अष्टावक्रगीता

प्रकरण ३ रे

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

आत्मज्ञानामुळे आसक्ति नष्ट होते.

अविनाशिनमात्मानमेकं विज्ञाय तत्वतः ।
तवात्मज्ञस्व धीरस्य कथमर्थार्जने रतिः ॥ १ ॥


अनुवाद - राजा जनकाला खरोखरीच आत्मज्ञान झाले की केवळ आत्मज्ञानाची भ्रांती झाली हे जाणून घेण्यासाठी राजा जनकाची परीक्षा घेण्याकरतां मुनीश्रेष्ट अष्टवक्र त्याला प्रश्न विचारतात, "आत्मा हा तत्वतः एकच आहे आणि अविनाशी आहे याची जाण होऊनसुद्धा तुझ्यासारख्या आत्मज्ञानी माणसाला पैसा कमविण्याची आसक्ति कां आहे ?"


विवेचन - राजा जनक गुरू उपदेश ऐकून जागृत झाले, प्रानि नष्ट झाली व त्यांना आत्मज्ञानाचे सत्याचा लाभ झाला. त्यांचा अहंकार नष्ट झाला, कर्तेपण नष्ट झाले, राजा जनक व्यक्ति होता तो समष्टी झाला जणू नवे रूप लाभले. राजा सांगतो की हे सर्व सहजपणे स्वाभाविकरित्या होत आहे. जो पर्यंत मनुष्य कर्ता किंवा भोक्ता आहे. जोपर्यंत संघर्ष आहे, तणाव आहे, परंतु कर्तेपण हे अहंकारामुळे आहे हे जाणल्यावर सर्व काही सहजपणे तणाव न येता घडते, म्हणजेच राजाने आधात्म-रसाची चव घेतली व तो मुक्त झाला. आपल्यामुळे जगाची धारणा होत नसून जगामुळे आपण आहोत, या धारणेने समर्पण झाल्यावर विनम्रता येते व तेव्हाच परमात्म्याचा लाभ होतो. जनकाच्या अभिव्यक्ति कथनानंतर त्याची परिक्षा घेण्यासाठी अष्टवक्र अनेक प्रश्न विचारून राजा जनकास खरोखर ज्ञान झाले किंवा नाही याची खात्री करून घेण्यासाठी त्यांनी हा प्रश्न विचारला आहे. अष्टवक्र म्हणजे सामान्य शिक्षक नसून परम ज्ञान देणारे आध्यात्मिक गुरू आहेत. शिक्षक केवळ भौतिक ज्ञान देतात परंतु गुरू आध्यात्मिक ज्ञान अनुभवाद्वारे देतो, रूपान्तरण करतो व मुक्ति प्राप्त करून देतो. भौतिक बौद्धिक ज्ञानामुळे आपण ज्ञानी झालो असा भ्रम निर्माण होतो. शास्त्राचा अभ्यास व उपदेश यामुळे माहिती भरपूर प्रमाणात मिळते, मुक्तिपर्यंत पोहचता येत नाही. ज्ञान आत्मजागृतीमुळे होते. मुनीश्रेष्ट अष्टवक्र राजा जनकाची परिक्षा घेण्यासाठी विचारतात की - 'आत्मा एक आहे हे तू जाणतोस, आत्मा अविनाशी आहे हेही जाणतोस मग धन प्राप्तीमधे तुला आस्था कशाकरता ? राजा जनकाने भौतिक पदार्थाचा त्याग केला नाही, कपडे बदलले नाही, संन्यासी झाले नाही, नग्न होऊन महाल सोडून जंगलात गेले नाहीत किंवा राज्यही सोडले नाही. सर्व जसे पूर्वी होते तसेच आताही सुरू होते. त्यामुळे अष्टवक्र विचारतात की आत्मज्ञानी झाल्यावर धन-प्राप्तीमध्ये रूची कशाकरता ? अजूनही तुझ्यात धनसंग्रह करण्याची इच्छा आहे का ? कां आजसुद्धा तुला राजसिंहासनाचा मोह आहे ? धन, पद, प्रतिष्ठा, सन्मान प्राप्तीसाठी अज्ञानी माणूस तडफडत असतो. ज्याला हिरा मिळत नाही तो दगडगोटे गोळा करतो. जो स्वतः प्रतिष्ठित आहे तो दुसर्‍याकडून अधिक प्रतिष्टेची अपेक्षा करत नाही. जो स्वतः प्रतिष्ठित नाही तोच दुसर्‍याकडून प्रतिष्ठेची अपेक्षा करतो. जो आतून भिकारी आहे तो बाह्य भौतिक वस्तू गोळा करतो. ज्याला स्वतःच्या मनात शांती नाही तो बाह्य वस्तूंमध्ये सुख व शांतीचा शोध घेतो. आत्मज्ञान व वासना एकत्र नांदू शकत नाही. प्रकाश आल्यावर अंधार राहू शकत नाही. आत्मज्ञानी माणसाकरिता ही सारी भौतिक साधने प्राप्त करणे वाईटही नाही व पापही नाही. पण त्यांची आसक्ति पाप आहे. धन प्राप्त करणे पाप नाही, पत्नी, मुले, घर, गृहस्थाश्रम या सर्वात काही पाप नाही. पण त्यांचे प्रति आसक्ति असणे वाईट आहे. आसक्ति सोडूनही सर्व काही भोगता येते म्हणून ज्ञान व अज्ञानाचा संबंध, भौतिक पदार्थाचा हिंदु जीवनाशी संबंध नसून आसक्ति व अनासक्तिशी आहे. अष्टवक्र या प्रश्नाद्वारा राजा जनकाला ह्या विषयाची आसक्ति आहे किंवा नाही हे जाणून घेऊ इच्छितात. धनामुळे वासनात वाढ होते व वासना वाढल्यावर मन अधिक धनप्राप्ती करता प्रसंगी अन्याय करण्यासाठी तयार होते. संपत्तिच्या लोभामुळेच लोभ, मोह, द्वेष, ईर्ष्या, घृणा, संग्रहवृत्ती, त्यासाठी वैर व संघर्ष ही अन्य पापभावना व पापकर्म याच्याही मनुष्य आहारी जातो. ह्यामुळे पैसा हे अनेक पापांचे मूळ आहे. त्यामुळे सर्वप्रथम पहिला प्रयत्न धनाच्या आसक्तिबद्दलच करण्याचे अष्टवक्राचे धोरण आहे.

जर माणसाला धनाची आसक्ति नसेल तर तो अनेक पापांपासून आपोआप मुक्त होतो, मग अनेक दुर्गुणाचा मुद्दाम त्याग करावा लागत नाही आणि पैश्याची वासना असेल तर मग अन्य अनेक दुर्गुणांपासून स्वतःचा बचाव करताच येणार नाही. न्यायनितीने वागून पैसे कमविणे व त्याचा उपभोग घेणे हे धर्मास मान्य व उचित कर्म आहे,. ते चूक नाही. सर्व काही सोडून लंगोटी लावून जंगलात पळून जाणारा फार मोठा धार्मिक आहे व सर्व गृहस्थाश्रमी व्यक्ति पापी आहेत अशी समजूत मूढ लोकांशिवाय दुसर्‍या कुणाची असू शकत नाही.




आत्माऽज्ञानादहो प्रीतिर्विषयभ्रमगोचरे ।
शुक्तेरज्ञानतो लोभो यथा रजतविभ्रमे ॥ २ ॥


अनुवाद - आत्म्याविषयीच्या अज्ञानामुळे एखाद्या विषयाचे जे भ्रामक रूप दिसते त्याबद्दल माणसाला तेवढाच लोभ वाटतो जेवढा अज्ञानामुळे शिंपल्यात चांदीचा भास झाल्याने वाटतो.


विवेचन - ह्या सूत्रात अष्टवक्र आसक्तिचे कारण सांगून जनकाला प्रश्न करतात, की ज्याप्रमाणे शिंपल्यात चांदी असल्याचा भास अज्ञानामुळे झाल्यावर त्याविषयी मोहसुद्धा जागृत होतो. तेव्हा स्पष्टपणे पाहिल्यावर लक्षात येते की चांदी नसून शिंपला आहे तेव्हा मोह नष्ट होतो. लोभाचे कारण चांदीचा भ्रम होता. ह्याच प्रकारे आत्म्याच्या अज्ञानामुळे विषयांचा भ्रम होतो व त्याबद्दल आसक्तिसुद्धा निर्माण होते. आसक्तिमुळे वाडू लागते की विषयांमुळे सुख मिळते परंतु आता आत्मज्ञान झाल्यामुळे राजा जनकाचा धनसमत्ती व अन्य विषयांबाबतचा भ्रम नष्ट व्हायला हवा. हे आश्चर्यच आहे की आत्मज्ञानानंतर सुद्धा तू या विषयांचा त्याग करत नाहीस व त्यांच्या बद्दलचा तुझा मोह सुटत नाही. असे का होते ?




विश्व स्फुरित यत्रेदं तरंग इव सागरे ।
सोऽहमस्मीति विज्ञाय किं दीन इन धावसि ॥ ३ ॥


अनुवाद - समुद्रात तरंग निर्माण व्हावा त्याप्रमाणे या आत्म्यात हे विश्व निर्माण होते, 'तेच मी आहे' असे मानून तू दीन होऊन कां धावतोस ?


