|
सामवेद - ऐन्द्र काण्ड - तृतीयोऽध्यायः सामवेद - तृतीय प्रपाठके - प्रथमार्ध पंचमी दशति वसिष्ठ ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः अभि त्वा शूर नोनुमोऽदुग्धा इव धेनवः । ईशानमस्य जगतः स्वर्दृशमीशानमिन्द्र तस्थुषः ॥ २३३
हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, धारा न काधलेल्या गायींच्या कळपाप्रमाणे आम्ही तुझ्यापुढे वाकतो आणि तुझी स्तुति करतो. हे सूर्याला प्रकाश देणार्या, सर्व अचरांच्या आणि चर विश्वाच्या स्वामी, आम्ही तुझी कीर्ति गातो.
भरद्वाज ऋषिः - इन्द्रो देवता - गायत्री छन्दः त्वामिद्धि हवामहे सातौ वाजस्य कार्वः । त्वां वृत्रेष्विन्द्र सत्पतिं नरस्त्वां काष्ठास्वर्वतः ॥ २३४
हे परमेश्वरा, आम्ही तुझे भक्त तुझे सर्व दिशांहून आवाहन करीत आहोत. म्हणून तू आम्हाला भौतिक आणि आध्यात्मिक संपत्ति प्रदान कर. हे उदात्त संरक्षका, पराक्रमी नेते सर्व अडचणींच्या आणि विघ्नांच्या प्रसंगी मदतीसाठी नेहमी तुझेच आवाहन करतात, तुझाच धावा करतात.
प्रस्कण्वः ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः अभि प्र वः सुराधसमिन्द्रमर्च यथा विदे । यो जरितृभ्यो मघवा पुरूवसुः सहस्रेणेव शिक्षति ॥ २३५
हे मानवांनो, खरेखुरे ज्ञान प्राप्त व्यावे म्हणूनजो सर्व भौतिक आणि आध्यात्मिक संपत्तिचा स्वामी आहे, त्या परमेश्वराची आराधना करा. तो सर्व सम्पत्तिचा स्वामी असून सर्वांना आश्रय देणारा आहे; आपल्या भक्तांची मदत करतो आणि त्यांना भौतिक व आध्यात्मिक दोन्ही प्रकारची संपत्ति हजारपटीने प्रदान करतो.
नोधा ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः तं वो दस्ममृतीषहं वसोर्मन्दानमन्धसः । अभि वत्सं न स्वसरेषु धेनव इन्द्रं गीर्भिर्नवामहे ॥ २३६
गोठ्यात बांधलेल्या गायी पौष्टिक खाद्य काऊन अति आनंदाने आपल्या वासरावर झुकतात, त्यांना चाटतात; त्याप्रमाणे हे परमेश्वरा, आम्ही आमची मस्तके तुझ्यापुढे नमवितो आणि तुझ्या कीर्तीची स्तुतिस्तोत्रे गातो. कारण तू आमच्या सर्व अशुभांचा नाश करणारा आहेस आणि आमच्या आसक्ती, अहंकार, लोभ, मत्सर इत्यादि शत्रूंचाही नाश करणारा आहेस.
कलिः प्रगाथः ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः तरोभिर्वो विदद्वसुमिन्द्रं सबाध ऊतये । बृहद्गायन्तः सुतस्ॐए अध्वरे हुवे भरं न कारिणम् ॥ २३७
हे साधकांनो, तो तुम्हाला ऐश्वर्य आणि शक्ति देतो, त्या भगवंताची तुझी स्तुतिस्तोत्रे गाऊन प्रशंसा कर. सर्व अनाक्रमक अहिंसक यज्ञान, जेथे सोमरस तयार केला जातो तेथे वैदिक मंत्रांनी त्याची संरक्षणासाठी कीर्ती गा, प्रशंसा करा. जेव्हां तुम्ही संकटात असाल तेव्हां त्याचेच आवाहन करा. मी सुद्धा त्याचाच धावा करतो. वडील जशी मुलांच्या कल्याणाची काळजी घेतात आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व करतात, त्यांना आधार देतात, तसे प्रमेश्वरही आपल्या कल्याणासाठी सर्व काही करतो. (येथे ’मी’ हा शब्द भक्तासाठी वापरला आहे आणि तो इतरांना समजावून सांगण्यासाठी आपला अनुभव सांगत आहे.)
वसिष्ठ ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः तरणिरित्सिषासति वाजं पुरन्ध्या युजा । आ व इन्द्रं पुरुहूतं नमे गिरा नेमिं तष्टेव सुद्रुवम् ॥ २३८
सावध कार्यकर्ता खरे ज्ञान आणि खोटे ज्ञान यांतील भेद जाणूं इच्छितो, आणि त्यासाठी पवित्र आणि विशा बुद्धीची मदत घेतो. हे अनेकवेळा ज्याचे आवाहन केले जाते त्या परमेश्वरा, मी भक्तियुक्त पदांनी कल्याणासाठी तुझ्यापुढे वाकतो; जसा सुतार त्याचे उत्तम लाकडाचे चाक वाकवतो त्याप्रमाणे. (भक्तियुक्त पदांनी परमेश्वराला नमवणे हे अलंकारिक वर्णन आहे.)
मेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः पिबा सुतस्य रसिनो मत्स्वा न इन्द्र ग्ॐअतः । आपिर्नो बोधि सधमाद्ये वृधे३ऽस्मां अवन्तु ते धियः ॥ २३९
हे परमेश्वरा, ज्ञानयुक्त भक्तीचा रस, जो आम्ही तुला पवित्र अंतःकरणाने अर्पण करीत आहोत तो तू प्राशन कर आणि आनंदीत हो.तूच आमच्या सर्वव्यापी परिचित आणि नातेवाईक आहेस. आम्ही सदैव तुझ्याबरोबर असावे आणि तुझ्या सहवासाचा आनंद प्राप्त करावा म्हणून तू आम्हांला प्रकाश प्रदान कर. आमचा सर्वप्रकारे विकास व्हावा म्हणून तुझे ज्ञान आमचे उत्तम प्रकार मार्गदर्शन करो. (भक्तीचा दिव्य रस प्राशन करणे हे प्रार्थना स्वीकाराचे अलंकारिक वर्णन आहे.)
मेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः त्वं ह्येहि चेरवे विदा भगं वसुत्तये । उद्वावृषस्व मघवन्गविष्टय उदिन्द्राश्वमिष्टये ॥ २४०
हे परमेश्वरा ! तुझ्या ज्ञानी उपासकाला अधिक ज्ञानसंपदा प्राप्त व्हावी म्हणून तू त्याच्याजवळ ये. त्याच्यावर शांति आणि आनंदाचा वर्षाव कर म्हणजे त्याला खरे ज्ञान आणि ऊर्जा, वृद्धि प्राप्त होऊन तो तुझ्या अधिक संपर्कात, सहवासात राहू शकेल. त्याला योगाचे आध्यात्मिक ज्ञानही तू प्रदान कर.
वसिष्ठ ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः न हि वश्चरमं च न वसिष्ठः परिमंस्ते । अस्माकमद्य मरुतः सुते सचा विश्वे पिबन्तु कामिनः ॥ २४१
हे भक्तांनो, परमेश्वर जो आपल्या जीवनाचे जीवन आहे, अथवा ज्ञानी मनुष्य हे तुमच्यातील अत्यंत विनम्र व्यक्ती अथवा हलक्या दर्जाची व्यक्ती कुणाकडेही तुच्छतेने पहात नाहीत. सर्वांनी या औषधीच्या तसेच भक्तीच्या सोमरसाचे पान करावे जो आम्ही तयार केला आहे. ज्या कुणाची इच्छा असेल त्याने आमच्या या यज्ञात त्याचे सेवन करावे. (खरा भक्त हा जन्मावर वा वर्णावर आधारीत भेद कधीच मानत नाही. सर्वांशी समभावनेने प्रेमाने वागतो.)
प्रमाथ ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः मा चिदन्यद्वि शंसत सखायो मा रिषण्यत । इन्द्रमित्स्तोता वृषणं सचा सुते मुहुरुक्था च शंसत ॥ २४२
अरे मित्रांनो, तुम्ही सर्व शक्तिमान परमेश्वराशिवाय इतर कुणाचीही कीर्ती गाऊ नका; म्हणजे कुठलेही दुःख तुझाला त्रास देणार नाही. तुझी स्वतः कोठलेही दुःख सोसू नका आणि इतर कुणालाही अपाय करू नका. तुमच्या सर्व यज्ञाच्या समयी जो तुम्हां सर्वांवर एकाचवेळी शांति आणि आनंदाची वृष्टि करतो त्या परमेश्वराची फक्त स्तुति, प्रशंसा करा आणि वैदिक ऋचांनी वारंवार त्याचीच प्रशंसा करा.
षष्ठी दशति पुरुहन्मा आङ्गिरस ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः न किष्टं कर्मणा नशद्यश्चकार सदावृधम् । इन्द्रं न यज्ञैर्विश्वगूर्तमृभ्वसमधृष्टं धृष्णुमोजसा ॥ २४३
आपल्या कृत्यांनी त्याला कुणी प्राप्त करू शकत नाही आणि मारू शकत नाही. जो शर्वशक्तिमान परमेश्वराच्या आदेशानुसार वागतो, त्या सर्वशक्तिमान, अजय, आपल्या परम शतीने सर्वांवर जय मिळविणारा परमेश्वर, त्याला शक्ति प्रदान करत असतो.
