ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

स्कन्दः स्कन्दधरो धुर्यो वरदो वायुवाहनः ।
वासुदेवो बृहद्भानुरादिदेवः पुरन्दरः ॥३६॥


३२७. स्कंद
स्कंद हा देवसेनानी आहे. देवांना हमखास विजय मिळवून देणारा तो कुशल आणि परम यशस्वी सेनापति आहे. कोण आहे हा स्कंद ? गीतेंत दैवी गुणांच्या गणनेंत ज्याचे प्रथम गणन झालें आहे तो अभय हाच स्कंद होय. दैवी गुणांची मालिका च देवसेना होय. तिला सेना म्हणायचे कारण ती आसुर गुणांच्या सेनेचा पराभव करते हे होय. प्रकाश अंधकाराचा पराभव करतो. त्यांचें सनातन युद्ध जुंपले आहे. तसा हा दैवासुरसंग्राम अखंड चालू आहे. ह्यांत देवसेनानी आसुर सेनेचा पराजय करून विजयी होतो. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हा षड्वर्ग आसुरसेनामुख होय ह्यांना षडानन आपल्या सहा मुखांनी तोंड देतो. अभयमुख पंच महाव्रतें वा यम हीच ती षडाननाची सहा मुखें होत. ज्ञानबलबलिष्ठ व्रतें प्रतिद्वंद्वी काम-क्रोधादि आसुर सेनेचे पारिपत्य करतात. ज्ञानबलामुळेच ती निर्भयपणे आसुरसेनेला तोंड देतात. आसुर सेना संख्याबलाने कितीहि बलिष्ठ भासली तरी अंधकारवत् अभाव रूप असल्यामुळे तिच्या ठाईं बल असत नाही. दैव सेना आत्मज्ञानबल-बृंहित आहे तर आसुर सेना भ्रान्तिगर्वित बलाभासदृप्त आहे. भ्रांतिजनितदोषस्कंदन करून दोषजनितकर्मक्षयकारी आत्मज्ञान दैवासुरसंग्रामात सदैव विजयी होतें. तेंच देहकारणभूत दोषव्यापाराचे आणि देहधारणशील कर्माचें स्कंदन करणारे अकुतोभय तत्त्व म्हणून स्कंद म्हटले आहे. ज्ञानस्वरूप परमात्माच भ्रांतीचे आणि तज्जनित भयाचें स्कंदन म्हणजे निर्मूलन वा ध्वंसन करणारा असल्यामुळे तो ठीकच स्कंद म्हटला आहे. सर्व दैवी गुणसेनेचा सेनानी हि तोच होय. त्याच्याच सैनापत्याखाली आसुरगुणसेनेचा पराजय होतो आणि ह्या संग्रामात स्वपक्षाची किंचित् हि हानि होऊन देतां तो प्रतिपक्षाला संपूर्ण गारद करीत असतो म्हणून सर्व सेनानींत तो श्रेष्ठ होय. म्हणूनच म्हटले आहे "सेनानीनां अहं स्कंदः ।

३२८. स्कंदधर
स्कंद म्हणजे अनात्मभावाचे व्यावर्तन करणारे आत्मज्ञान हा मूल अर्थ झाला. आणि अशा आत्मज्ञानाची जी गुणप्रभा ती हि पर्यायाने स्कंदच म्हणावयाची. सूर्य आणि सूर्यप्रभा दोन नाही, तसें हे ज्ञान आणि ज्ञानप्रभा हि दोन नाही. त्यामुळे जो स्कंद म्हटला तोच स्कंदधर हि म्हणावयाचा. भास्वान् म्हणजे सूर्य आणि सूर्य म्हणजे भास्वान् ! तसा स्कंद तोच स्कंदधर, जितके म्हणून दैवी गुण आहेत ते सगळे स्कंद होत. प्रत्येक गुण-किरण अवगुण-तमाचें निष्कासन करतो. अक्रोध क्रोधाचें, विराग रागाचे, शान्ति क्षोभाचे, सत्य असत्याचे, प्रेम द्वेषाचें, करुणा निष्ठुरतेचे निष्कासन निर्दलन निर्मूलन करीत आहे. म्हणून हे सर्व दैवी गुणरूप आध्यात्मिक योग स्कंद होत. आणि ज्या अर्थी हे सर्व आल्याचे म्हणा वा आत्मज्ञानाचे म्हणा अंगभूत होत त्याअर्थी तो आत्मा, तो परमात्मा हा स्कंदधर म्हणावयाचा.

स्कंद धातु उडी मारणे, नाश करणे, उत्सर्ग करणे अशा तीन अर्थांनी येतो. देवसेनानी स्कंद संसारजालांतून उडी मारून पार गेला म्हणून तो स्कंद होय. त्याने कामरागादि दोषांचे निर्दलन केलें म्हणून हि तो स्कंद म्हणावयाचा. त्याच प्रमाणे त्याने वैराग्य आत्मतुष्टि इत्यादि आत्मगुणांचे विकिरण केले म्हणूनही तो स्कंद होय. परमात्मा हा प्रपंचोपशम शिवस्वरूपं असल्यामुळे तो स्कंद तसा स्कंदधर म्हटला गेल्यास नवल नाहीं. त्याहून प्रपंचाच्या अतीत दुसरा कोण गेला आहे ? कोणी सर्व अनात्मभावजनित दोष-सेनचे निकन्दन केलें आहे ? कोणीं वैराग्य आत्मतृप्ति आत्मज्योति इत्यादि आत्मगुण प्रकट केले आहेत ? ही सर्व आत्मज्ञानाची लक्षणे आणि कार्ये परमात्म्याहून अधिक प्रकर्षाने कोणी धारण केली आहेत ? त्यामुळे तो परमात्मा स्कंदधर म्हटला आहे. स्कंद भीष्म हनुमान् इत्यादि त्याची अर्वाचीन रूपें होत. ती त्याने धारण केली आहेत म्हणून हि तो स्कंदधर म्हणावयाचा.

३२९. धुर्य
धुर्य म्हणजे धुरंधर, धुरेचा. निश्रेयसकारण ज्ञान घ्या की अभ्युदय-कारण धर्म घ्या, दोहोंत परमात्मा म्हणजे त्याचे ज्ञान व त्याचे यजनच धुरेचे म्हणजे अग्रिम आहे. चारी पुरुषार्थांचा दाता तो आहे. गीतेंत म्हटले आहे:

"भोक्तारं यज्ञ-तपसां सर्वलोक-महेश्वरम् ।
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥ गीता ५- २९


यांत यज्ञ-तपांचा भोक्ता हे पद चिंतनीय आहे. यज्ञाने अभ्युदयकारण धर्माचा तर तपाने निश्रेयसकारण ज्ञानतपादिकांचा निर्देश केला आहे. अर्थात् सकल पुरुषार्थाचा दाता आणि भोक्ता तो परमात्मा आहे. म्हणून तो धुर्य म्हणावयाचा. भुक्ति हवी असेल तरी त्या विश्वंभरालाच भजलें पाहिजे. मुक्ति हवी असेल तरी त्या मुकुंदालाच भजलें पाहिजे. अशा प्रकारे सर्वतो परी तो परमात्माच अग्रपूज्य आहे. तो सर्वादि आहे. तोच हा विश्वरथ वाहत आहे. म्हणून तो धुर्य. विश्वाचा गुरुभार त्याच्यावांचून दुसरा कोण वाहूं शकेल ? धुरा धारण करण्याची क्षमता असलेल्या पक्क्या बैलाला धुर्य म्हणतात. तो बुद्धिमान् आणि शक्तिमान् असतो गाडी वाहून शकटस्थांना तो इष्ट स्थळी पोचवतो. परमात्मा हा तसा आहे. तो या चराचराला वाहून नेत आहे. त्यांना इष्ट स्थळी पोंचवीत आहे. सर्वांच्या अंतरींचे आर्त त्याला कळतें. त्याविषयीं तो बरेवाईट न म्हणतां सहानुभूतिच राखतो. सहानुभूति राखून तें तें आर्त मायबापाप्रमाणे पुरवितो याचेच नांव सर्वभूतसुहृत्. आणि असा तो सर्वभूतसुहृत् असल्यामुळेच तो धुर्य झाला आहे. शहाण्या बैलांवर भरोसा ठेवून गाडीवान् झोंपी जातो. बैल त्याला सुरक्षित इष्ट स्थळी घेऊन जातो. परमात्मा हा तसा या विश्वाचा बैल आहे, धुर्य आहे.

३३०. वरद
वर म्हणजे आपलें अभिलषित. तें जो देतो तो वर-द होय. परमात्मा हा तसा सर्व जीवांचा अभिलषित-चिन्तामणि होय. प्रवाश्याला थारा, तहानलेल्याला पाणी, भुकेल्याला अन्न अमृत होय. परंतु तृप्तापुढे तुम्हीं अमृत ठेवले तरी त्याला त्याची मातब्बरी वाटणार नाही. त्यामुळे ज्याला ज्याची गरज आणि ओढ आहे ती त्याची मागणी पुरविणे याहून अधिक सुखकर दुसरे काही नाही. परमात्मा हा तसा "आवडीचें दान" देतो. म्हणून तो वरद होय. तुम्हीं इन्द्रपद मागितले तर तो इन्द्रपद देईल, निद्रापद मागितले तर तो निद्रापद देईल. तुम्ही वराल तें तो तुम्हांला देतो. त्यामुळे त्याच्या बऱ्यावाईटपणाची जबाबदारी सर्वस्वी तुमची आहे. 'ये यथा मां प्रपद्यन्ते तास् तथैव भजाम्यहम् ' अशी त्या वरदाची प्रतिज्ञा आहे, वराची ही अशी जोखीम असल्यामुळे सहज ज्ञानी भोळा भक्त प्रतर्दनाप्रमाणे देवाला म्हणतो-देवा, तूंच माझ्यासाठी वर वर, मला काय वरणे योग्य तें तूंच सांग. तूंच वरज्ञ आहेस. उलट प्रह्लादासारखा चतुर भक्त देवानें "वरं ब्रूहि' म्हणतांच त्याला " मला भिकारी बनवू नको " म्हणून बजावतो. तो म्हणतो.

मा मां प्रलोभयोत्पत्त्यासक्तं कामेषु तैर् वरैः ।
कामानां हृद्यसंरोहं भवतस्तु वृणे वरम् ॥


दोघांनी वर वरण्यांत अतुल बुद्धिमत्ता दाखविली आहे."आत्मानं विजानीहि । एतदेव अहं मनुष्याय हिततमं मन्ये " म्हणून देवाने प्रतर्दनाला आत्मकामना बहाल केली, तर प्रल्हादाला निष्कामता बहाल केली. दोन्ही एकच. अनात्मकाम दोहोंना हि समानच निषिद्ध आहे. वरविवेक इष्टच आहे. पण तो भक्तांचा प्रश्न आहे. पण भगवान् तर भुक्नि मुक्ति असला कोठला हि इष्टानिष्टविवेक जाणत नाही. त्याच्या लेखीं भुक्ति मुक्ति समानच अर्थ आहेत. जो जी मागेल ती भीक घालणे एवढेच ब्रीद त्याचे आहे. त्याच्या लेखी दोन्ही भिकाच.

३३१. वायुवाहन
वायुवाहन म्हणजे वायचे वाहन असणारा अथवा वायु ज्याचे वाहन आहे असा. अशा उभय प्रकारें हा समास विगृहीत करता येतो. तत्पुरुष समास घेतल्यास परमात्मा हा वायूचे वाहन आहे म्हणजे त्याचे वहन करून नेणार आहे, असा अर्थ होईल. प्राण ही जीवाची खूण आहे. जिथें प्राण आहे, चलन वलन आहे तिथे जीव आहे असे आपण ओळखतो.. गर्भिणीच्या उल्बकोशांतील हि त्या गर्भस्थ जीवाचें स्पन्दन आपल्याला ऐकू येते. अर्थात् जिथे जिथे जीव तिथे तिथे प्राण आहे. जीवच वायूचें वाहन आहे. जिथे जीव नाही तिथे प्राण नाही. म्हणूनच निर्जीवाला आपण निष्प्राण म्हणतों पण ही जीवाची खूण असली तरी प्राण हा नियम्य असून जीव नियामक होय. जीव प्राणनिरोध करून राहू शकतो. म्हणून जीव हा स्वामी होय, प्राण सेवक. आपण क्षणकाल प्राणनिरोध करूं शकतों, योगी दीर्घकाळ करू शकतात परमात्मा स्वेच्छेने, कल्पान्तीं प्राणनिरोध करून राहतो तो कल्पारम्भी परत प्राण-स्पंदन करूं लागतो.. अशा प्रकारे जीव, आ त्मा, परमात्मा हा प्राणाचा वाहक म्हणजे चालक आहे. बहुव्रीहि समास घेतल्यास वायु ज्याचे वाहन तो वायुवाहान असा विग्रह होईल. पण अर्थांत फरक होण्याचे कारण नाही. जो चालक असतो तो आपल्या वाहनावर आरुढ होऊन त्याला चालवीत असतो. अर्थात् परमात्मा वा जीव आपल्या प्राणवाहनावर आरुढ होऊन गमनागमन करतो असा भाव, निरनिराळ्या देवतांची. निरनिराळी वाहनें प्रसिद्ध आहेत. त्या वाहनांवरून त्यांच्या आगमनाची वार्ता कळते. तें वाहन त्यांचे निशाणच होय. गरुडवाहन गरुडध्वज. विष्णु आहे, तर वृषभवाहन वृषभध्वज शंकर आहे. जीवात्मा तसा प्राणवाहन प्राण-ध्वज आहे. प्राणाच्या फडफडणाऱ्या ध्वजावरून दुरूनच जीवराजाच्या स्वारीच्या आगमनाची वार्ता कळते. प्राणाच्या हालचालींनी त्याचा निकट परिचय होतो.

३३२. वासुदेव
जो सर्वत्र वसला आहे आणि सर्व ज्यांत वसले आहेत तो वासु म्हणावयाचा. आणि द्योतनशील प्रकाशस्वरूप असल्यामुळे तो देव हि होय. म्हणून वासुदेव, परमात्मा आकाशवत् सर्वांच्या आंत भरला आहे तसा सर्वांना वेढून हि राहिला आहे. "तत् अन्तर् अस्य सर्वस्य तद् उ सर्वस्य अस्य बाह्यतः" तो सर्वांचे सबाह्य अभ्यन्तर व्यापून आहे. कारण तद्भिन्न मुळी कांहीं वस्तुच नाही. " पुरुष एव इदं सर्वम् " " ईशावास्यं इदं सर्वम्" "वासुदेवः सर्वम् " हा वेद उपनिषदें गीता यांचा अनुस्यूत विचार आहे. हिन्दुधर्माचा आणि दर्शनाचा मुख्य सिद्धांत तो हाच होय. सर्व विचार आचार आणि उच्चार या सिद्धान्ताचे उपसिद्धान्त आणि विनियोग मात्र होत.

