॥ सीतोपनिषत् ॥


इच्छाज्ञानक्रियाशक्तित्रयं यद्भावसाधनम् ।
तद्‌ब्रह्मसत्तासामान्यं सीतातत्त्वमुपास्महे ॥
ॐ भद्रं कर्णेभिः श्रुणुयाम देवाः । भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ।
स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाँसस्तनूभिः । व्यशेम देवहितं यदायुः ।
स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः । स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः । स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥


हे अथर्ववेदाचे उपनिषद् असून गद्यपद्यात्मक आहे. या उपनिषदात सीतेच्या स्वरूपाचे तात्त्विक वर्णन आले आहे. देवतांनी प्रजापती ब्रह्माला सीतेच्या रूपाचे वर्णन करण्यास सांगितले तेव्हा प्रजापती म्हणाला, सीता शक्तीस्वरूपा आहे. ती इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, साक्षात् शक्ती या तीन रूपात प्रकट झाली आहे. मूळ प्रकृतीस्वरूपा म्हणून तिला प्रकृती म्हणतात. ॐ कारापासून निर्माण झाली म्हणूनही तिला प्रकृतीस्वरूपा म्हणतात. तीच व्यक्त प्रकृतीला रूप प्रदान करते. ती साक्षात् योगमाया आहे. संपूर्ण जगताचे बीज भगवान विष्णु असून त्याच्या योगमायेचे रूप 'ई'कार आहे. सीता या शब्दाचे स, ई, ता असे तीन वर्ण असून 'स्' हा सत्य, अमृत, चंद्र प्राप्ती सूचक आहे. 'ई'कार सर्व जगाचे बीजस्वरूप आहे. सीता अव्यक्तरूप महामाया आहे. 'ता' मधील 'त्' व्यंजन महालक्ष्मी स्वरूप आहे. ते प्रकाशमय व सृष्टीचा विस्तार करणार्‍या शक्तीपुंजाने भरले आहे. सीता त्रयरूपा मानली आहे. ती तीन स्वरूपे म्हणजे, १) शब्द ब्रह्म स्वरूप - बोध प्रदान करते. २) सगुणरूप - जनकाच्या भूमीत प्रकट झालेले रूप. ३) ईकाररूप - अव्यक्त रूप - या रूपात (योगमायेच्या रूपात) जगाचा विस्तार करते. सीता सर्व जगताचे कल्याण करते. तीच सर्व प्राण्यांची उत्पत्ती, स्थिती, विनाश घडवून आणते. ती सर्ववेदरूपिणी, सर्वांचेच आश्रयस्थान आहे. विश्वरूप आहे. सीतेचे इच्छाशक्ती रूप तीन प्रकारचे आहे. श्रीदेवी, भूदेवी, नीलादेवी रूपाने ती मंगलरूपिणी, प्रभावरूपिणी आणि चंद्र, सूर्य, अग्नी रूपात अत्यंत तेजमयी आहे. ती चंद्ररूपिणी होऊन औषधी वनस्पतीची जोपासना करते. ती अग्निरूप होऊन भूक-तहानेच्या रूपात, वनस्पतींमध्ये शीतोष्णरूपात, लाकडाच्या अंतर्गत आदित्यरूपाने अवस्थित असते. सीतेचे क्रियाशक्ती रूप श्रीहरीच्या मुखातून नादरूपाने प्रकट झाले आहे. सीता शांतीस्वरूप, तेजोमय, कृपास्वरूपा, व्यक्त-अव्यक्ताचे कारण असलेली, निमेष, उन्मेष, उत्पत्ती, स्थिती, विनाश, तिरोधान, अनुग्रह या सर्वांचे सामर्थ्य असलेली आणि अविनाशिनी असल्याने तिला साक्षात् शक्ती म्हणतात. सीतेचे वीर शक्तीरूप चार भुजायुक्त आहे. तिच्या हातात वरमुद्रा आणि दोन कमलपुष्पे आहेत. किरीट व अलंकारांनी ती सजलेली आहे. चार शुभ्र हत्ती रत्नजडित कलशातून अमृतजलाने तिला अभिषेक करतात. सर्व देवता चारी बाजूला उभ्या असून प्रत्यक्ष ब्रह्मादिक तिची स्तुती करतात. अणिमादी ऐश्वर्ययुक्त सीतेला कामधेनू वंदन करते. अप्सरा, देवांगना तिची सेवा करतात. वेदशास्त्रे तिची स्तुती गातात. भृगुसारखे महात्मा तिचे पूजन करतात. सूर्य-चंद्ररूप दिव्यांचा प्रकाश तिला उजळून टाकतो. तुम्बरु-नारद तिचे गुणगान गातात. ही महादेवी दिव्य सिंहासनावर अष्टदल कमलावर विराजमान आहे. ही सर्व कार्य-कारणांची विधायक शक्ती आहे.



