अष्टावक्रगीता

प्रकरण १० वे

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

तृष्णा हेच बन्धन आहे व वैराग्य-पूर्वक तृष्णा-त्याग हीच मुक्ति आहे.

विहाय वैरिणं काममर्थं चानर्थसंकुलम् ।
धर्ममप्येतयोर्हेतुं सर्वत्रानादरं कुरु ॥ १ ॥


अनुवाद - अष्टवक्र मुनी प्रतिपादन करतात की - वैरस्वरूपात असणारा 'काम' व अनथनि भरलेला 'अर्थ' ह्या दोघांचा तू त्याग कर आणि ह्या दोघांचे कारण असणार्‍या धर्माचा सुद्धा तू त्याग करून सर्वांची उपेक्षा कर.


विवेचन - या आधीच्या प्रकरणात मुनीश्रेष्ठ अष्टवक्रांनी सांगितले की हा संसार सुख-दुःखाच्या द्वंद्वाने भरलेला आहे, त्यात शांती नाही. म्हणून ह्या जगाची उपेक्षा केल्यानेच शांति मिळू शकते. ह्या जगाची उपेक्षा करण्यासाठी वासनेचा त्याग करणे हाच उपाय आहे. या प्रकरणात अष्टवक्र सांगतात की 'काम' सुद्धा व्यक्तीचा शत्रू आहे. जेथे काम म्हणजे कामना म्हणजे इच्छा आहे तीथे संसार (जग) आहेच. तसेच सार्‍या अनर्थाचे दुसरे मूळ म्हणजे अर्थ (पैसा) होय. ह्या दोघांची उपेक्षा केल्याने मोक्षाचा मार्ग रूंद होतो. अष्टवक्र मुनी काम व अर्थ ह्यांचा त्याग करतांना त्यांची उपेक्षा करण्याचा सल्ला देतात कारण ते प्रशंसनीय नाहीत किंवा निंदनीय सुद्धा नाहीत तर केवळ उपेक्षा करण्यायोग्य आहे. आत्म-ज्ञानी पुरूषाने त्यांचे प्रशंसेचा व निंदेचा मार्ग अवलंबू नये कारण प्रशंसा व निंदा ह्या दोन्हीतही काहीतरी, कोणत्यातरी स्वरूपाची कामना (इच्छा आहे) व तीच वैरस्वरूप आहे. त्याच बरोबर मुनीश्रेष्ठ अष्टवक्र 'रूप-धर्माची' सुद्धा उपेक्षा करण्यास सांगतात. शास्त्रामधे धर्म, अर्थ, काम व मोक्ष ह्या चारी बाबींना महत्त्व दिले असून ते चार पुरूषार्थ असल्याचे सांगीतले आहे. प्रापंचिक व्यक्तिला पहिल्या तीन बाबींची साधना करतच मोक्षाकडे जायला हवे कारण 'जीवा' ची अंतिम स्थिती मोक्षच आहे. परंतु केवळ धर्म अर्थ व काम ह्या तीन बाबींतच गुरफटून राहून मोक्षाला पूर्णपणे विसरून जाणे म्हणजे भोगवादी दृष्टी आहे. शिवाय मोक्षाकडे जाण्यासाठीच पहिल्या तीन बाबींचा उपयोग करावयाचा असतो हेही लक्षात घ्यावे. पण अष्टवक्र मुनी मोक्षप्राप्तीचा रस्ता राजा जनकाला समजावून सांगतांना ह्या पहिल्या तिघांच्या उपभोगात रममाण झालेल्यांनी त्यांचा त्याग करावा व मोक्षाची इच्छा धरावी असा उपदेश करतात. कारण भोगवादी दृष्टीने त्यात अडकणे असा धर्म हा खरा धर्मच नाही व तो सुद्धा बंधनाचे कारण होतो. ते तिघे केवळ साधन किंवा हत्यारस्वरूपातच उपयोगी आहेत. त्याचे रूपांतर बंधनात होऊ नये म्हणून मंव्हाच त्या परम-मुक्तिचा श्रेष्ठ आनंद मिळू शकतो.
स्वप्नेन्द्रजालवत्पश्य दिनानि त्रीणि पञ्च वा ।
मित्रक्षेत्रधनागारदारादायादिसम्पदः ॥ २ ॥


अनुवाद - मित्र, शेती, धन, घर, पत्नी, भाऊ ह्या सर्व प्रकारच्या सम्पत्तीला सुद्धा तू स्वप्नमय व मृगजळच मान कारण त्या सर्व क्षणिक असल्याने चार किंवा तीनच दिवस टिकणार्‍या आहेत.


विवेचन - भारतीय धर्म निवृत्तीमार्गी किंवा जगाच्या विरोधात कधीच नव्हता. भारतीय हिंदू धमनि संसार खोटा आहे, नरक आहे, माया आहे, त्यात दुखच दुःख आहे, ह्यात सुख नाहीच असे कधीच सांगितले नाही. हे सर्व म्हणजे मित्र, धर्मपत्नी, पुत्र-भाऊ, घरदार, शेती हे नरकात नेणारे आहेत. व त्यांचा त्याग करून हिमालयात गुहांत जाऊन बैस कधीच सांगितले नाही. हे सर्व सोडून जंगलात जा किंवा हिमालयात जाऊन तपश्चर्या कर असेही सांगितलेले नाही. हे सर्व बंधन आहेत व त्यांचा त्याग केल्याने मुक्ति मिळेल असेही सांगितलेले नाही. त्या स्वरूपाच्या कल्पना म्हणजे मूर्खांचा कल्पना विलास आहे. अज्ञानी माणसांद्वारेच अशा समजूती पसरतात. धर्म तर या जगाला मोक्ष-प्राप्तीचे सर्वात मोठे साधन असल्याचे मानते. जगात राहूनच सर्व कर्म करावे असे धर्म सांगतो व जगात संन्यास घेण्याची हौस मर्यादित रहावी म्हणून तर या जगात राहूनच मोक्ष-प्राप्तीचा रस्ता चोखाळायचा आहे, ह्यासाठीच जर देव-देवता सुद्धा मोक्ष-प्राप्ती मिळविण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेण्यास उत्सुक असतात. हे जग म्हणजे अनुभव प्राप्ती द्वारा मुक्तिची उपासना करण्याची शाळा आहे. परंतु या जगात येऊन भोगवादी दृष्टीने जगणे तर अधः पतन आहे. म्हणून निंदा जगाची केलेली नसून दोष दिला आहे तो या जगाप्रती असणार्‍या वासना, इच्छा व अपेक्षांना होय. आणि ह्याचे मुख्य कारण म्हणजे हे विश्व व त्याचा उपभोग, त्यातील नाते-संबंध सारेच क्षणिक आहेत, अनित्य व फार अल्पकाळ टिकणारे आहे. भारतीय अध्यात्माने क्षणिक व अल्पजिवी बाबीपेक्षा नित्य व शाश्वत गोष्टींना जास्त महत्त्व दिले आहे. जे भूत, वर्तमान, व भविष्य ह्या तीन्ही काळात टिकून राहील त्या शाश्वतालाच भारतीय धमनि सत्य म्हणून मान्यता दिली आहे. जे क्षणाक्षणाला बदलते ते सत्य असू शकत नाही. ह्याच कारणानी मुनीश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात की, जसे स्वप्नात सर्व काही सत्य वाटत असते पण जाग येताच एका क्षणात ते अदृश्य होते किंवा इन्हजालात अनेक बाबींचा भ्रम होतो, त्याचप्रमाणे हे जग स्वप्नमय किंवा भ्रामक इन्द्रजाल आहे असेच मोक्षाची इच्छा करणार्‍या व्यक्तिने मानले पाहिजे. कारण हे मित्र, शेती, धन, घर, भाऊ, नातेवाईक धर्मपत्नी हे फारच अल्पकाळासाठी सत्य आहेत. ते काही शाश्वत नाहीत व सदैव तुमच्याबरोबर राहू शकणार नाहीत. मृत्यूनंतर सर्व काही स्वप्नाप्रमाणे क्षणार्धात बदलून जाईल. पुढील जन्मात पुन्हा नवे नाते संबंध असतील, नवीन नातेवाईक मिळतील. या प्रमाणे अनेक जन्मात नाती तयार होतील व नष्ट होतील. कायमस्वरूपी सदैव साथ कुणीच देऊ शकणार नाही. हे सर्व तीन किंवा पाच दिवस टिकणारे स्वप्न आहे. म्हणून क्षणभंगूर आहे. म्हणून मोक्ष प्राप्तीसाठी ज्ञानी माणसाने त्यांची उपेक्षाच करणे योग्य आहे. या सर्वांना सोडून पळून जाण्याची मूर्ख गोष्ट अष्टवक्र सांगत नाही हे लक्षात घ्यावे. ते म्हणतात की जे अशाश्वत आहे, ते असत्य असल्याचा बोध होणे पुरेसे आहे. ह्या बोधामुळे आत्मक्रांती होऊन पूर्ण परिवर्तन होईल. बोध झालेला नसतांना जग सोडून जंगलात पळण्याला काही अर्थ नाही. अष्टवक्र मुनींच्या उपदेशाचे सार म्हणजे सर्वात जास्त महत्त्वपूर्ण बोध होय.
यत्र यत्र भवेत्तृष्णा संसारं विद्धि तत्र वै ।
प्रौढवैराग्यमाश्रित्य वीततृष्णः सुखी भवः ॥ ३ ॥


अनुवाद - 'जिथे जिथे आसक्ति आहे, तृष्णा आहे, तिथे तिथे संसार आहे हे ओळख व परिपक्व वैराग्याने तृष्णा विरहीत होऊन सुखी हो'


विवेचन - मुनीश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात की मनुष्य आपले बंधन होणारे संसाराचे जाळे स्वतःच निर्माण करतो. मनुष्याची हाव, आसक्ति, तृष्णा हाच त्याचा संसार आहे. ईश्वराने मनुष्याला खूप काही दिले, हे अमूल्य व बहुउपयोगी शरीर दिले व सर्वश्रेष्ठ अमूल्य असा आत्मा दिला. परंतु तरीसुद्धा ह्या हांव व तृष्णेमुळे एखाद्या भिकार्‍या सारखा वेगवेगळ्या वस्तूंच्या प्राप्तीसाठी मनुष्य सतत पळापळ करत असतो व या संसारी वस्तूच्या प्राप्तीसाठी आंधळ्या शर्यतीत भाग घेऊन स्वतःला कायमचे दुःखी करतो. ही सततची हांव, तृष्णा कधीच शांत होत नाही, कधीच तृप्ती होत नाही, त्यामुळे तो या जगात सतत सुखदुःखाच्या फेर्‍यात सापडतो. अष्टवक्र म्हणतात की जिथे जिथे हे हवे, ते हवे अशी तृष्णा आहे तिथे तिथे संसाराचे जाळे आहे हे ओळख. जर मनुष्याची तृष्णा, हाव शांत झाली, जर तो तृप्र झाला तरच तो सुखी होऊ शकतो. ह्यालाच तृष्णाविरहित होणे, वित-तृष्णा होणे असे म्हणतात. ही वित-तृष्णा प्राप्त होण्यासाठी परिपक्र वैराग्याची उपासना केल्यानेच मनुष्य सुखी होऊ शकतो.
तृष्णामात्रात्मको बन्धस्तन्नाशो मोक्ष उच्यते ।
भवासंसक्तिमात्रेण प्राप्तितुष्टिर्मुहुर्मुहुः ॥ ४ ॥


अनुवाद - तृष्णा हीच आत्म्याचे बंधन आहे. तृष्णेचा नाश हाच मोक्ष आहे. संसाराप्रती अनासक्त होणे हाच तृप्तीचा व शाश्वत प्राप्तीचा उपाय आहे.


विवेचन - अष्टवक्र मुनी पुन्हा आग्रहाने सांगतात की ही तृष्णाच आत्म्याचे बंधन आहे. अन्यथा या जगात दुसरे कोणतेच बंधन नाही. हा संसार, हे जग, नातेसंबंध, देहाभिमान, धनसंपत्ती ही सर्व बंधने होतात कारण त्या सर्वांशी आपल्या इच्छा-अपेक्षा जोडलेल्या आहेत. ह्या सर्व क्षणिक सुखाची अधिकाधिक अपेक्षा मनात असते. ते जास्तीत जास्त प्राप्त करण्याची धडपड असते. ह्याच्या मुळाशी तृष्णाच आहे. जर तृष्णेचा नाश झाला तर तीच मुक्ति आहे. मुक्तिसाठी अजून वेगळे नाही करावे लागत नाही. अष्टवक्र ह्या तृष्णा नाशाचा उपाय सांगण्यासाठी उपाय सांगतात तो अनासक्त होण्याचा होय. आसक्ति सोडल्यानेच तृष्णा मिटू शकते. वस्तूच्या प्राप्तीत तृप्ती कधीच मिळत नाही. तृष्णेच्या नाशाने कायम स्वरूपी टिकणार्‍या शाश्वत ज्ञानाची प्राप्ती व तृप्ती होते. या जगात जे सर्वश्रेष्ठ आहे त्याचे ज्ञान होऊ लागते ते तृष्णा संपल्यानंतरच. सर्व काही प्राप्त करूनही तृष्णा असेल तर पुन्हा रिक्ततेची भावना निर्माण होते. अनासक्त होण्याचा अर्थ आहे, न आसक्ति, न विरक्ति, न ग्रहण, न त्याग, कशाचीही इच्छा न करणे, जे प्राप्त झाले त्यावर संतुष्ट रहाणे, जगाप्रती उपेक्षा ठेवणे म्हणजे अनासक्त होणे होय.
त्वमेकश्चेतनः शुद्धो जडं विश्वमसत्तथा ।
अविद्यापि न किञ्चित्सा का बुभुत्सा तथापि ते ॥ ५ ॥


अनुवाद - तू एक शुद्ध चैतन्य आहे, संसार जड व असत्य आहे. अविद्या सुद्धा असत्य आहे. हे जाणल्यानंतर ह्यापेक्षा अजून काय जाणून घेण्याची तुझी इच्छा आहे ?


विवेचन - ब्रह्म म्हणजेच आत्मा व तो एकच आहे, चैतन्य स्वरूप आहे, शाश्वत आहे व म्हणूनच तो सत्य आहे. ही सृष्टी त्याचीच केवळ एक, अभिव्यक्ति आहे, त्याचाच विस्तार आहे, त्याचेच व्यापक रूप आहे. परंतु हा संसार जड आहे, अनित्य आहे. तो तर क्षणाक्षणाला बदलत असतो. संसार एखाद्या नदीच्या प्रवाहासारखा आहे, तो सतत वाहता आहे, या उलट चैतन्य स्थिर आहे पण संसार गतीमान व चंचल आहे. ह्या जगात दोन प्रकारची शक्ति आहे - एक विद्या व दुसरी अविद्या. ही विद्या अमृततत्वाकडे नेणारी तर अविद्या क्षणिक संसाराकडे नेणारी आहे. विद्या शक्तिच्या प्रभावाने जीव अमृतत्वाच्या जवळ सरकतात तर अविद्येच्या प्रभावाने त्यापासून दूर जातात. मानवाचे मलिन अंतःकरण बहुमुखी वासनेच्या प्रेरणेमुळे भोग मार्गावर खेचले जाते ते या अविद्येच्याच प्रभावामुळे या अविद्येमुळेच ते बन्धनात सापडते. या उलट माणसाच्या हृदयात सत्य, प्रेम, पावित्र्य, सज्जनवृत्ती, त्याग, वैराग्य, करूणा, दया हे भाव आहेत ते विद्येमुळे. ही विद्याच अमृततत्व आहे. अष्टवक्र मुनी राजा जनकाला हेच सांगतात की तू शुद्धचैतन्यच आहेस, आत्मस्वरूप आहेस म्हणून तू नित्य आहेस, शाश्वत आहेस या उलट हे जग जड आहे व असत्य आहे. ते नष्टप्राय आहे. या संसारामुळे निर्माण झालेली, संसाराकरिता निर्माण झालेली अविद्यासुद्धा असत्य आहे. हे ज्ञान प्राप्त झाल्यावर या असत्य व नश्वर बाबींपासून कोणते ज्ञान मिळण्याची तू इच्छा बाळगतोस ? आता तुझ्यासाठी जाणून घेण्याचे काहीही बाकी उरलेले नाही. तुला पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली आहे.
राज्यं सुताः कलत्राणि शरीराणि सुखानि च ।
संसक्तस्यापि नष्टानि तव जन्मनि जन्मनि ॥ ६ ॥


अनुवाद - ज्या मुला मुलींची, शरीराची, सुखाची व राज्याची तुला आसक्ति होती ते सर्व तर प्रत्येक जन्मात नष्ट झाले आहे. ( तुझ्या प्रत्येक जन्मात तुला मोह असलेली सुखे प्रत्येक जन्मात नष्ट झाली आहेत.)


विवेचन - मनुष्याचा जन्म होतो, तो मोठा होतो, शिकतो, नोकरी करतो, पैसा कमावतो, विवाह करतो, मुलांना जन्म देतो, घर-गृहस्थी व संसाराच्या जबाबदार्‍या पार पाडतो. या सर्व कार्याशी त्याची आसक्ति व मोह जोडलेला असतो कारण या सर्व गोष्टी ( मुले, घर वगैर) तो त्याच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत असे मानत असतो. या सर्व बाबींपासून त्याच्या अनेक अपेक्षा असतात. त्याच्या सुखाच्या कल्पना त्याच्याशी जोडलेल्या असतात. परंतु ज्या या बाबींशी तो एवढा जोडलेला असतो त्या सर्व बाबी त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याच्यापासून दूर होतात, नष्ट होतात. हे असे प्रत्येक जन्मात सुरू आहे. कायमचे असे त्याच्याजवळ काहीच टिकत नाही. पुन्हा नविन जन्म व पुन्हा नवीन जन्मात सर्व गोष्टी तो नव्याने करतो. परंतु अज्ञानामुळे तो हे समजू शकत नाही की या गोष्टींच्या आसक्तिचा त्याग करणे हेच ज्ञान आहे. मुनीश्रेष्ठ अष्टवक्र राजा जनकाला हाच उपदेश करीत आहेत की, तुझे अनेक जन्म झाले; प्रत्येक जन्मात तुला मुले, शरीर, राज्य व अन्य सुखे प्राप्त झालीत. या सर्वांबद्दल तुला आसक्ति असूनसुद्धा ते सारे नष्ट झाले. हे सर्वथा कायमस्वरूपी तुझे झालेच नाही म्हणून तुझी आसक्ति निरर्थक आहे. या आसक्तिमुळेच तुला वारंवार जन्म घ्यावा लागतो. या आसक्तिमुळेच त्यांच्यापासून दूर होण्याच्या विचाराने मन दुःखी होते अन्यथा या आसक्तिशिवाय दुखः होण्याचे दुसरे कोणतेच कारण नाही. म्हणून या पूर्वजन्माच्या अनुभवापासून तू बोध प्राप्त कर. आता तू या आसक्तिच्या त्याग कर जिच्यामुळे तुला पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची वेळ येते व पुन्हा पुन्हा दुःख भोगावे लागते तिच्यापासून मुक्त होण्यासाठी तिचा त्याग कर.
अलमर्थेन कामेन सुकृतेनापि कर्मणा ।
एभ्यः संसारकान्तारे न विश्रान्तमभून्मनः ॥ ७ ॥


अनुवाद - धनसंपत्ती (अर्थ), काम (इच्छा व आकांक्षा) आणि सत् कृत्ये (सुकृत) पुष्कळ झालीत. तरीसुद्धा ह्या संसाररूपी जंगलात मनाला शांतता व स्वस्थता लाभली नाही.


विवेचन - अष्टवक्र स्वामी, राजा जनकाला पुन्हा उपदेश करतात की धनसंपत्ती पुष्कळ कमावली, कामप्रेरीत कार्ये पुष्कळ झालीत आणि अनेक चांगली कामेसुद्धा केलीत व अजूनही हेच सर्व करणे सुरू आहे तरीसुद्धा या संसाराच्या जंगलात तू अतृप्त राहून भटकतो आहेस, तुला विश्रांती मिळत नाही. जर ह्या वस्तूत व कृत्यात सुख असते जर या वस्तूंमुळे आनंद मिळत असता तर तुला त्यांचेपासून सुखसमाधान प्राप्त झाले असते. जर या कामांमुळे तुझ्या दुःखांचा नाश झाला असता तर त्यांच्यापासून तुला नक्कीच शान्ति व आनंद प्राप्त झाला असता. पण तसे झाले नाही कारण त्यांच्यापासून सुख मिळू शकत नाही. तू सम झाल्याने सुखाच्या अपेक्षेने ह्या वस्तू व कृत्ये यांना उराशी कवटाळत आलास. आता या भ्रमाचा व अज्ञानाचा त्याग कर !
कृतं न कति जन्मानि कायेन मनसा गिरा ।
दुःखमायासदं कर्म तदद्याप्युपरम्यताम् ॥ ८ ॥


अनुवाद - शरीराने, मनाने व वाणीने तू काय अनेक जन्म दुखदायी व कष्टदायी कामे केली नाहीस ? आता तरी विश्रांती घे.


विवेचन - अष्टवक्र स्वामी जनकाला उपदेश करतात की वरपांगी सुखदायी वाटणारी ही कामे तू अनेक जन्मात केली आहेस. त्यामुळे सुख प्राप्तीच्या ऐवजी दुःख व कष्टच निर्माण झालेत व तू थकून गेलास. कारण तुझी या सर्व कामाबद्दल व माणसे, वस्तू यांचेबद्दल जी आसक्ति आहे ती तुझ्याकडून ही दुःखाला कारणीभूत होणारी कामे करून घेते व या कष्टांमुळे तू थकून गेलास. कारण जन्म-मृत्यूचे तुझे फेरे या आसक्तिमुळे सतत सुरू आहेत. आता तुला खरे सुख व मानसिक शांतता हवी असेल तर आता तरी तिचा त्याग कर.
GO TOP