॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ लघुवाक्यवृत्ति ॥


श्लोक क्र. १५ वा

॥ श्रीरामसमर्थ ॥

श्लोकः ऐक्यं सर्वनिरोधश्चेत्समाधिर्योगिनां प्रियः ।
तदशक्तौ क्षणं रुद्ध्वा श्रद्धेया ब्रह्मतात्मनः ॥ १५ ॥
श्लोकार्थ : सर्व विकल्पांचे निरोधन जर शक्य झाले तर साध्य होणारी समाधी ज्ञानी जनांना प्रिय आहे. पण ते जर शक्य होत नसेल तर क्षणभर तरी तसे निरोधन करून आपल्या ब्रह्मत्वाची श्रद्धापूर्वक अनुभूती घ्यावी. ॥१५॥

सर्व पूर्ववत तैसेंचि असतां । सर्व निरोध रूप पावे ऐक्यता ।
हाचि समाधि प्रियकर तत्त्वतां । योगि शब्द ज्ञानिया ॥ १६ ॥
सर्व गोष्टी पूर्ववत् जशाच्या तशाच असल्या तर सर्व गोष्टींचा निरोध करून जी एकरूपता साध्य होते तीच समाधी योग्यांना म्हणजेच ज्ञानी जनांना प्रिय असते. (४८१६)

येरव्हीं निग्रह करूनि जें रोधन । तो अप्रिय अर्थात ज्ञानियालागून ।
आणि न घडेचि कदा उपाधि असून । येविशी अशक्त सर्व ॥ १७ ॥
येहवी निग्रह करून जे निरोधन करण्यात येते ती समाधी ज्ञानी जनांना अप्रिय असते. आणि उपाधी असताना अशी समाधी सिद्धच होत नाही. आणि तशी समाधी लावण्याच्या बाबतीत सर्वजण असमर्थ असतात. (४८१७)

तस्मात् क्षण एक रोधोनियां । लयसाक्षी पूर्ण जाणोनियां ।
आपुली ब्रह्मता सर्व असोनियां । दृढ करावी सर्वांमाजी ॥ १८ ॥
म्हणून सर्व गोष्टींचा सर्वकाळ निग्रह करून समाधी लावण्याचा प्रयत्न न करता, एखादा क्षणभर विकल्पांचे निरोधन करून लयसाक्षीचे पूर्ण ज्ञान करून घेऊन सर्व परिवार भोवती असताना आपली ब्रह्मता दृढ करावी. (४८१८)

अभ्यासें सर्वदां वृत्ति खलावी । द्वैताचि ऊर्मिच नुठावी ।
आपुली ब्रह्मता दृढ करावी । श्रद्धावंत जो येणे ॥ १९ ॥
अभ्यासाने सर्वकाळ वृत्तीचा खल करावा. त्यामध्ये द्वैताची ऊर्मीच उठू देऊ नये. अशाप्रकारे श्रद्धावंताने आपली ब्रह्मता दृढ करावी. (४८१९)

हाचि अर्थ जो संकलित । प्रांजळचि करूं यथायुक्त ।
असावें सावधान बहुत । श्रोतीं यया निरूपणीं ॥ २० ॥
हा अभिप्राय संकलित स्वरूपात आता सांगितला. तोच आता विस्ताराने स्पष्ट करून सांगतो. श्रोत्यांनी या निरूपणाकडे सावधान राहन लक्ष द्यावे. (४८२०)

पद : ऐक्यं सर्व निरोधश्चेदिति ॥ १५ ॥
पदार्थ : सर्व विकल्पांचे निरोधन करणे शक्य असेल तर ॥१५॥

सर्व हे असतां ब्रह्मादि तृणान्त । आणि स्फूर्ति आणि प्राणान्त समस्त ।
परी नामरूपाचा जाहला घात । हाचि निरोध याचा ॥ २१ ॥
ब्रह्मदेवापासून ते गवतापर्यंत हे सर्व सभोवती असताना आणि स्फूर्तीपासून प्राणांपर्यंत सर्व तत्त्वे शरीरात असताना सर्व नामरूपांचा नाश होणे हाच त्यांचा निरोध होय. (४८२१)

निरोध म्हणिजे लयचि पाहीं । आधींच में उत्पन्न जाहलें नाहीं ।
उद्भवलें जें नामरूप सर्वही । ते रज्जु अहि निमाले ॥ २२ ॥
निरोध म्हणजे लय होय. मुळात तर हे सर्व उत्पन्नच झालेले नाही. जी नामरूपे निर्माण झाली, ती दोरीच्या जागी दिसणाऱ्या सर्पाप्रमाणे होत. हे सर्पाचे भास नाहीसे होणे म्हणजेच त्यांचा लय होय. (४८२२)

विचारें अस्तिभातिप्रियाविण । नामरूप कधीं जाहलें उत्पन्न ।
जाहलें होतें जें अज्ञानेंकडून । तें ज्ञानेंचि नष्ट जाहलें ॥ २३ ॥
विचाराच्या योगाने पाहिले तर जे आहे ते अस्ति भाति प्रियरूपच आहे. ही नामरूपे उत्पन्न तरी कधी झाली? (म्हणजे ती उत्पन्नच झालेली नाहीत.) जे झाल्यासारखे वाटले ते अज्ञानामुळे निर्माण झाले होते. ते ज्ञानानेच नष्ट झाले. (४८२३)

आहे तें ब्रह्म एकरूप । दिसे तें ब्रह्म चिद्रूप ।
प्रिय तें तें ब्रह्मचि निर्विकल्प । सविकल्प नाहीं नाहीं ॥ २४ ॥
आहे ते सर्व एकरूप ब्रह्मच आहे. दिसते ते सर्व चिद्रूप ब्रह्मच आहे. जे प्रिय वाटते आहे तेही निर्विकल्प असे ब्रह्मच आहे. तेथे सविकल्प काहीच नाही. (४८२४)

नग घडिले की मोडिले । परी सुवर्ण एकरूप संचलें ।
दुजेपण केव्हां कधीं आलें । कल्पित नामरूपासी ॥ २५ ॥
दागिने नव्याने घडले की मोडून वितळविले तरी त्यामध्ये सुवर्ण मात्र एकरूपच असते. मग कल्पित अशा नामरूपांना वेगळेपणा केव्हा आला? (तसा वेगळेपणा नसतोच.) (४८२५)

तैसें ब्रह्मात्मत्वचि परिपूर्ण । नामरूप नाहींच जाहलें उत्पन्न ।
जरी वृत्त्यादि मावळती उठोन । परी अमुकसे नव्हे ॥ २६ ॥
त्याप्रमाणे सर्वत्र ब्रह्मात्मत्वच परिपूर्ण आहे. नामरूप उत्पन्नच झालेले नाही. उत्पन्न वृत्ती. पण त्या उत्पन्न झाल्या तरी त्या लोप पावतात. अमुक गोष्ट अमुक नावाची आहे, असा भिन्न विचार तेथे नसतोच. (४८२६)

पहिलेचि आधी जाहलें नसती । वरी खलून दृढ केली वृत्ति ।
त्रिविधा समाधीचिये रीती । विस्मरण न होतां ॥ २७ ॥
मुळात ती अगोदरच निर्माण झालेली नसतात, त्यावर साधकाने वृत्तीचा खल केलेला असतो. वृत्ती दृढ झालेली असते. त्यानंतर या वृत्तिखलावर तीन समाधींचा अभ्यास केलेला असतो. (पूर्वोक्त दृश्यानुविद्ध, शब्दानुविद्ध आणि सविकल्पशुद्ध या त्या तीन समाधी होत). त्या अभ्यासामुळे ब्रह्मात्म्याचे विस्मरण कधीच होत नाही. (४८२७)

जैसा पाहिला पडिला न होता । वृक्षस्थ वृक्षींच असे ऐता ।
त्यावरी समजून जाहला घोकिता । मी पडिलों नाही म्हणूनी ॥ २८ ॥
ज्याप्रमाणे वृक्षस्थाच्या दृष्टान्तातला वृक्षस्थ माणूस मुळात पाण्यात पडलेला नव्हता. तो तर वृक्षावरच प्रथमपासूनच होता. त्यानंतर वस्तुस्थितीचे ज्ञान त्याला झाले. ते त्याने पक्के घटविले. आपण पडलो नाहीत ही त्याची खात्री झाली. (४८२८)

तयासी मी पडिलों ह्मणूनि मागुति । कासया उत्पन्न होईल भ्रांति ।
मी वृक्षींच बैसलों हे प्रतीति । विसरे ना सहसा ॥ २९ ॥
त्या माणसाला आपण पाण्यात पडलो आहोत' असा भ्रम आता कसा उत्पन्न होईल? 'आपण वृक्षावरच बसलेलो आहोत' हा अनुभव तो कधीच विसरणार नाही. (४८२९)

तैसेंचि हे स्फूर्तिपासून सर्व जग । जाहलेंच नसे नाना सोंग ।
त्याहीवरी जाणूनि लयसाक्षि असंग । पुढें मिथ्यात्व दृढ केलें ॥ ३० ॥
त्याप्रमाणे स्फूर्तीपासून ते या जगापर्यंत हे सर्व भास झालेलेच नाहीत. त्या सत्य गोष्टी नसून केवळ सोंगाप्रमाणे होत. आणि त्याहीवर त्याने असंग अशा लयसाक्षीचे ज्ञान करून घेऊन पुढे दिसणाऱ्या गोष्टींचे मिथ्यात्व दृढ केले आहे. (४८३०)

दृश्यानुविद्ध शब्दानुविद्ध । तिसरा सविकल्प समाधि शुद्ध ।
या अभ्यासें निरोधिलें अशुद्ध । नामरूप भेदात्मक ॥ ३१ ॥
तसेच दृश्यानुविद्ध, शब्दानुविद्ध आणि तिसरा सविकल्पशुद्ध या तीन समाधींच्या अभ्यासाने नामरूप भेदात्मक अशुद्धाचे निरोधन केले आहे. (४८३१)

मी हा देहादि आपण । आणि हे सत्य जग संपूर्ण ।
ऐशिये विक्षेपाचे उत्थान । होऊंच नाही दिधलें ॥ ३२ ॥
त्यामुळे 'मी म्हणजे हे सर्व देहादी आहे, आणि हे संपूर्ण जग सत्य आहे' असल्या विक्षेपांचे उत्थानच होऊ दिले नाही. (४८३२)

ऐसा अभ्यास समाधीचा । खलून दृढभाव केला वृत्तीचा ।
आपण ब्रह्मात्मा या सर्व जगाचा । सत्यमिथ्या प्रकार ॥ ३३ ॥
असा समाधीचा अभ्यास करून वृत्तीचा खल करून ती दृढ केली, आणि जगाचा वास्तवातला खरे-खोटेपणा जाणून घेऊन आपण ब्रह्मात्मा आहोत वृत्तीचा दृढभाव त्याने पक्का केला. (४८३३)

ऐशिया अभ्यासें स्वप्न आंत । मी असंग हे सर्व मिथ्याभूत ।
स्फुरूं लागलें अभ्यासरहित । मग जागरीं भेद कैंचा ॥ ३४ ॥
अशा अभ्यासाने स्वप्नातसुद्धा 'मी असंग असून हे जे दिसते आहे ते सर्व मिथ्या आहे', असे अभ्यास न करता सुद्धा त्याला स्फुरू लागले. मग जागृतीत तो भेद कसा राहील? (४८३४)

स्वतां परतां उत्थान राहिलें । भलते अवस्थे एकत्व संचलें ।
ऐसें समाधान दृढ बाणलें । या नांव समाधि ॥ ३५ ॥
स्वतःखेरीज दुसऱ्या गोष्टीचे उत्थानच नाही, कोणत्याही अवस्थेत सर्वत्र एकत्वच भरून राहिलेले आहे. असे समाधान दृढ झाले, त्याला समाधी असे नाव आहे. (४८३५)

चरण : समाधिर्योगिनां प्रिय इति ॥ १५ ॥
चरणार्थ : अशी समाधी ज्ञानी लोकांना प्रिय असते. ॥१५॥

हाचि एक पूर्ण समाधि । जे नामरूपें नुद्भवती कधीं ।
हाचि योगियासि प्रियतर बुद्धि । भूत भावी वर्तमानीं ॥ ३६ ॥
हीच एकमेव पूर्ण समाधी होय. तिच्यामुळे नामरूपे कधीच उद्भवत नाहीत. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तीन्ही काळातील योग्यांना या समाधीमुळे तयार झालेली बुद्धीच अतिशय आवडते. (४८३६)

नामरूपें स्वप्नीं उठतीना । असंग ब्रह्मात्मत्व पूर्णपणा ।
जागरी तो अभ्यास क्षणक्षणा । वाढतचि आला ॥ ३७ ॥
नामरूपे स्वप्नातसुद्धा उठत नाहीत. तो ज्ञाता असंग राहून पूर्णपणे ब्रह्मात्मत्वाचा अनुभव घेत असतो. जागृतीत तर क्षणाक्षणाला त्याचा अभ्यास वाढतच असतो. (४८३७)

इतुका निश्चय दृढ बाणला । की दुजा भाव नसे भलते अवस्थेला ।
संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला । मूलाज्ञानासहित ॥ ३८ ॥
त्याचा निश्चय इतका दृढ झालेला असतो की, कोणत्याही अवस्थेत दुजेपणाचा भाव त्याला स्पर्श करत नाही. संशय मूल अज्ञानासह ब्रह्मांडाबाहेर गेलेला असतो. (४८३८)

आतां स्फूर्ति उठोनि पसरो । की मनबुङ्यादि उभारो ।
अथवा निर्विकल्पी जाऊनि विरो । परी समाधि अभंग ॥ ३९ ॥
अशा अवस्थेत स्फूर्ती उत्पन्न होऊन प्रसरण पावो, किंवा ती मन, बुद्धी इ.ची उभारणी करो, अथवा ती निर्विकल्पात जाऊन विरून जावो, त्याची समाधी मात्र अभंग राहते. (४८३९)

मनबुद्धि अंतरीं विहारती । स्वप्नाभासातें उद्भविती ।
की इंद्रियद्वारा निघोनि क्रीडती । परी समाधि अभंग ॥ ४० ॥
मन आणि बुद्धी अंतःकरणात विहार करतील, ती स्वप्नरूप आभास निर्माण करतील किंवा इंद्रियद्वाराने बाहेर पडून क्रीडा करतील, तरी त्याची समाधी मात्र उभंगच राहते. (४८४०)

अलभ्य विषयांची प्राप्तता । भोग घडो इंद्रियां समस्तां ।
अथवा न घडो बुडो हे वार्ता । परी समाधि अभंग ॥ ४१ ॥
त्याला अलभ्य विषयांची प्राप्ती होईल. किंवा सर्व इंद्रियांचे भोग भोगायला मिळतील, अथवा मिळणारही नाहीत, तरी त्याची समाधी मात्र अभंगच राहते. (४८४१)

निचेष्टित किंवा चेष्टतो । उपवासी किंवा बहु खातो ।
बोलतो की मौने पाहतो । परी समाधि अभंग ॥ ४२ ॥
तो निश्चेष्ट पडलेला असो, अथवा हालचाल करत असो. उपाशी असो की, खूप खात असो, बोलत असो की, मौन धरून पाहत असो, तरी त्याची समाधी मात्र अभंगच राहते. (४८४२)

समुदायीं किंवा एकला । चालतो किंवा उगाच बैसला ।
हांसतो की शिव्या दे भलत्याला । परी समाधि अभंग ॥ ४३ ॥
तो समुदायात असो की, एकटा असो, चालत असो की, उगीच बसलेला असो, हसत असो की भलत्या व्यक्तीला शिव्या देत असो, तरी त्याची समाधी मात्र अभंगच राहते. (४८४३)

समाधिस्थ किंवा देवतार्चनीं । श्रवणीं पठणीं की निरोपणीं ।
अथवा जड पडे की पळे उठोनी । परी समाधि अभंग ॥ ४४ ॥
तो समाधिस्थ असो की, देवाच्या पूजेत मग्न असो; श्रवण करत असो, अध्ययन करत असो, किंवा निरूपण करत असो; अथवा जड (स्तब्ध) पडून राहिला असो की, उठून पळत सुटलेला असो; तरी त्याची समाधी मात्र अभंगच असते. (४८४४)

बहु कासयासी बोलावें । जे जे तयाचे प्रारब्धे घडावे ।
ते तेही सुखदुःखभोग भोगावे । परी समाधि अभंग ॥ ४५ ॥
जास्त काय बोलू, त्याच्या प्रारब्धाने जे जे घडत असेल, ते ते सुखदुःखाचे भोग त्याला भोगावेच लागणार आहेत; तरी त्याची समाधी मात्र अभंगच राहते. (४८४५)

हे असो दुजे तयालागीं । पूजिती की गांजिती प्रसंगी ।
स्तविती की निंदिती लागवेगीं । परी समाधि अभंग ॥ ४६ ॥
हे राहू देत, दुसरे लोक त्याची पूजा करत असोत की, त्याला छळत असोत; त्याची स्तुती करत असोत की त्याची निंदा करत असोत, तरी त्याची समाधी मात्र अभंगच राहते. (४८४६)

हाही तया निंदी की स्तवी । दूरी धरी की सलगी करी सर्वी ।
हे आपुले हे परकी जरी ह्मणवी । परी समाधि अभंग ॥ ४७ ॥
हा देखील त्यांची निंदा करत असो की, त्यांची स्तुती करत असो, तो सर्वांना दूर ठेवो की, त्या सर्वांशी सलगी करत असो; तो कुणाला आपले म्हणत असो की, परके म्हणत असो; तरी त्याची समाधी मात्र अभंगच राहते. (४८४७)

हैं असो वैकुंठासी नेला । कीं विमानी बैसोनि क्रीडला ।
अथवा कुग्रामी उकरडां पडिला । परी समाधि अभंग ॥ ४८ ॥
हे राहू दे, त्याला वैकुंठाला नेला की, त्याने विमानात बसून क्रीडा केली, अथवा एखाद्या घाणेरड्या गावात तो उकिरड्यावर पडला; तरी त्याची समाधी मात्र अभंगच राहते. (४८४८)

ऐसें हें बोलतां कधीं न सरे । ग्रंथ वाढतचि जाईल विस्तारें ।
समजावें थोडियाची अनुकारें । की समाधि न मोडे कदा ॥ ४९ ॥
असेच बोलत राहिलो तर ते बोलणे कधीच संपणार नाही; आणि ग्रंथाचा विस्तार वाढतच जाईल. थोडक्यात हे समजून घ्यावे की, ही समाधी कधीही भंग पावत नाही. (४८४९)

हेचि चरमस्थिति बापा तुज । सांगितली मागां स्थिती सहज ।
हाचि समाधि ज्ञात्याचा समज । पूर्वापार जे जे ॥ ५० ॥
हीच चरमस्थिती (शेवटची स्थिती होय, ती तुला मागे ओघात सांगितली आहेच. हीच ज्ञात्याची समाधी होय. पूर्वी झालेल्या सर्व ज्ञात्यांची हीच समाधी होती. (४८५०)

अगा रविदत्ता हे सहज स्थिति । कोणी विचारें कोणी अभ्यासें पावती ।
हेही मागे सांगितलें तुजप्रति । परी शेवटी एकरूप ॥ ५१ ॥
अरे रविदत्ता, हीच सहजस्थिती होय. ती कुणाला विचाराने प्राप्त होते, कुणाला अभ्यासाने प्राप्त होते. हे तुला मागेच सांगितले आहे. (पहा ४५६३-४५७७) अभ्यासाने असो वा विचाराने असो, दोन्ही प्रकार एकरूपच आहेत. (४८५१)

तस्मात् अभ्यासें सर्व असतां । सर्व निरोधाचे फळ तें ऐक्यता ।
नामरूप न उद्भवूनि एकात्मता । हे चरमस्थिति ज्ञात्याची ॥ ५२ ॥
म्हणून सर्व परिवार सभोवती असताना निरोधाचे फळ जी एकरूपता ती नामरूप न उद्भवता केवळ अभ्यासाने प्राप्त होते. ती ज्ञात्याची चरमस्थिती होय. (४८५२)

हाचि समाधि ऐक्यरूप अद्वय । सहजीं एकरूप पूर्ण निर्णय ।
हाचि ज्ञात्यासी परमप्रिय । येर अप्रिय निरोधन ॥ ५३ ॥
या एकरूपतेमुळे प्राप्त होणारी अद्वय स्थिती म्हणजेच ही समाधी होय. हीच सहजरीतीने प्राप्त होणारा पूर्ण एकत्वाचा निर्णय होय. ही समाधी सर्व ज्ञात्यांना प्रिय असते. इतर निरोधनाचे मार्ग त्यांना आवडत नाहीत. (४८५३)

योगी ाणिजे नव्हे हटयोगी । जे वायुरोधे शून्याचे विभागी ।
तयांसी ह्मणावें स्वरूपवियोगी । त्यागियां प्रिय नव्हे ॥ ५४ ॥
श्लोकातील योगी म्हणजे हठयोगी नव्हे. तो वायूचा निरोध करून शेवटी शून्याचा भागीदार होतो. त्याला स्वरूपवियोगी (स्वरूपापासून दूर गेलेला) म्हणावे. असल्या मार्गाचा त्याग करणाऱ्यांना वरील समाधी प्रिय नसते. (४८५४)

येर तो अघोरादि योगी नांवें । अथवा भलतैसें सोंग आणावें ।
किंवा मंत्रयंत्रादि संपादिती बरवे । त्यांसी हे स्थिति अप्राप्त ॥ ५५ ॥
इतर आणखी अघोरपंथी योगी नावाचेच योगी असतात. आणखी निरनिराळी सोंगे आणून हिंडणारे योगी असतात, मंत्रयंत्रादी साधनांचे अवडंबर माजवणारे योगी असतात, - अशा योग्यांना वरील समाधी अप्राप्य असते. (४८५५)

मुद्रादि लोली धोती पोती । ते तेही योगीच ह्मणविती ।
परी आह्मीं न स्वीकारूं तयांप्रती । योगीही म्हणोनी ॥ ५६ ॥
मुद्रादी प्रकार, लोली धोती इ. करणारेही स्वतःला योगी म्हणवून घेतात; पण आम्ही त्यांचा योगी म्हणून स्वीकार करत नाही. (४८५६)

हे असो लयसाक्षिज्ञान जयासी । होऊन संशय ज्या साधकासी ।
तोही न जाणे या स्थितीसी । तरी प्रिय तया कैची ॥ ५७ ॥
हे राहू द्या, ज्याला लयसाक्षिज्ञान झालेले असूनही ज्याच्या मनात संशय कायम राहिलेला आहे त्या साधकालाही या स्थितीचे ज्ञान नसते. त्यामुळे त्याला ती समाधी प्रिय कशी होईल? (४८५७)

तस्मात पूर्णज्ञानी जे समाधानी । एकरूप भलते अवस्थेलागोनी ।
तेचि योगिराज पूर्णपणीं । त्यासीच हा समाधि प्रिय ॥ ५८ ॥
त्यामुळे जे पूर्णज्ञानी असून समाधानी आहेत, कोणत्याही अवस्थेत जे एकरूप आहेत, तेच पूर्णपणे योगिराज होत, त्यालाच ही समाधी प्रिय वाटेल. (४८५८)

जो हा आतां आलीं निरोपिला । सर्व असतां ऐक्यत्वें संचला ।
नामरूपाचा की सविकल्पाचा उद्भवला । नाहीं जेथे हेतुही ॥ ५९ ॥
ज्या समाधीचे आम्ही आता निरूपण केले, सर्व गोष्टी उपस्थित असतानाच जी ऐक्यभावाने भरून राहिलेली असते. जिच्यामध्ये नामरूपांचा किंवा सविकल्पाचा विचारही मनात येत नाही, (४८५९)

हाचि समाधिज्ञानियासी प्रिय । येर अन्य समाधि ते अप्रिय ।
तेंही अल्पसें बोलूं संशय । जावया साधकाचा ॥ ६० ॥
हीच ती ज्ञानी लोकांना प्रिय असलेली समाधी होय. बाकीच्या इतर समाधी त्यांना प्रिय नसतात. तेही साधकांचा संशय जाण्यासाठी आता थोडेसे सांगतो. (४८६०)

वायु कोंडून कल्पवरी । बैसती शून्याचिये वोवरी ।
तो समाधि नव्हे दीर्घ झोंप भारी । अप्रिय ज्ञानिया ॥ ६१ ॥
काही लोक वायूचे निरोधन करून कल्पभर (दीर्घकाळपर्यंत) शून्याच्या खोलीत बसतात. ती खरी समाधी नसतेच. ती तर एक मोठी दीर्घ झोपच असते. असली समाधी ज्ञानी लोकांना पसंत नाही. (४८६१)

एक प्राणायामेंकडून । द्विदलापर्यंत करिती गमन ।
तो समाधि राहे एक दिन । परी तो अप्रिय ज्ञानिया ॥ ६२ ॥
दुसरे काही प्राणायामाच्या साहाय्याने द्विदलापर्यंत मजल मारतात, पण ती समाधी एक दिवसपर्यंत राहते; पण ती ज्ञानी लोकांना आवडत नाही. (४८६२)

एक आधारादि कमळे साही । त्यांत एक कमळा लक्षिती पाही ।
आपणासी समाधिस्थ मानिती तेही । परी तो अप्रिय ज्ञानिया ॥ ६३ ॥
काहीजण शरीरातील षट्चक्रांपैकी एका कमळावर लक्ष केन्द्रित करतात, आणि समाधी लावली असे मानून चालतात. पण तीही समाधी ज्ञानी जनांना अप्रिय असते. (४८६३)

एक सर्व चक्रांमाजी वायूसवें । प्रतिश्वासी लक्षित असावें ।
अथवा सोहं शब्दी मन ठेवावें । परी तो अप्रिय ज्ञानिया ॥ ६४ ॥
काहीजण सर्व चक्रात प्रत्येक श्वासाबरोबर लक्ष केन्द्रित करतात, किंवा 'सोऽहं' या मन्त्राच्या शब्दांवर मन केन्द्रित करतात. पण ही समाधीही ज्ञानी जनांना अप्रिय आहे. (४८६४)

एक उठतां वायु आदळतां । सोहं जपचि करिती तत्त्वतां ।
अथवा एकेक कमळी घ्याती देवता । परी ॥ ६५ ॥
कित्येक जण वायू उठताना किंवा आदळताना 'सोऽहम्'चा जप करतात. अथवा प्रत्येक कमळाच्या ठिकाणी तेथील देवतेचे ध्यान करतात. पण ही समाधी देखील ज्ञानी जणांना अप्रिय असते. (४८६५)

एक ते दशनादी निमग्न । एक ते लकलका उठे जें जीवन ।
तेथेंचि लावून बैसले मन । परी तो अप्रिय ज्ञानिया ॥ ६६ ॥
काही लोक दहा नादांवर लक्ष केन्द्रित करतात. तर काही जण पाण्याचा जो लकलक आवाज ऐकू येतो त्यावरच आपले मन केन्द्रित करतात. पण तीही समाधी ज्ञानी लोकांना आवडत नाही. (४८६६)

एक हृदयीं अष्टदल कल्पिती । आवडीची देवता तेथें स्थापिती ।
पूजासाहित्य कल्पून वाहती । परी तो अप्रिय ज्ञानिया ॥ ६७ ॥
काही जण हृदयाच्या ठिकाणी अष्टदल कमळाची कल्पना करतात आणि त्या ठिकाणी आपल्या आवडत्या देवतेची स्थापना करतात. आणि पूजेच्या सामग्रीची कल्पना करून त्या देवतेला वाहतात. पण ती समाधीदेखील ज्ञानी जनांना अप्रिय आहे. (४८६७) (पहा वेदेश्वरी १२ वा अ., ३४१-३६६)

एक ते मानसपूजा समोर । मूर्ति बैसवूनि करिती एकाग्र ।
तेथें एक जाऊन एक ये सत्वर । परी तो अप्रिय ज्ञानिया ॥ ६८ ॥
काही जण आपल्यासमोर मूर्तीची स्थापना करून एकाग्र चित्ताने तिची मानसपूजा करतात. तेथे एक मूर्ती जाऊन दुसरी मूर्ती त्या जागी लागलीच येते. पण ही समाधीही ज्ञानी जनांना अप्रिय आहे. (४८६८)

एक भ्रूमध्ये अवलोकिती । अंतराळी लक्ष ठेविती ।
ते खेचरी मुद्रा ह्मणविती । परी तो अप्रिय ज्ञानिया ॥ ६९ ॥
काही लोक दोन भुवयांच्या मध्यभागी दृष्टी स्थिर करून पाहतात. तिला ते खेचरी मुद्रा असे म्हणतात. पण तीही ज्ञानी जनांना मंजूर नाही. (४८६९)

पापण्या हालवूनि बुबळें दोनी । पाहती भ्रूमध्ये नेवोनी ।
ते चाचरी मुद्राच समाधि म्हणोनि । परी तो अप्रिय ज्ञानिया ॥ ७० ॥
पापण्यांची हालचाल करून दोन्ही बुबुळे भुवयांच्या मध्ये नेऊन काही जण ध्यान लावतात. तिला ते चाचरी मुद्रा म्हणतात. पण तीही ज्ञात्यांना अप्रिय आहे. (४८७०)

नासिकाग्राहून भूमीवरी । पाहणे ते मुद्रा भूचरी ।
अंतरी पाहणे ते अगोचरी । परी तो अप्रिय ज्ञानिया ॥ ७१ ॥
नासिकाग्रावरून भूमीकडे पाहणे ही भूचरी मुद्रा होय. केवळ दृष्टी अंतर्मुख करून आपल्या मनात डोकावणे ही अगोचरी मुद्रा झाली. पण तीही ज्ञानी लोकांना अप्रिय समाधी होय. (४८७१)

एक ह्मणती अंतर दृष्टीसी । अलक्ष मुद्रा पाहणे जाणिवेसी ।
एक सर्वदा वर्तती प्रकाशीं । परी तो अप्रिय ज्ञानिया ॥ ७२ ॥
काही जण म्हणतात की, अंतर्दृष्टीने जाणिवेचे निरीक्षण करावे, काही जण सर्वकाळ प्रकाशाकडे पाहतात, पण ह्या समाधीही ज्ञानी जनांना अप्रिय आहेत. (४८७२)

एक डोळे कान नाक दाबोनी । मुद्रा करिती षण्मुखी ह्मणोनी ।
एक नुसधे नेत्रचि बैसती दडपोनी । परी तो अप्रिय ज्ञानिया ॥ ७३ ॥
काही जण डोळे कान नाक दाबून षण्मुखी नावाची मुद्रा करतात. काही जण नुसते डोळे बंद करून बसतात. पण समाधीचे हेही प्रकार ज्ञानी जनांना आवडत नाहीत. (४८७३)

हे असो लोली धोती पोती नेती । नानाप्रकारें आसने करिती ।
ते ते कष्टचि सांगतां न पुरवती । परी तो अप्रिय ज्ञानिया ॥ ७४ ॥
हे राह द्या, काही जण लोली, धोती, पोती, नेती इ. प्रकारची साधने करतात. नाना प्रकारची आसने करतात. त्यांचे ते कष्टच सांगता सांगता पुरेवाट होते; पण तशा प्रकारचा योगाभ्यास ज्ञान्यांना मान्य नाही. (४८७४)

ऐसे कितेका प्रकारें कितेक । नाना प्रकारें भोंदिती लोक ।
ते ते अप्रिय ह्मणोनी सकळिक । बोलणेंचि नको ॥ ७५ ॥
अशा प्रकारे अनेक लोकांच्या अनेक तन्हा आहेत. लोक इतर लोकांना निरनिराळ्या प्रकारांनी फसवत असतात. ते सगळे प्रकार ज्ञान्यांना अप्रिय आहेत. हे सांगायलाच नको. (४८७५)

हे असो अज्ञान भ्रांत । परी जे साक्षी जाणोनि स्फूर्तीपर्यंत ।
बैसती निश्चय करूनि निवांत । तोही अप्रि० ॥ ७६ ॥
या अज्ञानी भ्रांत (वाट चुकलेल्या) लोकांचे एक राह दे. परंतु स्फूर्तीपासून ते लयसाक्षीपर्यंत जाणूनही जे लोक निश्चय करून निवांत बसतात, तोही प्रकार ज्ञानी जनांना अप्रिय आहे.(४८७६)

लयसाक्षीही जाणोनि जेणें । वृत्ति अभ्यास करूं नेणे ।
वाउगा निरोध वृत्तीचा करणे । तोही अप्रिय ज्ञानिया ॥ ७७ ॥
लयसाक्षी जाणूनही जे निरोध करतात तेही ज्ञानी लोकांना अप्रिय वाटतात, मग इतर प्रकार अप्रिय असतील हे काय सांगायला हवे? (४८७७)

लयसाक्षी जाणोनि निरोध अप्रिय । मा अन्य अप्रिय ह्मणणे काय ।
तस्मात् सर्व असून नामरूपक्षय । होणे हे स्थिति उत्तम ॥ ७८ ॥
म्हणून सर्व यथापूर्व असूनही नामरूपाचा नाश होणे हा उत्तम प्रकार होय. (४८७८)

सर्व पूर्ववत् जैसें मृगजळ । दिसे लोपे तरी मिथ्या सकळ ।
एक अस्तिभाति प्रियरूप केवळ । भलतिये अवस्थे ॥ ७९ ॥
सर्व गोष्टी पूर्ववत असल्या तरी त्या मृगजळाप्रमाणे आहेत. त्या दिसतात पुन्हा लोप पावतात. त्यामुळे त्या सर्व गोष्टी मिथ्या आहेत. पण कोणत्याही अवस्थेत अस्तिभातिप्रियत्वाने एकरूप असलेला ब्रह्मात्माच तेवढा सत्य आहे. (४८७९)

हेचि सहजस्थिति प्रिय ज्ञानिया । जे उत्थान नव्हे काळी कवणिया ।
एकरूप समाधान बाणेल जया । हाचि समाधि उत्तम ॥ ८० ॥
ही सहजस्थिती होय. ज्ञानी लोकांना ही सहजस्थितिरूप समाधीच प्रिय असते. त्या समाधीतून कधीही कोणत्याही काळी कोणाचेही उत्थान होणार नाही. त्या समाधीने साधकाला एकरूप असे समाधान प्राप्त होईल. हीच सर्वोत्कृष्ट समाधी होय. (४८८०)

या स्थितीत नित्यमुक्तत्व आतुडे । मा असंप्रज्ञत्व कां न जोडे ।
सहजींच होतसे शिवा पडिपाडें । येर बापुडे ते किती ॥ ८१ ॥
या सहजस्थितीत मुक्तत्व प्राप्त होते, मग असंप्रज्ञत्व का बरे प्राप्त होणार नाही? असा साधक अगदी सहजच श्रीशंकरांच्या बरोबरीचा होतो. मग त्यापुढे बाकीचे बिचारे देव ते काय? (४८८१)

एक राज्यपदी राजा बैसतां । येर राजचिन्हें बाणती अप्रयत्नता ।
तैसें यथार्थ ज्ञान दृढतर होता । आपैसा वोळगति चिन्हें ॥ ८२ ॥
एक राजा राज्यपदावर बसला म्हणताच इतर राजचिन्हे काहीही प्रयत्न न करता त्याला विनासायास प्राप्त होतात. त्याप्रमाणे यथार्थ ज्ञान दृढ झाल्याबरोबर त्या ज्ञानाची चिन्हे आपोआपच प्राप्त होतात. (४८८२)

सहजस्थिति जीवन्मुक्ति । विदेहस्थिति अलिप्त स्थिति ।
संप्रज्ञ असंप्रज्ञ समाधि ह्मणती । हीं सर्वही चिन्हें ॥ ८३ ॥
या यथार्थ ज्ञानाची चिन्हे म्हणजे सहजस्थिती, जीवन्मुक्ती, विदेहस्थिती, अलिप्तस्थिती, संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी इ. समाधी होत. (४८८३)

ही चिन्हें देह आहे तंवचिवरी । ह्मणोनि देह संबंधचि हा निर्धारी ।
नातरी केवळ निर्विकारी । अमुक ह्मणून कोणतें ॥ ८४ ॥
ही चिन्हेसुद्धा देह आहे तोपर्यंतच अस्तित्वात असतात. म्हणजे या सर्व अवस्था देहाशीच संबद्ध आहेत, हे निश्चित. तो देहच नसेल तर केवळ निर्विकार स्थितीत अमुक अवस्था म्हणजे अमुक समाधी असे कसे सांगता येईल? (४८८४)

असो सहजस्थिति प्राप्त होतां । संप्रज्ञ असंप्रज्ञ येती त्या आंतौता ।
तेचि अल्पसे निवडोनि आतां । कळावया निरोपूं ॥ ८५ ॥
असो, सहजस्थिती प्राप्त झाली म्हणजे संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात या समाधी तिच्यातच समाविष्ट होतात. तेच आता कळण्यासाठी थोडेसे सांगतो. (४८८५)

उठे की निमे जरी संकल्प । परी नामरूप न स्फुरे कदा अल्प ।
एकरूप ब्रह्मात्मा सच्चिद्रूप । भलतेही अवस्थे ॥ ८६ ॥
संकल्प उठला अथवा लोप पावला तरी केव्हाही थोडेसेसुद्धा नामरूप उत्पन्न होत नाही, कोणत्याही अवस्थेत सच्चिद्रूप ब्रह्मात्मा एकरूपच असतो. (४८८६)

नामरूप की किंचित् भेदभान । न होणे या नांव सर्व निरोधन ।
सर्वी एकरूप हेंचि ऐक्यपण । हेंचि फल निरोधाचें ॥ ८७ ॥
नामरूप किंवा अंशतः देखील भेदाचे भान न होणे यालाच सर्व निरोधन म्हणतात. सर्वांमध्ये एकरूप होऊन जाणे म्हणजे ऐक्यपण होय. तेच निरोधनाचे फळ होय. (४८८७)

मुख्य हेचि सहजस्थिति । की भेदाची किंचित न व्हावी स्फूर्ति ।
परी संप्रज्ञासी आठवे सच्चिन्मूर्ति । ब्रह्मास्मि सामान्यत्वें ॥ ८८ ॥
हीच मुख्य सहजस्थिती होय. तिच्यामध्ये नामरूप भेदाची किंचितसुद्धा स्फूर्ती होत नाही. पण संप्रज्ञात समाधीमध्ये आपण सच्चिन्मूर्ती ब्रह्मच आहोत असे सामान्यत्वाने स्मरण होत असते. (४८८८)

नामरूपभेद न स्फुरतां । ब्रह्मात्मत्वाचि प्रतीति घेतां ।
तयासी नांव सविकल्प संप्रज्ञता । समाधि समाधान ॥ ८९ ॥
नामरूपभेदाची स्फूर्ती न होता ब्रह्मात्मत्वाची प्रचीती घेतली तिला सविकल्प संप्रज्ञात समाधी, समाधान असे म्हणतात. (४८८९)

तोही ब्रह्म प्रतीतीचा अनुभव । ग्रासोनियां उरे स्वयमेव ।
तयासी असंप्रज्ञ निर्विकल्प नांव । बोलिजेत असे ॥ ९० ॥
हा प्रतीतीचा येणारा अनुभव देखील नाहीसा करून जो स्वतःच एकटा असा उरतो त्याला असंप्रज्ञ निर्विकल्प समाधी असे म्हणतात. (४८९०)

नामरूपभेद भान न स्फुरावें । हें तो उभयांचे समानचि जाणावें ।
परी ब्रह्मसुख प्रत्ययें स्फुरावें । संप्रज्ञामाजीं ॥ ९१ ॥
या दोन्ही समाधींमध्ये नामरूपांच्या भेदाचे भान राहात नाही, हा समान भाग आहे. परंतु संप्रज्ञ समाधीमध्ये ब्रह्मसुख त्याच्या अनुभवासहित स्फुरत असते. (४८९१)

असंप्रज्ञ समाधि आंतोता । ब्रह्मसुखही न स्फुरे तत्त्वतां ।
इतुकाचि भेद यया उभयतां । असे म्हणोनि दोन ॥ ९२ ॥
असंप्रज्ञ समाधीमध्ये खरे तर ब्रह्मसुखही स्फुरत नाही. एवढाच भेद या दोन्ही समाधींमध्ये असतो. म्हणून त्यांना दोन म्हणावे लागते. (४८९२)

नामरूपें दोहींसी न स्फुरती । येथे भेद नसे संप्रज्ञाप्रति ।
संप्रज्ञसमाधीसी ब्रह्मस्फूर्ति । तेही न स्फुरे तो असंप्रज्ञ ॥ ९३ ॥
दोन्ही समाधींमध्ये नामरूपांचे स्फुरण होत नाही. संप्रज्ञ समाधी त्याकारणाने भिन्न होत नाही. संप्रज्ञात समाधीमध्ये ब्रह्माचे स्फुरण (जाणीव) असते. तेही जिच्यामध्ये स्फुरत नाही, तिला असंप्रज्ञ समाधी असे म्हणतात. (४८९३)

येरव्ही निरोध नको जेवीं सविकल्पा । तेवींच नलगे रोधावें निर्विकल्पा ।
वृत्ति अभ्यासें नुद्भध नामरूपा । तेवीं घडे ययासी ॥ ९४ ॥
येन्हवी ज्याप्रमाणे सविकल्पाचा निरोध करण्याची गरज नसते, तशीच निर्विकल्पाचाही निरोध करण्याची गरज नसते. सविकल्प संप्रज्ञात वृत्तीच्या अभ्यासाने नामरूपांची उत्पत्ती होत नाही. तशीच निर्विकल्प असंप्रज्ञात समाधीतही नामरूपांची उत्पत्ती होत नाही. (४८९४)

सविकल्पी ब्रह्मास्मि स्फूर्ति स्फुरे । ते प्रतीति निर्विकल्पी वोसरे ।
एकलें एकरूप अद्वय निरि । हा असंप्रज्ञ समाधि ॥ ९५ ॥
सविकल्प समाधीमध्ये 'ब्रह्मास्मि'चे ('मी ब्रह्म आहे' या जाणिवेचे) स्फुरण होते. ती प्रतीती (अनुभव) निर्विकल्प समाधीमध्ये ओसरतो. रहाते ते फक्त एकमेव, एकरूप, अद्वय असे ब्रह्मरूप. हीच असंप्रज्ञात समाधी होय. (४८९५)

वृत्ति उद्भवली किंवा निमाली । हे वार्ताचि स्मृतीची बुडाली ।
परी स्वकीय ब्रह्मताही नाहीं स्फुरलीं । हा असंप्रज्ञ समाधि ॥ ९६ ॥
वृत्ती निर्माण झाली की लोप पावली, याची स्मृतीला दखलच नसते. एवढेच नव्हे तर स्वतःच्या ब्रह्मत्वाचेही स्फुरण होत नाही, ही असंप्रज्ञात समाधी होय. (४८९६)

मनबुद्धीचे संकल्प होती । न जाणेचि अमुक एक रति ।
परी हे ब्रह्म की नेणे विकृति । हा अमुक एक रति ॥ ९७ ॥
मन, बुद्धी यांचे संकल्प उठत असतात, पण ते अमुक पद्धतीने उठतात हेही जाणवत नाही. हे ब्रह्मच आहे की विकृती आहे, हे सुद्धा कळत नाही. हीच असंप्रज्ञ समाधी होय. (४८९७)

मनादि इंद्रियद्वारा निघोन । विषय घेती पूर्ववत संपूर्ण ।
परी हे ब्रह्म की जग नुद्भवे भान । हा अमुक एक रति ॥ ९८ ॥
मन इ., इंद्रियांच्या मार्गाने निघून विषयांचा आस्वाद पूर्वीप्रमाणेच संपूर्णपणे घेत असतात. पण हे ब्रह्म आहे की जग आहे, याचेही भान शिल्लक नसते, हीच असंप्रज्ञ समाधी होय. (४८९८)

हा देह क्रीडला की पडिला । बोलका की मुका निवांत ठेला ।
परी ब्रह्म की विकार नाहीं स्फुरला । हा अमुक एक रति ॥ ९९ ॥
ही देह क्रीडा करतो आहे की, पडलेला आहे, तो बोलतो आहे की, मौन धारण करून निवांत बसला आहे, हेही कळत नाही. ते ब्रह्मच आहे की आणखी काही विकार आहे, हेही स्फुरत नाही, हीच असंप्रज्ञ समाधी होय. (४८९९)

देहबुद्धि जैशी निपटून गेली । तिजसवेचि ब्रह्मबुद्धिही मेली ।
उपरी जे जे वर्तणूक जाहली । हा अमुक एक रति ॥ ४९०० ॥
देहबुद्धी जशी संपूर्णपणे नाहीशी होते, आणि तिच्याबरोबरच ब्रह्मबुद्धीही नाहीशी होते. अशा अवस्थेत जे वर्तन घडते तीच असंप्रज्ञात समाधी होय. (४९००)

स्फूर्तीपासून देहादि जग । मिथ्यात्वें निश्चयचि जाहला अभंग ।
पुढें मिथ्यात्वही स्मरेना अंग । हा अमुक एक रति ॥ १ ॥
तिच्यामध्ये स्फूर्तीपासून ते देहादी जग हे सर्व मिथ्या आहे. असा अभंग निश्चयच होतो. त्यानंतर पुढे तर या मिथ्यात्वाचेही स्फुरण होत नाही. ही असंप्रज्ञ समाधी होय. (४९०१)

ब्रह्मात्मा एक निजांगे स्वयें । ऐसा होऊनीच गेला निश्चय ।
मग स्मृतीवांचोनिया अद्वय । हा अमुक एक रति ॥ २ ॥
आपणच ब्रह्मात्मा आहोत, असाच ज्या समाधीत निश्चय होऊन गेलेला असतो; मग कसलेही स्मरण न होता हा अद्वयपणाचा अनुभव उरतो. हीच असंप्रज्ञ समाधी होय. (४९०२)

एवं मिथ्यासि मिथ्यात्वें स्मरेना । परी सत्यता स्वप्नीही उमसेना ।
हे सर्व ब्रह्मही आठवीना । हा अमुक एक रति ॥ ३ ॥
अशा प्रकारे मिथ्या पदार्थाबद्दल 'हे मिथ्या आहेत,' असे स्मरणही त्याला होत नाही; पण त्याचबरोबर सत्यत्वाचेही स्मरण त्याला स्वप्नातदेखील होत नाही. एवढेच काय, पण हे सर्व ब्रह्मच आहे, याचेही स्मरण तेथे नसते. हीच असंप्रज्ञ समाधी होय. (४९०३)

ओतप्रोत ब्रह्मचि चिद्घन । निजांगेंचि परी किंचित नव्हे स्मरण ।
स्वप्नींही नव्हेचि भेदभान । हा अमुक एक रति ॥ ४ ॥
साधक स्वतःच ओतप्रोत (सर्वत्र गच्च भरून राहिलेले) ब्रह्म असूनही त्याचे त्याला किंचितदेखील स्मरण नसते. स्वप्नातही त्याला भेदाचे भानदेखील होत नाही. हीच असंप्रज्ञ समाधी होय. (४९०४)

एवं हा असंप्रज्ञात समाधि । स्मरणेंविण निजांगें ।
त्रिशुद्धि । परी हा सविकल्प अभ्यासेंविण कधी । केवळ निरोधे साध्य नव्हे ॥ ५ ॥
अशा प्रकारची ही असंप्रज्ञात समाधी असते. तिच्यात कुठल्याही प्रकारच्या स्मरणावाचून साधक स्वतः ब्रह्मरूपच झालेला असतो. पण ही समाधी सविकल्पाच्या अभ्यासावाचून केवळ निरोधन करून साध्य होत नाही. (४९०५)

सविकल्प ध्यासें मिथ्यासी मिथ्यापणें । वृत्तीनें खलून सदृढ करणे ।
तेव्हांचि सत्यत्व न येतां स्मरल्याविणे । निर्विकल्प दृढ जाहलें ॥ ६ ॥
सविकल्पाच्या ध्यासाने मिथ्या गोष्टींना मिथ्यापणाने वृत्तीचा खल करून दृढ करावे, तेव्हाच त्यांना सत्यत्व येत नाही. आणि मग स्मरणरहित असे निर्विकल्प दृढ होते. (४९०६)

सर्व नाहींचि ब्रह्मात्मा स्वता । ऐसें वृत्तीचे अभ्यासें खलितां ।
निश्चयचि बाणून गेला न स्मरतां । उत्थाना अभावींही ॥ ७ ॥
हे सर्व दृश्य जग मुळात नाहीच, आपण स्वतःच ब्रह्मात्मा आहोत, अशी वृत्ती अभ्यासाने खलावी. त्यामुळे उत्थानरहित, स्मरणरहित असा पक्का निश्चयच बाणून जातो. (४९०७)

तस्मात् सविकल्प अभ्यासेंकडून । निर्विकल्प दृढ जाहला असंप्रज्ञान ।
नातरी वाउगें करितां निरोधन । सहसा साध्य नव्हे ॥ ८ ॥
त्यामुळे सविकल्पाच्या अभ्यासाच्या साहाय्याने निर्विकल्प असंप्रज्ञात समाधी दृढ होते. ती व्यर्थ निरोधन करत बसल्याने साध्य होत नाही. (४९०८)

कारण की मिथ्यात्व दृढ न होतां । आणि असंगहि निश्चय नव्हे पुरता ।
उगेंचि निरोधोनियां बैसतां । उत्थानी पूर्ववत उठती ॥ ९ ॥
कारण की, सर्व गोष्टींविषयीचा मिथ्याभाव दृढ न होता, आणि असंगत्वाचा निश्चय पूर्णपणे झाला नसताना, उगीचच निरोधन करून, समाधी लावली तर उत्थान होताच ते विकल्प पूर्वीसारखेच उत्पन्न होत राहतात. (४९०९)

स्फूर्त्यादि सत्य मिथ्या संशय उठे । ब्रह्मात्मा भेदावे केव्हां भेटे ।
ऐसें उत्थानी ज्ञान स्फुरे की ओहटे । हे ज्ञान ना समाधि ॥ १० ॥
प्रथम स्फूती इत्यादी तत्त्वे सत्य की मिथ्या हा संशय उत्पन्न होतो. नंतर ब्रह्मात्मा कधी दूर जातो (आपल्यापासून भिन्न होतो) तर कधी भेटतो. याप्रकारे उत्थानामध्ये ज्ञान कधी उत्थान पावेल तर कधी त्याला ओहोटी लागेल; परंतु वास्तविक पाहता या स्थितीला ज्ञानही म्हणता येत नाही. किंवा समाधीही म्हणता येत नाही. (४९१०)

तस्मात सविकल्प अभ्यासद्वारा । पावावें निर्विकल्पाचें निर्धारा ।
सर्व असोनिया एकसरा । नामरूप भेदचि नव्हे ॥ ११ ॥
म्हणून सविकल्प अभ्यासाच्या मागनि निर्विकल्पाच्या निर्धाराची प्राप्ती करावी. सर्व सविकल्पच जर एकरूप असेल तर नामरूपाचा भेदच दिसणार नाही. (४९११)

पाहें पाहें सविकल्प निर्विकल्पा । कोणता भेद तरी असे बापा ।
एकरूप असोनिया अभ्यास सोपा । संप्रज्ञतेचा ॥ १२ ॥
अरे, असे पहा की, सविकल्प आणि निर्विकल्प यांत भेद तरी कोणता आहे? दोन्ही एकरूपच असल्यामुळे संप्रज्ञतेचा अभ्यास सोपाच आहे. (४९१२)

सर्व उद्भवतां सर्वपणा त्यागावा । मग सर्व ब्रह्मात्माचि आठवावा ।
ऐशी सर्वात्मता बाणे स्वभावा । हा संप्रज्ञात समाधि ॥ १३ ॥
सर्व सविकल्प उत्पन्न झाले असताना त्यातील सर्वपणाचा त्याग करावा आणि सर्व ब्रह्मच आहे, असे स्मरण करावे. यालाच सर्वात्मता म्हणतात. ती या पद्धतीने अंगी बाणते. ही झाली संप्रज्ञात समाधी. (४९१३)

सर्व ह्मणोनि कांही नाठवावे । ब्रह्मचि असे हेही न स्मरावें ।
उगेंचि नाठवितां अंगें असावें । हा असंप्रज्ञात समाधि ॥ १४ ॥
सर्व या निर्देशाने कशाचेही स्मरण होऊ नये, ते सर्व ब्रह्मच आहे, याचेही स्मरण होऊ नये, काहीही न आठवता उगीच असावे, ही असंप्रज्ञात समाधी होय. (४९१४)

सर्व आपणचि होणें नामरूपाविण । हा समाधि सविकल्प संप्रज्ञ ।
हैं कांहीच न होतां दोन्ही विस्मरण । हा असंप्रज्ञ निर्विकल्प ॥ १५ ॥
नामरूपावाचून आपणच सर्व होऊन जाणे याला सविकल्प संप्रज्ञ समाधी म्हणतात. आणि या सर्व सविकल्पापैकी काहीच न होता दोन्हीचेही (सर्वात्मता आणि ब्रह्मात्मता) विस्मरण होणे ही असंप्रज्ञ निर्विकल्प समाधी होय. (४९१५)

कांहीच न स्मरावें ब्रह्म ना जग । उगेंचि निश्चयें असावें अभंग ।
या समाधीचा केव्हां तरी भंग । होईल बापा ॥ १६ ॥
ब्रह्म आणि जग यांपैकी कशाचेही स्मरण न करता उगीच निश्चयपूर्वक अभंग स्थितीत असावे. अशा या समाधीचा कधी तरी भंग होईल काय? (४९१६)

तैसें नव्हे सविकल्पासी । स्मरे तरी ब्रह्मता सर्वी अविनाशी ।
न स्मरे तरी अखंडैकरसीं । समाधिस्थ परिपूर्ण ॥ १७ ॥
ही निर्विकल्प समाधी अभंग स्थितीत राहते तशी सविकल्प समाधी नसते. तिच्यामध्ये स्मरण झाले तरी सर्वांमध्ये अविनाशी ब्रह्म व्यापून असतेच; जरी असे स्मरण झाले नाही तरी तो साधक अखंड, एकरस अशा समाधीत असतो. (४९१७)

म्हणोनि कांहींच न होणियापरिस । सर्व होणें तेंचि एकरस ।
जेथें भेदचि नव्हे भलते अवस्थेस । हेचि सहजस्थिति ॥ १८ ॥
म्हणून काहीच न होता सर्व होणे ही एकरस स्थिती होय. कोणत्याही अवस्थेत भेद न जाणवणे, हीच सहजस्थिती होय. (४९१८)

या सविकल्पयोगेंही कधी कधीं । निर्विकल्पही दृढ होय समाधि ।
वृत्ति उठे तरी सविकल्पाचा विधि । परी कदा उत्थान नव्हे ॥ १९ ॥
या सविकल्प समाधीच्या मार्गानच निर्विकल्प समाधीदेखील दृढ होते. जेव्हा वृत्ती उत्पन्न होईल तेव्हा सविकल्पाच्या विधीचा मार्ग अवलंबावा, मग केव्हाही उत्थान होत नाही.(४९१९)

तस्मात् सविकल्प समाधि साधकानें । निरोपिल्या रीतीं दृढ करणे ।
मग निर्विकल्पही त्यांतचि बाणे । निश्चय दृढतर होतां ॥ २० ॥
म्हणून साधकाने सांगितल्याप्रकाराने सविकल्प समाधी प्रथम दृढ करावी. मग त्यातूनच निर्विकल्पाचीही प्राप्ती होते. पण त्यासाठी दृढ निश्चय झाला पाहिजे. (४९२०)

असो वृत्ति अभ्यासें जो खलून । सदृढ केला उत्थानाविण ।
तो असो असंप्रज्ञ की संप्रज्ञ । परी दोनीही प्रिय ज्ञानिया ॥ २१ ॥
हे असू देत. वृत्तीच्या अभ्यासाने खलून जी दृढ केली जिला उत्थान नाही, अशी समाधी संप्रज्ञ असो अथवा असंप्रज्ञ असो, या दोन्हीही समाधी ज्ञानी साधकाला प्रिय असतात. (४९२१)

वृत्तीचा अभ्यास न करितां । निरोधून जाहला समाधि घेता ।
तो अप्रिय असे ज्ञानियां समस्त । ह्मणोनि तो निकृष्ट ॥ २२ ॥
पण वृत्तीचा अभ्यास न करता विकल्पांचा निरोध करून जी समाधी घेतली जाते ती सर्वच ज्ञानी साधकांना अप्रिय असते. म्हणून ती निकृष्ट समजावी. (४९२२)

तस्मात् वृत्तीचा अभ्यास दिननिशीं । खलून पावावें पूर्ण समाधानासी ।
यर संप्रज्ञता असंप्रज्ञता कायसी । नव्हेल सहजस्थिति पुढें ॥ २३ ॥
म्हणून अहोरात्र वृत्तीचा अभ्यास खलून पूर्ण समाधान प्राप्त करून घ्यावे. याप्रमाणे सहजस्थिती प्राप्त झाली असता संप्रज्ञ अथवा असंप्रज्ञ या समाधी तिच्यापुढे काय आहेत? (४९२३)

वृत्तीसी अज्ञाने अन्य देहादिकांचा । ध्यास बैसोनि गेला दृढचि साचा ।
तो जाईल जेव्हां हा खल होईल वृत्तीचा । अहंब्रह्मास्मि ह्मणोनी ॥ २४ ॥
वृत्तीला अज्ञानामुळे अन्य देहादिकांचा दृढ ध्यास लागलेला आहे. तो गेल्यानंतरच 'अहं ब्रह्मास्मि' या स्वरूपाच्या वृत्तीचा खल होऊ शकेल. (४९२४)

सर्व व्यापारी विशेषेकडून । दृश्य नव्हे मी ब्रह्मचि ह्मणून ।
वाणीसहित करावें उच्चारण । द्वैत स्फुरूंच न द्यावें ॥ २५ ॥
यासाठी विशेषेकरून सर्व प्रकारच्या व्यापारांमध्ये 'मी दृश्य नाहीच, मी ब्रह्मच आहे' म्हणून वाणीसह तोंडाने उच्चार करावा, तसेच नित्य स्मरणही ठेवावे आणि द्वैताचे स्फुरणही होऊ न द्यावे. (४९२५)

अंतरी कल्पना स्वप्नरूप होतां । चंचळ भास सारोनि परता ।
ब्रह्मात्मा पहावा त्या बाह्य आंतोता । दुजा भाव न स्फुरावा ॥ २६ ॥
स्वप्न अवस्थेमध्येही मनामध्ये कल्पना उठू लागल्या असताना सर्व चंचल असे दृश्य बाजूला सारून त्यांच्या बाहेर आणि आत ब्रह्मात्म्याचेच अस्तित्व पहावे. त्याखेरीज दुसरा भाव स्फुरू देऊ नये. (४९२६)

नुसधी अंतःकरणाची वृत्ति । स्तब्धत्वें स्फुरे सहजगती ।
मग ते असो गाढ सुषुप्ति । अथवा उगेपणा ॥ २७ ॥
सुषुप्ती असो अथवा उगेपणा असो, या अवस्थांमध्ये जी स्तब्धता असते, त्या स्तब्धतेमुळे अंतःकरणाची वृत्ती सहजपणाने स्फुरते. (४९२७)

अथवा समाधि घेतां तेचि वृत्ति । चिद्गनाकारें आत्मप्रतीति ।
ते सामान्य की चंचल विकृति । नामेंसहित निषेधिजे ॥ २८ ॥
अथवा समाधी लावून बसल्यानंतर तीच वृत्ती चिद्गगनाकार होऊन तिला ब्रह्मात्मत्वाची प्रचीती येते. आता प्रचीती सामान्य आहे की, चंचल विकृती आहे, याचा विचार त्यांच्या नावासहित मनात येऊ देऊ नये. त्या विचाराचा निषेध करावा, (४९२८)

तिचिया ओतप्रोत चहूंकडे । तये अंतरीही ब्रह्मत्व उघडे ।
घेऊनि येर तयेचे धर्म जे बापुडे । समाधिसहित त्यागावे ॥ २९ ॥
तिच्या आतबाहेर चोहीकडे ओतप्रोत उघडे ब्रह्मच व्यापलेले आहे. ते स्वीकारून तिचे वृत्तीचे जे धर्म आहेत त्यांचा समाधिसहित त्याग करावा. (४९२९)

समाधि आत्मप्रतीति वासनानंद । स्तब्धता सामान्यता विशद ।
हे सर्व सविकल्पाचे छंद । त्यागून चिद्रूप घ्यावें ॥ ३० ॥
समाधी, आत्मप्रतीती, वासनानंद, स्तब्धता, सामान्यता हे सर्व सविकल्पाचेच भेद आहेत. त्यांचाही त्याग करून साधकाने फक्त चिद्रूपाचाच तेवढा स्वीकार करावा. (४९३०)

तया वृत्तीचाही लय होतां । ते शून्यत्वें त्यागावी लयाकारता ।
त्यांतील साक्षिरूपमात्र अनंता । ग्राहकाविण घ्यावें ॥ ३१ ॥
त्या वृत्तीचाही लय झाल्यानंतर ती लयाकारता शून्य समजून तिचा त्याग करावा. आणि साक्षी असलेल्या अनंत ब्रह्मात्म्याचा मात्र आपण ग्राहक न होता स्वीकार करावा. (४९३१)

ऐसें करितां स्मरणपूर्वक । समाधिभंगाचा केव्हां नसे धाक ।
भलते प्रसंगी निश्चयात्मक । एकरूप समाधि ॥ ३२ ॥
असे जर स्मरणपूर्वक केले तर समाधी भंग पावेल याची केव्हाही भीती वाटण्याचे कारण नाही. कोणत्याही प्रसंगात ही समाधी निश्चितपणे एकरूपच असते. (४९३२)

लय अथवा वृत्ति उठतां । समाधि उगेपणा की झोंप लागतां ।
अथवा बुद्ध्यादि उठून स्वप्नाकारता । की इंद्रियांसहित जागर घडो ॥ ३३ ॥
लय होवो, वृत्ती उत्पन्न होवो, समाधी लागलेली असो अथवा झोप लागलेली असो, किंवा मन, बुद्धी इ. उत्पन्न होऊन त्यांना स्वप्नाकारता येवो, किंवा इंद्रियासहित असताना जागृती अवस्था प्राप्त होवो. (४९३३)

इतुके ठायींही ते ते विकार । न होतां ब्रह्मात्मा निर्विकार ।
स्मरणरूप सविकल्प ब्रह्माकार । संप्रज्ञात समाधि ॥ ३४ ॥
या सर्व अवस्थांमध्ये त्या त्या प्रकारचे विकार न होता ब्रह्मात्मा निर्विकार राहतो. अशा अवस्थेत अशी ब्रह्माकारता निर्विकल्प असते आणि स्मरणरूप सविकल्प असेल तर ती संप्रज्ञात समाधी होय. (४९३४)

ऐसें निर्विकल्प ब्रह्मरूपाचें । स्मरणे सविकल्प सुख घे साचें ।
आपुलें तों निर्विकल्पत्व नवचे । आणि महालाभ सविकल्पा ॥ ३५ ॥
अशा त-हेने निर्विकल्प ब्रह्माच्या स्मरणाने सविकल्पाचे सुख घेता येते. ते घेत असताना आपल्या निर्विकल्पत्वाला धक्का लागत नाही. आणि सविकल्पाच्या सुखाचा महालाभही होतो. (४९३५)

तस्मात् रविदत्ता जागृति की स्वप्न । वृत्तीसी समाधि झोंप की उगेपण ।
परी तूं स्मरें ते ते भाव त्यागून । आपलें सच्चिद्घनानंद ॥ ३६ ॥
म्हणून रविदत्ता, जागृती असो की स्वप्न, वृत्तीला समाधी लागो, झोप लागो किंवा उगेपण प्राप्त होवो, परंतु तू मात्र ते ते भाव टाकून आपले सच्चिद्धनानंद स्वरूप स्मरत रहा. (४९३६)

हे स्मरण अभ्यासें बलात्कारें । साधका करणे लागे निरिं ।
नामरूपादि सांडावे भेद सारे । ब्रह्मत्व खरें निवडावें ॥ ३७ ॥
हे स्मरण साधकाला अभ्यासाने, बळजबरीने, निर्धारपूर्वक करावे लागते. त्यामध्ये नामरूपादी सर्व भेदांचा त्याग करावा आणि खऱ्या ब्रह्मत्वाची निवड करावी. (४९३७)

हे सहजगति ज्ञानिया होती । नामरूपेंही नुद्भवती ।
आपुली ब्रह्मता दृढ प्रतीति । स्मरतां न स्मरतां बाणे ॥ ३८ ॥
ही सहजावस्था ज्ञानी साधकाला सहजरीत्या साध्य होते. त्याच्या साधनेत नामरूपेही उद्भवत नाहीत आणि त्याने स्मरण केले अथवा नाही केले तरी आपल्या ब्रह्मत्वाची खरी दृढ प्रतीती त्याच्या ठिकाणी बाणून जाते. (४९३८)

साधक तेचि सिद्ध होऊन । सहजस्थितीसी होती पावन ।
तोंवरी साधका अभ्यास करणे । लागे स्मृतीचा ॥ ३९ ॥
त्यामुळे साधकाला सिद्धाची अवस्था प्राप्त होते आणि तो सहजस्थिती प्राप्त करून पवित्र होतो. पण तोपर्यंत अभ्यासकाला हा स्मरणाचा अभ्यास करावाच लागतो. (४९३९)

तस्मात् ऐसाचि हा अभ्यास करीं । सदां भलते अवस्थेमाझारी ।
याविण सविकल्परोधाची चाड न धरीं । कवणेही काळीं ॥ ४० ॥
म्हणून तू सर्वकाळ कोणत्याही अवस्थेमध्ये अशाच प्रकारचा हाच अभ्यास कर, आणि कोणत्याही काळी (केव्हाही) सविकल्पाचे निरोधन करण्याची चाड धरू नकोस (काळजी करू नकोस) (४९४०)

सविकल्प समाधि तो हे सर्व असतां । सहजगती घडतसे तत्त्वतां ।
आणि निर्विकल्पही असंप्रज्ञता । मागें निरोपिल्यापरी घडे ॥ ४१ ॥
सविकल्प समाधी तर हे सर्व असतानाही सहजरीत्या सिद्ध होत असते. आणि निर्विकल्प असंप्रज्ञ समाधी तर मागे सांगितल्याप्रमाणे प्राप्त होते. (४९४१)

सर्वांचे मिथ्यात्वाचे स्मरण । आणि ब्रह्मात्मत्वाची आठवण ।
हाचि समाधि एकतान संप्रज्ञ । सर्वदां राहे ॥ ४२ ॥
सर्वांच्या मिथ्यात्वाचे स्मरण ठेवून आपल्या ब्रह्मात्मत्वाची आठवण सांभाळणे हीच एकतान संप्रज्ञ समाधी होय. ती सर्वकाळ राहते. (४९४२)

हे सर्व मिथ्यात्वेही न स्मरतां । स्वकीय ब्रह्मात्मत्वही नाठवितां ।
निजांगें निश्चय तरी एकरूपता । हा असंप्रज्ञ समाधी ॥ ४३ ॥
सर्व गोष्टींच्या मिथ्यात्वाचे स्मरण न ठेवता आणि स्वतःच्या ब्रह्मात्मत्वाचीही आठवण न करता ही स्वतःच्या एकरूपतेचा निश्चय कायम राहणे हीच असंप्रज्ञ समाधी होय. (४९४३)

उभयरीतीही सर्व निरोधाचें । फल तों एक ऐक्यत्वाचें ।
हेचि स्थिति सर्व ज्ञानियां रुचे । तस्मात् हेचि साधवी ॥ ४४ ॥
दोन्ही प्रकारांनी सर्व निरोधाचे एकमेव फळ जे ऐक्यप्राप्ती तेच प्राप्त होते. हीच स्थिती ज्ञानी साधकांना आवडत असते. म्हणून हीच स्थिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. (४९४४)

रविदत्ता तूं येथे कल्पना । करिसी की मागिल्या निरोपणा ।
विरोध आला जे वृत्ति लयाविना । असंप्रज्ञ नव्हे ॥ ४५ ॥
रविदत्ता, तू यावर कल्पना करशील की, मागे जे वृत्तीचा लय झाल्यावचून असंप्रज्ञता प्राप्त होत नाही, असे निरूपण केले होते (४५३२ ही ओवी पहा) त्याला येथे विरोध येतो आहे. (४९४५)

वृत्तिलय तोचि असंप्रज्ञ । ऐसें असतां प्रस्तुत भाषण ।
की सर्व पूर्ववत् असून । असंप्रज्ञता घडे ॥ ४६ ॥
वस्तुस्थिती अशी आहे की, वृत्तिलय हीच असंप्रज्ञ समाधी होय, आणि आता आपण सांगत आहात की, सर्व पूर्ववत असूनदेखील असंप्रज्ञ समाधी प्राप्त होते. (४९४६)

ऐसा विरोध जरी तुज वाटला । तरी सावध असावें निरूपणाला ।
आह्मी हेतूही प्रगटिला आपुला । परी त्वां जाणिला नाहीं ॥ ४७ ॥
यावर उत्तर असे की, असा विरोध तुला जर वाटत असेल तरी आता मी जे निरूपण करत आहे, ते सावधपणे ऐक. त्या निरूपणातच आम्ही आमचा हेतू प्रगट केला आहे. पण तो तू जाणून घेतला नाहीस. (४९४७)

तस्मात् तोचि हेतु आतां मागुती । स्पष्ट करून दावू तुजप्रती ।
आमुचा भाव कदा नोव्हें निश्चिती । की लय व्हावा वृत्तीचा ॥ ४८ ॥
म्हणून आता तोच हेतून पुन्हा एकदा तुला स्पष्ट करून सांगतो. वृत्तीचा लय झाला पाहिजे असे मागेही आमचे निश्चितपणे केव्हाही मत नव्हतेच. (४९४८)

परी लय व्हावा ह्मणोनि बोलणें । तें असे इतुकियाच कारणे ।
की सर्व असून नामरूप न स्फुरणे । हाचि लय ॥ ४९ ॥
परंतु लय व्हावा असे आम्ही जे बोलत होतो, ते एवढ्याचसाठी की, सर्व असून नामरूप न स्फुरणे हाच खरा लय होय, असाच आमचा अभिप्राय होता. (४९४९)

कवणेही अवस्थेसी नामरूपाचा । उद्भवचि न व्हावा सर्वपणाचा ।
हाचि लय स्मरणेंविणही साचा । हा असंप्रज्ञ समाधि ॥ ५० ॥
कोणत्याही अवस्थेमध्ये नामरूपाची उत्पत्तीच होऊ नये, सर्वपणाची उत्पत्ती होऊ नये, त्याचे स्मरणही होऊ नये हाच खरा लय होय. हीच असंप्रज्ञ समाधी होय. (४९५०)

याविण निःशेष वृत्ति निमावी । हे शंकाचि कवणें न करावी ।
जरी लयचि व्हावा ऐसें भावी । तरी बहुत विरोध ॥ ५१ ॥
यावाचून वृत्तीचा निःशेष लय व्हावा, अशी शंका देखील कोणी करू नये. जर संपूर्ण लय व्हावाच असा जर कोणी विचार करत असेल तर त्याला पुष्कळ विरोध निर्माण होतात. (४९५१)

लय जाहलिया जोवन्मुक्तीचें । सुख कोणे भोगावें साचें ।
सुखग्राहका तों सविकल्पाचें । निर्मूळ जाहलें ॥ ५२ ॥
लय खरोखरच झाला तर जीवन्मुक्तीचे खरे सुख कोणी उपभोगावे? कारण जो सुख घेणारा आहे, त्याच्या पक्षी सुखग्राहक अशा सर्व सविकल्पाचे समूळ उच्चाटन झालेले असते. (४९५२)

निर्विकल्पाचें सुख निर्विकल्प । नेघे कदापिही अल्प ।
तस्मात् सुखग्राहक तें सविकल्प । तें निमितां सुख कैंचें ॥ ५३ ॥
निर्विकल्पाचे सुख निर्विकल्प कधीच थोडेसुद्धा घेऊ शकत नाही. म्हणून सुख घेणारे ते नष्ट झाल्यावर तेथे सुख कसे राहील? (४९५३)

जीवन्मुक्तीचे सुखही बुडालें । आणि पुढे परंपरा केवों चाले ।
ज्ञाते तों निर्विकल्प होऊन गेले । तरी उपदेशावें कोणे कोणा ॥ ५४ ॥
अशा परिस्थितीत जीवन्मुक्ताचे जे सुख ते तर बुडतेच, पण मग पुढील परंपरा कशी चालू राहील? ज्ञाते तर निर्विकल्प स्थितीत गेले, मग कोण कोणाला उपदेश देणार? (४९५४)

एक ज्ञाता जो होऊन गेला । तो निर्विकल्प जड पडिला ।
तरी उद्धरावें कोणें दुजियाला । हा केवढा विरोध ॥ ५५ ॥
जो कोणी ज्ञाता झाला तो तर निर्विकल्प होऊन जड होऊन पडला तर दुसऱ्या व्यक्तीचा उद्धार तरी कोण करणार? हा केवढा मोठा विरोध आहे? (४९५५)

निर्विकल्प तोचि ज्ञाता एक । तरी आचार्य याज्ञवल्क्यादिक ।
उपदेशिते जाले एकासी एक । ते काय सर्व अज्ञान ॥ ५६ ॥
आणि निर्विकल्प असेल तोच खरा ज्ञाता अशी जर समजूत असेल तर याज्ञवल्क्य इत्यादी ज्ञात्यांनी एक-एकाला उपदेश केला तो काय सर्व अज्ञानातून केला? (४९५६)

मागील सर्व अज्ञान जाहले । कारण की निर्विकल्प नाहीं पडिले ।
तरी आतां हे ज्ञान कोठोनि आलें । हा तो अति विरोध ॥ ५७ ॥
मागील श्रेष्ठ पुरुष सर्व अज्ञानीच होते, कारण निर्विकल्प होऊन पडले नाहीत. मग सध्याचे ज्ञान कुठून आले? हा तर अतिशय मोठा विरोध आहे! (४९५७)

आणि श्रुति ज्ञानादेव बोलिली । या वचनासीही व्यर्थता आली ।
निर्विकल्पता तों क्रियेनें केली । तरी ज्ञानाचे कारण काय ॥ ५८ ॥
आता श्रुतीने म्हणजे उपनिषदांनी 'ज्ञानादेव तु कैवल्यम्' हा सिद्धान्त मांडला. त्या सिद्धान्तालाही खोटेपणा येईल. निर्विकल्पता प्राप्त झाली ती विशिष्ट कृतीच्या योगाने असे म्हटल्यास मग ज्ञानाचे प्रयोजनच काय? (४९५८)

ह्मणसी ज्ञान होऊन लय व्हावा । तरी श्रुतीसी विरोध न यावा ।
येणेही बोलें योग अपेक्षावा । नुसध्या ज्ञाने मोक्ष नोव्हे ॥ ५९ ॥
तू असे म्हणशील की, ज्ञान झाल्यानंतर लय व्हावा तर अशा म्हणण्याने श्रुतीला विरोध येतो. तो येऊ नये यावर म्हणशील की तरीही योगाची गरज आहे. केवळ ज्ञानाने मोक्ष प्राप्त होत नाही. (४९५९)

ज्ञानासी अपेक्षा जरी क्रियेची । तरी ज्ञानादेव या वचना व्यर्थता साची ।
ह्मणोनि सर्वदा निर्विकल्पत्वाची । गोष्टी सहसा न बोलावी ॥ ६० ॥
अशा प्रकारे ज्ञानाला योगाभ्यासाच्या कृतीची अपेक्षा आहे असे म्हणावे लागते. ते स्वीकारले तर वेदाचे 'ज्ञानादेव तु कैवल्यम्' (फक्त ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो) वचन व्यर्थ ठरते. म्हणून केवळ निर्विकल्पच असावे अशी गोष्ट सुद्धा काढू नकोस. (४९६०)

मुख्य आचार्य जे जे मागे जाहले । ते ते निर्विकल्प नाहीं पडिले ।
तस्मात् ते पूर्णज्ञाना नाहीं पावले । सर्वां आले अज्ञान ॥ ६१ ॥
मागच्या काळात जे जे प्रमुख आचार्य होऊन गेले ते नुसते निर्विकल्प होऊन पडले नाहीत. त्यामुळे तुझ्या बोलण्यानुसार त्यांना पूर्णज्ञान झाले नव्हते असे म्हणावे लागते. त्या सर्वांनाच अज्ञानी मानावे लागते. (४९६१)

या विरोधासी उत्तर कोणतें । विचारूनियां बोलें निगुतें ।
जरी ह्मणसी उपदेशापुरतें । सविकल्प असावें ॥ ६२ ॥
असा विरोध निर्माण झाल्यावर उत्तर काय? नीट विचार करून सांग. जर तू असे म्हणशील ते आचार्य उपदेश देण्याच्या वेळेपुरते सविकल्प झाले होते; (४९६२)

तरी निर्विकल्प होता ज्ञाना पावती । सविकल्पकाळी पडे अज्ञान भ्रांति ।
तस्मात् उपदेश करण्यायोग्य न होती । उभय अवस्थेही ॥ ६३ ॥
मग असे म्हणावे लागेल की, ते आचार्य निर्विकल्प झाले की ज्ञानी झाले होते. पण सविकल्प काळात ते अज्ञानभ्रांत झाले असावेत. तर अशा परिस्थितीत ज्ञानदशेत अथवा अज्ञानदशेत ते उपदेश करण्यास योग्य ठरत नाहीत. (४९६३)

निर्विकल्पी तों ज्ञान असोनी । बोलतां नये विराल्यावाणी ।
सविकल्पी तों अज्ञान कैसेनी । उपदेशा योग्य होय ॥ ६४ ॥
निर्विकल्प अवस्थेत ते ज्ञान असूनही विरून गेल्याप्रमाणे बोलू शकत नाहीत. सविकल्प काळात तर ते अज्ञानीच ठरत असल्यामुळे उपदेश करण्यास योग्य कसे ठरतील? (४९६४)

तथापि आणीक एक कल्पना । करिसी की विकल्प निर्विकल्प पूर्ण ।
उभयकाळीही आहेपणा । ज्ञानासी असे ॥ ६५ ॥
तरीसुद्धा तू आणखी कल्पना करशील की, सविकल्प काळी आणि निर्विकल्प काळी या दोन्हीही काळी पूर्ण ज्ञानास आहेपणा आहे (या दोन्हीही काळी ज्ञान असते) (४९६५)

ऐसें बोलतां तो विरोध थोर । सविकल्प स्फूर्ति आणि जड समग्र ।
हे उभयतांही जाहले साचार । अर्ध अर्ध विभागी ॥ ६६ ॥
असे बोललास तर फार मोठा विरोध निर्माण होतो. सविकल्प स्फूर्ती आणि सगळे जड पदार्थ हे दोघेही ज्ञानाचे अर्धे अर्धे वाटेकरी होतील. (४९६६)

जड पणिजे घटादिकांसी । ज्ञानाचा अर्धभाग आला त्यासी ।
कारण कीं तेथें कदां सविकल्पासी । रूप नसे ह्मणूनी ॥ ६७ ॥
जड म्हणजे घट इत्यादी पदार्थांना ज्ञानाचा अर्धा भाग वाट्याला येईल. कारण त्यांच्या ठिकाणी सविकल्प कधीही उत्पन्न होत नाही. (४९६७)

सविकल्प स्फूर्तीसी जो अर्धभाग । आला तोही वाटे नसे अभंग ।
कारण की संशयें पावतसे भंग । क्षणक्षणा विक्षेपें ॥ ६८ ॥
सविकल्प स्फूर्तीच्या वाट्याला जो अर्धा भाग येईल, तोही अभंग नाही असे वाटते. कारण की ते ज्ञान संशयाने आणि विक्षेपाने क्षणाक्षणाला भंग पावते. (४९६८)

साधक कोणी समाधि घेतां । पुरती नव्हेचि निर्विकल्पता ।
श्रवणीं चिलट जरी गुणगुणितां । विक्षेपचि उठे ॥ ६९ ॥
एखादा साधक समाधी लावून बसेल तर त्याला प्राप्त होणारी निर्विकल्पता कधीही पुरती होत नाही. कारण साधा डास कानाशी गुणगुणला, तरी विक्षेप निर्माण होतो. (४९६९)

निर्विकल्पता तरी नव्हे खरी । तस्मात् अर्ध भागाचा नसे वांटेकरी ।
अर्धभाग जो सविकल्पाचा निर्धारी । तोही विक्षेपें बुडला ॥ ७० ॥
अशा विक्षेपामुळे पूर्ण निर्विकल्पता येऊ शकत नाही. म्हणून अल्प कालावधीसाठी येणारी निर्विकल्पता खरी ठरत नाही. त्यामुळे ती अर्ध्या भागाची सुद्धा वाटेकरी होऊ शकत नाही. अविकल्पाच्या वाट्याला जो अर्धा भाग येईल तोही विक्षेपांमुळे बुडतो. (४९७०)

घट तरी जड निर्विकल्प खरा । ज्ञानाचा अर्धविभागी जाहला पुरा ।
हा साधक पडे संशया माझारा । तरी अर्धभागही नाहीं ॥ ७१ ॥
घट हा जड असून खरा निर्विकल्प आहे. म्हणून तो पूर्णपणे ज्ञानाचा अर्धा वाटेकरी ठरतो आणि हा आपला साधक सविकल्प. निर्विकल्पाच्या संशयात सापडला तर ज्ञानाच्या अर्ध्या भागालाही पारखा होतो. (४९७१)

ऐसे अनेक प्रकारचे विरोध । होती निर्विकल्पा ह्मणतां बोध ।
तस्मात् साधकं करावा वृत्तिरोध । ऐसें सहसा अपेक्षू नये ॥ ७२ ॥
अशा प्रकारचे अनेक विरोध ज्ञान फक्त निर्विकल्पकाळीच होते, असे मानल्याने निर्माण होतात. म्हणून साधकाने वृत्तीचे निरोधनच केले पाहिजे अशी अपेक्षा करू नये. (४९७२)

हे असो पूर्वील विरोधाचें । बोलणें राहो अन्यअन्याचें ।
परी साधकासी ज्ञानचि नवचे । नुसधे निर्विकल्प साधितां ॥ ७३ ॥
पूर्वी जे विरोध दाखवले ते बाजूला राहू द्यात, पण साधकाने नुसते निर्विकल्पच प्राप्त करण्याचे ठरविले तर त्याला ज्ञानच प्राप्त होणार नाही. (४९७३)

जया सविकल्पाज्ञान व्हावें । तया वृत्तीसी तों रोधून ठेवावें ।
तरी कवणे निश्चयेंसी स्थापावें । अमुकसें ज्ञान ह्मणोनी ॥ ७४ ॥
ज्या सविकल्पाला ज्ञान व्हायचे त्या सविकल्प वृत्तीलाच निरोधन करून ठेवले तर अमुक हे ज्ञान आहे असा निश्चय कोण करणार? (४९७४)

अज्ञान न जातां देहबुद्धीसहित । तो मुक्त तरी कवणे बोलिजेत ।
आणि ज्ञाता ह्मणावा कासयांत । वृत्ति तों निमग्न अज्ञानीं ॥ ७५ ॥
देहबुद्धीसहित अज्ञान गेल्याखेरीज त्या साधकाला मुक्त तरी कसे म्हणायचे? त्याला ज्ञाता तरी कसे म्हणायचे? कारण त्याची वृत्ती अज्ञानात बुडालेली आहे. (४९७५)

जरी उगाचि लय करून बैसला । तरी लयसाक्षी कदा न जाय कळला ।
येविशीं विचारचि पाहिजे केला । वृत्ति उत्थानी ॥ ७६ ॥
जर तो उगीचच लय करून बसला तर त्याला लयसाक्षीचे ज्ञान कधी होणारच नाही. त्यासाठी वृत्ती उठल्यानंतर त्याला योगाच्या कृतीऐवजी विचारच केला पाहिजे. (४९७६)

वृत्तीविना लय साक्षीचा । अनुमान कोणे करावा साचा ।
तस्मात् ब्रह्मानुभवचि असे कैचा । नुसध्या निरोधे ॥ ७७ ॥
आणि वृत्तीवाचून लयसाक्षीचे अनुमान कोण करील? तेव्हा केवळ निरोधन केल्याने ब्रह्मानुभव कसा प्राप्त होईल? (४९७७)

आणीक ह्मणसी की लयसाक्षीचें ज्ञान । जाहलिया यथार्थ विचारेंकडून ।
पुढें बैसावें वृत्ति रोधून । तरी याचे उत्तर ऐकें ॥ ७८ ॥
तू पुढे असे म्हणशील की, यथार्थ विचाराच्या साहाय्याने लयसाक्षीचे ज्ञान झाल्यानंतर पुढे वृत्तीचे निरोधन करून बसावे, तर त्याचेही उत्तर ऐक. (४९७८)

ज्ञान जाहलियाही लयसाक्षीचें । पुढे अभ्यासेंविण दृढतर कैंचें ।
निर्मूल नव्हेचि देहबुद्धीचें । जें बहु दिसांचे दृढ जाहलें ॥ ७९ ॥
लयसाक्षीचे ज्ञान झाल्यानंतरही अभ्यासावाचून ते दृढतर कसे होईल? कारण देहबुद्धी पुष्कळ दिवसांची असून अतिशय दृढ झालेली असते. या देहबुद्धीचे निर्मूलन या अभ्यासावाचून होणारच नाही. (४९७९)

जैशी देहबुद्धि सदृढ जाहली । ऐशी ब्रह्मात्मता पाहिजे केली ।
ते वृत्ति अभ्यासें जरी खलिली । तरीच खरी अपरोक्षता ॥ ८० ॥
देहबुद्धी किती दृढ झालेली असते! ब्रह्मात्मतासुद्धा तेवढीच दृढ केली पाहिजे. त्यासाठी वृत्तीचा अभ्यासाने खल केला पाहिजे. तसे केले तरच खरी अपरोक्षता प्राप्त होते. (४९८०)

येथे निरोधाचें काज काई । निरोधे ज्ञान नव्हे निःसंशई ।
हेही असो कवणा कालत्रईं । निःशेष लय कदा नव्हे ॥ ८१ ॥
या अभ्यासात निरोधाचा काही संबंध नाही. निरोधाने निश्चितपणे ज्ञान होणारच नाही. ते एक राह दे. कोणालाही निःशेष लय पाहणे कालत्रयीही शक्य होणार नाही. (४९८१)

पद : तदशक्तौ ।
पदार्थ : ते शक्य नसेल तर

जो सप्राण उपाधीसहित । तो ज्ञानी असो की अज्ञानयुक्त ।
परंतु सर्व लय करावया अशक्त । महाप्रयत्नी जरी ॥ ८२ ॥
जो सजीव प्राणी उपाधींनी वेढलेला आहे, तो ज्ञानी असो की अज्ञानी, तो कितीही प्रयत्न करो, तो सर्व लयाचा साक्षी होण्यास असमर्थ आहे. त्याला सर्वांचा लय करणे अशक्यच आहे. (४९८२)

वायु मस्तकी जो चढवूनी । बैसेल तो मात्र राहे चिरकाळ रोधोनी ।
परी तो शून्यामाजीं पडे अज्ञानीं । तरी उपयोग कैंचा ॥ ८३ ॥
वायू मस्तकात चढवून त्याचे निरोधन करून जो बसेल तो मात्र चिरकाल राहील; पण तो अज्ञानात राहून शून्यामध्ये पडून राहतो. मग त्याचा उपयोग काय? (४९८३)

ऐशिया हटयोगारहित । कोण असे निरोधा सशक्त ।
मागें जाहले ना पुढे होणार बहुत । परी ऐसा न देखों नायकों ॥ ८४ ॥
अशा प्रकारच्या हठयोगावाचून असे निरोधन करण्यास कोण समर्थ आहे? तो मागे झाला नाही, पुढेही होणार नाही, पण असा निरोधन करण्यास कोणीही पाहण्यात नाही, ऐकण्यातही नाही, (४९८४)

की सर्वदा वृत्तिलयचि करूनी । बैसेल एकरूप निशिदिनीं ।
मग तो असो अज्ञानी की ज्ञानी । परी समर्थ नव्हे ॥ ८५ ॥
की जो सर्वकाळ वृत्तिलय करून एकरूप होऊन रात्रंदिवस तसाच बसून राहिला आहे; मग तो ज्ञानी असो अथवा अज्ञानी असो. त्यापैकी कोणीही सर्वकाळ निरोधन करण्यास कधीही समर्थ होणार नाही. (४९८५)

वृत्ति स्फूर्तिरूप उठतां राहे । न घडे कदापि सर्वथा है ।
जैसा बंबांतून वायु न वाहे । ऐसा नसे प्रकार ॥ ८६ ॥
ज्याप्रमाणे बंबातून वारा वाहणार नाही, असे कधीच घडत नाही, त्याप्रमाणे स्फूर्तिरूप वृत्ती उठल्यानंतर स्थिर राहील असे केव्हाही घडणार नाही. (४९८६)

तथापि मनबुद्धि उठू न देणे । प्राणासि तरी असे वाहणे ।
तेणें क्षुधा तृषा होती अचुकपणे । तेव्हां व्याकुळ करील ॥ ८७ ॥
तरीसुद्धा मन आणि बुद्धी या वृत्ती उठू न देण्याचा निश्चय केला तर एकवेळ त्या स्थिर राहतील, पण जिवंत असेपर्यंत प्राण तर वाहणार आहेतच. त्यांच्या वाहण्यामुळे भूक, तहान या गोष्टी उत्पन्न होणारच, तेव्हा त्या प्राण्यास व्याकुळ करतीलच. (४९८७)

त्या व्याकुळीने घाबरून । उठेल सविकल्प बुद्धि मन ।
तथापि बळें बैसे निग्रह करून । तरी प्राणांत होय ॥ ८८ ॥
त्या व्याकुळतेने घाबरल्यामुळे सविकल्प मन, बुद्धी उठणारच. तथापि त्यावेळी बळजबरीने निग्रह करून बसला तर प्राणांत होईल. (४९८८)

तेणें नुठतां प्राणही दिधला । कासाविस होऊन व्यर्थ मेला ।
तरी कोणते सार्थकासी पावला । आत्महत्यारा ॥ ८९ ॥
तसाच बसून राहून तो उठला नाही तर कासावीस होऊन तो व्यर्थ मरून जाईल. मग अशा प्रकाराने कुणाचे सार्थक होणार आहे? तो आत्महत्याराच ठरेल! (४९८९)

तो ह्मणे म्यां मनादि रोधिले । किंचित् उत्थान होऊ न दिधलें ।
परी त्या कासाविशीमाजी भ्रमले । पुरता लय ना व्यापार ॥ ९० ॥
तो म्हणेल की, मी मन, बुद्धी यांचे किंचितही उत्थान होऊ न देता निरोधन केले; ते खरे झाले, पण त्या निरोधनामुळे जीव कासावीस झाला, मनाला भ्रम झाला. त्याचा परिणाम काय झाला? ना धड लय ना व्यापार अशी स्थिती झाली. (४९९०)

ऐसा वृत्तिरोधे होय अनर्थ । कोणी निरोधासी नसे समर्थ ।
आणि कोणताचि न साधे अर्थ । व्यर्थ देह पीडितां ॥ ९१ ॥
वृत्तिनिरोध करण्याने असा अनर्थ होतो. आणि त्यामुळे कोणीही निरोधन करण्यास समर्थ होत नाही. आणि कोणताही लाभ पदरात पडत नाही. केवळ देहाला मात्र व्यर्थ पीडा होते. (४९९१)

शा मागेंही ज्ञात ते उदंड जाहले । सनकादिक याज्ञवल्क्य महा भले ।
परी कोणी निर्विकल्पी जड पडिले । ऐसें नायकों ॥ ९२ ॥
मागेही सनकादिक, याज्ञवल्क्य इ. महान भले ज्ञाते पुष्कळ होऊन गेले; पण त्यांपैकी कोणी निर्विकल्प होऊन जडपणे पडून राहिले आहेत, असे ऐकिवात नाही. (४९९२)

ते पूर्ण ज्ञानी समाधानी । सुखें विचरती कर्मानुसार जनीं ।
परी निचेष्टित राहिले पडोनी । ऐसा एकही नायकों ॥ ९३ ॥
ते पूर्ण ज्ञानी होते, आपापल्या कर्मानुसार ते लोकांमध्ये सुखाने संसार करत होते. पण त्यापैकी कोणी निश्चेष्ट होऊन पडून राहिला असा एकही ऐकला नाही. (४९९३)

जरी विदेही नांव जनकासी । परी पडिला नाहीं निर्विकल्पत्वेंसी ।
विचरे सदा प्राप्त भोगासी । वनीं भुवनीं जनीं ॥ ९४ ॥
जरी जनक राजास विदेही असे नाव होते, तरी तोही निर्विकल्प होऊन पडला नाही. प्राप्त झालेले भोग भोगत तो वनात, घरात आणि जनसमुदायात वावरत होता. (४९९४)

तस्मात् कोणता जड पडिला । प्रारब्धानुसार नाहीं क्रीडला ।
परी अज्ञान ऐसें ह्मणे जो तयाला । त्याची जिव्हा झडेल ॥ ९५ ॥
त्यामुळे कोणीही ज्ञाता जड होऊन पडला नाही, प्रारब्धानुसार त्याने क्रीडा केली नाही, असे नाही. अशा ज्ञात्यांना जो कोणी अज्ञानी म्हणेल, त्याची जीभ झडून जाईल. (४९९५)

ते पूर्णज्ञानी सहजस्थिति । उत्थानरहित सर्वदा क्रीडती ।
तयांचे तेंचि यथार्थ जाणती । येरांसी काय कळे ॥ ९६ ॥
ते पूर्णज्ञानी असून सहजस्थितीमध्ये राहून तिच्यातून उत्थान न होता सर्वकाळ क्रीडा करत राहिले. ते त्यांचे त्यांनाच यथार्थतेने उमगते, इतरांना ते कसे कळेल? (४९९६)

सर्वदा निर्विकल्प जाहलियाविण । न पावती जरी पूर्ण समाधान ।
तरी काय राहती ते केलियावांचून । हरप्रयत्न साधिती ॥ ९७ ॥
सर्वकाळ निर्विकल्प न होता त्यांना जर समाधान मिळाले नसते तर ते ज्ञाते ते समाधान प्राप्त केल्यावाचून राहिले असते काय? त्यासाठी त्यांनी वाटेल ते प्रयत्न केले असते. (४९९७)

परी तयांसी काज असेना । ह्मणोनि निर्विकल्पी प्रवर्ततीना ।
सर्व असतां दृढबोधे समाधाना । पावले निःसंशयें ॥ ९८ ॥
पण त्यांना त्या निर्विकल्प होऊन राहण्यात रस नव्हता. म्हणून त्या निर्विकल्प अवस्थेसाठी प्रवृत्त होत नाहीत. त्यांच्या भोवती सर्व परिवार असताना आपल्या दृढ ज्ञानाच्या बळावर त्यांना निःसंशयपणे समाधान प्राप्त झाले. (४९९८)

हेही निःसंशय खरे जाहले । त्यावरी याज्ञवल्क्य गुरुत्वें बोले ।
हे जनक पूर्ण अभय तुज पावलें । हे वचन वेदामाजीं ॥ ९९ ॥
हेही निःसंशय खरे आहे. उपनिषदात याज्ञवल्क्यांनी गुरूंची भूमिका घेऊन जनकाला सांगितले की, "हे जनका, तू निर्भय रहा, दृढ बोधाने समाधान पावावे' असे वेदात/उपनिषदात सांगितले आहे. (४९९९)

तस्मात् ते निर्विकल्प नसतां । काय ह्मणो न येती ज्ञाते तत्त्वतां ।
तथापि न मानील कोणी तो ऐता । अधमाहूनि अधम ॥ ५००० ॥
त्यामुळे ते निर्विकल्प नसल्यामुळे त्यांना ज्ञाते असे का म्हण नये? तरीसुद्धा जर कोणी ते मानत नसेल तर तो अधमान अधम म्हणावा लागेल. (५०००)

यास्तव ते ज्ञाते पूर्ण समाधानी । सत्य सत्य वेद जयातें वाणी ।
ह्मणूनि मुमुक्षूनें आदरें करूनी । तद्नुसार वर्तावें ॥ १ ॥
म्हणून निर्विकल्प नसताना सुद्धा ते ज्ञाते पूर्ण समाधानी होते, हे खरेच आहे. कारण वेदांनीच त्यांचे कौतुक केले. म्हणून मुमुक्षूने त्या वेदवचनाचा आदर करून त्यांच्याप्रमाणे वर्तन करावे. (५००१)

मागे कोणी जडत्वें पडिला । ऐसा देखिला ना ऐकिला ।
येथे कोणी भावील की जडभरताला । निर्विकल्पस्थिति होती ॥ २ ॥
मागे कोणीही जडत्व स्वीकारून पडून राहिला आहे, असे पाहण्यात नाही की ऐकिवात नाही. येथे कोणी कल्पना करील की, जडभरताला निर्विकल्प स्थिती प्राप्त झाली होती . (५००२)

परी जडभरतही निर्विकल्प न होतां । तो पूर्वील दुःसंगा जाहला स्मरता ।
ह्मणोनि भिऊन जाहला अवलंबिता । जडचर्या जनीं ॥ ३ ॥
पण जडभरतसुद्धा निर्विकल्प नव्हता. कारण पूर्वीच्या वाईट संगतीच्या दुष्परिणामाचे त्याला स्मरण होते. म्हणून त्या भीतीने त्याने जनसमुदायात जडचर्या मुद्दाम धारण केली होती. (५००३)

तयाही अशनपान चालणे बोलणें । होत असे देहाचें करणें ।
रहुगणासी उपदेश होणें । निर्विकल्प तरी कैसा ॥ ४ ॥
त्यालाही देहाचे बंधन असल्यामुळे खाणे, पिणे, चालणे, बोलणे इ. देहाच्या कृती कराव्याच लागत होत्या. रहुगणालाही त्याने उपदेश केला होता. मग त्याला निर्विकल्प कसे म्हणता येईल? (५००४)

वरुती जडपणा जरी दाखवी । परी मननादि सर्व संपादी बरवीं ।
तस्मात् सर्वदा निर्विकल्पता असावी । ऐसें पूर्वी ना घडे पुढे ॥ ५ ॥
तो वरवर जडपणा जरी दाखवत असला तरी मनन करणे इ. गोष्टी तो योग्य प्रकारे करतच होता. म्हणून सर्वकाळ निर्विकल्पता असली पाहिजे. असे पूर्वी घडले नाही आणि पुढेही घडणार नाही. (५००५)

निःशेष वृत्तिलय करावया । कोणी समर्थ नव्हे गा शिष्यराया ।
ह्मणोनि तो सर्वथा घेऊं नये थाया । कवणेही साधकें ॥ ६ ॥
हे शिष्यराया, निःशेष वृत्तिलय करायला कोणीही समर्थ नाही. म्हणून कोणाही साधकाने निःशेष वृत्तिलयाचा छंद घेऊ नये. (५००६)

तंव रविदत्त घाली लोटांगण । बोलता जाहला हस्त जोडून ।
जी जी वृत्तीचा लय निःशेष होणे । न घडे कल्पांती ॥ ७ ॥
तेव्हा रविदत्ताने आचार्यांच्या पायांवर लोटांगण घातले आणि हात जोडून तो म्हणाला, “महाराज, वृत्तीचा निःशेष लय कल्पान्तीही होणे शक्य नाही. (५००७)

परी वृत्ति सर्वदा तदाकार । होऊन असावी ब्रह्माकार ।
या परतें नसावें अन्य येर । साधकां सदा ॥ ८ ॥
परंतु वृत्ती सर्वदा तदाकार म्हणजे ब्रह्माकार होऊन असावी, यापलीकडे साधकाला अन्य काही नसावे. (५००८)

ऐसें ऐकतांचि गुरु ह्मणती । सुखी असावें बापा येणें रीतीं ।
हें तों आझांसी इष्टचि अति । हा तों आमुचाचि पक्ष ॥ ९ ॥
असे ऐकताच सद्गुरू म्हणाले, “या पद्धतीने सुखी व्हावे. हे आम्हाला इष्टच आहे. हा तर आमचाच पक्ष आहे. (५००९)

कीं नामरूप भेदाचे दर्शन । होऊच नये सर्व पूर्वरीती असून ।
एक ब्रह्मात्मत्व सच्चिदानंदघन । एकतान अवलोकावें ॥ १० ॥
तो असा की, सर्व काही पूर्वीप्रमाणेच असूनसुद्धा नामरूपभेदाचे दर्शन होऊच नये. एक सच्चिदानंद घन ब्रह्मात्मत्वाचेच एकतान अवलोकन व्हावे. (५०१०)

वृत्ति उठो की मन बुद्धि उठोनी । इंदियद्वारा प्रवतों विषयग्रहणीं ।
परी पाहूं नये सच्चिद्घनावांचोनी । नामरूपादि भेद ॥ ११ ॥
वृत्ती उठू देत किंवा मनबुद्धी उठून इंद्रियांच्या द्वारा विषयग्रहणास प्रवृत्त होऊ देत, पण सच्चिद्घन ब्रह्मात्म्यावाचून नाम रूपांचा भेद मात्र पाहू नये. (५०११)

हेचि एकाकरता खरी । विसरूचि नये निमिष्यही अंतरीं ।
हेंचि साधका साधन निर्धारी । सहजस्थिति बाणे तों ॥ १२ ॥
हीच खरी एकाकारता होय. तिचा आपल्या अंतःकरणात क्षणभरही विसर पडू देऊ नये. साधकासाठी सहजस्थिती बाणेपर्यंत हेच साधन निश्चयपूर्वक समजावे (५०१२)

हें तों अवश्यचि असे साधकासी । परी लय जो बोलिला यथा रीतीसी ।
तोही जाहला पाहिजे निश्चयेंसी । क्षण एक निःशेष ॥ १३ ॥
साधकाला हे तर आवश्यकच आहे. पण जो लय वर सांगितला आहे तो क्षणभर का होईना पण निःशेष असा झालाच पाहिजे. तो होणे आवश्यकच आहे. (५०१३)

लयसाक्षीचा बाणावा प्रयत्न । शून्य संदेह मोडला जाय ।
ह्मणोनि क्षण एक स्वीकार होय । आह्मासीही लयाचा ॥ १४ ॥
लयसाक्षीचा प्रत्यय बाणला म्हणजे शून्याची शंका आपोआप नष्ट होते. म्हणूनच आम्हालादेखील क्षणभरापुरता का असेना लयाचा स्वीकार करावाच लागतो. (५०१४)

पद : क्षणं रुद्ध्वा ।
पदार्थ : क्षणभर रोधन करून

तस्मात् वृत्तीचा लयही क्षणभरी । करूनि लयसाक्षीची प्रतीति खरी ।
शून्य सांडूनि केवल निर्धारी । अपरोक्षता बाणावी ॥ १५ ॥
म्हणून वृत्तीचा क्षणभरासाठी तरी लय करून लयसाक्षीचा खरा अनुभव घ्यावा. शून्याचा त्याग करून केवळ अपरोक्षता (साक्षात अनुभव) बाणवून घ्यावी. (५०१५)

पूर्वी सांगितल्या रीतीं । चारी विघ्नांची होऊन समाप्ति ।
वृत्तीचा लय होय जो सहजगतीं । तो स्वकीय ज्ञाने जाणावा ॥ १६ ॥
पूर्वी सांगितल्याप्रमाणे चारी विघ्नांचा बीमोड झाल्यानंतर सहजरीतीने जो वृत्तीचा लय होतो, तो स्वतःच्या ज्ञानाच्या बळावर जाणून घ्यावा. (५०१६)

लय होऊन जें शुद्ध जाणणे । तेंचि चिद्रूप केवळपणे ।
आणि सद्रूप आनंदरूप अनुभवणें । अनुभवियाविण ते समईं ॥ १७ ॥
लय झाल्यानंतर जे शुद्ध जाणणे (ज्ञान) राहते तेच केवळ चिद्रूप होय. त्याच वेळी अनुभव घेणारा न होता सद्रूप आणि आनंदरूप यांचाही अनुभव घ्यावा. (५०१७)

ऐशी यथार्थ प्रतीति बाणता । मग पुढे वृत्तीही उद्भवतां ।
अथवा मनादिही व्यापार होता । तेंचि पहावें यामध्ये ॥ १८ ॥
अशी यथार्थ प्रतीती बाणल्यानंतर मग पुढे वृत्ती उत्पन्न झाली, अथवा मनादींचे व्यापार होऊ लागले तरी त्या अवस्थेमध्ये ती उत्पन्न झालेली तत्त्वे आणि व्यापार खुशाल पाहावीत. (५०१८)

नामरूप परतेंचि सारावें । भेदाचें निःसंतानचि व्हावें ।
एकरूप सच्चिद्घनचि स्मरावें । किमपि विस्मर न होतां ॥ १९ ॥
नामरूपे बाजूला सारावीत, भेदभावना निःशेष नष्ट व्हावी, आणि एकरूप सच्चिद्घन ब्रह्मात्म्याचेच किंचितही न विसरता स्मरण करावे. (५०१९)

एकदां लयसाक्षीचा प्रत्यय घेतला । क्षणभरी तदाकारत्वें राहिला ।
पुढे वृत्तीमाजीही अवलंबिता जाहला । तोचि प्रत्यय ॥ २० ॥
एकदा लयसाक्षीचा प्रत्यय घेतल्यानंतर क्षणभर तदाकार होऊन राहिल्यानंतर पुढे उत्पन्न झालेल्या वृत्तीमध्येही तोच प्रत्यय घ्यावा. (५०२०)

मागुतींही लयसाक्षी क्षणभरी । अनुभवून या वृत्तीवरी ।
वृत्तिसुखही घेऊन अंतरीं । पुन्हां लयप्रत्यय घ्यावा ॥ २१ ॥
त्यानंतरही क्षणभर लयसाक्षीचा अनुभव घेऊन वृत्तीवर यावे, आतल्या आत वृत्तिसुखाचा अनुभव घेऊन पुन्हा लयाचा प्रत्यय घ्यावा. (५०२१)

ऐसा क्षणक्षण वृत्तीचा अभ्यास । क्षणक्षण लयसाक्षी एकरस ।
वारंवार घडावा साधकास । भलतेही अवस्थे ॥ २२ ॥
अशा प्रकारे क्षणाक्षणाला वृत्तीचा अभ्यास करून क्षणाक्षणाला लयसाक्षीचा एकरस अनुभव साधकाला कोणत्याही अवस्थेत वारंवार घेता यावा. (५०२२)

एकदांचि लयसाक्षी जाणिला । क्षण एक प्रतीति घेऊन आला ।
पुन्हां जाऊंचि नये लयसाक्षीत्वाला । ऐसें नव्हे नव्हे ॥ २३ ॥
एकदा लयसाक्षीचे ज्ञान करून घेतले, एक क्षणभर तो अनुभव घेतला; त्यानंतर लयसाक्षित्वाचा अनुभव पुन्हा घेऊच नये असे नाही. (५०२३)

तस्मात् क्षण एक वृत्तिचा लय करून । लयसाक्षीचा प्रत्यय घेऊन ।
वृत्ति उठतां तदाकारत्वें राहणे । पुन्हां क्षणभरी लय कीजे ॥ २४ ॥
म्हणून एक क्षणभर वृत्तीचा लय करून, लयसाक्षीचा अनुभव घेतल्यानंतर जर वृत्ती उत्पन्न झालीच तर तदाकार होऊन राहावे आणि त्यानंतर पुन्हा क्षणभर लय करावा. (५०२४)

ऐसा क्षणक्षण लयरूप निरोध । क्षणक्षण उद्भवतां स्मरणीं सावध ।
हाचि अभ्यास एकरूप द्विविध । साधका अवश्य ॥ २५ ॥
अशा प्रकारे क्षणाक्षणाला लयरूप निरोध उत्पन्न झाल्यानंतर आपले स्मरण सावध ठेवावे. हा दुहेरी एकरूप अभ्यास साधकाने अवश्य करावा. (५०२५)

पद : श्रद्धालुर्ब्रह्मतात्मनः ।
पदार्थ : श्रद्धाळू साधकाने आपल्या ब्रह्मत्वाची अनुभूती घ्यावी.

आरंभी अभ्यासे किंवा विचारता । आपुली व्यतिरेंकें ब्रह्मात्मता ।
जाणिली लयसाक्षी जे अपरोक्षता । तेचि दृढतर पुढे करावी ॥ २६ ॥
आरंभी अभ्यासाने किंवा विचाराने व्यतिरेक पद्धतीने (इतर गोष्टींचा निरास करून) जी ब्रह्मात्मता जाणून घेतली तीच लयसाक्षी अपरोक्षता होय. तीच त्यानंतर पुढे दृढ करावी. (५०२६)

श्रद्धालु साधक जो अधिकारी । लयसाक्षी जाणोनि निर्धारीं ।
तेंचि दृढतर व्हावया अभ्यंतरीं । अभ्यासचि पाहिजे ॥ २७ ॥
जो अधिकारी श्रद्धाळू साधक असेल त्याने निर्धारपूर्वक लयसाक्षी जाणून घेऊन तो दृढतर होण्यासाठी अभ्यासच केला पाहिजे. (५०२७)

श्रद्धा हे ह्मणावें आवडीसी । ते आपुली आवडी प्रियतम जैशी ।
आणिका देहादिकां नव्हे तैशी । हैं पूर्वीच विवेचन जाहलें ॥ २८ ॥
श्रद्धा म्हणजे आवड होय. ही आवड आपल्या देहावरच्या आवडीसारखीच आहे. इतरांच्या देहापेक्षा आपली आपल्या देहाबद्दलची आवड प्रियतम म्हणजे सर्वात अधिक असते. याचे विवेचन यापूर्वीच झाले आहे. (५०२८)

न जाणतां आवडी अकृत्रिम । दुसरिया पदार्था नसे तिजसम ।
आतां जाणिलिया अपरोक्षं प्रियतम । बोलणेंचि नको ॥ २९ ॥
ही आपल्या देहावरची आवड जशी न जाणता अकृत्रिम असते, तशी दुसऱ्या पदार्थाबद्दल तेवढी आवड नसते. आता अत्यंत आवडीचा ब्रह्मात्मा प्रत्यक्ष जाणून घेतल्यानंतर तो अधिक प्रियतम असणार, हे सांगायलाच नको. (५०२९)

विवेचनें बत्तीस परते केले । अभ्यासें लयसाक्षित्वा जाणिलें ।
तेंचि अपरोक्षं निजरूप आपुलें । त्रिविधाही प्रतीतीनें ॥ ३० ॥
विचाराने बत्तीस तत्त्वे बाजूला सारली, अभ्यासाने लयसाक्षित्व जाणले. तेच आपले खरे स्वरूप होय. आत्मप्रतीती, शास्त्रप्रतीती, आणि गुरुप्रतीती या त्रिविध प्रतीतींनी ते स्पष्ट होते. (५०३०)

ऐसें खरेखरेपणे निवडितां । मिथ्यासी मिथ्यात्वे त्यागितां ।
आतां तया मिथ्यासी कैंची प्रियता । एक आपुली प्रियतमता करी ॥ ३१ ॥
अशा प्रकारे सत्याचा खरा निवाडा केला असता, आणि मिथ्याचा मिथ्या म्हणून त्याग केला असता त्या मिथ्याला प्रियत्व कसे येईल? एक आपल्या आत्म्यालाच प्रियतम करावे (फक्त ब्रह्मात्म्यावरच प्रेम करावे). (५०३१)

ऐशी प्रियतमता जे आपुली । येर प्रियता होपळ जाहली ।
ययाचि नांवे श्रद्धा बोलिली । अन्य यागादि श्रद्धा नव्हे ॥ ३२ ॥
आत्मा प्रियतम ठरल्याने इतर देहादिकांची प्रियता ती व्यर्थ होते. यालाच श्रद्धा म्हणावे. यज्ञयागादींबद्दल वाटणारे प्रेम हे श्रद्धा नव्हे. (५०३२)

ऐशी आवडी अकृत्रिम जया । श्रद्धालु ऐसें ह्मणावें तया ।
तोचि साधक जेणे ब्रह्मात्मया । अपरोक्षं जाणिलें ॥ ३३ ॥
अशी अकृत्रिम आवड ज्याला असते त्याला श्रद्धाळू म्हणावे. आणि ज्याने ब्रह्मात्म्याला प्रत्यक्ष जाणले तोच खरा साधक होय. (५०३३)

अपरोक्ष जाणिलिया साधक कैसा । मानिसी संशय अंतरीं ऐसा ।
तो पुढे कळेल निरोपिजे जैसा । अवघी साधकत्वाचा ॥ ३४ ॥
तू असा संशय घेशील की ज्याने ब्रह्मात्म्याला प्रत्यक्ष जाणून घेतले आहे, त्याला साधक कसे म्हणता? याचे उत्तर मी पुढे जे निरूपण करीन; त्यातून तुला कळेल. त्यामध्येच साधकाची मर्यादा कोणत्या टप्प्यापर्यंत असते हेही तुला कळेल. (५०३४)

असो या रीतीं अपरोक्ष तत्त्वतां । श्रद्धालु साधकें आपुली आत्मता ।
जाणिली यथार्थ तेणेंचि मागुता । दृढतरता करावी ॥ ३५ ॥
असो, या रीतीने श्रद्धाळू साधकाने आपली आत्मता अपरोक्षत्वाने यथार्थपणे जाणली. त्यानंतर त्यानेच ती आत्मता दृढ करावी. (५०३५)

दृढतर मणिजे आपण स्वयें ब्रह्म । येविषयीं न यावा संशय भ्रम ।
मिथ्यात्वें त्यागिलें जें रूपनाम । तया आत्मता न यावी ॥ ३६ ॥
दृढतर म्हणजे आपणच स्वतः ब्रह्म आहोत, याविषयी मनात संशय अथवा भ्रान्ती होऊ देऊ नये. रूपनामांचा मिथ्यात्वाने त्याग केल्यानंतर त्याला कधीही आत्मत्व येऊ देऊ नये. (५०३६)

येर बत्तिसां सत्यत्वचि न यावें । जरी दिसत असतांही आघवें ।
मा आत्मत्व तरी कैंचें संभवे । तेंचि मी म्हणोनी ॥ ३७ ॥
त्या बत्तीस तत्त्वांना सत्यत्वच येऊ देऊ नये. जरी ते सर्व डोळ्यांना स्पष्ट दिसत असले तरी त्यांच्या ठिकाणी आत्मत्व कसे संभवेल? 'तेच मी आहे' असे तरी कसे म्हणता येईल? (५०३७)

आपण ब्रह्मात्मा परिपूर्ण । तो परोक्ष केवी होय आपण ।
ऐसें नुद्भवें कदा जें भेदभान । हेचि दृढतरस्थिती ॥ ३८ ॥
आपण स्वतःच परिपूर्ण असा ब्रह्मात्मा आहोत हे कळल्यावर तो 'आपण' परोक्ष (म्हणजे) अप्रत्यक्ष कसा होईल? अशा प्रकारचे भेदभाव केव्हाही उठू देऊ नयेत, हीच दृढतर स्थिती होय. (५०३८)

परी ऐशी स्थिती दृढतर व्हावया । अभ्यासचि पाहिजे शिष्यराया ।
तरीच संशय जाती निपटूनियां । वृत्तीच्या अभ्यासें ॥ ३९ ॥
पण अशी दृढतर स्थिती होण्यासाठी हे शिष्यराया अभ्यासाचीच गरज आहे. तरच वृत्तीच्या अभ्यासाने सर्व संशयांचे पूर्णपणे निरसन होईल. (५०३९)

तस्मात तोचि अभ्यास वृत्तीचा । सांगिजेल यथारीतीं साचा ।
त्या रीतीकरून दृढ अपरोक्षाचा । पावावा प्रत्यय ॥ ४० ॥
म्हणून तोच वृत्तीचा अभ्यास पद्धतशीर कसा करावा हे आता तुला मी सांगेन. त्या रीतीने अभ्यास करून दृढ अपरोक्षाचा अनुभव घे. (५०४०)

अगा रविदत्ता पूर्वीपासोन । जाहलें ते विचारी निरूपण ।
यथासांग जाहलें विवेचन । कांही आशय नुरतां ॥ ४१ ॥
रविदत्ता, प्रारंभापासून आतापर्यंत जे निरूपण झाले त्याचा विचार कर. आतापर्यंत कोणताही विषय बाकी न ठेवता सर्व विवेचन यथासांग झालेले आहे. (५०४१)

तयाहीवरी अभ्यासद्वारा । भेटविलें ब्रह्मात्मया निर्विकारा ।
अमुक एक संशय उठे माघारा । ऐसें उरलें नाहीं ॥ ४२ ॥
त्यानंतर अभ्यासाच्या साहाय्याने तुला निर्विकार ब्रह्मात्म्याशी भेट करवून दिली. आता मागे अमुक एक संशय उरला आहे, असे काही उरले नाही. (५०४२)

मध्ये तुवां प्रश्न केले होते । ते ते सांग सांगितले समस्ते ।
सविकल्प निर्विकल्पत्वही ऐते । निवडिले हातींचे आंवळे ॥ ४३ ॥
मध्ये तू जे जे प्रश्न केले होतेस त्या सर्वांचे परिपूर्ण विवेचन केले आहे. त्याचबरोबर सविकल्प आणि निर्विकल्प म्हणजे काय ते तळहातावरील आवळ्यांप्रमाणे तुला स्पष्ट करून सांगितले. (५०४३)

आतां तुझा प्रश्न एक उरला । त्याचा तुज असेल विसर जाहला ।
परी तो स्मरत असे आम्हाला । तो प्रगट करूं ॥ ४४ ॥
आता तुझा एक प्रश्न उरला आहे. त्याचा तुला विसर पडला असेल, परंतु आमच्या तो चांगला लक्षात आहे. तो प्रथम विचारात घेऊन स्पष्ट करू. (५०४४)

तुवां पुसिलें होतें ऐसें । की सर्व देहादि असोत पूर्वरीती जैसे ।
परी यासी आत्मत्व न यावें अल्पसें । आपुलें ब्रह्मत्व दृढ व्हावें ॥ ४५ ॥
तू असे विचारले होतेस की, सर्व देहादी पूर्वी होते तसेच असू देत, पण त्यांना आत्मत्व थोडेही येता कामा नये.आणि आपले ब्रह्मत्वही दृढतर व्हावे. (अधिक दृढ व्हावे) (५०४५)

हा इतुका मात्र प्रश्न उरला । अन्याचे उत्तर दिधलें तुजला ।
लयसाक्षी अपरोझे भेटविला । जीवही दिधला निवडूनी ॥ ४६ ॥
एवढा एक प्रश्न उरला आहे. इतर प्रश्नांची उत्तरे तुला दिली आहेत. लयसाक्षीची प्रत्यक्ष भेट घडविली आहे. जीवाचे स्वरूपही योग्य निवाडा करून स्पष्ट केले आहे. (५०४६)

असो देहबुद्धि मागुती न जडावी । आपुली ब्रह्मात्मता दृढ व्हावी ।
ऐशी तुझी प्रश्नाची उठाठेवी । फेडावी लागे ॥ ४७ ॥
असो, आता पुन्हा देहबुद्धी चिकटू नये, आपली ब्रह्मात्मता दृढ व्हावी. या तुझ्या प्रश्नाची ऊहापोह करून त्याची उकल केली पाहिजे. (५०४७)

निरूपणाचाही प्रसंग तोची । आला आलोडून एकदांची ।
श्रद्धालू साधकें स्वब्रह्मत्वाची । अपरोक्षता दृढ करणे ॥ ४८ ॥
निरूपणाचा सर्व प्रकार तोच ठेवून सर्व विवेचन एकदाचे पूर्ण केलेले आहे. श्रद्धाळू साधकाने आपल्या ब्रह्मत्वाचा प्रत्यक्ष अनुभव दृढ कसा करावा हा आता प्रस्तुतचा विषय आहे. (५०४८)

तस्मात् देहादिबुद्धि निपटून जावी । स्वकीयब्रह्मता दृढतर व्हावी ।
येरासी आत्मता न संभवावी । आणि परोक्षत्व ब्रह्मात्मया ॥ ४९ ॥
म्हणून देहादीबद्दलची आत्मीयता पूर्णपणे नष्ट व्हावी, स्वतःची ब्रह्मात्मता दृढतर व्हावी, इतरांच्या बाबतीत आत्मीयता उत्पन्नच होऊ नये, आणि ब्रह्मात्मत्वाचा प्रत्यक्ष अनुभव यावा (ब्रह्माला परोक्षत्व येऊ नये) (५०४९)

ऐसा अभ्यास घडावा वृत्तीसी । तोचि सांगू यथारीतीसी ।
हेचि उपासना म्हणावी ऐशी । सगुणनिर्गुणरूप ॥ ५० ॥
असा अभ्यास वृत्तीला घडावा, अशी तुझी इच्छा आहे तर ते तुला आता रीतसर सांगतो. हीच सगुण निर्गुण रूपी उपासना म्हणता येईल. (५०५०)

केवळ विचारेंचिं अपरोक्ष जया । आणि लयसाक्षी जाणतांचि अद्वया ।
पावेल एकरूप निःसंशया । ऐसे अधिकारी थोडे ॥ ५१ ॥
केवळ विचारानेच ज्याला अपरोक्ष (प्रत्यक्ष) दर्शन होते, आणि लयसाक्षीचे ज्ञान होताच अद्वय ब्रह्माशी जो एकरूपता प्राप्त करून घेतो, असे अधिकारी थोडेच असतात. (५०५१)

तस्मात् मंदप्रज्ञ अधिकारीयाने । विचारें अभ्यासें लयसाक्षी जाणणे ।
तैसेंचि पुढे वृत्तीनें खलणें । दृढतर व्हावया ॥ ५२ ॥
म्हणून मंदप्रज्ञ अशा अधिकाऱ्याने विचाराने आणि अभ्यासाने लयसाक्षी जाणून घ्यावा, आणि तो अनुभव दृढतर होण्यासाठी वृत्तीचा खल करावा. (पुनःपुनः अभ्यास करावा). (५०५२)

हेचि उपासना तूं करी जाईं । मागें बोलिलों होतों ते समईं ।
तस्मात् उपासना अभ्यास निःसंशईं । एकरूपचि असे ॥ ५३ ॥
हीच उपासना तू करत जा, असे तुला मागे त्या वेळी सांगितले होते. म्हणून उपासना म्हणजेच अभ्यास होय. ते दोन्ही एकरूपच आहेत, याबद्दल संशय बाळगू नकोस. (५०५३)

आतां साधकें असावें सावधान । अभ्यासरूप हेंचि उपासन ।
तेंचि दृढतर ऐकोनी निरूपण । तैसेंचि केलें पाहिजे ॥ ५४ ॥
आता साधकाने अवधानपूर्वक लक्ष द्यावे. अभ्यास म्हणजेच उपासना होय. तिच्यामुळेच ब्रह्मात्मत्व दृढ होते. तेच आता निरूपण करतो. ते ऐकून त्याप्रमाणे करावे. (५०५४)

GO TOP