ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

सनात्सनातनतमः कपिलः कपिरव्ययः ।
स्वस्तिदः स्वस्तिकृत्स्वस्ति स्वस्तिभुक्स्वस्तिदक्षिणः ॥९६॥


८९६. सनात्
सनात् हे एक अव्यय आहे. त्याचा अर्थ चिर, सदैव. जो चिरंतन आहे, सदैव आहे, सदैव आहेच आहे, त्याला सनात् नाही तर काय म्हणावयाचें ? सनात् चे दुसरें रूप सनत्कुमार. सनक सनंदन सनात् सनत्कुमार हे मुनिचतुष्क म्हणजे काल आज उद्यां नि सदासर्वदा हे जे कालाचे भिन्नाभिन्न चार प्रकार तेच होत. ते पृथगात्म दिसूनहि एकात्मच आहेत. ज्याला आपण उद्या म्हणतों तो उद्या आज होतो. ज्याला आज म्हणतों तो उद्यां काल होतो. ज्याला काल म्हटलें तो काल आज होता नि परवां उद्यां होता. सारांश एकच एक अखंड एकरूप कालप्रवाह ज्यावर काल आज उद्यां चे तरंग सतत उठत व फुटत राहतात, तोच सनात् होय. आज काल उद्या हे कालखंड जसे कल्पित आहेत तसेंच पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हे दिक्खंडहि कल्पितच आहेत. आणि कल्पितच आहे सारा कार्यकारणभाव जो विश्वोत्पत्तीची उपपत्ति मानला जातो. जर काही असेल, म्हणजे परमार्थतः असेल, तर ती एक चित्सत्ता मात्र आहे. तिच्यावरच देश काल निमित्त कल्पना केली जाते, वृथारोप केला जातो. हे असें महदभुत दर्शन झाले म्हणजे विश्वरूप दर्शनानें चकित झालेल्या अर्जुनाप्रमाणें आपल्याहि तोंडून उद्गार निघेल ः "सनातनस् त्वं पुरुषो मतो में" सनातन तोच सनात्.

८९७. सनातनतम
सनात् म्हटल्यानंतर पुनः सनातनतम म्हटलें त्या परमात्म्याला. हा मनाचा छंद आहे, जिभेचा चाळा आहे. तोंडांत खडीसाखरेचा खडा आपण टाकतों. पण कडाकडा चावून खाऊन मोकळे होत नाही. त्या साखरेचा तो गोड रस जिभेवर घोळत राहतो. मनानें तो आस्वादत राहतो. ती गोडी जाणूं जिभेनेंच नव्हे तर सर्वेन्द्रियांनी आम्ही चाखतों. ती गोडी जणूं जिभेतून मनांत,मनांतून हृदयांत पाझरत राहते आणि आमचे सर्वांग निवविते, परितृप्त करते. आणि मग जर विचारले की काय कशी आहे खडीसाखर ? तर उत्तरतों वा, गोड; खूपच गोड ! हे जसे आपण द्विवार आणि सविशेष प्रशंसन करतो तसेंच इथेहि झालें आहे. तो परमात्मा सनात् काय, सनातनतम आहे. असे सहजोद्गार निघाले आहेत. हा रसानुभावाचा उद्रेक झाला आहे. कल्लोळ उसळला आहे. वस्तुतः इथे तरतम भावाला वाव कुठे आहे ? प्राचीन वा अर्वाचीन, पुरातन वा नूतन, या विशेषणांना तरतम भाव असूं शकतो. परंतु सनातनाला, सर्वकालिकाला तो कसा असणार ? सनातनांत न्यूनाधिकता संभवतच नाही. तरी नित्याच्या संवईनें त्यालाहि तम प्रत्यय जोडून दिला आहे. पूर्ण म्हणजे अन्यून पूर्णच. परंतु त्या पूर्णालाहि आपण संपूर्ण परिपूर्ण म्हणून म्हणतच असतो. त्यांतलाच हा प्रकार. नित्य म्हणजे सनातन शाश्वत. पण त्या नित्याला आपण निरंतर पद जोडून देतो आणि नित्यनिरंतर असा प्रयोग करतों, नित्यानें प्रतिदिनंता तर निरन्तरानें प्रतिक्षणता आणि त्याहूनहि निबिडता व्यक्त केली आहे. तशाच सारखा भाव सनातनतम पदानें घ्यावयाचा. तो परमात्मा सनात् म्हणजे सनातन आहे, तो सनातनतम आहे, लवनिमिषार्धहि त्यावांचून नाही.

८९८. कपिल
कपिल म्हणजे काळसर.. कपिला गाय प्रसिद्धच आहे. उपनिषदांत आणि गीतेतहि कपिल पद आलें आहे. "ऋषि प्रसूतं कपिलं यस् तमग्रे ज्ञानैर् बिभर्ति जायमानं च पश्येत" असा उल्लेख उपनिषदांत आला आहे., "सिद्धानां कपिलो मुनिः' असा उल्लेख गीतेत आला आहे. पहिला कपिल हा ब्रह्मदेव आहे, तर दुसरा सांख्याचार्य महामुनि आहे. आणि हा इथला उभयरूप असून शिवाय वेगळाच आहे. ब्रह्मदेव हा परमात्म्यांचा एक आविर्भावच आहे. सांख्याचार्यहि विभूतिच आहे. पण इथे तो सर्वसामान्य जीवरूप घ्यावयाचा आहे. जो कोणता जीव जन्मतो तो कपिल होय. तो अज्ञानशबल वा मायामलिन होऊनच जन्मत असतो. . एरव्ही स्वरूपतः तर तो अज आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे. आणि असा तो आहे म्हणूनच तो परमात्मस्वरूप म्हणावयाचा. म्हणूनच तो परमात्माचें एक रूप होय.गीतेंत म्हटलेंच आहे ः "ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः" मागील सनात् सनातनतमः या आनुपूर्वीत कपिल पद आलें असून" जीवभूतः सनातनः" इथेहि सनातन पद आले आहे. तें वरील अर्थाला पोषक आहे असे म्हणता येईल. मायामलिन असल्यामुळे जीव कपिल आहे. तसा प्रत्येक जीव जन्मतः उल्बांतून बाहेर पडल्यावर बाहेरच्या हवेत किंचित् काळसर पडतो म्हणूनहि तो कपिल होय. जीव हा मूलतः ब्रह्मस्वरूप शुक्ल असून तो अज्ञानवशतः कपिल होतो. अग्निहि तसाच मूलतः शुक्लोज्जवल आहे. परंतु जगाच्या स्पर्शानें तो काळसर पडतो. म्हणून तोहि कपिल होय. अशा प्रकारें अग्नि वा परमात्मा वस्तुतः अत्यन्त निर्मल उज्ज्वल असून त्याचे बाह्य रूप मात्र काळसर दिसते आणि त्यामुळेच तो कपिल म्हटला जातो. दिसायला कपिल, असायला धवल असा हा परमात्माग्नि आहे. शंकराचार्यांनी कपिल म्हणजे वडवानल असा अर्थ केला आहे. वडवानल काळा कल्पिला आहे. म्हणून तो कपिल.

८९९. कपि
कपि हें एक विभूतिमत् सत्त्व आहे. जें जें विभूतिमत् सत्त्व आहे तें तें भगवद्विभूति होय असें गीता सांगते. पण ह्यासाठी गीता हवी कशाला ? जिथे जिथे कांहीं अद्‌भुत शक्ति वा शोभा आढळते त्यानें मनुष्य प्रभावित झाल्याशिवाय राहत नाही. अद्‌भुताचें मनुष्याला असें सहज आकर्षण आहे. अशा स्थितींत वानरासारख्या पराक्रमी प्राण्यानें तो प्रभावित न झाला तरच नवल. जमिनीला पाय न लावतां झाडावरून झाडावर उड्या घेत जाणारा जंगलांचा ज्याला अडथळा नाही अशा शक्तिशाली आणि युक्तिशाली प्राणी वानराचा नराला हेवा वाटल्यास नवल काय ? नराला एक एक पाऊल टाकत जावे लागतें तो जमीन सोडू शकत नाही. त्याला जंगल म्हणजे अंतराय होय, मोठे विघ्नच होय. पण वानराला तें अन्तराय नाही, तर उपाय आहे. जंगल म्हणजे त्याचें घरच. रहायला, खायला,हिंडाफिरायला जंगलाहून सो नि सुरक्षित दुसरें कांहीं नाहीं. जगांत पूर्वी शेकडों मैल जंगलेंची जंगलें होतीं नि वानरांचे साम्राज्य होतें. वानरच वनराज होता. पण नराला जंगल म्हणजे मंगल नव्हते. त्याला तें भयंकर होते. त्यानें जंगलें तोडली आणि जाळली. तेव्हां करें तो भूपति झाला. पण त्या अवधींत त्यानें वानरांची संख्या नि शक्ति दोन्ही पाहिल्या होत्या. आणि त्या दोहोंच्याहि योगें तो प्रभावित झाला होता हे खास. आणि म्हणून अशा प्रभावी प्राण्याचे नांव त्यानें परमात्म्याला दिलें. वानर हा ग्राम्य नाहीं, गृही नाही. तो विजनांत अनिकेत राहतो कंदमूलफलाशन करतो. अन्तराय उल्लंघून जातो. परमात्माहि तसाच आहे. म्हणून तो म्हटला आहे कपि. यतते इति यतिः । तसा कपते प्लवते इति कपिः जो सर्व अडथळे उल्लंघून जातो तो म्हणावयाचा कपि.

९००. अप्यय
(अव्यय) अप्यय म्हणजे विलय, प्रलय. परमात्मा हा लूतावत् म्हणजे कोळ्याप्रमाणें हा सृष्टीचा धागा आपल्यांतून काढतो आणि परत कल्पान्ताच्या वेळी तो गिळून घेतो. असा तो विश्वाकाराला गिळून टाकणारा असल्यामुळे त्याला अप्यय म्हणावयाचे. त्याच्या ठाईं हा सबंध व्यक्त विश्वाकार अपीत होतो, विलीन होतो. सूर्योदयाला वृक्षाची छाया त्याच्या पासून निघून लांबवर पसरलेली असते. पण जसजसा सूर्य चढत जातो तसतशी कमी कमी होऊन मध्याह्नीं ती वृक्ष तळी येऊन नाहीशी होते. सृष्टि हीहि तशीच परमात्म्याची छाया आहे. ती सृष्ट्युत्पत्तीच्या काळी लांबवर पसरलेली असते आणि कल्पान्तापर्यंत पसरते आणि पसरलेलीच राहते. परंतु जेव्हां कल्पान्त होतो तेव्हां ती परत परमात्म्याच्या पायातळी येऊन नाहींशी होते. या नाहीसे होण्यालाच अपीति, अप्यय म्हणतात. इथे ज्याच्या चरणी ती सृष्टिरूप छाया विसावते त्यालाहि म्हणजे परमात्यालाहि अप्यय म्हणता येईल. कारण अधिष्ठानावांचून कोणती क्रिया होऊं शकत नाही. आणि तें अधिष्ठान इथे परमात्माच आहे. म्हणूनच त्याला अप्यय म्हटले आहे. गीतेंत हा अप्यय शब्द प्रलय वा संहार या अर्थानें आलेला आहेः
भवाप्ययौहि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया ।
त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ॥ गीता ११- २

भवाप्यय म्हणजे आविर्भाव व तिरोभाव. अप्यय म्हणजे अप्ययकारी असा अर्थ न घेतला व केवळ अप्यय म्हणजे अपीति, तिरोभाव म्हटले तरी कांहीं बिघडावयाचे नाही. कारण विश्वाचा तिरोभाव म्हणजेच परमात्माविर्भाव होय, पर त्मि-दर्शन होय. म्हणून त्याला अप्यय म्हणणे योग्यच आहे. उलट परमात्म्याचा तिरोभाव म्हणजे विश्वाभास होय.
अप्यय ऐवजी अव्यय असाहि पाठ संभवतो. आचार्यांचा पाठ अप्यय आहे. कल्पान्ते अस्मिन् अपियन्ति जगन्ति इति अप्ययः ।

शतक दहावें

९०१. स्वस्तिद
हा सबंध श्लोकार्ध स्वस्तिमय आहे. आणि इथूनच सहस्राचे दशम व शेवटचे शतक सुरू होत आहे. सहस्र सबंधच पावन आहे, पण हे कलश शतक विशेषतः पावन आहे. स्वस्तिद आहे.
स्वस्ति ददाति इति स्वस्तिदः । जो स्वस्ति देतो तो स्वस्तिद म्हणावयाचा. परमात्मा हा स्वस्ति देणारा आहे. जे काय स्वस्ति आहे, कल्याण आहे, भलें आहे तें सारें त्याच्या पासून च मिळत असते. परका अहित चितूं शकतो, करू शकतो. परंतु कोणी आपलेंच अहित चिंतीत नाहीं, करीत नाही. आणि परमात्मा तर सर्वांचा निजात्मा आहे. सर्वभूतात्मभूत आहे, त्यामुळे तो कोणाचेहि सहित चिंतं शकत नाहीं, करू शकत नाही. तो केवळ कल्याण च चिंतूं शकतो, कल्याणच करू शकतो. म्हणून तो म्हटला आहे स्वस्तिद. माता पिता गुरु बन्धु हे सगळे आमचे आप्त आहेत आणि सहज स्वस्तिद आहेत. पण ते कितीहि आप्त असले, निकटचे असले तरी ते आपल्या निजात्म्याइतके निकटचे केव्हांहि म्हणतां येत नाहीत. म्हणून ते सगळे स्वस्तिद असले हितकर्ते असले तरी आपल्या निजात्मरूप परमात्म्याहून अधिक स्वस्तिद नव्हत. तो परमात्माच खरा स्वस्तिद आहे. कारण तो कधी कुणाचे अहित चिंतूंच शकत नाही. माता पिता गुरु हे परमहितकर्तेहि प्रसंगी माणसावर उलटतात, पण आपला निजात्मा आपला कधींच द्रोह करीत नाहीं, करू शकत नाही. म्हणून तो एक सर्वांतर्यामी परमात्मा च स्वस्तिद होय.

९०२. स्वस्तिकृत्
जो स्वस्तिद तोच स्वस्तिकृत्. बाप मुलाला रक्षण पोषण शिक्षण कामधंदा नि घरदार देऊन त्याचे भलें करीत असतो. कारण बापाची मुलाविषयीं आत्मभावना असते. तो त्याचा आदर्श असतो. त्यांत तो आपलें रूप पाहत असतो. आपलें सुंदर रूप पाहत असतो. आपलें उत्तम रूप पाहत असतो. आपली सफलता नि सार्थकता पाहत असतो. आणि म्हणून तो स्वस्तिद होतो. उलट मुलगा जाणतो नि मानतो की आपल्याला जे काहीं लाभलेलें आहे, हे सुंदर शरीर आणि तदनुगत सारे सुखोपभोग, तें सर्व बापापासून मिळाले आहे. म्हणून त्याला जेणे करून सुख होईल तें करणें हेच आपलें कर्तव्य. मुळाच्या सिंचनानेंच शाखापल्लव टवटवतात. आपण शाखापल्लव आहोत पिता मूळ आहे. असें म्हणून तो आजीवन पित्राशेंत वागत असतो, पित्याच्या मरणोत्तर त्याचे श्राद्ध करीत असतो. त्याचे अभिलषित म्हणजे आपलें स्वस्ति करीत असतो. अशा प्रकारें तो स्वस्तिकृत् होतो. आपल्याला रुचिकर व सुखकर वाटेल तें तो नाहीं करीत, तर जेंहितकर आहे, जे पित्याला इष्ट होतें तें तो करतों, जे आपल्याला सुखकर आहे तें नव्हे. म्हणून तो स्वस्तिकृत् होय. मूलसिंचन स्वस्ति आहे, शाखापल्लव सिंचन नव्हे. परमात्मा हा सर्वांचे मूळ होय. म्हणून त्याला जें अभीष्ट तें जो करतो तो स्वस्तिकृत् होय. परमात्मा तर सहजच स्वस्तिकृत् आहे. कारण तो अनात्मधर्म कोणताच स्वीकारीत नाही. त्याप्रमाणें जो अनात्मधर्मापासून दूर राहतो तो स्वस्तिकृत् होय. जो आत्मधर्माचं अनुसरण करतो तो स्वस्तिकृत होय. परमात्मा स्वभावतःच स्वस्तिकृत् असल्यामुळे वैदिक ऋषि परोपरीनें त्याच्या पासून स्वस्तिकामना करतातः
स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॥


९०३. स्वस्ति
परमात्मा स्वस्ति-द आहे, स्वस्ति-कृत् आहे हे काय सांगायला हवें ? तो तर स्वयं स्वस्तिरूप आहे. म्हणून त्याला स्वस्ति म्हटले आहे. स्वस्ति हे एक अव्यय आहे. तें नाम कसें झालें ? परमात्म्याची व्याप्ति नामापुरतीच नाहीं,तो शब्दाच्या सर्व जाति व्यापून आहे. तो नाम आहे, तो क्रिया आहे. तो नाम, धातु, उपसर्ग नि निपात आहे. तुम्ही शब्दाच्या जाति दोन वा चार न कल्पितां आठ कल्पिल्या तर तो परमात्मा नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी नि केवलप्रयोगी आहे. मग तो स्वस्ति म्हटला म्हणून कुठे बिघडलें ? तें अव्यय आहे, तसा परमात्माहि अव्ययच आहे. तो अव्यय स्वस्ति, अक्षय कल्याण आहे. स्वस्ति हे अव्यय "सु अस्ति' या दोन पदांचे बनले आहे. सु हा सुखाचा संक्षेप आहे, त्याचे आद्य अक्षर आहे. तो एक उपसर्ग आहे. आणि अस्ति हें एक क्रियापद आहे. अस्ति म्हणजे आहे. सु अस्ति म्हणजे सुख आहे. सुखाची भावना म्हणजे सुरक्षिततेची निर्भयतेची भावना. ही अभीष्ट स्थिति दाखविण्यासाठी जे चिह्न कल्पिलें त्याचें नांव स्वस्तिक. चारी दिशांनी सुरक्षित, सर्वतो भद्र म्हणून तें 5 असें काढले जाते. तें परमात्म्याचे प्रतीक आहे. स्वस्ति अव्ययाला स्वार्थे क प्रत्यय जोडून स्वस्तिक नाम बनविले आहे. परमात्मा हा अकुतोभय आहे म्हणून तो स्वस्ति होय. त्याच्यावर कोणाची कुदृष्टि चालत नाही. आत्मनिष्ठावर कोणत्याहि अनात्म वस्तूची सत्ता चालू शकत नाही. परमात्मा स्वस्ति आहे. म्हणजे तो आत्मनिष्ठारूप आहे.

९०४. स्वस्तिभुक्
यज्ञांत देवतेला उद्देशून आहुति द्यावी लागते. आणि होत्रादि ब्राह्मणांना दक्षिणा. संतर्पण यज्ञातहि ब्राह्मणादिकांना भोजन दिले जाते आणि दक्षिणाहि. अशा प्रकारें हवन भोजन आणि दक्षिणा हीं कोणत्याहि यज्ञाची प्रधान अंगें होत, मुख्य विधि होत, परमात्याच्या प्रीत्यर्थ जो यज्ञ करावयाचा त्यांत स्वस्ति हेच हवन व स्वस्ति हीच दक्षिणा. म्हणून त्याला विशेषेकरून स्वस्तिभुक् व स्वस्तिदक्षिण म्हणावयाचे.
स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।
स्वस्ति नस्तार्क्ष्योऽरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॥

हे जें स्वस्तिवाचन त्याचाच तो परमात्मा भोक्ता आहे. तोच त्याचा यज्ञ. प्रत्यक्ष यज्ञाग्नींत तांदूळ तीळ तूप होमून जो यज्ञ केला जातो तो द्रव्ययज्ञ होय. जो वाचेनेंच केला जातो तो वाचिक होय. जो मनांतच भाविला जातो तो मानसिक म्हणावयाचा. हे तिन्ही स्वस्तियुक्त केले म्हणजे ते स्वस्तियज्ञ झाले. आवश्यकते प्रमाणें ते करावयाचे. द्रव्य उपलब्ध नसेल व तशी गरज नसेल तेव्हां केवल वाचिक स्वस्तियज्ञ करता येईल. त्याचीहि शक्यता नसेल तर मनोमन मानसिकहि तो होऊं शकेल. आणि श्रद्धामय तर तो या तिन्हींवांचूनहि होऊं शकतो. पण स्थूल सूक्ष्म कोणती ना कोणती क्रिया ही यज्ञाला आवश्यक आहेच. अगदी ज्ञानमय यज्ञ घेतला तरी तो निष्क्रिय म्हणतां यावयाचा नाही. परमात्मा हा या सर्वच यज्ञांचा भोक्ता आहे. मात्र तो स्वस्तियुक्त असला पाहिजे.
स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां, न्याय्येन मार्गेण महीं महीशाः ।
गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यम्,लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु ॥
सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु, निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॥
हेहि स्वस्तिवाचनच होय.

९०५. स्वस्ति-दक्षिण
स्वस्ति एव दक्षिणा यस्मिन् यस्य वा, स स्वस्ति-दक्षिणः । स्वस्तिवचन हीच ज्यांत वा ज्याची दक्षिणा होय तो स्वस्ति-दक्षिण म्हणावयाचा. यजनीय देवता प्रसन्न व्हावी म्हणून आपण यज्ञ करतो. त्या यांत यज्ञदेवतेला हवि देतों हे योग्यच आहे, पण होत्राहि ब्राह्मणांना दक्षिणा कशासाठी ? हा मध्यस्थ हवाच कशाला ? यजमानच यज्ञ करीत असला तरी त्याला तज्ज्ञाची मन्त्रज्ञ व तन्त्रज्ञ ब्राह्मणाची, क्रियासिद्धीसाठी आवश्यकता असते. त्याची ही मध्यस्थता त्यानें लादलेली नाही, आम्ही मागितलेली आहे. सुइणीची गरज बाळंत होणारणीला असते, सुइणीला नव्हे. ती जी ऐनबिकट प्रसंगी मदत करते तिचे मोल होऊं शकत नाही. पण कृतज्ञतेनें तिला यथाशक्ति कांहीं द्रव्य दिले जाते. ही कांहीं मजुरी वा मोबदला नव्हे. मजुरी मोबदला यांचे प्रमाण ठरविणे शक्य असते. इथें तें शक्य नाही. इथे तें श्रद्धादेय आहे. त्याचेच नांव दक्षिणा. दक्षिणा किती दिली जाते याचे महत्त्व नाही, पण कशी दिली जाते याचे फार महत्त्व आहे. ती श्रद्धेच्या, कृतज्ञतेच्या, प्रेमादराच्या पाण्यात किती भिजलेली आहे याचे निरतिशय महत्त्व आहे. अशी ही दाक्षिण्याची खूण दक्षिणा ज्या यज्ञांत दिली जात नाहीं तो यज्ञ तामस होय, असें गीता म्हणते. अर्थात् ज्यांत श्रद्धा नाही, त्याग नाही, कृतज्ञता नाहीं, गौरव नाहीं तो यज्ञ होऊं शकत नाही. दक्षिणा भिक्षा नव्हे, तें मानदेय आहे. तें गौरवपूर्वक द्यावयाचे आहे. अशी ही दक्षिणा कांहींहि होऊं शकेल. एक तुलसीदलहि होऊं शकेल. पण त्या तुलसीदलाचें तोलमोल अदक्षिणेच्या खंडोगणती सोन्यानाण्याला यावयाचें नाही. परमात्म्याच्या यात स्वस्ति शब्दच दक्षिणा आहे. "स्वस्ति सर्व-भूतेभ्यः" असे म्हटलें म्हणजे सर्व दक्षिणा मिळाली. स्वस्ति शब्द हाच हवि, स्वस्ति शब्द हीच दक्षिणा. असा तो परमात्मा स्वस्तिभुक्, स्वस्तिदक्षिण आहे. स्वस्तिच देवता, स्वस्तिच दक्षिणा, स्वस्तिच मंत्र, स्वस्तिच तंत्र, स्वस्तिच फल असे हे स्वस्तिसूक्त इथे पूर्ण झाले.


अरौद्रः कुण्डली चक्री विक्रम्यूर्जितशासनः ।
शब्दातिगः शब्दसहः शिशिरः शर्वरीकरः ॥९७॥


९०६. अरौद्र
न रौद्रः अरौद्रः । जो रौद्र नव्हे तो अरौद्र म्हणावयाचा. रौद्र कशाला म्हणावयाचें ? जें जीवाला रडवतें तें रौद्र होय, आत्मविषयक अज्ञान, तज्जनित काम आणि कर्म ही माणसाला रडवत असतात. म्हणून ती रौद्र होत. सर्व आसुर संपद्, दम्भ दर्प अभिमान क्रोध पारुष्य हा सगळा अज्ञानवर्ग रौद्र होय. मनुष्य जी काम क्रोध लोभ-प्रेरित करें करतो ती सगळी रौद्र होत. त्यांचे परिणाम, तद्वारा संपादिलेली सत्ता संपत्ति संस्कृति, रौद्र होत. तद्द्वारा होणारी गति नरकादि उघडच रौद्र होय. सारांश अज्ञान, विकार, रोग आणि भोग ही संपूर्ण मालिका रौद्र होय. परमात्मा या सर्वांतून मुक्त आहे. कारण अज्ञानाचा परिणाम में शरीर त्यांतूनच तो मुक्त आहे. शरीराबरोबरच जन्म मृत्यु जरा व्याधि इत्यादि अनर्थ-मालिका येते. शरीराबरोबरच हा सारा संसार येतो, प्रपंच येतो आणि तें परमात्मतत्त्व तर "प्रपंचोपशमं शान्तं शिवं अद्वैतम्' आहे. म्हणून ते अरौद्र होय. वैराग्य जीवाला कडू वाटतें, संसार गोड वाटतो. पण संसाराचे गोडपण हे विषारी पण सुंदर फळासारखें, तर वैराग्याचे कडूपण हे कडू पए संजीवनी औषधीसारखे आहे. पण हे ज्ञान जीवाल नसते. त्यामुळे तो फसत असतो. या फसवणुकीतून गुरु सोडवितात. परमार्थ-मार्ग हा दिसायला रौद्र आहे पण परिणामतः तो सुखकर आहे. म्हणून ते परमात्मा अरौद्र म्हणावयाचा. सौम्य कां नाही म्हटला ? अरौद्र कां ? त्यांत हेतु आहे. हेतु हा के तो दिसायला रौद्र च आहे, पण रौद्र समजू नये कारण परिणामी तो अमृत आहे, हसविणारा आहे हे प्रकट व्हावें. "यत् तद् अग्रे विषमिव परिणाम ऽमृतोपमम्' असा आहे परमार्थ-मार्ग. म्हणून ते म्हटला आहे अरौद्र.

९०७. कुण्डली
अरौद्रः कुण्डली चक्री विक्रम्यूर्जित-शासनः शब्दातिगः शब्दसहः शिशिरः शर्वरीकरः ॥ हा संपूर्ण श्लोक परमात्म्याचे निर्दोषत्व व गुणाकरत्व प्रकट करणारा आहे. परमात्मा दंभ दर्प अभिमान क्रोध परुषता इत्यादि दाहक दोषांपासून मुक्त आहे, हे अरौद्र पद सूचित करते. तर "शिशिरः शर्वरीकरः हीं पदें तो शीतल सौम्य गुणनिधान आहे असें द्योतित करतात. परमात्मा रौद्र नाही इतकेच नव्हे तर तो कुण्डल म्हणजे कुण्डलवान् आहे, अलंकृत आहे. एखादा पुरुष वा स्त्री नुसती अव्यंग असून भागत नाहीं तर व्यक्तीच्या ठाईं गुणहि हवेत. ती विद्या कला कांचन यांनी संपन्नहि हवी. तेव्हांच ती सर्वांगसुंदर सर्वजन-नयन-मनोहर म्हटली जाते. परमात्ममूर्ति ही अशीच आहे. ती अरौद्र म्हणजे प्रसन्न आहे सौम्य, प्रियदर्शन, सुहास्य-वदन आहे. त्याच भोंवतीं सर्वत्र त्याची प्रसादचन्द्रिका पसरली आहे. सर्व मंगल गुणांचा आश्रय, सर्व विद्यांचा नि कलांच आकर आणि सुवर्णवस्त्रावृत व मणिभूषण-भूषित आहे. गायक गायिका नर्तक नर्तिका यांच्या गायन नर्तनावर लुब्ध होऊन लोक त्यांच्यावर चंदेरी बरसात करतात हे आपण पाहतों. म्हणजे गुण व कला यांच्यावरून सोनें नाणे हिरे माणकें ओवाळून टाकावीं अशी ती गुण कला आहेत. मग परमात्मा जो सर्व गुणांचा नि कलांचा निधान तो कां बरें कुण्डल-मण्डित असणार नाही, सर्व संपत्ति त्याची दासी होय. त्याच्या दिव्य गुणांवर लुब्ध होऊन श्री त्याच्या पायांची दासी झाली आहे. कुण्डली च काय पण तो श्रीपाद आहे. ती कर्णलग्नच नव्हे तर पदलग्न आहे. कुण्डली पद या सर्व अर्थाचे वाचक आहे.

९०८. चक्री
परमात्मा कुण्डली म्हणजे श्री-मन्त आहे तसा तो चक्री म्हणजे शक्तिमन्तहि आहे. चक्र हे निग्रहानुग्रहसामर्थ्याचे प्रतीक आहे. आपल्या सुदर्शन चक्रानें त्यानें वैऱ्यांची मुंडकी उडविली आहेत, आपल्या भक्तांचे परित्राण केले आहे. हे चक्र म्हणजे केवळ स्थूल वर्तुलाकृति शस्त्र नव्हे, तर कर्माचा अभंग कायदा होय. तुमची कर्मेंच तुमचे रक्षण वा भक्षण करतात. तुमची कर्में चांगली असली तर ती तुमचे रक्षण करतील. तुम्ही कितीहि विपत्तींत सांपडला तरी ती तुमची सोडवणूक करतील. तुम्ही कसें बचावलां तें तुमचे तुम्हांलाच कळणार नाही. पण ते सर्व तुमच्या पूर्व सुकृताचे फळ असते. तसेंच तुम्ही सर्व सौख्य अनुभवीत असतां, सुखाच्या राशीवर लोळत असतां एकाएकी तुमच्यावर आपत्ति येऊन कोसळते आणि पाहतां पाहतां तुम्ही भिकेस. लागतां. हे असें अकल्पित दुःख कुठून येते ? तेंहि तुमच्या पूर्व दृष्कृताचेच फळ असतें. कौरवपांडवांचा इतिहास आपल्याला हा कर्म-सिद्धांत समजावून सांगत आहे. ऐन वेळी कर्णाचें रथचक्र पृथ्वीत रुतते. काय कारण ? कारण त्याचे दैव म्हणजे पूर्व कर्म. ऐन वेळी धर्माला यक्ष भेटतो आणि त्याला वर देतो. काय कारण ? कारण त्याचे दैव म्हणजे पूर्व कर्मच. अशा प्रकारें आपलें बरें वा वाईट कर्म हेच एक आपलें तारक नि मारक आहे. आणि तें आहे आपल्याच हातीं, आपल्याच आत्म-शक्तीच्या हाती. म्हणून तो सर्वान्तर्यामी सर्व शक्तिमान् परमात्मा चक्री म्हटला आहे.

९०९. विक्रमी
परमात्मा हा निर्दोष गुणी आहे. आणि त्याच्या त्या गुणांत ब्राह्मणांचे शब्दबल, क्षत्रियांचे भुजबल आणि वैश्यांचें धनबलहि आहे. कुण्डली पदानें त्याचे सर्वगुणाश्रय धनगुणशालित्व प्रकट झालें आहे. चक्री विक्रमी आणि ऊर्जित-शासन या पदत्रयीनें त्याचे भुजबलगुणान्वितत्व प्रस्फुट झालें आहे. आणि शब्दातिगः शब्दसहः या पदद्वयीनें त्याचे शब्दबलशालित्व किंबहुना शब्दातिबलगुणशालित्व प्रकाशित झाले आहे असे म्हणतां येईल. त्याचे निर्दोषत्व अरौद्र पदानें आणि सर्वमंगलगुण-सुखास्पदत्व 'शिशिरः शर्वरीकरः' या पदद्वयीनें सूचित झाले आहे. असा एकूण श्लोकाचा भावार्थ आहे. चक्रीपद शक्तियुक्तिमत्ता प्रकट करतें तर विक्रमी पद त्याची पराक्रमशालिता प्रकट करतें. आणि ऊर्जितशासन हे पद त्याचे प्रजापालकत्व प्रकट करते. आधी शरीरबल आणि शस्त्रबल हवें, त्यानंतर पराक्रम हवा, शत्रुजयता हवी. आणि शेवटी हवी चक्रवर्तिता, सर्वत्र राजाज्ञा-शासन. चक्री विक्रमी आणि उर्जितशासन हीं तीन पदें त्याचेच सूचन करीत आहेत. प्राचीन काळी आपलें रणपाण्डित्य आपला पराक्रम आपलें सर्वातिशायित्व सिद्ध करण्यासाठी राजे लोक राजसूय यज्ञ करीत, दिग्विजय करीत. असा दिग्विजय करून राजसूय यज्ञ करणाराच चक्रवर्ती म्हणून राजमान्य होई. तोच खरा विक्रमी म्हणावयाचा. परमात्मा हा असा विक्रमी आहे. त्यानें हे विश्व जिंकून टाकले आहे. त्याच्या विरुद्ध कोण उभा राहूं शकला आहे ? तो विश्वजित् आहे. तो सद्रूप असून एक त्याचीच सत्ता या विश्वांत चालते आहे. त्याचेच चक्र या विश्वांत अप्रतिहत प्रवर्तित होत आहे. इतरांची सत्ता कुठल्या तरी कोपऱ्यांत नि तीहि चार दिवस चालते आणि बंद पडते. परंतु परमात्माची सत्ता ही सबंध विश्वांत निरंतर एकच एक चालली आहे. म्हणून तो विक्रमी.

९१०. ऊर्जित-शासन
ऊर्जितं प्रबलं शासनं यस्य सः ऊर्जित-शासनः । ज्याचे शासन ऊर्जित म्हणजे प्रबल आहे तो म्हणावयाचा ऊर्जित-शासन. ज्याच्या शासनाचें अतिक्रमण करता येत नाहीं तो म्हणावयाचा ऊर्जितशासन, जगांत जितकी राज्ये आहेत त्यांच्यांत एकहि असें नाहीं की लोक ज्याचे कायदे सर्वचे सर्व सर्वांशानें पाळतात. आणि ज्या विधि-निषेधांचें आणि जितक्या अंशानें अवज्ञान होतें त्याबद्दल त्यांना अवश्य शासन होतें, दण्ड होतो असेंहि नाही. म्हणजे हे राजे लोकांचे शासन ऊर्जित, प्रबल नव्हे, तर तें क्षीण व अवज्ञात आहे. अशा शासनाला की ज्याचें पालनच होत नाहीं शासन म्हणणेहि अनुचितच. परंतु परमात्म्याचे शासन असें नाहीं. तें सार्वभौम आहे. आणिं सर्वाकालिक आहे. कोणीहि त्यांतून सुटूं शकत नाही. आणि जितक्या अंशानें अवज्ञा होते तितक्याच अंशानें त्याला शासनहि होते. म्हणून परमात्म्याचे शासन में कांटेकोर आहे, उर्जित आहे. हे कसें होतें ? हे कर्मसिद्धान्तानुसार होतें. करावें तसे भरावे हा ईश्वरी नियम आहे. त्याचे उल्लंघन कोणालाहि करतां येत नाहीं. मनसा वाचा कर्मणा में बरें वाईट कर्म मनुष्य करतो त्याचे फळ त्याला अवश्य मिळतें. मनांत जरी किंचित् वाईट आले तरी ते त्या हृदयस्थ परमात्म्याला कळल्यावांचून राहत नाही. आणि त्याचे अनिष्ट फळ त्याला मिळाल्यावांचून राहत नाही. तसेच त्यानें किंचित् जरी सत्कर्म केलें तरी त्याचे इष्ट फळहि त्याला मिळतेच मिळतें. तें इतकें कांटेकोर असते की तुम्हांला ते कळो वा न कळो मिळाल्या वांचून राहत नाही. प्रत्येक सुख हे तुमच्या सुकृताचा आणि प्रत्येक दुःख हे तुमच्या दुष्कृताचा अवयंभावी परिणाम होय. हे अवश्यंभावित्वच ऊर्जितत्व होय. जगांतील कोणतेहि विधिनिषेध ईश्वरी नियमाची अवज्ञा करू शकत नाहींत. म्हणून ते अनूर्जितच होत. आणि एरव्हींहि ते अकिंचित्करच होत.

९११. शब्दातिग
शब्दं अतिगच्छति इति शब्दातिगः । जो शब्दाला उल्लंघून जातो तो म्हणावयाचा शब्दातिग. परमात्मा हा असा शब्दातीत आहे. शब्द ही एक महान् शक्ति आहे. अव्यक्त आणि व्यक्त यांच्या मधील तो सांधा आहे.. दोहोंमधील तो.दुवा आहे. त्याच्या द्वाराच सर्व व्यवहार होतोः परा पश्यन्ती मध्यमा वैखरी अशा त्याच्या चार परी आहेत. त्या विचारांत घेतल्या म्हणजे तर तो अक्षर ब्रह्मच म्हणावा लागतो. म्हणून शब्दोपासना ही महान् उपासना होय. ती उपासकाला कल्पवल्लीच आहे. त्याच्या सर्व कामना ती पुरविते. म्हणून च म्हटलें आहे" एकः शब्दः सम्यग् ज्ञातः सम्यक् प्रयुक्तः स्वर्गे लोके कामधुग् भवति । " याचे कारण शब्द हा वस्तुतः अर्थच होय. अर्थाहून भिन्न तो राहूच शकत नाही. नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणें शब्दार्थ हे संलग्न किंबहुना अभिन्न होत. एकवेळ नामावांचून एखादें रूप असूं शकेल पण नाम हे रूपावांचून राहूच शकत नाही. म्हणून नाम हाती आले की त्याचे दुसरें टोंक रूप वा वस्तु आपण हस्तगत करूं शकतों. नामावरून त्याचे स्वरूप त्याच्या प्राप्तीचा उपाय, प्रेरणा आणि बळ सर्वच आपल्याला अवगत होत असते. म्हणून शब्दच सर्वस्व होय. पण इथे तर तो परमात्मा शब्दातिग म्हटला आहे हे कसे ? याचे कारण शब्द हा वस्तूचे यथार्थ वर्णन करू शकत नाही हे आहे. तो वाचक नाहीं तो संकेतरूप आहे, सूचक आहे. शब्दाला व्यक्ताचें सुद्धा यथार्थ वर्णन करता येत नाही. गळ गोड आहे म्हटल्यानें गोडीची यथार्थ कल्पना होत नाही. गोडीच्या परी असंख्यच आहेत आणि गुळाच्याहि गोडी समान नाहीत. अशा स्थितींत गोड शब्दानें आपण जे काय समजतों तें इतकेंच की तो पदार्थ आंबट, खारट, तुरट, कडू वा तिखट नाही. म्हणजे वस्तु वा अर्थ हा शब्दातिग झाला. हे जर मूर्त वस्तुविषयीं झालें तर जी वस्तु निराकार अव्यक्त नि निर्गुण आहे तिच्या विषयी हे किती अधिक लागू म्हणावयाचें ? शिवाय यथार्थ वर्णन अलाहिदा पण जो मुळी वर्णनाचाच शब्दांचाच विषय नव्हे तो निर्गुण परमात्मा सहजच शब्दातिग होय.

९१२. शब्दसह
शब्दं सहते जयति वा इति शब्दसहः । जो शब्द सहन करतो वा जिंकतो तो म्हणावयाचा शब्दसह. परमात्मा हा शब्दातिग असला, शब्दाची पोच तिथवर नसली, तरी तो शब्द-विरोधी नाही. तो शब्द सहन करून घेतो, कारण तो असा नाही तसा नाहीं हेहि अखेर शब्दानेच सांगावे लागते. 'नेति नेति हेहि अखेर शब्दच. शिवाय दुसरे म्हणजे तो भाव ओळखतो. शब्दावरून विरोध विग्रह अज्ञच करतात. बाप रागावला आणि मुलाला 'तुझें तोंड पाहणार नाही म्हणाला' याचा अर्थ इतकाच की तो मुलावर फार रागावला आहे. त्याचा शब्दार्थ घ्यावयाचा नाही. जे शब्दार्थालाच चिकटून बसतात ते नेहमी गोत्यांत येतात आणि त्यांना शब्दाच्या खोड्यांतून सोडवावे लागते. विवेकी मनुष्य अशा खोड्यांत सांपडत नाही. तो तें शब्दजाल तोडून मोकळा होतो. गांधींनी गाईचे दूध प्यायचे नाहीं असें ठरविलें आणि जेव्हां दुधावांचून जगणे अशक्य झाले तेव्हां शब्दाला चिकटून राहून बकरीचे दूध प्यायला सुरवात केली. यांत ते समजतात की आपण प्रतिज्ञाभंगच केला आहे. पण वस्तुतः त्यांनी विवेकच केला असें मानलें पाहिजे. त्यांनी प्रतिज्ञा केली ती त्या वेळी त्यांना प्रतीत झालेल्या सत्याला अनुसरून होय. पण मागाहून जेव्हां त्यांच्या लक्षात आले की ही प्रतिज्ञा योग्य नाहीं, निदान आपल्या पुरती तरी ती अनुचितच आहे, तेव्हां त्यांनी मागील प्रतिज्ञेचा बाऊ न करतां आपलें मतपरिवर्तन झाले असल्याचे वा आपली शक्ति नसल्याचे जाहीर करून खुशाल गाईचे दूध घ्यायला पाहिजे होते. परंतु ते आपल्या शब्दाच्या जाळ्यांतच जणूं अडकून राहिले. हे शब्दातिगत्व नव्हेच, पण शब्दसहत्वहि नव्हे. हे झालें शब्दबद्धत्व वा शब्ददास्य. आत्मा हा शब्ददास नाहीं. तो सर्वतंत्रस्वतंत्र आहे. त्याला निगुण म्हटल्यानें तो आपलें सगुणत्व बाधित होऊं देत नाही. अथवा सगुण म्हटल्यानें निर्गुणत्व बाधित होऊं देत नाही. दोन्हीहि तो पचवतो आणि दोहोंतूनहि स्वतंत्र म्हणजे केवल-स्वरूप राहतो. म्हणून तो म्हटला आहे शब्दसह.

९१३. शिशिर
शृ शिरति इति शिर: पुनः पुनः शिरति इति शिशिरः । शृ म्हणजे झाडणे गाळणे, डोकें केस गाळत असते म्हणून ते शिर होय. जो ऋतु सारखा जुनी पानें झाडतच राहतो तो शिशिर म्हणावयाचा, परमात्मा हा शिशिर ऋतूप्रमाणें आपल्या सर्व उपाधि झाडून टाकतो, सर्व ताप निववितो म्हणून तो शिशिर होय. जीवाला आध्यात्मिक आधिदैविक आणि आधिभौतिक ताप सारखे पोळत असतात, जाळत असतात. त्यांत तो सारखा होरपळून निघत असतो. एखाद्या जळावेगळया झालेल्या मासोळी सारखा तो तडफडत असतो खालून रेती पोळत आहे, वरून सूर्य जाळत आहे. आंतून क्षुधातृष्णा व्याकुळ करीत आहे, शोषीत आहे. अशा आंतून बाहेरून जळणाऱ्या जीवाला शांति अमृताच्या डोहांतच लाभावयाची. तोच तो परमात्मा. म्हणून तो म्हटला आहे शिशिर, तो परमात्मा जीवाचे सर्व ताप निववून त्याला आतून बाहेरून गारीगार करतो. सुधासिन्धूत डुंबणाऱ्या जीवाला जसे अन्तर्बाह्य सर्वांग परम शीतल सुखरूप वाटते तसें परमात्म-भेटीनें जीवाला. म्हणून तो परमात्मा म्हटला आहे शिशिर. महिम्नांत म्हटलेंच आहे.
यदालोक्यालादं हद इव निमज्यामृतमये ।
दधत्यन्तस्तत्त्वं त्वमसि यमिनस् तत् किल भवान् ॥

परमात्मा दाहक अविद्याकामकर्ममय संसारानें शून्य आणि शिशिर-शीतल वैराग्य-ज्ञानानें परिपूर्ण आहे.
बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम् ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयश्नुते ॥ गीता ५ - २१

या शब्दांत परमात्म्याचे अरौद्रत्व नि शिशिरत्व प्रकट केले आहे. एक निषेधक लक्षण आहे, दुसरें विधायक, दोन्ही मिळून पूर्णता.

९१४. शर्वरीकर
शर्वरी क्षणदां करोति इति शर्वरीकरश् चन्द्रमा । शर्वरी म्हणजे सुखदायिनी पुनवेची रात्र. ती जी करतो तो पूर्णचन्द्र म्हणजे शर्वरीकर म्हणावयाचा. परमात्मा हा शर्वरीकर आहे. रात्र म्हणजे दिवसाच्या सर्व तापाची समाप्ति सर्व कर्म कटकटीची समाप्ति. रात्र म्हणजे - शान्ति, रात्र म्हणजे विश्रान्ति. रात्री मनुष्य सर्व श्रम आणि चिंता यांपासून मुक्त होऊन देहामनानें पूर्ण विश्रान्ति व शान्ति अनुभवीत असतो, सुख अनुभवीत असतो. सुषुप्तींत त्याला परमानन्द लाभत असतो. तिथूनच दुसऱ्या दिवसासाठी त्याला नवी स्फूर्ति, नवें बळ प्राप्त होतें, संजीवन मिळतें. चंद्रमा रात्रीच्या वेळी आपल्या अमृतदृष्टीनें नि वृष्टीनें ओषधींमधे रसोत्कर्ष करीत असतो. सूर्य रसशोष करीत असतो, तर चन्द्रमा रसपोष करीत असतो. सर्व जीवांना शान्तिः पुष्टिस् तुष्टिः देणारी शर्वरी करणारा हा जो चन्द्रमा तो परमात्माच होय. आणि परमात्माच जीवाला शान्तीची नि सौख्याची पूर्णिमा करीत असतो. म्हणून तो शर्वरीकर म्हणावयाचा. अनिष्टपरिहार आणि इष्ट-संप्राप्ति करून देणारा, सर्व दोष-निवारण आणि सर्व गुण-संनिधान करणारा. सर्व पापताप-निवारण करून षोडशकल मंगल कलश, अमृताचा पूर्ण कुम्भ हाती देणारा परमात्मा हा शर्वरीकर नाही तर काय म्हणावयाचा ? शंकराचार्यांनी "या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ हा गीतेचा श्लोक उद्धृत करून ब्रह्मरूप व संसाररूप शिवाशिव रात्रि करणारा तो शर्वरीकर म्हटले आहे. मी निशा आणि शर्वरी यांच्यातील साभिप्रायता लक्षून आणि संदर्भहि लक्षात घेऊन वरील अर्थदोहन केले आहे.


अक्रूरः पेशलो दक्षो दक्षिणः क्षमिणाम् वरः ।
विद्वत्तमो वीतभयः पुण्यश्रवणकीर्तनः ॥९८॥


९१५. अक्रूर
न क्रूरः अक्रूरः । परमात्मा हा क्रूर नाही तर क्रौर्याचा अभाव आहे. · क्रौर्याच्या अभावापासून आरंभ करून उत्तरोत्तर गुणोत्कर्षानें या श्लोकार्धात त्याला 'क्षमिणां वरः' म्हटले आहे ः " अक्रूरः पेशलो दक्षो दक्षिणः क्षमिणां वरः," तो क्रूर कठोर नसून पेशल म्हणजे सदयहृदय व व्यवहारांत मृदुमसृण आहे, तो कर्तव्यदक्ष असून दक्षिण म्हणजे दाक्षिण्यशील आहे. किंबहुना तो "क्षमिणां वरः" आहे. सर्वांचे सर्व कांहीं पोटांत घालणारा आहे. असा दैवी गुणांचा परमोत्कर्ष त्याच्या ठाई झाला आहे. तो सकलानिष्टशून्य आणि सकल - मंगलपरिपूर्ण असा आमचा आदर्श आहे. सकल अनिष्टांचा अर्क म्हणजे क्रूरता, निर्दयता, ती त्याच्या ठाईं नाही. ही निषेधमर्यादा आरंभबिंदु तिथून विधायक गुणांचा जो उत्कर्ष झाला त्याचा परमोच्च बिन्दु म्हणजे क्षमा ऊर्फ साम्य. या दोन बिन्दूंना, आरंभक व समापक बिन्दूंना, जोडणारी जी सुरेखा तिचें नांव शान्ति होय. ही आरंभीहि आहे, मध्येहि आहे आणि अन्तींहि आहे. म्हणून तिचा त्रिवार घोष होतो ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः । क्रूरता म्हणजे काय ? क्रूरता म्हणजे आत्मौपम्याचा विसर. सर्व जीव समान आहेत. सर्वांचे सुखदुःख समान आहे. म्हणून जे आपल्याला नको ते दुःख कोणाला देऊं नये आणि जें हवें तें सुख सर्वांना द्यावें याचें नांव आत्मौपम्य होय. यालाच म्हणावयाचे अक्रूरत्व, जो केवळ आपल्याच सुखाचा विचार करतो तो क्रूर होय, असा देहधारी जीव सर्व जगाचा आपल्या देशासाठी, देशाचा आपल्या गांवासाठी, गांवाचा आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबाचा आपल्या बायकोपोरांसाठी आणि बायकोपोरांचा आपल्या देहाच्या सुखासाठी द्रोह करायला कचरत नाहीं. म्हणजे देहाभिमान ही क्रूरता होय. परमात्मा अभिमानरहित असल्यामुळे तो अक्रूर होय.

९१६. पेशल
पेशल म्हणजे सुकुमार, नाजुक, सर्वथा कोमल. ज्याच्या ठाई मानसिक क्रौर्य, वाचिक कठोरता, कायिक काठिण्य यांचा सर्वथा अभाव आहे, त्याला म्हणावयाचें पेशल. जसें अर्भक, त्याचे अन्तःकरण प्रेममय असते. त्याच्या मनांत कोणाविषयींहि दुर्भाव असत नाही. वैर असत नाहीं, दुजाभाव असत नाही. विषधराशीहि तें खेळतें. रोम्यूलस्प्रमाणें वृकीला मातृवत् चिकटते. तिचे स्तन्य पिऊन धन्य होते. त्याला सारे विश्व मातृवत् वाटते. शकुंतलेप्रमाणें शकुन्तहि त्याला येऊन भरवतात. शाकुंतलांत म्हणे शृंगाररस भरला आहे ! विद्वान् रसिकांच्या मताचा अधिक्षेप कसा करायचा ? पण मला आपलें शाकुन्तल म्हणजे मूर्तिमन्त वात्सल्य वाटते. शकुंतला . आहे संस्कृत नांव. त्याचेच मराठी म्हणजे चिमणाबाई. सारी जादू या नामांतच आहे. त्यांतच शाकुंतल आहे. चिमण्या जिवाची चिवचिव किती गोड वाटते कानाला ? ज्यानें ती कधी ऐकली नसेल तोच म्हणेल वीणा गोड आहे ! "तें बोलणे सुकुमार । मुख मोहाचें माहेर । माधुर्या फुटले अंकुर । दशन तैसे ॥ " हे वर्णन त्यालाच लागू पडते. बालकाच्या बोबड्या बोलाहून मृदु मधुर वाणी अद्याप झाली नाहीं नि पूढे होणार नाही. कानामनाला मोहिनी घालण्याचे सामर्थ्य त्या बोबड्या बोलांत कुठून बरें येते ? तेहि त्याच्या प्रेममयतेंतूनच होय. जसे त्याचे मन, जसे त्याचे वचन, तसेच त्याचे तनहि किती कोमल असते ? सांवरीच्या कापसासारखें मऊ मऊ आणि गुबगुबीत ! स्पर्शसुखाची ती परमावधिच होय. त्याहून सुखस्पर्श या जगांत दुसरें कांही आहे का ? शोधूनहि सांपडावयाचे नाही. असे हे त्रिगुणित सौकुमार्य म्हणजे पेशलत्व होय. बालकाच्या ठाई आपल्याला तें आढळतें. कारण बालक हा देवाघरून आलेला आहे. त्याचा वारस आहे. हा वारसा वाढवणें वा उधळून टाकणे माणसा हाती आहे. उधळून टाकून तो दानव होतो. रक्षण आणि संवर्धन करून तो देव होतो. म्हणून म्हटले आहे श्रुतीनें "पाण्डित्यं निरविद्य बाल्येन तिष्ठासेत." परमात्मा हा प्रेमस्वरूप आहे म्हणून तो म्हटला आहे पेशल.

९१७. दक्ष
परमात्मा हा दक्ष आहे. पण दक्ष म्हणजे काय ? दक्ष म्हणजे अप्रमादी. आपल्या कर्तव्यांत कसूर न होऊं देणारा. निधिभुजंग जसे आपल्या निधीचें अनिमेष नें यांनी निरीक्षण रक्षण करीत असतात त्याप्रमाणें आपल्या स्वत्वाचें जो संगोपन करीत असतो, तो दक्ष होय. सूर्य सदैव पेटला आहे, वारा वाहतो आहे, पाणी द्रवते आहे, धरा धरते आहे आणि आकाश सदैव सामावतेंच आहे. अशी ईश्वरी सृष्टि स्वकर्तव्यदक्ष आहे. जो तो आपल्या कर्तव्याला जागतो आहे. याचें नांव दक्ष. ब्राह्मण ज्ञानदान करतो आहे, क्षत्रीय प्रजा-पालन करतो आहे, वैश्य भूत-भरण करतो आहे, शूद्र सर्व-सेवा करतो आहे, हे सर्व असें चालले आहे म्हणून ही सृष्टिसंस्था टिकून आहे. भगवान् आपली दक्षता आपल्या श्रीमुखानें गीतेत वर्णीत आहेतः यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यन्द्रितः । मम वानुवर्तेरन् मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ गीता ३ - २३ उत्सीदेयुरिमे लोका न कुयाँ कर्म चेदहम् । संकरस्य च कर्ता स्यां उपहन्यां इमाः प्रजाः ॥ गीता ३ - २४ परमात्म्याची ही दक्षता उर्फ स्वकर्तव्यनिष्ठा अनुकरणीय आहे. पण पुष्कळदा धर्मविचिकित्सा निर्माण होते, कर्तव्याकर्तव्यसंदेह निर्माण होतो. "किं कर्म किमकर्मेंति कवयो ऽप्यत्र मोहिताः" तेव्हां कर्तव्यनिर्णय करणे कठिण होऊन बसतें ? अर्जुन युद्धाला उभा राहिला आणि स्वजन-समूह पाहून गडबडला, गोंधळला." न चैतद् विद्मः कतरन् नो गरीयो यद् वा जयेम यदि वा नो जयेयुः । यानेव हत्वा न जिजीविषामस् तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥" या धर्मसंकटांत धर्मनिर्णयाची, स्वकर्तव्यनिश्चयाची कसोटी कोणती ? कसोटी आहे "कोऽहम्' चें उत्तर. रामानें आपल्याला हा प्रश्न विचारला आणि त्याला उत्तर मिळालें "मी दशरथाचा पुत्र." आणि तदनुसार पित्राज्ञापालन हे त्याचे कर्तव्य ठरून तो वनवासाला निघाला. अर्जुनाला हे उत्तर मिळेना म्हणून तो गोंधळला. पण मागाहून कृष्णाच्या उपदेशानें त्याच्या लक्षात आले की आपण. क्षत्रिय आहों. आपल्या राज्याचे हक्कदार. आणि त्या नात्यानें लढणे हेच झालें कर्तव्यः तदनुसार तो लढला. परमात्माहि आपण आत्मरूप म्हणून केवळ आत्मधर्म पाळतो तो अनात्मवश होत नाही. म्हणून तो दक्ष. विश्वेश्वर या नात्यानें तो सृष्टि-स्थिति-संहार करतो. म्हणून तो दक्ष.

९१८. दक्षिण
घर काय नि सृष्टि काय ज्या गुणांवर सुरळीत चालते ते हे दैवी गुण "अक्रूरः पेशलो दक्षो दक्षिणः क्षमिणां वरः । " या श्लोकार्धात आले आहेत, गुणविशेषणांच्या रूपाने. मनुष्य क्रूर नसावा. तो दीनांचा दयाळू, मनाचा मवाळू असावा. त्याचेच नांव पेशल. तो आपआपल्या कामधंद्यांत दक्ष असावा. त्याचबरोबर तो दक्षिण म्हणजे सरळ, ऋजु असावा. लोकांना सानुकूल असावा. सावकार सावकारीत दक्ष असावा, पण तो इतका दक्ष नको की कर्जदाराचे रक्तच पिऊ बघेल. त्याच्या ठाई दक्षिणता हवी. दुसऱ्याच्या अडी-अडचणीचा विचार हवा. प्रसंगी त्यानें व्याज सोडून द्यावें. एखादे वेळी मुद्दलहि सोडून देण्यास मागे पुढे पाहूं नये. याचे नांव दक्षिण, याचें नांव क्रुजु. दाक्षिण्य म्हणजे समोरच्याला अनुकूल वागणे. पाणी हे दक्षिण आहे. ते आपला धर्म सोडीत नाही. पण तसें करतांना तें जगाला अनुकूल होऊन चालतें. "पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाया वैसा' हे त्याच्या दाक्षिण्याचे लक्षण आहे. त्याच्या वाटेंत खाच खळगे येवोत, दगडधोंडे येवोत, दऱ्याखोरी वा डोंगर टेकड्या येवोत, तें तकरार करीत नाही. त्यांना भरून आणि पुरून ते पुढे सरकतें. तें वळणें वांकणे घेऊन प्रवाहित होते. "न्यून ते पुरतें, अधिक तें सरतें' करून घेऊन ते आपला मार्ग काढीत आपल्या प्राप्तव्याला पोचत असते. असें तें दक्षहि आहे आणि दक्षिणहि आहे. परमात्मा हा तसा आहे. तो सर्वांना दक्षिण आहे, ऋजु आहे, सानुकूल आहे. म्हणून त्याला दक्षिणामूर्ति म्हटले आहे. "फेडीत पाप ताप । पोखीत तीरीचे पादप । समुद्रा ज़ाय आप । गंगचें जैसें ॥ " तसें. ज्याचे शुद्ध, परार्थ जीवन आहे तो म्हणावयाचा दक्षिण. आपल्या कडील विधवा विकेशा संन्यासिनी स्त्रियांना आपण गंगाभागीरथी म्हणतों. फार थोर पदवी आहे ही. पवित्र नि परार्थ जीवन. त्यांत कामकल्मश नाहीं, स्वार्थ नाही. केवळ परोपकार. 'तुका म्हणे आतां । उरलों उपकारा पुरता' अशी स्थिति. सर्वांना दक्षिण होतां येईल, वक्रता वांकडेपणा टाकता येईल, जर ते आपला स्वार्थ सोडतील. परंतु देहाभिमानामुळे स्वार्थ सुटत नाही आणि स्वार्थामुळे मनुष्य नाना पा आचरतो. ही पापेंच कुटिलता होय. ती ज्याच्या ठायीं नाहीं तो दक्षिण होय, ऋजु होय. परमात्मा निरभिमान असल्यामुळे तो सहजच निःस्वार्थ, म्हणून निष्पाप आणि निष्पाप म्हणून दक्षिण होय. सर्वसानुकूल होय.

९१९. क्षमिणांवर
परमात्मा हा क्षमाशीलामध्ये क्षमाशील आहे.परम क्षमावन्त आहे. पृथ्वीला तर क्षमाच नांव आहे. म्हणजे ती मूर्तिमंत क्षमाच होय. आमचे सर्व जीवनिकायांचे सर्व अपराध ती पोटांत घालत आहे. तिला आपण सारखे तुडवीत असतों. तरी ती रागावत नाही. मनांत वैर द्वेष बाळगीत नाही. कसलाहि प्रतिकार करीत नाही. ही क्षमाच विश्वविजयी आहे. अनादि कालापासून राजे लोक पृथ्वीसाठी भांडत आले आहेत. पण आज.ते कुठे आहेत ? कुठे आहे त्यांचे राज्य नि साम्राज्य ? ते सर्व निमाले. पृथ्वी मात्र कायम आहे, आणि तिचेच राज्य आहे. युद्धे निमाली क्षमा मात्र टिकली. अशी ही क्षमा ब्राह्मणांचे ब्रीद आहे. कारण "क्षमावतां अयं लोकः, परश्चैव क्षमावताम्". विश्वामित्राला त्यामुळेच अखेर म्हणावे लागलेंः घिग् बलं क्षत्रिय-बलं, बह्म-तेजोबलं बलम् । वस्तुतः क्षमा आणि तेज ही परस्पर विरुद्ध तत्त्वें होत. पण इथें क्षमेला (ब्रह्म-) तेज म्हटले आहे. कारण मात करणारे तत्त्व आहे ते. या क्षमातत्त्वाचा, या शान्ततेजाचा परमोत्कर्ष-बिन्दु म्हणजे ब्रह्म होय. कसे आहे तें ? 'शान्तं शिवं अद्वैतम् . तिथे कशाला प्रतिकार नाही. सर्वांची ती समन्वयभूमि आहे. सर्व विरोधकांचे विरोध नि परस्पर-विरोध इथे अविरुद्ध होतात, अवरुद्ध होतात, शान्त होतात, म्हणून त्याला उपमा दिली आकाशाची. खं ब्रह्म. पृथ्वीला तुम्ही एक मणाची धडक दिली तर उलट ती तितक्याच वजनाची धडक तुम्हांला देते. पण आकाशांत विमानें नि अग्निबाण प्रचंड धडका देतात, पण त्यांना आकाश अणुमात्रहि प्रतिकार करीत नाही. म्हणून वस्तुतः आकाशच क्षमामूर्ति म्हटलें पाहिजे. पण तेहि व्यक्त आहे. त्याचाहि प्रतिकार संभवतो, परंतु परमात्मा तर अव्यक्त निगुण आहे. म्हणून तो म्हणावयाचा क्षमिणां वरः.

९२०. विद्वत्तम
परमात्मा हा सहजच विद्वत्तम म्हणजे निरतिशय ज्ञानवान् आहे. निखळ सोन्याच्या लगडीत जसें सोन्यावांचून दूसरें कांहींच नसते, ती केवळ सोनेंच सोनें असते तसे परमात्मतत्त्व हे निखळ ज्ञानच ज्ञान आहे. त्याहून अधिक निबिड ज्ञान आढळावयाचे नाही. म्हणून तो म्हटला आहे विद्वत्तम. "प्रज्ञानं ब्रह्म' या महावाक्यांत हीच विद्वत्तमता प्रज्ञान पदानें वर्णिली आहे. चिद्घन, चैतन्यधन, चिन्मात्रमूर्ति इत्यादि प्रयोगहि तेंच विद्वत्तमत्व प्रकट करण्यासाठी योजिले जातात. विश्वांत कोणतीहि वस्तु वा घटना जिच्या विषयीं ती आहे वा नाहीं, झाली वा गेली असें कसलें विधान होतें तें चैतन्याच्या जाणिवेतूनच होत असते. म्हणूनहि तो परमात्मा विद्वत्तम होय. त्याच्या जाणिवेंत जें आलें नाहीं तें मुळी आहे असे म्हणतांच येत नाही. त्यामुळे तो चैतन्यमूर्ति परमात्मा सर्वज्ञ होय. गीतेत म्हणूनच म्हटले आहेः वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन । . भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥ चिद्रूप असल्यामुळे तो स्वाभाविकच विद्वत्तम आहे इतकेच नव्हे तर बाह्य ज्ञान म्हणजे भौतिक ज्ञान, अन्तान म्हणजे मनोविज्ञान आणि अन्तरतर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान यांतहि तो पारंगत असल्यामुळे तो विद्वत्तम होय. आमचे भौतिक विज्ञान अणुस्फोटनापर्यंतच पोंचलें आहे. मानवाला अद्याप सृष्टीचे संपूर्ण रहस्य उलगडलें आहे असें नाही. मनोविज्ञानाच्या बाबतीत तर तो अगदी पोरच आहे. काम क्रोध लोभांवर कसा ताबा मिळवावा हे त्याला समजत नाही आणि आत्मज्ञान तर त्याला मुळीच नाही. तो प्रान्त च जणूं त्याच्या गांवीं नाही. परंतु परमात्म्याला या सर्व विषयांचें समग्र आणि निःसंशय ज्ञान आहे. ही सृष्टिच त्याचे प्रमाण आहे. म्हणूनहि तो परमात्मा विद्वत्तम होय.

९२१. वीतभय
विगतं भयं यस्मात् सः वीतभयः ! ज्याचे भय विगत झालें,दूर झालें तो म्हणावयाचा वीतभय. परमात्मा हा वीतभय आहे. कारण, तो विद्वत्तम आहे. जिथे ज्ञान तिथे अभय हे असावयाचेच. ज्ञानाचा तो अपरिहार्यपरिणाम आहे. जोवर रज्जूसर्पाची भ्रांति आहे तोवरच भय आहे. ती भ्रांति, तें अज्ञान गेलें की भय पळाले. भयमुक्ति हीच खरी मुक्ति होय आणि ती आहे ज्ञानाचे कार्य.
या विद्या सा विमुक्तयेहे वचन प्रसिद्धच आहे. याज्ञवल्क्यानें जनकाला आत्मविद्या दिली आणि सांगितलें अभयं वै जनक प्राप्तोऽसिजनका, आतां तू अकुतोभय झाला आहेस, अभयास पावला आहेस. हे झालें उपनिषद्. गीतेंतहि शेवटी अर्जुन म्हणतोः नष्टो मोहः स्मृतिर् लब्धा स्थितोऽस्मि गतसंदेहः मी मारणारा, हे मरणारे हा माझा मोह, ही माझी भ्रांति गेली, "मी न मारीन मरें" असें तें आत्मतत्त्व आहे ही स्मृति में ज्ञान मला झाले. आता मी गतसंदेह म्हणजे निःशंक झालों आहे. पापभयमुक्त झालो आहे. आतां मी देवा तु सांगशील तसें करीन. म्हणजे आत्मविचारानें निर्भय व्यवहार करीन. ही जी निःशंकता, ही जी वीतभयता, तिचेच नांव मुक्ति होय आणि ती आत्मज्ञानाचा अवश्यंभावी परिणाम होय. परमात्मा हा केवळ ज्ञानस्वरूपच असल्यामुळे तो सहजच वीतभय आहे. परमात्मा हा वीतभय आहे, याचा अर्थ त्याला कोणापासून भय नाहीं एवढाच नाही. तर त्याच्या पासूनहि कोणालाहि भय नाही. याला दृष्टांत आकाशाचा. आकाशाला कोणाचे भय नाही. आणि आकाशाचे कोणाला भय नाहीं. आकाशांतच सारें विश्व तरंगते आहे आणि साऱ्या विश्वांत आकाश ओतप्रोत आहे. जसें आपलें आपल्याला भय असू शकत नाही, तसें परमात्म्याला ह्या स्वात्मरूप विश्वाकाराचे भय नाही. अद्वैत आहे मग भय कसले ? म्हणून परमात्मा हा वीतभय म्हणावयाचा.

९२२. पुण्य-श्रवणकीर्तन
पूण्यं पावनं श्रवणं कीर्तनं च यस्य सः पुण्य-श्रवणकीर्तनः । ज्याचे श्रवण आणि कीर्तन पावन आहे, अघहर आहे, तो म्हणावयाचा पुण्य-श्रवणकीर्तन. परमात्म्याच्या नामरूप-गुणकर्माचे श्रवण पापनाशन आहे. अर्थातच त्यांचे कीर्तनहि पापनाशन आहे. कारण कोणी तरी तें कीर्तन केल्यावांचून श्रवण होणारे नाहींच. म्हणजे श्रवण कीर्तन ही एक जोड क्रिया आहे. दुहेरी क्रिया आहे. एक क्रिया पावन म्हटली म्हणजे दुसरीहि झालीच. म्हणून दोहोंचा समाहार केला आहे, एकत्र उल्लेख केला आहे. पूर्वी पुण्यकीर्ति म्हणून पद येऊनच गेलें आहे.. पण तिथे ही दुहेरी प्रक्रिया प्रकट झाली नव्हती. ती या नामांत विशद झाली आहे. कीर्ति म्हणजे नांवलौकिक. हे नांव कोणी तरी घेतो, कोणी तरी त्याचा लौकिक त्याचे रूप गुण नि कर्में वाखाणितो आणि कोणी तरी तें श्रवण करतो. असें होतें तेव्हांच कीर्ति होते. म्हणून पुण्यकीर्ति म्हटले तरी त्यांत श्रवण कीर्तन गृहीतच आहे. इतकेंच की त्या प्रक्रियेकडे नव्हे तर तिच्या फलिता कडेच तिथें अधिक लक्ष दिलेले आहे. अभिप्रेत फलित आहे, त्याची प्रक्रिया नव्हे. इथे मात्र त्याची स्पष्ट फोड केली असून त्या प्रक्रिया पुण्यप्रद आहेत, पापहर आहेत असे म्हटले आहे. कशाप्रकारे होतात त्या पापहर आणि पुण्यप्रद ? आत्मविषयक अज्ञानाची पुटें दूर करून ती आत्मस्वरूपाचा आविष्कार करीत जातात आणि अशा प्रकारे ती पापहर आणि पुण्यप्रद होतात. सत्य हे नाम घेतलें म्हणजे असत्यमात्राचा निषेध झाला. सत्य-नामश्रवणानें वा कीर्तनानें मनुष्य मननास प्रवृत्त व्हावा. तो सत्याचा शोध घेत जाईल. जसजसा शोध घेईल तसतसा बोध होईल. आणि त्या बोधाबरोबर कायिक वाचिक मानसिक असत्याची पुटे गळून पडतील. हेच अघनाशन होय आणि तेच पुण्य-प्रकाशन होय. जसजसा आत्मा अज्ञान-मलापासून मुक्त होतो तसतसा तो पुण्योज्ज्वल आणि स्वरूपसुंदर होत जातो. म्हणून तो परमात्मा म्हटला आहे पुण्य-श्रवणकीर्तन. नामाप्रमाणेंच त्याचे रूप, त्याचे गुण, त्याचे कर्महि समजावयाचे, वस्तुतः कर्मावरून गुणावरून आणि स्वरूपावरून च तर नामें पडली आहेत. म्हणून नामरूप-गुणकर्मात्मक कीर्ति एकरूप च होय.


उत्तारणो दुष्कृतिहा पुण्यो दुःस्वप्ननाशनः ।
वीरहा रक्षणः सन्तो जीवनः पर्यवस्थितः ॥९९॥


९२३. उत्तारण
तारण म्हणजे बुडत्याला वाचवणारा आणि उत्तारण म्हणजे पैल तीराला पोचवणारा. जुन्या काळी जेव्हां नद्यांवर पूल नव्हते तेव्हां नदी पार करण्याचे साधन म्हणजे नाव. आणि जो त्या नावेंतून पैल तीराला न्यायचा तो नावाडी उत्तारण म्हणावयाचा. या आपल्या नदीनद-बहुल देशांत कुठेहि जायचे म्हटलें म्हणजे नदी नाले ओलांडण्यावांचून गत्यंतर नाही. आजहि तें कमी झालेलें नाहींच. अशा प्रकारे नदी नाले म्हणजे मार्गातील मोठे विघ्नच होय. पुष्कळदां तर तें प्राणसंकटच असायचे. त्यांतून तो सही सलामत वाचवतो तो नावाडी, तो उत्तारण, कसा बरें कृतज्ञता-भाजन होणार नाहीं ? परमात्मा हाहि तसाच उत्तारण आहे. तो जीवाला भवनदीच्या पार नें तो. या भवनदींत मायेचे पाणी आहे, आसक्तीची धार आहे, काम क्रोध लोभ मद मत्सर या नक्रसादि भयंकर जलचरांचा त्यांत सुळसुळाट आहे, अभिमानाचा भोंवरा आहे. अशी ही भवनदी जीव पार कशी करणार ? कुशल कर्णधारावांचून तिच्यांतून पार पडणे शक्य नाही. जीवाला तो कुशल कर्णधार, कैवर्तक परमात्मा आहे. जीवाला तोच त्या परमानंदाच्या पैलतीराला पोचवतो. कोणी म्हणेल की मी आपल्या भुजबळानें तरून जाईन तर त्याचें तें साहस साहसच आहे. तें व्यर्थ आहे. त्याला निरभिमान झाल्यावांचून आणि परमात्म्याला अनन्यभावानें शरण गेल्या वांचून गत्यंतर नाही. इथे केवळ केशव-कैवर्तक-कृपाच कामाची आहे. इतर सर्व उपाय व्यर्थ नाहींत. केशवकृपेला उपकारक म्हणून ते मान्यच आहेत, परंतु स्वतंत्ररीत्या ते अकिंचित्करच होत. म्हणून गीतेंत भगवान् श्रीमुखानें सांगत आहेतः
नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया ।
शक्य एवंविधो द्रष्टुं दृष्टवान् असि मां यथा॥ गीता ११ - ५३
भक्त्या त्वनन्यया शक्य अहं एवंविधोऽर्जुन ।
ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप॥ गीता ११ - ५४

महाभारतीय रूपकाच्या भाषेत परमात्म्याचे उत्तारणत्व असें वर्णिलें आहे: भीष्म-द्रोणतटा जयद्रथ-जला गान्धार-नीलोपला शल्य-ग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला । अश्वत्थाम-विकर्ण-घोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवै रणनदी कैवर्तकः केशवः ॥

९२४. दुष्कृति-हा
दुष्कृति हन्ति इति दुष्कृति-हा । जो दुष्कर्माचे हनन करतो तो म्हणावयाचा दुष्कृति-हा. परमात्मा हा दुष्कृतिहा आहे. कशा प्रकारे करतो तो दुष्कृति-हनन ? काय तो लोहारा प्रमाणें कच्चे लोखंड भट्टीत घालून जाळतो चाळतो गाळतो ? काय त्याला . घणाघातांनी पिटून पिटून नरम करतो, सरळ करतो, घाट देतो ? त्याला असें कांहीं एक करावे लागत नाही. मूळ हे भूमिगत असतें. तें वरून दिसत नाही. त्यासाठी खोलांत शिरावे लागते. सर्व अनर्थाचें मूळ आत्मविषयक अज्ञान आहे. आपण कोण, याचा बोध नसल्यामुळे मनुष्य देहाद्यभिमान धारण करतो. देह म्हणजे मी आणि देहसंबद्ध ते माझे, अशा अविवेकानें तो व्यवहार करूं लागतो. यांतूनच भूतद्रोह होतो आणि सर्व दुष्कृति, झांतून पाण्याप्रमाणें, त्यांतून निघत राहतात. हे ओळखून शंकराचार्य आपल्या शिरोमणि स्तोत्रांत, षट्पदींत, देवापाशी मागतातः अविनयमपनय विष्णो, दमय मनः, शमय विषयमृगतृष्णाम् ।
भूतदयां विस्तारय तारय संसार-सागरतः ॥

समोरच्याला अविवेकानें परका मानून मी जो व्यवहार करतो तो माझा अविनय दूर कर. माझी हाव आणि हव्यास, माझा अविनय आप्पलपोटेपणा दिवसेंदिवस झर्दू दे, गळू दे. आणि अशा प्रकारें भूतद्रोहाचे तण निंदून काढून माझ्या ठाई भूतदयेचें अमूप पीक पिकव. भूतदयेचे बाग जिकडे तिकडे फुलू दे, फळू दे. संसार-सागरांतून अशा प्रकारचे माझें उत्तारण होऊं शकेल. दुष्कृतीच्या मगर-मिठीतून जीव-गजेन्द्राची सुटका तो भगवान् ज्ञान-सुदर्शनानें अशी करीत असतो.जोंवर आत्मज्ञानानें देहात्मबुद्धि क्षीणतर होत जाऊन नाहींशीच होत नाही, तोवर दुष्कृतीतून निःशेष सुटका होत नाही. परमात्मा केवळ ज्ञानस्वरूप असल्यामुळे तो सहजच दुष्कृतिहा आहे. अंधारच नाहीं मग अंधारांत होणारी दुष्कर्में कुठून असणार ? सूर्य रात्रीलाच नाहीशी करून जसें रात्रिकृत भय नाहीसे करतो, तसा परमात्मा अज्ञान नाहींसें करून अज्ञानकृत दुष्कृतींचे हनन करतो. आणि म्हणून तो दुष्कृति-हा म्हणावयाचा.
दुष्कृति म्हणजे दुराचारी असा अर्थ घेतला तरी तो परमात्मा दुष्ट-संहारकहि आहेच !

९२५. पुण्य
पुनाति इति पुण्यम् । जो पावन करतो, पापप्रक्षालन करतो तो म्हणावयाचा पुण्य. परमात्मा हा नुसता पुण्यरूप नाही तर तो परम पुण्यरूप आहे. "पवित्राणां पवित्रं यो मंगलानां च मंगलम्" असें या नामसहस्राच्या प्रास्ताविकांत म्हटलेंच आहे. पुण्य-श्रवणकीर्तन, पुण्यकीर्ति इत्यादि पदें पूर्वी येऊनच गेली आहेत. इथें त्याला केवळ पुण्यरूप म्हटले आहे. म्हणजे अमुक एक त्याचें पुण्यरूप आहे असे नव्हे तर तो सबंधचा सबंध च पुण्यरूप आहे, जसें चंदन हे सर्वांगीं चंदन आहे. त्याचे तोंड चंदनी आहे, त्याचा श्वास चंदनी आहे असें नाहीं, तो सबंधचा सबंध च चंदनी आहे किंबहुना चंदनच आहे. तसा परमात्मा हा सबंधच पुण्यात्मा आहे. त्याचे सर्व कांहीं पुण्यरूपच आहे. नाम रूप गुण कर्म सर्वे च पुण्यरूप पुण्यप्रद, त्याचे जनन म्हणजे आविर्भाव पुण्य तसे त्याचे मरण म्हणजे तिरोभावहि पुण्य. परमात्म्याच्या बाबतींत मरण शब्द कानाला कसासाच वाटतो. परमात्म्याच्या अवतारांची जयंती असते, पुण्यतिथि नसते. साधुसंत पुण्य परमात्म्यांत मिसळून जातात म्हणून त्यांची मरण-तिथिहि, अभद्र वाटणाऱ्या मरणाची तिथिहि, पुण्य तिथि होते. परमात्मा हा स्वरूपापासून केव्हांहि च्युत होत नसल्यामुळे, वियुक्त होत नसल्यामुळे स्वरूपाशी त्याचे पुनीलन संभवनीय नाही. म्हणून त्याची पुण्यतिथि नाही. 'क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति' हे पुण्यात्मा परमात्म्याच्या बाबतींत अशक्यच. अर्थात् त्याची अपुण्यतिथि म्हणजे जन्मतिथिहि नाही. स्वरूपा पासून तो केव्हांहि वियुक्त व्हावयाचा नाहीं, च्युत व्हावयाचा नाही. तो अच्युतच आहे सदैव. म्हणून म्हटले आहे गीतेंतः
जन्म कर्म च मे दिव्यं एवं यो वेत्ति तत्त्वतः ।
त्यक्त्वा देहं पुनर् जन्म नैति, मां एति सोऽर्जुन ॥ गीता ४ -९

ज्यांना मरण मान्य नसेल त्यांनी जननहि मानू नये आणि जनन मानावयाचे असेल तर मरण मानावयासहि तयार व्हावें व दोन्हीहि समानच पुण्य आहेत असें म्हणावें. कांहींहि मान्य केले तरी तो परमात्मा तत्त्वतः अच्युतच होय आणि म्हणूनच पुण्य.

९२६. दुःस्वप्न-नाशन
दुःस्वप्नं नाशयति इति दुःस्वप्ननाशनः| जो दुःखस्वप्न नाहींसें करतो तो म्हणावयाचा दुःस्वप्ननाशन. स्वप्नहि जर एक मिथ्या वस्तु असेल, तर तें चांगले पडलें म्हणून हर्ष नको, वा वाईट पडले म्हणून विषाद नको. परंतु स्वप्न हे स्वतः मिथ्या असलें तरी ते भावी घटनांचे सूचक मानले आहे. आणि म्हणून मनुष्य सुस्वप्नानीं हरिखतो व दुःस्वप्नांनी धास्तावतो. त्यामुळे दुःस्वप्नांची शान्ति करणे आवश्यक होऊन बसते. परमात्म्याचें नाम हे सकल अनिष्टांचे निवारक आणि सकल इष्टांचे कारक असल्यामुळे तो परमात्मा सहजच दुःस्वप्ननाशन होय. लहान मोठ्या अनिष्टांच्या परिहारासाठी, निरनिराळी नामें वा मन्त्र जपार्थ विनियोजिले जातात. आणि त्यांच्या जपसंख्याहि अनिष्टाच्या गुरुतेनुसार वेगवेगळ्या कल्पिल्या जातात. तज्ज्ञ वैद्यच औषधोपचार करू शकतो तसा तज्ज्ञ गुरु वा आचार्यच असा मंत्रोपचार करू शकतो. जपसामर्थ्य अचिन्त्य आहे. "अलौकिकोहि मणि-मन्त्र-ओषधीनां प्रभावः' मंत्रजपानें काय होते याचे उदाहरण स्वतः वाल्मीकि आहे. मंत्र-जपानें त्यानें आपल्या सर्व दृष्कृति म्हणजे ताप आणि सर्व मनोमल म्हणजे पाप धुऊन टाकून आपल्याला पुण्य पुरुष बनविलें होतें.तो आंतून बाहेरून निष्कलंक झाला होता, शुद्ध नि- सिद्ध झाला होता. मग दुःस्वप्ननाशन ही कोणती मोठी गोष्ट झाली ? परमात्म्याच्या नामानें ती सहजच होते. हे असें दुःस्वप्नांचे निवारण हा लौकिक अर्थ झाला. त्याचा खोल आणि आध्यात्मिक अर्थहि आहे. आणि खरोखर तोच मुख्यार्थ आहे. हा सारा संसार, हा प्रपंच म्हणजे एक भले मोठे दुःस्वप्नच आहे आणि त्यांत सगळे जीव विव्हळत आहेत. हे दुःस्वप्न आत्मजागृतीबरोबर नाहींसें होते आणि म्हणूनच तो परमात्मा दुःस्वप्ननाशन म्हणावयाचा.

९२७. वीर-हा
वीरं प्रतिवीरं प्रतिमल्लं हन्ति इति वीरहा । जो प्रतिस्पर्धी वीराला ठार करतो तो म्हणावयाचा वीरहा. हा शब्द पूर्वीहि एकदां येऊन गेला आहे. अर्थात् इथें तो पुनरुक्त झाला आहे. पुनरुक्ति हा केवळ दोषच नाहीं. तो गुणहि आहे. पुनरुक्ति ही त्या विषयांचे विवक्षितत्व आणि महत्त्व प्रकट करते. ग्रंथाचे तात्पर्य हेरण्याचें जें तंत्र आहे त्यांत अभ्यास म्हणजे पुनरुक्ति वा पुनःपुनरुक्ति हेहि.एक लक्षण सांगितले आहे.
उपक्रमोपसंहारौ अभ्यासो ऽपूर्वता फलम् ।
अर्थापत्तिः षडेतानि लिङ्गं तात्पर्य-निर्णये ॥

विष्णुसहस्रनाम हा तसा ग्रंथ नसला, तरी तो एक विचार आहे. त्याचे एक तात्पर्य आहे. आणि त्यावर भर दिला जाणे स्वाभाविक आहे. ईश्वरी अवतारांचे मुख्य कार्य धर्मसंस्थापन हे आहे. तें धर्मसंस्थापन साधूंच्या म्हणजे धर्मनिष्ठांच्या परित्राणानें व दुष्कृतांच्या म्हणजे धर्मपरिपंथींच्या विनाशानें अवतारी पुरुष पार पाडीत असतात. म्हणून वीरहा म्हणजे असुर-सूदन.हिरण्याक्ष-हिरण्यकशिपु रावण-कुम्भकर्ण आणि दुर्योधन-दुःशासन इत्यादि धर्मद्रोह्यांचा विनाश करणारा आणि तद्द्वारा प्रह्लाद, सीता, द्रौपदी यांच्यासारख्या धर्मनिष्ठांचे परित्राण करणारा. हे विधायक अंग पुढील पद रक्षण स्पष्ट करीत आहे. ते वीरहा या पदाच्या अर्थावरहि अशा प्रकारें प्रकाश पाडीत आहे. "वीरहा रक्षणः सन्तो जीवनः पर्यवस्थितः" हा सबंध श्लोकार्धच गीतेच्या
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्म-संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ गीता ४ -८

या अवतारकार्य-बोधक श्लोकाचें सूचन करणारा आहे, असें म्हणता येईल. शंकराचार्यांनी "विविधाः संसारिणां गतीः मुक्ति-प्रदानेन हन्ति इति वीरहा" असें भाष्य केले आहे. मागील वीरहा पदाहून वेगळा अर्थ करण्यासाठी मला तें गरजेचे वाटत नाही.

९२८. रक्षण
रक्षण म्हणजे संरक्षण करणारा. परमात्मा हा धर्मनिष्ठाचे रक्षण करतो. त्याच्यासाठी तो अवतार घेतो. जगांत तीन प्रकारचे लोक आढळतातः १-धर्मनिष्ठ, २-धर्मपरिपंथी आणि ३- उदासीन. धर्म हेच आपले सर्वस्व मानून त्यासाठी आपला जीवहि द्यायला जे सदैव तयार असतात ते धर्मनिष्ठ होत. जसे प्रह्लाद, राम, युधिष्ठिर इत्यादि. देव धर्म, साधु-संत इत्यादि हे सर्व थोतांड आहे, बुवाबाजी आहे, त्याला केव्हांहि थारा देता कामा नये, त्याचा कसून विरोध केला पाहिजे, त्याचा बीमोड केला पाहिजे' अशा विचाराचेहि काही लोक असतात. त्यासाठी ते हिहिरण्यकशिपु, रावण दुर्योधन इत्यादींप्रमाणें प्राणांची पर्वा करीत नाहीत. या दोन टोकांच्या दरम्यान सर्वसामान्य जनता असते.. ती या दोहोंनाहि योगक्षेमासाठी वश होत राहते. ना यंड ना उष्ण अशी ही कोमट जनता अकिंचित्कर होय. अशा अल्पप्राण अल्पश्रद्ध लोकांसाठी नाहीं देव अवतार घेत. तो अवतार अशा बहुसंख्य लोकांसाठी नाही होत. तोअवतार होतो धर्मनिष्ठाच्या रक्षणासाठी मग तो या विश्वांत मनु-मार्कडेयांसारखा एकाकी वा एक का असेना ? त्याचे रक्षण म्हणजे विश्वाचे रक्षण. कारण विश्वाचें मूळ धर्म आहे. तो नाहीसा झाल्यास विश्व टिकू शकत नाही. "धर्मो विश्वस्य प्रतिष्ठा." तो धर्म वेदांत प्रतिपादिला आहे म्हणून वेद-रक्षण, तो वेद ब्राह्मणांनी धारण केला आहे म्हणून त्यांचे रक्षण. त्यांचेच दुसरें नांव सन्त. कारण संतांच्याच ठाई सत्यधर्म प्रतिष्ठित असतो. "सन्तो भूमिं तपसा धारयन्ति” सन्त सत्यरूप तपानें या धरेला धारण करीत आहेत. म्हणून परमात्मा त्यांच्या रक्षणासाठी अवतार घेतो. तो कांहीं पक्षपात नव्हे. त्यांत समदृष्टिच आहे. राजा चोराला सुळी देतो व संन्याशाला पोळी देतो यांत पक्षपात नाही. ती न्यायाची समदृष्टि आहे. तो न्यायपाल आहे, तसा परमात्मा धर्मपाल आहे. धर्मगोप्ता आहे. धर्मरक्षणानेंच सर्वांचे रक्षण होते. म्हणून तो परमात्मा रक्षण म्हणजे धर्म-रक्षण द्वारा विश्व-रक्षण करणारा म्हटला आहे.

९२९. सन्त
सन्तः हे बहुवचन की एकवचन ? नियमानुसार तें बहुवचन आहे. पण सन्तः हे एकवचन घेणेहि शक्य आहे. "प्रयोगशरणा वैयाकरणाः". लोकांत प्रचलित असा हा अकारान्त शब्द आहे, असे व्याकरणाला मान्य व्हावें. आणि परमात्मा जर एकच आहे तर त्याचें नाम बहुवचनी कां ? तो परमात्मा एकवचनी म्हणून प्रसिद्धच आहे. "रामो राजमणिः सदा विजयते' इत्यादि प्रसिद्ध श्लोकांत एवढयासाठींच रामशब्दाचें केवळ एकवचन दिले आहे साती आठी विभक्तींत. अर्थात् अद्वैतांत, अद्वय परमात्म्यांत, द्वैत संभवत नाही. बहुत्व संभवत नाही. म्हणून सन्तः हे एकवचन. सहस्रांत सर्वत्र एकवचनच आले आहे.. लिंगे तिन्ही आहेत, पण वचन एकच आहे. त्यामुळेहि सन्तः हे एक वचन घेणे. योग्य. शंकराचार्यांनी इथे झांकली मूठ ठेवली आहे. "सन्मार्गवर्तिनः सन्तः, तद्रूपेण विद्याविनयवृद्धये स एव वर्तते इति सन्तः" असे त्यांचे भाष्य आहे. म्हणजे सन्तः हे पद जणूं उभयवचनी त्यांनी घेतले आहे.
परमात्मा हा अव्यक्त आहे, पण व्यक्त देहधारी जीवाची अभिलाषा त्याला आपल्यासारख्या सगुण साकार रूपांत पाहण्याची असते. त्यावांचून त्याचे समाधान होत नाही. हा असा मूर्तिमंत देव त्यांना संतामध्ये उपलब्ध आहे. देव पहायचा तर तो तिथे जाऊन पहा, असें स्वतः संतच सांगतात आणि भगवंतहि या सन्त या पदानें सांगत आहेत. " तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं. सन्तांचे संगती मनोमार्गे गति । आकळावा श्रीपति येणें पंथें,"अशी सहस्रावधि वचनें आपल्या धर्मग्रंथांत भरली आहेत. जितकी भगवंताची गाथा तितकीच संतांचीहि आहे. त्या संतांची लक्षणे भगवद्गीतेनें "स्थितप्रज्ञः स उच्यते' आणि "यो मद्‌भक्तः स मे प्रियः" इत्यादि श्लोकांत स्पष्ट निरूपिली आहेत. ती लक्षणेच सन्त होत. ही सर्व लक्षणे एकाच्या ठाईं आढळणे कठिण म्हणून सन्तः हे बहुवचन. असे सकळ संत एकत्र केले की भगवन्त मूर्तिमंत झाला. शिवाय भगवंत आहे चतुर्भुज. तो किमान दोन व्यक्ति एकत्र आल्या म्हणजेच सिद्ध होतो. म्हणूनहि सन्तः हे बहुवचन. अथवा आदरार्थी बहुवचन.

९३०. जीवन
जीवयति इति जीवनः । जो जीववितो तो म्हणावयाचा जीवन. या विश्वाला कोण बरें जीववीत आहे ? विश्वाचे अस्तित्व कोणाच्यामुळे आहे ? प्रत्येक जण, प्रत्येक अणुरेणु म्हणत असतो मी. या मीच्या बळावर तो जगत असतो. हा जो मी त्याची मीमांसा केली म्हणजे तो विश्व-जीवनाचा गुप्त झरा सांपडतो. शंकराचार्यांनी उत्तरमीमांसेच्या आपल्या शास्त्रीय भाष्याचा आरंभ इथूनच केला आहेः
'युष्मदस्मत्-प्रत्ययगोचरयोः विषय-विषयिणोः तमः-प्रकाशवत् अत्यन्तविरुद्धस्वभावयोः इतरेतरभावानुपपत्तौं' इत्यादि.
आपल्या लौकिक स्तोत्रांतहि त्यांनी हा विषय हाताळला आहे
" कस्त्वं कोऽहं कुत आयातः का मे जननी को मे तातः ।
इति परिभावय सर्वमसारं विश्वं त्यक्त्वा स्वप्नविचारम् ॥
इत्यादि
या सर्व मीमांसेचा इत्यर्थ हा निघतो की सर्वत्र एक चित्सत्ता व्याप्त आहे. त्या वेगळे दुसरे कांहीं नाहीं "नेह नानास्ति किंचन" आणि तें जें एकमेवाद्वितीय ब्रह्मसंज्ञित परमात्मतत्त्व तेंच जीवन म्हणजे विश्वजीवन आहे. सर्व अस्तित्वाचे मूळ तें आहे. त्यापासूनच हें विश्व उत्पन्न होत आहे, त्याच्या आधारें जगते आहे, त्यांतच तें विलीन होत आहे. ही तिहेरी अखंड प्रक्रिया म्हणजे विश्वजीवन आहे आणि ते त्या परमात्म-सत्तेनें, जिला जीव अज्ञानानें मी मी म्हणत आहे, चाललें आहे. परमात्म्याचे हे जीवनत्व, हे संजीवन आपल्यालाहि प्रत्यहीं अनुभवास येत असते. रात्री वा दिवस आपण गाढ झोपी जातो तेव्हां आपल्याला कांहीं एक कळत नाहीः 'मी आहे' ही अस्मिताहि त्याची त्या क्षणी लोप पावते. मग मी अमुक आहे, असा अभिमान कुठून असणार ? परंतु तशा त्या मृतवत् अवस्थेतून तो परत जीवित होतो. ताला पूर्वस्मृति आणि सर्व पूर्वभाव प्राप्त होतो. कोण देतो हे सगळे ? तो परमात्माच हे संजीवन करीत असतो. म्हणून तो म्हणावयाचा जीवन. मरणोत्तर व जननोत्तर जीवाला जी स्मृति होते ती कुणापासून ? तें सर्व जीवन त्या परमात्म्यापासूनच प्राप्त होते. म्हणून तो म्हटला आहे जीवन. धुवानें त्याचेच स्तवन केलें आहेः
योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमा प्रसुप्तां
संजीवयत्यखिलशक्तिधरः स्वधामा ।
अन्यांश् च हस्तचरणश्रवणत्वगावीन्
प्राणान्, नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ॥


९३१. पर्यवस्थित
परमात्मा हा पर्यवस्थित म्हणजे सर्वत्र कोंदलेला आहे. परि म्हणजे परितः, सर्वत्र, जिकडे पहावें तिकडे. आणि अवस्थित म्हणजे भरलेला, भरून राहिलेला. समर्थ म्हणतातः " नभासारिखें रूप हे राघवाचें । अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे " तो परमात्मा आकाशाप्रमाणें सर्वत्र व्याप्त आहे. एकहि ठाव त्यावांचून रिता नाही. आकाश जसें सर्व वस्तूंच्या ठाई आंतून बाहेरून भरून आहे तसा-तो परमात्मा सर्वत्र संचरला आहे. "तद् अन्तर् अस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः" परमात्मा हा असा सर्वत्र घनदाट भरून राहिला असला तरी तो अभाग्याला, म्हणजे ज्याला ती ज्ञानदृष्टि नाहीं, त्याला, पाषाण भासे. पाषाण भासे म्हणजे दगड दिसतो, देव दिसत नाही. प्रहलाद ज्ञानदृष्टि सेवून तो परमात्मा पर्यवस्थित आहे, सर्वत्र आहे असे म्हणत होता. परंतु हिरण्यकशिपु चर्मदृष्टि घेऊन विचारीत होता, कुठे आहे तो तुझा देव ? या खांबांत आहे ? हा तर निव्वळ दगडोबा आहे, मूकस्तम्भ आहे ! पण तो मूकस्तम्भ नव्हता. त्यांतला देव, तो आकाशरूप देव बोलला. तो गुरगुरला. शब्दगुण आकाश बोल लें. म्हणजे काय की जे आम्ही पोकळ समजतों, शून्य समजतों, तें पोकळ नाही. तें भरीव आहे, अव्यक्त रूपानें हे सर्व दृश्य विश्व भरलेलेंच आहे. तें जें अव्यक्त आणि अक्षर तत्त्व तेंच पर्यवस्थित होय, आणि जे आम्हांला पर्यवस्थित दिसत आहे, म्हणजे आमच्या चोहों बाजूला हें जें सारें दगडासारखें निबर व्यक्त विश्व दिसत आहे तें वस्तुतः अनवस्थित आहे. पाण्याचा मोठा बुडबुडा दिसतो पण हाती घेऊन पाहूं लागतो तर काय ? कांहीं नाहीं, नुसते पाणी ! तसे हे भले मोठे विश्व, हातात घेऊन पाहूं लागलों, ज्ञानदृष्टीनें त्याची चांचणी करूं लागलों तर अव्यक्तमात्र ठरतें. व्यक्त कांहीं शिल्लकच राहत नाही. म्हणजे ज्याला आम्ही मोठे भरीव समजतों तें जग निव्वळ पोक.. आहे. त्याला भक्कम समजून त्यावर पाय ठेवायला जावें तर गटंगळ्या खातों, बुडतो. उलट ज्याला आम्ही कांहीं नाहीं निव्वळ पोकळ समजून बसलो होतो, त्याच्या विरोधांत गेलों तर कपाळमोक्ष होतो हिरण्यकशिपूसारखा. सारांश, वस्तुच पर्यवस्थित आहे, भरीव आहे, भरोशाची आहे, अवस्तु ही अनवस्थित आहे, पोकळ आहे, धोक्याची आहे. परमात्माच वस्तु असून तदितर सारें अवस्तु आहे.
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस् त्वनयोस् तत्त्व-दर्शिभिः ॥ गीता २ - १६


अनन्तरूपोऽनन्तश्रीर्जितमन्युर्भायापहः ।
चतुरस्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशः ॥१००॥


९३२. अनन्तरूप
अनन्तानि रूपाणि यस्य सः अनन्तरूपः । अनन्त आहेत रूपें ज्याचीं तो म्हणावयाचा अनन्तरूप. ही अनन्त वैचित्र्यानें नटलेली सृष्टि म्हणजे परमात्म्याची अनंत रूपें होत. ही रूपें नित्य नवीं होतच आहेत. कालचे रूप आणि रंग आज नाही. आजचें उद्या नाही. अशी ही सृष्टि नित्यनूतन आहे. देशतः नि कालतः ही सृष्टि अनन्त आहे. आणि तिचे रंगरूपहि प्रतिक्षण बदलत आहे. त्यामुळे ती सर्वतोनन्तरूप आहे. परमात्मा हा उभयथा अनन्तरूप आहे. अव्यक्त रूपानें तो अनन्त आहे तसा व्यक्त रूपानेहि तो अनन्त आहे. सर्व व्यक्ताकाराचा अव्यक्तांत लय होतो पण अव्यक्ताचा लय केव्हांच होत नाही. म्हणून अव्यक्त हे अनन्त रूप होय. व्यक्ताचाहि देशतः नि कालतः अन्त लागत नाही म्हणून तेहि अनन्तच म्हणावे लागते. धक्त रूपानें तें लुप्त होते असें मानले तरी ते नासे झालें असें म्हणतां येत नाहीं तें अव्यक्ताच्या पोटांत गुप्त असतें इतकेंच, एखादा नट पडद्याआड गेला म्हगजे अदृश्य होतो पण नाहींसा होत नाहीं तद्वत् कलाकार अव्यक्तसात् झाला तरी तो नाहीसा झाला असे नव्हे. तो परत पडद्यावर येण्यासाठी गेलेला आहे. म्हणजे अव्यक्तांत व्यक्त आणि व्यक्तांत अव्यक्त सदैव स्थितच आहे. म्हणून तो परमात्मा तुम्ही कसाहि पहा, व्यक्त पहा की अव्यक्त पहा, अनन्तरूपच आहे. सोनेपण न मोडतां सोन्याचे नाना अलंकार होतात. तद्वत् अव्यक्ताचे अव्यक्तपण न मोडतां तें व्यक्त होते आणि त्यामुळे त्याच्या अनन्तरूपत्वाला कुठे कसलाहि बाध येत नाही. म्हणून व्यक्ताव्यक्ताची भाषा सोडून त्याला अन्तहीन अनन्त म्हणणेच समर्पक.

९३३. अनन्त-श्री
अनन्ताः श्रियः यस्य सः अनन्त-श्रीः ।अनन्त आहेत श्रिया ज्याच्या तो अनन्तश्री म्हणावयाचा. परमात्मा हा अनन्तरूप आहे तसा तो अनन्तश्री आहे. प्रत्येक रूपाची श्री, शोभा, न्यारीच असते. एक रूप दुसऱ्या रूपासारखें नाही. प्रत्येकांत आपलें कांहीं वैशिष्ट्य हे असतेच. तीच खरोखर त्याची श्री होय. या वैचित्र्यामुळेच जग इतकें आकर्षक बनून राहिले आहे. ते अगदी एकरूप असते तर कंटाळवाणे झाले असते. त्यांत गंमत राहिली नसती. त्याचे कुतूहल वाटले नसते. नाना योनि, त्या योनीत स्त्री-पुरुषभेद, त्या स्त्री-पुरुषांत वयोरूप-गुणकर्मभेद इत्यादि वैचित्र्यानें नटलेलें हे जग म्हणजे एक प्रचंड कॅलडस्कोपच आहे. प्रतिक्षण त्याचे दर्शन अपूर्व आहे, अद्‌भुत आहे. दृश्याच्या या वैचित्र्याला द्रष्ट्याच्या दर्शन वैचित्र्यानें गुणिलें की जो वैचित्र्याचा गुणाकार होतो तो खरोखर च अनन्त म्हणावा लागतो. स्त्री एकच पण तिचे दर्शन आई बाप भाऊ बहिण आणि तिन्हाईत यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे असेल. वाघाच्या दृष्टीला तर तो एक सुस्वादु मांसपिंडमात्र भासेल. पालखी वाहणाऱ्या भोयाच्या दृष्टीनें ती मण दोन मणाची लाश असेल, तर प्रियकराला ती प्राणप्रिया वाटेल. प्रत्येकाचे दर्शन वेगळे ! ही जी सृष्टि आणि दृष्टि यांची संसृष्टि तिला कुठेच इतिश्री नाही म्हणून तो परमात्मा अनन्त-श्री म्हणावयाचा.

९३४. जित-मन्यु
जितः मन्युर् मानः येन सः जितमन्युः । ज्यानें मन्यु म्हणजे मान जिंकला आहे तो म्हणावयाचा जितमन्यु. सामान्यतः मन्यु म्हणजे क्रोध असा अर्थ केला जातो आणि शंकराचार्यानीहि तो तसाच घेतला आहे. परंतु मागें जित-क्रोध हे पद येऊन गेलें आहे. म्हणून पुनः त्याच अर्थानें जितमन्यु हे पद घेणे प्रशस्त नाही. शिवाय क्रोधाहून मन्यु हे पद वेगळे आहे. तें समान अर्थाचें कां घ्यायचे ? समान अर्थाची मानलेली पदेंहि सूक्ष्म पाहिल्यास वेगळी अर्थच्छटा असलेली दिसून येतील. इथे तर त्यांचे धातुहि वेगळेच आहेत.क्रुध् धातु पासून क्रोध आला आहे तर मन् धातूपासून मन्यु. मूलतः दोन्ही भिन्न आहेत. क्रोध स्थूल आहे, मन्यु सूक्ष्म आहे. मन्यु म्हणजे मान, अभिमान, अतिमान. मनुष्य जेव्हां अपत्याला कोणी विशेष मानून बसतो तेव्हां तो आपल्याला संकुचित व विरुद्ध करून घेत असतो. त्यातूनच मग क्रोधादि विकार उत्पन्न होतात. म्हणून मन्यु हा मूल विकार होय. सर्व अनर्थाचें मूळ होय. तो धर्माचा प्रतिपक्षी होय. महाभारतांत दुर्योधन "दुर्योधनो मन्युमयो महान् द्रुमः" तसेंच "युधिष्ठिरो धर्ममयो महान् द्रुम' असें द्विविध रूपक आले आहे. त्यांत मन्युद्रुमाचे फळ घोर विनाश आणि धर्म-द्रुमाचे फळ थोर शान्ति सुख समृद्धि असल्याचे दाखविले आहे. म्हणजे मन्यु हा साक्षात् अधर्म होय, असे सुचविलें आहे. परमात्मा हा आत्मनिष्ठ असल्यामुळे सहजच जितमन्यु आहे, निरभिमान आहे. जो पुरुष आत्मधर्माचे अनुसरण करतो तोहि धर्मनिष्ठ जितमन्यु होतो, निरभिमान होतो. निरभिमान झाल्यामुळे देहग्रहणहेतुभूत दोषांपासून मुक्त होऊन अन्तीं देहांतूनहि विमुक्त होतो. कारण-लिंग-स्थूलदेहांतून विमुक्त झाल्यामुळे तो सर्व काम-कर्म-भोगरूप संसारांतून परिमुक्त होत्साता परमानन्द रूप स्वानन्दांत विहरत राहतो.