"वसुदेवस्य अपत्यं पुमान् वासुदेवः" ही व्युत्पत्ति तर प्रसिद्धच आहे. त्या वसुदेवपुत्राने गीतेंत "वासुदेव: सर्वम्" हा जो सिद्धांत सांगितला तो आत्मप्रतीति गुरुप्रतीति आणि शास्त्रप्रतीति एकवटून सांगितला आहे. "वासुदेवः सर्वम " मध्ये सोऽहंभाव प्रकटला आहे. आणि निर्गुण सगुण आणि साकार यांचे ऐक्य हि त्यांत साधलें आहे. जें तें निर्गुण ब्रह्म तोच सगुण भगवान् आणि तोच हा साकार वासुदेवावतार होय. तिन्ही बाष्प-जल-हिमवत् विभिन्न असून एकरूप होत. आणि म्हणूनच साकार-पूजा, सगुण चिन्तन आणि निर्गुण श्रद्धा अविरुद्ध असून उपपन्नच होत. म्हणूनच हिन्दु धर्मांत मूर्तिपूजेचा निषेध नाहीं वा' सगुण आराधनेचा हि नाही. निर्गुणाच्या भूमिकेवर सगुणाच्या विटेवर साकार विठ्ठल भक्तांना भेट देत उभा आहे. इथे तिन्ही एकरूपच आहेत.

३३३. बृहद्भानु
सूर्य सगळ्या जगाला प्रकाशित करतो, जाणतो. परंतु तो स्वत:ला प्रकाशित करू शकत नाहीं, जाणत नाही. सूर्य चंद्र अग्नि या सर्वांनाच हें लागू होतें. जो स्वत:लाच जाणत नाहीं तो साऱ्या जगाला तरी काय जाणणार ? त्याचें तें प्रकाशकत्व नुसते नांवाचें. तें खरें नव्हे, खरा प्रकाश केवळ एका चित् सत्तेचाच आहे. म्हणून केवळ तीच एक प्रकाशक असून तदितर सारे प्रकाश्य होत. ह्याच वर्गात अग्नि चन्द्र तारका आणि सूर्य ही तेजें येतात. म्हणूनच म्हटले आहे. -
"न तद् भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः"
यदादित्यगतं तेजो जगद् भासयतेऽखिलम् ।
यच् चन्द्रमसि यच् चाग्नौ तत् तेजों विद्धि मामकम् ॥


असें जें हें सर्वज्ञ स्वज्ञ आत्मतत्त्व तेंच सर्वज्ञ आहे. म्हणून त्यालाच बृहद्भानु म्हणावयाचे. त्याच्या पुढे सूर्यासारखीं तेजें हि अल्पच म्हणावयाची. आत्मोपलब्धिसामर्थ्यच सर्व ज्ञानाचा आधार आहे. तें असेल तर सर्व ज्ञान हस्तगतच आहे. तें नसेल तर सर्व असून नसल्यासारखेच आहे. कारण त्याची उपलब्धि होणार कोणाला ? जडमात्र चेतनपरवश आहे, पण चेतन जडवश नाही. त्यामुळे हे सारे विश्व चिद्घन परमात्म्याच्या अधीन आहे. सारे त्याचे स्व आहे. त्याच्या मालकीचे आहे. म्हणून म्हटले आहे:

ईशावास्यं इदं सर्व यत्किंच जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद् धनम् ॥


सर्व वित्त म्हणजे सर्व ज्ञान आणि सर्व धन परमेश्वराचे आहे, बृहद्भानूचे आहे.

३३४. आदिदेव
जगत्-कारण असल्यामुळे परमात्मा हा आदिदेव ' होय, या आदिदेवाचे वर्णन ज्ञानदेव असें करतात :
सर्वादि सर्वसाक्षी तो । विश्वंभर खल्विदं तो गे बाई ।
आनन्दा आनन्द तो । प्रबोधा प्रबोध तो गे बाई ।
बाप रखुमादेवीवरु तो । विटेवरी उभा तो गे बाई ॥


परमात्मा हा स्वत:च आदिरूप असल्यामुळे त्याचे आदि, त्याचे मूळ, दुसरे काय असणार ? तो अनादि आहे. झाडाला मूळ असते, पण मुळाला मूळ कुठलें ? हा सर्वादि असलेला सत्यदेव सर्वसाक्षी हि आहे. सर्वांचा ज्ञाता आहे. आणि ज्ञाताच नाही तर सुखरूप हि आहे. हा सच्चित्सुखरूप परमात्मा प्रकतीचा स्वामी असून तो या विटेवर, प्रतिदेहाच्या इष्टिकेवर, उभा आहे.

देव अनेक आहेत. पृथ्वीवर अग्नि हा देव आहे. अन्तराळांत विद्युत् देव आहे, आकाशांत वा स्वर्गात सूर्य हा देव आहे. कारण ते सर्व विद्योतमान् आहेत. पण या सगळ्या देवांचा देव, या सगळ्या प्रकाशकांचा प्रकाशक तोच खरा देव असून तोच आदिदेव म्हणजे मूळ देव म्हटला आहे. तो देवाधिदेव म्हणजे मागील नामांत ज्याचे विवरण केलें आहे तो बृहद्-भानु होय, चित्सूर्य होय. हे समस्त विश्व त्याचाच प्रकाश होय. अग्नि-विद्युत्-सूर्य हा तर त्या विश्वप्रकाशाचा एक किरणच म्हणावयाचा. या विश्वाचें तें जें मूळ चिदुपादान तोच आदिदेव असून ब्रह्म-विष्णु महेशादि वा सूर्यचंद्रतारकादि देव सगळे अर्वाचीन होत. या आदिदेवाचे नमन आद्य म्हणूनच ज्ञानदेवाने आपल्या ज्ञानेश्वरीच्या आरंभीं केलें आहे :

ॐ नमो जी आद्या । वेद-प्रतिपाद्या ।
जय स्व-संवेद्या । आत्मरूपा ॥


३३५. पुरंदर
पुरं दारयति इति पुरंदरः । जो पुर म्हणजे किल्लेकोट फोडून टाकतो, मोडून टाकतो, तो पुरंदर होय. किल्लेकोट फोडायचे ते अर्थात् शत्रूचे होत. परमात्मा हा तसा पुरंदर आहे. तो आपल्या शत्रूचे किल्लेकोट नेस्तनाबूत करतो. अर्थात् त्याला मैदानात खेचून ठेचून काढतो, ठार करतो. पण परमात्याला शत्रु कोण ? परमात्याचा शत्रु वास्तविक कोणीच नाही. पण परमात्म्याच्या ज्ञानाच्या आड येणारा तो त्याचा शत्रु म्हणावयाचा, पण मनुष्य आडवाटेला. कां जातो ? कोण त्याला आडवाटेस लावतो ? ज्याच्यामुळे मनुष्य आडवाटेस जातो, भगवन्ताला विमुख होऊन मृत्यूच्या पापवाटेस लागतो, त्याचं नाव आहे काम, भगवान् त्या परिपन्थी वाटमाऱ्या वैर्‍याचे किल्लेकोट फोडून टाकतो. गीतेंत ह्य बिलंदर वैर्‍याचे आणि पुरंदर परमात्म्याचे हे युद्ध वर्णिलें आहे. बिलंदर घूस बिळ करून त्या बाले किल्ल्यांत घुसून बसते. माणूस तिची बिळे खोदून आणि बुजवून नाहींशी करतो. घुशीला बाहेर काढून तिला ठार करतो. गीतेत हि तसेंच म्हटले आहे:

अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः ।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ गीता ३ - ३६

काम एष क्रोध एष रजोगुण-समुद्भवः ।
महाशनो महापाप्मा विध्येनमिह वैरिणम् ॥ गीता ३ - ३७

इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।
एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनाम ।| गीता ३ - ४०

तस्मात् त्वं इन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ |
पाप्मानं प्रजहीह्येनं ज्ञानविज्ञान-नाशनम् ॥ गीता ३- ४१


कामवैर्‍याची पुरें तीन आहेत: इन्द्रियें मन आणि बुद्धि. किल्ल्याला कोट असतात आणि सर्वांत आंत बालेकिल्ला असतो. सर्व मिळून तो किल्लाच. तसेंच हे. परमात्मा हा किल्ला फोडतो आणि जिंकतो. म्हणून तो पुरंदर.

अशोकस्तारणस्तारः शूरः शौरिर्जनेश्वरः ।
अनुकूलः शतावर्तः पद्मी पद्मनिभेक्षणः ॥३७॥


३३६. अशोक
मोह आणि शोक हा एक जोड चित्तविकार आहे. जिथे मोह असतो तिथेच शोक संभवतो. या दोहांना मिळून माया म्हणावयाचे. जीवाला शरीराविषयीं आणि तदनु स्वजन-धनादिकाविषयीं मोह असतो. अज्ञानजन्य तदभिमान आणि आसक्ति असते. परंतु ह्या सर्वच उपाधि नाशवंत असल्यामुळे त्या जीवापासून स्वभावत:च, त्याची इच्छा असो नसो, गळून पडत असतात. मूढ जीव त्याबद्दल शोक करतो. त्यांच्या ठाई असलेल्या आपल्या आसक्तीमुळे त्यांच्या वियोगाचे त्याला दु:ख होते. स्वरूपाविषयींच्या आपल्या अज्ञानामुळे जीवमात्र या शोकमोहाच्या चरकांत सांपडला आहे. त्यामुळे मूढ आणि शोचमान ही जीवाची नित्य विशेषणेच होत. त्याची ती लक्षणेच होत. या उलट परमात्मा हा ज्ञानस्वरूप असल्यामुळे नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव आहे. मोह आणि शोक यांचा संपर्क तिथे संभवतच नाही. म्हणून तो अशोक म्हटला आहे. अशोक म्हटला म्हणजे सहजच तो अमोह झाला. कारण शोक हे मोहाचे फळ आहे. त्याच्यांत कार्यकारणसंबंध आहे. म्हणून म्हटले आहेः

तत्र को मोहः कःशोकः एकत्वं अनुपश्यतः । सर्व उपनिषदांचे हेच तात्पर्य आहे. गीता हि उपनिषदच. किंबहुना उपनिषत्सार. तेव्हा तिचे हि तात्पर्य उपनिषदांहून वेगळे कसे असेल ? ईशोपनिषदांत

स पर्यगात् शुक्रं अकायं अव्रर्ण, अस्‍नाविरं शुद्धं अपापविद्धम् ।
कविर् मनीषी परिभूः स्वयंभूर् याथातथ्यत: अर्थान् व्यदधात् शाश्वतीभ्यः समाभ्यः ॥ "


या मंत्रांत आत्मज्ञ हा आत्मनिष्ठ कसा असतो तें विवरिलें आहे. याच्याच वरील मंत्रांत तो मोह-शोक-मुक्त असतो हे येऊन गेले आहे. गीतेची खरी .सुरवात हि, " अशोच्यान् अन्वशोचस् त्वम् नानुशोचन्ति पण्डिताः " या श्लोकाने झालेली आहे. जी गोष्ट साधक प्रयत्‍नाने साध्य करतो. ती परमेश्वरापाशी स्वतःसिद्ध असते. परमात्मा अशोक तर ज्ञानी विशोक आहे.

३३७. तारण
तारण म्हणजे तारक, तारणारा. परमात्माच एकच या मृत्युसागरांत तारण आहे. जे स्वतःच बुडते, तळ गाठते ते नश्वर. तुम्हाला काय तारणार ते बुडणार आणी बुडवणार जे शाश्वत आहे, अजर आहे. अमर आहे, तेच तारणार. असे तत्त्व एक परमात्माच आहे. आणि म्हणून तेच तारण, तेच शरण. ह्या अशा तरण तारण तत्त्वाला सोडून जे देहे नि देहानुबंधी नश्वराच्या भजनी लागतात ते मृत्यूमागून मृत्यूस प्राप्त होतात." अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि । "

मृत्युसंसारवर्त्म म्हणजे नुसतीच मृत्यूची वाट नव्हे तर मृत्यूमय वाट. ज्या वाटेवर पदोपदी मृत्यु भेट अशी वाट. हे सर्व जग नश्वर आहे. त्यातील कशाचाहि आश्रय घेतला तरी ते बुडणार आणि बुडविणार. म्हणून ते मृत्युसंसारवर्त्म होय. एक परमात्म तत्त्वच ’कूटस्थ, अचल, ध्रुव ’आहे आहे. म्हणूनच तेच एक तारण आणि शरण होय. त्याचाच जीवानें आश्रय करावा. तेच क्षेम होय. नदीकाठी मोठीमोठी कासवे असतात. त्याना दगड समजून कोणी त्याच्यावर बसतो. पण ते हळूच पाण्यात बुडतें आणि बसणार्‍याला बुडविते. तसा या जगातील नश्वराचा धंदा आहे. ते जीवाला विसाव्याचे स्थळ वाटते. तो त्यावर विसावतो न विसावतो तोच ते त्याला तळ दाखवते. म्हणून परिमार्गितव्य पद तेच होय की जे शाश्वत आहे. तेच तारण इतर सर्व बुडवण. म्हणून शाश्वत परमात्मा

हाचि आश्रय कल्याण हाचि आश्रय उत्तम ।
हाचि आश्रय पावूनि दुःखात्तूनि सुटे नर ॥ -- धर्मपद


३३८.तार
विष्णुसहस्रात ’तार’ ’तारण’ ’उत्तारण’ ही नामे आली आहेत. एकच तृ धातुची ती रुपे आहेत म्हणून समानार्थकच आहेत. सर्वांचा अर्थ तारणारा, पार उतारणारा असाच आहे. राम, रामभद्र रामचंद्र तिन्ही एकाचीच नावे. तसे हे आहे. राम्या रामा रामाराव अशाप्रकारे वयोभेदानुसार आपण एकाच माणसाला हाक मारतो. जणू ते तिघे आहेत वेगवेगळे आहेत ! आणि ज्या अर्थी तीन नामे झालीत त्या अर्थी त्यात त्रैविध्य आहे.वैविध्य आहे हे खास . राम्या शेंबडा आहे. रामा शाळकरी आहे. रामराव अधिकारी आहेत. ते एके असून अनेक आहेत. तसा परमात्मा एक असून अनेक आहे. तो निरुंद आणि उथळ पायी उतरता येइल असा, नदीचा उतार अथवा तार आहे. तो ज्याच्या आधारे तरुन जाता येइल अशी सांगड वा नाव आहे.

तारण आहे. तो नावेतून पैलतीराला सुखरुप पोचविणारा नावाडी आहे. उत्तारण आहे. परतीराला सुखरुप नेण्यासाठी जे जे सहायक ते ते सर्व तो आहे. तो वर्णाश्रमधर्मरुप तार आहे. ज्ञानरुप तारण आहे. मोक्षदानी उत्तारण आहे. नदी तुम्ही पायी उतरा , बाहुनी तरुन जा किंवा सांगड नावांच्या साधनानी पार करा. ते तुमच्या पायातील बाहूतील आणि बुद्धीतील तारक बल देहस्वामी आत्म्याचे आहे. चेतनाचे आहे. ते पाय दंड व मेंदू या जड देहावयांचे नव्हेम्हणून जगातील सर्व ज्ञान सर्व (क्रिया) बल त्या आत्म्याचे आहे. परमात्म्याचे आहे. तोच सर्व ज्ञाता सर्व कर्ता आहे सर्व धातु ज्ञानवाचक वा क्रियावाचक आहेत आणि या दोहींचे अधिष्ठान तें आत्मतत्त्वच आहे. तार तारण आणि उत्तारण या त्रिविध शब्दांचे अधिष्ठान जसा एकच तृ धातु आहे तसा तार आणि मार या समस्त विविध क्रियांचा तो परमात्माच अधिष्ठान आहे.

