नारद भक्तिसूत्रे
वेदानपि संन्यसति, केवलमविच्छिन्नानुरागं लभते ॥ ४९ ॥
अर्थ : वेदांचा देखील योग्य प्रकारे त्याग करतो आणि जो केवळ अखंड अशा भगवत्प्रेमाचा लाभ संपादन करतो.
विवरण : मागील सूत्रात कर्मफले व ती प्राप्त होण्याकरिता केली जाणारी विहित कर्मे यांचाही तो भक्त त्याग करतो असे सांगितले आहे. कर्म हे एक प्रमेय आहे ते प्रमाणाधीन असते. मानाधीना मेयसिद्धि । असे वचन आहे, याचा अर्थ प्रमाणाचे आधीन प्रमेय (विषय) असावे. कोणत्याही विषयाचे यथार्थ ज्ञान करून देणार्या साधनास प्रमाण म्हणतात. प्रमाणाचा शास्त्रग्रंथात पुष्कळ ऊहापोह आहे. प्रमाणे मानण्यात शास्त्रकारांत मतभेद आहेत, पण वेदान्त शास्त्रात प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती व अनुपलब्धी अशी सहा प्रमाणे मानली आहेत. बहुतेक प्रमाणे प्रत्यक्षोपजीवी आहेत, केवळ शब्दप्रमाण मात्र स्वतंत्र आहे. शब्दप्रमाणात लौकिक अलौकिक असे भेद मानले जातात. लौकिक शब्दप्रमाण हे मनुष्य बुद्धीत अनेक भ्रमप्रमादादि दोषयुक्त असल्यामुळे अलौकिक वस्तूच्या ज्ञानाकरिता त्याचा उपयोग नाही म्हणून अपौरुषेय व भ्रमप्रमादादि दोष रहित असे जे वेद आहेत ते लौकिक-अलौकिक सर्व विषयात प्रमाण मानले गेले आहेत.
प्रत्यक्षेणानुमित्यावा तस्तूपायो न बुद्ध्यते ।
एनं विदन्ति वेदेन तस्माद्वेदस्यवेदता ॥ स्मृतिवाक्य
'प्रत्यक्ष अनुमानादिकांनी जे उपायाचे ज्ञान होत नाही त्याचे वेदाने ज्ञान होते म्हणून त्यास वेद म्हणावे. भारतीय शास्त्रे सर्व वेदमूलक आहेत. प्रवृत्ती निवृत्ती ही वेदमूलक आहे. कोणतेही साधन जे वेदात सांगितले असेल तसेच करावे. कार्य व अकार्य काय आहे हे ठरविण्याची कसोटी वेदच होत,
'मागील सूत्रात 'कर्माचाही त्याग करतो' असे आहे, पण जोपावेतो वेद - प्रामाण्य मानले जाते तोपावेतो कर्मे टाकली जाणार नाहीत किंवा कर्मे करतो तोपावेतो वेदाचा त्याग होणार नाही. एखाद्या कर्माचा जो अधिकारी असतो त्यास वेद हा प्रेरणा देत असतो ! जो कर्माचा अधिकारीच नाही त्यास त्या कर्माची प्रेरणाच वेद देऊ शकत नाही, श्रीनारद पुढे याच सूत्रात 'केवलं अविच्छिन्नानुरागं लभते' असे सांगत आहेत अशा केवल अविच्छिन्न भगवदनुरागी भक्तांना कर्माचे बंधन नाही.
तसेच जनक-नवयोगेश्वर संवादात या विषयाचा विचार करीत असता म्हटले आहे तेथे शंका घेऊन त्याचा विचार केला आहे.
वेदाज्ञा विष्णूचि परम । वेदे विहिले धर्माधर्म । भक्त आचरता विकर्म । केवी वेदाज्ञानेम न बाधी त्यासी ॥ ४७६ ॥ जेवी रायाचा सेवक आप्त । तो द्वारपाळा नव्हे अंकित । तेथ रायाचा पढियता सुत । त्याचा पंगिस्त तो केवी होय ॥ १७ ॥ हरिनामाचे ज्यासी स्मरण । वेद त्याचे वंदी चरण । मा जो हरीचा पढियंता पूर्ण । त्यासी वेद विधान कदा न बाधी ॥ ७८ ॥ भक्तापासूनि विकर्म स्थिती । कदा न घडे गा कल्पांती । अवचटे घडल्या दैवगती । त्या कर्मा निर्मुक्ति अच्युत स्मरणे ॥ ७९ ॥ ए. भा. ५
तसेच एकादश स्कंधाच्या तेराव्या अध्यायात भक्तानी वेदाचा त्याग केला तरी त्याला प्रत्यवाय (दोष) नाही असे श्रीकृष्ण उद्धवास शंकासमाधानपूर्वक सांगतात 'वेदवचन ते तात्त्विक । मानावे पै अवश्यक । हे तुझीच शिकवण देख । तो वेदु लटिक म्हणावा कैसा ॥ ४६१ ॥ ऐशी मानाल आशंका । तेही विषयी मीचि देखा । वेदवादाच्या विवेका । विभाग नेटका सांगेन ॥ ४६४ ॥ अविद्या भेद सबळ ज्यासी । वेदु नियामक म्या केला त्यासी । मद्रूपी अभेदता ज्या भक्तासी । मिणधा त्यापाशी वेदवादु ॥ ४६५ ॥ सबळ भेदाचे भेदभान । तंव दुर्लघ्य वेदवचन । अभेद भक्त माझे जाण । वेद विधान त्या न बाधी ॥४६९॥' ए. भा. १३
एवढा विचार करण्याचे कारण जो केवळ प्रेमानुरागी भक्त आहे तो कर्मफल त्याग, कर्मत्याग व कर्मास प्रेरक अशा वेदाचाही त्याग करतो येथे 'अपि' या अव्ययाचा सहेतुक उपयोग केला आहे, त्रैगुण्य विषयावेदा निस्त्रैगुण्योभवार्जुन । २-४५ असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगून गेले आहेत. भक्त निस्त्रैगुण्य होतो असे मागील सूत्रात सांगितले आहे. वेदातील कर्ममार्ग हा सामान्य पामर बहिर्मुख जीवापुढे यज्ञयागादि सकाम कर्माची स्वर्गादि फले ठेवून त्यास निषिद्ध कर्मापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो, पण ती स्वर्गादि कर्मफले ही अनित्य अतएव दुःखरूपच आहेत असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. एर्हवी तरी नरकीचे दुःख । पावोनि स्वर्गनाम की सुख । वाचुनि नित्यानंद गा निर्दोख । ते स्वरूप माझे ॥३१४॥ ज्ञा. ९-३१४
मागे सूत्र आठ मध्येही 'निरोधस्तु लोक-वेद-व्यापार न्यासः । असे म्हटलेच आहे. तेथेही या विषयाचा विचार केला गेला आहे.
श्रीमद्भागवत चतुर्थस्कंधात नारदांनी प्राचीन बर्हिराजाला उपदेश केला आहे. त्या प्रसंगात हीच गोष्ट नारदांनी सांगितली आहे.
यदायमनुगृण्हाति भगवान्पुरुषः परः ।
सत्यजेत मतिं लोके वेदेच परिनिष्ठिताम् ॥ ४-२९-४६
'जेव्हा भक्त भगवद्ध्यान चिंतन करीत असतो, परपुरुष भगवंताचा अनुग्रह हृदयात प्रगट होतो तेव्हा तो भक्त लोकाचार आणि वैदिकाचाराचे ठिकाणी अत्यंत निष्ठा ठेवणारी जी बुद्धी तिचा त्याग करतो.
शुद्ध परमात्मस्वरूपापुढे सर्वच कर्मफले तुच्छ असतात म्हणून तो सांगणारा प्रेरक जो वेद त्याचाही भक्त त्याग करतो असे नारद या सूत्रात म्हणतात. कर्मे, कर्मफले किंबहुना वेदांचाही त्याग करून त्याला काय फलप्राप्ती होते ? नास्तिक मनुष्य विहित कर्माचा त्याग करील पण अनुकूल कर्मफलाचा त्याग करीत नाही, तसेच तो वेदाचाही त्याग करील म्हणजे वेदानी सांगितलेल्या आवश्यक अशा विहित कर्माचाही त्याग करील तर तो पतित होतो. पण देवर्षि नारद ज्याचे वर्णन करतात तो पतित तर होतच नाही तर 'अविच्छिन्नानुरागं लभते' अविच्छिन्न अखंड भगवदनुरागाचा त्याला लाभ होतो. येथे 'लभते' हे क्रियापद सहेतुक वाटते. जे अनुकूल प्राप्त झाले त्यास लाभ म्हटले जाते. प्रतिकूल प्राप्तीस लाभ म्हटले जात नाही. भगवद्विषयक अविच्छिन्न अनुराग प्राप्त होणे महद्भाग्याचे लक्षण आहे. येथे केवळ भक्ती असा शब्द वापरला नाही तर 'अविच्छिन्न अनुराग' म्हटले आहे. भक्ती हा शब्द व्यापक आहे. सकाम-निष्काम, व्यभिचारी-अव्यभिचारी, सात्विक-राजस-तामस, असे प्रकार भक्तीत संभवतात. पण अविच्छिन्न अनुराग हा केवळ एक प्रकारचाच असतो. त्यात व्यभिचार नसतो. मागे 'परमप्रेमरूपा' असे जे भक्तिलक्षण सांगितले आहे त्यासच अविच्छिन्न अनुराग म्हटले जाते, या विषयाचा विशेष विचार पुढे चोपन्नाव्या सूत्रात येणारच आहे. प्रेमाचे महत्त्वाचे लक्षण सहा प्रकारची विशेषणे देऊन त्या सूत्रात सांगितले आहे. त्या सूत्राचे व्याख्यानात विशेष विचार होईल. अविच्छिन्न अनुराग ही प्रेमाची पराकाष्ठा आहे. अशी भक्ती फलरूपा असल्याने या अवस्थेत प्राप्त झालेला प्रेमी स्वयंतृप्त असतो. त्याला काही प्राप्तव्य अवशिष्ट रहात नाही. येथे 'वेदानपि संन्यसति' म्हटले आहे. याचा अर्थ हा त्याग तिरस्कारमूलक नसून तृप्तीमूलक आहे. तो भक्त जाणून-बुजून वेदत्याग करीत नाही तर वेदच तो भक्त पूर्णकाम आहे असे जाणून त्याचेवरील आपले आधिपत्य काढून घेतो. 'तत्रवेदा अवेदाभवन्ति' असे उपनिषदात म्हटले आहे, तसाच हा प्रकार आहे.
GO TOP
|