नारद भक्तिसूत्रे
यत्प्राप्य न किञ्चिद्वाञ्छति, न शोचति, न द्वेष्टि, न रमते, नोत्साही भवति ॥ ५ ॥
अर्थ : जे (भक्तिप्रेम) प्राप्त करून (तो पुरुष) अन्य (कशाचीही) किंचितही इच्छा करीत नाही (कोणाकरताही) शोक करीत नाही, (कोणाशीही) द्वेष करीत नाही, (कोणत्याही विषयात, वस्तूत किंवा व्यक्तीमध्ये) रममाण (आसक्त) होत नाही, कोणत्याही (लौकिक कार्यात) उत्साहयुक्त होत नाही.
विवरण : प्रेमी भक्ताच्या ठिकाणी संसारी माणसापेक्षा बर्याच अलौकिक गोष्टी सिद्धी, अमृतत्व, तृप्ती इत्यादी असतात. तसेच संसारी लोकाजवळ जे जे दोष असतात, जे जीवास परतंत्र-दुःखी बनवितात ते भक्ताजवळ नसतात. तेच निषेध मुखाने या पाचव्या सूत्रात सांगितले आहे. इच्छा, शोक, द्वेष इत्यादी जेथे असतात तेथे सिद्धी, अमृतत्व, तृप्ती राहू शकतच नाहीत. याकरिता इच्छा, शोक, द्वेष, उत्साह इत्यादिकाचा निषेध केला आहे. सूत्रारंभी 'यत्प्राप्य' ('म्हणजे भक्तिप्रेम प्राप्त झालें असता') असे पद आहे. त्या भक्तीची प्राप्ती कशी होते ? याचा विचार केला असता तीन प्रकाराने होते, असे दिसून येते.
१. पूर्वपरंपराप्राप्त म्हणजे उत्तर अधिकाराने मिळालेली. उदाहरण - प्रल्हादानंतरचे त्याच्या वंशातील बळी इत्यादी भक्त बनले. तुकाराममहाराज म्हणतात,
माझ्या वडिलाची मिराशी गा देवा । तुझी चरणसेवा पांडुरंगा ॥
सहज वडिला होती सेवा । म्हणुनि पूजीतो या देवा ॥
एकनाथाचे पूर्वज भानुदास हे महान्भगवद्भक्त होऊन गेले, अशी काही उदाहरणे आहेत, पण भक्ताचे वंशज सर्वच भक्त निपजतात असे नाही.
२. एखाद्या संताने वा गुरूने कृपा करून भक्तीचा मार्ग दाखविला म्हणजे ही भक्ती प्राप्त होते. श्री ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
श्रीगुरू निवृत्तीने दिधले । ते प्रेम कोणे भाग्ये लाधले ॥
किंवा भगवत्कृपा भगवत्प्रेरणेने हृदयात अकस्मात भक्तिप्रेमाचा संचार कोणा कोणाचे ठिकाणी झालेला दिसून येतो.
३. भजन, ध्यान, कीर्तन इत्यादी साधने करण्यानेही चित्तात भक्तीचा उदय होतो.
यांपैकी कोणत्याही प्रकाराने भक्तिप्रेम प्राप्त झाले म्हणजे झाले. अशा या भक्तिप्रेमात निमग्न पुरुष त्या भक्तीची प्राप्ती झाल्याने अन्य कशाचीही वांछा करीत नाही, असे श्रीनारद महर्षी म्हणतात. वांछा, अपेक्षा, इच्छा, कामना या सर्वांचा अर्थ एकच आहे. ही एक जीवाची मूलभूत मनोवृत्ती आहे. जेव्हा जीवाचे शरीराशी तादात्म्य होते तेव्हा तो बहिर्मुख होऊन हे मला पाहिजे, ते मला पाहिजे असे म्हणतो. त्या वृत्तीस इच्छा, कामना म्हणतात. एका इच्छेपासूनच पुढे द्वेष, शोक इत्यादी निर्माण होतात. सर्व जीव कामबद्ध आहेत. ही इच्छावृत्ती दृष्ट विषयप्राप्तीमुळे जरी क्षणिक अशी शांत झाल्यासारखी वाटली तरी ती शांतता क्षणिकच असते. तसेच इच्छेचे विषय असणारे सर्वच पदार्थ प्राप्त होतातच असे नाही, कारण त्याकरिता लागणारे अनुकूल प्रारब्ध वा प्रयत्न किंवा अन्य साधनसामग्री प्राप्त असतेच असे नाही. ती इच्छा पूर्ण झाली नाही की पुन्हा तळमळ, अशांतता निर्माण होतेच, यदाकदाचित एक इच्छा पूर्ण झाली तरी अनंत विषयांच्या अनंत इच्छा पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे वृत्ती सदैव बहिर्मुखच असते. ही बहिर्मुखताच सर्व अशांतीचे बीज आहे. भगवत्प्रेमात वृत्ती केवळ भगवदाकाररूप बनलेली असते. भगवत्प्रेमाचा आनंद भोगणार्या प्रेमी भक्तास सर्व ऐहिक - पारत्रिक भोग तुच्छ वाटतात.
खर्या भक्तास अन्य महत्त्वाच्याही भोगाची इच्छा कशी नसते याबद्दल भगवान श्रीकृष्ण उद्धवास सांगतात-
न पारमेष्ठयं न महेंद्रधिष्ण्यं न सार्वभौमं न रसाधिपत्यम् ।
न योगसिद्धिरपुनर्भवंवा मय्यर्पितात्मेच्छति मद्विनान्यत् ॥ - भागवत ११ - १४ - १४
'भगवान श्रीकृष्ण म्हणतात, 'उद्धवा ! ज्याचे चित्त माझ्या ठिकाणी अर्पिले गेले आहे, असा माझा अनन्यभक्त सामान्य भोगच काय, पण ब्रह्मलोकाचीही इच्छा करीत नाही. स्वर्गातील इंद्रपदाच्या भोगाचीही इच्छा करीत नाही. सार्वभौम राज्य प्राप्त झाले तरी त्याची त्यास अपेक्षा नसते. पाताळादी लोकांचे स्वामित्व त्यास तुच्छ वाटते. अणिमादी सिद्धीकडे तो पाहतही नाही, इतकेच नव्हे तर तो जन्मभावस्वरूप मोक्षाचीही पर्वा करीत नाही. माझ्यावाचून तो कशाचीही इच्छा करीत नाही.
इच्छा-आकांक्षा भक्तास कां नसते याचे महत्त्वाचे कारण श्रीज्ञानेश्वर - महाराजांनी बाराव्या अध्यायातील भक्तलक्षणाचे वर्णन करताना सांगितले आहे.
आणि जयापरौते काहीं नाहीं । तें आपणपेंचि आपुलां ठायीं ।
जाहला यालागीं जो कांहीं । आकांक्षी ना ॥ ज्ञा. १२ - १९३
बाह्यविषय दिसावेत, त्याच्या ठिकाणी सुखबुद्धी असावी, त्याच्या प्राप्तीविना जीवन अपूर्ण वाटावे, तरच त्याची इच्छा होते. पण प्रेमी भक्तास आपल्या प्रियतमाविना अंतरबाह्य काही दिसतच नाही. तर त्याच्या ठिकाणी अन्य विषयाची अनुकूल भावना कशी राहील ? प्रेमी भक्ताला बाह्य अंतर आपला प्रियतमच दिसत असतो. पुढे पंचावन्नाव्या सूत्रात नारद महर्षीच सांगतात,
तत्प्राप्य तदेव अवलोकयति, तदेव श्रुणोति तदेव भाषयति, तदेव चिंतयति ।
अशी स्थिती होते.
'विषय तो त्याचा झाला नारायण । नावडे जनधन माता - पिता ॥ असे या अवस्थेचे वर्णन श्रीतुकाराममहाराज करतात.
सूत्रात 'किञ्चित' असा शब्द आहे. सर्वांना सर्व विषयाची इच्छा असतेच असे नाही. तरीही कोणत्या ना कोणत्या विषयाची सूक्ष्म का होईना इच्छा असतेच, पण भक्ताचे इच्छा करणारे मनच उरत नाही. ते भगवन्मयच होऊन गेले असते. म्हणून किंचितही इच्छेचा प्रवेश त्याच्या ठिकाणी नसतो.
तसेच पुढील पद 'न शोचति' हे आहे. इच्छा हा जसा एक नैमित्तिक विकार आहे, तसाच शोक हाही एक नैमित्तिक विकार आहे. पण जीवाच्या जीवनात अपरिहार्यरूपाने तो येतो. ज्याच्याविषयी इष्ट बुद्धी असते अशा सचेतन वा अचेतन पदार्थाचा वियोग झाला म्हणजे आत्यंतिक दुःख होते त्यास शोक म्हणतात.
नश्वरा इष्टाचा नाश देख । तेणे देहाहंता मानी दुःख ।
या नांव गा शोक । सकळही लोक मानिती ॥ १७९ ॥ -नाथभागवत अ. २८
असे शोकाचे लक्षण श्रीकृष्णभगवंतानी उद्धवोपदेश प्रसंगी केले आहे.
संसारात प्रिय-अप्रियाच्या संयोग-वियोगाचे प्रसंग येतच असतात, म्हणजे अप्रियाचा संयोग व प्रिय वस्तूचा वियोग होतच असतो, कोणी तो टाळू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा, अर्जुनासारखा युद्धात प्रत्यक्ष शंकराना जिंकणारा पिता उपस्थित असताही अभिमन्यूच्या वियोगाचा शोक पांडवाना झाला. कितीही सुखात, ऐश्वर्यात, वैभवात असला तरी शोकाचा प्रसंग आला की सर्व तुच्छ होते व जीवनही असह्य वाटते. कित्येक शोकातिरेकाने आत्महत्त्याही करण्यास प्रवृत्त होतात.
शोकनाशाचे एक साधन आत्मज्ञान आहे, असे उपनिषदातून सांगितले आहे.
तत्र को मोहः क शोक एकत्वमनुपश्यतः ॥ -ईशावास्य
'कोणताही विकार भेदात, द्वैत प्रतीतीत असतो. जेथे आत्मैक्य बोध आहे, तेथे कुठला मोह व कुठला शोक संभवतो,' असे ईशावास्योपनिषदात म्हटले आहे.
श्रीकृष्ण भगवंतानी तत्त्वज्ञान सांगून अर्जुनाचा शोक दूर केला, हे प्रसिद्ध आहे. तसेच 'तरति शोकमात्मवित्' 'आत्मवेत्ता शोकातून तरून जातो' असे महर्षी नारद व सनत्कुमार यांच्या संवादात छांदोग्यउपनिषदामध्ये सांगितले आहे. तसेच भक्तही शोकरहित असतो. श्रीमद्भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायात श्रीकृष्णानी अर्जुनास जी भक्तलक्षणे सांगितली आहेत त्यात -
यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति । - गीता अ. १२
'अर्जुना' माझा जो प्रिय भक्त आहे तो कोणाचाही द्वेष करीत नाही. कोणत्याही वैषयिक भोगाची प्राप्ती झाली असता त्यास हर्ष होत नाही, तसेच तो कोणाहीबद्दल शोक करीत नाही व कशाचीही तो अपेक्षा करीत नाही.'
इष्ट वस्तूचा नाश अथवा वियोग झाला असता शोक होतो असे वर म्हटले आहे, पण भक्त त्याला भगवत्कृपा समजतो, ती एक माझ्याकरिता झालेली भगवत्लीला आहे असे मानतो. याच दृष्टीने श्रीतुकाराम महाराजांचे हे उद्गार मननीय आहेत.
बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरी या दुष्काळे पीडा केली ॥
बाईल मेली बरे झाले । देवे माया सोडविले ॥
तसेच जी वस्तू आपली खरी आहे ती केव्हाही आपल्यापासून दूर होत नाही म्हणून तो गतवस्तूबद्दल शोक करीत नाही, असेही एक कारण श्रीज्ञानेश्वरमहाराज भक्तलक्षणावरील आपल्या व्याख्येत सांगतात.
पै आपुले जे साचे । ते कल्पांतीही न वचे ।
हे जाणोनि गताचे । न शोची जो ॥ ज्ञानेश्वरी अ. १२ - १९२.
मागील सूत्रात भक्तलक्षणात तो सिद्ध होतो, अमृत होतो, तृप्त होतो असे सांगितले आहे. त्यात कामना, शोक हे विकार कसे संपादू शकतील ? परमप्रिय भगवान तर आपल्या हृदयातच असता आपण रडू लागलो दुसर्याकरिता, तर तो त्याचा एकप्रकारचा अपमानच नव्हे काय ? त्यामुळे भक्ताच्या अनन्यतेत बाध येणार नाही काय ?
वर शोकाच्या कारणात नश्वर इष्ट वस्तूचा वियोग हे शोकाचे कारण सांगितले आहे. भक्ताच्या जीवनात इष्ट एक केवळ भगवानच आहे, तो नित्य हृदयातच आहे, त्याचा नाश होणेच शक्य नाही. इतर नाशवान वस्तू भक्ताला इष्ट वाटतच नाहीत. 'सर्व संगे वीट आला । तू एकला आवडसी ॥' हीच त्याची भूमिका असते. म्हणून भक्त सांसारिक कोणत्याही वस्तू अथवा व्यक्तीकरिता शोक करीत नाही व तसा शोक करणे हा भगवंताचा अपमान समजतो. शोक मनुष्याच्या चित्तात वर्तमानापासून परावृत्त करून भूतकालात नेत असतो. व्यतीताकरिताच शोक होतो. शोक मनुष्यास वर्तमानात राहू देत नाही म्हणून 'न शोचति' असे म्हटले आहे. कोणी म्हणेल गोपिकांनी शोक केला, भगवद्वियोगाचे त्यांना दुःख झाले असे भागवतात वर्णन आहे, याचे उत्तर हे की त्या वियोगातही प्रेमप्रकर्षच होता. शुकाचार्य म्हणतात --
रुरुदुसुस्वरं राजन्कृष्णदर्शनलालसा ॥ - भागवत स्कं. १०.
त्या वियोगात कृष्णदर्शन लालसा होती, वृत्ती कृष्णमयच झाली होती, कृष्ण-प्रेमाने अंतरंग भरून गेले होते, संयोगापेक्षाही तो वियोग भक्तिशास्त्रात श्रेष्ठ समजला जातो. पूर्ण प्रेमप्रकर्ष त्या अवस्थेत झालेला असतो. सर्वत्र प्रियतमच प्रतीत होतो, म्हणून त्यास शोक म्हणू नये.
या पुढील लक्षण 'न द्वेष्टि' हे आहे. 'ज्याला या प्रेमाचा लाभ झाला आहे, तो कोणाचाही द्वेष करीत नाही.' द्वेषाची उत्पत्ती कोठून होते याबद्दल श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात
आणि इच्छिलिया सांगडे । इंद्रिया अमिष न जोडे ।
ऐसा जो डाव पडे । तोचि द्वेष ॥ - ज्ञा.
पसरिला अभिलाष । अपूर्ण होय तोचि द्वेष ॥ - ज्ञा.
इच्छित वस्तू एखाद्याकडे असली व त्याने ती दिली नाही की द्वेष निर्माण होतो, असा अनुभव आहे. पण जेथे इच्छेचाच अभाव आहे असे सूत्रात आरंभी 'न किंचिद्वाञ्छिति' म्हणून सांगितले आहे तेथे द्वेषाचा प्रादुर्भाव कसा होणार ? गीतेच्या बाराव्या अध्यायात जी भक्तलक्षणे सांगितली आहेत, त्यात प्रथम लक्षण 'अद्वेष्टा सर्वभूतानां' हेच आहे. भक्त 'अद्वेष्टा' असतो याचे कारण त्याचा जर एखाद्याने द्वेष केला तर त्याला त्याची कल्पनाही नसते. प्रल्हादाला मारण्याकरिता शुक्राचार्याचे पुत्र षण्ड व अमर्क यांनी एक कृत्या निर्माण केली. ती कृत्या जेव्हा प्रल्हादाला स्पर्शही करू शकली नाही, तेव्हा तिने आपल्याला उत्पन्न करणार्याचा प्राण घेतला. पण त्यामुळे प्रल्हादाला फार दुःख झाले. त्यावेळी प्रल्हाद म्हणाला, 'हे प्रभो ज्यांनी माझ्यावर शस्त्रप्रहार केले, विष दिले, पर्वतावरून खाली लोटून दिले, अग्नीत जाळण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांविषयी माझ्या मनात यत्किंचित द्वेषभाव जर नसेल तर हे माझ्या गुरूंचे दोन्ही पुत्र जिवंत होतील !' या अद्वेष्टा भावनेचा परिणाम असा झाला की दोन्ही गुरुपुत्र जिवंत झाले. श्रीएकनाथ महाराजांचे अंगावर एक यवन अनेक वेळा थुंकला पण त्यांच्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही. मात्र पुन्हा पुन्हा त्यांनी गंगास्नाने केली. पण शेवटी त्यास पश्चात्ताप झाला व तो पाया पडून रडू लागला, क्षमा मागू लागला. त्याला एकनाथ महाराज म्हणाले, 'अरे, तू तर माझ्यावर उपकार केलेस. तुझ्यामुळे आज मला शंभरवेळा गोदावरीच्या स्नानाचे पुण्य प्राप्त झाले.'
श्रीज्ञानेश्वर महाराज सांगतात-
जो सर्व भूतांचा ठायीं । द्वेषातें नेंणेचि कहीं ।
आपपरू नाहीं । चैतन्या जैसा ॥ - ज्ञा. १२ - १४५
अनेक प्रेमप्राप्त भगवद्भक्ताचे जीवन 'न द्वेष्टि' या विशेषणाने सुशोभित असते. भगवत्प्रेमात रंगल्यामुळे शत्रु-मित्रभावाचा विचार करावयास त्यास अवसरच नसतो.
यानंतर 'न रमते,' "भक्त कोणत्याही सजीव-निर्जीव विषयात रममाण होत नाही" या पदाचा विचार करू. कोणत्याही अनुकूल विषयात रममाण होणे, आसक्त राहणे. मग तो चेतन, अचेतन कसाही असो, हा जीवाचा स्वभाव आहे. मानवच काय, पशू, पक्षी इत्यादीही आपल्या प्रिय विषयात रमत असतात. भ्रमर गंधविषयात, मृग हा नादविषयात, मत्स्य हा रसविषयात, गज स्पर्शविषयात, पतंग रूपविषयात रमतो. हे सर्व आपआपल्या विषयात इतके रमत असतात की, त्यात त्याचा नाश होतो. मानव तर पंचविषयात रममाण होत असतो हे उघड आहे. अपरिहार्य म्हणून, जीवनावश्यक म्हणून विहित विषयांचे सेवन करणे वेगळे व त्यात रममाण होणे वेगळे. अज्ञ अभाविक मनुष्य भगवत्प्रेमाचे ज्ञान नसल्यामुळे विषयसेवन हाच पुरुषार्थ मानून विषयसंपादनातच आयुष्याचा वेच करतो. त्या विषयातच केवळ सुख मानून त्यात पूर्ण आसक्त होत असतो.
श्रीएकनाथ महाराज हीच गोष्ट स्पष्ट करीत आहेत-
इंद्रिया आणि विषयासीं । स्वयें अंतर्यामी प्रकाशी ।
जीव सेवूनि त्या विषयासीं । पावे आसक्तीसी अहभावें ।
म्हणे हे विषय कैसे गोड । माझ्या देहाचें पुरे कोड ।
तव इंद्रियांची खवळे चाड । विषयवाढ भोगावया ॥
इंद्रिया विषयांची आसक्ती । भोगाभिमाने वाढे वृत्ती ।
मावळोनि मुळीची स्फूर्ती । मोहममता स्थिती दृढ वाढे ॥ - नाथभागवत अ. ३. २३० - ३२
ज्ञाता जीव ज्ञेय विषयांच्या आसक्तीने त्या विषयाच्या मागे कसा धावत असतो, याचे वर्णन श्रीज्ञानेश्वर महाराजांनी गीतेच्या अठराव्या अध्यायाच्या अठराव्या श्लोकावरील टीकेत अनेक दृष्टांताच्या द्वारे केले आहे. त्याचा भावार्थ खाली दिला आहे.
'श्रीकृष्णभगवान म्हणतात, अर्जुना 'इंद्रियद्वारा ज्ञाता जो जीव त्याला ज्ञान तो विषय जरा दाखविते न दाखविते तोच तो ज्ञाता त्या विषयाचा प्रिय असल्यास स्वीकार किंवा अप्रिय असल्यास त्याग करण्यास प्रवृत्त होतो. माशाला पाहून बगळा त्याला पकडण्यात जसा त्वरेने झडप घालतो, अथवा द्रव्याचा ठेवा पाहून तो घेण्यास दरिद्र मनुष्य जितक्या वेगाने धावतो, अथवा सुंदर स्त्रीला पाहून कामुक जसा तिला धरण्यास पुढे सरसावतो किंवा ज्याप्रमाणे पाणी उतारावर धावते, अथवा भ्रमर फुलाच्या सुगंधाकडे धाव घेत असतो, अथवा धार काढावयाच्या वेळेला सोडलेले वासरू जसे गाईकडे धावते, वा आकाशात उंच चढलेला पारवा पक्षी पारवीला पाहून ज्याप्रमाणे आपले सगळे अंगच तिच्याकडे लोटून देतो, किंवा मेघाच्या गडगडाटाबरोबर मोर जसा आकाशाकडे कौतुकाने उडण्याचा प्रयत्न करतो, त्याप्रमाणे विषयाला पाहून ज्ञाता जीव तिकडे धाव घेत असतो ' - ज्ञानेश्वरी, १८. ४७९ - ४८४
वास्तविक अनित्य, जड, दुःखरूप विषयाचा सुख हा धर्मच होऊ शकत नाही. तसेच परिणामी ते सुख दुःखरूपच होते. श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी अनेक उदाहरणाने ही गोष्ट स्पष्ट केली आहे.
येर्हवी इंद्रियाचिया अर्था । सारिखा विषय पोखिता ।
संतोष कीर चित्ता । आपजेल ॥
परी तो संवचोराचा सांगातु । जैसा नावेक स्वस्थु ।
जंव नगराचा प्रांतु । सांडिजेना ॥
बापा विषाची मधुरता । झणे आवडी उपजे चित्ता ।
परी तो परिणाम विचारता । प्राणुहरी ॥
देखे इंद्रियी कामु असे । तो लावी सुख दुराशे ।
जैसा गळी मीनु अमिषे । भुलविजे गा ॥ ज्ञानेश्वरी ३. २१० - १३
या विषयसुखात कोण फसले जातात, असा प्रश्न उपस्थित करून ज्ञानेश्वरीच्या पांचव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण त्याचे विस्ताराने उत्तर देतात. "अर्जुना, ज्याप्रमाणे भुकेने पीडित झालेला दरिद्री पुरूष कोंडा खातो, त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही तेच या विषयात रमतात, अथवा तहानेने व्याकुळ झालेली हरणे भ्रमाने खर्या पाण्याला विसरून मृगजळाच्या मागे लागतात, तसेच ज्याला आत्मस्वरूपाचा अनुभव नाही, अर्थात ज्याच्या ठिकाणी स्वरूपानंदाचा पूर्ण अभाव असतो, त्यालाच हे विषय सुखरूप वाटतात. येर्हवी विषयात सुख आहे ही भाषा तरी योग्य आहे काय ? विजेच्या क्षणिक चमकण्याने जगातील सर्व अंधार नाहीसा होईल काय ? ज्याप्रमाणे विषाच्या कांद्याला मधुर म्हणावे, त्याप्रमाणे विषयात सुख आहे असे म्हणणे म्हणजे विषयाचे खरे स्वरूप न जाणता व्यर्थ केलेली बडबड आहे. अर्जुना, तूच सांग, सर्पाच्या फणाची सावली आहे ती उंदराला कितपत शांत करणारी होईल ? गळाला लागलेल्या अमिषाचा पिंड मासा गिळीत नाही तोपावेतो ठीक, त्याप्रमाणे विषयाचा सर्वसंग आहे हे तू निःसंशय समज. विरक्त पुरुषाच्या नजरेने पाहिले तर हे विषय पांडुरोगामध्ये आलेल्या लठठपणाप्रमाणे घातक आहेत असे समज. म्हणून अर्जुना ! विषयाच्या उपभोगामध्ये जे सुख असते, ते प्रारंभापासून शेवटपावेतो दुःखच आहे. परंतु काय करावे, जे मूर्ख असतात, अज्ञानी असतात त्याचे विषयसेवन केल्याशिवाय चालतच नाही.' - ज्ञानेश्वरी. ५. ११० - २०
श्रीकृष्ण भगवानच स्पष्ट सांगतात -
येहि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते ।
आद्यन्तवन्त कौतेय न तेषु रमते बुध ॥ - गीता ५ - २२.
"विषय व इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे भोग दुःखालाच कारण होतात. त्यांना आदि व अंत आहे. ज्ञानी पुरुष त्यांचे ठिकाणी रममाण होत नाही." प्रेमी भक्ताला विषयाच्या अनित्य व दुःखरूपाचे हे ज्ञान असते, म्हणूनच नारदमहर्षींनी "न रमते" असे म्हटले आहे. जीवाने जेथे अखंड रमावे, भक्त जेथे अखंड रममाण होतात असा एक श्रीहरीच आहे.
पांडुरंगी मन रंगले । रंगला या रंगे । तुका विठ्ठल सर्व अंगे ।
तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग । वैसला अभंग एकविध ॥ ज्ञा. अ....
या पुढील पद 'नोत्साही भवति' हे आहे.
मन हे एकच आहे, ते भगवत्प्रेमात रंगले आहे, मग तद्व्यतिरिक्त अन्य कर्मे करण्यात त्या भक्तास उत्साह कसा राहणार ? जो आपल्या देहावरही उदास आहे, ज्याची सर्व कर्मे भगवत्प्रीत्यर्थच होत असतात, त्यास सर्वस्वाचा विसर पडला आहे, त्याचा भगवद्भक्तीव्यतिरिक्त अन्य कार्यांत उत्साह राहणे शक्यच नाही. हे कर्म मी करीनच या प्रकारच्या निश्चयात्मक बुद्धीला उत्साह असे म्हटले जाते. पण भक्तलक्षणामध्ये बाराव्या अध्यायाच्या सतराव्या श्लोकात भगवंतानेच 'शुभाशुभ परित्यागी' हे एक महत्त्वाचे लक्षण सांगितले आहे. तो भक्त शुभ-अशुभ सर्वांचाच त्याग करतो असे म्हटले आहे. दुसरी गोष्ट ही की, कोणत्या तरी सुखाच्या इच्छेनेच त्या सुखाची प्राप्ती करून देणार्या कर्मात मनुष्याचा उत्साह असतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात -
तयापरी जो अशेषा । विश्वाचिया अभिलाषा ।
पाय पाखाळणिया दोषा । घरटा केला ॥
म्हणोनि फळाचा लागु । देखे जिये असलगु ।
तिये कर्मी चांगु । रोहो मांडी ॥ ज्ञा. १८. ६५१ - ५२
पण प्रेमी भक्त हा अमृतरूप, तृप्त झालेला असतो. त्याच्या ठिकाणी लौकिक कार्याचा उत्साह मुळीच निर्माण होणार नाही. म्हणूनच "शुभा-शुभ परित्यागी" असे भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे, तोच आशय 'नोत्साही भवति' या वाक्यात आहे. उत्साही होत नाही याचा अर्थ भक्तिव्यतिरिक्त अन्य कर्मांत त्याचा उत्साह नसतो. भक्तिविषयक सर्व व्यवहार, जप, पूजा, श्रवण, स्मरण, कीर्तनादिकात त्याचा विशेष उत्साह असतो. प्रेमाने अखंड भगवत्संकीर्तनादिक तो करीत असतो.
GO TOP
|