अष्टावक्रगीता

प्रकरण १४

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

साक्षीपुरुषाचे ज्ञान झाल्यावर मुक्तिची चिंता नष्ट होते.

प्रकृत्या शून्यचित्तो यः प्रमादाभ्यावभावनः ।
निद्रितो बोधित इव क्षीणसंसरणो हि सः ॥ १ ॥


अनुवाद - राजा जनक म्हणतात - " जो पुरुष स्वभावाने शून्यचित्त आहे परंतु केवळ प्रमाद म्हणून विषय-संग करतो व निद्रेतसुद्धा जागरूक असतो - तो पुरुष संसारातून मुक्त आहे."


विवेचन - बाराव्या व ओव्या प्रकरणात राजा जनक अनुभूतीचे वर्णन करतांना सांगतो की आत्मा केवळ जाणून घेतल्याने सिद्धी प्राप्त होत नाही तर त्याची प्राप्ती करून घेणे हीच सिद्धी आहे हाच परम पुरुषार्थ आहे. उपलब्धि प्राप्त झाल्यावर चित्ताची चंचलता पूर्णपणे नाहीशी करण्यासाठी त्या उपलब्ध प्राप्तीमध्येच विलिन होऊन राहिले पाहिजे ज्यामुळे अनेक जन्मांच्या संस्कार-स्वरूप वासनेच्या बीजांचा पूर्ण नाश होऊ शकेल. जेंव्हा हे बीजच नाहीसे होईल तेंव्हाच कैवल्यपदाची प्राप्ती होऊ शकेल. असा पुरुष सर्वत्र तोच एकत्वरूपी आत्मा पाहतो. तीच आत्मज्ञानी स्थिती आहे. या प्रकरणात राजा जनक मुक्तिचे वर्णन करतात अर्थातच ही मुक्ति आत्मज्ञानानंतरची स्थिती आहे. आत्मज्ञानी माणसातसुद्धा जर एखादी इच्छा वा वासना केवळ बीज रूपाने जरी शिल्लक राहिली तर संधी आल्यावर त्या बीजापासून पुन्हा वासना प्रकट होऊ शकते. या बीजाचा नाश हीच मुक्ति. राजा जनक म्हणतो की आत्मस्वरूपी लीन झालेला ज्ञानी स्वभावानेच शून्य-चित्त असतो. त्याच्या मनातील सर्व कामना, वासना व संस्कारजन्य तरंगे शांत होऊन चंचलता पार नष्ट झालेली असते. आता त्यात संकल्पामुळे किंवा इच्छांमुळे कोणताही अडथळा येत नाही, अशी कमालीची शांत अवस्था असते. अशी स्थिती प्राप्त झालेला योगी पुरुष सदैव जागृत असतो. झोपेतसुद्धा शरीराचे सर्व अवयव झोपी जात नाहीत. शरीराच्या प्राणदायी क्रिया यथावत् सुरू राहतात. झोपेतसुद्धा श्वासोच्छश्वास, रक्ताचे अभिसरण, हृदयाचे आकुंचन-प्रसरण आणि मनसुद्धा कार्यरत असते. मेंदूचा काही भाग झोपी जातो पण त्याही वेळेला चेतना जागृत असते, ती झोपी जात नाही. झोपणे हा चेतनेचा स्वभाव नाही. म्हणून राजा जनक म्हणतात की मी आत्मस्वरूप असल्याने झोपलेला भासत असलो तरी माझी चेतनाशक्ति जागृत असते. मी सदैव जागृत असतो. शरीर झोपी जाते. आत्मा कधीच झोपत नाही. याप्रकारे आत्मस्वरूप असलेला योगी पुरुष मुक्त अवस्थेत असतो. अशा पुरुषाचे स्वाभाविक कर्म सतत होत असते पण ते केवळ स्वभाव म्हणून. अशा पुरुषाने प्रापंचिक किंवा अन्य विषयांचा विचार केला तर तो वासना किंवा आसक्ति म्हणून नसतो तर केवळ स्वभावाचा प्रमाद म्हणून होय. स्व-इच्छेने करावयाची कामे तर असा आत्मज्ञानी पुरुष करत नाही कारण तो आता 'कर्ता' नसतोच. त्यामुळे त्याचे कर्म-संचित साठत नाही व जे पूर्वीचे कर्म-संचित आहे ते सुद्धा आत्मज्ञानामुळे नष्ट होते. कारण कर्माचा संबंध मनाशी आहे व 'मन' च अस्तित्वात राहिले नाही. म्हणजे कर्माचा आपोआप क्षय होतो. परंतु ज्या प्रारब्ध-कर्मामुळे हे शरीर आणि जीवन प्राप्त झाले आहे ते मात्र आत्मज्ञान झाल्यावरसुद्धा भोगावेच लागतात. ते भोगल्याशिवाय मुक्ति नाही. म्हणून आत्मज्ञानी माणसालासुद्धा शेष (शिल्लक) राहिलेल्या प्रारब्ध कर्माचे भोग भोगावे लागतात. तेव्हांच मुक्ति मिळते. जर त्यांचा भोग केला नाही तर ते न भोगलेले कर्म पुन्हा आपला प्रभाव दाखवतात. म्हणून जनक राजा म्हणतो की मी आता विषयांशी संबंधित कर्मे वासनेमुळे न करता प्रमादवश-प्रारब्ध म्हणून करतो. ह्या जन्मात जे भोग मला सक्तीने भोगावयाचे आहेत ते ईश्वराच्या योजनेनुसार भोगायचे आहेत म्हणून ते भोगतो पण त्यातल्या अहंकारयुक्त कर्तेपणातून मी मुक्त आहे.




क्व धनानि क्व मित्राणि क्व मे विषयदस्यवः ।
क्व शास्त्रं क्व न विज्ञानं यदा मे गलिता स्पृहा ॥ २ ॥


अनुवाद - माझी स्पृहा, इच्छाच नष्ट झाली असल्यामुळे आता माझ्यासाठी कुठले धन, कुठले मित्र, कुठले विषय, कुठले शास्त्र व कुठले ज्ञान ?


विवेचन - आत्मज्ञानाच्या सुखाचा अनुभव नसल्यामुळे मनुष्य शारीरिक, मानसिक सुखाच्या प्राप्तीसाठी, विषयांकडे-वासनांकडे आकर्षित होऊन कर्म-प्रवृत्त होतो. हे विषयच त्याला सुख देऊ शकतात असा त्याला भ्रम झालेला असतो पण हे विषय व त्यापासून मिळणारे सुख हे दोन्हीही अनित्य असतात. ज्ञानी माणूस तर शाश्वत सुख प्राप्त करतो. मग त्याचे या अनित्य व क्षणभंगुर अशा विषयसुखात मन रमत नाही. ह्या गोष्टी प्राप्त करण्याची त्याची इच्छाच नष्ट होते. सर्वश्रेष्ठ अशी बाब प्राप्त झाल्यावर क्षुद्र बाबींची कोण इच्छा करेल ? धन, मित्र, विषय-भोग, शास्त्रज्ञान हे सर्व मनुष्याच्या वासनापूर्वीची साधने आहेत. जोपर्यंत मनात वासना शिल्लक आहे तोपर्यंतच ह्या गोष्टी मूल्यवान, उपयुक्त व महत्त्वाच्या आहेत असे वाटते. अशा गोष्टीत स्वारस्य वाटते. हे जीवन व जग म्हणजे केवळ वासनेची स्पर्धा आहे. मनुष्य ह्या वासनांमुळे सतत धावत रहातो पण अतृप्तच रहातो. मृत्यू येतो तो सुद्धा अतृप्त वासनांसह. त्यामुळे पुन्हा नव्या जन्मात धावावे लागते. या वासना केवळ अनेक जन्मात सुद्धा शांत होत नाहीत. म्हणून जगाला मृगजळ म्हटले आहे. ही एक खोटी स्पर्धा आहे जिच्यामध्ये उपभोगाची प्राप्ती झाल्यावर सुद्धा अतृप्ती कायमच राहते. अशी वासनारूपी इच्छा, स्पृहा केवळ जगातल्या वस्तूंचीच नसते तर धर्माची सुद्धा असते. पण सर्व इच्छा संपल्यावरच मनुष्य शून्यचित्त होतो. ही शून्य-चित्त अवस्था म्हणजेच आत्मज्ञान आहे व परमात्म्याचे निवासस्थान आहे. जनक राजा म्हणतो माझी इच्छाच संपली, मी शून्य-चित्त झालो. आता वासनेचे तरंग निर्माण होत नाहीत, मन आंदोलीत होत नाही. म्हणून माझ्यासाठी धन, मित्र, विषय, घर, फार काय पण शास्त्र व ज्ञान सुद्धा अर्थहीन झाले आहे. आता माझ्यासाठी या गोष्टी निरर्थक झाल्या आहेत. या सर्वांमुळे आत्म्याला काहीच तृप्ती मिळत नाही. ह्या गोष्टी केवळ शरीर व मन (अहंकार) यांच्या तृप्तीसाठी असतात व त्यामुळे मनुष्य आत्मानंदाच्या श्रेष्ठ प्राप्तीपासून वंचित रहातो. मी आता हा सर्वश्रेष्ठ आत्मानंद प्राप्त करून शून्यचित्त होऊन सुखाने स्थिर आहे.




विज्ञाते साक्षिपुरुषे परमात्मनि चेश्वरे ।
नैराश्ये बन्धमोक्षे च न चिन्ता मुक्तये मम ॥ ३ ॥


अनुवाद - साक्षीपुरुष (ब्रह्म), परमात्मा, ईश्वर, आशा-मुक्ति आणि बंधन मुक्ति जाणून घेतल्यावर आता मला मुक्तिची कोणतीही काळजी नाही.


विवेचन - सर्व सृष्टीचे कारण आणि आधार एकच चेतनसत्ता आहे व त्या चेतन्यालाच अध्यात्माने 'ब्रह्म' म्हटले आहे. हे ब्रह्मच सत्य आहे, शाश्वत आहे, नित्य आहे, ज्ञान स्वरूप आहे व त्याचेच वर्णन साक्षीपुरुष या शब्दांनी केले जाते. सृष्टीतले सर्व प्रकारचे पशु, प्राणी, वनस्पति, दगड, सर्व चेतन व सर्व अचेतनाचे आकार-प्राकार हे या ब्रह्म किंवा चैतन्य शक्तिचेच रूप आहे. ब्रह्मापेक्षा वेगळे असे काहीच अस्तित्वात नाही. सर्व प्राण्यात अंतर्यामी तेच चैतन्य आहे. तेच ब्रह्म विद्यमान आहे. तोच व एकच आत्मा आहे. देह, इंद्रिये आदिच्या संयोगाने तोच आत्मा विद्यमान आहे. हा आत्माच जीव आहे. जीवाचा व ब्रह्माचा संबंध अभेद्य आहे व त्याचाच उपदेश गुरू आपापल्या शिष्यांना करत असतात. 'अयमात्मा ब्रह्म' (हे ब्रह्मच आत्मा आहे) 'तत्वमसि' (तू ते (म्हणजे आत्मा) आहेस. ते म्हणजे ईश्वर किंवा ब्रह्म तू म्हणजे जीव. हा जीवच आत्मा आहे. ही महावाक्ये आहेत. या महावाक्यांमुळे जीव व ब्रह्म यांच्या अभेद्य नात्याचा बोध होतो. शिष्याला ह्याचा बोध झाल्यावर तो म्हणतो 'अहं ब्रह्मास्मि' (मी ब्रह्म आहे) ब्रह्म हे सर्वज्ञ आहे तर जीव अल्पज्ञ आहे. ह्या अल्पज्ञ स्वरूपात जे चेतनतत्त्व आहे, तेच आत्मा आहे व तेच ईश्वर आहे. चेतन अवस्थेत दोघांचा संबंध अभेद्य आहे. ह्या अभेद्य संबंधांचे ज्ञान ज्याला झाले तो मुक्त आहे. त्याला मुक्तिची साधना करावी लागत नाही व त्याला त्याची चिंताही नसते.

यामुळे जनक राजा म्हणतो की ह्या शरीरात स्थित असलेला हा साक्षी पुरुषरूपी जीव हा आत्माच आहे. ज्याला ह्या साक्षीपुरुषरूपी आत्म्याचे ज्ञान झाले, त्याला त्या परमात्म्याचे म्हणजेच ईश्वराचेही ज्ञान आपोआप होते. आत्मा अल्पज्ञ आहे व परमात्मा सर्वज्ञ आहे. ईश्वरालाच परम्-आत्मा म्हटले आहे. सर्वज्ञतेच्या ऐश्वर्यामुळे परम-आत्म्याला ईश्वर म्हटले आहे. म्हणूनच हा साक्षीपुरुष (आत्मा) व परमात्मा (ईश्वर) यांच्यात अभेद्य संबंध आहे. ज्याला ह्या अभेद्य संबंधाच्या ज्ञानाचा साक्षात्कार झाला आहे, त्याला आशा-निराशा किंवा बंधनातून मुक्ति याची चिंता रहात नाही. जनक राजाला हा साक्षात्कार झाल्याने (अभेद्य संबंध जाणता आल्याने) तो आशारहित आणि बंधनमुक्त झाला. म्हणून त्याला आता मुक्तिचीही चिंता उरलेली नाही. राजा जनक म्हणतो की 'मुक्त तर मी होतोच, बंधनाचा जो भ्रम होता तो नाहीसा झाल्याने मी आता पूर्ण शांत स्थितीत आहे.' आत्मा व परमात्म्यामधील अभेद्य संबंध हेच या सूत्राचे सार आहे. ज्ञानाची ही सर्वोच्च अवस्था आहे. जे या दोघात भेद असल्याचे मानतात, परमात्म्याला आत्म्यापेक्षा वेगळे मानतात ते सारे द्वैतवादी धर्म आहेत. जो अन्य आत्म्यापेक्षा दुसर्‍या आत्म्याला वेगळा समजतो तो प्रत्यक्षात फक्त जीवाचीच व्याख्या किंवा वर्णन करत असतो. त्यांना चेतन आत्म्याचे भानच झालेले नाही. राजा जनक म्हणतो की हा अद्वैताचा अनुभवच ज्ञानाची अंतीम व सर्वश्रेष्ठ अनुभूती आहे.




अन्तर्विकल्पशून्यस्य बहिः स्वच्छन्दचारिणः ।
भ्रान्त्यस्येव दशास्तास्तास्तादृश्या एव जानते ॥ ४ ॥


अनुवाद - ज्या पुरुषाच्या अन्तर्यामी कोणतीही शंका (पर्यायी विचार) नाही आणि बाह्यतः जो भ्रमिष्ट भासणार्‍या व्यक्तिप्रमाणे स्वच्छंद आहे, अशा पुरुषाच्या वेगवेगळ्या स्थितीचे मर्म व अर्थ, त्या स्थितीला पोहोचलेलाच जाणू शकतो.


विवेचन - आत्मज्ञानी पुरुष स्वच्छंद असतो. सत्य-असत्य, नित्य-अनित्य, क्षणिक-शाश्वत या सर्व बाबींचे त्यास ज्ञान झाल्याने तो सर्व बंधनातून मुक्त होऊन स्वच्छंद आचरण करतो. तो कोणाचेही बंधन जुमानत नाही पण स्व-विवेकाने जगतो - स्वाभाविकपणे जगतो. त्याचे आचरण सदा निर्दोष असते व तो बालकाप्रमाणे होऊन निष्पापपणे जगतो. कोणतीही गोष्ट करण्याची वा न करण्याची त्याची इच्छा व आग्रहच सुटून जातो. त्याच्या सर्व इच्छा, आकांक्षा व वासना संपून जातात. त्याचे अन्तःकरण सर्व इच्छा, आग्रह किंवा शंका मुळातून नाहीशा होतात. जणू तो विचारशून्य होतो. निर्णय व निवड करणे हा त्याचा स्वभावच उरत नाही. तो केवळ तटस्थपणे बघणारा साक्षीदार-द्रष्टा असतो. पण बाहेर मात्र तो अन्य व्यक्तिंप्रमाणे उठतो-बसतो, तसेच वागतो. त्याचे खाणे-पिणे, कपडे घालणे, उठणे बसणे वगैरे सर्व व्यवहार सामान्य व्यक्तिप्रमाणेच सुरू असते. तो सामाजिक नियमांचे व शासकीय नियमांचे सुद्धा पालन करतो. रस्त्यावर चालतांना वाहतूकीचे नियमांचे पालन करतो. व्यावहारिक कार्ये व शिष्टाचाराचे सुद्धा पालन करतो. तो काही समाजात विवस्त्र होऊन हिंडत नाही, अभद्र व्यवहार करीत नाही. हास्यविनोद सुद्धा करतो. त्याचा बाह्य आचार सामान्य व्यक्तिप्रमाणेच असतो. त्याला आपल्या ज्ञानाचा अहंकार सुद्धा नसतो. बाह्य अनुशासनापेक्षाही तो आत्मानुशासनानुसार तो जगत असतो. पण त्याचे अंतरमन मात्र फार बदलून गेलेले असते. त्याचे अंतरमनाची स्थिती कुणीच जाणू शकत नाही. जो त्या स्थितीला पोहचला आहे तोच ते समजू शकतो. अज्ञानी माणूस ते जाणू शकत नाही. अज्ञानी माणूस त्याला सामान्य माणूस समजतात. सर्वसामान्य माणसे कुणाचीही परीक्षा त्याचे शरीर, त्याचे कपडे व त्याचे आचरणावरून करत असतात. पण ह्या तीन्ही बाबी मनुष्याचे खरे स्वरूप जाणण्याच्या कसोट्या होऊ शकत नाही. बहुरूपी व ढोंगी माणसेसुद्धा असे मुखवटे लावून वेगळ्या प्रकारचे वर्तन करतात. त्याचे खरे स्वरूप वेगळेच असते, पण बाहेर दाखवण्यासाठी ते वेगळ्या प्रकारचे नाटक करतात. आत विष आहे पण बाहेर अमृताप्रमाणे गोड बोलतात. आत दुष्टपणा आहे पण बाह्यतः मात्र सहिक्षतेचा उपदेश करतात. आत हिंसा वृत्ती आहे पण गळ्यात अहिंसेची पाटी घालून हिंडतात. आत तर चार्वाकाचे विचार आहेत पण बाह्यतः मात्र अद्वैत तत्त्वज्ञानाच्या गप्पा मारतात. बाह्य आचरणावरून माणसाची परीक्षा करण्याचे काम अज्ञानी माणसे करतात, ज्ञानी ही चूक करत नाही. म्हणूनच अष्टवक्र स्वामीजींनी बाह्य आचरणावरून माणसाचे मूल्यमापन करणार्‍यांना चांभाराची उपमा दिली होती; कारण चांभार केवळ कातड्याचेच परीक्षण करून शकतात. ज्ञानी बाह्य आचरण नव्हे तर ज्ञानाची खोली पाहतात. राजा जनक म्हणतात की ज्ञानी माणसाच्या स्थितीचे मूल्यांकन दुसरा ज्ञानी माणूसच करू शकतो, कारण त्यालाच त्या स्थितीचा अनुभव असतो. अज्ञानी ते जाणू शकत नाही. काही वेळा ज्ञानी पुरुष भ्रम झाल्याप्रमाणे राहतो वागतो जसे काही त्याला काहीच कळत नाही. तो स्वच्छंदपणे वेगळे-वेगळे व्यवहार वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने करतो म्हणून त्याच्या बाह्य आचरणावरून त्याची महत्ता जाणणे अवघड असते. कृष्णचरित्राचे रहस्य यामुळेच लोकांना समजू शकत नाही. कधी कृष्णाने लोणी चोरले तर कधी रास खेळत होता, बासरी वाजवत होता व युद्धही करण्यास प्रेरणा देत होता, कपट कारस्थान करत होता व गीतेचा उपदेशही सांगत होता. हे सर्व बाह्य आचरण आहे. त्यावरून कृष्णाचे परिक्षण केले तर निर्णय चुकणारच. आचरण बदलल्यामुळे ज्ञान प्राप्ती होत नाही. आचरण हे तर ज्ञानाच्या सावलीसारखे आहे. ज्याचे अंतर मन शुद्ध आहे त्याचे बाह्य आचरणसुद्धा आपोआप शुद्ध होत जाते. ते तसे मुद्दाम करावे लागत नाही. आचरणात सुधारणा करणे हे सामाजिक दृष्ट्या आवश्यकच आहे, त्याची सामाजिक उपयोगीता आहे. परंतु त्यामुळे आत्मज्ञान होत नाही.




GO TOP