नारद भक्तिसूत्रे
लोकोऽपि तावदेव किंतु भोजनादिव्यापारस्त्वाशरीरधारणावधि ॥ १४ ॥
अर्थ - लौकिक व्यवहारही तोपावेतो (म्हणजे जोपावेतो शास्त्ररक्षणाची मर्यादा पाळली जाते तोपावेतो) (व्हावा) परंतु भोजनादी (लौकिक) व्यापार मात्र शरीरादिकांचे (केवळ) धारण होईतोपर्यंत (व्हावा.)
विवरण : निश्चय दृढ झाल्यानंतर जोपर्यंत मागील सूत्रात सांगितल्याप्रमाणे प्रेमीभक्ताकडून शास्त्ररक्षण होते तोपर्यंत त्याच्याकडून लौकिक व्यवहाराचे पालनदेखील होणे योग्य होय. कदाचित भक्तिप्रेमाच्या उत्कटतेमध्ये 'यज्ज्ञात्वा मत्तो भवति, स्तब्धो भवति, आत्मारामो भवति ।' (ना. भ. सू. ६) अशी बाह्यज्ञानशून्य अवस्था झाली तर शास्त्रिय व लौकिक सर्वच व्यापार बाजूला राहील ! पण साधक भक्त हा लोकांमध्ये राहणारा देहधारी मनुष्यच असतो. जोपर्यंत त्याचे प्रारब्ध आहे, तोपर्यंत देहधारण आहे, जोपर्यंत देहधारण आहे, तोपर्यंत देहशुद्धी, आहार, निद्रा, स्नान, वस्त्रधारण हे त्याला करावे लागणार. त्यासाठी त्याला घरदार, अन्नवस्त्र, धनधान्य इत्यादीची आवश्यकता राहणारच, म्हणजे माणसाला समाजात राहावे लागले की कांही प्राथमिक वस्तूची गरज ही राहणार. ती पूर्ण करण्यासाठी त्याला उद्योग, व्यवसाय काही तरी करावाच लागणार. अनेक भक्त हे असा आपला लौकिक व्यवहार सांभाळून भक्तीत रंगलेले होते असे दिसून येईल. श्री गोरोबा कुंभार, सावतामाळी, सेना न्हावी इत्यादी संतांनी अंतःकरणात अनन्य भक्तीचा उदय झाल्यानंतरही लौकिक व्यवहार सांभाळलेला दिसतो. निश्चयदाढर्यानंतर ज्याप्रमाणे भक्ताकडून शास्त्ररक्षण होवो असे नारदमहर्षीना वाटते. त्याप्रमाणे त्याच्याकडून लौकिक आचाराचेही पालन व्हावे असे त्यांना वाटते असे यावरून दिसते. भक्ती करणे म्हणजे कामधंदा सोडून काही तरी लोकापेक्षा वेगळा, विचित्र किंवा विक्षिप्त आचार करणे नव्हे ! 'अलौकिक नोहावे । लोकाप्रति ॥' असे श्री ज्ञानदेव म्हणतात, ते याच अर्थाने 'मन हे गोविंदी देह काम करी वो ।' असे गोपिकाच्या आचाराचे वर्णन श्रीतुकाराममहाराज करतात तेही हाच उद्देश प्रगट करण्यासाठी. भक्त म्हणजे कुणी योगी, तपी, संन्यासी नव्हे. तो व्यवहारात राहतो पण व्यवहार त्याला बाधू शकत नाही. कारण तो त्याच्या लौकिक आणि वैदिक सर्व व्यापाराचा न्यास भगवंताच्या चरणाजवळ करतो. मग लोकसंग्रहासाठी योग्य लौकिक व्यवहारही त्याच्या हातून भक्ती दृढ झाल्यानंतर घडला तर तो समाजरक्षणासाठी आवश्यकच आहे.
मागील सूत्रातील 'भवतु' हे पद त्याच अर्थाने या सूत्रातही अध्याहृत गृहीत आहे. 'भवतु.....शास्त्ररक्षणम् ।' तसेच 'भवतु लोकोऽपि' 'लोकव्यवहाराचे आचरण भक्ताकडून होवो.' असे म्हणण्यात ते त्याच्यावर बंधनकारक आहे असे नाही, तर ते शक्यतो होणे ठीक. अगदी अशीच भाषा ज्ञानदेवांनीही वापरली आहे. ते म्हणतात,
तो शरीराचेनि मेळे । करू का कर्में सकळें ।
परि आकाश धुये न मैळे । तैसा असे ॥ ज्ञा. १३. १०३२
पतित होऊ नये म्हणून त्याने शास्त्ररक्षण करावे आणि जोपर्यंत शास्त्ररक्षणाचे भान, भक्तिप्रेमाच्या उन्मादात त्याचा विसर होईतोपर्यंत, त्याला राहील, तोपर्यंत लौकिक व्यवहाराचे भान त्याने सांभाळले पाहिजे. 'तावत एव' या पदाचा हा अर्थ होतो. नाही तर शास्त्ररक्षण म्हणून स्नानसंध्या चालू आहे, पण भक्तीमुळे लोकांचे उसने आणलेले पैसे मात्र परत करण्याचा विसर पडला, असे ढोंग त्यात शिरावयाचे !
