ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

उद्भवः क्षोभणो देवः श्रीगर्भः परमेश्वरः ।
करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहः ॥४१॥


३७३. उद्भव
उद्भव म्हणजे उद्गम. हा समस्त व्यक्त सृष्टीचा प्रवाह अव्यक्त नि अक्षर परमात्म्यापासून निरंतर प्रवाहित होत आहे. त्यांत खळ नाही. म्हणून तो उद्भव, मूर्त अमूर्त, स्थूल सूक्ष्म, व्यक्त अव्यक्त सारांश यच्चयावत् सगुण वस्तूंचा उद्भव तो निर्गुण परमात्मा होय, जें कांहीं निर्माण व्हायचें तें मूलतः त्यांतूनच होते. म्हणूनच म्हटले आहे देवानें-" उद्भवश्च भविष्यताम् " ' जन्माला येणाऱ्या सर्व वस्तूंचे मायपोट मी आहे. ' जगांतील कार्यकारणभाव हा अलीकडचा आहे. नळाच्या तोटींतून पाणी येतें तिथें तें तळयांतून येते, तळयांत नदीचे येतें, नदीत डोंगराचे येते आणि डोंगरांत पावसाचे. पण पाऊस कुठून येतो ? तो यज्ञातून येतो, परमेश्वरापासून येतो. सूर्यरूप परमेश्वरी यज्ञ चालला आहे. त्यांतून पावसाळा, त्याने सुगी, त्यांतून भूतांचे जीवन, अशा प्रकारें परमात्माच सर्वांचे मूळ होय. तोच उद्भव.

सर्वांचे मूळ माझ्यांत प्रेरणा मजपासुनी ।
हे ओळखूनि भक्तीने जाणते भजती मज ॥
चित्तें प्राणे जसे मी चि एकमेकांस बोधिती ।
भरूनि कीर्तने माझ्या ते आनंदांत खेळती ॥

असे जे रंगले नित्य भजती प्रीतिपूर्वक ।
त्यांस मी भेटवीं मातें देउनी बुद्धियोग तो ॥
करूनि करुणा त्यांची हृदयीं राहुनी स्वयें ।
तेजस्वी ज्ञान-दीपाने अज्ञानतम घालवीं ॥


उद्भव प्रभव संभव सर्व नामें समानार्थकच आहेत. आणि ती सर्व इथे आली आहेत. उद्भव हे नाम तर दोन वेळां आलें आहे: प्रस्तुतचे ’उद्भवः क्षोभणो देवः ’ (४१) आणि पुढे ’उद्भवः सुंदर: सुन्दः ’ (८५)

३७४. क्षोभण
क्षोभण म्हणजे क्षोभ उत्पन्न करणारा. सृष्टीच्या प्रारंभी जगाची सर्व उपादानभूत तत्त्वे कायम असूनहि सृष्टि मात्र निर्माण होऊ शकली नाही. सृष्टिकर्माचा अध्यक्ष तो ब्रह्मदेव बुचकळ्यांत पडला. कुठे अडलें, म्हणून तो विचार करू लागला. पण त्याला काहीं सुचेच ना. तो थकला आणि देवाला शरण गेला. तेव्हां देवाने आपल्या तेजाने त्या सर्व जडाजड उपादान-तत्त्वांत प्राण फुकला, त्यांना स्वकर्मक्षम केले. आणि तेव्हां कुठे ती क्षोभ पावलेली तत्त्वे भराभर सृष्टि रचूं लागली.परमात्मा हा असा क्षोभण आहे. स्त्री-पुरुषांच्या ठाई जोवर क्षोभ निर्माण होत नाहीं तोंवर अपत्यनिर्माणतत्त्वे असूनहि ती स्वकर्मक्षम होत नाहींत. क्षोभ निर्माण झाला म्हणजे ती परस्पर सहकार्य करतात. आणि त्या सहकारांतून ही सृष्टि आकार घेते. प्रकृति-पुरुषरूप जीवाजीव तत्त्वे सृष्टीची मूळ उपादाने होत. परंतु ती त्यांच्यांत क्षोभ होईपर्यंत स्वस्थ पडून राहतात. आणि परस्पर सहकाराअभावीं सृष्टिरचना घडून येत नाही. हा क्षोभ व तदुत्थ सहकार परमेश्वरी प्रेरणेनेच निर्माण होतो. म्हणून परमात्मा हा क्षोभण म्हणावयाचा. वीज आणि विजेची उपकरणे दोन्हीहि असून जोवर आपण बटन दाबून त्यांच्यांत क्षोभ व सहकार उत्पन्न करीत नाहीं तोवर ती कार्यक्षम होत नाहीत, दिवा प्रकाशत नाही, पंखा गरगरत नाहीं, रेडिओ बोलत नाही. हा आपला नित्याचा अनुभव आहे. हा जसा बाह्य जगांतील अनुभव तसा अंतर्जगांतील अनुभवहि आपल्याला नित्याचाच आहे. देहेंद्रियमनोबुद्धि सुषुप्तींत विलीन होतात. त्यावेळी त्यांचे अस्तित्व असून नसून सारखेच, त्यांना परत स्वकर्मक्षम कोण करतें ? तो क्षोभणदेवच तें करतो. म्हणून ध्रुव म्हणतो
योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल-शक्तिधरः स्वधामा ।
अन्यांश्च हस्त-चरण-श्रवण-त्वगादीन् प्राणान्, नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ॥


३७५. देव
द्योतते इति देव: आत्मरूपाने जो प्रत्येक जीवाच्या हृदयांत द्योतमान होतो तो देव होय. म्हटलेंच आहे:
यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः ।
क्षेत्र क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत ॥ गीता १३-२४


जगाला रवि प्रकाशित करतो. तो भूः भुवः आणि स्व: तिन्ही लोक प्रकाशित करतो. संपूर्ण विश्व प्रकाशित करतो. त्याप्रमाणे क्षेत्री परमात्मा संपूर्ण क्षेत्राला अन्तर्बाह्य प्रकाशित करतो. सूर्याला जसा अंधकार ठाऊक नाही तसें क्षेत्रज्ञाला अज्ञात असें क्षेत्र नाही. हा सर्वान्तर्यामी देव संपूर्ण क्षेत्र जाणतो इतकेच नव्हे तर भूतभविष्यवर्तमानकालीन यच्चयावत् क्षेत्रेहि तो जाणतो. म्हणून गीतेतच पुनश्च म्हटले आहे:

वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।
भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥ गीता ७-२६


सारांश, तो देव समग्र आणि सर्व क्षेत्रांचा ज्ञाता आहे, प्रकाशक आहे. त्याच्या जाणिवेतून एक कण आणि एक क्षणही निसटू शकत नाही, किंवा त्यांची कुठली हालचालहि सुटू शकत नाही. त्याच्यापासून लपून राहूं शकेल असें कांहीं मुळी असूच शकत नाही. असा तो देव, देव म्हणजे प्रकाशक आहे, सर्वज्ञ आहे. देव हेच त्या देवाचें मूळ नाम आहे. खरें नाम आहे. इतर सर्व आडनांवें आहेत. ईश्वर, प्रभु, भगवान् इत्यादि, विष्णु शिव शक्ति इत्यादि, राम कृष्ण हरि इत्यादि. देव म्हणजे देवत्व हेच त्याचे रूप आहे. प्रकाशन-शीलता हे त्याचे स्वरूप आहे. द्योतन हाच त्याचा गुण आहे आणि तेच त्यांचे कर्म आहे. अशा प्रकारें नामरूप-गुणकर्मानी म्हणजे सर्वतोपरी तो देव ' देव ' आहे.

३७६. श्री-गर्भ
बीजाच्या पोटांत मूलोपमूल-स्कन्ध-शाखा-प्रशाखा-पत्र-पुष्पसंपत्ति आणि शोभा सांठलेली असते. बीज अंकुरते आणि त्यांतून आपल्या संपूर्ण वैभवाने वृक्ष मूर्तिमान् होतो. म्हणून बीज हे वृक्षगर्भ म्हणावयाचे. पूर्णिमेचा चंद्र आपल्या षोडश कलांनी सुधा-सिंचन करून सर्वांना सुखवीत असतो. पण हा सारा कलाकलाप अमावस्येच्या मुकुलित चन्द्रकलिकेंत निभृत असतो. म्हणून त्या चंद्राला कलानिधि म्हणावयाचे, कला-गर्भ म्हणावयाचे. सहस्ररश्मि सूर्य सायंकाळी आपल्या किरणांचा ताणा गुंडाळून घेतो आणि सकाळी परत पसरतो. म्हणून तो दिनकर किरणगर्भ म्हणावयाचा. वृक्ष-विस्तार, कला-विस्तार, किरण-विस्तार बीज, चंद्र आणि सूर्य यांची श्रीच होय, त्यामुळे तेहि श्रीगर्भ म्हणावयाचे. परमात्मा हा तसा श्रीगर्भ आहे. विश्वाचा हा विराट विस्तार, हा कलाकलाप, हा प्रकाशपुंज त्या परमात्म्यापासून प्रकटला आहे. म्हणून तो श्री-गर्भ, विश्व हे वैचित्र्याचे आगर आहे. किंबहुना वैचित्र्य म्हणजेच हें विश्व होय.

३७७. परमेश्वर
ईश्वरभाव म्हणजे प्रजापालन होय. मर्त्यलोकी राजा प्रजेचे पालन करतो, म्हणून त्याला मनुष्येश्वर म्हणतात. देवलोकी जो देवांचे पालन करतो, त्याला देवेश्वर म्हणतात. पाताळांत जो असुरांचे पालन करतो, त्याला असुरेश्वर म्हणतात. परंतु या सर्वविध ईशांचे ईशन करणारा जो, तो परमेश्वर म्हणावयाचा. त्या परमेश्वराच्या आधिपत्याखाली सर्व लहानमोठे, ईश्वर म्हणवणारे, आपआपल्या क्षेत्रांत ईशन करीत असतात. वस्तुत: ते अस्वतन्त्र आहेत. परमेश्वरी सूत्रानुसार त्यांचे ईशन चाललेले असते. परंतु ते हे ओळखत नाहीत आणि आम्हीच ईश्वर आहोत असा अहंकार करतात. त्यांचा प्रलाप गाजत असतो

ईश्वरोऽहं अहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी । गीता १६-१४.२
आढ्योऽभिजनवान् अस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया ॥ गीता १६-१५.१


असा उद्दाम अहंकार ईश्वरी संकल्पाच्या भूमिकेवर आदळून दगडावर आपटलेल्या ढेकळाप्रमाणे भुगा होऊन जातो. परंतु जे ईश्वराचे भक्त आहेत ते ज्ञानी " करिष्ये वचनं तव " म्हणून नम्र होतात. ते असे प्रलपत नाहींत असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि, पण विनम्रपणे म्हणतातविश्वांत एक सर्वोपरि सत्ता कार्य करीत आहे. तिला ओळखून माणसाने नि:संग आणि निर्वैर होऊन जगावयाचे आहे हे जो समजला आणि वर्तला तो कृतार्थ झाला, धन्य झाला. गुरुबोध आणि दासबोध, आचार्यांचा आणि दासांचा बोध, आहे
ते धन्या भुवि परमार्थ-निश्चितेहा: शेषास्तु भ्रमनिलये परिश्रमन्ति । --शंकराचार्य

समजले आणि वर्तले । ते चि भाग्यपुरुष झाले ।
एर ते उरले । करंटे जन ॥ --समर्थ


३७८. करण
कोणते हि कर्मानुष्ठान व्हायला जी कारकसामग्री आवश्यक असते तींत कर्ता कर्म करण आणि अधिकरण हे चतुष्टय गौण होय. प्रधान आणि पांचवें कारक दैव होय. चार बोटें आणि आंगठा मिळून हाताचा पंजा होतो. कार्य त्या पाचां मिळूनच होतें. पण त्यांत मुख्य वांटा आंगठ्याचा असतो. त्याच्या सहकाराशिवाय बाकीची चारी लंगडींच म्हणावी लागतात. या कारक-पंचकांत हि तसेंच आहे. गीतेने या कारांनाच कारक म्हटले आहे. या कारकांची संख्या सोईप्रमाणे कमीज्यास्त होते. पण त्यांत एक दैव आणि दैवेतर असा द्विविध विभाग अवश्य असतो. दैव हे अपरिहार्य आणि अविभाज्य एक आहे. दैवेतरांत सोईप्रमाणे संख्येची वाढघट होऊ शकते. कांहीं पशु- पक्षांच्या पंज्यांत दोन, तीन, चार अशी हि नखें बोटें आढळतात. पण त्यांत एक आंगठा आणि बोट वा बोटें असा विभाग मात्र असतोच असतो. इथे सहस्राने करणं कारणं असा द्विविध विभाग केला आहे. अर्थात् करण म्हणजे सर्व सहायक सामग्री, दैवेतर सर्व संभार, कर्ता कर्म करण आणि अधिकरण समजावयाचा. प्रत्यक्ष कर्म संपादन करणारें जरी हे चतुष्टय असलें तरी तें सहायक असल्यामुळे त्याला करण हे नाम योग्यच होय. तरवार शत्रूची मुंडकी उडविते खरी, पण नुसती ती उठून उडवू शकत नाही. तें कर्तृत्व तरवारबहाद्दराचे असते. म्हणूनच तो करविता होय. प्रधान. होय. प्रधान आणि गौण असा विभाग केला तरी कर्मानुष्ठानाला दोन्ही सारखेच आवश्यक आहेत. म्हणून परमात्म्याला करण आणि कारण म्हणावयाचे.

३७९. कारण
कर्मनिष्पादक सामग्रीत ज्या पंचकाचा समावेश होतो त्यांत दैव हे पांचवें म्हणजे अन्तिम आहे. अर्थात तें कलशरूप आहे. कळसाशिवाय सामग्री ही असामग्री होईल. तें समग्रतेचा एक अपरिहार्य अंश आहे एवढेच नव्हे, तर तो अंश प्राणभूत आहे. एक पुरुषाकृति सर्वांग-संपन्न आहे पण तींत प्राण नाही, तर ती जितकी व्यर्थ म्हणावी लागेल, तितकीच कर्मसामग्री ही दैवाशिवाय व्यर्थ म्हणावी लागेल. हे जें मुख्य कारण, किंबहुना एकमेव कारण दैव त्याचे स्वरूप काय आहे ? खरोखर तें अचिन्त्य आहे. पण ईश्वरी संकल्प त्याचे स्वरूप आहे, असे म्हणता येईल. ईश्वरी संकल्पाचे अनुमान महापुरुषांना होतें, कारण, त्यांना समग्र दर्शन असतें. अल्पज्ञ जीव आपल्या फल्गु कामनांत गुंतलेला आणि गुंडाळलेला असतो. त्याला व्यापक दर्शन नसतें. सिंधु सागराला मिळायला निघालेली असते. पण बिंदु जर तद्विरोधी मनसुबे रचील, तर ते विफल होतील, हे उघड आहे. त्याचे अनुकूल मनसुबे सफल होतच असतात. प्रतिकूल विफल होत असतात. आणि या साफल्यावैफल्याच्या भोवऱ्यात सांपडून बिन्दुस्थानीय जीव सुखदु:ख भोगीत संसरत असतो. पण त्याच्या सुखदु:खाची पर्वा न करतां ईश्वरी संकल्प सिद्धीस जात राहतो. हा जो दुर्निवार, नव्हे अनिवार ईश्वरी संकल्प, तोच कारण होय. सर्व काही त्याच्याच बळाने घडून येते. त्याच्याच अनुकूलतेनें, त्याच्याच अनुग्रहाने सर्व कर्म फलोन्मुख होते. आणि यथाकाल सफल होते. त्याच्याच प्रतिकूलतेने, त्याच्याच निग्रहाने कर्म रुद्ध आणि विफल होते. म्हणून कर्तुं अकर्तुं अन्यथाकर्तुं समर्थ परमात्मा हाच सर्वकारण होय. देवाचा संकल्प म्हणून त्या सर्वकारणालाच दैव अशी हि संज्ञा दिली आहे. त्याचा संग्रह मी असा केला आहे:

कर्म-कारणसामग्र्यां गरीयो दैवमुच्यते ।
ऐश्वरो मूलसंकल्पो दैवमित्युच्यते बुधैः ॥


३८०. कर्ता
"करणं, कारणं कर्ता, विकर्ता गहनो गुहः" या श्लोकार्धात, तीन जोड्या आल्या आहेत नामांच्या. पहिली 'करणं कारणं आपण पाहिली. आता दुसरी 'कर्ता विकर्ता' पहावयाची. त्यानंतर 'गहनो गुहः' ही जोडी पाहूं.

कर्ता आणि विकर्ता म्हणजे काय ? तर प्रत्येक वस्तूला षड्भाव होतात-जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते म्रियते- ते देणारा. हे षड्भावच इथे कर्ता आणि विकर्ता या दोन पदांत संक्षिप्त झाले आहेत. कर्ता म्हणजे जन्म स्थिति वृद्धि देणारा आणि विकर्ता म्हणजे विपरिणाम अपक्षय आणि मृत्यु देणारा होय, त्रैगुण्याला अनुसरून ब्रह्मा-विष्णु-महेश असें त्रैत मानले गेले आहे. परंतु खरें पाहिले, तर या त्रिविध कल्पनेची गरज नाही. जन्ममृत्यु, वृद्धिक्षय, स्थिति-गति असें द्वैधच तेवढे सर्वत्र दिसून येते. आणि म्हणून त्यांच्या अधिष्ठात्या देवांची हरिहराची तेवढी जगांत पूजा होते. ब्रह्मदेव अभावानेच आढळतो. त्याची कुठेच वास्तपुस्त नाही. विचारक प्रसंगानुसार विविध विचार मांडतो आणि ते सर्व युक्तिपूर्वक सिद्ध हि करता येतात. त्यामुळे त्यांच्यांत विरोध कल्पिण्याची गरज नाही. कारण युक्तीनेच त्यांची व्यवस्था झालेली असते. त्यांच्यांतील विरोधाचा परिहार हि युक्तीनेच होतो इथे द्वैध विचार मांडला आहे. आणि म्हणून परमात्मा हा कर्ता आणि विकर्ता म्हटला आहे. मुद्रणालयांत अक्षरांचे खिळे जुळविणारा प्रथम त्यांचा संग्रह करतो आणि परत तोच काम झाल्यावर त्यांचा विग्रह करतो. त्या प्रमाणे परमात्मा प्रथम कल्पारंभी या विश्वाची संघटना करतो आणि नंतर कल्पान्ती त्याची तोच विघटना करतो. म्हणून तो कर्ता जसा तसा विकर्ता म्हटला आहे. कल्प आणि कल्पान्त अशी एक जुळी आणि सूक्ष्म प्रक्रिया आहे. ती परस्परविनिमित होणारी आहे. म्हणजे एका दृष्टीनें जें घटन आहे, तेच दुसऱ्या दृष्टीने विघटन आहे आणि विघटन आहे तें घटन आहे. एकाच वेळी नदी डोंगराला व मैदानाला झिजवीत असते आणि समुद्राला भरीत असते, तद्वत्. म्हणून परमात्मा हा कर्ता विकर्ता जोडीने म्हटला आहे. तो नुसता कर्ता नाहीं, नुसता विकर्ता नाही, तर कर्ता विकर्ता आहे.

३८१. विकर्ता
विकार विक्रिया विकर्म हा सर्व विपूर्वक कृ धातूचा गोतावळा आहे. आणि तो सर्व अनिष्ट अर्थाचा वाचक आहे. त्यांतच विकर्ता हा शब्द हि पडतो. परमात्मा कर्ता आहे, तो अकर्ता आहे असे म्हटले तर तें समजण्यासारखे आहे. पण तो विकर्ता म्हणजे वाईट कर्म करणारा आहे असें कसें म्हणावयाचें ? पण इथे तर जणूं तसे म्हटले आहे. त्याचा अर्थ काय ? पाप वा पुण्य करणारांचे व न करणारांचे चार प्रकार संभवतात:

१-केवळ पाप करणारा
२-केवळ पुण्य करणारा
३-पाप-पुण्य दोन्ही करणारा
४-पाप-पुण्य दोन्ही न करणारा
पैकी केवळ पाप करणारा हा कल्प परमात्म्यालाच काय पण कोणालाच लागू होऊ शकणार नाही. तेव्हां विकर्ता म्हणजे केवळ पाप करणारा असा अर्थ जर होऊ शकत नाही, तिथे जर असंभावना संभवते, तर त्याचा दुसरा काय अर्थ करावयाचा ? त्याचा अर्थ करावयाचा विशिष्ट कर्म करणारा, विविच्यकर्ता, पापपुण्याचा विवेक करून पुण्य तेवढे करणारा, पाप मात्र वर्ज्य करणारा. यज्ञ दान तप हे पुण्यकर्म आहे, चित्तशुद्धिकारक आहे. चित्तशुद्धिकर तेवढी कर्में तो करतो, म्हणून तो विकर्ता म्हणावयाचा. अर्थात् केवळ पुण्य करणारा ही जी दुसरी कोटी वर वर्णिली ती त्याला लागू होते. परमात्मा सर्वाधार असल्यामुळे पापपुण्य सर्व कांहीं तो करतो असे म्हटले जाईल. हा झाला कर्ता म्हणजे सर्वकर्ता. तो निर्गुण असल्यामुळे तो कांहींच करीत नाही, असे म्हटले जाईल. हा झाला केवळ अकर्ता आणि तो पुण्यापूण्यविवेक करतो असे म्हटले जाईल. म्हणून तो विकर्ता म्हणावयाचा. हाच अनुकरणीय आदर्श होय.

३८२. गहन
गहन आणि गुह ही जोडी परमात्म्याचे अप्रकाशत्व प्रकाशित करणारी आहे. परमात्म्याचे स्वरूप, सामर्थ्य आणि चेष्टित म्हणजे करणी अगम्य आहे. कोणाला त्याचे यथार्थ आकलन होत नाही. करणं कारणं कर्ता विकर्ता या पदांच्या सांनिध्यामुळे गहन आणि गुह ही पदें अनुषंगाने त्याच्या कर्मशक्तीचे स्वरूप, सामर्थ्य आणि फल निगूढ असल्याचे सूचित करतात. इथे सहजच गीतेचा पुढील श्लोक आठवतो:

कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः ।
अकर्मणश्च बौद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥ गीता ४-१७


कर्मतत्त्व गूढ आहे. कर्म कशाला म्हणावें, विकर्म कशाला म्हणावें आणि अकर्म कशाला म्हणावें ?

गीतेप्रमाणेच भागवतहि म्हणते,
" कर्माकर्मविकर्मेंति वेदवादो न लौकिक:" कर्म अकर्म विकर्म हा लौकिक विषय नाही. तो वेदाचा विषय आहे. तो शास्त्रीय आहे. अर्थात् शास्त्रानेच त्याचा उलगडा करायचा आहे. गीताशास्त्राने त्याचा उलगडा केला आहे. तो थोडक्यांत. असा: आत्म्याशी कर्माचा कांहीं एक संबंध नाही. तो अकर्ता आहे. पण देहवंताला कर्म टाळणे अशक्य आहे. आणि कर्म हे सदोष असायचें च, सर्वस्वी निर्दोष कर्म नाही. अर्थात् त्याचे बरे-वाईट फळ हि कर्त्याला मिळणारच. तेव्हां फलरूप कर्म-बंधांतून सुटका व्हायची कशी ? त्याला उपाय हाच की कर्म करणार नाही हा वृथा अहंकार वा हट्ट सोडून द्यायचा. सदोष हि पण स्वभावप्राप्त म्हणजे स्वधर्मरूप कर्म करायचे. पण त्याच बरोबर यज्ञदानतपोरूप चित्तशुद्धिकर विकर्म विशेषे करून करायचे. आणि ही दोन्ही कर्में मी कर्ता असा संग म्हणजे अभिमान न धरता, त्यांच्याविषयीं राग-द्वेष न बाळगतां म्हणजे केवळ कर्तव्यबुद्धीने आणि त्यांचे फळ आपल्याला मिळालें च पाहिजे असा फलाग्रह न धरतां निष्काम भावाने करावयाची. अशा युक्तीने कर्में केल्यास यथाकाळी अकर्मसिद्धि होते. अर्थात् आत्म्याचें अकर्त अभोक्त स्वरूप प्रकट होतें: आणि मनुष्य कर्म-बंधनांतून मुक्त होऊन स्वरूपी प्रतिष्ठित होतो. हा सगळा विषय गहन नाहीं, असें कोण म्हणेल ? परमात्म्याचे हे स्वरूप म्हणूनच गहन म्हटलें आहे.

३८३. गुह
गुह म्हणजे गुहा-प्रविष्ट, गुह्य, गूढ. परमात्मा हा सर्वांच्या अन्तरांत लपलेला आहे. तो अन्तरतर आहे. केळीची सोपटें सोलून सोलून नि:शेष काढून टाकली म्हणजे तिचा गाभा हाती लागतो. तो त्या सोपटांत लपलेला असतो. म्हणून तो जसा गुह्य तसा परमात्मा हा अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनन्दमय म्हणवणाऱ्या पंच कोशांच्या आंत दडलेला आहे, लपलेला आहे, म्हणून तो गुह म्हणजे गुह्य म्हणावयाचा. मुंजतॄणाच्या कोशांतुन जशी मुंजाची शलाका वा इषिका काढावयाची असते, तसा तो गुह म्हणजे गूढ आत्मा या पंचकोशांतून विचाराने बाहेर काढावयाचा आहे. या विचारणेलाच अध्यात्मविद्या म्हणतात. जीवाला ' स्वे महिम्नि ' प्रतिष्ठित करणारी ही विद्या आहे. म्हणून ती सर्व विद्यांत थोर म्हटली आहे, 'अध्यात्मविद्या विद्यानाम् '. केळीच्या सोपटाच्या आंत जसे सोपट असते त्याप्रमाणे हे कोश आहेत आणि त्यांच्या ह्या मालिकेला गुहा अशी संज्ञा आहे. ह्या गुहेत तो अंतरतर आत्मा लपलेला आहे. म्हणून तो गुह म्हणजे गुह्य होय.

देहादभ्यन्तरं प्राण: प्राणादभ्यन्तरं मनः ।
तत: कर्ता ततो भोक्ता गुहा सेयं परंपरा ॥


पंचकोष-विलक्षण, अवस्थात्रय-साक्षी, सच्चिदानंदस्वरूप तो परमात्मा गुह होय आणि त्याचे ज्ञान तें गुप्त. तेंच परमगुह्य म्हणून राजगुह्य म्हटले आहे. गुह्यालाच पुढे ' गुह्यो गभीरो गहनो गुप्तः ' म्हणून अनेकशः आळविले आहे. जणूं त्याची गूढता एका पदानें पुरेशी प्रकट करता येत नाही, इतका तो गुह म्हणजे गूढ आहे. परमात्मा झांकलेला म्हणून गुह म्हणावयाचा, तसा तो झांकणारा म्हणून, गृहति इति, गुह म्हणता येईल. कोणाला झांकलें आहे त्याने ? जगाला ? नाही, स्वत:ला. जगद्रूपाने प्रकटून तो लपला आहे. अलंकाररूपाने प्रकटून सुवर्ण रूपाने तो लपला आहे, सुवर्णाला त्याने लपविलें आहे. म्हणूनहि तो गुह. गुह म्हणजे देव-सेनानी स्कंद, तो एक परमात्म्याची विभूति आहे. ' सेनानीनां अहं स्कंदः ' कामक्रोधादि षड् रिपूंचें स्कंदन करतो म्हणून स्कंद. त्या शत्रूंची त्याच्यापर्यंत पोंच होत नाही म्हणून गुह.


व्यवसायो व्यवस्थानः संस्थानः स्थानदो ध्रुवः ।
परर्ध्दिः परमस्पष्टस्तुष्टः पुष्टः शुभेक्षणः ॥४२॥


३८४. व्यवसाय
व्यवसीयते अस्मिन् इति व्यवसाय: | ज्याच्या स्वरूपाबाबत व्यवसाय म्हणजे निश्चय केला जातो तो परमात्मा व्यवसायरूप होय. गुरुमुखाने शास्त्रश्रवण करून आत्मचिन्तनाने हा 'अहं ब्रह्मास्मि ' रूप व्यवसाय केला जातो. या व्यवसायान्त क्रियेलाच आत्मानात्मविचार असें म्हणतात. आत्मा म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण संज्ञा धारण करणाऱ्या तीन शरीरांहून विलक्षण, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या पंच कोशांहून वेगळा आणि जागृति, स्वप्न, सुषुप्ति या तीन अवस्थांचा साक्षी असलेला सत्चिद्-आनंद-स्वरूप परम अर्थ होय. अनात्मा म्हणजे असत्अचिद् अनानन्दरूप म्हणजेच अनृत-जड-दु:खात्मक असें व्यष्टिसमष्टि शरीरत्रय होय, संशय, असंभावना आणि विपरीत भावना या त्रिदोषांपासून मुक्त असा मी ब्रह्म आहे हा निश्चय ज्याचा झाला तो व्यवसायी पुरुष जीवन्मुक्त ज्ञानी होय. देहपातोत्तर तो ब्रह्मज्ञ नव्हे तर ब्रह्मच होतो. ज्यांचा असा निश्चय होत नाही ते अव्यवसायी होत. कोऽहं याचा निर्णयात्मक बोध त्यांना कधीच होत नाही आणि ते कधी याचा तर कधी त्याचा अभिमान बाळगून अपार संसारांत भ्रमण करीत राहतात. त्यांचे हे भ्रमण परमात्म-कृपेने त्यांना सद्गुरु भेटून त्यांचे अज्ञान फिटेपर्यंत आणि व्यवसाय भेटेपर्यंत चालूच राहतें. ह्यालाच अनुलक्षून गीतेंत " व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन । बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ॥" इत्यादि प्रकरण वेदवादी अव्यवसायी आणि स्थितप्रज्ञ व्यवसायी म्हणून चित्रित करणारे, आले आहे.

३८५. व्यवस्थान
व्यवस्थाप्यते अनेन इति व्यवस्थानः | सर्वांना परमात्म्याने व्यवस्था लावून दिली आहे. म्हणून तो व्यवस्थान म्हणावयाचा. कशी काय लावून दिली आहे त्याने ही व्यवस्था ? गुण-कर्म-विभागशः. प्रत्येकाला गुण आणि तदनुसार कर्में वाटून देऊन ही व्यवस्था लावण्यांत आली आहे. जी व्यवस्था बाहेरून लादण्यांत येते, ती झुगारून देण्याची प्रवृत्ति प्रत्येक जीवांत असते. अर्थात् अशी व्यवस्था ही व्यवस्था न म्हटली जातां जुलूम म्हटली जाते. तो बलात्कार म्हटला जातो. तो टिकू शकत नाही. कारण, ' स्वभाववश ही भूतें बलात्कार निरर्थक '. जें स्वाभाविक असतें तेंच टिकते. म्हणून स्वाभाविक आचरणाला व्यवस्था म्हणावयाचे. चातुर्वर्ण्य या तत्त्वावर आधारलेलें आहे म्हणून ती व्यवस्था आहे. अमक्या एका धंद्यांत ज्यास्त पैसा मिळतो म्हणून आपला स्वाभाविक धंदा सोडून म्हणजेच स्वधर्म सोडून जो दुसऱ्या अस्वाभाविक, लोभदृष्ट धंद्याकडे वळतो तो परधर्म करतो. आणि ' परधर्मो भयावहः ' परधर्माचरणापासून भय म्हणजे बाधा निर्माण होते. अर्थात् व्यक्तीचे आणि समाजाचे जीवन सुरळीत चालत नाही. One man's food is another man's poison. या इंग्रजी म्हणीचा हि असाच आशय आहे. ज्याने त्याने स्वभावानुसार वर्तावं. हे स्वभाव-नियतधर्माचें आचरण सोडून माणूस भटकतो ह्याचे कारण इंद्रियांचा स्वभाव होय, माणसाचे हित निराळे, इंद्रियांचे प्रिय निराळे. असा विवेक करून माणसाने सदैव स्वहितच पहावें. इन्द्रियांच्या आवडीला वश होऊ नये, बळि पडू नये. ह्याच विवेकपूत आचरणामुळे धर्माची स्थापना होते. म्हणून परमात्मा विवेकदृष्टि देऊन धर्मसंस्थापना करीत असतो. जो हा विवेक सोडून वागतो तो दु:ख पावतो. धर्माचरणाने सुखी होतो. हेच व्यवस्थापन, म्हणून परमात्मा हा व्यवस्थान म्हणावयाचा.

३८६. संस्थान
' व्यवसायो व्यवस्थान: संस्थानः' ही क्रमिक पदे एक विचार सूचित करतात. प्रथम एखाद्या कार्याचा निश्चय होतो. त्यानंतर त्या कार्याच्या साधनांची व्यवस्था करावी लागते आणि शेवटी तें कार्य संपादून समाप्त केले जाते. अथ ने आरंभ आणि इति ने समाप्ति होते. संस्थान हे पद तो इत्यर्थ सूचित करणारें आहे. परमात्मा या विश्वकर्माचा व्यवसाय व्यवस्थान तसा संस्थान आहे. आज आपण संस्था संस्थान या पदांचा कांहीं वेगळाच आशय समजतों, परंतु त्या संस्थेशी वा संस्थानाशी या परमात्मवाचक संस्थान पदाचा संबंध नाही. अथवा असें म्हणूं या की, जगांत कायम टिकणारी अशी एकच संस्था आहे. आणि ती म्हणजे स्मशान. सर्वांची परिसमाप्ति त्या संस्थेत वा संस्थानांत होते. परमात्मा या समस्त संसाराला संस्था देतो, आपल्या ठाई विराम देतो म्हणून तो संस्थान म्हणावयाचा. जोंधळ्याच्या दाण्यापासून जोंधळ्याचे रोप अंकुरतें आणि वाढते. हे त्याचे प्रस्थान होय. कणीस धरलें आणि भरलें म्हणजे त्याची वाढ खुंटते. ही कुंठा म्हणजेच संस्थान होय. परमात्मा या विश्वसृष्टीचे साफल्य आहे. आत्मदर्शनावधिच सर्व साधना चालतात, आत्मदर्शन झाले की त्या सफल होऊन कुंठित होतात. म्हणून परमात्मा हा या संसारवृक्षाचा फलभूत होत्साता संस्थान म्हणजे संस्था, परिणति, परिसमाप्ति देणारा म्हटला आहे. गीतेत यालाच उद्देशून " सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते " म्हटले आहे. इथे निःशेष सर्व कर्म म्हणजे वर्णाश्रमधर्मादि वा अन्य यच्चयावत् हालचाल आणि वेदानुवचन यज्ञ दान तप इत्यादि समस्त साधना अर्थात् सर्वविध प्रस्थान ज्ञानांत म्हणजे आत्मज्ञानांत परिसमाप्त होते म्हणजे सफल होऊन संस्थित होतें, असा सिद्धांत प्रतिपादिला आहे. अशा प्रकारे कर्ममात्राला आणि विकर्ममात्राला अकर्मात परिणत करणारा तो परमात्मा संस्थान होय.

३८७. स्थानद
'मागील संस्थान पदानें परमात्मा हा सर्व संसाराला कुंठित करतो म्हणजे आपल्या ठाई कशालाच वाव देत नाही म्हटले तर स्थानद हे पद तद्विरुद्ध अर्थाने तो सर्वाला म्हणजे कशाला हि स्थान देणारा आहे, वाव देणारा आहे, असे म्हणत आहे. मंद अंधारांत एक दोरी पडली आहे. ती दिसते आहे. पण स्वच्छ दिसत नाही. त्यामुळे कोणाला तो आर (सर्प) भासतो, कोणाला तो हार. वस्तुतः दोरीच्या ठाई ना हार आहे, ना आर. म्हणजे परमार्थतः दोरी हाराला वा आराला, अर्थात् स्वेतर कशालाच, वाव देत नाही, आणि तरी ती अन्यथाज्ञानाला, अर्थात् हाराला नि आराला, आधारभूत झालेली आहे. म्हणजे ती वाटेल त्या आभासाला वाव देत आहे. आभास म्हणणे हे परमार्थदृष्ट्या झालें. पण व्यवहारतः तर तिथे पाहणाराला सर्पच दिसतो आहे आणि त्यामुळे भयाने त्याची प्रत्यक्ष गाळण उडत आहे, अथवा हाराच्या प्रत्यक्ष दर्शनाने लोभ सुटत आहे आणि त्यामुळे हि तो तळमळतो आहे. उभयत: तो अधीर होत आहे. म्हणजे हा परमार्थतः आभास असला तरी व्यवहारतः तें सत्यच होय, म्हणून परमात्मा हा सर्वांना स्थान देतो, कशालाच तिथे मतजाव नाहीं असें म्हणावयाचे. मतजाव जर तिथे कुणाला असेल तर तो फक्त मतजावालाच. तो परमात्मा निषेधाचा निषेध अशेष आहे. म्हणून त्याला स्थानद म्हटले ते ठीकच म्हटलें आहे. सत्याला तिथे स्थान आहेच. कारण स्वत:च तो सद्रूप आहे. पण जें असत् आहे त्याला हि तिथे स्थान आहे. कारण तो सर्वाधार आहे. असत् निराधार राहूं शकत नाही. सापाच्या आभासाला हि दोरीचा आधार हवाच, सत् स्वाधार आहे, तर असत् सदाधार आहे, निराधार मुळी कांहीं अतूंच शकत नाही. म्हणून परमात्मा हा स्थानद होय. तिथे सत्, असत्, सदसत् आणि नसत् नासत् सर्वांना स्थान आहे.

३८८. ध्रुव
ध्रुव म्हणजे अविचल, निष्कंप, सुस्थिर, जग सर्व भ्रमत आहे. त्यांत स्थिर असें कांहींच दिसत नाही.

सर्व जंगम आहे, स्थावर काहीच नाही. सर्व स्थावरांत म्हणजे स्थिर भक्कम अशा पर्वतांत हिमालय हा सर्वांत मोठा स्थावर म्हटला आहे. पण खरोखर तो काय स्थिर आहे ? त्याचे कडे कोसळत आहेत, नद्या त्याला सारख्या कापीत आहेत. तो प्रतिक्षणीं घटत बढत आहे. आज आम्हांला तो जिथे दिसतो तिथे तो एके काळी नव्हता आणि कालांतराने तो तिथून नाहीसा होणार हे निश्चित. अशा या क्षणाक्षणाने व कणाकणाने बदलणाऱ्या ढिगाऱ्याला स्थावर कसें म्हणावयाचें ? जें जें संहत आहे, तें तें विहत होणार; संघटित आहे, तें तें विघटित होणार, त्रिगुण आणि पंचभूते स्वतः संहत आहेत, मग त्यांचे कार्य हे जग तसें आहे त्यांत काय नवल ? आणि कारणाबरोबर तें कार्य हि विघटित व विहत झाल्यास नवल काय ? सारांश, ' यद् दृष्टं तन् नष्टम् '. हे सारे जग नश्वर आहे, अनित्य आहे, अध्रुव आहे. त्याला मुळी स्थितिच नाही, म्हणूनच तर त्याला जगत् म्हणजे सतत गतिशील, नित्य परिवर्तनशील म्हणावयाचे. जाग्रदवस्थेतील जग स्वप्नावस्थेत नाहीसे होते आणि सुषुप्तावस्थेत ही जाग्रत्स्वप्न दोन्ही जगें नाहींशी होतात. ती सुषुप्तावस्थाहि स्वप्नजागृतींत नाहींशी होते. अशा या अस्थिरतेच्या महासागराच्या तळाशी जो शान्ताकार पहुडलेला आहे तो तुरीय ध्रुव होय. " जगें येवोत जावोत तो अभंग जसा तसा " दोरीवर हाराचे वा आराचे आभास होतात, जातात, दोरी आपली जशीची तशी राहते. तिला त्या आभासांच्या उद्भव-स्थिति-लोपांचा पत्ता हि असत नाही. त्याप्रमाणे संसाराच्या उद्भवस्थितिलयांचा ज्याला स्पर्श हि होत नाहीं तें में कूटस्थ परमात्मतत्त्व तेंच म्हणावयाचे ध्रुव.

३८९. परद्धि
परा ऋद्धि म्हणजे परद्धि होय. वृक्ष बीजांतून अंकुरतो. त्याला मूलोपमूलें फुटतात, स्कंध शाखा प्रशाखा पत्र पुष्प फळ यांनी तो समृद्ध होतो. त्याची मुळे शेषाच्या टाळूला व शेंडा आकाशाला भेदून जातो. ही सगळी त्याची महर्द्धि वा समृद्धि होय. पण तिला परद्धि म्हणतां यावयाचे नाही. कारण ह्या बाह्य ऋद्धीचा हास होतो व लोप हि होतो. जिचा कधीं हास वा लोप होऊ शकत नाहीं तीच अव्यय अलय बीजभूत पराऋद्धि म्हणावयाची. अशी परा ऋद्धि म्हणजे या विश्वाचे आदिकारण ब्रह्म होय, परब्रह्म होय, विश्वाचा आकार आला गेला तरी तें कायमच राहते. तें विश्वाकाराने वाढत नाही किंवा त्याच्या लोपाने घटत नाही. ती त्याची अन्यनिरपेक्ष स्वायत्त ऋद्धि सदैव पूर्णच असते. म्हणून ती परा ऋद्धि म्हणावयाची. एखादा राजा असतो. त्याला सर्व सुखें असतात, पण संतान नसते. त्यामुळे त्याची समस्त साम्राज्यलक्ष्मी त्याला तुच्छ भासते. कारण तिला पुढे वारस नाहीं. तात्पर्य काय की लक्ष्मीहून लक्ष्मीचा स्वामी हा श्रेष्ठ होय. आणि खरोखर तीच परर्द्धि म्हणावयाची. ज्या संपत्तिजाताला आपण ऋद्धि म्हणतों ती सर्व बाह्य आहे. आत्मभोग्य अनात्म आहे. ती स्वेच्छ्या अंगीकरणारा वा तिचा स्वेच्छ्या त्याग करणारा जो स्वतंत्र अन्तरात्मा तोच खरी ऋद्धि होय. आणि त्यालाच परद्धि म्हणावयाचे. ही ऋद्धि कोणी काढून घेऊ शकत नाही. कारण, ती आमचें निजस्व आहे. आणि जें निजस्व तीच परर्द्धि. याच परर्द्धीला लक्षून ज्ञानदेव म्हणतात:

अमोलिक रल सांपडलें तुज ।
कां रे ब्रह्मबीज नोळखसी । .
न कळे न मिळे न भिये चोरा ।
ते वस्तु चतुरा सेविजेसु ॥

३९०. परमस्पष्ट
ज्याचे दर्शन स्वच्छ होतें त्याला परमस्पष्ट म्हणावयाचे, आणि स्वच्छ दर्शन कुणाचें होतें ? तर जी वस्तु प्रत्यक्ष दिसते तिचें. डोळ्यांसमोर घड्याळ धरले तर त्याचे आंकडे स्पष्ट दिसतात. पण घड्याळाचा काच जर मलिन असला वा रंगीत असला तर ते आंकडे तितकेसे स्पष्ट दिसत नाहीत. कारण आंकडे प्रत्यक्ष दिसत नाहीत, मलिन काचाचा अंतराय होतो. काचाचा वा प्लास्टिकचा अंतराय पारदर्शक वा अपारदर्शक आहे, पण इतर अंतराय आल्यास ते आकडे मुळीच दिसणार नाहीत. कारण ते अन्तराय अपारदर्शक असतील. तात्पर्य अंतरायामुळे स्पष्ट दर्शन होत नाही. जगांतील सर्व विषयांचें (म्हणजे पंच विषयांचे) ज्ञान आपल्या इंद्रियांच्या द्वारा म्हणजे मध्यस्थीनेच होते. हीं इन्द्रियें शाबूत असली तर ज्ञान स्पष्ट होते. ती अधू असली तर उपकरणांच्या सहाय्याने तें ज्ञान होऊ शकते. परंतु तें अस्पष्ट न म्हटले तरी आस्पष्टच म्हणावे लागेल. याचे कारण करण आणि उपकरण यांचा अंतराय आणि दोषास्पद अंतराय होय. परंतु जे ज्ञान मुळी विषयेंद्रियसंनिकर्ष-जनित नाहींच त्याला काय म्हणावयाचें ? त्याला विषयेंद्रियसंनिकर्षजनित ज्ञानाप्रमाणे केवळ स्पष्ट म्हणणे पुरेसे होणार नाही. म्हणून त्या अतींद्रिय ज्ञानाला परमस्पष्ट म्हटले आहे. विषयज्ञान हे शेय-ज्ञातृ-ज्ञानक्रिया अशा भेदानें होत असतें. आत्मज्ञानांत तसा भेद नाहीं आणि क्रिया नाही. जिथे भेद व क्रिया संभवते तिथे स्थलकालात्मक सांतरायता ठेवलेलीच असणार. त्यामुळे ते किती हि स्पष्ट म्हटले तरी निरन्तराय व निष्क्रिय ज्ञानासारखें स्पष्ट असू शकणार नाही. म्हणून आत्मज्ञान म्हणजे आत्मतत्त्व हे परमस्पष्ट म्हणावयाचे. परमः स्पष्टः अशी पदें हि इथें संभवतात. तशी कल्पिल्यास परम म्हणजे परा मा यस्य सः परम: अर्थात् ज्याची मा म्हणजे लक्ष्मी शोभा परा म्हणजे अलौकिक आहे, तो परम अथवा तद्वाच्यत्वात् परम: तत्पदवाच्य म्हणून परम म्हणावयाचा आणि स्पष्ट म्हणजे प्रत्येकाच्या हृदयांत संविद्रुपाने अहमिति संस्फुरणारा स्वत:प्रमाण म्हणून स्पष्ट म्हणावयाचा.

३९१. तुष्ट
" सर्वं परवशं दुःखं सर्वं आत्मवशं सुखम् " अशी आहे सुखदुःखाची व्याख्या. परमात्मा हा कोणत्याहि कारणासाठी पराधीन नसल्यामुळे आणि सर्वस्वीं स्वायत्त असल्यामुळे तो तुष्ट म्हणजे 'आत्मन्येव आत्मना तुष्ट ’ आहे. जीवाला आपल्या सुखासाठी बाह्य जगावर अवलंबून रहावे लागते. म्हणजे त्याचे सुख पराधीन आहे. आणि पराधीनतेचेच दुसरें नांव दु:ख असल्यामुळे, तो उद्योग करतो सुखासाठी आणि त्याला मिळतें मात्र दु:ख, असा विपर्यास आणि उपहास होतो. परमात्मा हा सर्वस्वी स्वतन्त्र असल्यामुळे तो आत्मकाम, आप्तकाम, पूर्णकाम म्हटला जाईल. म्हणून तोच तुष्ट, आणि जे हे परमात्मस्वरूप ओळखतात ते आत्मधन द्विज संतोषवृत्ति म्हटले जातात. ते यदृच्छालाभसंतुष्ट होत. अनिष्ट-हानि आणि इष्टलाभ झाला म्हणजे जीवाला तुष्टि होत असते. परंतु शरीर आहे तोवर इष्टानिष्टोपपत्ति होतच रहाते. म्हणून संतोष ही विदेह अवधूतांची वृत्ति म्हणावयाची, देहाभिमान्यांना तिची प्राप्ति असंभवच. जे केवळ आत्मनिष्ठ होऊन राहिले त्यांना ती साधावयाची. आत्मज्ञान आणि तितिक्षा हाच तिच्या प्राप्तीचा मार्ग, याचंच नांव अस्पर्शयोग होय. गीतेत आरंभीच तो आला आहे :

मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः ।
आगमापायिनोऽनित्यास् तांस् तितिक्षस्व भारत । गीता २-१४

यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।
समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ गीता २-१५


देहीचा अस्पर्शयोग म्हणजे तत्त्वज्ञानपूर्वक तितिक्षा आणि विदेहीचा अस्पर्शयोग म्हणजे देहयोगासंभवत्व होय, स्थितप्रज्ञ हा पहिल्याचे उदाहरण होय. परमात्मा हा दुसऱ्याचे. त्यालाच ब्रह्मनिर्वाण म्हणावयाचे. तिथेच तुष्टि, तिथेच संतुष्टि, अभाग्याचेहि भाग्य बनविणारा स्पर्श-मणि म्हणजे संतोष होय.

३९२. पुष्ट
तुष्टि आंतरिक भाव आहे, पुष्टि बाह्य. परंतु परमात्म्याबाबत अंतर्बाह्य एकच होऊन जातात. अर्थात् पुष्टि हि आंतरिकच म्हणावयाची. तिचा परिणाम बाह्यतः प्रकट होतो इतकेंच. परंतु परमात्म्याच्या बाबतींत तो हि बाह्यत: प्रकट होणारा नाही. कारण परमात्मा गुणातीत आहे. गुणांत चयापचय होत राहतो. म्हणून गुणात्म संसाराचे पुष्टत्वहि अपुष्टच म्हणावे लागते. परंतु परमात्मा हा गुणातीत असल्यामुळे तिथे गुणजन्य चयापचय संभवत नाही. आणि म्हणून तो सदैव चयापचयशून्य अर्थात् स्वरूपस्थितिपूर्ण असतो. हे जें परमात्म्याचे सदा एकरसत्व त्या गुणानेच तो पुष्ट म्हणावयाचा. ज्यांना बाहेरून पोषण मिळवावें लागते ते पराधीनपोषण अपुष्ट असू शकतात किंबहुना राहतातच. परंतु जो स्वरसपुष्ट आहे, त्याला केव्हां हि पोषणाभाव होऊ शकत नसल्यामुळे तो पुष्टच असावयाचा. परमात्मा हा तसा पुष्ट आहे. तो स्वयंपूर्ण असल्यामुळे पुष्ट आहे.

तुष्ट आणि पुष्ट ही जोडपदेंच समजावयाची. आंतरिक तोषाशिवाय नुसती बाहेरील पुष्टि हि टिकत नाही. नुसती आंतरिक तुष्टि तदनुकूल बाह्य पुष्टीशिवाय प्रकट होत नाही. अर्थात् आंतरिक तुष्टि बाह्य पुष्टीला हि जन्म देतेच देते. अशी परस्परविनिमित होणारी ही तत्त्वे आहेत. एकाची उणीव दुसऱ्याची हि उणीव सूचित करते. एकाची सत्ता दुसऱ्याची हि सत्ता प्रकट करते. अर्थात् दोन्ही परस्परपूरक आहेत. तथापि त्यांच्यात कार्यकारणभाव आहे. तुष्टि हे कारण आहे, पुष्टि कार्य. आणि म्हणूनच आधी तुष्ट पद आले आहे आणि मागाहून पुष्ट पद. पूर्णत्वाची ती गमके आहेत.

३९३. शुभेक्षण

तुष्ट पुष्ट शुभेक्षण हा क्रम साभिप्राय दिसतो. जो जीव असंतुष्ट आणि बुभुक्षित असतो तो जगाकडे शुभदृष्टीने पाहत नाही. तो आर्त जीव जगाला आणि जगदीश्वराला बोल लावतो. जगांत न्याय नाही, ईश्वर झोपला आहे, असे तो कटु उद्गार काढतो. हा वस्तुत: जगावर व जगदीश्वरावर आरोप असतो. तो आर्तप्रलाप असतो. उलट जो तुष्ट आणि पुष्ट असतो त्याचीच दृष्टि जगाकडे पाहण्याची शुभ असते, उदार असते. जग किती भलें आहे, परमात्मा किती दयाळु आहे, असे तो म्हणतो. सारांश, पुरुष आपल्या रंगाने जगाला रंगवीत असतो. परमात्मा हा सदैव तुष्ट आणि पुष्ट असल्यामुळे तो जगाकडे शुभेक्षण म्हणावयाचा, जीव मी मर्त्य आहे, दु:खी आहे अशी अशुभ भावना करतो, म्हणून त्याला जग तसेंच अशुभ प्रतीत होतें. परमात्मा मी सच्चिदानन्द आहे अशी शुभ भावना करतो आणि त्याला सारे जग तसेंच दिसतें. जग कसे आहे ते जगाला काही ठाऊक नाही. मी पाहीन तसें तें आहे. परमात्मा जगाकडे तत्त्वदृष्टीने पाहतो. त्याचा निर्णय गीतेच्या शब्दांत असा आहे:

नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस् त्वनयोस् तत्त्व-दर्शिभिः ॥ गीता २-१६


आत्मभिन्न जगांत कांहीं नाहींच आणि तें आत्मतत्त्व आहे सच्चिदानन्दस्वरूप. अशी परमात्म्याची दृष्टि असल्यामुळे तो शुभ-दृष्टि म्हणावयाचा. त्याच्या दृष्टीला अनात्म वस्तूचा मुळी स्पर्शच नाही.रज्जूसर्पाला मनुष्य पाहूं शकेल, पण स्वत: रज्जूच त्या रज्जूसर्पाला कशी पाहणार ? ती तर केवळ रज्जूलाच म्हणजे स्वत:लाच पाहणार, परमात्मा हा तसा स्वदृक् आहे. म्हणून शुभेक्षण. ' शुभं ईक्षते इति शुभेक्षणः ' असा कर्तरि ल्यूट घेऊन तत्पुरुष होऊ शकेल. अथवा 'शुभं ईक्षणं दर्शनं यस्य सः शुभेक्षणः' असा बहुव्रीहि हि होऊ शकेल. परमात्म्याचे दर्शन सर्व शुभ म्हणजे शुभंकर आहे. ते मोक्षार्थीला मोक्ष व भोगार्थीला भोग देतें. अभिलषित- चिन्तामणिच तें आहे.


रामो विरामो विरतो मार्गो नेयो नयोऽनयः ।
वीरः शक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः ॥४३॥


३९४. राम
हे गौण म्हणजे गुणवाचक नाम आहे, व्यक्तिवाचक नाही. म्हणून राम म्हणजे ज्याच्या ठाईं योगी रमतात तो परमात्मा होय. त्या परमात्म्याचा अवतार जो प्रभु रामचंद्र तो हि पर्यायाने रामच. त्याच्या ठाईं सर्व प्रजा रमली होती. प्रत्येक जीव त्याच्या ठाईं रमला आहे तो अन्तर्यामी परमात्मा राम होय. जो ज्याच्या ठाईं रमला आहे तो त्याचा राम होय आणि हा राम दुसरा तिसरा कोणी नसून ज्याचा त्याचा निजात्माच होय, म्हणून तो आत्मारामच इथे राम म्हटला आहे. योग्यांचा नि भोग्यांचा राम हाच, दोघेहि त्यांतच रमत असतात. दोघांनाहि त्याचे यथार्थ आकलन होतच नाही. अज्ञानी भोगी मी देहगेहावर पुत्रकलत्रावर प्रेम करीत आहे असे समजतो, वस्तुत: ते त्याचे सारे प्रेम आत्मप्रेम असतें. आत्मसंबंधामुळे त्याला तें प्रिय होत असते. 'आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति '. पण हें तो ओळखत नाहीं. ज्ञानी योगी हि इयत्तया त्याला जाणत नाहीं. तो विगलित-वेद्यान्तर होत्साता तल्लीन होत असतो, स्वलीन होत असतो.

'राजा प्रकृतिरंजनात्' जो आपल्या समस्त प्रजांचें रंजन करतो तो राजा. राजा शब्दाची अशी निरुक्ति आहे. असा राजा कोण आहे जो आपल्या एकूण एक प्रजाजनाचे रंजन करतो ? तो एकमात्र आत्मारामच होय. आणि म्हणून आम्ही जेव्हां 'राजा राम राम राम म्हणतो तेव्हां त्या आत्मारामाचे भजन करीत असतो, कोणा दशरथ-पुत्राचे नव्हे. दशरथपुत्रहि राम म्हटला गेला वा राजा म्हटला गेला तो हि त्या आत्मारामाचा अंशभूत म्हणून वा प्रतिनिधि म्हणूनच होय. म्हणून जगांत राम केवळ एकच आहे आणि राजाहि तो एक रामच आहे. तो आत्माराम सर्वांच्या हृदयांत रमला आहे आणि आपल्या रंजकतेने सर्वांना रमवीत आहे, भ्रमवीत आहे.

ईश्वरः सर्वभूतानां हृदेशेऽर्जुन तिष्ठति ।
भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ गीता १८- ६१


३९५. विराम
विष्णुसहस्रांत एककें द्विकें त्रिकं आली आहेत. इथे 'रामो विरामः' हे एक द्विक आहे. द्विक म्हणजे परस्परपूरक जोडी. परमात्मा नुसता राम नाही तर त्याच बरोबर तो विरामहि आहे आणि नुसता विराम नाहीं तर त्या सोबतच रामहि आहे. रमण-विरमण ही एकाच क्रियेची दोन रूपे आहेत. दोन गति आहेत त्या, चंद्रमा शुक्ल पक्षांत एकएका कलेनें उमलत जातो आणि तोच कृष्णपक्षांत एकएका कलेनें मिटत जातो. त्याचे हे उन्मीलन-निमीलन सतत चालूंच असते. त्याप्रमाणे सृष्टिरूपाने परमात्म्याचे रमणविरमण अखंड चालले आहे. कल्पारंभी तो रमूं लागतो. एकाचा अनेक होऊन ही सर्वाश्चर्यमय अनन्त सृष्टि रचतो. आणि कल्पान्तीं ती परत ऊर्णनाभाप्रमाणे गिळून घेतो, विरमतो. ' एकाकी न रमते ' एकटेपण बरे वाटत नाही, म्हणून तो अनेक होतो, विविध सृष्टिरूपाने नटून आपल्याशी खेळतो. पण खेळून खेळून दमला, कंटाळला म्हणजे तो खेळ टाकून स्वस्थ पहुडतो, विरमतो. ही सगळी त्याची लीला आहे, क्रीडा आहे. आनंदावांचून दुसरा कांहीं हेतु त्यांत नाही. आनंदासाठी रमतो, आनंदासाठी विरमतो. "आनंदाच्या डोही आनंदतरंग " सारखे उठत आणि निमत आहेत. ते उठले वा निमाले तरी आनंद हा अविकृत जसाचा तसा राहतो. कारण तो स्वभाव आहे. स्वभावाला औषध नाही. तिथे तुमचा हा प्रश्न की 'असें कां ?' चालत नाही. सूर्य का प्रकाशतो, वारा कां वाहतो, झरा का झुळझुळतो, गाय का पान्हावते, या सर्वांचे उत्तर एकच-स्वभाव. तसा परमात्म्याचा स्वभाव आहे रमणे-विरमणे तो रमत रमत विरमतो, विरमत विरमत रमतो.

३९६. विरज (विरत ?)
' रामो विरामो विरमों ' असा पाठ सुपाठ होईल. विरज म्हणजे विरजस्क. पण रज म्हणजे काय ? रजस् हा प्रकृतीच्या तीन गुणांपैकी एक होय. पण इथे आत्मा, प्रकृति, गुण इत्यादि सर्वच पदार्थांचा उलगडा करावा लागेल. प्रकृति ही प्रकृतिमान् आत्म्यापासून भिन्नाभिन्न आहे. ती अंगभूत म्हणून अभिन्न, पण बाह्य म्हणून भिन्न आहे. पाणी शांत, तरंगित आणि गोठलेलें अशा तीन अवस्थांत आढळते. पाण्याच्या प्रकृतीचे हे तीन गुण होत. पाणी आपल्या ह्या त्रिगुणात्मिका प्रकृतीपासून वियुक्त कधीच आढळावयाचे नाही. म्हणून तीच प्रकृति म्हणावयाची. हे तीन गुण ज्या अर्थी एकसमयावच्छेदें करून प्रकृतींत प्रकटत नाहीत, पण आलटून पालटून प्रकटतात, त्या अर्थी त्या तिहींहून प्रकृति भिन्न आणि त्यांची आधारभूमि म्हणावयाची. ही प्रकृति जड म्हणजे स्वानुभवाक्षम आहे. तिचा हा सारा गुणकर्म-खेळ जो अलिप्तपणे पाहतो तो आत्मा होय. पिण्डदृष्ट्या क्षेत्रक्षेत्रज्ञ आणि ब्रह्माण्डदृष्ट्या प्रकृतिपुरुष यालाच म्हणतात. परमात्मा वस्तुत: गुणातीत असता त्याला विरज म्हणण्यांत काय स्वारस्य ? त्यांत स्वारस्य हेंच की सत्त्वरजतम या त्रिगुणांत व्यवहारदृष्ट्या तारतम्य आहे. इष्टानिष्ट भाव आहे. तमापेक्षां रज आणि रजापेक्षां सत्त्व हे इष्ट म्हणावयाचे. पशु पक्षी तम प्रधान आहेत. रज:प्रधान मानवाला विरज हे परमात्मनाम महत्त्वाचे वाटेल. मानवाची साधना मुख्यतः रजोगुणावर विजय मिळविण्यांतच आहे. तृष्णा आणि आसक्ति ही आहेत रजोगुणाची लक्षणे. ती जर मानव जिंकू शकला तर तो रजोविजयीच झाला म्हणावयाचा. नित्यसत्त्वस्थ झाल्यावरच तो विरज व्हावयाचा.

३९७. मार्ग
जो मुक्कामावर पोंचवितो तो मार्ग म्हणजे नीति. जो मुक्काम तो नय. आणि जो नेला जातो तो नेय होय. इथें क्रमाने ' मार्गो नेयो नयः ' ही पदें याच अभिप्रायाने आली आहेत. हे एक त्रिक आहे. प्रस्थानबिंदु आणि संस्थान-बिंदु यांच्यावांचून मार्गाची कल्पना होऊ शकत नाही. म्हणून जीव, ज्ञान आणि ब्रह्म अथवा ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे त्रिक वा त्रिपुटी कल्पावी लागते. इथे 'नीतिर्नेयो नयोऽनयः" असा पाठ सुपाठ झाला असता. असो या. मार्गाचे वा नीतीचें स्वरूप काय ? ' ज्ञानात् एव मोक्षः ' असा वेदान्ताचा सिद्धांत असल्यामुळे ज्ञान हेच याचे स्वरूप आहे. अवान्तर कर्म उपासना ध्यान इत्यादि सारे ज्ञानसहकारी म्हणून मान्य, परन्तु त्यांची स्वतंत्र योग्यता नाही. चित्तशुद्धिद्वारा ज्ञानोत्पत्ति होण्याला त्यांची जेवढी उपयुक्तता तेवढीच त्यांची योग्यता, रत्नच मोलाचें खरें, पण त्यासाठी चिंधी बाळगावी लागते. रत्नामुळे ती चिंधी चिंधी राहत नाही. तीहि रत्नमोलाची होते. त्यासारखे आहे हे. पर्यायाने सर्व मार्ग मुक्कामाला पोंचवितात, पण ज्ञानमुखानेंच पोंचवितात. त्यामुळे ज्ञानच सरळ व प्रत्यक्ष मार्ग म्हणावयाचा. प्रत्यक्ष समुद्राला गंगाच मिळते, इतर तिच्या उपनद्या तिला मिळतात म्हणून समुद्राला पोचतात म्हणावयाचें. मार्गितव्य मुक्काम एकच आहे. त्याला पोचविणारा मार्गहि एकच आहे पण उपमार्ग अनेक असू शकतील. या उपमार्गालाहि गौरवाने मार्ग म्हटले जाते. गीतेत एवढ्याचसाठी कर्म, ध्यान, भक्ति यांनाहि ज्ञानाबरोबर योग म्हटले आहे. या ठळक उपमार्गाशिवाय अवांतरहि उपमार्ग वैवासुरसंपद्विभाग-योग, श्रद्धात्रय विभाग-योग गीतेने प्रतिपादिले आहेत. अध्याय १३-१५ क्षेत्रक्षेत्रज्ञविभाग-योग, गुणत्रयविभाग-योग आणि पुरुषोत्तम-योग उर्फ पुरुषत्रय-विभाग-योग हा तर । प्रत्यक्षच ज्ञान-योग आहे. १८ वा अध्याय उपसंहाराचा असला तरी तोहि वस्तुतः ज्ञान-कर्म-सुखादि-त्रिविध विभाग-योगच आहे. सारांश १३-१८ ही षडध्यायी विभाग-योगात्मकच आहे. आणि विभाग म्हणजे ज्ञान-प्रक्रियाच आहे. या विभागरूप ज्ञान-योगाला शेवटी स्थान देऊन गीतेने त्याचे शिरोमणित्वच सूचित केले आहे. त्यालाच शास्त्रहि म्हटले आहे. असा हा शास्त्रच म्हटलेला मार्ग म्हणजे ज्ञानमार्ग होय. आणि तोच एक मार्ग ह्या पदवीस पात्र आहे.

३९८. नेय
नेय म्हणजे मार्गाने न्यावयाचा मार्गस्थ, जीव हा नेय आहे. कारण तो आपल्याला अपूर्ण समजत आहे आणि अपूर्ण म्हणून पूर्णाला गांठण्यासाठी धडपडत आहे. त्याची नि:शेष धडपड संपली की तो पूर्णाला पोंचला म्हणून समजावें. हे सारें जगत् म्हणजे धडपडणारे आहे, गतिशील आहे. कारण तें अपूर्ण आहे. पूर्ण एक परमात्मा आहे आणि म्हणून त्याला पोचण्याची साऱ्या जगाची धडपड चालली आहे आणि त्याला पोचेपर्यंत ती अशीच चालावयाची आहे. नदी समुद्रांत मिळेपर्यंत ती वाहतच राहणार. समुद्रांत प्रवाह नाहीं, एकार्णवांत प्रवाह नाही.

पण परमात्मा जर पूर्ण आहे तर त्याच्यापासून झालेले हे जग अपूर्ण कसे ? तेंहि पूर्णच. त्या पूर्ण परमात्म्याचा जो उद्रेक तो म्हणजे हे जग होय. ती पूर्ण परमात्म्याची परिपूर्णता आहे. पर्वतीय भूमि वा जलाशयें जेव्हां कांठोकांठ तुडुंब भरून जातात तेव्हांच ती पाझरांच्या व झऱ्यांच्या रूपाने वाहूं लागतात. ही अपूर्णता नसून पूर्णतेचा उद्रेक होय. त्याप्रमाणे हे जग हि परमात्म्याच्या पूर्णतेचा उद्रेक होय, परिवाह होय. बीजांत कोंडलेली बैजिक शक्ति जेव्हां बीजांत सामावून राहू शकत नाही तेव्हा तिला हातपाय फुटतात. तीच मूलें व दलें होत. तसे परमात्मगत अनिवार पूर्णतेला फुटलेले हातपाय म्हणजे हे जग होय, आणि हातपाय स्वस्थ बसण्यासाठी नाहींत. ते कार्य करीत राहतात, खटपट करीत असतात, त्यांची ती खटपट जेव्हां त्यांना स्वानंद लाभतो तेव्हांच विश्रान्त होते. अशा प्रकारें पूर्णतेतून पूर्णतेचा उद्रेक आणि उद्रेकांतून परत परिपूर्णतेचा मागोवा असा हा पूर्णाचा खेळ चालला आहे.

३९९. नय
" नयति इति नय: नेता । " जो नेतो तो नय म्हणजे नेता होय. माणूस बैलाला घराकडे वा शेताकडे घेऊन जातो तेव्हां माणूस हा बैलाचा नेता होतो. परंतु इथें नय म्हणजे तसला नेता नाही. तर मुक्काम वाटसराला चालायची प्रेरणा देऊन चालवीत असतो, आपल्याकडे नेत असतो, तसला तो नेता आहे. मार्गावरून मनुष्य जात असतो, त्याचे पाय चालत असतात, पण त्या पायांना चालना गन्तव्य स्थान देत असते. गन्तव्य नसेल तर मार्गहि सांपडणार नाहीं आणि पायांना चालनाहि मिळणार नाही. गन्तव्याच्या अभावी मार्ग-अमार्ग आणि शक्ति-अशक्ति होऊन बसते. असे पाहिले म्हणजे मार्गितव्याची सत्ताच मार्गाला आणि मार्गस्थाला जन्म देत असते, जीवन देत असते, कृतार्थ करीत असते असे दिसून येईल. सर्व पाणी समुद्राला मिळण्यासाठी धडपडत असतें. तेंच आपला मार्ग शोधते आणि तयार करीत जाते. त्याचा मार्ग कोणी आधी आंखून दिलेला वा तयार करून ठेवलेला नाही. पण हे सर्व तो समुद्रच करवून घेत असतो. म्हणून सर्व पाण्याचा तो नेता होय, त्याप्रमाणे सर्वांचे गन्तव्य असलेला तो परमात्मा सर्वांना आपल्याकडे नेत आहे. चराचर त्याच्याकडे खेंचलें जात आहे. सर्वांचा ओढा त्याच्याच कडे आहे. जीवांना भले हे न कळो, न सांगता येवो, परंतु त्या सर्वांची गति तिकडेच आहे. ज्ञानी तिकडेच चालला आहे. अज्ञानीहि तिकडेच ढकलला जात आहे. सर्वांची परिसमाप्ति त्यांतच व्हावयाची आहे. तो नय आहे आणि त्याच्या नीतींतुन कोणीहि वगळला जावयाचा नाही. त्याला सर्वच नेय आहेत.

४००. अनय (अ-नय, अन्-अय)
'न विद्यते नय: अस्य इति अनय: । ' ज्याला कोणी नय म्हणजे नेता नाहीं तो अनय होय. परमात्माच सर्वांचा नेता, त्याला दुसरा कोणी नेता नाही म्हणून तो अनय म्हणावयाचा, विनायक म्हणावयाचा, जो विशेष नायक तो विनायक, तसा जो विगत नायक तो हि विनायक, अनय हा असा विनायक आहे. ' न नय: इति अनय: । ' जो नय म्हणजे नेता नव्हे तो अनय, अनेता, परमात्माच सर्वरूप असल्यामुळे त्याच्या ठाई नेय आणि नेता असा भेद करतां येत नाही. “तत्र को नेयः को नेता एकत्वं अनुपश्यतः ?”

नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः ।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥ गीता ५-१५

न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः ।
न कर्मफल-संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥ गीता ५.१६


बऱ्या-वाईट कर्मांची परमात्मा प्रेरणा देत नाहीं वा त्यांची बरी वाईट फळेहि तो देत नाही. ती स्वभावानुसार होत असतात. ह्यामुळेहि परमात्मा हा अनय म्हणजे कुणाला कुठल्या कर्माला वा कर्मफळाला नेणारा म्हणता येत नाही.

वरील विवेचन ' न नय: अ-नयः ' अशा तत्पुरुष वा बहुव्रीहि पदाचे झाले. परंतु सदर पद न अय: अनयः' असेहि कल्पिणे शक्य आहे. अय: म्हणजे मार्ग, गति. ती ज्याच्या ठाईं संभवत नाही तो अनए:. मागील नीति (मार्ग) नेय नय पदानी अयन सुचविलें आहे, गति सूचित केली आहे. इथे तिची असभावना सुचविली आहे. परमात्मा अगम्य आहे. तुम्ही त्याच्यांत प्रवेश करू शकत नाही कारण प्रवेश करायचा म्हणजे त्याला आत्म-भिन्न कल्पायचे आणि ते तर असंभवनीय आहे. कारण तो परमात्मा स्वत:च सर्वात्मभूत आहे. आपणच आपल्या ठाईं कसे प्रविष्ट व्हायचे ? आपल्याच डोक्यावर आपण उडी मारून कसे उभे रहायचे ? तें अशक्य म्हणून परमात्मा हा अनय म्हणावयाचा, अगम्य म्हणावयाचा.

४०१. वीर
वीर पद सहस्रांत तीनदा आले आहे. इथें तें आरंभीच आलेलें आहे, तेव्हां स्वतंत्रपणेच विचार केला पाहिजे. शूर वीर पराक्रमी अशी त्रिपदी प्रसिद्ध आहे. अर्थात् तिन्ही मिळून एक पूर्ण विचार होतो. शूर म्हणजे निर्भय, कसल्याही बिकट प्रसंगानें न घाबरणारा. वीर म्हणजे अशा प्रसंगानें स्फूर्ति चढणारा, उत्साही, जिगीषु आणि पराक्रमी म्हणजे आलेल्या संकटावर तुटून पडून त्याचा नि:पात करणारा, 'देहं वा पातयामि कार्यं वा साधयामि' अशा निर्धाराने झुंजणारा आणि विजयी होणारा. थोडक्यांत निर्भय विजिगीषु समितिंजय म्हणजेच शूर, वीर, पराक्रमी. मर्दपणाची एकापेक्षा एक चढती पायरी आहे ही. (म्हणून त्यांची अक्षरेंहि चढती आहेत-तीन, चार, पांच) उलट भ्याड, पुचाट, पळपुटा ही नामर्दीची चढती पायरी होय. शौर्यवीर्य हे आंतरिक भाव होत. पराक्रम त्यांचा दृश्य परिणाम होय. जीवन हेच रणांगण आहे. त्यांत आपले कर्तव्य निर्भयपणे, उत्साहाने आणि देहाची तमा न बाळगतां पार पाडणे हाच शौर्य-वीर्य-पराक्रम होय. गीतेचा हाच संदेश आहे:

क्लैब्यं मा स्म गम: पार्थ नैतत् त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदय-दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥

निर्वीर्य तूं नको होऊं न शोभे हे मुळीं तुज ।
भिकार दुबळी वृत्ति सोडुनी ऊठ तूं कसा ॥

परमात्मा वीर आहे. तो आपलें सृष्टिकर्म आणि धर्मसंस्थापनेचे कर्तव्य सोत्साह पार पाडीत आहे. त्याचे वीर्य, त्याचा मानसिक उत्साह आणि उद्यम या सर्वतोन्तरूप विश्वरचनेवरून प्रकटच आहे. अधर्मावर विजय मिळविण्याचा सत्याचा निर्धार आणि उत्साह कधी कमी झाला आहे का ? म्हणून परमात्मा हा एक वीर होय.

४०२. शक्तिमतां श्रेष्ठ
वीर पदानंतर लगेच 'शक्तिमतां श्रेष्ठ' हे पद आले आहे. तें पराक्रमी या अर्थाचेंच समजावयाचे. वीर्य हा मूलतः मानसिक वा आंतरिक भाव आहे. ज्याच्या ठाईं मनोबल नाहीं तो फार वेळ टिकाव धरूं शकत नाही, मग त्याचे शारीरिक बळ किती का असेना ? पण नुसतें मनोबळ पुरेसें नाही. त्याबरोबर शारीरिक बळ हि पाहिजे. तुम्हांला लोककल्याणाची खूप हौस आहे, अपार उत्साह आहे, परंतु तुमचे शरीर जर पाप्याचें पितर असेल, शतजर्जर असेल तर तुमच्या हातून काय होऊ शकेल ? म्हणून दोन्ही बळें पाहिजेत, सत्त्व हि पाहिजे आणि शक्ति हि पाहिजे. दोन्ही मिळून रीइनफोर्सड् काँक्रीट तयार होतें, जें कार्याचा केवढाहि मोठा भार सहज पेलूं शकतें. गांधीजींजवळ मनोबळ व शरीरबळ दोन्ही होती म्हणून ते स्वराज्याची चळवळ सुदीर्घ काळ चालवू व भगवत्-कृपेने यशस्वी करू शकले. ग्रामस्वराज्याच्या चळवळीला हि तेंच लागू आहे. पुरेसें मनोबळ म्हणजे सत्त्व वा वीर्य नसते आणि आवश्यक शारीरिक काटकपणा नसता तर काय तेरा वर्षे अखंड पदयात्रा आणि ग्रामराज्याची चळवळ विनोबांना करतां आली असती ? हे जें भगवद्‌भक्तांचे बळ, त्याच्या अनन्तपट बळ भगवंताचे आहे. म्हणून तो 'शक्तिमतां श्रेष्ठ', सर्व शक्तिमंतांत वरचढ म्हटला आहे. त्याच्या शक्तिमत्तेचे निदर्शन म्हणजे ही विश्वरचना होय. तिचे आकलन सुद्धां मानवबुद्धीला होऊ शकत नाही. मग तिच्याशी झुंज तो काय देणार ? तो जितकें तिचें आकलन करतो, तितका तो नम्र होतो. आत्यंतिक भक्तीनेंच त्याच्या आत्यंतिक शक्तीचे दर्शन व्हायचे.

४०३. धर्म
धर्म पदाची व्याख्या "धारणात् धर्मः" अशी करतात. मग ज्याने ह्या सबंध विश्वाला धारण केलें आहे तो परमात्मा धर्म कां न म्हटला जावा ? जीव जगत् आणि जगदीश्वर ही त्रयी प्रसिद्ध आहे. पैकी जीव आणि जगत् आम्ही पाहतो आहों. चेतनाचेतन असा त्यांचा विभाग होईल. जीव चेतन, जगत् अचेतन म्हणता येईल. अचेतन स्वतःला जाणत नाहीं तें चेतनाचेच भोग्य, चेतनाचेच आश्रित. आंधळ्याला डोळसच मार्गदर्शन करू शकतो, त्याचा सांभाळ करूं शकतो. म्हणून शेवटी जगाचा आधार चेतनच म्हणावें लागतें. नखलोमादींचा निर्माता आणि स्वामी चेतनच होऊं शकतो, केव्हां हि अचेतन नव्हे. अग्नीपासून ठिणग्या तसे परमात्म-तेजापासून जीवरूप चेतन स्फुलिंग हि निर्माण होतात असें म्हणावयाचे. अग्नीपासून अग्नि निर्माण होतो, अनग्नीपासून नव्हे. सारांश, हे सर्व चेतनाचेतन विश्व चेतन-मूलक आहे, चेतन-प्रधान आहे, किंबहुना चेतनमयच आहे. म्हणून चिन्मात्रमूर्ति परमात्माच धर्म होय, कांकी या विश्वाचा धारक तोच असू शकतो, दुसरा कोणी हि नव्हे. जडवादी मानतात की ज्याला तुम्ही चेतन म्हणतां तो हि जडाचाच एक विकास आहे आणि म्हणून हे सारे विश्व जड आहे. असे मानलें म्हणजे मग "सर्वं दुःखम् । सर्वं अनित्यम्" ची सिद्धि झाली. कारण, आनंद हा चेतनाचा धर्म आहे आणि चेतन हे ज्ञप्तिस्वरूप सर्व-विलक्षण आहे. तें घटित-विघटित होणार्‍या नश्वर संसाराहून विलक्षण असल्यामुळे तें नित्य आहे. अर्थात् तें एकमात्र सत्पद-वाच्य होय. म्हणून तें जें सत् चित् आनंद-पदवाच्य तेंच धर्म होय. त्यानेंच हे सर्व विश्व धारण केलेले आहे. त्याची सत्ता न स्वीकारणे म्हणजे 'मी नाहीं' म्हणण्यासारखें आहे. तो 'वदतो व्याघात' आहे. बौद्धांचा निर्बुद्धवाद तो हाच.

४०४. धर्मविदुत्तम (धर्मविद् उत्तम)
जगात अनेक धर्म म्हणजे कल्याणाचे मार्ग आहेत. त्यांच्यापैकी एक हि ज्याने जाणला तो धर्मविद् होय.

एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।
कर्मजान् विद्धि तान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥

त्या सर्वांचे सामान्य लक्षण गीतेच्या वरील श्लोकांत सांगितले आहे. आणि तें हें की तो प्रत्येक धर्म म्हणजे यज्ञ, ब्रह्माला उद्देशून केलेला असतो आणि क्रियारूप असतो. काय, वाक् आणि चित्त हे तीन कर्मपथ आहेत. आणि या तिन्ही पथांनी ईश्वराला जोडणारे संभवनीय सर्व योग वेदांत म्हणजे शास्त्रांत सांगून ठेवले आहेत. आतां या असंख्य धर्ममार्गात कोणता मार्ग उत्तम म्हणायचा ? मुक्कामाला पोचवणारा प्रत्येकच मार्ग आहे आणि ज्याला तो स्वभावतः प्राप्त झाला आहे, तोच त्याला उत्तम, जलचराला जलमार्ग उत्तम, भूचराला भूमार्ग उत्तम आणि नभश्चराला आकाशमार्ग उत्तम. जो जिथे उभा आहे तिथून त्याला मुक्कामाला नेणारा जो मार्ग तोच उत्तम म्हणावयाचा. आणि धर्मविदुत्तम म्हणजे अशा धर्माच्या वेत्त्यांत श्रेष्ठ कोण ? जो चालू क्षणी धर्माचरण करतो तो. पण हा तर धर्मकर्ता झाला, वेत्ता नव्हे ! नाहीं, जो कर्ता तोच वेत्ता म्हणावयाचा. ज्ञान आणि कर्म वेगळे नाही. साखर गोड की कडू हे जाणणे म्हणजेच चाखणे आणि चाखणे म्हणजेच जाणणे. तद्वत्. जो अमृत सोडून विष पितो तो अमृतवेत्ता कसा म्हणावयाचा ? जो अमृत पितो तोच अमृतवेत्ता म्हणावयाचा. तद्वत् जो अधर्म वर्जून धर्मच आचरितो तोच धर्मविद् म्हणावयाचा. आणि जो तो धर्म चालू क्षणीं आचरतो तो धर्मविदुत्तम म्हणावयाचा. धर्म सावकाश आचरावयाचा नसतो. तो चालू क्षणीं आचरावयाचा असतो. कारण मृत्यु केव्हां गांठील त्याचा नेम नाही. गेला क्षण हातांतून निसटला, पुढचा हाती लागेल न लागेल. तेव्हां चालू क्षणच आपल्या हातचा आहे. हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागण्यांत शहाणपणा नाही.

यो ध्रुवाणि परित्यज्य अध्रुवं परिषेवते ।
ध्रुवाणि तस्य नश्यन्ति अध्रुवं नष्टमेव च ॥

दोन वस्तु ध्रुव आहेत. एक धर्म आणि दुसरी चालू क्षण, त्यांचा जो योग साधतो तोच धर्मविदुत्तम. ध्येयभूत परमात्मा हा सदैव स्वरूपस्थित असल्यामुळे तो सहजच धर्मविदुत्तम झाला.


वैकुंठः पुरुषं प्राणः प्राणदः प्रणवः पृथुः ।
हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ॥४४॥


४०५. वैकुण्ठ
विकुण्ठ पद दोन प्रकारें लावता येईल (१) 'विगता कुण्ठा यस्य तत् विकुण्ठं पदम् । ' (२) 'विशेषेण कुण्ठा यस्मिन् तत् विकुण्ठं पदम् । ' ज्याला कुण्ठाच नाहीं तें विकुण्ठ अथवा ज्यांत भलतीच कुण्ठा आहे तें विकुण्ठ. या विकुण्ठ पदाचा जो भाव तो वैकुण्ठ अथवा "विकुण्ठ एव वैकुण्ठः" असेंहि म्हणता येईल.

परमात्मा सर्वतन्त्र-स्वतन्त्र आहे. त्याला कुठेच अटकाव नाहीं, कुण्ठा नाही. कारण अटकाव करायला दुसरें मुळी कांहीं नाहींच. कुण्ठा म्हणजे मर्यादा आडकाठी, दुसरें कांहीं असेल तरच होणार ना ? जिथे अद्वैत आहे, किंबहुना ऐक्य आहे, तिथे कोण कोणाला मर्यादा घालणार ? म्हणून परमात्मा हा वैकुण्ठ होय.

परमात्मा ज्याअर्थी वैकुण्ठ आहे, परिपूर्ण मुक्त आहे. त्याअर्थी त्याच्या ठाईं बन्धाला, कोणत्याहि प्रकारच्या मर्यादेला मुळीं वाव नाही. सर्व गुण आणि गुणजन्य हा समस्त संसार कुण्ठास्वरूप आहे. तो सर्व विशिष्ट आहे आणि परमात्मा आहे निर्विशेष. त्यामुळे त्याच्या ठाईं त्याला मतजाव आहे, निरोध आहे, कुण्ठा आहे. गुण गुणाच्या ठाईं प्रवेश करतात, इंद्रिये आणि विषय एकमेकांत ये-जा करतात परंतु त्यांचा प्रवेश आत्मतत्त्वांत होऊ शकत नाही. कारण तें केव्हांहि विषयीभूत होऊ शकत नाही. ते स्वतःच विषयी आहे.

आकाश तत्त्व अत्यन्त सूक्ष्म आणि व्यापक आहे. त्यामुळे ते सर्वत्र आहे. पण त्यांत मात्र कशाचाहि प्रवेश होऊ शकत नाही म्हणून त्याला शून्य म्हणतात. आत्मतत्त्व हे तर त्याहून किती तरी सूक्ष्म आणि व्यापक. त्यांत आकाशतत्त्वाचा हि प्रवेश होऊ शकत नाही. कारण तें निर्गुण आहे. आणि म्हणून तें वैकुण्ठसंज्ञ होय. आकाश सगुण शब्दगुण.

४०६. पुरुष
'वैकुण्ठः पुरुषः प्राणः' हा क्रम जणूं निर्गुण सगुण साकार भाव सुचवीत आहे, अदेह विदेह आणि सदेह भाव सुचवीत आहे. परमात्मा, आत्मा, जीवात्मा त्याचीच दुसरी नामें. सशरीर तो जीवात्मा, शरीरमुक्त तो आत्मा अथवा मुक्तात्मा आणि शरीरसंभवसंपर्कविदूर अर्थात् केवलस्वरूप तो परमात्मा म्हणावयाचा. इथे पुरुष पद आत्मवाचक म्हणजे मुक्तात्म-वाचक अर्थात् अधियज्ञ समजावयाचे आहे. नामदेवाने आपल्या एका अभंगांत या तिहींचा उल्लेख केला आहे तो असाः जीव विठ्ठल, आत्मा विठ्ठल, परमात्मा विठ्ठल विठ्ठल.

एक विठ्ठलच जीव, आत्मा, परमात्मा झाला आहे. चित्सत्तेचाच हा सारा विलास आहे. चित्सत्तेचा उद्रेक म्हणजे हा सारा संसार-प्रवाह होय. कोणतीहि गति म्हटली म्हणजे ती आरोहावरोहात्मकच असावयाची. चिद्-विलासांतहि तसा आरोहावरोह आहे. ब्रह्माचा अध्यात्म कर्म अधिभूत हा अवरोह होय. अधिदैव अधियज्ञ आणि प्रयाणसाधना हा आरोह होय. गीतेच्या आठव्या अध्यायांत हा विषय संक्षेपाने आला आहे. अक्षर ब्रह्मापासून स्वभाव, स्वभावापासून विसर्ग आणि विसर्गाची जगत् व जीव अशी द्विरूप परिणति म्हणजे हा संसार होय. पुढे जीव उत्क्रान्त होऊन मानव झाला आणि यज्ञ करून साधना करून साधक बनला-योगी बनला. तोच शेवटी प्रयाण कालीन साधना करून देह आणि देहानु संसार यांतून परिमुक्त होऊन स्वरूपी युक्त झाला म्हणजे आरोह संपला आणि एक अवरोहारोह-चक्र पूर्ण झालें.

यथा नद्यः स्यन्दमानाः समुद्रे
गच्छन्त्यस्तं नामरूपे विहाय ।
तथा विद्वान् नामरूपाद् विमुक्तो
ब्रह्माक्षरं धाम निजं समेति ॥

आणि हाच पुरुष होय. पुरुष शब्दाच्या अनेक व्युत्पत्ति वा निरुक्ति आहेत. 'पुरु+सः=पुरुषः' ही माझी भर होय. 'इन्द्रो मायाभिः पुरुरूप ईयते' हे वेदवचन तिला अनुकूल आहे, आधार आहे. तो नाना रूपांनी नटला आहे म्हणून तो पुरुष, 'सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात्' या प्रसिद्ध पुरुष सूक्तांत सहस्रपदानें पुरुत्वच प्रकटलेलें आहे. म्हणून 'पुरुः सः पुरुषः' ही निरुक्ति यथास्थित होय.

४०७. प्राण
प्राणाचे चलनवलन हे जीवनाचे उप-लक्षण मानलें जाते. म्हणून जीवाला प्राणी आणि प्राण्याला जीव म्हटले जाते. अर्थात् देहधारी जीव तो प्राण म्हणावयाचा. वस्तुतः प्राण ही जीवनाची खूण आहे. प्रत्यक्ष जीव वेगळी वस्तु आहे. योगी प्राणनिरोध करून हृदयस्पंदन थांबवून राहू शकतो, ह्या वरून जीव व प्राण एक नव्हेत हे सहज समजण्यासारखें आहे. तथापि त्यांचे घनिष्ठ साहचर्य आहेच. योगी कांहीं काळ प्राणनिरोध करून भलें राहो, पण तो कायमचा तसा राहू शकत नाहींच, शिवाय निरोध म्हणजे अभाव नव्हेच. तें स्तंभन आहे. ज्ञातृतत्त्व आणि कर्तृत्व ही दोन्ही मिळून राहतात. ज्ञातृतत्त्व आधारभूत आणि कर्तृतत्त्व तदाश्रित असा बाह्यतः आम्ही विभाग करतों इतकेंच. ज्ञातृतत्त्व हे सदैव एकरूप राहतें. कर्तृतत्त्व कधीं उन्मीलित कधी निमीलित स्वभावानुसार होत राहते. आणि त्यालाच आम्ही जीवन मरण वा उत्पत्ति प्रलय म्हणत असतो. ज्ञातृतत्त्व म्हणजे पुरुष आणि कर्तृतत्त्व म्हणजे प्रकृति होय. ज्ञातृतत्त्वाचा प्रतिनिधि जीव म्हटला जातो. प्रकृतितत्त्वाचा प्रतिनिधि प्राण, पण इथे तर परमात्म्यालाच प्राण म्हणून संबोधिलें आहे. त्याचे कारण अखेर प्राणाचें सारें चलनवलन आत्मसत्तेच्याच अंकावर होत असते हे होय. तिच्यात कसलेहि परिवर्तन होत नाही. सर्व परिवर्तनांची ती साक्षी आहे. त्या सर्व परिवर्तनांच्या उद्‌भव-स्थिति-प्रलयांची ती आधार भूमि आहे. आणि ह्यामुळे एकच तत्त्व बोलायचे तर तें आत्मा म्हणावे लागेल. दोन तत्त्वे म्हणजे पुरुष आणि प्रकृति अथवा जीव आणि प्राण आणि अशा प्रकारे ह्या युक्तीने हवे तसे तत्त्वसंख्यान परस्पर-विरोध न येतां करणे शक्य होते. 'एक तत्त्व हरि, द्वैतनाम दुरीं । अद्वैत-कुसरी विरळा जाणे' असें ज्ञानदेवाने म्हटले आहे. ती अद्वैतकुसरीच सहस्र परोपरीने शिकवितें आहे. "जीव विठ्ठल आत्मा विठ्ठल परमात्मा विठ्ठल विठ्ठल" गाणारा नामदेव एकतत्त्वच गात आहे. द्वैत न मोडतां अद्वैताची ही कुसरी आहे.

४०८. प्राणद
प्राणद पद पूर्वी दोनदा येऊन गेलें आहे आणि पुढे एकदा यावयाचे आहे. असे हे पद सहस्रांत चारदा आले आहे. तीन ठिकाणीं तें प्राण पदाच्या जोडीने आले आहे, हे लक्षात घेतां तें समानार्थकच मानले पाहिजे. परमात्मा प्राणस्वरूप आहे, जीवरूप आहे, पण त्याच बरोबर तो त्या प्राणाचा स्वामीहि आहे. जो स्वामी, तोच दाता होऊ शकतो. ज्याच्या जवळ जें धन नाहीं तें तो देणार कसा ? याचा अर्थ असा झाला की तो परमात्मा प्राणस्वरूप दानहि आहे आणि त्याचा दाताहि आहे. जगांत अवांतर दानें देणारेहि फारसे नाहीत, पण प्राणदान देणारा तर परमेश्वरावांचून दुसरा कोणी नाहींच, म्हणून प्राण आणि प्राणद हीं पदें वारंवार आली आहेत. भक्त भगवंताचा हा अनन्य उपकार सदैव स्मरतात- "जेणें हा जीव दिला दान तयाचें करीन चिंतन' असें ते तुकारामाप्रमाणे गात असतात. सहस्रांतहि त्यामुळेच तें वारंवार आले आहे.

"प्राणान् यच्छति ददाति इति प्राणदः" अशा व्युत्पत्तीने प्राणद पदाचे विवरण वर आले आहे. पण "प्राणान् द्यति खण्डयति" अशीहि त्याची दुसरी व्युत्पत्ति होऊ शकेल. भगवान् कालरूपानें सर्वांचे प्राण तोडून नेत असतो. जो श्वास घेतो तो टाकावा लागतो. जो टाकला तो परत येत नाही. अशा प्रकारें कालरूप भगवान् प्राण्यांचे प्राण क्षणाक्षणाला तोडून घेत आहे. म्हणूनहि तो प्राणद म्हणावयाचा. शेवटी मरणसमयीं तो पंचहि प्राण तोडून नेतो म्हणूनहि तो प्राणद म्हणावयाचा.

दा म्हणजे तोडणे आणि देणे म्हणजे एकापासून घेऊन दुसऱ्याशी जोडणे होय. हे दोन अर्थ दिसतात परस्परविरुद्ध, पण वस्तुतः ती एकच क्रिया नाही का ? एखादी वस्तु द्यायची म्हणजे कोणापासून तरी ती घ्यावी, दूर करावी लागते. अपादानाशी संप्रदान जुडलें आहे. दोन्हीहि दानेच. दोन्ही मिळून परमात्मा प्राणद आहे. आरंभी प्राण देतो, शेवटी घेतो, म्हणजे प्राणद.

४०९. प्रणव
प्र नु स्तुतौ पासून प्रणव शब्द साधला आहे. अर्थात प्रणव म्हणजे प्रकृष्ट स्तव, सर्वोत्तम स्तुति. ॐकारालाच प्रणव म्हणतात. ॐ सर्वोत्तम स्तुति कसा काय झाला ? वेदच वस्तुतः परमात्म्याची सर्वोत्तम स्तुति होय. इतर काव्येतिहास आणि ग्रंथ लौकिक वाणी असल्यामुळे त्यांनी सुचविलेला अर्थ लौकिकच म्हणावयाचा. परंतु वेद अलौकिक आहेत, अपौरुषेय आहेत आणि म्हणून पुरुषबुद्धिकृत भ्रमाला त्यांत अवकाश नाही. ही एक श्रद्धा आहे. पुरुष कितीहि शुद्ध झाला तरी तो त्रिगुणाचा पुतळा. तिथे परिपूर्ण निर्दोषता संभवनीय नाही. म्हणून पौरुषेय उत्तम स्तुतिहि अपौरुषेय वाणीची बरोबरी करू शकणार नाही. पण अपौरुषेय वाणी वेद हे अपरिमित आहेत. ते कंठस्थ ठेवणे महाकठिण. त्यामुळे त्यांचा पूर्ण अर्थ ज्यांत आहे आणि जें कण्ठस्थ करायला, लक्षांत ठेवायला अत्यंत सोपे आहे असें जें पद असेल तेंच सर्वोत्तम म्हटले पाहिजे. ॐ हे तसें पद आहे. तें एकाक्षर आहे. तो एकाक्षरी वेद आहे. लोक सप्तश्लोकी गीता, चतुःश्लोकी भागवत, एकश्लोकी रामायण असे संक्षेप करतात. पण एकाक्षर वेद याहून अधिक संक्षेप तो कोणता असू शकेल ? इथे शंकर भगवान्हि सार-संक्षेपांत हरले आहेत. त्यांनी शतकोटि रामायणाचा सारसंक्षेप "राम" या द्वयाक्षरांत केला आहे. पण ऋषींनी तर एकाक्षरांत सर्व वेद गुंडाळले आहेत. आणि त्यामुळेच तो प्रणव म्हणजे सर्वोत्तम स्तुति म्हटला गेला. एक अमृतबिन्दुहि मर्त्याला अमर करू शकतो. त्यासाठी अमृतसिन्धूची आवश्यकता नाही. कारण अमृत सिन्धु त्याहून अधिक कांहींच करू शकत नाही. मग त्याच्या ऐसपैसपणाची मातब्बरी ती काय राहिली ? जें अनन्त वेद प्रतिपादितात तेंच एकाक्षर ॐकार सांगतो आणि परिपूर्ण सांगतो. म्हणून ॐकार ही सर्वोत्कृष्ट स्तुति होय, प्रणव होय. ॐकाराचें हें लाघवच त्याचे प्रकृष्टत्व होय, त्याचे गौरव होय.

४१०. पृथु
पृथु म्हणजे विस्तीर्ण. स्थूलाहून सूक्ष्म हें विस्तीर्ण असते, पण स्थूल सूक्ष्म दोन्ही व्यक्तच होत. या व्यक्ताहून अव्यक्त हे विस्तीर्ण होय. पण व्यक्त व अव्यक्त ही दोन्ही सगुणच होत. त्याहून निर्गुण हे विस्तीर्ण होय. पण सगुण निर्गुण ही दोन्ही भावच होत. त्याहून अभाव हा विस्तीर्ण होय. पण ज्याला या कोणत्याच एका कोटींत टाकतां येत नाहीं, तो जो भावाभाव-विलक्षण भाव तोच पृथु म्हणावयाचा. कारण तो अनिर्वचनीय आहे. त्याला कोणत्याहि पदानें विशिष्ट करणे शक्य नाहीं, मर्यादित करणे शक्य नाही. म्हणून जो असीम निर्मयाद तोच परमात्मा पृथु म्हणावयाचा, भूमा म्हणावयाचा. ज्याला विशेषण-विशिष्ट करता येतें तें केवढेंहि विशाल असले तरी ते मर्यादित झालें, अल्प झालें, परमात्मा हा तसा नाही. तो भूमा आहे. पृथु आहे. केवलस्वरूपी आहे.

परमात्मा हा भावाभाव सर्वच जिरवतो म्हणून जसा तो पृथु म्हटला तशी ही सर्वंसहाहि पृथ्वी म्हटली आहे. ती सर्वच प्राण्यांना सुष्टांना आणि दुष्टांना समानपणे वाहते आहे, साहते आहे. म्हणजेच ती पृथ्वी म्हणजे पृथु होय. तिच्याच सारखी जी आई तीहि आपल्या उच्चावच अपत्यांना समान पाहते आणि साहते म्हणून तीहि पृथा वा पृथु होय. "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी' असें जें रामचंद्राने म्हटलें तें त्यांच्या पृथुत्वामुळेच होय. ह्या पृथुत्वाच्या कसोटीनेच भगवान् विष्णु देवांत थोर ठरला आहे. त्याने मानापमान समान लेखले म्हणून तो पृथु म्हणजे मोठा, वरचढ ठरला. अमानित्वादि महनीय गुण अंगी असल्यामुळे वेनपुत्र पृथु हा अन्वर्थक झाला. तो भगवान् विष्णूचा अवतार मानला गेला. पृथा म्हणजे कुन्ती ही आपल्या आणि आपल्या सवतीच्या पुत्रांना समानभावाने वागवत होती. म्हणून तिचें पृथा हे नाम अन्वर्थक होय. अशा प्रकारें पृथु, पृथा आणि पृथ्वी हे तिन्ही प्रथित भाव त्या मूल ध्येय पृथु परमात्म्याचेच होत, जे आम्हांला चिन्त्य आणि अनुकरणीय आहेत.

४११. हिरण्यगर्भ
'हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत्" अशी श्रुति आहे. अर्थात हिरणगर्भ म्हणजे या भूतसृष्टीच्या आरंभी विष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेला पद्मसंभव ब्रह्मा होय. तो भूतादि असून आदिभूत आहे. जसा सूर्य हा सूर्य किरणाच्या आदौ झालेला असून मागाहून त्याच्या पासून सर्व किरण फांकतात तद्वत्.विश्वोत्पत्ति, म्हणजे या ग्रह-नक्षत्र-तारकापुंजांची उत्पत्ति, तेजोमेघापासून झाली आहे, असें आधुनिक विज्ञान सांगते. पौराणिक भाषेत तोच आदि तेजोमेघ हिरण्यगर्भ म्हटला आहे. त्या चतुर्मुख तेजोमेघानें चारी दिशांस अनंत लोकांची अनंत कोटि ब्रह्मांडांची निर्मिति केलेली आहे. तो जो आदि तेजोमेघ त्याच्या पोटांत सर्व धातुमय ज्वलद्‌रस भरला असून त्यालाच हिरण्य म्हटले आहे. आज आपण सुवर्णाला हिरण्य म्हणतो. परंतु हिरण्यगर्भांत गर्भरूपाने राहिलेलें जें हिरण्य आहे तें भौतिक सुवर्ण नसून तें सर्वधातुमूल जगदुपादानभूत चिद्धातुरूप होय. अचेतनापासून हे विश्व निर्माण होऊ शकत नसल्यामुळे जगदुपादान आणि निमित्त चेतनच मानावे लागते. आणि त्यालाच इथें हिरण्य म्हटले आहे. त्याच चिद्‌हिरण्याचे हे विश्वरूप नाना अलंकार घडले आहेत. यालाच अनुलक्षून ज्ञानदेवाने म्हटले आहे. "विश्वालंकाराचे विसुरे । जर्‍ही आहाति नाना आकारें । त‍र्‍ही घडिले एकेंचि भांगारें । परब्रह्में ॥ " हे सर्व विश्वहिरण्यमय आहे, चिन्मय आहे. आणि हे हिरण्मय विश्व ज्याचा गर्भ होय तो परमात्मा हिरण्यगर्भ म्हणावयाचा. तो मृद्‌गर्भ नाहीं, जड गर्भ नाही, तर हिरण्यगर्भ आहे चिन्मय आहे. हे हिरण्य ज्याला लाभलें, सर्वत्रोपलब्ध झाले, त्याहून अधिक श्रीमंत कोण ? यालाच अनुलक्षून रामदासांनी संतांना श्रीमंत म्हटले आहे' ऐसे जे संत श्रीमंत............'

४१२. शत्रुघ्न
जीव देहाभिमानामुळे इतराहून आपल्याला वेगळा मानतो आणि इतरांशी असूया स्पर्धा विरोध वैर करतो. अर्थात् अज्ञानजन्य मोहामुळे जीव 'मी माझा' 'तूं तुझा' अशी कल्पना करून आसक्ति आणि वैर करीत असतो. याचेच पर्यवसान वैयक्तिक पारिवारिक सामाजिक आणि राष्ट्रीय व आन्तरराष्ट्रीय वैमनस्य विरोध विग्रह आणि युद्ध महायुद्ध व जागतिक युद्ध यांत होत असते. याचा अर्थ हा झाला की शत्रु म्हणून वस्तुतः कोणीच नाही. आपलें अज्ञानच आपलें शत्रुत्व करीत आहे. हे शत्रुत्व जो घालवितो तोच वस्तुतः शत्रुघ्न आहे. अर्थात् केवळ एक आत्मज्ञान च शत्रुघ्न आहे. तेंच अज्ञान आणि तज्जन्य आसक्ति व वैर यांचा नायनाट करतें. परमात्याहून अधिक ज्ञानी दुसरा कोण असू शकेल ? स्वयमेव ज्ञानाहून अधिक ज्ञान कुठे असणार ? म्हणून परमात्मा हा शत्रुघ्न ठीकच म्हटला आहे. त्याची ही जगद्‍रचना म्हणजे जीवांना ज्ञान शिकविण्याची शाळाच आहे. डोळस आणि आंधळे दोन प्रकारचे लोक जगांत आहेत. डोळस मार्ग कोणता अमार्ग कोणता हे पाहून अमार्ग टाळून मार्गानें चालतात आणि यथासमय मुक्कामाला पोचतात. आंधळे मार्गामार्गज्ञान राखीत नाहीत आणि एक तर ते डोळसांच्या आश्रयाने मुक्काम गांठतात अथवा आड-वाटेला जाऊन ठेचा खात, चुकत सुधरत, मुक्कामाला पोंचतात. अर्थात् ठेचा खाऊन त्यांना ज्ञानदृष्टि येते आणि ते वाटेस लागतात. आणि माणूस एकदां वाटेस लागला म्हणजे तो आज ना उद्यां मुक्कामास पोंचलाच म्हणून समजा. शास्त्र हा मार्ग आहे, शास्त्रद्रोह अमार्ग, ज्ञानी डोळस होत. श्रद्धावंत नम्र भक्त होत. आणि जे ज्ञानीहि नाहीत आणि भक्तहि नाहींत ते अज्ञानी व अभक्त जीव करंटे होत. आपले आपण वैरी होत. सर्वात्मक परमात्म्याला शत्रुच नाही. मग तो शत्रुघ्न कसा होणार ? परंतु तरीहि तो शत्रुघ्न म्हटला आहे. कारण जो सर्वांचा शत्रु तो मोहच त्याचाहि शत्रु म्हटला जाईल आणि त्याला तो आपल्या सहज ज्ञानामुळे ठार करतो म्हणूनच तो शत्रुघ्न म्हणावयाचा.

४१३. व्याप्त
व्याप्त म्हणजे कारणरूपाने सर्व विश्वांत व्यापक असणारा, अथवा कार्यरूपाने विस्तारलेला, व्याप्य. कर्तरि वा कर्मणि दोन्ही प्रकारें तो लावता येईल. कार्यात्मना तो व्याप्य आहे, कारणात्मना व्यापक आहे. आणि असे असून तो अनेक नाहीं, एकच आहे कनक-कुण्डलवत्. जगाकडे कार्यदृष्टीनें पाहिल्यास जगांत नामरूपात्मक नानात्व दिसून पडते. परंतु कारण दृष्टीने पाहिल्यास सर्वत्र एकच एक चिद्वस्तु डोळयांत भरते. या दोन दृष्टींनाच पल्लवग्राही दृष्टि आणि मूलग्राही दृष्टि म्हणतात. "तत् सृष्ट्‍वा तदेव अनुप्राविशत्' या श्रुतींत परमात्मा सृष्टींत अनुप्रविष्ट म्हणजे सहप्रविष्ट असल्याचे म्हटले आहे. त्यांत त्याची कार्यकारणवत् व्याप्यव्यापकताच व्यक्त केली आहे. वस्तुतः कार्य आणि कारण आणि त्यांच्यातील कार्यकारणरूप संबंध कल्पनामात्रच आहे. जिथें एकत्व आहे तिथे भेदाला वाव कुठला ? आणि त्या भेदांतील संबंधाला तरी वाव कुठून असणार ? आकाशात अभ्र येतात. त्यांचे नाना आकार होतात. प्रेक्षक त्यांना नाना नामें देतात. वस्तुतः अभ्रावांचून तिथे दुसरें कांहींच नसतें. तिथे अभ्र-सिंहाने अभ्र-गजाला पळविलें वा ठार केलें तरी त्यांत हन्तृ-हत-हननादि कल्पनामात्र होत. 'गजोऽपि मिथ्या पलायनमपि मिथ्या' तद्वत् हा सृष्टि- व्यापार असल्यामुळे कार्यकारण आणि त्यांतील संबंध सर्वच निर्मूल आहे, आहे केवल केवलता. म्हणूनच म्हटलें आहे गीतेत -

मया ततमिदं सर्वं जगद् अव्यक्तमूर्तिना ।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः ॥
न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् ।
भूतभृन् न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥

४१४. वायु
सहस्रांत परमात्म्याला वारंवार प्राण म्हणून संबोधिलें आहे. इथे त्याला वायु म्हटले आहे. दोहोंत काय विशेष ? विशेष हाच की प्राण नासाभ्यन्तरचारी आहे, तर वायु सर्वत्रग महान् आहे. तो विश्वान्तरालसंचारी आहे. आपण झोपलों तरी प्राण झोपत नाहीं तो जागता राहतो पहारेकर्‍याप्रमाणे. त्याचा देहाच्या द्वारांत पहारा चालू असतो, त्याचे चंक्रमण सुरू असतें. तसा हा वायु जग निश्चेष्ट असले तरी त्याची चेष्टा, हालचाल, सुरूच असते. प्राण ज्या नाड्यांनी म्हणजे नाल्यांनी वाहतो त्या इडा पिंगला प्राणवाहिनी नाकपुड्या आलटून पालटून वाहत असतात. तसा वायुहि कधी दक्षिण ध्रुवावरून तर कधीं उत्तर ध्रुवाकडून वाहत असतो. तसाच तो कधीं प्राणापान जसे आतबाहेर ये जा करीत असतात तसा हा वायुहि दर्याबंदरांतून गिरिकंदरांत आणि गिरिकंदरांतून दर्याबंदरांत वाहत असतो. या जागतिक प्राणापानालाच उद्देशून वेदांत म्हटले आहे, "द्वौ वातौ वातः आसमुद्रात् आपरावतः". एक वायुलहरी बाहेरून आंत जाते, दुसरी आंतून बाहेर येते. असे हे दोन वायु-प्रवाह म्हणजे जगाचे प्राणापानच होत.

प्राण्याच्या अधीन प्राण असतात. प्राणी जीवात्मा लोकांतराला गेला म्हणजे प्राणहि त्यांच्या बरोबर जातात आणि प्राण्याचा देह निष्प्राण होतो. तसा हा जगदायु वायुहि परमात्याच्या अधीन आहे. पण तो परमात्मा आम्हांला कुठे दिसतो आहे ? त्याची खूण हा वायु तेवढा आम्ही पाहतो. याचे अनचाट सामर्थ्य आम्ही अनुभवतों, आणि म्हणून याच्याच नादाने आम्ही त्या परमात्याला ओळखतों, संबोधतों. जो अनाम ज्याचे नाम, जो अरूप त्याचें रूप, जोगुण त्याचे गुण आणि जो अकर्मा त्याचें कर्म आम्ही गात असतो.

४१५. अधोक्षज
मनुष्याला जें ज्ञान होतें तें सारें इन्द्रियज म्हटलें पाहिजे. मनुष्य कल्पना करतो त्याचाहि आधार इन्द्रियद्वारा पंच विषयांचा त्याने पूर्वी घेतलेला आस्वादच असतो. तो जगांत राहतो त्यावरून तो स्वर्गादि लोकांची कल्पना करतो. इथल्या वाटिकेवरून स्वर्गीय नंदनवनाची कल्पना करतो. इथल्या गायनावरून स्वर्गीय गन्धर्वालापाची कल्पना करतो. इथल्या षड्‌रसावरून स्वर्गीय अमृताची कल्पना करतो. इथल्या स्त्रीसुखावरून स्वर्गीय अप्सरांच्या सहवासाची कल्पना करतो. इथल्या जरा-मृत्यूवरून स्वर्गीय अजर अमृत जीवनाची कल्पना करतो. सारांश, त्याचे सर्वविध ज्ञान इन्द्रियजन्यच म्हणावे लागते. परंतु परमात्मा हा या इंद्रियजन्य ज्ञानाच्या कक्षेत येणारा नाही. जें कांहीं तुम्ही पहाल कल्पाल त्या सर्वाहून तो वेगळा आहे. आणि हा वेगळेपणा दाखविण्यासाठी त्याला अतीन्द्रिय म्हणावे लागते. मनुष्य व त्याचे ज्ञान इंद्रियांनी इतकें कांहीं गुंडाळलेलें आहे की इन्द्रिय आणि अतीन्द्रिय दोहोंची विभाजक रेखा इन्द्रियेंच होतात. आणि म्हणून त्या परमात्म्याचा इन्द्रियांशी दुरूनहि संबंध नसतांना त्याला अतीन्द्रिय वा अधोक्षज म्हणावे लागते. अधोक्षज म्हणजे इन्द्रिय अंतर्मुख केलीं, बंद केली वा उपडी घातली असतां मनुष्याला अन्तर्यामी येणारा जो निर्विषय स्वानुभव तो. तेच परमात्म्याने स्वरूप होय. ते आपल्यासारखें आहे असें म्हणतांच येत नाही. कारण तें जें अमकें तें इन्द्रियगोचर आहे. त्याला आहे नाहीहि म्हणतां घेत नाही. कारण आहे नाहींच्या आमच्या कल्पनाहि इन्द्रियजन्यच आहेत. जे इन्द्रियजन्य नाही, इन्द्रियजन्य- कल्पनादुष्ट नाहीं असें कांहींच नाहीं. म्हणून त्याला नेति नेति च म्हणावे लागते. तें असेंहि नाही आणि तसेंहि नाही. तुम्ही कोणताहि क्रियाकारकवान् शब्द वापरा. तो सर्व तिथें लटका पडतो. म्हणूनच रामदासांनी "कळे ना कळे ना कळेना कळेना !" असे म्हणून हात टेकले आहेत. नव्हे, माथे टेकलें आहे.


ॠतुः सुदर्शनः कालः परमेष्ठी परिग्रहः ।
उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः ॥४५॥


४१६. ऋतु
"ऋतुः सुदर्शनः कालः" हा सबंध चरण एक संपूर्ण काल-कल्पना मांडीत आहे. काल ही एक अव्यक्त आणि अचिन्त्य अशी वस्तु आहे. पण तिचे अर्वाचीन रूप म्हणजे कल्प, युग, मन्वन्तर, राजशक इत्यादि कालखंड; संवत्सर ऋतु मास पक्ष अहोरात्र इत्यादि कालावयव आणि प्रहर, घटिका, पल, क्षण, लव, निमेष इत्यादि कालांश हे मात्र व्यक्त आणि चिन्त्य आहेत. कालाचा विचार यांच्याच आश्रयाने करावा लागतो. यांची प्रतिनिधिभूत ऋतु आणि सुदर्शन म्हणजे संवत्सर हीं पदें इथे आली आहेत. युग, कल्प हे कालखंड फार मोठे म्हणून कल्पनेच्या कक्षेत धरतां येत नाहीत, तसे लवनिमेष हे अति सूक्ष्म म्हणून तेहि बुद्धीच्या चिमटींत धरता येत नाहीत. पण ऋतु आणि ऋतुचक्रस्वरूप संवत्सर मात्र सहज लक्षांत येणारे आहेत. ऋतूच्या पालटानें सृष्टीत स्पष्ट फरक दिसून येतो. शिशिरऋतूंत वनराजि सर्व साज टाकून निराभरण होते. तर वसंतांत ती नटते सर्वाभरण-भूषित होते. ग्रीष्मांत सर्व सृष्टि तप्त आणि वर्षाऋतूंत तृप्त होते. भूमि जीवनरसाने संतृप्त होते, नद नदी वापी कूप तडाग तुडुंब भरून जातात. शरद् ऋतुत सर्व सृष्टि प्रसन्न होते, संपन्न होते. मेघाडंबर जाऊन आकाश स्वच्छ होतें, जलें स्वच्छ होतात, कमलें फुलतात, शेतें खुलतात. हेमंतांत शेतातील सोने घरांत येतें, घरें भरतात धनधान्याने दुधातुपानें; हिरव्या चाऱ्याने व गार वाऱ्याने द्विपाद आणि चतुष्पाद हृष्टपुष्ट होतात. अशा प्रकारें ऋतूमुळे म्हणजेच क्रमिक नियमित परिवर्तनामुळे सर्वत्र 'शान्तिः पुष्टिस् तुष्टिः' होते. म्हणून परमात्मा हा ऋतु होय.

ऋच्छति इति ऋतुः । ऋत आणि ऋतु ऋधातूपासूनच आलेले शब्द आहेत आणि दोहोंचा अर्थ समान आहे. ऋत म्हणजे अचूक परिणाम. अर्थात् नियम. ऋतुहि अचूक येतो. त्यांत अंतर पडत नाहीं. परमात्मा हा अचूक फलदाता आहे. म्हणून ऋतु होय. फल अचूक पण यथाकाल देतो तो. म्हणूनहि तो ऋतु होय.

४१७. सुदर्शन
सुदर्शन म्हणजे ज्याचे दर्शन शुभ आहे तो परमात्मा. ज्याच्या दर्शनाने समस्त पापताप नाहीसे होतात तोच सुदर्शन म्हणावयाचा. मनुष्य अनेक पापें करतो आणि परिणामी ताप पावतो याचें कारण त्याला शाश्वत आणि अशाश्वत यांचा विवेक नसतो हे आहे. तो या सांसारिक भोग्यजातास शाश्वत समजून त्याच्या लाभासाठी वाटेल तें पाप करतो. हे भोग्यजात केवळ अशाश्वतच नाही, तर दुःखरूपहि आहे. आरंभी तें अमृतासारखें आणि परिणामी विषासारखे आहे. पण जीवाला इतका पोंच नसतो इतकी दीर्घदृष्टि नसते. त्यामुळे तो मोहाला बळि पडतो. भोग्यजाताचे हे अशाश्वतत्व दुःखरूपत्व जर कळलें आणि वळलें तर जीव पापप्रवृत्त होणार नाही. कालरूप भगवान् जीवांना त्यांचे आयुष्य बळ रुचि क्षणाक्षणानें क्षीण करून हा बोध देत असतो.

काळाच्याच योगें भोग्यजाताची क्षणभंगुरता आणि दुःखपरिणामिताहि अनुभवाला येत असते. ज्ञानी जिह्वेप्रमाणे संसाराची कटुता क्षणांत समजून उमजतात आणि निवृत्त होतात. अज्ञानी जीवांना जन्म ते जन्म चाटू प्रमाणे संसारांत बुडून राहूनहि त्याची कटुता कळत नाही. सर्पदंशाला जसा निंबाचा पाला गोड वाटतो तसा त्यांना हा संसार गोडच वाटत राहतो. आणि म्हणून सुदर्शन-चक्रांत ते भरडले जातात. ज्ञान्यांना सुदर्शन संसारापासून बचावतें तर अज्ञान्यांना तें भरडतें. विश्वरूप भगवान म्हणतात'कालोऽस्मि लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः' या कालात्मा विश्वरूपाच्या हातांतील सुदर्शनचक्र म्हणजे संवत्सरचक्र होय, या संवत्सररूप चक्राचा वर्षमान हा बुधला होय, अयने त्याचे दोन बंध होत. बारा मासांचे चोवीस पक्ष त्याचे आरे होत. सहा ऋतु त्याची पाठी होत. आणि काल हीच त्याची वाट वा नेमि होय. हे चक्र भगवंताच्या हातांत अविरत घुमत आहे आणि जीवांचा यथाकर्म यथाश्रुत फलोदय होत आहे. आत्मसत्तेच्याच आधारें हा स्थलकालात्मक सृष्टिप्रपंच घडत मोडत असल्यामुळे भगवंताच्या हातांत तत्प्रतीक शंखचक्रे दिली आहेत. संवत्सरात्मक ऋतुचक्रहि सुदर्शनच होय. त्याला जो अनुसरून वागेल, जो ऋतुचर्या पाळील, त्याला तें सुदर्शन होईल, सुख दाखवील. मग तो वैदिक ऋषींच्या वाणींत म्हणेल "वसन्त इत् नु रन्त्यो ग्रीष्म इत् नु रन्त्यः । वर्षाण्यनु शरद् हेमन्तः शिशिर इत् नु रन्त्येः ॥ " सर्व काळ रमणीय आहेत. सुखद आहेत.

४१८. काल
"कालः कलयतां अस्मि"काळ हा सर्वांची मोजणी, गणति करणारा आहे. किती किती ब्रह्मा विष्णु महेश होऊन गेले या गणति काळाजवळ आहे. अर्थात् काळ हा अनन्त आहे. या सान्त सृष्टीचा तो शेष आहे, अवशेष आहे. सर्व नाहीसे झाले तरी तो नाहीसा होत नाही. तो शिल्लक राहतो. शेष राहतो. अर्थात् शेष आणि अनन्त ही ह्या काळाचींच नामें होत. हा काल परमेश्वराची प्रकृति होय. माणूस जसा आपलाच हात उशाला घेऊन झोपतो तसा परमात्मा आपल्या कालशक्तीच्या शय्येवर पहुडलेला आहे. तो आपल्या प्रकृतीला संगें घेऊन स्वस्थ सुखानुभव करीत आहे. काल ही परमात्म्याची प्रकृति आहे म्हणजे परमात्मा आणि तो अभिन्न आहेत. काल अनन्त, दिक् अनन्त, चित् अनन्त, अशी अनन्तें अनन्त कल्पिली आपल्या आकलनासाठी तरी तीं वस्तुतः सर्व एकमयच होत. कारण अनन्त ही वस्तु सर्वव्यापक किंबहुना सर्वात्मकच म्हटली पाहिजे. तिथें दुसऱ्याला अवकाशच नाही. स्वभावतःच ती अद्वितीय वस्तु आहे. म्हणून विश्वांत सर्वतोऽनन्तरूप एक परमात्मवस्तुच आहे. 'नह नानास्ति किंचन' इथे वेगळे दुसरें कांहीं नाहीं. मग या एकालाच आम्ही कालकल्पना करून काल म्हणतो, दिग्‌देशकल्पना करून दिक म्हणतों, वस्तुकल्पना करून आत्मा म्हणतों हया त्रिपरिमाणांनी रहित अशी एकहि वस्तु तुम्हांला दाखविता किंवा कल्पिता तरी येईल का ? सुतराम् नाही. म्हणून या त्रिधा कल्पित एकालाच सहस्रनामांनी, नव्हे सहस्रावधि नामांनी, पुकारलें जातें यथारुचि यथावसर.

४१९. परमेष्ठी
परमे तिष्ठति इति परमेष्ठी । जो सर्वोत्तम पदी विराजमान आहे तो परमात्मा परमेष्ठी होय. वास्तविक परमेष्ठ असें रूप व्हायला पाहिजे. परंतु नारी कोणत्या रूपावर भाळेल त्याचा नेम नाहीं. वाणीने परमेष्ठ ऐवजी इन्‍नन्त परमेष्ठी रूपच पसंत केले आहे. आणि स्वयंवरवधू-पित्याप्रमाणे वैयाकरणाला वरप्रयोगशरण व्हावे लागलें आहे. परमेष्ठी प्रमाणे जगजेठी हे मराठी पदहि इन्‍नन्तच आहे. तें वस्तुतः जगज्‌ज्येष्ठ पासून आलेले आहे. या दोन्ही पदांचा उल्लेख नामदेवाने आपल्या एका सुंदर अभंगांत एकत्र केला आहे"गंगा वामांगुष्ठीं, नाभी परमेष्ठी, सखिये जगजेठी देखियेला"इथें परमेष्ठी पद ब्रह्मदेवाच्या अर्थाने आले आहे. भूतमात्राच्या दृष्टीने तो प्रजानाथ उघडच परम म्हणजे सर्वोच्च पदी विराजमान आहे. परंतु तें पद कांहीं सर्वोत्तम पद, परम पद नव्हे. कारण "आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन" थेट ब्रह्मलोकापासून खालपर्यंतचे झाडून सारे लोक जन्ममृत्यूच्या फेऱ्यांत सांपडलेले आहेत. अर्थात् तें अचिरंजीव पद उत्तम नव्हे. उत्तम पद तें होय, जिथे गेलें असतां पुनरावर्तन नाही. "यद् गत्वा न निवर्तन्ते तद् धाम परमं मम"अर्थात् आत्मलोक हाच सर्वोत्तम लोक होय. तिथें परमात्मा विराजमान आहे. म्हणून तो परमेष्ठी. भूर्लोकापासून वर आणि खाली लोककल्पना केली आहे. प्रथम वर वरच्या भूमिकांची कल्पना केली ती भूर भुवर् स्वर् महर् जनस् तपस् आणि सत्यम् अशी सप्तलोकात्मक आहे. ही सप्तलोककल्पना योगारोहाच्या सप्त भूमिका होत. ह्या जशा योगाच्या पायऱ्या कल्पिल्या तशा भोगाच्याहि कल्पिल्या आणि त्यांना तल अतल वितल तलातल रसातल आणि महातल वा पाताल अशा संज्ञा दिल्या. योगाच्या भूमिका आहेत. भोगाची तले आहेत. भूमिकांवर आरोहण आहे. तलांत अधोगति आहे. चढत चढत माणूस शिखराला पोंचतो. बुडत बुडत तो रसातलाला महातलाला जातो. रस, कामिनी आणि कांचन हे आहे भोगाचे त्रिविध सार. त्या विषयीं परम लोभतो तो भोगी. भोगी म्हणजे साप असाहि एक अर्थ आहे. आणि तो साप राहतो बिळांत. म्हणून उत्तरोत्तर अधिक लंपटतेची जी सप्तधा परिकल्पना ती म्हणजे तलादि अधोलोकांची कल्पना होय. पातालांत, म्हणजे भोग्यांच्या परम लोकांत, अमृताची कुंडे, नागकन्या आणि रत्नांच्या राशि आहेत. अशी ही लोककल्पना ऊर्ध्वमुख आणि अधोमुख पसरून चतुर्दश झाली आहे. आत्मसत्ता सर्वाधार आणि सर्वातीत आहे. तीच परमेष्ठी.

४२०. परिग्रह
परितो गृह्णाति इति परिग्रहः ।जो चोहों बाजूनें जीवाला आणि जगताला वेढून आहे तो परमात्मा परिग्रह होय, या जीवजगतांच्या जन्मापूर्वी आणि यांच्या मरणानंतर जो अनादि आणि अनन्त परमात्मा द्रष्ट्टस्वरूप, निरन्त अवस्थित आहे तोच परिग्रह होय.

बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ॥ गीता ४ - ५

वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।
भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥ गीता ७ - २६


या गीतावचनांत परमात्म्याची परिग्रहता सर्वज्ञताच वर्णिली आहे. गृहणाति इति ग्रहः । जो धरतो, झपाटतो तो ग्रह होय. परंतु हा ग्रह म्हणजे झपाटणारा भूतयोनि जीव कोणाला तरी केव्हां तरी झपाटतो. आणि त्या झपाटण्यांत वा झडपणींत मग जीव ताळयावर राहत नाही. स्वतंत्र राहत नाही. तो त्या ग्रहाच्या लहरीप्रमाणे वागत असतो, ग्रह-परतंत्र असतो. हे जीवजगत्‌हि तसें परमात्म्याच्या सत्तेने परितः म्हणजे सर्वतो परि झपाटलें आहे. आणि कायमचे झपाटलें आहे, तो नाचवील तसें नाचत आहे. सर्वस्वी परतंत्र आहे. म्हणून तो परमात्मा परिग्रह म्हणावयाचा. 'परितः गृह्यते इति वा परिग्रहः' । अथवा जिकडे पहावे तिकडे आढळणारा, चोहों बाजूला जो हा पसरला आहे, तो पसारा म्हणजे परिग्रह होय. हा सगळा विश्वाचा विस्तार म्हणजे परमात्म्याचा पसाराच होय. परमात्म्याचा विग्रह म्हणजे मूर्ति आम्हांला दिसत नाही. पण हा परिग्रह म्हणजे प्रपंच आम्हांला सर्वत्र दिसत आहे. तोच परमात्मा आहे. तोच त्याचा विग्रह आहे. पृथ्वी त्याचे पादपीठ आहे. स्वर्ग त्याचे मस्तक आहे. चंद्रसूर्य डोळे आहेत. वायु त्याचा श्वास आहे. दिशा त्याच्या भुजा आहेत. अन्तराल त्याचे धड आहे. असा हा परमात्मा परिग्रह रूप पसरला आहे. त्याची संपूर्णमूर्ति अनन्त आणि विश्वतोमुख असल्यामुळे आम्ही सामग्र्याने पाहूं शकत नाही. तथापि जें जें दिसतें तें सारें त्याचेंच रूप आहे. ती त्याचीच अंगोपांगें आहेत.

४२१. उग्र
अर्जुन विश्वरूपाला पाहून म्हणतो"आख्याहि मे को भवान् उग्ररूपः" परमात्म्याचें जें निर्गुण रूप आहे तें अचिंत्य आहे. त्याचा कालतः, देशतः आणि वस्तुतः विस्तार अचिंत्य आहे. मग अवर्णनीय म्हणून काय म्हणायचे ? तथापि माणसाला आकलन होण्यासाठी तो अचिंत्याचे चिंतन आणि अवर्णनीयाचे वर्णन करूं जातो. आणि तेच खरोखर उग्र आहे, भयावह आहे. माणसाला गोंधळांत टाकून देणारे आहे. इंद्रियमनोग्राह्य वस्तु माणसाला सुविज्ञेय होते आणि तीच त्याला रुचते व पचते म्हणून तिला तो गोड मानतो. पण जी अतीन्द्रिय अवाङ्‌मनसगोचर वस्तु आहे ती त्याला आकलन होऊ शकत नाही आणि तिची ती अनाकलनीयताच त्याला भेडसावते, व्यथित करते. त्यामुळेच तो तिला पाहून म्हणतो "दृष्ट्वाद्‌भुतं रूपमुग्रं तवेदं, लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्, दृष्ट्‍वा लोकाः प्रव्यथितास् तथाहम्" दोन पाय, दोन हात, दोन कान, दोन डोळे व एक डोके असलेला माणूस सर्वसामान्य आहे. पण ज्याला अनेक डोकी आहेत असा माणूस असामान्य म्हणावा लागेल. भयानकहि म्हणावा लागेल. ज्याला असंख्य डोकी आहेत तो तर अद्‌भुतच म्हटला पाहिजे. भयावहच म्हटला पाहिजे. ज्या आत्मसत्तेने हे सर्वतोऽनन्तरूप विचित्र विश्व धारण केलें आहे तिला अद्‌भुत, भयानक वा उग्र म्हणायचे नाही तर काय म्हणावयाचें ? तें कांहीं सौम्य रूप नव्हे, रुचणारें पचणारें रूप नव्हे. परमात्म्याचे विश्वरूप एका बाजूने निर्गुण तर दुसऱ्या बाजूनें तें सगुण साकारहि आहे आणि ही दोन्हीहि दर्शनें अनाकलनीय अतएव व्यथित करणारीच आहेत. दोन्हीहि दर्शनें अद्‌भुत आणि भयानकच आहेत. राक्षस भयानक असतोच पण त्याची छायाहि भयानक असते तद्वत्. ज्याशीं गुजगोष्टी कराव्या असें तें दर्शन नव्हे. ज्याला डोळे भरून पहावें, ज्याला बाहू भरून कवटाळावें, ज्यावर रुसावें, ज्याबरोबर बसावें, हंसावें असें जें स्वरूप तसें तें सौम्य नव्हे. म्हणून परमात्मा हा उग्र होय. अग्नीत सर्व दग्ध होते म्हणून अग्नि हा उग्र होय. परमात्मसत्तेच्या तेजांत सर्व विश्व वितळून पार नाहीसे होते. म्हणून परमात्मा हा उग्र म्हणावयाचा. सूर्यतेजांत अंधार उरत नाही तसा परमात्मतेजांत हा प्रपंच नाहींसाच होतो. म्हणून परमात्मा हा उग्र म्हणावयाचा.

४२२. संवत्सर
संवत्सर हा कालगणनेचा एकम् आहे. म्हणून तो कालाचा प्रतिनिधि होय. आमचे संपूर्ण जीवन कालाधीन आहे. कालशक्तीने ग्रहगोल उदयास येतात मावळतात. कालशक्तीनेंच त्यांचे जीवन चाललेलें आहे. असा हा काल सर्वनियामक आहे. पण मनुष्याला वाटतें मग आमचे कर्तृत्व तें काय राहिलें ? आम्ही काय निव्वळ काळाच्या हातांतील बाहुलें आहों ? महाभारतात याबाबत विचार आला आहे. तो दिसायला विरोधी आहे. "कालो वा कारणं राज्ञो राजा वा कालकारणम्-इति ते संशयो मा भूत् राजा कालस्य कारणम्" काळ हा राजाचा नियामक नसून राजाच काळाचा नियामक आहे. म्हणजे चांगल्या वा वाईट काळाचें प्रवर्तन राजा करीत असतो. पण हा विचार गोंडस असला, माणसाचे आत्मस्वातंत्र्य प्रस्थापित करणारा दिसला तरी तो मिथ्या आहे. महाभारताचे सार गीता आहे आणि तींत स्पष्ट म्हटले आहे की "मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्र भव सव्यसाचिन्" अर्जुना जें मी पूर्वींच योजिलें आहे, त्याला अनुसर. त्या कामीं निमित्तमात्र हो. अहंकार करूं नकोस. हे मी करीन, तें मी करणार नाही. असें म्हणू नकोस. अरे करणारा तूं नाहीस. "ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति । भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ "तो परमात्मस्वरूप काळच सर्व कांहीं करीत नि करवीत आहे. कृष्णालाहि कौरवांचा नि यादवांचा विनाश टाळता आला नाही. पौरुष प्रयत्न जर काळप्रवाह बदलवू शकत असता तर कृष्ण या नरवीरांना कां नाहीं वांचवू शकला ? कृष्णाला तें नको होते असें तर नाहींच, दुर्निवार कालगतीने ते वैरवश होऊन विनाश पावले. हा काल म्हणजे कोणी जड प्राकृत शक्ति नव्हे. ती ईश्वरी प्रकृति होय. अर्थात् ईश्वराहून ती अभिन्न आहे. ती अनन्त आहे, ज्ञानस्वरूप आहे, सद्‌रूप आहे. तिची प्रवृत्ति सान्त साहकार अज्ञ जड जीवाला आकलन होऊं शकत नाही. जीवाचे सर्वांत मोठें ज्ञान कर्तृत्व हेंच कीं त्यानें त्या पराशक्तीला वश होऊन रहावें. अर्जुन शेवटीं तेंच करतो. 'करिष्ये वचनं तव' म्हणतो. हा काळच अशा प्रकारे सर्व कांहीं यथावत् करतो. तो कधीं रुकत नाहीं चुकत नाही, म्हणून तोच संवत्सर म्हणावयाचा.

४२३. दक्ष
दक्ष म्हणजे क्रियादक्ष, कर्तव्यदक्ष. आपल्या कर्तव्यांत अप्रमत्त, "सत्यात् न प्रमदितव्यम् । धर्मात् न प्रमदितव्यम् । स्वाध्याय-प्रवचनाभ्यां न प्रमदितव्यम् । " अशा प्रकारें श्रुतीनें अप्रमादाचा म्हणजेच दक्षतेचा उपदेश दिला आहे. "ब्रह्म सत्यं, जगत् मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरः" हे जें परमसत्य आहे, जीव जगत् आणि ईश्वर यांच्या स्वरूपाविषयीचें, त्या विषयीं अन्यथा धारणारूप प्रमाद होता कामा नये. त्या ज्ञेय ब्रह्मानंतर तन्निष्पन्न कर्तव्यब्रह्म जो यज्ञरूप धर्म त्याविषयी प्रमाद होता कामा नये. अर्थात् कोणाहि जीवाचा द्रोह होता कामा नये. 'सर्वभूतहिते रति' धरली पाहिजे. आणि ह्या ज्ञेय आणि कर्तव्य ब्रह्माचा बोध आंत आणि बाहेर सतत जागता रहावा म्हणून वेदाध्ययन आणि वेदप्रवचन म्हणजेच स्वाध्याय, प्रवचनरूप ब्रह्मघोष होत राहिला पाहिजे. त्यांत एक दिवसहि प्रमाद होता कामा नये, असें हें त्रिविध ब्रह्मचर्य म्हणजेच अप्रमाद वा दक्षता होय, परमात्मा दक्ष आहे. अर्थात् तो ज्ञप्ति, कृति आणि उक्ति या जीवनाच्या त्रिपरिमाणांच्या विषयीं दक्ष आहे, त्रिदक्ष आहे. तो परमात्मा, सहज त्रिदक्ष आहे. आम्हांला त्या बाबत प्रयल करावयाचा आहे. प्रयासपूर्वक दक्ष व्हावयाचे आहे. ज्या विषयी आम्हांला दक्ष असायला पाहिजे त्याबाबत आम्ही पूर्ण विस्मृत असतो. अशी आहे जीवाची आणि परमात्म्याची दोन ध्रुवासारखी परस्परविरुद्ध स्थिति. "दूरमेते विपरीते विषूची" असें उपनिषद् म्हणते तर गीता तेंच "या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः" या शब्दांत प्रकट करते. साध्या मराठीत बोलायचे म्हणजे हा असा जिवाशिवाचा छत्तीसचा आंकडा आहे. परमात्मा दक्ष आहे, आम्ही प्रमत्त आहों. पण आम्हांला या प्रमादाच्या अध्रुवाकडून त्या दक्षतेच्या ध्रुवाकडे प्रगति करावयाची आहे, असा हा जीवनाचा अक्ष आहे, ज्या भोवती जीवलोक भ्रमत आहे.

४२४. विश्राम
"विश्रम्यते अस्मिन् इति विश्रामः ।" परमात्म्याच्या ठाईं सर्व विश्व विश्राम करतें म्हणून तो विश्राम होय. कल्पांती विश्व विश्वेश्वराच्या ठाई विश्रमते म्हणूनच केवळ तो विश्राम नाहीं तर नित्यच तें त्याच्या ठाई विश्रमत असते. जीव आणि जड सुषुप्तींत त्याच्या ठाईं विश्रान्त होत असतात. त्याच्या ठाईं विश्रान्त होऊन म्हणजे आपला थकवा घालवून ते तिथून परत संजीवन घेऊन नित्यशः परत कार्यक्षम होत असतात. असें संजीवन जर मिळाले नाही तर जीवाजीव स्वकार्यक्षमता जी ते श्रमून क्षीण करून बसले असतात, परत भरून काढूं शकणार नाहीत. जीव उघडच श्रमतात आणि विश्रान्त होऊन ताज्या दमानें परत कामाला लागतात हे आपण पहातोंच. पण अजीव जड यंत्र देखील एकसारखें काम करीत राहूं शकत नाही. त्यालाहि विश्रान्तीची अपेक्षा असते. तेंहि विश्रान्त होऊन परत पूर्ववत् कार्यक्षम होतें. यन्त्रज्ञ असें म्हणतात. हे विश्रमण आणि संजीवन ज्यांत आणि जिथून होतें तोच परमात्मा होय. परमात्म्याच्या ठाईं सारें विश्व विश्रान्त होत असते. त्यावेळी प्रत्येक भूत म्हणजे जीवाजीव सत्त्व आपलें वेगळेपण टाकून एकमय होत असते. सुषुप्तींत ब्रह्मा आणि मशक, व्याघ्र आणि शशक असा कांहींच भेद उरत नाही. तिथे सर्व नानात्व नाहीसे होऊन एकाकारता, केवलता नांदत असते. हाच विश्राम होय, हाच परमात्मा, नाम आणि रूप धारण करणे हा खरोखर श्रम आहे. भार आहे. मी अमुक आहे, अमुक अमुक माझें कर्तव्य आहे, या विचारानें भूतमात्र भारावले आहे. हे दडपण गेल्याखेरीज जीवाला विसांवा कुठला ? म्हणूनच ज्ञानदेवासारखे तत्त्वज्ञ म्हणतातः "माझें असतेपण लोपो । नाम-रूप हारपो । झणें मज वासिपो । भूतजात" आत्मज्ञाची, सर्वभूतहितेरताची, ही परम गति होय, परमावधि होय. आणि "अत्र विश्वं भवत्येकनीडम्" इथेच विश्वाला परिपूर्ण विसावा लाभत असतो.

४२५. विश्वदक्षिण
दक्षिण म्हणजे अनुकूल. उजवा हात हा उजवा म्हटला आहे याचे कारण तो कामाला अनुकूल, उजू पडतो. डावा हात हा डावा म्हटला आहे कारण तो प्रतिकूल पडतो. आडवा पडतो. उजव्या सारखा उजू म्हणजे सरळ पडत नाही. म्हणून दाक्षिण्य म्हणजे सारल्य होय, आनुकूल्य होय. जगांत प्रत्येक जीव कोणाला तरी सरळ, कोणाला तरी वांकडा असा असतो. तो आप्तेष्टांशी सरळ वागतो, परक्यांशी वांकडा वागतो. जीव हा जगांत असा स्वपरभेद करून वागत असल्यामुळे सर्वत्र शत्रुमित्र निर्माण करतो आणि त्यांच्या स्नेहांत आणि वैरांत बद्ध होतो. त्यामुळे त्याचें सारें जीवन गुंतागुंतीचे व विषमय होऊन बसते. हे द्वैत, हा भेद गेला तर जीवन सुतासारखें सरळ होऊन जाईल. मग कोणी परका नाही. सर्वच आत्मवत् होऊन जातील आणि आसक्ति व वैर यांचे निर्मूलन होऊन जीवन अमृतमय होऊन राहील. परमात्मा हा असा आहे. तो विश्वदक्षिण आहे. सर्वांना समान सानुकूल आहे तो. तो कुणालाहि प्रतिकूल नाही. सर्वांना तो निर्विशेष अनुकूलच अनुकूल आहे."एकलौतिया बालका । वरि पडौनि ठाके अंबिका । तैसा जो सकलिका । भूतां समु" असें त्या विश्वदाक्षिण्याचे वर्णन ज्ञानदेवानें केलें आहे. तथापि मातेची माया आसक्त असते, एकदेशी असते. त्यामुळें त्या मायलेकरांच्या जिव्हाळ्यांची उपमा परमात्म्याच्या विश्वदाक्षिण्याला देणें अतिच गौण होय, पण एकुलत्या एका अपत्यावरील आईच्या प्रेमातिशयाला अनासक्त व सर्व व्यापक कल्पिलें म्हणजे त्या विश्वदाक्षिण्याची किंचित् कल्पना येऊ शकेल. या विश्वदाक्षिण्यालाच गीतेने परमयोग म्हटलें आहे -

आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥ " गीता ६ - ३२

॥ हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP