|
अष्टावक्रगीताप्रकरण ११स्वतःचे चैतन्यस्वरूप ओळखणे हीच मुक्ति आहे.
भावाभावविकारश्च स्वभावादिति निश्चयी । अनुवाद - भाव आणि अभाव यांची जाणीव (विकार) ही आपल्या स्वभावावर अवलंबून असते, हे जो मनःपूर्वक जाणतो तोच पुरूष निर्विकार व क्लेरहित होऊन शांती प्राप्त करतो. विवेचन - विज्ञानाचा सारा प्रवास व शोध हा जड प्रकृतीशी संबंधित आहे. विज्ञान हे जड पदार्थांनाच अंतीम स्वरूप मानते. ह्या जड पदार्थाचे विश्लेषण करत व त्याचा अभ्यास करत मनुष्य विद्युत्शक्ति प्रत्येक पोहोचला. हे विद्युत् शक्तिचेच चैतन्य विज्ञानाला माहित आहे कारण ही विद्युत् पदार्थातून निर्माण होते व पदार्थालाच विज्ञान मूलतत्त्व मानते. परंतु अध्यात्म या पदार्थ व पदार्थजन्य विद्युतशक्तिच्या पलिकडल्या एका चैतन्याशी संबंधित आहे व अध्यात्माच्या दृष्टीने पदार्थ जसे जड आहेत तशीच विद्युत् जड आहे, पण पदार्थ व विद्युत हे त्या पलीकडच्या सर्वश्रेष्ठ चैतन्याचीच रूपे आहेत. ही संपूर्ण दृष्टी ह्या शक्तिचाच पसारा आहे, तिचीच ही नाना, अगणित, असंख्य रूपे आहेत. ह्या सार्या जगाचे सर्व व्यवहार, कार्ये त्या परम् चैतन्यामुळे होत असतात. ते परम चैतन्य, आत्मा आहे पण ते कर्ता नाही. ते निर्विकार व शुद्ध आहे. परंतु त्याचे अस्तित्व जरुरीचे आहे. कारण त्या चेतन्याच्या अभावात 'शिव' सुद्धा 'शव' म्हणजे प्रेत होते. मनुष्याचे जीवंतपण हरवून तो मृत होतो. सृष्टीत जिथे जिथे गति आहे, विकास आहे, प्रवाह आहे, सातत्य आहे ते सर्व या आत्म्याचे, चैतन्यस्वरूप आत्म्याचे प्रभावामुळे व अस्तित्वामुळे आहे. ज्याप्रमाणे चंद्राच्या आकाशातल्या केवळ अस्तित्वामुळेच समुद्रात भरती ओहोटीचे वादळ निर्माण होते, ज्या प्रकारे लोहचुंबक केवळ आपल्या उपस्थितीनेच लोखंडाला आपल्याकडे आकर्षित करतो, त्याचप्रमाणे केवळ आपल्या हजेरीने, उपस्थितीने चैतन्यसत्ता प्रकृतीला कार्य करण्यास सहाय्यभूत होते. त्या कार्याचा प्राण चैतन्य सत्ता असते पण स्वतः चैतन्यमात्र अकर्ता आहे. हा आत्मा नित्य आहे. चैतन्यमय आहे. आत्मा निर्विकार आहे व प्रकृती विकारशील आहे. अष्टवक्र स्वामी प्रतिपादन करतात की भाव व अभाव हे विकार, सर्व या प्रकृतीमुळे निर्माण होतात कारण प्रकृतीचा स्वभाव विकारशील आहे. अग्नीचा स्वभाव जाळणे आहे, पाण्याचा स्वभाव थंड करणे आहे, गुरूत्वकर्षणाचा स्वभाव ओढणे आहे, विजेचा स्वभाव प्रकाश व चुंबकत्व आहे, याचप्रमाणे सर्व पदार्थ आपापल्या स्वभावानुसार कार्य करीत असतात. 'बी' पासून विशाल वृक्ष तयार होण्याची क्रिया सुद्धा प्रकृतीमुळे निर्माण झाली आहे. संपूर्ण सृष्टीच्या कार्याचे संचलन प्रकृतीजन्य आहे. त्या परमचैतन्याच्या उपस्थितीमुळे सर्व होते. तो स्वतः काही करत नाही. ह्याचप्रमाणे ज्या व्यक्तिला आत्मज्ञान होते तो आपल्या प्रकृतीजन्य विकारांपासून व कार्यांपासून मुक्त होतो. चैतन्यरूपी आत्म्यालाच अंतीम सत्ता मानून निर्विकार व क्लेशरहित होऊन सुख व शांती प्राप्त करतो. आत्मज्ञानानंतरच अशी शांती प्राप्त होते. त्याच्या आधी केवळ तसे मानून समजूत करून घेतल्याने होत नाही. समजूतीमुळे भ्रम किंवा अज्ञान दूर होत नाही. फक्त ज्ञान-बोधामुळेच भ्रम दूर होतो. म्हणून त्यासाठी कोणतेही प्रयत्न किंवा परिश्रम करावे लागत नाही.
