|
अष्टावक्रगीताप्रकरण अठरावे (१८)संपूर्ण शांतीचा रस्ता बोधोदय आहे.
अष्टावक्र उवाच - अनुवाद : - ज्याचा बोध झाल्याने सर्व श्रम स्वप्नांप्रमाणे नाहीसे होतात त्या एकमात्र, आनंदरूपी, शांत व तेजोमयास प्रणाम असो. विवेचन : - हे प्रकरण 'आत्म-ज्ञान-शतक' या नावाने प्रसिद्ध आहे. जो एकमात्र आहे, आनंद-स्वरूप आहे, सृष्टीत त्याच्याहून वेगळे असे नाहीच नाही जो शांत व तेजोमय आहे अशा त्या ब्रह्माला मुनीश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी प्रारंभी प्रणाम करतात. जीव स्वत:ला अज्ञानामुळे आत्म्यापेक्षा वेगळे समजतो. परंतु जेंव्हा आत्म्याचा बोध होतो तेंव्हा आत्मज्ञान प्राप्ती होते व जेंव्हा जीव आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो तेंव्हाच आपण आत्म्यापेक्षा वेगळे असल्याला भ्रम नाहीसा होतो. अन्यथा हे अज्ञान हेच त्याचे बंधन आहे, तेच त्याचे जग आहे पण ज्ञान-प्राप्तीनंतर ते नाहीसे होते. हे मायारूपी, स्वप्नमय, खोटे, असत्य व क्षणभंगुर अनित्य जग असल्याचे लक्षात येते. हे केवळ दृष्टि परिवर्तनामुळे होऊ शकते. अज्ञानी माणसाची वैचारिक दृष्टी वेगळी असते. आत्म्याचा अनुभव नसल्याने तो या जगालाच सत्य व शाश्वत, नित्य समजतो व विषयांचा उपभोग घेण्यात परम सुख अनुभवतो. त्याला आत्मा, परमात्मा, ब्रह्म, ईश्वर हेच भ्रमजनक व मायारूपी वाटतात. जे दिसत नाही ते सत्य कसे असेल ? असा अज्ञानी माणसाचा प्रश्न असतो. ईश्वरभक्तिला तो दुकानदारी समजतो. पंडे, पुजारी, मुल्ला, मौलवी व धर्मगुरू यांची दुकानदारी मानतो. अज्ञानी पुढे जाऊन असेही म्हणतो की जे डोळ्यांना दिसते आहे त्याला माया ठरवून जे अदृश्य आहे त्याला प्रतिष्ठित करण्याचे धर्मगुरूंचे कट कारस्थान आहे व त्यामुळे अंधविश्वास, अज्ञान वाढले आहे. ज्ञानी व अज्ञानी, दोघांची आपापली वैचारिक दृष्टी व आपापले तर्क आहेत. दोघेही आपापल्या जागी बरोबर आहेत. ज्ञानी व अज्ञानी माणसाच्या दृष्टीकोनात फरक हा रहाणारच. हा फरक तर्क व वाद-विवाद केल्याने नाहीसा होणार नाही तर बोधामुळे नाहीसा होईल. बोध झाल्यावरच अज्ञानाचा अंधार नाहीसा होईल. सुर्योदय झाल्यावर ज्याप्रमाणे अंधार नाहीसा होतो त्याचप्रमाणे बोधोदय झाल्यावर अज्ञान नाहीसे होते. अंधार नाहीसा व्हावा म्हणून केलेले नकारात्मक प्रयत्न चुकीचे आहेत. अंधार नाहीसा केला म्हणजे सूर्य उगवेल असे जो सांगतो तो भ्रमात आहे. म्हणून मुमुक्षु नेहमी आत्मज्ञानाचे प्राप्तीसाठी प्रयत्न करतात. आत्मज्ञान झाल्यामुळेच सारे भ्रम नाहीसे होऊन व्यक्तिला शांतीचा लाभ होऊ शकतो. त्याच परम श्रेष्ठ आत्म्याला नमस्कार करून अष्टवक्र या प्रकरणाचा प्रारंभ करतात. अज्ञानी जर जगाला असत्य समजत असेल तर ते सुद्धा ढोंग आहे, अप्रमाणिकपणा आहे. अज्ञान कबूल करणे हा प्रामाणिकपणा आहे. अज्ञानावर ज्ञानाचे खोटे आवरण घालणे अप्रमाणिकपणा आहे. त्यामुळे व्यक्ति जणू बहुरूपी होऊन जाते.
अर्जयित्वाखिलान् अर्थान् भोगानाप्नोति पुष्कलान् । अनुवाद : - सर्व आयुष्य खर्च करून मनुष्य धन कमवून अधिकाधिक सुखांचा उपभोग घेतो पण सर्वांचा त्याग केल्याशिवाय सुखी होऊ शकत नाही.
विवेचन : - अष्टवक्र स्वामी म्हणतात की केवळ पैसाच, केवळ रूपयेच धन नसून ते अनेक प्रकारचे, विविध स्वरूपाचे असते. घर, जमीन, प्रॉपर्टी, हत्ती-घोडे, वाहने, जनावरे, जडजवाहिर, बाग-बगीचे सर्व धनच आहे. फार काय ज्ञान, विद्या, पांडित्य, कला, विद्वत्ता या गोष्टीसुद्धा धनच आहेत. भोग मिळविण्यासाठी मनुष्य या धनाचा उपयोग करतो किंवा या गोष्टी देऊन त्यांच्या बदल्यात सुखसुविधा प्राप्त करतो. श्रीमंतांना तर असा विश्वासच वाटतो की पैशाने सर्वकाही खरेदी करता येते. देशाचे राजकारण, अर्थव्यवस्था, उद्योग, तंत्रविज्ञानाचे फायदे अशा अनेक क्षेत्रावर आजच्या परिस्थितीत धनशक्तिचा बराच प्रभाव आहे. पैश्याचा पूर्ण अभाव असलेल्या म्हणजेच धनविरहित समाजाची तर कल्पनाही करता येत नाही. साऱ्या आशा-अपेक्षा धनसंपत्तीशी निगडीत असतात. संकटात, अडीचडचणीच्या वेळी पैसा कामाला येईल असाच सर्वजण विचार करतात. काही व्यक्ति तर याच कारणाने आपल्या कुटुंब्याला सुद्धा आपली संपत्ती समजतात कारण कुटुंबातले सदस्यसुद्धा संकटाचे वेळी कामाला येतात. परंतु अष्टवक्र स्वामींचे सांगणे आहे की धनाच्या, संपत्तीच्या जोरावर मनुष्य जास्तीत जास्त भोग प्राप्त करतो पण सुखी मात्र होत नाही. सुख व आनंद पैशाने खरीदता येत नाहीत कारण या गोष्टी बाजारात मिळत नाहीत. ती तर आपल्या अगदी आतल्या मनात जन्माला येणारी अनुभूती आहे. श्रीमंतीमुळे माणूस सुखी होऊच शकत नाही. श्रीमंत माणसे नेहेमी कोणत्या तरी काळजीत असतात. कुणाची पचनशक्ति खराब असते तर कुणाला मधुमेह झालेला असतो. कुणाला झोपच येत नाही तर कुणी चिंताग्रस्त आहे तर कुणाला अपत्य-प्राप्तीच झालेली नाही. संप्पत्ती गोळा करायलाही अतिशय त्रास कष्ट घ्यावे लागतात व नंतर तिच्या रक्षणाच्या काळजीने पुन्हा कष्ट करावे लागतात. ह्या पैशामुळेच चोरी, खून, गुंडागर्दी, विश्वासघात यासारखी गुन्हेगारी वृत्ती निर्माण होते. हा पैसाच अनाचाराच्या व दुराचाराच्या मुळाशी असतो. म्हणून पैश्याने कधीच सुख, आनंद व शांती प्राप्त होत नाही. पैसे मिळविणे हा गुन्हा नसला तरी पैश्याचे मागे मागे धावून त्यासाठी वेडे होणे फार वाईट आहे. हेच सर्व अशांतीचे कारण आहे. म्हणून मुनीश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात की धनसंपत्तीमुळे सुखप्राप्ती होत नाही. सुख तर संपत्तीचा त्याग केल्याने प्राप्त होते. त्यागाचा अर्थ असा नाही की पैसे मिळविणे बंद करून आळशी व भिकारी होऊन जगावे. सारे सोडून जंगलात जाणे किंवा संपत्ती नष्ट करणे असाही अर्थ नाही. संपत्तीच्या प्रती आसक्ति न ठेवणे, आसक्तिचा त्याग करणे एवढाच याचा खरा अर्थ आहे. पैश्याची गुलामी सोडा, पैश्यासाठी वेडे होऊ नका हा खरा भावार्थ आहे. पैसा भोग देतो, भोगाचे सुख देतो पण ते सारेच क्षणभंगुर असते. संपत्ती चंचल असते. तिचा भरवसा नाही. ती क्षणात अदृश्यसुद्धा होऊ शकते. म्हणून संतोष हेच परमसुख असल्याचे ज्ञानवंतांनी सांगितले आहे. ज्ञानी सांगतात.
कर्तव्यदुःखमार्तण्डज्वालादग्धान्तरात्मनः । अनुवाद : - कर्तव्य करण्यातून निर्माण झालेल्या सूर्याच्या ज्वालांनी ज्याचे अंतर्मन जळाले आहे, त्या पुरूषाला शांतीरूपी अमृतधारेच्या पाऊसाशिवाय सुख कसे मिळणार ? विवेचन : - ज्ञानी माणसाचा उपदेश अज्ञानी माणसाला कळू शकत नाही. कारण अज्ञानी माणसाचे मन सदैव अपेक्षा, इच्छा, स्वार्थ अशा गोष्टींनी ओतप्रत भरलेले असते. विषात अमृत मिसळले तर ते अमृतसुद्धा विष होऊन जाते. म्हणून अज्ञानी जोपर्यंत संकुचितपणाचा त्याग करत नाही तोपर्यंत ज्ञान सांगूनसुद्धा त्याला ते कळत नाही. म्हणूनच एका गोष्टीची वेगवेगळी विवरणे व वर्णने ज्याला येतात. या सुत्रात अष्टवक्र स्वामीजी कर्तव्य कर्मातून दुःखे निर्माण होतात हे स्पष्टपणे सांगून म्हणतात की या दुःखरूपी सूर्याच्या ज्वालांमुळे अंतर्मन जळते, दुःखी होते. या दुःखातून सुटका करून घेण्याचा उपाय 'शांती' रूपी अमृत धारेचा पाऊस आहे. त्याच्याशिवाय दुःखातून सुटका होत नाही, त्याच्याशिवाय मनुष्य सुखी होत नाही. येथे कर्तव्य शब्दाचा अर्थ कर्तेपणाशी आहे. जे कर्म 'मी केले' या कर्तेपणाच्या भावनेने केले जाते, अहंकाराने केले जाते, तेच कर्म दुःखदायी ठरते, अशी अहंकारातून जन्माला आलेली कर्मेंच बंधनस्वरूप होतात. अहंकारशून्य वृत्तीने मी पणाचा त्याग करून केलेली कर्मे, स्वभावत: केली गेलेली कर्मे, दुःखांना जन्म देत नाहीत. एवढेच नाही तर त्यांच्यापासून आनंदनिर्मिती होते, त्यांचे पासून सुखप्राप्ती होते, शांतिचा अनुभव सतत मिळतो. जो अहंकारशून्य वृत्तीने कर्मे करतो, त्याला शांती अवश्य मिळते. कर्तेपणाचा त्याग केल्याने शांती प्राप्त होते.
भवोऽयं भावनामात्रो न किंचित् परमार्थतः । अनुवाद : - हा संसार ही केवळ भावना आहे, प्रत्यक्षात असा तो अस्तित्वातच नाही. भावरूप पदार्थात तसेच अभावरूप पदार्थातसुद्धा रहाणारा जो स्वभाव आहे (आत्मा आहे), त्याचा कुठेच अभाव नाही. विवेचन : - मुनीश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात की हा संसार अस्तित्वात आहे ही आपली केवळ भावना आहे. वास्तवदृष्ट्या तो अस्तित्वात असा नाहीच. प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःचे भावनेनुसार जगाकडे पहातो म्हणून प्रत्येकाला हे जग वेगवेगळे दिसते. माणसाला जग तसेच दिसते जशी त्याची इच्छा असते. मनुष्याचे मन वासना, इच्छा, मोह, आसक्ति, भय, राग, लोभ, द्वेष व अन्य भावनांनी भरलेले आहे म्हणून त्याला संसार तसाच दिसतो. जग हे खरे तर आपल्याच मनातील भावनांचे प्रतिबिंब आहे. स्वप्न सुद्धा मनाचेच प्रतिबिंब असते पण तरी ते खरे वाटते. स्वप्नभंग झाल्यानंतरच कळते की हे स्वप्न होते, खोटे होते. त्याचप्रमाणे हे जगसुद्धा स्वप्नाप्रमाणे आपल्याच भावनांचे प्रतिबिंब आहे पण अज्ञानी माणूस त्यालाच सत्य समजतो. आत्मज्ञान झाल्यावरच हा भ्रम संपतो. आत्मज्ञान झालेल्या माणसालाच हे जग माया असल्याचे, असत्य असल्याचे कळते. आत्मज्ञानीच जगाचे नेमके स्वरूप ओळखू शकतो. म्हणून ज्ञानीपुरुष सांगतो की हे जग भावनेतच अस्तित्वात आहे, प्रत्यक्षात ते अस्तित्वात नाही. परम् अर्थाने म्हणजेच परमार्थानुसार आत्मा सत्य आहे व जग हे केवळ माया, भास आहे. अहंकारशून्य तसेच वासनाशून्य झाल्यामुळे ज्ञानी माणसाच्या लेखी या जगाची काहीच उपयोगीता नाही, काहीच प्रयोजन नाही. सारे जग अर्थशून्य आहे. जगाचे वास्तविक स्वरूप आत्मज्ञानी माणूसच जाणू शकतो. भितीमुळे माणसाला दोरीच्या जागी साप दिसू लागतो. लहान मुलाला भिती माहित नसल्याने तो सापाला सुद्धा दोरी समजून उचलून घेतो. आपली पत्नी, मुलगा हे सर्व चांगले वाटतात याचे कारण आपल्या अपेक्षा व स्वार्थ त्यांच्याशी निगडीत असतात. अन्यथा ते तर मागच्या जन्मात कधीही तुमच्याबरोबर नव्हते. आणि मृत्यूनंतरही तुमची साथ देणार नाहीत. जर स्वार्थपूर्ती झाली नाही तर या जन्मातच अर्ध्यावर सोडून पळून जातात. केवळ ज्योतिषाने कुंडली जमवून दिली म्हणजे कुणी पतीपत्नी होत नाही. खोटा पती व खोटी पत्नी जणू काही दोन आंधळ्याप्रमाणे एकमेकांचे हातात हात धरतात म्हणून काही काळ एकत्र राहतात. अन्यथा ते एकत्र राहणे शक्य नाही. नंतरही सारे जीवन मानसिक क्लेश व कष्टच सहन करावे लागतात. ज्योतिषाला विचारले की अठ्ठावीस गुण मिळत होते तरीही पतीपत्नीत भांडणे का होतात ? तर ज्योषिषाजवळ त्याचे काहीच उत्तर नाही. तुमचे मित्र, तुमचे शत्रू हे सारे तुमच्या मनाच्याच स्वार्थाचे प्रतिबिंब आहे. स्वार्थ नसेल तर कोण मित्र आहे व कोण शत्रू आहे ? संसार हा सर्वांत आहे, पण तो विश्वासार्ह नाही. आत्मा हा भावरूप आहे व सर्व प्रकारच्या पदार्थात विद्यमान आहे. आत्मा हा भावरूप व सत्य आहे. संसार अभावरूप व असत्य आहे. पण या दोघातही स्वभावरूपाने विद्यमान असा एकच आत्मा आहे. आत्मा सर्वांत आहे, त्याचा कोठेच अभाव नाही. बाकी सर्व अभावरूप आहे.
न दूरं न च संकोचाल्लब्धमेवात्मनः पदम् । अनुवाद : - हा आत्मा कुठे दूर नाही किंवा तो काही कुठल्या बाबीचा संकोच केल्याने प्राप्त होतो असेही नाही. तो निर्विकल्प आहे. प्रयत्नविरहीत आहे, निर्विकार आहे आणि निर्दोष आहे. विवेचन : - या सूत्रात अष्टवक्र स्वामी आत्म्याची स्थिती व त्याचे वैशिष्ट्य स्पष्ट करतांना सांगतात की आत्मा काही कुठे सातव्या स्वर्गात नाही, तो कुठल्या अदृश्य दुनियेत नाही, किंवा स्वर्गात नाही, हिमालयात नाही व मठमंदिरात नाही. अशा कोणत्याच ठिकाणी तो नाही की ज्यामुळे तो शोधावा लागेल. कोणत्या बाबीचा संकोच केल्याने तो प्राप्त होतो असेसुद्धा नाही. तो आपल्याच आत विद्यमान आहे व सदैव उपलब्ध आहे. केवळ आपले ज्ञानचक्षू उघडून बघण्याचे काम आपल्याला करायचे आहे. स्वतःच्या पूर्ण जागृत अवस्थेत त्याला प्राप्त करायचा आहे. विकारांची धूळ पुसायची आहे. घाणेरड्या आरशाला स्वच्छ करायचे आहे म्हणजे त्यात आत्मा आपोआप दिसू लागेल. विचारांच्या घनदाट ढगांमुळे आत्मसूर्याचे दर्शन होत नाही. सर्व उपासनापद्धती या विचारांची आंदोलने स्थगीत करण्याच्या पद्धती आहेत. आत्मा विकल्प विरहीत आहे. तुम्ही निर्विकल्प झाल्यावरच तुम्हाला त्याचे ज्ञान होऊ शकते. तो प्रयत्न विरहित आहे. त्याला जाणून घेण्यासाठी कोणतेही प्रयत्न करावयाचे नाहीत. तो निर्विकार आहे. त्याच्यात कोणतेही विकार नाही. वैज्ञानिकांच्या तत्त्वासारखा तो शुद्ध आहे. तो यौगिक सुद्धा नाही. त्याच्यात पाप-पुण्य, चांगले-वाईट, हित-अहित अशा स्वरूपाचे काहीच नाही. तो निर्दोष आहे. त्याच्यात कोणताही दोष नाही, तो अलिप्त आहे. त्याचे स्वरूप बदलता येत नाही कारण तो विकृत होऊ शकत नाही. तो कोणी हिसकावून घेऊ शकत नाही किंवा चोर चोरू शकत नाही. तो अ-प्रकट देखील नाही. तो कोणत्या खोलीत बंद अवस्थेतही नाही. तो तर सदैव उपलब्ध आहे. फक्त त्याचे विस्मरण झाले आहे, त्याची आठवण तेवढी करायची आहे.
व्यामोहमात्रविरतौ स्वरूपादानमात्रतः । अनुवाद : - सर्व मोहपाशातून मुक्त होऊन आपल्या सत्यस्वरूपाचा स्वीकार केल्यानंतरच शोक-मुक्त व निर्मल-निर्विकार दृष्टीच्या पुरुषाच्या गौरवात वृद्धी होते. विवेचन : - आत्मस्वरूप ओळखलेल्या व्यक्तिबद्दल मुनीश्रेष्ठ स्वामी अष्टवक्र सांगतात की प्रापंचिक संसारातील सर्व विषयांच्या मोहातून मुक्त झाल्याशिवाय आत्मस्वरूप प्राप्त होऊ शकत नाही. आत्मज्ञान प्राप्त करायचे नसते. फक्त त्याच्या प्राप्तीमधील अडथळे दूर करायचे असतात. दृष्टी तर तीच आहे. मोहाच्या आसक्तिने ती संसारातील विषयात गुंतवाल तर सर्वत्र संसारच दिसू लागतो. मोह नष्ट झाला तर नजरेतून संसार अदृश्य होईल व फक्त आत्माच दिसू लागेल. मग प्राणी, पशु, पक्षी, अन्य व्यक्ति फार काय दगडात सुद्धा त्या परमात्म्याचेच दर्शन होईल. याप्रमाणे आत्मस्वरूपाचा बोध झाल्यावर हर्ष-शोक, सुख-दुःख अशा सर्व प्रकारच्या द्वंद्वांबद्दल व्यक्ति उदास होते. त्याच्या वैचारिक दृष्टीत कोणताही विकार नसतो. दृष्टी पूर्णपणे निर्विकार व स्वच्छ असल्याने मोह, ममता, माया, राग, लोभ, द्वेष, घृणा त्याच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. अशा पुरुषाची वैचारिक निष्ठा व दृष्टी सत्यमय होऊन जाते. तो स्वतःच सत्यस्वरूप होतो. अशा पुरुषाचे ठायी जणू सत्यच मूर्तीमान होते. अशा पुरुषाच्या गौरवात सतत वृद्धी होते व असा पुरुष शोभून दिसतो.
समस्तं कल्पनामात्रमात्मा मुक्तः सनातनः । अनुवाद : - सर्व जग केवळ कल्पना आहे. आत्माच सनातन व मुक्त आहे. ह्याचे ज्ञान झाल्यामुळे धैर्यशील पुरुष, बालकाप्रमाणे ( निरागस वृत्तीने) व्यवहार करतात. विवेचन : - स्वामी अष्टवक्र म्हणतात की हे सर्व जग, या जगाचे अस्तित्व हे केवळ कल्पनेतच अस्तित्वात आहे. तुम्ही जगाची जशी चांगली किंवा वाईट कल्पना केली, जगाचे तसेच स्वरूप तुम्हाला दिसते. तुमच्या या कल्पनाशक्तिचेच नाव मन आहे. ह्या मनाच्या नजरेने तुम्ही जगाचे वास्तविक रूप पहात नसून कल्पनेनुसार, स्वतःला हवे तसे रूप कल्पीत करून पाहता. जर हा मनाचा अडथळा दूर झाला तर जगाचे वास्तविक स्वरूप फार भिन्न असल्याचे दिसून येईल. ही अज्ञानी दृष्टी हेच तुमचे बंधन आहे. त्याचा त्याग करून चेतनेच्या रूपाचे प्रत्यक्ष दर्शन घ्याल तेंव्हा, त्याच क्षणी मुक्त व्हाल व त्याचक्षणी आत्मज्ञान प्राप्त होईल. हा आत्मा मुक्त आहे व सनातन आहे. तो स्वत: बंधनग्रस्त नाहीच शिवाय असेही नाही की आज आहे व उद्या रहाणार नाही. तो सनातन आहे. पूर्वीपासून आहे व पुढेही रहाणार आहे. आत्म्याची प्राप्ती मेल्यावर होईल असेही नाही व स्वर्गात मिळेल किंवा ज्ञानी माणसाजवळ मिळेल असेही नाही. अज्ञानी माणसाजवळ आत्मा नसतो असेही नाही, फक्त माणसांत असतो व पशुपक्षात नसतो असेही नाही. आत्मा सर्वत्र आहे. सत्य एकच असते. ज्याला हे जग सत्य वाटते त्याला आत्मा असत्य वाटतो. पण आत्मज्ञानी माणसाला जग असत्य आहे व आत्माच सत्य आहे याचे ज्ञान व जाणिव असते. ही ज्याची त्याची दृष्टी आहे. जगाला सत्य मानणे हेच आत्म्यासाठी बंधन असते. जग सत्य मानणे हे वास्तवाला धरून नाही. खोट्या समजूतीमुळे खोटी बंधने निर्माण झाली आहेत. समजूत कृत्रीम म्हणून बंधनेसुद्धा कृत्रीम आहेत. ज्ञानी माणसाची कृत्रीम बंधने, खोड्या समजूती, भ्रम नाहीसे होतात म्हणून तो मुक्त असतो. म्हणून त्याला अज्ञानी माणसाप्रमाणे प्रयत्न करावे लागत नाही. अज्ञानी माणूसच प्रयत्न करतो, अभ्यास करतो, साधना करतो. आत्मज्ञान प्रयत्न, साधना, परिभ्रम यामुळे प्राप्त होत नाही. ते तर प्राप्तच आहे फक्त दृष्टीपरिवर्तन करून निर्विकारपणे त्याचेकडे बघायचे आहे. केवळ साक्षीदार होणे पुरेसे आहे. प्रयत्न करणे हे जगाचे लक्षण आहे. साक्षीत्व तर परमेश्वराप्रमाणे आहे. तुमच्या प्रयत्नांमुळेच कर्मांचा ढीग साचला आहे. हजारो जन्मात प्रयत्न करूनच तुम्ही कर्मांचा संचय गोळा केला आहे. नरकात जाण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करता पण एका क्षणात व प्रयत्नांशिवाय जी मुक्ति प्राप्त होऊ. शकते, तिच्याकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. एखाद्या गोष्टीचा साठा करण्यास, संचय करण्यास प्रयत्न करावे लागतात. पण त्याग मात्र एका क्षणात बसल्या जागी, कोणतेही कष्ट न करता, कोणतेही प्रयत्न न करता सुद्धा त्याग करता येतो. आसक्तिचा त्याग करणे हाच खरा त्याग आहे. साक्षात्काराचा अनुभव झटकन एका क्षणात घडून येईल. जणू काही स्वप्नातून जागे व्हावे तशी घटना घडून येईल. सर्व साचलेली कर्मे एका क्षणात नाहीसे होतील. ज्याप्रमाणे स्वप्नात केलेल्या कामांची चांगल्या वाईट कर्मांची कोणतीही शिक्षा मिळत नाही त्याप्रमाणे अज्ञानात झालेली कर्मे बंधन होत नसतात. मुक्त तर तुम्ही आधीसुद्धा होतातच. बंधन हीच भ्रांती होती व नाहीशी झाली. बसल्याबसल्याच मुक्त होता येते, श्रवणभक्ति द्वारा ऐकून ऐकून मुक्त होता येते. कुठे जावे लागत नाही, कुठे यावे लागत नाही. उपवासात मुक्ती नाही किंवा शिर्षासनात मुक्ति नाही. कुंडलीनी जागृत करावी लागत नाही, किंवा योगातील मुद्रा कराव्या लागत नाही. ना शास्त्राची जरूरी आहे, ना गुरूची आवश्यकता आहे. अज्ञान कबूल करणे म्हणजेच ज्ञानाचे दरवाजे उघडे करण्यासारखे आहे. अहंकाराचा त्याग करणे म्हणजेच सहज-स्वाभाविक रूप प्राप्त करणे आहे.
आत्मा ब्रह्मेति निश्चित्य भावाभावौ च कल्पितौ । अनुवाद : - आत्मा हाच ब्रह्म आहे. भाव-अभाव हे कल्पनामात्र आहे. जो पुरुष इच्छाविरहित (निष्काम) झाला आहे, तो काय जाणतो, काय सांगती व काय करतो ? ( तो काहीच करत नाही, स्वाभाविकपणे सर्व होते.) विवेचन : - आत्मा व ब्रह्म यांच्यातील अ-भेद्यता (अद्वैत) स्पष्ट करण्यासाठी मुनीश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी म्हणतात की हा आत्मा हाच ब्रह्म आहे. व्यक्ति-व्यक्तित विद्यमान असलेल्या चेतनेचे नाव आत्मा आहे व समष्टीत विद्यमान असलेल्या चेतनेचे नांव ब्रह्म आहे. हे ब्रह्म एकच आहे. पण वेगवेगळ्या वस्तूंत ते वेगवेगळे भासते. हे भाव व अभाव दोन्हीही कल्पनेचे खेळ आहेत. एक आत्मा हेच अंतीम तत्व आहे व ते भावस्वरूप नाही व अभाव स्वरूपही नाही. परमात्मा आहे किंवा नाही ही शंकाच खोटी आहे कारण जे काही आहे ते सर्व तोच आहे. ह्मा सृष्टीपेक्षा तो वेगळा नाही. सृष्टीमधे परमात्मा आहे किंवा नाही ही शंकासुद्धा निरर्थक आहे कारण ही सृष्टीच परमात्मा आहे. हे तत्व जो हृदयाशी धारण करतो त्यालाच याचा अनुभव येतो. शास्त्रांचा अभ्यास करून किंवा पंडितांशी चर्चा करून ते जाणता येत नाही. स्वतःच्या अंतर्मनांत प्रवेश केल्यानेच ते जाणता येते. निःशब्दपणे, शांतीपूर्वक व मौनअवस्थेत जाणता येते. विज्ञानाच्या प्रयोगशाळेत गेल्याने नव्हे तर स्वतःच्या आतल्या प्रयोगशाळेत प्रवेश केल्यानेच ते जाणता येते. जेव्हा स्वतःचा अहंकार नष्ट होईल तेंव्हाच परमात्म्याची भेट होईल. हे तर्काने नव्हे तर तर्कशून्य होऊन अनुभूती घेतल्याने जाणता येते. स्वतःच्या मीपणाचा लोप होणे ही ज्ञानप्राप्तीची सुरवात आहे. अहंकार व कर्तेपण हे मोठे अडथळे आहेत. स्वतःचे ज्ञान म्हणजे धर्म व दुसऱ्याचे ज्ञान म्हणजे विज्ञान. जेंव्हा मन वासना, आसक्ति, अहंकार यातून मुक्त होते, तेंव्हा जे शिल्लक रहाते तेच ब्रह्म आहे. अशी स्थिती प्राप्त केलेला ज्ञानी पुरुषच खरा इच्छाविरहीत ( निष्काम असतो.) ह्या परमश्रेष्ठ ज्ञानाच्या अवस्थेत कर्तेपण नाहीसे होते म्हणून कर्मसुद्धा नाहीसे होते. मग ज्ञानी जे काही करतो, बोलतो, ऐकतो, जाणतो त्यात त्याचा अहंकार नसल्याने ते त्याच्यासाठी कर्म नाहीच. सर्वकाही अस्तित्वाच्या सहज स्वभावामुळे घडत असते.
अयं सोऽहमयं नाहं इति क्षीणा विकल्पनाः । अनुवाद : - सर्व काही आत्मा आहे, हे सत्य जाणून शांत झालेल्या योगीपुरूषाच्या मनातील ' मी हे आहे' आणि 'ते मी नाही' अशा कल्पना नाहीशा होत जातात. विवेचन : - बन्धन किंवा मुक्ति शरीरासाठी नाही किंवा मनासाठी नाही. कर्म बंधन नाही किंवा त्यांचेमुळे मुक्ति मिळत नाही. परमेश्वर कुणाला बंधनात अडकवत नाही व मुक्तही करत नाही. मनुष्याची अज्ञानी बुद्धीच त्याला भेद करण्यास, वस्तूवस्तूत फरक करण्यास शिकविते. जीवात्मा व परमात्मा ह्यातही फरक करण्याच्या माणसाच्या अज्ञानी दृष्टीमुळे त्याने सर्व सृष्टीलासुद्धा द्वैतबुद्धिने दोन बाबीत वाटून टाकले. सृष्टी तर एकच अस्तित्वरूप आहे, ती अ-भेद आहे. पण द्वैतदृष्टीच्या विभाजनामुळे जीवात्म्यात व परमात्म्यात भेद दिसू लागला व हा भेदच संघर्षाचे कारण झाला आहे. हा भेद अज्ञानातून निर्माण झाला आहे. आत्मज्ञानाच्या अभावातून निर्माण झालेल्या या भेदातून तो योगीपुरूष मात्र अलिप्त असतो. कारण हे सर्व एकाच आत्म्याचे स्वरूप आहे हे त्याने जाणलेले असते. आत्म्यापेक्षा वेगळे काही अस्तित्वात नाही हे त्याने जाणल्यामुळे त्याच्या मनात असा द्वैतीभाव शिल्लक रहात नाही. अहंकार, मन, वासना, तृष्णा, इच्छा या सर्वांमुळे निर्माण झालेले अज्ञानच ह्या भेदवृत्तीच्या मुळाशी आहे. हा भ्रम नष्ट झाल्यावर, अभिन्नतेची सखोल जाणिव झाल्यावर असा पुरूष शांत-शांत होत जातो व मी म्हणजे हे आहे व ते म्हणजे मी नाही अशा स्वरूपाच्या त्याच्या भावना नाहीशा होतात. दिवा प्रज्वलित केल्यावर अंधार नाहीसा व्हावा ह्याप्रमाणे आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यावर ह्या भ्रमजनक भावना नाहीशा होतात.