३३९. शूर
शूर म्हणजे निर्भय, निधड्या छातीचा. याचा विरुद्धार्थक शब्द भीरु, भ्याड, कायर, शूर, वीर, पराक्रमी हे शब्द सगोत्र आहेत, पण वेगवेगळ्या व विशिष्ट अर्थाचे आहेत. शूर म्हणजे निर्भय, संकटास न डगमगता तोंड देणारा 'युधिष्ठिर'. वीर म्हणजे वीर्यवान्, बलवान्, शत्रूवर तुटून पडणारा 'भीम'. आणि पराक्रमी म्हणजे शत्रूवर वा संकटावर तुटून पडणारा आणि विजयी होणारा 'अर्जुन'. जीवनाच्या समरांत कीर्तिमंत व्हायला निर्भयता, सहनशीलता आणि धडाडी तिन्ही गुण अपरिहार्य आहेत. पण विजयी व्हायला दैवाची अनुकूलता हि हवी. ती नसेल तर दूतांत हारी मागून हार खाणाऱ्या युधिष्ठिरासारखी गत व्हावयाची. पांडव द्यूतात हरले, युद्धांत जिंकले; पण ही हार-जीत मानव-प्रयत्नाधीन नाही. ती सर्व ईश्वराधीन माहे. "कर्मण्येवाधिकारस् ते, मा फलेषु कदाचन' "निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्' "अहंकारविमुढात्मा कर्ताहमिति मन्यते" "स्वभावस तु पवर्तते" इत्यादि गीता-वचने हे स्पष्ट सांगत आहेत, कर्म आणि कर्मफल या दोहोंच्या हि बाबतीत तो केवळ परतंत्र आहे. आणि तो 'पर' म्हणजे परमेश्वर होय. त्यालाच शरण जाणे आणि 'करिष्ये वचनं तव' म्हणणे हेच ज्ञान, आणि हीच भक्ति होय. हेच धैर्य आणि शौर्य होय." हें चि शूरत्वाचे अंग । हारी आणिला श्रीरंग " असें म्हणूनच तुकारामाने म्हटले आहे. ज्याला शरण जाण्यांत शूरत्व आहे तो स्वत: किती शूर म्हणावा ? तो परम निर्भय आहे. सर्व मृत्यूला भितात, पण मृत्यूची मात्रा त्याच्यावर चालत नाही. इतकेच नव्हे तर मृत्युच त्याला भितो असा तो परमात्मा शूर आहे. त्याच्या शौर्याचे पोवाडे म्हणजे पुराणें होत. दशावतारांची नि शतावतारांची चरित्रे म्हणजे त्याच्या शौर्याचेच पोवाडे होत. एवढे ज्याचे शौर्य प्रसिद्ध आहे तो शूर आहे म्हणून काय सांगायला पाहिजे ? अमुक एक कर्म, शुभ वा अशुभ, करणे वा न करणे जीवाच्या अधीन नाही. 'कार्यते ह्यवश: कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः' अधर्म्य द्यूत वा धर्म्य युद्ध पांडवांना टाळूनहि टळले नाही त्यांतील हार आणि जीत हि त्यांच्या स्वाधीनची गोष्ट नव्हे. तें सर्व पराधीन आहे.

३४०. शौरि
शूर म्हणजे निर्भय पराक्रमी. अशा लोकांचा जो देश तो शूर (वा शूरसेन) देश. आणि लोक हि शूर म्हणूनच ओळखले जात. या हि अर्थाने परमात्मा हा शूर होय. तो शूरांच्या देशांत आणि कुळांत जन्मला म्हणून, शूर-वंशीय म्हणून शूर. तसाच शूर जो वसुदेव त्याचा पुत्र म्हणून तो शौरि हि म्हटला जातो.

भगवान् कृष्णाने आपल्या बाललीलांनी, तरुण पराक्रमांनी आणि वृद्ध ज्ञानाने संपूर्ण शूर वंश प्रकाशित केला म्हणून हि तो शूरकुलदीपक शौरि म्हणवितो. असा भगवान् कृष्ण हा शूर पित्याचा, शूर समाजाचा आणि शूर राष्ट्राचा वंशधर-शिरोमणि म्हणून शौरि होय.

शौरि हे परमात्म्याचे गौण म्हणजे गुणवाचक नाम आहे. पण हे तर व्यक्तिवाचक झालें, व्यक्तिवाचक या अर्थाने तें गौण म्हणजे गुणभूत, अंगभूत होय, प्रधान नव्हे. प्रधान तर गौण म्हणजे गुणवाचकच होय. तथापि व्यक्ति हि गुणामुळेच व्यक्त झाली, प्रसिद्ध झाली, हे जर आपण लक्षात घेतले, तर जें वैयक्तिक म्हणजे व्यक्तिवाचक म्हटलें तेंच मूलत: गौण म्हणजे गुणवाचक ठरते. अशा प्रकारे पाहिले म्हणजे विष्णु-सहस्रांतील वैयक्तिक भासणारी नामें हि वस्तुत: गौणच आहेत, असे दिसून येईल. आणि त्याबरोबरच शौरि हें नाम हि गुणवाचक आहे असें म्हणता येईल.

व्यक्ति ही अशुद्ध खनिजासारखी असते. तिच्यांत धातूबरोबर हीण हि मिसळलेले असते. पण खनिजाची किंमत धातूवरून होते, हीणावरून नव्हे. तशी गुणावरून व्यक्तीची किंमत व्हावी, अवांतर दोषांवरून, अवगुणावरून होता कामा नये. ही गुणदृष्टि आली तर मनुष्य सारग्राही बनेल आणि सुखी होईल. विष्णुसहस्र हीच दिव्यदृष्टि देते. ती मिळवून जीव परमहंस होतो मग सर्वत्र त्याला एकच एक निखळ ब्रह्म अनुभवते. निवडानिवडीला अवकाशच उरत नाहीं.

३४१. जनेश्वर
शूर- 'शौरिर् जनेश्वर: । ५०; शौरिः शूरजनेश्वरः । ८२; जायते इति जनः, जन्तुः । जनानां ईश्वरः जनेश्वर:' अशा प्रकारें जनेश्वर म्हणजे सर्वजीवेश्वर होय. परमात्मा हा सर्व जीवांचा, आब्रह्मस्तम्बपर्यंतच्या उच्चावच समस्त जीवांचा पास्ता आहे. सर्व व्यक्ति त्या अव्यक्त परमात्म्याच्या आहेत. त्या सर्व अव्यक्तांतून येतात, अव्यक्ताच्या प्रेरणेनुसार क्षणभर खेळ करतात आणि परत अव्यक्तांत विलीन होतात. एवं अव्यक्त सागरावरील लहरीच त्या. सर्व जन म्हणजे व्यक्ति, अव्यक्ताधीन होत. म्हणून त्या अव्यक्त परमेश्वराला जनेश्वर म्हणावयाचे.

जीवेश्वर या नात्याने परमात्मा जनेश्वर आहेच पण जीवविशेष जे मानव त्यांचा तो विशेषतः ईश्वर होय. म्हणून हि तो जनेश्वर म्हणावयाचा. मानवाला आपल्या स्वरूपाचें म्हणा वा पररूपाचें म्हणा ज्ञान होण्याची पात्रता आहे. म्हणून परमात्मा हा विशेषतः जनेश्वर म्हणजे नरेश्वर म्हणावयाचा. मानवेतर जीवांना ईश्वराचे म्हणजे आपल्या स्वरूपाचे वा पररूपाचे ज्ञान होण्याची शक्यताच नाही. कारण ते राजस तामस उपाधींनी बद्ध आहेत. तथापि त्यांना त्याचे भान होऊ शकते.

परमात्मा जनेश्वर म्हणजे मानवेश्वर म्हटला.तरी मानवांत हि कांहीं वंश-विशेष असतात. त्यांत तो आविर्भूत होतो. म्हणून तो त्या वंशजनांचा ईश्वर म्हणवतो. म्हणून इथे जनेश्वर म्हणजे शूरजनेश्वर असा अर्थ प्रतीत होतो "शूरः" आणि "शौरिः" या पदांच्या साहचर्याने. आणि गम्मत अशी की हीच पदें पुढे श्लोकांत किंचित् क्रमभेदानें आवृत्त झाली असून तिथे स्पष्टच 'शूरजनेश्वरः' असें पद आले आहे. इथे 'शूरः शौरिर जनेश्वरः, अशी तीन पदें आहेत, तर तिथे 'शौरिः शूरजनेश्वरः' अशी दोनच पदें आहेत. दोन्ही चरण वस्तुतः एकार्थकच आहेत. किंबहुना अभिन्नच आहेत. तात्पर्य हे की तो जो अव्यक्त परमात्मा तोच हा मानव-रूपाने शूरपुत्र शूरजनेश्वर वासुदेव म्हणून व्यक्त झाला आहे, अवतीर्ण झाला आहे.
इथें जन म्हणजे (१) जीव, (२) मानव आणि (३) शुरजन असा त्रिविध अर्थ लक्षून व्याख्यान केलें आहे.

३४२. अनुकूल
परमात्मा हा सर्वांचा स्वात्मा आहे. त्यामुळे सर्वांना तो सानुकूल आहे. त्याहून अधिक हितैषी आणि सुखकर दुसरा कोण बरे असू शकेल ? जगांत जीवाला माउलीहून अधिक निकट जिव्हाळ्याचे आप्त हितैषी कोणते हि नातें नाही. म्हणून अशा जिव्हाळ्याच्या नात्याला, संबंधाला माउली म्हटलें जाते. श्रुति-माउली, गुरु-माउली असे शब्दप्रयोग त्यांतूनच उत्पन्न झाले आहेत:

पै अहितापासौनि काढिती । हित देऔनि वाढविती
नाहीं गा श्रुतिपरौती । माउली जगा ॥


ज्या कारणास्तव ज्ञानदेव श्रुतीला, वेदांना, माउली म्हणतात, त्याच कारणास्तव लोक ज्ञानदेवांना गुरु-माउली म्हणतात. पण त्याच ज्ञानदेवांनी आत्म्यालाहि माउली म्हटले आहे आणि ती आत्म-माउलीच खरोखर खरी आणि पुरी माउली आहे सर्वांची. शंकराचार्यांनी म्हटले आहे. "कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति" एकवेळ कुपुत्र कुठे असू शकेल पण कुमाता मात्र शोधूनहि कधी कुठे आढळावयाची नाही. पण जगांत केव्हां केव्हां कुमाताहि आढळून येतात, पण आत्म-माउली ही अशी आहे की, तिच्या विषयी मात्र शंकराचार्यांचे वचन शंभर टक्के खरे आहे. तिच्याइतकी अनुकूल, उजू, कोणीच असू शकणार नाही. निज आत्म्यासारखा अनुकूल निज आत्माच ! आणि म्हणून तो सर्वांचा निजात्मा, तो सर्वात्मा परमात्माच अनुकूल होय. इतर अनुकूल होणारे देवादि सकारण अनुकूल होणारे आणि म्हणून क्षणिक अनुकूल होत, परंतु परमात्मा हा अकारण अनुकूल होय, सदैव अनुकूलच होय,

३४३. शतावर्त
ज्याला नदी पार करायची आहे, त्याला कधीं वारा अनुकूल असतो, कधी प्रतिकूल असतो. त्याला नदीप्रवाह केव्हां संथ आणि सरळ असतो, केव्हां क्षुब्ध आणि शतावर्त असतो. अनुकूल आणि शतावर्त हे शब्द साहचर्याने सदर अर्थ सूचित करतात. जो " निर्दोषं हि समं ब्रह्म " हे तत्त्व जाणतो, अर्थात् साम्ययोग आचरतो, त्याला सर्व जग सम म्हणजे अनुकूल होते. समदृष्टि आणि साम्ययोग तो हाः

समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् ।
न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् ॥ गीता १३ -२८


ही समदृष्टि आणि योग ज्याला अवगत नाहीं, जो विषम पाहतो आणि विषम वागतो, अर्थात् जो अहंता-ममता-वश आहे, त्याला हा सगळा संसार शतावर्त आहे. तो आपल्या विषमदृष्टीमुळे एका आवर्तातून निघून दुसन्या आवर्तात सांपडतो. त्याला हे जग, हे जीवन शतावर्त आहे. कोणी कितीहि चतुराई केली, तरी तो गोत्यांत आल्याखेरीज राहत नाहीं. गळ्यांत धोंडे अडकवून कोणी पोहूं लागला, तर तो तरणार कसा ? तो मुळीं शीघ्रातिशीघ्र आणि बिनचूक बुडण्याचाच बंदोबस्त ! तात्पर्य, ज्याला तरायचे आहे, त्याला तो अनुकूल आहे. ज्याला बुडायचे आहे, त्याला तो शतावर्त आहे.

जो तरू इच्छीत नाही, ज्याला बुडायचेच आहे, त्याची हि तो शतावर्त होऊन सोय करून देतो ह्यांत हि त्या परमात्म्याची अनुकूलताच आहे. केवढे हे स्वातंत्र्य ! पण असें भयंकर स्वातंत्र्य देऊनच तो अनुकूल नाहीं तर जितके वेळां जीव बुडू जातो तितके वेळां त्याला तारण्यासाठी तो शतशतदा अवतार घेतो, शतावर्त होतो, म्हणूनहि तो अनुकूल होय. तो अनुकूल असून शतावर्त आहे, शतावर्त असून अनुकूल आहे.

३४४ पद्मी
पद्मी म्हणजे पद्मधर. सत्त्वमूर्ति भगवान् विष्णु परमात्म्याची पालिनी कला आहे आणि जीवजगताला तीच उपास्य आहे. पण तिची उपासना म्हणजे अंशाची उपासना असें होईल. उपासना समग्राची करायची असते, अंशीची करायची असते, अखंडाची करायची असते. खंडाची वा खंडिताची उपासना उपासनाशास्‍त्रांत निषिद्ध आहे. अर्थात् जे कोणतें उपास्य घ्यावयाचें तें सकल, एकमेवाद्वितीय, परमात्मस्वरूप म्हणून घ्यावयाचे असते. मग तुम्ही गणेश, सूर, शक्ति, शिव वा विष्णु कोणतेंहि कां घ्या ना, त्यांत कांहींच विशेष नाही. जें कांहीं वेगळेपण असतें तें वरवरचे आणि गौण असेल. रुचिवैचित्र्यामुळे असेल, तेव्हां विष्णूची जी उपासना करायची ती, तो एकमेवाद्वितीय परमेश्वर म्हणून करावयाची. त्रिमूर्तीपैकी एक म्हणून नव्हे. विष्णूचें हें परमेश्वरत्व तो चतुर्भुज शंकचक्रगदापद्मधर म्हणून कल्पून द्योतित केले आहे. सर्व सृष्टीचा तो कर्ता आणि संहर्ता आहे हे त्याच्या हातात शंख आणि चक्र देऊन सूचित केले आहे. हे सर्व विश्व अव्यक्तस्वरूप शून्यमूलक आहे हे शंखाने, तसें तें कालग्रस्त आहे हे दुसऱ्या हातांतील कालरूप चक्रानें सूचित होते. हे विश्वाचें तात्त्विक निदर्शन झाले. व्यावहारिक स्वरूप म्हणजे तें परमेश्वराच्या निग्रहानुग्रहाने चालले आहे, असें गदा आणि पद्म यांनी सुचविले आहे. धर्मपरिपंथी दुष्टांचा निग्रह गदा करते, तर धर्मानुवर्ती सज्जनांचा अनुग्रह पद्म करतें म्हणून तो पद्मी म्हटला आहे. शंख सृष्टीची उत्पत्ति, चक्र संहृति आणि गदा व पद्म ही तिची स्थिति सूचित करून परमेश्वराचें सर्वशक्तिमत्त्व, सृष्टियुत्पत्तिस्थितिलयकारी अद्भुत सामर्थ्य, प्रकट करीत आहेत. ऊर्ध्वहस्तद्वयगत शंखचक्र विश्वाची उत्पत्ति आणि लय तर निम्नहस्तद्वयगत गदापद्म त्या विश्वांतील प्रजांचे पालन सूचित करतात. गदा संहारसूचक नसून प्रजा-पालनांतर्गत केवळ दुष्टनिग्रहरूप होय. दुष्ट-निग्रह केल्यानेच प्रजांचे रक्षण होते. म्हणून दुष्ट-निग्रह हि पालनच होय. पिकाचे निंदण म्हणजे पिकाचे संगोपन व संवर्धनच होय तद्वत्.

३४५. पद्मनिभेक्षण
परमात्म्याने ही सृष्टि निर्मिली. तिचे पालन तो करतो आहे आणि संहार हि. परंतु या जगद्व्यापारांत कर्तृत्व-भोक्तृत्वानें तो स्पृष्ट वा श्लिष्ट होत नाही. ही जी त्याची असंगता ती पद्म पदाने द्योतित केली आहे. कमलदलावर पाणी चिकटत नाही. इतर कोणत्याहि पुष्पांत व पुष्पदलांत ही खुबी नाही. म्हणून पद्मदल घेतलें. नेत्राला पद्मदलाची उपमा देतात, कारण तें नेत्र पद्मदलाच्या पाकळीप्रमाणे आकृत, आरक्त आणि प्रसन्न असते. अक्षिगोलक आणि त्याच्या भोवतीच्या उघडझाप करणाऱ्या पापण्याच जशा, अशा सारखा पद्मकोष आणि त्याच्या पाकळ्या आहेत. त्या हि उघडतात मिटतात. इत्यादि सादृश्यामुळे पद्माची उपमा नेत्राला योग्यच आहे. पण इथे ती मुख्यत: पद्मपत्राची अलिप्तता लक्षून दिलेली आहे. येथील ईक्षण शब्द हि सूचक आहे. ईश्वर कर्ता, भोक्ता म्हणविला जातो, परंतु वस्तुत: तो केवळ द्रष्टा आहे. हे त्याचे केवळ द्रष्टुत्व ईक्षण शब्दानें सूचित केलें आहे. अर्थात् अकर्तृ-अभोक्तृस्वरूप केवल द्रष्टुत्व प्रकट करणारा हा ईक्षण शब्द आहे. या विशेषाचे इतकें महत्त्व वाटतें सहस्रकाराला की, ह्याच अर्थाचे अन्य शब्द मागे हि येऊन गेले आहेत आणि पुढे हि आले आहेत. 'पुष्कराक्ष' (५,५९), 'पुण्डरीकाक्ष' (१२), प्रस्तुतचा 'पद्मनिभेक्षण' (३७), लगेच पुढील श्लोकांत 'अरविन्दाक्ष' (३८) अशी ही समानार्थक नामें आली आहेत. ग्रन्थतात्पर्याचा निर्णय ज्या गमकांवरून केला जातो त्यांत अभ्यास हे हि एक गमक मानले आहे आणि ह्या नामाचा म्हणजे, त्याच्या आशयाचा अभ्यास पांचदा झालेला आहे. 'श्रीमान्' 'प्राणद' इत्यादि नामें चार चार वेळां आलीं आहेत,पण पांचदां आलेले अर्थात आशयाने अक्षरश: नव्हे- हेच एक नाम आहे असें न म्हणतां आलें तरी अशा बह्वभ्यस्त नामांपैकी हे एक आहे एवढें खास.

पद्मनाभोऽरविन्दाक्षः पद्मगर्भः शरीरभृत् ।
महर्ध्दिर्ॠध्दो वृध्दात्मा महाक्षो गरुडध्वजः ॥३८॥३४६. पद्मनाभ
पद्म तळ्यांत उगवते. त्याचे मूळ दिसत नाही. त्याला अनेक पाकळ्या असतात. त्या उघडतात भिटतात. त्याच्यायोगे तळे शोभायमान होते. तसें हें विश्व अनेक जगतांचे मिळून बनलेले आहे. त्याचेहि मूळ दिसत नाही. त्याची उघडझाप, संकोच-विकोच, चालूच असतो. त्याच्यायोगें अव्यक्त-जलाशय शोभायमान आहे. असे हे लोकपद्म ज्याच्या नाभीतून निघालें तो अक्षर अव्यय भगवान् विष्णु अव्यक्त क्षीरार्णवाच्या तळाशीं पहुडला आहे. अव्यक्ताची अथांग आणि अपरंपार जलराशि लोकपद्माच्या योगें शोभत आहे, प्रकाशत आहे. हे. व्यक्त लोकपद्म आहे, म्हणून त्या अव्यक्ताचे आणि त्याच्या हि तळाशी दडलेल्या अक्षराचे भान होते. हे लोक-पद्म नसते, तर ते कुठून आले, त्याचे मूळ वा कंद कोणता, इत्यादि जिज्ञासा झाली नसती आणि त्या जिज्ञासेची निवृत्ति जें तत्त्वज्ञान ते हि झाले नसते. पद्मनाभ हें परमात्म्याचें नाम हा सगळा आशय प्रकट करतें. लोकाला जसें पद्म तसें अण्डहि म्हटले जाते. पुढील श्लोकांत वरीलच आशय व्यक्त झाला आहे.

नारायण: परोऽव्यक्तात् अण्डम् अव्यक्त-संभवम् ।
अण्डस्यान्तस्त्विमे लोकाः सप्तद्वीपा च मेदिनी ॥


हाच आशय पद्‌नाभ पदाला लक्षून मी असा रचीन:
पद्मकन्दोऽक्षरं ब्रह्म नालं अव्यक्तमुच्यते ।
लोकपद्ममिदं यत्र उन्मीलति निमीलति ॥


कल्पारंभी लोकपद्म फुटते, कल्पान्तीं तें गळून . पडते. परंतु कंद हा सदैव अक्षर अव्यय असा विद्यमानच असतो तोच पद्मनाभ होय.
पद्मनाभ हें नाम केरळांत विशेष प्रचलित आहे. केरळच्या राजाचे कुलदैवत पद्मनाभ स्वामी आहे. त्याचे तिथे भव्य मंदिर आहे.

३४७. अरविन्दाक्ष
पुष्कराक्ष, लोहिताक्ष, पुण्डरीकाक्ष आणि हा प्रस्तुतचा अरविन्दाक्ष असे अनेक समानार्थक शब्द सहस्रांत आले आहेत. पण समानार्थक म्हणजे एकार्थक नव्हे. त्यांत छटांचे वैचित्र्य आहे. अभिप्राय-विशेषांचें वैचित्र्य आहे. कमल, पद्म, पुष्कर, अरविन्द, पुण्डरीक आणि सदृश अनेकानेक कमलवाचक शब्द आहेत. ते सगळे सरूप असले तरी एकरूप नाहीत. त्या त्या नामांचे वैशिष्ट्य कालबळाने लोप पावल्यासारखे आहे. तथापि, त्या वैशिष्ट्याचे किंचित् अनुमान करता येण्यासारखे आहे. कं जलं अलंकरोति इति कमलम् । पदात् पदान्तरं पद्यते इति पद्म । पुष्णन् करः पुष्पयुक्तः करो वा इति पुष्करम् । अरान् अरचक्रवत् दलान् विन्दते इति अरविन्दम् । अरविं कमलकन्दं ददाति इति वा अरविंदम् । सध्यां अळूच्या कंदाला हिन्दींत अरवी म्हणतात, परंतु तो मूळचा कमलकंदवाचक असला पाहिजे, असें ह्या अरविंद शब्दावरून दिसून येते. तथापि, तात्पर्यार्थाने सर्व एकच. सर्वच कमलें निर्लेप आहेत, प्रसन्न आहेत, पवित्र आहेत आणि त्यामुळे भगवनेत्रांना आणि इतर हि अवयवांना त्याची उपमा दिली जाते. पावित्र्यरूप अन्त:सौंदर्याबरोबर कमलाच्या ठाईं बाह्य रूपसौंदर्यहि भरपूर आहे. त्यामुळे त्याची उपमा भगवदवयवांना देणे उचितच होय. कमल हे गुणसुंदर तसें रूपसुंदर आहे, म्हणजे अन्तर्बाह्य सर्वांगसुंदर आहे. सर्वांगसुंदर परमेश्वराला तशाच उपमानाची उपमा देता येईल. जगांत सामान्यतः श्री आणि सरस्वती यांचे सख्य नाही असे मानले जाते. पण पद्माच्या ठाई लक्ष्मी आणि सरस्वती दोघींनीहि निवास केला आहे. सरस्वती ही अन्त:सौंदर्यरूप ज्ञानात्मक आहे म्हणून तिचे आसन श्वेत पद्म, तर लक्ष्मी ही बाह्यसौंदर्यरूप पोषणात्मक सुवर्णवर्ण म्हणून तिचे आसन रक्त कमल मानलें आहे इतकेंच. वस्तुतः ती कमलाच्या अन्त:सौंदर्याची व बाह्यसौंदर्याची प्रतीकें मात्र होत. परमात्मा हा असा अरविन्दाक्ष आहे.

३४८. पद्मगर्भ
हे लोकपद्म कल्पारंभी परमात्मकंदाच्या ठाई अव्यक्तरूपाने निभृत असते म्हणून तो परमात्मा पद्मगर्भ म्हटला आहे. सृष्टीत आपण पाहतों की, उद्भिज्ज वृक्ष, वनस्पति, ओषधि इत्यादि आरंभी बीजांतून उत्पन्न होतात आणि परत शेवटी बीजांतच परिणत होतात. तशी ही समस्त व्यक्त सृष्टि आरंभी अव्यक्ताच्या ठाईं निभृत असते आणि शेवटी तिथेच निहित होते. हा क्रम कल्पारंभी आणि कल्पान्ती नि:शेष रूपाने तसा प्रत्यहीं हि होतच असतो. समस्त भूतजात रोजच्या रोज सुषुप्तींत आपलीं नामरूपं विसर्जित करून त्या अव्यक्ताच्या ठाई एकीभूत होत असतात. तिथे कोणी ब्राह्मण नाहीं, कोणी चांडाळ नाही, तिथे कोणी वाघ नाही, कोणी गाय नाही, कोणी हत्ती नाहीं, कोणी मशक नाही. सर्व भेद तिथें नाहींसे होतात. हा अमृतानुभव रोजच्या रोज जीवाला येतच असतो, परंतु अज्ञानामुळे जीव तो विसरतो, ज्ञानी विसरत नाही. तो व्यवहारकाळीहि तें आपलें अद्वैत ओळखून असतो. व्यक्तांत दिसणारे द्वैत वा नानात्व औपधिक अतएव तात्कालिक आहे हे तो ओळखून असतो आणि तद्नुसार साम्ययोग आचरीत असतो. गीतेत म्हणूनच पंडिताचे लक्षण,

विद्या-विनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥ गीता ५ -१८


असे दिले आहे आणि नाथासारख्यांनी रामेश्वराला वहायची कावड वाटेंत भेटलेल्या तृषार्त गाढवाला समर्पिली आहे. पितरांचे श्राद्धान्न भुकेल्या महारामांगांना वाढले आहे. नाथांचे जीवन म्हणजे गीतेच्या आदर्शाचे प्रत्यक्ष उदाहरणच होय. हे लोकपद्म त्या परमात्म-कंदापासून ज्पन्न झालेलें आहे हे जो ओळखतो तो त्याच्या वैचित्र्याने मोह पावत नाही. तो समदर्शी होतो.

३४९. शरीरभृत्
परमात्मा हा सर्व शरीरांचे अन्नरूपाने भरण करतो, म्हणून तो शरीरभृत् होय. शरीर म्हणजे शेवटी शीर्णच होणारें, त्याला अन्नादिकाच्या योगें रोजच्या रोज आणि वेळच्या वेळी जर नीट लिंपिलें माखलें नाहीं तर तें टिकतें तेवढेंहि टिकावयाचें नाही. म्हणून त्याला देह अशी हि दुसरी संज्ञा आहे. अर्थात् देह म्हणजे दिग्ध, लिंपलेला-माखलेला, आत्याला चिकटलेला पिंड. जीवरूपानें परमात्मा सर्व देहांना आत्मीयतेनें, ममतेने, सांभाळीत व पाळीत-पोषीत असतो, म्हणून तो शरीरभृत् ठीकच म्हटला आहे. शरीर जड, ते आपली काळजी काय घेणार ? त्याची काळजी चेतनालाच घ्यावी लागणार ! म्हणूनहि परमात्मा, आत्मा, जीवात्मा हाच शरीरभृत् म्हणावयाचा.

भृत् म्हणजे भरण करणारा असा अर्थ लथून वरील विवेचन केले आहे. परंतु भृत हे पद ज्या नामांच्या शेवटी आले आहे, ती नामें पाहिली तर भृ म्हणजे भरण करणे यापेक्षां धारण करणे अशाच अर्थाने तें पद आले आहे असे दिसून येईल. विष्णुसहस्रांत अशी पदे पुढीलप्रमाणे आली आहेतः गुणभृत्, देवभृत्-गुरु, प्राणभृत्, भारभृत्, भूतभृत्, यज्ञभृत्, शंखभृत्, शरीरभूतभृत् आणि हे प्रस्तुतचे शरीरभृत्. तेव्हां शरीरभृत् म्हणजे शरीरधारी असा अर्थ झाला. सर्व शरीरें शारीरक आत्म्याने धारण केलेली आहेत हे उघडच आहे, गाडी जड, ती आपोआप चालत नाहीं.. तिला चालक लागतो तसा या शरीराचा धारक, पोषक, चालक तो परमात्मा आहे, तोच त्याचें धारण आणि भरण--पोषण करीत आहे. म्हणून तो शरीरभृत्. निरुपपदप्रयोगावरून ती सर्वशरीरभृत् होय. " कां रायाचे देह चाळूं । रंका परौतें गाळू । हें न म्हणेचि कृपाळु । प्राणु पैं गा ॥ " तो प्राणरूपाने सर्वांची शरीरें समान धारण करीत आहे. भूभृत्सारखे लौकिक शब्दहि भृ धातु भरणवाचकापेक्षा धारणवाचकच अधिक असल्याचे निदर्शक आहेत. दोन्ही अर्थ एकवटून " भृ पालन करणे " असा अर्थ निष्पन्न होतो.

३५०. महर्द्धि
ज्याची ऋद्धि म्हणजे विभूति, वैभव मोठे तो महर्द्धि, परमात्मा. घरेंदारें, शेतीवाडी, गुरेढोरें, नोकरचाकर, सोने नाणे, हिरे-माणके इत्यादि म्हणजे ऋद्धि होय. सदर ऋद्धि सुखवस्तु गृहस्थाजवळ असते. त्यापेक्षा मांडलिक, राजा, महाराजा, द्वीपपति, पृथ्वीपति, लोकपाल इत्यादि उत्तरोत्तर समृद्ध पदें होत. पण जो ह्या समस्त विश्वाचा अधिपति आहे त्या परमेश्वराहून अधिक समृद्ध कोण बरें अतूं शकेल ? सर्व जीव अभिमानी आहेत. मुंगी आपल्या देहाचा नि गेहाचा अभिमान बाळगते आणि ब्रह्मदेवहि बाळगतो. एक अति तुच्छ, एक अति उच्च, एक " अणोः अणीयान् ", एक " महतो महीयान्." पण दोन्हीहि अहंममताभिमान-निबद्ध. अर्थात् परिमितच, अभिमान म्हटला की परिच्छेद, मर्यादा आली. परंतु ज्याला असा अभिमान नाहीं तें आत्मतत्त्व यच्चयावत् चराचर विश्वाचा स्वामी होय. तें निरभिमान असल्यामुळे त्याला स्वामी म्हणणेहि त्यावर आरोप करणेच होय. पण ज्याअर्थी जड हे स्वत:चे स्वामी होऊ शकत नाही त्याअर्थी चेतनाकडेच तें स्वामित्व जातें. हे चेतन सर्वगत असल्यामुळे त्याचीच सर्वत्र सत्ता आहे, त्याचेच सर्वत्र स्वाम्य आहे. म्हणून तो परमात्माच महर्द्धि म्हणावयाचा. इतर सारे उच्चावच आब्रह्मपिपीलक जीव अल्पर्द्धिच होत.

परमेश्वराचे हे महर्द्धित्व, हे वैभव प्रकट करण्यासाठी त्याचें ईश्वरी रूप अनेकदिव्याभरण, दिव्यमाल्यांबरधर दिव्यगन्धानुलेपन असें सर्वाश्चर्यमय परमर्दियुक्त वर्णिले आणि रेखिले जाते. परमेश्वराचे हे महर्दियुक्त दर्शन, हे महाविभूतिदर्शन केवळ अनन्य भक्तीनेच होऊ शकतें.

३५१. ऋद्ध
महर्द्धि हे पद कर्मधारय की बहुव्रीहि म्हणावें ? बहुव्रीहि म्हटल्यास तें आणि ऋद्ध हे पद जवळजवळ एकार्थकच होईल. म्हणून तें कर्मधारय म्हणायला हरकत नाही. विश्वोत्पत्ति , विश्वस्थिति आणि विश्वलय करणारी जी महती शक्ति तीच महर्द्धि होय, बीजशक्तीच्या ठाईं संपूर्ण विराट वृक्ष प्रकट करण्याचे, त्याचें धारण करण्याचे नि तो परत आपल्या ठाईं सांठविण्याचे सामर्थ्य निहित असते, म्हणून ती बैजिक शक्तिच खरोखर महती ऋद्धि, महर्चि, म्हटली पाहिजे. ही ऋद्धि त्या ऋद्धिमंत परमेश्वराहून वस्तुत: वेगळी नाही. परंतु अंशीचें संदर्शन अंशश: त्याचे दर्शन केल्यानेच होते. म्हणून अंशांचे पृथक् स्मरण हि अंशिस्मरणच होय. महर्द्धि-पदाप्रमाणे परर्द्धि-पद हि पुढे आलेलें आहे. तें हि असेंच आहे.
इथे जें ऋद्ध पद आले आहे तें व्यक्तिवाचक म्हणजे अभिव्यक्तिवाचक आहे. विश्वरूप हेच परमेश्वराचे ऋद्ध वा समृद्ध रूप होय, विश्वाहून अधिक समृद्ध दुसरे काय बरे असू शकेल ? अव्यक्त रूप हे शून्य नव्हे, पण ते आम्हांला गोचर होत नाहीं म्हणून त्याला आम्ही ऋद्ध वा समृद्ध म्हणूं शकत नाहीं. जो समृद्ध असतो, त्याच्या अंगोपांगी आभूषणे झळकत असतात. तो रिक्त असत नाही. तसा शाखोपशाखांनी आणि पत्रपुष्पफलसमृद्धींनी जो बहरलेला आहे तो हा परमेश्वरी विश्ववृक्षच समृद्ध वा ऋद्ध म्हणावयाचा. ज्या अव्यक्ताला देह नाहीं, नामरूप-गुणकर्म-फल इत्यादि कांहीं नाहीं त्याला समृद्ध कसें म्हणणार ? तो आकाशवत् शून्य म्हणजे रिक्तच म्हटला पाहिजे. त्याच्या विरोधांत व्यक्त विश्वाकार ऋद्ध होय. अव्यक्त परमात्मा व्यक्त विश्वाकाराने ऋद्ध झाला आहे.

३५२. वृद्धात्मा
वृद्ध आहे आत्मा म्हणजे बुद्धि ज्याची तो वृद्धात्मा होय. अर्थात् परिणत-प्रज्ञ. शरीराचें म्हातारपण दोषास्पद आहे. कारण त्यांत बलाचा अभाव आणि रोगांचा प्रभाव होतो. परंतु बुद्धीची. प्रगल्भता, तद्रुप वृद्धता दोषास्पद नसून गुणगौरवास्पदच होय. म्हणून वृद्धात्मा म्हणजे परिणत-प्रज्ञ परमात्मा होय. " ज्ञानं वृद्धोपसेवया " जे म्हटले आहे ते अशा परिणत-प्रज्ञांनाच अनुलक्षून होय. वयाबरोबर येणारें वृद्धत्व हे हि वृद्धत्वच होय. चार पावसाळे ज्याने जास्त पाहिले आहेत त्याच्या ज्ञानात भर पडलीच आहे असे समजावयाला हरकत नसावी. पण हे अति सामान्य वृद्धत्व होय. सामान्य असले तरी त्यांत महत्त्व त्याच्या ज्ञानालाच आहे, हे विसरता येत नाही. म्हणून वृद्धत्वाचे रहस्य ज्ञानवत्तेत आहे, क्षीणायुष्ट्वांत नाही. ज्ञानवत्ता हीच वृद्धता असेल, तर तें ज्ञान पूर्णत्वाने कुठे आढळावयाचें ? जिथे ज्ञान केवळ म्हणजे निरुपाधि, निखळ असेल तिथे. असें निखळ ज्ञान देहवंताच्या ठाईं कसें कल्पितां येईल ? कारण देह हा मुळीं अविद्या-काम-कर्मजनितच आहे. म्हणून निरुपाधि पांचभौतिक-लिंग-कारण देहत्रय-निरपेक्ष असा जो केवळ विदेह चिन्मात्रमूर्ति परमात्मा तोच प्रज्ञानघन वृद्धात्मा होय. सर्व ज्ञान त्याच्याच ठाईं आहे. तथापि या स्थितीच्या अति निकटची स्थिति म्हणजे ज्यांनी ज्ञानोपासनेने आपली अविद्या, काम नि कर्में परिक्षीण केली आहेत, हा चालू देह ज्यांचा शेवटचाच आहे, त्या अवधूतांची होय.

३५३. महाक्ष
महान्तौ चन्द्र-सूर्यरूपौ अक्षौ यस्य सः महाक्षः । मोठे आहेत अक्ष म्हणजे डोळे ज्याचे तो महाक्ष. महाक्ष म्हणजे विशालाक्ष, विशालाक्ष म्हणजे फुल्लारविन्दायतपत्र-नेत्र. माणसाच्या सर्व अंगांत शिर प्रधान आहे. तिथेच दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या व एक तोंड' अशा सप्त ऋषींचा निवास आहे. या सप्तर्षीत हि डोळे नेते आहेत. ते ज्याला आहेत तोच देखणा समजला जातो. ते ज्याचे विशाल आहेत, तो तर विशेष देखणा म्हणावयाचा. म्हणूनच वारंवार नेत्रांचा उल्लेख येतो. पुष्कराक्ष, पुण्डरीकाक्ष अरविन्दाक्ष, लोहिताक्ष, महाक्ष इत्यादि. या सर्व पदांचा तात्पर्यार्थ एकच आहे. डोळे मोठे म्हणजे विशाल हवेत. ते कमळाच्या पाकळीप्रमाणे आरक्त हवेत, सुंदर हवेत. भावदर्शी व प्रसादवर्षी हवेत. अलिप्त हवेत. ते दर्शनसंपन्न तर खरेच पण दिदृक्षा-संपन्नहि हवेत. कमळ सूर्यदर्शनोत्सुक सूर्यदर्शनविकासी असते. तसे डोळे परमात्मदर्शनोत्सुक परमात्मदर्शन-विकासी हवेत. पण परमात्म्याला कुणाच्या दर्शनाची उत्सुकता असणार ? त्यालाहि दर्शनोत्सुकता आहे. म्हणूनच तर त्याला डोळे आहेत. आणि त्याला हे आपले निजरूप असलेलें विशाल विश्व पहावयाचे आहे म्हणून ते विशाल आहेत. आणि नुसते विशालच नाहीत तर ते असंख्य आहेत. परमात्मा आपल्या असंख्य नेत्रांनी, आपल्या सहस्राक्षांनी हे आपलें अनंत विश्वरूप पाहत आहे, त्याला महाक्ष म्हणण्यांत आणि सहस्राक्ष म्हणण्यांत आणि वारंवार परोपरीने पुष्कराक्ष, पुण्डरीकाक्ष, अरविन्दाक्ष म्हणण्यांत आणखी एक भाव आहे. आणि तो म्हणजे हा की तो परमात्मा केवळ चिद्रूप आहे, चिन्मात्र आहे त्याला मोठे डोळे आहेत असे नव्हे तर तो सर्वागांनी डोळाच डोळा आहे, म्हणून तो महाक्ष, बहुव्रीहि तसा कर्मधारय दोन्ही प्रकारें तो महाक्ष आहे.

३५४. गरुडध्वज
देवतेच्या तत्त्वाला अनुलक्षून तिची मूर्ति, तिची आयुधे, तिचें वाहन, तिचे गण आणि ध्वजादि चिन्हे कल्पिली जातात. सामान्यतः जें वाहन असतें तेच ध्वजावर अंकित असतें. भगवान् शंकर वृषभवाहन व वृषभध्वज आहे, तर भगवान् विष्णु गरुडवाहन आणि गरुडध्वज आहे. भगवान् विष्णूचे वाहन गरुड कां ? परमात्मा हा नामवाह्य आहे म्हणून नाम घेतलें की रूप ध्यानास येतें. अर्थग्रहण पण होते. पण हे नाम गरुड कसें झालें ? गरुड म्हणजे अतिवेगवान् पक्षी. त्याचे उपमान नामाला दिले म्हणून ते गरुड झालें. शिवाय देवाचें वैदिक नाम आहे ॐ. ते हि पक्ष्याकृति आहे. त्या नामावर ॐ कारावर बसून तो येतो. म्हणून परमात्मा हा गरुडवाहन व गरुडध्वज म्हणावयाचा. " छन्दोमयेन गरुडेन समुह्यमानः " असें में भागवतांत म्हटले आहे तें वरील आशयानेच होय, छंद म्हणजे वेद आणि ॐकार म्हणजे अक्षर-वेद होय. एकाक्षर ब्रह्म होय. त्यावर तो परमात्मा, शब्दावर अर्थ आरुढ असतो तसा, आरुढ आहे. तोच गरुड आणि तोच त्याचे ध्वज-चिह्न. परमात्म्याचे वाहन त्याचे श्रद्धाभक्तिपुर:सर केलेलें मनोमन स्मरण होय. मनाहून अधिक वेगवान् काय आहे ? त्या स्मरणाबरोबर भगवान् आविर्भूत होतो, म्हणून त्याला हृत्स्थ म्हटले आहे. पण नामाचा त्या स्मरणाशी काय संबंध, असें कोणी म्हणेल, त्याला उत्तर हेच की जिथे स्मरण म्हणजे मनोभाव आहे तिथें वाणी हि आहे. आणि जिथे वाणी आहे तिथें मन हि आहेच. मुंगी म्हणजे मुकी. परंतु ती मुकी नाही. कारण तिला मन आहे. ती आपले मनोगत दुसऱ्या मुंगीला कळवते. ती जी कळविण्याची रीत तीच वाणी होय. थोडक्यांत म्हणजे मन हा वाणीचा गाभा असून वाणी हा मनाचा बाह्य आकार होय. आणि म्हणून जपाला स्मरण आणि स्मरणाला जप म्हटले जाते. परा पश्यन्ती मध्यमा आणि वैखरी ह्या वाकपुष्पाच्या चार पाकळ्या होत, आणि मन त्याचा देठ आहे. त्या देठाला त्या चारी पाकळ्या जुडल्या आहेत. अशा प्रकारे चित्त आणि वाणी एकरूप होतात. आणि त्यांच्या ठाईं अर्थरूप गंध आविर्भूत होतो. मनोवाणींच्या उभय पंखांनी उडणारा हा गरुड अर्थरूप भगवान् विष्णूचे वहन करीत असतो. म्हणून परमात्मा गरुड-वाहन आणि गरुडध्वज म्हणावयाचा.

अतुलः शरभो भीमः समयज्ञो हविर्हरिः
सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान्समितिञ्जयः ॥३९॥


३५५. अतुल
'नास्ति तुला यस्य सः अतुल: ' ज्याला तुला म्हणजे बरोबरीचा जोडीदार नाहीं तो अतुल, अजोड वा बेजोड होय. तुलनेसाठी दोहोंची आणि तुल्यांची गरज असते. परंतु परमात्म्याच्या बाबतींत दोहोंचा हि अभाव आहे. तो ' एकमेवाद्वितीय ' असल्यामुळे तुलनेला दुसरा नाहींच. दुसरा कल्पिलाच तरी तो तुल्य असणे शक्य नाही. त्यामुळे परमात्मा हा अतुल होय, परमात्माच एक सत् आहे बाकी सारें असत्. अशा स्थितींत सताची तुलना कोणाशी करायची ? बरें जें नाहीं तें असत् आहे म्हटले तरी त्या सदसतांची तुलना कशी व्हायची ? दोहोंत मुळी साम्यच नाही. ' आत्मैवेदं सर्वम् ' हे सर्व आत्मरूप आहे असे म्हटले म्हणजे द्वितीयाभावामुळे तुलना कुंठित झाली. आत्मानात्मविवेक कल्पिला तरी तुलना होऊ शकत नाही. आत्म्याची बरोबरी अनात्म्याशी कशी होणार ? दोहोंत कसलेच साम्य नाही. एक सत् दुसरा असत्. एक चित् दुसरा अचित्. एक आनन्द दुसरा अनानंद, तुलना व्हावी कशी ? मेरूशी मोहरी कशी तुळायची ? परंतु वरील तुलना ही भावाशी अभावाची झाली. त्यामुळे तिथे मेरुमोहरीचा दृष्टांत लागू पडत नाहीं. त्यासाठी एका भावाची दुसऱ्या भावाशी तुलना हवी. परमात्मा हा सूर्यवत् अंशी असून जगत् हे किरणवत् अंश आहे असे म्हटले तर ती भावाशी भावाची तुलना म्हटली जाईल. परंतु इथेंहि तुलना संभवत नाहीं, कारण एकलाशी शकलाची तुलना कशी होणार ? कोणत्याहि प्रकारें विचार केला तरी परमात्मा हा अतुलच होय.

