नारद भक्तिसूत्रे

तस्मात्सैव ग्राह्या मुमुक्षुभिः ॥ ३३ ॥


अर्थ : म्हणून मुमुक्षूंनी ती (भक्ती) च ग्रहण करावी.


विवरण : भक्ती स्वयंफलरूप आहे, म्हणून मुमुक्षुनेदेखील 'सा एव' म्हणजे तीच भक्तीच स्वीकारावी. आता मुमुक्षू कोणास म्हणावे याचा विचार करणे आवश्यक आहे. संसारात जे मानवदेहधारी जीव आहेत यांचे बद्ध, मुमुक्षू व मुक्त असे तीन प्रमुख भेद शास्त्रकारांनी कल्पिले आहेत. बद्धालाच विषयी असेही म्हणतात किंवा बद्धात पामर व विषयी असे दोन वर्ग मानले जातात. ऐहिक विषयभोगाचा धर्माधर्म, योग्य-अयोग्य न पाहता स्वैररूपाने अंगीकार करणारा रागद्वेषलोभादिकांनी युक्त अशा मनुष्यास पामर म्हटले जाते. ऐहिक भोगासक्त ते पामर व स्वर्गलोकातील म्हणजे पारत्रिक धर्म्य अशा पुण्यविशेषाने प्राप्त झालेल्या भोगात आसक्त पुरुषांना विषयी म्हटले आहे. पामर हा धर्माधर्म पाहत नाही, व विषयी धर्मानेच प्राप्त झालेल्या विषयाचे सेवन करीत असतो, त्यामुळे तोही बद्धच असतो. विषयासक्तीने रागद्वेषादिकांनी देहतादात्म्यानी, कर्म व कर्मफलासक्तीने व तन्मूलक अहंकार अज्ञानादि अनेक बंधनांनी तो बांधला गेलेला असतो, त्या बंधनातून सहजरीत्या तो बाहेर पडू शकत नाही. यालाच संसारबंधन म्हणतात. या बद्धासच शास्त्रीय भाषेत 'बुभुक्षू, भोगासक्त असेही म्हटले जाते. या बुभुक्षूत दोन प्रकार संभवतात. मुमुक्षूत्व योग्य व अयोग्य एखादा भोगासक्त असला तरी पूर्वसुकृताने सत्संगतीत केलेल्या सच्छास्त्र श्रवणाने या भोगातील दोष अनुभवास आल्यामुळे त्यातील असारता जर कळू लागली तर यातून सुटावे असे वाटू लागल्यास त्यास मुमुक्षुत्वयोग्य म्हणावे, व असा विचारही ज्याच्या मनात कधी येत नाही, कोणी योग्य मार्गदर्शन केले तरी अश्रद्धा, दुराग्रह, कुतर्क, विपर्ययादी दोषांनी सन्मार्गाकडे न प्रवृत्त होणार्‍यांना मुमुक्षुत्व अयोग्य म्हटले जाते. ज्याचे पूर्वसंस्कार चांगले आहेत असे सदबुद्धिवान पुरुष ज्यांना इहपरभोगातील दोषाची पूर्ण कल्पना आली आहे, या देहात, संसारात राहणे म्हणजे एकप्रकारचे बंधन आहे, कारण मुक्तपणाने आनंदाचा भोग येथे नाही, अनेक बंधने अंतर्बाह्य रूपाने आपणांस पीडा देतात त्यामुळे जो दुःखी होतो व त्याचे परिमार्जन करण्याचा जो सतत प्रयत्न करतो त्यासच मुमुक्षू असे म्हटले जाते. श्री एकनाथ महाराज सांगतात -

नित्यानित्यविवेकव्युत्पत्ति । इहामुत्रार्थफलभोग विरक्ति ।
शमदमादि साधन संपत्ति । अढळ चित्ती दृढ होआवी ॥
येही अवस्था वरुतीं । निश्‍चये वांछी निजमुक्ति ।
या नांव मुमुक्षा म्हणती । चित्तशुद्धी चित्तीं मुमुक्षुत्व हें ॥ हस्तामलक

श्रीज्ञानेश्वर महाराजांनी मुमुक्षूची खालीलप्रमाणे व्याख्या केली आहे.
पै भवस्वर्गा उबगले । मुमुक्षू योगज्ञानां वळघवले ।
पुढती नयों इयें निघाले । पैजां जेथ ॥ ज्ञा. १५-२७७

तसे पाहिले असता अध्यात्ममार्गात प्रविष्ट होण्याची इच्छा करणार्‍यास मुमुक्ष म्हणतात. अनासक्त बुद्धीने कर्मे करणार्‍या पुरुषासही गीतेमध्ये मुमुक्षू म्हटले आहे.
एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपिमुमुक्षुभिः ॥ ४ - १५

मोक्ष मुक्ती म्हणजे संसाराच्या, दुःखाच्या पारतंत्र्यातून सुटका. कोणीही विचारी पुरुष पारतंत्र्यात राहू इच्छिणार नाही. भक्तदेखील संसारदुःखात राहू इच्छिणार नाही. मागील सूत्र सत्तावीसच्या विवेचन प्रसंगी भक्त या संसार दुःखातून मुक्त करण्याकरिता देवाची कशी प्रार्थना करतो, आपले दैन्य कसे प्रगट करतो याचा विचार आलाच आहे. कित्येक भक्त-भाविक साधुसंतांजवळ आपले पारतंत्र्य प्रगट करतात.

काय मी उद्धार पावेन । काय कृपा करील नारायण ।
ऐसे तुम्ही सांगा संतजन । करा समाधान चित्त माझें ॥

असे अनेक अभंग सर्व संतांचे आहेत. जोपावेतो तो संसारात अंतर्बाह्य गुंतून पडला आहे तोपावेतो त्याची स्थिती कशी असते याचे वर्णन तुकाराम महाराज स्वानुभवपूर्ण भाषेत करतात -
गुंतलो या संवसारें कैसा झालोंसे अंध ।
मी माझें वाढऊनि माया तृष्णेचा बाध ।
स्वहित न दिसेंचि केला आपुला वध ।
लागले काळ पाठी सवें काम हे क्रोध ॥ १ ॥ <
br> अशा स्थितीत साधक भक्त मुमुक्षूने काय करावे याचे उत्तर नारदमहर्षी या सूत्रातून देतात. काही मुमुक्षू केवळ स्वप्रयत्नाने या संसारबंधनातून मुक्त होतात.

आपुलेनि पुरुषार्थे जिंकिला संसार ।
केला मदमत्सर देशधडी । - तुकाराम महाराज

ते ज्ञानयोगाचा अवलंब करतात, असे श्रीज्ञानेश्वर महाराजांनी मुमुक्षूचे जे लक्षण पंधराव्या अध्यायात केले आहे, त्यावरून सिद्ध होते; पण कित्येकांना तेवढे सामर्थ्य नसते. त्यांच्याकरिता श्रीकृष्णानेही उद्धवास उपदेश करतेसमयी भक्ती हेच साधन सांगितले आहे.

निर्विण्णानां ज्ञानयोगो न्यासिनामिह कर्मसु ॥
तेष्वनिर्विण्ण चित्तानां कर्मयोगस्तु कामिनाम् ॥ ए. भा. २०.७

'सर्व लौकिक भोगापासून पूर्णपणे विरक्त असून विधिपूर्वक संन्यास घेऊन ज्यांनी कर्माचा त्याग केलेला आहे अशा विरक्तांकरिता ज्ञानयोग सांगितला आहे; आणि कर्मामध्ये आसक्त असणार्‍या कामिक विषयेच्छू लोकांना सिद्धी देणारा कर्मयोग सांगितला आहे.'

यदृच्छया मत्कथादौ जातश्रद्धस्तुयः पुमान । न निर्विण्णो नाति सक्ती भक्ति योगोऽस्य सिद्धिदः ॥८॥ 'ज्याला पूर्वसुकृताने भगवंताच्या पवित्र कथालीलादि श्रवण करण्याची गोडी लागून श्रद्धा उत्पन्न झाली, तो विषयादिकांपासून फार विरक्त नाही व विषयी लोकांप्रमाणे अत्यासक्त नाही अशा पुरुषांकरिता भक्तियोगच इष्ट फल देणारा आहे. श्रीएकनाथ महाराज लिहितात - एवं विषयी दोषदर्शन । सर्वदा देखे आपण ।
परि त्यागालागी जाण । सामर्थ्यपूर्ण असेना ॥८४॥
सेवकी राजा बंदी धरिला । तया स्त्रीचंदनादि भोग दिधला ।
परी तो त्यासी विषप्राय झाला । भोगी उबगला अगत्यता ॥ ८५ ॥
एवं भोगिता त्या भोगासी । नित्य पाहे निजनिर्गमासी ।
तेवी भोगिता हा विषयासी । अहर्निशी अनुतापी ॥ ८६ ॥
या परी जो नव्हे विषयासक्त । ना निधडा नव्हे विरक्त ।
त्या लागी माझा भक्तिपंथ । मी बोलिलो निश्चित वेदवाक्ये ॥ ८७ ॥
येही करिता माझी भक्ती । माझ्या स्वरूपी लागे प्रीती ।
सहजे होय विषय विरक्ति । एवं सिद्धिदाती भक्ति हे माझी ॥८८॥

अशा मुमुक्षू साधकांकरिता अन्य योगादी साधनांची आवश्यकता नाही म्हणून सूत्रात 'सा एव' शब्दाने इतर साधनांचा निरास केला आहे. सूत्रातील मुमुक्षू शब्द हा वरील अर्थाने घेणेच योग्य आहे. मागील सूत्रात भक्ती ही स्वयंफलस्वरूपा आहे, असे सांगितले आहे. कोणास वाटेल साधनाशिवाय फलापर्यंत कसे जाता येईल ? याचे उत्तरही दिले गेलेच आहे की भक्ती हेच साधन मुमूक्षूंकरिता आहे; याच मार्गाने अनेक संत गेले आहेत.

मार्गी बहुत । याचि गेले साधुसंत ॥ - तुकाराम महाराज

हा राजमार्ग आहे, म्हणूनच निश्चयपूर्वक सांगतात की अन्य साधनांचा अवलंब न करता या साधनाचा स्वीकार मुमुक्षूंनी करावा.


GO TOP