न विक्षेपो न चैकाग्र्यं नातिबोधो न मूढता । अनुवाद : - पूर्णपणे ज्ञान झालेल्या योगी पुरूषासाठी न कशाचा अडथळा आहे न एकाग्रता आहे; न अतिबोध आहे, न मूढपणा आहे; न सुख आहे, न दुःख आहे. विवेचन : - मनामधे इच्छा आकांक्षा, निश्चय, शंका-कुशंका व पर्यायी विचार येतच असतात. ह्याच कारणांमुळे हे कल्पनेतले जग अस्तित्वात आले आहे. परंतु आत्मज्ञानी योगी पुरूषाचे चित्त या संकल्प-विकल्प, शंका-कुशंकाच्या प्रभावातून पूर्णपणे बाहेर असल्याने पूर्ण शांत असते व म्हणून त्याच्या मनातल्या सर्व बाधा, सर्व अडथळे नष्ट होतात. बाधा आल्यावरच एकाग्रता साधण्याची, धारणा-ध्यान-समाधी आदि पद्धतींनी उपासना करण्याची आवश्यकता वाटू लागते. अतिबोध व मूढपणा, सुख व दुःखाचा अनुभव हे सारे चित्ताच्या चंचलतेमुळे प्रतीत होतात. ज्ञानी योगी पुरूषाची तर सर्व चंचलता व वासना नष्ट झाल्याने तो सदैव व सर्वत्र आत्म्याचेच अस्तित्व असल्याची अनुभूती घेतो व आत्मानंदात रहातो. म्हणून या जगातले वर वर्णीलेले अनुभव त्याला येत नाही व सुखदुःखापासून तो दूर असतो.
स्वाराज्ये भैक्षवृत्तौ च लाभालाभे जने वने । अनुवाद : - निर्विकल्प स्वभावाच्या योगी-पुरूषाचे दृष्टीत राजसत्ता व भिक्षावृत्ती किंवा लाभ व हानि किंवा समाज व जंगल यात काहीच फरक नाही. विवेचन : - आत्मज्ञानी माणसाच्या मनातील सर्व इच्छा, वासना नष्ट झालेला असतात. निर्विकल्प होऊन असा योगी पुरूष आत्मानंदात मग्न असतो. तो समाजात असो किंवा जंगलात, त्याला फायदा होवो किंवा नुकसान, तो राज्यसत्ताधीश असो किंवा भिकारी, त्याच्या लेखी यातल्या कोणत्याही एका गोष्टीमुळे कोणताही फरक पडत नाही. त्याचे सारे आग्रह संपुष्टात आलेले असतात. राज्यसत्तेची इच्छा बाळगणारे व राज्यसत्तेचा त्याग करून पळून जाणारे दोघेही आग्रही असतात. दोघांच्या मनात काही इच्छा आहेत. याचप्रकारे मनात संकल्प बाळगून भिक्षा-वृत्तीने जगणारे, लाभ किंवा हानिचा विचार करणारे, जाणूनबुजून समाजात किंवा जंगलात राहणारे सर्व पुरूष मनात काही एक विचार, काही एक आग्रह बाळगून असतात की मी असे करीनच, मी तसे करीनच. हे सर्व अहंकारातून निर्माण झालेले अज्ञान आहे. अहंकार व संकल्प विकल्प यातून पूर्णपणे मुक्त झाल्यावर प्रत्येक स्थितीत अनाग्रही वृत्तीने स्वाभाविक जीवन जगणे हाच ज्ञानी पुरूषाचा स्वभाव असतो. कोणतीही गोष्ट तो निवडत नाही, ही चांगली, ती वाईट असे ठरवत नाही. कोणत्याही घटनेवर त्याची प्रतिक्रिया नसते, कोणत्याही परिस्थितीत त्याची काहीही तक्रार नसते. जे काही होते त्या सर्वाचा स्वीकार आहे.
क्व धर्मः क्व च वा कामः क्व चार्थः क्व विवेकिता । अनुवाद : - हे केले आहे, ते केले नाही अशा प्रकारच्या द्वैती विचारातून मुक्त असलेल्या योगी माणसासाठी कशाचा धर्म, कशाचा काम, कशाचा अर्थ व कशाचा विवेक ? विवेचन : - जीवन्मुक्त योग्याची लक्षणे या सुत्रात अष्टवक्र स्वामींनी स्पष्ट केली आहेत. ही लक्षणे असणारा पुरूष जीवन्मुक्त आहे व परमश्रेष्ठ योगी आहे असे जाणावे, कारण ही लक्षणे म्हणजे जीवन्मुक्तीची कसौटी आहे. ज्या पुरूषात ही लक्षणे दिसत नाहीत, त्याला ज्ञान प्राप्ती झालेली नाही, तो जीवन्मुक्त नाही व अद्वैताची अनुभूतीही त्यास आलेली नाही हे स्पष्ट आहे आणि तरीही जर तो आत्मज्ञानी असण्याचा दावा करत असेल तर त्याला भ्रम झाला आहे किंवा तो वेडा आहे किंवा तो ढोंगी आहे. याच प्रतिपादनाचे ओघात मुनीश्रेष्ठ अष्टवक्र सांगतात की संकल्प व विकल्प, इच्छा व शंका ह्यांच्यातून पूर्णतया मुक्त झाल्याने जीवन्मुक्त माणसाचे चित चंचलताविरहित होऊन शांतपणे स्थीर होते व म्हणून तो कोणती कामे केली व कोणती केली नाहीत अशा विचारांच्या द्वंद्वांतून मुक्त होतो. असा मुक्त योगी धर्म, अर्थ, काम व विवेक यासारख्या कर्तव्यबंधनातून सुद्धा मुक्त होतो. त्या संबंधातले कर्तव्य बंधन अज्ञानी माणसासाठी असते. ज्ञानी माणूस त्याच्या स्वभावानुसार त्यांचे पालन करतो तर अज्ञानी माणूस बंधन मानून मजबूरीने, सक्तिने व अस्वाभाविकपणे ही कर्तव्ये पार पाडतो. धर्म, अर्थ व काम तसेच विवेक यांचा खोटारडा मुखवटा अज्ञानी माणूस लावतो पण तो काही त्याचा स्वभाव नसतो. ज्ञानी माणसाचा तो स्वभाव होऊन जातो. आत्मज्ञानात दृष्टीपरिवर्तन होते व तीच ज्ञानी माणसाची खरी ओळख असते.
कृत्यं किमपि नैवास्ति न कापि हृदि रंजना । अनुवाद : - जीवन्मुक्त योग्यासाठी कोणतेही कर्तव्य कर्म नाही आणि अशा कर्तव्य कर्माविषयी त्याच्या मनात कोणतीही ओढ वा आसक्तिही नसते. तो या जगात स्वाभाविकपणे प्राप्त झालेले जीवन जगत असतो. विवेचन : - मुनीश्रेष्ठ अष्टवक्रस्वामी म्हणतात की जीवन्मुक्त योग्यासाठी कोणतीही कर्तव्यकर्मे नसतात. कर्मांचा उद्देश असतो धन, सुख, मानसन्मान, शांती, ऐवर्य, पद, प्रतिष्ठा या गोष्टींची प्राप्ती. कर्म करून या गोष्टी प्राप्त करण्याची सामान्य माणसाची इच्छा असते. कर्म करून काहीतरी प्राप्त करून त्याद्वारे समाजात सुखाने व सन्मानाने जगण्याची त्याची इच्छा असते. म्हणून कर्मात फळाची अपेक्षा सामावलेली असते. कर्म करणारी व्यक्ति धार्मिक असली तरी तिला कर्माद्वारे स्वर्ग, मोक्ष व सद्गती प्राप्त करण्याची इच्छा असते. याच इच्छेच्या प्रेरणेमुळे तो वाईट कर्मे, त्यातून सत्कर्मे करू लागतो. दुसऱ्याचे चांगले करतो, सेवा करतो, गरीबांना साहाय्य करतो, दानधर्म करतो, धर्मशाला बांधतो, देवळे बांधतो. ही सर्व कर्मे तो धार्मिक दृष्टीने करतो ज्यामुळे भविष्यात त्यामुळे त्याचे चांगले फळ मिळावे. म्हणजे त्यातसुद्धा फळाची आकांक्षा आहे. परंतु जो योगीपुरूष जीवन्मुक्त झाला आहे,, त्याला तर जी सर्वश्रेष्ठ प्राप्ती आहे तिचा लाभ झालेला आहे. ज्याच्यासाठी ही सारी धार्मिक कृत्ये केली जातात तेच ज्ञानी माणसाला प्राप्त झाले आहे म्हणून आता त्याचेसाठी कोणतीही कर्तव्यकर्में नाहीत, काहीही करण्याचे बाकी नाही. कर्माचा उद्देश फलप्राप्ती आहे म्हणून फलप्राप्ती करावयाची सर्व कर्म ज्ञानप्राप्तीनंतरच आपोआप सुटून जातात. त्यानंतर ज्ञानी माणसाकरिता फक्त तीच कर्म करण्याची आवश्यकता शिल्लक रहाते, जी कर्मे स्वाभाविकपणे व फलाकांक्षाविरहित वृत्तीने होतात. अशी कर्मे कर्तव्य कर्म नसून, खेळाप्रमाणे, नाटकाप्रमाणे, स्वाभाविकरित्या होत असतात. अशा कर्मांबद्दल हृदयात फार आस्था किंवा असोशीसुद्धा नसते. असा जीवन्मुक्त योगी जसे आयुष्य सहजपणे वाट्याला येईल, तसेच तो तितक्याच सहजपणे जगतो. त्यात काही खास मिळविण्याची इच्छा वा प्रयत्न नसतात, तसेच काही सोडण्याचाही आग्रह नसतो. त्याचेसाठी कर्तव्य कर्मे कोणचीच नाही. याचा अर्थ असा नाही की सारे सोडून ज्ञानी माणसाने आळशी व्हावे व सर्व काही मिळाले आता काहीच करायचे नाही असे म्हणत बसून रहायचे. याचा अर्थ असा की कर्मे तर सर्व होतील पण ती स्वाभाविकपणे व फळाची आकांक्षा न ठेवता होतील. याचा दुसरा अर्थ असा मुळीच नाही की सर्व कर्मांचा त्याग करून, आळशी होऊन जीवन जगणारा जीवन्मुक्त होऊन जाईल. तसे जो वागेल तो ज्ञानी नसून अहंकारी व ढोंगी माणूस आहे. हा फरक समजवून घेतला पाहिजे. म्हणून मुनीश्रेष्ठ अष्टवक्र सावधान करतात की ज्यांना भोगाची अभिलाषा आहे, त्यांच्यासाठी हा तत्त्वबोध त्याज्य आहे. ज्यांना फळाची आशा आहे, ते सर्व भोगाची अभिलाषा बाळगणारे आहेत. त्यांना प्रदान केलेला तत्त्वबोध अमृताऐवजी विषाचेच काम करेल. तसा माणूस कर्तव्यभ्रष्ट होऊ शकतो. स्वीकारणास योग्य असे अधिकारी व मुमुक्षू व्यक्ति यांनाच तत्त्वबोध प्रदान केला पाहिजे. ज्ञान म्हणजे काही बाजारात मिळणारी सवंग गोष्ट नाही की प्रत्येक पानाच्या दुकानावर मिळू शकेल. असे ज्ञान मंदिरात, मठात, आश्रमात, चर्चमधे किंवा मशिदीत सुद्धा मिळू शकत नाही. इथे डोके टेकवले, तिथे पुष्पमाला अर्पण केली, कुठे नारळ अर्पण केला की लगेच लोक स्वतःला धार्मिक समजू लागतात. लगेच आपल्याला स्वर्गाची किल्लीच प्राप्त होते अशी त्यांची समजूत होते. ते असेही मानू लागतात की आता ते मुक्त झालेत, सिद्ध झालेत, आता त्यांना जणू करण्यासारखे काहीच उरले नाही.जीझस येशू ख्रिस्ताने म्हटले की "तुझी इच्छा पूर्ण होवो" पण अशा भूमिकेत 'मी' व तू, माझी व तुझी हा द्वैतभाव तसाच शिल्लक रहातो. अद्वैताची अनुभूती होऊ न शकल्यामुळे त्यांनी ईश्वरात व मनुष्यात पितापुत्राचा संबंध असल्याचे मानले. ब्रह्मकुमार्रीवालेसुद्धा असेच मानतात. महावीराला तर आत्म्या-आत्म्यात ही फरक दिसला म्हणून ते अनेक आत्म्यांचे अस्तित्व मानत होते. या सर्व अपूर्ण ज्ञानाच्या अवस्थ्या आहेत. मुस्लीम धर्मसुद्धा पूर्णतया द्वैतवादी आहे. अद्वैतवादी लोकांतही अष्टवक्रस्वामी या ज्ञानातले शिरोमणी आहेत म्हणून ते ज्ञान आध्यात्म क्षेत्रातले सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. काही मूढ व मूर्ख असे मानतात की चहा पिणे सोडून दिल्याने, काट्यांवर झोपल्याने, नागडे फिरल्याने, अंगाला राख फासल्याने मोक्ष मिळेल. परंतु अशा गोष्टींचा व वस्तूंचा त्याग करण्याचा मोक्षाशी काही संबंध नाही. मोक्षाचा संबंध वृत्ती शांत होण्याशी आहे. हे सोडा, ते सोडा म्हणजे मोक्ष मिळतो असे सांगणारे अज्ञानी आहेत. मनाच्या चांगल्या वाईट सर्व प्रकारच्या व प्रत्येक इच्छेपासून मुक्त होणे हाच मोक्ष आहे. सर्व भेद नाहीसे होऊन त्या एका परमश्रेष्ठ तत्वात विलीन होणे हीच मुक्ति आहे.
क्व मोहः क्व च वा विश्वं क्व तद् ध्यानं क्व मुक्तता । अनुवाद : - सर्व संकल्प नष्ट झाल्यावर शांतवृत्तीने जगणाऱ्या महात्म्यासाठी कशाचा मोह व कोठला संसार ? कशाचे ध्यान व कुठली मुक्ति, ज्ञानी पुरूषासाठी हे सर्व निरर्थक आहे. विवेचन : - भारतीय धर्मात महात्मा, गुरू, संत, ज्ञानी हे शब्द उच्चबोध झालेल्या व्यक्तिचा निर्देश करतात. महात्मा असणाऱ्या पुरूषाच्या चित्तवृत्ती शांत, स्थिर असतात. सर्व प्रकारच्या इच्छा, संकल्प नाहीसे झाल्यामुळेच चित्त असे शांत होते व त्याचे मन त्या चैतन्यरूपी आत्म्यातच विलिन झालेले असते ज्याच्या इच्छा शिल्लक आहेत, काही तरी करण्याची किंवा प्राप्त करण्याची वासना आहे, ज्याच्यात अहंकार आहे, ज्याचे मन नेहमी चिंताग्रस्त आहे, ज्याच्या मनात स्वर्ग व मोक्ष प्राप्तीची इच्छा जागृत आहे, जो चांगले वाईट असा फरक मानतो, ज्याला जीव, ब्रह्म व सृष्टी हे वेगवेगळे दिसतात, असा माणूस ज्ञानी नसतो व महात्मा सुद्धा नसतो. राख फासून, नागडे होऊन, भगवी वस्त्रे पांघरून, चिमटा घेऊन बडबड केल्याने कुणी महात्मा होत नाही. जो पूर्णपणे इच्छाविरहित होऊन आत्मज्ञान प्राप्त करतो तोच महात्मा असतो. त्याच्यासाठी मोह, जग, ध्यान व मुक्ति सुद्धा निरर्थक असते, व्यर्थ असते. ही सर्व मनाचीच वृत्ती-प्रवृत्ती असते. जेव्हां मनच शिल्लक नाही तेंव्हा ह्या मनाच्या वृत्तींचे अस्तित्व तरी कुठून शिल्लक रहाणार ?
येन विश्वमिदं दृष्टं स नास्तीति करोतु वै । अनुवाद : - ज्याला जग वास्तव वाटते तो त्याचा अस्विकार का करेना, पण वासनारहित पुरुषाला त्याचे काय ? तो तर पाहूनसुद्धा पहात नाही. विवेचन : - जगाला वास्तव मानणारा, जगाचा स्वीकार करणारा तर वासनाग्रस्त असतोच कारण त्याला जगात जसे स्वारस्य असेल तश्याच दृष्टीने तो जगाकडे पाहतो व त्याची दृष्टी वासनेचीच असते. कधी कधी शास्त्रे ऐकून ऐकून त्याची मोक्ष प्राप्तीची वासना प्रबळ होते, यामुळे तोसुद्धा ज्ञानी पुरुषांप्रमाणे सांगत फिरतो की "संसार माया आहे, भ्रम आहे, असत्य आहे. संसार वास्तवात अस्तित्वात नसून, दोरीत साप दिसावा ह्या प्रकारच्या भ्रमाप्रमाणे आहे." परंतु जे ज्ञान ज्ञानी माणसाला झाले असते तसे ज्ञान अशा पढतशास्त्रींना झालेले नसते. म्हणून त्याने संसाराचा त्याग करणे हे सुद्धा खोटारडेपणाचे आहे, ढोंगीपणाचे आहे, त्याने जगाला अवास्तव म्हणणे हे त्याच्या वासनेचे लक्षण आहे कारण मोक्षप्राप्तीच्या वासनेने तो जगापासून दूर पळतोय, हिमालयात जातोय. म्हणून अष्टवक्र स्वामी म्हणतात की ज्ञानी माणसाची स्थिती ह्यापेक्षा वेगळी असते कारण तो वासनारहित झालेला असतो. तो जगाला पाहत असूनही पहात नाही कारण तो सर्वत्र आत्म्यालाच पहातो, जगाला नाही.
येन दृष्टं परं ब्रह्म सोऽहं ब्रह्मेति चिन्तयेत् । अनुवाद : - ज्याने पर-ब्रह्माचे दर्शन घेतले आहे तो खुशाल ' मी ब्रह्म आहे ' याच विचारावर चिंतन करो, पण जो श्रद्धापूर्वक सर्वत्र एकच एक (आत्मा) पहातो व दुसरे काहीच पहात नाही त्याने काय चिंतन करायचे ? विवेचन : - दोन भिन्न बाबी असल्याशिवाय चिंतन होतच नाही. एक तो जो चिंतन करतो व दुसरा तो ज्याचे चिंतन केले जाते. त्यामुळे जीवन व ब्रह्म हे वेगवेगळे दोन जण असल्याशिवाय चिंतन होणे शक्य नाही. अज्ञानीच माणूस स्वतःला त्या ब्रह्मापेक्षा निराळे समजतो म्हणून तो त्या ब्रह्माचे चिंतन करतो. शिवाय त्याने त्या ब्रह्माला पाहिले आहे. म्हणजे पाहणारा त्या ब्रह्मापेक्षा वेगळा असला पाहिजे तरच तो ब्रह्माला पाहू शकतो. पूर्ण आत्मज्ञान होण्याच्या आधीची ही स्थिती आहे. कारण त्या स्थितीत मनाला ब्रह्माचा आभास तेवढा होतो. या स्थितीत द्वैत कायम रहाते. अशा स्थितीत तो ' मी ब्रह्म आहे ' याचे चिंतन करतो पण त्यात 'मी' व 'ब्रह्म' अशा दोघांची उपस्थिती असते. पूर्ण ज्ञानाच्या स्थितीत हा जो 'मी' आहे. जो अहंकार आहे त्याचा पूर्ण विलय होतो व केवळ ब्रह्मच रहाते. अष्टवक्र स्वामी म्हणतात की पूर्ण ज्ञानमय स्थितीत जीव व ब्रह्म यांच्यातला फरक नाहीसा होतो. दोघे एकच होऊन जातात. अहंकारामुळे 'मी' चे अस्तित्व 'ब्रह्म' अस्तित्वापेक्षा वेगळे जाणवत होते तेच लोप होते. ज्याला सर्वत्र ब्रह्माचेच दर्शन होते. तो अहंकारच नाहीसा होतो. मग कुणी चिनन करायचे व कुणाचे करायचे ? ज्ञानाची ही सर्वश्रेष्ठ अवस्था आहे व तिची अनुभूती उच्च कोटीच्या फारच थोड्या व्यक्तिंना येते. ज्यांचा अहंकार शिल्लक असतो त्यांना त्यांचा 'मी' हा 'ब्रह्म' नसून वेगळा असल्याचा अनुभव येतो.
दृष्टो येनात्मविक्षेपो निरोधं कुरुते त्वसौ । अनुवाद : - ज्याला आत्म्याचे सुस्पष्ट दर्शन होऊ शकत नाही, त्याने चित्तनिरोध करावा पण ज्या उदार पुरुषाला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे व साध्य असे काहीच करायचे उरलेले नसेल त्याने काय करावे ? विवेचन : - प्रत्येक सजीवात जी चेतना आहे ती चेतना म्हणजेच आत्मा होय. मन, शरीर, इंद्रिये हे कार्यरत होतात ते या चेतना शक्तिच्या संजीवक प्रेरणेमुळे, ही चेतना शक्तिच प्राण आहे, आत्मा आहे, तीच ब्रह्म आहे तीच चेतना शक्ति ईश्वर आहे, तीच परमात्मा आहे. तिच्यामुळेच मन, शरीर व इंद्रियेआपापल्या गुणधर्मानुसार कार्य करतात. परंतु ही चेतनाशक्ति, आत्मा सूक्ष्म आहे म्हणून त्याचे प्रत्यक्ष दर्शन होत नाही. वासनेचे स्थान मन आहे व त्यामुळे मनात वासनेच्या विविध प्रकारच्या लाटा निर्माण होतात, विचारांचे तरंग निर्माण होतात. ह्या लाटांमुळे आत्म्याच्या प्रत्यक्ष दर्शनात अडथळा निर्माण होतो. आत्म्याचे दर्शन सर्वांना होऊ शकत नाही ते या चित्तातील विचारतलामुळे. योगशास्त्रात असा सिद्धान्त आहे की जर या चित्तवृत्तींचा निरोध केला तर आत्म्याचा अनुभव होऊ शकतो. म्हणून योगी आत्मज्ञानाकरितां चित्तवृत्तींचा निरोध करतात. हा वृत्ती-निरोध साधनेची अवस्था आहे. अष्टवक्र स्वामी सांगतात की अशा प्रकारे चित्तवृत्तींचा निरोध तेंव्हाच केला जातो जेव्हा आत्म्याच्या दर्शनात या वृत्तीतील तरंगांचा अडथळा होतो. परंतु ज्या पुस्वझ्या आत्मज्ञान दर्शनात या झ्यीतील तरंगांचा अडथळा होतो. परंतु ज्या पुरुषाला आत्मज्ञान झाले आहे ज्याचे चित्त शांत व तरंगविरहित झाले आहे. ज्याला साध्य करण्यासाठी काही उरलेले नाही व मन, चित्त नावाची गोष्टच त्याच्याजवळ उरलेली नाही त्याने काय करावे ? त्याच्यासाठी कशाची साधना ? ती संभवतच नाही. चित्त, मन, जग, शरीर हे सर्व त्याचेसाठी निरर्थकच नाहीत का ? मग निरोध कशाचा करणार ? जोपर्यंत चित्त आहे तोपर्यंत निरोध करता येईल. ज्ञानप्राप्ती पूर्वीच्या अवस्थेत साधन, साध्य, साधक अशा तीन गोष्टी अस्तित्वात असतात. ज्ञानप्राप्तीनंतर, चित्ताचे अस्तित्वच नाहीसे झाल्यावर साधना निरर्थक ठरते.
धीरो लोकविपर्यस्तो वर्तमानोऽपि लोकवत् । अनुवाद : - जगात राहून, जगासारखेच वागूनसुद्धा जो जगापेक्षा भिन्न आहे तो धैर्यशील पुरुष समाधी, अडथळे किंवा बंधन या सर्वांची उपेक्षा करतो, त्यांचेकडे पहात नाही. विवेचन : - ज्ञानी व अज्ञानी माणसाचे बाह्यांगी काही फरक नसतो पण अंतर्यामी, जाणीवांच्या स्तरांवर फार मोठा फरक निर्माण होतो. अज्ञानी माणसाचे कार्य, मुख्यत्वे करून मन, बुद्धि, अहंकार व वासना तृप्तीकरिता होत असते. शरीरपोषण हेच अज्ञानी माणसाचे ध्येय व जगण्याचा केंद्रबिन्दु असतो. ज्ञानीसुद्धा खातो पितो, अज्ञानी माणसाप्रमाणेच अन्य कर्मे करतो परंतु अंतर्यामी जागृत असतो. अज्ञानीसुद्धा तीच बाह्य कर्मे करतो पण अंतर्यामी झोपलेला असतो. आत्मज्ञान प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा कबीर कपडे विणत होता, रोहिदास जोडे शिवत होता, सेनान्हावी केस कापण्याचे काम करीत होता. बाह्य कर्मात काहीही फरक निर्माण झाला नाही. अष्टवक्र म्हणतात की आत्मज्ञानी माणूस जगातील अन्य माणसांप्रमाणेच व्यवहार करूनसुद्धा जगापेक्षा वेगळा असतो. हा फरक अंतरीचा असतो, बोधाचा असतोअसा ज्ञानी व धीरगंभीर पुरुषच मुक्त असतो. तो समाधी, बंधन, अडथळे, साधना यांची सुद्धा उपेक्षा करतो कारण तो त्या सर्वातून मुक्त असतो.
भावाभावविहीनो यस्तृप्तो निर्वासनो बुधः । अनुवाद : - जो ज्ञानी पुरुष तृप्त आहे. भाव-अभाव यासारख्या भावनांपासून मुक्त आहे, वासनारहित आहे, तो लोकांचे दृष्टीने सर्व कर्मे करूनसुद्धा वास्तवात मात्र काहीच करत नसतो. विवेचन : - अहंकाराने प्रेरित होऊन जो कर्म करतो तोच कर्ता असतो. ज्याची कोणतीच वासना नाही, कोणताच अहंकार नाही, ज्याला कोणत्याही फळाची आकांक्षा नाही, जो भाव-अभावाच्या चिंतेतून मुक्त आहे असा पुरुष कर्ता नसतो. जगात सर्व कर्मे करूनसुद्धा तो कर्मांपासून अलिप्त आहे, कारण कर्मांमुळे प्राप्त होणाऱ्या फळांना तो क्षुद्र व क्षणिक समजतो. त्याला शाश्वत सुख व आनंद याचा लाभ झाला आहे. तो आत्मानंदात तृप्त आहे म्हणून तो या क्षणभंगुर भोगांबद्दल उदास असतो. बाह्यतः जगाप्रमाणेच तोही सर्व कर्मे करतो पण ती कर्मे त्याला विचलित करू शकत नाहीत व आतून तो या कर्मांपासून अस्पर्श स्थितीत रहातो. म्हणून कर्मे करूनसुद्धा तो कर्तेपणाने असे काहीच करत नाही.
प्रवृत्तौ वा निवृत्तौ वा नैव धीरस्य दुर्ग्रहः । अनुवाद : - धैर्यशील पुरुष प्रवृत्ती किंवा निवृत्ती यापैकी कशासाठीही आग्रही नसतो. जेंव्हा जे करण्याची वेळ येते तेंव्हा तो ते करून सुखाने रहातो. विवेचन : - ज्ञानी पुरूष कर्ता नसल्याने कर्तव्याच्या अभिमानातूनही मुक्त असतो. म्हणून एखादी गोष्ट झालीच पाहिजे, मी ही गोष्ट करेन अशा प्रवृत्तीमय किंवा एखादी गोष्ट मी करणारच नाही, अशा निवृत्तीपर बाबीत त्याचा कोणताच आग्रह नसतो. शपथा खाऊन तो कशाचाही त्याग करत नाही. त्याचे सर्व संकल्प, आग्रह संपलेले असतात. अनाग्रही वृत्तीने जे स्वाभाविक आहे, ते तो करतो. जर एखाद्या कार्याची जबाबदारी त्याच्यावर आली तर ते कर्म करून तो तत्क्षणी त्यातून वेगळा होतो. आग्रह व निश्चय, संकल्प व वासना, प्रवृत्ती किंवा निवृत्ती, स्वीकार वा त्याग हे सर्व अहंकाराने केले तर ती बंधनेच होतात. ज्ञानी कडून अपेक्षा आहे की तो हे सर्व स्वाभाविकपणे करतो. ज्ञानी व अज्ञानीच्या कर्मात हेच खरे अंतर आहे, हाच खरा फरक आहे. बाहेरून फरक काही नाही. कोणी व्यक्ति पाण्यात बुडत असेल तर त्याला अज्ञानी माणूस वाचवेल व ज्ञानी माणूससुद्धा वाचवेल. दोघांच्या कार्यात काहीच फरक नसेल, पण अज्ञानी धावेल ते बक्षिस मिळविण्यासाठी, आपले प्राण धोक्यात घालून दुसऱ्याचे प्राण वाचविल्याबद्दल राष्ट्रपती पारितोषिक मिळेल, वृत्तपत्रातून प्रसिद्धि मिळेल, फोटो छापून येईल ह्या अपेक्षेने. पण ज्ञानी आपले कर्तव्य करून गुपचूपपणे तेथून निघून जाईल. कुणी आभार मानावे एवढीसुद्धा त्याची अपेक्षा नसते. तो कधीच म्हणणार नाही की मी एवढा उपकार केला तरी तुम्ही माझे आभार मानत नाही. मी वाचवले नसते तर तुम्ही बुडून मेला असता. हेच दोघांतले अंतर्यामी असलेले वेगळेपण आहे. काही अन्य मूढ माणसे अशी असतात की ती केवळ पहात रहातात व म्हणतात की कोण कुणाला वाचवू शकतो, तो आपल्या कर्माचे फळ भोगतो आहे, ते त्याला भोगू द्या. तुम्ही त्याला वाचवले तर तो आपल्या कर्माचे फळ भोगू शकणार नाही व त्याचे पाप तुम्हाला लागेल. वाचवल्यानंतर त्याने काही वाईट काम केले, एखाद्याचे प्राण घेतले, कुणाचा खून केला तर त्याचे पापसुद्धा तुम्हाला लागेल. ह्याप्रकारे काही मूढ व्यक्ति दान देतांनासुद्धा हिशोब करतात की दान दिल्यावर या पैशाचे तो काय करेल ? दारू पिईल किंवा जुगार खेळेल तर त्याचे पाप आपल्याला लागेल. अशा मूढ समजूती अनेक अज्ञानी माणसे उराशी बाळगून असतात. अहंकारमुक्त होऊन स्वाभाविकपणे, फलाकांक्षा सोडून जी कर्मे केली जातात तीच कर्मे कर्त्याला मुक्त करतात.
निर्वासनो निरालम्बः स्वच्छन्दो मुक्तबन्धनः । अनुवाद : - ज्ञानी पुरूष वासनारहित होऊन, परावलंबन त्यजून, स्वच्छंदपणे आणि बन्धनरहित झाल्यावर संसाररूपी हवेत एखाद्या वाळलेल्या पानाप्रमाणे व्यवहार करतो. विवेचन : - ज्याला आत्मज्ञान प्राप्तिचा लाभ झाला, ज्याने आत्मस्वरूप ओळखले, ज्याला संपूर्ण सृष्टी आत्म्याचेच रूप असल्याचे जाणवते तो वासनाशून्य होतो. या जगात किंवा नंतर स्वर्ग, मोक्ष वगैरे कोणत्याही बाबींची आसक्ति त्याला उरलेली नसते, म्हणून तो अवलंबनातून सुद्धा मुक्त होतो. असहाय्य व्यक्तिची गरज असते, की तिला कुणी मदतिचा हात द्यावा. ज्ञानी असहाय्य नसतो. तो स्वच्छंद होतो. कुणाच्या दबावाने तो कोणतेच कार्य करत नाही, परंतु आपल्या विवेकाने करतो. ज्याची काही अपेक्षा आहे तो त्या अपेक्षेमुळे बंधनात सापडतो व अपेक्षाशून्य माणूसच स्वच्छंद होऊ शकतो. घर, कुटुंब, पैसा, पद, प्रतिष्ठा ह्या अपेक्षांमुळे सामान्य माणूस स्वतःच स्वतःला बंधनात अडकवतो. ह्या वस्तू माणसाला बांधत नाहीत. अपेक्षा बांधते. जर सर्व अपेक्षांचा त्याग केला तर कुणीही स्वच्छंद होऊ शकतो, बंधनातून मुक्त होऊ शकतो. अष्टवक्र स्वामी म्हणतात की वाळलेले पान जसे वाऱ्याच्या झोताप्रमाणे हलते त्याचप्रमाणे ज्ञानी माणूस या जगाच्या वाऱ्यात वाळलेल्या पानाप्रमाणे व्यवहार करतो. ज्याप्रमाणे वाळलेल्या पानाची जशी काही इच्छा वासना, मर्जी नसते, जिकडे हवा घेऊन जाईल तिकडे ते जाते, त्याचप्रकारे ज्ञानी सुद्धा आपल्या मर्जीचा, आग्रहाचा त्याग करून जगरूपी वाऱ्यात जगाप्रमाणे व्यवहार करतो.
असंसारस्य तु क्वापि न हर्षो न विषादता । अनुवाद : - संसार मुक्त पुरुष न कधी हर्षित होतो, न कधी विषाद करतो. तो शांत मनाचा पुरुष ' मुक्त ' पुरुष म्हणून शोभून दिसतो. विवेचन : - मनुष्याचे जग त्याच्या बाहेर नाही. त्याच्या आतल्या वासना, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा ह्याच त्याचे जग आहेत. ह्या अपेक्षा व वासनांचे बाह्य प्रतिबिंब म्हणजेच त्याचे जग असते. ह्या अपेक्षा व वासनाच त्याच्या हर्षाचे व विषादाचे कारण असते. पण जीवन्मुक्त पुरूष या संसाराच्या अपेक्षातून मुक्त झालेला असल्याने त्याचे मन शांत झालेले असते. म्हणून तो हर्षित होत नाही व विषादसुद्धा करत नाही कारण त्याला अपेक्षाच उरलेल्या नसतात. म्हणूच तो देह असूनही विदेह (मुक्त) पुरुष म्हणून शोभून दिसतो.
कुत्रापि न जिहासाऽस्ति नाशो वापि न कुत्रचित् । अनुवाद : - आत्मरूपात रममाण झालेल्या व शीतल, शांत, निर्मल मनाच्या धैर्यशील पुरुषाला काहीही प्राप्त करण्याची इच्छा नाही व कशाचाही त्याग करण्याची इच्छा नाही. विवेचन : - अज्ञानी माणूस पैसा, पद, पत्नी, मुले, यश, मान-सन्मान, प्रतिष्ठा अशा नश्वर सुखातच रमलेला असतो. त्याला या सर्व गोष्टींच्या सुखाची लालसा असते, यातच त्याला आनंद वाटतो. परंतु हे सुख दुसऱ्यांपासून मिळवावे लागते. कोणत्याही क्षणी दुसरी व्यक्ति हे सुख हिसकावून घेऊ शकते व दुसऱ्यांचा भरोसा काय ? ज्याप्रकारे व्यक्ति दुसऱ्यांपासून सुख प्राप्त करू इच्छिते, त्याचप्रकारे दुसरे लोक तिच्यापासून सुख प्राप्त करू इच्छितात. पण सुख देण्याची कुणालाच इच्छा नसते. म्हणून संघर्ष सुरु होतो. हिसकाहिसकी सुरु होते व त्यामुळे केवळ क्लेश, त्रास, दुःखच निर्माण होते. सुखासाठी दुसऱ्यावर अवलंबून रहाणे ही गुलामी आहे. सुखाच्या लालसेने मनुष्य त्या गुलामीत स्वतःहून अडकत जातो म्हणून ज्ञानी लोक अशा सुखांना असत्य व बंधनकारक समजतात. जे सुख दुसऱ्यावर अवलंबून आहे ते असत्यच असते. थोड्याशा सुखासाठी मनुष्य स्वतःला दुसऱ्याला विकून टाकतो यापेक्षा माणसाचा दुसरा घोर अपमान तो काय असू शकेल ? म्हणून ज्ञानी पुरूष सर्व इच्छांचाच त्याग करतात. त्यानंतर कोणत्याही वस्तूची वा क्षणिक सुखाची प्राप्ती करण्याची वा जे यथाप्राप्य झाले आहे त्याचा त्याग करण्याची त्यांना इच्छा नसते. ते केवळ आपल्या आत्म-रूपात रममाण होऊन शाश्वत सुखाचा उपभोग घेतात, म्हणून त्यांचे चित्तही निर्मळ रहाते.
प्रकृत्या शून्यचित्तस्य कुर्वतोऽस्य यदृच्छया । अनुवाद : - जो पुरुष स्वाभाविकपणे शून्यचित्त आहे आणि तितक्याच सहजवृत्तीने सारी कर्मे करतो त्या धैर्यशील पुरुषाला इतर सामान्य माणसांप्रमाणे मानपान, सन्मान-अपमान नसतात. विवेचन : - मान व अपमान ह्या भावना अहंकारातून निर्माण होतात. त्याचा अहंकार जेवढा मोठा तेवढी मान-अपमानाची त्याची भावना जास्त तीव्र असते. छोट्या व्यक्तिचा अहंकार तीव्र असतो म्हणून प्रत्येक क्षणाला त्यांचेसमोर मान-अपमानाची समस्या उभी ठाकलेली असते. परंतु ज्ञानी पुरुष तर शून्य-चित्त असतो, त्याचे समोर मान-पान, सन्मान-अपमानाचा प्रश्न कधीच नसतो. ज्ञानी पुरुष सर्व कर्मे सहजपणे करत जातो. त्याला प्रशंसा व बक्षिसाची अपेक्षा नसते व कुणी अपमान केला तर त्याचाही त्याच्यावर काही परिणाम होत नाही. लहान मुलांप्रमाणे तो कर्म करतो.
कृतं देहेन कर्मेदं न मया शुद्धरूपिणा । अनुवाद : - 'माझ्या आत्मारूपी शुद्ध स्वरूपाने नव्हे तर शरीराने कर्म केले आहे' या विचाराचे जो अनुसरण करतो तो कर्म करूनही कर्म करत नाही. विवेचन : - अज्ञानी माणूस जी कर्मे करतो ती सर्व कर्मे ज्ञानी माणूस सुद्धा करतो. परंतु अज्ञानी माणूस अहंकारी असल्यामुळे सर्व चांगल्या-वाईट कामांचे ओझे व जबाबदारी स्वतःवर घेतो की हे मी केले आहे. तो स्वतःला कर्ता समजत असल्याने कर्म-फलाचाही तोच अधिकारी होतो, ती त्यालाच भोगावी लागतात. अज्ञानी व्यक्ति फळाच्या अपेक्षेखेरीज कोणतेही कर्म करूच शकत नाही. परंतु ज्ञानी माणसाने आपले शरीर व मन या पलिकडील आत्मा ओळखलेला असतो. व तो हे जाणतो की आत्मा हा कर्ता नाही व भोक्ता नाही. कर्मे तर शरीर व मनाचे मार्फतच होतात पण आत्मस्वरूप असल्याने ज्ञानी पुरूष हा त्या कर्मांचा केवळ साक्षीपुरुष असतो कारण सर्व कर्मे शरीराने केली आहेत, माझ्या आत्मस्वरूपाने नव्हे याची त्याला जाणिव असते. अशी व्यक्ति कर्म करूनसुद्धा त्यापासून अलिप्त रहाते. तिला त्याचे फळ भोगावे लागत नाही. जर अज्ञानी माणूस वाईट कामे करून म्हणेल की ही कामे मी केली नसून शरीराने केलीआहेत तरी त्याला त्या वाईट कामाची फळे भोगावी लागतील. कारण त्याच्यात वासना व अहंकार शिल्लक आहेत. या उलट ज्ञानी पुरुष वासना व अहंकारामुळे कोणतेही काम करीत नाही म्हणून तो फळाचा, भोगाचा अधिकारी नसतो. त्याचे सारे कार्य स्वाभाविकपणाने होत जाते.
अतद्वादीव कुरुते न भवेदपि बालिशः । अनुवाद : - जो सामान्य माणूस बोलतो वेगळे व करतो वेगळे, त्या सामान्य माणसाप्रमाणेच ज्ञानी व जीवन्मुक्त पुरुष कर्मे करीत असतो पण तो मूढ नसतो. ज्ञानी पुरुष सुखी होऊन संसारातच राहून सुशोभित जीवन जगतो. विवेचन : - ज्ञानी माणसाची ओळख त्याच्या कर्मावरून पटत नसते, ती त्याच्या ज्ञानावर अवलंबून असते. मुक्ति सुद्धा ज्ञानामुळे होते, कर्मामुळे नाही. सर्व कर्मांचा आधार शरीर, मन व अहंकार आहे. जोपर्यंत हे मन व अहंकार आहेत, तोपर्यंत सर्व कर्म बंधनेसुद्धा अस्तित्वात रहातात. परंतु ज्ञानी माणूस ह्या शरीर, मन व अहंकाराचे पलिकडील 'आत्म'रूप स्थितीत जगत असतो व म्हणून त्याची सर्व कार्ये ही स्वाभाविकपणे व जणू नाटक केल्याप्रमाणे होत असतात. त्यामुळे या कर्मांतून ज्ञानी माणूस अलिप्त असतो. म्हणून ज्ञानी माणसाची ओळख त्याच्या बोलण्यावरून होते, तो कोणत्या विचाराचे प्रतिपादन करतो त्यावरून होते. त्याचे बोलणे हे नेहमी सत्याचेच प्रतिपादन असते. त्याची कर्मे जनसामान्यांप्रमाणे असू शकतात. सामान्यांप्रमाणेच तो खातो-पितो व इतर व्यवहार करतो. याउलट सामान्य अज्ञानी माणसाने असामान्य काम केले तरी तो सामान्यच रहातो. गिधाड खूप उंच उडते पण त्याजी नजर मेलेल्या जनावरांच्या शरीरावर असते. बगळा एका पायावर उभा रहातो पण त्याची नजर माशावर असते. याच प्रकारे अज्ञानी माणसाने एखादे मोठे काम केले तरी त्याची नजर क्षुद्र वासनापूर्तीवर असते. म्हणून मुनीश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात की ज्ञानी व अज्ञानी माणसाच्या बोलण्यात - करण्यात फार फरक असतो. ज्ञानी माणूस विवेकशक्तिने जगतो, सत्यतेत जगतो, सृष्टीचा एकात्मभाव आत्मसात करून जगतो तर अज्ञानी माणूस अहंकार व वासनामय क्षुद्र स्वार्थी जीवन जगतो. दोघांमधले अंतर, फरक हा आतल्या भावजीवनाचा, वैचारिक दृष्टीचा असतो. अज्ञानी माणसाचे कर्म मूढपणातून जन्माला येते. ज्ञानी मूढ नसतो म्हणून तो संसारात राहून सुशोभित जीवन जगतो. अज्ञानीसुद्धा त्याच संसारात राहून दुःखी जीवन जगतो. ज्ञानी माणसाची ओळख त्याच्या कर्मावरून नव्हे तर ज्ञानामुळे पटते. अज्ञानी माणूस त्याच्या कर्मावरून ओळखला जातो, कारण तो कर्माच्या संदर्भात जगतो, ज्ञानाच्या नव्हे. ज्ञानी ज्ञानमय होऊन जगतो व कर्मातून अलिप्त रहातो.
नानाविचारसुश्रान्तो धीरो विश्रान्तिमागतः । अनुवाद : - सर्व विचारांच्या परिशीलनाने थकल्यावर जो धैर्यशील पुरुष शांती प्राप्त करतो तो कशाचीही कल्पना करत नाही, तो काहीही माहित करून घेत नाही. तो काही ऐकत नसतो व काही पहात नसतो. विवेचन : - अज्ञानी माणूस जगातील भोग भोगतो. जेंव्हा तो शरीर व इंद्रियांच्या भोगांनी तृप्त होतो तेंव्हा त्याला त्यात आनंद मिळत नाही व जेंव्हा त्याला ते निरस वाटू लागतात तेंव्हा संन्यास घेतो. वस्तुतः संन्यास हा संसारातील अनुभवांचे सार व अर्क आहे, त्याची निष्पत्ति आहे. तोच खरा संन्यास असतो. संसाराचा अनुभव प्राप्त केल्याशिवाय घेतलेला संन्यास हा वरुन लादलेला व कच्चा संन्यास आहे. तो कधीही डळमळीत होऊ शकतो. खरे तर संन्यास घेतला जात नसतो तो आपोआप घडून येतो. संन्यास हे कार्य नसून ती एक अनुभूती आहे. उत्तमोत्तम, श्रेष्ठ व उन्नत जीवनाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. असाच संन्याशी आत्म-ज्ञानाचा अधिकारी असतो व तोच शांती प्राप्त करू शकतो. याचप्रमाणे बुद्धिजीवी सुद्धा अनेक प्रकारच्या विचारात अडकलेला असतो. हे जग, संसार, कर्म, भोग, अध्यात्म, ईश्वर, परमात्मा, आत्मा वगैरे अनेक विषयांचे अध्ययन, अभ्यास, मनन व चिंतन करतो. अनेक शास्त्रे वाचतो. भजन-कीर्तन व ज्ञानी पुरुषांची प्रवचने ऐकतो, ज्ञान-चर्चा करतो, सिद्ध पुरुषांजवळ जाऊन चर्चा व सल्ला-मसलत करतो परंतु त्यापैकी कशातही त्याला शांती मिळत नाही. उलट तो या गुंतागुंतीत अडकत जातो. या गोष्टी केल्याने त्याला सत्य प्राप्त होत नाही कारण सत्य तर एकच आहे व असत्य अनेक आहेत. प्रत्येक व्यक्तिचे आपापले असत्य असते. असत्ये सर्व खाजगी व व्यक्तिगत असतात. पण सत्य एकच व सर्वांचे असते. सर्वांचे सत्य एकच असते. ते कुणाच्या बापाची जहागीर नाही, न त्याचा कोणी मालक आहे. म्हणून सत्याचे कधीच संप्रदाय बनत नाहीत. सर्व संप्रदाय हे असत्याचे बनतात. संप्रदायाचा आधारच असत्य, हक्क दर्शवणे, अहंकार, स्वार्थ, संकुचितपणा हे आहेत. जेथे संप्रदाय आहे तेथे सत्य नाही. संप्रदायात सत्याचा अभाव असतो, जेथे सत्य आहे तेथे संप्रदाय नसतो. म्हणून अष्टवक्र स्वामींचा संप्रदाय झाला नाही. सत्य चोविस कॅरेटचे सोने मानले तर संप्रदायात ते चौदा कॅरेटचेच शिल्लक रहाते. एवढी भेसळ झाली आहे. सत्यात हिंदू, मुस्लिम, खिश्चन, शिख, स्त्री, पुरुष, वेद, गीता, बायबल असे भेद असत नाही. सर्व तत्वज्ञानी व विचारवंत या रहस्याची संपूर्ण माहिती प्राप्त करण्यासाठी विचारांचा व बुद्धिचा रस्ता पकडतात पण भेद शिकवणारी, शंकाग्रस्त बुद्धि या रहस्याचा उलगडा करू शकत नाही. आत्म-ज्ञानाशिवाय शांती कधीच मिळत नाही. म्हणून अष्टवक्र स्वामी म्हणतात की जो सर्व विचारांचे अवगाहन करून, अभ्यास करून थकला तो शांतीच्या रस्त्यावर पोहचतो. ज्याचा विचारांचा, बुद्धिचा मोह फिटला तोच विचारांच्या फसव्या व उलट सुलट उत्तरांच्या चक्रव्यूहातून मुक्त होतो व त्यालाच आत्मज्ञानाचे फळ प्राप्त होते आणि ते कधीही मूढ मिळवू शकतच नाही. तो सर्व विचारांपासून दूर असतो व आत्म्याच्या अनुभवापासूनही दूर असतो. म्हणून ज्याने संसाराचा भोग घेतला आहे व ज्याने सर्व विचारांचा धुंडोळा घेतला आहे, त्यालाच आत्मज्ञान प्राप्त होते. ज्याने संसाराची ओळख करून घेतली नाही, तो परमेश्वराला कसा काय जाणू शकेल ? जो संसाराला सदैव दुःख समजून रडत राहिला तो परमात्म्याची प्राप्ती झाल्यावर सुद्धा आनंदित होऊ शकणार नाही. त्याला तर रडायचीच सवय लागली आहे. म्हणून तो सर्व स्थितीत फक्त रडू शकतो, तक्रार करू शकतो. ज्ञानी पुरुष पूर्णतया शांत असतो, तो सर्व स्थितीत शांततेचा अनुभव घेतो. एकदा आत्मरूपात विलिन झाल्यावर ज्ञानी पुरुष अन्य कशाची कल्पना करत नाही, अन्य कशातही आपले म रमवत नाही, न तो काही ऐकतो, न तो काही पाहतो. तो फक्त आत्मा आणि आत्माच पाहतो.
असमाधेरविक्षेपान् न मुमुक्षुर्न चेतरः । अनुवाद : - महाज्ञानी पुरुष शंका-इच्छा विरहित व समाधीरहित असल्यामुळे मुमुक्षू वर्गातला नसतो तसेच मुमुक्षू नसणार्यांपैकीही नसतो. सर्व संसार हा कल्पना असल्याचे खात्रीपूर्वक जाणून तो केवळ ब्रह्मस्वरूपात जगतो. विवेचन :- चित्ताच्या चंचल वृत्तींमुळेच इच्छा, शंका, विक्षेप निर्माण होतात. हे विक्षेप अशांतीला जन्म देतात. या चित्तवृत्ती शांत करण्यासाठी उपासना व व्रते केली जातात. ज्ञान-प्राप्ती करिता मुमुक्षु व्यक्ति चित्त वृत्ती शांत करण्यासाठी समाधीचा माध्यम म्हणून अवलंब करतात. परंतु ज्ञानी व्यक्तिच्या वृत्ती आधीच शांत झाल्यामुळे तो विक्षेपातून मुक्त असतो, त्याला समाधीची आवश्यकता नसते. असा ज्ञानी मुमुक्षु असणाऱ्यांपैकी नसतो व. मुमुक्षु नसणाऱ्यांपैकीही नसतो, कारण जे प्राप्त करण्यासाठी साधना करावयाची ते तर त्याला आधीच प्राप्त झालेले असते. त्याच्यासाठी हे जग केवळ कल्पनामय असते. तो ब्रह्मस्वरूप होऊन जगतो.
यस्यान्तः स्यादहंकारो न करोति करोति सः । अनुवाद : - ज्याच्या अंतःकरणात अहंकार आहे तो कर्म करीत नसला तरी कर्म करीत असतो व ज्याचे अंतःकरण अहंकारशून्य झाले आहे, तो धैर्यशील पुरूष कर्म करूनसुद्धा कर्म करीत नसतो. विवेचन : - अहंकारच सर्व पापांचे मूळ आहे. त्यामुळेच मनुष्य स्वतःला ईश्वरापेक्षा स्वतंत्र मानतो. त्यामुळेच त्याच्यात कर्तेपणाचा 'मी करतो' अशा वृत्तीची भावना असते, कर्तेपणाच्या याच भावनेमुळे तो सर्व कर्मफलाचा भोक्ता व अधिकारी होतो. जर अहंकार नष्ट झाला तर माणूस कर्तेपणाच्या जबाबदारीतून मुक्त होतो, मग तो सर्व कार्ये ही ईश्वराची समजून करेल व स्वतःला केवळ निमित्तमात्र समजेल. आत्मज्ञानीच असे मानतो की ही कर्मे शरीराद्वारे केली जातात, मी आत्मा आहे, शरीर नाही म्हणून ही कर्मे करणारा मी नव्हे. तो त्या कर्मांचा भोक्तासुद्धा नसतो. याउलट अज्ञानी माणूस कर्म करीत नसूनही कर्म करीत असतो कारण शरीरामार्फत केली जाणारी कर्मे त्याने थांबवली तरी त्याचे विचार सतत सुरू असतात, कार्ययोजना मनात जन्म घेत असते. सत् व असत् वृत्ती तर विद्यमान असतातच. पण अहंकार सुद्धा असल्यास हे विचार व भावनाच व्यक्तिला बंधनकारक होतात. कर्म करत नसल्याने त्या विचारांचा नाशही होत नाही. म्हणून २४ तास कर्म न करणारा सुद्धा कर्म करीत असतो. म्हणून मुक्तिसाठी कर्माचा त्याग करण्याची गरज नसून कर्तेपण व अहंकार सोडण्याची गरज आहे.
नोद्विग्नं न च सन्तुष्टमकर्तृ स्पन्दवर्जितम् । अनुवाद : - मुक्त पुरूषाचे चित्त उद्वेगशून्य, संतोष-रहित, कर्तव्य-रहित, स्पदनेरहित, आशाशून्य व शंकाशून्य असते व ते तसे शोभून दिसते. विवेचन : - मुक्त पुरूषाचे चित्त पूर्णतया शांत होते. सर्व प्रकारची द्वंदे मिटतात व त्यामुळे ज्याच्या चित्तात उद्वेग, संतोष, आशा, शंका यापैकी कशालाही जागा नसते. त्याची सर्व कर्मे विवेकपूर्ण व स्वाभाविकपणाने होणारी असतात. त्याचे मन अहंकारामुळे किंवा अन्य एखाद्या चित्तवृत्तीमुळे आवेशात येऊन कोणतेही कर्म करण्यास उद्युक्त होत नाही. सर्व कर्मे करूनसुद्धा तो त्या कर्मांपासून अलिप्त-अस्पर्शित रहातो. असा चित्तवृत्तीशून्य झालेला पुरूष शोभून दिसतो.
निर्ध्यातुं चेष्टितुं वापि यच्चित्तं न प्रवर्तते । अनुवाद : - "मुक्त पुरूषाचे मन ध्यान किंवा अन्य प्रयत्न करण्यास प्रवृत्त होत नाही. पण तो कोणत्याही निमित्ताशिवाय व उदिष्टाशिवाय ध्यान धारणा व कर्मे करतो." विवेचन : - 'मी करतो' ही भावना म्हणजेच आपणच कर्ता असल्याची भावना केवळ अहंकार आहे. अहंकारच सर्वप्रथम उद्दिष्ट ठरवतो व नंतर कर्म करण्यास प्रवृत्त होतो. उद्दिष्ट नसलेले कर्म अहंकार करूच शकत नाही. त्याला तर प्रत्येक कर्माचे फळ त्याच्या वासनापूर्तीसाठी हवेच असते. फळाची आकांक्षा नसलेले कर्म करणे तो व्यर्थ समजतो. अशा कामाची त्याच्या लेखी काहीच किंमत नसते. ज्या कर्मामुळे पैसा मिळत नाही, सुख मिळत नाही, आनंद मिळत नाही, त्या कर्माला तो कर्मच समजत नाही. त्याकरिता वेळ खर्च करणे तो वेळ वाया घालवण्यासारखे समजतो. असा माणूस जीवनाची किंमत पैसे, मानसन्मान, प्रतिष्ठा या बाबींनी मोजतो. या बाबी मिळाल्या तर जीवन धन्य झाले. मेल्यावर प्रेतयात्रेत हजार माणसे असली तर जीवन सफल झाले ! जर मेल्यावर एकटाच असला तर म्हणतात की कुत्र्याचे मरण आले. जर हजारो माणसांना श्राद्धाचे, बाराव्याचे जेवण घातले तर म्हणतात की स्वर्गात गेला. अज्ञानी माणसांनी याप्रमाणे आपापल्या कसोट्या निश्चित केल्या आहेत. त्याप्रमाणे तो सर्व काही बाबी प्रयत्नांनी प्राप्त करण्याची धडपड करतो. कोणत्या तरी निमित्ताने व कोणत्या तरी उद्दिष्टानेच तो प्रयत्न करण्यास प्रवृत्त होतो. उद्दिष्टाशिवाय तो ध्यानधारणा सुद्धा करणार नाही. ध्यानधारणा असो किंवा अन्य प्रयत्न असो ज्ञानी पुरुष मात्र त्यापासून दूर असो. कारण त्याला कोणत्याच फल प्राप्तीची इच्छा नाही. तो ध्यान किंवा अन्य कर्म करतो तेंव्हा ते स्वाभाविकपणे कोणत्याही इच्छेशिवाय, धडपडीशिवाय, कोणत्याही उद्दिष्टाशिवाय व सहजपणे करतो.
तत्त्वं यथार्थमाकर्ण्य मन्दः प्राप्नोति मूढताम् । अनुवाद : - मंदबुद्धि माणूस नेहमी क्षुद्र वासनांच्या विळख्यात सापडलेला असतो. त्यामुळे त्याला व्यक्तिगत स्वार्थाशिवाय दुसरे काहीच दिसू शकत नाही. त्याचे सारे लक्ष शरीर पोषणाकडे लागलेले असते. इंद्रियांचे उपभोगाशिवाय अन्य कोणत्याही बाबीत त्याला स्वारस्य नसते. अशा संकुचित मनोवृत्तीच्या माणसाला शाश्वत सत्याची माहिती दिली तरी ती ऐकून तो मूढच रहातो. आत्मज्ञानाचा तत्वबोध अत्यंत सूक्ष्म बाबींचे विवेचन करणारा असून तो स्थूल बुद्धिच्या माणसाला कसा काय कळणार ? ज्याचे चित्त वासनाग्रस्त आहे अहंकारी आहे, इच्छा आकांक्षाने भरलेले आहे तो या तत्वबोधाला सुद्धा विकृत करून टाकेल. ज्याप्रमाणे विषामधे अमृत मिसळले ते अमृतसुद्धा विष होते, त्याचप्रमाणे मूढ माणसाला तत्वबोध सांगूनही तो वाया जाणार. याउलट ज्ञानी माणूस वरपांगी मूढ असल्यासारखा दिसत असूनही स्वतःतील चैतन्यशक्ति जाणून समाधी लावतो. बाह्यांगी मात्र ज्ञानी माणूस क्ष असल्यासारखा व्यवहार करतो कारण आपली अनुभूती प्रगट केल्याने कार्यात बाधा येईल हे तो जाणतो. तो ती अनुभूती प्रगट करू इच्छित नाही कारण तिच्या प्रदर्शनामुळे अहंकार वृद्धिंगत होऊ शकतो.
एकाग्रता निरोधो वा मूढैरभ्यस्यते भृशम् । अनुवाद : - चित्तवृत्तींचा निरोध करण्यासाठी व एकाग्रता साधण्यासाठी अज्ञानी माणूस बरेच प्रयत्न करतो, परंतु ज्ञानी पुरूष निद्रिस्त व्यक्तिप्रमाणे आपल्या स्वभावानुसार शांत रहातो व तो काही करू शकतो असेही दिसत नाही. विवेचन : - आत्मज्ञानासाठी कोणतीही विशिष्ट उपासना पद्धती स्विकारावी लागत नाही. काहीतरी खटपट करून कुणाला आत्मज्ञान प्राप्त झाले नाही. बुद्धाने सहा वर्षे खूप वेगवेगळे प्रयत्न केले पण त्याच्या हाती काहीच लागले नाही व सर्व करणे सोडले तेंव्हा त्याला ज्ञान प्राप्ती झाली. मिळायला फार वेळसुद्धा लागत नाही. राजा जनकाला ज्याप्रमाणे एका क्षणात आत्मज्ञान झाले त्याप्रमाणे एका क्षणात त्याची प्राप्ती होते. काहीतरी प्रयत्न केल्याने ते प्राप्त होते ही समजूतच खोटी आहे. ज्ञान प्राप्तीसाठी करावे काही लागत नाही फक्त जागृत होऊन पाहण्याची आवश्यकता आहे. सजगता सावधनता व बोध पुरेसा आहे. जे तुम्ही हरवलेलेच नाही ते शोधणार कसे ? जे आपल्याच आत आहे, त्याचा शोध कशाचा ? जो आपलाच स्वभाव आहे त्याच्यासाठी प्रयत्न काय करायचे ? परंतु सारे प्रयत्न असतात ते अंतःकरणाच्या शुद्धीसाठी. जोपर्यंत चित्त निर्मल व शुद्ध होत नाही तोपर्यंत आत्म्याची जाणीव होऊ शकत नाही. म्हणून अज्ञानी साधक चित्तवृत्तींचा निरोध करण्यासाठी किंवा एकाग्रतेसाठी वेगवेगळ्या प्रकारची साधना करतात. पुन्हा पुन्हा त्याचा अभ्यास करतात कारण मन मोठे चंचल आहे. पुन्हा पुन्हा प्रयत्नपूर्वक एकाग्र केल्यावरही मन विषयवासनांकडे पुन्हा पुन्हा ओढ घेते. विषय वासनांकडे मन वळू नये म्हणून प्रयत्न करण्यातच खूप काल वाया जातो. एकदा मन एकाग्र झाले व जागृत झाले तर ज्ञानप्राप्रीसाठी वेळ लागत नाही. म्हणून मुनिश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी म्हणतात की अज्ञानी माणूस एकाग्रतेसाठी व चित्त निरोध साधण्यासाठी बरेच प्रयत्न करतो. परंतु ज्याचे चित्त शांत झाले आहे, त्याला काहीच करावे लागत नाही. तो झोपलेल्या माणसाप्रमाणे आपल्या स्वभावानुसार स्थिर व शांत असतो. कारण आत्मस्वरूपात विलिन झाल्यावर करण्यासाठी त्याच्यासाठी काहीच शिल्लक रहात नाही.
अप्रयत्नात्प्रयत्नाद्वा मूढो नाप्नोति निर्वृतिम् । अनुवाद : - प्रयत्न करून अथवा न करून अज्ञानी माणसाच्या चित्तवृत्ती निवृत्त वा शांत होत नाहीत पण ज्ञानी पुरूष केवळ तत्वाच्या अन:क्तणपूर्वक बोधामुळेच सर्व चित्तवृत्तीच्या पाशातून मुक्त होतो. विवेचन : - या सूत्रात अष्टवक्र स्वामी आत्मज्ञान प्राप्तीबद्दलचे एक महत्त्वपूर्ण सूत्र स्पष्ट करतात. चित्ताच्या वृत्ती-प्रवृत्ती असंख्य असतात. त्या एकेक करून सोडण्याने कोणतेही यश प्राप्त होत नाही. शिवाय या सर्व वृत्ती म्हणजे झाडाच्या पानांप्रमाणे आहेत. मूळ आहे ते अहंकार व वासना. अहंकार व वासना कायम राहिल्या तर केवळ वरवरची पाने तोडल्याप्रमाणे एकेक चित्तवृत्ती सोडली तर ती दुसर्या रूपात प्रगट होत रहाते. मुळांना पाणी घालत राहिल्यावर पाने तोडल्याने फार काही साध्य होतच नाही. म्हणून अष्टवक्र स्वामी म्हणतात की अज्ञानी व्यक्ति कितीही प्रयत्न खुशाल करो त्याच्या चित्तवृत्ति कधी शांत होत नाहीत. कारण त्याच्या आतील वासना तशाच शिल्लक आहेत. याविरुद्ध ज्ञानी माणूस आत्मतत्वाच्या बोधामुळेच सर्व वासना व चित्तवृत्तीच्या पाशातून मुक्त होतो. त्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागत नाही व कोणतीही साधना करावी लागत नाही.
बुद्धं प्रियं पूर्णं निष्प्रपंचं निरामयम् । अनुवाद : - या जगात अभ्यासू व्यक्ति शुद्ध, बुद्ध, प्रिय, संपूर्ण, प्रपंच-विरहित आणि दुःख-विरहित असलेल्या आत्म्याला जाणू शकत नाही. विवेचन : - आत्मा शुद्ध आहे. निखालस विशुद्ध आहे. त्याच्यात विकृती वा दोष नाहीच. तो बोधस्वरूप आहे. तो स्वतः ज्ञान आहे. त्याला जाणून घेण्यासाठी बाह्यज्ञानाची आवश्यक्ता नसते, तो प्रिय, पूर्ण, प्रपंचरहित व दुःखरहित आहे. हा अशा स्वरूपाचा आत्मा हाच आपला मूळ स्वभाव आहे. केवळ गफलतीमुळे आपण शरीर, मन, अहंकार यांनाच आपला स्वभाव समजत असतो. तो केवळ भ्रम आहे. आत्म्याला जाणून घेण्यासाठी हा भ्रम नाहीसा करण्याची गरज आहे. अन्य कोणत्याही साधनेचा उपयोग होत नाही. संसारात जे लोक अभ्यास करून आत्मा जाणून घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना कधीच आत्म्याचे ज्ञान होत नाही.अभ्यासामुळे अहंकार वाढतो चित्त-वृत्ती शांत होण्याऐवजी अजून वाढतात व त्यामुळे अभ्याससुद्धा एक बंधनच झाले असल्याचा अनुभव येतो. भ्रम मिटल्यानेच आत्मज्ञान प्राप्त होते. सर्व अभ्यास सोडून, चित्त शांत करून, वासना व अहंकाराचा त्याग केलेल्या अवस्थेत आत्म्याची अनुभूती होते.
