अष्टावक्रगीता

प्रकरण २ रे

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

अध्यात्म सत्तेपेक्षा जग निराळे नाही.

अहो निरंजनः शान्तो बोधोऽहं प्रकृतेः परः ।
एतावन्तमहं कालं मोहेनैव विडंबितः ॥ १ ॥


अनुवाद - राजा जनकाला अष्टवक्राचा उपदेश ऐकताच आत्मज्ञान प्राप्त झाले. राजा जनक उद्‌गारतो, "मी निर्दोष आहे, शांत आहे, बोधस्वरूप आहे, प्रकृतिपेक्षा वेगळा आहे. पण आजपर्यन्त दिर्घकाळ या मोहात अंध झालो होतो.


विवेचन - ज्ञानी अष्टवक्राच्या सम्पर्कात येताच राजा जनकाचाही ज्ञानदिप प्रज्वलीत झाला व त्याचे सर्व अज्ञानाचा अंधःकार क्षणात नाहीसा झाला. आत्म-सत्तेचे राजा जनक अधिकारी पुरूष झाले. त्याचा मोह ममता, वासना, आकांक्षा, अपेक्षा, अहंकार, घृणा, सारे सारे भ्रम नाहीसे झाले. दृष्टी-परिवर्तन झाले. हे जग त्याचेसाठी स्वप्नाप्रमाणे झाले. ज्याप्रमाणे जाग आल्यानंतर स्वप्नातले सारे जग विलिन होते त्याप्रमाणे राजा जनकाला आत्मज्ञान झाल्यावर ही दृष्टी माया व भ्रम वाटू लागली. आता तो स्वतःला संसारी किंवा प्रापंचिक न समजता चैतन्यरूप आत्मा समजू लागला. शरीर प्रकृती व मनाशी त्याचा संबंध सुटला. वासना विलिन झाल्या. आसक्ति नष्ट झाली. एका नव्या जीवनाचा प्रारंभ झाला. हे सर्व अकस्मात घडले नव्हते; अन्यथा राजा जनकालाही समजले नसते. पूर्व-पात्रता होती. शक्ति धारण करण्याची राजा जनकाजवळ क्षमता होती व तरीही तो आश्चर्यचकीत झाला व उद्‌गारला, "मी आत्मरूप आहे म्हणून निर्दोष आहे. आत्म्याप्रमाणेच शांत आहे. स्वतः बोध आहे. मी साक्षी आहे. प्रकृतीपेक्षा वेगळा आहे. मी दिर्घकाळ या मोहामुळे अंध झालो होतो. हा मोहच अंध कणारा, दिशाभूल करणारा आहे. कबीराने पण म्हटले आहे की - 'माया महा ठगिणी' माया फार फसवी असते. माया मोहामुळेच हे जग जसे आहे तसे न दिसतां वेगळेच दिसते. जनकाचे डोळ्यांवरील 'हे मायेचे पडदे दूर झालेत. त्याने आपले स्वरूप ओळखले. हाच तो गुरूचा महिमा आहे की जो लोखंडाचे सुद्धा सोने करतो. त्याचबरोबर शिष्याची पात्रतासुद्धा आहे ज्यामुळे तो स्वतःमध्ये पूर्ण परिवर्तन घडविण्यास तयार होतो. आता जनक स्वतःला निर्दोष समजतो. पाप-पुण्य, कर्म या सर्व बंधनांचे मायेचे जाळे तुटले. स्वतःला कर्ता समजण्याच्या मनुष्याच्या अहंकारामुळेच हे मायेचे जाळे निर्माण होते. जेव्हा कर्तेपणच नाहीसे झाले तेव्हा त्याला पाप-पुण्यही चिकटू शकत नाही. ज्ञानरूपी अग्नित सर्व जळून भस्म झाले. वास्तवाचे सत्य स्वरूपाचे ज्ञानच पुरेसे आहे. हे सर्व सद्‌गुरूच्या उपस्थितीमुळे घडले. गुरूने कॅटॅलिटिक एजंटचेही म्हणजे प्रक्रिया घडविर्‍यास अनुकूल वातावरण व मानसिकता निर्माण करण्याचेही काम केले. पान पण हालले नाही व विस्कोट तर होऊन चुकला, घाव पण झाला नाही व शस्त्रक्रिया पूर्ण झाली. असेच विवेकानंदांचे बाबतीतही घडले होते. अन्य ज्ञानीयांच्या बाबतीतही असेच घडले होते. जणू काही शरीरावरील वस्त्रे काढल्याप्रमाणे राजाला वाटू लागले. सापाने जणू कांत टाकली. सिंहाचे पिलू बकर्‍या मेढ्यांचे कळपात राहून राहून स्वतःलाही बकरी मेंढी समजू लागले होते. परंतु समुद्रातल्या पाण्यात त्याने आपले प्रतिबिंब पाहिले. सिंहाचा आवाज व गर्जना ऐकली, रक्ताचा त्याला स्वाद घेण्याची इच्छा झाली. त्याबरोबर त्याच्या शरीरातला सिंह जागा झाला व त्याने सिंहाप्रमाणेच गर्जना केली व बकर्‍यांचा कळप सोडून सिंहाच्या कळपाबरोबर जंगलात प्रयाण केले. स्वतःच्या आत्म प्रतिभेची ही जागृती होती, गुरू कृपेने त्याची आत्मशक्ति जागृत होऊन, त्याने आत्म-स्वरूप जाणून घेतले. गुरूले त्यास सिंह केले नाही फक्त त्याला त्याच्या सत्य-स्वरूपाचा बोध घडविला. असेच असते ज्ञानब्रह्माचे स्वरूप फक्त जे जाणणे जरूरीचे आहे.
यथा प्रकाशयाम्येको देहमेनं तथा जगन् ।
अतो मम जगत्सर्वमथवा न च किंचन ॥ २ ॥


अनुवाद - जसा या देहाला मी एकटाच प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे या विश्वाला सुद्धा मीच एकटा प्रकाशित करतो. म्हणून संपूर्ण जग माझे आहे किंवा माझे काहीच नाही.


विवेचन - आपल्या आत्मज्ञानाची अभिव्यक्ति करीत राजा जनक पुढे सांगतात की मी शरीर नसून आत्मा आहे म्हणून माझ्यामुळेच प्रकाशित आहे. जो आत्मा मी आहे तोच आत्मा संपूर्ण जगाचा सुद्धा आत्मा आहे. म्हणून हे सर्व जगसुद्धा माझ्याच प्रकाशाने उजळून निघाले आहे. म्हणजेच आत्मरूप चैतन्य तत्वांनी प्रकाशीत होत आहे. त्यामुळे हे सर्व जग माझेच आत्म वा ब्रह्मस्वरूप आहे, किंवा माझे असे काहीच नाही. कारण मोहवश व अहंकारग्रस्त होऊन माझे म्हणावे असे आता काही उरले नाही. सर्व ईश्वरमय आहे. आत्मा नाही असे कोणतेही स्वतंत्र अस्तित्व या पृथ्वीवर नाही. अर्जुन गोंधळलेल्या मनःस्थितीत होता म्हणून तो अनेक प्रश्न विचारीत होता, तर्क देत होता पण तत्वज्ञान ग्रहण करत नव्हता. राजा जनकाने तर्क सांगितला नाही आणि प्रश्न केला नाही कारण त्यांची मनोभूमिका आधीच तयार झाली होती. पात्रता सिद्ध झाली होती म्हणून उपदेशाचा सरळ मनाने स्विकार केला. त्यामुळे ब्रह्म सत्तेचे स्मरण जागृत झाले.
सशशीरमहो विश्वं परित्यज्य मयाऽधुना ।
कृतश्चित्कौशलादेव परमात्मा विलोक्यते ॥ ३ ॥


अनुवाद - आश्चर्यच वाटते की शरीर व विश्व यांना एकाच वेळी त्यागून मी उपदेशामुळे परमात्म्याचा अनुभव घेत आहे.


विवेचन - राजा जनकाला आत्मज्ञान प्राप्त झाले. आत्म्याचे स्वरूप स्पष्टपणे दिसू लागले. हेसुद्धा ज्ञान झाले की आत्मा व परमात्मा भिन्न नाहीत. त्यामुळे राजा म्हणतो की गुरूच्या कुशलतेमुळे (उपदेशामुळे) मी परमात्म्याला पाहू शकतो व या ज्ञानामुळे माझा शरीर व विश्वाचा मोह सुटला. आसक्तिमुळे मी शरीराला माझे समजत होतो व जगाला ज्या नजरेने पाहत होतो ते सारे संपले. जनकाने त्याग केला नाही, त्याग घडला. त्याग केला जात नसतो. जेथे करण्याची गोष्ट आहे तेथे अहंकार आहे, कर्तेपण हजर आहे. त्याग हे बोधाचेच फळ आहे. सत्य व शाश्वत गोष्टींचा लाभ झाल्यावर असत्य व अनित्य गोष्टींचा मोह नष्ट होतो. सोडून देण्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाही. काही पंथ सांगतात की तेथे त्याग करा व तेथे स्वर्ग मिळेल. काही सांगतात की सर्वस्वाचा त्याग करा, नग्न व्हा म्हणजे मोक्ष मिळेल. परंतु मोक्षप्राप्तीसाठी त्याग काही अट नाही. सौदेबाज लोक मोक्षालासुद्धा तराजूत घालून मोजतात. त्याग म्हणजे कोणची वस्तू सोडून देणे नाही परंतु अशी दृष्टी प्राप्त होणे की हे सर्व ईश्वराचे आहे, माझे नाही. जे तुमचे नाहीच ते तुम्ही कसे काय सोडणार ? ईशावास्य उपनिषद सांगते की "सृष्टीत जे जे आहे ते ते सर्व ईश्वराचे आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा त्यागपूर्वक उपभोग घ्या." स्वप्नात जर तुम्ही सम्राट झाला व स्वप्न संपल्यावर मात्र असे म्हणत नाही की मी सप्राटपदाचा त्याग केला तसेच आत्मस्वरूपाचा बोध झाल्यावर जग, शरीर या बाबींविषयीची आसक्ति समूळ नष्ट होते. त्याग करावा लागत नाही. त्याच्या आधी केलेल्या त्यागाचे काही महत्व नाही. जनक म्हणतात की हे सर्व मोठ्या कुशलतेने घडले. कोणी हिमालयात धावते आहे. कुणी योग, उपासना, ध्यान, यज्ञ, भजन- किर्तन, जप-तप, करीत आहे पण त्यांना परमात्मा मिळत नाही. मला त्याग करावा लागला नाही व कुठे डोंगरात जावे लागले नाही. सर्व इथेच बसल्याबसल्या घडले. हे जीवन नाटकासारखे किंवा खेळासारखे झाले. जे गांभीर्य होते ते नष्ट झाले. हे सर्व मोठ्या कुशलतेने, चातुर्याने झाले.
यथा न तोयतो भिन्नास्तरंगा फेनबुद्‌बुदाः ।
आत्मनो न तथा भिन्नं विश्वमात्मविनिर्गतम् ॥ ४ ॥


अनुवाद - जसे पाण्यापेक्षा फेस व बुडबुडे भिन्न नाहीत तसेच विश्व आत्म्यापेक्षा भिन्न नाही, परंतू आपल्यातूनच निर्माण झाले आहे.


विवेचन - राजा जनकाला स्वतःच्या आत्म्याचा बोध तर झालाच पण त्याचबरोबर याचाही बोध झाला की सर्वत्र एकच आत्मा असून भिन्न भिन्न असे वेगवेगळे अनेक आत्मे नाहीत तसेच या आत्म्यापेक्षा विश्व भिन्न नसून ते सुद्धा या आत्म्यातूनच निर्माण झाले आहे, त्याचीच अभिव्यक्ति आहे, त्याचेच रूप आहे. त्यासाठी ते हे उदाहरण देतात की ज्याप्रकारे पाण्यापेक्षा तरंग किंवा बुडबुडे वेगळे नसतात, त्याचप्रमाणे विश्व हे आत्म्यापेक्षा निराळे नाही. आत्मा व विश्व वेगवेगळे मानणे म्हणजे आत्म्याचे ज्ञान न झाल्याचे लक्षण आहे. अजून मनाच्या पलिकडे जाता आले नसल्याचे लक्षण आहे. भिन्नतेची जाणिव मनाच्या स्तरावर होते. नंतर सर्व काही अभिन्न असल्याचे जाणवते व एकत्वाचा बोध होतो. ध्यान योग्यास उच्चतम मानसिक स्थितीत आत्म्याची अल्प जाणिव होते पण अद्याप पूर्ण आत्म-बोध झालेला नसल्याने त्यास आत्मे वेगवेगळे असल्याचे जाणवते. ज्ञानाचा पूर्ण साक्षात्कार न झाल्याने ही अपूर्ण स्थिती आहे. अद्याप अज्ञान बाकी असल्याचे लक्षण आहे. आता विज्ञानक्षेत्रातले नामवंत शास्त्रज्ञ सुद्धा सांगतात की हे सारे अस्तित्व एकाच उर्जेपासून तयार झाले आहे. हे सारे पदार्थ त्या उर्जेची भिन्न भिन्न रूपे आहेत. अशा परिस्थितीत आत्मा वेगवेगळा असतो असे मानणे आणि आत्मा व विश्व यात भेद मानणे हे अज्ञानातून निर्माण झालेले विचार आहेत एवढेच.
तन्तुमात्रो भवेदेव पटो यद्वद्विचारतः ।
आत्मतन्मात्रमेवेदं तद्वद्विश्वं विचारितम् ॥ ५ ॥


अनुवाद - विचार केल्यानंतर वस्त्र म्हणजे तंतु आहेत हे लक्षात येते त्याचप्रमाणे विचार केल्यावर हे जग म्हणजे आत्म-सत्ता असल्याचे लक्षात येते.


विवेचन - राजा जनकास आत्म-बोध झाल्याने विश्वाच्या एकात्मतेचा अनुभव येतो व ते या एकत्वास अजून एका उदाहरणाद्वारा स्पष्ट करतात. डोळ्यांना एक वस्त्र दिसते पण ते सारे सारे अनेक तन्तु आहेत. ततुन् म्हणजेच वस्त्र हे विचार केल्यावर लक्षात येते. तन्तुशिवाय वस्त्र नाही. तन्तुंनीच वस्त्र घडले आहे. तसेच आत्म-रूपी तन्तुंनीच हे विश्व घडले आहे. मग हे विश्व व आत्मा हे भिन्न भिन्न कसे असू शकेल ? वस्तुतः आत्माच विश्वाचा आधार आहे मग दोन्ही भिन्न आहेत असे कसे म्हणता येईल. वैज्ञानिक ज्या विद्युतशक्तिला मूल उर्जा समजतात तीसुद्धा आत्मशक्तिचेच एक रूप आहे.
यथैवक्षुरसे कॢप्ता तेन व्याप्तैव शर्करा ।
तथा विश्वं मयि कॢप्तं मम व्याप्तं निरंतरम् ॥ ६ ॥


अनुवाद - ज्या प्रमाणे उसाच्या रसापासून बनणारी साखर उसाचे रसात व्याप्त असते, त्याचप्रमाणे माझ्यापासून बनलेले हे जग, माझ्यातही व्याप्त आहे.


विवेचन - राजा जनक विश्व व आत्मा यांची एकता स्पष्ट करण्यासाठी अजून एक उदाहरण देतात की उसाच्या रसापासून साखर तयार होते पण ती त्या रसात व्याप्त असतेच. अन्यथा त्यातून ती प्रकट झाली नसती त्याचप्रमाणे संपूर्ण विश्व आत्मतत्त्वात म्हणजेच ब्रह्म तत्त्वात व्याप्त आहे अन्यथा याची उत्पत्ति कशी झाली असती ? साखरेत जी गोडी आहे ती त्या रसाचीच गोडी आहे. अनेक प्रकारच्या मिठायांत जी गोडी आहे ती सुद्धा त्या रसाचीच गोडी आहे. ज्याला ह्या रसाची माहिती नाही तो मनुष्य साखर, गूळ, मिठाई यांना वेगवेगळे मानेल. या सर्वात एकत्व आहे, अभिन्नता आहे हे त्यास उमजू शकणार नाही. तो अज्ञानी माणूस म्हणेल की साखर, गूळ, खडीसाखर, मिठाई यांचे रंग रूप भिन्न भिन्न आहेत मग त्यांना एकच कसे मानावे ? जे दिसते त्या पलिकडे काही एकत्व आहे हे ज्ञानानेच समजू शकते. जे जाणतात ते म्हणतील की ही सर्व प्रकारची गोडी त्या उसाच्या रसात व्याप्त आहे. त्याचप्रमाणे आत्म्यापासून तयार झालेले हे विश्व त्या आत्म्यापेक्षा भिन्न नाही. आत्म्यामध्ये विश्व व्याप्त आहे व विश्वामध्ये आत्मा व्याप्त आहे. राजा जनकास या परमतत्व आत्म्याची सत्यानुभूती झाल्याने तो या सर्व विश्वातल्या एकात्मतेची जाणीव करून घेऊ शकतो.
आत्माऽज्ञानाजगद्‌भाति आत्मज्ञानान्न भासते ।
रज्जवज्ञानादहिर्भाति तज्ज्ञानाद्‌भासते न हि ॥ ७ ॥


अनुवाद - आत्म्याचे अज्ञानामुळे विश्व वेगळे जाणवते, आत्म्याचे ज्ञान असल्यास विश्व जाणवत नाही. ज्याप्रमाणे दोरीच्या अज्ञानामुळे साप जाणवतो, ज्ञान झाल्यावर साप जाणवत नाही.


विवेचन - राजा जनकाला आत्मज्ञान झाले ज्यामुळे त्यांना सारी सृष्टी आत्म-रूप दिसू लागली. या सूत्रात ते सृष्टीत दिसणार्‍या भिन्नतेचे कारण स्पष्ट करत सांगतात की हे विश्वसुद्धा आत्मस्वरूप किंवा ब्रह्म स्वरूपच आहे. कारण हे त्याच ब्रह्मापासून उत्पन्न झाले आहे. परंतु जग ब्रह्मापेक्षा वेगळे भासते याचे कारण म्हणजे आत्म्याविषयीचे अज्ञान होय. जोपर्यंत आत्म्याचे ज्ञान होणार नाही तोपर्यन्त हे विश्व भिन्न असल्याचेच भासेल. अन्यथा हे जग तर आत्मस्वरूपच आहे. दोरीच्या अज्ञानाने साप दिसावा तसे आत्म्याचे अज्ञानामुळे विश्व (वेगळे) असल्याचे दिसते. साप असल्याचे तोपर्यंत वाटत राहते, जोपर्यंत दोरीविषयी सत्य ज्ञान होत नाही. एकदा सत्य माहित झालेः की तो साप असल्याचा भ्रम आपोआप नाहीसा होतो. त्याचप्रमाणे आज जग व आत्मा वेगवेगळे जाणवते. राजा जनकाने अज्ञानाच्या तसेच ज्ञानाच्या, दोन्ही स्थितींचा अनुभव प्राप्त केला आहे, त्यामुळे राजा जनकाचे त्याच्या अनुभवावर आधारित असे हे प्रामाणिक कथन आहे. या सूत्रात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्याला आत्मज्ञान होते, त्याची जगाविषयीची आत्मीयता संपुष्टात येते. केवळ जगापासून दूर झाल्याने आत्मज्ञान होत नाही. जग सोडा, हे माया आहे, मिथ्या आहे, भ्रम आहे, असत्य आहे या सर्व खोट्या समजूती आहेत. याचप्रमाणे क्रोध, लोभ, वासना, आसक्ति सोडा म्हणजे परमात्मा लाभेल ही सुद्धा खोटी समजूत आहे. हे सर्व प्रतिपादन ज्ञानी माणसांनी केले आहे. हे त्यांचे अनुभव आहेत. अज्ञानी माणूस तसे मानून कर्मे करेल तर यात त्याचा अहंकार वाहून नैतिक अधःपात होईल. जग, मोह, लोभ, क्रोध सोडण्यापेक्षा जर त्यांची वास्तविकता अनुभवातून जाणून घेतली तर लाभ होऊ शकतो अन्यथा नाही. जगात राहून जर त्याचा अनुभव प्राप्त झाला तर त्याचा मोह आपोआप सुटून जाईल. मुद्दाम वेगळा प्रयत्न करून सोडावे लागणार नाही. हे जग अनुभव प्राप्त कण्याची एक शाळा आहे. यात राहून अन्तःकरण शुद्ध करता येते परंतु आत्म्याचे ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया यापेक्षा वेगळी आहे. दोरीला साप समजून दूर पळून गेलात तर भ्रम दूर होणार नाही. भ्रम तर प्रत्यक्ष दर्शनानेच दूर होईल. म्हणून राजा जनक सांगतो की, 'आत्म्याचे अज्ञानामुळे जग (वेगळे) दिसते व आत्मज्ञानाने त्याचे वेगळेपण नाहीसे झाल्याचे दिसते.' दोघांपैकी एकालाच पाहू शकता, आत्म्याला किंवा जगाला. आत्मज्ञानानंतर जग तर रहातेच पण जसे ते अज्ञानी व्यक्तिसाठी असते तसे ज्ञानी व्यक्तिसाठी नसते. ज्ञानी माणसाची दृष्टी बदलून जाते, त्याची विचार करण्याची पद्धत बदलून जाते. तो म्हणतो की क्रिया केल्याने अहंकार वाढतो, करणारा परमात्मा आहे, त्यालाच करू द्या. तुमचा कर्ता-भाव सोडून द्या, जे होत आहे ते स्वाभाविकपणे होऊ द्या. तुम्ही संपल्प करून काही काम करू नका सर्व काही स्वीकारा, कर्ता नव्हे साक्षी बना, केवळ द्रष्टा. सृष्टीच्या नियमानुसार सर्व स्वयंगतीने होत आहे. साक्षीचा अर्थ कर्मशून्य होणे नव्हे, परंतु स्वतःला कर्तेपणातून मुक्त करणे आहे. सर्व काही ईश्वराचे आहे, तोच सर्व काही करतोय, त्याला थांबवणे सुद्धा ईश्वराच्या कार्यात अडथळा आणणे आहे. या दृष्टीनेच योगी शान्त होतो. साधकासाठी यामुळे पात्रता निर्माण होते.
प्रकाशो मे निजं रूपं नातिरिक्तोऽस्म्यहं ततः ।
यदा प्रकाशते विश्वं तदा‍ऽहं भास एव हि ॥ ८ ॥


अनुवाद - प्रकाश हेच माझे व्यक्तिगत रूप आहे. मी त्यापासून भिन्न नाही. जेंव्हा विश्व प्रकाशित होते तेंव्हा ते माझ्याच प्रकाशाने उजळते.


विवेचन - आत्म-अनुभूतीला व्यक्त करीत राजा जनक पुन्हा उद्‌गारतात की, 'मी आत्म स्वरूप असल्याने या आत्म्याचे सर्व गुण माझेच गुण आहे. हा आत्माच स्वतः प्रकाश आहे. ह्याला अन्य प्रकाशाची आवश्यकता नाही.' जगात विविध वस्तूत जो प्रकाश विद्यमान आहे तो सुद्धा त्याचाच आहे. शास्त्रात ह्यालाच 'ज्योतिषां ज्योति' म्हणतात. जनक म्हणतात, प्रकाश हेच माझे मुख्य रूप आहे. त्या निराकार ब्रह्माचे स्वरूप प्रकाशच आहे. ज्ञान प्राप्तीच्या, साक्षात्काराच्या त्या काही क्षणात सर्व साक्षात्कारी व्यक्तिंना सर्वप्रथम तीव्र प्रकाशाचे दर्शन झाले आहे. हा प्रकाश एवढा उज्वल व तेजःपुंज असतो की जणू एकावेळी अनेक सूर्य प्रकाशित झाले आहेत. सूर्य व अन्य तार्‍यांतही त्याच ब्रह्माचा प्रकाश आहे. कोणताही पदार्थ जळतो तेव्हा त्यातून प्रकाश बाहेर पडतो, याचाच अर्थ असा की हा प्रकाश त्या सर्व पदार्थात सामावलेला असतो. हा चैतन्य तत्वाचाच प्रकाश असतो व तोच सर्व पदार्थात सामावलेला असतो. परमाणुविस्फोटातूनसुद्धा प्रकाश प्रकट होतो व तो याच मूल तत्वाचा प्रकाश असतो. आज शास्त्रज्ञांनी जे शोधून काढले आहे ते हजारो वर्षापूर्वी भारतीयांना अध्यात्मज्ञानाद्वारे प्राप्त केलेले ज्ञान आहे.
अहो विकल्पितं विश्वमज्ञानान्मयि भासते ।
रूप्यं शुक्तौ फणी रज्जौ वारि सूर्यकरे यथा ॥ ९ ॥


अनुवाद - आश्चर्य आहे की अज्ञानामुळे हे काल्पनिक जग मला शिंपल्यात चांदी, दोरीत साप व सूर्य किरणात पाणी भासमान व्हावे तसे दिसते आहे.


विवेचन - राजा जनकास आत्म-ज्ञान झाल्यामुळे त्याचा जगाबद्दलचा भ्रम दूर झाला होता. त्यास याची प्रचिती आली होती की त्याचे वास्तविक रूप हे चैतन्य स्वरूप आत्मा आहे व शरीर कदापि नाही. ह्माच प्रकारे जगाचे वास्तविक रूप आत्माच आहे व भौतिक पदार्थ नाही. हे जग जसे दिसते तसे हे नाही. अज्ञानामुळे काल्पनिक जग खरे जग वाटते. हे जग शिंपल्याप्रमाणे मूल्यहीन आहे पण चांदीप्रमाणे मूल्यवान वाटते. दोरीप्रमाणे हे जग निर्जीव आहे पण अज्ञानामुळे सापाप्रमाणे दिसते. सूर्य किरणात हवा तापल्याने भासमान होणार्‍या पाण्याप्रमाणे भ्रांतीजनक आहे. कारण ते तहान शमवू शकत नाही. या तीन उदाहरणात तीन तथ्य प्रकट झाले आहेत. शिंपल्यात चांदीचा भास व्हावा त्याप्रमाणे हे जग मूल्यवान भासते पण शिंपल्याप्रमाणे शून्य किंमतीचे आहे, सापाप्रमाणेच भयभीत करणारे पण दोरीप्रमाणे निर्जीव आणि मृगजळांतील पाण्याप्रमाणे असत्य कारण तहान भागवू शकत नाही. या विषय वासनांची तहान या संसारातील उपभोगांनी कधीच शमू शकत नाही म्हणून मनुष्य उपभोगानंतर सुद्धा तडफडत रहातो व त्यातच शेवटी प्राणान्त होतो. म्हणून हे सारे जगच मृगजळ आहे, ज्यात सत्यता नसून भ्रम व मायाच आहे.
मत्तो विनिर्गतं विश्वं मय्येव लयमेष्यति ।
मृदि कुम्भो जले वीचिः कनके कटकं यथा ॥ १० ॥


अनुवाद - माझ्यातून निर्माण झालेले हे विश्व माझ्यातच विलय पावेल. ज्याप्रमाणे घट शेवटी मातीत, तरंग पाण्यात व अलंकार सोन्यात विलय पावतात त्याप्रमाणे माझ्यात जगाचा विलय होतो.


विवेचन - आत्मज्ञान झाल्याने त्या दिव्य स्थितीत राजा जनकाला हे उमजले की हे आत्म-तत्व (ब्रह्म )च मूलतत्व आहे व यामूलतत्वानीच मी आणि हे संपूर्ण जग घडले आहे. हे मूलतत्व सृष्टीच्या प्रारंभी निराकार, अव्यक्त अवस्थेत होते. संकल्पामुळे याच्या चेतनेत तरंग निर्माण झाला. तीच चेतना, सृष्टी रूपात विकसित होत आली आहे. परंतु या सृष्टीचा अंत होईल तेंव्हा हीची अवस्था काय असेल ? ज्ञानी म्हणतात की ही पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात म्हणजे अव्यक्त स्थितीत जाईल आणि नव्या सृष्टीचा आरंभ होईल. हे सृष्टी चक्र याप्रकारेच चालत रहाते. काही धर्म सांगतात की, सृष्टी ईश्वराने बनविली, तोच निर्माता आहे. परंतु असे म्हणणे म्हणजे शास्त्रीय सत्य विसरणे आहे. आणि आज नाही तर कालांतराने विज्ञान याचे समर्थन करेल. जे म्हणतात की सृष्टी अनादि आहे, तिचा कुणी निर्माता नाहीं, त्याच्या या म्हणण्यात काही तथ्यांश आहे परंतु ही कुणी माणसाप्रमाणे असणार्‍या ईश्वराने निर्माण केलेली नाही. परंतु सृजनाच्या (निर्मितीच्या) स्वाभाविक प्रक्रियेने निर्माण झाली आहे. त्याचा कोणताही उद्देश सुद्धा नाही. रूप-परिवर्तन, सृष्टी परिवर्तन होतच रहाते. पदार्थ कधीच नाहीसां होत नाही. केवळ त्याचा रूपाकार बदलतो. हा पदार्थ उर्जेमधे रूपांतरित होऊ शकतो व उर्जेतून पुन्हा पदार्थ निर्माण होऊ शकतो आणि ही शास्त्रज्ञांचीच वैज्ञानिक मांडणी (सिद्धान्त) आहे. राजा जनक सुद्धा हीच वैज्ञानिक गोष्ट सांगत आहेत की हे जग माझ्यातून (आत्मा किंवा ब्रह्म यातून) निर्माण झाले आहे व जे तत्वसुद्धा ब्रह्मच आहे. सर्व आकार हे उर्जेची गोठलेली घनीभूत रूपे आहेत. प्रलयाच्या स्थितीत हे सर्व आकार नष्ट होऊन अरूप, निराकार व अव्यक्त अशा ब्रह्मचैतन्यात विलीन पावतील. ज्याप्रमाणे मातीची भांडी फुटल्यावर ती पुन्हा माती होतात त्याप्रमाणे हे होईल. पाण्यावरची लाट किंवा तरंग संपल्यावर तो समुद्रातले पाणीच होऊन रहातो. वितळवल्यावर दागीने पुन्हा मूळ सोनेच होतात. सर्व आकार आपल्या मूल तत्वात परत येतात. या सृष्टीचे मूलतत्व ब्रह्म आहे. याच चेतन तत्वातून सृष्टी निर्माण झाली होती व यात तत्वात ती पुनरपी परत येईल. राजा जनकाला या मूल-तत्वाची जाणीव झाल्याने तो याची वैज्ञानिक व्याख्या देऊ शकला. सृष्टीची उत्पत्ती व लय याबद्दलची वैज्ञानिक धारणा ही भारतीय तत्वज्ञानाची सर्वोत्कृष्ट उपलब्धी व शोध आहे. वेदात सुद्धा ह्याच सत्याचा उच्चार केला आहे, 'ज्या आत्मब्रह्मातून हे सर्व प्राणी व सृष्टी निर्माण होते; ज्या ब्रह्माचे शक्ति ते जीवन जगतात व मृत्यूनंतर पुन्हा त्याच शक्तित विलीन होतात त्या ब्रह्मालाच तू आपला आत्मा मान.'
अहो अहं नमो मह्यं विनाशी यस्य नास्ति मे ।
ब्रह्मादिस्तम्बपर्यन्त जगन्नाशेऽपि तिष्ठतः ॥ ११ ॥


अनुवाद - मी आश्चर्यजनक आहे ! मला नमस्कार असो ! ब्रह्मापासून गवतापर्यंत सर्व जगाचा नाश झाल्यावर सुद्धा माझा नाश होत नाही (कारण मी नित्य आहे)


विवेचन - आत्मतत्वाचे वैशिष्ट सांगतांना राजा जनक सांगतो की हे केवढे आश्चर्य आहे की ब्रह्मापासून गवतापर्यंत सर्वांचा लय होतो, सर्व काही व प्रत्येक वस्तू प्राणी, पदार्थ, रूप, नष्ट होते पण मी नष्ट होत नाही, कारण मी आत्मा आहे व म्हणून नित्य आहे. जेव्हां संपूर्ण अस्तित्वाची आधारभूत सत्ता मीच आहे मग मी अजून दुसर्‍या कुणाला नमस्कार करू ? माझा मलाच नमस्कार असो ! हे ब्रह्म पारमार्थिक सत्ता आहे. ह्याला कुणी निर्माण केले नसून ह्याचेतूनच सर्वकाही निर्माण झाले आहे. सर्व जगाची निर्मिती झाल्यावरही त्याच्या पूर्णतेला कमीपणा (न्यूनता) येत नाही.जग तर नाशवान आहेच पण ब्रह्मा सुद्धा त्या 'ब्रह्म' चे साकार रूप आहे म्हणून ब्रह्मासुद्धा नष्ट होतो. जे जन्माला आले आहे त्याचा विनाश अवश्य होणार हा जगाचा नियम आहे. यामुळे हे सर्व देव-देवता, इंद्र, ब्रह्मासुद्धा त्या 'ब्रह्म' चे प्रकट रूप आहे, त्यामुळे ते सुद्धा विनाशी आहेत. केवळ हे 'ब्रह्मच' अविनाशी आहे.
अहो अहं नमो मह्ममेकोदुहं देहवानपि ।
क्रचित्र गजा नागना व्याष्य विश्वमवस्थितः ॥ १२ ॥


अनुवाद. - मी आश्यर्यजनक आहे! मला नमस्कार असो! मी देहधारी असूनसुद्धा अद्वैत आहे. कुठे जात नाही, कुठून येत नाही आणि पूर्ण विश्वात व्याप्त (स्थिर) आहे.


विवेचन - राजा जनकाला आत्म-तत्वाची, ब्रह्म चेतन्याची पूर्ण अनुभूती आली व एकाच अब्जीत समग्रतेचे ज्ञान प्राप्त झाले. आत्म शक्तिच्या ज्ञानाने आश्चर्यचकीत होत स्वतःला म्हणजे ब्रह्मचैतन्याला नमस्कार करत ते सांगतात की मी देहधारी असूनही मी अद्रैताचा बोध झाल्याने आता स्वतःच अक्षेत झालो आहे. सर्वसामान्यतः देहधारी स्वतःला परमत्म्यिापेक्षा वेगळा मानतात व ज्याची देहासक्ति संपलेली नाही ते आत्म्याला सुद्धा देहापेक्षा भिन्न ? मानतात. ही भिन्नता अज्ञानामुळे जाणवते. ज्याप्रमाणे सर्व विहिरींमधले पाणी वेगवेगळे असूनही त्या सर्वाचा संबंध महासागराशी असतो, ज्याप्रमाणे चंद्र एकच असूनही वेगवेगळ्या जलाशयातल्या त्याच्या प्रतिबिंबानुसार अज्ञानी माणसास तो वेगवेगळा वाटतो, ज्याप्रमाणे आकाश एकच असून घरातील व बाहेरील आकाशात भेद मानतो, त्याचप्रमाणे अज्ञानी सुख दुःख, राग-विराग, ममता-आसक्ति, जन्म-मूल पुनर्जन्म या संदर्भात आत्म्याला वेगळा मानतात पण वास्तवतः हे सर्व गुण शरीराचे व मनाचे आहेत व अज्ञानामुळे हे गुण आत्म्याला चिटकवले जातात. हे आत्म्याचे गुण नाहीत. आत्मा तर अहेत आहे. एकच आहे व तोच सर्वात समानपणे आहे, सर्वात व्याप्त आहे, आणि या गुणांपासून मुक्त आहे. त्याचे गुणधर्म ह्या शरीरमनाच्या गुणधमपिक्षा भिन्न आहेत. 'ह्यामुळे राजा जनक आत्म्याचे वर्णन करतांना सांगतात की हा कुल येत नाही, हा कुठे जात नाही. हा सर्वात व्याप्त आहे. स्थिर आहे.
अहो अहं नमो मह्यं दक्षो नास्तीह मत्समः ।
असंस्पृश्य शरीरेण येन विश्वं चिरं धृतम् ॥ १३ ॥


अनुवाद - मी आश्चर्यजनक आहे ! मला नमस्कार असो ! माझ्या सारखा निपुण या जगात कुणीच नाही. कारण शरीराला स्पर्श न करताच मी या जगाला सतत धारण केले आहे.


विवेचन - राजा जनक म्हणतात, या जगात माझ्या सारखा दक्ष (निपूण) कोणी नाही. या आत्मतत्वाची निपुणता ही आहे की कोणत्याही शरीराला स्पर्श न करता या विश्वाची मी सतत धारणा करत आहे. याचा अर्थ असा की आत्मतत्वाशिवाय हे जग कसे असू शकेल ? ज्याक्षणी हे आत्मतत्व शरीरातून वेगळे होते, त्याक्षणी ते शरीर मृत झाल्याचे जाहीर केले जाते. सर्व शरीरांना धारण करणारे तत्व म्हणजे आत्माच तर आहे. ही असंख्य शरीरे याच एका तत्वाद्वारे धारण केली जातात. म्हणून हा आत्मा व्यक्तिगत नसून विश्वात्मा आहे. ह्याच विश्वात्म्याने जगाची चिरकाल धारणा केली आहे. हा या आत्म्याचा विशिष्ट गुण आहे. तो स्वतः कर्ता नसूनही त्याच्या गुणांनी स्वाभाविक क्रिया आपोआप होत आहे. ज्याप्रमाणे चुम्बक लोखंडाला प्रयत्न करून ओढत नाही, विद्युत् आपल्या प्रयत्नांनी किंवा इच्छेने प्रकाश देत नाही, सूर्य आपल्या इच्छेने उष्णता व प्रकाश देत नाही, गुरूत्वाकर्षण कोणाच्या आदेशाने वस्तूंना ओढत नाही, ढग व पाऊस कुणाच्या हुकूमाने पाणी देत नाही; हे सर्व त्यांचे त्यांचे स्वाभाविक गुण आहेत ज्यामुळे या सर्व क्रिया आपोआप होत असतात. याचप्रमाणे हे आत्मतत्व या जगाची स्वाभाविकपणे धारणा करीत आहे. त्याच्या मर्जीने नव्हे तर त्याच्या स्वाभाविक गुणांनी धारणा होते. राजा जनकाने एक महान सत्य या सूत्राद्वारे सांगितले आहे. जे लोक सर्व कार्य ईश्वराच्या आदेशाने होतात असे मानतात, त्याला कर्ता मानतात त्यांना या सत्यामुळे कदाचित वाईट वाटेल पण हे एक वैज्ञानिक सत्य आहे. विज्ञानाचा आधारसुद्धा हीच दृष्टी आहे. केवळ धार्मिक कथन नव्हे तर वैज्ञानिक सत्य म्हणून हे जाणून घेतल्यास खरे धर्मतत्व हे अंतिमतः वैज्ञानिक तत्वसुद्धा असते हे समजेल.
अहो अहं नमो मह्यं यस्य मे नास्ति किञ्चन ।
अथवा यस्य मे सर्वं यद्‌चाङ्‌मनसगोचरम् ॥ १४ ॥


अनुवाद - मी आश्चर्यकारक आहे ! मला नमस्कार असो ! माझे काहीच नाही किंवा सारे काही माझेच आहे. जे मन व जाणीचे विषय आहेत.


विवेचन - राजा जनक आत्मरूपाबद्दल सांगतात की मी आत्मरूप आहे म्हणून माझे काहीच नाही. मालकी हक्क तेथे असतो जेथे कशावर ताबा केलेला असतो. आत्मा कशावरच ताबा करत नाही. तो असंग, अक्रिय आहे. म्हणून आत्म्याचे मालकीचे काहीच नाही. तो तर केवळ द्रष्टा आहे, साक्षी आहे. त्याच्या उपस्थितीत सर्व काही होत आहे. त्याच वेळी राजा जनक 'सर्व काही माझेच आहे' असेही सांगतात. याचा अर्थ सर्व काही आत्म्याचे आहे कारण ही सर्व सृष्टी त्याच आत्म्याचा खेळ आहे. त्याचेच नृत्य आहे, त्याचीच लिला आहे. तो काही करत नाही पण सर्व काही त्याच्यामुळे होत आहे. पण तरीही तो कशातच लिप्त नाही. जगातले सर्व उपभोग हे शरीराचे, मनाचे व इंद्रियांचे आहेत; आत्म्याचे नव्हे. या भोगमय शरीरात राहूनही त्या भोगांपासून आत्मा अलिप्त आहे. अशा महान आत्म्याला नमस्कार असो.
ज्ञानं ज्ञेय तथा ज्ञाता त्रितयं नास्ति वास्तवम् ।
अज्ञानाद्‌भाति यत्रेदं सोऽहमस्मि निरञ्जनः ॥ १५ ॥


अनुवाद - ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता हे तीन्ही वास्तव नाहीत, कारण ह्या तीन्ही बाबी केवळ अज्ञानामुळे जाणवतात. मी तर फक्त निरंजन आहे. निर्दोष आहे.


विवेचन - जे जाणून घेतले जाते त्यास 'ज्ञान' म्हणतात. ज्याला जाणून घेतले जाते त्याला 'ज्ञेय' म्हटले जाते व जो जाणून घेतो तो 'ज्ञाता' असतो. कोणत्याही वस्तूचे ज्ञान होण्यासाठी या तीन्ही गोष्टींची गरज असते अन्यथा ज्ञान होत नाही. याप्रकारे कर्ता, कर्म, क्रिया भोक्ता, भोग्य व भोग अशी त्रिपुटी आहे. ह्यापैकी कुणी एक असल्यास उरलेले दोन्हीही असणे जरूरीचे असते. उदाहरणार्थ भोक्ता हजर आहे पण भोग्य पदार्थच नसेल तर तो भोग कशाचा करणार ? मग भोगाशिवाय, हजर असलेल्यास भोक्तासुद्धा म्हणता येत नाही कारण तो भोग होऊ शकत नाही. जर भोग्य पदार्थ आहे पण कुणी भोग घेणारा नसेल तरी भोग होऊ शकत नाही. जर ज्ञाता व ज्ञेय दोन्ही नसतील तर ज्ञान कशाचे व कुणाला होणार ? राजा जनकाला आत्मानुभूतीचे ज्ञान झाले असल्याने त्याला अन्य ज्ञानाची अपेक्षा नाही. जोपर्यंत अज्ञान आहे, आत्मस्वरूपाचे ज्ञान नाही, तोपर्यंत ज्ञाता ज्ञेय व ज्ञान यांच्या स्वतंत्रपणाची जाणीव होत रहाते. (वास्तविक ह्या तीन्ही गोष्टी आत्माच आहेत) ज्ञानी माणसासाठी हे भेद खोटे आहेत. अज्ञानी माणसालाच ज्ञानाची आवश्यकता आहे. त्याला ज्ञान हवे असेल तर ज्या वस्तूचे ज्ञान व्हायचे ती वस्तू असली पाहिजे शिवाय ज्ञान प्राप्तीची क्रियाही करावी लागेल. आत्मा स्वतःच ज्ञान आहे. जगातल्या समस्त ज्ञानाचे ज्ञान तोच आहे त्याने कशाचे ज्ञान घेण्याचा मुद्दाच उद्‌भवत नाही. म्हणून त्याच्यासाठी ह्या तीन्ही बाबी वास्तव नाहीत. अज्ञानी माणसाला हे भेद जाणवतात. ज्ञानी माणसाला नव्हे. अज्ञानी माणूस जगातल्या असंख्य बाबींचे ज्ञान घेण्याचे प्रयत्न करतो पण आत्म्याचे ज्ञान नसल्याने अंतिमतः अज्ञानीच रहातो. ज्ञानी माणूस ज्ञानामुळे तृप्त होतो व तो आत्मज्ञानाशिवाय दुसर्‍या वास्तविक नसणार्‍या ज्ञानाची अपेक्षा ठेवत नाही. म्हणून आत्मज्ञान हेच परमश्रेष्ठ ज्ञान आहे. हेच या सूत्राचे तात्पर्य आहे. जे आत्मज्ञान प्राप्त करतात तेच अज्ञानातून मुक्त होतात.
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

द्वैतमूलमहो दुःखः नान्यत्तस्यास्ति भेषजम् ।
दृश्यमेतन्मृषा सर्वमेकोऽहं चिद्‌रसोऽमलः ॥ १६ ॥


अनुवाद - अहो, दुःखाचे मूळ कारण द्वैत आहे व त्याचे अन्य औषध काही नसून हे सर्व दृश्य खोटे (मिथ्या) आहे. मी एक शुद्ध चैतन्य रस आहे.


विवेचन - राजा जनकास आत्मज्ञान प्राप्त झाल्याने त्याची द्वैतभावना संपुष्टात आली. सर्व भेद संपून एकत्वाचा बोध झाला. 'मी आणि माझे' या भावना नाहीशा झाल्या. या अनुभूतीमुळे राजा जनक म्हणतो की जगाचे दुःखाचे कारण ही द्वैत भावनाच आहे. द्वैताचे कारण आहे अहंकार. या अहंकारामुळे व्यक्ति स्वतःला इतरांपेक्षा व परमात्म्यापेक्षा वेगळी मानते. ह्या भेद व भिन्नतेमुळे लोभ, मोह, स्वार्थ, राग, तिरस्कार, हिंसा, आपला-परका, संग्रह करण्याची वृत्ती आदि दुर्गुणांचा जन्म होतो. सर्व अनर्थाचे मूळ हा अहंकार व द्वैत भावना आहे. या रोगाचा इलाज व औषध, अहंकार दूर करण्याशिवाय दुसरे काहीच नाही. अहंकार नष्ट झाल्याने अद्वैताचे ज्ञान होते व अद्वैताचे ज्ञान झाल्याने स्वार्थ, राग, लोभ, हिंसा या सारखे रोग आपोआप बरे होतात. पण लोक अहंकार अजून बळकट करतात व बाकीच्या रोगांवर उपाय शोधतात तेंव्हा त्या रोगांना औषध नाही हेच खरे. समग्र एकात्म अस्तित्वापेक्षा मनुष्य स्वतःला वेगळा मानतो. तो जगाला तुकड्या तुकड्यात पहातो. तो समजतो की तो एकटा आहे व जगापेक्षा वेगळा आहे. मी त्या समग्र अस्तित्वाचा हिस्सा नाही ही जाणिवच दुःखाचे कारण आहे. माझे स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानून व्यक्ति इतर संपूर्ण अस्तित्वाशी संघर्ष करतो व प्रकृतीवर, सृष्टीवर विजय मिळविण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठीच तो चोरी, हिंसा, हत्या सर्व काही करतो. हे सर्व आपले स्वतंत्र वेगळे अस्तित्व मानल्याने होते. हेच द्वैत आहे. हेच दुःखाचे कारण आहे. परंतु हे द्वैत खोटे आहे हे तो जाणून घेऊ इच्छित नाही. ते जाणल्यास त्याचा अहंकार संपुष्टात येईल. अहंकार व स्वार्थ सोडून दिला तर तो संपून जाईल अशी त्याला भीती वाटते. पण त्याच्या हे लक्षात येत नाही की त्याचे काहीच नुकसान होत नाही व तो संपून जातो असेही नाही. अहंकारामुळे असलेले त्याचे क्षुद्र अस्तित्व संपले तरी त्याचा संबंध त्या परमश्रेष्ठ एकात्म अस्तित्वाशी येईल व व्यक्ति समष्टीत विलीन होईल. मनुष्यत्व संपून तो परमात्म्याशी एकरूप होईल. लाट संपून समुद्र होते, बीज संपून वृक्ष होतो, मनुष्यत्व संपून परमात्मा होतो. जे प्राप्त होईल ते शेकडो पटीने जास्त असेल. त्याचे- ज्ञान नसल्याने क्षुद्रत्वाला घट्ट धरले आहे. ज्या दिवशी मनुष्य हे जाणून घेईल की तो त्या समग्र अखंड अस्तित्वाचा हिस्सा आहे, त्या अस्तित्वापेक्षा तो वेगळा नाही त्या दिवशी त्यास समग्र एकतेचा बोध होईल व त्याचे सारे दुःख नष्ट होईल. परमात्म्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करणेसुद्धा चुकीचे आहे कारण अहंकार कायम ठेऊन असे प्रयत्न करणे हे एक ढोंग आहे. मंदिरात जाणे, टिळे लावणे, पूजा-पाठ करणे वगैरे सर्व गोष्टी मनुष्याचा अहंकार वाढवतात, ज्यामुळे परमात्मा दूर जातो. परमात्मा अशा क्रिया व उपकरणांनी (साधनांनी) मिळत नसतो. तो तर मिळालेलाच आहे व तुमच्या आत आहे. पण अज्ञानामुळे त्याची जाणीव होत नाही, त्याच्यावर जणू धूळ बसली आहे, ती झटकण्याची गरज आहे. त्याची जाणीव झाली तरच अद्वैताची अनुभूती होते. तेंव्हाच सुखप्राप्ती होईल; आनंद होईल. केवळ आपले डोळे उघडून आपले वास्तविक रूप पाहण्याची आवश्यकता आहे. ह्यात गुरूचे महत्त्व एवढेच की तो भ्रम नाहीसा करून सत्यत्याचे दर्शन घडवतो. जनकाला या समग्रतेचा बोध झाला अद्वैताचा बोध झाला. तो जागा झाला व म्हणू लागला 'मी शुद्ध चैतन्य रस आहे' सारे भ्रमाचे पडदे दूर झाले व हे गुरू कृपेमुळे साध्य झाले.
बोधमात्रोम्हमज्ञानदुपाथिः कल्यितो मया ।
एव विमृश्यतो नि- निविळ्ये स्थितिर्मम ॥ १७ ॥


अनुवाद - मी फक्त बोध आहे. परंतु अज्ञानामुळे उपाधिची कल्पना केली गेली आहे. ह्या प्रमाणे नित्य विचार करीत मी निर्विकल्प स्थितीत आहे.


विवेचन - राजा जनक आपल्या आत्मानुभूतीची अभिव्यक्ति करतांना क्रमशः आत्मा म्हणजे काय याचे विवेचन करीत सांगतात की मी आत्मा असल्यामुळे शुद्ध बोध आहे. आत्मरूपाची सृष्टी अखण्ड आहे. त्याचे विभाजन करता येत नाही. त्या आत्म्याला तुकड्या तुकड्यात पहाणे चुकीचे आहे. आत्मा संपूर्ण आहे. त्याला भिन्न भिन्न शरीरात वा पदार्थात विभागित केल्याने त्याची उपयोगीता नष्ट होते, समग्रतेचे सौंदर्य नष्ट होते. शरीर जसे एक आहे, तसेच व त्या स्थितीतच ते सुद्धा आहे, पूर्ण आहे. जर प्रत्येक अवयवाला वेगवेगळे मानून त्यांचा एक दुसर्‍याशी संबंध तोडून टाकला तर त्या छिन्नविछिन्न देहाची काय स्थिती होईल ? अशीच परिस्थिती ह्या जगाची आहे. ज्याप्रकारे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवात एकत्वाचा बोध त्यातील आत्म्यामुळे होतो, त्याचप्रकारे सृष्टीत एकत्वाचा बोध करणारे ब्रह्म आहे. सृष्टीतल्या भिन्न भिन्न पदार्थात प्राण्यात, वस्तूत वेगवेगळेपणा नसून एकता आहे. परंतु त्यांना नावे वेगवेगळी देण्यामुळे ते वेगवेगळे असल्याचा भास होतो. नावे देण्यापूर्वी ते सर्व एकच होते. हे वेगवेगळे नामकरणसुद्धा अज्ञानामुळेच केले गेले आहे. हात, पाय, डोळे, नाक, कान वगैरे अवयवांच्या नावांनी पूर्ण मनुष्याचा बोध होत नाही. पण पूर्ण मनुष्याचा बोध झाला तर या सर्व अवयवांचा बोध होतो.

या दृष्टीमुळे परमात्मा आपण हरवून बसलो. कारखान्यात वेगवेगळे भाग जोडून ज्याप्रमाणे एक यंत्र निर्माण करतात तसे अवयव जोडून काही हे शरीर तयार केलेले नाही तर, एकाच चैतन्य तत्वातून संपूर्ण शरीर विकसित झाले आहे. याचप्रमाणे ही दृष्टी म्हणजे केवळ वेगवेगळे भाग एकमेकांशी जोडलेले नसून एकाच चैतन्यतत्त्वातून विकसित झाली आहे. त्यामुळेच सृष्टीत एकत्व आहे. वेगवेगळे यांत्रिक भाग जोडून तयार केलेला माणूस यंत्र माणूस (रोबोट) होईल, तो जीवंत माणूस असू शकत नाही. माणसे म्हणजे मोटरीचे प्रकार नाहीत तर एकच आत्मारूपी जीवनधारा त्यांच्यातून वाहत आहे. त्याचप्रमाणे सृष्टी आहे. तिच्यात भिन्नता फक्त अज्ञानी माणसांनाच दिसू शकते. ज्ञानी माणसाला त्यात एकताच अनुभवास येते.

हिंदुंची जीवनदृष्टी अद्‌भूत होती त्यामुळे त्यांनी 'विश्वपुरूषाची' कल्पना केली. तसेच सृष्टीच्या सर्व अवयवांना त्या विश्वपुरूषाचेच शरीराचे अवयव असल्याचे मानले, त्यामुळे दृष्टीतल्या एकत्वाचा भंग झाला नाही. जनक याच सत्याचे उच्चारण करतांना सांगतात की वेगवेगळे नामकरण (उपाधी) ची कल्पना ही या अज्ञानातूनच केली गेली आहे. ज्यांना आत्म्याचे ज्ञान नाही, 'ब्रह्म' माहित नाही, तेच या सृष्टीतल्या पदार्थांना वेगवेगळे मानून वेगवेगळी नावे देतात. अन्यथा ही सृष्टी म्हणजे एकच आत्मा आहे. जनक म्हणतात की या प्रकारे नित्य विचार करीत मी निर्विकल्प स्थितीत आहे. आता माझ्यासाठी कोणतीही आकांक्षा, अन्य विचार व विकल्प नाहीत. मी एक आहे, पूर्ण आहे व ही सृष्टी माझ्यापेक्षा वेगळी नाही.
अहो मयि स्थितं विश्वं वस्तुतो न मयि स्थितम् ।
न मे बन्धोऽस्ति मोक्षो वा भान्तिः शान्ता निराश्रया ॥ १८ ॥


अनुवाद - आश्चर्य आहे की माझ्यात स्थिर व व्याप्त असणारे विश्व वास्तवात माझ्यात व्याप्त नाही. त्यामुळे मला बंधन नाही आणि मोक्षही नाही. आश्रयरहित होऊन माझी भ्रान्ती शान्त झाली आहे.


विवेचन - राजा जनकाला एकत्वाचा बोध झाल्यामुळे हे विश्व व परमात्मा वेगळे नसल्याचे ज्ञान झाले. परमात्मा हाच आत्मा व हे विश्व त्याचाच विस्तार आहे. जेंव्हा बंधन असते तेंव्हाच मुक्तिची कल्पना करता येते. बंधनाचा अर्थ असा होतो की आपण मुक्तिसाठी धडपडतो आहे व आपल्याला बांधून ठेवणारा कुणी दुसरा आहे. अज्ञानाच्या स्थितीत मी विश्वाला आत्म्यापेक्षा वेगळा समजत होतो, त्यामुळे संसारातून मुक्त होण्याची इच्छा बाळगत होतो. पण आता मला समजले की हा आत्माच आहे, जग नव्हे; त्यामुळे आता कोणतेही बंधन नाही. हे विश्व जसे अज्ञानामुळे दिसते तसेच बन्धन सुद्धा अज्ञानामुळे होते. जर हे जग असत्य (मिथ्या) असेल तर बन्धनसुद्धा मिथ्याच. जर बंधन असेल तर मोक्षसुद्धा असत्य (मिथ्या) असणार. दोन्हीही असत्य आहेत. मी आश्रयरहित झालो असून माझा कोणताच आश्रय नाही. यास्तव या अज्ञानरूपी बन्ध व मोक्षाचा भ्रमसुद्धा दूर झाला. अज्ञानावस्थेत माझ्यात विश्व सामावले होते पण आता तोही भ्रम नष्ट झाला. आता हे विश्व असत्य आहे व ते माझ्यात नसून मी फक्त आत्मा आहे. मी अज्ञानामुळे विश्वाला देह, इन्द्रिये, ब्राह्मण, क्षत्रिय, आश्रमी, कर्ता, भोक्ता याप्रमाणे न जाणो अजून का काय काय समजलो. तेच माझे जग होते व तेच माझे बंधन होते. आता ते जग उरले नाही म्हणून बंधनसुद्धा उरलेले नाही आणि बंधन नाही म्हणून मोक्षसुद्धा नाही.
सशरीरमिदं विश्वं न किञ्चिदिति निश्चितम् ।
शुद्धचिन्मात्र आत्मा च तत्कस्मित्कल्पनाऽधुना ॥ १९ ॥


अनुवाद - शरीरयुक्त विश्व काहीसुद्धा नाही हे निश्चित आहे. हे शुद्ध चैतन्ययुक्त आत्मा आहे तर याची कल्पना दुसर्‍या कोणत्या पदार्थाच्या आधाराने करता येईल ?


विवेचन - राजा जनक सांगतात की हे विश्व जर शरीरयुक्त असेल तर ते काहीच नाही, त्याचे स्वतंत्र अस्तित्वच नाही. हे शुद्ध चैतन्यमात्र आत्मरूप आहे. आत्मा निराकार आहे व हे विश्व त्याचीच साकार अभिव्यक्ति आहे. म्हणून हे विश्व आत्म्यापेक्षा वेगळे नाही, परंतु आत्माच आहे अशी माझी खात्री झाली आहे. मग याची कल्पना कशी केली जावी ? कल्पना करण्यासाठी दोन गोष्टींची, वस्तुंची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, दोरीत सापाची कल्पना करण्यासाठी दोरी असते व तिच्यावरून सापाची कल्पना केली जाते. म्हणजेच निदान बाह्यांगी तरी दोरीची तुलना सापाबरोबर करण्यासाठी त्या दोन गोष्टीत साम्य असावे लागते. पण जेव्हा हे विश्व केवळ आत्मा रूप आहे तर याचे साम्य अन्य कुणाशी नसल्याने त्याची तुलना व कल्पना कशी करणार ?
शरीरं स्वर्गनरकौ बन्धमोक्षौ भयं तथा ।
कल्पनामात्रमेवैतत्किमे कार्यं चिदात्मनः ॥ २० ॥


अनुवाद - हे शरीर, स्वर्ग, नरक, बंध, मोक्ष आणि भय ह्या सर्व केवळ कल्पना आहेत. त्याच्याशी चैतन्य आत्म्याचा काय संबंध ? (म्हणजेच काही संबंध नाही.)


विवेचन - जनक सांगतात की, शरीर, स्वर्ग, नरक, बंधन, मोक्ष व भय ह्या काल्पनिक गोष्टी आहेत. अज्ञानी माणसाकरिता त्या सत्य आहेत व त्याचा त्या बाबींशी संबंध आहे. अज्ञानामुळे अज्ञानी माणूस शरीरात जगतो व शरीररूपात मरण पावतो, अहंकारामुळे तो कर्ता असतो व भोक्तासुद्धा असतो. तो आपल्या कर्माचे फळ भोगतो आहे. मनामुळे स्वर्ग व नरकाचा अनुभव येतो. अज्ञानी बंधनात सुद्धा असल्याने त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो व तो स्वर्ग नरकाच्या कल्पनेने भयभीत आहे पण ज्याने आत्मस्वरूप प्राप्त केले त्याच्यासाठी ह्या सर्व केवळ कल्पना आहेत व त्याचा ह्या कल्पनांशी काही संबंध नाही.
अहो जनसमूहेऽपि न द्वैतं पश्यतो मम ।
अरणयमिव संवृतं क्व रतिं करवाण्यहम् ॥ २१ ॥


अनुवाद - आश्चर्य आहे की जनसमूहात सुद्धा मला द्वैत दिसून येत नाही. हे सारे माझ्यासाठी अरण्याप्रमाणे झाले असल्याने मी या कशाचा लोभ वा प्रेम करू ?


विवेचन - राजा जनकाला एका नव्या वैचारिक दृष्टीचा लाभ घडला. जग तसेच्या तसेच होते पण त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून गेला. जे जग त्याला कधी सुखकारक तर कधी दुःखदायी वाटत होते ते आता न सुख देते न दुःख देते. प्रेम व घृणा, आपले-परके या सर्व मानसिक अवस्था आहेत. या गोष्टी आत्म्यासाठी केवळ 'आहेत' पण त्याबद्दल आत्म्याला प्रेम नाही व घृणा नाही. आत्म्यासाठी कुणी आपले नाहीत व कुणी परके नाहीत. त्याच्यासाठी हा भेद संपुष्टात आला आहे. त्याची उपस्थिती केवळ द्रष्ट्याची आहे. पहिल्यांदा राजा जनक स्वर्ग-नरक बंध-मोक्ष, भय आणि जग यांना 'कल्पना' म्हणतात पण आता तर त्यांना सर्व जनसमूहसुद्धा अरण्यासारखे दिसू लागले आहेत. त्याची कोणतीच खास ममता या जनसमुहाप्रती शिल्लक नाही. त्याला आता हे द्वैत दिसत नाही की हे वेगवेगळे मनुष्य आहेत व त्यात कुणी मित्र किंवा शत्रु आहेत. सर्वांबद्दलचा व्यक्तिगत भाव नाहीसा झाला. सारा जनसमूह त्यांना आत्म्याचेच एक रूप वाटू लागला व सर्वात एकत्व भाव दिसू लागला. संकुचितपणाच्या सार्‍या मर्यादा निखळून पडल्या. जात, धर्म, भाषा, संप्रदाय, लिंग, राष्ट्रीयता ह्या सर्व कल्पना संपल्या व विश्व-बंधुत्वाचा उदय झाला. ज्ञानी माणसाची दृष्टी अशी असते. माणसांमाणसांत फरक करण्याची, सृष्टीला तुकड्या-तुकड्यात बघण्याची दृष्टी नाहीशी झाली. राहीले फक्त एकमात्र आत्म्याचे एकच अस्तित्व. हे परमश्रेष्ठ ज्ञान राजा जनकाला गुरूकृपेमुळे उपलवब्ध झाले. असत्याचा त्याग केल्यामुळे राजा जनकाला शाश्वत सत्याची प्राप्ती झाली.
नाहं देहो न मे देहो जीवो नाहमहं हि चित् ।
अयमेव हि मे बंध आसीद्या जीविते स्पृहा ॥ २२ ॥


अनुवाद - न मी शरीर आहे, न शरीर माझे आहे, मी जीवसुद्धा नाही. मी निश्चितच चैतन्य आहे. जगण्याची इच्छा हेच माझे बंधन होते.


विवेचन - आत्मज्ञानाच्या स्थितीत राजा जनक जी उत्तुंग आध्यात्मिक उंची गाठू शकलेत, ती फार थोड्या व्यक्तिंना गाठता येते. ही खरोखरीच अद्‌भूत घटना आहे. एका झटक्यात सर्व बाधा पार करून, सर्व बंधने तोडून सर्व विश्वाला द्रष्टा म्हणून पाहण्याची आत्मशक्ति राजा जनकात जागृत झाली. या सूत्रात तर जगण्याची इच्छा ही सुद्धा बंधन असल्याचे सांगून ती सुद्धा तोडण्याची गरज राजा जनक लक्षात आणून देतात. राजा जनक म्हणतो, 'मी केवळ चैतन्य आहे म्हणून मी शरीर नाही व माझे असे शरीर नाही. शरीर आत्मा नाही व आत्म्याचे कोणतेही शरीर नसते. आत्मा अशरीरी आहे. ही सर्व शरीरे स्वतःच आत्मा असल्याने आत्म्यापेक्षा भिन्न नाही. भिन्न असेल तर ती बाब माझी आहे असे म्हणता येते. मी जीवसुद्धा नाही. जन्म व मृत्यू होणारा, अहंकार व लोभात सापडणारा अवगुणांचा जीव असतो. मी तसा जीव नाही. मी तर केवळ आत्मा आहे. पंचतत्वांनी बनलेले व सोळा तत्वांच्या रूपाने विकसित झालेले हे लिंग शरीर आहे. चेतनाशक्तिने मुक्त होऊन हे शरीर 'जीव' होते. (शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाच तन्‌मात्रा आहेत. यापासून पाच महाभूतांची (पंचतत्त्वांची) रचना होऊन आकाश, वायू, अग्नी, जल व पृथ्वी निर्माण झाली. ही पंचभूते, दहा इंद्रिये व सोळावे मन या सोळा तत्त्वाचे रूपात विकसीत व सत्य रज तम या तीन गुणांनी युक्त असे लिंग शरीर आहे. ते चेतनशक्ति म्हणजे आत्म्याशी संयुक्त होऊन 'जीव' बनते. म्हणून जनक म्हणतो की मी केवळ चैतन्य आहे. जीव नाही.

जनक पुढे सांगतो कि - माझे बंधन एवढेच होते की मला जगण्याची इच्छा होती. ही जगण्याची इच्छा सर्वात मोठी वासना आहे. याचा अर्थ असा नाही की आत्महत्या करून जीवन संपवून टाकावे. या प्रकाराने केवळ शरीर नष्ट करता येईल. परंतु जगण्याची वासना नष्ट होणार नाही. त्यामुळे आपल्या अतृप्त वासनांच्या पूर्तीसाठी पुन्हा शरीर धारण करावे लागते. ही अतृप्त वासनाच पुन्हा पुन्हा शरीर धारण करण्यास भाग पाडते. ही मनुष्य योनी कर्म योनी आहे. तशीच भोग योनी सुद्धा आहे. अन्य पशुपक्षी केवळ भोग-योनीत आहेत. मनुष्याजवळ अनेक जन्मात केलेल्या चांगल्या वाईट कर्मांचे व वासनांचे संचित भांडार आहे. त्यातून थोडेसे संचित तो या जन्मात उपभोगासाठी खर्च करून उरलेले सर्व पुढील जन्मांसाठी सुरक्षित ठेवतो. हे मनुष्य शरीर त्यास एका ठराविक कालावधी करताच प्राप्त होते. परंतु वेळेच्या आधी शरीर नष्ट केल्यास ते अभोग्य कर्म त्या जीवास पुढच्या जन्मात उपभोगावे लागते. म्हणून धर्मशास्त्रात आत्महत्येला पाप मानले आहे. पाप मानण्याचे कारण असे आहे की ईश्वराने जे शरीर एखाद्या नियुक्त केलेल्या कालावधीसाठी दिले आहे ते विकृत करणे मनुष्याच्या चुकीचा दृष्टीकोनच त्याला कारणीभूत असतो.

जिज्ञासु साधक असाही प्रश्न विचारतात की जगायचे ते तरी कशासाठी ? त्याचा उद्देश काय ? जीवन आपल्याला प्राप्त होते ते कशासाठी ? जीवनाचे सार काय आहे ? खाणे, पिणे, मैथून करणे, मुले निर्माण करणे व शेवटी मरणे हेच जीवन आहे का ? मुमुक्षू व्यक्ति असे प्रश्न करत नाही. तो सरळपणे, स्वच्छपणे व निःशंक मनाने मुक्तिची इच्छा धरतो. बुद्धिमान व्यक्तिच अशी इच्छा मनी धरतात. ज्ञानी माणसाच्या सर्व शंका फिटतात. त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. मूढ माणसात एवढी जिज्ञासा जागृत होण्याएवढी बुद्धिच नसते. ह्या सार्‍या शंका जिज्ञासूच्या आहेत. पण अलीकडे एखाद्या जिज्ञासूने प्रश्न केला की त्याला हजरजबाबी उत्तर देणारेसुद्धा एका पायावर उभे असतात. त्यांच्याजवळ रेडिमेड उत्तरे तयार असतात. कोणी सांगतात की जीवनाचा उद्देश मुक्ति मिळविणे आहे. कोणी म्हणते मोक्षासाठी जीवन आहे. कोणी सांगतात सेवेसाठी आहे. कोणी म्हणतात की हे जीवन म्हणजे ईश्वर प्राप्तीचे साधन आहे. कोणी म्हणतात की जीवन असार आहे. त्यात सार नाही. याप्रमाणे वेगवेगळी मते आहेत. परंतु जनक म्हणतात जीवन जसे आहे तसेच स्वीकार करा, स्वाभाविकपणे जगणे हेच उत्तम आहे. याचा तिरस्कार करू नका व मोह धरू नका. हे जीवन पापामुळे मिळालेले नाही, उलट ते तर परमेश्वराचे वरदान आहे. भोगांची इच्छा धरू नका व त्यागाची इच्छा धरू नका. जगण्याची इच्छा धरू नका व मृत्यूची इच्छा करू नका. ईश्वराने जीवन दिले, चांगली गोष्ट आहे. तो हे जीवन परत घेईल तरी हरकत नाही. सर्व त्याच्या मर्जीने होऊ द्या. तुम्ही विनाकारण याची उद्दिष्ट्ये ठरवू नका. जगण्याच्या इच्छेतून, भोगाच्या इच्छेमुळे तुम्ही चोरी, हत्या, शोषण, बेईमानी करून स्वतःला जीवंत ठेवाल तर ते सुद्धा पापच आहे. जेवढे अधिक जीवंत राहण्याची इच्छा होईल तेवढी अधिक पापे कराल. त्यामुळे पापकर्म न करतां स्वाभाविकपणे जेवढे सहजरित्या जगता येईल तेवढे जगा परंतु जेंव्हा तुमची स्वतःची जगण्याची इच्छा बळकट होईल तेंव्हा पापालाही सुरवात होईल. जगणे शुभ आहे पण जगण्याची वासना पापाकडे नेते म्हणून जर वासना पूर्ण झाली नाही तर पुन्हा जन्म घ्यावा लागेल. ही इच्छाच तुमचे बंधन होते. जनकसुद्धा हेच सांगतात की, 'माझी सुद्धा जगण्याची इच्छा होती व हेच माझे बंधन होते. पण आता मी मुक्त आहे.'
अहो भुवनकल्लोलैर्विचित्रैर्द्राक् समुत्थितम् ।
मय्यनन्तमहाम्भोधौ चित्तवाते समुद्यते ॥ २३ ॥


अनुवाद - हे केवढे आश्चर्य आहे की विस्तीर्ण समुद्रासारखा मी असून चित्तरूपी हवेमुळे माझ्यात जगाच्या रूपाने तसा निर्माण होतात.


विवेचन - राजा जनक ह्या सूत्रात उपमा देऊन हे स्पष्ट करू इच्छितात की आत्मा एखाद्या विशाल समुद्रासारखा आहे ज्याचा कुठे शेवट नाही. पण चित्तरूपी हवेमुळे त्यात जे तरंग निर्माण होतात तेच जग आहे. ह्यात तीन तथ्ये सांगितली आहेत. पहिले हे की आत्मा असीम आहे, त्याला मर्यादा नाहीत, समुद्राप्रमाणे तो विशाल असून तो सीमाबद्ध नाही. ज्याप्रमाणे हवेच्या झोतामुळे समुद्राच्या पाण्यात उंचलहान, छोट्या मोठ्या लाटा व तरंग निर्माण होतात त्याप्रमाणे चित्तरूपी हवेमुळे या आत्म्यात वेगवेगळ्या वासनांचे तरंग निर्माण होतात. मनुष्याच्या वासना, काम, क्रोध, लोभ, मोह, प्रेम, घृणा, उत्तेजीत वृत्ती हे सर्व आत्म्यात निर्माण झालेले तरंग आहेत. मनुष्य ते निर्माण करू शकत नाही किंवा थांबवू शकत नाही. या तणाचेच नाव विश्व किंवा जग आहे. पाण्यातले तरंग जसे समुद्रापेक्षा वेगळे नसतात. तसेच हे जगसुद्धा आत्म्यापेक्षा वेगळे नाही. चित हवेप्रमाणे चंचल आहे. त्यामुळे आत्मारूपी जगात तरंग निर्माण होणारच. योगशास्त्र ह्या चंचल चित्ताच्या वृत्तीच्या निरोधाचा उपदेश करते. "योगश्चित्तवृत्तिनिरोधः" जर योगचित्तवृत्तींचे नियंत्रण व निरोध करता आला तर आत्मरूप होणे शक्य आहे. चंद्राचे प्रतिबिंब समुद्राच्या पाण्यात पडते पण लाटांमुळे ते दिसत नाही. लाटा शान्त झाल्यावरच त्या प्रतिबिंबाचे आपण नीट दर्शन घेऊ शकतो.
मय्यनन्तमहाम्भोधौ चित्तवाते प्रशाम्यति ।
अभाग्याज्जीव वणिजो जगत्पोतो विनश्वरः ॥ २४ ॥


अनुवाद - अनन्त महासागराप्रमाणे मी आत्मा असून चित्तरूपी हवा थांबल्यावर जीवरूपी व्यापार्‍याच्या दुर्दैवाने जगतरूपी नौकेचा नाश होतो.


विवेचन - जनक म्हणतात आत्मारूपी समुद्र तर शान्त आहे. निर्मळ आहे. क्षोभरहित आहे, निर्दोष आहे, निर्विकार आहे. जर चित्तरूपी हवा नसेल तर त्यात तरंग निर्माण होणार नाहींत. ह्या चित्तामुळेच आत्मारूपी समुद्रात तरंग निर्माण होतात. चित्तवृत्तीमुळे तरंगरूपी वासना निर्माण होतात. हे तरंग आत्मारूपी समुद्रापेक्षा वेगळे नाहीत परंतु 'अहं' भावामुळे हे वेगळे वाटू लागतात, आपले अस्तित्व वेगळे मानू लागतात. हे अज्ञान अहंकारामुळे निर्माण होते. जगाला आत्म्यापेक्षा वेगळे किंवा नष्ट करणे ईश्वरीय नियमांचे उल्लंघन आहे. हेच ते पाप आहे ज्याची शिक्षा परमेश्वर जरूर देतो. आत्महत्येच्या मागे ही सुद्धा समजूत आहे की ही सुद्धा वासना आहे. ज्यांची वासना सर्वात जास्त असेल आणि जग त्या वासना पूर्ण करू शकले नाही तर मग ते आत्महत्येची मदत घेतात. आत्महत्या वासनामुक्तिचा उपाय कधीच असू शकत नाही. महावीरासारखी व्यक्तिमत्त्वे आत्मज्ञानी झाल्यानंतर सुद्धा चाळीस वर्षे जीवंत राहीली. ते म्हणत की जेवढ्या वेळेसाठी ईश्वराने हे शरीर दिले आहे ते योग्य वेळेच्या आधीच एखाद्या रांजण किंवा माठासारखे फोडून टाकू ही सुद्धा वासनाच आहे. ह्या शरीराने माझे काम पूर्ण केले. आता त्याला नष्ट करू ही सुद्धा वासनाच आहे, स्वार्थ आहे. हा घट स्वाभाविकपणे जेव्हा फुटणार आहे तेव्हा फुटून जाओ. फोडण्याची इच्छा उचित नाही. दिर्घ उपवास करून जे कुणी प्राणत्याग करू इच्छितात, ते सुद्धा महापाप करतात. कारण तसे करणे सृष्टीच्या नियमांच्या विरुद्ध आहे. अशा व्यक्ति जणू जगतांना अशी अट घालतात की असे असेल, तसें घडेल तरच जगेन अन्यथा जगणे व्यर्थ आहे. आपली अट पूर्ण झाली तर आत्महत्या करून घेतात. आत्महत्या करणारा मनातून भोगाच्या (काही तरी त्याच्या वासने नुसार घडण्याच्या) वासनेने ग्रस्त आहे. म्हणून हे पाप आहे. शिवाय अनेकांना आपण मेल्यावर आपल्याला लोकांनी महान समजावे अशी वासना असते. वासनेसाठी केलेला जीवनत्याग हे पापच आहे.

मग राजा जनक जगण्याच्या इच्छेला बंधन का म्हणतो ? राजा जनक म्हणतो की इच्छा बंधन आहे. जगण्याची इच्छा सुद्धा बंधन आहे. जगण्याची इच्छा भोगांच्या इच्छेतून निर्माण होते. अधिक जगलो तर अधिक भोग भोगेन अशी भोगेच्छा आहे. जर भोगांची इच्छा नाही, अन्य कोणती वासना नाही, आपले-परके व रागद्वेष नाही, भेद नाही, सर्व सृष्टी आत्म्याचेच रूप जाणवू लागली. जेवढ्या वैयक्तिक आकांक्षा होत्या त्या नामशेष झाल्या, तरीसुद्धा जगण्याची इच्छा करणे म्हणजे काहीतरी वासना शिल्लक आहे. मोह-ममता, राग-द्वेष मनात कायम आहेत. सर्व वासना, इच्छा संपल्यावर शरीर जीवंत राहील पण आकांक्षारहित राहील. साधे निसर्गसुलभ अस्तित्व राहील, जीवन राहील पण कर्म किंवा जगाबद्दल आग्रह रहाणार नाही. अशी व्यक्ति 'जीवन्मुक्त' होईल. असे जगणे ही एक उच्च कोटीची कला आहे. ह्या कलेचे ज्ञान नसल्याने अज्ञानी दुःखी राहतात. दुःख काही भाग्य किंवा नशिब नसते आणि ईश्वराचा शापसुद्धा नसतो व स्वतंत्र मानण्यामुळेच काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया या प्रवृत्ती वाढल्या, जगण्याची भोगमय इच्छा झाली, वासना, इच्छा वाढल्या, सम्पत्ती व साधने गोळा करण्याची वृत्ती वाढली. याप्रमाणे अनेक प्रकारे या प्रवृत्तींचा विस्तार होत गेला व मनुष्य स्वतःच विणलेल्या मायाजालात अडकत गेला. जनक सांगतात की तरंग म्हणजेच विश्व असून ते आत्मारूपी समुद्रात चित्तरूपी वासनांच्या हवेमुळे निर्माण झाले आहे. हा जीवरूपातला व्यापारी संसारातल्या भोगांची अभिलाषा बाळगतो. त्याची जीवननौका या चित्तरूपी हवेमुळेच चालते. म्हणजेच जोपर्यन्त हे चित तरंग आहेत, तोपर्यन्तच विश्व आहे. जर चित्तरूपी हवा जोरात वाहू लागली तर वासना, मोह, अहंकार, लोभ अधिकच वृद्धींगत होतात व जगात अन्याय अत्याचार, वैमनस्य, घृणा, हिंसा यातही वाढ होते. परंतु हवा एकदम बंद झाली तर ह्या हवेमुळेच चालणारी ही नाव तेथेच विनाश पावते. कारण हवा नसतांना ती जाऊ शकत नाही. म्हणून चित्तरूपी हवा ही या जगाचा आधार आहे व जीवरूपी व्यापारी तिच्या बळावरच भोगांचा व्यापार प्राप्त करतो. पण ह्या जीवरूपी व्यापार्‍याचा फायदा ह्यातच आहे की हवा जास्त जोरात वाहू नये, वादळवारे निर्माण होऊ नयेत आणि त्याचप्रमाणे हवा एकदम बंद, शान्त होऊ नये कारण तसे झाले तर हवा चालणारच नाही. एका हिन्दी कवीने जगाचे वर्णन करतांना म्हटले आहे की -

"दर्द भी होता रहे, होती रहे फरियाद भी ।
मर्ज भी कायम रहे, जिन्दा रहे बीमार भी ॥

हेच जगाचे वास्तविक रूप आहे. ह्यापेक्षा वेगळ्या रूपातल्या जगाची कल्पना करता येत नाही. राजा जनक ह्या सूत्रात जगाला नव्हे तर मुक्तिला महत्त्व देत म्हणतात की जर चित्तरूपी हवेचे वाहणे बंद केले तर हे तरंग निर्माणच होणार नाहीत, आत्मारूपी समुद्र शान्त होईल, तरंग रूपी जग विलयाला जाईल, जीव आपल्या नावेचे अस्तित्व टिकवू शकणार नाही, जगाबरोबर त्याची जी भोगाची देवाण घेवाण आहे ती बंद होईल, व या नौकेचा विनाश होईल. जीवरूपी व्यापार्‍याचे हे दुर्दैवच ठरेल कारण जीवाचा मुख्य आधार जग आहे, भोग आहे, वासना आहे. पण राजा जनक या दुर्भाग्यालाच सौभाग्य समजतात. जीवासाठी हे दुर्भाग्य वाटत असले तरी जीव या जगापासून वेगळा होऊन आत्मरूपात विलीन होऊन अमृत होतो. तसा संपल्यावर तो समुद्र होतो, जीवाचा विनाश झाल्यवर तो आत्मा होतो. वास्तवात त्याचे काहीच नुकसान होत नाही. तरंगाला समुद्रापेक्षा वेगळे मानण्याची जी भ्रांती होती, जे अज्ञान होते ते नष्ट होताच तसा समुद्र होतो. जनक हेच सत्य सांगतात की, 'माझे जीवरूप नाहीसे होऊन आत्मरूप झाले.' पतंजलि मुनी सांगतात की, "जेंव्हा चित्त वृत्ती स्तब्ध होतील तेंव्हाच जीव आपल्या रूपात स्थिर राहील. अन्य प्रसंगी चित्तातील वृत्तीप्रमाणेच तो होतो."
मय्यनन्तमहाम्भोधावाश्चर्यं जीववीचयः ।
उद्यानि घ्नन्ति खेलन्ति प्रविशन्ति स्वभावतः ॥ २५ ॥


अनुवाद - आश्चर्यच आहे की महासागर रूपी आत्मरूप असणार्‍या माझ्यात जीवरूपी तरंग निर्माण होतात, परस्परांशी संघर्ष करतात, खेळतात व स्वभावतःच लय पावतात.


विवेचन - राजा जनक अष्टवक्राच्या समोर आपल्या आत्मानुभूतीची अभिव्यक्ति करीत आहे. अभिव्यक्तिच्या या शेवटच्या सूत्रात राजा जनक अभिव्यक्तिच्या क्षणातील अनुभूतीचा अर्क किंवा सार सांगतात, आणि काहीही न लपवता असे सत्य प्रकट करतात की राजा जनकाला खरोखरीच वास्तविक ज्ञान झाले आहे याबद्दल अष्टवक्राची खात्री पटावी. जनक म्हणतात की मी माझ्या वास्तवरूपात म्हणजे आत्मरूपात आलो आहे. मी आता मर्यादा असलेला जीव उरलेलो नाही, या समुद्रातील एक तरंग नसून विशाल महासागर झालो आहे. आधीसुद्धा महासागरच होतो परंतु अहंकारामुळे अज्ञानामुळे मी जीव (तरंग) रूपात त्या आत्म्यापेक्षा (महासागरापेक्षा) वेगळा मानत होतो. माझ्या चित्ताच्या चंचलतेमुळे व अहंकारामुळे हे अज्ञान निर्माण झाले होते. आज हा सारा भ्रम नष्ट झाला असून मी माझ्या वास्तविक आत्मरूपात प्रतिष्ठित झालो आहे. अहंकार नष्ट झाला, भेद नष्ट झाला, एकात्मततेची जाणीव झाली, व्यक्ति व समष्टीतला भेद नाहीसा झाला, बिंदु होतो ते आता समुद्र झालो, मर्यादित होतो ते आता अ-मर्यादित, असीम झालो, सर्व अडथळे दूर झाले, संकुचिततेची कैद संपली, सर्व द्वैत-भाव नाहीसा झाला. आता मी एकटा आत्मरूपात स्थित आहे, ही सर्व गुरूची कृपा आहे. आता या आत्मारूपी महासागरात जीवरूपी तरंग निर्माण होतात, परस्परांशी संघर्ष करतात, खेळतात व स्वभावतः लय पावतात. ह्यावरून हे तथ्य समजून घ्यायला हवे की एकदा तरंग शाम्त झाल्यावर पुन्हा कां निर्माण होतात किंवा पुन्हा निर्माण होतात याचा अर्थ तरंग शान्त झालेले नाहीत. याबाबत राजा जनक सांगतात की एकदा सर्व शान्त झाले, तरंग निर्माण होणे बन्द झाले, मी आपल्या स्वरूपाला जाणले की मी जग नसून आत्मा आहे. तरंग नसून समुद्र आहे, जीव नसून आत्मा आहे परंतु चित्ताचा स्वभाव आहे चंचलता ! ह्यातून तरंग निर्माण होणारच, हे वासनेचे तरंग तरीही निर्माण होतात, परस्परांशी संघर्ष क्ततात, खेळतात परंतु मी स्वतःला या सर्वांपेक्षा भिन्न मानण्यास शिकलो असल्याने या वासना तरंगांचा माझ्यावर काहीच प्रभाव पडत नाही. मी या सर्वांचा द्रष्टा झालो आहे, साक्षी झालो आहे, मी फक्त बघतोय. पहिल्यांदा त्या माझ्यावर हुकमत गाजवत. आता मी त्यांच्यावर हुकमत गाजवतो. मी द्रष्टा झाल्याने आता हे तरंग निर्माण होतात व नंतर आपोआप शांत होतात. पहिल्यांदा यांना शांत करण्यासाठी योग समाधि, जप, तप, उपासना न जाणो अजून कितीतरी अन्य मार्गांनी यांचा निरोध करण्यासाठी मी प्रयत्न करीत होतो. पण आता साक्षी, द्रष्टा झाल्याने हे तरंग स्वाभाविकपणे शान्त होतात. मी तर जणू आता या सर्व तरंगांच्या खेळाचे नाटक पाहतोय, एवढा मी फक्त प्रेक्षक व तटस्थ झालो आहे. समुद्रकिनार्‍यावर बसून हा लाटांचा खेळ पाहतोय. हीच आत्म-दृष्टी आहे.

संसार सारा तसाच आहे. विश्व तेच आहे, त्याच्यात कोणतेही परिवर्तन झालेले नाही. कुणी व्यक्तिला ज्ञान-दृष्टी प्राप्त झाल्याने जगातील गति-विधीत काही बदल होत नसतो. केवळ एका ज्ञानी माणसाला जी ज्ञानाची प्राप्ती होते त्यामुळे केवळ त्याची स्वतःची जगाकडे बघण्याची दृष्टी बदलते, पाहण्याची पद्धत बदलते. अज्ञानी जगातील सर्व व्यवहारात गुरफटून जातो, ज्ञानी किनार्‍याला उभा राहतो. जगात राहूनही तो जगापासून, पाण्यातले कमळ पाण्यापासून अलिप्त रहाते, तसा अलिप्त रहातो. हीच ज्ञानी माणसाची प्राप्ती आहे. आत्मज्ञानामुळे मन, बुद्धि, चित्त, अहंकार हे नष्ट होत नाही. हे सर्व आत्म्यात विलिन होतात व स्वभावतः पुन्हा निर्माण होतात परंतु यांचा पुन्हा पुन्हा निरोध करावा लागत नाही. ज्ञानी साक्षी झाल्याने यांचा त्याचेवर प्रभाव पडत नाही.

राजा जनकाला ज्या एका घटनेत जे प्राप्त झाले ते अमोल आहे. अशी घटना हळूहळू घडत नाही तर एका क्षणात घटीत होते. त्याक्षणी जर साधकाची पूर्वतयारी नसेल तर तो त्या शक्तिला स्वीकारू शकत नाही. त्यामुळे त्याला वेड लागू शकते किंवा त्याच्या मृत्यू होऊ शकतो. म्हणून आत्मज्ञानाची घटना घडतांना गुरूची उपस्थिती आवश्यक आहे. अचानक होणारे हे संपूर्ण परिवर्तन साधकाच्या शरीराला, मनाला, इंद्रियांना, स्नायुंना हादरवून टाकते. हा सामान्य अनुभव नाही. हा त्या विराटाचा अनुभव आहे. ह्या विराटाच्या दर्शनाने अर्जुन भयभीत झाला होता. अर्जुनः कृष्णाला म्हणाला की आपले तेज मर्यादित करा. सामान्य सुखाने सुद्धा मनुष्य वेडा होतो तर त्या विराट ज्ञानाचे सुख तो कसे काय सहजरित्या स्वीकारू शकणार ? म्हणून गुरू त्या वेळेस मदत करतात. सांगितल्यामुळे सुखाचा व दुःखाचा भार कमी होतो म्हणून ते सहन करणे शक्य होते. राजा जनकाने जे अनुभवले त्याची अभिव्यक्ति करून त्या अनुभवामुळे उद्‌भवलेला आवेग कमी करतात. यासाठी गुरूची उपस्थिती आवश्यक मानली आहे.

GO TOP