मधातिथि काण्वौ ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः य ऋते चिदभिश्रिषः पुरा जत्रुभ्य आतृदः । सन्धाता सन्धिं मघवा पुरूवसुर्निष्कर्ता विह्रुतं पुनः ॥ २४४
कुठेही जखम झाल्यास परमेश्वर ते जखमी अवयव पूर्ववत निरोगी करून टाकतो. म्हणून प्रत्येकाने नेहमी परमेश्वराच्या कीर्तीचे ध्यान केले पाहिके आणि त्यालाच शरण गेले पाहिजे. त्याच्याशी एकनिष्ठ राहून त्याची उपासना केली पाहिजे.
मेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः आ त्वा सहस्रमा शतं युक्ता रथे हिरण्यये । ब्रह्मयुजो हरय इन्द्र केशिनो वहन्तु स्ॐअपीतये ॥ २४५
आध्यात्मिक ज्ञान असलेले, सूर्याच्या किरणांप्रमाणे दीप्तिमान, प्रकाशयुक्त आणि ज्यांचे देह तेज आणि पौरुष यांनी युक्त आहेत असे हजारो शेकडो ज्ञानी भक्त तुझे ध्यान करोत आणि इतरांना तुझ्याविषयी उपदेश करोत की, ज्यायोगे त्यांना ज्ञानोत्तर भक्तिरसाचे मनसोक्त पान करता येईल.
विश्वामित्र ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः आ मन्द्रैरिन्द्र हरिभिर्याहि मयूरर्ॐअभिः । मा त्वा के चिन्नि येमुरिन्न पाशिनोऽति धन्वेव तां इहि ॥ २४६
मोरांच्या केकांप्रमाणे आमच्या आनंदी प्रार्थना तुझ्या सुंदर शक्तींना आमच्या हृदयात प्रकट करोत. तुला कोणीही जाळ्यात अडकवू शकत नाही. हे परमेश्वरा, सशस्त्र माणसाप्रमाणे तू त्याचे पाश तोडून टाकतोस.
गौतम ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः त्वमङ्ग प्र शंसिषो देवः शविष्ठ मर्त्यम् । न त्वदन्यो मघवन्नस्ति मर्डितेन्द्र ब्रवीमि ते वचः ॥ २४७
हे प्रिय मित्रा, तू याप्रमाणे भगवंताची प्रार्थना कर. ’हे सर्वशतिमान, तू शांति आणि आनंद देणारा आहेस. मर्त्य मानवाला दिलासा, आश्वासन देणारा तुझ्या खेरीज अन्य कुणी नाही. हे परमेश्वरा, मी तुझ्याशीच बोलत आहे. मी अत्यंत मनःपूर्वक तुझीच कीर्ती वर्णन करतो.
नृमेधपुरुमेधौ ऋषी - इन्द्रो देवता - बृहती छन्दः त्वमिन्द्र यशा अस्यृजीषी शवसस्पतिः । त्वं वृत्राणि हंस्यप्रतीन्येक इत्पुर्वनुत्तश्चर्षणीधृतिः ॥ २४८
हे परमेश्वरा, तू अत्यंत प्रसिद्ध, प्रबलासून आमचा शक्ति आणि पराक्रमांनी युक्त स्वामी आहेस आणि तुझ्या भक्तांना तू सरळ आणि पवित्र मार्गावर नेतोस. मानवांच्या अजेय पालका, तू एकटाच आमच्या पापरूपी शत्रूंचा नाश करतोस.
मेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः इन्द्रमिद्देवतातय इन्द्रं प्रयत्यध्वरे । इन्द्रं समीके वनिनो हवामह इन्द्रं धनस्य सातये ॥ २४९
आम्ही यज्ञ करण्यासाठी फक्त परमेश्वराचेच आवाहन करतो. जेव्हां अहिंसक, अनाक्रमक यज्ञ चालू असतो तेव्हां त्याचेच आम्ही आवाहन करतो. यज्ञाच्या समाप्तीच्या वेळी किंवा दुष्टाशी युद्ध करताना आम्ही त्याचे स्मरण करतो. जेव्हां संपत्तिची वाटणी करतो तेव्हां किंवा तिचे दान करतांनाही आम्ही भगवंताचेच आवाहन करतो.
मेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः इमा उ त्वा पुरूवसो गिरो वर्धन्तु या मम । पावकवर्णाः शुचयो विपश्चितोऽभि स्त्ॐऐरनूषत ॥ २५०
मी केलेली स्तुतिस्तोत्रे हे अप्रिमित संपत्तिच्या स्वामी, परमेश्वरा, तुला प्रसन्न करोत. अग्नीप्रमाणे तेजस्वी आणि काया वाचा मनोभावेपवित्र असणारे ज्ञानी लोक, जे इतर सर्वांनाही पवित्र करतात, ते त्यांच्या मंत्रांनी, परमेश्वरा, तुझीच कीर्ति वर्णन करतात.
मेधातिथिर्ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः उदु त्ये मधुमत्तमा गिर स्त्ॐआस ईरते । सत्राजितो धनसा अक्षितोतयो वाजयन्तो रथा इव ॥ २५१
आमची ही अत्यंत मधुर कवने, ह्या तुझ्या स्तुतिपर ऋचा, नेहमी विकय प्राप्त करणार्या रथांप्रमाणे - जे त्यांच्या शक्तीचे प्रदर्शन करतात, संपत्ति मिळवितात आणि न चुकता मदतही करतात त्याप्रमाणे तुझ्यापर्यंत हे परमेश्वरा पोहोचोत.
देवातिथिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः यथा गौरो अपा कृतं तृष्यन्नेत्यवेरिणम् । आपित्वे नः प्रपित्वे तूयमा गहि कण्वेषु सु सचा पिब ॥ २५२
एखादे हरिण जेव्हां तहानेने अत्यंत व्याकुळ होते तेव्हां ते गवन नसलेल्या पाण्याच्या जवळ जाते, त्याप्रमाणे हे ज्ञानाची इच्छा असणार्या जीवात्म्या, तू लवकर आमच्या जवळ हे आणि ज्ञानी लोकांशी मैत्री करून शांति आणि आनंदरूपी आध्यत्मिक रसाचे त्यांच्याबरोबरच आकंठ पान कर.
सप्तमी दशति भर्ग प्रगाथ ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः शग्ध्यू३षु शचीपत इन्द्र विश्वाभिरूतिभिः । भगं न हि त्वा यशसं वसुविदमनु शूर चरामसि ॥ २५३
हे ज्ञान आणि कर्मांच्या स्वामी, तू तुझ्या सर्व शक्तिनिशी आमची मदत कर. तू श्रेष्ठ परम सुख देणारा, एवढेच नव्हे तर मोक्ष देणारा आहेस. तू महावीर आहेस. आमच्या भौतिक आणि आध्यात्मिक संपत्तिचे अन्वेषण करणारा आहेस. आम्ही तुझे अनुसरण करतो.
रेभः कश्यप ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः या इन्द्र भुज आभरः स्वर्वां असुरेभ्यः । स्तोतारमिन्मघवन्नस्य वर्धय ये च त्वे वृक्तबर्हिषः ॥ २५४
हे परमेश्वरा ! आनंदाच्या स्वामी ! तू स्वार्थी लोकांकडून त्यांच्या दुष्कृत्यामुळे त्यांचा आनंद आणि आनंदाची साधने हिरावून घेतोस. हे परमेश्वरा, जो तुझी अंतःकरणपूर्वक स्तुति करतो त्याची तू भरभरात करतोस. आणि जे उदार भक्त त्यांचे जीवन तुझ्या चरणी समर्पण करतात, त्यांचीही तू भरभराट करतोस. (ही ऋचा जो उत्तम राजा दुष्ट लोकांकडून संपत्ति काढून घेतो त्यासही लागू पडते.)
जमदग्निर्भार्गव ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः प्र मित्राय प्रार्यम्णे सचथ्यमृतावसो । वरूथ्ये३ वरुणे चन्द्यं वचः स्तोत्रं राजसु गायत ॥ २५५
सत्याचा आश्रय घेणार्या ज्ञानी माणसा ! जो परमेश्वर सर्वांचा सुहृद आहे, न्याय देणारा आहे, अत्यंत स्वीकारार्ह आहे, आपला परम हितचिंतक आहे, सूर्य आणि चंद्रासारख्या सर्व प्रकाशमान वस्तूंना जो व्यापून आहे, त्या परमेश्वराविषयी आदर व्यक्त करणारी पदे तू गा. वैदिक ऋचांप्रमाणेच भगवान् आणि त्याचे भक्त, जे सर्वांशी मित्रत्वाने आणि न्यायाने वागतात, ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरवून सर्व अज्ञानरूपी अंधकार नष्ट करून त्यांच्या सद्गुणांनी प्रकाशत राहतात, त्यांची कीर्तीचे वर्णन कर.
मेधातिथिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः अभि त्वा पूर्वपीतय इन्द्र स्त्ॐएभिरायवः । समीचीनास ऋभवः समस्वरन्रुद्रा गृणन्त पूर्व्यम् ॥ २५६
हे परमेश्वरा ! ज्ञानी भक्त आणि सर्व सज्जन लोक प्रामाणिकपणे मनःपूर्वक तुझीच स्तुतिसुमनें गातात आणि इतरांसमोर आनंदाचा आणि स्थळाचा आध्यात्मिक रस मनसोक्त प्राशन करू शकतात. ते तुझी सनातन, आदि बीज अशी कीर्ती गातात.
