|
अष्टावक्रगीताप्रकरण ७ वेआत्मा असीम महासागराप्रमाणे असून जग हे त्यात निर्माण होणार्या लाटेप्रमाणे आहे.
मय्यनन्तमहाम्भोधौ विश्वपोत इतस्ततः । अनुवाद - अमर्यादित, असीम अशा माझ्या महासागरात विश्वरूपी नाव वार्यामुळे इकडे तिकडे डोलते. माझ्यात असहिष्णुता नाही. विवेचन - या आधीच्या अध्यायात जनक राजा सांगतो की हे विश्व आपल्या प्राकृतिक व स्वाभाविक गतीमुळे संचलित होते. मी ज्ञानी झाल्यामुळे विश्वाच्या गतीत व संचलनात काहीही फरक पडलेला नाही. परंतु आता माझी दृष्टीच बदलून गेली. पहिल्यांदा मी त्यातच लिप्त होतो, त्याच्या गतीने प्रभावित झालो होतो. परंतु आता मी अ-लिप्त होऊन केवळ साक्षीदार होऊन सर्व जग न्याहाळतो. आता माझ्यावर जगातील व्यवहारांचा परिणाम होत नाही. त्यामुळे माझ्या मनात त्याग, स्वीकार व विलयाचे विचार येतच नाहीत. मी आत्म-रूप झाल्यामुळे आता हे विचार कसे काय निर्माण होणार ? ह्माच निवेदनाच्या ओघात राजा जनक आपल्या मुक्त अवस्थेचे वर्णन करतांना सांगतो की मी जणू मर्यादा नसलेल्या, शेवट नसलेल्या महासागराप्रमाणे असणारा आत्मा आहे. ह्या महासागरात विश्वरूपातील नाव इकडे तिकडे डोलते. मी तटस्थ वृत्तीने, साक्षीदार म्हणून तिला पहात असतो. माझ्यात असहिष्णुता नसल्याने मी प्रभावित होत नाही. हा सारा उपद्रव, अशांती केवळ लाटांपुरताच म्हणजे फार वरच्या पृष्टभागापुरता मर्यादित असतो. समुद्राच्या खोल अथांगतेमधील आतल्या भागावर त्याचा काहीच परिणाम होत नसतो. ह्याच प्रकारे मनुष्याच्या सार्या अशांतीचे कारण त्याचे मन आहे. मनातच इच्छा, आकांक्षा व वासनांचे तरंग निर्माण होतात कारण मनाचा तसा स्वभावच आहे. जे आहे त्यात मनाला समाधान नसते तर जे नाही त्याचीच मन नेहमी मागणी करते. जे आहे ते सुद्धा अजून अजून जास्ती हवे असते. त्यासाठी मन नेहमी अशांत व अतृप्त असते. कुणी धन संपत्ती करता अस्वस्थ झाले आहे, कुणी एखाद्या अधिकारपदासाठी, कुणी मान-सन्मानासाठी तर धार्मिक वृत्तीच्या व्यक्ति ईश्वरप्राप्तीसाठी शांती हरवून बसल्या आहेत. लोक वेगवेगळ्या कारणांनी अशांत असतात पण मी सहिष्णु वृत्तीचा झालो असून मी माझ्या आत्म्याच्या मूळ स्वभावानुसार स्वाभाविक जीवन जगत असल्याने शांत व स्वस्थ आहे. मला शांत होण्यासाठी प्रयत्नसुद्धा करावे लागत नाही. कारण कोणत्याही प्रयत्नांमागे इच्छा व म्हणून अशांती असते. जे काही होत आहे ते सर्व ठीक आहे, सर्वाचा स्वीकार आहे. कशाचीही मुद्दाम निवड नाही. हे चांगले, हे वाईट असा भेद नाही, कोणतीही इच्छा नाही, मी हिंसक नाही व अहिंसक होण्याचे प्रयत्नही करावे लागत नाही. मी जगाचा त्याग केला नसून संन्याससुद्धा घेतलेला नाही. मी पश्चाताप करत नाही व कशाची क्षमायाचनासुद्धा करत नाही. काहीही स्वीकार करण्याची किंवा कशाचाही त्याग करण्याची इच्छा नाही. हाच आत्म्याचा स्वभाव आहे व मी त्यात एकरूप झालो आहे.
मय्यनन्तमहाम्भोधौ जगद्विचिः स्वभावतः । अनुवाद - असीम अशा महासागर रूपी माझ्यात स्वाभाविकपणे लाट निर्माण होओ अथवा न होवो किंवा निर्माण होऊन विलय पावो. माझ्यात त्यामळे न वाढ होते न घट होते. विवेचन - राजा जनक सांगतो कि महासमुद्रात ज्याप्रमाणे लाटा स्वाभाविकपणे निर्माण होतात व नष्ट होतात. पण त्यामुळे महासागरात काही वाढ होत नाही किंवा कमीही काही होत नाही. ही वाढ किंवा घट म्हणजे अहंकाराचा परिणाम असतो. अहंकारामुळे प्रतिष्ठेची इच्छा निर्माण होते. प्रतिष्ठा प्राप्त झाली नाही तर तो स्वतःला कमी समजू लागतो व प्रतिष्ठा मिळाली तरच मोठा मानू लागतो. रबरी फुग्याप्रमाणे फुगतो व फुटतो. प्रापंचिक माणसे प्रतिष्ठेसाठी भुकेली असतातच पण त्याचबरोबर साधु संन्यासी सुद्धा प्रतिष्ठेची हाव बाळगून असतात. ते सुद्धा बॅन्ड लावतात, स्वतःचा जयजयकार करवून घेतात, शोभायात्रा काढून स्वतः मिरवतात, टाळ्या वाजवून घेतात. उच्चासनावर बसतात. हे सर्व नाटक, ढोंग प्रतिष्ठेसाठी सुरू असते. पण अशा पाखंडीवृत्तीमुळे व ढोंगामुळे पूजनीयता प्राप्त होत नसते. जे कुणी आत्म्याच्या मूळ स्थिर व शांत स्वभावापासून दूर गेले आहेत तेच ह्या अहंकाराच्या लाटांमुळे प्रभावित होतात. जनक राजा म्हणतो की 'माझ्यावर या लाटांचा काहीच परिणाम होत नाही म्हणून मला त्यामुळे लाभ होत नाही किंवा नुकसान होत नाही.'
मय्यनन्तमहाम्भोधौ विश्वं नाम विकल्पना । अनुवाद - अ-सीम अशा महासागरासारख्या माझ्या रूपात विश्व केवळ कल्पनामात्र आहे. मी अत्यंत शांत आहे, निराकार आहे आणि याच अवस्थेत स्थिर आहे. विवेचन - राजा जनक सांगतो की, "मी आत्मरूपी असीम सागर असून विश्व ही केवळ कल्पना आहे. ते अस्तित्वातच नाही तर त्याचा माझ्यावर परिणाम कसा होणार ? आधी मी या भ्रमाला, या कल्पनेलाच सत्य समजत होतो, त्यामुळे त्याचा माझ्यावर परिणाम होऊन मी अशांत होत असे. आता मी निराकार झालो असून या रूपात अत्यंत शांत व स्थिर आहे. आता माझ्यात कोणत्याही स्वरूपाची अशांती नाही. पूर्वी सारी अशांती केवळ मनामुळे उद्भवत होती. आत्मरूप झाल्यावर आता कशाचाही अडथळा, त्रास, प्रलोभन किंवा विचलन होऊ शकत नाही."
