुतवान्' म्हणून व्यासकृतत्व स्पष्ट झाले आहे.

तथापि ज्ञान हे अनादि आहे. म्हणून ते शिवपार्वती या जगदादि-विभूतींच्या मुखाने वदविले जाते. ज्ञान हे थोर आहे म्हणून तें भगवान् कृष्ण आणि भीष्माचार्य यांच्या सारख्या थोरांच्याच मुखांतून वदविलें जातें. नदीचा उगम आजचा वा इथला मानतां येत नाहीं तो अनादि आणि पर्वतासारख्या महोच्च पदापासूनच असावयाचा. म्हणून सर्व ज्ञान-संप्रदाय हे मूलतः परमात्म्यापासूनच आलेले आहेत. आणि हे असें असल्यामुळे त्यांचे कर्तृत्व कोणाहि मानवाला आपल्याकडे घेता येणार नाही, आदिकादि वाल्मीकीला हि नाहीं नि गहर्षि व्यासाला हि नाही. याची त्यांना जाणीव आहे म्हणून ते थोर पूर्वजांच्या मुखानेच ते सांगतात. 'इति शुश्रुग पूर्वेषा' असे म्हणतात.

२. "न ते यान्ति पराभवम्' परमात्म्याचा भक्त हा केव्हां हि पराभूत होत नाही. कारण त्याने सत्याचा आश्रय केलेला असतो. सत्याग्रहीला पराभव ठाऊक नाही. कारण सत्य हे सदैव विजयी तत्त्व आहे. महाभारत हे सत्याचा असत्यावरील शाश्वत विजय गाणारें महाकाव्य आहे. तो कोणा व्यक्तींचा इतिहास नाही. तो महेतिहास- होय. "जयो नामेतिहासो ऽयम्" हा जय नामक इतिहास आहे. "न ते यान्ति पराभवम्" हा चरण त्याचे स्मरण करून देतो. जें महाभारताचे अनुशीलन करतील, जे परम सत्याला भजतील त्यांचा केव्हां हि पराभव व्हायचा नाही, त्यांचा सदैव जय च आहे.

असे हे इथें विष्णुसहस्रनाम समाप्त झालें.

॥ हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP