|
अष्टावक्रगीताप्रकरण ८ वेबंध आणि मोक्ष यांचे कारण मन आहे.तदा बन्धो यदा चित्तं किञ्चिद्वाञ्छति शोचति । किञ्चिन्मुच्यति गृह्णाति किञ्चिहृष्यति कुप्यतिः ॥ १ ॥ अनुवाद - मुक्ति आणि बंधन यांचे स्पष्टीकरण करतांना या प्रकरणात अष्टवक्र महाराज सांगतात की, 'जेंव्हा चित कशाची तरी इच्छा बाळगते, कशाचा तरी विचार करते, कशाचा त्याग करते, काही स्वीकारते तेंव्हा ते सुखी किंवा दुःखी होते व तेंव्हाच बंधनात सापडते. विवेचन - अष्टवक्र महाराजांच्या उपदेशामुळे राजा जनकाला तत्व-बोधाचा लाभ झाला. अष्टवक्र महाराजांनी केलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊन राजा जनक त्याही कसोटीतून यशस्वी होऊन पार पडला. ह्यामुळे अष्टवक्र महाराज समाधान पावले. चार सुत्रात बंधन आणि मुक्ति ह्यांचे संक्षिप्त स्पष्टिकरण करतांना या प्रकरणात अष्टवक्र महाराज म्हणतात की हे जनक राजा, ही बंधने काही भौतिक स्वरूपातली नाहीत. या जगात शरीररूपाने कुणाला बांधता येईल, पण त्याचे मन, त्याची प्रेरणा, त्याचे विचार ह्यांना कुणी बांधू शकत नाही. मनुष्य स्वतःच शरीराच्या प्रेमामुळे वासना व इच्छांमुळे स्वतःच स्वतःला बांधून घेतो व बंधनात अडकून दुःखी होतो. त्याच्या दुःखाचे दुसरे कोणतेही कारण नसून तो स्वतःच आहे. चित हे आत्म्यापेक्षा भिन्न आहे, वेगळे आहे. तेच सर्व विचार, वासना व इच्छांचे केंद्र आहे. त्यामुळेच हे विश्व सत्य असल्याचा भ्रम होतो. त्याच्याचमुळे सुख-दुःखाचा अनुभव येतो. हे चित्तच विषयांकडे आकर्षित होते व त्यांच्या उपभोगाची, प्राप्तीची इच्छा बाळगते. ह्या इच्छेमुळेच प्रापंचिक व सांसारिक जगाची मनात सुरवात होते. ह्या इच्छेच्या पूर्वीसाठी मनुष्य संघर्ष करतो, दुसर्याला त्रास देतो, शोषण करतो व पैसा गोळा करून तिजोरी भरण्याचा प्रयत्न करतो. ह्या इच्छेसाठीच तो प्रसंगी हिंसा व खूनसुद्धा करतो, असंख्य प्रकारचे चांगले किंवा वाईट कर्म करतो व जो जो त्यास पैश्याची व अन्य बाबांची प्राप्ती होते तो तो अधिकाधिक पैश्याची त्याची इच्छा वाढतच जाते. वैभवाची तहान वाढत आते, मोह वाढत जातो, एका इच्छेतून दुसरी इच्छा निर्माण होते व बंधनांचे जाळेच तयार होते. वांछीत वस्तू मिळाली तर हर्ष होतो आणि प्राप्त झाली नाही किंवा प्राप्तीत काही अडथळा आला तर तो क्रोधित होतो, संतप्त होतो. याप्रमाणे चित्त जेव्हा कशाची तरी इच्छा बाळगते, वासनाग्रस्त होते, तेव्हा त्या वासनेमुळेच मन काही अपेक्षा करते, कशाचा तरी विचार मनात घोळवते, स्वीकार कशाचा करायचा ते ठरवू लागते, कशाचा त्याग करायचा ते ठरवू लागते आणि त्या सर्व विचार प्रक्रियेत व भाव भावनांच्या गदारोळात सुख-दुःख जन्माला येते. योग वशिष्ठ ग्रंथात प्रभु रामचंद्रांना उद्देशून मुनि वशिष्ठ म्हणतात की 'हे राम, वासनाग्रस्त मन हेच बंधन आहे. आणि वासनेपासून पूर्ण सुटका होणे हाच मोक्ष आहे. म्हणून तू वासनेचा त्याग करून, मोक्षाच्या इच्छेचासुद्धा त्याग करून सुखी हो' सर्वात बाहेर कर्म-जगत असते, ते खूप लहान असते पण त्याच्या मागे एक विशाल विचारांचे जग आहे आणि त्याहूनही विशाल असणारे वासनांचे विश्व त्याचे मागे असते. वासनांमुळे विचार निर्माण होतात व विचारांमुळे कर्म होते. त्यामुळे केवळ कर्म-संन्यास घेऊन विचार नष्ट होत नाही व विचार करणे सोडले तरी वासना नष्ट होत नाही. वासना हे जर वृक्षाचे मूळ मानले तर विचार त्याचे खोड व फांद्या आहे तर कर्म त्याची पाने आहेत. खोड, फांद्या आणि पाने या सर्वांचे पोषण मुळांमधून होते. केवळ पाने तोडून टाकल्याने वृक्ष मरत नाही. जोपर्यंत वासना शिल्लक आहेत तोपर्यंत केवळ कर्म-त्याग करून काहीच साध्य होत नाही. याउलट वासना संपुष्टात आल्या तर विचारांचे व कर्माचे अस्तित्व आपोआप नष्ट होईल. चित्तामधे वासना असते व त्यामुळे मन सक्रिय होते व त्यातून विचार निर्माण होतात. विचारांचे नियंत्रण बुद्धि करते व विचारांना प्रत्यक्ष साकार करण्यासाठी बुद्धि जेंव्हा शरीराला आदेश देते तेंव्हा कर्म जन्माला येते. म्हणून कर्म काही स्वतंत्रपणे अस्तित्वात नसतात तर त्यांचे अस्तित्व शरीरावर मनावर अवलंबून असते. वासनेमुळे मनुष्य विचार करू लागतो, चिंतन करतो, कशाचा तरी स्वीकार करतो व कशाचा तरी त्याग करतो व त्यामुळे सुखी किंवा दुःखी होतो आणि त्याचाच परिणाम म्हणून बंधनात अडकतो. ही सर्व लक्षणे वासनेमुळे निर्माण होतात त्यामुळे वासना शिल्लक आहे हे ह्या लक्षणांवरून ओळखता येते. मन सक्रिय होणे हे बंधन नसून वासनांचे अस्तित्व हे बंधन आहे. काम, क्रोध ही सर्व ह्या वासनांचीच फळे आहेत. वासनांमुळेच चित्तात लाटा उठल्याप्रमाणे विचार निर्माण होतात. ह्या लाटा म्हणजेच मन आहे. त्यांना सरळ साध्या प्रयत्नांनी थांबवता येत नाही. पण वासनारूपी वारा थोपवला तर पाण्यात तरंग निर्माण होणे आपोआप थांबते. वासनांचा नाश केल्याने मनाचे अस्तित्व नष्ट होते व तरच कर्म-मुक्ति होते. शरीर बंधन नाही किंवा त्याचे कर्म-बंधन नाही, मन बंधन नाही किंवा त्याचे विचार बंधन नाहीत, पण बंधन आहे ते वासना, बंधन आहे ते इच्छांचे. ही वासना भोगाची असो किंवा त्यागाची, जगायची असो किंवा मोक्षाची. स्वीकार करण्याची असो किंवा नाकारण्याची, त्यामुळे काही फरक पडत नाही. दोन्ही बंधने आहेत. जो कर्मात अडकेल तो कदाचित राजकीय सामाजिक नेता होईल, विचारात अडकेल तो कदाचित तत्त्वज्ञानी होईल पण मुक्त होणार नाही. जो माणूस धार्मिक वृत्तीने केवळ साक्षीदार होऊन सर्व विश्व व्यवहार वासनाविरहित होऊन पाहील तोच मुक्त. विचारांचे जग म्हणजे पाण्यात पुन्हा पुन्हा निर्माण होणार्या तरंगांचे जग आहे. तत्वज्ञानी त्यातच गुंतलेला असतो, त्याला खोलवरच्या शांत समुद्राचा परिचय नसतो. राजकीय सामाजिक नेता कर्मातच अडकतो त्याला वैचारिक जगाची माहिती नसते. सर्वसामान्य माणसांना प्रत्यक्ष कर्म, कार्य त्वरीत समजते. त्यामुळे कर्माविषयी अधिक लोकांना रूची असते. विचाराच्या पातळीवर फारच थोडे लोक पोहचू शकतात म्हणून विचारांच्या क्षेत्रात कर्माच्या तुलनेत फार कमी माणसे प्रवेश करतात. परंतु केवळ 'साक्षी ' होण्याची उंची गाठणे फारच दुर्मिळ असते. म्हणून सर्वात जास्त महत्त्वाच्या साक्षी होण्याच्या क्षेत्रात क्चचितच कुणी तरी येते व ते क्षेत्र आवाक्याचे बाहेरचे असते. ह्याच कारणामुळे अज्ञान सर्वात जास्त असते, हेच मायारूपी विश्व आहे व हेच बंधन आहे. ज्ञान म्हणजेच मुक्ति. ही फारच थोड्या अधिकारी पुरूषांच्या नशिबी असते. जगात जेवढे धर्म आहेत, तेवढे सर्व विचारांच्या पातळीपेक्षा जास्त उंच नाहीत, म्हणून त्या पातळीवर त्या सर्वात वेगवेगळेपण दिसून येते. मुक्तिचा कोणताच धर्म नाही. मूढ व अज्ञानी तर कर्माच्याच प्रेमात अडकले आहेत. ते सदैव आचरण, सदाचार व कर्मकांड यांच्यापेक्षा वरच्या दर्जाचे जीवनापर्यंत पोहचू शकत नाही. अष्टवक्र मुनी ह्यालाच 'बंधन' असे संबोधितात. तदा मुक्तिर्यदा चित्तं न वाञ्छति न शोचति । न मुञ्चति न गृह्णति न हृष्यति न कुप्यति ॥ २ ॥ अनुवाद - जेव्हा मन कशाचीही इच्छा बाळगत नाही, कशातही अडकून त्याचा विचार करत नाही, कशाचाही त्याग करत नाही व कशाचाही स्वीकार करत नाही, यामुळे जेंव्हा मन सुखी होत नाही किंवा दुःखी होत नाही तेंव्हाच त्याला मुक्ति म्हणतात. विवेचन - ह्या सुत्रात अष्टवक्र मुनींनी आत्मरूप होऊन मनाने निर्विकल्प होऊन साक्षीभाव आत्मसात करण्यावर भर देतात व सांगतात की जेव्हां मनात कोणतीच इच्छा शिल्लक नसते, कशाचाही ते विचार करत नाही व काहीही स्वीकारणे किंवा त्याग करणे सोडून देते, पर्यायाने सुख-दुःखापासूनही अलिप्त होते तीच मुक्तिची अवस्था होय. मन, बुद्धि, अहंकार, आणि शरीर सुद्धा चित्तापेक्षा वेगळे नसून चित्ताच्याच वेगवेगळ्या अवस्था आहेत. वासना व इच्छांचा, चित्त जणू एक गुच्छ आहे. त्याच्यात 'मी' पणा निर्माण होतो. आपल्या स्वतःला आत्म्यापेक्षा वेगळे मानणे हा अहंकारच आहे. अहंकार जेव्हां वासनापूर्तीसाठी विचार करू लागतो तेव्हा त्यास मन म्हणतात. जेव्हां तो चांगले वाईट असा भेद करू लागतो तेव्हा त्यास बुद्धि म्हणतात, जेव्हां तो क्रियाशील होतो तेव्हा तो 'शरीर' रूपाने क्रिया करू लागतो. शरीराचा विकाससुद्धा चित्तवृत्तीनुसार व वासनापूर्त्तीसाठी अनुकूल असा झालेला आहे. हे विश्व किंवा मोक्ष सुद्धा एखादे भौगोलिक ठिकाण नाही किंवा एखादे विशिष्ट स्थान नाही. शरीराच्या बाहेर जे स्थूल, भौतिक जग दिसून येते, ज्या नद्या-पर्वत, दर्या, पठारे, झरे किंवा समुद्र दिसतात तेवढेच जग नसून एक सूक्ष्म जग मनुष्याच्या अंतरीसुद्धा वसत असते, परंतु ते दिसून येत नाही. मनुष्याच्या अंतरीचे जग जसे असेल तसेच बाहेरचे जग दिसू लागते. दुःखी माणसाला सारे जर दुःखी वाटते तर आनंदी व सुखी असणार्यास त्याचे प्रमाणे उर्वरित जग सुद्धा तसेच आनंदी व सुखी आहे असे वाटू लागते. बाहेरच्या जगात जे काही व जसे काही दिसते ते सर्व अंतरीच्या चेतनेवर अवलंबून असते व अंतरीच्या चतनेचेच ते एक प्रकारचे प्रक्षेपण असते. अन्यथा आत्मा जसा निरपेक्ष व शांत असतो तसेच बाहेरचे जगसुद्धा निरपेक्ष व शांत असते. मनुष्य आपल्या चित्तवृत्तीच्या प्रभावानुसार ह्या दृश्य जगाचे वर्णन करीत असतो. हाच भ्रम आहे. म्हणून आध्यात्मात ह्या बाह्य जगाला 'माया' म्हणतात. ही माया मनुष्याच्या चित्तवृत्तीतून निर्माण होते, बाह्य जगतामुळे नव्हे. अध्यात्मिक वृत्तीच्या चर्चेत ह्याच अंतरीच्या मायाजगाची चर्चा केली जाते. ह्याच प्रकारे मोक्ष सुद्धा एखादे भौगोलिक ठिकाण नाही की मेल्यावर या भौतिक जगातून निघून कोणत्या दुसर्या दिव्य जगात जाऊन बसले किंवा एखाद्या सिद्धशाली शिलाखंडावर जाऊन बसणे म्हणजे मोक्ष नव्हे. परंतु जेव्हां चित्त कमालीचे शांत होते व त्यात कोणतीही इच्छा, वासना, विचार किंवा कर्म शिल्लक रहात नाही ती अवस्था म्हणजे मोक्ष होय. हीच चैतन्याची परम विशुद्ध अवस्था आहे. हेच आत्म्याचे स्वरूप आहे व तोच त्याचा स्वभाव आहे. ही अवस्था प्राप्त करणे हाच मोक्ष, हीच मुक्ति आहे अन्यथा ह्यापेक्षा वेगळा मोक्ष अस्तित्वात नाही. चैतन्यात निर्माण झालेली लाट म्हणजे क्षणभंगुर विश्व आहे व त्या लाटा शांत होणे म्हणजे मुक्ति आहे. मोक्षाची इच्छा बाळगणे, मोक्षाच्या इच्छेने जगाचा त्याग करणे, सत्य व आनंद शोधण्यासाठी त्याग करणे हे सर्व मोक्षाचे रस्ते नाहीतच. परंतु मोक्षाची इच्छा वासना हीच ती बंधन ठरणारी लाट आहे. संसारिक सुखाची वासना असो किंवा मोक्षाची वासना असो, वासना वासना आहे. केवळ वासनेचा विष विषय बदलल्यामुळे वासनेच्या परिणामात फरक पडत नाही. वासना काही प्राप्तीची असो किंवा उपभोगाची असो किंवा त्यागाची असो, वासना ही वासनाच असल्याने ती मोक्षापासून दूर नेणारी आहे. अष्टवक्र महाराजांच्या विचारानुसार जगाच्या सुखाची इच्छा व बंधन व त्या प्रकारच्या सर्व इच्छांचा शेष म्हणजे मोक्ष होय. तदा बन्धो यदा चित्तं सक्तं कास्वपि दृष्टिषु । तदा मोक्षो यदा चित्तमसक्तं सर्वदृष्टिषु ॥ ३ ॥ अनुवाद - जेंव्हा चित्त विषयांच्या ठायी किंवा कोणत्याही दृष्टिचे ठायी गुंतलेले असेल तेंव्हा ते बंधन आहे आणि तेंव्हा चित सर्व विषयांचे प्रति अनासक्त असेल, तर तोच मोक्ष आहे. विवेचन - पहिल्या व दुसर्या सुत्रात अष्टवक्र मुनी बंधनाची व मोक्षाची वेगवेगळी व्याख्या करतात परंतु या सुत्रात मात्र सार सांगितल्याप्रमाणे सर्व प्रतिपादनाचा निष्कर्ष सोप्या शब्दात सांगतात की जेंव्हा चित्त एखाद्या दृष्टित किंवा विषयाचे ठायी गुंतलेले असते तेव्हा तेच बंधन असते आणि जेंव्हा सर्व दृष्टीने सर्व विषयांतून ते अलिप्त झाले असेल, अनासक्त असेल तेव्हां तोच मोक्ष आहे. ह्या सुत्रात अष्टवक्र मुनी एक अजून महत्त्वपूर्ण गोष्ट सांगतात की केवळ कर्म करण्यात गुंतणेच बंधन होते असे नाही तर आत्म्यापेक्षा वेगळ्या दिसणार्या सर्व विषयांचे ठायी कोणत्याही प्रकारची भावना असणे हे सुद्धा बंधनच आहे. विषयांचे प्रति कोणतीही भावना असणे, कोणत्याही प्रकारची दृष्टी असणे हे वासनेचेच रूप आहे. जिथे नजर आहे, आसक्ति आहे तिथे वासना आहेच. पण दृष्टीच नसेल तर वासना निर्माण होऊ शकणार नाही. वासना असली तरी ती आपोआप शांत होत नष्ट होईल. त्यामुळे चित जेव्हां सर्व दृष्टीने - मग ती दृष्टी सांसारिक सुखाची असो, स्वर्गाची असो किंवा मोक्षाची असो - ह्या सर्व दृष्टीने चित्त अनासक्त होईल तेंव्हा तोच मोक्ष असतो. विषयांवरून नजर काढून केवळ आत्म-दृष्टि असणाराच मुक्त आहे. ह्या ठिकाणी एक शंका निर्माण होऊ शकते की चित्त जेव्हा विषयात गुंतते तेव्हां हे बन्धन आहे. पण तेच चित्त को आत्मरूप होते तेंव्हा मोक्ष असतो. पण चित्त फर चंचल असते व ते आत्म्याचे ऐवजी पुन्हा विषयांकडे वळण्याची शक्यता असते. अशा स्थितीत मोक्ष अनित्य होतो किंवा केवळ काही ठराविक काळापुरताच मर्यादित रहातो. अशा स्थितीत जर इच्छापूर्वक जबरदस्तीने मनाला सर्व विषयांप्रति अनासक्त होण्यास भाग पाडले तर ते पुन्हा विषयात स्वारस्य घेण्याची शक्यता आहे. पण जर स्वाभाविकपणे अंतःकरणपूर्वक निरासक्त होऊन मन स्थिर व वासनारहित केले तर ते आत्म्याचे ठायी एकरूप होऊन जाते. त्याचे स्वतंत्र अस्तित्वच रहात नाही. भ्रमामुळे किंवा अहंकारामुळे सर्व विश्वात प्रत्येक माणसामाणसात जी भिन्नता दिसत होती तीच नाहीशी होऊन जाते. त्यानंतर त्यात पुन्हा इच्छा, वासना यांचे तरंग निर्माणच होत नाही. ज्याप्रमाणे भाजलेले चण्याचे दाणे पुन्हा अंकुरित होऊ शकत नाहीत, त्याचप्रमाणे एकदा आत्मरूप झाल्यावर ते चित्तच रहात नाहीत मग त्याच्यात वासनेचे बीज कसे काय रूजणार ? यदा नाहं तदा मोक्षो यदाहं बन्धनं तदा । मत्वेति हेलया किञ्चिन्मा गृहाण विमुञ्च मा ॥ ४ ॥ अनुवाद - जोपर्यंत 'मी' आहे तोपर्यंत बंधन आहे. जेंव्हा 'मी' नाहीसा होतो तेंव्हा मोक्ष प्राप्त होतो. याप्रकारे चिंतन कर. कशाचीही इच्छा धरू नकोस, काही स्वीकार करू नकोस किंवा कशाचाही त्याग करू नकोस. विवेचन - अहंकार हेच बंधनाचे कारण असल्याचे सांगून स्पष्ट शब्दात अष्टवक्र मुनी सांगतात की जो पर्यंत मनुष्यात 'मी' पणा आहे तो पर्यंत बंधन कायम रहाते. आत्म्यापेक्षा कोणतीही वेगळी सत्ता अस्तित्वात नसतेच परंतु 'मी' पणाच्या अहंकारामुळे भिन्नता व वेगवेगळ्या सत्ता असल्याचा भास होतो. हा 'मी' पणा म्हणजेच अहंकार आहे व तो नष्ट होताच सर्व प्रकारच्या भिन्नतेचा भ्रम नाश पावतो. आत्मरूपी शांत समुद्रात चित्तरूपी हवेमुळे एक तरंग निर्माण झाला. ह्या तरंगाला अज्ञानामुळे भ्रांती होऊन आत्म्यापेक्षा आपण श्रेष्ठ असल्याचा अनुभव येतो व त्यात अहंकार निर्माण होतो. भिन्नतेचा अनुभवच अहंकारात रूपांतरीत होतो. अहंकारामुळेच तो स्वतःच कर्ता असल्याचे मानून जगू लागला, विषय वासनांचा उपभोग घेऊ लागला, भेदाभेद करणारी बुद्धि वापरू लागला, सर्व विषयांचे ठायी आसक्ति वाढली, काहीतरी मिळविण्यासाठी धावाधाव सुरू झाली. हेच मन, हीच बुद्धि सृष्टीक्रमाला प्रारंभ होण्यास कारणीभूत ठरली. हे सर्व घडले ते अहंकारामुळे. आत्म्यापेक्षा आपण वेगळे आहोत हे अहंकाराचे मानणे ह्या सर्व क्रमाच्या मुळाशी आहे. हा 'मी' पणा नष्ट होईल तर विचार निर्माण होणार नाहीत, इच्छा निर्माण होणार नाही व वासनाही निर्माण होणार नाही, स्वीकार नाही व त्यागही नाही. जेंव्हा सर्व काही एकच आहे व त्यांच्यात भिन्नताच नाही तेंव्हा कोण कुणाचा स्वीकार करणार ? कोण कुणाचा त्याग करणार ? कुणी दुसरा असा नाहीच. अशी स्थिती निर्माण होणे म्हणजे मोक्ष आहे. जो पर्यंत जीवाचा संबंध या अहंकाराशी आहे तोपर्यंत जीव स्वतःला आत्म्यापेक्षा वेगळे मानेल व तोपर्यंत त्याच्यासाठी मोक्ष नाही, मुक्ति नाही. अष्टवक्र मुनींनी मुळावरच आघात केला आहे. मुळेच उखडून टाकण्यास सांगितले आहे. बीयाच जाळून टाकण्याची गोष्ट सांगितली. त्यामुळे पुढे त्यातून काही जन्माला येण्याची शक्यताच नष्ट होते. परंतु काही लोक चलाख असतात. सर्व दुर्गुणांचे मूळ असणारा अहंकार तर लोक सोडत नाहीतच पण सोडण्याच्या व त्याग करण्याच्या नावाखाली कोणी रात्रीचे जेवण सोडतोय, कोणी चहा सोडतो, कोणी घरदार सोडतो, कोणी दान करतो, कोणी धर्मशाळा बांधतो, कोणी मंदिरात जाऊन पाचदहा पैसे टाकतो, कोणी नारळ व अगरबत्ती अर्पण करतो. धर्माच्या नावाखाली मनुष्य न जाणो काय काय करेल परंतु या सर्वाच्या मागे 'मी' पणा आहे की मी हे केले, मी चहा सोडला, मी नारळ दिले आणि हे सर्व करण्यामागे जर काही तरी मिळविण्याची इच्छा असेल तर मग हे मोक्षाचे रस्ते नाहीतच, कारण मोक्ष म्हणजे इच्छा नसणे. जगात सर्वजण भोगवासनेत गुरफटलेले आहेत. 'मी 'पणा, वासना, इच्छा, आसक्ति काहीच सुटत नाही. कर्ज काढा पण तूप घ्या अशी ही चार्वाकी पद्धत आहे. कर्ज मिळत नसेल तर चोरी करा, लाचलुचपत मिळवा, गैरकृत्ये करा, धोका द्या, बेईमानी करा, भेसळ करा, शोषण करा पण दुसर्याचे धन हडप करून मौज करा, उपभोग घ्या अशी आजची विचारसरणी आहे. या जगात असंख्य लोक असे आहेत की जे काहीही सोडू इच्छित नाही पण सोडल्याचे प्रदर्शन मात्र करतात. धर्माचा मुखवटा लावून पापकर्म करतात. लोकांनी आपल्याला धार्मिक समजावे यासाठी बाहेरची नाटके करतात, आतमध्ये वासना शिल्लक असतात. केवळ एखाद्या धर्मग्रंथाच्या आधाराने कुणालाही श्रेष्ठ सिद्ध करता येत नाही हेच खरे. बायबल, गीता, गुरू-वाणी, धम्मपद, आदि ग्रंथांचे मी दररोज वाचन करतो. मी ह्या ग्रंथाची पूजा करतो, वाचन करतो म्हणून मी धार्मिक आहे असा कुणी दावा करू शकत नाही. धर्मग्रंथ वाचले म्हणजे धार्मिक झाला असे नसून वासनामुक्त झाला किंवा नाही हा खरा प्रश्न आहे.अन्यथा धर्मग्रंथ वाचणे म्हणजे केवळ ढोंगीपणा आहे. स्वतःचे रूप बदलविणे, वागणे बदलविणे, आत्मा एकच आहे हे जाणणे व सर्व वासनातून मुक्त होणे होय. जो धार्मिक जीवन जगतो. तोच खरा धार्मिक होय. दुसरा कुणी धार्मिक नसतो. जो चोर आहे तो अचौर्याचा म्हणजे चोरीविरोधी भाषणे करण्याचा ठेका घेतो. हिंसक माणूस 'अहिंसा-परमोधर्मः' ची पाटी गळ्यात घालून मिरवतो, भोगांमधे आकंठ बुडालेला माणूस निष्काम कर्म योगाच्या बाता करतो. अष्टवक्र मुनी म्हणतात की अहंकाराने जे काही कराल तेच आणि ते सर्व तुमच्यासाठी पाप सिद्ध होईल. असे करण्यापेक्षा तर चार्वाकासारखे भोगवादी झालेले चांगले. भोगवादी होऊन भोग घेणे धर्माच्या जास्त जवळ आहे. म्हणून तर काही जण चार्वाकासारख्या भोगवादी माणसाला सुद्धा ऋषि म्हणून मान्यता देतात. असत्याला सुद्धा असत्य म्हणून मान्य केले तर तो साक्षी भावाकडे जाणारा रस्ता असतो पण सत्याशी दगाबाजी केली, खेळ केला, ढोंग केले तर तो नरक होतो. क्रोध, काम व लोभ यांच्या वासनांच्या लाटा माणसाच्या अंतरातून अगदी खोलवर असलेल्या द्वैत बुद्धितून निर्माण होतात. ह्या सर्वांना साक्षी भावाने पाहणारा त्यांच्या प्रभावातून मुक्त राहील. जगात जे काही होते ते त्या त्या व्यक्तिच्या व घटनेच्या (वस्तूंच्या) स्वभावानुसार होत असते म्हणून भोग व मोक्ष या दोघांच्या इच्छेतून मुक्त होणे हीच खरी मुक्ति आहे.आणि हे साध्य होण्यासाठी 'मी' पणाचा अहंकारी भाव नाहीसा होणे आवश्यक आहे व हाच अष्टवक्र मुनींचा उपदेश आहे. |