नात्मा भावेषु नो भावस्तत्रानन्ते निरञ्जने । अनुवाद - आत्मा विषयात कधीच नसतो व विषय ही कधी आत्म्यात लिप्त नसतात. आत्मा निर्दोष ( निरंजन) आहे. या प्रमाणे मी आसक्ति विरहित आहे, आकांक्षा विरहित आहे व याच अवस्थेत स्थिर आहे. विवेचन - राजा जनक सांगतो की इंद्रिये व मन हे शरीराशी जोडलेले आहेत. मन नेहमी विषयांकडे आकर्षित होत असते व इंद्रियांच्या द्वारे विषयांचा उपभोग घेऊन मन तृप्त होत असते. शरीर विनाश पावल्यावर इंद्रिये सुद्धा अस्तित्वात रहात नाही. परंतु सुक्ष्म शरीरात मन राहिल्याने विषयांच्या उपभोगाची त्याची आवड कायम रहाते. ह्या वासनेमुळे तो पुन्हा नवे शरीर धारण करतो. म्हणून जगातल्या सर्व विषयांचा संबंध केवळ शरीर व मनापुरता मर्यादित आहे. कर्माचे कर्तेपण त्यांचेच आहे आणि उपभोग घेणारे सुद्धा तेच आहेत. कर्तेही तेच व भोक्तेही तेच. आत्म्याचा याच्याशी काहीही संबंध नसतो. आत्मा विषयात नसतोच आणि विषयही आत्म्यात नसतात. मी आत्मा असल्याने सर्व विषयांबद्दल अनासक्त आहे, विषयांची आसक्ति शरीराला व मनाला असते, आत्म्याला नव्हे. म्हणून मी इच्छा, आकांक्षाविरहित असून त्याच अवस्थेत स्थिर आहे.
अहो चिन्मात्रमेवाहमिन्द्रजालोपमं जगत् । अनुवाद - अहो ! मी केवळ चैतन्यमात्र आहे. संसार मृगजळाप्रमाणे भासमान आहे. तेंव्हा आता माझ्यासाठी काहीही स्वीकारणीय, चांगले किंवा काहीही अस्वीकारणीय, वाईट असे काहीच नाही. माझ्यासाठी ती कल्पनाच आहे. विवेचन - राजा जनक प्रतिपादन करीत आहे की, इंद्रिये व मन यांचा संबंध आत्म्याशी नसून शरीराशी आहे तसेच मनाशी आहे. पण मी आता आत्मस्वरूप असल्याने व आत्म्यासाठी हे सर्व विश्व केवळ मृगजळासारखे आहे, केवळ भास आहे, माया आहे, भ्रम आहे. ही फसवी माया इंद्रियांना व मनाला भुलवू शकते कारण त्यांच्यात अज्ञानाचा वास आहे. आत्मा ज्ञानस्वरुप असल्याने त्याचेवर काहीच परिणाम होत नाही. तो हा सर्व खेळ केवळ साक्षीदार होऊन पाहतो. जोपर्यंत मी अज्ञानी होतो व ह्या भ्रमाला व असत्यालाच सत्य समजत होतो तोपर्यंत चांगले किंवा वाईट, स्वीकारणीय किंवा अस्वीकारणीय असा भेद अस्तित्वात होता. अज्ञानी असल्यामुळे मी लाभ-तोटा, शुभ-अशुभ, चांगले-वाईट अशी वर्गवारी करीत होतो. परंतु आता मला आत्मबोध झाला असून हे विश्व माझ्यासाठी स्वप्नासारखे आहे. मृगजळापेक्षा त्याचे जास्त महत्त्व नाही. त्यामुळे चांगलेही काही नाही व वाईटही काही नाही. आता सर्व कल्पना निरर्थक झाल्या आहेत. तेंव्हा सारे काहीं मिळविले, मिळविण्यासाठी काहीच बाकी नाही राहिले. तेव्हां इच्छा कशाची व नवीन कल्पना कशाची ? ह्या जगात काहीही प्राप्त करावयाचे नसून काहीही त्याग देखील करण्यासारखी स्थिती नाही. हे जग माझे नाही कारण ते भ्रम आहे. या जगातले काहीच माझे नाही मग मी त्याग कसा काय करू ? चांगले-वाईट, शुभ-अशुभ, स्वीकारणीय व त्याज्य असे काहीच उरले नाही. कारण ह्या भौतिक जगात माझे काहीच नाही व जे आहे असे वाटते ते सर्व माया आहे. आत्मा हा सर्वांपासून अलिप्त आहे. चांगले वाईट ठरविण्यामागे वासना असते. जेव्हा सार्या वासना नाहीशा झाल्यात, तेंव्हाच हे सर्व भेद नष्ट झाले. मी स्वभावतः जसा आहे तसाच मी संतुष्ट आहे. काहीही निवडायचे नाही. दोन्ही बाजूंचा मी केवळ न्याहाळणारा, पहाणारा साक्षीदार असून चैतन्यरूपात स्थिर आहे. |