नारद भक्तिसूत्रे
सा तु कर्मज्ञानयोगेभ्योऽप्यधिकतरा ॥ २५ ॥
अर्थ : ती (भक्ती) तर कर्म, ज्ञान व योगापेक्षाही श्रेष्ठतर आहे.
विवरण : आतापावेतो ज्या भक्तीचे परमप्रेमरूपा, अमृतरूपा, अकामयमाना इत्यादी विशेषरूपाने वर्णन केले आहे, ती भक्ती सामान्य नाही, तर कर्म, योग व ज्ञान या सर्व साधनापेक्षा श्रेष्ठ आहे हे या सूत्रात स्पष्ट सांगितले आहे.
मानवाच्या उद्धाराकरिता शास्त्रादिकातून जी साधने सांगितली जातात त्याचे अधिकारपरत्वे तीन विभाग पडतात. कर्म, ज्ञान व योग. कोणास त्यापैकी कर्ममार्ग श्रेष्ठ वाटतो. येथे कर्म म्हणजे ज्याच्या त्याच्या वर्ण-आश्रमादिकांस जे विहित कर्म वेदात सांगितले आहे ते भगवद्गीता, स्मृति इत्यादिकातून त्याचे स्वरूप विस्ताराने सांगितले आहे. त्याचे चार प्रकार आहेत. नित्य-नैमित्तिक, काम्य व निषिद्ध संध्या, वैश्वदेव, पंचमहायज्ञादी नित्यकर्मे ती रोज योग्य रीतीने केलीच पाहिजेत, न केली तर प्रत्यवाय आहे. श्राद्धे, अग्निहोत्रातील दृष्टी, ग्रहणादिकांतील कर्तव्ये ही नैमित्तिक कर्मे होत. इहपर भोगप्राप्त्यर्थ पुत्रकामेष्टी इत्यादी काम्यकर्मे होत, व वेदात ज्याचा करू नये असा निषेध सांगितला आहे, अशी सुरापान, अविधीहिंसा, मांसभक्षणादी निषिद्ध कर्मे होत. ती केली असता पाप निर्माण होते, या निषिद्ध कर्माचा विचार करण्याचे कारण त्याकडे मनुष्याची विकारामुळे सहज प्रवृत्ती असते, त्यात तामस सुखाचा भोग मिळतो, जरी परिणामी तो घातक असतो, तरी प्रारंभात सुख प्रतीत झाल्यामुळे अज्ञानी, अविवेकी पुरुषाची त्या निषिद्ध कर्मात प्रवृत्ती झालेली दिसून येते. अशी निषिद्ध कर्मे अनेक प्रकारची असून मनुष्यास त्यापासून वाचवण्याकरिता त्याचा विचार वेदामध्ये केला जातो.
वेदे न करिता प्रेरणा । विषयावरी सहज वासना ।
स्वभावे सकळ जना । सदा जाण सर्वासी ॥
मांससेवना मद्यपाना । मिथुनीभूत मैथुना ।
ये अर्थी सर्वजना । तीव्र वासना सर्वदा ॥
तेथे सेव्यासेव्य परवडी । विवंचना कोण निवडी ।
लागली विषयाची गोडी । ते अनर्थ कोंडी करतील ॥
हे विषयाचे त्रिविध विदान । मैथुन मांस भक्षण सुरापान ।
यदर्थी निवृत्तीच प्रमाण । हे मनोगत पूर्ण वेदाचे ॥
विषयापासूनि निवृत्ति । वेद विभागे हेचि द्योती ।
परी धरावी विषयासक्ती । वेदोक्तीसर्वथा न घडे ॥ नाथभागवत, ५. २०८ - ४०
कर्म चतुर्विध येथ । नित्य आणि नैमित्त ।
काम्य आणि प्रायश्चित्त । जाण निश्चित विभाग ॥
नित्य आणि नैमित्तिक । हे कर्म जाण आवश्यक ।
सांडोनिया फळाभिलाख । विधिप्रमुख आचरावे ॥
काम्य कर्म आवश्यक । त्यजावेगा निःशेख ।
जेवी का वमिले वमक । परतोनि लोक न पाहती ॥ नाथभागवत अ. १०. ४७ - ५२
असे हे कर्माचे विविध प्रकार आहेत. त्यात देश, काल, वय, अवस्था, वर्ण, आश्रम, अधिकार अशा विविध अडचणी असतात. केवळ प्रथम आचमन करावयाचे असते, त्यात पाणी आचमनास किती घ्यावे एथपासून विधी सांगितले आहेत. श्रीनाथमहाराज सांगतात -
कर्मी आचमन करावे । तेथ माष मात्र जळ घ्यावे ।
न्यूनाधिकत्वासवे । दोष पावे सुरापानसम ॥ ६ - ९८
या कर्मातच मंत्रविद्या, यज्ञ, दान, तप इत्यादी साधनांचा अंतर्भाव होतो, यात किती विघ्ने निर्माण होतात व ही साधने कडेला जाणे किती अवघड आहे, याचे विवेचन श्रीनाथमहाराज करतात -
मंत्रविद्याग्रहण । विकळ उच्चारिता वर्ण ।
शुद्धी नव्हे परी दारुण । पातक पूर्ण अंगी वाजे ॥
करिता शास्त्र-श्रवण । चौगुणा गर्व चढे पूर्ण ।
तो ज्ञातेपणाचा अभिमान । न निगे जाण चतुर्मुखा ॥
करिता वेदाध्ययन । विस्वर गेलिया उच्चारण ।
शुद्धी नव्हेचि परी मरण । अवश्य जाण वृत्रासुरा ऐसे ॥
दान देता नृग बहुवस । कृपी झाला कृकलास ।
प्राप्ती दूरी परी नाश । असमसाहस रोकडा ॥
तप करिता ऋष्यश्रृंगासी । तो वश झाला वेश्यासी ।
श्रद्धा श्रवणाचिया ऐशी । शुद्धी आणिकासी पै नाही ॥
कर्म करावे यथानिनुती । तव त्या कर्माची गहन गती ।
प्राचीन बर्ह्याची कर्म स्थिती । नारदोक्ती सांडविली ॥ नाथभागवत ६. ९२ - ७ r>
सर्व देव श्रीकृष्णनिर्वाणसमयी तेथे उपस्थित झाले, त्यांनी श्रीकृष्णाची जी प्रार्थना अनेक प्रकारे संबोधने देऊन केली त्या प्रसंगी ते म्हणतात -
एवं दुष्ट हृदय ज्यासीं । तपादिक साधनें त्यासीं ।
शुद्धि नव्हे हृषीकेशी । श्रवणें कीर्तीसी नायकतां ॥ ९९ ॥ अ. ६
तात्पर्य, कर्माचे आचरण करीत असता अनेक प्रत्यवाय निर्माण होत असतात, श्रीतुकाराम महाराज स्पष्ट सांगतात -
कर्म धर्म नव्हती सांग । उण्या अंगें पतन ॥
भक्तीमध्ये अशा अडचणी नसतात. तेथे देश, काल, जाती, आश्रम, वर्ण, व्यक्ती अधिकाराचा प्रश्नच नाही. काही विघ्ने आल्यास भगवानच ती सर्व विघ्ने दूर करीत असतो.
तसाच ज्ञानमार्ग हाही श्रेष्ठ असा वेद, उपनिषदे, सूत्रादी ग्रंथातून सांगितला आहे. विना ज्ञानाचा मोक्ष प्राप्त होतच नाही असा उपनिषदाचा सिद्धान्त आहे, 'तमेव विदित्वा अतिमृत्युमेति । नान्यः पथा विद्यतेऽयनाय' त्या परब्रह्माला अपरोक्ष स्वरूपाने जाणूनच मुमुक्षू मृत्यूचे उल्लंघन करून जातो, मोक्षाकरिता दुसरा मार्गच नाही, असा वरील वचनाचा अर्थ आहे. कर्म-उपासनादिकांचा अज्ञानाशी विरोध नाही, म्हणून ती अज्ञान दूर करून मोक्ष प्राप्त करून देऊ शकत नाहीत. ज्ञानाचा म्हणजे आत्मज्ञानाचाच अज्ञानाशी विरोध आहे, म्हणून अज्ञानमूलक संसारबंधाची निवृत्ती होऊन मोक्ष प्राप्त होतो, असा वेदान्तशास्त्राचा सिद्धान्त आहे. भगवद्गीतेमध्येही ज्ञानाचे महात्म्य पुष्कळ सांगितले आहे. पण त्या ज्ञानाचे फळ प्राप्त होण्यास अगोदर साधनचतुष्टय सिद्ध झाले पाहिजेत. नित्यानित्यविवेक, इहामुत्रफलभोगबिराग, शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान, तीव्र मुमुक्षुत्व ह्याना साधनचतुष्टय म्हणतात, ही साधने सिद्ध होणे फार कठीण आहे. यानंतर मग श्रीगुरुशरणागती, योग्य ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय गुरूंची भेट होणेही सोपे नाही. मग महावाक्याचे श्रवण, मनन, निदिध्यासन व मग साक्षात्कार. श्रवणाने प्रमाण प्रमेय असंभावनादिकांची निवृत्ती होऊन साक्षात्कार होणेही कित्येकदा कठीण जाते. कारण वर्तमान प्रतिबंध विषयासक्ती, प्रज्ञामान्द्य, विपर्यय (विपरीत ज्ञान) दुराग्रह इत्यादी आडवे येतात, कदाचित भूतप्रतिबंध, आगामी प्रतिबंधही आडवे येतात. ते ज्ञानोत्पत्तीस अडथळे आणतात. त्यातही महावाक्य श्रवणाचा अधिकार संस्कारवान त्रैवर्णिकांनाच कोठे कोठे सांगितला आहे. इतकेच नव्हे तर 'संन्यस्य श्रवण कुर्यात' असा संन्यास आश्रमीयांनाच श्रवणाचा अधिकार आहे व संन्यास आश्रमात फक्त ब्राह्मणच अधिकारी होतो असे म्हटले जाते. म्हणजे अन्याना श्रवणाचा अधिकारच नाही, मग ज्ञान कोठले ? म्हणजे ज्ञानमार्गात फार अडथळे आहेत. अव्योक्तोपासकांना -
तयामहेंद्रादिपदे । करिताति वटवधे ।
ऋद्धिसिद्धींचीं द्वंद्वें । पडोनि ठाती ॥ ज्ञानेश्वरी १२ - ६१
अशी विघ्ने येतात. महेंद्रादिपदे वाटमारेपणा करीत असून ऋद्धिसिद्धीपासून प्राप्त होणारी सुखदुःखादी द्वंद्वे ब्रह्मप्राप्तीच्या आड पडून राहतात, असे श्रीज्ञानेश्वरमहाराजानीही सांगितले आहे. तसेच वेदान्तश्रवण, निर्गुणध्यान या साधनातही लय, विक्षेप, कषाय, रसास्वाद हे अंतराय निर्माण होतात असे वर्णन आहे.
श्रवणी ध्यानी अंतराय । लय विक्षेप कषाय ।
का रसास्वादुही होय । हे चारी अपाय चुकवावे ॥ ए. भा. ११. ७०६
म्हणजे ज्ञानमार्गात किती विघ्ने, संकटे, काठिण्य असते व तो सर्वांकरिता नाही.
आता योगमार्गाचा विचार केला तर तो फारच अवघड म्हणून सांगितला गेला आहे. श्रीकृष्ण उद्धवास सांगतात -
अष्टांग योगी दुर्जयो पवन । सर्वथा साधेना जाण ।
साधला तरी नागवण । अनिवार जाण सिद्धीची ॥ ए. भा. १२ - ४७
योगसाधनाचा आरंभ यमनियमापासून होतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशा आठ अंगानी योग साध्य होत असतो. या प्रत्येकाचे प्रकार अनेकविध आहेत तसेच याही मार्गांत अनेक प्रतिबंध निर्माण होतात. त्याचे प्रकार योगशास्त्रात सांगितले आहेत.
व्याधिस्त्यानसंशयप्रमादालस्याविरतिभ्रान्तिदर्शनालब्ध ।
भूमिकत्वानवस्थितत्वानि चित्तविक्षेपास्तेऽन्तरायाः ॥
पातंजल योगशास्त्र १ - ३०
'व्याधी म्हणजे वातकफपित्तादी प्रकोपाने उत्पन्न होणारे ज्वरादी रोग, 'स्त्यान' म्हणजे योगानुष्ठान करण्यास चित्ताचे सामर्थ्य नसणे, संशय, प्रमाद, आलस्य, वैराग्य नसणे, विपरीत ज्ञान, अभ्यास करूनही योगमार्गातील भूमिकांची प्राप्ती न होणे, कदाचित एखादी भूमिका प्राप्त झाली तरी तेथे चित्त अखंड स्थिर न राहणे असे नऊ चित्तविक्षेप चित्तास प्रतिबंध करणारे आहेत. शिवाय दुःख, इच्छेचा भंग झाल्याने चित्त चंचल होणे, कफ, श्वास-प्रश्वासात दोष हे त्या विक्षेपाबरोबर होणारे आणखीही काही विकार प्रतिबंधक आहेत. यामुळे योगमार्ग साधणे अशक्य होऊन जाते. म्हणूनच, 'योग-याग विधी येणे नोहे सिद्धी । वायाचि उपाधि दंभ धर्म ॥' असे आपल्या हरिपाठात श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इतर साधनात जे प्रतिबंध वा अडथळे निर्माण होतात, जी विघ्ने निर्माण होतात ती साधकांस स्वसामर्थ्याने, स्वप्रयत्नाने दूर करावी लागतात. पण भक्तिप्रेमाचे श्रेष्ठत्व असे आहे की तो मार्ग निर्विघ्न आहे. श्रीकृष्ण उद्धवास सांगतात -
एवं निर्विघ्न मजमाजी सरता । मार्ग नाही भक्तिपरता ।
त्रिसत्य सत्य गा सर्वथा । भक्ति तत्त्वता मज पढिये ॥ ए. भा. ११ - १५ - ४७
तसेच कर्म, ज्ञान, योग या मार्गाना भक्तीची अपेक्षा आहे, पण भक्तिमार्ग हा अन्य साधन निरपेक्ष आहे.
इतर साधने व्युत्पत्ति । दूरी सांडूनि परती ।
श्रद्धायुक्त माझी भक्ती । धरिल्या हाती मी लाभे ॥ ए भा. १४ - २६३
तसेच धर्म, तप, विद्या इत्यादिक साधने भक्तिरहित पुरुषाला पावन करीत नाहीत असे श्रीकृष्ण भगवान स्पष्ट सांगतात.
धर्मः सत्यदयोपेतो विद्या वा तपसान्विता ।
मद्भक्त्यापेतमात्मानं न सम्यक् प्रपुनातिहि ॥ भागवत ११ - १४ - २२
'सत्य आणि दया यानी युक्त असलेला धर्म, किंवा तपश्चर्येने युक्त असलेली विद्या मद्भक्तिरहितांना पूर्णत्वाने पुनीत करू शकत नाही.'
माझे भक्तीवीण कर्मधर्म । जाण पा तो केवळ भ्रम ।
चुकले मत्प्राप्तीचे वर्म । तो धर्म अधर्म परिणमे ॥
माझे भक्तीवीण सत्यवादू । तो जाण पा जैसा गर्भाधू ।
प्रतिपदी घडे प्रमादू । अधःपतन बाधू देखेना ॥
भक्तीवीण दयेची थोरी । जेवी पुरुषेवीण सुंदरी ।
ते विधवा सर्व धर्मा बाहेरी । तैसी परी दयेची ॥
माझे भक्तीवीण जे विद्या । ते केवळ जाण पा अविद्या ।
जेवीं वायस नेणती चांदा । तेवी माझ्या निजबोधा नोळखिती ॥
चंदन-भार वाहे खर । परि तो नेणे सुवासाचे सार ।
माझेनि भक्तीवीण विद्याशास्त्र । केवळ भारवाहक ॥
माझे भक्तीवीण जे तप । शरीरशोषणादि अमूप ।
तें पूर्वदृष्टे भोगी पाप । नव्हे सद्रूप तपःक्रिया ॥
माझे भक्तीवीण जे साधन । ते कोशकीटाच्या ऐसे जाण ।
आपण्या आपण बंधन । भक्तिहीन क्रिया ते ॥ ए. भा. १४. २९९ - ३०५
याचे तात्पर्य हे की, कर्म, ज्ञान योगादी साधने भक्तीची अपेक्षा ठेवणारी आहेत. भक्ती ही मात्र स्वतंत्र व अन्यसाधननिरपेक्ष आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात -
तस्मान्मद्भक्तियुक्तस्य योगिनो वै मदात्मनः ।
न ज्ञानं नच वैराग्यं प्रायः श्रेयोभवेदिह ॥ भागवत ११ - २० - ३१
'अनन्यभक्तीने माझ्या ठिकाणी जो एकरूप झाला आहे, अशा भक्ताला ज्ञान आणि वैराग्य यांचे फारसे प्रयोजन राहत नाही.'
करू नेणे कर्माचरण । न साधिता वैराग्य ज्ञान ।
भावे करितां माझें भजन । माझ्या स्वरूपी मन ठेऊनि ॥ ३८७ ॥
तेथ ज्ञान कर्मादिकें जाण । मुख्य वैराग्यही आपण ।
मद्भक्तीसी येती लोटांगण । चरणा शरण पै येती ॥ ३८८ ॥
एवं भक्ति आपुले अंकी जाण । करी ज्ञानादिकाचे लालन ।
परमानंद पाजूनि पूर्ण । करी पालन निजागे ॥ ३९० ॥
ते आतुडल्या माझी भक्ती । ज्ञानदिकें कामारी होती ।
तेचिविखी उपपत्ती । स्वये श्रीपती सांगत ॥ ३९१ ॥
यत्कर्मभिर्यत्तपसा ज्ञानवैराग्यतश्चयत् ।
योगेन दानधर्मेण श्रेयोभिरितरैरपि ॥ ३२ ॥
सर्वं मद्भक्तियोगेन मद्भक्तो लभतेञ्जसा ।
स्वर्गापवर्गंमद्भाम कथं चिद्यदि वाञ्छति ॥ ३३ ॥ भागवत ११ - २०
जे पाविजे स्वधर्म कर्मादरे । जे पाविजे निर्बन्ध तपाचारे ।
जे सांख्यज्ञानविचारे । पाविजे निर्धारे जे वस्तु ॥ ३९२ ॥
जे पाविजे विषयत्यागे । जे पाविजे अष्टांगयोगे ।
जे वाताबुपर्णाशनभोगे । जे दानप्रसंगे पाविजे ॥ ३९३ ॥
जे साधे वेदाध्ययने । जे साधे सत्यवचने ।
जे साधे अनेकी साधने । ते मद्भजने पाविजे ॥ ३९४ ॥
हे न सोशिता साधन साकडे । नुल्लंघिता गिरिकपाटकडे ।
ही सकळ फळे येती दारापुढे । जै माझी आतुडे निजभक्ती ॥ ए. भा. २०. ३८७ - ९५
यावरून भक्ती ही सर्व मार्गापेक्षा 'अधिकतर' कशी आहे, हे कळून येते. महर्षी शांडिल्यांनीही आपल्या भक्तिसूत्रात भगवद्गीतेचा आधार देऊन भक्तीचे श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे.
तदेव कर्मिज्ञानियोगिभ्य आधिक्य शब्दात ॥ १ - २ - १५
कर्मी, ज्ञानी, योगी यांच्यापेक्षा ती प्रेमभक्ती श्रेष्ठ आहे; कारण भगवद्गीतेमध्ये तिच्याकरिता 'अधिक' शब्दाचा प्रयोग केला आहे. ते श्लोक असे आहेत.
तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥ ४६ ॥
योगिनामपि सर्वेषां मद्गतेनाऽन्तराऽऽत्मना ।
श्रद्धावान् भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥ ४७ ॥ गीता ६
'तपस्वी पुरुषापेक्षा योगी श्रेष्ठ, ज्ञान्यापेक्षाही योगी श्रेष्ठ व विहित कर्मानुष्ठान करणार्यापेक्षाही योगी श्रेष्ठ आहे, म्हणून अर्जुना ! तू योगी हो. तसेच सर्व प्रकारच्या योग्यांमध्येही माझ्या स्वरूपी ज्याचा अंतरात्मा प्रविष्ट झाला आहे, व श्रद्धायुक्त जो माझी भक्ती करतो तो सर्व योग्यामध्ये युक्ततम, श्रेष्ठ, आहे, असे मला वाटते.
योगेश्वर भगवान श्रीकृष्णच सर्व मार्गापेक्षा भक्तीचे आधिक्य, श्रेष्ठत्व प्रतिपादन करतो. यापेक्षा अन्य कोणते प्रबल प्रमाण पाहिजे ? पुढे शेवटी एक्यांशीव्या सूत्रात अट्टाहासाने नारदमहर्षी -
त्रिसत्यस्य भक्तिरेव गरीयसी भक्तिरेव गरियसी ॥
भक्तीच श्रेष्ठ आहे, भक्तीच श्रेष्ठ आहे असे सांगतात.
या सूत्रात भक्तीचे जे श्रेष्ठत्व पटवून दिले त्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण सांगण्याकरिता पुढील सूत्राची रचना आहे.
GO TOP
|