अष्टावक्रगीता

प्रकरण १५

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

भोगांची अभिलाषा असणाऱ्यांसाठी हा तत्त्वबोध त्याज्य आहे.

यथातथोपदेशेन कृतार्थः सत्यबुद्धिमान् ।
आजीवमपि जिज्ञासुः परस्तत्र विमुह्यति ॥ १ ॥


अनुवाद - अष्टवक्र स्वामींना विश्वास वटू लागला की राजा जनकाला भ्रांती झाली नसून खरोखरीच आत्म-बोध झाला आहे. म्हणून या आत्मज्ञानाचे समर्थन करीत मुनीश्रेष्ठ म्हणतात - सात्विक बुद्धिचा पुरुष थोड्याश्या उपदेशाने कृतार्थ (आत्मज्ञानी) होतो. असत्य बुद्धिचा पुरुष आजीवन ज्ञानासाठी -उत्सुक (जिज्ञासु) असूनही तो केवळ भोगांच्या मोहातच अडकून रहातो. (ज्ञानी होत नाही.)


विवेचन - राजा जनकाला झालेल्या आत्मज्ञानाची पुष्टी करण्यासाठी पुन्हा उपदेश करीत मुनीश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी या सुत्रात सांगतात की सात्विक बुद्धिच्या पुरुषाचे अंतःकरण शुद्ध असते. त्यामुळे अल्पशा उपदेशाने त्याला आत्मज्ञान होते. पण वासनायुक्त, राग-द्वेष, अहंकार, लोभ, घृणा यांनी ज्याचे अंतःकरण भरले आहे, त्यांचे नशिबी मनाचे विकार व मोहच येणार. त्याच्या अंतःकरणाची शुद्धी होण्यातच अनेक जन्म खर्च होतात. म्हणून असत्य बुद्धिचा माणूस ज्ञानासाठी आयुष्यभर उत्सुक असूनही मोहामुळे आत्मज्ञानापासून वंचितच रहातो. त्याची जिज्ञासा केवळ बौद्धिक स्तरावरची असते. तो धर्म व अध्यात्म यांचे ज्ञानसुद्धा बौद्धिक पातळीवर करून घेऊ इच्छितो. बौद्धिक आकलन पद्धतीत तर्क-कुतर्क-वितर्क निर्माण होतात. काही अन्य क्षेत्रातल्या माहितीच्या आधारावर असा मनुष्य अध्यात्मात कुठे विरोध शोधून काढतो तर कुठे साम्य शोधतो. याप्रमाणे अध्यात्म जे आत्म्याचे बोध करून देणारे शास्त्र आहे त्यातील सत्यसुद्धा तो बुद्धिच्या आधाराने शोधत असल्याने व बुद्धि ही भेद निर्माण करणारी असल्यामुळे तो पंडित होऊ शकतो, पण ज्ञानी बनू शकत नाही. बौद्धिक करामती व त्या पातळीवरील माहितीचाच त्याला अपार मोह होतो. ज्यामुळे सत्याच्या उपलब्धिपासून तो दूर रहातो. हे आध्यात्मशास्त्राचे ज्ञान बुद्धिनिरपेक्ष आहे. हा तर त्या परमचैतन्याचा अनुभव आहे व तो फक्त ध्यानाद्वारे, समाधीद्वारे किंवा बोधामुळे प्राप्त होतो. काही अन्य पद्धतीसुद्धा आहेत पण या सर्व पद्धतीची एक महत्त्वाची पूर्वशर्त आहे व ती म्हणजे अंतःक्तण सात्विक असणे, निर्मळ असणे. मुमुक्षु व्यक्तिच ह्या ज्ञानप्राप्तीसाठी लायक असते, केवळ जिज्ञासु नव्हे. आत्मज्ञान काही केवळ साधना नाही. अज्ञानाचे जे आवरण आहे ते काढून टाकण्याची गरज आहे व त्यासाठीच फार वेळ लागतो. ह्याच अज्ञानामुळे बुद्धिची स्थिरता होऊ शकत नाही. साधनेद्वारा केवळ सत्व-बुद्धि प्राप्त होते. त्यानंतर गुरूच्या उपदेशाने तत्वबोध होतो. हेच साधनेचे व तत्वबोधाच्या प्राप्तीचे रहस्य आहे.




मोक्षो विषयवैरस्यं बन्धो वैषयिको रसः ।
एतावदेव विज्ञानं यथेच्छसि तथा कुरु ॥ २ ॥


अनुवाद - 'विषयांबद्दल अनासक्त होणे हाच मोक्ष आहे. विषयांत स्वारस्य हेच बंधन आहे. एवढेच विज्ञान आहे. तु इच्छा असेल तसे कर.'


विवेचन - तत्वबोधाचा उपदेश लायकी संपादन केलेल्या शिध्यालाच द्यायचा असतो. अधिकार नसलेल्या व लायकी नसलेल्याला हा उपदेश केल्याने त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होतो. उपदेश घेण्यास पात्र कोण आहे. ह्याचे स्पष्टीकरण या आधीच्या सुत्रात मुनीश्रेष्ठ अष्टवक्राने केले आहे की ज्याची बुद्धि सत्वयुक्त व निर्मळ आहे तोच या ज्ञानाचा अधिकारी आहे, अन्य कुणी नव्हे. सात्विक बुद्धिची व्यक्तिच ह्या उपदेशाचा अर्थ जाणून तो आत्मसात करू शकते. तोच उत्तम व सर्वश्रेष्टरित्या हा उपदेश स्वीकारू शकतो. चित्ताची शून्यावस्थाच माणसाला स्वीकार करण्यास योग्य पात्रता प्रदान करते. स्वच्छ कांचेतच उत्तम प्रतिबिंब दिसू शकते. पात्रतेची परीक्षा गुरू स्वतः करतो. शिष्य आपल्या पात्रतेचा कधी दावा करत नाही. मी एवढे तप केले आहे, मी एवढे उपवास केले आहे मी जग सोडून दिले आहे, विवस्त्र राहीलो आहे, एवढ्या वेळी गायत्री मंत्राचे उच्चारण केले आहे, एवढे तास रोज उपासना केली, एवढे दान केले, एवढा त्याग केला असे शिष्य कधीच म्हणत नाही. "ह्या कारणांमुळे मी या उपदेशाला पात्र झालो आहे, मला उपदेश द्या" असे म्हणत नाही. जर शिष्याने पात्रता संपादन केली असेल तर गुरू तो ओळखून त्या सत्वबुद्धिच्या शिष्याला ज्याप्रमाणे अष्टवक्र स्वामींनी जनकाला दिला त्याप्रमाणे उपदेश देतो. जर राजा जनकाची मानसभूमी आधी तयार झालेली नसती तर मुनीश्रेष्ठ अष्टवक्राने त्यास हा तत्वबोध कधीच सांगितला नसता. मग त्यांनी राजा जनकाला साधना करण्यास सांगितले असते, मंत्र-जप करण्यास सांगितले असते, अष्टांग योग सांगितला असता, उपासना सांगितली असती पण राजा जनकाला त्याची आवश्यकता नव्हती. राजा जनकाची मानसिक भूमी आधीपासूनच तयार होती म्हणून उपदेश करताच तत्क्षणी घटना घडली व जनक राजास आत्मज्ञान प्राप्त झाले. अष्टवक्राने नंतर वेगवेगळे प्रश्न विचारू त्याची परीक्षा घेतली व राजा जनकास खरोखरीच आत्मान प्राप्त झाले असल्याची खात्री करून घेतली. आता या प्रकरणात गुरू दिक्षान्त स्वरूपात आशिर्वादात्मक प्रवचन करीत आहेत की तुला आत्ममान झाले, तू मुक्त झालास, आता तू सुखाने रहा. अल्प शब्दात उपदेशाचे सार सांगून टाकले. असा उच्च तत्वज्ञानाने परिपूर्ण असणारा गुरू-शिष्याचा संवाद अध्यात्माचे क्षेत्रात अद्वितीय आहे. अष्टवक्राचे सूत्र हे साधना सूत्र नसून सिद्धी प्राप्त झाल्यानंतरचा अंतिम उपदेश आहे, तो आरंभ नसून दिक्षांत आहे.