३५६ शरभ
"अतुल: शरभो भीमः" हा चरण, परमेश्वराचें अद्भुत सामर्थ्य प्रकट करतो. त्यांतील प्रत्येक पद त्याचे अलौकिक विस्मयावह पराक्रमशाली व्यक्तित्व प्रकट करतें. अतुल व भीम ही दोन विशेषणे आहेत, तर शरभ हे विशेष्य आहे. त्या दोहोंत सांपडलेलें. अतुल कसा, तर शरभासारखा. भीम कसा, तर शरभासारखा. शरभ हे एक नरसिंहासारखें अद्भुत सत्त्व आहे. नरसिंहांत नराची बुद्धि आणि सिंहाची शक्ति एकवटली आहे. त्यामुळे तो नरहि नाही आणि पशु हि नाही, पण त्या मनुष्ययोनि व तिर्यगयोनी या दोहोंहून वेगळा आणि वरिष्ठ देव आहे. तसा शरभ हा हि जलचरांतील मकर, स्थलचरांतील सिंह आणि नभश्चरांतील गरुड यांच्या तत्‌तत् सामर्थ्याने युक्त असा अद्भुत जीव आहे. तो समुद्रांत बुडूं शकतो, आकाशात उडू शकतो भूमीवर दौडू शकतो. तो सर्वत्र अप्रतिहत संचरू शकतो आणि आपल्या शत्रूचा फडशा पाहू शकतो. तो ' भयानां भयं भीषणं भीषणानाम् ' आहे. त्याच्यापुढें जलभय स्थलभय आकाशभय असलेले मकर, सिंह, गरुड नम्र होतात. ते एकएकटेच नव्हे तर तिन्ही मिळून हि त्याचे काही वांकडे करू शकत नाहीत. असा तो अतुल आणि भीम शरभ आहे. परमेश्वरी शक्ति ही सर्वांना आधारभूत असल्यामुळे ती अतुल आहे. तिचा सर्वांना धाक आहे. आधाराधेयांची तुलना होऊ शकत नाही. आधेयांना आधाराचा धाक असणारच. म्हणून तिला शरभ म्हटले आहे. शरभ हा एक अद्भुत प्राणी आहे. त्याला मी मकर, सिंह, गरुड यांची आद्याक्षरें घेऊन 'मसिंग' म्हणेन. मकर-सिंह-गरुड यांच्या योगाने होणाऱ्या वा मकर-सिंह-गरुड यांच्या गुणनाने होणाऱ्या फलित सामर्थ्याहून हि हे शरभसामर्थ्य आगळे आहे. कारण हे परमेश्वरी सामर्थ्य अ-गणित आहे. त्याचे मोजमाप होऊ शकत नाहीं, गणित होऊ शकत नाही.

३५७. भीम (अभीम:)
भीम म्हणजे भयंकर, परमात्मा हा सर्वान्तर्यामी आणि विश्वरूप असतांना तो भयंकर कसा म्हणावा वस्तुत: तो भीम म्हणजे भयंकर नाही, पण ज्या अर्थी तो सर्व काही आहे, त्या अर्थी, भीम म्हणजे भयंकर हि तो आहे. म्हणावयाचा. तो "अणुर् बृहत्" "कृश:स्थूल'. असा परस्परविरोधी सर्व भाव आहे. याचा अर्थ तो सर्वाधार सर्वव्यापी आहे समजावयाचा. ती परस्परविरोधी विशेषणे त्याची व्याप्ति मात्र दाखवितात. पटावर नाना वर्णाकृति चितारलेल्या असतात, त्यामुळे काळा नि पांढरा, वांकडा नि सरळ, सर्व रंग आणि आकार तो पटच होय. तसा हा परमात्मा नामरूपात्मक विश्ववैचित्र्याचा पट आहे. पटाधारे सर्व वैचित्र्य प्रकटलें आहे. पटावांचून त्यांची स्थिति कल्पितां येत नाही त्यांच्यावाचून पटाची स्थिति मात्र कल्पितां येते. पट स्वतंत्र आहे. चित्र अस्वतंत्र. हेच विश्वरूप-दर्शन होय. विश्वरूपदर्शनाने अर्जुन भ्याला, भांबावला आणि खरोखर या परमेश्वरी सत्तेची ही अनन्त विशालता पाहून कोण भांबावून जाणार नाही ? तो भीम नाहीं, भयावह नाही असे कोण म्हणेल ?

पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम् । गीता ११-१६.२
वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे । गीता ११ - २२.४
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा । गीता ११-२३.३
धृतिं न विन्दामि शमं च विष्णो । गीता ११ -२४.४


असें म्हणून न परमेश्वरी सत्तेची अनंतता पहात पहात भितो आणि भीतभीत परमेश्वरी सत्तेला ओळखता तो म्हणतो:

त्वमादिदेव पुरुषः पुराणः त्वं अस्य विश्वस्य परं निधानम् |
वेत्तासि वेद्यं च परं च धाम, त्वया ततं विश्वमनन्तरूप ॥ गीता ११ -३८,


आणि ओळखून नमस्कार करीत सुटतो:
नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्व: पुनश्च भूयो नमो नमस्ते । गीता ११ - ३९.२
नमः पुरस्ताःदथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व । गीता ११ -४०.१

असा आहे तो परमात्मा भीम म्हणजे भयावह, विस्मयावह. नास्ति भीमो यस्मात् सः अभीमः ।

३५८. समयज्ञ (शमयज्ञ) (सम-यज्ञ,समय ज्ञ)
समयज्ञ हा वर्ण-समाम्नाय दोन प्रकारें कल्पिता येईल : (१) सम-यज्ञ आणि (२) समय-ज्ञ. या पदांच्या पुढील पदें हविर् हरि: अशी आहेत. त्यांच्या सांनिध्यावरून मुख्यत: सदर पद, प्रथम कल्प, सम-यज्ञ असें असावें. आणि शंकराचार्यानीं तें तसें घेतलें हि आहे. तथापि त्याला त्यांनी दुसरें स्थान दिलें आहे, दुसरा कल्प मानिलें आहे. 'सर्वभूतेषु समत्वं यजनं यस्य सः सम-यज्ञः । '-सर्वभूतांच्या ठाई समभाव हेच ज्याचे यजन आहे तो समयज्ञ होय.

" समत्वमाराधनमच्युतस्य " हे समर्थक प्रह्लादवचन हि पुरावा म्हणून त्यांनी उद्धृत केले आहे.

दन्त्य 'स्' ऐवजी तालव्य 'श्' घेतल्यास सदर पद शम-यज्ञ होईल. आणि ते हि चिन्त्य ठरेल. मनाचे समाधान वा शमन हाच यज्ञ म्हणजे यजन आहे ज्याचे तो परमात्मा शम-यज्ञ होय.

समय म्हणजे सम्यक् अयन, यथाप्रतिज्ञात वागणे. अशा प्रकारे समय म्हणजे १ काल, २ प्रतिज्ञा वा करार असे दोन अर्थ होतात. काल हा अचूक चालत असतो. त्यांत केव्हां हि फरक पडत नाही. एक वेळ घड्याळ मंद वा बंद पडेल, एक वेळ सूर्य हि मंद वा बंद पडेल पण कालाच्या गतींत अनियमितता व्हावयाची नाहीं. "जगें येवोत जावोत तो अभंग जसा तसा " तो अखंड अस्खलित त्रुटिरहित चाललाच चालला आहे. या कालधर्माला अनुसरून जें यथा-प्रतिज्ञ वागणे त्याला हि समय असेंच अभिधान लक्षणत्वें प्राप्त झाले. या दोहोंना हि परमात्मा हा जाणतो म्हणून तो समय-ज्ञ होय. तो कालगतीचा साक्षी म्हणून सहजच समयज्ञ आहे. त्याच प्रमाणे तो आपली प्रतीज्ञा, "कौन्तेय प्रतिजानीहिन मे भक्त: प्रणश्यति' "तेषां अहं समुद्धर्ता मृत्युसंसार-सागरात्" अशा प्रकारची, केव्हां हि मोडीत नाही, पाळतोच पाळतो, म्हणून हि तो समयज्ञ होय. समय चा तिसरा हि एक अर्थ आहे वेळ व प्रसंग. तो जाणणारा योग्य वेळी योग्य गोष्ट करतो. परमात्मा हा तसा सर्व गोष्टी यथोचित करतो. म्हणूनहि तो समयज्ञ म्हणावयाचा. तिन्ही अर्थ परस्पर-पूरकच आहेत.

३५९-अ. हवि (हविर्-हरि)
"हविर-हरिः" हा वर्ण-समुच्चय एक पद म्हणून घेतला गेला आहे. परंतु हृ धातूपासून येणाऱ्या हर आणि हरि या दोन्ही कृदन्त उपपदांपैकी उपपद समासांत प्राय: हर हेच उपपद वापरले जाते. हरि हे स्वतंत्र पद म्हणूनच प्रसिद्ध आहे. उदाहरणार्थ 'सर्वपापहरो हरिः' या वचनांत हर हे कृदन्त उपपद म्हणून आले आहे, तर हरि हे स्वतंत्र पद म्हणून आले आहे. इथे हि तें तसे घ्यायला काय हरकत ? हरकत कदाचित् सहस्र संख्येची येईल. पण ती अन्य व्यवस्थेनें निवारतां येण्यासारखी आहे. हर हे कृदन्त हि शंकरवाचक म्हणून स्वतंत्रपणें प्रयुक्त होते, पण तें उपपद म्हणून हि सर्रास प्रचलित आहे, तसें हरि हे पद उपपद म्हणून प्रचलित नाही. म्हणून हवि आणि हरि हीं पदें वेगळी घ्यायला अनुकूलता अधिक आहे.

मागील पदांत परमात्मा हा सम-यज्ञ वा शम-यज्ञ म्हणून गाइला आहे. अर्थात् समभावाच्या यज्ञांत सर्व विषमता होमायची असते आणि समभावाचा एकमेवाद्वितीय अग्नि तेवढा प्रज्वलित ठेवायचा असतो. हें जें होमिलें जाणारें हविर्-द्रव्य तें हि परमात्मरूपच होय. कारण परिणामावरून वस्तूचें स्वरूप ठरविले जाते. आंब्याचे फळ लागले तर म्हणायाचें तें झाड आंब्याचे आहे. निंबोळी लागली तर म्हणायाचे निंब आहे. समभावाचा अग्नि होऊन जे राहिलें तें हविर्-द्रव्य समत्वरूप अग्निच म्हणावयाचे. यांत उपयोगी पडणारें द्रव्यजात, उपकरणजात, क्रियाजात, सारें यज्ञसात् होत असते.

तो अग्नि आणि यज्ञकर्ता हि यज्ञसात् च होतो. म्हणून इथें हविर्द्रव्य हि परमात्माच आहे असे म्हटले आहे.

ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥ गीता ४ - २४


या गीतावचनांत हाच आशय आला आहे. इथे केवळ हवि पद आले आहे, पण पुढे हा सर्व यज्ञ-संभार आलाच आहे.

३५९-आ. हरि (हविर्-हरि)
हरि म्हणजे हर्ता. कशाचे हरण करतो हा हरि ? तो कल्पान्तीं या समस्त विश्वाचे हरण करतो. म्हणून तो हरि म्हणावयाचा. तो स्थिति-कालीं दुष्टांचा संहार करतो आणि तद्वारा सज्जनांचा उद्धार करतो म्हणून हि तोहरि होय. उत्पत्ति-कालीं चराचर जीव-निकायांच्या रूपाने व्यक्त होऊन तो या विश्वांत विहार करतो म्हणून हि तो हरि, असा हा परमात्मा आदि मध्य अन्त व्यापून हरिच हरि आहे. तो आहर्ता आहे, विहर्ता आहे, संहर्ता आहे.

परंतु इथे परमात्मा हा 'हविर्-हरिः' म्हटला आहे असे म्हटल्यास तो या विश्व-यज्ञांत विश्वाकडून यजिला जाणारा यज्ञ-पुरुष होय. तो या विश्वाचा हविलेला हवि आहरण करीत आहे, असे समजावें. सर्वान्तर्यामी ऊर्फ वैश्वानर रूपानें तोच सर्व हुत अन्नाचा भोक्ता आहे. होत्याची आहुति, पूजकाचा नैवेद्य, भगताचा बळि सर्व तोच हरण करीत असतो.

यजन्ते सात्त्विका देवान् यक्षरक्षांसि राजसाः ।
प्रेतान् भूतणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः ॥ गीता १७- ४


या सर्वांच्या यज्ञतपांचा भोक्ता तो परमात्माच असतो आणि तीच त्यांच्या श्रद्धेला अनुसरून त्यांना फळ देत असतो. ,

यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति ।
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥ गीता ७ - २१

स तया श्रद्धया युक्तस् तस्याराधनमीहते ।
लभते च तत: कामान् मयैव विहितान् हि तान् ॥ गीता ७ - २२


ईज्य वा यजनीय एक परमात्मा असून आपआपल्या श्रद्धेनुसार सर्व त्याचेच यजन करीत असतात. वेदानुवचन, यज्ञ, दान, तप इत्यादि विविध आराधना सर्व त्यालाच उद्देशून केल्या जातात आणि तोच त्यांचा भोक्ता आणि फलदाता हि आहे.

३६०. सर्वलक्षण-लक्षण्य
लक्षण्य म्हणजे लक्षणोचित, सुलक्षण. जो सर्व लक्षणांनी लक्षणीय होय तो सर्व-लक्षण-लक्षण्य म्हणावयाचा. सर्व लक्षणांनी म्हणजे शुभ चिह्नांनी युक्त महापुरुष असतो. महापुरुष परमात्माच परिपूर्ण निर्दोष आणि सर्वलक्षण-समन्वित असू शकतो. म्हणून तोच एक सर्व-लक्षण-लक्षण्य म्हणावयाचा. त्याची ही लक्षणे ज्याच्या ठाई पुष्कळशी आढळतात त्याला हि तुलनेने महापुरुष म्हटले जाते. जसा कुलक्षण वेनाचा' पुत्र पृथु हा परमात्म्याचा नृपावतार सर्वसुलक्षण होता. तो महापुरुष म्हणावयाचा, हस्त-पादादि अवयवांवर ही चिन्हें जन्मत:च अंकित असतात, असे मानलें जाते. उपार्जित ध्वजच्छत्रादि बाह्य राजचिढ़ें वेगळी, लक्षणे आणि चिढ़े ह्यांतलेच तें अंतर आहे. लक्षणे जन्म-जात असतात, चिढ़े तद्नुसार उपार्जित होतात. छत्रचामरादि राजचिन्हें काढून ठेवून राजा गुप्त वेशांत फिरूं शकतो पण लक्षणे त्याला काढून ठेवता येत नाहीत.

पण परमात्मा तर विदेह आहे, त्याची लक्षणे कशी असणार ? परमात्मा विदेह निश्चितच आहे, पण त्याचे अवतार असूं नयेत, आविर्भाव असूं नयेत, असें बन्धन कोण लादणार ? तो सदेह असून हि विदेहच आहे. त्याची विदेहता देहाच्यायोगें खंडित होत नाहीं. कारण तिथे देहाभिमान नसतो. असे जे परमात्म्याचे अवतार वा आविर्भाव त्यांच्या ठाईं परमात्म-लक्षणे प्रकटतात. त्या भगवल्लक्षणांवरून आणि त्याच्या दैवी तेजावरून भगवदवतार ओळखला जातो. अतिमानुष कार्यावरून तो जगाला जाहीर होतो इतकेंच, शंखचक्रगदापद्म'ही त्याची लक्षणे आहेत. त्याची आज्ञा सर्व जग शिरसावंद्य करतें. कोणी प्रतिकार करायला धजत नाहीं, समर्थ होत नाही, हे त्याचें तेजच त्याची प्रकट खूण वा ओळखण होय.