विवेचन - अष्टवक्र म्हणतात की जो स्वतः अंतर्यामी आनंदित नाही तोच दुसरीकडे आनंद शोधत फिरतो, जो स्वतः सुखी नाही तो विषय भोगाद्वारे सुख मिळविण्याचा भ्रामक प्रयत्न करतो, जो स्वतः तृप्त नाही तोच भिकार्‍याप्रमाणे दुसर्‍याकडून तृप्तीची अपेक्षा करतो व तसे प्रयत्न करतो. परंतु सुख, आनंद तुम्हाला दुसरे कुणी देऊ शकत नाही. विषयभोगातून क्षणिक सुख मिळाले तरी शाश्वत आनंद व समाधान मिळू शकत नाही. ह्या क्षणिक सुखासाठी मनुष्य चोरी, हत्या, खोटारडेपणा, फसवणूक, कपट, शोषण, वगैरे पापे करतो. अनेकांना त्रास होईल असे वर्तन करतो, अनेकांचे गळे घोटतो, भ्रष्ट लोकांचे मागे हिंडून त्यांची स्तुती करतो, सत्ताधार्‍यांच्या आरत्या गातो. हे सर्व कशासाठी ? ह्यासाठी की तो समजतो की हे केल्याने मला सुख मिळेल. याशिवाय दुसरे कारण म्हणजे त्याच्या स्वतःच्या आत जो परम आनंद भरला आहे त्याविषयी तो पूर्ण अज्ञानात आहे. म्हणून तो हीन दीन होऊन दुसर्‍यांजवळ सुखाची याचना करतो. ह्याच सत्याचा निर्देश करून अष्टवक्र जनकाला प्रश्न करतात की हे विश्व अथांग समुद्रातल्या मामुली लाटेप्रमाणे, तरंगाप्रमाणे आहे, ते क्षुद्र आहे व त्यांचे कोणत्याही प्रकारे मूल्य नाही, ते नित्य नाहीत, शाश्वत नाहीत आणि तू तर स्वतः आत्मा असल्याने शाश्वत आहेस व अथांग समुद्राप्रमाणे आहेस, हे सत्य जाणूस सुद्धा क्षुद्र क्षणजिवी तरंगाप्रमाणे असणार्‍या या जगाचे मागे कां धावतोस ? हीरा प्राप्त झाल्यावर दगड गोट्यांची अपेक्षा ठेवतोस, ते कशासाठी ? अष्टवक्र हे जाणू इच्छितो की राजा जनक या क्षुद्र वासनामय जगाच्या मोहातून मुक्त झाला किंवा नाही.




श्रुत्वाऽऽपि शुद्धचैतन्यमात्मानमतिसुन्दरम् ।
उपस्थेऽत्यंन्तसंसक्तो मालिन्यमधिच्छति ॥ ४ ॥


अनुवाद - आत्मा हे शुद्ध चैतन्याचे व अति सुंदरतम रूप असल्याचे जाणूनसुद्धा इंद्रियांच्या विषयसुखात आसक्त होऊन कुणी मलिन कसे काय होतात ?


विवेचन - केवळ उपदेश ऐकताच राजा जनकाला आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे अष्टवक्र, राजाची परीक्षा घेण्याचे हेतूने विचारतात की ज्यांना आत्मा म्हणजे एक परम सुंदर चैतन्य आहे याचे ज्ञान होते ते पुन्हा कामासक्त होऊन पुन्हा इंद्रियसुखाकडे कसे काय वळतात ? पुन्हा ते मलिन कसे काय होतात ? जर एखादा अज्ञानी माणूस या इंद्रियसुखातच मग्न राहिला तर आपण हे समजू शकतो की त्याला महान व उच्च दर्जाचा आत्मीक आनंद प्राप्त न झाल्यामुळे तो क्षुद्र आनंदात रस शोधतोय. परंतु ज्ञानी माणूस आत्मारूपी महान आनंद प्राप्त करून सुद्धा जर त्याचप्रमाणे क्षुद्र सुखात रमत असेल तर याचा अर्थ असा की त्यालासुद्धा अद्याप आत्मानंद प्राप्त झालेला नाही. राजा जनक यावर जे उत्तर देईल त्याच्यावरच त्यास खरोखर आत्मज्ञान झाले किंवा नाही याचा अष्टवक्र मुनी निर्णय घेतील.




सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
मुनेजर्नित आश्चर्यं ममत्वमनुवर्तते ॥ ५ ॥


अनुवाद - सर्व भूतमात्रांत आत्मा आहे व आत्म्यामध्येच सर्व भूतमात्र आहे हे जाणून सुद्धा मुनींनादेखील ममता निर्माण होते, हे आश्चर्यच आहे.


विवेचन - शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो व नंतर शिकलेले ज्ञान तसे आत्मसात केले किंवा नाही ह्याचा निर्णय घेण्यासाठी त्याची परिक्षासुद्धा घेतो आणि उत्तीर्ण झाल्यावर प्रमाणपत्र देतो. याचप्रकारे गुरूसुद्धा शिष्याची परीक्षा घेतात व कसोटी लावून पाहतात की अद्याप सोने शुद्ध झाले किंवा नाही ? की अजूनही त्यात अशुद्धता आहे ? परीक्षा केल्याशिवाय ज्ञान झाले किंवा नाही, खरे काय, खोटे काय ? याचा निर्णय करता येत नाही. केवळ पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर कुणीही स्वतःला ज्ञानी म्हणून जाहीर केले तर अज्ञानी जन त्यावर कदाचित विश्वास ठेवतील पणे ज्ञानसंपन्न गुरू 'पढत पंडिताला' ज्ञानी मानू शकणार नाही. यासाठी राजा जनकांच्या आत्मज्ञानाला मुनीश्रेष्ठ अष्टवक्र मान्यता देण्याआधी वेगवेगळ्या प्रश्नांचे आधारे परिक्षा घेत आहेत. सर्व भूतमात्रात एकच आत्मा असल्यावर काही व्यक्तिंबद्दल विशेष ममता कशा करता ? जग व आत्मा याचा अगदी एकात्म संबंध असूनही ममतेची भूल मुनीसुद्धा कसे करतात ?




आस्थितः परमाद्वैतं मोक्षार्थेऽपि व्यवस्थितः ।
आश्चर्यं कामवशगो विकलः केलिशिक्षया ॥ ६ ॥


अनुवाद - परम अद्वैताची प्राप्ती झालेला व मोक्षासाठी उत्सुक झालेला पुरुष काम सुखासाठी बेचैन होतो हे आश्चर्यच आहे.


विवेचन - आत्म-ज्ञानाशिवाय मुक्ति मिळत नाही. आत्मज्ञानाने सृष्टी व आत्मा यांच्यातला भेद मिटतो, तशी जाणीव व ज्ञान प्राप्त होते परंतु ही मुक्ति नव्हे. याला सविकल्प समाधी म्हणतात. ह्यात इच्छा व पर्याय कायम राहतात. त्या नष्ट होत नाही. सर्व संस्कार, मन, बुद्धि, चित्त हे बीजरूपाने विद्यमान राहतात परंतु जेंव्हा ज्ञानी पुरुष निर्विकल्प समाधीत प्रवेश करतो तेव्हा या सार्‍या गोष्टींची बीजेसुद्धा नष्ट होतात आणि त्यामुळे त्या पुन्हा सृष्टीत येण्याची शक्यता उरत नाही. हीच मुक्तावस्था असते. यालाच निर्वाण किंवा मोक्ष म्हणतात. याचसाठी मुनीश्रेष्ठ अष्टवक्र राजाला विचारतात, की तू परम अद्वैताची प्राप्ती केलीस, अद्वैतातच स्थिर झालास, मोक्षासाठी उद्युक्त आहेस (म्हणजेच पूर्णतया तयारी झाली आहे व आत्मज्ञान झाले आहे. मुक्ति अजून बाकी आहे. ही सविकल्प समाधिची स्थिती आहे.) अशा स्थितीत पोहचूनसुद्धा तू कामक्रिडेच्या इच्छेचा त्याग केलेला नाहीस. जर कामक्रिडेची ओढ असेल तर आत्मज्ञान झालेच नाही असा त्याचा अर्थ आहे, मग हा तर केवळ भ्रमच म्हणावा लागेल.




उद्‌भूतं ज्ञानदुर्मित्रमवधार्याति दुर्बलः ।
आश्चर्यं काममाकाङ्‌क्षेत्कालमन्तमनुश्रितः ॥ ७ ॥


अनुवाद - अद्‌भूत परम ज्ञानाचा काम हा शत्रु आहे हे जाणून सुद्धा एखादा अतिदुर्बल व अन्तकाल जवळ आलेला पुरुष सुद्धा कामसुखाची इच्छा बाळगतो हे आश्चर्यकारकच आहे.


विवेचन - वासना अनेक प्रकारच्या असतात. परंतु त्यातही कामवासना सर्वात जास्त प्रबल असते. अन्य वासना सोडणे एकवेळ शक्य होईल पण काम वासना सोडणे अत्यन्त कठीण असते. अनेक ऋषी, मुनी, साधु, सन्यासी, योगी, भक्त, तपस्वी, साधक या भावनेतून मुक्त होऊ शकले नाहीत. या कामवासनेच्या विळख्यातून देवसुद्धा मुक्त राहू शकलेले नाहीत. काम ही एक प्रबळ शक्तिशाली उर्जा आहे. या शक्तिशाली उर्जेला दाबून टाकता येत नाही किंवा ती नष्ट केली जाऊ शकत नाही. तिचे रूपांतरण करणे मात्र शक्य असते. तिचे उन्नयन करता येते. तिला उच्च परिणीत स्वरूपात विकसित करता येते. ही संपूर्ण सृष्टी कामातूनच निर्माण झाली आहे. ही शक्ति ईश्वरानेच दिलेली असल्याने ती निंदनीय नाही. परंतु केवळ वासनारूपात तिचा उपयोग करणे मात्र निंदनीय आहे. अष्टवक्र मुनी तीन सुत्रांद्वारे राजा जनकाला काम भावनेविषयी सावध करतात. ते म्हणतात की शक्तिहीन झालेला व मृत्यूच्या जवळ पोहचलेला मनुष्य कधी कामसुखाची इच्छा करत नाही परंतु जर त्या स्थितीतल्या माणसाने सुद्धा कामसुखाची वासना तृप्त करण्याची इच्छा बाळगली तर ते खरोखरच आश्चर्य आहे. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तित नवे ज्ञान प्रकट झाले आहे त्या व्यक्तिने कामसुखाची आसक्ति सोडू नये ही सुद्धा आश्चर्य करण्यासारखीच गोष्ट आहे. कारण अनेक जन्मात ज्या कामवासनेचे भोग सुख उपभोगले आहे ते एका क्षणात आत्मज्ञान होताच नष्ट कसे होणार ? आत्मज्ञान तर एका क्षणात होते पण चित्ताच्या वृत्तींचे निरसन होण्यास वेळ लागतो. जेव्हां त्या पूर्णपणे त्याज्य होतात, पूर्णपणे मनुष्य त्यांचेपासून वेगळा होतो तेव्हांच 'मुक्ति' प्राप्त होते. ज्याप्रकारे प्रकाश आणि अंधार एकत्र राहू शकत नाही. त्याचप्रकारे ज्ञान आणि जग, ज्ञान आणि काम, ज्ञान आणि वासना एकत्र राहू शकत नाही. ज्याला ज्ञान प्राप्त होते व मुक्ति मिळते त्याच्याजवळ जगाची ममता किंवा काम वासना शिल्लक रहात नाही आणि जर ती त्याजवळ असेल तर त्याला ज्ञान झालेले नसून ज्ञानाचा भ्रम मात्र झाला आहे. यासाठीच ज्ञानी पुरूष सांगतात की संसार माया आहे, असत्य आहे, भ्रम आहे. परंतु अज्ञानी माणसासाठी असे ज्ञान, आत्मा, परमात्मा, ईश्वर, ब्रह्म हे स्वप्नमय व काल्पनिक असते. आत्मज्ञानाच्या याच कसोटीवर पारखण्यासाठी मुनीश्रेष्ठ अष्टवक्र राजाला विचारतात की तुला आत्मज्ञान झाले असे वाटते आहे, आणि या ज्ञानाच्या स्थितीत तू हे सुद्धा जाणले आहेस की कामवासना ही माणसाची शत्रू आहे. कामाचा प्रभाव तुझ्यावर अनेक जन्मांचा आहे. ज्ञानाचा संबंध नवीनच आहे म्हणून काम तुला आपल्याकडे खेचू शकतो. हे जाणूनसुद्धा तू कामसुखाची इच्छा करणे आश्चर्याचेच ठरेल. जर राजा जनक कामसुखाच्या इच्छेतून मुक्त झाला नसेल तर त्याला ज्ञान झालेले नाही हे स्पष्ट होईल.




इहामुत्र विरक्तस्य नित्यानित्यविवेकिनः ।
आश्चर्यं मोक्षकामस्य मोक्षादेव विभीषिका ॥ ८ ॥


अनुवाद - जो इहलोक व परलोकातील भोगांप्रती विरक्त झाला आहे आणि जो नित्य व अनित्य यांचा ज्ञानपूर्ण विवेक बाळगतो, मोक्षाची इच्छा बाळगतो, तोसुद्धा मोक्षाला घाबरतो, हे आश्चर्य आहे.


विवेचन - संसारी गृहस्थ नेहमी द्वंद्वात अडकलेला असतो. चांगले वाईट, लाभ-नुकसान, नफा-तोटा, सुख-दुःख, प्रेम-राग, जय-पराजय, संघर्ष-शांतता, वगैरे द्वंद्वच जीवनाला व्यापून टाकतात. नैतीक व्यक्ति त्यात फरक करू शकते. चांगल्याला पुण्य व वाईटाला पाप म्हणून नैतिक व्यक्ति ओळखू शकते. जगात राहून आपल्या वेगवेगळ्या कार्यांद्वारा तोही पापपुण्याची कमाई करत असतो. मृत्यूमयी सर्व कर्मातून त्याची सुटका होते पण हे पाप पुण्य तर त्याच्याबरोबरच जातात. सर्व पापपुण्याचे बॅलन्सशीट, जमाखर्च व ताळेबंद तो आपल्या सोबत घेऊन जातो. जर पुण्याची कमाई जास्त असेल तर तो स्वर्गात जातो, पाप जास्त असेल तर नरकात जातो. तिथे जेंव्हा तो याची फळे भोगतो तेव्हा तो पुन्हा जगात परत येतो. कोणतेही कर्म असो त्याचे फळ अवश्य मिळते. म्हणून कर्म हे मुक्तिचे साधन होऊ शकत नाही. जे स्वर्गाची इच्छा मनात धरून कर्म करतात, ते सुद्धा मनात भोगासक्त आहेत की येथल्यापेक्षा स्वर्गात जास्त भोग लुटायला मिळतील. परंतु मुक्तिची इच्छा बाळगणारा या दोन्ही ठिकाणच्या भोगांपासून विरक्त होऊ इच्छितो. तो द्वंद्वातून बाहेर पडतो. त्याच्यात हा विवेक निर्माण होतो की जगातले भोग जसे अनित्य आहेत तसेच स्वर्गातले भोगसुद्धा अनित्य आहेत. ते सुद्धा क्षीण होतील. म्हणून तो परमानन्द रूपातील नित्य, शाश्वत मुक्तिची इच्छा करतो. आत्मज्ञानाच्या स्थितीतच असा विवेक निर्माण होतो. त्यामुळे अष्टवक्र जनकाला पुन्हा प्रश्न करतात की तुला आत्मज्ञान झाल्याने तू इहलोकातील व परलोकांतील भोगाप्रती विरक्त झाला आहेस. आत्मज्ञानानंतरची अवस्था मुक्तिची आहे व तू तिचीसुद्धा इच्छा बाळगणार आहेस. जे संस्कार, ज्या वृत्ती बीजरूपाने शिल्लक आहेत त्यांनासुद्धा नष्ट करून तू पूर्णतया मुक्त होऊन त्या नित्य व शाश्वत तत्वाची प्राप्ती चाहतो आहेस परंतु तरीसुद्धा तुला मोक्षाची भिती वाटते हे आश्चर्य आहे. मोक्ष व मुक्ति हे आकर्षक असूनही त्यांचेबद्दल फार भय असते. पूर्ण स्वतंत्रता घाबरवणारी, भयप्रद आहे. पूर्ण स्वतंत्रतेत असुरक्षितता असते, तेथे भोग नसतातच. ह्यामुळे भोगाची इच्छा असणारा मुक्तिच्या कल्पनेने भयभीत होतो. तसेच ज्याला हे भय वाटते आहे, त्याची भोगवासना शिल्लक असल्याचे ते लक्षण आहे. अष्टवक्र ह्या सूत्रात राजा जनकाकडून हे जाणून घेऊ इच्छितात की त्याची भोगाची इच्छा बाकी आहे किंवा नाही.




धीरस्तु भोग्यमानोऽपि पीड्यमानोऽपि सर्वदा ।
आत्मानं केवलं पश्यन्न तुष्यति न कुप्यति ॥ ९ ॥


अनुवाद - धैर्यशील धीरगंभीर पुरुष तर भोग भोगतांना आणि व्यथेने पिडीत होतांना सुद्धा नेहमी केवळ आत्मरूपाकडे लक्ष देतो व तो प्रसन्न होत नाही किंवा संतप्त होत नाही.


विवेचन - प्रसन्न होणे, संतप्त होणे हे मनाचे धर्म आहेत जे अहंकारामुळे प्रकट होतात. अहंकारी व्यक्तिचे जीवन या अज्ञानरूपी अहंकारावरच आधारलेले असल्याने तो वारंवार संतप्त होणे किंवा खुश होणे स्वाभाविक आहे. धीरगंभीर पुरुष म्हणजेच आत्मज्ञानी सुद्धा भोग भोगतो. प्रारब्ध कर्माचे भोग त्याला भोगावे लागतात. जगात राहिल्याने आवश्यक कर्म तर त्याला करावेच लागतात, उपस्थित भोग तो भोगतो. काही भोग असेसुद्धा असतात की ज्यामुळे त्याला पिडा सहन करावी लागते, तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. उदाहरणार्थ - रामकृष्ण परमहंसांना कॅन्सरच्या वेदना सहन कराव्या लागल्या पण आश्चर्य असे की त्यांचा चेहरा तरीसुद्धा सदैव प्रसन्न असे व ते कधीही वेदनेबद्दल तक्रार करीत नसत. दयानंद सरस्वतींना विष देण्यात आले, कृष्णाला पायाचे अंगठ्यास तीक्ष्ण बाण लागून मृत्यू आला, संत मीराबाईला विष देण्यात आले. या सर्व घटनात या महान आत्मज्ञानी संतांनी व अवतारांनी अपार वेदना सहन केल्या पण त्याची तक्रार केली नाही, ते कधी दुःखी कष्टी झाले नाहीत किंवा ते कधी संतप्त झाले नाहीत. अनेकदा ज्ञानी पुरुषाला समाजाकडून सन्मान मिळतो पण त्यामुळे ते काही खुश होत नाहीत. प्रसंशा झाली तरी ठीक पण त्यामुळे ते हुरळून जात नाही किंवा जगाच्या मायेत अडकत नाहीत. ह्या भावना त्यास प्रभावित करू शकत नाहीत कारण त्यांचे सर्व चित्त, मन, बुद्धि हे आत्म्यातच विलीन झालेले असतात. जर ते भाव ज्ञानी माणसाला विचलित करू लागले तर मग त्याला ज्ञान झाले नाही असेच म्हणावे लागेल.




चेष्टमानं शरीरं स्वं पश्यत्यन्यशरीरवत् ।
संस्तवे चापि निन्दायां कथं क्ष्युभ्येन्महाशयः ॥ १० ॥


अनुवाद - जो आपले कार्यरत शरीर दुसर्‍याच्या शरीराप्रमाणेच मानतो तो महाशय पुरुष सुद्धा स्तुती किंवा निंदेमुळे कसा काय विचलित होतो ?


विवेचन - या सूत्रात मुनीश्रेष्ठ अष्टवक्र असे प्रतिपादित करतात की आत्म-ज्ञानामुळे ज्ञानी पुरुष स्वतःला शरीरापेक्षा वेगळा मानतो, आत्मा मानतो व त्याचे शरीर तसेच दुसर्‍याचे शरीर त्याचेसाठी समदृष्टीने पाहता सारखेच असते. शरीर व आत्मा हे भिन्न असल्याने आणि आत्मा एकच असल्याने स्वतःचेच शरीराबद्दलचे जास्त ममत्व मात्र कमी होते. ज्ञान झाल्यावरसुद्धा त्याचे शरीर या जगातील नित्यकर्म करीत कार्यरत राहते. शरीराकडून कर्म घडत असल्याने तो स्वतःला या शरीरापेक्षा भिन्न मानूनसुद्धा कर्मामुळे त्यास स्तुती किंवा निंदा प्राप्त होत असतेच. परंतू शरीर म्हणजे आपण नव्हे हे जाणत असल्याने त्या स्तुती किंवा निंदेचा त्याचेवर काही परिणाम होत नाही. क्षोभ तेव्हा निर्माण होतो जेंव्हा तो या स्तुती किंवा निंदेला स्वतःची स्तुती किंवा निंदा मानू लागेल. ज्ञानी माणसाच्या दृष्टीत ही स्तुती किंवा निंदा जणू काही त्याची नसून कुण्या दुसर्‍याचीच आहे. शरीर व आत्मा हे भिन्न आहेत याची सखोल जाणिव झाल्यानंतरच अशी तटस्थता व अलिप्त स्थिती प्राप्त होते. जर ज्ञानी माणसाला स्तुती किंवा निंदेने क्षोभ होत असेल तर तो ज्ञानी झालाच नाही हे सिद्ध आहे.




मायामात्रमिदं विश्वं पश्यन् विगतकौतुकः ।
अपि सन्निहिते मृत्यो कथं त्रस्यति धीरधीः ॥ ११ ॥


अनुवाद - जो या जगाकडे केवळ माया म्हणून पाहतो व जो या जगाच्या कौतुकापलीकडे पोहोचला आहे तो धीर पुरिषसुद्धा मृत्यू आल्यावर भयभीत कां व्हावा ?


विवेचन - मुनीश्रेष्ठ अष्टवक्र राजा जनकाकडून हे सुद्धा जाणून घेऊ इच्छितात की राजा जनकाचे मनातील मृत्यूचे भय नष्ट झाले की पूर्वीप्रमाणेच कायम आहे. अज्ञानी माणसासाठी जग हे सत्यच आहे. अज्ञानी माणसाचे मन याच जगात रमलेले असते. तो याच जगात शरीराने व मनानेसुद्धा राहतो, जगतो, खातो-पितो, विकास करतो, संसारातल्या रोग, लोभ, घृणा, माया, मत्सर, द्वेष यामुळे प्रभावित होतो. तो जगालाच भोगाचे साधन व उन्नतिचा रस्ता मानतो. अनेक जण या जगालाच स्वर्ग मानतात परंतु आत्मज्ञानी माणसाला वास्तव ज्ञान झाल्याने तो या जगाला असत्य मानतो व माया किंवा भ्रम समजतो, कारण त्याला बहुमूल्य आत्म्याची प्राप्ती लक्षात आलेली असते. ह्या वैविध्यपूर्ण जगाकडे पाहून अज्ञानी माणसाला आश्चर्य वाटते व तो जगाच्या कौतुकात गुरफटून जातो. परंतु ज्ञानी माणूस सत्यता जाणत असल्याने तो या जगाच्या कौतुकाच्या पलिकडे पोहोचतो. सामान्य जगत्‌प्रेमी अज्ञानी माणूस हे जग सोडण्याच्या म्हणजे मृत्यूच्या कल्पनेने भयभीत होतोच. न जाणो यानंतर कोणत्या कोणत्या योनीत प्रवेश मिळेल ? स्वर्ग मिळेल कां नरक मिळेल ? त्याच्या जगण्याच्या व अजून भोग भोगण्याच्या इच्छेमुळे व अज्ञात विश्वात जाण्याच्या कल्पनेने अज्ञानी माणूस भयभीत होतो. याप्रमाणे सर्व अज्ञानी मृत्यूमुळे घाबरतातच परंतु अष्टवक्र मुनी जनकाला विचारतात की आत्मज्ञानी होऊन तू हे जग माया आहे असत्य आहे, भ्रमजनक आहे हे ओळखले असूनही मृत्यूच्या भयाने कंपित होत आहेस कां ? कारण जो खरा ज्ञानी आहे तो मृत्यूला घाबरत नाही. ते एखाद्या शुभप्रसंगाचे, उत्सवाचे करावे तसे स्वागत करतात. शरीराबद्दल माया व आसक्ति असणार्‍यांनाच मृत्यूचे भय वाटते.




निस्पृहं मानसं यस्य नैराश्येडपि महात्मनः ।
तस्यात्मज्ञानतृप्तस्य तुलना केन जायते ॥ १२ ॥


अनुवाद - ज्या महात्म्याचे मन मोक्षाची सुद्धा इच्छा बाळगत नाही त्या आत्मज्ञानाने तृप्त झालेल्या पुरूषाची तुलना कशाबरोबर होऊ शकेल ?


विवेचन - या सूत्रात मुनीश्रेष्ठ अष्टवक्र उच्च अनुभूती विषयीचा प्रश्न करतात. ते म्हणतात, सामान्य संसारी माणूस तर मृत्यूमुळे भयभीत होतो कारण त्याला तेथल्या भोगांची इच्छा असते. परंतु ज्ञानी माणूस का भयभीत होईल ? इच्छा व वासना या अतृप्त राहण्याच्या कल्पनेमुळे भय वाटते अन्यथा कोणतेच भय अस्तित्वात नाही. ज्ञानी माणूस तर येथल्या भोगांची काय पण मोक्षाची सुद्धा इच्छा करत नाही. जर त्याने मोक्षाची इच्छा केली तर ती सुद्धा एक प्रकारची वासनाच होईल व वासना असेल तर मोक्ष मिळू शकणार नाही. जो माणूस इच्छामुक्त होऊन केवळ आत्मज्ञानानेच तृप्त आहे तो तर आत्मानंदाचा अनुभव घेत असतो व तो अनुभव हीच एक मुक्ति आहे, तोच मोक्ष आहे. खरे तर मोक्षापेक्षाही श्रेष्ठ आनंद आहे. अशा व्यक्तिची तुलना कुणाबरोबर होऊ शकणार ? अष्टवक्र जाणू इच्छितात की राजा जनकाला मोक्षाची तर अपेक्षा नाही ना ?




स्वभावादेव जानानो दृश्यमेतन्न किञ्चन ।
इदं ग्राह्यमिदं त्याज्यं स किं पश्यति धीरधीः ॥ १३ ॥


अनुवाद - जो ज्ञानी पुरुष हे जाणतो की हे दृश्य स्वभावतः काहीच नाही, तो धीर पुरुष वस्तू वतूत या ग्रहणयोश्व आहेत व या त्याज्य आहेत, हे कसे काय पहातो (ठरवतो) ?


विवेचन - अज्ञानी माणसाला आत्म्याचे ज्ञान नसल्यामुळे त्याला त्याचे दृश्यमान जगच सर्वस्व वाटते परंतु ज्या ज्ञानी पुरुषाला आत्म्याचे ज्ञान झाले आहे तो सर्व जगात एकच एक आत्म्याचे रूप पहातो. तो जगाला अनित्य, क्षणिक, भ्रमजाल समजू लागतो. त्याचेसाठी नित्य व सत्य असा आत्माच आहे मग या अनित्य जगापासून तो काय अपेक्षा ठेवणार ? ज्याला महान तत्त्वाची आणि विराट शक्तिची प्राप्ती झाली आहे तो क्षुद्र गोष्टींची काय अपेक्षा ठेवणार ? आत्मज्ञानीसाठी हे जग थोडेसेही मूल्यवान नाही, त्याचे ज्ञानानुसार सर्वश्रेष्ठ असा आत्माच सर्वकाही आहे. त्याचेसाठी सगळ्या वस्तुंचे मोल सारखेच आहे, तो कशालाही स्वीकार करण्यायोग्य समजत नाही किंवा कोणत्याही वस्तूला त्याज्य समजत नाही. त्याग व स्वीकार (ग्रहण) ही दोन्ही अहंकाराचीच रूपे आहेत. अहंकारामुळेच प्रापंचिक माणूस सर्व काही स्वतःसाठी, स्वतःचे उपभोगासाठी प्राप्त झाले पाहिजे असा आग्रह धरतो व त्या वस्तुंचा त्याग करण्यामागे सुद्धा त्याचा अहंकारच असतो. एखाद्या गोष्टीचा त्यागसुद्धा तो स्वर्ग मिळेल, पुण्य मिळेल या आश्वासनाच्या मोबदल्यातच करतो. पाखंडी व अहंकारी माणूस सर्वकाही सोडून नग्न होऊ शकतो पण ते सुद्धा मला लोकांनी त्यागी समजावे ह्या अहंकारापायी व इच्छेपायी केले तर तो त्याग नसून मूढपणा आहे. अमूक मिळाले तर तमूक सोडेन अशी अट घालून केलेला त्याग निष्फळ असतो. जिथे कुठे 'मी' आहे, कर्ता आहे तिथे अहंकार आहेच. ज्ञानी त्याग करत नाही, त्याच्याकडून त्याग घडतो. त्याग आपोआप होतो, करावा लागत नाही. आपल्या मालकीचे तो काहीच समजत नाही. सर्व काही ईश्वराच्या मालकीचे मानतो. जगाला दगड गोट्यांपेक्षा जास्ती महत्त्व देत नाही. मग कशाचे ग्रहण करणार व कशाचा त्याग करणार ? अहंकारामुळेच भोग व त्याग घडतो. ज्ञानी माणसासाठी त्या दोन्ही बाबींना महत्त्व नाही.




अन्तस्त्यक्तकषायस्य निर्द्वंद्वस्य निराशिषः ।
यदृच्छयाऽऽगतो भोगो न दुःखाय न तुष्टये ॥ १४ ॥


अनुवाद - ज्याने अंतःकरणातले सारे मालिन्य त्यजून द्वंद्वरहीत व आशारहित स्थिती प्राप्त केली आहे, अशा पुरुषाला दैवयोगाने मिळालेल्या भोगांपासून सुख होत नाही किंवा दुखः होत नाही.


विवेचन - या अंतिम सूत्रात मुनीश्रेष्ठ अष्टवक्र पुन्हा राजा जनकाला विचारतात की तू आत्मज्ञानी झाला आहेस, विषय वासनेचे सारे मालीन्य तू अंतःकरणातून काढून टाकले आहे, द्वंद्वरहित व आशारहित देखील झाला आहेस म्हणून तुला दैवयोगाने प्राप्त झालेले भोग व सुखदुःखे ही ईश्वरी वरदान मानून भोगता आली पाहिजे. ह्यात तुला सुख वाटू नये किंवा दुःख होऊ नये. अर्थात जे काही भलेबुरे, चांगले वाईट होते ते दैवयोग समजून भोगले पाहिजे. जर त्याविषयी सुख किंवा दुख वाटत असेल तर अजून मन जीवंत आहे व आत्मज्ञान झाले नाही असाच त्याचा अर्थ आहे.

स्वतःच्या विवेकाने जो या चंचल व अस्थिर गोष्टींवर विजय प्राप्त करतो तोच ज्ञानी असतो. काय चांगले आहे, काय वाईट आहे, कोणते स्वीकारावे, कोणते नाकारावे याचा निर्णय स्वतःचे विवेकाने करायला हवा. तो या जगातल्या रूढी, पद्धती, नियम यामुळे आपले निर्णय बदलत नाही. या चौदा सूत्रांद्वारे अष्टवक्र राजा जनकाच्या आत्मज्ञानाची परीक्षा घेत आहे.




GO TOP