लौकिक व्यापार म्हणजे केवळ आहारनिद्राच नव्हे. समाजाचा आणि कुटुंबाचा घटक म्हणून रूढ, योग्य आणि आवश्यक सर्व कर्तव्यकर्माचे पालन म्हणजे लौकिक व्यापार. भगवत्भक्तीने अंतःकरण व्यापले की सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने मनुष्य वायाच गेला पाहिजे (!) असा भ्रामक अर्थ श्रीनारदांचा आणि महाराष्ट्रातील साधुसंतांचाही दिसत नाही.
श्रीनारदमहर्षींनी लौकिक व्यापाराचा उल्लेख करताना 'भोजनादि' असा केला आहे. शरीररक्षणासाठी आवश्यक असणारा भोजन हा अगदी प्राथमिक असा व्यापार आहे. पण त्यापुढे 'आदि' जोडले आहे ! भोजनासारख्या प्रारंभिक, आवश्यक, लौकिक कृत्यापासून सुरुवात करून ते इतर सर्व आवश्यक व योग्य व्यवहारांचा त्या 'आदि' मध्ये अंतर्भाव आहे. कारण पुढेही 'आशरीरधारणावधि' असे त्यांनी म्हटले आहे. 'आ-शरीर' म्हणजे शरीरापासून ते इतर ज्या उपाधी कुटुंबात आणि समाजात कमीतकमी आवश्यक आहेत त्यांच्यापर्यंत.
पण मग भक्त आणि इतर संसारी पुरुष याच्यात काय भेद राहिला ? कारण 'भोजनादि' मध्ये सर्व कर्मे व 'आशरीरामध्ये' संसारातील घरदार, पैसा, संपत्ती, कुटुंब-मुले, या सर्वांचा समावेश होतो ! या सर्वांची जबाबदारी जर भक्ताने स्वीकारली तर त्याने भक्ती केव्हा आणि कशी करावी ? कारण संसारातील या उपाधी सतत वाढतच राहणार. त्याच्या लौकिक व्यापाराला काही मर्यादा आहे किंवा नाही
ती मर्यादा 'धारणाविधी' या शब्दानी सूत्रात सांगितली आहे. लौकिक व्यवहार भगवंताविषयी अनन्यता दृढ झाल्यानंतर भक्ताकडून होवो, पण तो हव्यासाने नव्हे, किंवा सांसारिक वस्तूच्या विषयीच्या आकर्षणाने त्यांची वाढ करण्याच्या उद्देशानेही नव्हे, तर केवळ त्याचे 'धारण' व्हावे या मर्यादेतच. शास्त्राचे आचरण ज्याप्रमाणे शास्त्र 'रक्षणा' पुरतेच मर्यादित काम्यकर्में करून अधिक काही मिळविण्यासाठी नव्हे, ह्याप्रमाणे भोजनादी व्यापारही लौकिकासाठी अपरिहार्य असणार्या शरीरादीच्या 'धारणा' पुरतेच मर्यादित ठेवावयाचे, 'पोषणा' साठी करण्याकडे प्रवृत्त व्हावयाचे नाही ! लौकिक विषयांची हाव वाढवून त्याचा अधिकाधिक संग्रह भक्ताने करू नये हा भाव 'धारणावधि' या पदांनी सुचविला आहे.
काही अर्थकारांनी या व यापूर्वीच्या 'भवतु निश्चयदार्ढ्यात...' या सूत्रांचे अगदी वेगळे अर्थ केले आहेत. कुणी या दोन सूत्रांचा अर्थ, 'निश्चय दृढ झाल्यानंतर मगच शास्त्ररक्षण करावे, नसता भक्तिमार्गातून पतन होईल. त्याप्रमाणे लौकिक व्यापारही निश्चय दृढ झाल्यानंतरच करावा, पण भोजनादी लौकिक व्यापार तर शरीर असेपर्यंत करावे लागतात ! (म्हणजे त्यासाठी निश्चय दृढ होण्याची मर्यादा नाही) असा अर्थ केला आहे.
कुणी, 'दृढ निश्चय झाल्यानंतरदेखील शास्त्ररक्षण करावे, नसता पतन होईल व लौकिक कर्मेही जोपर्यंत बाह्यज्ञानाचे प्रेमोत्कर्षामुळे विस्मरण होणार नाही तोपर्यंत करावीत, पण भोजनादी कर्मे मात्र त्या लोकव्यवहार विस्मरणाच्या अवस्थेतही होत राहतात, कारण जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत त्याच्या धारणेसाठी ती आवश्यक आहेत असा केला आहे.
या वरील अर्थांमध्ये 'आशरीरधारणावधि' या पदाचा अर्थ योग्य रीतीने लागत नाही. वरील अर्थ होण्यासाठी एकतर 'आशरीरधारणम्' असे (म्हणावयास पाहिजे होते किंवा 'शरीरधारणावधि' असे) म्हटले असते तरी पुरेसे होते. पण सुरुवातीस 'आ' हा उपसर्ग आणि शेवटी 'अवधि' असे शब्दयोगी अव्यय हे दोन्ही एकाच अर्थाने जोडण्याचे काय कारण असावे ? सूत्ररचनेमध्ये हे अपेक्षित नाही.
श्री स्वामी अखंडानद सरस्वती यानी आपल्या 'नारदभक्तिदर्शना' मध्ये ही शंका व्यक्त केली आहे. पण त्यांनी या शंकेचे समाधान वेगळ्या रीतीने केले आहे. ते म्हणतात, 'आशरीरधारणावधि' म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत 'आ' शरीराचा प्रारंभ सुचवितो आणि 'अवधि' त्याच्या धारणाचा शेवट ! या दोन टोकामध्ये भोजनादी लौकिक व्यापार करावेच लागतात. पण हाच अर्थ "आशरीरधारणम्" किंवा 'शरीरधारणावधि' यापैकी कोणत्याही संक्षेपाने सुचवला जातोच.
'आ' या उपसर्गाचे दोन अर्थ होतात. एक अर्थ 'पर्यंत' असा आहे, जसे आचंद्रसूर्य किंवा आकर्ण या ठिकाणी चंद्रसूर्य असेपर्यंत किंवा कानापर्यंत असा होतो. दुसरा अर्थ "पासून" असा आहे. जसे, आबालवृद्ध किंवा आनखशिखाग्र येथे बालापासून वृद्धापर्यंत किंवा नखापासून शेंडीच्या टोकापर्यंत असा अर्थ होतो. येथे 'आशरीर' मध्ये तो दुसर्या अर्थाने आला आहे. 'आशरीर' म्हणजे शरीरापासून प्रारंभ करून ते इतर आवश्यक व योग्य लौकिक विषयांपर्यंत असा अर्थ होतो. पण नारदांना येथे हे अपेक्षित आहे की या आशरीर सर्व विषयाचे केवळ धारण होईल. इथपर्यंतच त्याने लौकिक व्यवहार करावा, अधिक करू नये.
लौकिक व्यवहाराचा भार भक्ताने कशासाठी वहावा ? तो देवावर टाकून त्याने त्या संसाराच्या उपाधीतून मुक्त का होऊ नये ? परमात्मा त्याचा योगक्षेम चालविणार नाही काय ? अशा शंका यावर कदाचित येतील. भक्ताचा योगक्षेम भगवान चालवितो, हे खरे, पण म्हणून जाणूनबुजून भक्ताने तो देवावर टाकणे म्हणजे देवाला आपल्या संसाराचे साधन बनविणे आहे. तसे करणे म्हणजे ती भक्ती 'कामयमाना' होईल. पण 'कामयमाना' झाली की ती भक्ती राहत नाही !
'सा न कामयमाना' ( ना. भ. सू. ७) असे पूर्वी म्हटलेच आहे. त्याचप्रमाणे केवळ लोकव्यवहार टाकणे म्हणजेही भक्ती नव्हे तर, "लोकवेदव्यापारन्यास" (ना. भ. सू. ८) हे तिचे एक लक्षण आहे. केलेली कर्मे भगवदर्पण करणे हे भक्तीचे त्यागमय स्वरूप आहे.
नको गुफो भोगी नको पडो त्यागी । लावुनि सरे अगी देवाचिया ॥ असाच उपदेश श्रीतुकाराममहाराजही करतात.
GO TOP
|