अष्टवक्र मुनी महाराज सांगतात की मोक्ष ही काही वस्तू नाही किंवा एखादे ठिकाण नाही की जेथे पोहचता येते. कोणत्याही प्रकारचा भोग नाही, कोणताही आनंद देईल असा रस नाही. ह्याची कोणतीच साधना नाही, ह्याची कोणतीच उपासना नाही, न तो स्वर्गात आहे न तो तपश्चर्येच्या शिलाखंडावर, विषय वासनातून पूर्णपणे विरक्त होणे हाच मोक्ष आहे. विषयांचे ज्याला स्वारस्य आहे त्याचेसाठी सारे जग अस्तित्वात आहे. त्याचे कारण मन आहे. म्हणून मनच बंधनाचे व मुक्तिचे कारण आहे. हे मन जेव्हा विषयसुखात आसक्त होते तेव्हा बंधन आहे व ते या जगाचे असले तरी त्याचे कारण मन आहे. उपनिषदात सांगितले आहे की, "मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः" हे मनच मनुष्याच्या बंधनाचे व मुक्तिचे पहिले व शेवटचे मूलकारण आहे. हे मन जेंव्हा विषयसुखातून विरक्त होते तेंव्हा मुक्ति मिळते. जग बंधन नाही. जगात रहाणे, खाणे-पिणे, उठणे-बसणे वा अन्य व्यवहार करणे बंधन नाही. परंतु त्यात स्वारस्य घेणे, आसक्ति बाळगणे हे बंधन आहे. अष्टावक्र म्हणतात की हे एवढेच सर्व उपदेशाचे विज्ञानरूपी सार आहे. म्हणून हे जनका, तुला आता विरक्तिमुळे मोक्ष-प्राप्ती झाली आहे. आता तूला जसे हवे तसे कर. आता तुझ्यासाठी या जगात आसक्तिचा कोणताच विषय उरलेला नाही. बीजच नाहीसे झाले आता आसक्तिची शक्यताच उरलेली नाही. शरीरावर राख फासल्याने, यज्ञ-धूनी पेटविल्याने, जगाला शाप दिल्याने, शरीराला कष्ट दिल्याने, उपवास करण्याने, जेवतांना कडूनिंबाची पाने खाल्याने विषयांबद्दल विरक्ति निर्माण होत नाही. त्याचा मोक्षाशी काही संबंध नाही.




वाग्मिप्राज्ञमहोद्योगं जनं मूकजडालसम् ।
करोति तत्वबोधोऽयमतस्त्यक्तो बुभुक्षुभिः ॥ ३ ॥


अनुवाद - हा तत्व बोध वाचाळ बडबड्या माणसाला मुके करून टाकतो, बुद्धिमान पुरूषाला जड करून टाकतो व महाउद्योगी माणसाला आळशी करून टाकतो. म्हणून भोगाची अभिलाषा असणाऱ्यांकरिता हा बोध त्याज्य आहे.


विवेचन - भोग आणि मोक्ष या दोन परस्पर विरुद्ध दिशेला जाणाऱ्या वाटा आहेत. संसार आहे, भोग व त्यात विरसता-विरक्ति म्हणजे मोक्ष. दोघांच्या मधोमध मन उभे आहे, ते कधी कधी भोगाकडे आकर्षित होते तर कधी मोक्षाकडे आकर्षित होते. दोन्ही दिशांना ते एकाच वेळी जाऊ शकत नाही. भोगांत स्वारस्य घेणे, त्यात आसक्ति असणे, सकाम आणि उद्देश ठेऊन, व फळाच्या आशेने काम करणे म्हणजे संसारात गुरफटून आहे. म्हणून ज्याला भोगात स्वारस्य आहे, विषय वासनांत रस आहे त्याच्यासाठी केवळ मुक्तिसाठीच असलेला हा तत्त्व-बोध त्याज्यच आहे. कारण मुक्ति मिळत काहीच नाही उलट जे भौतिक, ऐहिक आहे ते सर्व सुटून जाते. संसारात मग त्याला काहीच रस उरत नाही. म्हणून त्याचे मन पुन्हा विषय भोगांकडे वळेल व त्यामुळे त्याचा अधःपात होईल. अशी व्यक्ति न घरी सुखी होते न घराबाहेर कुठे जंगलात, मंदिरात सुखी होते. तो ढोंगी व भ्रष्ट होऊन जाईल. भोगाची इच्छा असणारा वाचाळ असेल, बुद्धिमान असेल, महान उद्योगी पुरूष असेल परंतु आत्मज्ञान झाल्यावर तो मौन होतो, बोलण्यातली रूचीच कमी होते. कार्याचे प्रति तो उदास होतो, जड व आळशी होतो. मनाची सर्व शक्ति चैतन्याकडे वळते व त्या चैतन्य बोधामुळे त्याचे या जगाशी असणारे भावबंध तुटून जातात. म्हणून मुनीश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात की ज्याला विषयवासना भोगात स्वारस्य आहे, जो बुद्धिमान व पंडित आहे, अशा विद्वान माणसाला व ज्याला उद्योग व्यवसायाची आवड आहे, या साऱ्या ऐहिकक व लौकीक जगाबद्दल ज्याला ममत्व आहे त्याला मुक्तिचा वा मोक्षाचा उपदेश उपयोगी नाही. त्याच्यासाठी तो त्याज्यच आहे. हा उपदेश तर त्यांचेसाठी आहे ज्यांचा या जगाबद्दलचा प्रेमभाव संपला आहे, ज्याला भोगाची आसक्ति उरलेली नाही, जो संसाराबद्दल विरक्त आहे तोच या आत्मबोधाचा लाभ घेऊ शकतो.




न त्वं देहो न ते देहो भोक्ता कर्ता न वा भवान् ।
चिद्‌रूपोऽसि सदा साक्षी निरपेक्षः सुखं चर ॥ ४ ॥


अनुवाद - तू शरीर नाहीस, आणि हे शरीरसुद्धा तुझे नाही. तू भोक्ता नाहीस व कर्तासुद्धा नाहीस. तू ते चेतन्यरूप आहेस, नित्य आहेस, साक्षी आहेस निरपेक्ष आहेस, तू सुखाने विहार कर.