९३५. भयापह
भयं संसारजं उपहन्ति इति भयापहः । जो संसाराचे भय दूर पिटाळून लावतो तो म्हणावयाचा भयापह. परमात्मा संसाराचें भय दूर करतो म्हणून तो भयापह होय. संसार समस्त भयावह आहे. जगांत जीव सुखासाठी धडपडत आहे. परंतु तें सुख चन्द्रवत् सदैव त्याच्यापासून दूरच राहते त्याच्या पदरी निराशाच पडते. त्यामुळे संसारांत सुख शोधणे म्हणजे वाळूतून तेल पिळून काढणे च होय. निम्बाच्या वृक्षापासून आम्र-फळाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. त्याप्रमाणें बाह्य पदार्थापासून, इन्द्रियार्थापासून सुखाची अपेक्षा करणे फुकट आहे. इन्द्रियांचे विषय शब्द स्पर्श रूप रस गन्ध अनित्यहि आहेत आणि असुखहि आहेत. जगांतील सुमधुर शब्द संगीत. त्या संगीतांतील निवडक चिजा रेडियोच्याद्वारा घरबसल्या आपल्याला उपलब्ध होतात. म्हणून तो रेडियो आपल्याला सुखाचे साधन वाटतो. परंतु तो बिघडतो फुटतो तुटतो वा चोरीला जातो. इकडे आमचा कानहि बिघडतो वा फुटतो. दोन्ही प्रकारें शब्दसुखाला आम्ही अंतरतों. हे झालें इन्द्रिय आणि इन्द्रियार्थ यांचे अनित्यत्व. त्यांचे असुखत्वहि तसेंच स्पष्ट आहे. कानानें शब्द-श्रवण होतें तें सुखावह असतेच असे नाही. माझ्या समाधीचा तें भंग करते. गोड संगीतहि थोडा वेळ बरे वाटते. पण तें जर सारखें अष्टौ प्रहर कानी कपाळी आदळत राहिले तर त्याचा वीट येतो, त्रास होतो. वाटतें ही पीडा टळली तर बरी ! बहिऱ्याला ही पीडा नाहीं अथवा समाधींत ही पीडा नाही. सारांश, जगाचें स्वरूप हे असें अनित्य आणि असुख आहे. आणि तेंच खरोखर भय आहे. त्यांतून सुटका म्हणजे आत्मनिष्ठ होऊन राहणे. म्हणून परमात्मा हा भयापह म्हटला आहे. गीतेंत अर्जुनाला आणि भागवतांत उद्धवाला भगवान् कृष्णानें भयापहतेचा हाच मार्ग उपदेशिला आहे. "अनित्यं असुखं लोकं इमं प्राप्य भजस्व माम्" गीता.

मनें वाचा दिठी जें हें घेपे की श्रवणादिकीं ।
जाण नश्वर तें सारें मायामय मनोमय ॥
अयुक्ता भ्रम नानार्थ गुणदोषेनि युक्त तो ।
गुण दोष तिथे भेद कर्माकर्मविकर्म हा॥
तरी आवरुनी सारी इन्द्रियें चित्त रोधुनी ।
आत्म्यांत विश्व हे पाहें आत्मा तूं मज ईश्वरी ॥
ज्ञानविज्ञान-संयुक्त जीवांचा जीव होउनी ।
आत्मानुभवसंतुष्ट होसी निर्विघ्न उद्धवा ॥ भागवत ११.७.७-१०.


९३६. चतुरस्र (चतुरश्रः)
चारी भुजा ज्याच्या समान आहेत त्याला चतुरस्र कोण म्हणतात. तसा जो चोहों बाजूंनी समान अन्यून आहे, तो म्हणावयाचा. चतुरन. आपल्या जीवनाच्या धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या चार बाजू मानल्या तर जो या चारीत परिपूर्ण आहे तो म्हणावयाचा चतुरन, परमात्मा हा तसा चतुरन आहे. या चार पुरुषार्थांपैकी ज्यानें एकहि संपादिला नाही त्याचे जीवित निरर्थक म्हटले आहे.
धर्मार्थकाममोक्षाणां यस्यैको ऽपि न विद्यते ।
अजागल-स्तनस्येव तस्य जन्म निरर्थकम् ॥

जो या चारी पुरुषार्थांचे समग्र संपादन करतो तो म्हणावयाचा चतुरन. एकाच्याच मागे लागलेले एकांडे लोक पुष्कळ आहेत, परंतु ते जीवनाच्या तितक्याच महत्त्वाच्या अन्य तीन अंगांपासून वंचित राहतात. त्यांचे जीवन एकांगी होते. ते पूर्ण सुखी होत नाहीत. कोणत्याहि पुरुषार्थाला न उपेक्षितां आणि न पीडितां सर्वांचे यथावत् संपादन ही चतुरता होय. ती ज्यानें संपादिली तो चतुरन म्हणावयाचा. भगवान् कृष्ण हा पूर्णावतार म्हटला जातो. कारण तो पूर्ण मानव होता. मानव जीवनाची चारी अंगें त्यानें यथावत् संपादिली होती. धर्म अर्थ काम आणि मोक्ष सर्वांची समग्र संपादणी त्यानें केली होती. म्हणून तो पूर्णावतार. तोच चतुरस्र. मानव जीवनाचे एकांगी दर्शन एकांगी जीवन पद्धतीला जन्म देते. त्यांतून भल्या बरोबर बरेचसें वाईटहि निर्माण होते. आणि तें वाईट भल्यालाहि खाऊन टाकतें. म्हणून दर्शन आणि तदुत्थ पद्धति अशी हवींत की जी वाइटाला वाव न देतां भल्याचीच भलावणी करतील. वर्णाश्रम धर्म हा तसा आहे. म्हणून तोच चतुरन. तोच परमात्मा. त्याचेच सेवन केल्यानें जीव चतुरन होतो.

९३७. गभीरात्मा
गभीरः आत्मा स्वरूपं यस्य सः गभीरात्मा । ज्याचा आत्मा म्हणजे स्वरूप गंभीर आहे, तो म्हणावयाचा गभीरात्मा. समुद्र गंभीर आहे. खोल आहे. त्याच्या पृष्ठभागाच्या दर्शनानें त्याचे स्वरूप आकळत नाहीं. तो रत्नाकर आहे. त्याच्यांत प्रवालांचे पर्वत दडले आहेत. त्याच्यांत असंख्य जलचर आहेत. घोर मकर आणि थोर वरुण त्यांत वसति करून आहेत. तो अफाट पसरला आहे. आणि अथांग खोल आहे. असा सागर आश्चर्याचें आगरच आहे. त्याची आश्चर्य संपतच नाहीत. त्यांचे तळ बूड लागतच नाही. म्हणून तो गंभीर म्हणजे खोल म्हटला जातो. पण तो कितीहि खोल असला तरी त्याला मर्यादा आहे. कारण तो व्यक्त आहे. परंतु परमात्मा अव्यक्त आहे. अचिन्त्य आहे. त्याच्या खोलीत कोणाचाच प्रवेश होत नाही. कारण तिथे व्यक्ताला पूर्ण मतजाव आहे आकाशवत्. आकाशांत कोणाचाच प्रवेश होत नाही. कारण तें अत्यंत सूक्ष्म आणि निबिड आहे. तें मात्र सर्वांच्या आरपार शिरलें भरलें नि उरलें आहे. परमात्माहि तसाच सर्व व्यक्ताला भेदून अभिन्न अव्यक्त आहे. या अथांग अव्यक्तार्णवाला गभीरात्मा नाही म्हणावयाचे तर काय बरें म्हणायचे ? हे व्यक्त लोकपद्म त्या अव्यक्तार्णवांतच उगवलें आहे. त्या अव्यक्ताचें जर वर्णन करता आले तर त्याला व्यक्त च म्हणावें लागेल. म्हणून त्याचे यथार्थ वर्णन करतां येत नाही. जें कांहीं वर्णन होतें तें त्या अव्यक्त अक्षराच्या पडछायेचे होते म्हणावयाचे. त्या पडछायेचे वर्णन मनुस्मृतींत असें आले आहेः
आसीद् इदं तमोभूतं अप्रज्ञातं अलक्षणम् ।
अप्रतयं अविज्ञेयं प्रसुप्तमिव सर्वतः ॥

वस्तुस्थिति अशी आहे की सर्व बाह्य वस्तु ज्ञेय आहेत आणि म्हणून त्या उथळ होत. उलट आत्मतत्त्व हे अन्तरतर असून ज्ञातृस्वरूप आहे आणि म्हणून गभीरात्मा म्हटले आहे. त्याला दुसरा कोण जाणणार ? "विज्ञातारं अरे केन विजानीयात्."

९३८. विदिश ·
विदिशो व्यादिशो दिशः । हे एक सूत्र आहे, एक विचार आहे. दिश् धातुचा तो विस्तार आहे. दिशति इति दिशः| विविधं दिशति इति विदिशः । आणि विविधं आदिशति इति व्यादिशः ।अशी त्यांची व्युत्पत्ति आहे. तदनुसार जो वेदरूपानें समस्त कर्मांची फळे देतो तो वेदात्मा परमात्मा दिश म्हणावयाचा. विशिष्ट फळे विशिष्टांना देतो, सात्विकांना सात्विक, राजसांना राजस व तामसांना तामस फळे देतो, गुणकर्मानुसार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रांना विशिष्ट कर्तव्ये, विशिष्ट विधिनिषेध देतो तो व्यादिश म्हणावयाचा. अथवा "दिगात्मना दिशति निर्दिशति इति दिशः विदिशः, व्यादिशः" असेंहि म्हणता येईल. चार मुख्य दिशा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दाखवितो तो दिश म्हणावयाचा. त्यांच्या मधील उपदिशा ईशान्य, आग्नेय, नैर्ऋत्य आणि वायव्य दाखवितो तो विदिश म्हणावयाचा. आणि त्या उपदिशांमधील उपोपदिशा म्हणजे उत्तर ईशान्य, पूर्व ईशान्य, पूर्व आग्नेय, दक्षिण आग्नेय, दक्षिण नैर्ऋत्य, पश्चिम नैर्ऋत्य आणि पश्चिम वायव्य व उत्तर वायव्य, दाखवितो किंबहुना समग्र दिक्- चक्रवालच दाखवितो, तो म्हणावयाचा व्यादिश.
सामग्र्यानें संपूर्ण सूत्र पाहिल्या नंतर आतां एक एक पद पहावयाचे. इथे दिशः विदिशः व्यादिशः असा युक्ति-संगत क्रम न घेतां तो छन्दाच्या सोईसाठी विदिशो व्यादिशो दिशः असा घेतला आहे.
विदिश म्हणजे विशिष्टांना विशिष्ट फल देणारा. परमात्मा हा आपल्या मर्जीस येईल त्याप्रमाणें कोणालाहि कोणतेंहि फल देईल अथवा कोणत्याहि कर्माला कोणतेहि फल देईल तर संकर होईल. वैषम्य-नैधुण्यादि दोष त्याला चिकटेल. पण तो सम आहे, निर्दोष आहे. तो ज्याला त्याला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. म्हणून तो विदिश.

९३९. व्यादिश
विविधं आदिशति इति व्यादिशः ।ज्याला त्याला आपआपल्या गुणकर्मानुसार जो आदेश देतो, कर्तव्याचा निर्देश देतो, तो म्हणावयाचा व्यादिश, परमात्माच व्यादिश आहे. तोच सर्व जीवांना आपआपल्या गुणकर्मानुसार वेगळे वेगळे स्वभाव व धर्म लावून देतो. जीव तदनुसार वागत असतात. गाय बैल चरतात, व्याघ्रसिंह शिकार करून जगतात. कावळे चिमण्या उजेडतांच उठतात आणि अंधारतांच आपआपल्या घरट्यांत दडतात. उलट, घुबडे नि वटवाघळे दिवसां दडून बसतात आणि रात्रींच संचार करतात. हे जें स्वभाव-वैचित्र्य या सृष्टीत दिसून येतें तें सर्व प्रकृतीच्या गुणानुसार होय. आणि प्रकृति ही पुरुषाश्रित असल्यामुळे तो तिचा शास्ता म्हटला जातो. म्हणून तो व्यादिश म्हणावयाचा. एरव्हीं त्याचा ह्या सगळ्या घडामोडींशी काडीचाहि संबंध नाही. तो केवळ द्रष्टा आहे.
न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः ।
न कर्मफल-संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥ गीता ५ - १४
नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः ।
आज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥ गीता ५ - १५

प्रत्येक जीवाचा हा जो स्वभाव, ज्याला अनुसरून तो वर्तत असतो तो अपरिवर्तनीय आहे. त्याच्या बाहेर त्याला जातां येत नाही. जो तसे करूं पाहील तो ईश्वरी आदेशाचे उल्लंघन करूं पाहतो असें म्हणावे लागेल. त्यालाच अभ्यसूया म्हटलें आहे. तोच अधर्म होय. गीतेचे प्रतिपाद्य स्वधर्मनिष्ठा आहे. ज्यानें त्यानें आपल्या स्वभावधर्माप्रमाणें चालावें. जो तसे करायचे नाकारतो तो त्याचा हट्ट फुकट आहे.
"सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवान् अपि । प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥ गीता ३- ३३ यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे । मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यति ॥ गीता १८ - ५९ या श्लोकांत गीतार्थ स्पष्ट झाला आहे. "करिष्ये वचनं तव" या अर्जुनाच्या स्वीकारोक्तींत त्याचाच स्वीकार आहे.

९४०. दिश
दिशति कर्मिणां कर्मफलानि इति दिशः । जो कर्त्याला आपल्या कर्माची फळे देतो तो दिश म्हणावयाचा. देहधारी कोणताहि जीव अकर्मा राहूं - शकत नाही. प्रकृतीचे गुण त्याला कर्मप्रेरणा देत असतात. त्या प्रेरणेला वश होऊन तो जाग्रत् स्वप्न सुषुप्ति या अवस्थांतून जात असतो. तो त्यांचा विरोध करू शकत नाही. आणि त्या अवस्थांत कांहीं ना कांहीं कर्म होतेंच आणि कर्म म्हटले की त्याचें फळहि त्याबरोबर आलेच. तें टळू शकत नाही. हे कर्म आणि त्याची फळे कोण देतो ? तीं आपोआप मिळतात असें म्हणतां येत नाही. कारण कोणतेंहि कर्म हे कावांचूनच परभारें च होतें असें कुठेहि आढळून येत नाही. मग तें कर्म जो करतो तोच त्याची फळेहि देतो असें म्हटल्यास तेहि बरोबर नाही. कारण राजपुरुष कर्में करतो आणि त्याच्या सेवेचें फळ राजा देत असतो असें आपण पाहतो. म्हणजे कर्म करावयाचे एकानें व त्याचे फळ देणारा दुसराच, असा प्रकार सर्वत्र आढळून येतो. आता हा फळदाता कोणी तरी पुरुषच असावा लागेल. कर्म जड आहे. तेंच आपलें फळ मिळवतें वा देतें असें म्हणता येणार नाही. म्हणून पूर्व मीमांसकांनी जी अपूर्व नामक कर्माची वा फलदात्याची कल्पना केली आहे ती युक्तिसंगत नाही. अर्थात् फलदाता हा चेतनच हवा. आणि हा फलदानसमर्थ चेतन परमात्म्यावांचून दुसरा कोण आहे ? म्हणून तो परमात्माच फळदाता म्हणावा लागतो. म्हणून तो दिश म्हणजे फलदानी म्हटला आहे. "क्व कर्म प्रध्वस्तं फलति पुरुषाराधनमृते ?' असा पूर्व मीमांसकांना वेदान्त्याचा सवाल आहे. "अतस् त्वां संप्रेक्ष्य क्रतुषु फलदान-प्रतिभुवं श्रुतौ श्रद्धां बद्ध्वा कृतपरिकरः कर्मसु जनः । " तुम्ही वेदविहित कर्में करा. त्याचे प्रतिफल द्यायला परमात्मा प्रतिभू म्हणजे जामीन बसला आहे. असें श्रुति सांगते. आणि आस्तिक जन त्यावर विश्वास ठेवून कर्में करीत असतात; आणि परमात्मा त्यांना कर्मानुसार फल देत असंतो म्हणून तो दिश म्हणावयाचा.



॥ हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP