नारद भक्तिसूत्रे

निरोधस्तु लोकवेदव्यापारन्यासः ॥ ८ ॥


अर्थ : लौकिक आणि वैदिक (समस्त) व्यापारत्याग म्हणजेच निरोध होय.


विवरण : साधारणतः श्रद्धावान मानव दोन प्रकारच्या व्यापाराने (कर्माने) बांधला गेलेला असतो. १) लौकिक, २) वैदिक. लौकिक व्यापार म्हणजे दृष्ट प्रपंचातील काही विषयाच्या प्राप्तीकरिता कर्मे करीत राहणे. 'सायास करिसी प्रपंची दिननिशी' असे ज्याबद्दल श्रीज्ञानेश्वरमहाराज हरिपाठात सांगतात तो लौकिक व्यापार !

बहुतेकांची बहिर्मुखतेमुळे अशीच प्रवृत्ती असते. तर कित्येकांची अदृष्ट स्वर्गातील दिव्य विषय संपादन करण्याकरिता वेदात सांगितलेली यज्ञयागादी वैदिक कर्मे सतत करण्याची प्रवृत्ती असते, तो वैदिक व्यापार. किंवा, थोडक्यात ऐहिक अभ्युदय हेच ज्याचे फल मानले जाते तो लौकिक व पारलौकिक स्वर्गादी भोग ज्याचे फल मानले जाते तो वैदिक. भगवद्‌भक्त्याविष्ट पुरुष दोघांचाही त्याग करीत असतो.

कोणतेही कर्म लौकिक अगर वैदिक असो, ते देह, वर्ण, आश्रम यांचा अभिमान घेऊनच होत असते व विशेष भोगप्राप्तीच्या इच्छेनेच होत असते, हे स्पष्ट आहे. भक्तीत ही भोगासक्ती खपत नाही. याचा मागे पाचव्या सूत्रामध्ये विचार झालाच आहे. भगवान श्रीकृष्ण उद्धवास सांगतात -
साधुनि माझिया अनुसंधाना । परलोक नातळे वासना ॥
धिक्कारी पै ब्रह्मसदना । इतर गणना कोण पुसे ॥ - एकनाथी भागवत, १४. ८६, ८७.
लोक - वेद - व्यापार - न्यास ( त्याग) कसा झाला पाहिजे, याबद्दल भगवान श्रीकृष्ण उद्धवास स्पष्ट सांगतात -
सांडूनि स्त्रीपुत्र विषयध्यान । सांडूनि योग योग्यता शहाणपण ।
सांडूनि कर्मठता कर्माभिमान । मजलागी शरण रिघावे ॥
सांडूनिया वेदाध्ययन । सांडूनिया शास्त्रश्रवण ।
सांडूनि प्रवृत्ति निवृत्ति जाण । मजलागी शरण रिघावे ॥
सांडूनिया वैदिक लौकिक । सांडूनि आगम तांत्रिक ।
मज शरण रिघालिया देख । माझे निजसुख पावसी ॥ - नाथ भा. १२. २३५ - ३७

तसेच भक्ताच्या हृदयात भगवत्प्रेमाचा उदय झाला असता त्याच्या कामाचा सहजच निरोध होत असतो खर्‍या भक्तीचे हेच लक्षण आहे.
न काम कर्म बीजानां यस्यचेतसि संभवः ।
वासुदेवैक निलयः स वै भागवतोत्तमः ॥ भागवत ११. २. ५०
'काम, कर्म, बीज, वासनांचा ज्याच्या हृदयात प्रवेश होत नाही, वासुदेव परमात्मा हाच एकमेव आश्रयस्थान आहे असे मानणारा तो भागवतोत्तम होय.'
या श्लोकावरील टीकेत श्रीनाथमहाराज सांगतात -
हृदयी चिंतिता आत्माराम । तद्‌रुप झाला हृदयीं काम ।
त्यासी सर्व कर्मी पुरुषोत्तम । देवदेवोत्तम तुष्टोनि प्रगटे ॥
तेथे ज्या ज्या वासना हृदयवासी । त्याही पडिल्या हरिसुखासी ।
एवं वासना जडल्या हरिरूपाशी । हरी आश्रयो त्यासी दृढ झाली ॥ --नाथभागवत २. ६८० - ८१
खर्‍या भक्तिप्रकर्षात लोक - वेद - व्यापार - न्यास सहजच होतो. कारण तो ज्या देहादिकांच्या वर्णआश्रमाभिमानाने होतो तो भक्ताचा केव्हाच विगलित झालेला असतो.

देहाहंकृती विना लौकिक अथवा वैदिक क्रिया होऊ शकत नाही. तसे लौकिक व वैदिक कर्माची गुंतागुंत फार आहे. त्या कर्मबंधनात अडकलेला पुरुष त्यातून बाहेर पडणे कठीण आहे. तो कर्मजड होतो.

श्रीज्ञानेश्‍वरमहाराज त्या कर्मजड पुरुषाचे वर्णन करतात -
वेदाधारें बोलतीं केवळ कर्म प्रतिष्ठितीं ।
परी कर्मफळीं आसक्ती । धरूनिया ॥
म्हणती संसारी जन्मिजे । यज्ञादिक कर्म कीजे ।
मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ॥
एथ हें वांचूनि कांहीं । आणिक सर्वथा सुखचि नाहीं ।
ऐसें अर्जुना बोलतों पाहीं । दुर्बुद्धि ते - ज्ञा. २. २४५ - ४७

नाथभागवतात भगवान श्रीकृष्ण उद्धवास उपदेश करताना म्हणतात -
माझें स्वरूप नित्य निर्गुण । वेद तितुका त्रिगुण ।
त्या वेदाचें जें प्रेरण । तें गौण जाण मत्प्राप्ती ॥
त्या वेदार्थ श्रुतिस्मृति । नाना कर्मे करवितीं ।
त्या कर्माची कर्मगती । न कळे निश्चिती कोणासी ॥
कर्मस्वरूप परमगूढ । विधि निषेध अति अवघड ।
सज्ञानासी नव्हे निवाड । शास्त्रें दृढ विचारितां ॥
केवळ कर्मचि कर्माआत । एक प्रवृत्त एक निवृत्त ।
सकाम निष्काम अद्‌भुत । अंगी आदळत साधकां ॥ नाथभागवत १२. २१७ - २०

कामनाभिभूत होऊन लौकिक वैदिक कर्मे करू लागला की, निरोध होत नाही व निरोध नाही की भक्ती नाही. कारण निरोध हेच भक्तीचे स्वरूप सातव्या सूत्रात सांगितले आहे. म्हणून खरा भक्त या कर्माच्या विधिनिषेधाच्या कचाट्यात पडत नाही.

हीच अवस्था एका खेळियाच्या अभंगात श्रीतुकाराममहाराज सांगतात -
वर्ण अभिमान विसरली याती एकएका लोटांगण जाती रे ।
निर्मळ चित्ते झाली नवनीते पाषाणा पाझर फुटती रे ॥

अंतःकरणाची अशी प्रेममय अवस्था झाल्याविना वरीलप्रमाणे लौकिक वैदिक कर्माचा न्यास होत नाही. असा निरोध होणे फार कठीण आहे. एकदम सर्व लौकिक वैदिक कर्मे टाकणे शक्य नाही. म्हणून भगवद्‍गीतेमध्ये सर्वकर्मसमर्पण सांगितले आहे. म्हणून 'लोक - वेद - व्यापार - न्यास' म्हणजे सर्व प्रकारची कर्मे भगवदर्पण करणे, असा न्यास शब्दाचा अर्थही कित्येक करतात. 'न्यासो नाम भगवति समर्पणम् ।' न्यास पदाचा अर्थ आहे भगवंताला समर्पण म्हणजे लौकिक व वैदिक सर्व कर्मे भगवत्समर्पण करणें. तोच निरोध.

लौकिक व वैदिक जितकी कर्मे आहेत, ती त्रिगुणात्मक प्रकृतीपासून होतात, मी कर्ता नाही, असंग दृष्टा आहे, या कर्माशी माझा संबंध नाही, असे मानणे हा सांख्यमताप्रमाणे त्याग समजला जातो. कार्याला जोपावेतो कारणरूपाने न जाणले जाईल तोपावेतो खर्‍या रीतीने कार्याचा त्याग होत नाही. वेदान्तशास्त्रात कार्यास त्याचे कारण प्रकृती - माया - अज्ञान एतद्रूप मानले जाते व ती मिथ्या म्हणून तिचे कार्य लौकिक, वैदिक कर्मही मिथ्या असे समजणे हाच त्याग भक्तिमार्गात जगाचे मूलकारण, परमाणू, त्रिगुण प्रकृती इत्यादी नसून केवळ भगवानच आहे, अशी भावना असते. अतएव भगवंताच्या ठिकाणी सर्व कर्म समर्पण हाच न्यास मानला जातो.

या सर्व कर्मसमर्पणाचे रहस्य हे आहे की, काया-वाचा-मनाने होणारे कोणतेही कर्म भक्त मी करतो असे मानीत नाही.
श्रीएकनाथमहाराजांनी स्पष्ट सांगितले आहे -
हेतुक अथवा अहैतुक । वैदिक लौकिक स्वाभाविक ॥
भगवंती अर्पे सकळीक । या नांव देख भागवतधर्म ॥ ३३६ ॥
उदकीं तरंग अतिचपळ । जिकडे जाय तिकडे जळ ।
तैसे भक्ताचें कर्म सकळ । अर्पे तत्काळ भगवंती ॥ ३३७ ॥ नाथभागवत अ. २
किंवा या सूत्राचा दुसरा अर्थ असा की, लौकिक कर्मे, नृत्य-संगीतादी, ती भगवंताचीच व्हावीत. मनात ही भावना ठेवली की भगवान हे श्रवण करीत आहे, पाहात आहे, या सेवेने तो संतुष्ट होवो. 'गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद ।' 'निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणी ।- तुकाराममहाराजांचे असे अनेक उद्‌गार आहेत. इतकेच नव्हे तर, 'जे जे काही करितो देवा । ते ते सेवा समर्पे ॥' अशी त्यांची भावना आहे. व्यापार शब्दाचा अर्थ देहेंद्रियादिकांनी होणार्‍या चेष्टा असा आहे. त्याचे तात्पर्य इष्टप्राप्ती व अनिष्ट परिहारार्थ होणार्‍या क्रिया हे आहे. स्नान, संध्या, यज्ञयागादी वैदिक कर्मे ही संस्कारवश होतच असतात; पण ती झाल्यावर 'कृष्णार्पणमस्तु', 'ब्रह्मार्पणमस्तु', 'अनेन विश्वात्मा भगवान् प्रियताम्' अशी समर्पणाची भावनाच ठेवली पाहिजे. आपल्या संस्कारातही ही भावना पूर्वीपासून ठेवलेली आहे. कन्येचे लग्न करीत असता असाच संकल्प केला जातो. 'इमा लक्ष्मी - रूपिणी कन्यां श्रीधररूपाय वराय तुभ्यमहं संप्रददे ॥' म्हणजे 'ही माझी कन्या लक्ष्मीस्वरूपिणी आहे. हिला मी श्रीधरस्वरूप वराला समर्पण करीत आहे.' लोकव्यवहारात संकल्पाचा केवल उच्चार केला जातो, पण भावना क्वचित ठेवली जाते. ही दृढभावना ठेवून सर्व लौकिक, वैदिक कर्माचा भगवत्स्वरूपी न्यास (समर्पण) करणे हाच निरोध होय.


GO TOP