ईश्वरः सर्वनिर्माता नेहान्य इति निश्चयी । अनुवाद - सर्व सृष्टीचा निर्माता परमेश्वरच आहे, अन्य कुणी नाही हे ज्याला उमजते तोच पुरुष शांत होतो. अशा पुरुषाच्या जड पदार्थाबद्दलच्या आशा अपेक्षा नाहीशा होतात. तो कशाच्याच मोहात अडकत नाही. विवेचन - आसक्तिचे खरे कारण जग नसून स्वतःची वासना आहे. तृष्णा आहे, 'काम' आहे, काही तरी मिळविण्याची, हवे असण्याची इच्छा आहे. स्वतःचा स्वार्थ हे मोहाचे कारण आहे. आसक्तिसाठी दोन भिन्न बाबींची आवश्यकता असते. ज्याची आसक्ति आहे व ज्याला त्या पदार्थाची आसक्ति आहे, अशा दोन बाबी असाव्या लागतात. हे शरीर, घर, पत्नी, मुले या सर्वांना आपण आपल्यापेक्षा वेगळे मानतो, त्यामुळे त्यांच्याबद्दल मोह निर्माण होतो. जर सर्व काही 'एक'च असेल तर मोह कुणाचा व कुणाला होणार ? म्हणून अष्टवक्र स्वामी सांगतात की या सृष्टीत मूलतः भिन्नता, वेगळेपण अस्तित्वातच नाही. एकच चैतन्य सत्ता वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या स्वरूपात्त प्रकट झाली आहे. म्हणून संपूर्ण सृष्टी ही चैतन्यच आहे. संपूर्ण सृष्टी एकाच ईश्वराचे रूप आहे. सर्व काही त्या एकाच चैतन्याचा आविष्कार व विस्तार आहे. म्हणून सर्व काही घडविणारा ईश्वरच आहे, दुसरा कुणी नाही. परंतु ज्याला या एकत्वाचे ज्ञान झाले आहे, त्यालाच आत्मज्ञान होऊन तो भ्रामक कलहातून मुक्त होतो व शांती प्राप्त करतो. जेव्हा संपूर्ण सृष्टीतल्या एकत्वाचा बोध होतो तेंव्हा त्याच्या सर्व आशा आकांक्षा, अपेक्षा मुळातूनच नाहीशा होतात. मग तो कशाच्या मोहात अडकत नाही. ईशावास्य उपनिषदात सांगितले आहे की, "या जगात जे काही आहे ते ईश्वराचेच आहे हे जाणून त्याबद्दलच्या वासनेचा त्याग करून त्याचा उपयोग करून घे." जो ईश्वरसत्ता जाणतो त्याला हेही कळून येते की सर्व काही ईश्वराचे आहे, जे प्राप्त झाले ते ईश्वराचे आहे, जे गमावले ते सुद्धा ईश्वराचेच आहे, मग त्याचा सहजपणे त्याग करता येतो. द्वंद्वभावना नाहीशी होते, द्वैतभावना नाहीशी होते. अशांतीचा विलय होतो. आशा नष्ट होतात. जे प्राप्त झाले आहे, जे जसे घडते आहे त्यातच व्यक्ति समाधान मानण्यास शिकते. मग आसक्तिचे कारण उरत नाही. अशा व्यक्तिला परम शांती प्राप्त होते.
आपदः सम्पदः काले दैवादेवेति निश्चयी । अनुवाद - विपत्ती किंवा संपत्ती दैवयोगामुळे उचित समयी प्राप्त होते हे जाणणारा पुरुष सदैव संतुष्ट, शांत असतो व तो कोणत्याही गोष्टीची आशा बाळगत नाही किंवा कशाबद्दलही शोक करत नाही.