नाप्नोति कर्मणा मोक्षं विमूढोऽभ्यासरूपिणा । अनुवाद : - अभ्यास कर्मामुळे अज्ञानी माणसाला मोक्ष प्राप्ती होत नाही. याउलट क्रियाशून्य ज्ञानी पुरूष केवळ ज्ञानामुळे मुक्त होऊन जगतो. विवेचन : - आत्मा आपला स्वभाव आहे हे फक्त आपण ओळखायचे आहे. ज्याने आत्म्याला जाणले त्याने ब्रह्म जाणले व तो शुद्ध विशुद्ध झाला यात शंका नाही. नंतर करण्यासारखे काही शिल्लक रहात नाही. सर्व भ्रम नष्ट होतात, सर्व बंधने तुटून जातात. हीच मुक्ति आहे. अज्ञानी साधक अभ्यास करून ही बंधने तोडण्याचा प्रयत्न करतो. पण बंधने प्रत्यक्षात नसून केवळ भ्रम आहेत, अज्ञानामुळे आहेत. त्यामुळे अभ्यास निरर्थक आहे. ज्ञानप्राप्तीनंतर सारी बंधने आपोआप गळून पडतील. जो भ्रम आहे तो नाहीसा होईल. 'स्व' -स्वरूपात विलिन होणे हा मोक्ष आहे. पाण्यावर तरंगण्यासाठी अभ्यास करावा लागतो. बुडण्यासाठी नाही. येथे सुद्धा स्व-रूपात बुडून जायचे आहे. फक्त उडी घेण्याचे साहस मात्र हवे. नंतर सर्व आपोआप होत जाईल. आत्मज्ञान व मोक्षासाठी समर्पण वृत्तीने स्वतःला सोडून देण्याची आवश्यकता आहे. निराधार होण्याची गरज आहे. अभ्यास, साधना सारे काही त्यजून स्वतःला समर्पित करावयाचे आहे. पुढची प्रक्रिया आत्म्याचे अस्तित्वाद्वारे पार पडेल. हेच आत्मज्ञान आहे, हीच मुक्ति आहे. प्रयत्नांनी विविध क्रियांनी बाह्यज्ञान प्राप्त होतें. आत्म-ज्ञानाचा रस्ता अ-क्रियेचा आहे.
मूढो नाप्नोति तद् ब्रह्म यतो भवितुमिच्छति । अनुवाद : - अज्ञानी माणूस ' ब्रह्मस्वरूप ' होण्याची इच्छा बाळगूनही ' ब्रह्म ' होऊ शकत नाही. पण ज्ञानी पुरूष त्याची इच्छा नसूनही परब्रह्माचा उपासक होतो. विवेचन : - अष्टवक्र स्वामी म्हणतात की सिंहाचे पिल्लू बकऱ्या-मेंढ्यांच्या कळपात वाढले तर स्वतःला मेंढी बकरी समजू लागते. त्याला भ्रम होतो की तो एक बकरी आहे. पण जेंव्हा तो नदीच्या पाण्यात आपला चेहरा पाहतो व जेव्हा त्याला रक्ताची चव कळते तेंव्हा त्याचा बकरी असण्याचा भ्रम नष्ट होतो. त्याचे सिंहत्व जागृत होते. त्यासाठी त्याला कोणतेही प्रयत्न करावे लागत नाही. केवळ आपल्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त झाल्याने त्याचा बकरीचा भ्रम नष्ट होतो. त्याचप्रकारे ज्ञानी माणसाने आपले 'स्व' रूप जाणल्यावर त्याचे भ्रम आपोआप नाहीसे होतात, व तो स्वतःच ब्रह्म होतो. जीव ब्रह्म होत नाही तर तो आधीही ब्रह्मच असतो याचे फक्त त्याला ज्ञान होते. जर सिंहाचे पिल्लू खरच बकरी असेल तर लाख कष्ट करून, योगाभ्यास करून, साधना करूनही तो सिंह होऊ शकत नाही. अष्टवक्रसुद्धा हेच सांगतात की अज्ञानी माणूस ब्रह्म होण्याची इच्छा करूनही ब्रह्म होऊ शकत नाही. जर तो ब्रह्म नाहीये तर केवळ इच्छा करूनही तो ब्रह्म होऊ शकणार नाही. परंतु ब्रह्म आहे याच एका कारणामुळे त्याने आपले सत्य स्वरूप जाणले तर तो ब्रह्म होईल. त्यासाठी साधना, अभ्यास करावे लागत नाही. केवळ अन्तःकरण पूर्वक जाणल्याने भ्रम नाहीसे होतात. म्हणून इच्छा नव्हे तर निश्चय असण्याची गरज आहे.
निराधारा ग्रहव्यग्रा मूढाः संसारपोषकाः । अनुवाद : - ह्या आधारशून्य, दुराग्रही जगाचा पोषक (आधार) पुरुषच असतो. ह्या अनर्थकारी संसाराच्या मूळाचा छेद ज्ञानी व्यक्तिंनी केलेला आहे. विवेचन : - येथे संसाराचा अर्थ बाह्य व भौतिक जगाशी नाही. आपणच आपल्या विचारांमुळे, वासनेमुळे, इच्छांमुळे जो राग, द्वेष, घृणा, ईर्ष्या निंदा, हिंसा, अहिंसा, तृष्णा, मोह यांचे जे जग निर्माण केले आहे ते जग आधारशून्य आहे. त्याचा कोणताच भक्कम व शाश्वत टिकाऊ आधार नाही. हे आपले मनाचे भ्रम, दुराग्रह व माया आहे. आपल्याच खोट्या आग्रहांमुळे आपल्याला जगात सुख-दुःख, हर्ष-खेद यांचा अनुभव येतो. जर आपले दुराग्रह व पूर्वग्रह शांत झाले तर या जगांत सुद्धा आपल्याला शांतिचा अनुभव येईल. आपल्या दुराग्रहामुळेच संसार अनर्थकारी होतो, निरर्थक होतो व त्याचा कोणताच उद्देश, हेतू उरत नाही. पण या अनर्थाच्या मूळांचा छेद ज्ञानी पुरुष आपल्या ज्ञानाने करतो कारण त्यालाच वास्तवतेचा, सत्याचा शोध लागलेला असतो. म्हणून ज्ञानी मुख्य या अनर्थाला सर्व मोह व आसक्तिचे मूळ समजून त्याचा छेद करून आपला संबंध आत्म्याशी जोडून सुखाने व शांतीने जगतो. परंतु अज्ञानी माणूस या ज्ञानाच्या अभावात या आधारशून्य व अनर्थकारी संसाराचेच पोषण करीत बसतो. आत्मानंदाच्या अभावात तो विषयांच्या आनंदालाच सुख मानतो. जेंव्हा व्यक्तिला ज्ञान प्राप्ती होते तेंव्हाच ती आत्मानंदाची प्राप्ती करून विषयांतील आनंदाला गौण समजून त्यांचा त्याग करते.
न शान्तिं लभते मूढो यतः शमितुमिच्छति । अनुवाद : - शांत होण्याची इच्छा बाळगूनही अज्ञानी पुरुष शांत होत नाही. पण ज्ञानी पुरुष तत्व-बोधामुळे सदैव शांत मानसीकतेचा असतो. विवेचन : - शांती ही प्रयत्नांनी मिळणारी गोष्ट नाही. अज्ञानी शांत होण्यासाठी प्रयत्न करतो. पण शांत होण्याच्या इच्छेमुळेच चित्तात तरंग निर्माण होतात व त्यातून नवी अशांती निर्माण होते. चित्तात कोणत्याही इच्छा, शंका, आकांक्षा व विक्षेप निर्माण न होणे म्हणजेच शांती प्राप्त होणे आहे. ज्याचे चित्तात कोणताही विक्षेप व कोणताही तरंग नसतो. त्यालाच आत्मज्ञानाचा अनुभव प्राप्त होऊ शकतो व तोच पुरुष सदैव शांत मनाचा असतो. द्वंद्वरहित होऊन, सम भाव चित्तात बाळगून सर्वत्र एकाच आत्म्याचा अनुभव घेतल्याशिवाय शांती प्राप्त होत नाही. इच्छा करणे हे तर अशांतीचे कारण आहे.
क्वात्मनो दर्शनं तस्य यद् दृष्टमवलम्बते । अनुवाद : - जो केवळ दृश्य पदार्थांनाच सत्य समजतो त्याला आत्म्याचे दर्शन कसे होणार ? धैर्यशील पुरुष जे दिसते तेच सत्य मानत नाही. ते अविनाशी आत्म्याचेच दर्शन घेतात. विवेचन : -अज्ञानी माणूस फक्त वस्तूंना, पदार्थांना पाहतो. त्यांच्या आतील आत्मा तो पाहू शकत नाही. इंद्रियें केवळ स्थूल स्वरूपच पाहू शकतात, ' सूक्ष्म ' त्यांच्या आवाक्याबाहेर रहाते. याच प्रकारे सामान्य जनसुद्धा केवळ पदार्थच पाहतात परंतु शास्त्रज्ञ त्या पदार्थांच्या आतील उर्जासुद्धा पाहू शकतात. अज्ञानी म्हणतात पदार्थ आहे पण शास्त्रज्ञ म्हणतात की पदार्थ हा भ्रम आहे, सर्व काही उर्जा आहे. पदार्थ हा उर्जेचा रूप आहे. याचप्रकारे केवळ दृश्य पदार्थांनाच सत्य मानणाऱ्यांना आत्म्याचे दर्शन होऊ शकत नाही, कारण आत्मा स्वतःच द्रष्टा (पाहणारा) आहे. डोळे हे केवळ माध्यम आहेत, एक साधन आहेत, ते कुणालाही पाहू शकत नाहीत. मेंदू सुद्धा कुणाला पाहू शकत नाही. ही सर्व उपकरणे म्हणजेच साधने आहेत. पाहणारा तर आत्मा आहे. म्हणून ज्ञानी पुरुष केवळ दृश्य पदार्थ पहात नाहीत तर त्या अविनाशी आत्म्याला पाहतात कारण आत्म्यामुळेच सर्व जग दिसू शकते. अज्ञानी केवळ दृश्य पदार्थच पहात असतो. खरा द्रष्टा असलेल्या आत्म्याचे ज्ञान हाच धर्म आहे.
क्व निरोधो विमूढस्य यो निर्बन्धं करोति वै । अनुवाद : जो अज्ञानी हट्टाने चित्तवृत्तींचा निरोध करतो त्याच्या चित्तवृतींचा निरोध होणे कसें शक्य आहे ? 'स्व' रूपात मग्न झालेल्या धैर्यशील पुरुषासाठी चित्तवृत्तिंचा निरोध ही स्वाभाविक गोष्ट आहे. विवेचन : - निरोध ही स्वाभाविक गोष्ट असते. प्रयत्न करणे म्हणजे ते मनाचे कार्य आहे. जसे वाईट काम मनामुळे होते तसेच चांगले काम सुद्धा मनामुळेच होते. भोग जसा मनामुळे होतो तसाच त्यागसुद्धा मनामुळे होतो. संसाराची आसक्ति जर मनाची आहे तर मोक्षाची आसक्ति सुद्धा मनामुळे आहे. जोपर्यंत 'मन' आहे, इच्छा आहेत, तो पर्यंत शांती मिळू शकत नाही. मनाचे पोषण कर्मातून होते. कर्माशिवाय मन राहू शकत नाही. म्हणून अष्टवक्र म्हणतात की जे हट्टाने चित्त वृत्तिचा निरोध करतात ते तो मनामुळेच करतात, त्यामुळे चित्तवृत्तिचा निरोध होत नाहीच उलट मन अधिक बळकट होते. अहंकार वृद्धिंगत होतो. स्वाभीमान दृढ होतो. यामुळे अज्ञानी माणसाला कधी शांती मिळत नाही. पण ज्याने आत्म्याचे स्वरूप ओळखले आहे त्याला चित्तवृत्तिचा निरोध करावा लागत नाही तर ती त्याची स्वाभाविक अवस्था असते म्हणून त्याला शांतीही प्राप्त होते. तो इच्छाविरहीत स्वतःतच रममाण असतो. त्याला हट्टाने काही करावे लागत नाही. आत्मज्ञानानेच वृत्ती शांत होतात. प्रयत्न केल्याने नव्हे.
भावस्य भावकः कश्चिन् न किंचिद् भावकोऽपरः । अनुवाद : - काही जण ' भावरूप ' असल्याचे मानतात. काही जण ' काहीच नाही ' असे मानणारे आहेत. तसेच काही जण दोन्ही मते मानणारे आहेत. तसेच काही जण .दोन्हीही नाकारणारे आहेत व तेच स्वस्थ शांत चित्ताचे आहेत. विवेचन : - काही लोक ईश्ववराला भावरूप मानतात. काही जण केवळ अभावरूप शून्य असल्याचे मानतात. अस्तिक म्हणतो ईश्वर आहे तर नास्तीक म्हणतो परमात्मा अस्तित्वातच नाही. परंतु अष्टवक्र म्हणतात की दोघेही अज्ञानी आहेत. कारण या दोघांचीही बुद्धिवादी मान्यता व समजूत आहे. दोघांनीही 'जाणलेले' असे काहीच नाही. दोघेही रूढीवादी आहेत, परंपरावादी आहेत. परमात्मा तर एवढा विराट व अंतहीन आहे की बुद्धिच्या क्षुद्र मयदित तो सामावणे शक्य नाही. बुद्धि त्याला जाणू शकत नाही. तसेच वाणीही त्याचे वर्णन करू शकत नाही. ईश्वर आहे किंवा नाहीच या दोन्हीही बुद्धिच्या घोषणा आहेत. ज्यांनी ईश्वराला जाणलेले नाही व तरीही ईश्वर आहे असे म्हणतात ते अज्ञानी आहेत. ज्याने खरोखर जाणले असते ते मौनवृत्ती धारण करतात कारण त्यांना ते अभिव्यक्त करणे अवघड होते. म्हणून खरा ज्ञानी पुरुष ईश्वर आहे म्हणत नाही किंवा ईश्वर नाही असेही म्हणत नाही. तो दोन्ही भूमिकांत तटस्थ रहातो. कोणतेही आग्रहपूर्ण वळ वा विधान तो करत नाही. व असा ज्ञानी पुरुषच परम शांती प्राप्त करून स्वस्थ व शांत चित्ताने जगतो. कोणतीही एक भूमिका घेतल्याने विवाद निर्माण होतो. तकनि ईश्वराचे अस्तित्व असल्याचे सिद्ध करता येत नाही तसेच ईश्वर नसल्याचे सुद्धा तर्काने सिद्ध करता येत नाही.
शुद्धमद्वयमात्मानं भावयन्ति कुबुद्धयः । अनुवाद : - कुबुद्धि पुरुष शुद्ध अद्वैत आत्मा असल्याची भावनिक समजूत करून घेतात परंतु मोहपाशांमुळे त्याला जाणू शकत नाहीत म्हणून आयुष्यभर ते सुखापासून वंचित राहतात. विवेचन : - सुख हे ज्ञान प्राप्ती नंतर मिळणारे फळ आहे. अज्ञानी माणसाला ज्ञानाच्या अभावात सुख कसे मिळणार ? अज्ञानी माणूस कितीही पक्की समजूत करून घेवो की, आत्मा आहे, परमात्मा आहे, संसार खोटा आहे, मायारूप आहे, तरीही त्याला सुखाचा लाभ होऊ शकत नाही. कारण केवळ समजूत करून घेण्याने सुख मिळत नाही. सुख होते ते सत्य जाणल्याने. परंतु कुबुद्धिचा पुरुष संसाराच्या सर्व मोहपाशात अडकलेला असतो. त्यामुळे तो आंतून जाणून घेण्यास असमर्थ असतो आणि केवळ ढोंग म्हणून शुद्ध अद्वैताची इच्छा बाळगतो. जगात असे अनेक लोक आहेत की जे चोरी करतात, बेईमानी करतात, असत्य, क्रोध, लोभ, अज्ञान व दुराग्रह यांच्या चिखलात स्वच्छेने फसलेले असतात पण तेच तोंडाने मात्र याविरुद्ध बोलून व्रत घेतात की चोरी करणार नाही, खोटे बोलणार नाही वगैरे. लाखो रूपयांची चोरी करून केवळ काही हजार रूपये मंदिराला दान करून दानशूर म्हणून मिरवतात. ईश्वराची पूजा सुद्धा स्वतः करण्यापेक्षा दुसऱ्याला पैसे देऊन करवून घेतात. पूर्णपणे अश्रद्ध असूनही अद्वैताच्या गप्पा करतील. व्रत घेऊन त्याच्या आड आपली चोरी व बेईमानी लपविण्याचा प्रयत्न करतील. पण हे तर ढोंग आहे. ह्या ढोंगामुळे काहीच साध्य होत नाही. स्वतःची दृष्टी व रूप, यांत पूर्ण परिवर्तन घडविणे हाच धर्म आहे. केवळ वरपांगी समजूत करून घेऊन तोंडाने तशी बडबड केल्याने काही होत नाही. प्रत्यक्ष बोध व्हावा लागतो, तेंव्हाच शांती-सुख लाभते.
मुमुक्षोर्बुद्धिरालम्बमन्तरेण न विद्यते । अनुवाद : - मुमुक्षू व्यक्तिची बुद्धि ( अन्य क्रियांवर) अवलंबून असते, अशा अवलंबनाशिवाय ती राहू शकत नाही. मुक्त पुरुषाची बुद्धि निष्काम व कशावरही अवलंबून नसते. विवेचन : - मनाला नेहमी आधार हवा असतो. आधाराशिवाय ते जीवंतच रहाणार नाही. जर त्याला परमात्म्याचा आधार मिळाला तर ते तृप्त होते. पण तो आधार मिळाला नसला तर ते तृप्तीसाठी विषयांकडे धाव घेते. बुद्धिसुद्धा आधार शोधते. अशा आधाराच्या अवलंबनाशिवाय कोणताही विचार शक्य नाही. म्हणून मुमुक्षू व्यक्तिसुद्धा पूजा-पाठ, यज्ञ, पंडित, शास्त्र, मंदिर, परमात्मा या सर्वांचा आधार घेत असते. परंतु मुनीश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात की जो पर्यंत आधार आहे मग तो कशाचाही का असेना - तोपर्यंत मुक्ति नाही. कारण असे अवलंबन, आधार हे सुद्धा बंधन आहे. उद्देश प्राप्तीनंतर सर्व आधार, अवलंबन यांचा त्याग करावा लागतो तरच व्यक्ति निष्काम व निरावलंबी होते. बुद्धि व मनाची अशी अवस्था हीच मुक्ति. मुक्त पुरुष कशावरही अवलंबून नसतो व एकाच आत्म दर्शनात तो समर्पित व एकरूप झालेला असतो.
विषयद्वीपिनो वीक्ष्य चकिताः शरणार्थिनः । अनुवाद : - विषय वासनारूपी वाघाला पाहून भयभीत झालेला मनुष्य आश्रयाच्या शोधात त्वरीत चित्तनिरोध आणि एकाग्रतेच्या प्राप्तीसाठी पर्वतांच्या गुहांत प्रवेश करतो. विवेचन : - विषयांमुळे संसारी माणूस घाबरत नाही. तो तर त्यांचा उपभोग घेतो. हे विषयसुख अल्पकाळच टिकणारे असले तरी व्यक्ति ते उपभोगून तृप्तिचा आनंद मिळवते. जो शाश्वत टिकणारा आहे, चिरस्थायी आहे असा आनंदसुद्धा असतो याची त्याला कल्पनाच नसल्यामुळे तो जे क्षणिक आहे; अल्पकाळ टिकणारे आहे त्याच्याच उपभोगाने संतुष्ट होतो. सुख-दुःख, हर्ष-खेद जे काही मिळेल तेच त्याचे भाग्य आहे असे समजून त्याचा उपभोग घेतो परंतु ज्याची आत्मज्ञानाची चिकित्सा तीव्र होते तो या विषयांमुळे भयभीत होतो. तो या विषयांना वाघ समजून त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एकांतातल्या एखाद्या पर्वतातील गुहेत प्रवेश करतो. याप्रमाणे तो जगापासून दूर पळतो. असा अज्ञानी माणूस समजतो की जगापासून दूर पळून गेल्याने, एकांतात रहाण्याने चित्त वृत्तींचा निरोध होईल, एकाग्रता प्राप्त करण्यात यश येईल व त्यामुळे त्याला आत्मज्ञान प्राप्त होईल. परंतु हा तर त्याचा भ्रम असतो. विषयांबद्दल आकर्षण वाटण्याचे कारण मनांत असलेली वासना आहे व तिच्यामुळेच विषयसुखाकडे मन धाव घेते. जग हे कारण नाही. त्यामुळे जगापासून पळून दूर गेल्यामुळे वासना नष्ट होणार नाही. जेंव्हा मनातली वासना शांत होईल तेंव्हाच निरोध करणे शक्य होईल. त्यामुळे भयभीत होऊन पळून जाण्यापेक्षा जागरूकपणे पाहून, साक्षीभावाने पाहून तसेच बोध ज्ञानाच्या प्रकाशात पाहून वृत्तींचा निरोध करणे शक्य होईल. अन्यथा दुसरा कोणता उपाय नाही.
निर्वासनं हरिं दृष्ट्वा तूष्णीं विषयदन्तिनः । अनुवाद : - वासनाशून्य अशा पुरूष सिंहाला पाहून विषयरूपी हत्ती चूपचाप पळून जातो किंवा त्याची प्रशंसा करीत त्याची सेवा करू लागतो. विवेचन : - मुनीश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी म्हणतात की विषयांना घाबरून पळून जाण्यानें मनातले भय तसेच कायम रहाते. स्वप्नात, समाधित किंवा ध्यानधारणेत या भयामुळे पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता असते. त्यामुळे विषयांपासून दूर पळून जाण्याने, जंगलात जाण्याने प्रश्न सुटणार नाही पण वासनाशून्य होणे हाच त्यावरचा एकमात्र उपाय आहे. वासनाच आकर्षण निर्माण करते. वासना नष्ट झाली तर आकर्षण सुद्धा आपोआप नाहीसे होईल. मग चित्तनिरोध करण्यासाठी जंगलात पळून जावे लागणार नाही किंवा डोंगरातल्या गुहात जावे लागणार नाही. जगात-संसारात राहून ही सिद्धी घरबसल्या उपलब्ध होऊ शकते. मुनीश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात की जरी विषय हे हत्तीप्रमाणे बलवान असले तरी व त्यांना सहजगत्या काबूत आणता येत नसले तरी वासनाशून्य पुरूष हा सिंहाप्रमाणे आहे. त्याला पाहून हे विषय चूपचाप पळून जातात किंवा एवढे दुर्बल होतात की चमचेगिरी करणाऱ्या नोकराप्रमाणे त्याची सेवा करू लागतात. ज्ञानी माणूस विवेकाने त्यांचा उपयोग करतो पण अज्ञानी माणसावर मात्र विषय हुकमत गाजवतात. हाच दोघात फरक असतो. वासनाशून्य होणे हेंच सर्वाधिक महत्त्वाचे आहे.
न मुक्तिकारिकान्धते निःशङ्को मुक्तमानसः । अनुवाद : - शंकारहित आणि मुक्त मनाचा पुरूष मुक्तिकारी योगाचा म्हणजेच यम-नियमांचा स्विकार करण्याचा आग्रह धरत नाही परंतु पाहतांना, ऐकतांना स्पर्श करतांना, खातांना तो सुखाने जगतो. विवेचन : - ज्याच्या सर्व वासना फिटल्या, ज्याच्या सर्व वृत्ती शांत झाल्यात, ज्याला आता काहीही प्राप्त करण्याची कामना उरलेली नाही अशी आत्म-ज्ञान प्राप्त केलेली व्यक्तिच शंका कुशंकारहित व मुक्त मनाची असते. मनाच्या बंधनातून मुक्त झाल्यामुळे, सर्व द्वंद्वांच्या पार होऊन अशी व्यक्ति केवळ आत्म-रूपात विलिन होऊन जगत असते. त्याचे सर्व आग्रह नष्ट होतात. अहंकार गळून पडल्यामुळे कर्तव्यकर्म केल्याचा अभिमानसुद्धा वाटत नाही. मुक्तिसाठी आवश्यक असणाऱ्या यम नियमांचासुद्धा त्याचा आग्रह नसतो, ते तर स्वभावतःच त्याच्या अंगी बाणलेले असतात. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह हे पाच नियम योगी लोक आग्रहपूर्वक पाळतात. पण ज्ञानप्राप्ती नंतर ज्ञानी पुरूषाचा स्वभावच असा बनतो की त्याला ह्या नियमांचे पालन करण्यासाठी कोणतीच जबरदस्ती करावी लागत नाही. कोणताही आग्रह न बाळगता, पहाणे,ऐकणे, स्पर्श करणे, जेवणे वगैरे सर्व इंद्रियाची कर्में यथावत करत ज्ञानी पुरूष शांतीपूर्वक जगतो.
वस्तुश्रवणमात्रेण शुद्धबुद्धिर्निराकुलः । अनुवाद : - यथार्थ शुद्ध तत्वबोधाचे केवळ श्रवण केल्यामुळे बुद्धि शुद्ध झालेला स्वस्थ व शांत चित्ताचा पुरूष आचार, अनाचार किंवा उदासिनता ह्या कशाकडेही पहात नाही. विवेचन : - आचार आणि अनाचार, उदासिनता व कर्मठता ह्या गोष्टी अज्ञानी माणसांसाठी आहेत. मनामुळे हे सर्व भेद निर्माण होतात. परंतु आत्मज्ञानी पुरूष स्वस्थ व शांत चित्ताचा व शुद्ध बुद्धिचा होत असल्याने त्याच्याकडून कोणतेही कर्म झाले तरी तो ते कर्म पूर्ण जागरूकपणे आणि विवेकानेच करेल. त्याचे कर्मांत स्वार्थ, वासना किंवा अहंकार नसल्यामुळे तो जे कर्म करेल ते शुभ व समाजाला स्वास्थ्य देणारे असते. त्याचे कर्मात विकार नसतात. अष्टवक्र स्वामी म्हणतात की असा तत्त्वबोध केवळ ऐकण्यामुळेही होऊन शकेल पण त्यासाठी अंतःकरण शुद्ध पाहिजे. जर शुद्ध अंतःकरणाने ऐकणे कुणाला शक्य असेल तर जप-तप पूजापाठ, भजन-पूजन, ध्यान-धारणा, समाधि, कर्मयोग, हठयोग, भक्ति वगैर कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नसते. केवळ श्रवण केल्यामुळे सर्वकाही प्राप्त होते. वासना व बंधने यामुळे जगाचे अस्तित्व जाणवते. अन्यथा जग हा केवळ भ्रम आहे, अंधःकार आहे व ज्ञान प्रगट झाल्यावर तो आपोआप नाहीसा होतो. प्रयत्न करावा लागत नाही. कोणत्याही कर्मकांडाची गरज नाही.
यदा यत्कर्तुमायाति तदा तत्कुरुते ऋजुः । अनुवाद : - शुभ वा अशुभ कर्मे करण्याचा प्रसंग येतो तेंव्हा धैर्यशील पुरूष ती कर्मे सहजपणे पार पाडतो. कारण त्याचा व्यवहार बालकाप्रमाणे असतो. विवेचन : - बालक व ज्ञानी पुरूष ह्यांच्यात थोडी समानता असते. बालक मनाच्या स्वभावानुसार तर ज्ञानी फक्त स्वभावानुसार जगतो. लहान मूल स्वतःच्या सर्व इच्छा पूर्ण करू इच्छिते. बुद्धिचा विकास झालेला नसल्याने शुभ वा अशुभ असा भेद मूल करू शकत नाही. बुद्धिच भेद निर्माण करते. परंतु ज्ञानी मनाच्या नव्हे तर आत्म्याच्या स्वभावानुसार जगतो. मन आणि बुद्धिचे अडथळे ज्ञानी पुरूषाने पार केलेले असतात. बुद्धिचा उपयोग तो विवेकाने करतो. म्हणून ज्ञानी पुरूष शुभ-अशुभ असा भेद करत नाही. तो आपल्या आत्म्याच्या स्वभावाला जे अनुकूल असेल, आवश्यक असेल तेवढे कार्य बालकाप्रमाणे करतो. त्यात कोणत्याही प्रकारच्या दुराग्रह नसतो. असाच ज्ञानी पुरूष शांतीपूर्वक सुखाने जगतो.
स्वातंत्र्यात्सुखमाप्नोति स्वातंत्र्याल्लभते परम् । अनुवाद : - धैर्यशील पुरूष स्वतंत्रतेमुळे सुख प्राप्त करतो. स्वतंत्रतेमुळे श्रेष्ठ तत्व प्राप्त करतो, स्वतंत्रतेमुळे नेहमी सुखात जगतो व स्वतंत्रतेमुळे श्रेष्ठ पदी विराजमान होतो. विवेचन : - आत्म-ज्ञानी सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतो. वासना, कामना, तृष्णा, अहंकार यामुळे मनुष्याभोवती बंधने निर्माण होतात. ह्या बंधनांमुळे त्याला विषयांची गुलामगिरी सहन करावी लागते. त्यामुळेच सुख-दुःख, हर्ष-खेद ह्या भावनांचा जन्म होतो, तीच त्याची कर्मबंधने होतात व तो ती अनेक वर्षे भोगत रहातो. आत्म-ज्ञानाशिवाय त्यातून सुटका होत नाही. ज्ञानी पुरूषच ह्या तत्वाला आत्मसात करून सर्व बंधनातून मुक्त होऊन परम श्रेष्ठ सुख प्राप्त करतो. बंधनातून मुक्त होणे हीच स्वतंत्रता आहे, तीच मुक्ति आहे. सिद्धशिलेवर बसणे ही मुक्ति नाही कारण तीथेच बसणे व अन्यत्र न जाणे हे एक बंधनच होते. जिथे सक्तिने रहायचे असते तो तर तुरूंग असतो, त्यात स्वातंत्र्य कुठले आले ? परम् पद् तर स्वातंत्र्य आहे व तेच श्रेष्ठ सुख आहे. जीवाची सर्वात शेवटची ही अवस्था असते.
अकर्तृत्वमभोक्तृत्वं स्वात्मनो मन्यते यदा । अनुवाद : - जेंव्हा मनुष्य आपल्या आत्म्याचे अ-कर्तेपण व अभोक्तेपण जाणतो तेंव्हा त्याच्या सर्व चित्तवृत्तिंचा नाश होतो. विवेचन : - " मनुष्य कर्ता नाही व भोक्ताही नाही. तो कर्म करत नाही व त्याचे फळही भोगत नाही. मनुष्य पापी नाही. त्याच्याकडून पाप होऊच शकत नाही " - अशी वेदांताची घोषणा आहे. परंतु मनुष्य अहंकारामुळे स्वतःला आत्म्यापेक्षा व ब्रह्मापेक्षा वेगळा समजू लागला. या अहंकारजन्य भ्रमामुळे तो स्वतःला कर्ता समजू लागला. कर्ता मानू लागल्याने तो भोक्ताही झाला. हेच त्याचे पाप आहे. ज्या क्षणी तो आपल्या शरीरापेक्षा, मन व अहंकारापेक्षा स्वतःला वेगळे व केवळ आत्मरूप मानू लागेल त्या क्षणी तो कर्ताही होत नाही व भोक्ताही रहात नाही, त्याचेकडून पापही होत नाही व पुण्यही होत नाही. आत्मज्ञानात त्याच्या सर्व चित्तवृत्ती शांत होतात. त्याचा अहंकार गस्त जातो. 'मी'पणा संपुष्टात येतो. मग कोण कर्ता व कोण भोक्ता हे सांगणेही कठीण होते. आत्म-ज्ञानाच्या स्थितीतच हे असे घडण्याची शक्यता आहे. अन्यथा त्याचे कर्तेपण व भोक्तेपण शिल्लक राहील व त्यामुळे तो पापपुण्याचा भागीदार राहील.
