नारद भक्तिसूत्रे

दुःसंगः सर्वथैव त्याज्यः ॥ ४३ ॥


अर्थ : दुष्ट संग हा सर्व प्रकारे (अंतर्बाह्य) टाकला पाहिजे.


विवरण : मनुष्य हा संगप्रधान प्राणी आहे हे सर्वमान्य आहे. संगाविना तो राहू शकत नाही. संसारातही संग असतोच व परमार्थातही सत्संग आवश्यक आहेच हे मागील सूत्रांतून स्पष्ट झालेच आहे. पण ती सत्संगती प्राप्त होण्याला प्रतिकूल अशी दुःसंगती असते. अनादि संसारात नित्य विषयसेवनाचेच संस्कार साचलेले असतात. इंद्रिय-तादात्म्य, विकार हे त्या दुःसंगाचे प्रेरक असतात. जोपावेतो त्या दुःसंगात साधक असतो तोपावेतो त्याची सत्संगाकडे प्रवृत्ती होत नाही. कदाचित झाली तरी तिचा उपयोग होऊ शकत नाही. म्हणून प्रथम त्या दुःसंगाचा त्याग करावयास नारद सांगतात. कित्येक वेळी दुःसंगाचे काही अनिष्ट परिणाम भोगावयास मिळाले असता काही दुःसंग टाकले जातात असे दिसून येते. पण तो खरा त्याग नव्हे. एका प्रकारचा टाकला तर अन्य प्रकारचा राहतोच. कारण दुःसंग एकच प्रकारचा नसतो. म्हणून सूत्रात 'सर्वथैव' असे महत्त्वाचे पद घातले आहे. संगाचा चांगलेपणा व वाईटणा त्या संगाच्या विषयावर अवलंबून असतो. दुःसंग हा बाह्य व आंतर असा दोन प्रकारचा आहे. निषिद्ध शब्द स्पर्शादि पंचविषय हे बाह्य असतात, पण ते तमोगुण कार्य म्हणून मोहशक्तीने युक्त असतात. अनादिकालीन विषय इंद्रियतादात्म्यामुळे विषयाचे ठिकाणी अनुकूल बुद्धी निर्माण होते. अंतःकरण राग व द्वेषयुक्त असते, त्यामुळे ते सहज विषयाकडे प्रवृत्त होते. पण ते परिणामी किती बाधक असतात याचे विवेचन मागे सूत्र पस्तीसमध्ये आलेच आहे. त्यातही विशेषतः ते विषय स्त्रीदेहाच्या द्वारा जेव्हा पुढे येतात तेव्हा ते अधिक आसक्तीला कारण होतात. या बाह्य संगाचा त्याग करताना साधक भक्ताने दोन गोष्टींपासून आपल्याला फार सांभाळले पाहिजे असे श्रीकृष्ण उद्धवास उपदेश प्रसंगी भागवत एकादश स्कंध, अध्याय चौदा तसेच अध्याय सव्वीसमध्ये सांगतात. त्या दोन गोष्टी म्हणजे स्त्रीसंग व त्यापेक्षा बाधक असा स्त्रैणसंग.

श्री एकनाथ महाराज अनुवाद करतात -
जो मजलागी आर्तभूत । तेणे सांडावी स्त्रीसंगाची मात ।
मी चिंतावा भगवंत । तेणें एकांत सेवावा ॥ ३६० ॥
स्त्रियेच्याही परिस वोखटी । संगती स्त्रैणांची अति खोटी ।
त्यासी न व्हावी भेटीगाठी । न पहावे दिठी दुरोनि ॥ ३६१ ॥ अ. १४

साधकांस स्त्रीसंग कसा बाधक होतो, मोठे मोठे तपस्वीही या संगात अडकून पडले व त्यांचा तपोभंग कसा झाला याचे रसभरित वर्णन एकादश स्कंधाच्या सव्विसाव्या अध्यायांत केले आहे (एकनाथी भागवत-एकादशस्कंध, अध्याय सव्वीस श्लोक चोवीस वरील व्याख्यान पहा.) कोणास वाटेल स्त्री ही एवढी घातक आहे काय ? याचे उत्तर हेच की केवळ स्त्री ही बाधक नाही, येथे स्त्रीचा निषेध नाही. स्त्रीसंगाचा-आसक्तीचा निषेध आहे. विशेषता मनुष्य त्यात आसक्त होतो आणि सामान्यांना स्त्री ही केवळ भोग्य वस्तूच वाटते. भोग्य या रूपाने स्त्री अथवा पुरुष यांची बाधकता समानच असते. एखादी व्यभिचारिणी स्त्री एखाद्या परपुरुषास भोग्य या रूपाने पाहील तर तो पुरुषसंगही बाधकच झाल्याविना राहणार नाही. तो दुःसंगच होईल. श्री एकनाथ महाराजानी स्त्रीसंगापेक्षा स्त्रैणाचा संग फार वाईट, घातक असतो असे म्हटले आहे. स्त्रीसंगतीने कित्येक तरूनही गेले अशी प्रसिद्धी आहे. पण स्त्रैण संगतीने अधःपातच होतो.

स्त्रीसंगाच्या मोहमदा । सुटका आहे यदाकदा ।
परी स्त्रैण संगतीची बाधा । ते आपदा अनिवार ॥
चुडाला स्त्रियेचे संगती । तरला शिखिध्वज भूपती ।
ना तरी मदालसेचे संगती । तरला नृपती कुवलयाश्व ॥
हो का लीलेने करुनि भक्ती । प्रसन्न केली सरस्वती ।
तिचा उद्धरिला निजपती । हे बोलिले ग्रंथी वसिष्ठे ॥
या परी स्त्री संगती । उद्धरिले ऐकिजेति ।
परी स्त्रैणाचे संगती । उद्धारा गती असेना ॥ एकनाथी भागवत १४-३७६-७९.

मनुष्य हा संगप्रधान प्राणी आहे असे आरंभी सांगितलेच आहे. मात्र तो एखाद्या वस्त्रासारखा आहे. महाभारत शांतिपर्वात भीष्म म्हणतात.
यदि संतं सेवति यद्यसंतं तपस्विनं यदि वा स्तेनमेव ॥
वासो यथा रंगवंशं प्रयाति तथा स तेषां वशमभ्युपैति ॥

'मनुष्य संतांच्या संगतीत राहील तर तो तसाच बनतो. असंताच्या संगाने असंत, तपस्व्याच्या संगतीत तपस्वी व चोराच्या संगतीत चोर बनतो, वस्त्राला जो रंग द्यावा तो चढतो तसेच माणसाचे आहे.' असत्संग म्हणजे काय ? असंत कोणास म्हणावे हेही महाभारतात सांगितले आहे.
दुर्विचारा दुर्विचेष्टा दुष्प्रज्ञाः प्रियसाहसाः ।
असंतस्त्विति विख्याताः संतश्‍चाचार लक्षणाः ॥
दुष्ट विचार, दुष्ट आचार, दुर्बुद्धि, साहसप्रियता ही असंत लक्षणे होत. दुःसंग किती व कशा प्रकारे पुढे येतो हे श्रीकृष्ण भगवानच भक्त श्रेष्ठ उद्धवास सांगतात.

जो मानीना वेदशास्त्रार्था । जो अविश्वासी परमार्था ।
ज्या माजी अति विकल्पता । तोही तत्त्वता दुःसंग ॥
जो बोल बोल अतिविरक्त । हृदयी अधर्म कामरत ।
कामरोधे द्वेषा येत । तोही निश्चित दुःसंग ॥
स्वधर्म कर्म विनीतता । बाह्य दावी सात्त्विकता ।
हृदयी दोषदर्शी संता । हे दुःसंगता अतिदुष्ट ॥
जो मुखे न बोले आपण । परी देखे साधूचे दोष गुण ।
तेचि संवादिया दावी उपलक्षण । तो अतिकठिण दुःसंग ॥ एकनाथी भागवत अ. २६ ओ. ३०३ ते ६.

तसेच दुःसंग हा सर्वथा त्याज्य का याचे उत्तर पुढील सूत्रांतून नारद महर्षी देणारच आहेत, पण भागवतामध्ये कपिल देवहूति संवादात कपिल दुःसंगाचे बाधकत्व सांगतात -
सत्यं शौचं दया मौनं बुद्धिः श्री र्‍हीर्यशः क्षमा ॥
शमो दमो भगश्‍चेति यत्संगाद्याति संक्षयम् ॥ ३-३१-३३.

कपिल भगवान म्हणतात, 'दुष्ट संगाने सत्य, पावित्र्य, दया, मननशीलता, बुद्धि, लज्जा, श्री, कीर्ति, क्षमा, मनःशांति, इंद्रिये ताब्यात राहणे आणि ऐश्वर्य इत्यादि सर्व गुणाचा नाश होतो.' भक्तिमार्गाच्या दृष्टीने अत्यंत त्याज्य असा दुःसंग म्हणजे नास्तिक, अश्रद्धावान् तमोगुणी, रजोगुणी पुरुषांचा संग होय. अनेक तर्कदुष्ट अनुमाने, हेत्वाभास, कुतर्क, वितंडवाद, युक्त्याभास इत्यादिकाच्या द्वारा श्रद्धावान भक्तिमार्गीयांना सन्मार्गापासून च्युत करण्याचा त्यांचा अखंड प्रयत्न चालू असतो. श्रीतुकाराम महाराजही स्पष्ट सांगतात.

तार्किकाचा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ॥
नको दुष्टसंग । पडे भजनामध्ये भंग ॥
येथे दुःसंगाचा जो निषेध आहे तो सत्संगाच्या फलप्राप्तीकरता आहे. दुःसंग त्यागपूर्वक सत्संग झाला पाहिजे.

श्रीकृष्ण भगवानही हेच सांगतात.
ततो दुःसंगमुत्सृज्य सत्सु सज्जेत बुद्धिमानू ।
संत एतस्य छिन्दन्ति मनोव्यासङ्गमुक्तिभिः ॥ ना. भा. २६.

'याकरिता बुद्धिमान पुरुषाने दुष्टांची संगती टाकून देऊन संतांची संगती धरावी. संत हे आपल्या संगतीत असणार्‍याच्या मनातील विषयासक्तीचा आपल्या अमृतमय वाणीने नाश करतात.'

अशा रीतीने दुःसंग सर्वथा त्यागावा हे सांगितले. पण त्याचा त्याग का करावा ? तर तो सर्वथा जीवाचा सर्वनाश करणारा आहे. तो कशा कशा प्रकारे मानवाचा सर्वनाश करण्यास कारण होतो हे सांगण्याकरिता पुढील सूत्राची रचना केली आहे.


GO TOP