|
अष्टावक्रगीताप्रकरण ४ थेजगापासून योगी अलिप्त रहातो.
हन्तात्मज्ञस्य धीरस्य खेलतो भोगलीलया । अनुवाद - राजा जनक, अष्टवक्र मुनींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो व त्यामुळे त्यास आत्मज्ञान खरोखरीच झाले आहे याची पुष्टी होते. राजा जनक म्हणतात, "भोग विलासांशी लिलया खेळणार्या धीरगंभीर ज्ञानी पुरुषाची तुलना सार्या जगाला आपल्या डोक्यावर घेणार्या मूढ माणसाशी करणे कसे शक्य आहे ?
विवेचन - तिसर्या प्रकरणात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे राजाजनक या प्रकरणात सारगर्भित रूपात व सहा सूत्रात देतो. तो सांगतो की ज्ञानी व अज्ञानी माणसांद्वारे होणार्या कर्मा-कर्मात फरक असतो. अज्ञानी माणसात अहंकार असतो. अहंकारी माणूस स्वतःला कर्ता मानून सर्व कर्मे करतो म्हणून तो कर्म-फलांचा भोक्ता असतो. ज्ञानी माणसात अहंकार नसतो म्हणून तो कर्तेपणातून मुक्त होतो. ह्याच कारणानी ज्ञानी माणसांनी केलेली कर्मे स्वाभाविक व विवेकपूर्ण असतात. त्यामुळे तो कर्म-फलांचा भोक्ता नसतो. तो सर्व कर्म ईश्वराची समजून करतो. अज्ञानी सर्व कर्मे अहंकारामुळे किंवा वासनेमुळे आणि भोगाची अभिलाषा धरून करतो. त्यामुळे अज्ञानी माणूस कर्मफलाचा भोक्ता बनतो. आत्मज्ञानी या सर्वाचा साक्षी बनतो. जे काही ईश्वराने दिले त्याचा उपयोग करणे चूक नाही उलट त्याचा तिरस्कार करणे व त्याचा अहंकारामुळे त्याग करणे हेच चूक आहे व ईश्वराच्या नियमांच्या विरुद्ध आहे. फळाची आकांक्षा व वासना न ठेवता ज्ञानी व्यक्ति स्वाभाविक रितीने कर्मकर्तव्य पूर्ण करते. असा माणूस फलाच्या इच्छेच्या अभावामुळे निष्काम कर्मयोगी होतो. कर्तव्य बजावतांना त्या कार्याप्रती त्याचा वैयक्तिक राग, लोभ, मोह माया असा कोणताच भाव नसतो. त्याच्या मनात कोणताही मानसिक तणाव नसतो व या उच्च दर्जाच्या मनोभावनेतून कर्तव्यकर्म पार पाडण्याची कला व अध्यात्मिक उच्च श्रेणी तो प्राप्त करून घेतो. या उलट अज्ञानी माणूस प्रत्येक कर्म अहंकारापोटी करतो. त्या प्रत्येक कर्मात तो स्वतःला कर्ता समजतो म्हणून कर्तेपण असते, ईर्ष्या, द्वेष व मानसिक तणाव यामुळे अज्ञानी माणूस चिंताग्रस्त असतो. कार्य पार पाडतांना अज्ञानी माणसाच्या मनात अहंकारामुळे हे काम मी करतोय, हे काम माझ्यामुळे घडतेय व मी नसतो तर सर्व कार्याचा नाश झाला असता, अशी भावना असते. सार्या जगाचा भार जणू आपल्याच डोक्यावर आहे व आपल्यामुळे घर, संसार व जगाचे व्यवहार होतात अशी तो समजूत करून घेतो. या उलट ज्ञानी माणूस असे मानतो की या जगाला चालविणारा कुणी असेल तर तो एक ईश्वरच होय. सारी सृष्टी तीच्या अंगभूत नियमांनुसार संचलित होते, मी कुणीच नाही. ज्ञानी पुरुष अहंकारमुक्त असतो. हेच तथ्य स्पष्ट करण्यासाठी राजा जनक विचारतो की ज्ञानी पुरुषाच्या कार्याची तुलना अज्ञानी व मूढ पुरुषाच्या कार्याबरोबर कशी करता येईल ? दोघांच्या दृष्टीत व कार्य करण्यामागील भावनेत खूप फरक आहे. मेवाड संस्थानात चतुरसिंह नावाचे एक ज्ञानी संत पुरूष होऊन गेलेत. मेवाडी भाषेतल्या एका दोह्यात हेच सत्य स्पष्ट करण्यासाठी त्यांनी म्हटले आहे की,
यत्पदं प्रेप्सवो दीना शक्राद्याः सर्वदेवताः । अनुवाद - ज्या पदाच्या अभिलाषेमुळे इंद्र अन्य देवता हुरळून जातात, दीन होतात, त्या पदाची प्राप्ती झालेला योगी पुरुष मात्र कधीही हर्षोल्हासित होत नाही हे एक आश्चर्य आहे. विवेचन - या सूत्रात राजा जनक सांगतात की कर्म तर ज्ञानी व अज्ञानी असे दोघेही करतात परंतु अज्ञानी माणसाला कर्मफलाची तीव्र अपेक्षा असते व या अपेक्षेमुळे लाभ-ज्ञानी, सुख-दुःख, हर्ष-विषाद या सारख्या भावनांनी तो प्रभावित होतो. या विविध भावनांचे मुख्य कारण त्याच्या इच्छा-अपेक्षा ह्याच असतात. कामाला सुरवात करतांनाच अज्ञानी माणूस त्यापासून किती लाभ होईल याचा अंदाज घेत त्या अपेक्षांची जोपासना करतो. ह्या कामामुळे एवढा फायदा होईल हे प्रारंभ करतांनाच मनात गृहीत धरले असते. येवढा लाभ व येवढा आनंद मिळावा अशी अपेक्षा व त्या अपेक्षेचा ताण-तणाव त्याच्या मनावर असतो. या भविष्यकळात होऊ शकणार्या फायद्यावर आधारित अशी दुसरी स्वप्ने पाहण्यास सुरवात होते. पुढच्या योजना तयार होतात. या फायद्यातून होणार्या नफ्यातून घर तयार करीन, मोटार खरेदी करेन, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करेन वगैरे स्वप्ने मनात फुलू लागतात. पण जेव्हा या अपेक्षा पुर्या होत नाहीत तेव्हां शेखचिल्लीच्या महंमदी स्वप्नांप्रमाणे याचीही स्वप्ने भंग पावतात व तो तीव्र दुखी होतो. हे दुःख कोणत्याही वस्तूमुळे होत नसून कर्मफलाच्या अपेक्षेमुळे होत असते. ह्या अपेक्षांच्या ताण तणावामुळे देवांचा राजा इंद्रसुद्धा दीन, दुःखी होतो. त्याचे सिंहासन कुणी दुसरा हिसकावून घेईल या धोक्याची त्यात नेहमी भिती वाटते. कुणी कठोर व उग्र तपस्या केली तर इंद्राचे सिंहासन डोलू लागते. आपले सिंहासन वाचविण्यासाठी इंद्र कटकारस्थान रचतो. ह्या सुखोपभोगाच्या इच्छेमुळे सर्व देवदेवतासुद्धा दुःखी होतात. कधी इंद्राजवळ, कधी विष्णूजवळ तर कधी शंकराजवळ जाऊन त्यांना प्रसन्न करून आमचे संकट दूर करा अशी प्रार्थना करतात. ह्या वासनांमुळे इंद्र व अन्य देवता आत्मारूपी व मुक्तिरूपी श्रेष्ठ पद प्राप्त करू शकलेले नाहीत. हे पद प्राप्त व्हावे म्हणून ते मनोमन कष्टी होतात पण ज्या श्रेष्ठ योग्यांना हे पद प्राप्त होते ते मात्र त्यामुळे किंचितमात्र ही आनंदित होत नाहीत, हे एक आश्चर्यच आहे. हे पद प्राप्त करून सुद्धा मी त्यामुळे आनंदित झालेलो नाही कारण हर्ष-खेद, आनंद-दुःख, ह्या प्रकारच्या तसेच मी-तू माझे-तुझे, किंवा जड-चेतन असा सर्व स्वरूपाच्या 'द्वैत' भावनेच्या मी पलिकडे गेलो आहे. अद्वैत मनोवृत्तीची स्थिती हीच मुक्ति आहे. लाभ नुकसान, प्राप्री-अप्राप्ती ह्याकडे मी आता समान भावनेने पाहू शकतो. मी नित्य शाश्वत असणार्या आत्मपदाची प्राप्ती केली आहे. त्या पदावर मी स्थिर आहे. ज्याच्याजवळ काहीच नाही तो दीन नसतो तर ज्याला सतत कशाची तरी इच्छा असते तो दीन हीन असतो. ज्याची तृप्ती होत नाही, ज्याला सतत काहीतरी इच्छा असते, तोच दुःखी असतो. कारण अपेक्षा, वासना व इच्छा ह्याच सर्व दुःखाचे कारण आहेत.
तज्ज्ञस्य पुण्यपापाभ्यां स्पर्शो ह्यन्तर्न जायते । अनुवाद - मुक्तिपद प्राप्त केलेल्या व्यक्तिच्या अंतःकरणाला पापपुण्याचा स्पर्श होत नाही. ज्याप्रमाणे आपल्याला भास होत असला तरी धूराच्या उंच लोटाचा सुद्धा आकाशाला स्पर्श होत नाही, त्याचप्रमाणे पाप-पुण्याचा स्पर्श मुक्ति प्राप्त केलेल्या व्यक्तिला होत नाही. विवेचन - अंतःकरणाचे कार्य दोन प्रकारचे असते. जेव्हा मन बुद्धि, व अन्य इंद्रियांबरोबर वाहत जाऊन त्यांच्या वासना व इच्छा ह्यामुळे अंतःकरण व्यापलेले असते तेंव्हा ते पाप व पुण्याचे भागीदार होते. परंतु वासनामुक्त होऊन अंतःकरण जर शुद्ध असेल तर मात्र ते पापण्यापासून मुक्त राहते. पाप-पुण्य ही केवळ एक मानसिक धारणा आहे. कोणत्याही कृत्यामुळे नव्हे तर ते कृत्य तुम्ही कोणत्या भावनेने करता यावर पापपुण्य अवलंबून आहे. पापपुण्य हे शारीरिक कृतीवर नाही तर मनावर अवलंबून आहे. जेंव्हा अंतःकरण वासना, अहंकार ह्यातून मुक्त होते तेंव्हा ते आपोआप विशुद्ध होते. आत्मज्ञानी माणसाजवळ 'मी कर्ता आहे' ही भावनाच नसते, त्याचा अहंकार व कर्तेपण निघून गेले असते. मग त्याच्यावर पापपुण्याचा प्रभाव कसा पडणार ? म्हणून राजा जनक सांगतो की, ज्याप्रमाणे धुराचा स्पर्श आकाशाला होत नाही त्याचप्रमाणे पापपुण्याचा स्पर्श आत्मज्ञानी माणसाला होत नाही. आकाशात उंच गेलेल्या धुराचा संबंध प्रत्यक्ष आकाशाशी कधीच येत नाही त्याप्रमाणे या जगात असूनही इच्छाविरहित असल्याने आत्मज्ञानी त्यापासून अलिप्त रहातो. नजरेला भास होतो कि सर्व आकाश धुराने भरून गेले आहे पण तो भ्रम असतो. त्याचप्रमाणे लोकांना वाटते की ज्ञानी पुरुष सुद्धा संसारी व प्रापंचिक माणसाप्रमाणेच सर्व व्यवहारात सहभागी होत असल्याने तो ज्ञानी नसून भोगी आहे पण हा सुद्धा धुराप्रमाणेच भ्रम असतो. लोकांना वाटते की ज्ञानी पुरुष ढोंग करतोय, दुनियेला फसविण्यासाठी ज्ञानी असल्याचे दाखवतो. ह्या ज्ञानी पुरुषाने तर कोणत्याही गोष्टीचा त्याग केलेला नाही. कपडे, घर काहीच सोडले नाही. सर्व काही इतर माणसासारखेच आहे. जेवण सोडले नाही इतर व्यवहार सोडले नाही हा ज्ञानी असू शकत नाही. जेव्हा अज्ञानी माणसे त्यांच्या बुद्धिनुसार ज्ञानी माणसाची लक्षणे ठरवू लागतात तेंव्हा ते स्वतःच्या मनातले विचार ज्ञानी माणसावर लादण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यामते जो कपडे घालणार नाही. खाणारपिणार नाही, उपवास करेल, ज्याचा चेहरा उदास असेल, ज्याला ऍनिमिया झाला असेल, जो वाळून अगदी अशक्त झाला असेल, त्याच्यात बोलण्याची सुद्धा शक्ति शिल्लक नसेल, डोळ्यात तेज नसेल, जणू काही मेल्याप्रमाणे जो जीवन जगेल तोच ज्ञानी. जर एखाद्या माणसाला परमेश्वराचे चित्र काढायला सांगितले तर तो परमेश्वराचे चित्र एखाद्या माणसाप्रमाणेच काढेल. माकडांचा देव मनुष्यासारखा कसा असणार ? अज्ञानी माणसाला ज्ञानी माणसाची ओळख होऊ शकत नाही कारण तो स्वतःप्रमाणेच म्हणजे स्वतःच्या अज्ञानातूनच ज्ञानी माणसाची कल्पना करतो. राजा जनकाला स्वतःला आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळेच तो ज्ञानी माणसाची योग्य लक्षणे सांगू शकतो. हे त्यामागचे खरे कारण अष्टवक्रासारखा ज्ञानी गुरूलाच समजू शकते. जे घडले आहे ते केवळ भ्रम आहे याचे ज्ञान सुद्धा अज्ञानी माणसाला होऊ शकत नाही.
आत्मैवेदं जगत्सर्वं ज्ञातं येन महात्मना । अनुवाद - ज्या महात्म्याने ह्या संपूर्ण सगाचे व आत्म्याचे ऐक्य जाणले आहे, त्या ज्ञानी माणसाला आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास कोण प्रतिबंध करू शकेल. विवेचन - जी व्यक्ति स्वतःला आत्मा न मानता केवळ मन व अहंकार यांच्या प्रेरणेनेच सर्व कामे करते तिला त्या कर्माचे पापपुण्याचे फळ स्विकारावे लागते. त्या कर्माचे फल त्या मनालाच भोगावे लागते. परंतु जो त्या चैतन्यरूपी आत्म्याशी एकरूप होतो, सर्व जगात ज्याला एकच आत्मा दिसतो, त्याचेबाबतीत कर्मही शिल्लक राहत नाही. किंवा त्याचे फळ किंवा भोगसुद्धा शिल्लक राहत नाही. कारण आत्मा कोणतेच कर्म करत नाही. जे मन किंवा जो अहंकार कर्म करत होता तोच नष्ट झाल्याने त्या कर्माचे कर्तृत्व घेणाराही कुणी शिल्लक राहत नाही. त्याचे अस्तित्वच नसल्याने, पापपुष्य होतच नाही. हेच सत्य सांगतांना राजा जनक म्हणतोय हे सर्व एकाच आत्म्याचे रूप असल्याचे ज्याने जाणले आहे, त्या ज्ञानी पुरुषाला त्याच्या इच्छेनुसार कार्य करण्यास कुणीच अडवू शकत नाही. असा ज्ञानी पुरुष सामाजिक राजकिय, व्यावहारीक अशा सर्व नियमांपासून व बंधनांपासून मुक्त असतो व केवळ ईश्वराच्या नियमानुसारच तो कार्य करतो. त्याच्या सर्व कामाचा पाया, सर्व व्यवहाराचा पाया त्याचा स्वतःचा विवेक असतो. त्यामुळे तो त्या विवेकानुसार कार्य करीत असतांना कुणीच त्याच्या विवेकाला धक्का लावू शकत नसल्याने त्याच्या कार्यात अडथळे आणून ते कार्य बंद पाडू शकत नाही. ज्ञानी पुरुषाचा विवेक भक्कम असल्याने ते कोणत्याही परिस्थितीत कार्य तडीस नेतातच. केवळ कर्तृत्वाच्या अहंकाराने मन व बुद्धि यांच्या वासनामय इच्छांनी ज्ञानी पुरुष कधीच काम करत नाही. शरीर, मन, अहंकार व बुद्धि ह्या सर्व बंधनातून मुक्त होऊन ज्ञानी पुरूष परम स्वतंत्रतेचा आनंद समभाव वृत्तीने भोगतो. जेंव्हा द्वैत आहे, कुणीतरी दुसरा हजर आहे केव्हाच पाप-पुण्याचा प्रश्न येतो. जेंव्हा हे सारे जग मीच आहे व मीच तो आत्मा आहे असे शिवाचे व जीवाचे ऐक्य झाले आहे तेव्हा पाप-पुण्यही नाही व मी आणि दुसरा अशी द्वैत भावनासुद्धा नाही.जर दोन असे कुणीच नाही तर पाप करणारा कोण ? कोणासाठी व कुणाशी पाप करायचे ? कोण कर्ता आहे ? कोण भोग घेणारा आहे ? पाप-पुण्याची भाषा द्वैताची भाषा आहे व ती तर अज्ञानी माणसांकरिता आहे. ज्ञानी माणसाच्या मनात तर कुणीच कुणापासून भिन्न नाही. ज्ञानी माणसाजवळ एकत्वाची भावना असते, भेद शिल्लकच राहत नाही मग पाप-पुण्य कशाचे ? शरीराचा एक अवयव दुसर्या अवयवाला दुखापत करत नाही, सहकार्यच करतो. जर अनवधानाने एखाद्या अवयवामुळे दुसर्या अवयवाला त्रास झाला तर दुसरा अवयव काही त्याचा सूड घेत नाही, माफी मागण्यास सांगत नाही. कोणत्याच अवयवाला त्यामुळे पाप लागत नाही किंवा बाकीचे अवयव स्वर्गात व त्रासाला कारणीभूत ठरलेला अवयव नरकात जातो असेही होत नाही. पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, दया-क्षमा ही सर्व द्वैतवादी भाषा ज्ञानी माणसाकरिता उपयोगाची नसून ती अज्ञानी माणसाची भाषा आहे. अद्वैताची प्राप्ती केलेला ज्ञानी पुरुष ह्या सर्व द्वैतातून व द्वंद्वातून मुक्त असतो. ज्याला एकत्वाचा बोध होतो त्याला पाप-पुण्य लागत नाही.
आब्रह्मस्तम्बपर्यन्ते भूतग्रामे चतुर्विधे । अनुवाद - ब्रह्मापासून क्षुद्र मुंगीपर्यन्तच्या चार प्रकारच्या जीवांच्या समूहात आपली इच्छा व अनिच्छा नियंत्रित करण्याचे सामर्थ्य फक्त ज्ञानी पुरूषाजवळ असते.
विवेचन - ज्ञानी व अज्ञानी माणसांच्या कार्या-कार्यात तसेच व्यवहारात ज्याप्रमाणे फरक ( भिन्नता) दिसून येते, त्याचप्रमाणे ज्ञानी व अज्ञानी माणसांनी निर्माण केलेल्या शास्त्रात सुद्धा वेगळेपणा दिसून येतो. सर्व ज्ञानी माणसांची विचारदृष्टी एकच असते पण अज्ञानी माणसांत मात्र प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असतो. दादू नावाचे कविने सांगितले आहे की, -
आत्मानमद्वयं कश्चिंञ्जानाति जगदीश्वरम् । अनुवाद - आत्मा हाच अद्वैतरूपी जगदीश्वराचे रूप आहे, तोच आत्मा, तोच जगदीश्वर हेच अद्वैत आहे. याचे ज्ञान क्वचितच एखाद्या व्यक्तिला होते. तो जे करणे योग्य समजतो तेच तो करतो व त्यासाठी त्याला कुणाचेही भय वाटत नाही. विवेचन - राजा जनक म्हणतो की जगात अनेक लोक वेगवेगळे मुखवटे लाऊन ज्ञानी असल्याचे प्रदर्शन करतात. कोणी पूर्ण नग्न अवस्थेत, कोणी अंगाला चिमटे लाऊन, कुणी अग्नि प्रज्वलित करून, कुणी तपश्चर्या करून कोणी अंगाला भस्म फासून, कोणी घंटानाद करून आपण ज्ञानी असल्याचे नाटक करतात. सांगता येणार नाही एवढ्या वेगवेगळ्या पेहेरावात व रूपात ते ज्ञानीपण मिवत असतात. त्यातही पुन्हा भेद व संप्रदायाचे तुकडे असतात. कुणी द्वैतवादी, कोणी निरंकारवाले, कोणी कबीरपंथी, कोणी नानकपंथी, कोणी शैव तर कोणी वैष्णव. पण त्यांच्यात ज्ञानी पुरूष एखादाच असतो. कोणी एखादाच आत्म्याचे ज्ञान प्राप्त केलेला असतो. आत्मा एकच असून सारी सृष्टी हा त्याचाच अविष्कार आहे हे ज्ञान सर्वांना झालेले नसते. एकच आत्मा आहे व तोच जगदीश्वर आहे, त्याच्यापासून सृष्टी निर्माण झाली आहे. सृष्टी आत्मा व ईश्वर हे एकच आहेत, सृष्टी वेगळी व तिला निर्माण करणारा सृष्टीवेगळा अशी स्थिती नाही हे ओळखतो तोच ज्ञानी होय. भस्म लावल्याने व एका पायावर उभे राहिल्याने किंवा केवळ भगवे कपडे व तुलशीमाळा घातल्याने ज्ञान होत नसते. ज्याला आत्मा एकच आहे हे ज्ञान झाले त्या ज्ञानी पुरूषाला जे करणे योग्य आहे असे वाटते, तेच तो करतो. तो कुणा दुसर्याच्या आदेशाचा नोकर नसतो. त्याला कुणाचे भय सुद्धा नसते कारण मन व अहंकार यापासून तो मुक्त झालेला असतो. भय वाटणे म्हणजे द्वैतभावना असल्याचे लक्षण आहे. अद्वैतावस्थेत कशाचेच भय नसते. |