उच्छृंखलाप्यकृतिका स्थितिर्धीरस्य राजते । अनुवाद : - ज्ञानी पुरूषाची स्वाभाविक उच्छृंखल स्थितीसुद्धा शोधून दिसते. पण स्पृहायुक्त (इच्छा-आकांक्षायुक्त) मनाच्या मूढ व्यक्तिची ढोंगी शांती शोभून स्थित नाही. विवेचन : - मनुष्यात इच्छा आहेत, वासना आहेत. या वासनेमुळेच त्याला हे शरीर प्राप्त झाले आहे. जर या संसारात काही भोगल्याची, काही करण्याची इच्छाच नसती तर त्याला हे शरीर मिळालेच नसते. मातिचा कुंभ तेंव्हाच तयार केला जातो जेंव्हा त्यात काही भरायचे असते. जर भरायचे काहीच नसेल तर कुंभ (रांजण किंवा भांडे) तयारच केले जाणार नाही. इच्छा, वासना हे मनाचे गुण आहेत. या वासनेमुळेच जगाचे अस्तित्व आहे. वासनेमुळेच मनुष्य सारे रचनात्मक व विध्वंसात्मक कार्य करतो. जगाची आज जी काही स्थिती आहे ती वासनेमुळेच आहे. म्हणून वासना हीच संसार आहे. तिच्याशिवाय काही मिळत नाही. जेथे इच्छा-वासना आहेत, तेथे धावाधाव आहे, हिसका-हिसकी आहे. संघर्ष आहे, हिंसा आहे फार काय सर्व निर्माण कार्य ही सुद्धा वासना (स्पृहा) आहे. परंतु आध्यात्मिक लाभ इच्छा-मुक्त झाल्यावरच पदरात पडतो, तेंव्हाच आत्म-ज्ञान होते व शांती मिळते. इच्छा शिल्लक असतांना शांतीची आशा धरणे म्हणजे मृगजळ आहे. त्यात तहान कधी भागत नाही. जर कुणी वासनाधारी म्हणेल की मी शांत झालो आहे, मला आध्यात्मिक शांती प्राप्ती झाली आहे तर ते त्याचे केवळ ढोंग आहे. ती शांती दिखाऊ आहे. पाखंडी वृत्तीने केलेली शांतीची जाहिरात आहे. अर्धा तास कसेतरी ध्यान लावले, थोडा वेळ गायत्री मंत्र जप केला व कोणत्या तरी आश्रमात बसून सांगू लागले की मला शांती प्राप्ती झाली तर ती शांती नसतेच, ते लोकांना फसविणे आहे, ढोंग आहे. जे शांत असल्याचे सांगूनही आतून अशांत आहेत त्यांची शांती केवळ बाहेरची, पृष्ठभागावरची आहे व तिचा केंव्हाही भंग होऊ शकतो. या उलट ज्ञानी पुरुष इच्छामुक्त झाल्याने खरी आध्यात्मिक स्वभावाची प्रगाढ शांती प्राप्त करतो. कारण अशांतीचे कारण जी इच्छा, वासना होती तीच नाहीशी झाल्यामुळे तो आता परम शांत असतो. त्याची शांती स्वाभाविक असते. असा ज्ञानी माणूस शरीराच्या वा निसर्गाच्या स्वभावानुसार उछृंखलता करेल तरी त्याला ती शोभून दिसते. स्वामी रामकृष्ण परमहंसांनी उच्च भावावस्थेत सर्वजण ब्रह्म आहेत या भावनेत भिकाऱ्याला वाढलेले अन्न खाल्ले होते. ज्ञानी माणसाच्या उच्छृंखलतेतही कोणताही विकार नसतो, तिच्यात कोणतीच वासना वा इच्छा नसते. आतली घाण लपविण्यासाठी अनेक जण बाह्यांगी आवडंबर माजवून ती लपवू पाहतात पण आतूनच निर्मळ झाल्यावर बाह्यांगी शिष्टाचाराची सुद्धा ज्ञानी पुरूषांना बंधने उरत नाहीत.
विलसन्ति महाभोगैर्विशन्ति गिरिगह्वरान् । अनुवाद : - सर्व कल्पनांचा त्याग केलेला, बंधन-रहित आणि मुक्त बुद्धिचा धैर्यशील पुरूष काही वेळा अनेक महान सुखांचा उपभोग घेत त्या सुखांशी क्रिडा करतो आणि काही वेळा पर्वतांच्या गुहांमधे रहातो. विवेचन : - ज्या ज्ञानी पुरूषाची इच्छा-तृप्ती झाली आहे, त्याला कोणतीच इच्छा उरलेली नाही, ज्याच्यात कोणतीच वासना नाही, जो कल्पना व बंधने यातून मुक्त आहे तो मुक्त-चित्त असलेला धैर्यशील पुरूष मोठ मोठ्या सुखांचा उपभोग घेत, त्यांचेसमवेत क्रिडा करीत सुद्धा त्यांचेपासून पूर्णतया अस्पर्शी, अलिप्त रहातो. एखादा खेळ खेळल्याप्रमाणे किंवा नाटक केल्याप्रमाणे साऱ्या क्रिडा करूनही त्या केवळ साक्षी भावाने भोगतो. काही प्रसंगी आवश्यक तेव्हा तो पर्वतातल्या गुहांत सुद्धा तेवढ्याच सहजपणे राहू शकतो. दोन्ही प्रकारच्या स्थितीमधे तो अनाग्रही असतो. दोन्ही परिस्थितीबद्दल त्याचे मनात समभाव असतो. ज्या व्यक्तिचा काही तरी भोगण्याचा, किंवा काहीतरी सोडण्याचा, त्याग करण्याचा आग्रह असतो, तो सर्व नियम व संयम यात स्वतःला बंदिस्त करून कार्य करतो, जो सिद्धान्त- रूढी- परंपरा- प्रथांप्रमाणे वागतो तो तर स्वतंत्रतेपासून शेकडो मैल दूर असून बंधनग्रस्त आहे. ज्ञानी पुरूष सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होऊन केवळ आत्मरूपात रममाण होऊ स्वच्छंदपणे स्व-स्वभावानुसार कार्य करतो.
श्रोत्रियं देवतां तीर्थमङ्गनां भूपतिं प्रियम् । अनुवाद : - धैर्यशील पुरूषाच्या हृदयात पंडित, देवता आणि तीर्थक्षेत्र यांची पूजा करण्यामुळे किंवा राजा, स्त्री व प्रिय व्यक्ति यांच्या दर्शनामुळे कोणतीही वासना निर्माण होत नाही. विवेचन : - अज्ञानी माणसाची इच्छा-वासना सदैव अतृप्त असते. ज्ञानाच्या वासनापूर्तीसाठी तो विद्वानांकडे जातो. धन, यश व पुत्रप्राप्तीसाठी देवतांची पूजा करतो, प्रार्थना करतो. आपली पापे धुतली जावी म्हणून तीर्थक्षेत्रांची यात्रा करतो. मंदिरात जाऊन अभिषेक करतो, अर्चना करतो, वारंवार प्रणाम करतो. स्त्रीला पाहून काम-मोह जागृत झाल्याने तो तिची अभिलाषा मनी धरतो. राजाची भाटगिरी करतो, मंत्र्यांच्या मागे मागे फिरतो की काहीतरी पद, निवडणूकीचे तिकीट मिळेल. प्रियजन भेटल्यावरही त्यांच्यामुळे कोणता स्वार्थ पूर्ण करून घेता येईल याचाच विचार त्याच्या मनांत असतो. अष्टवक्र स्वामी सांगतात की धैर्यवान पुरूष सुद्धा स्त्रिया, राजा किंवा तिर्थक्षेत्रे पहातो. पण त्यांच्यापासून त्याला काहीच मिळवायचे नसल्यामुळे, त्याच्या मनात कोणतीच वासना निर्माण होत नाही. जे मन वासनायुक्त असते तेच विकारी असते. ज्ञानीपुरूष हा या भौतिक जगापासून काहीच अपेक्षा ठेवत नसल्याने कुणाच्याही दर्शनाने त्याच्या मनात कोणतीच वासना निर्माण होत नाही.
भृत्यैः पुत्रैः कलत्रैश्च दौहित्रैश्चापि गोत्रजैः । अनुवाद : - नोकर, मुले, पत्नी, नातेवाईक व बांधवांनी उपहासाने हसून धिक्कार केला तरीही योगी माणूस विकारवश होत नाही. विवेचन : - अज्ञानी माणूस वासनाग्रस्त व अहंकारी असतो. वासनेमुळेच त्याला मोह होतो व ह्या मोहाची पूर्ती न झाल्यास त्याला क्रोध येतो. मान-सन्मानाची इच्छा होते याचे मूळ कारण अहंकारच असतो. जर मान-सन्मान मिळाला नाही, कुणी तिरस्कार केला, अपमान केला, उपेक्षा केली तर त्याच्या अहंकारावर आघात होतो,त्यामुळे तो संतप्त होतो व त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न करतो. द्रौपदीनें कौरवांना उद्देशून, 'आंधळ्याची मुले आंधळीच असतात' असे उद्गार काढले तेंव्हा कौरवांना स्वाभिमान दुखावला गेला व ते चवताळून उठले. त्याचाच परिणाम पुढे महाभारताचे युद्ध होण्यात झाला. जगात या अहंकाराच्या प्रतापामुळेच अनेक संघर्ष व उलाढाली झाल्या आहेत. ज्याला या अहंकाराला शांत करण्याची युक्ति व कला अवगत आहे तो आपले काम सहजगत्या साध्य करून घेऊ शकतो. पापाच्या मुळाशी जसा अहंकार असतो तसेच पुण्याच्या मुळाशी सुद्धा अहंकार होता. जो योगी पुरूष अहंकारापासून मुक्त झाला तो पापकृत्य करत नाही व तसेच पुण्यकृत्यसुद्धा करत नाही. तो जसा आहे तसाच आपल्या आत्म्याच्या स्वभावात स्थिर असतो. म्हणून मुनीश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी म्हणतात की योगी पुरूष अहंकाररहित झाल्याने आपल्या नोकरांनी, मुलांनी, पत्नीने किंवा बांधवांनी उपहास केला, धिक्कार केला तरी क्रोधीत होत नाही, कोणत्याही विकाराच्या आहारी जात नाही. कारण क्रोध व सर्व मानसिक विकार (लोभ, भय, क्रोध, मत्सर) ह्या सर्वांना जन्म देणारा अहंकारच त्याच्याजवळ शिल्लक नसतो.
सन्तुष्टोऽपि न सन्तुष्टः खिन्नोऽपि न च खिद्यते । अनुवाद : - धैर्यशील पुरूष संतुष्ट होऊनसुद्धा संतुष्ट होत नाही आणि दुःखी होऊन सुद्धा दुःखी होत नाही. त्याच्या या आश्चर्यजनक स्थितीचे ज्ञान त्याच्यासारखेच (अन्य) ज्ञानीच जाणतात. विवेचन : - अज्ञानी व ज्ञानी या अतंर्यामी व बाह्यांगी बराच फरक असतो. अज्ञानीच्या मनात अहंकार, वासना, तृष्णा, लोभ, माया, मोह, मत्सर, क्रोध व हिंसा यासारखे अनेक विकार ठासून भरलेले असतात पण बाहेरून मात्र तो विनम्र, , सहनशील, दयाळू दानशूर, अहिंसक, सेवाभावी, त्यागी असल्याचा मुखवटा लावून फिरतो. बाहेरून तर अज्ञानी माणूस शांत, सुखी व प्रसन्न दिसतो पण आतून तेवढाच अस्वस्थ, बेचैन व असंतुष्ट असतो. याउलट ज्ञानी माणूस आतून सुद्धा शांत असतो, पूर्ण संतुष्ट असतो. त्याला काही इच्छा नाही व काही अपेक्षा नाही. त्याला तर जे सर्वश्रेष्ठ आहे, तेच लाभले आहे. आता मिळविण्यासाठी त्याच्यासाठी काहीही शिल्लक नाही, म्हणून तो तृप्त आहे. परंतु ही प्रगाढ तृप्ती काही तो बाहेर दाखवत नाही. इतरांप्रमाणेच सर्व कर्मे करतांना तो असा दिसतो की जणू काही त्यालासुद्धा काही तरी प्राप्त करण्याची इच्छा आहे, त्याला सुद्धा सन्मान हवा आहे. बाहेरून चिंतीत दिसला तरी तो न कशाने दुःखी होतो न कशाने चिंताग्रस्त होतो- ज्ञानी माणसाची अशी स्थिती इतरांसाठी आश्चर्यजनक असते व या स्थितीचे खरे ज्ञान त्याच्याप्रमाणेच ज्ञानी असणाऱ्या दुसऱ्या आत्मरूप पुरूषालाच होऊ शकते. अज्ञानी केवळ त्याची बाह्य कर्मेच पाहू शकतो. त्याची आतली ज्ञानमय अवस्था फक्त दुसऱ्या ज्ञानी माणसाला उमजते.
कर्तव्यतैव संसारो न तां पश्यन्ति सूरयः । अनुवाद : - संसार हा कर्तव्यरूप आहे. ( वासनेच्या अभावामुळे) शून्याकार, ( आत्म-रूपामुळे) निराकार, विकारशून्य व दुःखशून्य झालेला ज्ञानी पुरूष कर्तव्याची दखल घेत नाही, त्याकडे पहात नाही. विवेचन : - मुनीश्रेष्ट स्वामी अष्टवक्र म्हणतात की हा संसार म्हणजे कर्तव्याचेच रूप आहे. संसारात राहिल्यावर कर्तव्य करावेच लागते. कर्तव्य न करता कुणी संसारात राहू शकत नाही. ह्या संसाराला जे काही रूप प्राप्त झाले आहे ते आपल्या कर्तव्यामुळेच. कर्तव्य म्हणजे करण्यायोग्य कृत्य. अर्थातच ज्ञानी पुरूष ते पार पाडतच असतो. पण ते करण्यामागे ज्ञानी माणसाचा आग्रह नसतो किंवा फळाची अपेक्षाही नसते. संसारी माणूस कर्तव्य करतांना चांगले -वाईट, शुभ-अशुभ, निंदा-स्तुती या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच कर्तव्य करतो. त्याच्या कर्तव्यामागे संकल्प असतो, अहंकार असो, म्हणून तो त्या कर्माची फळे (चांगली किंवा वाईट) भोगतो. कर्तव्याची गती स्वर्गापर्यंत आहे. सत् कृत्ये करून तो स्वर्गसुख मिळवू शकतो, परंतु मुक्तिसाठी ते बाधक आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला हेच सांगितले की तू क्षत्रिय आहेस, युद्ध करणे तुझे कर्तव्य आहे. जर युद्धात मारला गेलास तर स्वर्गात जाशील जर जिंकलास तर पृथ्वीवर राज्य भोगशील. पण असे नाही सांगितले ती तू मुक्त होशील. कारण मुक्तिचा मार्ग या कर्तव्यमार्गापेक्षा भिन्न आहे. जो मुक्त होतो तो या जगातूनच मुक्त होतो असे नाही तर स्वर्गातूनही मुक्त होतो. स्वर्गात उपभोग आहेत पण तेथे सुद्धा इच्छा आहे, वासना आहे, ऐश्वर्याची आकांक्षा आहे म्हणून इंद्र व देवसुद्धा त्रस्त आहेत. कधीकधी इंद्राचे सिंहासन पुण्याच्या जोरावर या जगातल्या महात्म्यांनी हलविले आहे तर कधी असूरांचा उपद्रव होतो. त्यांनासुद्धा शांतता मिळत नाही. केवळ ज्ञानी पुरूषच वासनामुक्त असल्याने पूर्ण मुक्तिद्वारा शांतिचा धनी होतो. वासना नसल्यामुळे शून्याकार, आत्मरूप असल्याने निराकार, निर्दोष व दुःखरहित असल्यामुळे तो जगाकडे कर्तव्याच्या दृष्टीने न पाहता केवळ एखाद्या अभिनेत्याच्या दृष्टीने पाहतो. तो केवळ परमात्म्यालाच कर्ता मानतो. ज्याला हे सत्य उमजत नाही तोच कर्तव्याच्या बाता करतो. कर्तव्य, संकल्प, मनोबल, महत्वाकांक्षा, संघर्ष, विजय, त्यासाठी धावाधाव हे सर्व वासनेत अडकलेल्या माणसाचे वर्णन व लक्षण आहे.
अकुर्वन्नपि सङ्क्षोभाद्व्यग्रः सर्वत्र मूढधीः । अनुवाद : - अज्ञानी माणूस कर्मे करीत नसतांना सुद्धा इच्छा, अहंकार व वासना यामुळे विक्षोभ होऊन व्याकुळ होतो. ज्ञानी पुरूष सर्व कर्मे करीत असूनसुद्धा शांतचित्त असतो. विवेचन : - स्वामी अष्टवक्रांचे म्हणणे असे नाही की ज्ञानी कर्म करत नाही, किंवा तो आळशी व अकर्मण्यवादी असतो. ज्ञानी मंदिरात मठात जातो, एकांतात बसतो, ज्यांनी त्याला ओळखले ते त्याची सेवा करतात असे नसून उलट तो कर्तव्यनिष्ठ होऊन, फळाची आकांक्षा सोडून कर्म करतो. हेच कर्मातले सौंदर्य आहे. हीच कर्मातली कुशलता आहे. गीतेत म्हटले आहे की 'योगामुळेच कर्मात कुशलता येते.' पैश्याकरिता व स्वतःचे सुखाकरिता कार्य करणाऱ्यांच्या कर्मात किती कुशलता असते ? ज्ञानी माणसाची कर्मे व अज्ञानी माणसाची कर्मे असा भेद करून अष्टवक्र स्वामी म्हणतात की अज्ञानी माणूस जर तत्व-बोध ऐकून कर्म करणे सोडून देईल तर त्याला मुक्ति म्हणता येणार नाही. त्याला आळशी म्हणावे लागेल. बाह्यतः कर्मत्याग केल्यावर सुद्धा त्याचे मनात संकल्प-विकल्प, इच्छा-शंका-कुशंका, ह्या रहातातच. जोपर्यंत मनातले हे संकल्प व शंका शांत होत नाहीत तोपर्यंत मुक्ति मिळणार नाही. त्याविरूद्ध ज्ञानी माणसाचे सर्व विक्षेप शांत झालेले असतात म्हणून सर्व प्रकारची कर्मे करीत असतांना सुद्धा तो अशांत होत नाही. हीच कर्मातली कुशलता आहे जी फक्त योगी पुरुषच प्राप्त करू शकतात. म्हणून जग सोडणे किंवा कर्मत्याग करणे म्हणजे मुक्ति नसून अज्ञान नष्ट करून, चित्त शांत करून, इच्छा-वासना व अहंकार यांच्या विळख्यातून बाहेर पडणे म्हणजेच मुक्ति आहे.
सुखमास्ते सुखं शेते सुखमायाति याति च । अनुवाद : - शांत बुद्धीचा ज्ञानी पुरुष व्यवहारात सुखपूर्वक वावरतो सुखकारक वृत्तीने येतो व मृत्यु पावतो, सुखाने बोलतो व सुखाने भोजन करतो.
विवेचन : - मनुष्य बाह्यतः जो व्यवहार करतो ते त्याच्या मनांत सुरू असलेल्या विचारांचे प्रतिबिंब असते. अशांत मनाचा माणूस बसण्यात, येण्या-जाण्यात, बोलण्यात अगदी जेवण करतांना सुद्धा अशांत व अतृप्त असतो.
स्वभावाद्यस्य नैवार्तिर्लोकवद्व्यवहारिणः । अनुवाद : - जो ज्ञानी पुरुष व्यवहारात सामान्याजनांप्रमाणे (फलाकांक्षेमुळे) व्यवहार करत नाही आणि महासरोवराप्रमाणे क्लेशशून्य असतो, तोच शोभून दिसतो. विवेचन : - ज्ञानी व अज्ञानी दोघेही याच जगात राहून सर्व व्यवहार करीत असतात परंतु अज्ञानी माणसाचे सर्व कर्म व व्यवहार त्याचा अहंकार, वासना व इच्छा यांनी प्रेरीत झालेला असतो व त्यामुळेच त्यातून दुःख निर्माण होते. परंतु ज्ञानी माणूस कर्म करूनसुद्धा त्यातून अलिप्त रहातो. केवळ क्रिडा केल्याप्रमाणे कर्म करतो. फलाची आकांक्षा नसल्यामुळे त्या कर्मामुळे दुःख निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कर्म करण्यातच ज्ञानी माणसाचा आनंद सामावलेला असतो. फलाकांक्षा नसतेच. पण अज्ञानी माणसाच्या कर्माशी इच्छा व फळाची आकांक्षा जोडलेली असल्यामुळे त्यातून दुःख निर्माण होते. अष्टवक्र स्वामी सांगतात की ज्ञानी पुरुष हा एखाद्या विशाल सरोवरासारखा शांत मनाचा असतो व क्लेशमुक्त असतो. म्हणून सामान्यजनांप्रमाणे व्यवहार न करूनसुद्धा सर्व प्रकारचे क्षोभ व क्लेश यातून ज्ञानी पुरुषाची आपोआप सुटका होते. अज्ञानी तेच कर्म, तोच व्यवहार करून दुःखी होतो. व्यवहारात व कर्मात अधिकाधिक अडकत जाण्यामुळे केवळ दुःखात वाढ होते.
निवृत्तिरपि मूढस्य प्रवृत्ति रुपजायते । अनुवाद : - मूर्ख मनुष्याची निवृत्तीसुद्धा प्रवृत्तीरूप होते परंतु धैर्यशील पुरुषाची प्रवृत्तीसुद्धा निवृत्तीप्रमाणे फलदायी ठरते. विवेचन : - प्रवृत्ती व निवृत्तीच्या स्वरूपाकडे लक्ष वेधीत या सूत्रात अष्टवक्र स्वामी सांगतात की मूर्ख मनुष्य या ऐहिक जगातील सुखोपभोगाची साधने सोडून देऊन, घर-दार, पत्नी मुले वगैरेंचा त्याग करून जंगलात निघून जाईल, स्त्री-घोडे, हिरे-जवाहर, महाल-माड्या हे सर्व सोडून भगवी वस्त्रे घालून संन्याशी होऊन जाईल, केस काढून मुंडण करून, अंगावर भस्माचे पट्टे ओढून घेईल, तरीसुद्धा हे सर्व करण्यात त्याचा अहंकार, वासना, अज्ञान व मूढपणा असतोच. त्यामुळे ही निवृत्ती नसून प्रवृत्तीच असते. मी त्याग करतो, मी हे करतो, मी ते करतो ही प्रवृत्ती 'मी' पासून उद्भवलेली असते. हे सर्व करण्यामागे काहीतरी मिळविण्याची जोपर्यंत इच्छा आहे, तोपर्यंत ही प्रवृत्तीच आहे. ज्याने घर सोडून आश्रम स्थापन केला, संसार सोडू मोक्षाची इच्छा धरली, ऐहिक सुखे सोडून आश्रम स्थापन क्रेला, संसार सोडून मोक्षाची इच्छा धरली, ऐहिक सुखे सोडून स्वर्ग व मुक्तिची नवी वासना स्विकारली यामुळे तो निवृत्त झाल्याचे भासू लागले तरी त्यातल्या वासनेमुळे तो प्रवृत्तीच आहे. संसारांचा व्याप सोडून आता तो आश्रमाचा व्याप करेल, तेथील कर्तव्यकर्मे करत बसेल. संसारात जरी सन्मान मिळाला नाही तरी आश्रमात मान-सन्मान प्राप्त करण्याची वासना जास्त तीव्र होईल म्हणून अशा व्यक्तिला निवृत्त म्हणता येणार नाही. याविरुद्ध ज्ञानी पुरुषाचे कर्मात इच्छा, वासना व अहंकार नसल्यामुळे संसारातच राहून प्रवृत्त राहून तो निवृत्तीचे फळ प्राप्त करतो. प्रवृत्ती किंवा निवृत्तीची कसोटी बाह्य विषय नसून आतली वासना आहे.
परिग्रहेषु वैराग्यं प्रायो मूढस्य दृश्यते । अनुवाद : - मूढ माणसाचे वैराग्य ठरविण्यासाठी परिग्रहाची कसोटी वापरतात पण ज्याचे देहभान व देहाची आसक्ति गळून पडली आहे अशा ज्ञानी माणसाचे वैराग्य कसले व रागमयता (अनुरक्ती) कसली ? विवेचन : - वरील सुत्रातील प्रतिपादनाचाच धागा जोडून याही सुत्रात स्वामी अष्टवक्र म्हणतात की परिग्रहाचा म्हणजे संपत्तिचा व तुम्ही ज्याचा संग्रह केला आहे त्याचा त्याग म्हणजे वैराग्य नव्हे. परंतु मूढ पुरुष धन-संपत्ति घर-दार, राज्य-महाल-माड्या ह्यांच्या संग्रहाच्या त्यागालाच वैराग्य समजतो किमती संग्रहाचा त्याग केला अशी कसोटी ठरवून त्यानुसार वैराग्य छोटे की मोठे, सौम्य कां तीव्र हे ठरवितात. जास्त त्याग करेल तो जास्त वैराग्यशील मानतात. पण काहीतरी (भले मग ते मोक्ष-मुक्ति कां असेना) मिळविण्यासाठी त्याग केला तर तो त्यागही नाही व वैराग्यही नाही. तो केवळ स्वार्थ आहे वासना आहे, तृष्णा आहे. जास्त काही प्राप्तीच्या इच्छेने क्षुद्र व कमी बाबीचा त्याग मूर्ख व मूढ माणसेच करत असतात. राग (आसक्ति) व वैराग्य दोन्हीही अज्ञानच आहे. ह्याच्या उलट आत्म-रूपात रममाण झालेल्या ज्ञानी माणसाच्या ह्या संसाराबद्दलच्या अपेक्षा नाहीशा झालेला असतात. संसार, संपत्ति, सुख यांना तो क्षुद्र, नाशवान व क्षणिक मानतो. तो न रागी आहे न विरागी. त्याला कही सोडावे लागत नाही कारण तो कशाचाच संग्रह करत नाही. जी व जशी स्थिती आहे. तीच सुखाची मानून तो जगतो. धन-संपत्ती असणे हे संसारी असल्याचे लक्षण नाही व त्याचा त्याग करणे हेही वैराग्याचे लक्षण नाही. हा तर मूढ माणसांचा विचार आहे. ज्ञानी माणसांचा नव्हे. राग व विराग, आसक्ति व उदासिनता ह्या दोन्हींचा जन्म वासनेमुळे होतो. जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत ज्ञानही मिळत नाही व मुक्तिही मिळत नाही.
भावनाभावनासक्त दृष्टिर्मूढस्य सर्वदा । अनुवाद : - " मूर्ख माणसाची दृष्टी नेहमी भावनेच्या व अ-भावनेच्या विचारात गुंतलेली असते. परंतु शांतीस्वरूप ज्ञानी पुरुषाची दृष्टी भावना-अभावनेने युक्त असूनही त्यांचे प्रति जणू अ-दृष्टि असल्याप्रमाणे असते. विवेचन : - स्वामी अष्टवक्र सांगतात की मूढ पुरुषाची वैचारिक दृष्टि नेहमी भावना व अ-भावना ह्याचेच विचारात अडकलेली असते. त्याला नेहमी ह्याचिच चिंता लागलेली असते की माझ्याजवळ आत्ता किती आहे, अजून किती कमी पडते आहे, कोणत्या प्रकारे भरून काढता येईल ? कुणाला कसे फसवून, कट-कारस्थान करून, बेईमानी करून जास्तिचा पैसा कमवता येईल ? जे आहे त्याचा उपभोग कसा घ्यायचा ? याचाच सदैव विचार सुरू असतो. त्याची सारी बुद्धि, सारी शक्ति ह्यात काय आहे व काय नाही ह्याच्या म्हणजेच भावाच्या व अ-भावाच्या विचारात गुंग असते. ह्यापेक्षा वेगळा विचार तो करू शकत नाही. घाणीच्या बैलाप्रमाणे तो ठराविक जागेतच एकाच खुंट्याभोवती गोल गोल फिरत असतो. तो सुखाने जे आहे त्याचा उपभोग घेऊ शकत नाही व त्याचा त्यागही करू शकत नाही. साप व मुंगुसाप्रमाणे त्याची स्थिती होते परंतु ज्ञानी माणसाची दृष्टी ह्या दोन्ही विचारातून मुक्त असते. काय आहे व काय मी आहे ह्याच्या भावात्मक व अभावात्सक अशा दोन्ही गोष्टींची त्याला चिंता नसते. ह्या दोन्ही बाबीतील मन काढून घेत जे आहे व जेवढे आहे त्यातच तो संतुष्ट असतो कारण या भावात्मक व अभावात्सक विचारांचा जन्म वासनेतून होतो. ज्ञानी माणूस वासनारहित असल्याने ह्या मर्यादा ओलांडून तो पुढे जातो. परिस्थितिनुसार तो भाव व अभाव यांनी ग्रस्त तर असतो पण त्याचे मन व वैचारिक दृष्टी त्यावर कधीच पडत नाही.
सर्वारम्भेषु निष्कामो यश्चरेद्बालवन् मुनिः । अनुवाद : - जो मुनी बालकाप्रमाणे व्यवहार करतो व सर्व कामांची सुरवात वासनाशून्यपणे करतो, त्या शुद्धस्वरूप मुनीला त्यानें केलेले कोणतेही कर्म लिप्त होत नाही. विवेचन : - कर्म बंधन नसून कामना, आसक्ति, इच्छा, अपेक्षा व अहंकार हीच माणसाची खरी बंधने आहेत. कर्म तर ज्ञानी करतो व अज्ञानीसुद्धा करतो. परंतु दोघांच्या करण्यामागची प्रेरणा व दृष्टी वेगवेगळी असते. अज्ञानी माणसाचे कर्म अहंकारातून, 'मी' करतो या कर्तेपणाच्या भावेनेनें होत असते. त्याच्यात आसक्ति, कामना व फळाची आकांक्षा असते, ज्यामुळे ती कर्मे त्याला बंधनकारक येतात. पण ज्ञानी माणसाची कर्मे कामनाविरहितपणे होतात व त्यांचे मागे फळाची आशा नसते. ह्यामुळे त्याची कर्मे त्याला बंधनकारक होत नाही. ज्ञानी माणसाची कर्मे स्वाभाविकपणे होतात व तो एखाद्या बालकाप्रमाणे खेळ खेळल्याप्रमाणे करत असल्यामुळे ती कर्मे त्याला बंधन होत नाही. ज्ञानी पुरुषाचे संचित कर्म नष्ट होतेच. प्रारब्धातील कर्म फलांचा भोग तो भोगतो आणि कामनारहित होऊन, इच्छांचा त्याग करून, तो या जन्मात जे कर्म करतो ते क्रियमाण कर्म (केलेले कार्य) त्याला चिकटतच नाही व ते त्याच्यासाठी बंधन होऊ शकत नाही व त्या कर्माचे फळही त्याला भोगावे लागत नाही. ज्ञानी पुरुषाला सर्वश्रेष्ठ सुख प्राप्त झालेले असते म्हणून कर्मांमुळे प्राप्त होणारे क्षुद्र सुख मिळावे अशी तो इच्छाच बाळगत नाही. अशा इच्छा न ठेवताच तो कर्म करतो. त्याची सर्व कर्मे स्वाभाविकपणे व ईश्वरइच्छेनुसार होतात. तो स्वतःला ईश्वरइच्छा साकार करण्याचे माध्यमच बनवून टाकतो. स्वतःला कर्ता मानणे हेच सर्वात मोठे बंधन आहे.
स एव धन्य आत्मज्ञः सर्वभावेषु यः समः । अनुवाद : - तोच आत्म-ज्ञानी पुरुष धन्य आहे जो आपल्या मनाचे निस्तरीकरण (शून्य-करण) करू शकला आहे व जो पाहतांना, ऐकतांना, स्पर्श करतांना, वास घेतांना, खातांना, सर्व क्रियांतून एकाच भावनेचे स्वारस्य अनुभवतो. विवेचन : - आत्म-ज्ञान प्राप्तीत दोनच मुख्य अडथळे आहेत - शरीर व मन. अज्ञानी माणसांच्या सर्व क्रियांचे संचलन याच दोघांद्वारे होत असते. पण या दोघांच्या पलीकडील तिसऱ्या शक्तिशी ज्ञानी पुरुषाचा संबंध असतो. ही तिसरी शक्ति आत्म्याची आहे जो सर्व जगाकडे व सर्व क्रियांकडे साक्षीभावाने पहातो व तोच सर्व कर्मांची आधारभूत उर्जाशक्ति आहे व तोच सत्य व शाश्वत आहे. अष्टवक्र स्वामी म्हणतात की जो पुरुष या मनाचा अडथळा दूर करू शकला, त्याने मोठीच अडचण जिंकली आहे. जो या मनाची काळनदी (वैतरणी) पार करू शकला तोच आत्म-ज्ञानाचे सुख प्राप्त करू शकतो. असा आत्मज्ञानी पुरुष धन्य होय. मनाच्या सर्व विकारांवर विजय प्राप्त करून ज्याने एका आत्मतत्वाचा अनुभव घेतला तो ज्ञानी इंद्रियांची सर्व कर्मे करतांना (पाहतांना, ऐकतांना, चालताना) एकाच शांती रसाचा आनंद घेतो. ही कर्मे शरीराच्या स्वभावानुसार होतात.
