नारद भक्तिसूत्रे

अथातो भक्तिं व्याख्यास्यामः ॥ १ ॥


अर्थ : अथ (आता) अत: (म्हणून) भक्ति (भक्तीचे) व्याख्यास्यामः (आम्ही व्याख्यान करीत आहो.)


विवरण : कोणत्याही ग्रंथाच्या आरंभी तो ग्रंथ निर्विघ्न रीतीने परिसमाप्त व्हावा म्हणून मंगलाचरण करण्याचा शिष्ट संप्रदाय आहे, त्याला अनुसरून सूत्राच्या आरंभी 'अथ' या शब्दाचा उपयोग केला आहे. कारण 'अथ' शब्द मंगलवाचक आहे. त्याचे कारण खालील श्लोकात सांगितले आहे.

ॐकारश्चाथ शब्दश्च द्वावेतौ ब्रह्मणः पुरा ।
कंठं भित्वा विनिर्यातौ तेन माङ्‌गलिकावुभौ ॥
सृष्टीच्या प्रारंभी भगवंताच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाच्या कंठातून प्रथम 'ॐ' आणि 'अथ' हे दोन शब्द निर्माण झाले म्हणून ते दोन्ही मंगलवाचक मानले गेले. अथ शब्दाचा अर्थ कोशात मंगल असा नाही, पण अथ शब्दाचा उच्चार होताच मंगलवाद्य ध्वनिश्रवणाप्रमाणे मंगलभाव प्रकट होतो. म्हणून अनेक दर्शनांची जी सूत्रे आहेत त्याचा आरंभ 'अथ' या शब्दाने झाला आहे. 'अथातो ब्रह्मजिज्ञासा' 'अथातो धर्मजिज्ञासा,' 'अथातो धर्म व्याख्यास्यामः', 'अथ योगानुशासनम्' इ.

वास्तविक भक्तवर्य नारद महर्षीसारखे व्याख्याते व भक्तिसूत्रासारखा विषय, येथे अमंगल काही राहणारच नाही हे खरे. पण शिष्ट संप्रदाय पालन व शिष्यांना मार्गदर्शन व्हावे या हेतूने अथ शब्दाचा प्रयोग करून मंगल साधले आहे.

अथ शब्दाचे आरंभ, अधिकार व अनंतर असे तीन अर्थ आहेत. अधिकार असा अर्थ घेतला तर इतर साधनांना जसा पूर्वी काही साधनाचरण होऊन अधिकार प्राप्त होतो, उदाहरणार्थ, धर्माचरण करणाऱ्याला वेदाध्ययनाने अधिकार प्राप्त होतो. ज्ञानाचा अधिकार विवेक-वैराग्यादि अंतरग साधनाचरणाने प्राप्त होतो. योगसमाधीचा अधिकार यमनियमादिकांनी सिद्ध होतो, तसे भक्ती हे साधन करण्यापूर्वी इतर कोणत्याही साधनाची ती अपेक्षा ठेवीत नाही. विहित कर्मे करण्यास त्रैवर्णिक अधिकारी आहे. यज्ञयागादि करण्यास गृहस्थाश्रमी अधिकारी आहे तसा येथे वर्णआश्रम, जाति अवस्था, वय इत्यादी कोणताही अधिकार लागत नाही. मनुष्यदेहात आला तो भक्तीचा अधिकारी होतो. एखादा भक्ती करीत नसेल तर तो पुरुषापराध होय. पण तो अधिकारी नसतो असे नाही म्हणून 'अथ' पदाचा अर्थ अधिकार असा घेता येत नाही.

तसेच अनंतर हाही अर्थ उपयुक्त नाही. काही साधने प्रथमत इतर साधनाचरण करूनच केली जातात. तसें भक्तीचे नाही. पुढे नारदानी भक्ती स्वयंफलरूप आहे असे म्हटले आहे. तप, यज्ञक्रिया इत्यादी साधनाची भगवद्‌भक्तिपूर्वी अपेक्षा असते असे नाही. कारण तप, यज्ञक्रियादिकांची पूर्तता नामस्मरणपूर्विका भक्तीनेच होते, हे पुराणादिकातून प्रसिद्ध आहे. सर्वसाधननिरपेक्ष भक्ती आहे. (या विषयाचा विचार पुढे सूत्र २८,२९, ३० च्या व्याख्यानाचे वेळी विस्तृत होणार आहे.) अथवा अथ शब्दाचा अनंतर असा अर्थ घेऊन खालीलप्रमाणे उपपत्ती लाविली तरी चालेल. श्रीनारदमहर्षींनी अनेक ग्रंथ, स्मृती, पांचरात्र इ. निर्माण केले, पण त्याच्याद्वारे सर्व मानवाचा उद्धार होणे शक्य नाही. कारण त्यात केलेला विचार सूक्ष्म व गूढ आहे व सांगितलेली साधने क्लिष्ट अशी आहेत. म्हणून वरील ग्रंथनिर्मिती नंतर सर्वजण सुलभ अशा भक्तियोगाचे रहस्य सर्वांना पटवून द्यावे, या हेतूने सूत्राची रचना केली, असा अर्थ होऊ शकेल. 'अथ' शब्दाचा आरंभ असा अर्थही घेणे योग्य होईल. कारण श्रीनारदमहर्षी या सूत्रात आम्ही आता भक्तीचे व्याख्यान करतो अशी प्रतिज्ञा करतात. हे प्रतिज्ञासूत्र म्हटले जाते. योग्य व श्रेष्ठ व्यक्तीने केलेली प्रतिज्ञा प्रयोजन सिद्ध करणारी असते. ते प्रयोजन पुढील चौथ्या-पाचव्या सूत्रातून स्पष्ट केले आहे. म्हणून 'अथ' या शब्दाने आम्ही आता या भक्तीच्या व्याख्यानास आरंभ करतो असाही अर्थ घेणे योग्य होईल.

सूत्रातील दुसरे पद 'अत:' हे आहे. 'अत:' शब्दाचे दोन अर्थ संभवतात. ते 'अतःकारणात्' 'अतःप्रयोजनात्' या कारणाने व या प्रयोजनाने अशा दोन अर्थात अतः शब्दाचा व्यवहार होतो. भक्तीच्या व्याख्यानाचा म्हणजे सर्व मानवाचा भगवद्‌भक्तीकडे प्रवृत्त करण्याचे कारण काय हा प्रश्न निर्माण झाला तर त्याचे उत्तर हे की, सर्व मानवप्राणी संसारात गुंतले आहेत, कोणाची कोणत्या ना कोणत्या सांसारिक भोगात आसक्ती दिसून येते. कोणी धन, कोणी ऐश्वर्य, कोणी पत्नीपुत्रादि तसेच कोणी जातिधर्म, समाज, राष्ट्र याची कोणत्यातरी हेतूने, कोणत्यातरी प्रकारे भक्ती करीत असतात. पण या भोगासक्ती, वैभवासक्ती, सत्तालालसा इत्यादिकांनी कधी कोणास सुखशाती प्राप्त होणे शक्य आहे काय ? ही भोगवासना कामक्रोधादि विकार वाढविते व ते किती बाधक आहेत हे श्रीनारदमहर्षी पुढे सूत्र ४४, ४५ मध्ये स्पष्ट सांगणारच आहेत. 'अतः' - शब्दाने सूत्रकार हे सूचित करतात की, ऐहिक व पारत्रिक ब्रह्मलोकापावेतो भोग प्राप्त झाले तरी विनाभगवत्प्रेमाच्या मनुष्यास खरी शांती-वास्तवसुखाची प्राप्ती होणे शक्य नाही. मानव तर त्या शांतीचा भुकेलेला आहे 'अत:, या कारणास्तव' - आम्ही भक्तीचे व्याख्यान करतो.

संसारात जे जे काही इंद्रियगोचर दृश्य पदार्थ आहेत ते क्षणविनाशी आहेत. क्षणाक्षणाला प्रत्येक वस्तू झिजत जात असलेली आपणास दिसते. कोणतीही वस्तू टिकणारी नाही. संताची वचने हे असत्यत्व पटवून देणारी अनेक आहेत, पण आपला अनुभवही असाच नाही काय ? सर्वच वस्तू परिच्छिन्न, असत्, जड, दुःखरूप, सत्ताशून्य अशा आहेत केवळ परमात्मा हाच एकमेव सत-चित्-आनंदस्वरूप आहे, हे श्रुति-स्मृति-संतवचनांनी अनेक उपपत्तीच्या द्वारे स्पष्ट केले आहे. तो अविनाशी आहे. तो आमच्या हृदयाला सोडून कधीही राहत नाही, तो एकमेव सुखप्रदाता आहे 'अतः' या कारणास्तव विनाशी दुःखरूप अशा या संसारातून सुटून अविनाशी सत्य व सुखस्वरूप परमात्म्याची प्राप्ती व्हावी या प्रयोजनाच्या इच्छेने भक्तीच्या व्याख्यानास आरंभ केला जातो येथे 'भक्तिं व्याख्यास्यामः' अशी प्रतिज्ञा आहे. ही करण्याचे कारण असे की, वेद, उपनिषदे, धर्मशास्त्र, वेदांतशास्त्रावरील सर्व दर्शनांवर सूत्रे रचली गेली, पण भक्तिशास्त्रावर योग्य प्रकारची सूत्रे रचली गेली नाहीत. प्राप्त कलिकालात तेच एकमेव मानवमात्राच्या उद्धाराचे महत्त्वाचे साधन आहे. जर त्यावर सूत्ररचना न केली तर त्या साधनाचे महत्त्व ठरणार नाही, त्याला सामान्यत्व प्राप्त होईल, म्हणून श्रीमहर्षी नारदऋषींनी प्रतिज्ञापूर्वक ही सूत्ररचना केली असावी असे वाटते कारण त्याचा अवतारच श्रीतुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे : 'वाढावया सुख भक्तिभाव धर्म' याकरिता होता. देवर्षी नारदाचे पिते श्रीब्रह्मदेव यांनी त्यांना असा आदेशच दिला होता "यथा हरौ भगवतिनृणां भक्तिर्भविष्यति ॥" तू असाच प्रचार कर, की ज्यायोगे मानवमात्राची भगवंताचे ठिकाणी भक्ती निर्माण होईल. नारदांनी भक्तिदेवीपुढे स्वत: अशी प्रतिज्ञा केली होती -
अन्यधर्मान्स्तिरस्कृत्य पुरस्कृत्य महोत्सवान् ।
तदानाहं हरेर्दासो लोकेत्वां न प्रवर्तये ॥ -श्रीभागवत माहात्म्य २.१४
'अन्य सर्व धर्मांची उपेक्षा करून मी सर्व लोकांत मोठ्या उत्साहाने तुझी (भक्तीची) स्थापना न करीन तर मी श्रीहरीचा सेवक होऊ शकणार नाही ? पित्याची आज्ञा, आपली प्रतिज्ञा, क्लेशमग्न जीवाच्या उद्धाराचे एकमेव क्लेशरहित हेच साधन आहे यावर विश्वास, यामुळे नारदांनी भक्तिसूत्रे रचली.

श्रुतीही -
भक्तिरेवैनं नयति । भक्तिरेवैनं दर्शयति । भक्तिरेवैनं गमयति ।
भक्तिवशः पुरुष: । भक्तिरेव भूयसि ॥ त्रिपाद्‌विभूति उप० -
असे भगवद्‌भक्तीचे अगाध माहात्म्य उद्‌घोषपूर्वक सांगत आहे, म्हणून 'भक्तिं व्याख्यास्यामः' असे नारद प्रतिज्ञापूर्वक सांगतात. येथे 'व्याख्यास्यामः' म्हटले आहे, कथन करतो, सांगतो असे म्हटले नाही. 'व्याख्यास्यामः' वि-आ- ख्यास्यामः. वि-विशेषरूपाने, आ-योग्य प्रकारे, ख्यास्यामः-वर्णन, निरूपण करीत आहो. असा विशेष अर्थ या पदातून निष्पन्न होतो. तसे भक्तीचे स्वरूप, प्रकार इ. अनेक ग्रंथातून सांगितले गेले आहेत. बहुतेक ठिकाणी कर्ममिश्रा, ज्ञानमिश्रा, सात्त्विक, राजस, तामस, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू अशाप्रकारे भक्तीचे निरूपण केले आहे. पण नारदांनी विशेषरूपाने म्हणजे जिच्यामध्ये इतर कोणाचे मिश्रण नाही अशा शुद्धभक्तीचे व्याख्यान केले आहे जी कोणाचेही अंग होत नाही. तसेच जी स्वतः फलस्वरूप आहे, अशा भक्तीचे आम्ही व्याख्यान करू अशी ही प्रतिज्ञा आहे. प्रथम सूत्रात भक्तीचे व्याख्यान करू अशी प्रतिज्ञा केली आहे, पण शास्त्र- सिद्धान्त असा आहे की, 'नहि प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धि, अपि तु लक्षण प्रमाणाभ्यां वस्तुसिद्धिः' म्हणजे एखादी वस्तू प्रकट करतो एवढे म्हणण्याने त्या वस्तूची सिद्धी होत नाही तर त्या वस्तूच्या (प्रमेयाच्या) लक्षण व प्रमाणांनीच ती सिद्ध होते. 'असाधारणधर्मो लक्षणं' वस्तूचा असाधारण म्हणजे तेथेच राहणारा, अन्यत्र न दिसून येणारा जो धर्म त्यास लक्षण असे म्हटले जाते. शास्त्रीय दृष्टीने कोणत्याही विषयाचे प्रथम लक्षण ठरवावे लागते म्हणजे त्याचा असाधारण धर्म सांगावा लागतो. जर तसा धर्म सांगितला नाही तर त्या वस्तूचे सामान्य ज्ञान झाले तरी विशेषरूपाने यथार्थ ज्ञान होणार नाही. केवळ सामान्य ज्ञान हे अकिचित्कर आहे. तसेच प्रमाणही पाहिजे, म्हणजे योग्य प्रमाणाने ती गोष्ट सिद्ध झाली तरच ती अबाधित, अर्थप्रतिपादक ठरते. येथे नारदवचन हेच प्रमाण आहे. प्रमाणे प्रत्यक्ष, अनुमान, शब्द इत्यादी अनेक मानली आहेत. त्यात अतींद्रिय-अर्थप्रतिपादनामध्ये प्रत्यक्षादी प्रमाणाची योग्यता नाही. तेथे शब्दप्रमाणच उपयुक्त आहे. वेद, उपनिषद, पुराणे, सूत्रे, स्मृती इत्यादिकांना जसे प्रामाण्य आहे तसेच 'आप्तवाक्यालाही' प्रामाण्य आहे. 'आप्तस्तु यथार्थ वक्ता' असे आप्ताचे लक्षण आहे. लौकिक व अलौकिक असे आप्ताचे प्रकार संभवतात. लौकिक व्यावहारिक वस्तूचे ज्ञान करून देणारे ते लौकिक आप्त, व अलौकिक म्हणजे अन्य लौकिक प्रमाणांना अगोचर असे ज्ञान, भक्ती, प्रेम, याचे यथार्थ कथन करणारे ते अलौकिक आप्त होत. श्रीनारद-महर्षी असे यावन्मानवमात्राचे कल्याण चिंतणारे अलौकिक आप्त होत. अर्थात तेच या भक्तीचे लक्षण सांगू शकतील. श्रीनारद हे प्रत्यक्ष भगवद्विभूतिस्वरूप आहेत. 'देवर्षीणांच नारदः ।' असे गीता अध्याय दहाव्यात श्रीकृष्णच सांगतात. म्हणूनच नारदांनी केलेल्या या भक्तिलक्षणाला महत्त्व आहे.

तशी पुराणादिकांतून भक्तीचे अनेक प्रकार, भक्ताचे प्रकार, भक्तींची फले इत्यादी सांगितली आहेत. पण लक्षण या दृष्टीनी श्रीनारदांनी केलेल्या भक्तीच्या व्याख्येला फार महत्त्व आहे. म्हणून पुढे दुसऱ्या सूत्रात श्रीनारद भक्तीचे लक्षण सांगतात.


GO TOP