नारद भक्तिसूत्रे

यज्ज्ञात्वा मत्तो भवति, स्तब्धो भवति, आत्मारामो भवति ॥ ६ ॥


अर्थ : ज्या (प्रेमरूपा भक्तीला) जाणून मनुष्य उन्मत्त (आनंदभरित) होतो, स्तब्ध (शांत) होतो, (आणि) आत्माराम होतो.


विवरण : मागील चौथ्या व पाचव्या सूत्रात भक्तीची प्राप्ती, भक्तीचा लाभ सांगितला. या सूत्रात भक्ती जाणली असता म्हणजे भक्तीच्या ज्ञानाने काय फळ प्राप्त होते ते नारदमहर्षी सांगतात. कित्येक भाविक भक्तीचे आचरण करीत असलेले दिसतात, पण त्यांना भक्तीचे खरे स्वरूप ज्ञात नसते. भक्तीचे स्वरूप ज्ञात असणे म्हणजे भक्ती ही ज्याची करावयाची त्या परमात्मस्वरूपाचेही ज्ञान असणे अवश्य आहे. उपास्यज्ञानाधीन उपासना असते.

नारदपंचरात्रामध्ये भक्तीचे हेच लक्षण केले आहे.
माहात्म्यज्ञानपूर्वस्तु सुदृढः सर्वतोऽधिकः ।
स्नेहो भक्तिरिति प्रोक्तस्तया मुक्तिर्नचान्यथा ॥
'ज्ञान शब्दाने सेव्यस्वरूपाचे माहात्म्यज्ञान अभिप्रेत आहे. माहात्म्य-ज्ञान-पूर्वक सर्वांहून अधिक व सुदृढ, अव्यभिचारी स्नेहविशेष म्हणजे भक्ती' असा श्लोकाचा अभिप्राय आहे. जर हे ज्ञान नसेल तर श्रीकृष्णांनी नवव्या अध्यायात त्यांना मूढ म्हटले आहे.
अवजानन्तिमां मूढाः मानुषींतनुमाश्रितम् ।
परंभाव मजानंतो मम भूतमहेश्वरम् ॥ - गीता ९ - ११
'श्रीकृष्ण म्हणतात, माझे श्रेष्ठ व उत्कृष्ट स्वरूप न जाणणारे मूढ सर्व भूतांचा ईश्वर असलेल्या पण मानवदेह धारण करणार्‍या मला मनुष्य समजून, मनुष्यधर्म माझ्यावर आरोपित करून माझी अवहेलना करतात.' या श्लोकावरील श्रीज्ञानेश्वरमहाराजांची विस्तृत व मार्मिक टीका मुळातच पाहावी.

जसे भज्य जो भगवान याचे ज्ञान पाहिजे तसेच भक्तीच्या स्वरूपाचेही यथार्थ ज्ञान पाहिजे. भक्तीच्या फलाचेही यथार्थ ज्ञान पाहिजे. असे ज्ञान झाले, भक्तीचे महात्म्य पटले तर तो सतत त्या भक्तिप्रेमसागरातच डुंबत राहील. त्यास अन्य सर्वांचा विसर पडेल, लोकव्यवहाराकडे पाहणारही नाही, तो भक्त लोकबाह्यवृत्तीचा म्हणजे अलौकिक वृत्तीचा होतो, या स्थितीस 'मत्त' असे म्हटले जाते. मत्त होणे हा एक उन्मादाचाच प्रकार आहे. उन्माद अनेक प्रकारचा असतो. भ्रमानेही एखाद्यास उन्माद होतो, तो मत्त होतो, धनाचा, विद्येचा, सत्तेचा, पिशाच्चामुळे येणारा, शरीरबलाचा, मदिरादि सेवनाने येणारा असा अनेक प्रकारचा उन्माद दिसून येतो. पण हा क्षणिक, तुच्छ इतकेच नव्हे तर परिणामी बाधक असतो. भक्तिप्रेमाच्या अवस्थेत प्राप्त होणारा हा 'दिव्योन्माद' आहे. यात अलौकिक आनंदावस्था असते. या अवस्थेचे वर्णन भागवत एकादश स्कंध दुसर्‍या अध्यायात नवयोगेश्वरांनी केले आहे.
एवंव्रत स्वप्रियनामकीर्त्या जातानुरागो द्रुतचित्त उच्चै. ।
हसत्यथो रोदिति रौति गायत्युन्मादवन्नृत्यति लोकबाह्यः ॥ ४० ॥
'स्वतःला अत्यंत प्रिय अशा भगवन्नामाचे संकीर्तन करून व्रतानुष्ठान करणारा आणि प्रेमाधिक्याने ज्याचे चित्त भरलेले आहे असा लोकविलक्षण महात्मा मोठ्याने हसतो, रुदन करतो, गात बसतो, ओरडतो आणि बेभान होऊन उन्मत्त पुरुषाप्रमाणे नाचू लागतो.'
या श्लोकावरील श्रीएकनाथांची विस्तृत टीका मुळातच पाहणे योग्य आहे. व्याख्यानाच्या शेवटी श्रीएकनाथ महाराज सांगतात -
जो मोलें मदिरा खाये । तो मदिरानंदे नाचे गाये ।
जेणें ब्रह्मानंदु सेविला आहे । तो केवीं राहे आवरला ॥
यालागीं तो लोकबाह्यता । स्वयें नाचो ब्रह्म‍उन्मादतां ।
लोक मानिती तया पिशाचता । हा बोधू पंडिता सहसा न कळे ॥ - नाथभागवत २. ५७८ - ७९

हा प्रेमोन्माद कसा असतो, याविषयी शुकाचार्य प्रल्हादाचे वर्णन करीत असता त्याची अवस्था कशी झाली होती ते सांगतात.
न्यस्तक्रीडनको बालो जडवत्तन्मयस्तया ।
कृष्णग्रहगृहीतात्मा न वेद जगदीदृशम ॥
आसीनः पर्यटन्नश्‍नञ्छयान प्रपिबन्ब्रुवन् ।
नानुसंधत्त एतानि गोविंदपरिरम्भित ॥
क्वचिद्रुदति वैकुंठचिंताशबलचेतन ।
क्वचिद्धसति सच्चिंताल्हाद उद्‍गायति क्वचित् ॥
नदति क्वचिदुत्कण्ठो विलज्जो नृत्यति क्वचित् ।
क्वचित्तद्‌भावनायुक्तस्तन्मयोऽनुचकार ह ॥ - भागवत ७ - ४ - ३७ ते ४०
'शुकाचार्य म्हणतात, भक्त प्रल्हाद हा बालक असताही भगवंताचे ठिकाणीच चित्त आसक्त झाल्यामुळे त्याने अनेक प्रकारची खेळणीही टाकूनच दिली होती. जसे काही श्रीकृष्णरूपी ग्रहाने (पिशाचाने) त्याचे चित्त ग्रासले होते, जगाला तो या रूपाने पाहतच नव्हता. बसता, उठता, फिरता, खाता, झोपता, पिताना, बोलताना, त्या प्रल्हादाला त्या कार्याचे भानच राहत नव्हते. कारण त्याला वाटत होते की, गोविंदाने त्याला चहूकडून घेरलेले आहे. कधी भगवंताचा वियोग झाला असे समजून रडत असे, कधी प्रभूच्या मीलनाचा आनंद वाटून हसत असे, कधी कधी भगवद्यश तसेच लीलाचे गायन करीत असे, कधी मोठमोठ्याने हाक मारीत असे, कधी लाज सोडून नाचत असे, कधीकधी तर तन्मय होऊन स्वतःस श्रीकृष्ण मानून त्या शामसुंदराच्या लीलाचे अनुकरण करीत असे.'

संतवाङमयात विराण्या (विरहिणी), सौरी (स्वैरिणी) इत्यादी रूपकाचे जे अभंग आहेत ते 'मत्त' या स्थितीतीलच आहेत. भगवत्प्रेमात रंगलेले हृदय असेल तेथे कोणाचीही भीड-पर्वा नसते.
श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे उद्‌गार पाहा -
नगमेहा संसारू म्हणूनि केला भ्रतारू । लोक अनाचरु म्हणती मज ॥
चंचळ झालिये म्हणतील मज । कवणा सांगू जिवीचे गुज ॥
तुकाराम महाराजांचे उद्‌गार पाहा -
नाहीं काम माझे काज तुम्हासवें । होते गुप्त ठावे केलें आता ॥
व्यभिचार माझा पडला ठाऊका । न सरती लोका माजी जाले ॥
न धरावा लोभ काही माझे विशी । झाले देवपिशी तुका म्हणे ॥
पुण्यपापा ठाव नाहीं सुखदुःखा । हानिलाभ शंका नासलिया ॥
जितामरण आले आपपर गेले । मूळ ते पुसिले संसाराचे ॥
सर्वच संतांच्या काव्यातून असे 'मत्त' स्थितीतील उद्‌गार सापडतात.

भक्तश्रेष्ठ प्रल्हाद असुरबालकापुढे भक्तांच्या 'मत्त' अवस्थेचे वर्णन करून सांगत आहे -
यदाग्रहग्रस्तइव क्वचिद्धसत्याक्रन्दते ध्यायति वन्दते जनम् ।
मुहुश्‍वसन्वक्ति हरे जगत्पते नारायणेत्यात्ममतिर्गतत्रपः ॥ - भागवत, ७ - ७ - ३५
'प्रल्हाद म्हणतो, जेव्हा तो भक्त एखाद्या भूतपिशाच्चादिकाचा संचार झालेल्या पुरुषाप्रमाणे कधी हसतो, कधी सारखा रडत असतो, कधी ध्याननिमग्न स्वस्थ बसतो, कधी समोर आलेल्या कोणासही नमस्कार करीत राहतो, वारंवार दीर्घश्वास घेत "हे हरे, जगत्पते, नारायणा" असा आक्रोश करतो, तेव्हा बुद्धी श्रीहरीकडेच लागलेली असल्याने त्याची सर्व लोकलज्जा सुटलेली आहे.' या मत्त अवस्थेचे महत्त्वाचे फलही प्रल्हाद सांगतो -
तदापुमान्मुक्त समस्त बंधन स्तद्‌भावभावानुकृताशयाकृति ।
निर्दग्धबीजानुशयोमहीयसा भक्तिप्रयोगेण समेत्यधोक्षजम् ॥ - भागवत, ७ - ७ - ३६ 'प्रल्हाद म्हणतो, हे असुरबालकांनो, ज्या वेळी वरील श्लोकात सांगितल्याप्रमाणे त्या भक्ताची उन्मत्तवत् अवस्था होते त्या योगाने तो समस्त संसारबंधनापासून मुक्त होतो. निरंतर भगवद्‍भावनायुक्त असल्याने त्याचे चित्त भगवदाकारास प्राप्त होते. अंतःकरणातील सर्व कर्मबीजे दग्ध होतात. या महान भक्तीचा अंगीकार केल्याने तो अंतर्यामी परमात्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतो.'

यानंतर सूत्रातील पुढील पद 'स्तब्धो भवति' हे आहे. स्तब्धता म्हणजे देहव्यापाररहित, शांतता, अविकारता, प्रेमभक्तीमध्ये रंगलेला भक्त असा असतो. गोकुळवासी भक्तांची कशी अवस्था झाली होती, त्यांना स्तब्धता कशी आली होती हे तुकाराम महाराज सांगतात -
तयासी आवडे वैकुंठ नायक । गेली सकळिक विसरूनि ॥
निंदास्तुती कोणी न करी कोणाची । नाही या देहाची शुद्धि कोणा ॥
मने हरिरूपी गुंतल्या वासना । उदास त्या सूना गौळियांच्या ॥
श्रीकृष्ण प्रेमात रंगलेल्या गोपिकांना कसा स्तब्धीभाव प्राप्त झाला होता त्याचे वर्णन स्वतः श्रीकृष्णच भक्तवर्य उद्धवापुढे करतात -
ता नाविदन्मय्यनुषङ्ग बद्धधियः स्वमात्मानमतस्तथेदम् ॥
यथा समाधौ मुनयोऽब्धितोये नद्यः प्रविष्टा इव नामरूपे ॥ १२ ॥ -भागवत ११ - १२ - १२
'समाधी अवस्थेमध्ये ज्याप्रमाणे योग्यांना कशाचेही भान नसते, तो निश्चल असतो, महासागरात प्रविष्ट झालेल्या नद्यांना निराळे अस्तित्वच राहत नाही, त्याप्रमाणे श्रीकृष्ण म्हणतात, प्रेमातिशयाने ज्यांची अंतःकरणे माझ्याच ठिकाणी एकरूप झाली आहेत, अशा गोपी आपला देह, आपला जीव व हे जगत् माझ्याशिवाय सर्व काही संपूर्ण विसरल्या होत्या.' या श्लोकावरील श्रीएकनाथमहाराजांची टीका पाहा.
ऐशी अनन्य ठायीच्या ठायी । गोपिकांसी माझी प्रीति पाही ।
त्या वर्तताही देहगेही । माझ्या ठायी विनटल्या ॥ --एकनाथी भागवत, अ. १२. १८२

श्रीमद्‍भागवताच्या अकराव्या स्कंधातील तिसर्‍या अध्यायात भागवत धर्माचे आचरण करणारा भक्त कसा असतो याचे वर्णन नवयोगेश्वरांपैकी 'प्रबुद्ध' नामक योगीश्वर विदेह राजापुढे करीत आहे -
क्वचिद्रुदंत्यच्युतचिंतया क्वचिद्धसन्ति नन्दन्ति वदन्त्यलौकिकाः ॥
नृत्यन्ति गायन्त्यनुशीलयन्त्यजं भवन्ति तूष्णीं परमेत्य निर्वृता. ॥ -नाथभागवत ३ - ३२

'अलौकिक भक्ती करणारे हे एकांतिक भक्त भगवतचिंतनाने तन्मय होऊन कधी रडतात, हसतात, आनंदाने बेहोष होतात, बोलतच राहतात, नाचतात, भगवद्‍गुणगान करीत राहतात व भगवत्स्वरूपाशी तन्मय होऊन आनंदाने शांत राहतात.' या श्लोकात प्रथम तीन चरणात भक्ताची 'मत्त' स्थिती सांगून चौथ्या चरणात तो 'स्तब्ध' कसा असतो हे सांगितले आहे. श्रीनाथमहाराज त्या प्रेमी भक्ताच्या स्तब्धतेचे वर्णन करतात -
सद्‍भावे भगवत्परिचर्या । करितां पारुषे कर्मक्रिया ।
अहंसोऽहं निरसोनिया । वृत्तीही लया जाय तेथें ॥
एवं सप्रेम भक्ति संभ्रमु । तेणे निरसे साधन भ्रमु ।
फिटे निःशेष भवभ्रमु । वाचांसी उपरमु इंद्रिया होय ॥
तेथे एक ना दुसरे । सन्मुख ना पाठिमोरे ।
जेथ सुखही निजसुखामाजी विरे । ते स्वरूप निर्धारे निजशिष्यं होती ॥
-नाथभागवत, अ. ३. ६०४ - ६

वरील विवेचनाच्या आरंभी भक्तश्रेष्ठप्रल्हादाच्या 'मत्त' अवस्थेचे वर्णन केले आहे. त्याच्या पुढील श्लोकात त्याच्या "स्तब्ध" स्थितीचे वर्णन केले आहे. '
क्वचिदुत्पुलकस्तूष्णीमास्ते संस्पर्शनिर्वृत ।
अस्पन्दप्रणयानंद सलिला मीलितेक्षणः ॥ -भागवत ७ - ४ - ४१
'कधी त्याच्या शरीरावर रोमांच दाटून आले आहेत, तो शांत बसला आहे, बाह्यस्पर्शशब्दादिकाचा त्याला प्रत्ययच येत नव्हता, स्पंदनहीनस्थिरकाय, नेत्र मिटलेले असतानाही त्यातून प्रेमाश्रू स्त्रवत आहेत.' यापेक्षा स्तब्धतेचे अधिक लक्षण कोणते होईल ?

प्रेमभक्तीने गोकुळातील गोपिकांना प्राप्त झालेल्या ताटस्थ्य अवस्थेचे म्हणजेच स्तब्ध स्थितीचे वर्णन तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून उत्कृष्ट असे केले आहे.
दिवस राती कांही नाठवे तयासी । पहाता मुखासी कृष्णाचिया ॥
याच्या मुखे नये डोळियासी वीट । राहिले हे नीट तटस्थचि ॥
-श्रीतुकारामगाथा - बाळक्रीडा अभंग.

भक्तिशास्त्रकारांनी या स्तब्धतेसच 'प्रेमसमाधी' असे म्हटले आहे.

यानंतर सूत्रातील 'आत्मरामो भवति' या लक्षणाचा विचार करू. भक्तीच्या यथार्थ ज्ञानाने तो भक्त मत्त होतो, स्तब्ध होतो, असे सूत्रात प्रारंभी म्हटले आहे. कोणाला वाटेल ही मत्तता, स्तब्धता कदाचित अन्य काही कारणाने ही प्राप्त होऊ शकते, पण भक्ताची ही स्थिती का होते, याचे कारण शेवटच्या या लक्षणात दिले आहे. 'आत्मारामो भवति' आत्माराम होणे म्हणजे आत्मस्वरूपी रममाण होणे. मागील सूत्रात 'न रमते' असे म्हटले आहे. जीवाचा स्वभाव कोठे तरी रमण्याचा आहे, अज्ञ जीव जड विषयात रमतो, पण भक्त केवळ आत्म्याच्या ठिकाणीच रममाण होतो, हे सिद्ध करण्याकरिता 'आत्मारामो भवति' असे म्हटले आहे. मानव कोठे ना कोठे रममाण होतच असतो. बहुधा देहादिकाच्या ठिकाणी तादात्म्य ठेवणारा जीव इंद्रियद्वारे अनुकूल विषयाच्या ठिकाणी तादात्म्य ठेवतो, इंद्रियाचा गुलाम होतो. उपनिषदात म्हटले आहे,
पराञ्चिखानिन्यतृणत्स्वयंभू तस्मात्पराङपश्यतिनान्तरात्मन् ॥' 'ही इंद्रिये परमात्म्याने बहिर्मुख बनविली आहेत. म्हणून इंद्रियांच्या आधीन झालेला जीव बाह्यविषयच पाहतो. अंतरात्म्यास पाहू शकत नाही.' अशा पुरुषास गीतेत 'इंद्रियाराम' म्हटले आहे.
अघायुरिंद्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥- गीता, अ. ३ - १६
या इंद्रियाराम इंद्रियलंपट पुरुषास 'अघायु म्हणजे त्याचे आयुष्य सर्व पापरूप आहे व त्याचे जिणेही व्यर्थ आहे, म्हणजे पुरुषार्थ-प्रयोजक होऊ शकत नाही. या श्लोकावरील व्याख्यानात श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
तो पातकांची राशी । जाण भारभूमीसी ।
जो कुकर्मे इंद्रियासी । उपेगागेला ॥
ते जन्मकर्मसकळ । अर्जुना अति निष्फळ ।
जैसे की अभ्रपटळ । अकाळीचे ॥
का गळास्तन अजेचे । तैसे जियाले देखे तयाचे ॥ ज्ञा. ३. १४०. ४१

इंद्रियाराम होण्यात ती इंद्रिये सामान्यासच काय पण मोठमोठयांनाही कसा त्रास देतात, हे श्रीभगवानकृष्ण अर्जुनास सांगतात.
यततोह्यपि कौंतेय पुरुषस्यविपश्चित ।
इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मन ॥ -गीता, २. ६०
'इंद्रियदमनार्थ प्रयत्न करणार्‍या विद्वानाचे देखील मन ही बलवान इंद्रिये बलात्काराने भलतीकडे ओढून नेतात.'

इंद्रियराम होणे किती घातक आहे याविषयी श्रीज्ञानेश्वर महाराज स्पष्टच सांगतात.
म्हणोनि इंद्रिये एके । जाणतेनि पुरुखे ।
लाळावी ना कौतुके । आदिकरूनी ॥ २०२ ॥
हांगा सर्पेसी खेळी येईल । व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल । सांगे हलाहल जिरेल । सेविलिया काई ॥ २०३ ॥
देखे खेळता अग्नि लागला । मग तो न सांवरे जैसा उधवला ॥
तैसा इंद्रिया लळा दिधला । भला नोहे ॥ २०४ ॥ --ज्ञानेश्वरी, अ. ३
इंद्रियाराम झाला की तो विषयातच रममाण होतो, व विषय आले की त्याच्याबरोबर विकार येतातच.
देखे इंद्रियी काम असे । तो लावी सुखदुराशे ।
जैसा गळी मीन अमिषे । भुलविजे गा ॥ ज्ञा. ३

हे विकार किती बाधक असतात याचा पुढे सूत्र ४४ मध्ये विस्तृत विचार येणार आहे. मानव हा केवळ बहिर्मुखतेमुळेच आत्माराम न होता विषयाराम (म्हणजे विषयातच रममाण होणारा) होतो, पण त्यापासून मनुष्यास परिणाम, ताप संस्कार, दुःखादी भोगावे लागतात. म्हणून भक्त इंद्रियाराम विषयराम होत नाही, तो केवळ 'आत्माराम' होतो. आत्मा हा शब्द गौण मुख्य लाक्षणिक भेदाने अनेक अर्थाने वापरला जातो. एका गीतेत आत्मा शब्द अंतःकरण, जीव, परमात्मा इत्यादी अर्थाने वापरला आहे. पण या सूत्रात आत्मा हा शब्द परमात्मा श्रीहरी याच अर्थाने घेतला आहे.
श्रीमद्‍भागवतात श्रीशुकाचार्यांनी परीक्षितास सांगितले आहे.
कृष्णमेनमवेहित्वमात्मानमखिलात्मनाम ॥ जगद्धिताय सोऽप्यत्र देहीवा भाति मायया ॥ -भा. १० - १४ - १५
'या श्रीकृष्णास तो सर्व प्राणिमात्राचा आत्मा आहे, असे समज, तो या गोकुळात 'जगत्कल्याणाकरिता' आपल्या मायेने देहधारी झाल्यासारखा वाटतो.' तो परमात्माच एकमेव आनंदस्वरूप असल्याने त्याच्या ठिकाणी अखंड रममाण होणाराच 'आत्माराम' म्हणविला जातो. विषय इंद्रिये ही असत, जड, दुःखस्वरूप असल्याने तेथे भ्रमानेच जीव रमत असतो.

श्रीमद्‍भगवदगीतेच्या पाचव्या अध्यायात 'योऽन्तःसुखोन्तरारामस्तथान्तर्यो?तिरेव य ।'
'बाह्यसुखाची अपेक्षा न करिता अन्तःसुखी आत्मसुखानेच सुखरूप झाला तसेच, अंतर्ज्ञानमय ज्योतीनीच जो प्रकाशित झाला असे त्या योगी पुरुषाचे वर्णन केले आहे. या श्‍लोकावरील टीकेत श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात -
म्हणोनि असो हें आघवे । एथ न बोलणे काय बोलावे ।
जे खुणाचि पावेल स्वभावें । आत्माराम ॥
जे ऐसेनि सुखे मातले । आपणपांचि आपण राहिले ।
ते मी जाणे निखिल वोतले । सामरस्याचे ॥
ते आनंदाचे अनुकार । सुखाचे अंकुर ।
की महाबोधे विहार । केले जैसे ॥ - ज्ञा. ५. १३६ - ३८
ही आत्मारामपद प्राप्त झालेल्या पुरुषाची लक्षणे होत.

आत्मा हा नित्य समीप आनंदमय आहे. विषय हे दूर आहेत व प्रारब्ध-साध्य आहेत. सर्वानाच अनुकूल विषयाचे प्रारब्ध सिद्ध असते असे नाही तसेच ते विषय प्राप्त झाले तरी त्याच्या भोगात अनेक प्रतिबंध असतात. त्यात आराम मिळणे अशक्यच असते. म्हणूनच गीतेत तिसर्‍या अध्यायातही,
यस्त्वात्मरतिरेवस्यादात्मतृप्तश्‍चमानवः ।
आत्मन्येवच संतुष्टस्तस्यकार्य न विद्यते ॥ १७ ॥
'जो केवल आत्म्यातच रत, आत्म्यातच तृप्त आणि आत्म्याच्या ठिकाणीच संतुष्ट झाला त्याला कोणतेही कार्य उरत नाही.'

उपनिषदातही 'आत्मक्रीड आत्मरति.' असे या अवस्थेचे वर्णन आढळते. अशा परम सुखमय परमात्म्यास सोडून जे पुरुष केवळ इंद्रियाराम वा विषयाराम होतात, त्याचा निषेधच गीता, भागवतादी ग्रंथातून केला आहे. श्रीमद्‌भागवताच्या एकादशस्कंधातील आठव्या अध्यायात पिंगलाख्यान आहे. पिंगलेच्या पश्चात्तापदग्ध अंतःकरणातून निघालेले उद्‌गार पाहा -
संतं समीपे रमणं रतिप्रदं वित्तप्रदं नित्यमिमं विहाय ।
अकामदं दुःखभयादिशोकमोहप्रदं तुच्छमहं भजेज्ञा ॥ - भा. ११ - ८ - ३०
'सदासर्वदा अत्यंत समीप असणारा, शाश्वत सुख देणारा, नित्यद्रव देणारा अशा रमणस्वरूप आत्म्याला सोडून महामूर्ख अशी मी इच्छापूर्ती न करणारा, दुःख, भय, शोक आणि मोह इत्यादी देणारा अशा क्षुद्र पुरुषाची इच्छा करीत आहे.'

या श्लोकावरील आपल्या टीकेत श्रीएकनाथ महाराज लिहितात -
संत पुरुषांची प्राप्ती । जवळी असतां नेणे आसक्ती ।
ज्यासी केलिया रति । काम निवृत्ती तत्काळ ॥
काम निवर्तवूनि देख । अनिवार पुरवी नित्य सुख ।
वित्त दाता तोचि एक । अलौकिक पै देणे ॥
सकळ ऐश्वर्य निजपदेसी । संतोषोनि दे रतीसी ।
रमवू जाणे नरनारीसी । रमणु सर्वासी तो एक ॥ नाथभागवत ८. २१९. २१

अशा परमानंदस्वरूप परमात्मस्वरूपात जे रममाण होतात त्यांनाच 'आत्माराम' म्हटले जाते. ही अवस्था भक्तिप्रेमप्रकर्षानेच प्राप्त होते. ज्याने अनन्यत्वाने हे प्रेम जाणले तोच आत्माराम होतो, व जो आत्माराम होतो तोच मत्त, स्तब्ध होतो, याचा विचार पूर्वी केला गेलाच आहे.


GO TOP