|
अष्टावक्रगीताप्रकरण २०आत्मरूप स्थितीत सर्व द्वंद्व संपुष्टात येतात.
क्व भूतानि क्व देहो वा क्वेन्द्रियाणि क्व वा मनः । अनुवाद : - माझ्या निर्दोष स्वरूपात पंचमहाभूते कुठे आहेत ? देह कुठे आहे ? इंद्रिये कुठे आहे ? किंवा मन कुठे आहे ? कोठे शून्य आहे ? आणि कोठे नैराश्य आहे ? विवेचन : - आपल्या जीवन्मुक्तीच्या अवस्थेचे वर्णन करतांना राजा जनक म्हणतात की मी आत्मरूपात स्थिर झाल्यामुळे सर्व भूतांच्या (पंचभूतांच्या) विकारातून मुक्त झालो आहे. माझे हे आत्मस्वरूप निरंजन म्हणजे निर्दोष आहे, शुद्ध आहे. यामध्ये विरुद्धधर्मी तत्व एकही नाही. सर्व संयुक्त व एकच आहे. भिन्नता अशी कुठेच दिसून येत नाही. अज्ञानाच्या स्थितीत माझ्या मनाच्या कॅमेऱ्याच्या प्लेटवर सर्व आकारांची, संस्कारांची चित्रे उमटत होती. परंतु आता हा आत्मा केवळ आरशाप्रमाणे आहे. ह्यावर चित्र उमटतच नाहीत. हा केवळ साक्षी आहे. द्रष्टा (पाहणारा) आहे. ह्याच्यात विकार निर्माण होत नाही. धारणा तयार होत नाही, विचार निर्माण होत नाही. हा सदैव अलिप्त असतो. मी मन नसून आत्मा आहे म्हणून माझ्यात ही पंचमहाभूते, देह, इंद्रिये, मन काहीही नाही. ह्यात शून्य सुद्धा नाही व नैराश्यसुद्धा नाही. हीच आत्म्याची महानता आहे.
क्व शास्त्रं क्वात्मविज्ञानं क्व वा निर्विषयं मनः । अनुवाद : - सदैव द्वंद्वरहित असल्याने मला कुठले शास्त्र, कुठले आत्मविज्ञान ? कोणते विषयरहित मन ? कुठे तृप्ती व कुठे तृष्णेचा अभाव आहे ? विवेचन : - जेथे द्वैत आहे तेथे मन आहे. चैतन्यस्वरूप आत्म्यात कोणतेही द्वैत च्यी. तेथे स्त्री-पुरुष असा भेद नाही, जड-चैतन्य, प्रकृति-पुरूष, सगुणण-निर्गुण, ज्ञान-विज्ञान, तृष्णा-तृप्ति वगैरे सर्व भेद नाहीसे होऊन एकच एक तत्व उरते. दोन असतील तर तेथे भेद असतो. म्हणून राजा जनक म्हणतो की आत्मज्ञान प्राप्तीमुळे मी द्वंद्वरहित झालो. आता मला शास्त्राची आवश्यक्ता नाही. शास्त्रे वाचून आत्मा कसा आहे हे जाणण्याची गरज नाही, आत्म-विज्ञानाची सुद्धा आवश्यक्ता नाही. कारण अभ्यास करून जे जाणता येते ते सर्व बौद्धिक असते. मी तर स्वतः आत्मा आहे, आता मला शास्त्र किंवा विज्ञान वाचून काय करायचे ? मी विषयरहित मनाचासुद्धा विचार करत नाही. सर्वप्रथम अष्टवक्र स्वामींनी सांगितले होते की विषयांना विषाप्रमाणे सोडून दे, त्याग कर. पण विषयांचा त्याग केल्यावर विषयरहित मनाची कल्पनासुद्धा उरली नाही. अशा स्थितीत तृप्तीसुद्धा नाही कारण तृप्तीचा अनुभव अतृप्त माणसाला येतो. तृष्णेचा (वासनेचा) अभाव आहे असा विचारसुद्धा आता येत नाही, अशा स्थितीत आता मी जगतोय.
क्व विद्या क्व च वाविद्या क्वाहं क्वेदं मम क्व वा । अनुवाद : - स्व-रूप असणाऱ्याचे कोणते रूप आहे ? विद्या कोणती व अविद्या कोणती ? कुठे 'मी' आहे किंवा कुठे 'इथे' आहे ? कुठे 'माझे' आहे ? कुठे 'बंधन' आहे ? किंवा कुठे 'मोक्ष' आहे ? विवेचन : - आत्मज्ञानी माणसाची स्थिती अवर्णनीय असते. तिचे अचूक वर्णन करून सांगणे अवघड असते. जनक त्याच स्थितीचे वर्णन करतात की आत्माच निजस्वरूप आहे. अन्य सर्व रूपे ही कृत्रीम आहेत. केवळ भ्रमामुळे ती सत्य भासतात परंतु वास्तवात ते फक्त 'माया' आहेत. हा मायेचा पडदा दूर झाल्यावरच स्वतःचे आत्मस्वरूपाचा बोध होतो. परंतु त्याचे काही रूप नाही. आत्म्याचे असे कोणतेच रूप नाही, की ज्याचे वर्णन करता येईल, ज्याला पाहता येईल, आत्म्यात विद्या (ज्ञान) किंवा अ-विद्या म्हणजे जगसुद्धा नाही. कारण विद्या व अविद्या हे सुद्धा भ्रम आहेत. दोन्ही माया आहेत. आत्म्यासाठी 'मी' व 'इथे' असा भेदसुद्धा अस्तित्वात नाही. कारण अहंकारामुळेच 'मी' ची जाणीव होते व 'मी' असल्यावरच 'हे' असल्याचा भास होतो. आत्मा एकच आहे त्यांत सुद्धा कुणीच नाही म्हणून हा भेद सुद्धा शिल्लक रहात नाही. जीथे 'मी' नाही तिथे 'माझे' असे काहीच नाही. आत्म्याचे कोणतेच बंधन नाही. म्हणून 'मोक्ष' सुद्धा नाही. बंधन नाही. कारण बंधने केवळ अज्ञानामुळे असतात. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत बंधन असते. आत्मा स्वयं ज्ञानी आहे. त्याचे कोणतेच बंधन नाही व त्याचा कोणताच मोक्ष नाही तो तर नित्य आहे, बंधन व मोक्ष दोघांचे कारण अहंकार आहे. अहंकारविरहित माणूस दोन्ही बाबीतून मुक्त आहे.
क्व प्रारब्धानि कर्माणि जीवन्मुक्तिरपि क्व वा । अनुवाद : - सदैव निर्विशेष असल्याने मला प्रारब्ध कर्म कशाचे ? किंवा जीवन्मुक्ति कशाची ? आणि कुठे विदेही कैवल्याची अवस्था आहे ? विवेचन : - शास्त्र सांगतात की आत्मज्ञान झाल्यावर संचीत कर्मे नष्ट होतात व क्रियामाण (केलेल्या) कर्मांची फले सुद्धा भोगावी लागत नाही. कारण कर्तेपण न उरल्यामुळे भोक्तेपण सुद्धा उरत नाही पण प्रारब्ध कर्मे मात्र भोगावी लागतात. त्यांचे भोगाशिवाय वि-देहमुक्ति होत नाही. परंतु राजा जनक यापेक्षाही खूप पुढची, सर्व शास्त्रांच्या मान्यतेपेक्षा वेगळी गोष्ट सांगतात. ते म्हणतात 'मी आत्मा असल्याने विर्विशेष आहे कारण आत्मा अद्वैत असल्याने सर्व विशेषत्वापासून मुक्त आहे.' जर कुणी सामान्य असेल तरच दुसरा विशेष असतो. आत्म्यात द्वैत (दोन असे काहीही) नाही त्यामुळे सामान्य व विशेष असेही त्याच्यात काही नाही. हा भेद द्वैतामुळे जाणवतो पण ते केवळ अज्ञान आहे. म्हणून आत्म्याचे प्रारब्ध कर्मसुद्धा नसल्याने त्याची जीवन्मुक्ति सुद्धा नाही. भोगण्यासाठी जर प्रारब्ध कर्मे असतील तर त्याचा अर्थ भोगणारा अहंकार शिल्लक आहे अन्यथा भोगणारा कोण ? आत्मज्ञानी अहंकाररहित शुद्ध चैतन्य मात्र आहे. तो कर्ता नाही व भोक्ता नाही. मग प्रारब्ध कर्मांचे अस्तित्वच कुठे शिल्लक रहाते ? भोगण्यासाठी लागणारा अहंकारच शिल्लक राहिला नाही, कारण आत्मा कशाचाही भोग करत नाही. म्हणून प्रारब्ध कर्म सुद्धा व्यर्थ व निरर्थक होऊन नष्ट होतात. म्हणून जीवन्मुक्तिचाही प्रश्न उरत नाही व जेंव्हा जीवन्मुक्ति नाही तेंव्हा वि-देह कैवल्यसुद्धा नाही. विदेहमुक्ति सुद्धा तेंव्हाच असते जेंव्हा जीवन्मुक्ति असते. जीवन्मुक्ती नाही तर विदेहमुक्ति असू शकत नाही. जर आत्मज्ञानी माणसाजवळ अहंकार शिल्लक असेल तरच जीवन्मुक्ती व विदेहमुक्तिचा प्रश्न निर्माण होतो. जनकाने त्याचासुद्धा त्याग केला आहे. म्हणून ते या सर्व गोष्टींना ओलांडून केवळ आत्म्यातच स्थित आहेत. ही एक सर्वश्रेष्ठ स्थिती आहे. कोणतेही शास्त्र राजा जनकाप्रमाणे ही गोष्ट निर्भयपणे सांगू शकलेले नाही. अशा निर्भय अभिव्यक्तिची क्षमता अन्य कोणत्या ज्ञानी माणसाजवळ नाही व कोणत्याही शास्त्रात नाही. म्हणून अष्टवक्र गीता अध्यात्मातला असा एक शिर्षस्थ व सर्वोच्च ग्रंथ आहे की ज्याची दुसऱ्या ग्रंथाबरोबर तुलनाच होत नाही.
क्व कर्ता क्व च वा भोक्ता निष्क्रियं स्फुरणं क्व वा । अनुवाद : - नेहमी स्वभावशून्य असल्याने मला कर्तेपण कुठले व भोक्तेपण कुठले ? निष्क्रियता तरी कुठे आहे किंवा स्फुरण (स्फूर्ती) तरी कुठे आहे ? कोणते अपरोक्ष (प्रत्यक्ष) ज्ञान आहे किंवा कोणते फळ आहे ? विवेचन : - अज्ञानी माणूस मनाच्या व अहंकाराच्या प्रेरणेने जगतो. चित्तवृत्तीच्या स्फुरणांमुळे स्वभाव तयार होतो व अहंकारामुळेच अज्ञानी स्वतःला कर्ता मानू लागतो. स्वतःला कर्ता मानण्यामुळेच तो कर्मक्ताचा भोक्ता होतो. मनुष्य सक्रीयसुद्धा तेव्हांच होतो जेव्हां त्याला फळाची आशा असते. जर मनुष्य आत्मज्ञानी नाही व त्याला फळाची आकांक्षासुद्धा नाही तर मग तो निष्क्रीय किंवा आळशी होऊन जाईल. परंतु ज्ञानी माणसाचा स्वभाव यापेक्षा वेगळा असतो. तो मन व अहंकार यापासून मुक्त होऊन केवळ साक्षीभावाने जगत असतो. म्हणून त्याच्यात कर्तेपण सुद्धा नसते की हे 'मी' करतोय. कर्तेपण नसल्यामुळे स्वाभाविकच त्याला भोक्तेपण सुद्धा नसते. तो कर्माचा त्याग करूनसुद्धा आळशी होत नाही किंवा निष्क्रीय होत नाही व त्याच्या चित्तात कशाचेही स्फुरण होत नाही कारण वासनाच नाही. कर्तव्यकर्माबावत तो जास्त लक्ष पण देत नाही की हे काम करायचे आहे, त्यामुळे एवढा लाभ होईल, न केल्यास एवढे नुकसान होईल वगैरे. 'मी' पण राहिल्यामुळे प्रत्यक्ष कर्म होतात व त्याचेच फळ मिळते. ज्ञानी या दोन्ही बाबींपासून मुक्त असतो.
क्व लोकं क्व मुमुक्षुर्वा क्व योगी ज्ञानवान् क्व वा । अनुवाद : - अद्वैत असल्यामुळे मला कोणता 'लोक' आहे ? मी कुठे मुमुक्षु आहे ? कुठे योगी आहे ? कुठे ज्ञानवान आहे ? किंवा मी कुठे बद्ध आहे व कुठे मुक्त आहे ? विवेचन : - राजा जनक म्हणतो की मी अद्वयस्वरूप असा आत्मा आहे. सृष्टीमध्ये द्वैत असे काहीच नाही. आत्मा-परमात्मा, जीव-ब्रह्म, प्रकृती-पुरुष ही विभागणी सृष्टीत कुठेच अस्तित्वात नाही. सर्व काही केवळ त्या एकाच आत्म्याचा विस्तार आहे. 'दोन' मानणे हाच भ्रम आहे, हेच अज्ञान आहे. मी आत्मा असल्याने अ-द्वय आहे. मला अज्ञानामुळेच ज्या विविध भिन्नतेची जाणीव होत होती तीच आता नष्ट झाली आहे. आता माझ्यासाठी जिथे मी राहील असा 'लोक' नाहीच कारण सर्वत्र मीच आहे. माझे कोणतेही निश्चित असे एक स्थान असू शकत नाही. मोक्ष प्राप्त करावा अशी मला मुमुक्षा सुद्धा नाही करण मी जिथे आहे तिथेच मोक्ष. आहे; मोक्ष माझ्यापेक्षा वेगळा नाही. योगी अजून रस्त्यावर चालतो आहे त्याला अद्याप ध्येयशिखर प्राप्त झालेले नाही. तो साधन आहे व ज्ञान प्राप्तीमुळे तो ज्ञानी आहे पण मी आत्मामय झाल्याने मी स्वतःच ज्ञान आहे. मी ज्ञानवान नाही कारण ज्ञानवान आणि ज्ञान वेगळे नाही. मी बद्धही नाही व मी मुक्तही नाही. कारण आत्मा कुठल्या बंधनात अडकत नाही व तो मुक्तही नसतो. तो तर सदैव एक प्रकारचा 'भाव' आहे व मी हा तसाच आहे.
क्व सृष्टिः क्व च संहारः क्व साध्यं क्व च साधनम् । अनुवाद : - मी अद्वयस्वरूप असल्याने मला सृष्टी कसली व सृष्टीचा विलय (संहार) कसला ? कोणते साध्य ? आणि कोणते साधन ? साधक कोण आणि सिद्धी तरी कसली ?
विवेचन : - सृष्टी व तिचा विलय म्हणजेच प्रलय यासंबंधाने विविध धर्म अनेक स्वरूपाचे विचार मांडतात. काही सांगतात की ही सृष्टी अनादी आहे. हिला कुणीही तयार केलेली नाही व हिचा कधीही नाश होणार नाही. काही सांगतात की परमेश्वराने सहा दिवसात सृष्टी तयार केली, तोच हिचे संचलन करीत आहे, तोच हिचा नाश घडवून आणेल. काही म्हणतात की सृष्टी ही परमेश्वराची अभिव्यक्ति आहे. एकच ब्रह्म वेगवेगळ्या स्वरूपात प्रगट झाले आहे. विस्तारीत होणे, पसरणे हाच त्याचा गुणधर्म आहे. सृष्टीची निर्मिती संकल्पपूर्वक झाली. एका सीमेपर्यंत हिचा विस्तार होईल. त्यानंतर ती पुन्हा आकुंचन पावेल व तिच्या मूळच्या ब्रह्म स्वरूपात विलीन होईल. तो प्रलय-काळ असेल. विज्ञानसुद्धा पदार्थ व उर्जा हे वेगळे नाहीत असेच मानते. पदार्थ हे उर्जेचे दृश्य स्वरूप आहे व उर्जा हे पदार्थाचे अदृश्य रूप आहे. दोन्ही एकमेकात रूपांतरीत होऊ शकतात. पदार्थ कधीही नष्ट होत नाही. त्याचे उर्जेत रूपांतर होते व उर्जा पुन्हा पदार्थाचे रूप धारण करू शकते.
क्व प्रमाता प्रमाणं वा क्व प्रमेयं क्व च प्रमा । अनुवाद : - सदैव विमलारूप (निर्मल व विशुद्ध) रूप असल्याने प्रमाता कोणती ? प्रमाण कोणते ? प्रमेय कोणते व प्रमा (बोध) कोणता ? कोणते किंचन व कोणते अकिंचन ? विवेचन : - राजा जनक आपल्या आत्मस्थितीचे वर्णन करतांना सांगतात की मी आत्म्याला जाणलेले नाही व प्राप्तही केलेले नाही. कारण मी त्याच्यापेक्षा भिन्न नाही. मी स्वतःच आत्मा आहे. अज्ञानामुळेच मी स्वतःला शरीर, मन, इंद्रिये समजत होतो व आत्म्याला माझ्यापेक्षा वेगळा समजत होतो. जर आत्मा माझ्यापेक्षा वेगळा असता तर मी तो प्राप्त करू शकलो असतो. किंवा मला त्याचा बोध होऊ शकला असता व तो मी प्रमाण देऊन सिद्ध केला असता. हे ज्ञान किंवा बोध काय आहे ? कसे आहे ? त्याची अनुभूती कशी होते याचे वर्णन करावे लागले असते. परंतु मी प्रमाता (बोधयुक्त) नाही कारण बोध माझ्यापेक्षा वेगळा नाही. मी प्रमा (बोध) सुद्धा नाही कारण मी स्वतःच तो आत्मा आहे जो बोधस्वरूप आहे. म्हणून प्रमाणाची आवश्यकता नाही. प्रत्यक्षाला प्रमाण कशाला पाहिजे ? सत्य तर साक्षात असते, प्रत्यक्ष आहे, मग प्रमाणांची काय आवश्यकता आहे ? आत्मा प्रमेय (प्रमाण योग्य) सुद्धा नाही. माझ्यात अकिंचन (दरिद्रता) किंवा किंचन भाव (संपन्नता) सुद्धा नाही कारण आत्मा असल्यामुळे मी सर्वकाही आहे व निर्मळ विशुद्ध स्वरूपात आहे.
क्व विक्षेपः क्व चैकाग्र्यं क्व निर्बोधः क्व मूढता । अनुवाद : - सदैव क्रियाशून्य असल्याने मला कुठली एकाग्रता ? कोणते ज्ञान ? मूढता कोणती ? हर्ष कशाचा ? विषाद कशाचा ? विवेचन : - सर्व विक्षेप चित्तामुळे निर्माण होतात. त्यांचा जन्म चित्तवृत्तीमुळे होतो. ह्या विक्षेपांना दूर करण्यासाठी एकाग्रतेची साधना करावी लागते. परंतु आत्मज्ञानीचे सर्व विक्षेप शांत झालेले असतात. तो केवळ आत्मरूपात स्थित असतो. तो क्रियारहित होतो कारण आत्मा कोणतीही क्रिया करत नाही. माझ्यात कोणताच विक्षेप (शंका, कुशंका, वासना, अहंकार) नाही, म्हणून मला एकाग्रता करण्याचीही आवश्यकता नाही. आत्मा असल्यामुळे माझ्यात अज्ञान नाही, मूढता नाही, हर्ष नाही व विषाद (खेद) सुद्धा नाही. आत्मा तर ह्यापेक्षा वेगळी अशी चैतन्यशक्तिरूपी उर्जा आहे. मी तेच आहे. तीच उर्जा आहे.
क्व चैष व्यवहारो वा क्व च सा परमार्थता । अनुवाद : - सदैव निर्विकार असल्याने मला कुठला व्यवहार ? कुठली परमार्थता ? सुख तरी कुठले आणि दुःख तरी कुठले ? विवेचन : - राजा जनक म्हणतात की मी आत्मा आहे म्हणून मी सदैव निर्विकार आहे व त्यामुळे हे व्यवहार व परमार्थ माझ्यासाठी नाही. हे तर मनाचे गुणधर्म आहेत. सुख-दुःख सुद्धा मनाचे धर्म आहेत. आत्मा तर सुख-दुःखाच्या पलीकडे आहे व मी आत्मा असल्याने या सर्वापासून दूर आहे.
क्व माया क्व च संसारः क्व प्रीतिर्विरतिः क्व वा । अनुवाद : - मी सदैव विमलस्वरूप असल्यामुळे माझ्यासाठी कोणती माया ? आणि कोणता संसार ? प्रीती कुठे आहे व वि-रति कुठे आहे ? कुठे जीव आहे व कुठे ब्रह्म आहे ? विवेचन : - आत्मज्ञानाच्या अंतीम श्रेणीत सर्व भिन्नता-भेद गळून पडतात. केवळ एक चैतन्य तेवढे रहाते. ही माया आहे, हे ब्रह्म आहे, हा आत्मा आहे, हा संसार आहे, प्रीति व वि-रती, जीव आणि ब्रह्म अशी द्वैती जाणीव नष्ट होते. ज्याला त्या सत्यस्वरूपी आत्म्याचे ज्ञान नाही तोच या सर्वात भेद आहे असे मानतो. आत्मज्ञानानंतर सर्व 'अभेद' च जाणवतो व कळते की हे सर्व सर्व फक्त ब्रह्म आहे, एकच आहे, सारा विस्तार त्याचाच आहे. भिन्नता हा भ्रम आहे. ह्या भ्रमाचा निरास करणे हेच ज्ञान आहे व तेच सत्य आहे.
क्व प्रवृत्तिर्निर्वृत्तिर्वा क्व मुक्तिः क्व च बन्धनम् । अनुवाद : - सदैव कूटस्थ (स्थिर), अखंडरूप आणि स्वस्थ असल्याने मला निवृत्ती कुठे आहे ? मुक्ति कुठे आणि बंधन तरी कुठे आहे ? विवेचन : - आत्मा सदैव स्वस्थ (स्थिर) आहे, तो अखंड आहे. त्याची विभागणी करता येत नाही. तो अद्वय आहे. त्याच्याशी एकरूप होणे हेच सर्वोच्च स्वास्थ्य आहे. म्हणून ज्ञानीच स्वस्थ असतो व बाकीचे सर्व रूग्ण असतात. अशा व्यक्तीत प्रवृत्ति नसते व निवृत्ती नसते. त्याच्यासाठी मुक्ति नसते कारण आत्म्याचे कोणतेच बंधन नसते. तो बंधविरहित आहे. बंधने केवळ वासना व अहंकारामुळे निर्माण होतात. त्यांच्या मुळाशी अज्ञान असते. अहंकारामुळे कर्तेपण असते. त्यातूनच बंधने निर्माण होतात. त्यातूनच पापपुण्य निर्माण होते. कर्तेपणातूनच भोळेपणाचा जन्म होतो. ज्या धर्मांनी आत्मा जाणलेला नाही तेच त्यात भेद भिन्नता मानतात. परंतु सर्व अस्तित्व अखंड, संयुक्त व एकच. आहे. भेद भिन्नता केवळ अज्ञानी व अहंकारी व्यक्ति करतात कारण अहंकारामुळेच त्यांना तृप्तीचा आनंद मिळतो. लोक धर्माच्या नावावर अहंकाराचेच पोषण करतात. श्रेष्ठ व सर्वोच्च धर्म त्या सर्व बाबींपेक्षा उच्च अशा एक अस्तित्वाबद्दल चर्चा करतो. हे अस्तित्व अखंड आहे. अद्वय आहे, निर्मल आहे व निर्विकार आहे, शांत आहे. केवळ चैतन्य आहे.
क्वोपदेशः क्व वा शास्त्रं क्व शिष्यः क्व च वा गुरुः । अनुवाद : - उपाधिरहित शिवस्वरूप (कल्याणरूप) असल्यामुळे माझ्यासाठी उपदेश कोणता ? किंवा शास्त्र कोणते ? शिष्य कोणते व गुरू कोणता ? आणि पुरुषार्थ तरी कुठे आहे ? विवेचन : - आत्मज्ञान नसलेली व्यक्तिच 'उपाधी' युक्त असते. आत्म्याची कोणतीच उपाधी नाही. तो एक आहे की दोन, जड आहे की चैतन्य, प्रकृती आहे की पुरुष, सृष्टी आहे की परमात्मा हे सांगणे सुद्धा कठीण आहे, कारण सर्वकाही तोच आहे; आणि तो तसे काहीच नाही. तो दिसत नाही पण तरीही आहे. तो क्रियारहित आहे पण सर्व काही त्याच्यामुळेच होत आहे, त्याच्याशिवाय झाडाचे एक पान हलू शकत नाही. तो शिवस्वरूप आहे, कल्याणकारी आहे. जनक म्हणतात की मी हे आत्मस्वरूप प्राप्त केले आहे त्यामुळे आता माझ्यासाठी कोणताच उपदेश आवश्यक नाही. उपदेश तर अज्ञानी माणसाला केला जातो. शास्त्रसुद्धा अज्ञानी माणसांकरिता आहे. ज्ञानी तर स्वतः शास्त्र आहे. त्याची वाणी हेच शास्त्र आहे व ती जिवंत आहे. पुस्तकावर आधारलेले शास्त्र तर मृत आहे, ज्ञानी स्वतः गुरू आहे, त्याने गुरूत्व प्राप्त केले आहे. तो शिष्यसुद्धा नाही व त्याला आता गुरूची आवश्यकता नाही. त्याला आता कोणता पुरुषार्थ करण्याची सुद्धा आवश्यकता नाही कारण आत्मज्ञान हाच परम श्रेष्ठ पुरुषार्थ आहे व ते तर त्याला प्राप्त झालेच आहे. त्या ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर बाकीच्या सर्व गोष्टी व्यर्थ ठरतात. नदी पार केल्यावर जशी नावेची उपयुक्तता नसते तसेच हेही आहे. कबीराने म्हटले आहे की 'दुल्हा-दुल्हन मिल गये, फिकि पडी बारात'. वरातीचे महत्त्व पती-पत्नीच्या मिलनापर्यंतच असते. त्यांचे मिलन झाल्यावर सर्व वरातीला निरोप द्यावा लागतो नाहीतर नंतर त्यांचा अडथळा होऊन बसतो.
क्व चास्ति क्व च वा नास्ति क्वास्ति चैकं क्व च द्वयम् । अनुवाद : - कुठे आहे व कुठे नाही ? किंवा कुठे एक आहे व कुठे दोन आहे ? यात जास्त वर्णन करण्यात काय प्रयोजन (हेतू). माझ्यामधे तर काहीच निर्माण होत नाही. सर्व शांत झाले आहे तरंग निर्माण होत नाही. विवेचन : - शेवटी समारोप करतांना राजा जनक म्हणतात की संसार आहे माया आहे, ब्रह्म आहे. जीव आहे हे असे सर्व अज्ञानी माणसेच सांगतात. तो काय 'आहे' हेच जाणतो. परंतु तो जे जे आहे म्हणून सांगतो ते काहीच नाही. सृष्टी जीव हे तर माया आहेत. ब्रह्मच सत्य आहे. ज्याने काही जाणले नाही तोच काय आहे व काय नाही ह्याच्या भ्रमात जगतो. ज्याने जाणले तो तर आत्मरूप होऊन जातो. त्याच्यासाठी काय आहे व काय नाही ह्याबद्दलचा अज्ञानातून निर्माण झालेला भ्रम नष्ट झालेला असतो. तो असेसुद्धा म्हणत नाही की ईश्वर आहे, जीव त्यापेक्षा भिन्न आहे किंवा सर्व आत्मा ईश्वरूपच आहे, ईश्ववर अनेक आहेत कारण आत्मा अनेक आहेत. तो तर ईश्ववर व सैतान अशा दोन भिन्न शक्ति असल्याचे मानत नाही. हे सर्व विचार आहेत व ते मनामुळे जन्म घेतात. आत्मज्ञानीच्या मनात विचारांचे तरंग निर्माणच होत नाहीत. सर्व काही शांत झालेले असते. सांगणारासुद्धा वाचत नाही. कोण विवेचन करणार ? असा ज्ञानी त्या एका सर्वोच्च तत्वात एकरूप होऊन स्थित असतो. हीच ज्ञानाची अंतिम अवस्था आहे. हीच अंतिम सिद्धि आहे. ॥ ॐ नमः शिवाय ॥ |