ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

मं ग ला च र ण ..

मंगलाचरण

श्लोकः १, २
यस्य स्मरणमात्रेण जन्म-संसार-बन्धनात् ।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे ॥
नमः समस्त-भूतानां आदिभूताय भूभृते ।
अनेकरूप-रूपाय विष्णवे प्रभविष्णवे ॥

अर्थः

१. ज्याच्या केवळ स्मरणानेच जन्मजन्मान्तररूप संसरणाच्या बंधनांतून जीवाची सुटका होते त्या सर्वशक्तिमान् विष्णूला नमस्कार असो.
२. नमस्कार असो त्या सर्वशक्तिमान् विष्णूला जो सर्व भूतांचा आदि आहे, ज्याने ही पृथ्वी धारण केली आहे आणि जो ही चराचर नानारूपें ल्याला आहे.
टिप्पणी
१. हे मंगलाचरणाचे दोन श्लोक विष्णुसहस्राच्या बाहेरचे आहेत. तथापि ते मंगलाचरण म्हणून पाठारंभीं म्हणण्याचा परिपाठ आहे. मंगलाचरण किती श्लोकांनी करावें याला नियम नाही. ते एका श्लोकानें, एका शब्दाने वा एका अक्षरानेंहि होऊ शकतें. ॐ हे एक अक्षर आहे. अथ हा एक शब्द आहे. आणि 'यस्य स्मरणामात्रेण' हा इथे श्लोक आहे. कुठे तिन्ही, कुठे दोन, कुठे एक आणि कुठे या पैकी काहींच नाहीं असेंहि आढळून येते. जिथें तें उल्लिखित नसतें तिथें तें अध्याहृत आहे असे समजावें. अथवा स्वयं-मंगलरूपाला दुसऱ्या मंगलाची गरज नाहीं असें म्हणावें.

२. "विश्वं विष्णुर्वषट्कारो" पासून 'सर्वप्रहरणायुधः' पर्यंत एकूण १०७ (एकशें सात) श्लोक आहेत. त्यांच्या आरंभी 'यस्य स्मरणमात्रेण' हा मंगलाचरणाचा एक श्लोक जोडून विष्णु-सहस्राच्या श्लोकांची ही अष्टोतरशती स्मरणिका होते. नित्यपाठाला एवढीच पुरेशी आहे. आरंभींचे प्रास्ताविक आणि अंतींचा उपसंहार निरर्थक नसला तरी नित्यपाठाला गरजेचा नाही. म्हणून माझी पाठावृत्ति अष्टोत्तरशती आहे. सारणी अष्टोत्तरशत-संख्यक ग्रथितांची असते, हे प्रसिद्धच आहे.

संख्येला तसें विशेष महत्त्व देण्याचे कारण नाही. परंतु विचारवंत आपल्या सर्व कृति मोजून-मापून करतात. कारण संख्या हा हि एक विचारच आहे. आणि त्यामुळेच ज्ञानाला त्यांनी सांख्य हे नांव दिलेलें आहे. सांख्यांत सर्व तत्त्वे संख्याबद्ध आहेत, क्रमबद्ध आहेत.

विष्णुसहस्रनाम हि एक सांख्यच आहे. तें नामांच्या सहस्राने बद्ध आहे. तसा सहस्रनाम हा ग्रंथहि अष्टोत्तरशत श्लोकबद्ध आहे असे म्हणायला हरकत नाही. व्यासांना निश्चितच हे संख्यान आवडेल. कारण व्यासांच्या सर्व कृति संख्याबद्ध आहेत. नवांक ही संख्याचक्राची त्रिज्या होय आणि व्यास त्याच्या दुपटीला म्हणतात म्हणून, व्यासांच्या बऱ्याच कृति (९x२)=१८ अष्टादशसंख्यक आहेत. गीता अष्टादशाध्यायिनी आहे. महाभारताची पर्वे १८ आहेत. भारतीय युद्धांतील अक्षौहिणी १८ आहेत. पुराणे १८ आहेत. उप-पुराणे १८ आहेत. भागवत ग्रन्थ अष्टादश सहस्र आहे. अशा प्रकारे १८ अष्टादश ही जणूं व्यासांची खूणच आहे. कुठे ना कुठे ती खूण येतेच. विष्णुसहस्र महाभारतांर्गतच आहे. त्याला पुनः १८ संख्येची गरज नाही. पण ग्रंथपरिमितीची गरज आहे. ती परिमिति १०८ मानल्यास १०८ संख्येला जें पावित्र्य आहे तें अधिक पवित्र होईल.

३. जन्मसंसारबन्धन : जन्मामागून जन्म घेत फिरणे म्हणजे जन्मसंसार होय. तेंच जें बंधन त्याला म्हणावयाचे जन्मसंसार-बंधन.