क्व संसारः क्व चाभासः क्व साध्यं क्व च साधनम् । अनुवाद : - आकाशाप्रमाणे सदैव निर्विकल्प असणाऱ्या ज्ञानी पुरूषाला कुठला संसार ? कुठला आभास ? कुठले साध्य ? कुठचे साधन ? ( यातले काहीच त्याचेसाठी नाही.) विवेचन : - हा संसार मनाची निर्मिती आहे. जसे मन असेल. मनात जसे विचार असतील तसे जग दिसते. संसारात रागद्वेष, लाभ-हानि, हर्ष-विषाद, सुख-दुःख जे जे काही दिसते ते सर्व या मनाचे खेळ आहेत. त्याच्या पलिकडे चेतनारूपी आत्मा असतो व मनाचा अडथळा दूर केल्यानंतरच त्याची जाणीव होते. ही चेतना आकाशाप्रमाणे स्वच्छ, निर्मळ, निर्दोष व निर्विकल्प आहे. परंतु मनरूपी ढगांनी घेरली गेल्यामुळे तीची जाणिव होत नाही. तरीही सर्व सृष्टीचा आधार हीच चेतना आहे. ज्या ज्ञानी पुरूषावरील मनाचा प्रभाव संपुष्टात आला, त्याचा सारा संसार संपलाच, त्याच्यासाठी साऱ्या वासना, सर्व सुखे व म्हणून सर्व जग निरर्थक आहे. असा पुरूष सत्यत्वाचा पुतळाच होतो. साक्षी भावाने सर्व पाहणारा द्रष्टा होतो. त्याला जे मिळवायचे आहे ते त्याने सर्व मिळविलेले असते. मग त्याच्यासाठी कोणत्याही साधनेची गरज नसते व साध्यही काही नसते. न स्वर्ग, न मोक्ष, न हर्ष, न खेद. जिथे पोहोचावयाचे होते तिथे तो पोहोचलाच आहे. क्षुद्रत्वाची साथ सुटून विराटात एकरूप झाला, हीच परमश्रेष्ठ प्राप्ती होय. तो तर निर्विकल्प झाला. हीच ज्ञानाची अंतिम व वेष्टतम स्थिती आहे.
स जयत्यर्थसंन्यासी पूर्णस्वरसविग्रहः । अनुवाद :- जो पूर्णानंदस्वरूप आहे, ज्याची समाधी सहजरित्या व निरंतर अबाधितपणे स्थिर आहे. त्याच संन्याशाला विजयश्री प्राप्त होते. विवेचन : - संन्यास प्रारंभ आहे तर समाधी शेवट आहे ज्याप्रमाणे शिक्षण प्राप्तीच्या हेतूने विद्यार्थी शाळेत प्रवेश करतो तेंव्हा त्यास शाळेची शिस्त व नियम यांचे पालन करावे लागते, योग्य-पोशाख, नियमितपणे एकाच वेळेला पोहोचणे, नियमित वाचन व अभ्यास यांचे पालन करावे लागते, त्याचप्रमाणे विशेष प्रकारचा पोशाख घालावा लागतो. याच पद्धतीप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रातसुद्धा आत्म-ज्ञान प्राप्तीची इच्छा असणाऱ्या व्यक्तिच्या विधिवत शिक्षणासाठी संन्यास ही सुरवात आहे व शेवट आहे समाधी. या समाधी अवस्थेत आत्मज्ञान प्राप्त केलेला साधुपुरुष सहजसमाधीवस्थेत पूर्ण आनंद प्राप्त करून पूर्णानंदस्वरूप होऊन जातो. संन्यासी अवस्थेत त्याला वेगळ्या स्वरूपाचे नियम, संयम व अनुशासन (शिस्त) याचे पालन करावे लागते. पण आत्मज्ञान प्राप्ती झाल्यावर याची आवश्यकता रहात नाही. बाह्य नियम हे शरीर व मन यांना नियंत्रित करण्यासाठी आवश्यक आहेत पण ज्ञानप्राप्ती नंतर शरीर व मन हे आपोआप नियंत्रित होतात. त्यांना सक्तिने वा जबरदस्तीने नियंत्रित करावे लागत नाही. समाधीअवस्थेत तो सदैव आपल्या आत्मस्वरूपात रममाण होऊन परम आनंदाशी एकरूप होतो. हीच सन्याशाची अकृत्रिम सहज समाधी असते. काही हठयोगी श्वास रोखून धरण्याची सवय आत्मसात करतात व त्यामुळे जमीनीच्या आत किंवा बाहेर ते श्वास रोखून अनेक दिवस राहू शकतात. पण या शारीरिक क्रियेचा आत्म्याशी संबंध नसल्यामुळे ही समाधी केवळ कृत्रिम समाधी आहे. अशी कृत्रिम समाधी तर केवळ देखावा आणि प्रदर्शन करण्याची वस्तू आहे. त्याचा आत्मज्ञानाशी काही संबंध नाही. म्हणून अष्टवक्र स्वामी म्हणतात की जो सहजसमाधीद्वारे निरंतरपणे पूर्णानन्दस्वरूप आत्म्यात एकरूप होतो त्या संन्याशानेच विजय प्राप्त केला आहे. व हीच त्याची शेवटची तसेच श्रेष्ठ कमाई असते. प्रयत्न करून कृत्रिम समाधी लावणे हे एक प्रकारचे धोका देणे आहे. ज्ञानी आपल्या ज्ञानशक्तिच्या बळावर सहज समाधी प्राप्त करतो.
बहुनात्र किमुक्तेन ज्ञाततत्त्वो महाशयः । अनुवाद : - इथे अजून जास्त सांगण्यात काय प्रयोजन आहे ? तत्वज्ञानी महापुरूष तर भोग व मोक्ष ह्या दोन्हींच्या आकांक्षेतून मुक्त व सदैव, सर्वत्र विरागी (स्वारस्यशून्य) वृत्तीने जगत असतो. विवेचन : - महामुनीश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी आपले प्रतिपादन अधिक स्पष्ट करण्यासाठी सांगतात की ज्या व्यक्तिला तत्वाचा बोध झाला आहे त्याला सर्व काही मिळालेले असते व म्हणून त्याला भोगाचीच काय पण मोक्षाचीसुद्धा आशा किंवा इच्छा नसते. त्याला कोणत्याही बाबतीत कधीही स्वारस्य नसते. अशा स्थीतीत त्याच्या सर्व इच्छा, कामना, वासना, राग, विराग सर्व काही लुप्त होते, चित्तात एकही विराग वा विकृती उरत नाही व पूर्ण शांत चित्तामुळे तो आत्म-तत्वात विलीन होतो. ज्या आत्मतत्त्वचापासून प्रारंभ झाला असतो त्याच आत्मतत्वातं शेवट होतो. जीवनचक्राचा हाच प्रारंभ व हाच शेवट असतो. हीच पूर्णावस्था असते. ज्याप्रकारे मानसिक सृष्टीचा आरंभ व शेवट ह्या आत्मतत्त्वात आहे त्याचूप्रकारे भौतिक सृष्टीचा आरंभ व शेवट सुद्धा ह्याच आत्म-तत्वात आहे. दोन्ही प्रकारच्या क्रियांचा हाच आधार आहे. ज्या अहंकारामुळे सर्वत्र भिन्नतेचा, वेगळेपणाचा अनुभव येत होता त्या अहंकाराचे विसर्जन होऊन सर्वत्र एकत्वाचा अनुभव येणे हीच परमश्रेष्ठ उपलब्धी व प्राप्ती आहे व तीच अद्वैताची अवस्था आहे.
महदादि जगद्द्वैतं नाममात्रविजृम्भितम् । अनुवाद : - महातत्व वगैरे जे द्वैती जग आहे ते केवळ नावालाच वेगळे आहे. त्याचा त्याग केल्यानंतर शुद्ध बोध प्राप्ती झालेल्याचे कोणते कार्य शिल्लक रहाते ? (कोणतेही कार्य शिल्लक रहात नाही.) विवेचन : - ह्या संपूर्ण जगात जी विविधता दिसून येते ती सर्व रंग, रूप, गुण यामुळे आहे व त्यामुळेच भ्रम निर्माण होऊन भिन्नतेचा भास होतो. ह्या भिन्नतेमागील आपली अज्ञानाची, जाणिव आपल्याला नसते म्हणून आपल्याला जग द्वैती स्वरूपात दिसते. आत्मा व शरीर, जीवात्मा व परमात्मा हे वेगवेगळे वाटतात, त्यांच्यात द्वैत आहे असे वाटते. एकच चैतन्य-ब्रह्म वेगवेगळ्या क्रियारूपात प्रगट होते व त्या रूपांना महत् अहंकार, पंचतन्मात्रा, पंच महाभूत अशी नांवे आहेत. ही भिन्नता केवळ नाममात्रच असते. अन्यथा ही सर्व एकाच ब्रह्माची रूपे आहेत. त्यांना वेगवेगळी नांवे दिल्यामुळे भिन्नतेचा भास होतो अन्यथा ते वेगवेगळे नाहीत. बाहेरून भिन्न भिन्न भासूनही अतंर्यामी ते संयुक्त व एकच आहेत, अ-भिन्न आहेत. ह्या भ्रांतिमुळे किंवा अज्ञानामुळे वेगवेगळी कर्मे करावी लागतात व ह्या अज्ञानाचा नाश करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची साधना, उपासना, योग, भक्ति, ध्यानधारणा वगैरे कर्मे करावी लागतात. पण अष्टवक्र स्वामी म्हणतात की ज्याला आत्मबोध झाला, ज्याने त्या परमतत्वाला ओळखले त्याचे हे द्वैतस्वरूपी जग नाहीसे होते. असा ज्ञानी, अद्वैत आत्मरूपात विलिन होतो. अहंकार व वासनेमुळे संसारात जेवढे संबंध निर्माण केले होते, जेवढा साठा संग्रह केला होता, अधिकार व व्यक्तिगत हक्काचे दावे केले होते ते सर्व खोटे सिद्ध झाल्याने सुटून जातात. त्यानंतर करण्यासाठी ज्ञानी माणसाला कोणतेच कार्य बाकी उरत नाही. ज्ञानी काही मिळवत नाही, व काही सोडत सुद्धा नाही. फक्त अज्ञान वा भ्रम तेवढा सुटतो व सत्याचे ज्ञान तेवढे प्राप्त होते. अज्ञानी भ्रमात जगतो व अज्ञान हेच त्याचे जग आहे. ज्ञानी व अज्ञानी पुरूषांत हेच अंतर वा फरक असतो.
भ्रमभूतमिदं सर्वं किंचिन्नास्तीति निश्चयी । अनुवाद : - 'हे सर्व भ्रामक जग, प्रपंच मायारूप आहे, मिथ्या आहे हे ज्ञान अंतःकरणपूर्वक स्वीकारून, आत्म्याचे स्फुरण प्राप्त केलेला शुद्ध स्वभावाचा पुरूष सहजरित्या शांत होतो.' विवेचन : - आत्मज्ञानानंतर व्यक्तिचा स्वभाव शांत होतो. या शांतीसाठी त्याला कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत. कोणतीही योगासने, तप, साधना, नियम, वगैरे कर्मकांड त्याला करावे लागत नाही. कारण ज्ञानरूप अवस्थेत त्याला हे जगत् प्रपंच भ्रमरूप दिसू लागते. जणू काही हे काहीच अस्तित्वात नाही. संसाराचा सारा खेळ इन्द्रिये, अहंकार व वासना ह्यांच्यामुळे भिन्न भिन्न वाटतो. ज्ञानरूप स्थितीत त्याच्या सत्य स्वरूपाचे ज्ञान होते. अन्यथा ते समजत नाही. म्हणून अज्ञानी अवस्थेत शांतीसाठी केलेले यज्ञ-याग, विधी, पूजा, संकल्प हे सर्व केवळ अशांतीच वाढवतात. मनात हजारो प्रकारच्या भावना व विकृती आहेत म्हणून जग सुद्धा तसेच वाटते. डोळ्यावर ज्या रंगाचा चष्मा असेल जगसुद्धा त्याच रंगाचे दिसते. त्याचे सत्य स्वरूप अज्ञानाच्या पडद्याने झाकले गेले असल्याने दिसू शकत नाही. म्हणून याला प्रपंच, माया, भ्रम, अशी नांवे दिली जातात. ज्ञान प्राप्तीनंतर त्याचे सत्य स्वरूप प्रकट होते व सर्व भ्रमसुद्धा नाहीसे होतात. अशी ज्ञान प्राप्ती झालेला पुरूषच शांत असतो व त्याने प्राप्त केलेली शांती स्वाभाविक, नैसर्गिक असते.
शुद्धस्फुरणरूपस्य दृश्यभावमपश्यतः । अनुवाद : - दृश्य अस्तित्वाला न पाहता केवळ शुद्ध स्कूरणयुक्त आत्म्याचाच नित्य अनुभव घेणाऱ्या ज्ञानीसाठी कोणता विधी आहे ? कोणते वैराग्य ? कशाचा त्याग ? व कशाची कुठली शांती ? विवेचन : - परमात्म्याचे कोणतेही कारण नसून तो सर्व गोष्टींचे कारण आहे. त्याला कुणी बनवले नसून त्यानेच सर्व काही बनविले आहे. तोच मूलभूत आहे. विज्ञानानुसार या सृष्टीत १०६ मूलतत्त्व आहेत. अध्यात्मशास्त्र त्यापुढे जाऊन सांगते 'की मूलतत्त्व एकच आहे. १०६ स्ततत्वे सुद्धा खरोखर स्वतत्वे नसून केवळ मायेची रूपे, यौगिक आहेत. आणि त्या एकमात्र असणाऱ्या मूलचालाच अध्यात्माने 'ब्रह्म' नाव दिले आहे. सारी सृष्टी ही ईश्ववराचीच अभिव्यक्ति आहे, हा सारा पसारा त्याच्याच रूपाचा आहे. ही सृष्टी बनवली गेली, पण ती बनविण्यामागे कोणतेही कारण नाही व कोणताही उद्देश नाही. मूढ लोकच असे कारण व उद्देश शोधतात. सृष्टी त्या आत्मशक्तिचे सहज स्फुरण आहे व हे स्फुरण आपोआप होत आहे. कोणत्याही निश्चित उद्दिष्टाने ते होत नाही. म्हणून त्याला लीला व खेळ म्हटले आहे. चिमण्या चिवचिव करतात, मोर नाचतात, पक्षी उडतात, बालक स्वच्छंद खेळते, फुले उमलतात, झरे वाहतात, मनुष्य कामासक्त होतो. ह्या मागे परमात्म्याची कोणतीच इच्छा नाही व कोणताच उद्देश नाही. परंतु मूढ लोकांनी ह्या सर्वांची उद्दिष्टे ठरविली आहेत. ते म्हणतात की तुम्ही तुमच्या पापाचे प्रक्षालन करू शकावे, तुम्हाला ज्ञान प्राप्त व्हावे, तुम्ही मुक्त व्हावे ह्यासाठी परमात्म्याने हे जग बनविले आहे. पण हे सर्व विकृत मस्तकाचे मूर्ख विचार आहेत. अष्टवक्र स्वामी म्हणतात की अशी मूर्ख विचारसरणी केवळ अज्ञानी लोकांची असते. म्हणून ते स्वतःला मुक्त करण्यासाठी अनेक प्रकारची साधना करतात. संसारातून बाजूला होऊन घर सोडून जंगलात पळून जातात. घरगृहस्थी, धन संपत्तिचा त्याग करतात. त्यांना असे वाटते की असे केल्यामुळे त्यांना स्वर्ग मिळू शकेल. काही लोक मृत्यू आल्याची जाणीव झाल्यानंतर काही वस्तू दान करतात. त्यामुळे ह्या वस्तू त्यांच्या आत्म्याला प्राप्त होतील अशी त्यांची समजूत असते. काही जास्त हुशार लोक ही सामुग्री मृत्यूच्या आधीच दान करतात जणू काही त्या वस्तू त्यांच्या पुढे जाऊन ते मेल्यावर त्यांना मिळू शकतील. ह्या सर्व मूर्ख समजूती आहेत. परंतु ज्ञानी ह्या डोळ्यांना जेवढे व जितके दिसते तेवढ्यावरच विश्वास ठेवत नसतो. तो वस्तूच्या बाह्य आकारापेक्षा तिच्यातल्या आत्मशक्तिकडे लक्ष देतो व त्या एकाच आत्म्याचा अनुभव सर्व वस्तूत घेतो. अशा ज्ञानी पुरूषासाठी कोणताही विधी करण्याची आवश्यकता नसते, त्याला कशाचा त्याग करण्याची आवश्यकता नसते व वैराग्याचीही गरज नसते. तो प्रगाढ शांततेत जगत असतो. शांती मिळावी यासाठी त्याला प्रयत्न करावे लागत नाहीत, कारण ती त्याला स्वभावतःच नैसर्गिकरित्या, सहजसुलभपणे प्राप्त होते.
शुद्धस्फुरणरूपस्य दृश्यभावमपश्यतः । अनुवाद : - दृश्य अस्तित्वाला न पाहता केवळ शुद्ध स्कूरणयुक्त आत्म्याचाच नित्य अनुभव घेणाऱ्या ज्ञानीसाठी कोणता विधी आहे ? कोणते वैराग्य ? कशाचा त्याग ? व कशाची कुठली शांती ? विवेचन : - परमात्म्याचे कोणतेही कारण नसून तो सर्व गोष्टींचे कारण आहे. त्याला कुणी बनवले नसून त्यानेच सर्व काही बनविले आहे. तोच मूलभूत आहे. विज्ञानानुसार या सृष्टीत १०६ मूलतत्त्व आहेत. अध्यात्मशास्त्र त्यापुढे जाऊन सांगते 'की मूलतत्त्व एकच आहे. १०६ स्ततत्वे सुद्धा खरोखर स्वतत्वे नसून केवळ मायेची रूपे, यौगिक आहेत. आणि त्या एकमात्र असणाऱ्या मूलचालाच अध्यात्माने 'ब्रह्म' नाव दिले आहे. सारी सृष्टी ही ईश्ववराचीच अभिव्यक्ति आहे, हा सारा पसारा त्याच्याच रूपाचा आहे. ही सृष्टी बनवली गेली, पण ती बनविण्यामागे कोणतेही कारण नाही व कोणताही उद्देश नाही. मूढ लोकच असे कारण व उद्देश शोधतात. सृष्टी त्या आत्मशक्तिचे सहज स्फुरण आहे व हे स्फुरण आपोआप होत आहे. कोणत्याही निश्चित उद्दिष्टाने ते होत नाही. म्हणून त्याला लीला व खेळ म्हटले आहे. चिमण्या चिवचिव करतात, मोर नाचतात, पक्षी उडतात, बालक स्वच्छंद खेळते, फुले उमलतात, झरे वाहतात, मनुष्य कामासक्त होतो. ह्या मागे परमात्म्याची कोणतीच इच्छा नाही व कोणताच उद्देश नाही. परंतु मूढ लोकांनी ह्या सर्वांची उद्दिष्टे ठरविली आहेत. ते म्हणतात की तुम्ही तुमच्या पापाचे प्रक्षालन करू शकावे, तुम्हाला ज्ञान प्राप्त व्हावे, तुम्ही मुक्त व्हावे ह्यासाठी परमात्म्याने हे जग बनविले आहे. पण हे सर्व विकृत मस्तकाचे मूर्ख विचार आहेत. अष्टवक्र स्वामी म्हणतात की अशी मूर्ख विचारसरणी केवळ अज्ञानी लोकांची असते. म्हणून ते स्वतःला मुक्त करण्यासाठी अनेक प्रकारची साधना करतात. संसारातून बाजूला होऊन घर सोडून जंगलात पळून जातात. घरगृहस्थी, धन संपत्तिचा त्याग करतात. त्यांना असे वाटते की असे केल्यामुळे त्यांना स्वर्ग मिळू शकेल. काही लोक मृत्यू आल्याची जाणीव झाल्यानंतर काही वस्तू दान करतात. त्यामुळे ह्या वस्तू त्यांच्या आत्म्याला प्राप्त होतील अशी त्यांची समजूत असते. काही जास्त हुशार लोक ही सामुग्री मृत्यूच्या आधीच दान करतात जणू काही त्या वस्तू त्यांच्या पुढे जाऊन ते मेल्यावर त्यांना मिळू शकतील. ह्या सर्व मूर्ख समजूती आहेत. परंतु ज्ञानी ह्या डोळ्यांना जेवढे व जितके दिसते तेवढ्यावरच विश्वास ठेवत नसतो. तो वस्तूच्या बाह्य आकारापेक्षा तिच्यातल्या आत्मशक्तिकडे लक्ष देतो व त्या एकाच आत्म्याचा अनुभव सर्व वस्तूत घेतो. अशा ज्ञानी पुरूषासाठी कोणताही विधी करण्याची आवश्यकता नसते, त्याला कशाचा त्याग करण्याची आवश्यकता नसते व वैराग्याचीही गरज नसते. तो प्रगाढ शांततेत जगत असतो. शांती मिळावी यासाठी त्याला प्रयत्न करावे लागत नाहीत, कारण ती त्याला स्वभावतःच नैसर्गिकरित्या, सहजसुलभपणे प्राप्त होते.
स्फुरतोऽनन्तरूपेण प्रकृतिं च न पश्यतः । अनुवाद : - असंख्य रूपात स्फुरण पावलेल्या प्रकृतीरूपी मायेला न बधणाऱ्या ज्ञानी पुरुषाला कशाचे बंधन ? कुठला मोक्ष ? हर्ष कशाचा व शोक कशाचा ? विवेचन : - ही सृष्टी आत्म्याचे स्फुरण आहे व ते असंख्य, अगणित रूपात, विविध आकारात, भिन्न भिन्न स्वरूपात प्रगट झाले आहे. पण ही सर्व रूपे 'प्रकृती' जन्य असून, मायारूप आहेत. हे स्फुरण आत्मशक्तिची अभिव्यक्ति आहे. सर्व रूपात चेतन तत्व असलेले आत्मतत्त्व विद्यमान आहे. अज्ञानी या स्थूल व बाह्य प्रकृती स्वरूपाला पाहून त्यावरच मोहित होतो. तो या रूपालाच सर्वस्व समजतो व हीच त्याची मुख्य चूक आहे, हेच त्याचे बंधन आहे. परंतु ज्ञानी या जडप्रकृतीला माया समजून त्या वस्तूचे जे मूळ कारण असलेले चेतन तत्व (ज्याला आत्मा किंवा ब्रह्मतत्त्व म्हणतात) त्याचाच बोध घेतो व शेवटी त्या आत्मतत्वातच विलिन होऊन स्थिर होतो. त्यामुळे ही प्रकृती त्याच्यासाठी बंधन होऊ शकत नाही. जर त्याला बंधनचच नाही तर मोक्ष कशाचा ? म्हणून ज्ञानी पुरुष बंधनाचा व मोक्षाचा विचार देखील करत नाही. सारे हर्ष, शोक हे प्रकृतीपासून निर्माण झाले आहेत, द्वंद्वातून निर्माण झाले आहेत. स्वतःला आत्मा न समजता मन आणि शरीर समजण्यापासून निर्माण झाले आहेत. चेतनाशक्ति जाणणाऱ्या आत्मज्ञानी पुरुषाला हर्ष नसतो व शोकही नसतो. तो परम आनंदमय स्थितीत असतो.
बुद्धिपर्यन्तसंसारे मायामात्रं विवर्तते । अनुवाद : - बुद्धिने ओळखल्या जाणाऱ्या जगात सर्वत्र मायाच माया आहे. अशा स्थितीत ममताशून्य, अहंकारशून्य आणि कामनाशून्य ज्ञानीच शोभूत दिसतो. विवेचन : - जगात काय आहे ? मोह आहे, ममता आहे, राग आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, खुणा आहे, प्रेम आहे, वासना आहे, अहंकार आहे, काम आहे, लोभ आहे आणि सर्व काही हेच आहे. ह्याचेच नाव संसार आहे. परंतु हे सर्व या प्रकृतीजन्य सृष्टीला खरे मानल्याचा परिणाम आहे व तो अर्थातच भ्रम आहे, माया आहे. या अज्ञानामुळे जीव वेगवेगळे कष्ट भोगतो. बुद्धिमुळे विचार निर्माण होतात. बुद्धिसुद्धा मनाला संतुष्ट करण्यासाठीच कार्य करते व चांगले वाईट, सत्य असत्य असा भेद करते. बुद्धि ही मनाची भाटगीरी करणारी सेविका आहे. म्हणून मुनीश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी म्हणतात की ह्या जगाचे रूप बुद्धि ओळखेल तर ते केवळ मायारूपच आहे. त्यात सत्य किंचितमात्र सुद्धा नसते. सत्य आहे तो केवळ आत्मा. ज्या ज्ञानी पुरुषाने आत्म्याला जाणले तो ममताशून्य, अहंकारशून्यच आणि कामनाशून्य होतो. हे क्षुद्र वासनामय जग त्याच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. असा ज्ञानी पुरुष शोभून दिसतो. अज्ञानी ह्या प्रकृतीजन्य सृष्टीतील क्षुद्र ममता, अहंकार व वासना यातच जगतो. असा क्षुद्र आशय शोधणारा व त्यातच रमणारा माणूस शोभून दिसत नाही.
अक्षयं गतसन्तापमात्मानं पश्यतो मुनेः । अनुवाद : - "अविनाशी आणि संतापशून्य आत्म्याचेच दर्शन घेणाऱ्या मुनीसाठी विद्या कोणती आणि अविद्या कोणती ? कुठली देहाबद्दलची ममता आणि कुठला अहंकार ?" विवेचन. : - अज्ञानी माणसांची अनेक मते असतात, अनेक विचार व अनेक धारणा असतात. त्यांची मते सत्यावर आधारलेली नसून केवळ दुराग्रहावर आधारलेली असतात. सत्य जाणून घेण्याची त्यांची इच्छा नसते पण ते जे काही मानतात त्यालाच ते सत्य म्हणून सिद्ध करू इच्छितात. यामधूनच पंथवाद, विरोध, वैमनस्य, हिंसा, घृणा यांचा जन्म व प्रसार होतो. परंतु ज्ञानी पुरुष सत्य जाणत असतो. तो दुराग्रही नसतो. म्हणून सर्व ज्ञानी पुरुष एकाच मताचे असतात. हिंदू मुस्लीम, ख्रिश्चन असे भेद त्यांच्यात नसतात. ज्ञानी माणसांचे सांगणे असते की परमात्मा तुमच्याशिवाय भिन्न नाही. परमात्मा काही आकाशात बसून राज्य करीत नाही. परमात्मा मंदिरात नाही व मशीदीत नाही. तो स्वर्गात नाही, चर्चमधे नाही. तो तुमच्या बाहेर नाहीच म्हणून शोधल्याने सापडणार नाही. तो काही असा एखादा पदार्थ नाही कि जो डोळ्यांना दिसेल. ज्या स्वरूपाच्या सर्व समजूती बालीश व मूर्खपणाच्या आहेत. ज्यांना आत्मज्ञान झाले नाही, जे मानसिक खुळचटपणातून बाहेर पडलेले नाही, तेच आकाशात बसलेल्या परमात्म्याच्या बाता मारतात. परंतु ज्यांना आत्मानुभूती झाली आहे ते सांगतात की परमात्मा हा उर्जेचा, शक्तिचा समुद्र आहे. संपूर्ण सृष्टी या उर्जेची अभिव्यक्ति आहे. सर्व काही या उर्जेचा खेळ आहे. शरीरातील आत्मा व परमात्मा या दोन्ही गोष्टी एकाच उर्जेच्या आहेत. त्यापेक्षा वेगळा कुणी ईश्वर नाही. ज्या ज्ञानी पुरुषाने ह्या संतापशून्य, अविनाशी आत्म्याला ओळखले त्याने सर्व काही जाणले आहे. त्याच्यासाठी मग विद्या, अविद्या ज्ञान व संसार, देह व ममता ह्या सर्व गोष्टी निरर्थक आहेत. ह्या सर्व बाबी अज्ञानातून पैदा झाल्या आहेत व अज्ञानी माणसांवरच त्यांचा प्रभाव पडतो. ज्ञानी केवळ आत्म्यालाच जाणणारा असतो. व त्यामुळे ही अज्ञानातून निर्माण झालेली भ्रांती नाहीशी होते.
निरोधादीनि कर्माणि जहाति जडधीर्यदि । अनुवाद : - "जरी जड बुद्धिच्या माणसाने (चित्त) निरोधाची सर्व कर्मे सोडून दिली तरी तो त्याचे मनोरथ (इच्छा) व प्रलाप (अहंकारी बोल) यांची पूर्ती करण्याचे दिशेनेच प्रवृत्त होतो. विवेचन : - मनुष्याची सर्व कर्मे, व्यवहार व आचरण हे त्याच्या चित्तवृत्तीचे प्रक्षेपण आहे. जशी चित्त-वृत्ती असेल, क्ये त्याचे मन असेल तसेच त्याचे सर्व कर्म व आचरण असेल हे उघड आहे. आचरण आणि कर्म ह्यात बाह्यतः बदल केल्यामुळे मन बदलत नाही. पतंजली सांगतात की 'चित्त-वृत्तिचा निरोध हाच योग आहे.' परंतु अष्टवक्र सांगतात की चित्तवृत्तिचा निरोध करण्यासाठी जी कर्मे केली जातात त्यामुळे चित्त वृत्तींचा निरोध होत नाही. उलट अशा कर्मांमुळे चित्ताची चंचलता व वासना अधिकच वाढते. कारण अशा चित्त निरोधासाठी केलेल्या कर्मांचे मागे वासना, इच्छा असतात मग निरोध कसा होणार ? म्हणून चित्तनिरोधासाठी केल्या गेलेल्या सर्व कर्मांचा व आचरणाचा त्याग केला पाहिजे. कर्म मग ते कोणतेही असो त्याची प्रेरणा एखादी वासना, एखादी इच्छा असते, म्हणून सर्व कर्में बंधने असतात व त्यापासून ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही. अष्टवक्र स्वामींचे उपदेशाचे सार एवढेच आहे की जे काही प्राप्त होईल, ते केवळ बोधामुळेच, कर्मामुळे नाही, कारण कर्मात अहंकार, वासना व फलाकांक्षा असते व त्यामुळे चित्ताचा निरोध होऊ शकत नाही. म्हणून निरोधासाठीची सर्व कर्मे उदाहरणार्थ ध्यान, समाधी यांचासुद्धा त्याग केला पाहिजे तरच ज्ञान प्राप्ती होईल. पण जरी एखादा मूढ किंवा जड-बुद्धिचा पुरुष ही कर्में सोडून देईल तरी त्याच्या मनांत अनेक मनोरथ (इच्छा), आकांक्षा व वासना असतातच त्याचा निचरा झालेला नसल्याने तो तत्काळ त्यांची पूर्ती करण्याच्या प्रयत्नाला लागतो. ह्याचे सार एवढेच की चित्ताच्या पूर्ण शांत अवस्थेतच ज्ञान प्राप्ती होणे शक्य आहे. निरोधासाठी कृत्रिम उपाययोजना करून ज्ञानप्राप्तीची शक्यता नाही कारण ती कर्मे त्यागाच्या हेतूने नव्हे तर उद्देशाच्या हेतूनें केलेली असतात. आचरण वा कर्मे सोडणे सुद्धा महत्त्वाचे नाही कारण महत्व आहे ते मूढपणा सोडण्याला, अज्ञान व भ्रम सोडण्याला.
मन्दः श्रुत्वापि तद्वस्तु न जहाति विमूढताम् । अनुवाद : - तत्व-बोध ऐकूनसुद्धा मूढ बुद्धीचा माणूस मूढता सोडत नाही. बाह्य आचरणात निर्विकल्प (निरिच्छ) होऊनसुद्धा तो मनांत विषयांची लालसाच जोपासत असतो. विवेचन : - मनुष्यात अनेक प्रकारची मूर्खता आहे. अहंकार, वासना, कामना फळाची आशा ही सुद्धा मूर्खता व मूढपणाचीच लक्षणे आहेत. यांच्या प्रेरणेने केलेली सर्व कर्मे व आचरण सुद्धा मूढपणाच असणार. राजा जनक निर्मल व शुद्ध मनाचा असल्यामुळे अष्टवक्र स्वामींचा उपदेश ऐकतांक्षणी त्यास तत्त्वबोध झाला. परंतु जे मंद बुद्धिचे असतात ते वासना अहंकार, शंका-कुशंका यांची साथ सोडत नसल्यामुळे उपदेश ऐकूनसुद्धा त्यांना आत्म-ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. असा मूढ माणूस बाह्य कर्मे करण्यात कितीही उदासीनता दाखवेल तरीही त्याच्या मनात अहंकार व वासना कायम असल्यामुळे त्याला शाश्वत् आत्म्याचे दर्शन होऊ शकणार नाही. अहंकार सोडल्याची त्याने कितीही नाटकं केले तरी मंदबुद्धिमुळे त्याच्या मनात विषयांची लालसा कायम असते. मंदबुद्धीची माणसे काय घ्यायचे व काय सोडायचे एवढ्याच दोन बाबी समजू शकतात. आतले गूढ तत्व ते समजू शकत नाही. म्हणून या ज्ञानाला ते नेहमीच वंचित राहतात.
ज्ञानाद् गलितकर्मा यो लोकदृष्ट्यापि कर्मकृत् । अनुवाद : - ज्ञानप्राप्तीमुळे ज्याचे कर्म नष्ट झाले आहे. असा ज्ञानी पुरुष लोकांचे दृष्टीने जरी कर्म करणारा असला तरी त्याला काही करण्याची किंवा काही सांगण्याचीही संधी नको असते. विवेचन : - कर्म दोघेही करतात, ज्ञानी करतात व अज्ञानीसुद्धा करतात. पण त्या कर्म करण्यात बाह्यतः फरक नसला तरी अंतर्यामी खूप फरक असतो. ज्ञानी पुरुषाचे कार्य, कर्म हे स्वभावशीलपणे होत जातात, ते लोकहितासाठी केलेले असते. ज्ञानी पुरुष कर्म ही ईश्वराची इच्छा समजून कर्म करतो व ती कर्म आवश्यक तेवढीच व निमित्तापुरती असतात. त्या कर्माचे मागे वासना, अहंकार व फळाची आशा नसते. पण अज्ञानी माणसाच्या कर्मामागे फल-प्राप्तीची अपेक्षा असते, अहंकारसुद्धा असतो. अज्ञानी माणसाने लोक हिताची कामे केली तरी त्यातसुद्धा सन्मान प्राप्ती, यश प्राप्ती किंवा स्वर्गप्राप्ती असा हेतू असतो. ज्या कर्मांमुळे स्वर्गाचे द्वार आपल्यासाठी उघडे होतें अशी वाटेल ती कर्में करण्यास अज्ञानी माणसे उत्सुक असतात. लोकहित सेवा, समाजसेवा, दान, पुण्य, धर्म या संबंधांत त्याला काहीही गम्य नसते. तो केवळ त्याद्वारे सन्मान व पुण्य कसे मिळेल याच्याच चिंतेत असतो. परंतु अष्टवक्रस्वामी म्हणतात की ज्ञामुळे कर्म नष्ट होतात. मग ज्ञानी पुरुषाला कर्म करण्याचीआवश्यकताच उरत नाही. परंतु असा ज्ञानी पुरुषसुद्धा जे लोक-कल्याणाचे कार्य आहे ते करतच असतो. जेवढी कामे आवश्यक आहेत तेवढी तो करतो. स्वर्ग प्राप्तीच्या दृष्टीने किंवा फलप्राप्तीच्या आकांक्षेने तो कोणतेही कर्म करत नाही. ज्यामुळे पुण्य किंवा अन्य खरे-खोटे लाभ होतील अशा कर्मांमुळे त्याचे लक्ष नसते. व हे काम मी अहंकार विरहित असल्यामुळे केले असे सुद्धा तो कधी बोलत नाही. कर्म-कुशलता हीच असून ती फक्त ज्ञानी पुरुषाजवळच असते.
क्व तमः क्व प्रकाशो वा हानं क्व च न किंचन । अनुवाद : - सदैव निर्भय व निर्विकार असणाऱ्या धीरगंभीर पुरुषासाठी कुठे अंधार आहे ? कुठे प्रकाश आहे ? त्याने कशाचा त्याग करावा ? त्याच्यासाठी हे काहीही अस्तित्वात नाही. विवेचन : - मनाच्या अनेक प्रवृत्ती, वासना, इच्छा आहेत. अनेक जन्मांमधून जे प्राप्त झाले त्याचेच एकत्रित नाव चित्त किंवा मन आहे. बुद्धि त्यात फरक करून नेहमी चांगले वाईट ठरवते. सुख-दुःख, नफा-तोटा, प्रेम-तिरस्कार, हिंसा-अहिंसा, प्रकाश-अंधार, प्राप्ती-त्याग वगैरे फरकसुद्धा बुद्धिच करत असते पण असे कोणतेच भेद अस्तित्वात नसतात. वास्तवात सर्व संयुक्त व एकच आहे. एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू असून, एकतर त्या दोन्ही नाहीशा होतील किंवा दोन्हीही अस्तित्वात राहतील. एकच तेवढी वाचवून दुसरी नष्ट करण्याचा कोणताच उपाय नाही. जर जन्म झाला आहे तर मृत्यू तर होणारच. बेईमानी नाहीशी झाली तर इमानदारीसुद्धा नाहीशी होईल. जर पापी या जगात उरलेच नाही तर मंदिरे, मशिदी, चर्चेस, गुरूद्वारे सुद्धा रहाणार नाहीत. जर रोग नसले तर आरोग्यसुद्धा रहाणार नाही. जर अ-साधु लबाड दुर्जन नसले तर साधुपुरुषांनाही कायमचा रामराम करावा लागेल. हे सर्व संयुक्त आहेत व एक दुसर्यावर अवलंबून आहेत. जर रावणाचे पात्र काढून टाकले तर रामाची कहाणीच लिहिता येणार नाही. नैतिकतेचे उच्च आदर्शांमुळे नितीमान माणसे त्यात फरक करतात व वाईट तेवढे बाजूला सारून चांगल्याची स्थापना करू पाहतात. अंधार दूर करून प्रकाश करू पाहतात. ह्या उलट धार्मिक व्यक्ति सर्व काही ईश्वराचे देणे आहे असे मापून दोघांचाही स्वीकार करतात. ज्ञानी पुरुष आत्म्याचे ज्ञान झाल्यामुळे सदैव निर्भय व निर्विकार असतो. त्याची ही भेददृष्टी संपून जाते. प्रकाश अंधार, स्वीकार, त्याग, ह्यात तो काहीही फरक करू शकत नाही. स्वाभाविकपणे जी कर्म होतील तेवढी तो करतो व सदैव परमानंद स्वरूप असणार्या आत्मस्वरूपात मग्न रहातो.
क्व धैर्यं क्व विवेकित्वं क्व निरातंकताऽपि वा । अनुवाद : - ज्याचा कोणताही स्वभाव उरला नाही, त्या अवर्णनीय, स्वभावाच्या योग्यासाठी धीर कसला व विवेक कसला ? आणि निर्भयताही कशाची ? विवेचन : - जिथे भय आहे तिथे निर्भयताही निर्माण होते, जिथे मूढपणा असतो तिथे विवेक निर्माण होतो, जेथे अधीरता व्याकुलपणा निर्माण होतो तिथेच धैर्याची चर्चा होते. परंतु ज्या योगी पुरुषाने त्या परमश्रेष्ठ रसानुभूतीची प्राप्ती केली आहे, तो सर्व द्वंदातून पार होऊन जातो व त्याच्या स्वभावाचे वर्णनही करता येत नाही. योगी पुरुषाचे कोणतेही सिद्धान्त नसतात, कोणतेही आग्रह नसतात. तो परंपरांचे मार्गदर्शनानुसार जगत नाही व रूढींनुसार जगत नाही. त्याच्या संदर्भात हे सांगणेच अवघड आहे की तो नेमका कोणत्या स्वभावाचा आहे ? कारण तो स्वभावशून्य होतो. त्याचा स्वतःचा स्वभाव, स्वतःची सवय, स्वतःचा आग्रह असा काहीच नसतो. तो आत्म्याच्या स्वभावानुसार जगत असतो. व त्याचे ज्ञान संसारी माणसाला नसते. नियम, संयम, मर्यादा, शिस्त, सिद्धान्त, कर्तव्य, विवेक यांची बंधने अज्ञानी माणसांकरिता असतात. ज्ञानी माणूस पूर्णतया स्वतंत्र असतो. तो या क्षुद्र बंधनांच्या बाहेर राहून व्यवहार करतो व त्याचे रहस्य ओळखणे संसारी माणसाला शक्य नसते.
न स्वर्गो नैव नरको जीवन्मुक्तिर्न चैव हि । अनुवाद : - योगी पुरुषासाठी स्वर्ग नाही व नरक नाही. जीवन्मुक्ती सुद्धा नाही. योगाचे दृष्टिने ह्या सर्वांचे योग्याच्या जीवनात काहीच स्थान नाही, त्यामुळे त्याबद्दल जास्त काही सांगण्याचे प्रयोजनही नाही. विवेचन :- भारतीय तत्वज्ञानी पुरुषांनी, ऋषी मुनींनी आध्यात्मावर जेवढा सूक्ष्म व प्रचंड, सविस्तर अभ्यास, मनन केले आहे तेवढे इतर कोणत्याही देशातील कोणताही धर्म करू शकलेला नाही. ख्रिश्चन, यहुदी व मुस्लीम धर्म स्वर्ग व नरक यापुढील धर्माची चर्चा क शकले नाहीत. मुक्तिची त्यांची कोणतीच कल्पना नाही. त्यांनी ईश्वराला एक व्यक्ति मानून आकाशात बसवले हे व तेथून त्याने सात दिवसात सृष्टी निर्माण केली व आताही म्हणे तेथेच बसून तो सृषीचे संचलन करतोय. तो त्यांच्या कल्पनांनुसार शिक्षा देतो, बक्षिसे वाटले, स्वर्ग किंवा नरक देतो, तो अतिशय दयाळू असून भक्तांना क्षमासुद्धा करतो. महावीराने 'ब्रह्म' नावाची किंवा त्या स्वरूपाची कोणतीही शक्ति अस्तित्वात आहे हेच मानण्यास नकार दिला व आत्मेसुद्धा अनेक असतात असे मानले. ही त्याची अनेकता मनाच्या शेवटच्या स्तरापर्यंत दिसून केले. आत्मज्ञान मनाच्या तळाच्याही पुढची स्थिती आहे व तिथे पोहचल्यावर सर्व प्रकारच्या भिन्नता नाहीशा होतात. मृत्यू नंतर केवळ शरीराचा त्याग होतो व सूक्ष्म जीवात्मा हा मन, अहंकार, चित्त याचेसह आपल्या पुढच्या प्रवासाला निघतो. पुनर्जन्मापर्यंत हा जीवात्मा एका निश्चित कालावधीपर्यंत अंतराळात भटकत रहातो. तिथे आपल्या अहंकारामुळे व वासनेमुळे सुखदुःखाचा अनुभव घेतो. सुस्वभावी वर्तन केलेले आत्मे सुखाचा व दुष्ट आत्मे दुःखाचा अनुभव घेतात. हाच त्यांचा स्वर्ग नरक असतो. स्वर्ग व नरक ह्या मनाच्याच अवस्था असून ती प्राथमिक पायरी आहे. मुक्ति त्या पलीकडची अवस्था आहे. योग केवळ आत्म्यालाच मानतो. अष्टवक्र स्वामी म्हणतात की ही सृष्टी भ्रम आहे, स्वर्ग, नरक, जीवन्मुक्ति हे सर्व भ्रम आहेत व ते अज्ञानामुळे तसेच वासनेमुळे जाणवतात. वास्तवात ते सर्व असत्य आहेत. स्वर्ग व नरक ह्मा केवळ वासना आहेत. जेंव्हा वासना व अहंकार नष्ट होतात तेंव्हा आत्माच रहातो व तोच एक शाश्वत सत्य आहे. अन्य सारे भ्रम आहेत. वासना व अहंकार यापासून केवळ ब्रह्मच मुक्त आहे. त्या आधीच्या स्थितीतले स्वर्ग, नरक हे केवळ वासनेतून निर्माण झालेले आहे. ती काही मौलिक प्राप्ती नव्हे. संपूर्ण सृष्टीचा प्रारंभ व शेवट ब्रह्मच आहे. जीवात्म्याचे सर्वोच्च ध्येय शिखर केवळ ब्रह्मच आहे. योगाची हीच धारणा व हीच मान्यता आहे.
नैव प्रार्थयते लाभं नालाभेनानुशोचति । अनुवाद : - धैर्यशील पुरुषाचे चित्त अमृतमय व शीतल आहे. म्हणून तो कधी लाभासाठी प्रार्थना करत नाही किंवा हानीची चिंता करत नाही. विवेचन : - द्वैतवादी धर्म ईश्ववराला जीवापेक्षा वेगळा मानतात. म्हणून ते ईश्वराची प्रार्थना करतात, त्याच्या कृपेची भीक मागतात, त्याची मदत मागतात. ते धर्म ईश्वराला सर्वशक्तिसंपन्न, दयाळू, कृपाळू, नियंता, सृष्टीची निर्मिती करणारा, मदत करणारा मानतात व स्वतःला दुबळे, अशक्त, अज्ञानी व पापी समजतात. म्हणून ते सदैव परमात्म्याची कृपा व्हावी या हेतूने प्रार्थना करतात. लाभ व्हावा म्हणून प्रार्थना करतात, दुःखांचे निवारण व्हावे म्हणून प्रार्थना करतात, शत्रूचा नाश व्हावा म्हणून प्रार्थना करतात. सुख, शांती, समृद्धीसाठी प्रार्थना करतात परंतु योगी पुरुष तर अद्वैतयादी असतात. सृष्टीपासून भिन्न, जीवात्म्यापेक्षा भिन्न अशा ईश्वराला ते मानत नाहीत. शरीरातील आत्माच त्यांचा ईश्वर आहे. तोच त्यांचे ब्रह्म आहे. जेंव्हा ह्याचे ज्ञान योगी पुरुषाला होते तेंव्हा त्याची धारणा होते की, 'मीच ब्रह्म आहे.' माझ्यापेक्षा वेगळे कोणतेच ब्रह्म नाही. असा योगी सदैव आत्म्याच्या परमश्रेष्ठ आनंदात निमग्न असतो. त्याच्या मनातील क्षुद्र वासना, अहंकार सर्व नाहीसे होतात व तो अमृतमय आत्मा प्राप्त झाल्याने शांत व शीतल होतो. त्याला विराटाची प्राप्ती होते. तो कोणत्याही क्षुद्र गोष्टीसाठी प्रार्थना करत नाही व कोणत्याही हानीची चिंता करत नाही. तो सदैव आत्मरूप होऊन महान सुखाचा आनंद घेतो. ज्याला विराट उमजत नाही तोच क्षुद्र लाभ व तोटा ह्याची चिंता करत बसतो.
न शान्तं स्तौति निष्कामो न दुष्टमपि निन्दति । अनुवाद : - निष्काम पुरुष शांत पुरुषाची प्रशंसा करत नाही किंवा दुष्ट व्यक्तिची निंदा करत नाही. तो सुख-दुःखांना समान मानतो व तृप्त असतो. करण्यासाठी त्याला काही कार्य समोर दिसत नाही. विवेचन : - जे अंतर्यामी भरलेले आहे तेच बाहेर प्रगट होते. जर आतमध्ये प्रेम, दया, करूणा, अहिंसा असे गुण असतील तर बाहेर प्रशंसा, सेवा, धन्यवाद आशिर्वाद यांचे रूपात ते निश्चितपणे प्रगट होतील. परंतु ज्याच्या आत घृणा, हिंसा, अहंकार, वासना, स्वार्थ, ईर्ष्या, क्रोध असे गुण भरले आहेत त्याचे गुण निंदा, संघर्ष, कष्ट, हिंसा, आग्रह, दुराग्रह, दुसऱ्याचा छळ करणे, यातना देणे, वगैरे रूपात प्रगट होतील. ह्या बाहेरील लक्षणांवरून आत कोणते गुण असतील याची कल्पना येते. निंदकाचे स्वतःचे स्वार्थ असतात, ज्याची पूर्ती झाली नाही तर तो निंदक बनतो. कोल्ह्याला द्राक्षे मिळत नसली म्हणजे तो त्यांना आंबट म्हणतो पण मिळाले तर आंबट असले तरी गोड आहेत असेच म्हणतो. कामभावनेने जे व्याकुळ आहेत तेच 'काम' शक्तिची निंदा करतात, ज्याला धन-संपत्तीची खूप आशा आहे पण मिळत नाही तोच धनसंपत्ती पाप असल्याचे सांगत फिरतो. कमजोर माणूसच बढाया मारून शूरपणाचा आव आणतो. दुसऱ्याची निंदा करणे हा सुद्धा दुष्टपणाच आहे. सज्जन कुणाची निंदा करत नाही. परंतु ज्ञानी कुणाची प्रशंसासुद्धा करत नाही. निंदक आणि प्रशंसक दोघेही वासनाग्रस्त आहेत. दोघांचे स्वार्थ आहेत. ज्ञानी माणसाच्या चित्तवृत्ती शांत झालेल्या असतात. त्याच्या आत व बाहेर निंदेची वा प्रशंसेची लहर निर्माण होत नाही. तो 'समभाव' असतो व पूर्ण शांत असतो. त्याच्या मनाची सारी अस्वस्थता नाहीशी झालेली असते. तो राग द्वेष, स्तुती प्रशंसा या दोन्हींच्या पलीकडे पोहचलेला असल्याने निंदा व प्रसंशेपासून दूर असतो. असा ज्ञानीपुरुष निष्काम व कामनाशून्य असतो. त्याचा कशाचाही आग्रह नसल्याने तो पूर्णतया अनाग्रही असतो. निंदा व प्रशंसा करून त्याला काहीच मिळवायचे नसते. समभाव असलेल्या मनाची हीच आदर्श अवस्था असते व या अवस्थेत मनात कोणतेही तरंग निर्माण होत नाहीत. अशी व्यक्तिच तृप्त असते, सुखी व शांत असते. तो न सुखाने आनंदित होतो न दुःखाने दुःखी होतो. जे काही होत आहे त्या सर्वाचा तो शांत मनाने स्वीकार करतो. जर कुणी सज्जन आहे तरी ठीक, जर कुणी दुष्ट आहे तरी ठीक. ही योगी पुरुषाची श्रेष्ठ अवस्था आहे. अशा स्थितीत पोहचलेल्या ज्ञानी पुरुषाला करण्यासारखे काहीच उरत नाही. हाच साक्षीभाव आहे. या स्थितीत आल्यावर तो अ-कर्ता होतो. मग त्यासाठी सिद्धी नाही, समाधी नाही, त्याला संसार सोडावा लागत नाही व मोक्षही मिळवायचा नसतो. ज्ञानी माणसालाच हे स्वाभाविकरित्या साध्य होते. तो या स्थितीत जे काही करतो ते केवळ स्वाभाविकवृत्तीने, त्यासाठी त्याला कोणतेही प्रयत्न करावे लागत नाही.
धीरो न द्वेष्टि संसारमात्मानं न दिदृक्षति । अनुवाद : - धैर्यवान पुरुष संसाराचा द्वेष करीत नाही व आत्मा पहाण्याची इच्छाही बाळगत नाही. हर्ष व शोक यांचे पाशातून मुक्त असा ज्ञानी पुरुष न मृतासारखा आहे, न जीवंत व्यक्ति सारखा. विवेचन : - राग (स्वारस्य) असल्यामुळेच द्वेषसुद्धा निर्माण होतो. अनुरागयुक्त स्वारस्यामुळेच आसक्ति निर्माण होते. त्याचमुळे अपेक्षा निर्माण होतात व त्या पूर्ण न झाल्यास द्वेष निर्माण होतो. ज्ञानी माणसाला जीवनात कोणतेच स्वारस्य नसते. जगाप्रती त्याला अनुराग नसतो, आसक्ति नसते आणि अपेक्षाही नसतात. म्हणून तो जगाचा द्वेषसुद्धा करीत नाही. तो जगाला अर्थहीन समजतो मग द्वेष कशाचा ? द्वेष करणे म्हणजेसुद्धा त्याला महत्त्वपूर्ण मानण्यासारखे आहे. ज्याला काही महत्त्वच नाही, त्याचा कुणी द्वेष करत नाही. ह्याचप्रकारे ज्ञानी माणूस आत्मा पाहण्याची सुद्धा इच्छा बाळगत नाही. आत्मा अदृश्य आहे. तो दिसू शकत नाही. त्याची अनुभूती होते, त्याचा बोध होतो. पाहण्याची इच्छा असणे ही एक वासनाच आहे आणि जो पर्यंत वासना आहे तोपर्यंत आत्मानुभूती होऊ शकत नाही. आरसा स्वच्छ असला तरच त्याची अनुभूती होऊ शकते. असा ज्ञानी पुरुष सदैव आत्मसुखाचा अनुभव घेतो व त्यामुळे हर्ष शोक यांपासून तो मुक्त होतो. राग, वासना, प्रिती या सर्व भावना शून्य होतात व केवळ स्वचेतनेलाच सर्वस्व मानून तो स्थिर वृत्तीने जगतो. भोग, त्याग, राग, विराग, संसार, परमात्मा ह्या सर्व वासनाच आहेत व त्या शिल्लक असेपर्यंत ज्ञान होऊ शकत नाही. ज्ञान झाल्यावर त्या रहात नाहीत. जगाच्या दृष्टीने असा ज्ञानीपुरुष जीवंत असल्यासारखा वाटत नाही कारण त्याची धावाधाव, धडपड, महत्त्वाकांक्षा, वासना सर्व काही नाहीशा होतात. तो काही करत नाही. पण मृतासारखा सुद्धा नसतो कारण आळशी होत नाही व अकर्मण्यशील होऊन कर्मांचा त्यागसुद्धा करत नाही. तो पूर्ण जीवनाचे, तृप्त जीवनाचे साक्षात प्रतीक स्वरूप होतो. काहीही करत नसून सुद्धा तो खूप काही करू शकतो. परमात्मासुद्धा काही करत नसूनसुद्धा सारे काही त्याच्यामुळेच होत असते. त्याच्या स्वभावामुळेच असे होत असते. ह्याचप्रमाणे ज्ञानी काही करत नसूनसुद्धा खूप काही करत असतो. हे सुद्धा त्याच्या स्वभावामुळे घडत असते, केवळ त्याच्या उपस्थितीमुळे सारे घडून येते.
निःस्नेहः पुत्रदारादौ निष्कामो विषयेषु च । अनुवाद : - पुत्र, स्त्री यांचेबद्दल मनात स्नेह न बाळगणारा, सर्व विषयांपासून विरक्त झालेला, आपल्या शरीराची सुद्धा चिंता न करणारा ज्ञानी पुरुष सर्व आशा-अपेक्षातून मुक्त होऊन शोभून दिसतो. विवेचन : - अज्ञानी व संसारी माणसाचा वैचारिक दृष्टीकोन वेगळा असतो व ज्ञानी माणसाची दृष्टी त्यापेक्षा भिन्न असते. अज्ञानी माणूस आपल्या विचाराचे माध्यमातून ज्ञानी माणसाकडे पाहील तर त्याला ज्ञानी माणसाचे वेगळेपण व अलौकिकत्व समजून येणार नाही. अज्ञानी आपल्या पत्नीबद्दल, मुलांबद्दल फार प्रेम बाळगतो, नेहमी विषय सुखांची इच्छा बाळगतो आणि आपल्या शरीर पोषणाची चिंता करतो तसेच वेगवेगळ्या आशा उराशी बाळगून जगत असतो. याचे मागे आसक्ति व वासना असतात. स्वतःचे संकुचित स्वार्थामुळे तो ह्या प्रकारचे वर्तन करीत असतो. ज्ञानी माणूससुद्धा त्याच्या पत्नी व मुलांबद्दल आत्मीयता बाळगतो पण त्यामागे त्याच्या वासना व स्वार्थ यांची प्रेरणा नसते. तो सुद्धा शरीराची देखभाल ठेवतो पण शरीराचे पोषण रक्षण यातच तो गढून गेलेला नसतो. स्वाभाविकपणे, नैसर्गिकरित्या व सहजपणे जे व जेवढे प्राप्त होईल, त्यातच तो संतुष्ट असतो. ज्ञानी पुरुष सर्व आशा-अपेक्षांतूनही मुक्त असतो. त्यामुळे स्नेह, कर्म, चिंता, आशा, इच्छा यांची संकुचित बंधने त्यास बांधू शकत नाहीत. असा ज्ञानी पुरुष समाजाचे भूषण असल्याने शोभून दिसतो.
तुष्टिः सर्वत्र धीरस्य यथापतितवर्तिनः । अनुवाद : - जे प्राप्त होते त्यातच उपजिविका भागविणारा, देशोदेशी स्वच्छंदपणे हिंडणारा, जेथे सूर्य मावळेल तेथे विश्रांतीस्तव झोपणारा धैर्यशील पुरुष सर्वत्र संतुष्ट मनःस्थितीत असतो. विवेचन : - ज्ञानी पुरुष जे सर्वश्रेष्ठ आहे तेच मिळवितो म्हणून क्षुद्र बाबींच्या वासनेतून तो मुक्त होतो. तो सुद्धा कर्म करतो पण त्यात फलाकांक्षा नसते. वासना नसते. कर्माचे फळ म्हणून सहजपणे जे त्यास मिळते त्यातच तो संतुष्ट वृत्तीने आपली उपजिविका मोठ्या आनंदाने व अधिक प्राप्तीची आशा न बाळगता भागवतो. जास्ती कसे मिळेल याचा विचारही त्याच्या मनाला स्पर्शत नाही व कमी मिळाले अशीही त्याची तक्रार नसते. जग पापी झाले, साधुसंताचा सन्मान केला जात नाही, त्याला कुणी दान देत नाही. बेईमान मजा करतात व साधु उपाशी मरतात अशी भावना त्याच्या मनात येत नाही व तो तशी तक्रार कधी करत नाही. तो आपल्या वृत्तीमुळे स्वावलंबी असतो. तो जेवणासाठीसुद्धा दुसऱ्यावर अवलंबून नसतो. जे मिळाले, तिथे मिळाले किंवा नाही मिळाले तरी त्यात तो संतुष्ट असतो. तो संसार हेच एक बंधन आहे असे मानत असल्याने शरीर पोषणासाठी तो कुणा दुसऱ्याची बंधने कशाला स्विकारेल ? तो कोणत्याही एका विशिष्ट स्थानाचे बंधन मानत नाही. तो जे करतो ते आत्म्याचे स्वभावानुसार करतो, कोणत्या वासनेच्या आसक्तिमुळे नव्हे. त्याच्या उठण्याची, काम करण्याची, झोपण्याची, थांबण्याची कोणतीही निश्चित वेळ किंवा नियम नसतात. येथेच झोपेन, ह्याच ठिकाणी थांबेन अशाच बिछान्यावर झोपेन, गवतावरच झोपेन, गायीचेच दूध पिईन, पैश्याला स्पर्श करणार नाही, पायी पायी व विवस्त्र अवस्थेत हिंडेन, या प्रकारचा त्याचा कोणताही नियम वा आग्रह नसतो. नियमांच्याही बंधनातून त्याची सुटका झालेली आहे. आग्रह संपलेले आहेत. असा ज्ञानी सर्वत्र सर्व स्थितीत संतुष्ट असतो.
परततूदेतु वा देहो नास्य चिन्ता महात्मनः । अनुवाद : - जो स्वतःचे स्वभावरूपी जमीनीतच विश्रान्ती घेत आहे आणि संसाराचा ज्याला विसर पडला आहे, त्या महात्म्याला शरीर राहिले काय किंवा न राहिले काय ह्याची चिंता नसते. विवेचन : - मुनीश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी म्हणतात की असा ज्ञानी पुरुष संसाराच्या नियमात व बंधनात जगत नसतो. तो केवळ आत्म्याच्या स्वभावानुसार जगतो. संसाराचा त्याला पूर्ण विसर पडलेला असतो. त्याची कोणत्याच प्रकारची वासना शिल्लक नसल्याने शरीर रक्षणाची व त्याद्वारे जीवंत राहण्याची इच्छा सुद्धा संपुष्टात आली असते. ज्या कुणाची देहाची आसक्ति तीव्र असते, त्याचीच जास्त काळ जीवंत राहण्याची इच्छा असते. त्यामुळे मृत्यू आला तरी त्याचे प्राण शरीराबाहेर पडत नाही. जीवन व मृत्यू यात तो संघर्ष करत असतो. यमदूत त्याला खेचत असतात पण तो हे जग सोडून जाऊ इच्छित नाही म्हणून त्याला यमदूत जबरदस्तीने ओढून व पकडून घेऊन जातात. प्राण जातांना त्याचे नातेवाईक गंगेचे पाणी व तुळशीपत्र देऊन, गायदान करून त्याला जास्तीत जास्त पुण्य मिळवून देण्याचा हास्यास्पद प्रयत्न करतात. हे सर्व प्रकार देहासक्तिमुळे होतात. पण ज्ञानी पुरूषाला किंचितमात्र देहासक्ती नसते म्हणून मृत्यूच्या वेळी त्याला संघर्ष करावा लागत नाही. तो मृत्यूचा सुद्धा आनंदाने स्वीकार करतो. घर बदलल्याप्रमाणे तो सहजपणे व त्यास जास्त महत्त्व न देता शरीराचा त्याग करतो. जो जीवनात शांतीपूर्वक व संतुष्ट वृत्तीने जीवन जगला त्याला मृत्यूसमयी सुद्धा शांतता लाभते. म्हणून ज्ञानी पुरूष कधी मरण पावत नाही तर केवळ देह-त्याग करतो व त्याचा आत्मा हेच त्याचे आश्रयस्थान असते व त्यातच तो विलिन होतो.
अकिंचनः कामचारो निर्द्वन्द्वश्छिन्नसंशयः । अनुवाद : - अकिंचन (संपत्ती-विहिन), स्वच्छंद हिंडणारा, द्वंद्वरहित, संशयरहित आसक्तिशून्य व एकटा असणारा ज्ञानवंत पुरूष सर्व परिस्थितीत, सर्व भावनात संतुष्ट रहातो. विवेचन : - जिथे आसक्ति आहे, तिथे बंधन नक्की आहे. संसार, स्त्री, मुले, धन-संपत्ती, गांव, देश, धर्म, जाति, वर्ण आदि संकुचित परिघात मनुष्य त्याच्या स्वतःचे आसक्तिमुळे बंदिस्त झाला आहे. याचे खरे कारण त्याच्या आसक्तिशिवाय दुसरे कोणतेच नाही. या मर्यादित वर्तुळात स्वतःला बंद करून घेऊन मनुष्य स्वतःसुद्धा संकुचित होतो. त्याची दृष्टी संकुचित होते. तो त्या वर्तुळाबाहेर विचार करू शकत नाही व विराटाचे दर्शन घेऊ शकत नाही. पिंजऱ्यातला बंदिस्त पक्षी बघून पिंजऱ्यातच फडफडत रहातो, व शेवटी त्यातच प्राण गमावतो. मोकळ्या आकाशात तो भरारी मारू शकत नाही. सृष्टीत अन्यत्र असलेल्या सौंदर्याची त्याला माहिती मिळू शकत नाही. याचप्रकारे मर्यादित व संकुचित विचार, सिद्धान्त, नियम यात बंदिस्त होऊन मनुष्य छोटा होतो व अहंकारामुळे तो त्या डबक्यात राहून स्वतःला महान समजू लागतो. ज्ञानी माणसाची स्थिती यापेक्षा फार वेगळी असते. तो स्वतःला सर्व बंधनातून मुक्त करून घेतो. तो तर स्वच्छपणे खुल्या आकाशात विहरत असतो. द्वंदरहित होऊन श्रेष्ठतम आनंद लुटतो कारण त्याच्या मनात शाश्वत सत्याबद्दल, ईश्वराबद्दल कोणताही संशय वा शंका-कुशंका नसतात. तो स्वतःला एकाकी व अकिंचन ( दरिद्री) समजतो व त्यामुळेच तो सर्वांचा होतो व महान जीवनाशी एकरूप होतो आसक्तिमुळे मनुष्य क्षुद्रत्वाशी बांधला जातो. पण ज्ञानी आसक्तिरहित असल्यामुळे तो विराटाचे सुख भोगतो व सर्व परिस्थितीत सर्व भावांशी तो तादात्म साधू शकतो. शरीरभावनेशीच बांधला गेलेला अज्ञानी शरीर-सुखच भोगू शकतो पण आत्मज्ञानी सृष्टीतील महान भोग भोगतो. शरीरसुख तर क्षुद्र आहे. आत्मसुख विराट आहे, त्यात रमणारा ज्ञानीच सर्व भावांशी, सर्व परिस्थितीत समभावपूर्वक तादात्म्य साध्य करतो.
निर्ममः शोभते धीरः समलोष्टाश्मकाञ्चनः । अनुवाद : - जो ममतारहित आहे त्याचेसाठी माती, दगड व सोने एक समान आहे. ज्याची हृदय ग्रंथी (आस्था) तुटली आहे व ज्याचे रज व तम गुण धुतले गेले आहेत तो धैर्यशील पुरुष या जगात शोभून दिसतो. विवेचन : - मनुष्य आजारी आहे, रूग्ण आहे. हा रोग बाहेरचा नसून आतला आहे व बाहेरून लेप लाऊन हा रोग बरा होऊ शकत नाही. त्यासाठी एक कडू औषध घ्यावे लागेल. केवळ शास्त्रांच्या वाचनाने व उपदेशाने फायदा होणार नाही. शास्त्र आणि उपदेश हे केवळ डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाच्या चिठ्ठीसारखे आहेत. अनासिनचा फार्मूला कळल्याने डोकेदुःखी कमी होत नाही. पाणी कसे तयार होते याचे शास्त्रीय ज्ञान झाल्याने पाण्याची तहान भागणार नाही. त्यासाठी पाणी घ्यावेच लागते. याचप्रमाणे वस्तुंची किंमत आपल्याला वाटणाऱ्या ममतेमुळे आहे. विवस्त्र भटकल्याने, राख फासल्याने, उपाशी राहिल्याने झोपडीत राहिल्याने ममता नाहीशी होत नाही. जोपर्यंत मनाचे आत ममता आहे, तोपर्यंत वस्तू वस्तूत व आत्मा-आत्म्यात फरक जाणवतो. नंतर सोने व माती दगड समान वाटतात. अन्यथा सोने मूल्यवान वाटते कारण त्याबद्दल मोह आहे, ममता आहे, अन्यथा ते निर्माल्य आहे. फक्त अत्यावश्यक अशा कमीत कमी गरजा भागवणे, आसक्ति नाही, व ते वाईट नाही. पण अनावश्यक वस्तूंचा संग्रह करणे वाईट आहे. अनेकजण धनसंपत्ती, जमीन घरे, यांचा संग्रह आवश्यकता गरज भागविण्यासाठी न करता अहंकाराचे तृप्तीसाठी करतात. ही तर मानसिक रोगी असल्याची लक्षणे आहेत. आपली प्रतिष्ठा, इज्जत, सन्मान मोजण्यासाठी ते जणू वस्तूंचा मानदंड म्हणून उपयोग करतात. स्वत: श्रेष्ठ नसल्यामुळे ते वस्तुद्वारे आपली श्रेष्ठता जगाला दाखवू इच्छितात. परंतु ज्ञानी पुरुष स्वस्थ व शांत मनाचा असतो. तो मानसिक रूग्ण नसतो. त्याची सर्वातील आस्था संपलेली असते. त्याचे रज व तमोगुण धुऊन जाऊन केवळ शुद्ध सात्विकताच शिल्लक असते. तो ममतारहित व आसक्तिरहित केवळ आत्मरूप होऊन जगतो. म्हणून त्याचेसाठी सोने, हिरे, घरदार, यांना काहीच मूल्य नसते. सोने व माती त्याला सारखीच. असा ज्ञानी पुरुष या जगात शोभून दिसतो.
सर्वत्रानवधानस्य न किंचिद् वासना हृदि । अनुवाद : - जो सर्व प्रकारच्या व्यवधानांबद्दल उदासीन आहे व ज्याच्या हृदयात कोणतीही वासना नाही अशा तृप्त मुक्तात्म्याची तुलना कुणाबरोबर होऊ शकेल ? विवेचन : - वासनांमुळेच इच्छा निर्माण होतात व इच्छा तर एवढ्या असंख्य आहेत की त्या कधी पुऱ्याच होऊ शकत नाही. अशी वासनायुक्त माणसे सर्व काही मिळूनसुद्धा अतृप्तच असतात. सारे जग जिंकून सुद्धा सिकंदराला अतृप्तीत मृत्यू आला. अनेक करोडोपती अतृप्त अवस्थेतच मरण पावतात. परंतु ज्याची वासना नष्ट झाली तो मात्र आहे त्या जीवनात व जेवढे काही मिळाले आहे, तेवढ्यानेच तृप्त आहे. बुद्ध राजकुमार होता पण त्या अवस्थेत तो तृप्त नव्हता. पण ज्ञान प्राप्तीनंतर तो तृप्त झाला. ज्याच्यात वासना आहेत तो नेहमी वेगवेगळ्या व्यवधानात अडकलेला असतो, त्याला समाधान मिळतच नाही. ज्ञानी माणूस वासनामुक्त असल्याने व्यवधानातूनही मुक्त असतो. जीवनातली धावपळ, संघर्ष यासारख्या बाबींतून त्याची सुटका होते. त्यामुळे तो समाधानी होतो व शांत चित्ताने, पूर्ण तृप्तीने जगतो. त्याची सर्व बंधने नाहीशी होतात. अशा ज्ञानी पुरुषाची तुलना अन्य कुणा सामान्य संसारी किंवा अज्ञानी माणसांबरोबर करता येत नाही. तो पूर्ण सिद्ध पुरुष असतो. जो क्षुद्रत्वामागे धावतो तो स्वतःच क्षुद्र होतो. तो कधीच पूर्णता प्राप्त करू शकत नाही.
जानन्नपि न जानाति पश्यन्नपि न पश्यति । अनुवाद : - वासनारहित पुरुषाशिवाय असा दुसरा कोण आहे की जो सारे काही जाणूनसुद्धा काहीच जाणत नाही, पाहत असूनही पाहत नाही व बोलत असून सुद्धा बोलत नाही. विवेचन : - ज्ञानी व अज्ञानी यांच्या बोलण्यात, पाहण्यात व जाणून घेण्यात फार फरक असतो. अज्ञानी अहंकाराने व वासनेने भरलेला असतो व तो आपल्या स्वार्थामुळे आंधळा झालेला असतो. त्यामुळे त्याच्या पाहाण्यात, बोलण्यात व सर्व क्रियात एक प्रकारची संकुचित वृत्ति असते, उदारता नसते. अहंकारामुळे तो ज्यांना जाणत नाही, त्या बाबींनासुद्धा तो जाणत असल्याचा त्याचा दावा असतो. जे त्याला समजत नाही, ते समजले असल्याचे सांगत फिरतो. आत्मा आणि परमात्मा याचे त्याला ज्ञान नसते व त्यांचे दर्शनही त्यास झालेले नसते पण तो या बाबी सत्य असल्याची जोरदार हमी देत हिंडतो. तो बडबडत रहातो की, आत्मा आहे, परमात्मा आहे, पुनर्जन्म आहे स्वर्गनरक आहे, तुम्ही परमात्म्याला मानत नाही तुम्ही नास्तिक आहात, अज्ञानी आहात, नरकात जाल वगैरे बाबी सांगतो. ज्ञानी माणूस सर्व काही जाणतो पण तरीसुद्धा सांगतो की मी काहीच जाणत नाही. त्याला सर्व काही स्पष्टपणे दिसत असूनही तो सांगतो की मला दर्शन झालेले नाही. तो जे सांगतो, बोलतो त्या कशाबद्दलही त्याचा दुराग्रह नसतो कारण तो इच्छाशून्य, वासनारहित आहे, अहंकाररहित आहे. अशा ज्ञानी पुरुषाची तुलना अन्य कुणा व्यक्तिबरोबर करता येणार नाही.
भिक्षुर्वा भूपतिर्वापि यो निष्कामः स शोभते । अनुवाद : - ज्याची सर्व स्थितींबद्दल (विरक्ति व अनाग्रह असल्यामुळे) शोभनीय किंवा अशोभनीयतेचा विचार नाहीसा झाला आहे व जो निष्काम आहे, तोच शोभून दिसतो मग तो राजा असो किंवा भिकारी. विवेचन : - जीवन एक त्रिवेणी नदी आहे जीच्यात गंगा व यमुना तर प्रगट व प्रत्यक्ष रूपाने सामील झाल्या आहेत पण सरस्वती मात्र गुप्त आहे. जीवनात सुद्धा शरीर व मन तर प्रगट आहे पण चेतना मात्र गुप्त आहे. अज्ञानी माणूस शरीराला व मनाला सहज ओळखतो परंतु ज्ञानी माणूस चेतनाशक्तिला सुद्धा ओळखतो. जे केवळ आपल्या मनाचे आधीन आहेत त्यांनी सृष्टीला द्वैतामधे विभाजित करून टाकले आहे. या विभागणीमुळे सृष्टीत भेद आहे असे दिसते पण ज्ञानी माणसाला गुप्त असलेल्या चेतना शक्तिचीही माहिती असल्याने त्याचे सर्व भेद नष्ट होऊन तो एकत्वाचाच अनुभव घेतो. यालाच सत्य आणि ज्ञान अशी नांवे दिली गेली आहेत. भेद हा केवळ अज्ञानामुळे केला जातो. स्वर्ग, नरक व मोक्ष, परमात्मा व ब्रह्म, सुख-दुःख, राग-विराग-वितराग, दुर्जन, सज्जन व जीवन्मुक्त, साधु-असाधु आणि संत यामधे सुरवातीचे शब्द म्हणजे जणू मनाची व्याख्या आहेत. मन वासनामय आहे. विलासी व स्वार्थी आहे. ते नेहमी फरक काय आहे ह्याचाच शोध घेते. चांगले वाईट, लाभ-तोटा, जय-पराजय, श्रेष्ठ-कनिष्ठ, शोभन-अशोभन, राजा-रंक, त्याग व स्विकार, हिंसा-अहिंसा असा भेद करणे हेच मनाचे लक्षण व काम आहे. आपली वासनापूर्ती करण्यासाठी व स्वार्थासाठी जे अनुकूल असते ते चांगले व जे प्रतिकूल आहे ते वाईट असल्याचे मन सांगते. पण ज्ञानी माणूस ह्या मनाच्या पलिकडे असतो, त्याची शाश्वत आत्म्याशी एकरूपता झालेली असते. सर्व प्रकारचे अस्तित्व शेवटी एकाच आत्म्याचे अस्तित्व असल्याने ज्ञानीपुरुष समानभाव व समत्वबुद्धिचा असतो. जीवन्मुक्ति हा शब्द व संकल्पना ही भारतीय आध्यात्माची साऱ्या मानवजातीला देणगी व ज्ञानाचे वरदान आहे. इतर सर्व धर्म जर द्वंदाला ओलांडून जाऊ शकत नाही ते तर सर्व अजूनही मनाच्याच पातळीवर आहेत. अंतिम सत्य, मुक्ति, आत्मा ह्याविषयी व शाश्वत अस्तित्व ह्याचा व अन्य धर्मांचा काही परिचयच नाही. असे धर्म आचरणाला नियमात जखडून टाकण्यावर भर देतात. पण भारतीय धर्म ज्ञानालाच सर्वात जास्त महत्त्व देतो. म्हणून अष्टवक्र स्वामी म्हणतात की ज्याची सर्व वस्तु व स्थिती (भाव) या बद्दलचा शोभनीयतेचा किंवा अशोभनीयतेचा विचार गळून पडला आहे, जो निष्काम आहे, ज्याची कोणतीच वासना नाही, अहंकार नाही, फळाची आकांक्षा नाही असा ज्ञानी पुरुष भिकारी असो किंवा राजा; तो तर सर्वत्र शोभून दिसतो. व्यक्तिची श्रेष्ठता ही धन, पद, मान, सन्मान यावरून मोजली जात नसून त्याच्या आत्मीक गुणांवरून ठरविली जाते. वासना व अहंकाररहित ज्ञानीच सर्वश्रेष्ठ असतो कारण तो क्षुद्रत्वाला सोडून महान विराटात एकरूप झालेला असतो.
क्व स्वाच्छन्द्यं क्व संकोचः क्व वा तत्त्वविनिश्चयः । अनुवाद : - निष्कपट, सरळ आणि उज्वल चारित्र्याच्या योगी पुरुषाला कुठली स्वच्छंदता व कुठला संकोच ? आणि तत्वाचा आग्रह तरी कुठला ? विवेचन : - ज्या योगी पुरुषाने आत्मज्ञान प्राप्त केले आहे, ज्याने सृष्टीचे मूलतच असणाऱ्या आत्म्याला जाणले आहे तो योगी निष्कपट, सरळ व उज्वल चारित्र्याचा असतो. त्याच्यासाठी स्वच्छंदता, संकोच किंवा तत्वाचा आग्रह या गोष्टी निरर्थक असतात, तो त्या पद्धतीने जगत नसतो. या सर्वांच्या पलीकडे पोहचून तो केवळ आत्मस्वभावानुसार जगतो. आत्म्याचे अस्तित्व हीच त्याची शिस्त, तोच त्याचा नियम व तोच त्याचा संयम असतो. मनाच्या पातळीवर अस्तित्वात असणाऱ्या स्वच्छंदता, संकोच वा तत्वाचा आग्रह यांच्यापासून तो फार दूरवर निघून जातो व तोच त्याचा श्रेष्ठ दर्जाचा विवेक होय.
आत्मविश्रान्तितृप्तेन निराशेन गतार्तिना । अनुवाद : - " आत्म्याशी एकरूप होऊन तृप्त झालेल्या, आशाशून्य व शोकशून्य ज्ञानी पुरुषाला अंतर्यामी जो अनुभव प्राप्त होतो तो कसा व कुणाला सांगणार ?" विवेचन : - आत्मज्ञानी व्यक्ति तृप्त होते. इच्छाविरहित व शोकरहित होते. अशा उच्चतम अवस्थेत पोहचून स्थिर व शांत जीवन जगणाऱ्या ज्ञानी योग्याला आतल्याआंत जो सर्वश्रेष्ठ व विराटस्वरूपी सुखाचा अनुभव येतो तो नेहमीच्या सांसारिक अनुभवांपेक्षा फार वेगळा असतो. त्याचे वर्णनही करता येत नाही. कारण ऐकणारा त्या स्थितीत पोहचलेला नसतो व त्याला त्या प्रकारचा अनुभव नसल्याने त्याला ते अनुभव कळून शकत नाही. अशा स्वरूपाचे अनुभव प्रमाणाद्वारे व तर्काने सिद्ध करता येत नाही, ज्या प्रकारे दहा वर्षाच्या मुलाला काम-क्रिडेचे सुख समजावून सांगता येत नाही, त्याचप्रमाणे कुणाचे दुःख, वेदना, पीडा ही सुद्धा दुसऱ्याला समजवून सांगता येत नाही किंवा एकाच्या वेदनेचा अनुभव दुसऱ्याला देता येत नाही. आंधळ्याला पांढरा, हिरवा, लाल वगैर रंगाचे ज्ञान समजावून सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषाचे आत्म-सुखाचे शब्दातून वर्णन करता येत नाही म्हणून योगी पुरुष मौन असतो. आत्म-ज्ञानात बोध होतो एक अनुभूती येते. त्यात जुन्या धारणा, समजूती सर्व नष्ट होतात. ज्याप्रकारे स्वप्न भंग झाल्यावर एका क्षणात सर्व काही बदलून जाते त्याचप्रमाणे आत्मज्ञानाच्या क्षणार्धात हे संसाररूपी स्वप्नभंग पावते व योगी पुरुषाचा अशा एका नव्या जगात प्रवेश होतो की जे त्याने कधी पूर्वी ऐकले नाही किंवा पाहिलेले नाही किंवा ज्याची त्याने कधी कल्पना केलेली नसते. ह्या स्थितीत गुरूचे सान्निध्य नसेल तर तो वेडा होऊ शकतो. त्याचा काही उपाचारपण नसतो. तो त्या परमात्म्याच्या अनुभूतीत मस्त असतो. ह्या संसारासाठी वेडे होण्यापेक्षा ईश्वरासाठी वेडे होणे जास्त चांगले. आत्म्याचा बोध चित्तनिर्विकार असतांनाच होऊ शकतो. ती एक प्रकारची शून्यावस्था असते. त्याचेच नाव ध्यान व समाधी आहे. मन जेंव्हा शून्य होते तेंव्हाच आत्मा आपल्या पूर्ण प्रकाशासह प्रगट होतो. ध्यान एखाद्या विषयावर होत नसते. विषय असेल तर ध्यान होत नाही. चिन्तन, मनन सुद्धा ध्यान नाही व ध्यान खरे तर मुद्दाम करता येत नाही. केल्याने ध्यान होत नाही. अ-क्रिया हेच ध्यान आहे. अष्टवक्र स्वामींचा भर या अ-क्रियेवर आहे. त्याच अवस्थेत ज्ञान, बोध, जागरण प्राप्त होते. ह्या अनुभूतीनंतर व्यक्ति स्वतःच आत्मा असल्याचा अनुभव येऊ लागतो. तो हिंदु मुस्लीम, खिश्चन, शिख रहातच नाही, तो ब्राह्मण वैश्य क्षत्रिय किंवा शूद्र रहात नाही. तो ब्रह्माला जाणतो म्हणून तो ब्राह्मण. ब्राह्मण्यत्व ही एक उच्च दर्जाची प्राप्ती आहे. त्याच्यात नम्रता येते. अहंकार व वासनासुद्धा लुप्त होते व तो एक श्रेष्ठ पुरुष होतो. त्याच्या जुन्या व्यक्तिमत्त्वाचा लोप होऊन नवे व्यक्तिमत्त्व जन्माला येते म्हणून त्यास 'द्विज' म्हणजे दोन वेळा जन्म घेतलेला असे म्हणतात. शरीराचा जन्म आई देते पण आत्म्याचा जन्म गुरूमुळे होतो. तो शूद्राला ब्राह्मण बनवतो, जीवात्म्याला परमात्मा बनवतो. म्हणून गुरुचे महत्त्व ईश्वरापेक्षाही उंच व श्रेष्ठ आहे. ईश्वरच गुरु रूपात प्रगट होतो. हे गुरुचे महत्त्व आहे. ही ज्ञानप्राप्तीची शाळा आहे संन्यास व अंतिम फल म्हणजे आत्मा. आत्मानुभूती झाल्यावर व्यक्ति मुक्त होते. हीच जीवाची शेवटची गती व परम आनंदाची स्थिती आहे.
सुप्तोऽपि न सुषुप्तौ च स्वप्नेऽपि शयितो न च । अनुवाद : - जो झोपलेला असतांनासुद्धा सुषुप्तित (गाढ निद्रेत) नसतो आणि स्वप्नांतसुद्धा झोपलेला नसतो, जागेपणीसुद्धा जागृत नसतो, तोच धैर्यशील पुरुष क्षणो क्षणी तृप्त असतो. विवेचन : - ज्ञानी व अज्ञानी दोघेही झोपतात पण अज्ञानी जेंव्हा स्वप्नावस्थेत असतो, तेंव्हा स्वतःला विसरून जातो. स्वप्नात सुद्धा हरवून जातो व एका दुसऱ्याच जगात प्रवेश करतो. जेंव्हा गाढ निद्रा (सुषुप्ति) सुरू असते तेंव्हा तर स्वप्नसुद्धा हरवून जातात. त्याला संसाराचे भान रहात नाही व स्वतःचे भान रहात नाही. परंतु ज्ञानी माणसाची झोप संसारी गृहस्थापेक्षा वेगळी असते. ज्ञानी माणूस स्वप्नात सुद्धा जागा असतो. साक्षीभावाचा प्रयोग केल्यावरच हे शक्य आहे. स्वप्नातसुद्धा त्याला याचे भान असते की तो झोपलेला असून स्वप्न पहात आहे. ह्याच पद्धतीने तो सुषुप्तीत सुद्धा जागा असतो. सुषुप्तीत जीवाचा संबंध आत्म्याशी जुळून त्याला आनंदाची अनुभूती प्राप्त होते. ह्या अनुभूतीची प्राप्ती जागा असल्यामुळे फक्त योगी पुरुषालाच होते. ह्याचप्रकारे जागृत अवस्थेत सुद्धा तो सदैव आत्मरूपात विलिन असल्याने बाह्य वस्तू व घटना यामुळे प्रभावित होत नाही. म्हणून तो जागेपणी जागासुद्धा नाही. जागेपणी, झोपेत व सुषुप्तीत सुद्धा तो केवळ आत्मानुभूतीत असतो. असा ज्ञानी नेहमी तृप्त असतो.
ज्ञः सचिन्तोऽपि निश्चिन्तः सेन्द्रियोऽपि निरिन्द्रियः । अनुवाद : - ज्ञानी पुरुष चिनायुक्त असूनही चिन्तामुक्त असतो, इंद्रिये असूनही इंद्रियेरहित असतो, बुद्धि असूनही बुद्धिविरहीत असतो व अहंकार असूनही अहंकारशून्य असतो. विवेचन : - ज्ञानी पुरुष चिंतायुक्त असतो पण चिंतेत तो बुडून जात नाही, वा दुःखी होत नाही. इंद्रिये तर त्याला आहेतच पण सर्व इंद्रिये आपापली कामे करतात. खाणे, पिणे, वास घेणे, ऐकणे, स्वाद घेणे, स्पर्श-ज्ञान, पहाणे, ह्या सर्व क्रिया व्यवस्थितपणे होतात पण वासना नसल्यामुळे ज्ञानी पुरुष त्या क्रिया आसक्तिने करत नाही व त्यांच्यामुळे प्रभाविक होत नाही. आवश्यकता असेल तर तो इंद्रियांचा उपयोग करेल पण वासनेसाठी नाही. ज्ञानी माणूस बुद्धिचा सुद्धा उपयोग करेल पण त्याला त्याचे स्वभावानुसार जसा योग्य वाटेल तेवढाच उपयोग करेल. तो बुद्धिचा मालक म्हणून वागेल, बुद्धि त्याची मालक असणार नाही. ज्ञानी आवश्यकता असल्यावर अहंकाराचा उपयोग करील, गरज असल्यास विनम्रतेचा सुद्धा उपयोग करेल पण त्यांचा गुलाम होणार नाही. कर्ता म्हणून नव्हे तर केवळ साक्षीभावाने सर्व गोष्टींचा उपयोग करेल. सृष्टीच्या नियमांत ज्ञानी पुरुष अडथळाही निर्माण करत नाही व सहकार्यही करत नाही. जसे घडते तशीच ईश्वराची इच्छा आहे असे ते मानतात.
न सुखी न च वा दुःखी न विरक्तो न संगवान् । अनुवाद : - ज्ञानी सुखी नसतो व दुःखी नसतो. तो विरक्त नसतो व कुणाशी संयुक्तही नसतो. तो मुमुक्षु नाही व मुक्तही नाही. त्याच्याजवळ काही आहे असे नाही व त्याच्याजवळ काही नाही असेही नाही. विवेचन : - ज्ञानी माणसाची स्थिती सर्व द्वंद्वांच्या पलिकडील असते. त्याच्या बुद्धिचे वर्णन समत्वबुद्धि असेच करावे लागेल. तो सदैव एकरस, एकभाव व अद्वैतात निमग्न असतो. घड्याळाच्या लंबकाप्रमाणे कधी या टोकाला तर कधी त्या टोकाला याप्रमाणे तो अतिरेक करत नाही. प्राचीन मुनींनी सुद्धा सांगितले आहे की सतारीच्या तारा जास्त ढील्या असू नयेत व जास्त ताणलेल्या असू नयेत तरच त्यातून मधूर संगीत निर्माण होते. जे अज्ञानी असतात तेच एका टोकाला जातात. ज्ञान अतिरेकात नसून समत्वभावात आहे, एकरसतेत आहे. अहंकारी माणसाला अतिरेक करण्यात आनंद वाटतो. ज्ञानी माणूस डोंबाऱ्याप्रमाणे दोन टोकांच्या मधल्या दोरीवर समतोल साधून चालतो. म्हणून म्हटले आहे की धर्म म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे कठीण कर्म आहे. थोडासाही तोल ढासळला तर सर्व साधना तपश्चर्या वाया जाते. म्हणून अष्टवक्र स्वामी म्हणतात की ज्ञानी सुखी नाही व दुःखी नाही, न तो विरक्त आहे, न तो कुणाशी संयुक्त आहे, मुमुक्षू नाही व मुक्त नाही. तो असेसुद्धा मानत नाही की मी कुणी विशेष आहे व असेही समजत नाही की मी नगण्य आहे. तो स्वतःला श्रेष्ठ, ज्ञानी इतरांपेक्षा उच्च दर्जाचा मानत नाही किंवा कमी मानत नाही. तो सदैव समस्थितीत रहातो. जे काही आहे, जसा काही आहे, त्यातच व तशाच स्थितीत तो संतुष्ट असतो.
विक्षेपेऽपि न विक्षिप्तः समाधौ न समाधिमान् । अनुवाद : - जीवनात संकटे निर्माण झाली तरी ज्ञानी पुरुष विक्षिप्त होत . नाहीत, समाधीत ते समाधीमय नसतात, जडतेत जड नसतात व पांडित्यात पंडीत नसतात. विवेचन : - जो ज्ञानी पुरुष आत्मज्ञानामुळे 'समभाव' झाला आहे तो संकटाच्या काळातही विक्षिप्त होत नाही, तो सर्व अडथळे सहन करतो. तो समाधीत रहातो पण तो सदैव समाधीचा अभ्यास करणारा समाधीवाला नसतो. तो नेत्यांप्रमाणे किंवा व्यवसायीकांप्रमाणे पैश्यासाठी, प्रतिष्ठेसाठी धावाधाव करत नाही. त्यामुळे तो जड असल्याला, अ-चल असल्याचा भास होतो पण तो जड नसून पूर्ण चैतन्यशील व जागरूक असतो. त्याच्यात पांडित्य आहे पण पूर्ण ज्ञान झालेले असूनही इतर पंडितांप्रमाणे त्याच्यात अहंकार नाही व पांडित्याचे प्रदर्शन करण्याची वासनाही नाही. तर्क-कुतर्क करण्यावर त्याचा विश्वास नसून तो सहज स्वाभाविकपणे ज्ञान आत्मसात करून ज्ञानरूप होतो व त्याने जसे जाणले आहे तेच तो व्यक्त करतो.
मुक्तो यथास्थितिस्वस्थः कृतकर्तव्यनिर्वृतः । अनुवाद : - सर्व प्रकारच्या परिस्थितीत मुक्त पुरुष स्वस्थ व शांत असतो. केलेल्या व करण्यायोग्य कर्तव्यकर्मामुळे तृप्त आहे. सर्वांप्रती 'समभाव' आहे व वासनारूपी कृष्णेच्या अभावामुळे तो केलेल्या व न केलेल्या कर्मांचे स्मरण करत नाही. विवेचन : - ज्याला ज्ञान प्राप्त झाले तोच मुक्त असतो. अज्ञानी तर बंधनग्रस्त असतो, रुग्ण असतो, कामना-वासना-अहंकार यांच्या आहारी गेलेला असतो. पण जो या बंधनांना तोडू शकला तो मुक्त पुरुष मात्र स्वस्थ असतो. जी कर्तव्यकर्म त्याने केली व जी करण्यायोग्य आहे त्या दोन्ही प्रकारच्या कर्मांत तो तृप्तीचा आनंद घेतो. जे केले त्याबद्दल चिंता किंवा शोक करत बसत नाही किंवा त्याबद्दल खुश होऊन प्रसन्न होत नाही. करण्यायोग्य कर्मांबद्दलसुद्धा त्याच्या मनात वासना नसते व फळाची अपेक्षा नसते. सहज भावाने तो कर्म पार पाडीत जातो. दोन्ही बाजूंशी समान वृत्तीने व्यवहार करतो. ते कर्तव्य त्याने पार पाडले किंवा जे त्याने प्रत्यक्षात केलेले नाही त्याचाही तो विचार करत नाही व आठवण ठेवत नाही. अशी कर्तव्य कर्मांची आठवण ज्याला वासना-तृष्णा आहे तोच ठेवतो. लाभ-तोटा ह्याचा विचार ज्याला काही मिळवायचे आहे तोच करतो. ज्ञानी माणसाला काही मिळवाचे नाही व मुद्दाम कशाचा त्यागही करायचा नसतो. म्हणून तो पश्चाताप करत नाही, खुश होत नाही किंवा गर्व करेआत नाही. ज्ञानी माणसाची अशी ही श्रेष्ठ अवस्था असते.
न प्रीयते वन्द्यमानो निन्द्यमानो न कुप्यति । अनुवाद : - स्तुती केल्यामुळे मुक्त पुरुष प्रसन्न होत नाही किंवा निंदा केल्यामुळे संतप्त होत नाही. मरणामुळे त्याला उद्विग्नता येत नाही किंवा जीवनातही तो हर्षभरित नसतो. विवेचन : - प्रशंसेचा वा निंदेचा ज्याच्यावर परिणाम होतो तो पुरुष ज्ञानी असू शकत नाही. ज्याच्या मनात अहंकार भरलेला आहे त्याची निंदा केली तर तो संतप्त होतो व प्रशंसा करून त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवले की प्रसन्न होतो. निंदा व प्रशंसा याचा सर्वात जास्त परिणाम अज्ञानी पुरुषावर होतो. ज्ञानी पुरुष तर मृत्यूचे समयी सुद्धा दुःखी होत नाही कारण तो मृत्यूला सुद्धा स्वाभाविक मानतो. मृत्यूसुद्धा त्याचे नजरेत सृष्टीचा एक नियम आहे. जीवनामुळे हर्षित होत नाही. हर्ष व खेद हे सर्व मनाच्या समुद्रात निर्माण होणारे तरंग आहेत, विक्षेप आहेत व त्यांचा ज्ञानी माणसावर काही परिणाम होत नाही. असा ज्ञानी पुरुषच मुक्त असतो. ज्ञानी पुरुष आत्म्याशी एकरूप असल्याने व आत्मा नित्य-अमृत असल्याने त्याचा मृत्यू होत नाही. केवळ शरीर म्हणून जगणारे अज्ञानीच मरण पावतात व म्हणून तेच मृत्यूमुळे भयभीत होतात.
न धावति जनाकीर्णं नारण्यं उपशान्तधीः । अनुवाद : - 'शांत बुद्धिचा पुरुष लोकांनी गजबजलेल्या शहरांकडे धाव घेत नाही किंवा निर्जन अशा जंगलाकडेही धावत नाही. तो सर्व स्थितीत, सर्व ठिकाणी समभावाने जगतो. ' विवेचन : - जीवनातली धावपळ तोच पुरुष करतो ज्याला काही प्राप्त करायचे आहे, ज्याच्या मनात तृष्णा आहे, वासना आहे, तोच सुखांमागे धावतो. ही वासना संसाराची असो वा मोक्षाची, ती वासनाच आहे. ज्या ज्ञानी पुरुषाने ते श्रेष्ठ तत्व जाणले, ज्याला आत्मबोध झाला, ज्याला सर्वश्रेष्ठ आत्मा प्राप्त झाला, जो मुक्त झाला त्याची सारी धावपळ समाप्त होते. कारण त्याच्या सर्व इच्छा, आकांक्षा समाप्त होतात. त्याला सृष्टीमधे एकत्वाचेच दर्शन होते, ज्यामुळे त्याच्यात सर्वांबद्दल समभाव निर्माण होतो. असा ज्ञानी पुरुष शांत होत जातो. तो सर्व प्रकारच्या परिस्थितीत व सर्व ठिकाणी शांतपणे, कोणतीही तक्रार न करता जगतो. मग ते ठिकाण शहर असो किंवा जंगल, गर्दीचे ठिकाण असो वा सुनसान निर्जन ठिकाण, महाल असो किंवा झोपडी, त्याच्या दृष्टीने ही सर्व ठिकाणे सारखीच आहेत. अज्ञानी माणूस निवड करतो की मला राहण्यासाठी असेच ठिकाण पाहिजे, असेच जेवण पाहिजे, भिक्षा मागूनच जेवीन, असेच कपडे घालीन, नागडाच राहील वगैरे. पण ज्ञानी माणसाला कशाचीच निवड करण्याची इच्छा नसते. जे आहे त्यात तो राजी आहे. तो आत्म्याचे एक नाममात्र साधन असतो. शरीरसुखाबद्दल आसक्ति नसल्याने त्या जीवन्मुक्त व्यक्तिची ही ज्ञानमय अवस्था श्रेष्ठ होय. |