नारद भक्तिसूत्रे

अमृतस्वरूपा च ॥ ३ ॥


अर्थ : आणि (ती भक्ति) अमृतस्वरूपा (ही) आहे.


विवरण : द्वितीय सूत्रात परमप्रेम हे भक्तीचे यथार्थ स्वरूप आहे, असे स्पष्ट केल्यानंतर या सूत्रात त्या प्रेम भक्तीचा एक महत्त्वाचा विशेष श्री नारदमहर्षि सांगतात, ती प्रेमरूपा भक्ती 'अमृतस्वरूपा' आहे. अमृत म्हणजे मरण-विनाश-बाधरहित अवस्था अथवा स्वरूप होय.

तसे अमृत शब्दाचे कोशात अनेक अर्थ सांगितले आहेत. व्योम (आकाश), देवान्न, यज्ञशेष, रसायन, अयाचित, जल, दुग्ध, मोक्ष, अन्न, सुवर्ण, गोरस इ. अनेक पदार्थांना अमृत असे म्हटले जाते. साहित्यात वरील अनेक पदार्थांचा वाचक म्हणून अमृत पदाचा उपयोग केला आहे. तसेच शास्त्रकारांनी आपल्या शास्त्रात जे जे साध्य म्हणून ठरविले आहे, त्यासाठी अमृत शब्दाचा प्रयोग केला आहे. मीमांसक कर्मकांडी वेदातील "अपामसोमममृता अभूम" हे वाक्य घेऊन 'यज्ञातील सोमरस प्राशन करून आम्ही अमर होऊ' असे म्हणतात, योगी समाधिसुखासच अमृत समजतात. पंचदशी या वेदांत ग्रंथात श्री विद्यारण्य स्वामींनी त्यांच्या मताचा अनुवाद केला आहे.
धर्ममेघमिमं प्राहुः समाधिं योगवित्तमाः ।
वर्षत्येव यतो धर्मामृतधाराः सहस्रशः ॥ - पंचदशी, १-६०
'योगात निष्णात असणारे पुरुष या निर्विकल्प समाधीस धर्ममेघ म्हणतात. कारण हा धर्ममेघ धर्मांमृताच्या सहस्त्र धारांनी वर्षाव करतो.'

वेदांतशास्त्रात ब्रह्म, मोक्ष, या अर्थी 'अमृत' शब्दाचा उपयोग केलेला आढळतो. 'ब्रह्मैवेदममृतं' 'तद्विद्वानमृत‍ इह भवति' "ब्रह्मसंस्थोमृतत्वमेति" "अमृतत्वस्य नाशास्ति वित्तेन" "यज्ज्ञात्वामृतमश्नुते" "विद्यया अमृतमश्नुते" अशी अनेक प्रमाणे आहेत.

श्रीएकनाथ महाराजांनी आपल्या भावार्थ रामायणात लौकिक अशा पाच प्रकारच्या अमृतांची नावे व त्यांची स्थानेही सांगितली आहेत.
स्वादामृत उन्मादामृत । सुप्त्यमृत तृप्त्यमृत ।
ये अमृतेप्रलोभार्थ । परमामृत पांचवे ॥
स्वादामृत अप्सरांसी । तेणें त्या स्वादिष्ट सर्वांसी ।
तृप्त्यमृत ते देवांसी । क्षुधा त्यासी बाधीना ॥
उन्मादामृत दैत्यासी । तेणें ते उन्मत्त अहर्निशी ।
सुषुप्त्यमृतते दिग्गजांशी । तेणें ते सुखेसीं डुल्लत ॥
डुकल्या येती निद्रितासी । तेवी डुल्लणे दिग्गजांसी ।
ये तंव अमृतें वायसी । देवें सर्वांसीं चाळविलें ॥
समुद्र मथिला समस्तीं । झाली अमृताची प्राप्ती ।
कलहो करितां देवदैत्त्यीं । मोहिनी हातीं दिधलें ॥
मोहिनीरूपे श्रीविष्णुजाण । तेणें अमृत विभागून ।
इतरा अमृत वाढोन । राखिलें आपण परमामृत ॥
जेणें चुके जरामरण । तें परमामृत विष्णू आधीन ॥ अरण्यकांड ६ - १११ ते ११७

वास्तविक हे जे अमृताचे अनेक प्रकार कोठे कोठे सांगितले जातात हे सर्व गौण आहेत. अमृतातील काही धर्माचा त्याच्यावर आरोप करून त्यास अमृत अशी संज्ञा दिली आहे. वास्तविक देवदानवांनी क्षीरसागराचे मंथन करून जे अमृत काढले व ज्याला पुराणादिकातून अमृत अशी मुख्य संज्ञा दिली जाते ते देखिल खरे अमृत नव्हेच. कारण स्वर्गस्थ देव अमृत प्राशन करतात पण त्यांनाही मरण चुकत नाही. श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायात त्या अमृताचे बेगडीस्वरूप स्पष्ट करून दाखविले आहे. ते म्हणतात -
जे काळकुटाचे सहोदर । मृत्युभेणे प्याले अमर ।
तरी दिहाचे पुरंदर । चौदा जाती ॥
ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसु ।
जया वायाचि अमृतपणाचा आभासु । ज्ञा. १० - १९२, ९३
"एका ब्रह्मदेवाच्या दिवसात एकूण चौदा इंद्र बदलत असतात, मग त्या अमृतप्राशनाचा काय उपयोग ? म्हणून त्या द्रवपदार्थावर अमृतपणाचा आभास आहे ते खरे अमृत नाही."

समुद्रमंथनोद्‍भुत असे स्वर्गीय अमृत ते देवभोग्य आहे. ते जरा रोगनाशक आहे, दीर्घायुष्यप्रद आहे पण देवांनी केलेल्या पुण्यास क्षीण करणारे आहे, देवलोकांतील प्राणी अमृतप्राशन करून स्वर्गात जोपावेतो पुण्य क्षीण होत नाही, तोपावेतोच राहतात. 'क्षीणे पुण्ये मर्त्यलोके विशन्ति' (९-२१) हे गीतावचन प्रसिद्ध आहे.

तसेच चंद्रात अमृत आहे असे म्हटले जाते पण तेही असे गौणच आहे. श्री एकनाथ महाराज म्हणतात -
म्हणती चंद्रामृत जो आरोगी । तो होय नित्य निरोगी ।
मुख्य चंद्रचि क्षयरोगी । त्याचें अमृत निरोगी करीं केवीं ॥ नाथभागवत, २, २४६
चंद्रकिरणातील अमृत वनस्पतीचे पोषण करणारे व तद्वारा-प्राणिमात्रांना भोगावयास मिळणारे आहे, म्हणजे गहू इ. धान्याचे त्या चंद्रामृताने पोषण होऊन ते प्राणिमात्रांचा आहार होत असते. ते देहास पुष्ट करिते. क्षुधानिवारक आहे. पण जरा-मरण-शोकादि निवारक नाही, म्हणून ते खरे अमृत नव्हे.

धर्मयोगज्ञानादिक यांना अमृतत्व अशी संज्ञा दिली जाते असे मागे म्हटले आहे, पण ती साधने फलकाली अमृतत्वास प्राप्त होतात. स्वरूपाने नाही. 'अपामसोमममृता अभूम' यज्ञयागादिकरून स्वर्गात जाऊ व अमृत प्राशन करून अमर होऊ.' म्ह. अमृतत्व हे त्या धर्माचे कदाचित् फल होईल. धर्म अनुष्ठान कालात अमृतस्वरूप नाही. अनुष्ठानकाली तर कायक्लेश, संयम, तितिक्षा इत्यादिकांचे कष्टच असतात.

हीच गोष्ट योगाकरिताही आहे. समाधि धर्मामृतधारांचा वर्षाव करते असे वर म्हटले आहे, पण तो अमृतवर्षाव योगाचा आरंभ केला असताना होतो असे नाही. आरंभी यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यानादि साधने करावी लागतात ती अत्यंत क्लेशस्वरूप आहेत. पुढे ते योगी अनाहत नादाच्या श्रवणाकडे प्रवृत्त झाले तरी प्रथम नाडीशोधन, संयम, तीन बंध, कुंडलिनीजागृती इत्यादि झाली पाहिजेत व तो मार्ग किती कठीण व क्लेशप्रद आहे, हे योग ग्रंथातून स्पष्ट सांगितले आहे. पुढे ५८ व्या सूत्राच्या विवरणात हा विषय येणारच आहे.

आत्मज्ञानाच्या बाबतीत पाहिले तरी ज्ञानाच्या प्रारंभी विवेक, वैराग्य, शमदमादिषटकसंपत्ति, तीव्र मुमुक्षुत्व हे पाहिजे. तेव्हाच ज्ञानाचा अधिकारी होतो. वैराग्य, शमदम, तितिक्षादि साधनाचे काठिण्य उघडच आहे. अधिकारी झाल्यावर पुन्हा श्रवण मनन निदिध्यासनादिकांची अपेक्षा असते. नंतर महावाक्यजन्य ब्रह्माकार वृत्तीचा उदय झाल्यावर अविद्यानिवृत्ती होऊन मग अमृतत्त्वाची प्राप्ती होते.

सर्वांचे तात्पर्य हे की ज्ञानसाधन कालात अमृत नाही, पण 'भगवद्‌भक्ती' ही सर्व कालात अमृतस्वरूपा आहे.

भगवान स्वतः अमृतस्वरूप आहे, म्हणून त्याच्याशी संबंध आलेली प्रत्येक वस्तू अमृतस्वरूप मानली जाते. चरणामृत, प्रसादमृत, नामामृत, इ. साधनात्मिका भक्तीची जर ही अवस्था तर तीच पराभक्ती या स्वरूपास प्राप्त झाली. म्हणजे तिच्या अमृतत्त्वाचा संशय घेण्याचे कारण नाही.

ती भक्ती फलकाली तर अमृतस्वरूपा आहेच, पण साधन काली ही ती अमृतरूपा आहे 'तुका म्हणे भक्ति । सुखरूप आदि अंती ॥' श्रीकृष्ण भगवान स्वतःच गोपिकांना उपदेश करतात व भक्तीचे अमृतत्व सांगतात. मयि भक्तिर्हि भूतानाममृतत्त्वाय कल्पते ॥ श्रीमत भागवत १०.८२.४५

"माझी भक्ती प्राणिमात्रांना अमृतत्वप्राप्तीस कारण होते." येथे जरी भक्ती आणि अमृतत्वप्राप्ती याचा कार्यकारण भाव दिसून येतो, तरी तो अभेदस्वरूपच आहे. श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला भक्तीचे स्वरूप सांगतात.
येर्‍हवी तिजी ना चौथी । पहिली ना सरती ।
पै माझिये सहज स्थिती । भक्ति नाव ॥
ऐसा हा सहज माझा । प्रकाशु जो कपिध्वजा ।
तो भक्ति या वोजा । बोलिले जें गा ॥
ज्ञानी इयेते स्वयंवित्ति । शैव म्हणती शक्ति ।
आम्ही परम भक्ति । आपुली म्हणो । - ज्ञा १८.

'अमृत' या शब्दाचा मृतिरहित, मृत्युराहित्य असा अर्थ केला जातो. पण बहुधा केवळ स्थूल देहपात होणे म्हणजेच मृत्यू असा मृत्यू शब्दाचा सामान्य अर्थ केला जातो. पण जोपावेतो वासना, शुभाशुभ कर्माचे संस्कार, संचितप्रारब्धादिकर्मे अवशिष्ट आहेत, तोपावेतो एक देह गेला तरी दुसरा पुन्हा प्राप्त होतच असतो. म्हणून केवळ स्थूल देहपात हाच मृत्यू असे मानणे योग्य नाही. मृत्यू अनेक प्रकारचा मानला गेला आहे. आत्मघात, आत्महत्या यांसही मृत्यू मानले गेले आहे. "जया देहसंबंधा आंतु । प्रतिपदी आत्मघातु । भुंजतां उसंतु । काहीच नाही ॥ (ज्ञा. १८. १२. ७६)

श्री भागवत एकादश स्कंधात भगवान श्रीकृष्ण म्हणतात -
पावोनि श्रेष्ठ नरशरीर । जो नुतरेचि संसार पार ।
तो आत्महत्यारा नर । सत्य साचार उद्धवा ॥ (नाथ भागवत २०० - १८९)
आत्मा जीवदशेत येणे, संसारी बनणे, विकारवश होणे, त्यास लौकिक वासनेत जखडून पडावे लागणे हाच मृत्यू आहे. आत्म्याची परतंत्रता हाच त्याचा मृत्यू आहे. कामक्रोधांना ज्ञानेश्वर महाराजांनी कृतांत म्हटले आहे. असे मृत्यूचे मुख्य गौणरूपाने अनेक प्रकार ग्रंथात प्रसिद्ध आहेत. या सर्व प्रकारच्या मृत्यूपासून मुक्त करण्याचे सामर्थ्य भगवद्‌भक्तीतच आहे.

भगवान अमृतरूप आहे, भक्ती हे त्याचे स्वरूप आहे. इतकेच नव्हे ती भगवंताला आवडणारी आहे, म्हणजे ते भगवद्‌भोग्य म्हणजे ज्या प्रेमभक्तीचा भोग केवल भगवान घेतो असे अमृत आहे.

परप्रेम तर अमृतस्वरूप आहेच, पण त्या प्रेमाङ्गभूत होणार्‍या ज्या अन्य गोष्टी त्यांनाही अमृत स्वरूप म्हटले आहे. भगवत्स्वरूप, भगवत्कथा, भगवन्नाम हे सर्व अमृतमयच आहे. नाम नामीचा अभेद असल्याने भगवान व त्याचे नाम ही अमृतस्वरूपच आहेत. देवर्षिनारद प्राचीनबर्हि नामक राजास सांगतात -
तस्मिन्महन्मुखरिता मधुभिच्चरित्र पियूषशेष सरितः परितः स्रवन्ति ॥
ता ये पिबन्त्यवितृषो नृप गाढकर्णेस्तान्नस्पृशन्त्यशनतृड भयशोक मोहाः ॥ -श्रीमत् भागवत ४-२९-४०
नारद म्हणतात 'हे राजा ज्या ठिकाणी भगवद्‌भक्त वास्तव्य करतात तेथे भक्तश्रेष्ठांनी गायिलेले मधुसूदनाचे चरित्ररूप अमृत ज्यांत भरलेले आहे अशा नद्या चोहीकडून वाहत असतात. जे श्रद्धेने एकाग्र अशा श्रोत्रेंद्रियांनी त्या चरित्र कथारूप अमृताचे पान करतात त्यांना क्षुधा, तृषा, भय, शोक, मोह हे कधीही बाधा करीत नाहीत.

रामायणात प्रत्यक्ष श्रीशंकरच या अमृताचे श्रेष्ठत्व व फल स्वानुभवपूर्वक सांगतात.
श्रीरामनामाक्षर मंत्रबीजं जाप्यं मदीयं परमामृतं मे ॥
समुद्रजातं गरलं वृथाकृतं ध्येयं मदीयं सतु रामचंद्रः ॥ ३-७५,
शंकर पार्वतीस सांगतात, श्रीरामनामाक्षर हा बीज मंत्र त्याचाच अखंड जप मी करतो ते माझे परमामृत आहे. त्याचा प्रभाव असा थोर आहे की क्षीरसमुद्र मंथनातून निघालेले हलाहल विष या परमामृताने व्यर्थ गेले म्हणजे हलाहल विषाचाही माझ्यावर काही परिणाम झाला नाही म्हणून माझे ध्येय एक श्रीरामचंद्रच आहे'

या श्‍लोकावरील आपल्या प्रसादगर्भ टीकेत श्रीएकनाथ महाराज सांगतात :
रामनामयुग्म अक्षर । वाचेसी येता एक वार ।
सर्वांगी अमृताचा पूर । वेगबत्तर चालिला ।
त्या अमृताचे नि तेजे देख । करपोनि गेले व्याळ विख ।
पन्नग झाले निर्विख । अलंकारे देख बाधतीना ॥
अल्प पन्नगाची गरळ । त्याहूनि विशेष हलाहल ।
समुद्र मंथनी तत्काळ । उठले जगतीतल जाळीत ॥
पीडित सकळ सुरगण । यक्ष किन्नर सिद्ध चारण ।
ऋषी आदि दीनजन । भूमंडळ जाण जाळीत ॥
तेणे काळे म्या आपण । श्रीरामनामाच्या बळे जाण ।
न लगतां अर्धक्षण । कंठी जाण धरियले ॥
अल्पहि त्याची बाधा नाही । त्याहूनि अपूर्व आणिक काही ।
प्रळयानळाते गिळी लवलाही । प्रतापे पाही रामाच्या ॥
ऐसा श्रीरामनाथनाम प्रताप । जेणे विष हळाहळ ताप ।
भस्म झाला आपोआप । ते परमजाप्य जाण माझे ॥ भावार्थ रामायण युद्धकांड. ३. ११४ - १२२

रामायणात आणखीही या अमृताचे स्वरूप वर्णिले आहे.
ब्रह्माम्भोधि समुद्‌भवं कलिमलप्रध्वंसनं चाव्ययम ।
श्रीमच्छंभुमुखेंद्र सुंदरवरं संशोभितं सर्वदा ।
संसारामयभषजं सुमधुरं श्रीजानकीजीवनम ।
धन्यास्ते कृतिनः पिबन्ति सततं श्रीरामनामामृतम् ॥
"ब्रह्मसमुद्रातून निघालेले, कलिमलाचा नाश करणारे, अविनाश श्री शंकर प्रमुख देवांनी श्रेष्ठ म्हणून गायिलेले, संसाररूपी महारोगावरील औषधच, श्री सीतादेवीचे मूर्तिमंत जीवनच असे श्री रामनाममृत जे लोक सतत प्राशन करतात ते खरोखर धन्य होत."

भक्तश्रेष्ठ प्रल्हाद श्रीनृसिंहापुढे या अमृताचे स्वानुभवपूर्वक वर्णन करीत आहे.
नैवोद्विजे परदुरत्ययवैतरण्यास्त्वद्वीर्यगायन महामृत मग्नचित्तः ॥"
""प्रल्हाद म्हणतो, हे प्रभो ! मला तरून जाण्यास दुस्तर अशा या संसाररूप वैतरणी नदीची मुळीच भीती वाटत नाही, कारण तुझ्या चरित्रगायनरूप महान अमृतामध्ये माझे अंतःकरण अगदी तल्लीन होऊन गेले आहे."

भगवान श्रीकृष्ण स्वतःच उद्धवास आपल्या कथामृताचे महात्म्य सांगत आहेत.
अमृतरूपाया माझ्या कथा । श्रद्धायुक्त श्रवण करितां ।
फिके ज्या करूनिया अमृता । गोडी भक्तीपंथा तात्काळ लागे ॥
अमर अमृतपान करिती । तेही शेखी मरोनि जाती ।
माझे कथामृत जे सेविती । ते नागवती कळिकाळा ॥
सेविता कथामृत सार । मद्‍भावी रंगले अंतर ।
तै माझे गुण माझे चरित्र । गाती सादर उल्हासे ॥
एकनाथी भागवत १९. २१७ - २२०

अमृतामध्ये जीवास अमर करण्याचा जसा गुण आहे तसाच माधुर्य हाही एक मोठा गुण आहे. "अमृतरसस्वादनी । रस सकळ ॥" (ज्ञा. १-२६) भक्ती ही देखील तशीच अमृतासारखी रसरूपा आहे. किंबहुना सर्व रसांचा अंतर्भाव भगवद्‌भक्तीत होतो याचा विचार भक्तिशास्त्रकारांनी विस्ताराने केला आहे. रस शब्द आनंदवाचक आहे. "रसौ वै सः रसं लब्ध्वानंदा भवति" असे श्रुतिवचन आहे, प्रेमरसाची माधुरी गोडी अलौकिक आहे ती भगवत्कथा, भगवत्स्वरूप सौंदर्य, माधुर्य, भगवन्नाम यातून प्रकट होते. त्या नाम माधुर्यापुढे या अमृताचे माधुर्यही फिके पडते असे संत सांगतात.

"जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिके पुढे ॥" तुकाराममहाराज
"गोड हे गोमटे अमृतासीवाड । केला कैवाड माझ्याजीवे ॥" तुकाराममहाराज
"गंगोदकाहुनी निके । गोडी अमृत झाले फिके ॥" ज्ञानेश्वरमहाराज
एखाद्याला भगवन्नामातील ही गोडी, हा स्वाद, हे माधुर्य अनुभवास येत नसेल तर समजावे की, तो रोगी आहे. "रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न ॥" (तु.) साखर स्वरूपाने मधुर असूनही पित्त झालेल्या रोग्यास गोड लागत नाही. पण तो पित्तरोग दूर करण्याचे औषधही ती साखरच आहे. तद्वत् नाममाधुरी अनुभवास येण्याचे साधनही अखंडनाम घेणे हेच आहे. भगवन्नामात रस येण्याकरिता श्रीज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात -
नामामृत गोडी वैष्णवा लाधली । - (ज्ञानदेव हरिपाठ)

आणि वैष्णव तोच आहे की ज्याचे भगवन्नामावर निरतिशय प्रेम आहे.
भगवद्‌भजनाचे सुख । भक्त जाणती भाविक ।
भावेवीण भजनसुख । अनोळख अभाविका ॥ एकनाथी भागवत, ५ - ३९२

नाम हेच आपल्या अलौकिक सामर्थ्याने सर्व दोष दूर करते आणि आपलीच गोडी निर्माण करते, ती आवड एवढी वृद्धिंगत होते की, तो नामधारक देवालाही म्हणतो -
तुझ्या नामाचा महिमा । तुज न कळे मेघश्यामा ।
तुका म्हणे आम्हा । जन्म गोडयासाठी ॥ तु.गा.

मधुर मधुर मेतन्मंगलं मंगलानाम ।
सकल निगमवल्ली सत्फलं चित्स्वरूपं ॥ - पुराणवचन

'मधुराहूनही मधुर, मंगलापेक्षा मंगल, सर्व वेदरूप वेलीचे फल व चित्स्वरूप हे कृष्णनाम आहे.'
'रसगंगाधर' या साहित्यशास्त्रावरील अपूर्व ग्रंथाचे कर्ते जगन्नाथ पंडितांचा हा एक श्लोक पाहा.
मृद्वीकारसिता सितासमशिता स्फीतं च पीतं पयः ।
स्वर्यातेन सुधाप्यधायि कतिधा रम्भाधरः खंडितः ॥
सत्यं ब्रूहि मदीय जीव भवता भूयोभवे भ्राम्यता ।
कृष्णेत्यक्षरयोर्द्वयोर्मधुरिमोद्‍गारः क्वचिल्लक्षितः ॥
हे जीवा, अनेकवेळा या संसारातील नाना योनीत भ्रमण करीत असता तू मधुर द्राक्षे खाल्ली आहेस. साखरेचा आस्वादही घेतला आहेस, उत्तम दूधही प्याला आहेस, अनेकवेळा स्वर्गात जाऊन तेथे रम्भादी अप्सरांचे अधरामृतही प्राशन केले असेल. पण खरे खरे सांग की 'कृष्ण' या दोन अक्षरात जे माधुर्य आहे, तसे अलौकिक माधुर्य तुला कोठे अनुभवास आले आहे काय ?

भक्तिरसाचा पूर्णप्रकर्ष ज्यात आहे अशा 'भक्तिरसामृतसिंधू' "उज्ज्वलनीलमणी" "ललित माधव" 'विदग्ध माधव' "श्री भागवत बृहत्तोषणी" इ. अलौकिक ग्रंथाचे कर्ते भक्तश्रेष्ठ रूपगोस्वामी हे एक ठिकाणी श्रीकृष्णनाम माधुर्याचे अत्यंत सुंदर वर्णन करतात.
"तुण्डे ताण्डविनी रतिं वितनुते तुण्डावली लब्धये ।
कर्णक्रोड कदम्बिनी घटयते कर्णार्बुदेभ्यःस्पृहाम ।
चेतःप्राङ्णसङ्गिनी विजयते सर्वेंद्रियाणां कृतिं ।
नो जाने जनिता कियाद्भिरमृतैः कृष्णेति वर्णद्वयी ॥ विदग्धमाधव
श्रीरूपगोस्वामी म्हणतात, 'आम्ही हे जाणू शकत नाही, की 'कृष्णही वर्णद्वयी (दोन अक्षरे) जेव्हा जिव्हेवर येते तेव्हा मन आतुर होऊन उठते. त्याला वाटते की, हे नाम सतत घेण्याकरिता मुखामध्ये अनंत जिभांच्या पंक्तीच्या पंक्ती उत्पन्न व्हाव्यात व त्याच्याद्वारे या नामाच्या माधुर्याचा रस घेत असावा, जेव्हा ही दोन अक्षरे कानामध्ये पडतात तेव्हा अशी उत्कंठा होते की, अनंत कान असते तर त्याच्याद्वारे या माधुर्यश्रवणाचा लाभ घेता आला असता. चित्तात जेव्हा या कृष्णनामाचे स्मरण होते तेव्हा सर्व इंद्रियांचे व्यवहार तेथेच बंद पडतात, अन्य काही पाहावे किंवा ऐकावे, कोणास स्पर्श करावा, काही सुगंध सेवावा किंवा रसनेने अन्य कोणत्या रसाचा आस्वाद घ्यावा, किंवा कोठे जावे - यावे, काही करावे असे वाटतच नाही.'

तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगातून या भक्तिप्रेमरसालाच ब्रह्मरस अशी संज्ञा दिली आहे.
लाऊनी मृदंग श्रुतीटाळ घोष । सेवू ब्रह्मरस आवडीने ॥
जेथें तुझ्या कीर्तनाचा घोष । जळती पापे पळती दोष ।
काय ते उणें आम्हां आनंदास । सेवू ब्रह्मरस तुका म्हणे ॥

अशा या ब्रह्मरसात भक्त निमग्न झाला म्हणजे त्याच्या इंद्रियांनाही अन्य काही कसे आवडणार ?
भक्तिप्रेमामृताचे श्रेष्ठत्व किती आहे, हे श्रीएकनाथ महाराज एका ओवीतून सांगतात.
धर्मअर्थकाम मुक्ती । चहू पुरुषार्थाही वरती ।
श्रीकृष्णें सारामृत-निजभक्ती । उद्धवाहाती अर्पिली ॥ ना भा. २९ - ९७६

भक्ती अमृतस्वरूपा आहे, याचा आणखीही एका दृष्टीने विचार करता येण्यासारखा आहे. भक्ती ही अमृतस्वरूपा म्हणजे अखंड राहाणारी आहे. कोणतेही साधन फल उत्पन्न करून नष्ट होत असते, म्हणजे त्यास 'मृति' आहे. उदाहरणार्थ, यजन करणारा यज्ञ करून स्वर्गास गेला म्हणजे मग यज्ञ राहत नाही. धर्मकर्माचे फल प्राप्त झाले म्हणजे कर्म संपते. योगरूप साधनही फलनिर्मितीनंतर नष्ट होते. योगाने निर्विकल्प समाधी सिद्ध झाली असता पुन्हा योगसाधनाची आवश्यकता नाही. आत्मज्ञान हे साधनही फलरूपवृत्ती निर्माण करून नष्ट होते. महावाक्य श्रवणाने व मनननिदिध्यासनोत्तर ब्रह्माकारवृत्तीचा उदय झाला असता ती अविद्यावृत्तीचा नाश करून ती वृत्तीही नष्ट होते. श्रीशंकराचार्य म्हणतात -
अज्ञानकलुषं जीवं ज्ञानाभ्यासाद्विनिर्मलं ।
कृत्वाज्ञानं स्वयंनश्ये ज्जलं कतकरेणुवत् ॥

अविद्येने कलुषित झालेला जीव ज्ञानाभ्यासाने शुद्ध होतो. जसे पाणी गढूळ झाले म्हणजे ते स्वच्छ करण्यास त्यात निवळीच्या बीजाचे चूर्ण करून टाकतात. ते बीजचूर्ण त्या पाण्यातील गाळ खाली तळास नेते व आपणही तळास जाते. त्याप्रमाणे ते वृत्तिज्ञानही अज्ञान दूर करून आपणही नष्ट होते. 'अज्ञान ज्ञाने नेले । तेही आपणपे वस्तू देऊनि गेले ॥ असे श्रीज्ञानेश्वर महाराजही म्हणतात. म्हणजे त्या स्थितीत ज्ञानसाधने कशी राहू शकतील ? पण भक्तिप्रेमाचे तसे नाही. भक्तीने भगवतप्राप्ती झाल्यावर ती भक्ती नष्ट होईल काय ? भगवतप्राप्तीने तर भक्तिप्रेमाची वाढ झालेलीच दिसून येते. एक जन्मच काय, अनेक जन्म प्रेममय जीवनाचा भोग घ्यावा असेच त्या भक्तांस वाटत असते. पुढील सूत्रातून याचा विशेष विचार केला जाणार आहे.

ही भक्तिप्रेमामृत धारा, गंगेचा ओघ समुद्रास मिळाला तरी पुन्हा मिळतच असतो, त्याप्रमाणे अखंड प्रवाहितच असते. ती कधीच खंडित होत नाही.
मिळोनि मिळतचि असे । समुद्री गंगाजळ जैसे ।
मी होऊनि मज तैसे । सर्वस्वे भजती ॥ -ज्ञा० १३ - ६०७

याच आशयाने श्री नारद महर्षी 'अमृतस्वरूपाच' असे परमप्रेमस्वरूपा भक्तीचे विशेष स्वरूप सांगतात.


GO TOP