४. स्मरणमात्रेण : संसारबंधन आत्मविस्मृतीनें होतें. विस्मरणावर उतारा स्मरणाचा. म्हणून म्हटलें आहे 'स्मरणमात्रेण'. स्वप्नांतील दुःख जागृतीनेंच जायचे. तसें आत्म-विस्मरणामुळे उत्पन्न झालेलें संसार-दुःख स्मरणानेच जायचे. त्यासाठी ही अष्टोत्तर शत-ग्रन्थ-स्मरणी. इथें ग्रंथ म्हणजे श्लोक समजावयाचा. त्यांतील पहिला ग्रंथ हा मंगलाचरणाचा श्लोक होय.

५. विष्णु : गीतेंत "आदित्यानां अहं विष्णुः" म्हटले आहे. अर्थात् अदितिपुत्र सर्व देवांत, प्रकाशकांत, सूर्य हा सर्वोत्तम प्रकाशक होय. अशाप्रकारे विष्णु हा तेजो-देवता होय, सर्वोत्तम तेज:पुंज होय. सूर्य हे आधिभौतिक रूप आहे, सविता हे आधिदैविक रूप आहे आणि परमात्मा हे आध्यात्मिक रूप आहे. कारण तेंच चिद्घन असून सर्व चित्‌प्रकाशित आहे. त्याचीच उपासना गायत्रींत उपदेशिली आहे. त्यालाच उद्देशून मंत्र आहे -

उद् वयं तमसस् परि, ज्योति: पश्यन्त उत्तरम् ।
देवं देवत्रा सूर्यम्, अगन्म ज्योतिर् उत्‌तमम् ॥

हा चतुष्पाद अनुष्टुभ् श्लोक आहे. "देवं देवत्रा सूर्यम्" हा पाद 'देवं देवत्रा सूरिअम्' असा उच्चारिला असतां श्लोक सुस्वरूप बनतो. यांत उत् उत्‌तर आणि उत्‌तम अशा तिन्ही उत्तरोत्तर उंच पायऱ्या आलेल्या आहेत. त्या आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक भूमिकांचा उल्लेख करतात. ज्या पुरुषोत्तमाला आम्हांला गांठावयाचे आहे तो परं ज्योति होय. तोच विष्णु.

६. प्रभविष्णु : हा विष्णु अधिभूत सूर्य रूपाने भौतिक नैश तमाचा भेद करून वर येतो. अधिदैव सवितृरूपानें तो स्थूल उपाधींचा भेद करून आणखी वर चढतो आणि तोच अध्यात्म परमात्मरूपाने सूक्ष्मातिसूक्ष्म उपाधींचा, सर्व कोशांचा भेद करून सर्वोपरि विराजमान होतो. म्हणून त्याला म्हटले आहे प्रभविष्णु, सर्व अंतरायांवर मात करणारा. प्रभवति इति प्रभुः । प्रभवितुं शीलं अस्य इति प्रभविष्णुः । सर्व अंतरायांवर मात करतो म्हणून प्रभु आणि असें सर्वत्र प्रभुत्व गाजवणे हेच ज्याचें शील आहे तो म्हणावयाचा प्रभविष्णु.

७. आदिभूत : अव्यक्त प्रकृतीचा आश्रय म्हणून तो अक्षर परमात्मा आदिभूत होय, आदि सत्त्व होय. हे मूळ म्हणावयाचें संसार वृक्षाचें.

८. भूभृत् : ही भूमि, हा भूर्लोक, सर्व जीवनिकायांचा आश्रय आहे. आणि त्याचाहि आश्रय प्रकृतीच्या द्वारा तो परमात्माच आहे. म्हणून तो म्हटला आहे भूभृत्, भूलोकाला धारण करणारा. हा बुंधा म्हणावयाचा.

९. अनेकरूप-रूप : सृष्टींत जी चराचर नाना रूपें दिसतात ती सगळीं पांचभौतिक प्रकृतीच्या द्वारा परमात्म्यानेच धारण केलेली होत. म्हणून तो परमात्माच अनेकरूप-रूप म्हटला आहे. हीं सगळीं रूपें त्याचेच रूप आहे. ही पानें फुलें म्हणावयाची. असा हा समग्र संसार-वृक्ष आहे. आणि तो आदौ मध्यें अंतीं परमात्मरूपच आहे.

१०. मोगऱ्याचे फूल जसें बहुपुटी असते, तसें हें विश्वहि बहुपुटी आहे. पुडांत पुडें भरली आहेत त्यांत. एका विश्वांत दुसरें विश्व, आणि त्यांत पुनः तिसरें असें तें रचलेलें आहे. विश्वाकार हे एक पुट आहे. त्याच्या पोटांत भूमि हे दुसरें पुट आहे. त्याच्या हि पोटांत शरीर हे तिसरें पुट आहे आणि या तिन्ही पुटांत वा पुरांत तो परम पुरुष वसला आहे. म्हणून तो आदिभूत भूभृत् आणि अनेकरूप म्हटला आहे.

११. मंगलाचरणांतील सृष्टीच्या या सहज उल्लेखावरून तेंच सूत्र घेऊन परमात्म्याचे पहिलें नांव विश्वम् म्हणून स्फुरले असावें.

GO TOP