नृमेधपुरुमेधौ ऋषी - इन्द्रो देवता - बृहती छन्दः प्र व इन्द्राय बृहते मरुतो ब्रह्मार्चत । वृत्रं हनति वृत्रहा शतक्रतुर्वज्रेण शतपर्वणा ॥ २५७
अरे भक्तांनो, तुमच्या प्रसिद्ध वैभवसंपन्न परमेश्वराची पवित्र ऋचांच्या द्वारे स्तुति करा, त्यांचे गायन करा. सर्वशक्तिमान परमेश्वर असंख्य आश्चर्यजनक कृत्त्ये करणारा असून, अज्ञान आणि पातकांचा, तसेच दुष्ट प्रवृत्तींचा, अशुभाचा नाश करणारा आहे. तो आपल्या सामर्थ्याने दुष्टांचा नाश करून शेकडो प्रकारे सज्जनांचे रक्षण करीत असतो.
नृमेधपुरुमेधौ ऋषी - इन्द्रो देवता - बृहती छन्दः बृहदिन्द्राय गायत मरुतो वृत्रहन्तमम् । येन ज्योतिरजनयन्नृतावृधो देवं देवाय जागृवि ॥ २५८
हे भक्तांनो ! सर्वशक्तिमान परमेश्वरासाठी तुम्ही प्रसिध उत्तम स्तुतिवाचक ऋचांचे गायन करा. तो सर्वशक्तिमान परमेश्वर उत्तम तर्हेने पातकांचा संहार करतो आणि त्यायोगे सत्याचे प्रवर्तक आत्म्याला जागृत करणारी दैवी ज्योत निर्माण करतात.
वसिष्ठ ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः इन्द्र क्रतुं न आ भर पिता पुत्रेभ्यो यथा । शिक्षा णो अस्मिन्पुरुहूत यामनि जीवा ज्योतिरशीमहि ॥ २५९
हे परमेश्वरा ! पिता ज्याप्रमाणे आपल्या पुत्रांना ज्ञान देतो, त्याप्रमाणे तू आम्हाला ज्ञान दे. हे परमेश्वरा, ज्या रक्षणासाठी तुझी स्तुति केली जाते त्यायोगे आम्हाला न्यायाच्ता मार्गाने जाण्यासाठी, व योगाने मनावर ताबा मिळविण्यासाठी मार्गदर्शन कर. म्हणजे आम्ही तुझ्या दैवी प्रकाशाचा साक्षात्कार करू शकू.
रेभः कश्यप ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः मा न इन्द्र परा वृणग्भवा नः सधमाद्ये । त्वं न ऊती त्वमिन्न आप्यम् मा न इन्द्र परा वृणक् ॥ २६०
हे परमेश्वरा ! तू आमचा त्याग करू नको. तू सदैव आमच्या समोर रहा आणि आमची हृदये आनंदाने भरून टाक. तुझी कृपा लाभावी म्हणून आम्ही आमच्या बुद्धीचा उपयोग करीत असतो.
मेधातिथिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः वयं घ त्वा सुतावन्त आपो न वृक्तबर्हिषः । पवित्रस्य प्रस्रवणेषु वृत्रहन्परि स्तोतार आसते ॥ २६१
हे पापविनाशना, आम्ही तुझे भक्त, ज्यांनी आपल्या भक्तीला ज्ञानाची जोड देऊन तिची वाढ केली आणि आमची, जलाप्रमाणे शांत, निर्वात व पवित्र हृदयरूपी आसने तुझ्यासमोर अंथरली आहेत त्यावर तू बसावेस आणि तुझ्या पवित्रता रूपी निर्झरात तू स्नान करावेस.
भरद्वाज ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः यदिन्द्र नाहुषीष्वा ओजो नृम्णं च कृष्टिषु । यद्वा पञ्च क्षितीनां द्युम्नमा भर सत्रा विश्वानि पौंस्या ॥ २६२
हे परमेश्वरा ! सर्व आध्यात्मिक आणि भौतिक शक्ति ज्या मनुष्यामध्ये आढळून येतात, आणि निरनिराळ्या स्तरावरील लोकांना जी उत्तम कीर्ति प्राप्त होते ती तुझ्यामुळेच होय. आपण आम्हाला कायमच पौरुष प्रदान करावे.
अष्टमी दशति मेधातिथिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः सत्यमित्था वृषेदसि वृषजूतिर्नोऽविता । वृषा ह्युग्र शृण्विषे परावति वृषो अर्वावति श्रुतः ॥ २६३
हे कृपेच्या वर्षाव करणार्या, तूच आमचा खरोखर रक्षणकर्ता आहेस. हे सर्वव्यापका ! महावीरांनी तुझे आवाहन केले आहे. हे शर्वशक्तिमान, तू कृपेची वृष्टि करणारा आहेस. सर्व इच्छा पूर्ण करणारा आहेस. तू द्रही आहेस आणि जवळही आहेस म्हणून तुला ’वृषा’ म्हणतात.
रेभः काश्यप ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः यच्चक्रासि परावति यदर्वावति वृत्रहन् । अतस्त्वा गीर्भिर्द्युगदिन्द्र केशिभिः सुतावां आ विवासति ॥ २६४
हे पापनाशना, या पृथ्वीवर दूर असलेल्या स्वर्ग, तसेच आकाश आदि ठिकाणी तूच सर्वशक्तिमान आहेस. म्हणून यज्ञकर्ता त्याची तुझ्या ठिकाणी असलेली भक्ति इतर ज्ञानी भक्तांसह ऋचांचे गान करून व्यक्त करीत असतो.
वत्स ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः अभि वो वीरमन्धसो मदेषु गाय गिरा महा विचेतसम् । इन्द्रं नाम श्रुत्यं शाकिनं वचो यथा ॥ २६५
जो सर्व अशुभांचा नाश करणारा आहे आणि वेद ज्याच्या थोरवीच गान करतात, त्या सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान परमेश्वराची तुमच्या प्राकृतिक आणि आध्यात्मिक आनंदोत्सवाच्या प्रसंगी तुम्ही मोठ्या आवाजात आणि स्तुतीतील शब्दार्थास अनुसरून अत्यंत प्रेमाने आणि हृदयांतील भावनेस व्यक्त करणार्या शब्दात प्रशंसा करावी.
भरद्वाज ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः इन्द्र त्रिधातु शरणं त्रिवरूथं स्वस्तये । चर्दिर्यच्च मघवद्भ्यश्च मह्यं च यावया दिद्युमेभ्यः ॥ २६६
हे परमेश्वरा ! आम्झ्या कल्याणासाठी मला (शरीररूपी) एक निवासस्थान द्या, जो तीन धातूंनी (वात, पित्त, कफ) परिपूर्ण असेल, जे त्रिविध (आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक) तापांपासून मुक्त असेल. अथवा असे एक घर द्या की ज्यात सोने, चांदी, तांबे यांचा यथायोग्य उपयोग केलेला असेल, आणि जे उन्हाळा, पावसाळा व हिवाळा यांत नेहमी आराम देणारे, सुख देणारे असेल. यज्ञाच्या श्रीमंत यजमानांना आणि मलाही असे निवासस्थान द्या की जे प्रकाशांनी युक्त आणि सर्व दुःखांपासून मुक्त असेल.
नृमेध ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः श्रायन्त इव सूर्यं विश्वेदिन्द्रस्य भक्षत । वसूनि जातो जनिमान्योजसा प्रति भागं न दीधिमः ॥ २६७
जो सूर्याप्रमाणे प्रकाशाचा स्त्रोत आहे त्या भगवंताचा, परमेश्वराचा आश्रय घेऊन तुम्ही सर्व शक्तिनिशी सर्व संपत्तिचा, जी आता विद्यमान आहे, जी यानंतरही तुमच्या परीश्रमाने प्राप्त होईल, तिचा आनंद उपभोगू या. जी संपत्ति खरोखर भगवंताचीच आहे, ती आपण वारसाहक्काने वाटून घेऊ.
पुरुहन्मा ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः न सीमदेव आप तदिषं दीर्घायो मर्त्यः । एतग्वा चिद्या एतशो युयोजत इन्द्रो हरी युयोजते ॥ २६८
हे चिरस्थायी आत्म्या ! जो मनुष्य ईश्वराच्या अस्तित्वार विश्वास ठेवत नाही (अर्थात् नास्तिक असतो) आणि कृपणही असतो, त्याला कधी आध्यात्मिक अन्न प्राप्त होत नाही; त्याला कधी इच्छित ध्येयाचीही प्राप्ती होत नाही. कारण जो मनुष्य घोड्यांचा मालक असतो तोच त्यांना लगाम घालू शकतो, ताब्यांत ठेऊ शकतो. सूर्यच त्याच्या निरनिराळाच्या प्रकारच्या किरणांना (अश्वांना) काबूत ठेऊ शकतो. त्याचप्रमाणे योगीच त्याच्या ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांवर ताबा ठेऊ शकतो. हे तो त्याचे ज्ञान व त्याची भक्ति या दोन लढवय्या घोड्यांचा मदतीने करू शकतो.
नृमेध-पुरुमेधावृषी - इन्द्रो देवता - बृहती छन्दः आ नो विश्वासु हव्यमिन्द्रं समत्सु भूषत । उप ब्रह्माणि सवनानि वृत्रहन्परमज्या ऋचीषम ॥ २६९
तुम्ही तुमच्या अंतरांतील आणि बाहेरील प्रत्येक युद्धप्रसंगी पूज्य परमेश्वरालाच अलंकाराप्रमाणे धारण करा. हे पापनाशना, नेहमी विजयी होणार्या, सर्वश्रेष्ठ प्रकारे स्तुत्य अशा परमेश्वरा ! तू आमच्या हृदयात प्रकट हो, आणि आमच्या नित्य यज्ञांत तुझी जी स्तुति करतो, त्य्झ्या ज्या प्रार्थना करतो, त्या ऐक. आअम्च्या स्तुतितून आम्ही तुझी कीर्तीच वरणन करावी अशी कृपा तू करावीस.
विसिष्ठ ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः तवेदिन्द्रावमं वसु त्वं पुष्यसि मध्यमम् । सत्रा विश्वस्य परमस्य राजसि न किष्ट्वा गोषु वृण्वते ॥ २७०
हे परमेश्वरा, ही पृथ्वी तुझी संपत्ति आहे. मधील अंतरालाचा आश्रही तूच आहेस. त्यावरील लोकांचा तूच चक्रवर्ति सम्रात आहेस. ह्या सर्व ब्रह्माण्डात तुझा सामना करू शकेल अथवा तुला विरोध करू शकेल असा कुणीही न्हाही. कारण तूच सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सर्वश्रेष्ठ परमात्मा आहेस.
मेधातिथि मेध्यातिथि काण्वौ ऋषी - इन्द्रो देवता - बृहती छन्दः क्वेयथ क्वेदसि पुरुत्रा चिद्धि ते मनः । अलर्षि युध्म खजकृत्पुरन्दर प्र गायत्रा अगासिषुः ॥ २७१
हे परमेश्वरा ! तुम्हा कुठले प्रदेश पार केले आहेत ? आणि तुम्ही कुठे सापडू शकता ? या प्रश्नांचे उत्तर आहे - तुझी ज्ञानशक्ती सर्वत्र आहे. हे विश्वनिर्मात्या, बंधनातून मुक्त करणार्या, हे महावीरा, तू सर्वव्यापक आहेस. सर्वत्र आहेस. भक्त नेहमी तुझी स्तुतिस्तोत्रे गात असतात.
कलिः प्रगाथ ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः वयमेनमिदा ह्योपीपेमेह वज्रिणम् । तस्मा उ अद्य सवने सुतं भरा नूनं भूषत श्रुते ॥ २७२
सर्व पातकांचा आणि दुःखांचा नाश करणार्या परमेश्वराला आम्ही आमच्या खर्या भक्तीने प्रसन्न करून घेतले आहे. अरे, भक्तांनो, आजच्या या वैदिक यज्ञात भक्ति व ज्ञानाच्या मिश्रणाने बनलेले (सोम)रस आणा आणि त्या परमेश्वराला आपल्या हृदयमंदिरात स्थापन करून त्याची पूजा करा.
नवमी दशति पुरुहन्मा ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः यो राजा चर्षणीनां याता रथेभिरध्रिगुः । विश्वासां तरुता पृतनानां ज्येष्ठं यो वृत्रहा गृणे ॥ २७३
जो सर्व पुरुषांचा सम्राट आहे, योगाभ्यासाने ज्याची प्राप्ती होते, जो अतुलनीय आहे आणि सर्व लालसांचे सैन्यास वशीभूत करणारा, सर्व पातके व अज्ञानाचा नाश करणारा आहे, त्या परमेश्वराची मी स्तुति करतो.
भर्गःप्रगाथ ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः यत इन्द्र भयामहे ततो नो अभयं कृधि । मघवञ्चग्धि तव तन्न ऊतये वि द्विषो वि मृधो जहि ॥ २७४
हे परमेश्वरा, ज्या कशाची आम्हाला भिती वाटत असेल त्या भितीपासून आम्हाला मुक्त कर. हे सर्वसंपत्तिच्या नाथा, आमचे रक्षण व्हावे म्हणून आम्ही ही याचना करीत आहोत. आमच्या पासून द्वेष, तिरस्कार आणि बाहेरील, अंतरातील आसक्ती, क्रोध, मत्सर, अहंकार इत्यादिंना हाकलून लाव.
इरिम्बिठिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः वास्तोष्पते ध्रुवा स्थूणां सत्रं स्ॐयानाम् । द्रप्सः पुरां भेत्ता शश्वतीनामिन्द्रो मुनीनां सखा ॥ २७५
हे परमेश्वरा, तू आमच्या घरांचा आणि शरीरांचा स्वामी आहेस. तू भक्तासाठी सुदृढ आधारस्तंभ आणि कवच आहेस. तुझे दैवी आणि भक्ति व ज्ञानाने मिश्रित, स्वादिष्ट आनंददायक अमृत भौतिक बंधनाचे बालेकिल्ले उध्वस्त करून टाकते. हे भगवंता, परमेश्वरा, तू ऋषीमुनींचा परम सुहृद, सखा आहेस.तू सूर्याप्रमाणे सर्व अंधकाराला दूर करतोस.
जमदग्निर्ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः बण्महां असि सूर्य बडादित्य महां असि । महस्ते सतो महिमा पनिष्टम मह्ना देव महां असि ॥ २७६
हे विश्वमिर्मात्या ! तू खरोखर थोर आहेस. खरोखरच हे स्वयंप्रकाशी अविनाशी परमात्म्या, तू फार थोर आहेस. हे परमेश्वरा, तुझ्या वैभवामुखे, महिम्यामुळे तूं सर्वांना अत्यंत पूज्य, आदरणीय आहेस. तुझ्या कीरीमुळेही तू फार थोर आहेस.
देवातिथिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः अश्वी रथी सुरूप इद्ग्ॐआं यदिन्द्र ते सखा । श्वात्रभाजा वयसा सचते सदा चन्द्रैर्याति सभामुप ॥ २७७
हे भगवंता, परमेश्वरा, ज्यावेळी एखादा मनुश्य तुझा मित्र अथवा भक्त बनतो, तेव्हां तो उत्तम संस्कारी, ज्ञानी आणि उत्तम वक्ता असल्याने त्याच्या ठिकाणी अति आवश्यक प्राणभूत शक्ति असते ती त्याला सामर्थ्य देते आणि तो तेजस्वी विद्वानांच्या समवेत सभेत प्रवेश करतो.
पुरुहन्मा ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः यद्द्याव इन्द्र ते शतं शतं भूमीरुत स्युः । न त्वा वज्रिन्त्सहस्रं सूर्या अनु न जातमष्ट रोदसी ॥ २७८
हे परमेश्वरा ! तू सर्व अशुभांचा नाश करणारा आणि दुष्टांना शासन करणारा आहेस. जरी शेकडो सूर्य आणि शेकडो पृथ्वा असल्या आणिअ त्यात भर म्हणून हजारो सूर्य असले तरी ही सर्व मिळून तुझी बरोबरी करू शकत नाहीत; कारण तू स्वर्ग व पृथ्वीला घेऊन टाकले आहेस.
देवातिथिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः यदिन्द्र प्रागपागुदग्न्यग्वा हूयसे नृभिः । सिमा पुरू नृषूतो अस्यानवेऽसि प्रशर्ध तुर्वशे ॥ २७९
हे परमेश्वरा ! जेव्हां पूर्वेला राहणारे, पश्चिमेस राहणारे, उत्तरेला आणि दक्षिणेला राहणावे, तसेच खालील लोकात राहणारे लोक सर्व तुझेच आवाहन करतात. तू सर्व स्थळी, सर्वकाळी, अगदी जवळच हाताच्या अंतरावर असतोस. हे पापविनाशना ! लोक तुझे वेगवेग्ळ्या प्रकारे आवाहन करतात आणि सर्व मानवजातीत नेहमीच उपस्थित असतोस.
देवातिथिः काण्व ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः कस्तमिन्द्र त्वा वसवा मर्त्यो दधर्षति । श्रद्धा हि ते मघवन्पार्ये दिवि वाजी वाजं सिषासति ॥ २८०
हे विश्वधरा ! तू सर्वव्यापक आहेस त्यामुळे कोठला माणूस तुझ्यावर मात करू शकेल ? हे लक्ष्मीनाथा ! एखादा ज्ञानी योगी सत्याची देणगी प्राप्त झालेला आणि आत्मप्रकाशात जगणारा नेहमी ज्ञानाचा प्रचार करण्याची इच्छा करतो.
जमदग्निर्भार्गव ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः इन्द्राग्नी अपादियं पूर्वागात्पद्वतीभ्यः । हित्वा शिरो जिह्वया रारपच्चरत्त्रिंशत्पदा न्यक्रमीत् ॥ २८१
या माझ्या श्रद्धेला पाय नाहीत पण तरी ज्याला इंद्र म्हणतात त्या परमेश्वरापर्यंत, तसेच श्रेष्ठ नेता असलेल्या अग्निपर्यंत पाय असलेल्या लोकांच्याही पूर्वी पोहोचते. परमेश्वराविषयी हे प्रेम जिव्हेला नेहमी भगवंताच्या नामोच्चार गुंतवून ठेवते, मग देह राहो अथवा जावो. (जिवंत असतांना आणि मरण आले तरीही) महिन्याचे तीसही दिवस ती नेहमी शुभ कर्मे करण्यांतच गुंतलेली असते.
वत्स ऋषिः - इन्द्रो देवता - बृहती छन्दः इन्द्र नेदीय एदिहि मितमेधाभिरूतिभिः । आ शं तम शं तमाभिरभिष्टिभिरा स्वापे स्वापिभिः ॥ २८२
हे परमेश्वरा, तू आमच्या हृदयात ये, तुझा साक्षात्कार आम्हाला होऊं दे, तुझ्या संरक्षक शक्तीसह येऊन तू आमच्या पवित्र बुद्धीला सामर्थ्यशाली बनव. तुझ्या कल्याणकारी, मदतीसह हे श्रेष्ठ मंगलकर्त्या, तू ये. हे उत्तम मित्रा, परम सुहृदा, तुझ्या आनंददायी शक्तींसह तू आमच्याजवळ ये.
इति ऐन्द्रकाण्डे तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥ |