नारद भक्तिसूत्रे

कथादिष्विति गर्गः ॥ १७ ॥


अर्थ : भगवत्कथाआदिकांमध्ये अनुराग ठेवणे (हीच भक्ती होय,) असे गर्गाचार्य मानतात.


विवरण : व्यासाचे मत सांगितल्यावर नारद गर्गाचार्यांचे मत सांगतात. गर्गाचार्य हे यादवांचे पुरोहित होते, असे श्रीमद्‌भागवत दशम स्कंध अध्याय आठमध्ये म्हटले आहे. ते महातपस्वी व मोठे ज्योतिषशास्त्रज्ञ होते, असेही तेथे वर्णन आहे. देवीभागवतामध्ये याच्या नावावर एक कथा आहे. देवकीला मुले झाल्याबरोबर त्यांना मारण्याचा कंसाने सपाटा चालविला, तेव्हा वसुदेवाने यांना पुत्र दीर्घायु होण्याचा उपाय विचारला, म्हणून यांनी देवीभागवत श्रवण करण्याचा उपाय सांगितला. पण ते तुरुंगात शक्य नव्हते म्हणून गर्गमुनींनी स्वतः देवीभागवताचा पाठ केला. त्यामुळे देवीने लवकरच कृष्णावतार होईल, असा वर दिला. (दे. भा. १/२) वसुदेवाने यांना मथुरेत सांगितले की, गोकुळात नंदाच्या येथे जो पुत्र जन्मला आहे, तो वास्तविक माझाच आहे. मीच कंसभयाने त्यास तेथे नेऊन ठेविले आहे. पुत्रोत्पत्तीनंतर जातकर्मादी संस्कार आवश्यक आहे, आपण आम्हा यादवांचे कुलोपाध्याय आहा, तेव्हा आपण तेथे जाऊन त्याचा नामकरण संस्कार करावा. त्याप्रमाणे गर्गाचार्य गोकुळात गेले व त्यानी नंदगृही प्रवेश करून बलराम आणि श्रीकृष्ण यांचा नामकरण विधी केला व श्रीकृष्णाचे भविष्यकथनही केले. ही कथा भागवत दशमस्कंधाच्या आठव्या अध्यायात आहे. गर्गसंहितानामक बारा हजार श्लोकाचा श्रीकृष्णचरित्रपर ग्रंथ उपलब्ध आहे, तो याचाच आहे, असे मानले जाते. त्यात इतर पुराणात उपलब्ध न होणार्‍या अशा कृष्णचरित्रातील बर्‍याच कथा उपलब्ध होतात. यावरून हे मोठे कृष्णभक्त असावेत, असे म्हणावयास हरकत नाही.

ज्योतिष्यात यांची प्रसिद्धी बरीच दिसून येते. पंचागातून गर्गाचार्यांचा मुहूर्त प्रमाण मानला जातो. ज्योतिषावर यांची एक संहिता आहे. तसेच काही धर्मशास्त्रग्रंथातून गर्गस्मृतीचे उतारे सापडतात. मात्र गर्ग अनेक झाले असावेत असे दिसून येते. ज्या अर्थी नारदमहर्षीसारख्यांनी त्यांच्या मताचा अनुवाद केला आहे, त्या अर्थी भगवद्‌भक्तिविषयक त्याचा अधिकार थोर असला पाहिजे, असे म्हणावयास हरकत नाही.

व्यासमहर्षीच्या मतात पूजादिकाविषयी अनुराग म्हणजे भक्ती, तर गर्गाचार्य यांच्या मते श्रीभगवत्कथादिकात अनुराग म्हणजे भक्ती असे मानले जाते. पूजादिकांमध्ये उपचाराकरिता फार खटाटोप करावा लागतो. जर तो उपचार प्राप्त न झाला तर पूजेत वैगुण्य निर्माण होते. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रात एक कथा (१. मयूरचित्रक नावाचा एक ग्रंथ तसेच जलविद्या आणि वास्तुशास्त्र या विषयावरही गर्गांच्या नावावर ग्रंथ आहेत पण ते अन्य कुणी गर्ग असावेत असे मानले जाते.) आहे. भगवान श्रीकृष्ण श्रीशंकराची आराधना नित्य सहस्त्रकमलांनी करीत होते. पण शेवटच्या दिवशी एक कमळ कमी पडले, त्यामुळे पूजेत न्यूनता निर्माण झाली. तेव्हा ती न्यूनता दूर करण्यासाठी श्रीकृष्णानी आपले नेत्रकमल समर्पण केले ! असा पूजाविधी कठिण आहे. तसेच पूजेस योग्य स्थलकालादिकाची आवश्यकता असते. तशी कथाकीर्तनश्रवणभक्तीकरिता अन्य साधनाची अपेक्षा असतेच असे नाही. वीणा, मृदंग, तालादी वाद्ये उपलब्ध झाली तरी ठीक, नसता काही अडत नाही. तसेच कलियुगामध्ये अन्य साधनापेक्षा कीर्तनभक्तीलाच श्रेष्ठत्व दिले आहे. नवयोगेश्वर जनक संवादात सांगितले आहे -
कलि सभाजयन्त्यार्या. गुणज्ञा. सारभागिन. ।
यत्र संकीर्तनेनैव सर्व स्वार्थोऽभिलभ्यते ॥ भा ११ - ५ - ३६
'गुणज्ञ सारभूत वस्तूचा अंगीकार करणारे श्रेष्ठ पुरुष कलियुगाचा आदर करतात, कारण या युगात केवळ भगवत्कथा संकीर्तनानेच सर्व प्रकारचे इष्ट पुरुषार्थ प्राप्त होतात.'

या श्लोकावरील टीकेत श्रीएकनाथमहाराज सांगतात -
ऐक राया सर्वज्ञा । धन्य धन्य कलियुग जाणा ।
जेथ सर्व स्वार्थ हरिकीर्तना । नामस्मरणासाठी होती ॥ ४०३ ॥
कलियुगी दोष बहुत । केवी कीर्तनें होय स्वार्थ ।
तेथे दोषत्यागें जे गुण घेत । ते नित्यमुक्त हरिकीर्तनी ॥ - ॥ ४०४ ॥ अ. ५
पण खरा कथारसिक भक्त विशिष्ट हेतूने कथाकीर्तन करीत नाही. कथेपासून सर्व अभीष्ट प्राप्त होऊ शकेल. पण तेथे 'अनुराग' शब्द आहे. कथेत रंगलेला भक्त तन्मय होत असतो, तो कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवीत नाही.

भक्तिशास्त्रामध्ये भगवत्कथा प्रेमाने गाणे, प्रेमाने श्रवण करणे या क्रियेला फार महत्त्वाचे स्थान आहे. श्रीमद्‌भागवताच्या प्रथमस्कंधात नारद-व्यास संवादात प्रत्यक्ष नारदमहर्षीच कीर्तनभक्तीचे श्रेष्ठत्व वर्णन करीत आहेत.
इद हि पुसस्तपसः श्रुतस्य वा स्विष्टस्य सूक्तस्यच बुद्धिदत्तयो ।
अविच्युतोऽर्थ कविभिर्निरूपितो यदुत्तमश्लोकगुणानुवर्णनम ॥ भागवत - १ - ५ - २२

'विद्वानांनी विचार करून हेच निरूपण केले आहे की, भगवद्‌गुणानुवादकीर्तन हे तप, वेदाध्ययन, योग्यप्रकारे केलेले यज्ञ, मंत्र, ज्ञान व दानादिकांचे अविनाशी फल आहे, म्हणजे वरील सर्व साधनांपेक्षा कथा-कीर्तन भक्तीचे श्रेष्ठत्व सिद्ध होते.

कथेचे स्वरूप कसे असावे, कथा-कीर्तनांमध्ये किती गोष्टींचा समावेश होतो याचे श्रीएकनाथमहाराज स्वरूप सांगतात -
हरिचरित्रे अगाध । ज्ञानमुद्रापदबंध ।
कीर्तनी गातां विशद । परमानंद वोसंडे ॥
वानिती अजन्मयाची जन्मे । वानिती अकर्मयाची कर्मे ।
स्मरतीं अनामियाची नामें । अति सप्रेमे डुल्लत ॥
साधावया निजकाज । सांडूनि लौकिकाचें काज ।
कीर्तनी नाचती भोज । अतिनिर्लज्ज निःशंक ॥
भगवंताचे स्वरूपभूत असणारे यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्यादी षड्‍गुणांचे कीर्तन, तसेच भगवंताच्या अलौकिक लीलाविशिष्ट अवताराची चरित्रे गायन करणे, त्याचा जन्म, कर्म रूप इत्यादिकाचे वर्णन करणे, अशा सर्वच गोष्टीचा कथा शब्दात समावेश होतो.

हरिनामगुणकीर्तनकीर्ति । अखंड आवडे जागृति ।
स्वप्नीं होतेचि स्थिती । दृढ हरिभक्तीं ठसावें ॥
ऐसियापरी भक्तियुक्त । दृढतर जाहले ज्याचे व्रत ।
तंवतंव होय आर्द्रचित्त । प्रेम अद्‌भुतहरिनामकीर्ती ॥ एकनाथी भागवत. २. ५५७ - ५८

मागील सूत्रात व्यासाची पूजाभक्ती सांगितली. पण त्याच व्यासांनी -
यज्ञैः संकीर्तनंप्रायैयजन्ति हि सुमेधसः ॥ भाग. ११ - ५ - ३२
'शुद्ध बुद्धीचे लोक कथासंकीर्तनरूप यज्ञानीच यजन (पूजा) करतात. म्हणजे नामसंकीर्तन ही एक मोठी पूजाच आहे, असे म्हटले आहे. या श्लोकावरील टीकेत श्रीएकनाथमहाराज सांगतात -
मधुपर्कादिकविधान । खङ्ग केलें जें पूजन ।
तेंही मानोनिया गौण । आवडे कीर्तन कलीयुगीं कृष्णां ॥
नवल कैसें राजाधिराजा । कीर्तन तेंचि महापूजा ।
ऐशी आवडी अधोक्षजा । कीर्तनें गरुडध्वजा उल्हासुसदा ॥
कीर्तनी हरीची आवडी कैशी । वत्सालागी धेनू जैसी ।
कां न विसंबे जैसी माशी । मोहळासीं क्षणार्ध ॥
यालागी हरिकीर्तनी गोडी । जयासी लागली धडफुडी ।
त्यासीं नाना साधनाच्या वोढी । सोसावया सांकडीं कारण नाहीं ॥
ज्यासी कीर्तनी कथाकथनी । चौगुण आल्हाद उपजे मनी ।
तो उद्धरला सर्व साधनी । पवित्र अवनी त्याचेनि ॥ ए. भा. ५. ३४५ - ५७

भागवतादी पुराणग्रंथांतून तसेच संतांच्या वाङ्‍मयातून अशी आणखीही पुष्कळ प्रमाणे सापडतात. कोणतेही साधन श्रीहरीच्या संतोषाकरिता किंवा स्वतःच्या चित्तशुद्धीकरताच करावयाचे असते. ते फल हरिकथेच्या ठिकाणी ज्याचे खरे प्रेम आहे, त्याला अनायासेच प्राप्त होते.

कथा म्हणजे काय व कथेचा विषय कोणता असावा, याबद्दल संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराजांचा एक अभंग प्रसिद्ध आहे.
सगुणचरित्रे परमपवित्रे सादर वर्णावीं ।
सज्जनवृंदे मनोभावें आधी वंदावीं ॥ १ ॥
संतसंगें अंतररंगे नाम बोलावें ।
कीर्तनरंगी देवासन्निध सुखें डोलावें ॥ २ ॥
भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या ।
प्रेमभरें वैराग्याच्या युक्ति विवराव्या ॥ ३ ॥
जेणेंकरूनि मूर्ति ठसावें अंतरी श्रीहरीची ।
ऐशी कीर्तनमर्यादा आहे संतांच्या घरची ॥ ४ ॥
अद्वयभजनें अखंड स्मरणें वाजवी करताळी ।
एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी ॥ ५ ॥

भक्तवर्य श्रीतुकाराममहाराज हे कथेविषयी अतिशय अनुराग ठेवणारे होते, ते देवाजवळ स्पष्ट म्हणतात -
सांडुनि कीर्तन न करी आणिक काज ।
नाचेन निर्लज्ज तुझ्या रंगी ॥ १ ॥

ते हरिकथेच्या आनंदाला ब्रह्मानंद, ब्रह्मरस म्हणतात.
सोपे वर्म आम्हा सांगितले संती ।
टाळ दिंडी हाती घेऊनि नाचा ॥ १ ॥
समाधीचे सुख सांडा ओवाळून । ऐसा हा कीर्तनी ब्रह्मरस ॥ २ ॥

कथेचे स्वरूप, कथेचे फल, कथेची मर्यादा, देवाला कथा किती आवडते, कथेत कसा रस निर्माण होतो, या सर्वच विषयांचा त्यांच्या अभंगात विचार सापडतो. कथेचे एवढे महत्त्व का ? तर कथा ही भगवंताला अतिशय आवडणारी भक्ती आहे. भगवान श्रीकृष्ण भक्तवर्य उद्धवास सांगतात,
आळस दवडूनि दुरी । अभिमान घालूनिया बाहेरी ।
अहर्निशी कीर्तन करी । गर्व न धरी जाणिवेचा ॥ ७३८ ॥
गाणीव जाणीव शहाणीव । वोवाळुनि सांडावे सर्व ।
सप्रेम सावडी कथा गौरव । सुख अभिनव तेणें मज ॥ ७३९ ॥

मूळ सूत्रात 'कथादिष्वनुराग' असे म्हटले आहे. येथे कथा आदी शब्दाने कथा म्हणजे भगवद्‌गुण, लीला, माहात्म्य हे सर्व प्रेमाने गीत, वाद्य व प्रेमी भक्तांसह गाणे असा अर्थ होतो. आदी शब्दाने कथाश्रवण हा अर्थ घेणे योग्य होईल. कारण श्रीमद्‍भागवतादी भक्तिशास्त्रावरील ग्रंथातून भगवत्कथा गायनाचे जेवढे माहात्म्य सांगितले आहे तेवढेच चरित्रगुण लीलाश्रवणाचेही सांगितले आहे.

स्वर्गस्थ इंद्रादिक देव भगवंताची स्तुती करताना म्हणतात.
शुद्धिर्नृणा नतु तथेड्य दुराशयाना विद्याश्रताध्ययनदानतप क्रियाभिः ।
सत्त्वात्मनामृषम ते यशति प्रवृद्धसच्छ्रद्धया श्रवणसंभृतया यथा स्यात ॥ भागवत ११ - ६९

'देव म्हणतात, हे पुरुषोत्तमा, वारंवार तुझ्या लीलांचे श्रवण करून तुझ्या सत्त्वप्रधान भक्तीच्या योगाने भक्तांना जसे समाधान प्राप्त होते, तसे समाधान व मानसिक शुद्धी विषयवासनेने ज्यांची अंतःकरणे दूषित झालेली आहेत, अशा पुरुषांना वेदांतज्ञान, ग्रंथश्रवण, अध्ययन, दान, तप इत्यादी कर्मांनी होत नाही. या श्लोकावरील टीकेत नाथमहाराज म्हणतात,
एवं तुझे किर्तीचे श्रवण ॥ तेचि परमशुद्धीसी कारण ।
या वेगळें जे साधन । ते केवळ जाण प्रयास ॥
चित्तशुद्धीसी कारण । प्रेमयुक्त कीर्तन श्रवण ।
येथ सच्छ्रद्धाचि प्रमाण । अकारण साधनें ॥ नाथभागवत, ६. ८९ - १०५

कथादिकात अनुराग ठेवणे म्हणजे भक्ती असे लक्षण श्रीगर्गमुनीनी केले आहे, ही गोष्ट अन्य भक्तियोगाचा विचार करणार्‍या भागवद्‍भक्तांनाही मान्यच आहे. हेच आतापावेतो केलेल्या वरील विवेचनावरून सिद्ध होते. भक्तश्रेष्ठ गोपिकाचे कथाप्रेम किती होते, भगव‍द्‌वियोगकाळी त्यानी त्या कथामृताचेच महत्त्व गाईले आहे, हे 'कथादिष्वनुराग' याचे एक महत्त्वाचे लक्षण होय. भक्ताचा ज्या विषयात अनुराग असतो, तो विषयही तितकाच महत्त्वाचा असणे योग्य नाही काय ? गोपिका प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवंतालाच उद्देशून म्हणतात -
तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहम् ।
श्रवणमङगलं श्रीमदाततं भुवि गृणन्ति ते भूरिदा जनाः ॥

'हे श्रीकृष्णा, तुझी कथा इतकी मधुर वाटते की, तिला अमृताचीच उपमा द्यावी. तसेच ती भवतापसंतप्त मानवांना शांती देणारी, जीवन देणारी आहे, मोठे मोठे तत्त्वज्ञ देखील या कथेची स्तुती करतात, सर्व पापांचा नाश करणारी आहे. केवल श्रवणमात्रानेच सर्व मंगलाची सिद्धी करणारी आहे. अनंत वैभवाने संपूर्ण आहे. या पृथ्वीतलावर जे तुझ्या कथांचे वर्णन व गायन करतात, ते फार मोठे दानी म्हणविले जातात.' (श्रीभागवत १० - ३१ - ९)


GO TOP