विवेचन - मुनीश्रेष्ठ अष्टवक्र महाराज राजा जनकाला सांगतात की आत्मज्ञान झाल्यामुळे या जगातल्या वेगवेगळ्या विषयांबद्दल तुला आसक्ति उरलेली नाही. तुझ्यासाठी भोगांमधला रस आटला आहे. तु मुमुक्षु होतास व शुद्ध अंतःकरणाचा होतास म्हणून तुला त्वरीत आत्मबोध झाला. आता तू चैतन्यरूपी आत्म्यात विलिन झाला आहेस त्यामुळे तू म्हणजे शरीर नव्हे. शिवाय हे शरीर ही तुझे नाही, कारण आता तू फक्त आत्मा आहेस त्यामुळे नित्य आहेस, तू कर्ता नाहीस कारण आत्मा कर्ता नसतो, तू भोक्ता नाहीस कारण आत्मा भोक्ता नसतो, तू केवळ साक्षीपुरूष आहेस व निरपेक्ष आहेस. म्हणून तू आता सुखाने विहार कर.




रागद्वेषौ मनोधर्मौ न मनस्ते कदाचन ।
निर्वकल्पोऽसि बोधात्मा निर्विकारः सुखं चर ॥ ५ ॥


अनुवाद - राग व द्वेष हे मनाचे धर्म आहेत. तू कधीही मन देखील नाहीस. तु निर्विकल्प, निर्विकार, बोध-स्वरूप आत्मा आहेस. तू सुखाने विहार कर.


विवेचन - शरीर, मन, बुद्धि, अहंकार हे सर्व प्रकृतीजन्य आहेत. त्या प्रत्येकाचा धर्म वेगवेगळा आहे. आत्मा चैतन्यस्वरूप आहे व त्यामुळे शरीराचे, मनाचे, बुद्धिचे व अहंकाराचे गुणधर्म हे आत्म्याचे गुणधर्म होऊ शकत नाही.अष्टवक्र स्वामी सांगतात की तू आत्मज्ञानी आहेस त्यामुळे आत्मा हाच तुझा स्वभाव आहे. तू त्याचप्रमाणे आचरण कर व सुखाने रहा. हे राग, द्वेष तर मनाचे धर्म आहेत, चैतन्याचे नाही; म्हणून ते तुझे धर्म नाहीच कारण तू मन नाहीस. तू आत्मरूप आहेस व आत्मा निर्विकल्प, निर्विकार व बोधस्वरूप आहे जो या सर्व जगाचा केवळ साक्षी आहे. म्हणून शरीर व मनाच्या दोषांपासून तू सर्वथा मुक्त आहेस.




सर्वभूतेषु चात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।
विज्ञाय निरहंकारो निर्ममस्त्वं सुखी भव ॥ ६ ॥


अनुवाद - सर्व भूतांमध्ये (जीवांमध्ये) आत्म्याला व सर्व जीवांत आत्मा असल्याचे जाणून तू अहंकारशून्य व ममताशून्य आहेस, तू सुखी हो.


विवेचन - संसारात अनेकत्वाचा' भास होतो. व्यक्ति, पशु, पक्षी, किटक, वनस्पती, जड-चेतन, ठोस, तरल, वायुरूप, द्रवरूप याप्रमाणे सर्व पदार्थ भिन्न भिन्न, वेगवेगळे असल्याचा भास होतो. हा भास हे केवळ मनाचे भ्रामक खेळ आहेत. मन नेहमीच विविधता व अनेकत्वच पाहते कारण त्याची दृष्टीच मर्यादित आहे. परंतु ही भिन्नता आत्म्याविषयी अज्ञान असल्यामुळेच जाणवते. ज्याने या आत्मतत्वाचे ज्ञान प्राप्त केले आहे त्याचा हा अनेकत्व विषयीचा भ्रम संपुष्टात येतो. तो हे जाणून घेतो की ही संपूर्ण सृष्टी फक्त एकाच आत्म्याचे रूप आहे. एकाच आत्म्याची ही वेगवेगळी रूपे आहेत. ह्या सर्वांच्या आत एकच आत्मा आहे. ज्याप्रमाणे दुधापासून शेकडो प्रकारच्या मिठाया तयार होतात त्याचप्रमाणे एकाच आत्म्याची ही हजारो रूपे आहेत. ह्या एकत्वाचे ज्ञान होणे म्हणजेच परम श्रेष्ठ ज्ञान होणे होय. अज्ञानी माणूस भिन्नताच ओळखतो व त्यामुळे त्याच्यात अहंकार व ममतेची भावना निर्माण होते. राग-द्वेष, ईर्ष्या, लोभ-मोह या भावना निर्माण होतात. अष्टवक्रस्वामी म्हणतात की राजा जनक, तू जर आत्मरूप झाला आहेस त्यामुळे तू हे जाणून घेतले आहेस की सर्व पदार्थात मिळून आत्मा आहे व सर्व पदार्थात आत्मा आहे. दोन्ही अभिन्न आहेत. म्हणून तू अहंकार विरहित व ममताशून्य आहेस. आता तू सुखी हो. हे प्रतिपादन एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणेच आहे कारण वैज्ञानिक सुद्धा पदार्थ व विद्युतशक्ति यांना अभिन्न समजतात. पदार्थ हा उर्जा आहे व उर्जा हीच पदार्थ आहे. आध्यात्माची दृष्टी व विचारसुद्धा पूर्ण शास्त्रीय विचार आहे. ब्रह्म, ईश्वर, आत्मा व जग यांची याप्रमाणे एवढी वैज्ञानिक व्याख्या अन्य पंथ, धर्म व संप्रदाय करू शकलेले नाहीत.




विश्व स्फुरति यत्रेदं तरंगा इव सागरे ।
तत्वमेव न संदेहश्चिन्मूर्ते विज्वरो भव ॥ ७ ॥


अनुवाद - हे जग एखाद्या तरंगाप्रमाणे ज्याच्यात निर्माण होते तो तूच आहेस यात शंका नाही. हे चैतन्यस्वरूपा, आता तू संतापविरहित हो.


विवेचन - स्वामी अष्टवक्र महाराज सांगतात की ज्या प्रमाणे समुद्रात लाटा किंवा तरंग निर्माण होतात तरी त्या लाटा व समुद्र हे काही वेगळे नसतात. त्याचप्रमाणे तू आत्मा असल्याने महासमुद्रा सारखा आहेस ज्यात हे जग तरंगाप्रमाणे निर्माण झाले आहे. लाटा ज्याप्रमाणे अनित्य आहेत, निर्माण होतात व पुन्हा नाहीशा होतात परंतु त्यामुळे समुद्राला काहीच लाभ किंवा तोटा होत नाही, त्याचप्रमाणे हे जग आत्म्यातून निर्माण झाले आहे, ते लाटांप्रमाणे अनित्य आहे. ते निर्माण होते, नाहीसे होते पण त्याच्या या निर्माणाच्या व पुन्हा विलयाला जाण्याच्या प्रक्रियेमुळे आत्म्याला काहीच नफा-नुकसान होत नाही. कारण आत्मा हा समुद्राप्रमाणे नित्य आहे. जगातले सारे व्यवहार, सारे विषय, सारे भोग, अपेक्षा, आशा-निराशा, संयोग-वियोग हे सारे तरंगाप्रमाणे आहेत परंतु तू तरंग नाहीस तर महासमुद्र आहेस, यात शंका नाही. हे सत्य जाणून तू आता विकार-रहित, ज्वर-रहित, संताप-रहित हो. साऱ्या संतापाचे कारण केवळ हेच होते की तू स्वतःला समुद्रासारखा आत्मा न समजता लाटांप्रमाणे असणारे जग समजत होतास. ते तुझे अज्ञान होते. आता ज्ञानाचा दिवा प्रज्वलित झाल्याने हे अज्ञानातून निर्माण झालेले भ्रम नष्ट झालेत. आता तू संतापासारख्या सर्व विकारांपासून मोकळा हो.




श्रद्धस्व तात श्रद्धस्व नात्र मोहं कुरुष्व भो ।
ज्ञानस्वरूपो भगवानात्मा त्वं प्रकृतेः परः ॥ ८ ॥


अनुवाद - हे तात ! श्रद्धा धारण कर, श्रद्धावान हो ! या जगाचा मोह करू नकोस !!! तू ज्ञानस्वरूप, भगवान स्वरूप आत्मा आहेस व प्रकृतीपेक्षा भिन्न आहेस.


विवेचन - स्वामी अष्टवक्र पुन्हा सांगतात की तू या प्रकारे आत्मरूप झाला आहेस. म्हणून हे तात ! आता ह्याच सत्यावर नितांत श्रद्धा ठेव. ज्याला प्रत्यक्ष अनुभूती झालेली नाही, ज्याचे ज्ञान केवळ पुस्तकांवर अवलंबून आहे, तो अश्रद्धही होऊ शकतो कारण हे ज्ञान बुद्धि-निरपेक्ष असून तो स्वानुभूतिचाच विषय आहे. पण तुला तर तो अनुभव प्रत्यक्षच घेता आला आहे, त्यामुळे तू अश्रद्ध होण्याचा प्रश्नच नाही. हे जग भौतिक आहे, जड आहे व प्रकृतिजन्य आहे, तू आत्मा आहेस म्हणून ज्ञान-स्वरूप आहेस, भगवान स्वरूप आहेस त्यामुळे तू प्रकृतीपेक्षा वेगळा आहेस.




गुणैः संवेष्टितो देहस्तिष्ठत्यायाति याति च ।
आत्मा न गन्ता नागन्ता किमेनमनुशोचसि ॥ ९ ॥


अनुवाद - हे गुणयुक्त शरीर जन्माला येते, रहाते व नाश पावते. परंतु हा आत्मा जन्म घेत नाही, (तो येत नाही) किंवा नाश पावत नाही (जात नाही) त्यामुळे शरीराचा तो काय विचार करायचा ?


विवेचन - ज्या प्रकारे सोन्यापासून अनेक दागिने, अलंकार निर्माण होतात व कालांतराने नष्ट होतात, ज्याप्रकारे मातीपासून अनेक प्रकारचे घट तयार होतात व कालांतराने नाहीसे होतात, ज्याप्रकारे समुद्रात अनेक लाटा निर्माण होतात व नाहीशा होतात, पण या सर्वात त्यांचे मूल पदार्थ कायम रहातात, त्याचप्रमाणे शरीर नष्ट झाले तरी मूलतत्त्व असणारा आत्मा कायम रहातो. विज्ञानसुद्धा हेच सांगते की पदार्थ अविनाशी आहेत, शक्ति अविनाशी आहे. पदार्थांचे रूपांतरण होते, शक्तिचे सुद्धा रूपांतरण होते परंतु ते स्वतः अविनाशी आहेत. शक्ति व पदार्थ यांचे एक दुसर्‍यात रूपांतरण होते. पदार्थाचे रूप विनाशी असते. पण पदार्थातील शक्ति नित्य व शाश्वत आहे, स्वयंभू आहे, शक्तिचा कधी नाश होत नाही.

अध्यात्मात सुद्धा हेच सांगितले आहे की हे शरीर हे एक तात्पुरते रूप आहे व ते सत्व, रज, तम गुणांनी युक्त आहे. ह्या गुणांनी ते लिप्त आहे. हे शरीर जन्माला येते, काही काळ रहाते व नंतर नष्ट होते. ह्या शरीराला बालपण, तारूण्य व म्हातारपण येते. पण आत्मा मात्र नित्य आहे. त्याच्यात ह्या प्रकारचे गुण ही नसतात. तो जन्माला येत नाही, मरतही नाही, त्याची वाढ होत नाही व त्याचा क्षय होत नाही. हे शरीर नष्ट झाल्यावर आत्मा शिल्लकच रहातो व तो नवे शरीर धारण करतो. त्यामुळे या शरीराबद्दल चिंता ती काय करायची ? स्वतःला शरीर न मानता आत्मा मानून जन्माला येणाऱ्या व नाश पावणाऱ्या शरीराच्या स्थितीबद्दल विचार तो कसला करायचा ? असा विचार अज्ञानीच करतात. जे या शरीरालाच सर्वस्व समजतात, शरीर नष्ट झाल्याने सर्व नष्ट होते असे मानतात. ते अज्ञानी होय. परंतु ज्ञानी या शरीराच्या विनाशाने कधीच दुःखी होत नाहीत.




[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

देहस्तिष्ठतु कल्पान्तं गच्छत्वद्यैव वा पुनः ।
क्व वृद्धिः क्व च वा हानिस्तव चिन्मात्ररूपिणः ॥ १० ॥


अनुवाद - देह कल्पांतापर्यन्त टिको किंवा अगदी आताच नाश पावो, , तुझ्या चैतन्यरूपाची कुठे वृद्धि होते किंवा केव्हा नाश होतो !


विवेचन - मागील सूत्राच्या प्रतिपादनाच्या ओघातच स्वामी अष्टवक्र म्हणतात की, हा देह तर मरणधर्मी आहे. हा देह तर नष्ट होणारच आहे. हे शरीर मृत्यूपासून, नाशापासून वाचविण्याचा कोणताच उपाय नाही. रामाचा देहसुद्धा वाचू शकला नाही, कृष्णाचा देहसुद्धा वाचू शकला नाही, न संत महात्म्यांची शरीरे अमर झालीत न दुष्टात्म्यांची शरीरे अमर झालीत. न ज्ञानी माणसांचे देह टिकलेत न अज्ञानी माणसांचे देह टिकलेत. शरीराचा जन्म होणे, वाढ होणे व शेवटी क्षय होत होत मृत्यू होणे हा निसर्गाचा नियम असून त्याला अपवाद असा कुठेच नाही. हे ध्रुवाएवढे अढळ सत्य आहे की देह उशिरा किंवा लवकर पण नष्ट जरूर होणार. यात फरक पडत नाही. त्यामुळे तो काही चिंतनाचा विषय नाही. परंतु आत्मा मात्र चैतन्यरूप आहे व त्याची वाढ होत नाही, त्याचा क्षय होत नाही किंवा त्याचा मृत्यूही होत नाही. तो आहे तसाच राहणार. तू आत्मरूप असल्याने नित्य आहेस.




त्वय्यनन्तरमहाम्भोधौ विश्ववीचिः स्वभावतः ।
उदेतु वास्तमायातु न ते वृद्धिर्न वा क्षतिः ॥ ११ ॥


अनुवाद - तुझ्या विशाल व अन्तहीन (शेवट नसलेल्या) महासमुद्रात विश्वरूप तरंग आपल्या स्वभावानुसार निर्माण होतात व नाहीसे पावतात परंतु तुझी वृद्धी होत नाही किंवा नाश होत नाही.


विवेचन - अष्टवक्र महाराज सांगतात की ज्या प्रमाणे विशाल महासागरात वाऱ्याच्या झोतामुळे व स्वभावामुळे अनेक लाटा निर्माण होतात व नष्ट होतात पण तरीही त्यामुळे समुद्रात वाढ होत नाही किंवा घट होत नाही. ज्याप्रमाणे आकाशात अनेक प्रकारची वायूंची वादळे उठतात व शांत होतात पण त्यामुळे आकाशात फरक पडत नाही कारण आकाश अस्पर्शीत रहाते, त्याचप्रकारे तू आत्मारूपी महासमुद्र आहेस ज्यामधे हे विश्वरूपी तरंग निर्माण होतात व नष्ट होतात पण हा साक्षी आत्मा नेहमी अप्रभावित रहातो. जगाच्या वृद्धिमुळे वा नाशामुळे आत्म्याची वृद्धी किंवा नाश होत नाही.




तात चिन्मात्ररूपोऽसि न ते भिन्नमिदं जगत् ।
अतः कस्य कथं कुत्र हेयोपादेयकल्पना ॥ १२ ॥


अनुवाद - हे तात ! तू चैतन्यरूप आहेस, तुझे जग तुझ्यापेक्षा वेगळे नाही. म्हणून हिन (अनुपयुक्त) आणि उपयुक्त अशा कल्पना कुणाच्या, कुठे व कशासाठी ? (अशा कल्पना कधीही कुठेशी चैतन्यरूपी आत्म्याच्या नसतात)


विवेचन - ही संपूर्ण सृष्टी एकावयवी (एकच शरीर असलेली) आहे. ही सृष्टी संयुक्त आहे, सलग आहे, अखंड आहे, तिची वाटणी किंवा तुकडे होऊ शकत नाही. ही सृष्टी चक्र असली तर तिचा मधला आस एकच आहे. तिचे केंद्र एकच आहे. विहिरी अनेक असल्या तरी त्या सर्वात एकाच जलप्रवाहाचे पाणी आहे. पदार्थ अनेक आहेत परंतु त्या सर्वांचे मूलतत्त्व असणारी उर्जा एकच आहे. हे मूलतत्त्व प्रत्येक पदार्थात वेगळे भासते. याचप्रमाणे आत्मा एक आहे ज्याच्या आसाच्या आधारावर हे शरीरचक्र सुरू आहे. जो शरीरात आत्मा आहे तोच विश्वात विश्वात्मा आहे. आत्म्यामुळे हे शरीर तर विश्वात्मामुळे विश्व चालते. म्हणून आत्मा, परमात्मा, ब्रह्म, सृष्टी जीव, जगत, जड, चेतन हे वेगवेगळे नसून त्या एकाच तत्त्वाची अभिव्यक्ति आहे. ते एकच चैतन्य वेगवेगळ्या रूपात प्रकट झाले आहे. आपल्या अहंकारामुळे ही भिन्नता जाणवते. ह्या अहंकारामुळेच आपण काही गोष्टी अनुपयुक्त (हीन) ठरवतो अ काही उपयुक्त ठरवतो, काही स्वीकारयोग्य तर काही त्याज्य समजतो, एकाला संसार (जग) म्हणतो तर परमात्म्याला वेगळे मानतो. लाभ-हानी, नफा-नुकसान, जीवन व मृत्यू याप्रमाणे असंख्य द्वंदाची कल्पना करतो ती सुद्धा या अहंकारामुळे. हे द्वंदच दुःखाला कारणीभूत होते. ह्या अहंकारामुळेच वासनेचा उदय होतो तसेच ही वासना म्हणजेच आपले जग झाले आहे. म्हणून अष्टावक्र स्वामी, राजा जनकाला उद्देशून म्हणतात की तू चैतन्यरूप आत्मा आहेस व तू जो आत्मा आहेस त्याच आत्म्याची हे जग सुद्धा अभिव्यक्ति आहे म्हणजेच हे जग तुझ्यापेक्षा वेगळे नाही. हे जग तू आहेस म्हणजेच या जगात जे जे आहे ते ते तूच आहेस. मग ह्यात काय स्वीकारायचे व काय टाकायचे याचा विचार होऊच शकत नाही. जेंव्हा मनुष्य स्वतःला सृष्टीपेक्षा वेगळे समजतो तेव्हाच अशा भिन्नतेचा विचार करता येईल. आत्म्याचे ज्ञानाचा अनुभव घेतल्यावर स्वीकारयोग्य व त्याज्य अशा कल्पना व्यर्थच. कारण एकाच शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांपैकी कोणते स्वीकारणीय व कोणते अस्वीकारणीय म्हणायचे ? अशी कल्पना करणे म्हणजे मूढपणा आहे. अशी आत्मामय सृष्टी आहे. तिच्या वेगवेगळ्या अवयवांना चांगले किंवा वाईट म्हणणे उचित नाही. असा फरक करणे हे अज्ञानाचे व अहंकाराचे लक्षण आहे.




एकस्मिन्नव्यये शान्ते चिदाकाशेऽमले त्वयि ।
कुतो जन्म कुतः धर्मः कुतोऽहंकार एव च ॥ १३ ॥


अनुवाद - निर्मल, अविनाशी, शांत व चैतन्यरूप आकाशात कुठला जन्म कोणते कर्म व कसला अहंकार ? (हे सर्व काहीच नाही).


विवेचन - मुनीश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी पुन्हा सांगतात की आत्मा निर्मळ आहे, निर्दोष आहे. त्याच्यात दोष असा कोणताच नाही. तो शुद्ध आहे, अविनाशी आहे, शांत आहे. त्यात कोणतेही भावनिक आंदोलन, तरंग निर्माण होत नाही. तो चैतन्यरूप असून आकाशाप्रमाणे सर्वत्र आहे. तो सदैव अस्तित्वात आहे, त्याचा न जन्म आहे, न त्याचे कोणते कर्म आहे व न त्याला अहंकारासारखे कोणते भाव-विकार आहेत. हे जनक राजा ! तू आत्मा असल्याने तुझ्यात हे सर्व गुण आहेत. हे सारे विकार तर मन, शरीर व अहंकाराचे आहेत ज्यापासून तू भिन्न आहेस. स्वतःच्या आत्म-स्वरूपाचे ज्ञान झाल्यावर ह्या विकारांची जाणीव होत नाही.




यत्वं पश्यसि तत्रेकस्त्वमेव प्रतिभाससे ।
किं पृथक् भासते स्वर्णात्कटकांगदनूपुरम् ॥ १४ ॥


अनुवाद - जे पदार्थ तू पाहतोस त्यात तूच दृष्टोत्पत्तीस येतोस. बांगड्या, बाजूबंद व पैजणापेक्षा सोने वेगळे थोडेच दिसते ?


विवेचन - अष्टवक्र स्वामी म्हणतात की ज्याप्रमाणे वेगवेगळे दागिने हे केवळ वेगवेगळे आकार आहेत, उपयोग वेगवेगळा आहे परंतु त्या सर्वांची निर्मिती एकाच मूलतत्त्वापासून म्हणजे सोन्यापासून झाली आहे, सर्वात सोनेच आहे, त्याप्रमाणे सृष्टीच्या भिन्न भिन्न पदार्थात, अवयवांतील मूलतत्त्व एकच म्हणजे आत्माच आहे. दागिन्याच्या नांवारूपात फरक असला तरी त्यामुळे सोन्यात फरक पडत नाही, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पदार्थांचा आकार व नाव वेगवेगळे असले तरी त्यात आत्माच असतो व तो सर्वांत एकच असतो. जो वरपांगी भेद दिसतो तो शरीरांचा, बाह्य आकृतीचा आहे अन्यथा फूल असो वा काटे, मनुष्य असो वा पशुपक्षी सर्वात एकच मूलतत्त्व, एकच आत्मा आहे. तू आत्मा असल्यामुळे सर्व गोष्टीत तूच दिसतोस. ह्या सर्व बाह्य रूपाच्या आत असलेले जे अ-रूप तत्त्व आहे ते एकच आहे. बाह्याकार हे समुद्रातल्या क्षणभंगुर लाटांप्रमाणे आहेत. लाटा शांत झाल्यावर समुद्रच रहातो, हे जाणून परम शांती प्राप्त कर.




अयं सोऽहमयं नाहं विभागमिति संत्यज ।
सर्वमात्मेति निश्चित्य निःसंकल्पः सुखो भव ॥ १५ ॥


अनुवाद - 'हे मी आहे', 'हे मी नाही' अशी विभागणी करणे सोडून दे. सर्व काही आत्माच आहे असा निश्चय करून तू संकल्परहित हो, सुखी हो.


विवेचन - ही संपूर्ण सृष्टी एकच आहे, अखंड आहे व त्या एकाच आत्म्याचा विस्तार आहे. ज्ञात भिन्नता कोठेच नाही. नामरूपाच्या वेगळेपणामुळे अज्ञानी माणसाला वेगळेपण दिसते. तो सृष्टीला वेगवेगळ्या रूपात, आकारात, पदार्थात म्हणजेच तुकड्या-तुकड्यात पहातो. त्याला जड-चेतन, मनुष्य व इतर प्राणी यात, एवढेच नव्हे तर मनुष्यातही व्यक्ति व्यक्तित फरक दिसतो. जीव व आत्मा यातही त्याला भिन्नता दिसते पण हा भेदच सर्व दुःखाचे कारण असतो. सृष्टी ही एकच सत्ता असून तिची वेगवेगळ्या आकारात, नावारूपात विभागणी करणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. ही द्वैत दृष्टीच दुःखांना जन्म देते. सर्व सृष्टीत एकत्व दिसणे व समग्रत्वाचा बोध होणे हेच ज्ञान आहे व तोच धर्म आहे. समग्रता हेच जीवन आहे, तेच ब्रह्म आहे. ह्या एकीकृत अस्तित्वाची जाणीव जागृत होणे हाच धर्म आहे, हेच खरे शास्त्र आहे व तोच सर्व विज्ञानाचा बोध आहे. सृष्टीला तुकड्या-तुकड्यात वाटणे हे अधर्माचे व अज्ञानाचे लक्षण आहे. म्हणूनच धर्माने अशी घोषणा केली आहे की, 'अहंब्रह्मास्मि'. मी ब्रह्म आहे ही जाणीव अहंकार नसून त्या अखंड अस्तित्वरूपी चैतन्यरूपी समग्रतेचा अनुभव आहे. मी व ब्रह्म वेगवेगळे नाही, दोन जणांचे अस्तित्व नसून एकाचे अस्तित्व आहे हेच परम ज्ञान आहे. संसाराचा त्याग करून, राख फासून, भिक्षा मागून जेवल्याने, दण्डवत केल्याने, विनम्रता दाखविल्याने व क्षमा याचना केल्याने अहंकार नाहीसा होत नाही. एकत्वाची अनुभूती झाल्याशिवाय अहंकार नाहीसा होत नाही. धर्माचे सर्वात महत्त्वाचे व सर्वश्रेष्ठ ज्ञान हेच आहे. सर्वश्रेष्ठ उपदेश हाच आहे की आत्मा एक आहे, सर्व त्याचाच विस्तार आहे व सर्वत्र तोच व्यापून आहे. भिन्नत्वाची जाणीव त्यागून एकत्वाचा अनुभव घेणे व त्याप्रमाणे जगणे हाच मोक्ष, मुक्ति व ज्ञान आहे. म्हणून अष्टवक्र स्वामी सांगतात की हे जनक राजा, मी हे आहे व मी ते नाही अशी द्वैत-दृष्टी सोडून देऊन 'अहं ब्रह्मास्मि' मीच ते ब्रह्म आहे व सर्व जे जे आहे तेही मीच आहे, म्हणजेच ब्रह्म आहे अशी अनुभूती घेतल्यानेच दुःखाचे कारण दूर होते व एकत्वाच्या जाणीवेमुळे मनुष्य सुखी होतो. हे जाणून एकत्वाची, भ्रामक नामरूपाच्या विविध आकारात विभागणी करणे सोडून दे. कारण ही विभाजनवादी दृष्टीच सर्व दुःखांना जन्म देते. तेव्हा ह्या एकत्वाचा संकल्प करून, त्याची ठाम जाणीव करून घेऊन, अन्य सर्व संकल्प व इच्छांचा त्याग करून तू सुखी व शांत हो.




तवैवाज्ञानतो विश्वं त्वमेकः परमार्थतः ।
त्वत्तोऽन्यो नास्ति संसारी नासंसारी च कश्चन ॥ १६ ॥


अनुवाद - तुझ्या अज्ञानामुळेच हे जग आहे. परमार्थिक दृष्टीने तू एकच आहेस. तुझ्याशिवाय दुसरे कुणीच नाही - संसारी नाही व असंसारी ही नाहीत.


विवेचन - हेच प्रतिपादन विस्तारपूर्वक सांगत स्वामी अष्टवक्र महाराज म्हणतात की, स्वतःपेक्षा जगाचे अस्तित्व वेगळे जाणवणे हे तुझ्या अज्ञानामुळेच घडू शकते. जगाला जो स्वतःपेक्षा वेगळे पाहतो, त्यालाच 'तो' व 'जग' अशा दोन गोष्टी दिसू लागतात. पण एका आत्म्याचे हे दोन अविष्कार असले तरी आत्मरूपाने एकच आहेत हे न जाणणे म्हणजे अज्ञान आहे. त्यामुळे जगाचे अस्तित्व वेगळे भासते. अन्यथा जग व व्यक्ति मिळून एकच आत्मा आहे. जे व्यक्ति आहे तेच विश्व आहे. जे विश्व आहे तेच व्यक्ति आहे. त्याचप्रमाणे संसारी व असंसारी असा भेद सुद्धा खोटा आहे. संसारी आहे ते सुद्धा आत्म्याचे रूप आहे व असंसारी वाटते ते सुद्धा आत्म्याचे रूप आहे. हेच ज्ञान आहे व हेच परमसत्य आहे. सत्य एकच असते. सत्य कधीच दोन नसतात. सत्यासत्यात भेद वाटणे हे तर कमालीचे अज्ञान आहे. जे अभेद्य आहे त्याच्यामधे अहंकाराची भिंत उभी रहाते तेव्हाच भेद दिसू लागतो, व ही अहंकाराची भिंत पाडली म्हणजे अभेद्यता नजरेस येते. सर्व काही समग्रपणे लक्षात येते. हा आत्मा संसारी नाही व असंसारी नाही. कारण तो कोणत्याही अर्थाने संसार नाहीच. तो फक्त आत्मा आहे व सर्वत्र सर्वरूपात तोच आहे. तो संसार नाही कारण संसारसुद्धा त्याचीच अभिव्यक्ति आहे.




भ्रांतिमात्रमिदं विश्वं न किञ्चिदिती निश्चयी ।
निर्वासनः स्फुर्तिमात्रो न किञ्चिदिव शाम्यति ॥ १७ ॥


अनुवाद - हे विश्व म्हणजे फक्त भ्रांति आहे यापेक्षा वेगळे काही नाही. हे अन्तःकरणपूर्वक जाणणारा वासनारहित व चैतन्यरूप असतो. जणूकाही काहीही अस्तित्वातच नाही अशी सर्वश्रेष्ठ परम शांती त्याला प्राप्त होते.


विवेचन - ह्या संसारात दोन प्रकारच्या व्यक्ति आहेत. एक ज्ञानी व दुसरे अज्ञानी. ह्या दोघांचीही दोन प्रकारची विचारदृष्टि आहे. अज्ञानी म्हणतो की संसार हेच सत्य आहे. संसारात अनेकता आहे, विभिन्नता आहे. नैसर्गिक, राजकीय, मानसिक, शारिरिक, बौद्धिक, नैतिक, धार्मिक वगैरे अनेक स्तरावरचै भेद अज्ञानी माणसाला दिसतात. काहीजणांना तर आत्म्यामधेसुद्धा भिन्नता दिसू लागते व प्रत्येकाचा आत्मा वेगवेगळा आहे असेच ते मानतात. काही लोकांना परमात्म्यात सुद्धा भिन्न दिसू लागते व म्हणून ते हिंदू ख्रिश्चन, जैन असे भेद करतात. हे सर्व कमालीचे अज्ञान आहे. जसे या डोळ्यांना प्रत्यक्ष दिसते ते तसेच खरे असल्याचे ते मानतात. त्यापेक्षा वेगळे असणाऱ्या परोक्ष-सत्याचे ज्ञान त्याला नसते. त्याचे सारे ज्ञान इंद्रियजन्य असते व इंद्रियांचे अधिन असणारी बुद्धि जी नेहमी अहंकार व भेदांना जन्म देते तीच त्याची मार्गदर्शक असते. जे इंद्रियांना समजते, बुद्धिला समजते त्यालाच तो सत्य समजतो. इंद्रियांच्या पलिकडील बाबी त्याच्या आकलनात येत नाही. अज्ञानी माणूस ब्रह्म, आत्मा, ईश्वर यांचे अस्तित्वसुद्धा खरे मानत नाही कारण ते सुद्धा इंद्रियाद्वारे जाणून घेता येत नाहीत. अशी व्यक्ति वैज्ञानिक असते, भौतिक दृष्टीची असते. त्याला जे व जेवढे दिसते, ते व तेवढेच तो खरे मानतो. स्वतःला जे दिसते व स्वतःचा ज्यावर विश्वास आहे, ते व तसे सांगायला आत्मबलाची व हिमतीची गरज आहे. दुनियेतल्या सर्व धर्मांच्या लोकांचे सांगणे नाकारून व शिक्षा होईल हे माहित असूनही गॅलीलिओने सांगितले की सूर्य फिरत नसून पृथ्वीच सूर्याभोवती फिरते. हे सत्य एवढ्या छातीठोकपणे सांगण्यात खरोखरीच त्या काळी विलक्षण धैर्याची गरज होती. परंतु काही ढोंगी असे असतात की त्यांनी काहीही जाणलेले नसते, त्यांना कशाचाच अनुभव आलेला नसतो व ते लोकांना दक्षिणेच्या किंवा अन्य मोबदल्याच्या आशेने सांगतात की, ब्रह्म आहे, ईश्वर आहे, हे जग खोटे आहे, त्यात अर्थ नाही, ब्रह्म सत्य आहे, स्वर्ग-नरक आहे, पुनर्जन्म आहे वगैरे वगैरे. पण ज्याने सत्याची अनुभूती घेतलेली नाही त्याचे पांडित्य म्हणजे केवळ पोपटपंची असते. अज्ञानी माणसासाठी जग हे सत्य आणि ब्रह्म हे असत्य असते. अज्ञानी माणसाने तसेच सांगितले तर ते त्याचे केवळ अज्ञान आहे. पण ज्ञान झालेले नसतांना ज्ञान झाल्याचे सांगणे ही बेईमानी व ढोंग आहे. तो तर समाजाला धोका देण्याचा प्रकार आहे. ढोंगी ज्ञानी माणसापेक्षा सरळरित्या जे दिसते तेवढेच खरे मानणारा अज्ञानी माणूस चांगला.

दुसरी वैचारिक दृष्टी ज्ञानी माणसाची असते. ज्याने या सत्याचा खरोखरीच अनुभव घेतलेला असतो तोच ज्ञानी होय. त्याने ब्रह्म, आत्मा व परमात्मा यांचे ज्ञान संपादन केलेले असते. अज्ञानी माणूस फक्त स्थूल तेवढे जाणतो, सूक्ष्म त्याला समजत नाही. अज्ञानी माणूस प्रकृती तेवढी समजू शकतो. त्याची दृष्टी शरीर, भोग व विषयसुख या पुरतीच मर्यादित असते. त्यापलीकडे जे सूक्ष्म आहे, चेतन आहे, जी शक्ति आहे ती तो ओळखू शकत नाही व म्हणून त्या गोष्टी अस्तित्वात नाहीच असे तो म्हणू लागतो. या उलट ज्ञानी माणसाला सत्याचे व म्हणूनच आत्म्याच्या एकत्वाचे ज्ञान प्राप्त झालेले असते म्हणून तो ब्रह्म, आत्मा व ईश्वर यांना सत्य मानतो. त्याच्यासाठी जग खोटे आहे, भ्रांती आहे, अनित्य आहे म्हणून त्याच्या लेखी त्याचे काही मोल नाही. ज्ञानी माणसासाठी जे शाश्वत व सनातन आहे तेच मूल्यवान आहे. अज्ञानी फळाची व वृक्षाची चर्चा करतो पण ज्ञानी माणसू बीजाची चर्चा करतो. दोघेही आपापल्या दृष्टीप्रमाणे जग पाहतात. हा दोघांच्या वैचारिक दृष्टीतला फरक आहे. त्यात एकमेकांचा विरोध नाही.

अष्टवक्र महाराज व राजा जनक दोघेही ज्ञानी पुरुष आहेत. दोघांनाही सत्याची अनुभूती झालेली आहे. त्यामुळे दोघांचा संवाद हा ज्ञान-प्राप्त झालेल्या व्यक्तिचा संवाद आहे. एक ज्ञानी व दुसरा अज्ञानी असेल तर संवाद होण्याऐवजी विवादच व्हायचा. तर्क व प्रमाणांबद्दल परस्परांना विचारणा केली असती, कुतर्क व वितर्क करून आपलेच मत सत्य मानण्याचा एकमेकांना जोरदार आक्रमक आग्रह केला गेला असता; परंतु येथे तसे न घडता दोघांच्या मुखातून एकाच सत्याचे वर्णन केले जात आहे. मुनी श्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात की हे जग भ्रम आहे, यापेक्षा वेगळे काही नाही. जो वासनारहित होतो, जो वासनाशून्य होतो व अहंकार शून्य होतो त्याला त्याच्या अंतर्यामी स्थित असलेल्या आत्म्याचे ज्ञान होते. असे ज्ञान झाल्यावर त्याला हे जग भ्रामक वाटू लागते. याचा अर्थ असा नाही की जे जग आपल्या डोळ्याला दिसते ते खरेच अस्तित्वातच नाही. याचा खरा अर्थ एवढाच, की जे जग आपण डोळ्यांनी पहातो त्याच्याशी आपला जो भावनिक संबंध असतो, जी आसक्ति असते, जो मोह किंवा मायाममता असते तीं खोटी असते, ती भ्रम असते. ज्ञानी माणूस या आसक्ति मुक्त होतो. म्हणून त्याला जग हे भ्रम वाटते व आत्मा हेच एकमेव सत्य वाटते. ह्या ज्ञानाची प्राप्ती ज्ञानी माणसालाच होऊ शकते व त्याला मोह-माया-ममता ह्यातील निरर्थकपणा समजू शकतो. अज्ञानी ते समजू शकत नाही. म्हणून ज्ञानी ह्या साक्षात्कारामुळे परम शांती प्राप्त करतो तर अज्ञानी बुद्धि प्रामाण्यामुळे अंधारातच चाचपडत रहातो व सदैव अशांत रहातो. हाच ज्ञानी व अज्ञानी माणसातला फरक असतो. ज्ञानी माणसाची वैचारिक दृष्टि अज्ञानी माणसापेक्षा वेगळी होत जाते.




एक एव भवाम्भोधावासीदस्ति भविष्यति ।
न ते बन्धोडस्ति मोक्षो वा कृत्यकृत्यः सुखं चर ॥ १८ ॥


अनुवाद - संसाररूपी समुद्रात तू एकटाच होतास व एकटाच राहशील तुला बंधन नाही व मोक्ष नाही. तू कृतकृत्य होऊन सुखाने विहार कर.


विवेचन - बंधन म्हटले तर त्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते. एक ज्याला बांधले जाते, दोन- ज्याच्याने बांधले जाते व तीन म्हणजे बांधणारा. अज्ञानी जीवन बंधनात असतात. संसाराबद्दलचा त्यांचा मोह, त्यांची माया-ममता, त्यांची वासना हेच त्यांचे बंधनांचे कारण आहे. ह्या मोहामुळे अज्ञानवश होऊन स्वतःच स्वतःला माणूस बंधून घेतो. त्याला बांधणारा दुसरा कुणी नाही. जग कुणालाही कधी बांधत नाही. परंतु ज्ञान-प्राप्ती नंतर ज्ञानी माणसाची दृष्टी बदलून जाते. तो त्याच्यापेक्षा भिन्न असणाऱ्या व शरीर, मन, अहंकार यांच्याशी निरपेक्ष असणाऱ्या चैतन्यरूपी आत्म्याचे ज्ञान करून घेतो त्यामुळे त्याच्या दृष्टीत सृष्टी व आत्मा यांच्यातला भेद नाहीसा होतो. अज्ञानाचा पडदा दूर झाल्यावर तेच एक चैतन्य तेवढे उरते. जेंव्हा सर्व काही एकच आहे तेंव्हा बंधनही उरत नाही व मोक्षही उरत नाही. सर्व काही एकच असल्यावर कोण कुणाला बांधणार व कशाने बांधणार ? म्हणून स्वामी अष्टवक्र महाराज म्हणतात की सर्व काही मिळून एकच आहे व हे राजा जे एक आहे ते आत्मा आहे व ते तूच आहेस. आधी सुद्धा तू एकटाच होता व पुढेसुद्धा तू एकटाच रहाणार आहेस. अज्ञानामुळे व देहाच्या मायेमुळे तू स्वतःला चैतन्य आत्म्यापेक्षा वेगळा समजत होतास, शरीर समजत होतास व तेच तुझे बंधन होते. आता ना तर बंधन आहे ना तर मोक्ष आहे. तू आता कृतकृत्य हो व सुखाने कालक्रमण कर. आत्मा स्वभावानेच मुक्त आहे. त्याचे कोणतेच बंधन नाही. जो भ्रम होता तो द्वैताचा भ्रम नाहीसा झाला आहे.




मा संकल्पविकल्पाभ्यां चित्तं क्षोभय चिन्मय ।
उपशाम्य सुखं तिष्ठ स्वात्मन्यानन्दविग्रहे ॥ १९ ॥


अनुवाद - हे चिन्मय ! तू मनाला संकल्प व विकल्पांनी क्षोभित करू नकोस. शांत होऊन आपल्या आनंदपूर्ण स्वरूपात सुखाने रहा.


विवेचन - संकल्प व विकल्पात अडकणे, रमणे हा माणसाचा स्वभावच आहे. जेंव्हा मनात वेगवेगळ्या इच्छा निर्माण होतात तेंव्हा मन त्यामुळे क्षोभित होते, आंदोलित होते. ह्या क्षोभांचे नांव, ह्या तरंगांचे नांव मन आहे. संकल्प व विकल्पामुळे विचार निर्माण होतात व त्यांच्या परिपूर्तिसाठी शरीर व इंद्रिये सक्रीय होतात व त्यामुळे कर्म घडून येते. अहंकारामुळे मनुष्य कर्तेपण स्विकारतो व त्यामुळे तो स्वतःच कर्म-बंधनात अडकतो. कर्मामुळे नवे संस्कार जन्माला येतात. या प्रमाणे कर्माचे व कर्म बंधनाचे जाळेच तयार होते. हे कर्माचे जाळे म्हणजेच संसार आहे व तेच बंधन आहे. म्हणून अष्टवक्र स्वामी म्हणतात की तू चैतन्यरूपी आत्मा आहेस. तुझे कोणतेच बंधन नाही व कोणताच मोक्ष नाही, तू 'एक' आहेस व शांत आहेस. म्हणून आता तू पुन्हा नव्याने कोणत्याही संकल्प-विकल्पांनी मन क्षुब्ध करू नकोस अन्यथा पुन्हा कर्म-बंधनात अडकशील. हा आत्मा हेच तुझे सत्य स्वरूप आहे व ते तुला प्राप्त झाले आहे. आता त्यातच विलिन होऊन सुखाने कालक्रमण कर.




त्यजैव ध्यानं सर्वत्र मा किंचिद्‌हृदि धारय ।
आत्मा त्वं मुक्त एवासि किं विमृश्य करिष्यसि ॥ २० ॥


अनुवाद - ध्यानधारणा, या सर्वांचा त्याग करून आता हदयात कशालाही जागा देऊ नकोस. तू आत्मा असल्याने मुक्त आहेस, तू आता विचार करून काय मिळविणार ?


विवेचन - अष्टवक्र स्वामी पुढे सांगतात की ध्यान, धारणा, समाधी हे सर्व अज्ञानी माणसांकरिता असतात. ती सर्व ज्ञानप्राप्तीची साधने आहेत. तुला तर सर्वश्रेष्ठ व अंतिमज्ञानाची प्राप्ती झाली आहे. म्हणून ह्या ध्यान व धारणादि पद्धतींचा तू त्याग कर. साध्य वस्तू प्राप्त होईस्तवर साधनांचा उपयोग असतो. त्यानंतर त्यांचे ओझे वाटणे व्यर्थ आहे. नांवेमधून नदी पार केल्यावर नावेचा काहीच उपयोग नसतो. तिला किनाऱ्यावरच सोडून द्यावी लागते. त्याचप्रकारे आत्मज्ञान प्राप्तीसाठी जी साधने वा पद्धती आहेत, त्या सर्व उपलब्धि नंतर सोडून दिल्या पाहिजेत, अन्यथा ही साधनेच बंधन होऊन बसतील. म्हणून स्वामी अष्टवक्र म्हणतात की आता तू हृदयात अन्य कोणत्याही गोष्टीला धारण करू नकोस. तू आता आत्मस्वरूप झाला आहेस व म्हणून सदैव मुक्त आहेस. आता तू विचार करून काय मिळविणार ? जेंव्हा लक्ष दुसरीकडे जातच नाही, चित्तशून्य अवस्था येते तेव्हा तीच निर्विकल्प समाधी आहे. तीच आत्म्याची व परमात्म्याची अनुभूती आहे.




GO TOP