विवेचन - भारतीय धर्मशास्त्राचे हे आग्रही प्रतिपादन आहे की, सर्व काही योग्य वेळीच घडते, वेळ आल्याशिवाय काही घडत नाही. " माली सींचे सौ घडा, ऋतू आये फल होय !" माळ्याने शंभर घडे पाणी टाकूनसुद्धा फळ येत नाही पण ऋतू आला तर लगेच झाडाला फळे येतात. म्हणून गीतेत देखील सांगितले आहे की तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे. फल प्रातीवर नाही. फलप्राप्ती तर ईश्वराच्या मर्जीवर आहे, जे भाग्यात लिहिले असेल तसे होईल. भारतीय धर्माचा हा महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. यामुळे हा दृष्टीकोन स्वीकारण्यार्या भारतीय माणसाच्या जीवनात ताण तणाव नसतात, अशांती नसते. भौतिक सुख-समृद्धीचा अभाव असला तरी तो प्रसन्न असतो, आनंदी असतो, हसतमुखाने कार्य करतो. पश्चिमी राष्ट्रातील माणूस योग्य वेळेच्या आधीच फलप्राप्ती व्हावी म्हणून धडपड करतो, सर्व काही आपल्याच मर्जीनुसार व्हावे अशी इच्छा बाळगतो. पण तसे घडत नाही. मशीनमधे हे शक्य आहे पण मनुष्याच्या भाग्यात ते शक्य नाही. म्हणून भौतिक सुख सुविधांनी अतिसंपन्न असूनसुद्धा पश्चिमी राष्ट्रातील समाजजीवन तणावग्रस्त आहे व मानसिक संतुलन हरवलेल्यांची संख्या वाढती आहे. आत्मीक शांती नष्ट झाली आहे. याचे कारण हेच आहे की सृष्टीच्या मूलभूत नियमांबद्दल ते अज्ञानी आहेत. त्यांचे सर्व लक्ष भौतिक नियमांची माहिती मिळविण्यावर केंद्रित झाले आहे. त्यामुळे पश्चिमी राष्ट्रांची वैज्ञानिक प्रगती तर खूप झाली पण आत्मीक ज्ञानापासून ते वंचित झाले व त्याचा दुष्परिणाम त्यांना भोगावा लागत आहे.
सुखदुःखे जन्ममृत्यु दैवादेवेति निश्चयी । अनुवाद - सुखदुःख. जन्ममृत्यू हे सर्व दैवयोगामुळे होते असे ज्ञान प्राप्त झालेला मनुष्य, जे कर्म साध्य आहे, जे प्राच आहे तेच कर्म करतो ( अ-प्राप्याचे मागे धावत नाही.) आणि प्रयत्नरहित कर्मे करून सुद्धा त्यांच्यात अडकत नाही. विवेचन - याच क्रमाने स्वामी अष्टवक्र म्हणतात की सुखदुःख व जन्म किंवा मृत्यूद्धा दैवयोगाने होतात. ते घडविणे हा मनुष्याचा अधिकार नाही. जर तो मनुष्याचा अधिकार असता तर दुःखातून व मृत्यूतून त्याने स्वतःची कायमची सुटका करून घेतली असती, परंतु तो तसे करू शकत नाही. तो केवळ भोग भोगतो. म्हणून हे सर्व दैवयोगाच्या अधीन आहे हे जाणून ज्ञानी पुरुष योग्य कर्माद्वारे जे प्राप्त होऊं शकते त्यासाठी प्रयासरहित कर्म करतो परंतु त्या कर्मात तो निरासक्त असल्याने त्याला त्या कर्माची फळे भोगावी लागत नाही. दैवयोगाने होते असे मानल्यामुळे तो स्वतः कर्तेपणातून मुक्त होतो, अहंकारातून मुक्त होतो व त्याला परम शांती प्राप्त होते. कमळ जसे चिखलापासून अलिप्त रहाते तसा तो कर्मफळापासून अलिप्त रहातो. तो केवळ द्रष्टा म्हणजे साक्षीदार होतो. असे परिश्रम करण्यात श्रम होत नाही, आनंद मिळतो व ज्ञानीपुरुष ताणतणाव, चिंता किंवा मानसिक रूग्णता यापासूनही मुक्त रहातो. जय-पराजय, लाभ-हानी, यश-अपयश, सफलता-असफलता सर्व काही ईश्वराचे आहे. मी केवळ साधन आहे. मी केवळ निमित्तमात्र आहे, असे मानणारा ज्ञानी पुरूष सर्व तऱ्हेच्या मानसिक ओझ्यांपासून मुक्त, तणावमुक्त, चिन्तामुक्त होऊन जगतो. या उलट अज्ञानी माणूस स्वतःला कर्ता मानून, फळाची इच्छा बाळगून काम करतो. त्यामुळे तो सदैव दुःखी, अशांत, चिंताग्रस्त व तणावाखाली असतो. हे एक मनोवैज्ञानिक मानसशास्त्रीय सत्य आहे. त्या समवेत ह्यात हे आध्यात्मिक सत्य आहे की जो ज्ञानी पुरूष स्वतःचे ऐवजी ईश्वराला कर्ता मानेल तो कर्म फलातूनसुद्धा मुक्त होतो. ज्ञानी पुरूषाचे सर्व कार्य अखिल मानवजातीच्या कल्याणासाठीच असते. ज्ञान प्राप्तीमुळे कर्मफलाच्या आसक्तितून त्याची सुटका झालेली असते. कार्य, कर्म हे त्याच्या दृष्टीने शरीराचा इंद्रियाचा धर्म असतो. आत्म्याचा धर्म नव्हे. त्यामुळे त्याचे जवळ कर्तापणच नसल्याने कर्त्याला मिळणारा कर्मफलाचा भोग सुद्धा त्याला मिळत नाही. तो सर्व प्रकारच्या फल प्राप्तीतून बाजूला रहातो. भारतीय अध्यात्म यामुळेच दैवयोगावर, भाग्यावर, ईश्वरावर व फलाची इच्छा त्यागण्यावर विशेष भर देते. ज्यामुळे मनुष्य शांततेत जगू शकेल व चिन्ता त्रस्तता, तणाव यापासून दूर राहू शकेल.
चिन्तया जायते दुःखं नान्यथेहेति निश्चयी । अनुवाद - ह्या जगात चिंतेमुळेच दुःख निर्माण होते, अन्यथा ते निर्माण होत नाही, हे सत्य जो जाणतो तो सुखी व शांत होतो. सर्व कामातून त्याची स्वतःची कोणतीच इच्छा साधायची नसते म्हणून तो चिन्तामुक्त होतो. विवेचन - याच विवेचनाच्या ओघात मुनीश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी पुढे सांगतात की जिथे अहंकार आहे, तिथे कर्ता भाव आहे. कर्ता भाव असतो तिथे हे मीच करत आहे अशी भावना असते. जेथे ही भावना आहे तिथे फळाची इच्छा आहे व म्हणून चिंता आहे. जिथे चिन्ता आहे तेथे दुःख आहे. फक्त ज्ञानी पुरुषच असे मानतो की मी कर्ता नाही, निमित्त मात्र आहे, सर्व कामे ईश्वराचीच आहेत व त्याच्या प्रेरणेने त्याच्या आदेशानुसार मी कर्म करीत आहे, मी केवळ साधन आहे, मी केवळ बासरी आहे पण वाजवणारा तोच आहे, स्वर त्याचेच आहेत, असे मानून कर्म करणारा चिंतामुक्त होऊन जगतो. त्याच्या मनावर कसलेही ओझे नसते. असा माणूसच सुखी व शांत होतो. ह्या भावनेमुळे स्वतःची इच्छा गळून पडते. तो आपली स्वतःची नव्हे तर परमेश्वराची इच्छा मानून कर्म करतो व म्हणून शेवटी चिंतामुक्त होतो. ज्याप्रमाणे लहान बालक आपल्या वडलांचे बोध धरून निश्चिंत होतो, त्याप्रमाणे मनुष्य परमात्म्याचा आधार मिळाल्यावर निश्चिंत होऊन जगतो. आणि त्यामुळेच तो अनेक प्रकारच्या मानसिक चिंता, तणाव व अशांती यापासूनही मुक्त होतो. जे कुणी ईश्वरावर विश्वास ठेवत नाहीत त्यांचे जीवन अनेक प्रकारच्या यातनांनी भरून जाते. मानसिक अवरोधाबरोबरच अनेक अवरोध त्याचे जीवनातील प्रगती रोखून ठेवतात. म्हणूनच मानसिक संतुलन समतोल राखण्यासाठी ईश्वरावरील श्रद्धा नितांत उपयुक्त आहे. ईश्वर आहे किंवा नाही ह्याला महत्त्व नाही. त्यापेक्षा तुम्ही तो आहे असे मानता किंवा नाही याला तुमच्या मानसिक आरोग्याचे दृष्टीने अधिक महत्त्व आहे.
नाहं देहो न मे देहो बोधोऽहमिति निश्चयी । अनुवाद - 'मी शरीर नाही, हा देह माझा नाही, मी तर चैतन्यस्वरूप, बोधस्वरूप आहे' - असे ज्ञान ज्यास प्राप्त होते तो पुरुष कैवल्यप्राप्तीमुळे केलेल्या किंवा न केलेल्या कामाचे स्मरण करीत नाही. विवेचन - महामुनी अष्टवक्र म्हणतात की जो मनुष्य आत्मज्ञान प्राप्त करतो तो निश्चयपूर्वक स्वतःला चैतन्य स्वरूप आत्मा समजतो. शरीराशी असणारा त्याचा मोह संबंध तुटून जातो म्हणून अशा ज्ञानी पुरूषाचे म्हणणे असते की, मी म्हणजे देह नाही, आत्मा आहे. आत्म्याचे स्वतःचे कोणतेच शरीर नसल्यामुळे तो म्हणतो की माझे कोणतेच शरीर नाही. हे केवळ ज्ञानी पुरूषच समजू शकतो. ज्यामुळे त्याला कैवल्यप्राप्तीचा लाभ होतो. कैवल्यप्राप्ती झालेला पुरूष स्वतःला आत्मस्वरूप समजतो त्यामुळे केलेल्या किंवा न केलेल्या कर्माच्या आठवणीत अडकत नाही. जी कर्मे केली ती देहाने केली, आत्म्याने नव्हे आणि जी कर्मे केली नाहीत ती मनाच्या सीमारेषेच्या आत कधी आलीच नाहीत केवळ विचारांपुरतीच सिमीत राहीलीत म्हणून त्या दोघांच्याही आठवणीत ज्ञानी पुरुष अडकू शकत नाही. दोन्ही प्रकारच्या कर्मांना आत्म्याशी संबंध नसल्याने तो त्यांचे स्मरण करत नाही.
आब्रह्मस्तम्बपर्यन्तमहमेवेति निश्चयी । अनुवाद - ब्रह्मापासून गवतापर्यंत असलेली विविध रूपे 'माझीच' आहेत हे जो जाणतो तो निर्विकार, शुद्ध, शांत व प्राप्ती-अप्राप्तीच्या विचारांतून मुक्त होतो. विवेचन - अज्ञानी माणूस आत्म्याला ओळखत नाही, तो शरीराला ओळखतो. तो शरीर जाणतो, पदार्थ वस्तू जाणतो. याच कारणाने त्याला जगात विभिन्नता दिसू लागते. पण ज्ञानी पुरूष या संपूर्ण सृष्टिच्या मूलतत्वाला ब्रह्माला म्हणजेच आत्म्याला जाणतो. या आत्म्यामुळेच ही संपूर्ण सृष्टी अस्तित्वात आहे. या कारणाने ज्ञानी पुरूषाला संपूर्ण सृष्टीत एकता जाणवते, सर्व वस्तू पदार्थ, जीव यात एक प्रकारचे साम्य जाणवते. ज्याला आत्म्याचे ज्ञान होते तो आत्मरूप होतो, आत्म्याशी एकरूप होतो. सर्व प्रकारच्या वस्तू पदार्थ जीव यांच्यातील जी अंतीम सत्ता, अंतीम मूलतत्व आहे ते व ज्ञानी पुरूष स्वतः यात त्याला वेगळेपण दिसत नाही. वेगवेगळ्या शरीरात वेगवेगळे आत्मे असल्याचे त्याचे अज्ञान नष्ट होते. अष्टावक्र स्वामी सांगतात की 'मी आत्मा आहे व ब्रह्मापासून आत्म्यापर्यंत माझाच विस्तार आहे, सर्व सृष्टी मिळून मीच आहे व मी एकच आहे, ही सृष्टी माझी नसून, मीच ही सृष्टी आहे, माझ्यापासून वेगळे असे काहीही नाही' असे ज्ञान ज्या व्यक्तिला होते, ती निर्विकल्प होऊन जाते. अशा ज्ञानी पुरुषाच्या मनात कोणतीही शंका उरत नाही. त्यामुळे हा ज्ञानी पुरूष शांत व शुद्ध होतो, एवढा की जणू विशुद्ध सोनेच. जेवढी म्हणून विकृति, विकारवशता व अशुद्धता आहे ती नष्ट होते. अशा मनुष्याला त्याला काय मिळाले व काय मिळाले नाही ह्याचा विचार त्रास देऊ शकत नाही. त्याबद्दलच्या दोन्ही विचारातून तो सर्वार्थाने मुक्त झालेला असतो. असा ज्ञानी पुरूषच असे म्हणू शकतो की 'सारे काही माझे आहे किंवा माझे असे काहीही नाही.' ज्ञानी पुरूषाची ही अवस्था म्हणजेच मुक्ति आहे.
