|
अष्टावक्रगीताप्रकरण १७तत्वज्ञानाचा अधिकार निराकांक्षी माणसाला असतो.
तेन ज्ञानफलं प्राप्तं योगाभ्यासफलं तथा । अनुवाद : - जो पुरुष तृप्त आहे, शुद्ध इंद्रियांचा आहे व सदैव एकांतात रममाण होतो त्यालाच ज्ञान आणि योगाभ्यासाचे फळ प्राप्त होते. विवेचन : - सर्व प्रकारच्या साधनांमुळे ज्ञान-प्राप्तीचे फळाचा लाभ होतो. भक्ति असो वा उपासना, ध्यान असो वा समाधि, योगाभ्यास असो किंवा सांख्य, तंत्र असो किंवा हठयोग सर्वांमुळे होणारा अंतिम लाभ ज्ञान आहे व ज्ञानाचे फळ मुक्ति आहे. परंतु ज्ञान प्राप्ती नंतरसुद्धा जर पुरुष तृप्त झाला नाही, अजूनही त्याच्या वासना जागृत असतील, अजूनही तो उद्विग्न असेल, चिंताग्रस्त असेल तर त्याचा अर्थ एवढाच की ज्ञान मिळून सुद्धा त्याला त्याचा पूर्ण फायदा करून घेता आलेला नाही, ज्ञानाचे फळ त्याला लाभलेलेच नाही. ज्ञान प्राप्त झाल्यावरसुद्धा त्याची इंद्रिये वासनारहित होऊन शुद्ध झालेली नसतील, अजूनही भोगाची लालसा असेल, अजूनही तो पुरुष एकटा राहण्यास घाबरत असेल तर आश्रम मठ बनवून त्यात आपले अनेक शिष्य जमवून त्यांच्यात राहून आपला अहंकार तृप्त करत असेल तर त्याला आत्मज्ञानाचा लाभ झालेला नाही. मुनीश्रेष्ट अष्टवक्र म्हणतात की आत्मज्ञान व योगाभ्यास याद्वारे ज्याने स्व-चैतन्याचा अनुभव घेतला तो आपोआप तृप्त होतो. तृप्तीसाठी त्याला दुसऱ्याकडे जाण्याची आवश्यकताच नाही. तो स्वयंतृप्त आहे, तो वासनारहित शुद्ध इंद्रियांचा मालक होतो व त्याची इंद्रिये वासनाभोगाकडे वळतच नाहीत. जे प्राप्त होते तेवढेच त्याला पुरेसे असते. शरीरासाठी जे आवश्यक आहे, तेवढेच स्वीकारून तो समाधान पावतो तसेच तो एकांतात राहतो, कळपासारखा समूह गोळा करत नाही. दुसर्याकडून कशाचीच अपेक्षा ठेवत नाही. शहरात, समाजात राहूनही तो एकटाच असतो. तो कुणाला सहकारी-सोबती, शत्रु-मित्र, हितचिंतक-हितशत्रु बनवतच नाही. तो कुणाकडून साहाय्य घेत नाही. अशा योगी व आत्मज्ञानी माणसालाच आपल्या ज्ञानाचे फळ प्राप्त होते. ह्यापेक्षा उलटे व विरूद्ध पद्धतीने वर्तन करणार्याला ज्ञान प्राप्त होऊनसुद्धा त्याचे फळ (मुक्ति) प्राप्त होत नाही. म्हणून आत्मज्ञानी माणसानी एकटे रहावे अन्यथा पुन्हा वासनेच्या चक्रव्यूहात अडकण्याची शक्यता असते.
न कदाचिज्जगत्यस्मिन् तत्त्वज्ञो हन्त खिद्यति । अनुवाद : - या जगात तत्वज्ञानी माणसाला कधी खेद होत नाही. कारण त्याच्याच मुळे हे ब्रह्मांड मंडल पूर्ण आहे. विवेचन : - जोपर्यंत पुरुषाला आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही, तोपर्यंत तो सर्व शरीरांना वेगवेगळे मानतो. ही भिन्नताच दुःखाचे कारण आहे. ' जेंव्हा अलग अलग मन, बुद्धि व शरीराच्या व्यक्ति एकत्र येतात व त्यांच्यात विचारसाम्य निर्माण होत नाही तेव्हां व्यक्तिला फार अस्वस्थ व बेचैन वाटते. प्रत्येक व्यक्तिच्या मानसिक व शारीरीक स्वस्थतेसाठी एका मोकळ्या व पुरेशा मोठ्या जागेची ( लिव्हिंग स्पेसची) गरज असते. घरातसुद्धा कुटुंबातील सदस्यांची संख्या फार मोठी असल्यास माणसात एक प्रकारचे मानसिक आजारीपण निर्माण होते, त्याचा विकास करून घेणे त्याला जमत नाही. मन व डोके एकांतातच शांत राहू शकते. दुसऱ्याच्या उपस्थितीत मानसिक तणाव निर्माण होतो व दुसऱ्यामुळेच अहंकार निर्माण होतो. अहंकाराकरिता गर्दी आवश्यक आहे. एकटा माणूस कुणाला अहंकार दाखविणार ? एकटेपणात अहंकार नाहीसा होतो. दुसऱ्याच्या उपस्थितीत मनुष्य आपल्या नैसर्गिक साधेपणाने वागू शकत नाही. मग तो नैतिकता, संकेत व शिष्टाचार यांचे मुखवटे धारण करतो. म्हणूनच विचारवंत, ध्यानी, कलाकार व शास्त्रज्ञ नेहमी एकांतात राहणे पसंत करतात. दुसऱ्याच्या उपस्थितीत ते बेचैन होतात. त्यामुळे काही जण दुसऱ्याच्या हकालपट्टीसाठी खटाटोप सुरू करतात तर काहीजण जंगलात पळून जातात. परंतु अष्टवक्र स्वामी म्हणतात की, जे तत्वज्ञानी आहेत ते या जगातल्या गर्दीत असूनसुद्धा बेचैन होत नाही किंवा खेद करत नाहीत. कारण त्यांच्या दृष्टीत तर सर्वत्र एकाच आत्म्याचा विस्तार आहे. त्या एका आत्म्यानेच सारे परिपूर्ण झाले आहे. येथे दुसरे कुणीच नाही मग दुःख कशाचे ? कुणीही स्वतःलाच दुःख देत नाही मग खेद कशाचा ? म्हणून आत्मज्ञामी माणसाला या भावनेचा स्पर्श झाल्याने व अनुभव आल्याने तो सदैव चिंता मुक्त रहातो.
न जातु विषयाः केऽपि स्वारामं हर्षयन्त्यमी । अनुवाद : - ज्याप्रमाणे मऊ ताज्या गवताच्या उपलब्धतेमुळे प्रसन्न झालेल्या हत्तीला निंबाची पाने आवडत नाहीत, त्याचप्रमाणे आत्मज्ञानात रममाण झालेल्या व्यक्तिला हे विषय कधी आवडत नाहीत. विवेचन : - विषयांमधे आनंद आहे, त्यापासून सुख मिळते हे खरेच आहे. जर विषयात सुख नसते तर सारे जग वेडे होऊन त्यामागे धावले नसते. या आंधळ्या शर्यतीत मग कुणीच भाग घेतला नसता. दुनियेत सुख आहे, आनंद आहे असा संसारी माणसाला नेहमी अनुभव येतो. म्हणून तर तो त्या सुखासाठी धावाधाव करतो. पण काही अर्धवट ज्ञानी लोकांनी उगाचच दुनियेला दुःखाचे कारण ठरवून तिच्यापासून ह पळून जाण्याचा सल्ला दिला. पण जगापासून दूर पळाल्याने दुःख दूर होत नाही व सुख मिळत नाही. जे होते ते सुद्धा सुटून गेले या विचाराने या लोकांची स्थिती फारच दयनीय होते. सर्व काही सोडून सुद्धा काहीच मिळाले नाही. मानसिक तृप्तीसुद्धा मिळत नाही. जे प्रत्यक्ष हातात आहे ते हातचे सोडून दुसऱ्या काल्पनिक बाबींच्या मागे धावणारा काही विवेकी नसतो. तो मूर्ख असतो. कशाचा तरी त्याग करणे, सोडणे ही काही ज्ञानप्राप्तीची पूर्णशर्त नाही. जर उच्च दर्जाचे ज्ञान प्राप्त झाले तर खालच्या दर्जाचे जीवन आपोआप सुटून जाते. ते सोडावे लागत नाही. अष्टवक्रस्वामी ह्याच सत्याचे निरूपण करण्यासाठी सांगतात की या विषयांपासून सुख मिळते पण ते सुख क्षणभंगुर व तात्पुरते असते. ह्या सुखाच्या प्राप्तीसाठी अनेक अनितीपूर्ण कामे करावी लागतात व त्याचा परिणाम म्हणून दुःखेही भोगावी लागतात. जगात असे कोणतेच सुख नाही की जे पूर्णपणे स्वतंत्र आहे. सुख हे नेहमीच दुःखाशी जोडलेले असते. संयुक्त असते. शिवाय सुख सुद्धा चिरस्थायी नसून तात्पुरते असते. चिरस्थायी, कायम टिकणारे सुख फक्त आत्मानंदाचे आहे. आत्म्याचे सुख स्वतःचेच सुख आहे व शाश्वत टिकणारे आहे. आत्मानंदाच्या सुखात दुःख असत नाही. म्हणून ज्याने आत्मानंदाचे टिकाऊ सुख प्राप्त केले आहे, जो नेहेमी आत्मानंदात बुडून गेला असतो, त्याला ही संसारी सुखे क्षुल्लक व तुच्छ वाटतात. म्हणून तो त्यात कधी स्वारस्य घेत नाही. ज्याप्रमाणे कोवळे गवत पाहून हत्ती हर्षभरीत होतो, त्याप्रमाणे हत्ती काही कडूनिबांची पाने पाहून हर्षभरीत होत नाही. परंतु काही अज्ञानी माणसांनी मात्र उलटे शिकवायला सुरवात केली की पहिल्यांदा, काही तरी सोडावे लागेल. ह्या उलटे शिकवण्यामुळे जग विकृत झाले. जे होते ते सुटले व नवीन काही मिळत नाही. असा उलटा उपदेश म्हणजे जगाला अभिशापच आहे. वरदान नव्हे.
यस्तु भोगेषु भुक्तेषु भवत्यधिवासीत: । अनुवाद : - जो उपभोग घेतल्या विषयांबद्दल मनात वासना ठेवत नाही त्याचप्रमाणे, त्यांची पुन्हा प्राप्तीची इच्छा करत नाही, असा माणूस जगात मिळणे दुर्लभ होय. विवेचन : - अष्टवक्र स्वामींचा सर्व उपदेश हा साधना करू इच्छिणाऱ्यांसाठी नसून ज्ञानप्राप्ती झालेल्यांसाठी आहे. ती साधना सूत्रे नसून आत्मज्ञानी माणसाचा व्यवहार कसा असतो हे सांगणारी ज्ञानी माणसांकरता सांगितलेली सूत्रे आहेत. ही आत्मज्ञानाची कसोटी आहे. साधना-सूत्रे समजून ह्याचा स्विकार केल्यास चूकच होईल - ती एक दिशाभूल होईल. केवळ सर्व गोष्टींचा त्याग केल्याने आत्मज्ञान होत नाही. मुनीश्रेष्ठ अष्टवक्रस्वामी सुद्धा हेच सांगतात की आत्मज्ञान प्राप्ती झालेली माणसे जगात फार दुर्मिळ व फारच थोडे असतात. गीतेमधे सांगितले आहे की, 'हजारो माणसात एखादाच अन्तःकरण शुद्धीसाठी प्रयत्न करतो व त्यापैकी एखादाच दुर्मिळ माणूस आत्मज्ञान प्राप्त करू शकतो.' ज्या विषयांचा उपभोग घेतला त्याबद्दल आत्मज्ञानी माणूस वासना ठेवत नाही कारण तो त्याच्या आठवणीतून मुक्त होतो. जर त्याची वासना कायम असेल तर त्याचा अर्थ असा की त्याला आत्मानंद प्राप्त झालेला नसून विषयांतील आनंदातच त्याला रस आहे. खरा आत्मज्ञानी भोग घेतलेल्या विषयांप्रमाणेच न भोगलेल्या विषयांबद्दलसुद्धा मनात कोणतीही वासना करत नाही कारण अशी वासना, इच्छा त्याला पुन्हा विषयांकडे नेऊ शकते. एवढा संयम व नियंत्रण प्राप्त केलेला आत्मज्ञानी दुर्लभच असतो. तो आत्मा सदैव तुमच असतो.
बुभुक्षुरिह संसारे मुमुक्षुरपि दृश्यते । अनुवाद : - या जगात भोगाची इच्छा असणारे व मोक्षाची इच्छा असणारे असे दोन्ही प्रकारचे पुरुष आढळतात. पण भोग व मोक्ष या दोघांबद्दल निराकांक्षी असणारा (आकांक्षा नसणारा) माणूस दुर्मिळच. विवेचन : - जेंव्हा चित्तातील सर्व इच्छा शांत होतात तेव्हांच चित्त शांत होते. वासनेमुळेच मनात तरंग निर्माण होतात. ही तरंगरूपी अशांतता मोक्षमार्गातली अडचण आहे. हे तरंग, ह्या लाटा विषयवासनेमुळे निर्माण झाले तर मोक्षमार्गात बाधा आहेत व खुद्द मोक्षाच्याच इच्छेमुळे निर्माण झाल्या तरी सुद्धा बाधा आहेत. जो मोक्षाची इच्छा बाळगतो, त्यासाठी चिंताग्रस्त राहतो, मोक्षासाठी प्रयत्न करतो त्याचे मन अशांतच राहते. ही अशांती मोक्षाला बाधक असते. संसारी माणूस नेहमीच आशाआकांक्षा-वासना-इच्छा यातच रमलेला असतो. कधी त्याला भोगाची इच्छा होते तर कधी मोक्षाची. परंतु त्याला हे रहस्यच माहित नसते की अशी इच्छा हीच मोक्षमार्गातली बाधा आहे. सर्व साधु-संत संसाराचा त्याग करण्याचा उपदेश करतात. खाणे-पिणे सोडण्यास सांगतात, उत्तम वस्त्रे फार काय घर-दार सुद्धा सोडायला सांगतात. दिक्षा देऊन, गंडेदोरे बांधुन शिष्य व साधु तयार करतात. पण हे रहस्य सांगत नाही की संसार नव्हे तर तुमच्या इच्छा ह्याच तुमचे बंधन आहेत. त्यांचा त्याग करणे हीच मुक्ति आहे. म्हणून अष्टवक्रस्वामी सांगतात की भोग आणि मोक्ष या दोघांबद्दल जो निरासक्त आहे, ज्याला दोघांच्याही प्राप्तीची इच्छा नाही असाच माणूस मुक्त आहे, पण एवढा निरासक्त पुरुष दुर्मिळच असतो. केवळ आत्मज्ञानीच ह्या स्थितीला पोहचतो. अज्ञानी तर दोन्हींचीही इच्छा बाळगतो.
धर्मार्थकाममोक्षेसु जिविते मरणे तथा । अनुवाद : - धर्म, अर्थ, काम व मोक्ष याबद्दल तसेच जीवन व मृत्यू याबद्दल सुद्धा उदारचित्त पुरुष स्वीकाराची अथवा त्यागाची इच्छा बाळगत नाहीत. विवेचन : - आत्मज्ञानी माणूस हाच खरा उदारचित्त पुरुष असतो कारण सर्व विश्व म्हणजे एकच आत्मा आहे याची फक्त त्यालाच जाणिव असते. विश्व व आत्मा यात त्याला भिन्नता दिसतच नाही. या उलट अज्ञानी माणसाला सर्वत्र वेगळेपण, भिन्नताच दिसू लागते. जो त्याचा हेतु असतो तो सफल करण्याचीच अज्ञानी माणसाची इच्छा असते. इच्छा व वासना यांत तो पूर्ण बुडलेला असतो. अज्ञानी माणूस सर्व गोष्टी या स्विकारणीय किंवा त्याज्य ह्यापैकी एका गटात घालतो व त्याबद्दल आसक्ति किंवा भय बाळगतो. ह्यामुळे तो मुक्त नाही व उदारचित्तसुद्धा नाही. केवळ आत्मज्ञानी माणूसच धर्म, अर्थ, काम किंवा मोक्ष आणि जीवन व मृत्यू यांना स्वीकारणीयही समजत नाही किंवा त्याज्यही समजत नाही. तो या बाबींना स्वीकार करण्यायोग्य ही समजत नाही व त्याग करण्यायोग्य ही समजत नाही. तो यांची निंदा करत नाही किंवा प्रशंसा सुद्धा करत नाही, तो यांची पूजा करत नाही व त्यांना उपयोगीही समजत नाही. अशी स्थिती प्राप्त केल्यामुळेच आत्मज्ञानी हा जीवन्मुक्त झालेला असतो व अशी स्थिती प्राप्त होणे म्हणजेच मोक्ष मिळणे होय.
वाञ्छा न विश्वविलये न द्वेषस्तस्य च स्थितौ । अनुवाद : - जो पुरुष विश्वाच्या विलयाची (विनाशाची) इच्छा करत नाही किंवा विश्वाच्या स्थितीबद्दल ज्याच्या मनात द्वेष नाही, तो कृतकृत्य झालेला पुरुष जे काही मिळते त्यावर आपली उपजीविका भागवून सुखाने राहतो. विवेचन : - जगातील अनेक व्यक्ति जगाच्या विनाशाच्या कल्पनेने फार चिंताग्रस्त झालेल्या असतात. जणू काही त्यांचे विचार, सिद्धान्त व धारणा यामुळेच सारी सृष्टी जीवंत आहे. जर त्यांनी विचार केला नसता तर जणू सृष्टीचा नाशच होणार होता. अशा व्यक्ती जगाला नेहमी घाबरवतात की सृष्टीचा प्रलयकाळ जवळ आला आहे, विसाव्या शतकाच्या शेवटी प्रलय होईल व नवे युग सुरू होईल; सत्ययुग येईल. अत्याचार वाढत असल्याने परमेश्वर अवातर घेईल व तो दुष्ट व्यक्तिंना दंड देईल. काही लोक जगाच्या आजच्या स्थितीमुळे फार काळजीच पडले आहेत. ते म्हणतात की आजचे जग सर्वात निकृष्ट आहे. आज जेवढ्या चोऱ्या खून, बलात्कार, दरोडे, भ्रष्टाचार, लाचखोरी, शोषण, अनैतिकता, धोकेबाजपणा, दगाबाजी वाढली आहे तेवढी पूर्वी कधीच नव्हती मनुष्याचे सर्वाधिक पतन झाले आहे. व ते जनावरापेक्षा सुद्धा वाईट स्थितीत आहे. स्वामी अष्टवक्र म्हणतात की, ह्या प्रकारच्या वैचारिक धारणा असणाऱ्या व्यक्ति अशांत व दुःखी आहेत. तो ज्ञानी पुरुषच धन्य आहे की जो विश्वाचा विनाशाची इच्छा किंवा काळजी करत नाही व आजच्या स्थिती बद्दलही काळजी करत नाही. कारण तो तर केवळ साक्षी आहे, द्रष्टा आहे. रागद्वेष, आसक्ति-विरक्ति यांच्या पलिकडे गेला आहे. म्हणून तो जास्त प्राप्त करण्याची इच्छा करत नाही व जे काही मिळाले आहे किंवा जेवढे मिळते तेवढ्यावरच तो समाधान मानून त्यातच आपली उपजीविका भागवतो. जे त्याला मिळालेले नाही त्याची तो इच्छा बाळगत नाही व त्यासाठी तो दुःखीसुद्धा होत नाही.
कृतार्थोऽनेन ज्ञानेनेत्येवं गलितधीः कृती । अनुवाद : - हे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे ज्याची बुद्धि (अहंकार) गळून गेला आहे असा कृतकृत्य पुरुष पाहतांना, ऐकतांना, स्पर्श करतांना, वास घेतांना, खातांना सुखाचा अनुभव घेतो. विवेचन : - या संपूर्ण सृष्टीचा आधार एकच आत्मा आहे. या चेतनेपासून सर्वप्रथम बुद्धि निर्माण झाली. बुद्धिपासून अहंकार निर्माण झाला. या अहंकारामुळे जीवाने स्वतःला त्या चैतन्यरूपी आत्म्यापेक्षा वेगळे मानले. हे अज्ञानच त्याचे पाप आहे. बुद्धि व तिच्यातून जन्माला आलेला हा अहंकारच वेगवेगळ्या पापांचे मूळ कारण आहे व आपल्या आत्मस्वरूपाची विस्मृती हेच पाप आहे. ही बुद्धि त्या विराट आत्म्याचा एक छोटासा किरण आहे. आत्मा विशाल महासागर असला तर बुद्धि चमच्याएवढी आहे. बुद्धिचा आवाका लहान आहे. बुद्धिचा हा छोटा तराजू जगातल्या छोट्या मोठ्या कामांसाठी पुरेसा आहे पण त्या विशाल चैतन्याचे मोजमाप त्या छोट्याश्या तराजूने करणे हास्यास्पद आहे. मनुष्य या बुद्धिने परमात्म्याचे मोजमाप करू पाहतो म्हणून तो चुकीला पात्र होतो. बुद्धि नेहमी तर्क-वितर्क, उलट-सुलट विचार, प्रश्न-उत्तर, चिंतन-मनन विश्लेषण करून निर्णय घेते. गणित सोडविल्याप्रमाणे चांगले-वाईट शुभ-अशुभ ह्याचे वर्गीकरण करते. परंतु या गणिती अकलेने त्या विराट शक्तिची ओळख करून घेता येत नाही, त्या समग्र संपूर्णत्वाची प्रचिती येऊ शकत नाही. अस्तित्व अखंड आहे. अविभाज्य आहे, त्याची कल्पनासुद्धा बुद्धिने करता येत नाही. चेतना बुद्धिच्या आवाक्यात व पकडीत येऊच शकत नाही. जे कार्य बुद्धि कधीही करू शकत नाही ते कार्य चेतनाशक्तिमुळे होऊ शकते. उच्चकोटीचे ज्ञान बुद्धितून नव्हे तर चेतनाशक्तितून निर्माण झाले आहे म्हणून त्याला अपौरुषेय म्हणतात. उच्च कोटीचे शास्त्रीय शोध, गणित, आयुर्वेद, उच्च कोटीचे साहित्य, अध्यात्म, वेद, पुराण हे प्रत्यक्ष चेतनाशक्तितूनच निर्माण झाले आहेत. हे बुद्धिचे कार्य नाही. म्हणून सामान्य ज्ञानाला बुद्धि पुरेशी आहे, परंतु आत्मज्ञानात क्षुद्र बुद्धिचे स्थान त्या विराट चेतनाशक्तिला मिळते. म्हणून अष्टवक्र स्वामी म्हणतात की, जो आत्मज्ञान प्राप्त करतो त्याची बुद्धि गळून पडते व तो क्षुद्र अस्तित्वातून बाहेर पडतो व विराट अस्तित्वाशी एकरूप होतो. त्याला सर्व कार्यांचे व पद्धतींचे ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे या क्षुद्र संसारात भ्रमिष्ट न होता, मोहात न अडकता स्वाभाविकपणे कार्य करीत संसाराच्या सर्व व्यवहारांकडे केवळ साक्षीभावाने पहात सुखाने जगतो. चिंता व वासनांच्या जंजाळातून तो मुक्त होतो. जीवन अखंड आहे पण बुद्धिमुळेच माणसाला त्यात भेद दिसू लागतो. बुद्धि गळून पडल्यावर सर्व अस्तित्व त्याला सलग दिसू लागते. हेच अंतिम सत्य आहे, हेच अंतिम ज्ञान आहे. जिथे बुद्धीची हद्द संपते तेथेच चेतनेचा अनुभव येण्यास सुरवात होते.
शून्या दृष्टिर्वृथा चेष्टा विकलानीन्द्रियाणि च । अनुवाद : - ज्या पुरुषाचा संसार-सागर क्षीण झाला आहे, त्या पुरुषाला न कशाची इच्छा ( स्पृहा) आहे, न अनिच्छा ( विरक्ती) आहे. त्याची नजर शून्य ( निर्विकार) झाली आहे, प्रयत्न पूर्णपणे थांबले आहेत, आणि इंद्रिये सुद्धा निष्क्रीय झाली आहेत. विवेचन : - बुद्धिचा अनुभव हा क्षुद्र जगाचा अनुभव असतो. या जगापुरताच बुद्धिचा अनुभव मर्यादित राहतो. परंतु चेतनेचा अनुभव हा विराटाचा अनुभव असतो. क्षुद्रत्वाला त्यजून ह्या विराटाचा अनुभव जो पुरुष घेतो, सर्व समग्राचा एकत्रित अनुभव घेतो त्याचा संसार-सागराचा अनुभव क्षीण होऊन जातो. पहिल्यांदा संसाराचा आवाका सागराप्रमाणे वाटत होता पण ज्ञानप्राप्तीनंतर तोच सागर अत्यंत क्षीण होऊन जातो. ज्याने महासागर पाहिला आहे तो छोट्या छोट्या तलावांकडे कसा आकर्षित होईल ? ज्याने हत्ती पाहिलेला आहे तो आंधळ्याप्रमाणे हत्तीच्या एकेका अवयवालाच हत्ती कसे म्हणू शकेल ? तशी चूक तर आंधळाच करू शकेल. समग्रतेचे दर्शन घेतलेला आत्मज्ञानी संसाराबद्दल अनिच्छा बाळगत नाही व इच्छासुद्धा बाळगत नाही. त्याची जगाकडे बघण्याची दृष्टी जणू शून्य (निर्विकार) होते. असा ज्ञानी पुरुष प्रयत्नही करण्याचे थांबवतो कारण जे सर्वश्रेष्ठ आहे ते ज्ञान प्राप्त झाल्यावर आता प्रयत्न कशासाठी करायचे ? त्याची इंद्रिये सुद्धा निष्क्रीय होतात कारण विषयांबद्दलचे त्याचे आकर्षणच संपलेले असते. श्रेष्ठ आनंदाचा लाभ झाल्यावर क्षुद्र गोष्टींच्या क्षणिक सुखाचे आकर्षण आपोआप संपुष्टात येते. त्यासाठी शपथा खाण्याची गरज उरत नाही.
न जागर्ति न निद्राति नोन्मीलति न मीलति । अनुवाद : - "ज्ञानी पुरुष झोपत नाही व जागत नाही, न पापण्या बंद करतो, न उघडतो. अहो ! मुक्त पुरुषाची कशी परमश्रेष्ठ अवस्था असते." विवेचन : - मुक्त चेतनेचा अनुभव घेतलेला पुरुष त्या विराटाची अनुभूती झाल्यामुळे सांसारिक कामातील वासना, तृष्णा, इच्छा, राग, द्वेष, अहंकार, तृप्ती वगैरे भावनांतून मुक्त होतो. तो कर्मांचा केवळ साक्षी रहातो. अशी व्यक्ति जागत नाही किंवा झोपत नाही, न तो डोळे उघडतो न बंद करतो. अर्थात ह्या शारीरिक क्रिया आहेत व त्या स्वाभाविकपणे होत रहातात. ज्ञानी आत्मवत झाल्यामुळे तो त्या क्रिया करत नाही. तो या सर्वांपासून दूर राहून केवळ पहाण्याचे काम करतो. या क्रिया शरीराच्या गुणधर्मानुसार होतात. आत्मा ह्या सर्वांचा दृष्टा असतो. ही ज्ञानाची सर्वोच्च श्रेष्ठ अवस्था आहे. चेतनेच्या चार अवस्था असतात - जागृती, स्वप्न, सुषुप्ति आणि तुरीय. जागृतीत अहंकार व कर्तेपणा (मी) असतो. स्वप्नात तो क्षीण होतो. सुषुप्तीत त्याचा पूर्ण अभाव असतो. चौथ्या तुरीय अवस्थेत तर व्यक्ति नाहीशी होऊन ती परमात्म्यातच विलिन होते. याच चौथ्या अवस्थेविषयी हे सूत्र आहे.
सर्वत्र दृश्यते स्वस्थ: सर्वत्र विमलाशयः । अनुवाद : - मुक्त पुरुष सदैव शांत (स्वस्थ) व सर्वत्र निर्मळ आशय पाहणारा होतो. सर्व वासनाविरहित झाल्याने सर्वत्र शोभून दिसतो. विवेचन : - अज्ञानी अनेक प्रकारच्या द्वंदात अडकलेला असतो व ती द्वंद्वेच जणू त्याचे जीव असतात. त्यामुळे तो कधी स्वस्थ, शांत होऊ शकत नाही. परंतु ज्ञानी पुरुष हर्ष-विषाद, सुख-दुःख या प्रकारच्या सर्व द्वंदातून बाहेर पडून सदैव शांत वृत्तीने जगतो. द्वंद्वमुक्त झाल्यामुळेच त्याला ही स्वस्थता लाभते. सर्व वासनांतून तो मुक्त झाल्यामुळेही ही मानसिक स्थिरवृत्ती त्याला प्राप्त होते. वासनाग्रस्त माणूस एका संकुचित मर्यादित वर्तुळातच विचार करतो, त्याची वैचारिक दृष्टीची झेप, वृत्ती, कार्य सर्व काही त्या संकुचित वर्तुळातच होत असते. तो दुसऱ्याच्या हिताची पर्वा न करता आपल्याच हितसंबंधांचा व स्वार्थाचा विचार करतो, त्यासाठीच काम करतो व त्यामुळे तो क्षुद्र अर्थ शोधणारा होतो. ज्ञानी माणूस मात्र वासनाविरहित झाल्यामुळे सर्व गोष्टीत शुभ व निर्मळ, व्यापक हिताचा अर्थ शोधतो. हे सारे विश्वच माझे घर आहे अशी त्याची 'वसुधैव कुटुम्बकम्" भावना असते. अशी व्यक्ति सर्व ठिकाणी शोभून दिसते.
पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन्न् अश्नन् गृण्हन् वदन् व्रजन् । अनुवाद : - पाहतांना, अकतांना, स्पर्श करतांना, वास घेतांना, खातांना, स्वीकार करतांना, बोलतांना, चालतांना; हित व अहित या विचारातून मुक्त झालेला पुरुष खरोखरीच जीवन्मुक्त आहे. विवेचन : - जीवन्मुक्त व्यक्तिची लक्षणे सांगतांना मुनीश्रेष्ठ अष्टवक्र या सूत्रात म्हणतात की ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले तो जीवन्मुक्त झाला असतो. अशी व्यक्ति सर्व वासना, कामनापासून अलिप्त झालेली असते; सर्व द्वंद्वांच्या पलीकडे निघून जाते. म्हणून हित व अहित असा विचारही त्याच्या मनात येत नाही. सर्व कर्म स्वाभाविकपणे करूनही त्या कर्मांनी जीवन्मुक्त व्यक्ति बांधली जात नाही करण सर्व प्रकारच्या कर्तेपणातूनही तो मुक्त असतो.
न निन्दति न च स्तौति न हृष्यति न कुप्यति । अनुवाद : - मुक्त पुरुषाला कशातही स्वारस्य नसते. तो कुणाची निन्दा करत नाही व कुणाची स्तुती करत नाही. तो हर्षित होत नाही व कुणावर खवळतही नाही. तो कुणाला काही देत नाही व कुणाकडून काही स्वीकारत नाही. विवेचन : - परमात्मा सर्व रसांचा परमरस आहे. पूर्णानन्य आहे. ज्याला तो परमरस प्राप्त झाला त्याला संसारातले सर्व रस फीके वाटतात. म्हणून संसारिक गोष्टीबाबत आत्मज्ञानी निरसवृत्ती धारण करतो. परमात्मा प्राप्तीने जो तृप्त झाला त्याला या संसारातील तृप्तीची इच्छा उरत नाही. जर संसारात शाश्वत सुख असते, जर संसारातील विषयांमुळे शाश्वत तृप्ती मिळाली असती तर मग मनुष्याला परमात्म्याचा शोध घेण्याची ओढ निर्माणच झाली नसती. तशा स्थितीत धर्मालासुद्धा काहीही अर्थ उरला नसता. धर्म म्हणजे केवळ निरर्थक बडबड ठरली असती. त्या परम तृप्तीचा शोध हाच तर धर्म आहे. त्या विराट चेतनेशी एकरूप होण्याचे विज्ञान म्हणजे धर्म आहे. संन्यास वा वैराग्य त्या शोधाचा प्रारंभ असून जीवन्मुक्ति त्या शोधाचा शेवट आहे. ह्या स्थितीत पोहचलेला ज्ञानी द्रष्टा होतो. विराटात भक्त विलीन होतो. दोघांची स्थिती एकसारखी होते. अष्टावक्राचा रस्ता हा द्रष्ट्याचा रस्ता आहे. सूफी संतांनी साधनेच्या चार अवस्था सांगितल्या आहेत. पहिल्या अवस्थेत विधी-विधान, पद्धती ( तौरतरीके) नियम, व संयम हे उपाय आहेत. दुसऱ्या अवस्थेत अहंकार विसर्जित होतो, साधना संपूर्ण होते व मी-पणा हरवून जातो. तिसऱ्या अवस्थेत परमात्म्याचे दर्शन होते पण अंतर कायम रहाते. चौथ्या अवस्थेत जीवाशिवाचे मिलन होते व एकरूपता होऊन अद्वैताची अवस्था येते. या अवस्थेत केवळ ब्रह्मरूपी सत्यच उरते. तीच शेवटची ध्येयस्थिती आहे. हीच जीवमुक्तीची अवस्था आहे. अशा व्यक्तिला सर्वत्र त्या एकाच आत्म्याची अनुभूती येते. त्यामुळे तो कुणाची स्तुती करत नाही व कुणाची निंदा करत नाही. तो कशाने हर्षभरीत होत नाही किंवा कोणत्याही कारणाने खवळत नाही. न तो कुणाला काही देतो, न तो कुणाजवळून कशाचा स्वीकार करतो. स्वभावत: आपोआप जे होते तेच तो करतो. जे सहजरित्या प्राप्त होते तेच व तेवढेच त्याला पुरेसे असते. अन्य कशाची व जास्तीची अपेक्षाच नसते. वासनेमुळे प्रेरित होऊन किंवा अहंकाराने तो कोणतेच कर्म करत नाही. अशी वासनारहित व अहंकारशून्य व्यक्तिच जीवन्मुक्त असते.
सानुरागां स्त्रियं दृष्ट्वा मृत्युं वा समुपस्थितम् । अनुवाद : - "प्रीतीयुक्त स्त्री किं मृत्यू जरी जवळ आला तरी जो पुरुष अविचल व स्वस्थ-शांत रहातो तो खरोखरीच जीवमुक्त आहे." विवेचन : - माणसाचे मनच त्याच्या बन्यनाचे कारण असते. मनातल्या दोन मुख्य वृत्तींमुळेच ते कधी शान होत नाही. ह्या दोन वृत्ती म्हणजे राग (भावना) व भय. जीवनात राग ( भाव-भावनांचा रस) आहे, त्याबद्दल आकर्षण आहे. विषयांत राग (रस) आहे व त्या सर्वात काम सर्वाधिक बलशाली आहे. कामातून जीवनाची निर्मिती झाली आहे. वासना, कामना व सृजन (निर्मिती) यांची उर्जाशक्ति कामच आहे. ही सृष्टीसुद्धा 'काम' शक्तिचाच विस्तार आहे, म्हणून मनुष्य तीच्याकडे आकर्षित होतो. दुसरे आहे मृत्यूचे भय. मनुष्याची जीवेष्णा म्हणजे जीवंत राहण्याची इच्छा सर्वात जास्त प्रबळ आहे. सर्व त्रास, विपदा, संकटे सहन करूनही तो जीवंत राहू इच्छितो. म्हणून मनुष्य सर्वात जास्त मृत्यूला घाबरतो. मृत्यूचे भय सुद्धा वासनेमुळेच आहे. ज्याने संसारसुख पूर्ण भोगले नाही जो अतृप्त आहे त्यालाच मृत्यूचे भय सर्वात जास्त असते. जर सर्व वासनाच तृप्त झाल्या असतील तर मृत्यूचेही भय कमी होते. म्हणून आसक्ति व भिती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपले सर्व अस्तित्व म्हणजे शरीर आहे असे समजणाऱ्यांसाठी काम वासना हेच मुख्य आकर्षण आहे. कारण कामवासना ही शरीराची नव्हे तर मनाची वृत्ती आहे. शरीर केवळ यंत्राप्रमाणे आहे. मनाच्या आदेशानुसार क्रियाशील होते किंवा निष्क्रिय होते. म्हणून केवळ शरीराला एखादि क्रिया करण्यापासून थांबविल्याने वासनामुक्त होता येत नाही. मनातून सुद्धा वासनेचा त्याग झाल्यावरच वासनेतून मुक्त होता येते. त्याचप्रमाणे भयमुक्त होण्यासाठी मनातून भय काढून टाकले पाहिजे. अष्टवक्र स्वामी हेच सांगतात की प्रेमासक्त स्त्री किंवा साक्षात मृत्यू ह्या पैकी कुणीही जवळ आले तरी सुद्धा ज्या पुरुषाचे स्थिरावलेले, शांत झालेले मन अ-विचल व पूर्वीप्रमाणेच शांत राहते, त्यात कोणतेही विकार किंवा इच्छा (प्रितीची वा जगण्याची) निर्माण होत नाही, त्याच पुरुषाला मुक्ति प्राप्त झाली आहे. शरीराने अविचल व स्थिर किंवा निष्क्रीय राहूनही मनात दुर्विचार आला किंवा मृत्यूमुळे भिती निर्माण झाली तर तो मनुष्य वासनाग्रस्त आहे, मुक्त नव्हे. म्हणून सर्व विकारांपासून मन मुक्त होणे हीच मुक्ति आहे.
सुखे दुःखे नरे नार्यां संपत्सु च विपस्त्सु च । अनुवाद : - समदर्शी व धैर्यवान पुरुषाचे दृष्टीने सुखात व दुःखात स्त्रीत व पुरुषांत, संपत्तीत व दारिद्र्यात काहीही फरक नाही. विवेचन : - सुख-दुःखात आपण फरक करतो ते वासनेमुळे व इच्छांमुळे. जर इच्छा बदलली तर सुखाचे रूपांतर दुःखात व दुःखाचे रूपांतर सुखात होते. सृष्टीमधे सुख-दुःखात फरक नाही. आपल्याला ते वासनेमुळे जाणवते. त्याचप्रमाणे स्त्री-पुरुषांची भिन्नता शरीराचे रचनेपुरते आहे, आत्म्यांत फरक नाही. आत्मा लिंगविरहित आहे. तो स्त्री नाही व आत्मा पुरुषही नाही. मनातल्या वासनेमुळे स्त्री व पुरुष असा भेद दिसतो. जेंव्हा मनात वासना नाही, इच्छा नाही तेंव्हा आत्म्या आत्म्यात व म्हणूनच स्त्री-पुरुषात भेद रहात नाही. बाहेरून दोघे वेगवेगळे दिसत असले तरी आत्मरूपात दोघेही समान आहेत कारण आत्मा एकच आहे. आत्मज्ञानी केवळ बाह्य म्हणजे शरीर पहात नाही, तो तर सर्वत्र आत्मा असल्याचीच अनुभूती घेतो. ह्याचप्रमाणे संपत्ती किंवा विपत्ती (दरिद्रता) ही सुद्धा मनाच्या दुर्बलतेतून व मनाच्या खेळामधून निर्माण झाली आहे. आत्मज्ञानी तर सर्व बाबींकडे समान दृष्टीने पाहतो. बाह्य फरकामुळे आत्मज्ञानी विचलीत होत नाही. म्हणून भेदविरहित नजरेने सर्व बाबीत तो एकाच आत्म्याचे दर्शन घेतो. असाच पुरुष जीवन्मुक्त आहे.
न हिंसा नैव कारुण्यं नौद्धत्यं न च दीनता । अनुवाद : - ज्या पुरुषासाठी संसार क्षीण झाला आहे त्या पुरुषात हिंसा नाही, करूणा नाही, न उद्धटपणा (मग्रुरी) आहे, न लाचारी आहे, आश्चर्य नाही व क्षोभ नाही. विवेचन : - ज्या पुरुषाला आत्मज्ञानाचा लाभ झाला आहे, त्याच्यासाठी हा संसार असला काय नसला काय त्याला काहीच फरक पडत नाही. हा संसार त्याच्या मनात पूर्णपणे क्षीण झालेला असतो, संसाराप्रती त्याच्या मनांत कोणतेच आकर्षण उरलेले नसते. वासना, मोह, ममता, स्वार्थ, माया यांचे प्रभावामुळे ह्या संसाराकडे बघतांना त्याला पूर्वी चांगले-वाईट, स्वीकारण्यास योग्य, त्याग करण्यास योग्य याप्रकारचे भेद जाणवत होते पण आता संसाराकडे बघण्याची वृत्तीच बदलून गेल्यामुळे तसे भेद दिसतच नाही. हिंसा, करूणा, उद्धटपणा विनम्रता, दीनता, लाचारी ह्या गोष्टी तेंव्हाच संभवतात जेंव्हा कुणीतरी 'दोन' व्यक्ति वा पदार्थ अस्तित्वात आहेत. तोपर्यंतच मनुष्या-मनुष्यात फरक जाणवतो. जेंव्हा संपूर्ण सृष्टीत एकच आत्मा आहे तेंव्हा कोण कुणाची हिंसा करणार व कोण कुणाला करूणा दाखवणार ? आपोआप हे सर्व लुप्त होते. प्रयत्नपूर्वक दया, करूणा व अहिंसा करावी लागत नाही व तिच्यावर भाषणे देत फिरण्याचीही खऱ्या संताला गरज भासत नाही. अहिंसेवर भाषण देणे ही एक प्रकारची वासना आहे. कशाला तरी नैतिक व कशाला तरी अनैतिक ठरविणारी माणसा-माणसात फरक करणारी दृष्टी अस्तित्वात आहे याचे ते लक्षण आहे. सर्वत्र एकच आत्मा असेल तर सारे भेद - सद्गुण व दुर्गुण - सुद्धा लुप्त होतात. मग कोणतेही व्रत करावे लागत नाही. अशा ज्ञानी माणसाला कशाचेही आश्चर्य वाटत नाही व कशामुळेही त्याचे अंतःकरणाचा क्षोभ होत नाही. या जगाकडे व जगातील प्रत्येक बाबीकडे तो आपल्या स्वभावानुसार उपेक्षेनेच पहातो. स्वयंविवेक व स्वयंशासनानुसार स्वच्छंद जगतो. तो दुसऱ्यांच्या विरूद्ध वर्तन करत नाही किंवा दुसऱ्यांना अनुकूल वर्तन करत नाही. तो स्वतःच्या स्व-भावाला अनुकूल असे वागतो. ईश्ववरसुद्धा असाच आहे. तो दयावान नाही व करूणाशील नाही. ईश्वर हिंसक नाही व अहिंसक नाही. तो कुणाला शिक्षा करत नाही व कुणाला बक्षिसे देत नाही. ही सृष्टीसुद्धा ईश्वराने तयार केलेली नाही आणि तो ती चालवत सुद्धा नाही. सृष्टीतर तीच्या स्वतःच्या नियमांनी, विशिष्ट नियमांनी अभिव्यक्त होत आहे. म्हणून परमात्मा हा कर्ता नाही किंवा भोक्ता नाही. ज्ञानी सुद्धा याच प्रमाणे ईश्वरासमान होतो.
न मुक्तो विषयद्वेष्टा न वा विषयलोलुप: । अनुवाद : - मुक्त पुरुष विषयांचा द्वेष करीत नाही व तो विषयलोलुप सुद्धा नसतो. तो सदैव आसक्तिरहित होऊन प्राप्त व अ-प्राप्त वस्तूंचा उपभोग घेतो. विवेचन : - मुनीश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी म्हणतात की जीवन्मुक्त व्यक्ति हीच सर्वाधिक उपभोग घेणारी व्यक्ति आहे. संसारातल्या क्षणभंगुर व क्षुद्र भोगांचा त्याग करून आत्मानंदाचा शाश्वत भोग जीवन्मुक्त घेत असतो. तो विषयांचा द्वेष करत नाही किंवा विषयलोलुपसुद्धा नाही. ढोंगी साधु विषयांचा तिरस्कार करत असल्याने त्या भावनेच्या ओझ्यामुळे दुःखी राहतात आणि त्या विषयांतच आसक्त होऊन गुरफटल्यामुळे संसारी माणूसही दुःखी रहातो. जे मिळाले आहे त्यामुळेही दुःखी आहे शिवाय जे मिळाले नाही त्यामुळेसुद्धा दुःखी आहे. अज्ञानी माणसाची वैचारिक दृष्टीच अशी असतो की ज्यामुळे तो सतत व सर्व प्रकारच्या परिस्थितीत रडतच रहातो. प्रसन्न होण्याची, आनंदात राहण्याची कला त्याला येतच नाही. त्या कलेचे ज्ञान व प्राप्ती ज्ञानी माणसालाच झालेली असते. ज्ञानी माणसाला कशाचीच आसक्ति नसते. आसक्ति असणाराच दुःखी, चिंतित व तणावग्रस्त असतो. ज्ञानी माणूस जे प्राप्त झाले त्याचा उपभोग घेतो व जे प्राप्त झाले नाही त्याची चिंता करत नाही. जे आहे त्याने आनंदित रहातो व सर्व प्रकारच्या परिस्थितीत आनंदात रहातो. स्वामी रामकृष्ण परमहंस यांनी एकदा सांगितले की 'आम्ही संसार सोडला व आम्हाला परमात्म्याची प्राप्ती झाली. म्हणून आम्ही क्षणभंगुर गोष्टीचा त्याग केला व आता परम शाश्वत भोगाचे मानकरी झालो आहोत. म्हणून आम्हीच महान भोगी आहोत. तुम्ही परमात्मा सोडला व संसार प्राप्त केला म्हणून या क्षणभंगुर पणातच जखडून रडता आहात. भोग कसला घेणार तुम्ही ? तुम्ही तर सदैव रडतात. क्षुद्र गोष्टींसाठी तुम्ही विराटाचा त्याग केला, तुम्ही महान त्यागी आहात व आम्ही महान भोगी आहोत.'
समाधानासमाधानहिताहित विकल्पनाः । अनुवाद : - शून्यचित्त माणूस समाधान व असमाधान किंवा हित व अहित यांचे पर्याय जाणत नाही. तो तर केवळ कैवल्याप्रमाणे स्थिर आहे. विवेचन : - चित्त जेंव्हा शंकित होते, उद्विग्न होते तेंव्हाच संकल्प व विकल्प सुचू लागतात, तेंव्हाच समाधान व असमाधानाचे विचार निर्माण होतात, तेंव्हाच हित व अहित यांचा विचार सुरू होतो. हे सर्व अहंकारामुळेच होते. क्षुब्ध व चंचल मनात इच्छेच्या, वासनेच्या लाटा निर्माण झाल्यावरच हे आक्षेप-विक्षेप निर्माण होतात. जर मन वासनारहित झाले, शांत झाले, त्यात विचार, इच्छा, कामना यांच्या लाटा निर्माण होणे बंद झाले तरच कैवल्याची स्थिती प्राप्त होते. असा माणूस केवळ आत्म्यातच एकरूप होऊन स्थिर असतो. आत्म्याशिवाय त्याला दुसरे काही सूचत नाही. असाच माणूस जीवन्मुक्त असतो.
निर्ममो निरहंकारो न किञ्चिदिति निश्चित: । अनुवाद : - "ज्याच्या सर्व आशा अंतर्मनातून नाहीशा झाल्या आहेत व जो खात्रीपूर्वक जाणतो की (दृश्य जग) कोणत्याही प्रकारे अस्तित्वात नाही तोच ममतारहित, अहंकारशून्य पुरूष कर्म करून सुद्धा त्यामुळे कर्म बंधनात अडकत नाही." विवेचन : - याप्रमाणे ज्याच्या अंतर्मनातून सुद्धा सर्व इच्छा गळून पडल्या आहेत तो शून्य-चित्त होऊन आत्मरूपात एकरूप होतो. तो आत्म्याशिवाय कशालाही ओळखत नाही मग दुसऱ्या कशाची आशा करणार कशी ? ज्ञानप्राप्ती झालेला असा पुरूष कुणाच्याही माया-ममतेत अडकत नाही व कोणताही अहंकार त्याच्या मनात उद्भवत नाही. मी-पणाचा अभाव झाल्यामुळे कर्तेपण गळून पडते. कर्म त्याच्या हातानी घडूनसुद्धा त्याने काहीच केलेले नसते. कारण तो केवळ उपकरण (साधन) म्हणून उरतो. परमेश्वर जे त्याच्याकडून करून घेतो ते तो करून टाकतो. अशी व्यक्ति सर्वार्थानें अलिप्त असते.
मनःप्रकाशसंमोहस्वप्नजाड्यविवर्जित: । अनुवाद : - ज्याचे मन गळून पडले आहे आणि मनातून कर्म, मोह, स्वप्न आणि जडता सर्व समाप्त झाले आहेत तो पुरूष वर्णन करता येत नाही अशी श्रेष्ठ स्थिती प्राप्त करतो. विवेचन : - आत्मज्ञानात मुख्य बाधा मनाचीच आहे. कर्म, मोह, स्वप्न व जडता यांचा आभास मनामुळेच होतो. म्हणून ज्याचे मन गळून पडले आहे. त्याचे कर्म, मोह, स्वप्न व जडता सुद्धा संपुष्टात येतात. अशी व्यक्ति सदैव पूर्ण चैतन्यरूपी जागृत अवस्थेत स्थीरवृत्तीने जगते. या अवस्थेचे वर्णन करता येत नाही. हीलाच कैवल्य-अवस्था म्हणतात. तिचे वर्णन ती अनिर्वचनीय आहे असेच करावे लागते. सर्व ज्ञानी पुरूषांनी सांगितले आहे की स्थिती अवर्णनीय आहे, वर्णनातीत आहे. वेदांनी ह्याच स्थितीला ऋत व कबीराने अमनी दशा म्हटले आहे. भगवान, परमेश्वर परमात्मा, ब्रह्म, सत्य अशाच व्यक्तिमधे स्थित असते. हाच खरा स्वभाव आहे, हाच परमश्रेष्ठ नियम आहे. हेच खरे ज्ञान आहे. |