३६१. लक्ष्मीवान्
लक्ष्मीवान् म्हणजे श्रीमान्. श्रीमान् पद पूर्वी येऊनच गेलें आहे. तिथे त्याचे विवेचन केलें आहे, तें पहावें. इथे लक्ष्मीवान् हे पद सर्व-लक्षण-लक्षण्य या पदानंतर आले आहे त्याच्या साहचर्याने इथें लक्ष्मी म्हणजे सर्व सुलक्षणांनी अर्थात् लक्ष्मांनी बनलेली अपूर्व अशी समग्रातिरिक्त शोभा समजावयाची, आणि अशा लक्ष्मीनें जो नित्ययुक्त तो लक्ष्मीवान् म्हणावयाचा, परमात्मा हा विदेह एवढ्याच साठी म्हणावयाचा की देह ही उपाधि म्हटली जाते आणि तो तर निरुपाधि आहे. पण सत्चित्आनंद हा स्वभावच त्याचा देह म्हटला तर तो निरुपाधि आणि अतएव विदेह असून हि सदेह म्हणावयाला हरकत नाही. कारण हा सच्चिदानंदरूप भाव त्याला कायमचा दिग्ध म्हणजे चिकटलेलाच आहे. आणि म्हणूनच शास्त्रांत त्याला सच्चिदानंद-विग्रह म्हटलें आहे. या विग्रहाची जी अपूर्व आणि अलौकिक कान्ति तीच त्याचा परिग्रह होय. तीच लक्ष्मी. मोत्यावर मोत्याचे पाणी त्याला परितः वेदून असते आणि अविभाज्यपणे संयुक्त असते. तसा लक्ष्मीचा परिग्रह सच्चिदानंद-विग्रह परमात्याशीं नित्य संबद्ध आहे. म्हणून तो लक्ष्मीवान् म्हणावयाचा. आणि सत् चित् आनंद हींच त्या लक्ष्मीची घटक लक्षणे म्हणावयाची. इथे एकाच वस्तूला, सच्चिदानंदाला, त्याचा विग्रह आणि परिग्रह हि म्हणण्याची आपत्ति येते खरी, परंतु परमात्म्याचे स्वरूपच असें विलक्षण आहे की त्याच्या वर्णनास भाषा तोकडीच पडावयाची. सर्व वर्णन वा निरूपण सादृश्यमूलक आहे. आणि परमात्मसदृश परमात्माच असल्यामुळे त्याचे वर्णन यथार्थतया होऊ शकत नाही. म्हणूनच त्याला पुढे 'शब्दातिग: शब्दसहः' म्हटले आहे. तथापि म्हणूया की चंदनाचे नांव चंदन, त्याचे रूप म्हणजे देहहि चंदन, त्याचे हस्त-पादादि अवयव चंदन तसा परमात्म्याचा विग्रह (देह) परिग्रह (स्त्री) सर्व काही परमात्माच आहे.

३६२. समितिंजय
'समिति जयति इति समितिंजयः ।'जो समितीला जिंकतो तो समितिंजय होय, पण समिति म्हणजे काय ? सम् म्हणजे एकत्र आणि इति म्हणजे येणे. जिथे लोक गोळा होतात ती समिति होय. ब्राह्मणांची समिति म्हणजे वादसभा होय आणि क्षत्रियांची समिति म्हणजे रणांगण होय. वैश्यांची समिति म्हणजे बाजार पेठ होय आणि शूद्रांची समिति म्हणजे कामगारतळ होय. वादसभा प्रज्ञा-प्रकर्षान, रणसभा शस्त्रास्त्रनैपुण्याने, बाजारपेठ व्यवहार-कौशल्याने आणि कामगारसभा निष्कपट सेवा-सामर्थ्याने जिंकली जाते. ह्या प्रत्येक समितींत स्पर्धा आहे, चढाओढ आहे, लढाई आहे, तींत बुद्धि, बळ, चातुर्य आणि सेवा या गुणांच्या सर्वातिशायी प्रकर्षाने प्रतिपक्षावर विजय मिळविला जातो. हा जो प्रत्येक क्षेत्रांतील विजेता तो समिर्तिजय होय. हा विजय कोणाचा आहे ? आत्मशक्तीचा आहे. प्रत्येकाच्या ठाई में आत्मतत्त्व आहे त्याच्याच बळावर तो शारीरिक आणि बौद्धिक, भौतिक आणि आध्यात्मिक, सर्व शक्तींचा उदय, विकास आणि उत्कर्ष साधीत असतो. म्हणून तो सर्वभूतात्मभूत परमात्माच समितिंजय होय. राक्षसांचा, असुरांचा नि देवांचा विजय हा त्यांचा विजय नव्हे तो त्या परमात्म-शक्तीचाच विजय होय. परंतु हे ते ओळखत नाहीत. आणि म्हणूनच त्यांना"अस्माकमेवायं विजयः, अस्माकमेवायं महिमा" असा भ्रम होतो. गुरुकृपेनें जेव्हां देवांना त्या परमात्म-तत्त्वाचे भान आणि ज्ञान होते तेव्हां ते मग ओळखू लागतात की अरे हा तर देहेन्द्रियमनोबुद्धीचा नव्हे तर त्यांना स्वकर्मक्षमता देणाऱ्या त्या आत्मतत्त्वाचाच विजय आहे.

इन्द्रियाणि मनो बुद्धिः सत्त्वं तेजो बलं धृतिः ।
वासुदेवात्मकान्याहुः क्षेत्रं क्षेत्रज्ञ एवच ॥

योगो ज्ञानं तथा सांख्यं विद्या: शिल्पादि कर्म च ।
वेदा: शास्त्राणि विज्ञानं एतत् सर्वं जनार्दनात् ॥


विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः सहः ।
महीधरो महाभागो वेगवानमिताशनः ॥४०॥३६३. विक्षर
क्षर, अक्षर, आणि विक्षर ही तिन्ही पदें विष्णुसहस्रांत आली आहेत. जें क्षरणशील, विनाशशील आहे तें क्षर होय, जें क्षर नव्हे, तें अक्षर होय. पण विक्षर म्हणजे काय ? तर जे क्षर हि नव्हे, अक्षर हि नव्हे तें उभय-भिन्न पण उभयांना सांधणारे तत्त्व विक्षर म्हणावें, त्यांना जोडणारा पण त्यांच्याहून भिन्न असा तो सेतु होय. हे प्रतिक्षणी क्षरमाण संपूर्ण दृश्य विश्व म्हणजे क्षर होय.तें अदृश्य, अव्यक्त, अनिर्देश्य, कूटस्थ ब्रह्म अक्षर होय, आणि उभय विशिष्ट आणि उभय-भिन्न देहधारी जीव हा विक्षर होय. जीव जगत आणि ईश्वर ही पदार्थत्रयी आपण पाहतच आहों. जीव हा पदार्थ परमार्थत: चिन्मात्र आहे तरी जोवर तो सोपाधिक आहे तोवर त्याला जड जगताहून आणि चेतन परमेश्वराहून वेगळेच मानणे भाग आहे. आणि त्यामुळेच त्याला क्षर हि म्हणतां येत नाही आणि अक्षर हि म्हणतां येत नाही. म्हणून तो विगतक्षर आणि अनक्षर विक्षर म्हणावयाचा. परमार्थत: अद्वैत असले तरी व्यवहारतः त्रैतच आहे.

'क्षरं अक्षरं' ही क्रमिक पदें नपुंसक आहेत तर 'अक्षरः' 'विक्षरः' एकैकश: आलेली पुंल्लिंग आहेत. त्यावरून असे दिसते की क्षरं अक्षरं हीं पदें सृष्टीचा चिदचिद्-विभाग सूचित करून आणि तद्द्वारा उभयविधत्व वर्णन परमात्म्याचे व्यापकत्व सूचित करतात. उलट, 'अक्षर: विक्षर:' ही पदें स्वतंत्र आली असून ती परमात्मा अक्षरब्रह्म आहे तसा विशेषत: क्षरणशील हा संसार हि तो आहे, असें वैचित्र्य व स्वातंत्र्य प्रतिपादीत आहेत. कारणरूपानें परमात्मा हा अक्षर आहे तर कार्य-रूपानें तो विक्षर आहे. एक स्वरूप आहे, दुसरें विश्वरूप आहे. अथवा परमात्मा हा स्वभावत: अक्षर आहे तर साधक जीव हा प्रयत्नतः ज्ञानसंन्यासाने विगत-क्षर होतो म्हणून तो विक्षर म्हटला जातो, असे समजावें.

३६४. रोहित
रोहित नामाबरोबर पुढील सुभाषित आठवतें:
अगाधजलसंचारी न गर्व याति रोहितः ।
अंगुष्ठोदकमात्रेण शफरी फर्फरायते ॥

तेव्हां रोहित म्हणजे देवमासा. देवमासा या नामावरूनच तें एक देवाचे रूप आहे आणि रोहित हे त्याचे नांव आहे हे सहज लक्षांत यावें. पण याला रोहित नाम का मिळाले ? कारण तो सारखा रोहण करीत गेला, वाढतच गेला म्हणून. प्रथम तो मनूच्या ओंजळीत आला व तत्क्षणीं तो वाढला, तेव्हां त्याने तो आपल्या कमंडलूंत टाकला. कमंडलूंत हि तो मावेनासा झाला, तेव्हा त्याला त्याने गंगाळांत टाकले. त्याने गंगाळ हि व्यापून टाकलें, तेव्हां त्याला मनूनें रांजणांत टाकले. पण रांजण हि त्याने व्यापून टाकला तेव्हा त्याला त्याने नदीत सोडलें, नदींत तो पाहता पाहतां वाढत गेला आणि नदी मुखाने समुद्रांत आणि समुद्रांतून महा सागरांत आणि महा सागरांतून प्रलयकाळांत एकार्णवांत संचार करू लागला. मनूला त्याने सांगून ठेवले होते की लवकरच प्रलय होईल आणि त्यांत ही संपूर्ण पृथ्वी बुडून जाईल. म्हणून तूं शिखरावर बसून रहा, तुला मी येऊन नावेत घेऊन जाईन असें हि त्याने त्याला आश्वासन दिले होते. मनूच्या प्रसृतींतील अंगुष्ठमात्र मत्स्यापासून एकार्णवातांतील पर्वतप्राय आणि अद्भुत सत्त्वापर्यंत ज्याअर्थी तो वाढत गेला त्याअर्थी तो रोहित म्हटला गेला. वामनाचा त्रिविक्रम झाला, म्हणून हि तो रोहित म्हणावयाचा, अनिर्देश्य अव्यक्त तत्त्वापासून इदंतया निर्देश्य ब्रह्माण्डापर्यंत वाढला म्हणून हि तो रोहित होय.

रलयोर् अभेद: या न्यायाने रोहित म्हणजे लोहित हि समजावयाचा. "उदये सविता रक्तः रक्त: चास्तमने तथा" म्हणून रोहित म्हणजे सूर्य. तो हि लोहित असून शिवाय उदयापासून आरोहण करीत मध्याहनीं सर्वोच्च रोहित होतो, आरुढ होतो म्हणून हि रोहित म्हणावयाचा.

३६५. मार्ग
मार्ग्यते इति मार्ग: जो शोधला अनुसरला जातो तो मार्ग होय. अर्थात् परिमार्गितव्य पद. गीतेत म्हटलें आहे-' ततः पदं तत् परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः ' ध्येयभूत, साध्यभूत परमात्माच तें परमपद होय, म्हणून तोच मार्ग म्हणावयाचा. मार्ग्यते अनेन इति मार्गः ह्याच्या योगे शोधावा, शोधला जातो, अनुसरला जातो, म्हणून मार्ग अशी हि त्याची दुसरी व्युत्पत्ति होऊ शकेल. ज्या साधनाने परमात्मा शोधला जातो, गांठला जातो तें साधन हिं परमात्माच होय. परमात्म्याहून वेगळा परमात्म्याला दुसरा कोण गांठू शकतो ? म्हणून परमात्मा हाच मार्ग होय, यज्ञ होय, 'यज्ञेन यज्ञम् अयजन्त देवाः' या वेदवचनाचा हाच आशय आहे. साध्य म्हणून तो यज्ञ म्हणजे यजनीय आहे, तर साधन म्हणून तो यज्ञ म्हणजे यज्ञनक्रिया हि आहे. उपनिषदांत म्हटले आहे: " सत्येन लभ्यस् तपसा ह्येष आत्मा । सम्यग्ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम् " हे तें सत्याचरणरूप तप तेंच सत्य-स्वरूप परमात्म्याचे साधन होय. अशा प्रकारें साध्यसाधनांची एकरूपता हा गांधीचा विचार हि जुनाच आहे. तो वैदिक आहे, औपनिषदिक आहे. गीतेने तर ब्रह्मकर्मसमाधिरूपानें तो परिपूर्णतेलाच पोचविला आहे. ब्रह्मसंबंधत्वें सर्व कर्तृकर्मक्रियाकलाप ब्रह्म होय.

ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥ गीता ४-२४

कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण आणि संबोधन सर्व कारकें तो एक परमात्मा च आहे. तेव्हां मार्ग्यते अस्मिन् इति मार्ग: असें परत म्हणायला नकोच. जिथे तो सर्वच कारकें आहे असे म्हटलें तिथे कर्म, करण आणि अधिकरण म्हणून त्याचे परत व्याख्यान करण्याची आवश्यकता उरत नाही. तसें म्हणणें हें ब्राह्मणपरिव्राजक म्हणण्यासारखेच होय.

३६६. हेतु
हेतु म्हणजे कारण. परमात्मा या विश्वाचे ऊर्णनाभवत् निमित्त आणि उपादान कारण आहे.

किमीहः किंकाय: स खलु किमुपायस् त्रिभुवनं
किमाधारो धाता सृजति किमुपादान इति च ।

अतक्यैश्वर्ये त्वय्यनवसर-दुःस्थो हतधिय:
कुतर्को यं कांश्चिन् मुखरयति मोहाय जगतः ॥


परमात्म्याचे ऐश्वर्य अतर्क्य आहे. तेव्हा त्याने हे विश्व कशापासून, कुठल्या साधनांनी, कठे केव्हां, कसे निर्माण केलें इत्यादि शंका घ्यायला अवकाश नाहीं.

एक सामान्य जन्तु हि केवळ आपल्यातूनच एक जाल निर्माण करतो तर ज्याचें ऐश्वर्य अपरंपार आहे त्या ईश्वराला काय अशक्य आहे ? म्हणून या चराचर विश्वाचे सर्वकारण तो परमात्माच होय.

हेत म्हणजे उद्देश असा हि अर्थ घेता येईल. या संपूर्ण विश्वाचा उद्देश परमात्मदर्शनाहून दुसरा काय असू शकेल ? बीज उगवते आणि वाढवाढून फळतें तेव्हांच ते आपल्या उद्देशांत सफळ झाले असे म्हटलें जाते. ते एकदा फळून थांबत नाही, तर आपली संपूर्ण हयात त्याचसाठी खपवते आणि अशा प्रकारें कृतार्थ होते. या विश्ववृक्षाचे हि तसेंच आहे. तो हि परमात्मबीजापासून उगवून परमात्मरूपानें परिणत होत आला आहे आणि होत राहणार आहे. ही आत्मपरिणतिच या विश्वाचा उद्देश आहे, हेतु आहे. हा हेतु. सफल होऊन कुंठित होत नाही. कारण आत्मदर्शन हा आत्म्याचा स्वभाव आहे. गंगा सागराला मिळून मिळतच राहते. कारण तो तिचा जीवनहेतु आहे, स्वभाव आहे. प्रत्येक अंश आपल्या अंशीशी संगत व्हायला धडपडत असतो. कारण तो त्याचा जीवन-हेतु आहे. तसा परमात्मा ह्या विश्वाचा जीवन-हेतु आहे.