नानाश्चर्यमिदं विश्वं किञ्चिदिति निश्चयी । अनुवाद - अनेक प्रकारची विविध आश्चर्ये असलेले जग मिथ्या आहे. क्षणभंगूर आहे, अशाश्वत आहे अशीं ज्या ज्ञानी पुरूषाची खात्री पटली आहे तो वासनारहित, बोधस्वरूप खरोखरीच, एवढी शांती प्राप्त करतो की त्याच्यासाठी काहीच अस्तित्वात नसते. विवेचन - ज्याने शाश्वत काय याचे ज्ञान प्राप्त केले आहे, त्याला क्षणजीवी बाबीत काहीच स्वारस्य उरत नाही. ज्याने अंतिम तत्व जाणले त्याचे मन क्षुद्र बाबीत रमत नाही. अद्वैताचा सर्वश्रेष्ठ आनंद ज्याला लाभला तो या अशांत, दुःखमय व यातनामय भाव भावनांच्या विळख्यातूनच बाहेर पडतो. मग या नाशवान क्षणिक जगाबद्दलची त्याची आसक्ति, वासना समूळ नष्ट होते व परम शांतीच्या अनुभवात तो रममाण होतो. अष्टावक्र स्वामी म्हणतात की, या जगात अनेक प्रकारची असंख्य आश्चर्ये असूनही आत्मानंदाच्या तुलनेत ती सारी खोटी, मिथ्या व रसशून्य आहेत. बोधस्वरूप व आत्मज्ञानी पुरूषाची या जगाच्या असत्यतेबद्दल खात्री पटलेली असल्यामुळेच त्याला शांती लाभते. जगात सुखदुःखाचा जो अनुभव येतो, सत्य, आनंद, हर्ष, विषाद यांची जी अनुभूती येते तिचे मुख्य कारण माणसाची वासना व त्याचा अहंकार हेच आहे. ज्यामुळे वासना व अहंकार तृप्त होतो ते सुखदायी वाटते पण त्याच्या उलट झाले तर दुःख वाटते. पण सृष्टी तिच्या स्वतःच्या नियमांनीच संचलित होत असते. तिला मनुष्याच्या सुख दुःखाची पर्वा नसते. तिच्या नियमांशी मिळते जुळते घेऊन जगणारा सुखी होऊ शकतो. त्या नियमांच्या विरुद्ध वर्तन करणारा उध्वस्थ होतो व अनेक यातना भोगतो. आत्मज्ञानी पुरूषाला हे रहस्य माहित असल्याने तो सृष्टीनियमांना पोषक व सुसंगत असा व्यवहार करतो. यामुळेच त्याला शांती प्राप्त होते. याउलट अज्ञानी व संसारात फसलेला माणूस सृष्टीच्या नियमांबद्दल अज्ञान असल्यामुळे सामाजिक व प्रापंचिक बाबीत अडकून शेवटी अशांतीचा धनी होतो. ज्ञानी व अज्ञानी माणसाच्या जगाकडे बघण्याच्या दृष्टीत हाच फरक असतो. सृष्टीचे नियम जाणून घेणे म्हणजे ज्ञान व त्या नियमांबद्दल उदासिनता म्हणजे अज्ञान होय. ज्ञानामुळेच अज्ञान नाहीसे होते, भ्रम दूर होतात, सत्याचा साक्षात्कार होतो व शांती अनुभवता येते. अज्ञान हटविण्यासाठी दिशाहीन धडपड करणे म्हणजे दिवा न पेटवताच अंधार नाहीसा करण्याचा निष्कळ प्रयत्न करण्यासारखा आहे. ज्ञानापासून दूर गेल्याने नव्हे तर जागृत होऊन त्याचा स्वीकार करण्याने, त्यागाने नव्हे तर प्राप्तीनेच शांतीचा रस्ता सापडतो. अष्टवक्र स्वामीप्रमाणे एवढे अर्थपूर्ण विवेचन दुसरे कुणी करू शकलेले नाही. सार म्हणून, सूत्र म्हणून त्यांनी ही क्रांतीकारी गोष्ट निवेदित केली आहे. |