देवा ह वै प्रजापतिमब्रुवन्का सीता किं रूपमिति । स होवाच प्रजापतिः सा सीतेति । मूलप्रकृतिरूपत्वात्सा सीता प्रकृतिः स्मृता । प्रणवप्रकृतिरूपत्वात्सा सीता प्रकृतिरुच्यते । सीता इति त्रिवर्णात्मा साक्षान्मायामयी भवेत् । विष्णुः प्रपञ्चबीजं च माया ईकार उच्यते । सकारः सत्यममृतं प्राप्तिः सोमश्च कीर्त्यते । तकारस्तारलक्ष्म्या च वैराजः प्रस्तरः स्मृतः ॥ १ ॥


एकदा सर्व देव प्रजापति ब्रह्मदेवाला विचारते झाले कि - "ही सीतादेवी कोण आहे ? तिचे स्वरूप कसे आहे ?" तेव्हां प्रजापति उत्तरले - शक्तिरूप जे ब्रह्मस्वरूप तेच श्रीसीता. मूलप्रकृतिरूप कारणाने तिला 'सीता' म्हणजे 'प्रकृति' असे म्हणतात. प्रणवदेखील प्रकृतिस्वरूप असल्याचे म्हटले जाते आणि म्हणूनही प्रकृतीला 'सीता' असे म्हणतात. 'सीता' नामात्मक रूप तीन वर्णांचे असून ती योगमायास्वरूपा आहे.

संपूर्ण जगत्‌प्रपंचाचे भगवान् विष्णू हे बीज आहे, तर त्यांची (भगवंतांची) माया 'ईकार'रूपा आहे. 'स'कार हा सत्य, अमृत, प्राप्ति (अणिमादिक ऐश्वर्यसिद्धिंपैकी एक) यांचे प्रतिक असून त्यालाच (सकार) चंद्राचा वाचकही म्हटले जाते. दीर्घमात्रायुक्त 'त'कार (= ता) हे प्रकाशमय, महालक्ष्मीचे स्वरूप तसेच विस्तार करणारे तत्त्व यांचे प्रतिक आहे. (१).


ईकाररूपिणी सोमामृतावयवदिव्यालङ्कारस्रङ्‌मौक्तिकाद्याभरणलङ्कृता महामायाऽव्यक्तरूपिणी व्यक्ता भवति । प्रथमा शब्दब्रह्ममयी स्वाध्यायकाले प्रसन्ना उद्भावनकरी सात्मिका द्वितीया भूतले हलाग्रे समुत्पन्ना तृतीया ईकाररूपिणी अव्यक्तस्वरूपा भवतीति सीता इत्युदाहरन्ति । शौनकीये - श्रीरामसान्निध्यवशाज्जगदानन्दकारिणी । उत्पत्तिस्थितिसंहारकारिणी सर्वदेहिनाम् । सीता भगवती ज्ञेया मूलप्रकृतिसंज्ञिता । प्रणवत्वात्प्रकृरिति वदन्ति ब्रह्मवादिन इति । अथातो ब्रह्मजिज्ञासेति च । सा सर्ववेदमयी सर्वदेवमयी सर्वलोकमयी सर्वकीर्तिमयी सर्वधर्ममयी सर्वाधारकार्यकारणमयी महालक्ष्मीर्देवेशस्य भिन्नाभिन्नरूपा चेतनाचेतनात्मिका ब्रह्मस्थावरात्मिका तद्गुणकर्मविभागभेदाच्छरीररूपा देवर्षिमनुष्यगन्धर्वरूपा असुरराक्षसभूतप्रेतपिशाचभूतादिभूतशरीररूपा भूतेन्द्रियमनःप्राणरूपेति च विज्ञायते ॥ २ ॥


महामायेचे अव्यक्तरूपास 'ईकार-रूपिणी' म्हणतात. ती व्यक्तरूप (मूर्तरूप) घेते तेव्हां चंद्राप्रमाणे, अमृतमय, दिव्य अलंकार आणि माला यांसहित व्यक्त होते. या महामायेची तीन रूपे विख्यात आहेत. प्रथम स्वरूप म्हणजे 'शब्दब्रह्ममयी' रूप, म्हणजेच बुद्धिस्वरूप. साधनकाली साधकावर जेव्हां ती प्रसन्न होते तेव्हां त्याला 'बोध' प्राप्ति होते. दुसरे व्यक्तस्वरूप हे सीरध्वज जनकराजास यज्ञभूमीत प्राप्त झालेले मूर्तस्वरूप. महामाय तिसर्‍या स्वरूपात अव्यक्तरूपिणी 'ई'कार स्वरूपातच असते. या तिन्ही रूपांना मिळून "सीता" ही संज्ञा आहे.

शौनकीय तत्त्वाप्रमाणे व्यक्त केलेला भाव असा - श्रीसीतेचे श्रीरामाशी नित्य-सान्निध्य असल्यामुळे ती जगदानंदकारिणी आहे. तीच सर्व शरीरधारी प्राण्यांची उत्पत्ति, स्थिति व लय घडवीत असते. तिलाच मूलप्रकृतिरूपा षडैश्वर्यसंपन्ना भगवती असे जाणले पाहिजे. प्रणवस्वरूपा असल्यामुळे ब्रह्मवादी विद्वान तिला ‘प्रकृति’ म्हणतात. ब्रह्मसूत्रातील प्रथम सूत्र ‘अथातो ब्रह्मजिज्ञासा’ यांत प्रकृतीचेच प्रतिपादन आहे.

ती श्रीसीता म्हणजे - सर्ववेदमयी, सर्वदेवमयी सर्वलोकमयी, सर्वकीर्तिमयी, सर्वधर्ममयी, सर्वांचा आधार असलेली, कार्य व कारणरूपा, चेतन व जडस्वरूपा, ब्रह्मदेवापासून स्थावर-जंगमात्मक पदार्थांची आत्मभूता, जड-चेतन पदार्थांच्या गुण व कर्म भेदरूपाने, शरीररूपाने नटलेली, देवता, ऋषी व मनुष्य, तसेच गंधर्व, असुर, राक्षस, भूत प्रेत, पिशाच्च प्रभृति प्राणीमात्रांची शरीररूपा, पंचमहाभूते, दहा इंद्रिये, मन व प्राणरूप अर्थात् समस्त विश्वरूप धारण केलेली अशी महालक्ष्मी असून ती देवतांचे आराध्य जे भगवान, त्यांच्याशी भिन्न व अभेद स्वरूप असलेली अशी मानली जाते. (२)


सा देवी त्रिविधा भवति - शक्त्यासनेच्छाशक्तिः क्रियाशक्तिः साक्षाच्छक्तिरिति । इच्छाशक्तिस्त्रिविधा भवति । श्रीभूमिनीलात्मिका भद्ररूपिणी प्रभावरूपिणी सोमसूर्याग्निरूपा भवति । सोमात्मिका ओषधीनां प्रभवति कल्पवृक्षपुष्पफललतागुल्मात्मिका औषधभेषजात्मिका अमृतरूपा देवानां महत्स्तोमफलप्रदा अमृतेन तृप्तिं जनयन्ती देवानामन्नेन पशूनां तृणेन तत्तज्जीवानां सूर्यादिसकलभुवनप्रकाशिनी दिवा च रात्रिः कालकलानिमेषमारभ्य घटिकाष्टयामदिवसरात्रिभेदेन पक्षमासर्त्वयनसंवत्सरभेदेन मनुष्याणां शतायुःकल्पनया प्रकाशमाना चिरक्षिप्रव्यपदेशेन निमेषमारभ्य परार्धपर्यन्तं कालचक्रं जगच्चक्रमित्यादिप्रकारेण चक्रवत्परिवर्तमानाः सर्वस्यैतस्यैव कालस्य विभागविशेषाः प्रकाशरूपाः कालरूपा भवन्ति । अग्निरूपा अन्नपानादिप्राणिनां क्षुत्तृष्णात्मिका देवानां मुखरूपा वनौषधीनां शीतोष्णरूपा काष्ठेष्वन्तर्बहिश्च नित्यानित्यरूपा भवति ॥ ३ ॥


श्रीसीता शक्तिस्वरूपा, म्हणजे शक्तिशासनरूपा असल्याने इच्छाशक्ति, क्रियाशक्ति व केवळ शक्ति या रूपात प्रकट होते. इच्छाशक्तिमय तिचे स्वरूपही त्रिविध प्रकारचे आहे. श्रीदेवी, बूदेवी व नीलादेवी या रूपांत ती कल्याणरूप, प्रभावरूप तसेच चंद्र, सूर्य, अग्नि, विद्युत रूपात प्रकट होते. चंद्रस्वर्पाने ती औषधी व वनस्पतींचे पोषण करते. कल्पवृक्ष, फुले, फळे, लता, वेली व दिव्य औषदींची स्वरूपभूता होते, तसे अमृतरूपी चंद्र बनून देवदेवतांसाठी ’महस्तोम’ नामक यज्ञाचे फळ देणारी बनते. अमृतरूपाने देवतांचे, धान्यरूपी अन्न बनून प्राणीमात्रांचे व तृणरूप धारण करून इतर क्षुद्र जीवांचे अन्न बनून सर्वच प्राणीमात्रांना तृप्त करते.

श्रीसीता सूर्यादि सर्व लोक व भुवनें यांना प्रकाशित करणारी आहे. दिवस, रात्र, निमेष इ. कालमापन; तसेच अष्टप्रहर, दिवस-रात्र भेदाने, पक्ष, मास, अयन, संवत्सर इत्यादि भेदाने मनुष्यमात्राचे शतवर्षांचे आयुष्य या कल्पनेने स्वतःच प्रकाशित होते. पार काय लघुमापाने निमेषादि रूपे व दीर्घमापाने वर्षे, युगे या कालचक्र प्रकाराने कालरूपा स्वरूप प्रकाशित होते/व्यक्त होते.

प्राणीमात्रांसाठी अग्निरूप धारण करून अन्न व जलपानाद्वारे त्यांच्या क्षुधा व तृषा याम्ची तृप्ती करते. देवतांसाठी मुखरूपाने, वनौषधींसाठी शीतोष्णरूपे, काष्ठामध्ये अग्नितत्त्व वा प्रज्ज्वलित अग्निरूपाने स्थित असते. (३)


रीदेवी त्रिविधं रूपं कृत्वा भगवत्सङ्कल्पानुगुण्येन लोकरक्षणार्थं रूपं धारयति । श्रीरिति लक्ष्मीरिति लक्ष्यमाणा भवतीति विज्ञायते । भूदेवी ससागरांभःसप्तद्वीपा वसुन्धरा भूरादिचतुर्दशभुवनानामाधाराधेया प्रणवात्मिका भवति । नीला च मुखविद्युन्मालिनी सर्वौषधीनां सर्वप्राणिनां पोषणार्थं सर्वरूपा भवति । समस्तभुवनस्याधोभागे जलाकारात्मिका मण्डूकमयेति भुवनाधारेति विज्ञायते ॥ क्रियाशक्तिस्वरूपं हरेर्मुखान्नादः । तन्नादाद्‌बिन्दुः । बिन्दोरोङ्कारः । ओङ्कारात्परतो राम वैखानसपर्वतः । तत्पर्वते कर्मज्ञानमयीभिर्बहुशाखा भवन्ति ॥ ४ ॥


श्रीसीता आपल्या देवीरूपाने भगवंताच्या संकल्पानुसार तीन रूपें धारण करून व्यक्त होते. समुद्र वलयांकित पृथ्वीरूपें तसेच भूः भुवः इत्यादि चौदा भुवनांचे आधारभूत प्रणवरूपाने व्यक्त होते. विद्युतरूपे नीलादेवी देखील औषधी व प्राणीमात्रांच्या पोषणार्थ सर्व प्रकारे व्यक्त होते.

श्रीसीता क्रियाशक्तिरूपे परमात्म्याच्या मुखाने नादरूपाने प्रकट होते. त्या नादांतून बिंदु प्रकट झाला. बिंदुमधून ॐकार आविर्भूत झाला. ॐकाराच्या पलिकडे रामवैखानस नामक पर्वत आहे. त्या पर्वताच्या कर्म व ज्ञानरूपी अनेकानेक शाखा आहेत. त्या पर्वतावर वेदत्रयीरूप आदिशास्त्र स्थित आहे. तात्पर्य श्रीराम-वैखानस पर्वत नित्य वेदस्वरूप आहे, आणि लोकांत तोच वेदांच्यारूपें व्यक्त होतो. (४)


तत्र त्रयीमयं शास्त्रमाद्यं सर्वार्थदर्शनम् । ऋग्यजुःसामरूपत्वात्त्रयीति परिकीर्तिता । कार्यसिद्धेन चतुर्धा परिकीर्तिता । ऋचो यजूंषि सामानि अथर्वाङ्गिरसस्तथा । चातुर्होत्रप्रधानत्वाल्लिङ्गादित्रितयं त्रयी । अथर्वाङ्गिरसं रूपं सामऋग्यजुरात्मकम् । तथा दिशन्त्याभिचारसामान्येन पृथक्पृथक् । एकविंशतिशाखायामृग्वेदः परिकीर्तितः । शतं च नवशाखासु यजुषामेव जन्मनाम् । साम्नः सहस्रशाखाः स्युः पञ्चशाखा अथर्वणः । वैखानसमतस्तस्मिन्नादौ प्रत्यक्षदर्शनम् । स्मर्यते मुनिभिर्नित्यं वैखानसमतः परम् । कल्पो व्याकरणं शिक्षा निरुक्तं ज्योतिषं छन्द एतानि षडङ्गानि ॥ ५ ॥


आदिशास्त्र म्हणजे प्रार्थनास्वरूप ऋक् मंत्र, यज्ञाचे विधीरूप यजुमंत्र व स्तुतिरूप सामगानाचे मंत्र - हे तिन्ही म्हणजे त्रयी असे म्हणतात. पण कार्य सिद्धीसाठी त्याचे चार विभाग करून चार नांवाने संबोधन करतात ते असे - ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद. यज्ञकर्मासाठी ब्रह्मा, होता, अध्वर्यु व उद्‌गाता असे चार ऋत्विज लागतात.

चार वेदांच्या अनेक शाखा आहेत. ऋग्वेदाच्या एकवीस शाखा मानतात. यजुर्वेदाच्या एकशे नऊ, सामवेदाच्या एक हजार तर अथर्ववेदाच्या पांच शाखा मानल्या गेल्या आहेत. कल्प, व्याकरण, शिक्षा, निरुक्त, ज्योतिष व छंद या सहांना वेदांग म्हणतात. अयन, मीमांसा व न्यायशास्त्राचा विस्तार यांना वेदांची उपांगे म्हणतात. वेदांच्या यथार्थ ज्ञानासाठी वेदांग व उपांगे फार उपयुक्त होतात. (५)


उपाङ्‌गमयनं चैव मीमांसान्यायविस्तरः । धर्मज्ञसेवितार्थं च वेदवेदोऽधिकं तथा । निबन्धाः सर्वशाखा च समयाचारसङ्गतिः । धर्मशास्त्रं महर्षिणामन्तःकरणसम्भृतम् । इतिहासपुराणाख्यमुपाङ्गं च प्रकीर्तितम् । वास्तुवेदो धनुर्वेदो गान्धर्वश्च तथा मुने । आयुर्वेदश्च पञ्चैते उपवेदाः प्रकीर्तिताः । दण्डो नीतिश्च वार्ता च विद्या वायुजयः परः । एकविंशतिभेदोऽयं स्वप्रकाशः प्रकीर्तितः । वैखानसऋषेः पूर्वं विष्णोर्वाणी समुद्भवेत् । त्रयीरूपेण सङ्कल्प्य इत्थं देही विजृम्भते । संख्यारूपेण सङ्‍कल्प्य वैखानसऋषेः पुरा । उदितो यादृशः पूर्वं तादृशं शृणु मेऽखिलम् । शश्वद्‌ब्रह्ममयं रूपं क्रियाशक्तिरुदाहृता । साक्षाच्छक्तिर्भगवतः स्मरणमात्ररूपाविर्भावप्रादुर्भावात्मिका निग्रहानुग्रहरूपा शान्तितेजोरूपा व्यक्ताव्यक्तकारणचरणसमग्रावयवमुखवर्णभेदाभेदरूपा भगवत्सहचारिणी अनपायिनी अनवरतसहाश्रयिणी उदितानुदिताकारा निमेषोन्मेषसृष्टिस्थितिसंहार तिरोधानानुग्रहादि सर्वशक्तिसामर्थ्यात्साक्षाच्छक्तिरिति गीयते ॥ ६ ॥


अयन, मीमांसा व न्यायशास्त्राचा विस्तार यांना वेदांची उपांगे म्हणतात. वेदांच्या यथार्थ ज्ञानासाठी वेदांग व उपांगे फार उपयुक्त होतात.

महर्षि-मुनिगण यांनी इतिहास व पुराणें, वास्तुवेद, धनुर्वेद, गांधर्ववेद व आयुर्वेद यांना उपवेद म्हटले आहे. याबरोबरच दण्ड (=शासन), नीति, अर्थशास्त्र व परतत्त्वामध्ये प्राणजय करणें - असे एकविस प्रकारए स्वप्रकाशित होणारे "शास्त्र" आहे.

फार पूर्वी वैखानस नामक ऋषिच्या हृदयांत भगवान् विष्णूंची वाणी प्रकट झाली. त्या वाणीलाच वेदत्रयी कल्पून सर्व देहधारी आपला उत्कर्ष करून घेतात.

ब्रह्मदेव पुढे सांगतात - वैखानस ऋषिने आपल्या हृदयांत उमटलेल्या भगवंताच्या वाणीला संख्यारूपे संकल्प करून ज्याप्रकारे प्रकट केले ते आता तुम्हाला सांगतो. जिला सनातन ब्रह्ममय रूपधारिणी क्रियाशक्ति म्हणतात ती भगवंताची साक्षात् शक्ति होय. भगवंताच्या संकल्पमात्रें ती जगत्‍रूप धारण करून दृश्य जगत्‌रूपाने व्यक्त होते. तीच शसनरूप व कृपारूप धारण करते. तीच शांतिरूप व तेजोरूप (=उग्ररूप) धारण करते. तीच व्यक्त प्राणीमात्र व अव्यक्त देवता यांची कारणभूत असून त्यांचे अवयव (शरीर), वर्ण इत्यादि भेदरूपाने प्रकट होते. सदा भगवंताच्या सान्निध राहून ती अविनाशी अशी आहे. तीच निमेष-उन्मेष, सृष्टि, स्थिति, संहार, तिरोधान, अनुग्रह अशा अनेक सामर्थ्यांनी युक्त असल्याकारणाने तिला साक्षात् शक्तिरूपा म्हटले गेले आहे. (६)


इच्छाशक्तिस्त्रिविधा प्रलयावस्थायां विश्रमणार्थं भगवतो दक्षिणवक्षःस्थले श्रीवत्साकृतिर्भूत्वा विश्राम्यतीति सा योगशक्तिः । भोगशक्तिर्भोगरूपा कल्पवृक्षकामधेनुचिन्तामणि शङ्खपद्मनिध्यादिनवनिधिसमाश्रिता भगवदुपासकानां कामनया अकामनया वा भक्तियुक्ता नरं नित्यनैमित्तिककर्मभिरग्निहोत्रादिभिर्वा यमनियमासन प्राणायामप्रत्याहार ध्यानधारणासमाधिभिर्वालमणन्वपि गोपुरप्राकारादिभिर्विमानादिभिः सह भगवद्‌विग्रहार्चापूजोपकरणैरर्चनैः स्नानादिभिर्वा पितृपूजादिभिरन्नपानादिभिर्वा भगवत्प्रीत्यर्थमुक्त्वा सर्वं क्रियते ॥ ७ ॥


श्रीसीतेच्या इच्छाशक्तीचेही तीन रूपे आहेत. प्रलयकाळी विश्राम स्थितीत ती भगवंताच्या उजव्या वक्षःस्थलावर श्रीवत्स आकृति धारण करून विश्राम करते. त्या स्थितीला ’योगशक्ति’ म्हणतात. दुसरी भोगरूप भोगशक्ति. कल्पवृक्ष, कामधेनु, चिंतामणि, शंख, पद्म इत्यादि नऊ ठिकाणी तिचा निवास असतो. भगवद्‌भक्तांच्या कामनेनुसार - म्हणजेच अग्निहोत्रादि कर्में, अष्टांगयोग भजन-पूजन इत्यादि नित्य व नैमित्तिक कर्मानुसार - त्यांना भवने, विमानें, अन्नादि भोज्य पदार्थ, रसादि पिण्यायोग्य पदार्थ - एकून सर्व प्रकारच्या भोग्य पदार्थांची पूर्तता करते. (७)


अथातो वीरशक्तिश्चतुर्भुजाऽभयवरदपद्मधरा किरीटाभरणयुता सर्वदेवैः परिवृता कल्पतरुमूले चतुर्भिर्गजै रत्नघटैरमृतजलैरभिषिच्यमाना सर्वदैवतैर्ब्रह्मादिभिर्वन्द्यमाना अणिमाद्यष्टैश्वर्ययुता संमुखे कामधेनुना स्तूयमाना वेदशास्त्रादिभिः स्तूयमाना जयाद्यप्सरःस्त्रीभिः परिचर्यमाणा आदित्यसोमाभ्यां दीपाभ्यां प्रकाश्यमाना तुम्बुरुनारदादिभिर्गायमाना राकासिनीवालीभ्यां छत्रेण ह्लादिनीमायाभ्यां चामरेण स्वाहास्वधाभ्यां व्यजनेन भृगुपुण्यादिभिरभ्यर्च्यमाना देवी दिव्यसिंहासने पद्मासनरूढा सकलकारणकार्यकरी लक्ष्मीर्देवस्य पृथग्भवनकल्पना । अलंचकार स्थिरा प्रसन्नलोचना सर्वदेवतैः पूज्यमाना वीरलक्ष्मीरिति विज्ञायत इत्युपनिषत् ॥ ८ ॥


तिसरी ती वीररूप शक्ति. हे तिचे चतुर्भुज रूप. दोन भुजा अभय व वरदानासाठी, आणि दोन भुजा कमळ व आयुधें यांच्यासाठी. या रूपांत ती देवांनी घेरलेली, दिव्य आभूषणांनी भूषित झालेली, चार श्वेत हत्तींच्याद्वारे रत्‍नजडीत कलशांतून अमृतजलाने अभिषिक्त होत असलेली व्यक्त होते. या रूपाला ब्रह्मादि सर्व देवता वंदन करतात. आणिमादि अष्ट ऐश्वर्यांनी युक्त असलेली कामधेनु तिची स्तुति करते. देवनारी व अप्सरा तिची सेवा करीत असतात. सूर्य व चंद्र प्रकाश पाडण्याचे काम करतात. तुम्बरु व देवर्षि नारद तिचे गुणगान करीत असतात. राका आणि सिनीवाली नामक देवता यांनी छत्र धरले आहे. ह्लादिनी व माया या दोघी चवर्‍या ढाळीत आहेत. स्वाहा व स्वधा ह्या पंख्याने वारा घालीत आहेत. भृगु आदि महात्मे तिचे पूजन करीत आहेत. अष्टल पद्मांत दिव्य सिंहासनारूढ झालेली ही तिथे बस्न जगत् चालनाची आपली सर्व कर्मे करीत असते. त्या आसनावर स्थित असलेली देवी हेच तिचे वीररूप होय. (८)

या प्रकारे श्रीलक्ष्मीदेवीचे ध्यान करावे.


ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः । भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ।
स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाँसस्तनूभिः । व्यशेम देवहितं यदायुः ।
स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः । स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः । स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
इति सीतोपनिषत्समाप्ता ॥