३६७. दामोदर

दाम्न: उदरं यः स दामोदर: । जो या विश्वरूप दाव्याचे मायपोट आहे, आश्रय स्थान आहे, तो परमात्मा दामोदर होय. दावें दोन बाजूला दोन खुंटांना बांधलेले असते. तसें हें विश्व आदि अंत मध्य भागी परमात्मसंज्ञक खुंटानें धारण केलेले आहे. त्याचा आरंभ परमात्म्यापासून होतो आणि अंतहि परमात्म्याच्याच ठाईं होतो. त्या दुहेरी आधारावर तें मध्यभागी हि अवलंबित असतें, मध्यभागी खुंटा दिसत नाहीं खरा, पण त्याच्याच आधारावर तें टिकून असते हे उघड आहे. परमात्म्याचा आश्रय चालू जगांत कुठे दिसून येत नाही, पण तें त्यावरच अवलंबून आहे. तें निराधार राहू शकत नाही. तें असत्य, अप्रतिष्ठ, अनीश्वर असूं शकत नाही. या जगाला परमात्म्याचा आधार आहे तें ठीक, पण त्याला दावें म्हणण्याचे काय कारण ? दाव्याला म्हणजे दावणीला गुरे बांधलेली असतात. त्याप्रमाणे नामरूपकर्मांनी वळलेलें हें जें जगरूप दावें आहे त्याला सर्व चराचर बांधलेलें आहे. ज्याला नाम नाहीं, रूप नाहीं, कर्म नाहीं असें कांहीं तरी या जगांत आहे का ? तसें शोधून सांपडणार नाही. अव्यक्ताच्या पोटांत सारे व्यक्त सामावलेले आहे. कारणाच्या पोटांत सारें कार्य सामावलेले आहे. त्यामुळे तो अव्यक्त परमात्मा दामोदर म्हणावयाचा.

दामोदराचा हा आशय व्यक्त करण्यासाठीच कृष्ण चरित्रांत कृष्णाच्या मुखांत यशोदेला सारें विश्व दाखविले आहे. अशा प्रकारें दामोदर पदाचा भावार्थ अन्य कथेच्या द्वारें व्यक्त केला गेला आहे आणि दामोदर पदासाठी कृष्णाला उखळीला बांधून यमलार्जुनमोक्ष करविला आहे. वस्तुतः दाम्ना बद्ध उदरं यस्य सः दामोदरः' ही व्युत्पत्ति समर्पक नाहीं आणि गुणवाचक तर नाहीच नाही. देवाची सर्व नामें गौण म्हणजे शास्त्रांत गुणवाचक आणि विख्यात म्हणजे पुराणांत प्रसिद्ध आहेत. शास्त्रांत त्यांचा तत्त्वार्थ तर पुराणांत लौकिक अर्थ (म्हणजे मनोरंजक अद्भुत आख्यायिका) आला आहे.

३६८. सह
सहस् म्हणजे धमक, धडाडी, पराक्रम. युयुत्सु विजिगीषु वृत्ति, कसला हि प्रसंग आला तरी हार खायची नाही, त्यावर मात करायची, ही जी वृत्ति तिचे नांव आहे सहस्. परमात्मा या साहसी वृत्तीची मूर्तिच होय, म्हणून तो सहः म्हटला आहे. मनुष्य कशाच्या बळावर संकटांना तोंड देतो आणि विजयी होतो ? क्वचित् विजयी न झाला तरी पस्तहिंमत होत नाहीं, परत उठावयाची उमेद बाळगतो. तें जें बाह्य कोणत्याहि वस्तूवर अवलंबून नसलेलें, अन्तरतर बळ तेंच 'सहः' म्हटले आहे. सर्व जगाने जरी सोडले तरी जो अन्तर देत नाही तोच सहः होय, आणि तोच परमात्मा. अशा या आत्मनिष्ठनें जो युक्त, तो आत्मवान् होय. तोच निर्भय. तो सर्वांवर मात करतो. तो सर्वांना पुरून उरतो. म्हणून ते जे अन्तरतर बळ, जें जगाने दगा दिला तरी आपल्या पाठीशीं सदैव उभे असतें तेंच 'सह' होय. सर्व भक्तांना महान् संकटांत । यानेच तारले आहे. हाच तो सर्व संकटांचे हरण करणारा हरि आहे. यालाच उद्देशून म्हटलें । आहे- " हरिने भजतां हजी कोइनी लाज जती नथी जाणी रे " यालाच उद्देशून तुकाराम म्हणतो-" जेथे जातों तेथें तूं माझा सांगाती । चालविसी हातीं धरोनिया " असा तो सदैव सह असतो म्हणून तर तो परमात्मा सह होय. समर्थ म्हणतात-"विलग विषम काळी सांडिती सर्व माळीं । रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळी " मरणाच्या त्या कठिण प्रसंगी सर्व सोडून जातात, पण परमात्मा संनिध असतो. जीवाचा तोच एक जिवलग आहे. आमचा 'साथी' तो आहे. ' अपराजित: सर्वसहः ' म्हणून पुढे दोन पदें आलीं आहेत ती हि सहच्या अर्थावर प्रकाश पाडणारी आहेत. तो सहसंज्ञक परमात्मा कोणाला हार न गेलेला आणि सर्वांवर मात करणारा, केलेला आहे. भीमानें बकासुराचा सर्व मार सहन केला आणि मग त्याला जिंकलें. अर्थात् त्या बकासुराने मात्र त्याचा मार सहन केला नाही. तसा परमात्मा सर्वांचे सर्व सहन करून सर्वांना जिंकतो म्हणून तो ' सह '

३६९. महीधर
धरणीधर आणि महीधर ही पदें पूर्वी येऊन च गेली आहेत. पुढे हि धराधर पद आले आहे. अशा प्रकारें भूलोक-धारणाचे मोठे कौतुक आहे. भूलोकवासी मानव प्राण्याला तसे वाटणे स्वाभाविक आहे.

मही हे पद असें महत्त्वाचे आहे. त्याचे महत्त्व सारखे वाढणारेच आहे. प्रथम मही म्हणजे हा देह होय, ज्यांत आमचा निवास आहे. ज्याच्या योगें सकळ पुरुषार्थ साधता येतात, ज्याच्या योगे सच्चिदानंद पदवी हस्तगत करता येते, तो महान् नर देह मही होय.

ज्या जीवलोकांत असे असंख्य आणि असंख्यविध देह, उत्पन्न होऊन वाढतात तो हा जीवलोक, सर्व जीवांचा जीवनाधार, मही होय. मशकापासून महात्म्यापर्यंत सर्वांना त्यांत ठाव आहे, त्यांच्या सर्व आकांक्षांना वाव आहे. म्हणून तो मही होय.

विविध देह आणि त्या विविध आणि असंख्य देहांचा आश्रय असणारी ही भू ज्या विश्वरचनेंत सामावली आहे ती विराट् विश्वरचना हि तिच्या व्यापकतेमुळे मही पदवीस पात्र आहे. अर्थात् ही समस्त विश्वरचना आणि तिचा अंश दोन्ही खरोखर महीच होत. विश्वरचना अद्भुत आहेच, पण त्या विश्वाचा परमाणु हि तसाच अद्भुत आहे. त्यांत हि अनेकानेक सूक्ष्मातिसूक्ष्म घटकांच्या घडामोडी चाललेल्या आहेत. विश्व स्वत: विश्व आहेच पण त्याचा अंश हि विश्वच आहे. भूमि, तिच्या अंकावर वाढणारा वृक्ष; आणि त्याच्या ही अंकावर वाढणारें फूल सर्व एकमय आहे. तसें ब्रह्माण्ड सप्तद्वीपा पृथ्वी आणि जीवदेह सर्व एक महीरूपच होत. आणि त्या महीचा धर्ता तो परमात्मा आहे. म्हणून तो महीधर म्हणावयाचा.

३७०. महाभाग
महान् भाग: यस्य सः महाभाग: । मोठे आहे भाग्य ज्याचें तो महाभाग होय. जगांत भाग्यवान् लोक एकापेक्षा एक आहेत. त्यामुळे त्यांची ती भाग्य तुलनेत आणि स्पर्धेत सांपडलेली आहेत. शिवाय ती नाश हि पावणारी आहेत. तुल्यता, अभ्यधिकता आणि विनाश यांनी ती ग्रस्त आहेत. ही अशी जर भाग्य म्हणावयाची तर अभाग्ये कोणती ? अर्थात् खरोखर ही भाग्य या पदवीसच लायक नाहींत. मग महाभाग्य ही पदवी तर दूरच ! पण ज्या अर्थी परमेश्वराला महाभाग म्हटले आहे त्या अर्थी भाग्यवान् हि कोणी असलेच पाहिजेत. हे भाग्यवान् म्हणजे परमात्याचे भक्त होत. आणि त्यांचे भाग्य म्हणजे वैराग्य होय. वैराग्यांत तुल्यता, अभ्यधिकता आणि नाश तिन्ही नाही म्हटले तरी चालेल. 'सर्व वस्तु " भयान्वितं भुवि नृणां वैराग्यमेवाभयम्." त्याला नाश नाही. त्यांत स्पर्धा चालत नाही. कोणी कितीही वैराग्य वाढवले तरी त्याला कोणी हटकू शकत नाही. तिथे कोणाला हटक नाहीं नि कोणाला अटक नाहीं. त्यामुळे तें भाग्य या पदवीस पात्र होय. आणि असें हे भाग्य आत्मज्ञानमूलकच असूं शकत असल्यामुळे आणि तें आत्मज्ञान म्हणजे आत्मनिष्ठा परमात्म्याहून अधिक इतरत्र उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे विदेह परमात्मा हा महाभाग होय. ज्या वस्तूचा अभिलाष असेल तिचे त्या अभिलषित्याला दारिद्रय आहे हे उघड आहे. तो अभिलाष, ती कामना ज्याला मुळी स्पर्शतच नाहीं त्याहून अधिक महाभाग कोण म्हणावयाचा ! परमात्मा आत्मकाम म्हणून महाभाग, तर ज्ञानी भक्त अकामहत म्हणून भाग्यवान् म्हणावयाचा. दोहोंच्याहि भाग्याचे मूळ आत्मज्ञानमूलक वैराग्यच होय.

३७१. वेगवान्
वेगवान् म्हणजे चपळ, जलद, जलचरांत मासा, सर्पात नाग, ग्राम्य पशूत घोडा, आरण्यक श्वापदांत चित्ता आणि पक्ष्यांत ससाणा वा गरुड हे वेगवान् म्हणून प्रसिद्ध आहेत. बाह्य जगांत वायु आणि अंतर्जगांत मन हि वेगवान् म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु या सर्वांना प्रतिकार हि असतो. ह्या सर्वांना अंतर कापावयाचे असते, त्यांनी किती हि चपळाई केली तरी ती मर्यादितच असणार. ह्या सर्वांत अधिक चपळ म्हणजे मन. तें वायूहून हि सूक्ष्म, त्याला प्रतिकार कमीत कमी, पण त्यालाहि अंतर तर कापावेंच लागते ना ? त्यामुळे त्याची चपळाई कितीही अचाट असली तरी तिथें क्रिया आहे. आणि त्यामुळे काही ना काही वेळ हा लागणारच. परंतु परमात्मा हा असा सक्रिय वेगवान् नाही. तो अक्रिय असून सर्वव्यापी आहे. त्यामुळे त्याच्या वेगाची बरोबरी कल्पनेने हि कोणाला करता यावयाची नाहीं. म्हणून म्हटले आहे:

अनेजद् एकं मनसो जवीयः
नैनद् देवा आप्नुवन् पूर्वमर्षत् ।
तद् धावतोऽन्यान् अत्येति तिष्ठत्
तस्मिन् अपो मातरिश्वा दधाति ॥

इंद्रियें, वाणी, मन कोणीहि त्या आत्मतत्त्वाला गाठू शकत नाही. ही सर्व त्याने गांठून केव्हांचीच मागे टाकली आहेत. आणि ते हि इवलीशी हि हालचाल न करता. तें परमात्मतत्त्व अक्रिय असून सर्वव्यापी आहे. सर्वव्यापकत्व त्याचे सहज आहे. क्रियासाध्य नाही. खरोखर म्हणजे ते सर्व क्रियांचा आधार आहे. सर्व हालचाल, सर्व क्रिया त्याच्याच अंकावर होत असते. परमात्मा एकमेवाद्वितीय सर्वगत असल्यामुळे स्थलान्तराला वाव नाहीं आणि अक्रिय असल्यामुळे कालान्तराला हि वाव नाही. म्हणून वेगवान्, सर्वाधिक वेगवान् होय.

३७२. अमिताशन
" अमितं अशनं यस्य सः अमिताशनः ।" अमित म्हणजे मात्रारहित आहे अशन म्हणजे आहार ज्याचा तो अमिताशन होय. भीम हा खूप खाणारा होता. पण त्याने किती हि खाल्ले तरी ते कितीसें असणार ? परिमितच म्हणावे लागेल तें. त्याला कांहीं अ-मित, अ-मात्र म्हणतां यावयाचें नाहीं. कोणी हि एक व्यक्ति खाऊन खाऊन खाणार किती ? म्हणून भीम काय नि बकासुर काय ? सगळया व्यक्ति मितंपच च होत. परंतु या सर्वांच्या मुखानें, सर्व देहेंद्रियमनोबुद्रींच्या द्वारा सर्व विषयांचे ग्रहण करणारा जो सर्वभूतात्मभूत परमात्मा तोच एक अमिताशन म्हणावयाचा. सर्व कर्तृत्व-भोक्तृत्वाचा आधार आत्मसत्ता आहे. म्हणून तो परमात्माच एक अमिताशन म्हणावयाचा. अशन ही हि एक क्रिया आहे. पण सर्व क्रियांचा समावेश तिच्यांत होतो. कारण अशन म्हणजे केवळ खाणे नव्हे तर सर्व घडामोडींचें ग्रहण वा ज्ञान होय.

चिद्रूप परमात्मा हा सर्व घडामोडींचा साक्षी असल्यामुळे तो सर्वाशन होय, अमिताशन होय. गीतेच्या पुढील श्लोकांत परमात्याचे हे अमिताशनत्वच विवरिलें आहे:

वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन ।
भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन् ॥ गीता ७-२६
<

परमात्म्याची चित्सत्ताच सर्वग्रासी आहे. म्हणून परमात्मा हा अमिताशन म्हणावयाचा. इतर कोणी कितीहि मोठा विद्वान् झाला तरी तो सर्वज्ञ होऊं शकत नाही. सर्व विश्वांतलें सर्व काळचे सर्व कांहीं एक परमात्माच जाणतो म्हणून तोच अमिताशन, इतर सारे मिताशन, मितंपच च, किंचिज्ज्ञच.

॥ हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP