अष्टावक्रगीता

प्रकरण १९

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

आत्म्याशी एकरूप होणे ही सर्वश्रेष्ठ अवस्था आहे.

तत्त्वविज्ञानसंदंशमादाय हृदयोदरात् ।
नाविधपरामर्शशल्योद्धारः कृतो मया ॥ १ ॥


अनुवाद : - आत्मज्ञानाच्या प्राप्तीमुळे संतुष्ट होऊन राजा जनक आपली अनुभूती व्यक्त करीत म्हणतात, "हे मुनीश्रेष्ठ ! आपल्या उपदेशाचा स्वीकार करून मी माझा हृदयातील व पोटातील अनेक विचाररूपी बाण बाहेर काढून टाकले आहे. "


विवेचन : - मुनीश्रेष्ठ अष्टवक्र स्वामींच्या उपदेशाने व त्या उपदेशाच्या श्रवणामुळे राजा जनकास तत्काळ आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. त्याची मानसिक तयारी व पृष्ठभूमी आधी पासूनच तैयार होती, अन्तःकरण शुद्ध होते म्हणून स्वामी अष्टवक्रांच्या तत्त्वबोधाच्या उपदेशाचे श्रवणानंतर त्यांनी शंका-कुशंका व्यक्त न करता त्याचा स्वीकार केला. अर्जुनाप्रमाणे त्यांनी तर्क, प्रमाण ह्यांचा आग्रह धरला नाही, शंकाकुल झाले नाही व अश्रद्धा दाखवली नाही. मुनीश्रेष्ठांच्या उपेदशाला त्यांनी एखाद्या मधुर पेयाप्रमाणे प्राशन करून स्वीकारले व त्यामुळे त्यांना अमृतत्वाचा लाभ झाला. अष्टवक्र स्वामीजींचा उपदेश म्हणजे अमृतच पण त्याचा फायदा फक्त श्रद्धाशील अंत: करणाच्या व्यक्तिलाच होऊ शकतो. गीतेत म्हटले आहे की "श्रद्धावान् लभ्यते ज्ञानं" ज्ञानाचे अमृतफळ फक्त श्रद्धावान व्यक्तिलाच मिळते. जनक आत्म-रूप झाले. त्या आत्मरूपाची अनुभूती राजा जनकाने व्यक्त केली. ती लक्षपूर्वक ऐकल्यावरही विविध प्रश्न उपस्थित करून अष्टवक्र स्वामींनी राजाची परिक्षा घेतली व त्यात राजाची अनुभूती खरी असल्याचे सिद्ध झाले. अष्टवक्र स्वामींची खात्री झाली की राजा जनकाला भ्रम झालेला नसून खरोखरीच आत्मज्ञान प्राप्त झाले आहे. म्हणून या आधीच्या प्रकरणात राजा जनकाने आत्मज्ञानाच्या स्वरूपात राजाला शांतिचा उपदेश केला. विधीपूर्वक व शास्त्रसंमत पद्धतींनी शिष्याला शिक्षण देऊन, नंतर तो परिक्षेत उत्तिर्ण झाल्यानंतर गुरू शिष्याला दिक्षान्त भाषण देऊन आपल्या विद्यालयातून निरोप देतो आणि जगात शास्त्रसंमत शुद्ध आचरणाने व्यवहार करण्याचा उपदेश देतो. त्याचप्रमाणे स्वामी अष्टवक्रांनी जनकाला शांतीवर उपदेश केला आहे.

आत्मज्ञानानंतर प्राप्त झालेल्या या उपदेशामुळे राजा जनक धन्य धन्य झाला आहे. हा अष्टवक्र-गीता नावाचा ग्रंथ जनक व अष्टवक्र यांच्या संवादरूपाने सिद्ध झाला असून अध्यात्माच्या क्षेत्रातील हा एक असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे की ज्याची तुलना दुसऱ्या ग्रंथाबरोबर करता येत नाही. तत्त्वबोधाचे यापेक्षा उच्च दर्जाचे विवेचन दुसऱ्या कोणत्याही ग्रंथात उपलब्ध नाही.

अष्टवक्र स्वामींचे दिक्षान्त भाषण पूर्ण झाल्यावर ते राजा जनकाला आता निरोप देत आहेत. आता राजा जनक, अष्टवक्र स्वामींबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करीत आहे. ही कृतज्ञता केवळ औपचारिक शिष्टाचार नसून गुरूच्या कृपेने प्राप्त झालेल्या आपल्या आत्मस्थितीचे वर्णन आहे.

आत्मज्ञान ही एक अद्‌भूत शस्त्रक्रिया आहे. तीच्यामुळे विरुद्धधर्मी तत्वांचा निरास होतो आणि शुद्ध आत्मज्ञान तेवढे शिल्लक रहाते. ज्याप्रकारे भट्टीत सोने तापवून वितळवून त्यातील भेसळ व निकस हलके धातू काढून टाकून शुद्ध सोने प्राप्त केले जाते, त्याचप्रमाणे या आत्मज्ञान बोधाच्या प्रक्रियेत सुद्धा अज्ञानामुळे निर्माण झालेले अधर्मी संस्कार काढून टाकून आत्म्याच्या रूपातील सोने प्राप्त केले जाते. ह्यात मन, बुद्धि, स्मृती, अहंकार, शरीर, संकल्प-विकल्प, विचार, शास्त्र, धर्म, कामना, वासना सर्व काही नाहीसे होते, कारण आत्म्यासाठी या सर्व नैसर्गिक स्वभावाशी विसंगत असणाऱ्या विकृती आहेत, त्यांचा आत्म्याशी काही संबंध नाही. मृत्यूप्रसंगी शरीराचा तेवढा त्याग केला जातो, बाकीचे सारे संस्कार, ईच्छा, अहंकार आपल्या बरोबर राहतात. ही विसंगत, विजातीय तत्वेच आपल्या पुर्नजन्माचे कारण बनतात. पण आत्मबोधामुळे ती नाहीशी झाल्यावर पुर्नजन्माचे कारण उरत नाही. म्हणून आत्मज्ञानामुळे ' महा-मृत्यू' होतो असे म्हटले जाते. कारण आत्मज्ञानानंतर जे शिल्लक रहाते तेच आपले स्वतःचे आहे व त्याचेच नाव आत्मा आहे. माणसाचा मुख्य रोग आहे 'विचार'. विचारांमुळेच अनेक प्रकारचे कार्य घडते. विचार मृत्यूनंतरही बरोबर रहातात. त्यांच्यामुळेच पुनर्जन्म होतो. सुख-दुःखाचे कारण विचारच आहेत, सर्व द्वंद्वे या विचारांमुळेच उद्‌भवतात. दुसऱ्या शब्दात हे विचार म्हणजेच जग आहे. विचारविरहित साधना म्हणजे ध्यान आहे, त्याची प्राप्ती म्हणजे समाधी आहे, तेच आत्मज्ञान आहे. जोपर्यंत विचार सतावतात, तोपर्यत मनुष्य स्वस्थ होऊ शकत नाही. राजा जनकास आत्मज्ञान प्राप्त झाल्याने हा विचारांचा रोग बरा झाला. आता ते पूर्ण स्वस्थ व शांत झाले आहेत. अष्टवक्र स्वामींबद्दल कृतज्ञता व्यक्त करतांना ते म्हणतात की तुमच्या तत्त्वज्ञानरूपी आत्मबोधाचा स्वीकार करून मी हृदयातून व पोटातून अनेक विचाररूपी प्राण काढून टाकले आहेत. आता मी पूर्ण स्वस्थ आहे. विचार आत्मज्ञानात बाधक आहेत. या तरंगांमुळे हृदयातल्या आत्म्याचे प्रतिबिंब दिसू शकत नाही. विचारशून्यता हीच या ज्ञानप्राप्तीची किल्ली आहे. विचारांमुळे माणसाची दिशाभूल होते. आत्मा आपणच आहोत पण त्याची विस्मृती झाली आहे. निर्विकार व विचारशून्य अवस्थेतच त्याचे पुन्हा स्मरण होऊ शकते.




क्व धर्मः क्व च वा कामः क्व चार्थः क्व विवेकिता ।
क्व द्वैतं क्व च वाऽद्वैतं स्वमहिम्नि स्थितस्य मे ॥ २ ॥


अनुवाद : - आपल्या आत्म्याच्या महिम्यात एकरूप झाल्यावर मला कुठला धर्म ? कुठले काम ? कशाचा अर्थ ? विवेक कुठे आणि द्वैत कुठे ? आणि अद्वैत ही कुठे ?


विवेचन : - आत्मा आपला स्वभाव आहे, तोच सत्य आहे, तोच आनंदरूप आहे. त्याला प्राप्त करणे ही सर्वात मोठी प्राप्ती आहे. आत्मज्ञानीच महामहिम आहे. अन्य सर्व महिमा खोटा आहे फसवणूक आहे. दुसऱ्याने दिलेली बाब तो पुन्हा हिसकावून घेऊ शकतो. दुसऱ्याने मोठेपणा दिला म्हणजे फुग्यासारखे तुम्ही फुगून, स्वतःला मोठे समजू लागला तरी त्याची हवा काढण्याची किल्ली तर दुसऱ्याच्या हातात आहे. त्याची मर्जी असेल तेंव्हा तो तुमची हवा काढू शकतो. तुमचा मोठेपणा हिसकावून घेऊ शकतो व त्या वेळी तुम्ही टिकू शकणार नाही, मूळच्या साध्या सामान्यत्वापेक्षाही कितीतरी अधिक पटीने कुरूप व हीन दिसू लागाल. जमीन-घरेदारे, धन-संपत्ति, मित्र-मंडळी, जात-बंधु, पद-प्रतिष्ठा यांना आपण आपल्या प्रतिष्ठेची चिन्हे समजतो पण ह्या सर्व दुसऱ्यांमार्फत आपल्याला प्राप्त झालेल्या गोष्टी आहेत. दुसऱ्यांच्या हाताने किंवा दैवयोगाने आपल्या जवळून या सर्व गोष्टी सहजपणे दुरावू शकतात व त्यांचेवर अवलंबून असणारे आपले मोठेपणसुद्धा हिसकावून घेतले जाईल. आज लोकांनी तुम्हाला मते दिलीत, आमदार, खासदार बनवले तरी त्यांनी तुम्हाला मोठेपण दिलेले नसते तर त्यांच्या स्वार्थसिद्धिसाठी ते तुम्हाला माध्यम बनवतात. जर त्यांचा स्वार्थ तुमच्यामार्फत पूर्ण होत नाही असे त्यांचे मत झाले तर ते पुन्हा तुम्हाला जमिनीवर आपटतात. तुम्ही मालक नव्हे तर लोकांचे गुलाम बनलात. ते तुम्हाला माकडाला जसे नाचवतात त्याप्रमाणे नाचवतात. तुम्ही स्वतःला मोठे समजून नाचता. ह्यालाच कां मोठेपण म्हणायचे ? परंतु जनक राजा म्हणतो की , मी माझ्या महानतेत एकरूप झालो आहे. कारण आत्मा हेच माझे मोठेपण आहे. ह्या आत्मरूपात स्थिर झाल्यामुळे मी महामहिम झालो आहे. माझ्या मोठेपणाला माझ्याजवळून कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही. हे तर पूर्णतया माझेच वैयक्तिक मोठेपण आहे व ते माझे मीच प्राप्त केले आहे. हे सदैव टिकणारे शाश्वत, सत्य आहे व फक्त माझे आहे. आता दुसरा कुणी माझा नाही कारण तो वेगळा होऊ शकतो पण आत्मा वेगळा होऊ शकत नाही. ह्याच्यावर श्रेष्ठ असे दुसरे कोणतेच मोठेपण नाही. ज्यांच्यात स्वतःत मोठेपण नाही तेच दुसऱ्यांनी मोठेपणा द्यावा अशी अपेक्षा बाळगतात. परंतु ज्याने आत्मरूपाने स्वतःचे मोठेपण संपादन केले आहे तोच श्रेष्ठ आहे. ह्या व्यक्तिगत मोठेपणाची प्राप्ती व्हावी म्हणून भिन्न भिन्न साधना-उपासनांचा अवलंब केला जातो. धर्म, अर्थ, काम, विवेक ही सुद्धा त्याची साधने आहेत. ह्याच प्रकारे ध्यान-धारणा, समाधी, जप, पूजा, श्रवण, निदिध्यासन, शास्त्र, गुरू, सत्संग (कीर्तन-प्रवचन) ही सर्व साधने आहेत. परंतु आत्म-प्राप्तीनंतर त्याचा काही उपयोग नाही. आत्मज्ञानानंतरही त्याचे ओझे वहात रहाणे मूर्खपणाचे आहे. नंतर तर ही साधनेच बंधने होऊन बसतात. शास्त्रात सांगितले आहे की, ' उत्तिर्णे तु गते पारे नौकायाः किं प्रयोजनात् । ' जेव्हा मनुष्य नदी पार करून दुसऱ्या तीरावर उतरतो तेंव्हा मग नावेचा उपयोग काय ? ती त्याच्यासाठी निरर्थक आहे. तीच्यातच बसून न रहाता तीर आल्यावर तिला सोडून देण्यातच शहाणपणा आहे. याचप्रकारे आत्मज्ञानाच्या अभावात द्वैताचा भ्रम होतो. परंतु आत्मज्ञानी हे जाणून घेतो की द्वैत हा केवळ भ्रम आहे, अज्ञान आहे. वास्तवतः हा सारा पसारा म्हणजे त्या एकाच आत्म्याचा पसारा व अभिव्यक्ति आहे. ह्या अद्वैताचे ज्ञान प्राप्त झाल्यावर आत्मज्ञानी माणसाचा द्वैतभाव संपुष्टात येतो. अद्वैत सुद्धा द्वैतसापेक्ष आहे. कारण जेंव्हा द्वैत अस्तित्वातच नाही तेंव्हा अ-द्वैत म्हणणे सुद्धा चुकीचे आहे. म्हणून राजा जनक म्हणून जातो की मी न द्वैत आहे, न अद्वैत आहे. मी केवळ आत्मस्वरूप आहे. जनकाचे हे आत्मज्ञानाचे अनुभूतीने परिपूर्ण असणारे निवेदन फार अमोल आहे. आत्मज्ञानी माणूसच ह्या अभिव्यक्तिद्वारे सत्य सांगू शकतो. ह्याच सूत्रात राजा जनकाचे म्हणणे आहे की तो स्वतःच्या महत्तेत स्थिर झालेला असल्याने आता त्याच्यासाठी धर्मसुद्धा निरर्थक झाला आहे. आत्म्याची प्राप्ती झाल्यावर धर्माचीसुद्धा आवश्यकता उरलेली नाही. धर्म हे तर आत्म्याचे स्मरण व्हावे यासाठीचे एक हत्यार, उपकरण किंवा साधन आहे. सर्व धर्मात आत्म-प्राप्तीसाठीचे विधी सांगितलेले आहेत. आचरण, कर्मकांड योग, भक्ति, पूजा, सर्व विधी केवळ साधने आहेत. त्याचा उपयोग अज्ञानी माणसांकरिता आहे. ज्ञानी माणसासाठी अशा प्रकारचे विधी निरर्थक आहेत. धर्माचा अर्थ केवळ एखादा पंथ, एखादा संप्रदाय, एखादी संघटना नसून जो विधी आत्मज्ञानाकडे घेऊन जातो तोच धर्म आहे म्हणून धर्म एक साधन आहे. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हे धर्म नाहीत. धर्म तर फक्त आत्मा आहे.




क्व भूतं क्व भविष्यद् वा वर्तमानमपि क्व वा ।
क्व देशः क्व च वा नित्यं स्वमहिम्नि स्थितस्य मे ॥ ३ ॥


अनुवाद : - सदैव आपल्याच महत्तेत स्थिर व एकरूप झालेले आता मला भूतकाळ कोणता आणि भविष्यकाळ कोणता ? वर्तमानकाळ तरी कुठे आहे ? किंवा देश तरी कोणता आहे ?


विवेचन : - वेळेचे व ठिकाणाचे बंधन अज्ञानी माणसाला बांधते. आत्मज्ञानी त्यांचे परिघाचे बाहेर असतो. आत्मा नित्य आहे, शाश्वत आहे, त्याचा जन्म होत नाही, तो निराकार व अलिप्त आहे. म्हणून त्याच्यासाठी कोणताही भूतकाल, वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळ नाही. तो कालातीत आहे. त्याच्यासाठी जागेचे बंधन नाही कारण सर्व जागांवर तोच आहे. तो या आधीच्या सर्व काळात होता, आज आहे व या पुढेही राहणार आहे. त्याचा विनाश होतच नाही. सृष्टी नव्हती तेव्हांही तो होता व सृष्टी नष्ट झाल्यावरसुद्धा राहणार आहे. म्हणून ज्या ज्ञानी पुरुषाने आत्मा जाणला त्याने 'ब्रह्म'च जाणले व तो ब्रह्मस्वरूप होतो. राजा जनक हेच सांगतोय की मी आत्मरूप झालो आहे म्हणून आत्म्याची महत्ता हीच माझी महत्ता आहे.




क्व चात्मा क्व च वाऽनात्मा क्व शुभं क्वाशुभं यथा ।
क्व चिन्ता क्व च वाऽचिन्ता स्वमहिम्नि स्थितस्य मे ॥ ४ ॥


अनुवाद : - आपल्याच महत्तेत विलिन झाल्याने मला आत्मा कुठला व अनात्मा कुठला ? माझ्यासाठी शुभ काय आहे ? अशुभ काय आहे ? चिंता कुठे आहे ? व अचिंता तरी कसली ?


विवेचन : - आत्मा, परमात्मा, ईवर, ब्रह्म वगैरे नांवे दिल्यामुळे अनेक भ्रम निर्माण झाले आहेत. वस्तुतः असा कोणताच पदार्थ नाही. असा भ्रम आहे की जणू काही या नावाचा एखादा पदार्थच आहे की जो पाहता येतो, जाणता येतो, मिळवता येतो. परंतु ज्यांनी ध्यानाचा सखोल अनुभव घेतला आहे त्यांनी असे काही पाहिले नाही, असे काही जाणले नाही व असे काही मिळविलेलेही नाही, परण्तु अनुभव व्यक्त करण्यासाठी त्यांनी जी नांवे दिली त्यामुळे भ्रम निर्माण झालेत. सत्य हरकून गेले. याच कारणाने लाओत्सेने म्हटले होते की, "सत्य सांगता येत नाही व जे सांगता येते ते सत्य नसते." सत्याची अभिव्यक्ति होऊ शकत नाही. शब्दात रूपांतर करता करताच त्याचे असत्यात रूपांतर होते. म्हणून ज्ञानी मौन पाळतात. ध्यानामध्ये किंवा समाधीमध्ये आत्म्याचे दर्शन होत नाही किंवा त्याचा साक्षात्कारही होत नाही. अशा स्थितीत जो काही अनुभव येतो त्यामुळे आत्म्याचे अनुमान करता येते, निष्कर्ष काढता येतो की हा आत्माच आहे. धुर पाहिल्यावर जसे आगीचे अनुमान करता येते तसेच हे अनुमान असते. पण हा आत्मा कसा असतो हे सांगणे कठीण आहे. म्हणून ज्ञानी माणसांची अभिव्यक्ति वेगवेगळी असते. आत्म्याबद्दल जे काही सांगितले गेले आहे. ते सत्य नाही. लाओत्सेने त्याला सत्य म्हटले, महावीराने आत्मा म्हटले, उपनिषदाने तत् (तो) म्हटले, ज्ञानी माणसांनी ज्ञान म्हटले, भक्तांनी ईश्वर म्हटले, परमात्मा म्हटले, अद्वैतवादी लोकांनी ब्रह्म म्हटले. राजा जनकाची अभिव्यक्ति अधिक स्पष्ट आहे कारण त्या स्थितीत पोहचल्यावर आत्मा व अनात्मा ह्यातला भेद नाहीसा होतो. तेथे पोहचल्यावर केवळ आनंदाचाच अनुभव येतो. व्यक्ति पूर्ण शांत होते व असा अद्‍भूत अनुभव येतो की ज्याचे वर्णन केले जाऊ शकत नाही. तेथे पोहचल्यावर शुभ-अशुभ, चिंता-अचिंता ह्यांची आठवणच रहात नाही. केवळ चैतन्य तेवढे उरते. हीच सर्वश्रेष्ठ स्थिती आहे व त्या स्थितीत पोहचल्यावर ज्ञानी पूर्णतेचा अनुभव घेतो. हेच त्याचे मोठेपण आहे. अन्य दुसरे मोठेपण नाही. अशा ज्ञानीयाची महत्ता सर्वश्रेष्ठ आहे.




क्व स्वप्नः क्व सुषुप्तिर्वा क्व च जागरणं तथा ।
क्व तुरीयं भयं वापि स्वमहिम्नि स्थितस्य मे ॥ ५ ॥


अनुवाद : - "आपल्या महत्तेत एकरूप झाल्याने मला आता स्वप्न कशाचे ? सुषुप्ति कशाची ? जागृत अवस्था पण कुठली ? व तुरीय अवस्थेचे पण भय कुठले ? "


विवेचन : - आत्मज्ञानी पुरूष जागृतावस्था, स्वप्नावस्था, सुषुप्तीअवस्था व तुरीय अवस्था, या चारी अवस्थांच्या पलीकडे जातो. ह्या चारी अवस्था शरीराच्या, मनाच्या व बुद्धिच्या आहेत. तुरीय अवस्थासुद्धा अन्तःकरणाची आहे. चेतना या सर्वांपलीकडची गोष्ट आहे व त्या स्थितीत आधीच्या चार अवस्थांची जाणिव होत नाही.




क्व दूरं क्व समीपं वा बाह्यं क्वाभ्यन्तरं क्व वा ।
क्व स्थूलं क्व च वा सूक्ष्मं स्वमहिम्नि स्थितस्य मे ॥ ६ ॥


अनुवाद : - " आपल्या आत्म्याच्या महत्तेत स्थिर झाल्याने मला दूर काय व जवळ काय ? बाहेरचे काय व आतले काय ? स्थ्थूल काय व सूक्ष्म काय ?


विवेचन : - आत्म्याच्या महत्तेत स्थिर झालेल्या ज्ञानी पुरूषासाठी दूर, जवळ, आतले, बाहेरचे असे भेद नाहीसे होतात. कारण आत्मा दूर सुद्धा आहे व जवळसुद्धा, तो आत सुद्धा आहे व बाहेरसुद्धा आहे, तो स्थूसुद्धा आहे व सूक्ष्मसुद्धा. सृष्टीसुद्धा अशीच आहे. जे पिण्डी आहे तेच ब्रह्मांण्डी आहे. सूक्ष्मच स्थूलाचे कारण आहे व स्थूलसुद्धा सूक्ष्मात रूपांतरीत होऊन जाते. उर्जा व पदार्थ भिन्न नाहीत. दोघांचे एकमेकांत रूपांतर होते. वैज्ञानिक ज्याला 'क्वान्टा' म्हणतात तसेच आत्म्याचे स्वरूप आहे, न सूक्ष्म न स्थूल, न पदार्थ न तरंग, आणि असले तर दोन्ही आहे.




क्व मृत्युर्जीवितं वा क्व लोकाः क्वास्य क्व लौकिकम् ।
क्व लयः क्व समाधिर्वा स्वमहिम्नि स्थितस्य मे ॥ ७॥


अनुवाद : - आपल्या महत्तेत स्थिर झाल्यामुळे मला मृत्यू कुठला व जीवन तरी कुठले ? कुठला लोक व कुठे त्याचे लौकिक व्यवहार ? लय कुठला व समाधी कुठली ?


विवेचन : - आत्म्याचा जन्म होत नाही व मृत्यू होत नाही. तो सदैव अस्तित्वात आहे. ज्याला जन्म होतो त्याचा मृत्यू होतो. जर जन्मच झाला नाही तर मृत्यूच होणार नाही. आत्मरूप झाल्याने आत्मज्ञानी म्हणू लागतो की मला जीवन नाही व मृत्यू नाही. आत्मा अमर आहे. लोक व लौकिक व्यवहार आत्म्यासाठी निरर्थक आहेत. ते व्यवहार तर शरीर करते, लय व समाधी हे सुद्धा मनासाठी आहेत. आत्मा एकच आहे. त्याचा कशात विलय होत नाही व त्याची समाधी लागत नाही. ह्या सर्व अज्ञानातून निर्माण झालेल्या धारणा व समस्ती ज्ञान प्राप्तीनंतर नाहीशा होतात.




अलं त्रिवर्गकथया योगस्य कथयाप्यलम् ।
अलं विज्ञानकथया विश्रान्तस्य ममात्मनि ॥ ८ ॥


अनुवाद : - आपल्या आत्म्यात एकरूप झाल्यामुळे मला त्रिवर्गाची (धर्म, अर्थ, काम) कथा पर्याप्त आहे, योगाची कथा पर्याप्त आहे व विज्ञानाची कथा पर्याप्त आहे.


विवेचन : - ज्या ज्ञानी पुरूषाने पूर्णता प्राप्त केली त्याचेसाठी धर्म, अर्थ व काम या संदर्भातली कोणतीच अपेक्षा शिल्लक रहात नाही कारण सिद्धिच प्राप्त झाल्याने सिद्धिची साधने निरर्थक होतात. ह्याच प्रकारे योग आणि विज्ञान ह्यांची सुद्धा आवश्यकता रहात नाही. मिळविण्यासाठी काहीही उरलेले नसल्याने ह्या सर्व गोष्टींची उपयुक्तताच संपलेली असते. सर्व काही सुटून गेले असल्याने एका आत्मरूपातच स्थिर होऊन योगी पुरूष जे सर्व श्रेष्ठ आहे ते प्राप्त करतो. हाच सर्वोच्च धर्म आहे.




GO TOP