|
अष्टावक्रगीताप्रकरण १२'स्व-रूप' होणे हीच आदर्श स्थिती आहे.
कायाकृत्यासहः पूर्वं ततो वाग्विस्तरासहः । अनुवाद - आत्मज्ञानाच्या प्राप्तीनंतरच्या आपल्या अनुभूतीचे वर्णन राजा जनक त्याचे गुरू स्वामी अष्टवक्र महाराजांचे समोर करतांना म्हणतात, "सर्वप्रथम मी शारीरिक कर्माचा विरोध केला (व त्यातून मुक्त झालो) नंतर वाचेच्या कर्माचा विरोध केला (व त्यातून मुक्त झालो) या प्रकारे मी आता स्थिर व शांत झालो आहे. विवेचन - स्वामी अष्टावक्र महाराज व राजा जनक या दोन्ही ज्ञानी पुरूषांत आपापसांत अत्यंत मधुर व ज्ञान-संपन्न संवाद सुरू आहे. या दोन्ही ज्ञानी पुरूषांना आत्म-ज्ञानाची अनुभूती प्राप्त झाली असल्याने ते परस्परांशी ज्ञान-संवाद करतात. एक ज्ञानी व एक अज्ञानी पुरूषात विवाद होऊ शकतो, संवाद होऊ शकत नाही. दोन अज्ञानी पुरूषात विवादाचे ऐवजी संघर्षच होईल. अष्टवक्र स्वामीजींच्या कृपेमुळे राजा जनकाला आत्मज्ञानाची प्राप्त झाली आहे. ह्या ज्ञान प्राप्तीच्या क्रमाचे वर्णन करतांना राजा जनक निवेदन करतात की 'वासनेमुळे चित्तात तरंग निर्माण होतात, त्यामुळे मनात विचारांची, इच्छांची सुरवात होते. वाणीद्वारे या इच्छांची अभिव्यक्ती होते व नंतर शारीरिक क्रियाद्वारे त्याच इच्छांना प्रत्यक्षात साकार केले जाते. अंतःकरणपूर्वक या प्रकारच्या वाणीचा व शारीरिक क्रियांचा विरोध करणे म्हणजेच निरोध करण्यानेच आत्मज्ञान प्राप्त होते. पतंजली मुनींनी सांगितले आहे की, 'चित्त-वृत्तीचा निरोध करणे हाच योग आहे'. गीता सांगते की, ' फार कठोर परिश्रमानेच मन ताब्यात येते.' निरोध करण्याची पद्धती सांगतांना पतंजली मुनी सांगतात की 'अभ्यास आणि वैराग्यामुळेच चित्तवृत्तीचा निरोध करणे शक्य होते.' म्हणून आत्मज्ञानासाठी अभ्यासाची व वैराग्य आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. राजा जनक म्हणतात की 'मी प्रथम शारीरिक कर्माचा निरोध केला, वाणीच्या कर्मांचा निरोध केला व नंतर मानसिक कर्मांचा सुद्धा विरोध केला, ह्या प्रकारे आत्मज्ञान प्राप्त करून मी आता केवळ 'आत्मा ' स्वरूपात स्थिर आहे. शरीर व इंद्रियांद्वारे होणार्या कर्माशी फळाची आकांक्षा आशा-निराशा, लाभ-हानि, सुख-दुःख अशा अनेक बाबी जोडलेल्या असतात. त्यांच्यामुळे मनात शंका निर्माण होतात. त्यांचा निरोध करण्यासाठी जप, तप, यज्ञ, आसन, हठयोग वगैरे कर्मे केली जातात. पण त्या कर्मांमुळे पुन्हा नवीन इच्छा व नव्या शंका निर्माण होतात. जर शारीरिक कर्मे करणे बंद केले तर वाचा-कर्म सुरू रहाते, भजन-कीर्तन, मंत्रोच्चारण, प्रवचन, उपदेश, या प्रमाणे काही ना काही वाणीचे, वाचेचे कर्म सुरू असते. ते बंद ठेवले तरी मनामध्ये इच्छा, संकल्प, शंका-कुशंका निर्माण होत रहातात. ही तीन्ही प्रकारची कर्मे जोपर्यंत थांबत नाही. तोपर्यंत चित शांत होत नाही व जर चित्त शांत झाले नाही तर आत्म-ज्ञान होऊ शकत नाही. ह्या तिन्ही कर्मांचा निरोध करण्याचा एकच उपाय आहे व तो म्हणजे त्यांची पूर्ण उपेक्षा करणे हा होय. कर्माचा विरोध दुसर्या कर्माने करणे म्हणजे त्यातून पुन्हा नवी कर्मे निर्माण करणे होय. म्हणून उदासिन होणे, उपेक्षा करणे केवळ साक्षीदार होऊन सृष्टीतील सर्व घटना पाहणे हाच एक रस्ता आहे. शरीर, मन व वाणीची कर्मे आपोआप घडत रहातात, शरीराच्या मनाच्या व वाणीच्या स्वभावामुळे ही कामे होत रहातात. अगदी बेशुद्ध अवस्थेत किंवा झोपेतसुद्धा कामे बंद होत नाही. स्वप्नात सुद्धा मनाचे कार्य सुरू असते. शरीरातील हृदय व मेंदू तसेच किडनी सारखे अनेक अवयव सतत व अगदी अखंडपणे कार्यरत असतात. हे सारे नैसर्गिकपणे घडत असते. स्वतःच्या शरीरातील इंद्रियांच्या क्रियांवर निसर्गाचा जेवढा प्रभाव आहे तेवढा प्रभाव आपला स्वतःचा नाही, ह्याचप्रमाणे वाणी व मनाची कर्मे सुद्धा आपोआप होत असतात. त्यांची कामे थांबविण्याचा प्रयत्न केल्यास ती अधिक उत्तेजित होऊन जोरात कार्यरत होतात. म्हणून त्या सर्वांपेक्षा आपल्या स्वतःला वेगळे करून द्रष्टा होऊन साक्षीभावाने त्यांचेकडे पहिल्यास त्यांचा विरोध होऊन त्यांच्यापासून मुक्ति मिळते. कर्तेपणाचा त्याग करणे हाच एक मार्ग आहे. त्यामुळेच चित्त स्थिर व शांत होऊ शकते. गीतेत सांगितलेली वितरागता हीच आहे. मित्र-शत्रु, प्रशंसा-निंदा, त्याग-ग्रहण, राग-विराग, हे सर्व चित्तासाठी उपद्रव आहेत. दोघांमधेही मनुष्याला स्वास्थ्य असते. या सर्वात आसक्ति आहे. एखादी बाब मिळविण्यात जशी आसक्ती आहे तशी आसक्ति त्याग करण्यात आहे. शत्रु, निंदा, विराग यांच्यातही मनुष्याचा अभिमान, अहंकार यामुळे उलट्या प्रकारची आसक्ति म्हणून संबंध आहे. म्हणून राजा जनक म्हणतात की आता मी तिन्ही प्रकारच्या कर्मातून वेगळा झालो आहे. या प्रकारे आता मी चैतन्यरूपी आत्माच झालो आहे.
प्रीत्यभावेन शब्दादेरदृश्यत्वेन चात्मनः । अनुवाद - शब्द आणि इंद्रियजन्य विषयांचे बद्दलच्या सर्व प्रकारच्या आसक्ति, मोह व संबंधातून मुक्त होऊन आणि आत्मा अदृश्य असल्यामुळे त्याच्या बद्दलच्या ज्ञानाच्या अभावात जे विक्षेप (भ्रम) होतात त्यांचे पासूनही मुक्त होऊ, एकाग्र होऊन मी स्थिर वृत्तीने अस्तित्वात आहे. विवेचन - मन वासनाग्रस्त आहे व शरीराचे माध्यम वापरून मन या वासनांची पूर्ती करते. शरीराची पाच ज्ञानेंद्रिये आहेत व पाच कर्मेंद्रिये आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे या इंद्रियांचे विषय आहेत व या विषयांचे सेवन करून मन संतुष्ट होते. यामुळे भावनीक बंधन (राग) निर्माण होतो व एकदा भोगल्यानंतर पुन्हा पुन्हा भोगण्याची इच्छा निर्माण होते. हे मन हाच एक साधनेत सर्वात मोठा अडथळा आहे. उपभोग घेतल्याने मन शांत होत नाही किंवा उपभोगांचा त्याग केल्याने सुद्धा शांत होत नाही. शारीरिक भोग बंद केले तरी वाणीचे भोग सुरू असतात. वाणीचे भोग बंद केले तरी मानसिक भोग सुरूच राहतात. भोगामुळे व त्यागामुळेही मन अशांत होते. मनाची चंचलता सदैव साधनेत अडथळे निर्माण करते कारण मन हे वासनेच्या आधीन असते. वासना शिल्लक आहे तोपर्यंत भोग व त्याग दोघेही व्यर्थ आहेत. मन शांत व्हावे म्हणून जे जप, तप, यज्ञे व अन्य कर्मकांड केले जाते, त्यामुळे नव्या इच्छा निर्माण होतात व नवे अडथळे निर्माण होतात. म्हणून भोग किंवा त्याग (त्यागासाठी केलेली जपतपादी कर्मे) मनाला मुक्त करू शकत नाही. आत्मा अदृश्य आहे. तो दिसत नसल्यामुळे इंद्रियांद्वारे जे जग जाणवते तेच सत्य आहे असा भ्रम निर्माण होतो. ध्यानाद्वारे किंवा समाधीत सुद्धा आत्म्याचे दर्शन किंवा आत्म साक्षात्कार होत नसतो. आत्म्याचा केवळ अनुभव येतो, फक्त बोध होतो, फक्त ज्ञान होते. त्याचे दर्शन होत नाही. तो पाहण्याची वस्तू नाही. तो स्वतः द्रष्टा आहे व सर्वांना पहात असतो. इंद्रियांची सर्व कर्मे त्याच्या अस्तित्वामुळेच होत असतात. शरीर, मन, बुद्धि हे सारे जड आहेत. आत्म्याच्या शक्तिमुळे सक्रिय असणार्या यंत्रासारखे आहे. जड पदार्थ चैतन्याला कसे काय पाहू शकणार ? यामुळे आत्मज्ञान झाल्यावर राजा जनक या स्थितीचे वर्णन करतांना सांगतात की आत्मा अक्षय असल्याने त्याचे बद्दलचे ज्ञानाचे अभावात शरीर व मन याद्वारे निर्माण होणारे भास अनेक अडथळे निर्माण करतात. आत्म्याविषयीचे अज्ञान हेच समस्त अडथळ्यांचे, मानसिक भ्रमांचे मूळ कारण आहे व त्याचे अज्ञानातूनच सर्व मानसिक बंधनांचा (रागांचा) उदय होतो. म्हणून मला आत्मज्ञान झाल्यावर आता मी या सर्व राग-विरागांपासून मुक्त झालो आहे. आत्म्याच्या अदृश्यतेमुळे जे भ्रम व विघ्ने निर्माण होतात त्यातूनही माझी सुटका होऊन एकाग्र झालो आहे. आता मी केवळ आत्मा आहे. हीच खर्या आत्म-ज्ञानीची स्थिती असते. शारीराने व मनाने केलेल्या कर्मांचा आत्म्याला स्पर्श होत नाही. त्यामुळे आत्मज्ञानी, पापपुण्य, किंवा शुभ-अशुभ या प्रकारच्या सर्व कर्मांपासून अलिप्त असतो. तो चांगल्या वाईट कर्मांचा कर्ता नाही व त्या कर्मांच्या फळांचा भोक्ता सुद्धा नाही.
समाध्यासादिविक्षिप्तौ व्यवहारः समाधये । अनुवाद - सम्यक अध्यास (भ्रम) व त्यातून निर्माण झालेल्या विक्षेपामुळे समाधीसारखे व्यवहार होतात. असे नियम पाहून मी आता समाधीरहित अवस्थेत स्थिर झालो आहे. विवेचन - आत्म्याच्या अज्ञानामुळे मनुष्य मन व शरीराचा, इंद्रिये व बुद्धिचा गुलाम होतो. त्यामुळेच तो भोगात रूची घेतो व त्यातून अनेक भ्रम निर्माण होतात. हे सारे भ्रम अंधारात नेणारे व अज्ञानातून निर्माण होणारे आहेत. खरे काय खोटे काय, तथ्य काय भ्रम काय, विवेक कोणता व मूढता कोणती याचे ज्ञान आत्मज्ञानाच्या प्रकाशात होते. अज्ञान दूर व्हावे व आत्मज्ञान प्राप्त व्हावे या हेतूने काहीजण समाधी लावण्याचा व्यवहार करतात. आत्म्याचे ज्ञान समाधी अवस्थेतच होते. परंतु राजा जनकास आत्मज्ञान प्राप्त झाल्याने तो यासारख्या व्यवहारांकडे साक्षी भावाने पहात आहे. राजा जनक समाधीरहित होऊन आत्म्यातच जणू एकरूप झाला आहे. त्याला आता समाधीची आवश्यकता उरलेली नाही. साध्य प्राप्त झाल्यावर साधने निरूपयोगी होतात. म्हणून राजा जनक म्हणतो की अज्ञानामुळेच भ्रम निर्माण होतो, दिशाभूल होते व त्यामुळे लोक समाधी लावतात. परंतु मी आत्म्याशी एकरूप झाल्याने समाधिरहित होऊन या नियमांकडे साक्षीभावाने पहात आहे. आता मी आत्मानंदात आहे. या सर्व विवेचनाचा बोध एवढाच की आत्मज्ञान केवळ बोधामुळे होऊ शकते. ज्याला बोध झाला नाही त्याला ध्यान-धारणा, समाधि वगैरे गोष्टी कराव्या लागतात. अन्यथा त्याची आवश्यकता नाही. समाधीशिवाय मिळणार नाही अशी काही आत्मज्ञानाची अट नाही. अहिंसा, सत्य, दया, करूणा याशिवाय ते होणारच नाही, यम-नियम, आसने, प्राणायाम ह्मांच्याशिवाय मिळणार नाही अशा काही अटी नाहीत. आत्मा तर सदैव उपलब्ध आहे. जागृत होऊन त्याचा बोध करून घ्यावयाचा आहे. दृष्टी पुरेशी आहे. क्रिया आवश्यक नाही.
हेयोपादेयविरहादेवं हर्षविषादयोः । अनुवाद - हे ब्रह्मन ! हिणकस वा उपयुक्त अशा वस्तुंच्या हानीमुळे जो हर्ष किंवा वियोग होतो त्याच्या अभावाने मी जसा आहे तसाच (मूळ आत्म्याचे स्वरूपात) स्थिर आहे. विवेचन - आत्मा हाच आपला स्वभाव आहे, ह्या आत्म्याशी एकरूप होणे म्हणजेच स्वतःचे मूळ स्वरूपाची, 'स्व-भावा' ची प्राप्ती करण्यासारखे आहे. आत्मा हाच शुद्ध आहे, त्याच्यात अशुद्धता नाही. हिणकस (निरूपयोगी) व सकस (उपयोगी), चांगले-वाईट, वगैर विचार (कसोट्या) मनाच्या वासनेमुळे निर्माण होतात. वासनेचा क्षय झाला तर हे सारे भेदच नष्ट होतात. उपयुक्त व निरूपयोगी असे भेद मनात असल्यामुळेच वस्तूच्या प्राप्तीमुळे आनंद होतो. किंवा ती गमावल्यास दुःख होते. वस्तू हिणकस असेल तर तिच्या वियोगाने सुख होते व ती नशीबी आल्यास दुःख होते. जनकाला आत्मज्ञान झाल्यामुळे तो आपल्या मूल स्वरूपात, स्वभावात विलिन झाल्याने त्याच्यासाठी उपयुक्त व निरूपयोगी अशा कसोट्या निरर्थक झाल्या आहेत. त्यामुळे त्यापासून होणार्या आनंद व खेदातून सुद्धा तो मुक्त झाला आहे. आता जनक राजा म्हणतो की 'आता मी जसा मूळ स्वरूपात आहे, त्याच रूपात स्थिर झालो आहे म्हणजेच आपल्या वास्तविक स्वरूपात आहे. अज्ञानामुळे मी जे वेगवेगळे मुखवटे माझ्या चेहेर्यावर लावले होते ते सर्व गळून पडले आहेत.' सॉक्रेटिसने म्हटले होते की 'स्वतःला ओळखणे' राजा जनकाची नेमकी हीच स्थिती आहे. आपला स्व-भाव असेल त्याप्रमाणे जीवन जगणे, आत्मज्ञान होणे अशा वेगवेगळ्या शब्दांनी हीच स्थिती वर्णिली जाते.
आश्रमानाश्रमं ध्यानं चित्तस्वीकृतवर्जनम् । अनुवाद - आश्रम आहे, अनाश्रम आहे. ध्यान आहे, चित्ताचा स्वीकार आहे व त्याचा निरोध आहे. ह्या सर्वातून उत्यन्न होणारा भ्रम पाहून मी त्या तिघांपासून मुक्त आहे. विवेचन - मूढ माणसांसमोर कोणताच प्रश्न नसतो. ते कशाचाही विचार करत नाही व त्यांच्या जीवनात चांगल्या वाईटाच्या काही कसोट्यासुद्धा नसतात. त्यांचा कोणताही सिद्धान्त किंवा विचारदर्शन सुद्धा नसते. ज्ञानी पुरूष विवेकशील वृत्तीने जगतो कारण त्याच्या जवळ जीवनाबद्दलचे काही ठाम सिद्धान्त असतात, जीवनदर्शन असते. पण ज्ञानाच्या उच्चतर अवस्थेत ज्ञानी माणूस या सिद्धान्ताच्याही पलीकडे निघून जातात. मूढ माणसासमोर समस्याच नसतात आणि ज्ञानी पुरूष समस्यांच्या पलीकडे निघून जातात. मूढ अनुभवशून्य आहे व ज्ञानी अनुभव घेऊन त्यातून मुक्त झालेला असतो. दोघांमध्ये फार फरक आहे. परंतू अज्ञानी माणसाचे अनेक विचार असतात, समजूती असतात, अनेक सिद्धान्त असतात.मूढ माणसाजवळ विचारशक्तिच नसते. तर अज्ञानी माणूस बुद्धितच जगतो, बुद्धिच्याच भ्रामक प्रामाण्यात अडकतो. तर्क, विश्लेषण, विभाजन करून सृष्टीजाणून घेऊ इच्छितो म्हणून त्याला एकत्याचा बोध होत नाही. ज्ञानी माणसाला एकत्वाचा बोध झालेला असल्याने त्याचे सर्व श्रम, तर्क, विभाजन, विश्लेषण, अनेकत्व आणि भिन्न भिन्न विचार व भिन्नतेची जाणीव संपलेली असते. निर्विकल्प होऊन, कोणतीही इच्छा मनात शेष नसल्याने ज्ञानी पुरूष परमानंदाचा अनुभव प्राप्त करतो. वर्ण व्यवस्था (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व श्ष) आश्रम व्यवस्था (ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम) अनाश्रम व्यवस्था अज्ञानी माणसाकरता आहे. या व्यवस्थांमुळे त्या त्या अवस्थेतून पार होत क्रमशः प्रगती करीत अज्ञानी माणूस स्वतःची आत्मोन्नती करून घेऊ शकतो. कर्म आणि त्याचे फल याची व्यवस्था अज्ञानी माणसाकरता असते. अज्ञानी माणसांसाठी विविध कर्मांची तरतूद आहे. भजन, किर्तन, भक्ति, पूजा, पाठ, जप, यज्ञ, हवन, कर्मकांड, हठयोगाच्या क्रिया आणि अन्य प्रकारच्या अनेक उपासना पद्धती तसेच ध्यान धारणा समाधी या अन्य साधनापद्धतीच्या द्वारे अंतःकरण शुद्ध होते तेव्हा आत्मज्ञान प्राप्त होते. म्हणूनच काही धर्म-संप्रदाय उपदेश करतात की जे काही जसे आहे तसेच स्वीकार करावे कारण जे आहे ते सारे ईश्वरीय आहे. स्वीकार करण्याने तुम्ही मुक्त व्हाल. तंत्र पंथाची हीच समजूत व धारणा आहे. हठयोगात चित्ताचे निरोधन करण्याची पद्धती सांगितली आहे. - "मनाचे नियंत्रण करा, वासना-भोगापासून दूर रहा, मनाचे ऐकू नका, मनच सतत भटकत रहाते. शरीराला पण कष्ट द्या, कारण त्याच्यामुळेच तुम्ही विषय वासनात अडकला आहात. शरीराला उघडे ठेवा, उपाशी ठेवा, त्याला चाबकाचे फटके मारा. थंडीत उन्हात त्याचा छळ करा कारण हे शरीर पापी आहे" ह्यालाच हठयोगी तपश्चर्या, तप म्हणतात. पण हे सर्व कशासाठी ? ह्याचा पर्याय आहे - 'आत्म-ज्ञान'. असे हठयोगी तप केल्याने कदाचित अज्ञानी माणसाची पाप वासनातून मुक्ती होईल व त्यामुळे त्याला बोध होण्यास मदत होईल पण ही सर्व साधना अज्ञानी माणसासाठी आहे. राजा जनकाला तर आत्म-ज्ञान होऊन चुकले आहे. वर सांगितलेली तपःश्चर्या करून जे मिळवायचे ते राजा जनकाला प्राप्त झालेलेच आहे. म्हणून राजा म्हणतो की आता माझ्यासाठी आश्रम नाही व अनाश्रम नाही, ध्यान नाही आणि मनाचे नियंत्रण करण्यासाठी साधना नाही. या सर्वातून मुक्त होऊन आत्मरूपातील पर्याय मी प्राप्त केल्याने मी केवळ आत्म-रूपातच स्थितप्रज्ञ बुद्धिने स्थीर झालो आहे. जनकाचे हे प्रतिपादन त्याच्या सिद्धावस्थेचे लक्षण आहे. अज्ञानाच्या अवस्थेत असतांना ह्या साधना पद्धतीचा अवलंब करावा लागतो. ज्याला बोध होत नाही त्याला कोणती तरी उपासनापद्धती स्वीकारावी लागेलच. कोणत्याही पद्धतीचा अवलंब न करणे ही सुद्धा एक पद्धत आहे. पण तिची साधना व अवलंबन फारच कठीण आहे. त्यामुळे ही 'बोध ' होण्याची पद्धत फारच थोड्या लोकांना उपयगी पडू शकते. सामान्य व्यक्तिची ह्यात दिशाभूल होऊ शकते.
कर्मानुष्टानमज्ञानाद्यथैवोपरमस्तथा । अनुवाद - ज्याप्रमाणे कर्माचे अनुष्ठान अज्ञान आहे, त्याचप्रमाणे अज्ञानामुळेच कर्माचा त्याग करण्यात येतो - हे तत्त्व मी मनःपूर्वक जाणल्यामुळे कर्म व अ-कर्म यांतून मुक्त होऊन मी माझ्या मूल आत्मस्वरूपात स्थिर आहे. विवेचन - जगात विविध कर्मे करणे हे आवश्यक व बंधनकारक आहे. कर्म अनेक प्रकारचे असते. उदाहरणार्थ स्वाभाविक कर्म, सक्तिचे किंवा बंधनकारक कर्म, नित्यकर्म, अ-कर्म वगैरे. कर्म शारीरिक व मानसिक प्रकारचे सुद्धा असते. जीवन हेच कर्म व कर्म हेच जीवन आहे. कर्माचा पूर्ण अभाव म्हणजे मृत्यूच. कर्मांचा प्रारंभ जन्मापासून सुरू होतो व मृत्यूपर्यंत चालू रहातो. म्हणून जीवनातून कर्म नाहीसे करणे अशक्य आहे. गीतेत म्हटले आहे की - "कुणीसुद्धा व क्षणभरसुद्धा कर्म न करता राहू शकत नाही कारण प्रकृतीचे गुण सर्वांकडून सर्व वेळी कर्मे करून घेतात." परंतु जी कर्मे अहंकरामुळे केली जातात, वासनापूर्तीसाठी केली जातात, ज्या कर्मांचे मागे काही अपेक्षा व लालसा असते, ती कर्मे मनुष्यासाठी बंधनरूप होतात. ज्या कर्मामधे कर्तेपणाचा अहंकार असतो, 'मी करतो आहे' 'मी केले आहे' याप्रमाणे जिथे 'मी' ची उपस्थिती असते तेथेच कर्म हे बंधन होते व त्याचे कारण 'मी' भाव व अज्ञान हेच आहे. हे सर्व जप, तप, ध्यान, धारणा, भजन, यज्ञ, समाधि केवळ अहंकाराने 'मी' भाव कायम ठेऊन व फळाची आसक्ति ठेऊन केले जात असल्याने ही कर्मेसुद्धा बंधनस्वरूप होतात. अहंकाराने व अज्ञानाने केलेल्या कर्माचे फळ अवश्य मिळते. शुभ कार्याचे फळ शुभ असते व अशुभ कर्माचे फळ अशुभ असते. पण अशुभ जसे बंधन असते तसेच शुभ सुद्धा बंधनच असते. बेड्या लोखंडाच्या असोत किंवा सोन्याच्या, मुक्तिसाठी तर दोन्ही बेड्या तोडाव्या लागतात. याचप्रमाणे कर्माचा त्याग सुद्धा बंधन असते. कारण त्यात सुद्धा अहंकार असतो. कर्माच्या त्यागात सुद्धा अहंकारामुळे व अज्ञानामुळे 'मी' पणा असतो. 'मी त्याग करतो ' हा अहंभाव बाळगून जो त्याग केला जातो तो अहंकाराची अधिकच वृद्धि करतो. शिवाय अशा त्यागाचे मागे स्वर्ग, मोक्ष किंवा मुक्ति यासारख्या अपेक्षा व लालसासुद्धा असतात. यामुळे जी कर्मे अहंकाराने, लालसेने व अज्ञानाने केली जातात ती मुक्तिच्या वाटेवर नेऊ शकत नाही. म्हणून राजा जनक या श्लोकात सांगतात की जसे कर्माचे अनुष्ठान अज्ञान असते तसेच त्यागाचे अनुष्ठान सुद्धा असते. दोघांमधे 'मी' भाव असतो व तो अज्ञानामुळे निर्माण झालेला असतो. आत्म-स्वरूप झाल्यामुळे मी हे जाणू शकतो कारण आत्मा कोणतेही कर्म करीत नाही व कोणत्याही कर्माचा कर्ता आत्मा न्सतो. कर्म केवळ अहंकारामुळे होते 'मी' भाव रूपी अहंकारविरहीत होऊन कर्म व अ-कर्म तसेच कर्म व कर्मत्याग या सर्वांपासून मुक्त होऊन आत्मस्वरूपात स्थिर आहे. अहंकाराचा त्याग करून स्वाभाविकपणे केलेली कर्में बंधनकारक कर्मे नसतात. या स्थितीत मी पोहोचलो आहे. राजा जनकाने या सुत्रात कर्माचे जे वर्णने केले आहे त्यापेक्षा उचित व श्रेष्ठ अशी कर्माची दुसरी कोणतीही अवस्था नाही.
अचिन्त्य चिन्त्यमानोपि चिन्तारूपं भजत्यसौ । अनुवाद - 'ब्रह्म ' तत्वाचे (अचिंत्याचे) चिंतन करतांनासुद्धा काही पुरुष ऐहिकाची चिंता करीत असतात. म्हणून त्या भावनेचा त्याग करू, भावनामुक्त होऊन मी स्थिरवृत्तीने अस्तित्वात आहे. विवेचन - कृष्णाची गीता हा उपासकासाठी केलेला उपदेश आहे. परंतु अष्टवक्र गीता ही उपासनेनंतरच्या सिद्ध अवस्थेच्या अनुभूतीचे वर्णन आहे. यात उपदेश नाही तर कसोट्या आहेत ज्यांचेवर पारखून आत्मज्ञानी झाल्याचे सांगणार्या व्यक्तिंचे परीक्षण करता येते. या कसोट्यानुसार ज्याला ज्ञान झाले आहे तोच ज्ञानी असे जाणावे. या जगात अनेक व्यक्ति स्वतःला सिद्ध म्हणवून घेतात, महात्मा म्हणवून घेतात, आपण ज्ञानी झाल्याचे, तीर्थंकर असल्याचे, पैगंबर असल्याचे, ईश्वर-पुत्र, भगवान व संत असल्याचे जाहीर करतात. या सर्वांना अष्टवक्र-गीतेच्या कसोटीवर पारखून पाहता येणे शक्य आहे. जर या कसोट्यांनुसार त्यांना अनुभूती झाली असेल तर त्याला आत्मज्ञान प्राप्त झाले असे मानता येईल, अन्यथा मुळीच नाही. अन्यथा त्यांना आत्मज्ञानाची केवळ भ्रांती झालेली आहे, किंवा ते केवळ ढोंग करत आहेत हे सिद्ध आहे. आत्मज्ञानाच्या अशा अचूक कसोट्या अन्यत्र कुठे उपलब्ध नाहीत. अष्टवक्र गीता एखादा सिद्धान्त नाही. अष्टवक्र गीता म्हनजे अध्यात्मातील एक वैज्ञानिक वक्तव्य आहे व ते सर्व देश, धर्म, काल, समुदाय, जाती व वर्ग यांच्या पलिकडील व त्या सर्वांवरचे म्हणजेच त्या सर्वांच्या निरपेक्ष असे आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील हे वैज्ञानिक वक्तव्य म्हणजे सार्या विश्वाचा मौलिक, पारंपारिक वारसा आहे. धर्माच्या नावावर प्रचलित असलेल्या अनेक पाखंडी व ढोंगी व्यक्तिंचे मुखवटे फाडण्याचे काम अष्टवक्र गीतेतील कसोट्यांनी करणे शक्य आहे. राजा जनक ह्यांनी सुत्रात यापुढील, अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे सूत्र सांगितले आहे. अनेक व्यक्ति कर्मकांड, उपासना सोडून केवळ त्या अचिंत्य ब्रह्माचे चिंतन करतात. त्यांना वाटते की केवळ परमात्म्याच्या चिन्तनामुळे, ब्रह्माच्या चिंतनामुळे त्यांना मुक्ति मिळेल. जनक म्हणतो की हा सुद्धा भ्रम आहे. पहिला मुद्दा असा की ब्रह्म तर निराकार आहे. त्याचे चिन्तन होऊ शकत नाही. शिवाय चिन्तन करणार्याला ' चिन्तन ' करण्याचीच चिन्ता असते. आज चिन्तन झाले नाही. आज ध्यान किंवा समाधी लागली नाही याचीच चिंता होते. याप्रकारे या चिंतनात सुद्धा 'कर्ता' भाव असतो, मी चिंतन करतो - असा 'मी' - भाव, मी-पणा असतो. म्हणून चिंतन करणारा मनुष्य ब्रह्माच्या ऐवजी ' चिंते'चेच चिंतन जास्त करतो. आत्म-ज्ञान प्राप्त झाल्याने राजा जनक या ब्रह्माच्या चैतन्याच्या चिंतनातून सुद्धा (त्याचा त्याग करून) मुक्त होऊन आपल्या आत्म-रूपात स्थिर आहे. ब्रह्म-चिंतनाच्या चिंतेतून सुद्धा राजा जनक मुक्त आहे.
एवमेव कृतं येन स कृतार्थो भवेदसौ । अनुवाद - सर्व साधने, उपासना व अन्य क्रियारहित होण्याची अवस्था प्राप्त केली आहे असा पुरूष कृतकृत्य आहे, धन्य आहे आणि तसा ज्यांचा स्वाभाविकरित्या (सहजपणे) स्वभावच झाला आहे तो पुरूष तर कृतकृत्व आहेच आहे - हे काय सांगायला हवे ! विवेचन - कोणतीही साधना न करता, जप, तप, योग, भक्ति, पूजा, उपासना ध्यान व अन्य क्रिया-कर्म न करतांच राजा जनकाला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे. परंतु तरी राजा जनक ह्या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत असे म्हणत नाही. ही साधने व्यर्थ आहेत, किंवा ह्या पद्धतींनी उपासना करू नये, ह्यामुळे ज्ञान होणार नाही असे राजा जनक सांगत नाही. (जे. कृष्णमूर्ति सांगत की काहीही करावयाचे नाही. तसे राजा जनक सांगत नाही) राजा जनक म्हणतो की हा आत्मा क्रियाविरहित आहे. ह्या क्रियारहित आत्म्याचे रूपाची प्राप्ती (ह्या साधनांद्वारा किंवा त्याशिवाय) ज्याला झाली आहे तो पुरूष कृतकृत्य आहे. या साधनांद्वारा उपासकाला आत्म्याची अनुभूती होईल. त्याचा प्रयत्न वाया जाणार नाही. साधनाद्वारेसुद्धा अशी स्थिती प्राप्त केली तर राजा जनक त्याचे महत्त्व नाकारत नाही. परंतु जो स्वभावानेच स्व-भाव म्हणजे आत्म-भावरूप आहे तो तर खरोखरीच धन्य आहे, कृतकृत्य आहे यात काय शंका ! असा आत्मभाव प्राप्त झालेला मनुष्य परम-ज्ञानी आहे मग तो आत्मभाव साधनांद्वारे प्राप्त झालेला असो किंवा ते ज्ञान त्यास स्वभावतः प्राप्त झालेले असो. जे प्राप्त झाले आहे ते एकच आहे. मार्ग अनेक असले तरी ध्येय एकच आहे. |