॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ लघुवाक्यवृत्ति ॥


श्लोक क्र. १२ वा

॥ श्रीरामसमर्थ ॥

श्लोक: एकद्वित्रिक्षणेष्वेवं विकल्पस्य निरोधनं ।
क्रमेणाभ्यस्यतां यत्नाद्ब्रह्मानुभवकांक्षिभिः ॥ १२ ॥
श्लोकार्थ : ब्रह्म साक्षात्काराची इच्छा करणाऱ्यांनी एक क्षण, दोन क्षण, तीन क्षण अशा क्रमाने वाढवत वाढवत विकल्पांच्या निरोधनाचा (थोपवून धरण्याचा) क्रमाक्रमाने प्रयत्नपूर्वक अभ्यास करावा. ॥१२॥

जया साधका ब्रह्मानुभवाची । अपेक्षा खरी असे साची ।
तेणें क्षणाक्षणां विकल्पनिरोधाची । यत्ने स्थिति साधावी ॥ ७ ॥
ज्या साधकाला ब्रह्मानुभवाची खरी अपेक्षा आहे, त्याने विकल्पनिरोधाची स्थिती प्रयत्नपूर्वक क्षणाक्षणाने वाढवत साध्य करावी. (३२०७)

आजि येक क्षण निरोध । जाहला विकल्परहित शुद्ध ।
तरी उद्यां परवां द्विविध । वाढवावें सामान्य ॥ ८ ॥
आज एक क्षणभर निरोध केला. तेवढ्या क्षणासाठी निर्विकल्प शुद्ध अवस्था प्राप्त झाली. उद्या, परवा दुप्पट क्षण सामान्य वाढवावे. (३२०८)

दोन क्षण जाहलिया निरोधन । पुढे अभ्यासें साधावे क्षण तीन ।
ऐसें प्रतिदिनी क्रमेंकडून । चिरकाळ स्थिर करावें ॥ ९ ॥
दोन क्षणासाठी निरोधन झाल्यावर पुढे अभ्यासाने तीन क्षणांचे करावे. अशा तहेने प्रत्येक दिवशी क्रमाक्रमाने वाढवून ते दीर्घकाळपर्यंत स्थिर करावे. (३२०९)

आतां हेचि प्रांजळ करूं । कैसा कैसा अभ्यास प्रकारु ।
ध्वनितार्थे की यथार्थे निर्धारु । बाणे अभ्यासाचा ॥ १० ॥
आता हा अभ्यासाचा प्रकार स्पष्ट करतो. हा प्रकार जेणेकरून सवयीचा होईल तो प्रकार संक्षेपाने पण यथार्थरीतीने स्पष्ट करू. (३२१०)

तस्मात् साधकीं सावधान । निरूपण ऐकोनी एकाग्र मन ।
त्या रीतींच येकांती बसून । अभ्यासावें आदरें ॥ ११ ॥
म्हणून साधकाने सावधान होऊन निरूपण ऐकून मन एकाग्र करावे. त्याच पद्धतीने एकान्तात बसून त्याचा आदरपूर्वक अभ्यास करावा. (३२११)

पद : एवं ब्रह्मानुभवकांक्षिभिः ॥ १२ ॥
अर्थ : ब्रह्मानुभवाची आकांक्षा बाळगणारांनी ॥१२॥

एवं मणिजे या प्रकारें । जैसें मागें बोलिलें विस्तारें ।
तैसें साधकें अभ्यासद्वारें । हळुहळू साधावें ॥ १२ ॥
ब्रह्मानुभवाची आकांक्षा बाळगणारांनी अशा प्रकारे म्हणजे मागे सांगितल्या प्रकाराने अभ्यासाच्या साहाय्याने हे निरोधन हळूहळू साधावे. (३२१२)

ब्रह्मानुभवाची आकांक्षा । कीं जाणावें सामान्य अपरोक्षा ।
तेण याचि अभ्यासें प्रत्यक्षा । पाविजे स्वानुभवा ॥ १३ ॥
ब्रह्मानुभवाची आकांक्षा म्हणजे सामान्य चिद्रूपाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा (अपरोक्षानुभव) अशी ज्याची इच्छा असेल त्याने याच अभ्यासाने स्वानुभव प्रत्यक्ष घ्यावा. (३२१३)

मागें आता पूर्व श्लोकाआंत । संधि प्रकार टळटळित ।
सांगितला जैसा यथायुक्त । नेत्र झांकिता की उघडोनी ॥ १४ ॥
मागे पूर्वीच्या श्लोकात (११ वा श्लोक) डोळे उघडे ठेवून अथवा मिटून संधी कसा टळटळीत अनुभवास येतो ते चांगल्या प्रकारे सांगितले. (३२१४)

ज्ञातता आणि अज्ञातता । द्विविधापरी प्रकार तत्त्वतां ।
साधावे बाह्य आणि आंतौता । बैसोनि येकांतीं ॥ १५ ॥
एकांतात बसून जागृतीतील (बाह्य) आणि स्वप्नातील (आंतर) या दोन्ही अवस्थांतील ज्ञातता आणि अज्ञातता हे दोन्ही प्रकार साध्य करावेत. (३२१५)

संधीमाजी सामान्य पहावें । की अज्ञाततेत चिद्‌रूप वोळखावें ।
नातरी ज्ञाततेमाजीं स्थिर असावें । विषयानंदें ॥ १६ ॥
संधींमधील सामान्याचे अवलोकन करावे, किंवा अज्ञाततेत चिद्रप ओळखावे किंवा ज्ञाततेत विषयानंदात स्थिर असावे. (३२१६)

ऐसे कोणतेही प्रकारीं । स्थिरत्व करावें अंतरीं ।
विकल्प न होतां निर्विकारी । वृत्ति बुडावी ॥ १७ ॥
अशा प्रकारे यांपैकी कोणत्याही प्रकारामध्ये अंतःकरण स्थिर करावे, कोणतेही विकल्प निर्माण होऊ देऊ नयेत आणि वृत्ती निर्विकारामध्ये, ब्रह्म तत्त्वामध्ये बुडावी. (३२१७)

संकल्पाचें जें अधिष्ठान । संकल्प उमटताहे जेथून ।
लक्षाशें लक्षावें तें स्थान । सूक्ष्म अंतरदृष्टीनें ॥ १८ ॥
संकल्पाचे जे अधिष्ठान आहे, म्हणजे जेथून वृत्ती उठते ते स्थान, सूक्ष्म आंतर दृष्टीने लक्ष्य करून (मननाचे केन्द्र करून) पहावे. (३२१८)

आंरभी निर्विकल्प स्फूर्ति उठे । पुढे मनबुध्यादि विकल्प उमटे ।
परी वृत्तीचे मुळी निरखितां नुठे । विकल्परूप धर्म ॥ १९ ॥
प्रथम निर्विकार स्फूर्ती उठते, पुढे मन, बुद्धी इ. विकल्प उत्पन्न होतात. परंतु वृत्तीच्या मुळाचे निरीक्षण करण्याने विकल्परूप धर्म निर्माण होत नाहीत. (३२१९)

यद्यपि जरी विकल्प उठिला । तरी सोडूं नये वृत्तीच्या मुळाला ।
एकतानचि पाहिजे लक्षिला । आपुला जाणतेपणा ॥ २० ॥
जरी कदाचित विकल्प उठला, तरी वृत्तीच्या मुळाला घट्ट धरून असावे, ते अजिबात सोडू नये. आपला जाणतेपणा एकतानतेनेच पाहिला पाहिजे. (३२२०)

ऐसें संकल्प बुडी जाणतेपण । तें लक्षिलें जरी एकतान ।
मग विकल्प जरी उठे आपण । तरी आपैसा निमे ॥ २१ ॥
असे आपले जाणतेपण संकल्पाच्या बुडावर (मुळावर) केन्द्रित करून एकतानतेने अवलोकन करण्याने विकल्प उठला तरी आपले आपण (आपोआप) मावळतो. (३२२१)

ऐसाचि वारंवार जरी उठे । परी तत्क्षणीं वितळूनियां फाटे ।
ज्ञानघनचि परिपूर्ण दाटे । गगनापरी ॥ २२ ॥
विकल्प असाच उठत राहिला तरी तो त्या क्षणीच उठून वितळून फाटतो. आणि ज्ञानघन असा ब्रह्मात्मा आकाशाप्रमाणे सर्वत्र पूर्णपणे व्यापून राहतो. (३२२२)

स्वरूपनिर्धार गगनाऐसा । वोतप्रोतपणे सहसा ।
मध्येचि किंचित् विकल्पठसा । उमटून मावळे ॥ २३ ॥
हा स्वरूपनिर्धार (स्वरूपनिश्चितीचा प्रकार) आकाशाप्रमाणे ओतप्रोत (सर्वत्र गच्च भरून राहिलेला) असतो. त्यामध्ये मधेच एखादा विकल्पाचा ठसा उमटला तरी तो लगेच मावळतो (नाहीसा होतो). (३२२३)

तेंचि ज्ञान वृत्ती उठतां । आले वाटे स्फूर्ति आंतौता ।
परी तें असे तयेच्या परता । वृत्ति येवढे नव्हे ॥ २४ ॥
तेच स्वरूपज्ञान वृत्ती उठल्याबरोबर स्फूर्तीत आल्यासारखे वाटते, परंतु ते ज्ञान स्फूर्तीच्या पलीकडचे आहे. ते वृत्तीप्रमाणे मर्यादित नाही. (३२२४)

जैसें गगन वायूंत न ये । तैसें चिद्‌रूप वृत्तींत न समाये ।
परी वाटलें जें वृत्तिमय । येर न कळे ह्मणोनी ॥ २५ ॥
ज्याप्रमाणे आकाश वायूमध्ये सामावले जात नाही, त्याप्रमाणे चिद्रूप वृत्तीत सामावले जात नाही. आता आपल्याला ते वृत्तीएवढेच आहे, असे वाटते, त्याचे कारण वृत्तीच्या पलीकडचे आकाश ते आपल्या अनुभवास येत नाही, हे होय. (३२२५)

जैसा विकल्प होतां स्फूर्ति झांकोळे । तेवीं स्फूर्ति उठतां ज्ञान तें न कळे ।
गगनापरी जे असे सगळं । कळे तें वृत्तीयेवढें ॥ २६ ॥
ज्याप्रमाणे विकल्प निर्माण होताच स्फूर्ती झाकली जाते. त्याप्रमाणे स्फूर्ती उठताच ते पलीकडचे ज्ञान कळत नाही. ते संपूर्ण ज्ञान आकाशाएवढे असताना आपल्याला ते वृत्तीएवढेच असल्यासारखे वाटते. (३२२६)

विकल्प त्यागूनि स्फूर्ति वोळखावी । स्फूर्तित्यागें चित्प्रभा कळावी ।
जैशी वायु टाकोनी गगनीं घालावी । निजदृष्टि सहज ॥ २७ ॥
तेव्हा विकल्पाचा त्याग करून स्फूर्ती ओळखावी त्याप्रमाणेच स्फूर्तीचा त्याग करून चित्प्रभा कळली पाहिजे. वायूचा त्याग करून सहज आकाशामध्ये स्वतःची दृष्टी घालावी तितक्या सहजतेने ते ज्ञान कळले पाहिजे. (३२२७)

विषय पाहतां वाटे देखत । तो हा चर्च पदार्थजात ।
डोळिया अवलोकितां वाटे पाहत । विकल्प अंतरींचा ॥ २८ ॥
विषय पाहत असताना असे वाटते की, आपल्याला कळत असलेले हे पदार्थ डोळाच पाहत आहे. डोळ्याकडे पाहिले असता वाटते की आतून निर्माण होणारा विकल्पच पाहत आहे. (३२२८)

विकल्प कळे जयाचे दृष्टी । ते हे स्फूर्तीच आपुले पुष्टी ।
जेधवां स्फूर्तीस जाणे उठाउठी । तो चिद्‌रूप आत्मा । ॥ २९ ॥
विकल्प जिच्या दृष्टीने कळतो ती स्फूर्तीच खरी पाहत आहे असे वाटते. आणि स्फूर्तीस सहजपणे जाणणारा तो अंतरात्माच आहे असे आपल्याला कळते. तोच चिद्रूप ब्रह्मात्मा होय. (३२२९)

तस्मात् गगनवत् चिद्‌रूप आपण । मध्ये एकदेशी वायु ऐसें स्फुरण ।
तें चिद्‌रूप जाणे स्फुरणालागून । परी ऐसें साधका न कळे ॥ ३० ॥
म्हणून चिद्रूप आत्मा हा आकाशाप्रमाणे परिपूर्ण आहे. आकाशात वायूचे स्फुरण उठते, ते एकदेशी असते, ते एकदेशी असून चिद्रूपच त्या स्फुरणास जाणत असते. साधकाला मात्र ते कळत नाही. (३२३०)

कारण की विशेषावरी प्रवृत्ति । अनादि पडलीसे भ्रांति ।
हे अभ्यासे कळतां कळतां कळती । तोंकाळ दृष्टि वरिवरी ॥ ३१ ॥
कारण की विशेषाकडेच प्रवृत्ती असणे ही अनादिकाळापासून पडलेली भ्रांती आहे. हे अभ्यासाने कळू लागते. अभ्यासाने सामान्य पाहण्याची सवय लागेपर्यंत आपली दृष्टी वरवरचीच असते. (३२३१)

आरंभी नेत्रांचे देखणें त्यागावें । तें संकल्पावरी आणावें ।
तेचि पुढे संकल्प पहावे । स्फूर्तीच्या योगें ॥ ३२ ॥
त्यासाठी प्रथम डोळे पदार्थ पाहत होते, ते डोळ्यांचे पाहणे टाकून संकल्पावर केंद्रित करावे. मग संकल्प स्फूर्तीच्या मुळे पाहतात हे लक्षात आणावे. (३२३२)

नंतर तया अति सूक्ष्मः स्फुरणा । चिद्‌रूप आत्माचि देखणा ।
तो लय उद्भव साक्षी अनुमाना । स्फुरणाच्या यावा ॥ ३३ ॥
त्यानंतर अतिशय सूक्ष्म अशा त्या स्फुरणास आत्माच पाहातो हे कळले पाहिजे. तो आत्माच त्या स्फुरणाची उत्पत्ती आणि लय यांची साक्षी आहे, हे अनुमानाने कळावे. (३२३३)

तथापि तो प्रस्तुत न कळे । तरी ती निवळत निवळत निवळे ।
परी अभ्यासावें चिद्‌रूप सगळं । स्फूर्तीच्या दृष्टीनें ॥ ३४ ॥
तथापि तो अनुभव एकदम होणार नाही, तरी तो हळूहळू अभ्यासाने कळत जातो. तेव्हा स्फूर्तीच्या दृष्टीने सगळे चिद्रूप पाहण्याचा अभ्यास झाला पाहिजे. (३२३४)

स्फूर्ति उठतांचि चिद्गगन । व्यापोनि पसरावी जेवढे सघन ।
पसरतांचि जातसे वितळून । मागुतीं दुजी उठे ॥ ३५ ॥
स्फूर्ती उठताच ती आकाशाला व्यापून पसरावी. जेवढे आकाश आहे तेवढी स्फूर्ती विस्तीर्ण करावी. ती अशी पसरल्याबरोबर लगेच वितळून जाते. त्यानंतर पुन्हा दुसरी स्फूर्ती उठते. (३२३५)

तेही चिद्‌रूपाकार व्हावी । चिद्गगन व्यापून विरावी ।
ऐसी जे जे वृत्ति उठावी । ते ते फेंकावी चिद्गगनीं ॥ ३६ ॥
तीसुद्धा चिद्रूपाकार होते. ती चिद्गगन व्यापून विरून जाते. अशा त-हेने जी जी वृत्ती उठेल ती ती त्याने चिद्गगनात फेकावी. (३२३६)

तैशी वायूची झुळूक गगनीं । उठोनि गगन व्यापी जाऊनी ।
पसरतांचि जाय मावळूनी । आपुले आपण ॥ ३७ ॥
ज्याप्रमाणे वाऱ्याची झुळूक आकाशात उत्पन्न होते. उत्पन्न झाल्यानंतर ती आकाश व्यापून टाकते. ती आकाशात पसरताच आपली आपण मावळून जाते. (३२३७)

अथवा पाणियावरी लहर । उपाधीस्तव उठे चक्राकार ।
सर्व पाणी तें व्यापून सत्वर । वितळून जाय ॥ ३८ ॥
किंवा पाण्यावर उपाधीमुळे चक्राकार लाट निर्माण होते. ती सर्व पाणी व्यापून लगेच वितळून जाते. (३२३८)

याचि दृष्टांताचिये पडिपाडें । स्फूर्ति उठोनि चिद्‌रूप जेवढें ।
तदाकार होऊन मोडे । वितुळतां स्वभावें ॥ ३९ ॥
या दृष्टान्ताप्रमाणे स्फूर्ती उत्पन्न होऊन जेवढे चिद्रूप तिला व्यापता येईल तेवढे व्यापते. ती तदाकार होऊन लगेच मोडून जाते आणि तिच्या स्वभावाप्रमाणे लगेच वितळून जाते. (३२३९)

येथें चिद्‌रूप गगनापरी । बोलतां कोणी शंका करी ।
की गगन जैसें पोकळ नेत्रीं । भासे तैसेंचि चिद्‌रूप ॥ ४० ॥
या ठिकाणी चिद्रूप हे आकाशासारखे आहे, असे म्हणताच कोणी शंका करील की, आकाश ज्याप्रमाणे पोकळ त्याचा डोळ्यांना फक्त भास होतो, त्याप्रमाणेच ब्रह्मही पोकळच आहे काय? (३२४०)

येविशी पुढे असे बोलणें । गगन चिद्‌रूप भेदें दाखवणे ।
आणि ज्ञान तेंचि सदानंदघनें । अनुभवाविण अनुभाव्य ॥ ४१ ॥
याविषयी पुढे सांगितले जाणारच आहे. पुढे आकाश आणि चिद्रूप यांच्यातील भेद स्पष्ट केला जाणार आहे. आणि सदानंद घन चिद्रूप ब्रह्माचा अनुभवरूप त्रिपुटीखेरीज अनुभव येणे हेच ज्ञान होय, हेही स्पष्ट केले जाणार आहे. (३२४१)

हे अनुक्रमें निर्विकल्प व्याजें । निरोपितां साधका समजे ।
प्रस्तुत येथे वोळखिजे । अभ्यासावया चिद्गगन ॥ ४२ ॥
पुढे येणाऱ्या निर्विकल्पाच्या निरूपणाच्या निमित्ताने हे सांगितले जाणार आहे. साधकाला तेव्हा ते कळेलच. प्रस्तुत प्रसंगी चिद्गगनाचा अभ्यास होण्यापुरती त्याची ओळख सांगितली आहे. (३२४२)

वृत्ति उठतांचि येथून उठे । आणि जेथवरी जाऊन फाटे ।
तेथवरी चिद्‌रूप घन दाटें । एकतान पहावें ॥ ४३ ॥
वृत्ती उठताच तेथून ती पुढे पसरते. ती जेथपर्यंत पसरून फाटून विरते तेथपर्यंत घनदाट असे चिद्रूप एकतानपणे पसरलेले पहावे. (३२४३)

परी वृत्ति उठता विकल्पाकार । होऊंच न द्यावी अणुमात्र ।
बुद्धिमनाचा उद्गार । होऊ न द्यावा ॥ ४४ ॥
मात्र वृत्ती उठताच तिच्यात विकल्प निर्माण होऊन त्यांच्याशी ती तदाकार होऊ नये. बुद्धी आणि मन यांचा उद्भवच होऊ देऊ नये. (३२४४)

तथापि पूर्वाध्यासें उठे । तरी चिद्गगन पहावें नेटे ।
बुद्धि निश्चया येतां गोमटें । कीं हें चिद्गगन ॥ ४५ ॥
जरी पूर्वीच्या सवयीने त्यांची उत्पत्ती झाली तरी प्रयत्नपूर्वक चिद्गगनच पहात राहावे. त्यामुळे बुद्धीची खात्री पटेल की हेच ते चिद्गगन होय. (३२४५)

ऐसा निश्चय जरी करितां । विकल्प मोडे विषयाकारता ।
निश्चय होऊन उरे ज्ञातता । सामान्यता वृत्ति पसरे ॥ ४६ ॥
असा बुद्धीचा निश्चय झाला की विकल्प मोडून जाईल. वृत्ती विषयाकार होणार नाही आणि त्या निश्चयाने ज्ञातता सामान्य वृत्तीच पसरेल. (३२४६)

तेही पसरितां जाय वितळूनी । पुढे दुजी वृत्ति उठे मागूनी ।
तेही विकल्पाकार न होतां गगनी । अभ्यासें योजावी ॥ ४७ ॥
तीदेखील पसरत असताना वितळून जाते. पुन्हा नंतर दुसरी वृत्ती उठते. तीदेखील विकल्पाच्या आकाराची होऊ न देता अभ्यासाने तिची चिदाकाशात योजना करावी. (३२४७)

ऐसा अभ्यास चिरकाळ होतां । विकल्पाचिये होय घाता ।
नुसधीच उरे सामान्यता । निर्विकल्प स्फूर्ति ॥ ४८ ॥
असा अभ्यास दीर्घकाळ झाल्यानंतर विकल्पांचा घात होऊन केवळ सामान्यवृत्ती किंवा निर्विकल्प स्फूर्ती उरते. (३२४८)

ऐसें जाहलिया अंतःकरणासी । सुख जें होय एकरसीं ।
तें बोलतां नयेचि वाचेसी । वृत्तीचे वृत्ती जाणे ॥ ४९ ॥
असे झाल्यानंतर अंतःकरणाला जे निर्भेळ सुख होते, ते वाचेने सांगता येणार नाही . ते वृत्तीचे वृत्तीलाच ठाऊक! (३२४९)

तस्मात् ब्रह्मात्मानुभवाची । आकांक्षा जया साधकाची ।
तेणें ऐशिया अभ्यासाची । दृढता करावी ॥ ५० ॥
म्हणून ज्या साधकाला ब्रह्मात्मानुभवाची इच्छा असेल त्याने या प्रकारचा अभ्यास दृढ करावा. (३२५०)

जया अभ्यासे विकल्प मोडे । आणि स्वस्वरूपी वृत्ति पवाडे ।
तरी हे अगत्य साधके कोडें । अभ्यासावें ये रीतीं ॥ ५१ ॥
त्या अभ्यासाने विकल्प मोडतात आणि वृत्ती स्वरूपाला मिळते. परंतु त्यासाठी साधकाने वर सांगितलेल्या पद्धतीने मोठ्या उत्साहाने हा अभ्यास अवश्य करावा. (३२५१)

विकल्प मोडून जाय ह्मणतां । की त्वरितचि मोडेल भावील चित्ता ।
तरी ऐसे नव्हे हळुहळु तत्त्वतां । क्षीणत्वा पावे ॥ ५२ ॥
विकल्प मोडून जाईल असे म्हणताच तो लागलीच मोडतो अशी कल्पना मनात करशील, तर ते तसे होत नाही. विकल्प हळूहळू क्षीण होत जातात. (३२५२)

विकल्प हळुहळु क्षीण होय । सामान्यही तैसेंचि वाढत जाय ।
त्वरित नव्हे ह्मणून सोडूं नये । अभ्यासासी ॥ ५३ ॥
विकल्प हळूहळू क्षीण होत जातात. तसतशी सामान्य वृत्तीही वाढत जाते. हे ताबडतोब होत नाही म्हणून अभ्यास लागलीच सोडून देऊ नये. (३२५३)

श्लोकांश : एक द्वित्रिक्षणेषु विकल्पस्य निरोधनम् । क्रमेण यत्नात् अभ्यस्यताम् । ॥ १२ ॥
अर्थ : एक क्षण, दोन क्षण, तीन क्षण अशा क्रमाने वाढवत वाढवत विकल्पांच्या निरोधनाचा अभ्यास क्रमाक्रमाने प्रयत्नपूर्वक करावा. ॥१२॥

एक दोन तीन क्षणीं । अभ्यास वाढवावा अनुदिनीं ।
विकल्प क्षीण कीजे निरोधूनी । यत्ने साध्य क्रमें होय ॥ ५४ ॥
एक, दोन, तीन अशा क्षणांनी अभ्यास दररोज वाढवत जावा. विकल्पाने निरोधन करत करत तो क्षीण करावा. तो प्रयत्नाने क्रमाने साध्य होईल. (३२५४)

आतां बोलिल्या प्रकारें । सामान्य वृत्ति चिद्गगनाकारे ।
क्षण एक एकाग्र स्थिरे । तितुका मोडे विकल्प ॥ ५५ ॥
आता सांगितल्या प्रकाराने सामान्य वृत्ती चिद्गनाकार होऊन एक क्षणभर एकाग्र होऊन स्थिरावली तर तेवढाच वेळ विकल्प खंडित होतो. (३२५५)

ऐसा आजि अभ्यास जाहला जितुका । उदयीक सहज होय तितुका ।
त्याहीवरी क्षण एक निका । हळुहळु वाढवावा ॥ ५६ ॥
असा आज जेवढा अभ्यास होतो उद्या तेवढा अभ्यास सहजच होतो. मग त्याही पेक्षा एक क्षणभर अधिक वाढवावा, असे क्रमाने हळूहळू वाढवत जावे. (३२५६)

आजि दोन क्षण सामान्य जाहलें । तितुकेचि विकल्प जाती मोडले ।
तरी तिसरे दिनी पाहिजे साधिलें । तीन क्षणपर्यंत ॥ ५७ ॥
आज दोन क्षण सामान्याचा अनुभव घेतला, तेवढ्या वेळेपुरते तरी विकल्प मोडले गेले. मग तिसऱ्या दिवशी तीन क्षणापर्यंत ते नष्ट झाले पाहिजेत. (३२५७)

ऐसें प्रतिदिनी क्षण क्षण । सामान्य वाढवावें स्थिरपण ।
विकल्प करावा निरोधन । सहजी सहज ॥ ५८ ॥
अशाप्रकारे प्रत्येक दिवशी सामान्य क्षणाक्षणाने वाढवत जावे. त्यायोगे विकल्पाचे सहजासहजी निरोधन करावे. (३२५८)

अथवा एके दिनींच बैसतां । क्षणक्षणां वाढवावी सामान्यता ।
तैशीच विकल्पा यावी क्षीणता । हळुहळू अभ्यासें ॥ ५९ ॥
अथवा एकाच दिवशी अभ्यासाला बसल्यावर क्षणाक्षणाला सामान्यता वाढवत न्यावी आणि त्याबरोबरच त्या अभ्यासाने विकल्पासही हळूहळू क्षीणता यावी. (३२५९)

प्रथम वृत्ति चिद्गगनाकार । जाहली असे निमिष्यमात्र ।
तितुकाचि मोडे विकल्पविकार । पुढें उठे मागुतीं ॥ ६० ॥
प्रथम वृत्ती क्षणभर चिद्गगनाकार झाली, तेवढ्यानेच विकल्पाचा विकार त्या वेळेपुरता मोडतो. पुन्हा नंतर तो उठतो. (३२६०)

तेचि पुन्हां मोडून विकल्प । वृत्ति होय चिद्गगनरूप ।
मागुतीं उठतांचि साक्षेप । गगनाकार करावी ॥ ६१ ॥
ते विकल्प पुन्हा मोडून वृत्ती चिद्गगनाकार करावी. पुन्हा उठल्यावर पुन्हा प्रयत्नपूर्वक तशीच चिद्गगनाकार करावी (३२६१)

परी स्थिरता पहिली जाहली । तीहून दुजी पाहिजे वाढविली ।
एक क्षण वृत्ति स्थिरावली । दुजी दोन क्षण ॥ ६२ ॥
पण एक गोष्ट पाळली पाहिजे ती म्हणजे प्रथम जी स्थिरता झाली होती तिच्यापेक्षा दुसऱ्या वेळी ती दुप्पट झाली पाहिजे. एक क्षण वृत्ती स्थिर झाली. दुसल्या क्षणी ती दोन क्षण स्थिर झाली पाहिजे. (३२६२)

दोन क्षण सामान्य स्थिरावतां । मध्ये विकल्प उठोनि जातां ।
पुढे तीन क्षण तदाकारता । वाढवावी सहज ॥ ६३ ॥
दोन क्षण सामान्य स्थिर केले. पुढे विकल्प उठले आणि मावळले. त्यानंतर स्थिरतेचा आकार तीन क्षणापर्यंत सहजासहजी वाढवावा. (३२६३)

आणीक विकल्प उठोनि जाय । मग चार क्षण करावी चिन्मय ।
ऐसा कमेंकरोनी हळुहळु उपाय । साधावा अभ्यास ॥ ६४ ॥
आणखी विकल्प उठून मावळले. तेव्हा त्यानंतर ती स्थिरता चार क्षण करावी. अशा क्रमाने प्रयत्नपूर्वक ही स्थिरता म्हणजेच चिद्रूपता वाढवण्याचा अभ्यास साध्य करावा. (३२६४)

ऐशी क्षण क्षण वृद्धि करावी । सामान्य तदाकारता साधावी ।
विकल्पता क्षीण पावे आघवी । आणि बळात्कार नव्हे ॥ ६५ ॥
अशा प्रकारे क्षणाक्षणाने तिच्यात वाढ करावी आणि त्या त्या वेळेप्रमाणे सामान्यता - चिद्गगनाकारता - चिद्रपता साध्य करावी. त्यामुळे सर्व विकल्पांचा सहजासहजी नाश होत जातो. त्यासाठी बळेच अट्टाहासही करावा लागत नाही. (३२६५)

सहज मनासी गोडी लागे । तदाकार वृत्ति होय अंगें ।
विकल्प सांडोनि राहे उगें । उठे जरी विकल्प ॥ ६६ ॥
मनाला सहज त्या अभ्यासाची गोडी लागते. आणि वृत्तीही तदाकार होत जाते आणि विकल्प जरी उठत राहिले तरी मनाची ती वृत्ती शांत सुखाकार होते. (३२६६)

कल्पनेचे एक निकें । देखिल्या या सुखासी सोके ।
विकार सांडोनि आवश्यकें । तदाकारता स्वीकारी ॥ ६७ ॥
कल्पनेच्या बाबतीत एक चांगले आहे. तिला अनुभवलेल्या सुखाची चटक लागते. सर्व विकल्पविकार टाकन ती तदाकारता (सामान्य चिद्रूपता) स्वीकारते. (३२६७)

ऐशि तदाकारता वाढली । विकल्पाची वाढी मोडली ।
ऐशी घटिका दोन घटिका साधिली । जरी हे स्थिरता ॥ ६८ ॥
अशी तदाकारता वाढत गेल्यावर विकल्पांची वाढ खंटते. अशी स्थिरता घटका दोन घटका साधली तरी विकल्पांच्या वाढीला त्यामुळे आळा बसतो. (३२६८)

तरी अभ्यासाचें सफलत्व जाहलें । ब्रह्मानुभवासी पावले ।
परी हे सर्वदा अभ्यासिलें । पाहिजे यत्ने ॥ ६९ ॥
हीच अभ्यासाची फलद्रूपता होय. त्या वेळेपुरता तरी हा ब्रह्मानुभव अथवा ब्रह्मसाक्षात्कारच होतो. पण हा अभ्यास प्रयत्नपूर्वक केला पाहिजे. (३२६९)

एक वेळे मुहूर्त एक बैसावें । पुन्हां व्यापारीच सदां असावें ।
ऐशियासी योगसिद्धि नव्हे । बैसतां ही एकांती ॥ ७० ॥
एखाद्या वेळी एक क्षणभर अभ्यासाला बसावे, आणि बाकीचा सर्व वेळ कामधंद्यात गुंतून पडावे, असे करत राहिल्यास योगसिद्धी एकान्तात बसूनही होणार नाही. (३२७०)

जरी सर्व काळ राहे स्मरण । व्यापारतां स्नान पान भोजन ।
सदा समाधीचें अनुसंधान । साधका असावें ॥ ७१ ॥
पण सर्वकाळ या ब्रह्मानुभवाचे स्मरण ठेवले आणि नित्याचे खाणे-पिणे, जेवणे इ. व्यापार करत राहिले तर चालेल. साधकाला हे समाधिसुखाचे अनुसंधान सर्वकाळ ठेवणे आवश्यक आहे. (३२७१)

विषय पाहतां संधि पहावी । ज्ञातता अज्ञातता वोळखावी ।
मननीं तैशीच आठवावी । स्थिति समाधीची ॥ ७२ ॥
विषयाचे दर्शन झाले की विकल्पांचा संधी पहावा, ज्ञातता आणि अज्ञातता ओळखाव्यात, आणि पुढे मनन करताना या समाधीच्या स्थितीचे तसेच स्मरण ठेवावे. (३२७२)

चिद्गगनीं चिद्गगन व्हावें । अंतर्बाह्य चिद्‌रूप पहावें ।
अहोरात्र ऐसेंचि घ्यावें । व्यापारामाजीही ॥ ७३ ॥
चिद्गगनात आपणही चिद्गगन होऊन जावे, अंतर्बाह्य चिद्रूपतेचे अवलोकन करावे, आणि व्यापारांमध्येही रात्रंदिवस त्याचेच ध्यान करावे. (३२७३)

ऐशीया व्यापारींच्या ध्यासें । निवांत स्थळी योग साधे अपैसे ।
ना तरी विस्मरण जरी व्यापारी होतसे । तरी दांत खातां न साधे ॥ ७४ ॥
व्यापारातही असाच ध्यास ठेवल्याने निवांत जागी योग आपोआप साध्य होतो. नाही तर अभ्यासाला बसल्यानंतर कितीही दातओठ खाले तरी तो योग साधत नाही. (३२७४)

एकांती सुख जें अनुभविलें । त्या ध्यासें व्यापारी स्मरलें ।
तैसेंच व्यापारी ध्यासरूप ठसावलें । तें उमटलें समाधि काळीं ॥ ७५ ॥
एकान्तात ज्या समाधिसुखाचा अनुभव घेतला तर त्याच्या ध्यासाने व्यापारात (नित्याच्या व्यवहारात) त्याचे स्मरण राहते. त्याप्रमाणे व्यापारात ध्यासरूपाने ते ठसले तर ते समाधीच्या काळात प्रकट होते. (३२७५)

एवं व्यापारींचे अनुसंधानें । समाधीचे सुख ते बाणे ।
समाधिसुखाचेनि गुणें । व्यापारी सुख ॥ ७६ ॥
अशा प्रकारे नित्याच्या व्यवहारात अनुसंधान ठेवल्याने ते समाधीचे सुख दृढ़ होते आणि समाधि सुखामुळे व्यापारातही ते सुख प्राप्त होते. (३२७६)

तस्मात् साधकें सर्व काळ । अनुसंधान राखावें निर्मळ ।
नातरी समाधिकाळी बरळ । विघ्ने होत असती ॥ ७७ ॥
म्हणून साधकाने निर्मळ अंतःकरणाने सर्व काळ त्या समाधिसुखाचे अनुसंधान राखावे. तसे न केल्यास समाधिकाळी भलती सलती (बरळ) विघ्ने येत राहतात. (३२७७)

जरी व्यापारी निर्विषय मन । तरी समाधिसुख पावे निर्विघ्न ।
तस्मात् साधकें कामादि त्यागून । अनुसंधानी असावें ॥ ७८ ॥
जर व्यापारात मन निर्विषय असेल तर समाधिकात समाधिसुख निर्विघ्नपणे मिळते. म्हणून साधकाने काम इ. चा त्याग करून अनुसंधानात मग्न असावे. (३२७८)

कृषिवाणिज्य राज्यकारण । आणि विषयीजन संभाषण ।
अथवा अन्य शास्त्राचे वेवादन । इतुकेंही त्यागावें ॥ ७९ ॥
शेतीचे व्यवहार, व्यापारधंदा, राजकारण आणि विषयासक्त लोकांशी संभाषण, अथवा अन्य शास्त्रातील वादविवाद या सगळ्यांचा त्याग करावा. (३२७९)

कामादिक जरी गेले । तरी मनोराज्यही पाहिजे त्यागिलें ।
वाउग्या विषयवल्गनेतें अव्हेरिलें । पाहिजे साधकें ॥ ८० ॥
कामादी जरी नाहीसे झाले तरी मनोराज्ये चालू असतातच त्यांचाही त्याग केला पाहिजे. विषयांच्या वायफळ चर्चाही साधकाने टाळायला हव्यात.(३२८०)

कामादिक मनोराज्य असतां । अथवा कृष्यादि व्यापार करितां ।
तो ध्यास जो बैसे चित्ता । तेणें समाधिस विघ्नं होती ॥ ८१ ॥
कामादी मनोराज्ये करत बसले तर शेतीचे व्यवहार इ. गोष्टी करतानाही त्यांचा ध्यास चित्तात बसतो आणि त्यामुळे समाधीत विघ्ने निर्माण होतात. (३२८१)

काव्य तर्क न्यायादिक । हेही पढतां आवश्यक ।
निश्चय संपादिला जो एक । त्याची उपेक्षा होय ॥ ८२ ॥
काव्य, तर्कशास्त्र, न्यायशास्त्र यांचाही अभ्यास करत राहिल्यास आपण जे ध्येय (निश्चय) ठरविले आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होते. (३२८२)

तस्मात् हे विघ्नकर समाधीसी । त्यागिलेचि त्यागावे आवश्येसी ।
जितुके निर्वाहक देहासी । ते भोजनादि संपादावें ॥ ८३ ॥
त्यामुळे उपरोक्त गोष्टी समाधीसाठी विघ्नकारक आहेत. त्यांचा त्याग अवश्य करावाच करावा. देहाला जेवढे आवश्यक आहे तेवढेच भोजन इ. कार्य करावे. (३२८३)

भोजनादि जरी न केलें । तरी मृत्यु किंवा देह गलित जाहले ।
तरी साधन अभ्यास बुडालें । म्हणोनि भोजनादि कीजे ॥ ८४ ॥
भोजनादी व्यवहारही केले नाहीत तर मृत्यू येईल अथवा शरीर अगदी गळून जाईल. त्यामुळे साधना, अभ्यास या गोष्टी ठप्प होतील, म्हणून भोजन इ. गोष्टी कराव्यात. (३२८४)

तैसें काव्यकृष्यादि त्यागितां । मृत्यु नव्हे ना विगलितता ।
तस्मात् त्यागाव्याचि ह्या समस्ता । कृति विघ्नकर ॥ ८५ ॥
काव्य, शेतीचे व्यवहार इ. गोष्टींचा त्याग केला तर वरीलप्रमाणे मृत्यू किंवा देह क्षीण होणे इ. गोष्टी होत नाहीत. म्हणून समाधीला विघ्न करणाऱ्या या सर्व गोष्टींचा अवश्य त्याग करावा. (३२८५)

म्हणसी जनकादिकी कैसें । सर्व राज्यादि संपादुन जैसें ।
समाधानही स्वतःसिद्ध असे । तरी तया दृढ बोध ॥ ८६ ॥
जर तू म्हणशील की, जनकादिकांनी राज्यादी व्यवहार पार पाडले आणि तरीही त्यांचे समाधान स्वतः सिद्ध होते. यावर उत्तर असे की, त्यांचे ज्ञान पक्के होते. त्यांना दृढ बोध प्राप्त झाला होता. (३२८६)

ऐसा दृढ बोध तुज अपरोक्ष । बाणेल संशयरहित प्रत्यक्ष ।
देहादिकांचे कर्म बरें कीं रुक्ष । भिन्नत्वें जेव्हां पाहसी ॥ ८७ ॥
असा दृढ, अपरोक्ष, संशयरहित बोध तुझ्या अंगी बाणेल आणि जेव्हा देहादिकांच्या बऱ्यावाईट व्यापारांकडे तू भिन्नत्वाने पाहू लागशील. (३२८७)

तेव्हां तूंही जनकापरी । जें जें पाहिजे तें तें करी ।
कृष्यादि अथवा काव्य तर्के सारीं । पढे यथासुखें ॥ ८८ ॥
तेव्हा जनकाप्रमाणे तूही तुला पाहिजे ते कर. शेतीचे व्यवहार कर, काव्य, तर्कशास्त्र इ.चे अध्ययन कर. या साऱ्या गोष्टी तुला पाहिजे तशा कर. (३२८८)

तुज अद्यापि ब्रह्मानुभवासी । की ठाव नाहीं असंगज्ञानासी ।
वाउगी समानता करूं जासी । तरी पावसी अनर्थ ॥ ८९ ॥
तुला अद्याप ब्रह्मानुभवाचा पत्ता नाही, की निरासक्तीचे ज्ञान नाही. तू जनकादिकांशी उगीचच खोटी बरोबरी करू पाहशील तर संकटात पडशील. (३२८९)

तस्मात् भोजनादि संपादावें । कृष्यादि तर्क पठन त्यागावें ।
कामादि विषयचिंतन न करावें । सहसा साधकें ॥ ९० ॥
म्हणून साधकाने भोजन वगैरे आवश्यक गोष्टी कराव्यात, शेतीचे व्यवहार, तर्क इ. शास्त्रांचे अध्ययन इ. गोष्टींचा त्याग करावा. कामादी विषयांचे चिंतन करू नये. (३२९०)

विवेक वैराग्य जागृत सदा । आणि असावी शमदम संपदा ।
कधी पावेन सुखैकपदा । हे असावी तळमळ ॥ ९१ ॥
विवेक आणि वैराग्य नेहमी जागृत ठेवावे; आणि मनाची शांती, इंद्रियनिग्रह रूपी संपदा प्राप्त करावी; मला ते एकमेव सुख (ब्रह्मानंद) केव्हा प्राप्त होईल अशी सदोदित तळमळ ह्याच्या अंतःकरणात असावी. (३२९१)

असो रविदत्ता तुज सांगणे नलगे । तूं उदास सर्वी अससी अंगें ।
परी अन्यासाठी सांगावें लागे । जे जे येर मुमुक्षु ॥ ९२ ॥
हे असू दे, रविदत्ता, तुला अधिक सांगण्याची गरज नाही. तू सर्व विषयांच्या बाबतीत उदासीन आहेस. पण इतर मुमुक्षू जे आहेत त्यांच्यासाठी सांगण्याची आवश्यकता आहे. (३२९२)

आतां ऐके सावधान । समाधीचे निरूपण ।
जें पूर्वी जाहलें अवलोकन । सामान्य गगनापरी ॥ ९३ ॥
आता सावधान होऊन ऐक. आता आपण समाधीच्या निरूपणाकडे वळू. आतापर्यंत आपण सामान्याचे आकाशाप्रमाणे अवलोकन कसे करावे, हे पाहिले. (३२९३)

तेंचि अनुसंधान दृढ राखितां । बलात्कारें विकल्प निरोधितां ।
विघ्नं चार होताती तत्त्वतां । ते आधी अवधारी ॥ ९४ ॥
तेच अनुसंधान दृढ करत असताना, बळजबरीने विकल्पांचे निरोधन करण्याचा प्रयत्नात असताना चार विघ्ने निर्माण होतात, ती आधी लक्षात घे. (३२९४)

विक्षेप लय तिसरा कषाय । चौथा रसास्वादु होय ।
हेचि समाधिसुखासी अपाय । करिती बळें ॥ ९५ ॥
विक्षेप, लय, कषाय आणि रसास्वाद ही त्यांची नावे आहेत. ही चार विघ्ने समाधिसुखात हानी निर्माण करतात. (३२९५)

या चारींची रूपें कैशीं । वेगळालीं बोलिजे परियेसी ।
आणि निवारणेही होती जैशीं । तेंहि निरोपूं ॥ ९६ ॥
या चारी विघ्नांची त्याचबरोबर त्यांचे निवारणही कसे करता येते तेही सांगतो. (३२९६)

विक्षेप हणिजे विकल्प । मनोराज्याचा संकल्प ।
हा उसंतचि नेदी अल्प । विषयध्यासें उठे ॥ ९७ ॥
विक्षेप म्हणजे मनोराज्ये करणारा संकल्प अथवा विकल्प. विषयाच्या ध्यासामुळे तो थोडीसुद्धा उसंत न देता उठत असतो. (३२९७)

अनेक विषय आठवित । ते प्रत्यक्ष दिसती अंतरांत ।
तेणें वृत्ति कैशी होय निवांत । चिद्‌रूपामाजीं ॥ ९८ ॥
अनेक विषयांचे स्मरण करत असताना ते विषय अंतरात (अंतःकरणात) प्रत्यक्ष दिसत असतात. त्यांच्यामुळे वृत्ती चिद्रूपामध्ये निवांत कशी राहू शकेल? (३२९८)

तथापि बलात्कारें चिद्गगनीं । वृत्ति लावावी अनुसंधानीं ।
तें लावावी जो त्या आधीं उठावणी । संकल्पाची होय ॥ ९९ ॥
तथापि अनुसंधान ठेवून वृत्ती बळेच चिद्गगनात लावावी. आपण ती चिद्गगनात लावतो न लावतो तोच त्याआधीच संकल्पाची उभवणी झालेली असते. (३२९९)

तेव्हां कैचा सांपडे अवसर । विक्षेपची उठती वारंवार ।
कैची वृत्ति होय तदाकार । क्षणभरी तरी ॥ ३३०० ॥
तेव्हा वृत्तीला चिद्गगनात पाठवायला अवसर कसा मिळेल? विक्षेप तर सारखे उठतच असतात. अशा परिस्थितीत वत्ती एक क्षणभर तरी चिद्गगनाकार होऊ शकेल का? (३३००)

विक्षेपरूप विकल्प ऐसा । उठतां पूर्वाध्यास सहवासा ।
समाधिसुखाचा अनुभव सहसा । नये बैसतां चिरकाळ ॥ १ ॥
पूर्वाध्यासाच्या सहवासाने असा विक्षेपरूप विकल्प उठत असता अगदी दीर्घकाळ अभ्यासाला आपण बसलो तरी समाधिसुखाचा अनुभव सहसा येणारच नाही. (३३०१)

हा विक्षेप मोडावयासी । सर्वदा अनुसंधान असावें मानसीं ।
कृष्यादि व्यापार आणि काव्य तर्कासी । सांडिलें पाहिजे ॥ २ ॥
हा विक्षेप मोडण्यासाठी मनात सतत अनुसंधान ठेवावे आणि शेतीचे व्यवहार, काव्य, तर्कशास्त्र इ. ग्रंथांचे वाचन यांचा त्याग केला पाहिजे. (३३०२)

पूर्वी निरोपिल्या प्रमाण । अन्य किंचित् न करावें भाषण ।
त्याग बुद्धि अंतरापासून । असावी सर्वांची ॥ ३ ॥
यापूर्वी सांगितल्याप्रमाणे इतर कोणत्याही प्रकारचे भाषण करू नये. मनापासून सर्व विषयांबद्दल त्यागबुद्धी असावी. (३३०३)

एक आत्मस्वरूपाचें अनुसंधान । तेंचि मनासीही मनन ।
अथवा अनुभवा आलें जें ध्येय पूर्ण । तेथें एकतान ध्यास ॥ ४ ॥
एका आत्मस्वरूपाचेच अनुसंधान ठेवावे. मनानेही त्याचेच मनन करावे. किंवा जे ध्येय (ध्यानाचा विषय) अनुभवास आले असेल त्याचाच एकतान पूर्णपणे ध्यास धरावा. (३३०४)

इतुकें सर्वदा ध्यान रहे । तरीच साधका स्वानुभव लाहे ।
आणि अन्याच्या त्यागें विक्षेप मोडताहे । हळुहळु अभ्यासें ॥ ५ ॥
इतके ध्यान जर नेहमी राहिले तरच साधकाला स्वानुभव प्राप्त होऊ शकतो. आणि अन्य विषयांच्या त्यागाने विक्षेप अभ्यासाच्या साहाय्याने हळूहळू मोडतो. (३३०५)

तस्मात् साधकें सर्व व्यवहाराचा । सर्वदा त्याग करावा साचा ।
आणि सदा ध्यास निरालंबाचा । योषाजारापरी असावा ॥ ६ ॥
म्हणून साधकाने सर्व व्यवहाराचा सर्वकाळ त्याग करणेच योग्य. आणि नेहमी निरालंब ब्रह्मतत्त्वाचा स्त्री आणि तिचा प्रियकर यांच्या परस्परांविषयीच्या ध्यासाप्रमाणे ध्यास असावा. (३३०६)

हाचि उपाय विक्षेप जावया । दुजा नाहींच गा शिष्यराया ।
तस्मात् वैराग्य अंतरापासूनियां । आणि आवडी स्वरूपी ॥ ७ ॥
हे शिष्यराया, विक्षेप जाण्याचा हाच एक उपाय आहे. इतर कुठलाही दुसरा उपाय नाही. म्हणून विषयांचे मनापासून वैराग्य असावे आणि स्वरूपाची आवड असावी. (३३०७)

एवं खरें वैराग्य विषयादिकांचें । आणि अनुसंधान स्वस्वरूपाचें ।
हे जागृतींत दृढतर व्हावें साचें । तरीच समाधि घेतां साधे ॥ ८ ॥
अशा प्रकारे विषयादिकांचे खरे वैराग्य असावे. स्वस्वरूपाचे अनुसंधान असावे. या गोष्टी जागृतीत अगदी दृढ असाव्यात तरच समाधी घेणे होते. (३३०८)

तेथेही बैसलियावरी । विक्षेप उठती विषयानुकारी ।
तयासि विवेक वैराग्ये सारी । जरी साधक स्वयें ॥ ९ ॥
तेथेही समाधीला बसल्यावर विषयांच्या पाठोपाठ विक्षेप उठत असतात. त्या विक्षेपांना स्वतः साधकाने विवेक आणि वैराग्याच्या साहाय्याने दूर सारले; (३३०९)

एकदां सारितां न जाती । वारंवार विकल्प उठती ।
ते सारावेचि विवेकविरक्ती । कडून तेच अवसरी ॥ १० ॥
तरी एकदा दूर सारल्यानंतरही विकल्प जात नाहीत. विकल्प वारंवार उठत राहतात. पण तरीही विवेक आणि वैराग्य यांच्या बळावर साधकाने त्याचवेळी त्यांचा बीमोड करावा. (३३१०)

येथींचा विवेक तो ऐसा । हा जो उठे विकल्पठसा ।
तो कासयावरी उमटे सहसा । हे पाहिले पाहिजे ॥ ११ ॥
या ठिकाणी विवेक करायचा तो असा. हा विकल्पठसा उमटला आहे तो कशावर उमटला आहे हे पाहिले पाहिजे. (३३११)

पाणियावरी जेवीं तरंग । की आकाशामध्ये मेघ ।
तैसे चिद्गगनीं विषय अमोघ । विकल्पांसह भासती ॥ १२ ॥
पाण्यावर ज्याप्रमाणे तरंग उठतात, किंवा आकाशामध्ये मेघ जमतात, त्याप्रमाणे चिद्गगनात अनेक विषय विकल्पांसह भासतात. (३३१२)

पाणी गगन अवलोकितां । तरंग मेघाची मिथ्या वार्ता ।
तैसें स्वानुभवें चिद्गगनीं निरखितां । मिथ्यता विषयासी ॥ १३ ॥
तरंग सोडून पाण्याकडे पाहिल्यास तरंग मिथ्या भासतात. मेघ सोडून आकाशाकडे पाहिल्यास मेघ मिथ्या वाटतात. त्याप्रमाणे स्वानुभवाने चिद्गगनाचे निरीक्षण केले असता विषय मिथ्या वाटतात. (३३१३)

विषय सांडून चिद्गगन पहावें । अर्थात विषयाचा त्याग संभवे ।
स्वरूपानुसंधान विवेक या नांवें । हेचि दोनी वाढती ॥ १४ ॥
तेव्हा विषय सोडून चिद्गगनाचे अवलोकन करावे. त्यामुळे विषयांचा आपोआपच त्याग होतो. हाच स्वरूपानुसंधान विवेक होय. या विवेकाने विवेक आणि वैराग्य हे दोन्हीही वाढतात. (३३१४)

ऐसें विवेक वैराग्य वाढतां । अवश्य विक्षेपा येतसे क्षीणता ।
क्षणक्षणां संधीसी विवर्धता । बोलिल्या न्यायें होय ॥ १५ ॥
असे हे विवेक आणि वैराग्य वाढल्यानंतर विक्षेपांना आपोआप क्षीणता येते आणि क्षणाक्षणाने सांगितल्याप्रकारे संधी वाढवता येतो. (३३१५)

निःशेष विकल्प जरी मोडे । तरी सामान्यसुख अपार जोडे ।
तें सुख बोलतां न ये कोडें । वृत्ति जाणे साधकाची ॥ १६ ॥
विकल्प जर पूर्णपणे नष्ट झाले तर अपार सामान्य सुखाची प्राप्ती होते. ते सुख शब्दांनी सांगता येत नाही. केवळ त्या साधकाची वृत्तीच ते जाणू शकते. (३३१६)

एवं विवेक वैराग्य कडूनी । विक्षेप विकल्पाची हानि ।
होत असे साधकालागूनी । तस्मात् या रीती साधावें ॥ १७ ॥
अशा प्रकारे विवेक आणि वैराग्य यांच्या साहाय्याने विक्षेप विकल्पांचा नाश होतो. म्हणून साधकाने याच मागनि ते अपार सामान्य सुख प्राप्त करून घ्यावे. (३३१७)

ऐसें विक्षेपरूप एक विघ्न । साधकाचें गेलें निरसून ।
परी पुढे लय ठाके येऊन । हेही विघ्न दुर्धर ॥ १८ ॥
अशा प्रकारे साधकाचे विक्षेप नावाचे विघ्न टळले. परंतु इथे विघ्ने संपत नाहीत. कारण ते विघ्न नष्ट होताच दुसरे लय नावाचे विघ्न त्याच्यासमोर येऊन उभे ठाकते. तेही कठीण (दर्धर) आहे. (३३१८)

तया लयाचे दोन प्रकार । येक झोंप दुजा शून्याकार ।
येणे स्वानुभवा पडे अंधकार । तरी तो काल व्यर्थ गेला ॥ १९ ॥
त्या लयाचे दोन प्रकार आहेत. एक झोप येणे आणि दुसरे म्हणजे शून्याकारता. त्यायोगाने स्वानुभवाच्या नावाने काळोख पडतो. याचाच अर्थ तेवढा काळ फुकट गेला. (३३१९)

विकल्पासह विक्षेप मोडतां । झोंपचि येतसे आवश्यकता ।
अथवा वृत्तीसी शून्याकरता । हाही लयचि बोलिजे ॥ २० ॥
विकल्पासह विक्षेप मोडल्याबरोबर निश्चितपणे झोपच येते. किंवा वृत्तीस शून्याकारता येते. त्यालाही लयच म्हणतात. (३३२०)

लय किंवा शून्याकार होणे । तरी स्वानुभवा मुकावें येणें ।
येथेही साधके उपाय करणे । तरी मोडेल लय ॥ २१ ॥
लय होवो, किंवा शून्याकारता येवो, दोन्हीमुळे स्वानुभवाला मुकावे लागते. तेव्हा साधकाला येथेही काही उपाय करावा लागतो तेव्हाच लय या विघ्नाचे निराकरण होते. (३३२१)

चिद्गगनाची येकाकरता । असावी ध्येयमात्र गोचरता ।
हा विसरचि न पडावा तत्त्वतां । निमिष्यही एक ॥ २२ ॥
आपल्या दृष्टीसमोर चिद्गगनाची एकाकारता अगदी ध्येयासारखी असावी. तिचा एक क्षणभरही विसर पडता कामा नये. (३३२२)

स्मरण एकतान असावें । विस्मरणासीच विसरावें ।
सामान्यवृत्तीने उठोनी पसरावें । वितुळतां आपुले आपण ॥ २३ ॥
एकतान स्मरण असावे. विस्मरणाचाच विसर पडावा. सामान्य वृत्ती उठल्यावर ती चिद्गगनात पसरावी. ती पसरून वितळल्यावर आपले आपणच असतो. (त्या चिद्गगनाशी एकरूप होऊन जातो.) (३३२३)

स्वरूपाची गोडी अत्यंत । असतां स्मरणही राहे निवांत ।
परी ते आवडी कैशी देऊन दृष्टांत । स्पष्ट करूं अवधारी ॥ २४ ॥
स्वरूपाची जर अत्यंत गोडी निर्माण झाली तर चिद्रपाचे स्मरणही निवांतपणे चालू राहाते. ती गोडी कशी असते, हे दृष्टानताच्या साहाय्याने स्पष्ट करतो, ऐक. (३३२४)

उष्णकाळी सूर्य खडतरला । माध्यान्ही वोणवाही लागला ।
ऐशिया समयीं गज बुडला । महा डोहाच्या आशयीं ॥ २५ ॥
उन्हाळ्याचे दिवस होते. सूर्य फार प्रखर झाला होता. माध्यान्हाची (दुपारची) वेळ, तशात अरण्यात वणवा पेटला. अशा परिस्थितीत एक हत्ती एका मोठ्या डोहात शिरला. (३३२५)

तयासी सुख शीतलत्वाचें । जाहलें तें कदां त्यागिलें नवचे ।
जरी तोंड बाहेरी काढितां साचें । तापेल यास्तव न काढी ॥ २६ ॥
त्याला पाण्याच्या थंड स्पर्शामुळे खूप सुख झाले. ते सोडून बाहेर येण्याची त्याला इच्छा होईना. आपण पाण्याच्या वर तोंड काढले तर ते उन्हाने वणव्याने भाजेल या भीतीने तो तोंडच बाहेर काढीना. (३३२६)

तैसा हा त्रिविध तापें तापला । विक्षेपासी अति विटला ।
चिद्गगनी विश्रांति पावला । विक्षेपाकडे तो न येची ॥ २७ ॥
जसा हा हत्ती उन्हाळा, मध्यान्हीचा तळपता सूर्य आणि वणवा या तीन तापांनी पोळला होता, तसाच जीवही आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविध तापांनी पोळन निघतो. सर्व विक्षेपांना कंटाळून जातो. तेव्हा त्याला चिद्गगनात विश्रांती मिळते. तेथील सुखाला लालचावलेला तो त्रिविधतापांच्या भीतीने तो त्या परमानंदातून बाहेर निघायला तयार होत नाही. त्या विक्षेपांकडे परत यायचे नावही काढत नाही. (३३२७)

परी त्या स्वात्मत्वसुखाची । गोडी क्षणाक्षणां वाढती साची ।
वाहवा ह्मणे विश्रांति मीचि । पावलों असें ॥ २८ ॥
त्या स्वात्मसुखाची त्याला वाटत असलेली गोडी क्षणाक्षणाला वाढतच जाते. आणि तो कृतकृत्य होऊन मनाशी म्हणतो, "वाहवा! मला येथे किती छान वाटते आहे! मला येथे किती विश्रांतिसुख अनुभवायला मिळत आहे! (३३२८)

अनंत जन्मींचे दुःख गेलें । जया सुखें तें मज प्राप्त जाहलें ।
ऐसेंही जरी आठविलें । तरी हा विक्षेपची ॥ २९ ॥
माझे अनंत जन्मांचे दुःख नाहीसे झाले. ज्या सुखाने आपल्याला हे प्राप्त झाले त्या सुखाचे स्मरण सुद्धा करू नये. त्याचे स्मरण करणेसुद्धा विक्षेपच ठरते. वाटते. (३३२९)

ह्मणोनि ऐसेंही नाठवितां । उगेंचि असावें सुखाकारता ।
पुढे आपेआप उत्थान होतां । आठवेल विक्षेपें ॥ ३० ॥
म्हणून सुख या कल्पनेने स्मरणसुद्धा न करता उगीच सुखाकारतेने राहावे. पुढे आपोआप उत्थान झाल्यानंतर त्याला त्या सुखाची आठवण झाली तरी ती विक्षेपानेच झाल्यासारखी असेल. (३३३०)

ते आठवण भोजनादि व्यापारीं । विसरूंची नये क्षणभरी ।
ह्मणजे तया ध्यासें पुन्हां इडकरी । बैसतां तदाकार होय ॥ ३१ ॥
ती आठवण भोजनादी व्यापार करीत असताही क्षणभरदेखील विरू देऊ नये. म्हणजे पुन्हा समाधीसाठी बसल्यावर त्या आठवणीच्या ध्यासाने झटकन तदाकार होता येते. (३३३१)

विक्षेप नसतां सावधान । चिद्गगनीं होय लीन ।
चढती आवडी क्षणक्षण । तरीच हा लय मोडे ॥ ३२ ॥
विक्षेप नसतील तेव्हा सावधान राहून चिद्गगनामध्ये लीन व्हावे. जर त्याची गोडी क्षणाक्षणाला वाढणारी असेल तरच हे लय नावाचे विघ्न नाहीसे करता येते. (३३३२)

झोंप तों नयेची तत्त्वतां । आणि नव्हे शून्याकारता ।
सावधपणे एकाग्रता । याचि नांवें समाधि ॥ ३३ ॥
जिला तत्त्वार्थाने झोप म्हणता येणार नाही आणि जी शून्याकारही म्हणता येणार नाही. पण चित्त साधव असून एकाग्र असेल तर त्या अवस्थेलाच समाधि असे म्हणतात. (३३३३)

ऐस लयाचे विघ्न नासलें । समाधिसुख प्राप्त जाहलें ।
तरी आणीक तिजें विघ्न उदेलें । कषायाचें साधका ॥ ३४ ॥
अशा प्रकारे लयाचे विघ्न नष्ट झाले आणि समाधिसुखही प्राप्त झाले.तरी पुढे कषाय नावाचे तिसरे विघ्न साधकापुढे उभे असतेच. (३३३४)

कषाय ह्मणिजे सुखरूप असतां । सहजी भास चिद्गगना आंतोता ।
हिरवे पिवळे भासती भोवता । की अग्नि लागला वाटे ॥ ३५ ॥
कषाय म्हणजे आपण चिद्गगनातील सामान्य प्रकाशाचा सुखाने अनुभव घेत असताना चिद्गगनामध्ये हिरवे पिवळे रंग दिसायला लागतात किंवा आग लागल्यासारखे वाटते. (३३३५)

नाना विद्युल्लता चमकती । कीं नानावावें श्रवणीं पडती ।
हा कषाय विघ्नकर निश्चितीं । वोढी वृत्ति तिकडेची ॥ ३६ ॥
किंवा अनेक विजा चमकल्यासारख्या वाटतात, किंवा अनेक वाद्यांचे ध्वनी कानांवर पडतात. हा कषाय निश्चितपणे विघ्नकारक आहे. तो आपली वृत्ती तिकडेच ओढून नेतो. (३३३६)

एकाएकी हे अवलोकिता । तत्क्षणीं उठोनि धांवे तत्त्वतां ।
एकदां साधक उठोनी पळतां । मग पुन्हा पुन्हां तैसाची ॥ ३७ ॥
कधीकधी कषाय पाहिल्याबरोबर साधक उठून पळायला लागतो. एकदा साधक समाधी सोडून पळून गेला की, पुढेही पुन्हापुन्हा तसाच पळत सुटतो. (३३३७)

प्रतिदिनी तितुक्या सुखासी । पावतां एकाग्र तदाकारतेसी ।
भासतां नाद किंवा रंगासी । आरोळी मारोनी पळे ॥ ३८ ॥
मग दररोज चिद्गगनाच्या अभ्यासात सुख अनुभवत असताना नादांचा किंवा रंगाचा भास होताच आरोळी मारून पळू लागतो. (३३३८)

ऐशी हे संवे लागली जरी । तरी पुढे प्रवेशेना ब्रह्माकारी ।
तेथून प्रतिदिनी फिरे माघारीं । तस्मात् हे विघ्न दुर्धर ॥ ३९ ॥
आणि अशी एकदा सवय लागली की पुढे त्या ब्रह्मतादात्म्यात प्रवेश करायला तो तयार होत नाही. दररोज तिथपर्यंत पोहोचला की माघारी फिरतो. म्हणून हे कषाय नावाचे विघ्न फार दुर्धर आहे. (३३३९)

अथवा उठोनी जरी न पळाला । ठायींचा ठायींच बैसला ।
कषाय दिसतांचि आला । विक्षेपाकडे ॥ ४० ॥
अथवा जरी उठून पळाला नाही, आणि जागच्या जागी बसून राहिला तरी कषाय दिसताच तो विक्षेपाकडे येतो. (३३४०)

विक्षेपाकडे जरी येण्याची । संवे पडली वृत्तीसी साची ।
तरी तेही आवडी सांडून एकाग्रतेची । उत्थान प्रतिदिनी करी ॥ ४१ ॥
आणि अशी विक्षेपाकडे परत येण्याची वृत्तीला सवय लागली की, ती सवयही आपल्याला लागलेली एकाग्रतेची गोडी सोडून दररोज उत्थान करू लागते आणि समाधीचा भंग होतो. (३३४१)

येथे साधकें एक करावें । चिद्गगन ज्ञानघना न सोडावें ।
आठवणींत आठवपणे मुरावें । भिन्नत्वें नुरतां ॥ ४२ ॥
अशा वेळेला साधकाने एक करावे. ज्ञानघन चिद्गगनाला मुळीच सोडू नये आणि चिद्रूपाच्या स्मरणामध्ये भिन्नत्वाने न उरता ते स्मरणच होऊन मुरावे. (३३४२)

तथापि रंग नाद उमटती । तरी ते मिथ्यात्वे दृश्य भ्रांति ।
विवेकें विदारूनि त्यागिजेती । विक्षेपाकडे आलियाही ॥ ४३ ॥
तथापि रंग, नाद उठले तर ते खोटे भ्रम आहेत. त्यांचा विवेकाने बीमोड करून त्यांच्यामुळे विक्षेपाकडे आल्यावरही त्यांना मोकळे सोडू नये. (३३४३)

ब्रह्म अशब्द परिपूर्ण । तेथें कैंचें नादाचे श्रवण ।
आणि अदृश्य अगोचर तरी वर्ण । हिरवा पिवळा कैंचा ॥ ४४ ॥
वास्तविक पाहता ब्रह्म पूर्णपणे अशब्द आहे. तेथे नादाचे ऐकणे कुठून आले? आणि ते अदृश्य असून दृष्टीला न पडणारे आहे, मग हिरवे पिवळे असे रंग तिथे कसे दिसतील? (३३४४)

ज्ञानघन जो प्रकाशक । तो ऐसा नव्हे दृश्यात्मक ।
सूर्याऐसा ह्मणती कित्येक । तेही न विवेकी ॥ ४५ ॥
जो ज्ञानघन असून सर्वांचा प्रकाशक असतो, तो असा दृश्यरूप कधीच नसतो. काही लोक तो सूर्यासारखा आहे असे म्हणतात, पण तेही विचारी आहेत असे म्हणता येत नाही. (३३४५)

डोळे दडपूनियां पाहती । अथवा मुद्रादिकांची कृति ।
पित्तप्रकृतीने प्रकाश उमटती । तें ब्रह्म ह्मणती मूढ ॥ ४६ ॥
काही लोक डोळे दडपून ब्रह्मास पाहतात, किंवा द्रादिकांची कती करतात. पित्तप्रकृती असेल तर त्यामळे निरनिराळ्या रंगाचे प्रकाश उमटतात. त्यालाच ते मूर्ख लोक ब्रह्म समजतात. (३३४६)

कोणी भाविती ज्योति ऐसें । कोणी मानिती अणुत्वें असे ।
ऐसें कित्येकांसी लागलें पिसें । तयां मूढां प्राप्त कैंचें ॥ ४७ ॥
कोणी ब्रह्म हे ज्योतीसारखे अशी कल्पना करतात, कोणी त्याला अणपरिमाण आहे असे मानतात, कित्येकांना तर वेडच लागलेले असते. ते ब्रह्माबद्दल वाटेल तसे बरळतात, त्या मूर्त्यांना ब्रह्माची प्राप्ती कशी होईल? (३३४७)

असो खरें तरणें जया साधका । ऐशिया न गुंतावें कुतर्का ।
तेणें पहावें अंतरविवेका । सूक्ष्मबुद्धीनें ॥ ४८ ॥
हे असू दे, पण ज्या साधकाला खरेच तरून जाण्याची इच्छा असेल तर त्याने या प्रकारच्या कुतर्कामध्ये अडकून पडू नये. त्याने सूक्ष्म बुद्धीने अंतर्विवेक करावा. (३३४८)

की ज्ञान प्रकाशाऐसें नाहीं । तें अंतरदृष्टीनेही दिसेना कांही ।
जरी दिसावया जोगें असतां कधीही । विषय पाहतां आढळेना ॥ ४९ ॥
की, ज्ञान प्रकाशासारखे नाही, ते अंतर्दृष्टीलाही दिसत नाही. ते कधीही दिसावयासारखे असते तर अनेक विषय धुंडाळले तरीही ते दिसत नाही. (३३४९)

तस्मात् वर्ण व्यक्ति नाद रंग । हे सर्व दृष्टीचे दृश्य तरंग ।
आत्मा ब्रह्म असंग अभंग । अमुका ऐसा नव्हे ॥ ५० ॥
म्हणून वर्ण, नाद, तरंग अथवा वस्तू हे सर्व दृष्टीचे दृश्याभास आहेत. आत्मा नेमका तद्विरुद्ध म्हणजे असंग (आसक्तिहीन) अभंग असा आहे. तो अमुक पदार्थासारखा आहे, असे सांगता येत नाही. (३३५०)

दृश्य भासातीत सघन । निश्चळ परिपूर्ण चिद्गगन ।
तेथेंचि वृत्तीसी करावें लीन । एकाग्रभावें ॥ ५१ ॥
चिद्गन हे दृश्य, भास, (नाद) यांच्या पलीकडचे आहे. ते सर्वत्र घनदाट भरून राहिलेले, अचल आणि परिपूर्ण आहे. साधकाने एकाग्र होऊन आपल्या वृत्तीला तेथेच लीन करावे. (३३५१)

ऐसा निर्धार करून बैसतां । कषाय नासून जाती तत्त्वतां ।
किंचित् भासही जाहला असतां । वितळून जाती ॥ ५२ ॥
असा निर्धार करून ध्यानास बसले असता सर्व कषाय नष्ट होऊन जातात. किंचित भास झाल्यासारखे वाटले तरी ते वितळून जातात. (३३५२)

दिसोत न दिसोत नाद रंग । परी वृत्ति असावी अभंग ।
तरी आपेआप पावे भंग । विघ्न कषायाचें ॥ ५३ ॥
नाद किंवा रंग दिसू देत अथवा न दिसू देत, आपली वृत्ती मात्र अभंग ठेवावी. त्यामुळे कषायाचे विघ्न आपोआप भग्न होते. (३३५३)

वृत्ति लीन असतां चिद्गगनीं । कदाचित् विकल्प पावला उत्थानीं ।
तरी अहंब्रह्म असंग ह्मणोनी । होतां पुन्हां लीन होय ॥ ५४ ॥
वृत्ती चिद्गगनात लीन झाली असता कदाचित एखादा विकल्प उठला तरी ब्रह्मात्मा (अहं ब्रह्म) असंग आहे असे आठवताच ती पुन्हा चिद्गगनात लीन होते. (३३५४)

लीनत्वें मी ब्रह्म तरी स्फुरे । परी न होती शब्दाकारें ।
सामान्य वृत्तीच जाऊन पसरे । पुन्हां वितळून झेंपावें ॥ ५५ ॥
वृत्ती लीन असली तरी तिला 'अहं ब्रह्मास्मि'चे स्फुरण होते. पण ते स्फुरण शब्दरूप धारण करत नाही. ते स्फुरण सामान्य वृत्तीच्या रूपानेच पसरते आणि वितळून जाते आणि चिद्गगनात पुन्हा झेपावते. (३३५५)

एवं विकल्प उठतां नुठतां । अहंब्रह्मास्मि स्वकीय असंगता ।
स्फुरूं लागे एकाकारता । अभ्यासबळेंकडोनी ॥ ५६ ॥
अशा प्रकारे विकल्प उठोत अथवा न उठोत. अभ्यासाच्या योगाने 'अहं ब्रह्मास्मि'चे स्फुरण उठते. तसेच स्वतःचे असंगत्व आणि चिद्गगनाशी एकाकारताही स्फुरू लागतात. (३३५६)

ऐशी वृत्तीची ब्रह्माकारता । होय जरी साधका तत्त्वतां ।
तत्क्षणीं कषायाचे होय घाता । आपेआप ॥ ५७ ॥
अशा प्रकारे साधकाच्या वृत्तीची ब्रह्माकारता होताच तत्क्षणी कषायांचा आपोआप घात होतो. (३३५७)

या रीतीं कषाय पावतां उपमर्द । पुढें उमटू लागे रसास्वाद ।
हेही समाधीसी प्रसिद्ध । विघ्नचि चौथें ॥ ५८ ॥
अशा प्रकारे कषायांचा बीमोड झाला की, नंतर रसास्वाद उमटू लागतो. रसास्वाद हे समाधीचे प्रसिद्ध असे चौथे विघ्न आहे. (३३५८)

विक्षेप नव्हे लय नव्हे । कांही रंगही नुमटावे ।
परी अहंब्रह्म ह्मणोनी घ्यावें । अभिमानें माथां ॥ ५९ ॥
हे विघ्न म्हणजे, विक्षेप नव्हे, लय नव्हे, किंवा काही रंगही उमटणे नाही. परंतु 'अहं ब्रह्मास्मि' असे म्हणून अभिमान माथ्यावर घेण्याचा हा प्रकार होय. (३३५९)

अहंब्रह्मास्मि ह्मणून । वृत्तीने घेतला जो अभिमान ।
हे नव्हे समाधींचें लक्षण । ध्येयाहून भिन्न पडे ॥ ६० ॥
'अहं ब्रह्मास्मि' असे म्हणून वृत्ती जो अभिमान धरते तो अभिमान म्हणजे समाधी नव्हे. त्या अभिमानामुळे साधक आपल्या ध्येयापासून बाजूला पडतो. (३३६०)

जैशी देहबुद्धिची स्फूर्ति । घेऊन बैसती मूढमति ।
तैशीच अहंब्रह्मही वृत्ति । साभिमानें बाधक ॥ ६१ ॥
ज्याप्रमाणे मूढबुद्धीचे लोक देहबुद्धीची स्फूर्ती घेऊन बसतात, त्याप्रमाणेच 'अहं ब्रह्म' ही वृत्तीसद्धा अभिमानाचीच वृत्ती होय. अभिमानामुळेच ती बाधक असते. (३३६१)

निर्विकल्प निजरूप आपुलें । तें किमात्मक नाहीं कळलें ।
परी मी ह्मणोन साभिमानें आलें । देहबुद्धीकडे ॥ ६२ ॥
आपले स्वरूप निर्विकल्प आहे पण ते नेमके कसे आहे हे न कळल्यामुळे मी पणाचा अभिमान धरल्यामुळे तो देहबुद्धीचाच प्रकार ठरतो. (३३६२)

जरी ह्मणसी चिद्गगनाकार । वृत्ति जाहली असे निर्धार ।
ते कैशी येईल साचोकार । देहबुद्धीकडे ॥ ६३ ॥
जर अशी शंका घेशील की, वृत्ती निर्धारपूर्वक चिद्गगनाकार झाली की मग ती देहबुद्धीकडे कशी येईल? (३३६३)

तरी अवधारावें निवांत । वृत्ति उठतां अभिमान स्फुरत ।
ते क्षणी देहबुद्धीच ऐसा संकेत । यथार्थ न कळे ह्मणोनी ॥ ६४ ॥
तर इकडे नीट लक्ष दे. वृत्ती उठताच जर तिचा अभिमान जर स्फुरला तर तो देहबुद्धीचाच प्रकार समजावा, कारण तिला सत्य कळले नाही. तिला खरे ज्ञान झाले नाही. (३३६४)

वृत्ति जरी लीन जाहली । तरी शून्याकारता अवलंबिली ।
तेचि सत्य म्हणून बळकाविली । आपुली स्वरूपस्थिति ॥ ६५ ॥
वृत्ती जर विलीन झाली तर शून्याकारता स्वीकारल्यासारखे होईल. तीच सत्य आहे असे वाटल्यामुळे तिनेच आपल्या स्वरूपाची जागा बळकाविल्यासारखे होते. (३३६५)

स्फूर्तीपासून देहापर्यंत । या मिथ्यात्वाचा साभिमान घेत ।
हे देहबुद्धि नव्हे काय निश्चित । ब्रह्म ह्मणून घेतां जरी ॥ ६६ ॥
ती वृत्ती स्वतःस ब्रह्म म्हणवून घेत असली तरी ती स्फूर्तीपासून देहापर्यंतच्या सर्व मिथ्या तत्त्वांचा अभिमान घेत असल्यामुळे ती खरी देहबुद्धीच नव्हे काय? (३३६६)

तथापि इतुकें मिथ्या ह्मणोनी । त्यागिलें जरी विवेचूनी ।
तरीही शून्यासी ब्रह्म कल्पूनी । मीच मानोनी बैसे ॥ ६७ ॥
तथापि या सर्व तत्त्वांना नीट विचार करून मिथ्या म्हणून निश्चित केल्यावर वृत्तीने त्यांचा त्याग केला तरी शून्यालाच ब्रह्म मानून त्याला ती 'मीच ते आहे' असे मानून बसते. (३३६७)

आत्मरूप जरी गगनापरी । परी ज्ञानघन रूपप्रतीति नव्हे खरी ।
तेचि शून्य भावि अंतरीं । तेणें सुखें नाचत ॥ ६८ ॥
आत्मरूप हे आकाशासारखे असले तरी ज्ञानघन ब्रह्माच्या रूपाची प्रतीती खरी नाही. आकाश म्हणजे शून्य. वृत्ती त्या शून्यालाच ब्रह्म मानून साधक अंतरामध्ये सुखी होऊन नाचत बसतो. (३३६८)

जैसा हठयोगी वायु कोंडोनी । शून्याकार बैसला होऊनी ।
तैसाचि हाही गगनातें मानी । शून्याकार ब्रह्म ॥ ६९ ॥
ज्याप्रमाणे हठयोगी साधक वायू कोंडून शून्याकार होऊन बसतो. त्याप्रमाणे हाही साधक आकाशालाच शून्याकार ब्रह्म मानून बसतो. (३३६९)

येथे स्वरूप आणि गगनाचा । भेद कळला पाहिजे साचा ।
आणि अहंब्रह्माभिमान वृत्तीचा । निपटून गेला पाहिजे ॥ ७० ॥
या परिस्थितीत स्वरूप (ब्रह्मरूप) आणि आकाश यातील भेद प्रथम कळला पाहिजे. त्याचप्रमाणे वृत्तीचा अहं ब्रह्मास्मि'चा अभिमान संपूर्ण गेला पाहिजे. (३३७०)

तरीच हा रसास्वाद मावळे । ब्रह्म ब्रह्मत्वें स्वयें निवळे ।
नातरी शून्य किंवा उफाळे । देहबद्धी मागुती ॥ ७१ ॥
तरच हा रसास्वाद मावळेल आणि खऱ्या ब्रह्माचा ब्रह्म म्हणून स्वीकार करता येईल, नाहीतर शून्य वृत्तीच किंवा देहबुद्धी पुन्हा उफाळून येईल. (३३७१)

तस्मात् या रसास्वादाचे विघ्न । ब्रह्म न पविजे निरसल्याविण ।
तेंचि कैसे ऐकावें निरूपण । अति सावधान साधकें ॥ ७२ ॥
म्हणून या रसास्वादाच्या विघ्नाचे निरसन झाल्याखेरीज ब्रह्माची प्राप्ती होणार नाही. तेच कसे करता येते यासंबंधीचे पुढील निरूपण साधकाने सावधान होऊन ऐकावे. (३३७२)

आधीं गगनस्वरूपाचा भेद । विवेचनें कळावा प्रसिद्ध ।
पुढे साभिमान त्यागूनि स्तब्ध । वृत्ति राहे तें बोलूं ॥ ७३ ॥
आधी आकाश आणि स्वरूप यातील भेद विचाराने कळला पाहिजे. त्यानंतर वृत्ती अभिमान सोडून कशी स्तब्ध राहील ते सांगतो. (३३७३)

आकाश मणिजे केवळ भूत । शब्द गुण जेथें उमटत ।
आणि शून्यरूप जाणण्यारहित । नेत्रासी अवकाश दिसे ॥ ७४ ॥
आकाश म्हणजे पंचभूतांपैकी केवळ एक भूत आहे. त्याच्या ठिकाणी शब्दगुण उमटतो. ते शून्यरूप आणि ज्ञानरहित आहे. आकाश डोळ्यांना अवकाशाच्या रूपाने दिसते. (३३७४)

काम क्रोध लोभ मोह भय । याही पांचांचा गगनीं अन्वय ।
पोकळ दृश्य तमोगुण कार्य । जड चारी भूतांऐसें ॥ ७५ ॥
काम, क्रोध, लोभ, मोह, भय या पाचही विकारांचा आकाशापासून उगम झालेला आहे. आकाश पोकळ, दृश्य, तमोगुणाचे कार्य या स्वरूपाचे असून इतर चार भूतांप्रमाणे ते जड आहे. (३३७५)

चिद्गगनीं शब्दगुण नसे । आणि शून्यही जेथें अनारिसें ।
नेणीव कालत्रयीं न दिसे । अदृश्य अगोचर ॥ ७६ ॥
चिद्गगनात शब्द हा गुण नाही आणि शून्याचाही तेथे पत्ता नसतो (तेथे शून्यत्व म्हणजे पोकळी नाही) तेथे नेणीव (अज्ञान) कालत्रयीही असणे शक्य नाही. ते अदृश्य आहे आणि कोणत्याही इंद्रियाच्या साहाय्याने त्याचे ज्ञान होणार नाही. (३३७६)

कामक्रोधादि हे मनोधर्म । त्या मनाचाचि नसे जेथें उद्गम ।
अवकाशेविण चिद्घन सम । पोकळ तो किंचित् नसे ॥ ७७ ॥
काम क्रोध हे मनोधर्म आहेत. पण चिद्गगनाच्या ठिकाणी मनाचाच उठाव नाही तर हे मनोधर्म कसे असतील? चिद्गगनात पोकळी नाही. ते सर्वत्र समान व्यापलेले आहे. (३३७७)

भूत मणिजे जाहलें । ह्मणोनि गगन हे नाम पावलें ।
स्वस्वरूप आदिअंती संचलें । ज्ञानघन निबिड ॥ ७८ ॥
आकाश हे भूत आहे. भूत म्हणजे जे झाले ते. आकाश झाले आहे म्हणून त्याला गगन असे नाम प्राप्त झाले. पण स्वस्वरूप मात्र आदी आणि अंती व्यापलेले आहे. ते घनदाट व्यापलेले असून ज्ञानघन आहे. (३३७८)

जया स्वरूपी मायास्फूर्ति । रज्जुसर्पाची जेवीं भ्रांति ।
तैशी न होऊन मानिली उत्पत्ति । अहंब्रह्मास्मि शब्दें ॥ ७९ ॥
त्या स्वरूपाच्या ठिकाणी मायेचे स्पुरण हे दोरीवरील सर्पाप्रमाणे भ्रांतिरूप आहे. त्याप्रकारेच 'अहं ब्रह्मास्मि' हे स्फुरण ब्रह्माच्या ठिकाणी न होऊन झाले आहे. (३३७९)

तो शब्द आणि तया शब्दासी । अवकाश जाहला अखंडैकरसीं ।
तया छिद्ररूप पोकळपणासी । आकाश नाम ठेविलें ॥ ८० ॥
तो शब्द आणि शब्दगुण यांस अखंडैकरस ब्रह्माच्या ठिकाणी अवकाश प्राप्त झाला. त्या छिद्ररूप पोकळपणाला आकाश असे नाव ठेवले गेले. (३३८०)

येर भूतें आणि जगास । पैसरूपी जाहला वास ।
तया नाम मात्र ठेविलें फोस । आकाश ह्मणोनी ॥ ८१ ॥
या पोकळपणारूपी अवकाशात इतर भूते आणि जग यांना वसतीला ठिकाण मिळाले. त्या पैसरूप पोकळीला आकाश असे तुच्छ (फोस) नाव मिळाले. (३३८१)

तेथे अज्ञान जडत्व आलें । ह्मणोनि कल्पिलें तमोगुणी जाहलें ।
कामक्रोधादि कार्यांत उमटले । अंतःकरणरूपी ॥ ८२ ॥
ते आकाश जड आणि ज्ञानरहित होते. म्हणून ते तमोगुणापासून झाले अशी कल्पना करण्यात आली. नंतर काम, क्रोध हे विकार अंतःकरणरूपी त्याच्या कार्यात निर्माण झाले. (३३८२)

ऐसे विकार हे गगनाचे । कार्य तरी मायास्फूर्तीचें ।
विचारें पाहतां जाहलेंच नवचे । परी नामास्तव कल्पिलें ॥ ८३ ॥
असे हे गगनाचे विकार होत. ते मायारूप स्फूर्तीचेच कार्यरूप आहेत. विचार करून पाहिले तर ते मुळाच झालेच नाहीत. पण व्यर्थ अशा नामासाठी ते झाले अशी कल्पना केली. (३३८३)

स्वरूप तरी अखंडैकरस । जेथें मायेसी जाहला उमस ।
परी तेथें छिद्ररूप पोकळीस । अवकाश कैंचा ॥ ८४ ॥
याविरुद्ध स्वरूप (ब्रह्म) हे अखंडैकरस असून त्याच्या ठिकाणी मायेचा जन्म झाला पण मग तेथे छिद्ररूप पोकळीस अवकाश तरी कसा सापडला? (३३८४)

जैसें आरसिया छिद्र नसतां । पुढील पदार्थ दिसती आंतोता ।
तैसें ज्ञानघन निबिड असतां । भ्रमें जग मध्ये जाहलें वाटे ॥ ८५ ॥
ज्याप्रमाणे आरशाला छिद्र नसतानाही त्याच्या आत त्याच्यासमोरचे पदार्थ दिसतात, त्याप्रमाणे स्वरूप ज्ञानघन आणि घनदाट असताना त्याच्यामध्ये जग झाले असे भ्रमाने वाटते. (३३८५)

ज्ञानघनीं कैचा अवकाश । ह्मणिजे अमुक स्थळ स्वरूपाहून वोस ।
पडिले ऐसें नाहीं तयास । एकरस बोलिजे ॥ ८६ ॥
स्वरूपाच्या खेरीज एखादे ओस (रिकामे) ठिकाण असते तर ज्ञानघन अशा स्वरूपात अवकाश सापडला असता. पण स्वरूपापेक्षा दुसरे कोणतेही ओस पडलेले स्थळ सापडतच नसल्यामुळे स्वरूप हे एकरस आहे असे म्हणावे लागते. (३३८६)

ऐशिया अखंडैकरसामाजीं । कल्पिली कल्पना माया दुजी ।
नेणीवही कल्पिली सहजीं । तेंचि आकाश ॥ ८७ ॥
अशा अखंड, एक रस स्वरूपामध्ये माया नावाच्या दुसऱ्या पदार्थांची कल्पना केली. त्याच मायेमध्ये अज्ञानाचीही कल्पना केली. तेच जड असे आकाश होय. (३३८७)

ज्ञानामाजी नेणतेपण । पोकळ जडरूप गगन ।
नाम पावले उपाधीकडून । येरव्हीं जाहलेंचि नाहीं ॥ ८८ ॥
ज्ञानरूप स्वरूपामध्ये अज्ञान: 2ळ, जड असे आकाश झाले. त्याला उपाधीमळे स्वतंत्र आकाश असे नाव देण्यात आले. वास्तविक पाहता ते झालेलेच नाही. (३३८८)

स्वरूपाविण स्थळ रितें नाहीं । ऐसें बोलतां कोणी येथेही ।
शंकील की गगनासीही पाहीं । खंडता कोठे ॥ ८९ ॥
स्वरूपावाचून एकही स्थळ रिकामे नाही, असे म्हटल्याबरोबर कोणी येथे शंका काढील की, आकाशात तरी कोठे खंडता आहे? तेही अखंडैकरसच आहे. (३३८९)

तरी परिसा याचे उत्तर । जें कां निश्चळ अंत ना अपार ।
तयासी गगन हे नाम मात्र । मायेस्तव कल्पिले ॥ ९० ॥
तर याचे उत्तर ऐका. आकाश निश्चळ आहे. त्याला अंत नाही. त्याला मर्यादा नाही. त्याला आकाश हे नाव केवळ मायेमुळे पडले आहे. (३३९०)

वेगळेपणे जे पहावें । तयासी गगन कल्पिलें स्वभावें ।
अभिन्नपणे जे एकरस व्हावें । तरी तें गगनचि ब्रह्म ॥ ९१ ॥
कारण त्याला आपण वेगळेपणाने पाहतो. त्या वेगळेपणामुळेच त्याला गगन असे नाव स्वाभाविकपणे आले ते जर अभिन्न राहन एकरस झाले असते तर आकाश हेच ब्रह्म मानले असते. खरे तर, आकाश ब्रह्मच आहे. (३३९१)

काळिमा नसतां पितळ । तेंचि सुवर्ण केवळ ।
तैसें अज्ञान नसतां निवळ । ज्ञानघन तें ब्रह्म ॥ ९२ ॥
पितळाला जर काळिमा नसता तर पितळ हे केवळ सोनेच मानले असते. तसे आकाशाच्या ठिकाणी अज्ञान नसते तर ते ज्ञानघन आकाश ब्रह्मच ठरले असते. (३३९२)

हे अवकाशरूप उगें भाविलें । तया ब्रह्मरूपा गगन नाम ठेविलें ।
परी तें आकाश नव्हे असे संचलें । परब्रह्मचि ॥ ९३ ॥
त्याला अवकाशरूप आहे असे उगीचच मानले आहे. ते ब्रह्मरूपच आहे. पण अवकाशरूप मानल्यामुळे गगन असे नाव ठेवले. पण ते आकाश नाहीच. ते परब्रह्मच सर्वत्र दाटून राहिले आहे. (३३९३)

आतां आकाशाचे रूप कोणतें । म्हणसी जरी बोलिजे तें ।
छिद्रत्वे शब्द नाद उमटती तें । आकाश भूतरूप ॥ ९४ ॥
मग आकाशाचे रूप कोणते, असे जर म्हणशील तर ते सांगतो. ते छिद्र असल्यामुळे त्याच्या ठिकाणी शब्द आणि नाद उमटतात. म्हणून ते आकाश भूतरूप आहे. (३३९४)

तेंचि आकाश शब्दासहित । जाहलें ह्मणून नाम पावलें भूत ।
तेंचि प्रलयकालीं नासत । येर संचलें ते ब्रह्म ॥ ९५ ॥
आकाश शब्दगुणयुक्त झाले म्हणून भूत हे नाव प्राप्त झाले. प्रलयकाळी हे भूतच नष्ट होते. त्यानंतर उर्वरित भरून राहिलेले ते ब्रह्मच आहे. (३३९५)

शब्दरूप तेचि श्रोत्रासी । वेद्य जाहलें एकदेशी ।
येर ओतप्रोत तें कवणासी । विषय असे सांगे ॥ ९६ ॥
आकाशाचे जे शब्दरूप तेच कानास विषयरूप होते. तो त्याचा मर्यादित भाग झाला. पण बाकीचे ओतप्रोत असणारे आकास हा कोणाचा विषय आहे. हे सांग बरे. (३३९६)

म्हणसी नेत्रासी पोकळपणा । दिसे गगनाचा परिपूर्णा ।
तरी ते वाउगी कल्पिली कल्पना । गगना रूप कैचें ॥ ९७ ॥
तू असे म्हणशील की आकाशाचा पोकळपणा डोळ्यांस दिसतो. पण ती कल्पना खोटी आहे. आकाशाला रूप कसे असेल? आकाशाला रूपच नसते. (३३९७)

शब्द तरी नेत्रासी न दिसे । मा ओतप्रोत तें कैसें भासे ।
अनुमानिलें जें पोकळसें । तें परब्रह्म सघन ॥ ९८ ॥
शब्द हा त्याचा गुण असला तरी तो डोळ्यांना दिसणार नाही. मग ओतप्रोत असे ते आकाश डोळ्यांना कसे भासते? अरे जे पोकळ आहे असे आपण अनुमानाने जाणतो ते खरे तर ब्रह्मच आहे. तेच घनदाट भरून राहिले आहे. (३३९८)

परब्रह्म अनुमाना आलें । म्हणून गगन ऐसें नाम ठेविलें ।
पाहणाराकडे ज्ञान उमटलें । पाहिलें तें जड अज्ञान ॥ ९९ ॥
त्या परब्रह्माचे आपण अनुमान केले, म्हणून त्यालाच आकाश असे नाव ठेवले. पहाणायामध्ये ते ज्ञान उमटले. पण त्याने जे पाहिले ते वास्तविक पाहता अज्ञानच आहे. ते जड असते. (३३९९)

परी पाहणाराचे विशेष ज्ञान । तेंचि अन्यथा अप्रमाण ।
मा कल्पिलें पोकळासी जें अज्ञान । तें खरें कैसें ॥ ३४०० ॥
पण पहाणाराला आकाशाचे जे विशेष ज्ञान झाले, तेच मुळात अप्रमाण (अविश्वसनीय) आहे. पोकळपणाची जे कल्पना करते ते अज्ञान खरे कसे असेल? (३४००)

पाहणाराचे ज्ञान त्यागावें । पोकळींचे जडपण विसर्जावें ।
उर्वरित केवळ ज्ञान स्वभावें । तें परब्रह्म दोहींकडे ॥ १ ॥
पहाणाराचे ज्ञान (खरे तर, अज्ञान) टाकून द्यावे, पोकळीच्या जडपणाचे विसर्जन करावे, म्हणजे उरते ते स्वाभाविकपणे ज्ञानच असते. तेच परब्रह्म होय. तेच पहाणारा आणि पोकळी या दोन्हीकडे असते. (३४०१)

तस्मात् ओतप्रोत तें ब्रह्म पूर्ण । शब्दरूप तितुकेंचि गगन ।
जें कां उद्भवलें मायास्फुरण । उपाधिमाजीं ॥ २ ॥
म्हणून ओतप्रोत आहे तेच परिपूर्ण असे ब्रह्म होय. जेवढे शब्दरूप आहे तेवढेच आकाश होय. तेच उपाधीमध्ये निर्माण झालेले मायास्फुरण होय. (३४०२)

तेथूनचि परा पश्यंती मध्यमा । वैखरी आदि पावली उद्गमा ।
शब्दरूपता तयाचिये नामा । आकाशभूत ॥ ३ ॥
तेथूनच परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी या वाणी निर्माण झाल्या. त्या वाणी म्हणजेच आकाशाची शब्दरूपता होय. (३४०३)

येर चारी भूतांचे उपाधीस्तव । शब्दघसणीनें उठे स्वभाव ।
अथवा पशुपक्ष्यादि जीव । तेथें ध्वनिरूपें गगन ॥ ४ ॥
चारी भूतांच्या उपाधींच्या घर्षणातून स्वाभाविकपणे शब्द उठतो. अथवा पशुपक्ष्यादी जीव जेथे असतात तेथे जो शब्द उठतो, तेच आकाशाचे ध्वनिरूप होय. (३४०४)

तेथेंचि काम क्रोधाची उत्पत्ति । आणि शून्य जड अज्ञान भ्रांति ।
अथवा नाशही कल्पांती । इतुक्याचि गगना ॥ ५ ॥
तेथेच कामक्रोधांची उत्पत्ती होते. शून्य, जडता, अज्ञान, भ्रम हे तेथेच असतात किंवा कल्पान्तीचा नाशही एवढ्या सगळ्या गगनाचाच असतो. (३४०५)

तया शब्दरूप गगनाचा । वेद्यत्वपणा श्रोत्रासी साचा ।
येर ओतप्रोत जें तयाचा । शब्द ना वेद्यत्व ॥ ६ ॥
ते आकाशाचे शब्दरूपच कानाला जाणता येते. ज्याचे ओतप्रोतत्व आहे त्याला शब्दही नसतो. आणि वेद्यत्व (जाणण्याचा विषय) ही नसते. (३४०६)

तेथें कामक्रोधादि ना जडपण । शून्य अज्ञान ना शब्दगुण ।
उत्पन्न जाहलें ना नाश होणे । म्हणून तेंचि ब्रह्म ॥ ७ ॥
तेथे कामक्रोध इ. नसतात किंवा जडपणाही नसतो. किंवा शून्य, अज्ञान, शब्दगुण हे काही नसते. ते उत्पन्नही होत नाही, किंवा त्याचा नाशही होत नाही. म्हणूनच ते ब्रह्म होय. (३४०७)

अज्ञानें तया ब्रह्मरूपासी । कल्पना केली भूताऐशी ।
नाम आकाश ठेविलें त्यासी । परी रूप कांही नसे ॥ ८ ॥
अज्ञानामुळे त्याच ब्रह्माला भूत असे कल्पनेने मानले, त्यालाच आकाश असे नाव ठेवले. पण त्याच्या ठिकाणी रूप मात्र काही नाही, (३४०८)

तस्मात् तेंचि ब्रह्म खरें । परी घेतले पाहिजे विचारें ।
तंव रविदत्त पुसे आदरें । कर जोडोनी ॥ ९ ॥
म्हणून तेच खरे ब्रह्म आहे. फक्त ते विचाराने घेतले पाहिजे. तेव्हा रविदत्ताने आदरपूर्वक हात जोडून विचारले. (३४०९)

जी जी स्वरूपासीं जें उपमिलें । तें गगन कवणासी बोलिलें ।
विभु व्यापक निरंश झणितलें । हें तों ओतप्रोत गगन ॥ १० ॥
"महाराज, स्वरूपाला ज्याची उपमा दिली जाते ते कोणते? विभू, व्यापक, निरंश (अंश नसलेले) असे ज्याला म्हणतात, ते तर ओतप्रोत आकाश होय. (३४१०)

शब्दरूप तें तों एकदेशी । विभुत्व व्यापकता न ये त्यासी ।
तस्मात् उपमिलें में ब्रह्मरूपासी । तें ओतप्रोत गगन ॥ १ ॥
शब्दरूप असे जे आकाश आहे. ते तर एकदेशी आहे. त्याच्या ठिकाणी विभुत्व, व्यापकता हे गुण आढळणार नाहीत. म्हणून ब्रह्मरूपाला ज्याची उपमा दिली जाते ते ओतप्रोत आकाशच आहे. (३४११)

विभत्व व्यापकत्व निरंशता । स्वरूपासम असती तत्वतां ।
एक चैतन्याची मात्र अधिकता । ब्रह्मरूपी असे ॥ १२ ॥
त्याच्या ठिकाणी विभुत्व, व्यापकत्व, निरंशता हे गुण स्वरूपासारखेच आहेत. ब्रह्मरूपाच्या ठिकाणी चैतन्य हा गुण मात्र अधिकचा आहे. (३४१२)

ब्रह्मीं चैतन्य ह्मणतां अधिक । व्यापकही जड जाहलें आवश्यक ।
तेंचि ब्रह्म उपदेशितां एक । तरी हे उमजे ऐसें करा ॥ १३ ॥
ब्रह्माच्या ठिकाणी चैतन्य हा अधिकचा गुण आहे. असे म्हणताच व्यापक आकाश आपोआप जड ठरते. आपण तर त्यालाच ब्रह्म म्हणून सांगत आहात. तेव्हा हे कोडे मला उलगडेल व समजेल असे सांगा."(३४१३)

ऐसें ऐकतांचि श्रीशंकर । हर्षोनि करिते जाहले उत्तर ।
की हे ओतप्रोत जें निर्विकार । यासीच उपमिलें ॥ १४ ॥
हे ऐकताच श्रीशंकराचार्यांना आनंद झाला आणि त्यांनी उत्तर दिले, "रविदत्ता, हे जे ओतप्रोत आणि निर्विकार आकाश आहे. त्याचीच ब्रह्मरूपाला उपमा दिली आहे. (३४१४)

अज्ञानें भ्रमें भाविलें असे । कीं हें व्यापकचि आकाश ऐंसे ।
तयासी कळावया सांगती आवेशें । श्रुति आणि ज्ञाते ॥ १५ ॥
अज्ञानामुळे आणि भ्रमामुळे अशी कल्पना करण्यात आली की, हे जे व्यापक तत्त्व आहे तेच आकाश आहे. ते व्यापक तत्त्व कळावे म्हणून वेद आणि ज्ञाते मोठ्या आवेशाने सांगतात. (३४१५)

श्रुति आणि ज्ञाते कळून । सांगती कैसें हेंचि गगन ।
ह्मणसी तरी प्रयोजन । असे इतुकेंची ॥ १६ ॥
वेद आणि ज्ञाते हे कळत असूनसुद्धा हेच आकाश आहे म्हणून कसे सांगतात? असे म्हणशील तर त्यांचा हाच एक उद्देश आहे, (३४१६)

की अज्ञानासी ज्ञान व्हावें । तरी तें कासयासारिखें उमजावें ।
ऐसा पदार्थचि दुसरा नव्हे । म्हणोनि ज्याचे त्या उपमिलें ॥ १७ ॥
की अज्ञानी माणसाला त्या ब्रह्मरूपाचे यथार्थ ज्ञान व्हावयाचे असेल तर त्याने ते कशासारखे आहे म्हणून समजावे? असा दुसरा पदार्थच नसल्यामुळे ज्याची त्यालाच ही उपमा दिली. (३४१७)

अज्ञानासी या गगनाचा । व्यापकपणा मोठेपणा साचा ।
ठाउका असे तरी उपमितां स्वरूपाचा । अनुभव कळेल ॥ १८ ॥
अज्ञानी माणसाला या आकाशाचा व्यापकपणा, मोठेपणा यांची नीट कल्पना असेल तर उपमित स्वरूपाचा (ब्रह्माचा) त्याला अनुभव येईल. (३४१८)

एक शून्य अज्ञान भाविलें । ह्मणोनीच गगना ऐसे उपमिलें ।
तेंही साधका जाईल कळलें । अभ्यासबळेकडूनी ॥ १९ ॥
शून्य हे अज्ञानस्वरूप मानले म्हणून परब्रह्माला ते आकाशासारखे आहे म्हणून उपमा दिली. साधकाला अभ्यासाने साहाय्याने त्यातील तथ्य हळूहळू कळेल. (३४१९)

की ब्रह्म चिद्घन ज्ञानरूप । तें विशेषा ऐसें नव्हे अल्प ।
सामान्य स्वयंप्रकाश अमुप । यथार्थ कळे जेव्हां ॥ २० ॥
ब्रह्म हे चिद्घन (संपूर्ण चैतन्यमय) आणि ज्ञानरूप आहे. ते विशेष अशा पदार्थांसारखे अल्प (मर्यादित) कधीच नसते. ते सामान्य प्रकाशाप्रमाणे असून स्वयंप्रकाशी आहे आणि अमाप आहे. अभ्यासाने साधकाला हे कळेल तेव्हा त्याला ब्रह्म आणि आकाश यातील फरक कळेल. (३४२०)

तेव्हांचि ओतप्रोतासी अज्ञान । कल्पिलें होतें तें त्यागून ।
सहजीं सामान्य एकरूपज्ञान । कळतां गगनबुद्धि जाय ॥ २१ ॥
तेव्हा त्याला कळेल की ओतप्रोताच्या ठिकाणी आपण आकाशाप्रमाणे अज्ञान कल्पिले होते. त्या कल्पनेचा त्याग करताच त्याला ब्रह्माचे सामान्य एकरूप ज्ञान होईल आणि ब्रह्माच्या ठिकाणी केलेली त्याची आकाश कल्पना निघून जाईल. (३४२१)

विभुत्व व्यापकत्व तों पहिले सम । तें तो ऐक्यचि सहज निःसीम ।
भाविलें अज्ञान आणि ठेविलें नाम । तें मिथ्या होय स्वानुभवें ॥ २२ ॥
विभुत्व आणि व्यापकत्व ही दोन्ही लक्षणे पहिल्यासारखी राहतील. त्याबाबतीत ओतप्रोत आकश आणि ब्रह्म यांच्यात पूर्णपणे ऐक्यच आहे. त्याला अज्ञान मानून त्याला 'आकाश' असे नाव दिले. हे मिथ्या आहेत हे स्वानुभवानेच त्याला कळेल. (३४२२)

तस्मात् रविदत्ता विचारून पाहें । व्यापक ज्ञानघन ब्रह्मचि आहे ।
या व्यापकासी कोणतें रूप की लाहे । चक्षु आदि इंद्रियां ॥ २३ ॥
म्हणून रविदत्ता, विचार करून पहा, व्यापक आणि ज्ञानघन असे फक्त ब्रह्मच आहे. त्या व्यापकाला कोणते रूप आहे म्हणून ते डोळे आणि इतर इंद्रियांचा विषय होऊ शकेल? (त्याला रूपच नाही म्हणून इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही. (३४२३)

असो ऐसिया व्यापक रूपासी । गगन कल्पना जे अज्ञानासी ।
तेचि निरसिजे ऐकें मानसीं । सावधानपणे ॥ २४ ॥
असो, 'अशा व्यापकाबद्दल अज्ञानी माणसाच्या मनात जी आकाशाची कल्पना असते. तिचेच सावधान राहून निरसन केले पाहिजे. (३४२४)

वायु आदि चारी भूतें । व्यापक गगनीं असती मिश्रितें ।
तेंचि भिन्न काढिता ऐतें । स्वतःसिद्ध ब्रह्म ॥ २५ ॥
व्यापक आकाशामध्ये वायू इ. चार भूते मिश्रित झाली आहेत. ती जर त्यातून काढून टाकली तर ब्रह्म आयतेच स्वतःसिद्ध आहे. (३४२५)

अज्ञान शून्य जे नेणीव । हा पृथ्वीचा कठिन स्वभाव ।
गगनीं मृदुत्वाचा जो भाव । तो अपाचा गुण ॥ २६ ॥
व्यापक आकाशात जी अज्ञान शून्य अशी नेणीव आहे तो म्हणजे पृथ्वीचा कठीण स्वभाव आहे. त्या आकाशात जे मृदुपण आहे तो आपतत्त्वाचा गुण आहे. (३४२६)

भासलें गगन तें तेज । म्हणून पोकळ अनुमानिजे सहज ।
स्तब्धता निरोधता ते समज । वायुतत्वाची ॥ २७ ॥
आकाश भासते तो तेजाचा अंश आहे. म्हणूनच ते पोकळ असते, हे सहज अनुमानाने कळते. आकाशात स्तब्धता आहे, निरोधक्षमता आहे. ती वायुतत्त्वाची आहे म्हणून समज. (३४२७)

शब्दरूप अंतःकरणस्फूर्ति । जयेस्तव गगन हे वदंती ।
हे केवळ गगनीं नाढळती । विचारून पाहतां ॥ २८ ॥
आकाशामध्ये जी शब्दरूप अन्तःस्फूर्ती आहे (असे म्हणतात), तिच्यामुळे आकाशाला 'आकाश' हे नाव पडले असे म्हणतात. ही स्फूर्ती आकाशात नाहीच असे विचारपूर्वक पाहता लक्षात येते. (३४२८)

स्तब्धता निरोधता तो नसे । की मायाचि जेथें नुमसे ।
चंचळ स्वभावेंविण एकरसें । चिद्गगन ब्रह्म ॥ २९ ॥
जेथे मायाच उद्भवत नाही तेथे स्तब्धता निरोधक्षमता कशी असतील? ब्रह्म हे एकजिनसी चिद्रूप असल्यामुळे त्यात वायूची चंचलता तरी कशी असणार? (३४२९)

तस्मात् गगनीं वायूचा अभाव । तेज भासकत्वें दिसे तें वाव ।
जाहला म्हणसी ब्रह्मींचा अनुभव । परी तो भ्रम ॥ ३० ॥
त्यामुळे आकाशामध्ये वायुतत्त्वाचा अभाव आहे. आकाशात भासकत्वामुळे जे तेजतत्त्व दिसते, ते खोटे आहे. या तत्त्वांच्या रूपाने ब्रह्माचा अनुभव झाला, असे म्हणशील तर तो केवळ भ्रम आहे. (३४३०)

वेगळेपणे कोण खरें । की ब्रह्म अनुभविजे साचोकारें ।
तस्मात् अभित्रपणे भास निवारे । तेव्हां तेजाचा अभाव ॥ ३१ ॥
वेगळेपणाने (विशेषरूपाने) जाणवणारे कोणते तत्त्व खरे असते? विशेषरूपाने जाणवणे हा ब्रह्माचा स्वभावच नाही. त्यामुळे त्या कोणत्याही तत्त्वाच्या विशेषत्वामुळे ब्रह्माचा खऱ्या अर्थाने अनुभवच येणार नाही. त्यामुळे हा भास अभिन्नत्वाच्या मुद्द्यावर जेव्हा दूर सारला जाईल तेव्हा ब्रह्माच्या ठिकाणी तेजाचा अभाव आहे, असे कळते. (३४३१)

त्वचेसी कांही स्पर्शावें । तरी मृदु कठिन म्हणावें ।
आपुलें आपणासी स्वयमेवें । मृदु ना कठिन ॥ ३२ ॥
त्वचेला दुसऱ्या कशाचा तरी स्पर्श झालाच तर त्या पदार्थाला मृदू अथवा कठीण म्हणावे. आपणच आपल्याला मृदूही नसतो अथवा कठीणही नसतो. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी वायुतत्त्वाचा अभाव आहे. (३४३२)

तरी आप हैं कवणेपरी । असे तें काढावें निर्धारी ।
नाहींच नाही कल्पना दुसरी । आहे तैसें आहे ॥ ३३ ॥
याच प्रकारे आकाशाच्या ठिकाणी जो आपतत्त्वाचा आहेपणा जाणवतो तो निर्धारपूर्वक दूर सारावा. ब्रह्माच्या ठिकाणी दुजेपणाची कल्पनाच अस्तित्वात नाही. ते जसे आहे तसेच आहे. म्हणून तेथे आपतत्त्वाचा अभाव आहे. (३४३३)

कठिनपण शून्य अज्ञान । हे कल्पिली पृथ्वी म्हणून ।
विचारें वोळखितां सामान्य ज्ञान । अज्ञान मावळे ॥ ३४ ॥
कठीणपणा, शून्यत्व, अज्ञान ही पृथ्वीची लक्षणे म्हणून कल्पना केली आहे. पण ब्रह्माचे सामान्य ज्ञानस्वरूप लक्षात घेता ब्रह्माच्या ठिकाणी अनुमानिलेले अज्ञान मावळते. (३४३४)

आपण चिद्गगन ओतप्रोत । अंत नाही म्हणोन अनंत ।
सजातीयादि भेदरहित । कळे जरी स्वानुभवें ॥ ३५ ॥
आत्मा चिद्रूप, ओतप्रोत, अंत नाही म्हणून अनंत आणि सजातीय, विजातीय आणि स्वगत भेद नसलेला असा आहे हे स्वानुभवाने कळले पाहिजे. (३४३५)

देहादिकांचे मी आपण । मानिलें होतें विपरीत ज्ञान ।
म्हणून कल्पिलें एक अज्ञान । की नकळे आपआपणा ॥ ३६ ॥
देहादिक म्हणजेच मी, असे मानले होते, ते विपरीत ज्ञान होते. आपले आपल्याला कळत नसते म्हणून अज्ञानाची कल्पना केली होती. (३४३६)

हे विपरीत ज्ञान वृत्ति उठतां । कल्पिलें असे बहिर्मुखता ।
तस्मात् नेणीवही आली पाहतां । माथां वृत्तीचे ॥ ३७ ॥
अशी विपरीत ज्ञान वृत्ती उठल्याबरोबर बहिर्मुख दृष्टीची कल्पना करावी लागते. म्हणून वृत्तीच्या माथी नेणीव म्हणजे अज्ञानही आहे. (३४३७)

परी स्वरूप अज्ञान नसे । उठतां वृत्तीसी जाणतसे ।
विपरीत ज्ञान तेंही प्रकाशे । जयाच्या प्रभे ॥ ३८ ॥
पण स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नसते. वृत्ती उठल्याबरोबर तिला ते जाणते. त्याच्या प्रकाशाने विपरीत ज्ञानदेखील जाणले जाते (प्रकाशित होते). (३४३८)

वृत्तीसीच स्वरूप न कळलें । तें अज्ञानही जेणें प्रकाशिलें ।
तरी तें अज्ञान कैसें जाहलें । ज्ञानघन ओतप्रोत ॥ ३९ ॥
वृत्तीलाच स्वरूप कळत नाही. तिचे अज्ञानही ब्रह्मच प्रकाशित करते. असे असताना त्याच्या त्या ज्ञानाला अज्ञान कसे म्हणता येईल? ते तर ओतप्रोत असून ज्ञानघन आहे. (३४३९)

जडपणा तों स्वरूपी किंचित । नाहींच नाहीं निभ्रांत ।
शून्य अज्ञानत्व कल्पिला संकेत । तो विचारें निरसिला ॥ ४० ॥
स्वरूपाच्या ठिकाणी जडपणा किंचित देखील नाही. त्याला आकाश म्हणून शून्य, अज्ञान असे कल्पिले होते. तोही गैरसमज विचाराने दूर केला पाहिजे. (३४४०)

तथापि शन्य खंडन उरलें । तें पढील श्लोकीं निरूपिलें ।
तेव्हां तेंचि वस्ततंत्र ज्ञान संचलें । कळेल अपरोक्ष ॥ ४१ ॥
तथापि शून्याचे खंडन अद्याप राहिले आहे. ते पुढच्या श्लोकात केले आहे. तेव्हा तेच वस्तुतंत्र ज्ञान सर्वत्र भरून राहिलेले आहे हे अपरोक्षत्वाने (प्रत्यक्षपणे) कळेल. (३४४१)

एवं स्वस्वरूप में चिद्गगन । अनंत अपार व्यापक पुर्ण ।
तयासी व्यर्थ कल्पिती आकाश ह्मणून । परी तेंचि सघन ब्रह्म ॥ ४२ ॥
अशा प्रकारे स्वस्वरूप हेच चिद्गगन असून ते अनंत, अपार व्यापक आणि पूर्ण आहे. त्याला उगीचच आकाश म्हणून मानतात, पण ते चुकीचे आहे. ब्रह्मच सर्वत्र व्यापलेले आहे. (३४४२)

तें स्वरूप अशब्द अस्पर्श । अरूप अगंध अरस ।
भास मृदु ना निरोधांश । आणि अज्ञान नव्हे ॥ ४३ ॥
स्वरूप हे अशब्द, अस्पर्श, अरूप, अगंध, अरस असे असून, तेथे भास नाही, मृदुत्व नाही, निरोधांश नाही, आणि तेथे अज्ञानही नाही. (३४४३)

ऐसें गगन गाळून काढिलें । पांचही भूतांचे धर्म त्यागिले ।
नंतर उर्वरित जें उरलें । तें रविदत्ता चिद्गगगन ॥ ४४ ॥
आकाश जर गाळून घेतले, त्याच्यातील पंच महाभूतांचे धर्म काढून टाकले. तर रविदत्ता जे शिल्लक उरते, तेच चिद्गगन असे समज. (३४४४)

हे ऐकूनी रविदत्त आपण । साष्टांग घालितसे नमन ।
जी जी स्वस्वरूप ज्ञानघन । पोकळीविण एकरस ॥ ४५ ॥
हे ऐकून रविदत्ताने सद्गुरूंना साष्टांग दंडवत घातले. आणि तो म्हणाला, “महाराज, स्वरूप ज्ञानघन, पोकळी नसलेले आणि एकजिनसी आहे. (३४४५)

ऐसे विचारें अनुमानलें । की गगनप्राय ओतप्रोत संचलें ।
परी तें वृत्तीसी पाहिजे कळलें । तेव्हां वृत्तीचे अज्ञान नासे ॥ ४६ ॥
विचाराने असे मानले आहे की ते आकाशासारखे सर्वत्र व्यापून राहिलेले आहे. पण वृत्तीला त्याचे हे स्वरूप कळले पाहिजे. तरच तिचे अज्ञान नष्ट होईल. (३४४६)

स्वरूप वास्तविक अज्ञान नव्हे । सामान्य ज्ञानघनचि स्वभावें ।
परी वृत्तीसी तों अज्ञान संभवे । की कळेना स्वरूप ॥ ४७ ॥
स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही. ते स्वभावतःच ज्ञानघन आहे. पण वृत्तीच्या ठिकाणी अज्ञान संभवते, त्यामुळे तिला स्वरूप कळत नाही. (३४४७)

सजातीयादि भेदरहित । की परिच्छेदाविण अनंत ।
वृत्तीसी कळावा अपरिमित । तरीच अज्ञान निरसे ॥ ४८ ॥
ब्रह्म हे सजातीय, विजातीय, स्वगत अशा भेदांनी रहित आहे. त्यात परिच्छेद होत नसून ते अनंत आहे. ते अपरिमित आहे, हे ज्ञान वृत्तीस झाले तरच अज्ञानाचे निरसन होईल. (३४४८)

जया वृत्तीच्या न कळण्यामुळे । येवढे ऐक्य तें पडिलें वेगळं ।
देहबुद्धि धरूनियां बळें । नाथिलेंचि जन्मे मरे ॥ ४९ ॥
ज्या वृत्तीच्या न कळण्यामुळे एवढे अखंड ऐक्य (परब्रह्म) हे तिच्यापासून वेगळे पडले आणि ती देहबुद्धी धरते व तिच्यामुळे अस्तित्वात नसलेले जन्ममरण भोगत राहाते. (३४४९)

ऐशिया वृत्तीसी कळल्याविण । न फिटेचि कदाही अज्ञान ।
अभ्यासें व्यापितसे चिद्गगन । परी केवढे किती कळेना ॥ ५० ॥
अशा वृत्तीला ज्ञान झाल्याशिवाय अज्ञान कधीच फिटणार नाही. अभ्यासाने वृत्ती चिद्गगन व्यापते पण ते केवढे आहे, किती आहे हे तिला कळत नाही. (३४५०)

वृत्तीसी कळे किंवा न कळे । तो इतुकियांत वृत्ति मावळे ।
तरी अशेषत्वें कैसे निवळे । अगोचर ब्रह्म ॥ ५१ ॥
“अभ्यासाने वृत्ती चिद्गगन व्यापते, पण तिला कळते न कळते तोच ती मावळते. मग ते इंद्रियातीत अगोचर ब्रह्म तिला संपूर्णपणे (अशेषत्वाने) कसे कळेल? (३४५१)

तथापि किंचित कळण्याने । वृत्तीने अभिमान माथां घेणें ।
अहंब्रह्मास्मि हें उफाळणे । विघ्नरूप रसास्वादु ॥ ५२ ॥
तथापि तिला जे किंचित ज्ञान होते त्या ज्ञानामळे वृत्ती आपल्याला ज्ञान झाले असा अहंकार घेते. तिचा 'अहं ब्रह्मास्मि' असा अभिमान उफाळून वर येतो. तोच विघ्नरूप रसास्वाद होय. (३४५२)

तरी हा रसास्वादु कैसा जावा । यथार्थ वृत्तीसी कैसा कळावा ।
अभिमानरहित स्वानुभवा । कैसें पावावें ॥ ५३ ॥
पण हा रसास्वाद कसा जाईल? वृत्तीला यथार्थ ज्ञान कसे होईल? आणि अभिमानरहित, स्वानुभव तिला कसा प्राप्त होईल? (३४५३)

साभिमानेंविण शून्य होतें । अभिमानें तों विघ्न उमटते ।
तरी येथील खूण कैशी आहे ते । स्वामी निरोपावी ॥ ५४ ॥
वृत्तीने अभिमान घेतला नाही तर ती शून्याकार होते. अभिमान धारण केला तर हे रसास्वादरूपी विघ्न पुढे उभे राहते. तर या स्थितीत यथार्थ ज्ञानाची काही गुरुकिल्ली असल्यास महाराज, आपण मला ते सांगावे."(३४५४)

ऐसें बोलोनी चरण धरिलें । ऐकतां सद्गुरूही संतोषले ।
ऐक ह्मणती सावधान पाहिलें । वृत्तीसी कळणे कैसें तें ॥ ५५ ॥
असे बोलून रविदत्ताने आचार्याचे पाय धरले. त्याची ती शंका ऐकताच आचार्यांनाही संतोष झाला. ते म्हणाले, "वृत्तीला ज्ञान कसे प्राप्त होते, ते तुला मी सांगतो, ते आता ऐक." (३४५५)

जे कां चिद्गगनीं वृत्ति पसरे । तदाकार होऊनी विघुरे ।
नंतर जें कांही उर्वरित उरे । तेंचि स्वप्रभरूप ॥ ५६ ॥
वृत्ती चिद्गगनात पसरते. ती त्याच्याशी तदाकार होते, पण लगेच मावळते, नंतर जे काही उरते तेच स्वयंप्रकाशी ब्रह्म होय. (३४५६)

पुन्हां तत्क्षणींच वृत्ति उठे । चिद्गगन व्यापून सर्वेचि फाटे ।
दुजी नुठे तोंवरी दाटे । केवल स्वरूप ॥ ५७ ॥
त्याच क्षणी पुन्हा वृत्ती उसळते, चिद्गगन व्यापून लगेच विघुरते, आता पुन्हा दुसरी वृत्ती जोपर्यंत उठत नाही तेवढ्या वेळात जे दाटून भरलेले असते तेच केवळ ब्रह्म होय. (३४५७)

म्हणसी वृत्ति मावळतां निवळे । तें वृत्तीसी केवीं कळे ।
परी वृत्ति उठतां चिद्गगनीं मिसळे । परी तें कळे हे म्हणूनी ॥ ५८ ॥
यावर तू म्हणशील की, वृत्ती मावळल्या बरोबरच ब्रह्म हाताशी लागते. पण मग त्याच वृत्तीला ज्ञान कसे होईल? पण वृत्ती उसळताच लगेच चिदगगनात मिसळते, पण तेव्हाच तिला कळते की, हेच ते ब्रह्म होय. (३४५८)

वृत्ति पदार्थ जरी पाहतां । अमुक कळून मावळे तत्त्वतां ।
हा स्वभावचि वृत्तीचा ऐतां । की कळावें मावळावें ॥ ५९ ॥
वृत्तीने पदार्थ जरी पाहिला तरी तो पदार्थ अमुक अमुक आहे, हे तिला त्यावेळीच कळते. आणि लगेच ती मावळते. हा वृत्तीचा नेहमीचा स्वभाव आहे. तिला ज्ञान होते की ती मावळते, कळावे की लगेच मावळावे (३४५९)

म्हणोनी घटपटाचें जें अज्ञान । निरसून अमुकसें होय ज्ञान ।
जरी मग जातसे मावळून । तरी कळणे तों जाहलें ॥ ६० ॥
म्हणून अगोदर घट, पट इ.चे जे अज्ञान होते त्याचे निरसन होते आणि हा पदार्थ अमुक आहे, असे तिला ज्ञान होते. मग ती लगेच मावळली तरी काही बिघडत नाही. ज्ञान तर झालेले असते ना! (३४६०)

तैशी वृत्ति झेपावे चिद्गगनीं । हें स्वस्वरूप कळे तत्क्षणीं ।
तेव्हांचि जाय जरी वितळूनी । परी अज्ञान तें गेलें ॥ ६१ ॥
त्याप्रमाणे वृत्ती चिद्गगनात झेपते, तेव्हा तिला हे स्वरूप आहे. असे तत्क्षणी कळते. त्याच क्षणी जरी ती वितळून गेली तरी तिचे अज्ञान गेलेले असते. (३४६१)

हे मी ब्रह्म चिद्गगन । एकरस दंडायमान ।
ऐसें वृत्तीसी होय ज्ञान । न कळणे जाउनी ॥ ६२ ॥
तिचे न कळणे (अज्ञान) जाते आणि "हे चिद्गगन एकजिनसी व्यापून राहिलेले ब्रह्म मीच आहे असे वृत्तीला ज्ञान होते. (३४६२)

वृत्ति व्यापतांचि अज्ञान जातें । अमुकसें ब्रह्म निश्चया येतें ।
म्हणसी साभिमानें माथां घेतें । हा उफाळे रसास्वादु ॥ ६३ ॥
वृत्तीने चिद्गगन व्यापिल्याबरोबर तिचे अज्ञान जाते. अमुक अमुक असे ब्रह्म आहे याचा तिला अनुभव येतो आणि त्याचा तिला अभिमान होतो. म्हणजेच तोच रसास्वाद निर्माण झाला असे समजावे. (३४६३)

तरी हा रसास्वादु त्रिपुटि असतां । निःशेष मावळेना तत्त्वतां ।
वस्तुतंत्र निजांगे होतां । तेव्हांचि मावळे ॥ ६४ ॥
हा रसास्वाद त्रिपुटी असेपर्यंत निःशेष नाहीसा होणार नाही. जेव्हा साधक स्वतः वस्तुतंत्र होईल तेव्हाच तो मावळेल. (३४६४)

तोपर्यंत हा अभिमान । पाहिजे तरीच अज्ञान खंडन ।
कर्तृतंत्रत्वें अखंड अनुसंधान । एकतान असावें ॥ ६५ ॥
पण तोपर्यंत हा अभिमान असला पाहिजे. त्यामुळे अज्ञानाचे खंडन होते. आणि त्यासाठी कर्तृतंत्र अखंड आणि एकतान अनुसंधान राखावे. (३४६५)

हे ध्येयध्यानरूप कर्तृतंत्रता । चिरकाळ राहे जरी स्थिरता ।
येणेंचि वस्तुतंत्र अभिन्नता । होय हळुहळू ॥ ६६ ॥
ध्येय-ध्यान याप्रकारची ही कर्तृतंत्रता चिरकाळ स्थिर राहिली तरच त्यायोगाने वस्तुतंत्र अभिन्नता हळूहळू साध्य होईल. (३४६६)

दृढ अपरोक्ष जाहलियावरी । की अंगें निर्विकल्प निर्विकारी ।
हें विघ्न रसास्वादाचें निर्धारी । मावळोनि जाय ॥ ६७ ॥
त्यानंतर हे दृढ अपरोक्ष (साक्षात) ज्ञान झाल्यानंतर साधक स्वतः निर्विकल्प निर्विकारी होऊन त्याचे हे रसास्वादाचे विघ्न नाहीसे होते. (३४६७)

तों काल हा रसास्वादु । साभिमानरूप ब्रह्म आल्हादु ।
उपयोगी वृत्तीचा छंदु । अन्य विघ्ने निवारी ॥ ६८ ॥
तोपर्यंत हा अभिमानरूप ब्रह्मानंदाचा आस्वाद देणारा रसास्वाद उपयुक्त असून वृत्तीचा छंद वाढवतो आणि त्याबरोबरच इतर विघ्नांचेही निराकरण करतो. (३४६८)

विक्षेपाची नरडी पिळी । लयाची खांदून काढी मुळी ।
कषायातें धरून आफळी । हा रसास्वादु ॥ ६९ ॥
हा रसास्वाद विक्षेपाचे नरडे पिळून टाकतो, लयाची मुळी खांदून काढतो आणि कषायाला पकडून आपटतो. (३४६९)

तस्मात् हा जरी विघ्नकर । परी आरंभी होतसे सुखकर ।
अन्य विघ्नांसी करी संहार । आणि ब्रह्मानंद वाढवी ॥ ७० ॥
त्यामुळे हा रसास्वाद जरी विघ्नरूप असला तरी आरंभी सुखकारक असतो. तो इतर विघ्नांचा संहार करतो आणि ब्रह्मानंद वाढवतो. (३४७०)

विघ्नत्रय निःशेष निमालें । वृत्तीसी ज्ञान जरी दृढ जाहलें ।
पुढे हे भिन्नत्वें विघ्न दिसलें । सुलीन नव्हे म्हणोनी ॥ ७१ ॥
तिन्ही विघ्नांचा संपूर्ण बीमोड झाला, वृत्तीला दृढ ज्ञान झाले आणि त्यानंतर साधक ब्रह्मास्वादात सुलीन झाला नसल्याने भिन्नत्वाने दिसणारे हे विघ्न उद्भवले, तरी ते अहितकारक नाही. (३४७१)

परी आधीं वृत्तीसी पुरतें । ज्ञान व्हावें ब्रह्मींचे ऐतें ।
पुढें आपेआप रसास्वादातें । घात होय निर्विकल्पी ॥ ७२ ॥
परंतु आधी ब्रह्मसुखाचे पूर्ण ज्ञान वृत्तीला झाले पाहिजे. त्यानंतर निर्विकल्प झाल्यानंतर त्या रसास्वादाचे आपोआप निर्मूलन होते. (३४७२)

अगा बापा हे रविदत्ता । जरी हे वृत्ति व्याप्ति होय तत्त्वतां ।
इसीच ब्रह्मविद्या नांव पाहतां । ठेविती ज्ञाते आणि वेद ॥ ७३ ॥
अरे रविदत्ता, वास्तविक पाहता ही वत्तिव्याप्तीच होय. तरी तिलाच ज्ञाते आणि वेद ब्रह्मविद्या असे नाव देतात. (३४७३)

हे ब्रह्मविद्या चिद्गगनीं अपार । पावोनि राहे तत्तदाकार ।
तरीच अज्ञानरूप अंधकार । फिटेल तत्क्षणीं ॥ ७४ ॥
ही ब्रह्मविद्या अपार अशा चिद्गगनात पसरून तदाकार होते तेव्हाच अज्ञानरूप अंधकार लगेच नष्ट होतो. (३४७४)

ये-हवीं या ब्रह्मविद्येविण । जरी अभ्यासिलें समाधिसाधन ।
उगेंचि स्थिर केलें बुद्धि मन । तरी व्यर्थ जाय सर्व ॥ ७५ ॥
पण या ब्रह्मविद्येचा आश्रय न करता समाधिरूप साधनाचा अभ्यास केला म्हणजे बुद्धी आणि मन स्थिर करण्याचा प्रयत्न केला तरी सर्व व्यर्थ होते. (३४७५)

तिन्हीही विघ्नं निरसलीं । ब्रह्मकार वृत्ति जाहली ।
चिद्गगनाकारें एकरसली । हेचि ब्रह्मविद्या ॥ ७६ ॥
तिन्ही विघ्नांचे निरसन झाले, वृत्ती ब्रह्माकार झाली, आणि चिद्गगनात एकरस होऊन गेली की, तिलाच ब्रह्मविद्या असे नाव प्राप्त होते. (३४७६)

हे ब्रह्मविद्याचि अज्ञान नाशी । आणि आपणही उरेना आपैसी ।
पूर्ण ब्रह्म अखंडेकरसीं । मावळून जाय ॥ ७७ ॥
ही ब्रह्मविद्याच अज्ञानाचा नाश करते आणि नंतर आपणच स्वतः नष्ट होऊन जाते. मागे उरत नाही. पूर्ण अखंड ब्रह्मरसात ती एकरस होऊन मावळून जाते. (३४७७)

तस्मात् अज्ञान नासावया थोर । हे ब्रह्मविद्याचि ब्रह्माकार ।
अज्ञान नासूनियां समग्र । स्वयेंही नासे ॥ ७८ ॥
तेव्हा अज्ञान नष्ट करण्यास ही ब्रह्मविद्याच फार उपयुक्त आहे. अज्ञान न करून स्वतः ब्रह्माकार होऊन नष्ट होऊन जाते. त्यामुळे अज्ञान नष्ट करण्यासाठी ब्रह्माकार असलेली ही ब्रह्मविद्या समर्थ आहे. समग्र अज्ञान नष्ट झाल्यानंतर ती स्वतःसुद्धा नष्ट होते. (३४७८)

म्हणोनि अज्ञान नासावयापुरती । ज्ञाते वृत्तिव्याप्ति अपेक्षिती ।
परंतु जीवव्याप्ति न स्वीकारिती । प्रयोजनाभावीं ॥ ७९ ॥
म्हणून अज्ञान नष्ट होईपर्यंत ज्ञाते लोक या वृत्तिव्याप्तीचा स्वीकार करतात. परंतु जीवव्याप्तीचा मात्र तिचे प्रयोजन नसल्यामुळे स्वीकार करत नाहीत. (३४७९)

बाह्य पदार्थ घटादिक । तेथें वृत्ति होय घटरूपक ।
हा स्थूलउदर सानमुख । ऐसें ज्ञान करी ॥ ८० ॥
घट इ. जे बाह्य पदार्थ असतात ते पहात असताना वृत्ती घटरूप धारण करते. हा पदार्थ स्थूल पोटाचा लहान मुखाचा आहे असे ज्ञान तिला होते. (३४८०)

हे ज्ञान होतांचि अज्ञान । घटाचें नासून जाय संपूर्ण ।
परी त्या वृत्तीसी पाहिजे स्फुरण । जीवचैतन्याचे ॥ ८१ ॥
हे ज्ञान होताच तिचे घटाबद्दलचे सर्व अज्ञान नष्ट होते. पण घटाचे अज्ञान नष्ट होऊन हा घट आहे असे ज्ञान होण्यास तिला जीवचैतन्याचे स्फुरण आवश्यक असते. (३४८१)

वृत्तीही असे परप्रकाशक । घट तो जड अप्रकाशक ।
म्हणोनि जीव स्फुरद्‌रूपक । पाहिजे उभयां ॥ ८२ ॥
वृत्तीसुद्धा परप्रकाशच असते. घट तर बोलून चालून जड आणि अप्रकाशक असतो. म्हणून वृत्ती आणि घट या दोघांना प्रकाशित करण्यासाठी स्फुरण स्वरूप असलेल्या जीवाची अपेक्षा असते. (३४८२)

तैसें नलगे ब्रह्माकारतेसी । वृत्तीच एक अज्ञान नाशी ।
जीव नलगे स्फुरवावयासी । ब्रह्म प्रकाशें प्रकाशित ॥ ८३ ॥
पण ब्रह्माकारतेला जीवाची गरज नसते. एकटी वृत्तीच अज्ञान नष्ट करण्यास समर्थ असते. तिला स्फुरविण्यासाठी जीवाची आवश्यकता नाही. कारण ती प्रत्यक्ष ब्रह्माच्या प्रकाशाने प्रकाशित झालेली असते. (३४८३)

जैसें अंधारी पदार्थ पहावया । अपेक्षिजे चक्षु दीपां उभयां ।
तैसे घटादि जड म्हणूनियां । जीव वृत्ति दोन्ही असावें ॥ ८४ ॥
ज्याप्रमाणे अंधारातील पदार्थ पहाण्यासाठी डोळे आणि दिवा या दोघांची अपेक्षा असते. त्याप्रमाणे घटादी पदार्थ जड असल्यामुळे जीव आणि वृत्ती या दोघांची अपेक्षा करतात. (३४८४)

दीपचि नुसधा जरी पाहणे । तरी चर्च एक पुरें होणे ।
तैसें ब्रह्मतत्त्व जरी अवलोकनें । तरी वृत्तीच एक पुरे ॥ ८५ ॥
पण नुसता दिवाच पहावयाचा असल्यास फक्त डोळेच पुरेसे आहेत. त्याप्रमाणे ब्रह्मतत्त्वाचेच अवलोकन करावयाचे झाल्यास एकटी वृत्ती पुरेशी आहे. (३४८५)

ब्रह्म स्वतां प्रकाशघन । तेणें चित्तवृत्ति प्रकाशमान ।
म्हणूनि नलगे जीवाचें स्फुरण । वृत्ति मात्र असावी ॥ ८६ ॥
ब्रह्म स्वतःच प्रकाशमय आहे. त्याच्यामुळेच चित्तवृत्तीही प्रकाशमान होतात. म्हणून ब्रह्म पहाण्यासाठी जीवाच्या स्फुरणाची गरज नाही. एक वृत्ती मात्र असावी. (३४८६)

तेही वृत्ति अज्ञान जोवरी । अपेक्षिजे ब्रह्माकारी ।
निपटून अज्ञान जातां झडकरी । मावळे हा स्वभाव ॥ ८७ ॥
ती वृत्तीसुद्धा ब्रह्मरूपाचे अज्ञान असेल तोपर्यंतच असावी. अज्ञान ज्यावेळी संपूर्णपणे नष्ट होईल तेव्हा ताबडतोब वृत्तीचा हा स्वभाव मावळतो. (३४८७)

म्हणसी वृत्ति जोवरी आहे । तोवरी जीव ही प्रतिभासत्वें राहे ।
पाणी तेथें प्रतिबिंब लाहे । तरी अवधारी ॥ ८८ ॥
तू यावर म्हणशील की, वृत्ती जोपर्यंत आहे, तोपर्यंत जीव हा प्रतिबिंबाच्या भासाच्या रूपाने असणारच. पाणी असेल तेथे प्रतिबिंब असणारच. तर त्याचे उत्तर ऐक. (३४८८)

जरी पाणियांतील प्रतिबिंब असे । परी तें छायेमाजी विशेष दिसे ।
तेंचि असोनियां समरसे । केवळ उष्णामाजीं ॥ ८९ ॥
जर पाण्यात प्रतिबिंब असेल तर ते सावलीत स्पष्टपणे दिसते. पण उन्हामध्ये पाणी असेल तर त्यातील प्रतिबिंब उन्हातच मिसळून जाते. (३४८९)

तैसा वृत्तीस्तव जीव असिला । परी ब्रह्मप्रकाशी लोपून गेला ।
तो प्रकाशीना ब्रह्माकारतेला । मग असे तरी कैसा ॥ ९० ॥
त्याप्रमाणे वृत्तीमध्ये जीव असला तर तो ब्रह्मप्रकाशातच लोपून जातो. तो काही ब्रह्मस्वरूपाला प्रकाशित करू शकत नाही. मग तो असला काय आणि नसला काय. सारखेच (म्हणजे त्याच्या असण्याचा काय उपयोग?) (३४९०)

आणीकही एक परिहार असे । जीवत्वाचा अभावचि होतसे ।
पाणियांत बिंब बुडतां जैसें । प्रतिबिंब पडेना ॥ ९१ ॥
तुझ्या शंकेचा परिहार आणखीही एका वेगळ्याप्रकारे करता येतो. सूर्याचे बिंब पाण्यातच बुडाले तर त्याचे प्रतिबिंबच दिसणार नाही. सूर्याप्रमाणे जीवाचाही अभाव संभवतो. (३४९१)

जोवरी बिंब पाणियाहूनि वेगळें । तोवरी प्रतिबिंब आहे ऐसें कळे ।
जरी सूर्य पाणी एकत्र मिसळे । तेव्हां प्रतिबिंब कैचें ॥ ९२ ॥
जोपर्यंत बिंब पाण्याहन वेगळे होते, तोपर्यंत प्रतिबिंब आहे, असे कळत होते. पण जर सूर्य आणि पाणी एकत्र मिसळतील तेव्हा प्रतिबिंब कसे असेल? (३४९२)

तैसी ब्राह्मस्वरूपाहूनि वेगळी । वृत्ति पडून विषय न्याहाळी ।
ह्मणून आभास जीवाची झळझळी । उमटली वृत्तीमाजीं ॥ ९३ ॥
त्याप्रमाणे वत्ती जेव्हा ब्रह्मस्वरूपाहन वेगळी पडून विषयांचे निरीक्षण करते तेव्हा आभासरूप जीवाची झळझळ वृत्तीमध्ये उमटते. (३४९३)

ते वृत्ति ब्रह्माकार जाहली । बिंबात्मया मिसळूनि गेली ।
तरी जीवत्वाची कोठे उमटली । आभासता सांगा ? ॥ ९४ ॥
ती वृत्ती ब्रह्माकार होऊन ब्रह्मात्म्यामध्ये मिसळून जाते तेव्हा जीवात्म्याचे आभासित प्रतिबिंब कोठे पडेल, सांग बरे! (३४९४)

एवं जीवत्वाचा निःशेष अभाव । वृत्तिव्याप्तीचा मात्र गौरव ।
तेही नासूनि जाय स्वयमेव । अज्ञान नासूनी ॥ ९५ ॥
अशा प्रकारे जीवत्वाचा निःशेष (संपूर्ण) अभाव होतो तेव्हाच वृत्तिव्याप्तीचे फक्त महत्त्व असते. ती वृत्तिव्याप्तीही अज्ञान नष्ट करून अखेर स्वतःच नष्ट होते. (३४९५)

अमुक हे ब्रह्म ऐसे कळे । हेंचि ज्ञानवृत्तीसी निवळे ।
तेव्हांचि अज्ञान निःशेष मावळे । पुढे ज्ञातता उरे ॥ ९६ ॥
ब्रह्म म्हणजे नेमके काय हे वृत्तीला कळणे, हेच तिचे ज्ञान होय. हेच ज्ञान वृत्तीला स्पष्ट कळते तेव्हा अज्ञान संपूर्णपणे नष्ट होते आणि नंतर केवळ ज्ञातता उरते. (ओ. ३०३९ ते ३०४१ पहा). (३४९६)

जैशी घटाकार वृत्ति जाहली । परी घटबुद्धि नाहीं उठली ।
तेचि अज्ञातता संचली । न कळणे घटाचें ॥ ९७ ॥
घट पाहात असताना वृत्ती घटाकार होते. पण हा अमुक पदार्थ (घट) असे तिला कळत नाही. हे घटाविषयीचे अज्ञान वृत्तीला व्यापते तीच अज्ञातता व्यापून राहते. (पहा ओ. ३०३१ ते ३०३५) (३४९७)

पुढे हा घट ह्मणोनि कळला । तेव्हां न कळण्याचा भाव नासला ।
ऐसें अज्ञान जातांच नाश वृत्तीला । तैसाचि भाव येथींचा ॥ ९८ ॥
नंतर हा घट आहे असे तिला कळते तेव्हा तिचे न कळणे म्हणजे अज्ञान नष्ट होणे होय. अज्ञान जेव्हा नष्ट होते. त्याबरोबरच वृत्तीही नष्ट होते. तशीच स्थिती येथेही होते. (३४९८)

स्वरूपी वृत्ति जेव्हां उद्भवली । तेव्हांचि ब्रह्मस्वरूपा विसरली ।
अन्य पदार्थचि पाहू लागली । हेंचि न कळणे अज्ञान ॥ ९९ ॥
स्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा वृत्ती उद्भवते तेव्हाच तिला ब्रह्मस्वरूपाचे विस्मरण होते आणि ती अन्य पदार्थ पाह लागते. हेच तिचे न कळणे म्हणजे अज्ञान होय. (३४९९)

प्रस्तुत आतां अभ्यासेंकडून । अंतर्बाह्य संधि साधून ।
तिन्हीही विघ्ने निरसून । ब्रह्मीं वृत्ति झेंपावली ॥ ३५०० ॥
आता प्रस्तुत विषयाकडे वळतो. अभ्यासाच्या साहाय्याने अंतर्बाह्य संधी साध्य करून, तिन्ही विघ्नांचे निरसन झाल्यानंतर वृत्ती ब्रह्माकडे झेप घेते. (३५००)

झेंपावतांचि पहिलें अज्ञान । की जोवरी जाहलें नव्हतें विवेचन ।
तें स्वरूपचि भाविलें दृश्यत्वें गगन । विचारिलें नाहीं तें ॥ १ ॥
तिने झेप घेतल्यानंतर ब्रह्मासंबंधी विवेचन झालेले नसल्यामुळे तिच्या ठिकाणी मूळचे जे अज्ञान होते, त्यामुळे आकाशाचे जे दृश्यत्व अनुभवाला येत होते. त्यामुळे त्या दृश्य आकाशालाच ती स्वरूप मानन बसली. जोपर्यंत तिने विचार केला नव्हता तोपर्यंत तिची धारणा आकाश हेच ब्रह्म अशी होती.(३५०१)

तेंचि श्रवणमननें शोधिलें । ब्रह्म आकाश भिन्न निवडिलें ।
यथार्थ ब्रह्मींचे लक्षण कळलें । तेव्हां समाधिकाळी पाहे ॥ २ ॥
तेच श्रवण मनन झाल्यानंतर तिला वस्तुस्थितीचे भान झाले. मग त्या ज्ञानामुळे तिने आकाश आणि ब्रह्म वेगवेगळे निवडून काढले. तिला ब्रह्माची यथार्थ लक्षणे कळली. त्यानंतर समाधीमध्ये ती ब्रह्मस्वरूप अनुभवू शकली. (३५०२)

सूक्ष्म पंचभूत जें आकाशी । तें गाळून सांडिले जडत्वेंसी ।
उर्वरीत उरे में अविनाशी । अभिन्नत्वें प्रतीतीस आणी ॥ ३ ॥
आकाशात जी सूक्ष्म पंचभूते होती ती जड असल्यामुळे ती चाळणी लावून बाजूला काढली. नंतर जे अविनाशी असे ब्रह्मतत्त्व उरले त्याचा तिला अभिन्नत्वाने प्रत्यय आला.(३५०३)

व्यापक परिपूर्ण चिद्गगन । जें त्रिधा परिच्छेदविहीन ।
आणि त्रिविधभेदशून्य । ऐसें कळे वृत्तीसी ॥ ४ ॥
चिद्गगन हे व्यापक आणि परिपूर्ण आहे. त्याच्या ठिकाणी सजातीय, विजातीय आणि स्वगत असे तीन भेद नाहीत. ब्रह्माच्या ठिकाणी कालपरिच्छेद, देशपरिच्छेद आणि वस्तुपरिच्छेद असे तीन भेद नाहीत. असे वत्तीला ज्ञान होते. (३५०४)

स्वरूप एक नाहीं दुसरें । चिद्‌रूप ज्ञानघन निर्विकारें ।
दृष्टांतही नसे साचोकारें । निरुपम सहज ॥ ५ ॥
स्वरूप हे एकमेव आहे. त्याखेरीज दुसरे तत्त्वच अस्तित्वात नाही. ते चिद्रूप, ज्ञानघन आणि निर्विकार (विकाररहित) आहे, त्याला कशाचाही दृष्टान्त देता येत नाही. म्हणन निरुपम असे आहे. (३५०५)

गगन होतें दृष्टांती दिधलें । तेंही शोधनें मिथ्या जाहलें ।
उर्वरित ऐक्यत्वा पावलें । आतां उपमा कैंची ॥ ६ ॥
अगोदर स्वरूपासाठी आकाशाचा दृष्टान्त दिला होता. पण तिच्या चाळणीमुळे (सूक्ष्म शोधामुळे) तेही मिथ्या ठरले. त्यानंतर जे उरले त्याच्याशी तर ती एकरूप होऊन गेली. मग उपमा कशी संभवेल? (ब्रह्माशिवाय दुसरे काहीच उरत नाही. (३५०६)

चिद्‌रूप दुसरेंचि असेना । अर्थात् सजातीय भेदाची खंडना ।
जीवेश प्रतिबिंबे ती सत्य असतीना । तरी सद्‌रूपा दुजा कोण ॥ ७ ॥
दुसरे चिद्रूप अस्तित्वातच नाही. त्यामुळे साहजिकच सजातीय भेदाचे खंडन झाले. जीव आणि ईश्वर ही दोन्ही तत्त्वे आभासरूप प्रतिबिंबे सत्य नाहीत. तेव्हा सद्रूपाशिवाय दुसरे कोणते तत्त्व असू शकेल? (३५०७)

जग जडत्वें होतें भाविलें । अथवा शून्यत्वें गगनसें कल्पिलें ।
तें तों विचारें नाहींसें जाहलें । आतां विजातीय भेद कैंचा ॥ ८ ॥
जग तर जड मानलेलेच होते, आकाशही शन्यत्वामळे चिद्रपासारखे मानले होते. पण विचाराअंती दृष्टान्तासाठी ही दोन्ही तत्त्वे निरुपयोगी ठरली. तेव्हा ब्रह्मामध्ये विजातीय भेदही रहात नाही. (३५०८)

कांही अवयव असतीना । स्फुरणाची तरी मिथ्या लक्षणा ।
म्हणून स्वगत भेद आढळेना । एकरस चिद्गगन ॥ ९ ॥
त्याला आकार नसल्यामुळे त्याच्या ठिकाणी अवयव नाहीत. त्यावर वाऱ्याच्या झुळुकीसारखे जे स्फुरण उठते असे मानले होते तेही मिथ्या ठरले. तेव्हा ब्रह्माच्या ठिकाणी स्वगत भेदही आढळत नाही. ब्रह्म अथवा चिद्गगन एकजिनसी आहे, एकरस आहे. (३५०९)

एवं सजातीय विजातीय । आणि स्वगत भेद जो होय ।
हे खंडिलिया चिद्गगन अद्वय । वृत्तीसी कळों आलें ॥ १० ॥
सजातीय, विजातीय आणि स्वगत या तीन भेदांचे खंडन झाल्याबरोबर चिद्गगन हे एकमेव, अद्वितीय आहे. हे वृत्तीला कळले. (३५१०)

तें चिद्गगन अमुक देशी असे । आणि दुजिया देशी नसे ।
ऐसें नाहीं तें व्यापिलें असे । दशदिशां एकरूप ॥ ११ ॥
ते चिद्गगन अमुक देशात आहे. आणि दुसऱ्या देशात नाही अशा प्रकारचे नाही. ते सर्वत्र व्यापून आहे. सर्व दाही दिशांमध्ये ते एकरूपच आहे. (३५११)

ऐसा देशतां जो परिच्छेद । हा तुटोनि गेला मानिला जो भेद ।
ओतप्रोत एकरस अभेद । परिपूर्ण कोंदलें ॥ १२ ॥
अशा प्रकारे जो देश परिच्छेद ब्रह्माच्या ठिकाणी मानला होता त्याचे खंडन झाले. हा जो भेद मानला होता तो नष्ट झाला. तेव्हा ब्रह्म हे ओतप्रोत, एकरस, अभिन्न आणि सर्वत्र दाटून राहिले आहे असे वृत्तीला कळले. (३५१२)

आतां समाधिकाळी हे प्रगटलें । नातरी नाहींसे कधीं होतें जाहलें ।
संचलें होतें तेंचि अवलोंकिले । आतां सामान्य वृत्ति ॥ १३ ॥
आता समाधिकाळी ते प्रगट झाले असले तरी ते इतर काळी कधी नव्हते? जे सर्वत्र दाटून राहिलेले होते तेच समाधिकाळात सामान्य वृत्तीने पाहिले इतकेच. (३५१३)

अनंत युगें अनंत कल्प । होती जाती आपेआप ।
परी एकरूप सचिद्‌रूप । आदिअंती संचलें ॥ १४ ॥
अनंत युगे, अनंत कल्पे, होतील आणि जातील, परंतु सच्चिद्रूप हे आदी आणि अंती जसेच्या तसे व्यापून राहिलेलेच आहे. (३५१४)

आतां काळ परिच्छेद कोठे । पाहतां न पाहतां पूर्ण दाटे ।
पाहणारचि मात्र उठोनि आटे । परी तें संचलें एकरूप ॥ १५ ॥
आता कालपरिच्छेद कोठे राहिला? चिद्वस्तूकडे पाहिले काय आणि न पाहिले काय ते सर्वत्र पूर्णपणे दाटून राहिले आहे. त्याला पहाणाराच उत्पन्न होतो, आणि नाहीसाही होतो. परंतु ते चिद्रूप मात्र एकरूप असेच दाटून राहिलेले असते. (३५१५)

अमुक एक वस्तु उद्भवली । त्यांत चिद्‌रूपता नाहीं संचली ।
ऐसें नाहीं सर्वी व्यापली । तेव्हां वस्तुपरिच्छेद नसे ॥ १६ ॥
अमुक वस्तू उत्पन्न झाली आणि त्यात चिद्रूपता व्यापलेली नाही, असे कधीच होत नाही. यावरून चिद्वस्तूच्या ठिकाणी वस्तुपरिच्छेद नाही, हे स्पष्ट आहे. (३५१६)

एवं देशतां कालतां वस्तुतां । भेद नाही स्वरूपी तत्त्वतां ।
ऐसे वृत्तीसी अखंडिता । ज्ञान हे ठसावे ॥ १७ ॥
अशा प्रकारे देश, काल, वस्तू या कोणत्याही प्रकारचे भेद स्वरूपाच्या ठिकाणी नाहीत. हे ज्ञान वृत्तीच्या ठिकाणी अखंडितपणे ठसावे. (३५१७)

वृत्ति उठतांचि पसरून वितुळे । परी अंत लागेना की केवढे सगळे ।
परी हेंचि ब्रह्म ह्मणोनि कळे । जरी मावळे पुनःपुन्हां ॥ १८ ॥
वृत्ती उत्पन्न होताच लागलीच पसरते आणि वितळून जाते. पण स्वरूप केवढे आहे याचा तिला अंत लागत नाही. परंतु जरी ती पुन्हा पुन्हा मावळत असली तरी ब्रह्म ते हेच अशी तिची खात्री पटलेली असते. (३५१८)

एवं सजातीयादि भेदरहित । की त्रिधा परिच्छेदेंविण अखंडित ।
अथवा वृत्तीसी न लागे अंत । ह्मणोनि अनंत पूर्ण ॥ १९ ॥
अशा रीतीने ब्रह्माच्या ठिकाणी सजातीयादी भेद नाहीत, त्याच्या ठिकाणी तीन प्रकारचे परिच्छेद नाहीत, ते अखंडित आहे, अथवा वृत्तीला त्याचा अंत लागत नाही या सर्व कारणांमुळे ब्रह्म हे अनंत आणि पूर्ण आहे. (३५१९)

आणीकही सच्चिदानंदादि लक्षण । वृत्तीसी कळों येती भिन्नभिन्न ।
हे पुढील श्लोकीं असे निरूपण । येथे कळती ह्मणून बोलिलें ॥ २० ॥
वृत्तीला ब्रह्माची आणखीही सच्चिदानंद इ. लक्षणे कळायला लागतात. हे पुढील श्लोकामध्ये स्पष्ट केले जाणारच आहे. येथे ती लक्षात येतात म्हणून सांगितली आहेत. (३५२०)

ऐसें सच्चिदानंद अनंत । चिद्गगन परिपूर्ण सदोदित ।
सामान्य वृत्तीसी जेव्हां कळत । तत्क्षणीं अज्ञान नासे ॥ २१ ॥
अशा प्रकारे चिद्गगन हे सच्चिदानंद, अनंत, परिपूर्ण, नित्य उदित, आहे असे सामान्य वृत्तीला जेव्हा कळते, त्या क्षणी तिचे अज्ञान नष्ट होते. (३५२१)

अधोमुख जो वृत्तीचा बोध । मनादि विषयान्त होता अमोघ ।
तेव्हां हाचि सत्य होता संघ । स्वरूप ज्ञान नव्हतें ॥ २२ ॥
जेव्हा वृत्तीचा प्रवाह मनापासून ते इंद्रियापर्यंत असा अधोमुख होता त्यावेळीही हा सर्व संघ सत्य होताच. पण स्वरूपज्ञान झालेले नव्हते. (३५२२)

तेचि अभ्यासें विकल्पादिक । सांडिलें मन बुद्ध्यादि अनेक ।
एकलें सामान्यवृत्तीचे कौतुक । उरलें तें ब्रह्माकार जाहलें ॥ २३ ॥
मग अभ्यासाने विकल्प इ. चा त्याग केला. मन, बुद्धी इ. अनेक तत्त्वांचाही त्याग केला तेव्हा सामान्यवृत्तीच फक्त उरली आणि ती ब्रह्माकार झाली. (३५२३)

अधोमुख तें उर्ध्व जाहलें । वृत्तीचे मुख ब्रह्मी पसरलें ।
तेव्हां हेंचि ब्रह्म ह्मणोनि कळलें । बोलिल्या क्षणीं ॥ २४ ॥
वृत्ती प्रथम अधोमुख म्हणजे इंद्रिय विषयानुगामी होती. पण ती ऊर्ध्वमुख म्हणजे ब्रह्मसन्मुख झाली. वृत्तीचे मुख ब्रह्माकडे पसरले, तेव्हा हेच ते ब्रह्म असे तिला बोलताक्षणीच वाटले. (३५२४)

पहिले ओत प्रोत जें अखंड । वृत्तीसी ठाउके नव्हतें उदंड ।
माया अविद्येचेंचि माजलें बंड । हेंचि अज्ञान दृढ होते ॥ २५ ॥
प्रथम जे ओतप्रोत असून अखंड आहे असे ब्रह्मस्वरूप वृत्तीला माहीतच नव्हते. कारण तिच्यावर माया अविद्या यांचा मोठा प्रभाव होता. हेच तिचे अज्ञान दृढ झाले होते. (३५२५)

तेचि वृत्ति हे अधोमुखता । सांडोनि परतलीसे तत्त्वतां ।
चिद्गगनाकार होत्साता । ज्ञान होतें जाहलें ॥ २६ ॥
तीच वृत्ती आपली अधोमुखता टाकून परत फिरते. त्यानंतर ती चिद्गगनाकार होते. आणि तिला ज्ञान प्राप्त होते. (३५२६)

तेव्हां न कळणे गेलें वृत्ती । हे मी ब्रह्म ह्मणून कळे साचें ।
इतुकेंचि काज वृत्ति व्याप्तीचें । जीवाचे अभावी ॥ २७ ॥
त्यावेळी वृत्तीचे न कळणे म्हणजे अज्ञान नाहीसे होते. आणि आपणच ब्रह्म आहोत असे ज्ञान तिला होते. जीवाच्या अभावी वृत्तिव्याप्तीचे एवढेच कार्य असते. (३५२७)

ऐसी वृत्तीसी ब्रह्माकारता । होऊन वितुळे परी मागुता ।
होत असे तदाकारता । हेचि ब्रह्मविद्या ॥ २८ ॥
अशा त-हेने वृत्तीला ब्रह्माकारता प्राप्त होते. त्याबरोबर ती लगेच लोप पावते. वृत्तीचे तदाकार होणे हीच ब्रह्मविद्या होय. (३५२८)

मग त्या वृत्तीसी फुज दाटे । आश्चर्यवत मानीतसे नेटें ।
ह्मणे हे येवढे स्वस्वरूप घनदाटे । असतां विसरलें होतें की ॥ २९ ॥
मग त्या वृत्तीला अभिमान वाटायला लागतो. तिला आपल्या या ज्ञानाचे मोठे आश्चर्य वाटते. ती म्हणायला लागते की, मी एवढे घनदाट स्वस्वरूपच असताना ते विसरूनच गेले होते. (३५२९)

आतां अनंत जन्मींचे सुकृत । एकाएकी वाढलें अद्भुत ।
ब्रह्मज्ञान जाहलें ओतप्रोत । तें चिद्गगन अपार ॥ ३० ॥
आता माझे अनंत जन्मांचे पुण्य एकाएकी पूर्वी कधी नव्हते एवढे वाढले. मला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. ते अमर्याद असे चिद्गगनच मी स्वतः झाले. (३५३०)

ऐसा कुंज दाटतां वृत्ती । विकल्पाची होय उत्पत्ति ।
जरी तदाकारता जाहली मागती । तरी उफाळे विकल्प ॥ ३१ ॥
वृत्तीला असा गर्व दाटून आल्यामुळे विकल्पाची उत्पत्ती झाली. त्यानंतर जरी तिला तदाकारता (ब्रह्माकारता) प्राप्त झाली तरी पुन्हा विकल्प उफाळून येतो. (३५३१)

ब्रह्माकार जाहलों स्वतः । ऐशीच उठों लागे अहंता ।
हाचि रसास्वादु तत्वतां । उठतां समाधि भंगे ॥ ३२ ॥
वृत्तीचा हा गर्व म्हणजेच साधकाचा गर्व होय. "मी स्वतः ब्रह्म झालो" असा अहंकार त्याच्या मनात निर्माण होतो. खरे पाहिले असता हाच रसास्वाद होय. तो उत्पन्न होताच समाधीचा भंग होतो. (३५३२)

ह्मणोनि रसास्वादु विघ्नकर । लीन वृत्ति जे ब्रह्माकार ।
उसळून होतसे विकल्पाकार । अहंब्रह्म साभिमानें ॥ ३३ ॥
म्हणून रसास्वाद हा विघ्न ठरतो. त्यामुळे ब्रह्माकार लीन झालेली वृत्ती उसळून विकल्पाकार होते. हे 'अहं ब्रह्माऽस्मि' या अभिमानामुळे होते. (३५३३)

येथे साधकें एक करावें । तदाकारतेसी न सोडावें ।
उसळतांची पुनःपुन्हां जिरवावें । न द्यावें विकल्पा हातीं ॥ ३४ ॥
अशा वेळी साधकाने एक करावे. ती तदाकारता (ब्रह्माकारता) प्राप्त झालेली असता ती सोडू नये. वृत्ती पुन्हा पुन्हा उसळत असता तिला तसेच जिरवावे. विकल्पांच्या हाती मात्र तिला सोपवू नये. (३५३४)

वृत्ति उठतां चिद्गगनीं । पसरून मावळे तत्क्षणीं ।
तया मावळणियाचे साक्षपणीं । सहजत्वे असावें ॥ ३५ ॥
वृत्ती उठताच ती चिद्गगनात पसरून त्याच क्षणी मावळते. त्या मावळण्याचा आपण सहज साक्षीदार व्हावे. (३५३५)

वृत्ति उठो की पसरो सहज । परी तयेसी नाहीं काज ।
साक्षित्व साक्षित्वाचिये शेज । पासून न चळावें ॥ ३६ ॥
वृत्ती उठो की पसरो तिला दुसरे कामच नसते. आपल्या साक्षित्वाच्या शे साक्षित्वाला ढळू देऊ नये. (३५३६)

वृत्ति उठे पसरे मावळे । ते जयाच्या साक्षीने कळे ।
तें कळणे कळणियासी निवळे । तेंचि लक्षावें एकरूप ॥ ३७ ॥
वृत्ती उठते, पसरते, मावळते. हे सर्व ज्याच्या साक्षीने क कळणेपण ज्ञानामुळेच स्पष्ट होते. त्याच्याशी एकरूप होऊन त्यावरच आपले लक्ष केन्द्रित करावे. (३५३७)

तरीच वृत्ति विकल्पाकडे । साभिमानें न पवाडे ।
साक्षीमाजींच उठे बुडे । सुलीनता तदाकार ॥ ३८ ॥
असे केल्याने वृत्ती अभिमान धरून विकल्पाच्या तावडीत सापडत नाही. ती त्या साक्षिभावातच उठते आणि त्यातच विलीन होते. वृत्तीचे तदाकार होणे हीच सुलीनता होय. (३५३८)

हे तदाकारता चिद्गगनगोचर । वृत्ति राहे सामान्यत्वें स्थिर ।
जरी अहंब्रह्मास्मि सूक्ष्म उद्गार । परी विकल्पाकडे न ये ॥ ३९ ॥
ही तदाकारता चिद्गनगोचर (चिद्गगनाचा अनुभव घेणारी) असून वृत्ती सामान्यत्वाने स्थिर असते. तिच्यामध्ये 'अहं ब्रह्मास्मि'चा सूक्ष्म उद्गार उठत असला तरी ती विकल्पाकडे येत नाही. (३५३९)

त्रिपुटी रूप ध्येय ध्यान । ध्याता ध्येयी समरस होणें ।
ध्येयाकारें वृत्तीचे स्थिरपण । ध्याता आपण नुठे जरी ॥ ४० ॥
म्हणून त्रिपुटीरूप ध्येय, ध्यान आणि ध्याता ही ध्येयामध्ये समरस होणे आवश्यक आहे. वृत्ती ध्येयाच्या रूपाने स्थिर होते. त्या ध्यानामध्ये ध्याता स्वतः उठत नाही. (३५४०)

हाचि अभ्यास क्षणक्षण । वाढवावा अभ्यासेंकडून ।
हळुहळू ध्याता ध्यान त्यागून । ध्येयीं समरसावें ॥ ४१ ॥
हाच अभ्यास क्षणाक्षणाला वाढवत न्यावा. हळूहळू ध्याता आणि ध्यान यांचा त्याग करून ध्येयामध्ये समरसून जावे. (३५४१)

ध्याता होतां ध्येयाकार । साभिमानाचा नुठे उद्गार ।
सहजी उरे चिद्गगनाकार । सामान्यत्वें वृत्ति ॥ ४२ ॥
ध्याता जेव्हा ध्येयाकार होतो तेव्हा अभिमानाचा उदार उठत नाही. फक्त सहज चिद्गगनाकार झालेली वृत्ती सामान्यत्वाने उरते. (३५४२)

तें ब्रह्मसुख तरी नसे । परी विकल्प किमपि नुमसे ।
हाही रसास्वादु परंतु असे । तदाकार होऊनी ॥ ४३ ॥
ही अवस्था तसे पाहिले तर ब्रह्मसुखाची आहे. पण तिच्यात काहीसुद्धा विकल्प उठत नाही. हाही रसास्वादच होय, पण तो तदाकार (ब्रह्माकार) झालेला असतो. (३५४३)

रसास्वोदाची लक्षणे दोन । एक सामान्य विशेषण ।
विशेषे होतसे समाधि उत्थान । लीन राहे सामान्यत्वें ॥ ४४ ॥
रसास्वादाची दोन लक्षणे (येथे प्रकार) असतात. एक सामान्य आणि दुसरा विशेष. विशेष रसास्वादामुळे समाधीतून उत्थान होते. आणि सामान्य रसास्वादामध्ये वृत्ती चिद्गगनात लीन राहते. (३५४४)

तस्मात् ब्रह्मसुख तरी घ्यावें । परी विकल्पाकडे न यावें ।
मुख्य ध्येयाकारत्वे असावें । ध्यात्या उजू न येतां ॥ ४५ ॥
म्हणून ब्रह्मसुख तर घ्यावेच पण विकल्पाकडे मात्र येऊ नये. मुख्यतः ध्येयाकार होऊन असावे आणि ध्यात्यासमोर येऊ नये (म्हणजे समाधीमध्ये आपण ध्यात्याची भूमिका घेऊ नये.) (३५४५)

ध्यात्याकडे जरी वृत्ति । येतांचि साभीमान उसळे वरुती ।
विकल्पाकार होऊन समाप्ति । सुखाकारतेची होय ॥ ४६ ॥
वृत्ती ध्यात्याकडे जर आली तर तिचा अहंकार उसळून वर येतो. आणि वृत्ती विकल्पाकार होऊन सुखाकारतेचा शेवट होतो (स्वीकृत पाठ' - विकल्पाकार होऊन समाप्ती। सुखाकारतेची होय।) (३५४६)

ह्मणोनि ध्याता नावलंबावा । ध्येयाकारता सहज स्वभावा ।
तरीच रसास्वादाचा नुठावा । विशेषे विकार ॥ ४७ ॥
म्हणून ध्यात्याची भूमिका घेऊ नये. सहज ध्येयाकारता स्वीकारावी. तेव्हाच विशेष विकारस्वरूप रसास्वाद उत्पन्न होणार नाही. (३५४७)

सामान्यत्वें जो रसास्वादु । उरे ध्येयाकार वृत्त्यानंदु ।
हा जोंकाल त्रिपुटीचा भेदु । तोंवरी सामान्यत्वें उरे ॥ ४८ ॥
सामान्य रसास्वादामध्ये ध्येयाकार झालेल्या वृत्तीचा आनंद उरतो. तो जोपर्यंत त्रिपुटीचा भेद असेल तोपर्यंत सामान्य रूपाने उरतो. (३५४८)

जेव्हां निजांगे ब्रह्म होऊनी । दृढ अपरोक्ष वस्तुतंत्रपणी ।
सहजत्वें उरे समाधानी । तेव्हांचि त्रिपुटी भंगे ॥ ४९ ॥
जेव्हा स्वतः ब्रह्म होऊन, वस्तुतंत्र होऊन दृढ अपरोक्ष ज्ञान होऊन सहज समाधान प्राप्त करतो तेव्हाच त्रिपुटीचा नाश होतो. (३५४९)

त्रिपुटि भंगतां रसास्वादु भंगे । तोवरी सामान्यत्वे असे अंगें ।
परी विशेषाकारें नुमगे । ह्मणोनि विघ्नकर नव्हे ॥ ५० ॥
त्रिपुटीचा नाश होताच रसास्वादाचाही नाश होतो. तोपर्यंत तो सामान्यत्वाने राहतो. पण त्यावेळी तो विशेष रूपाने उठत नाही. म्हणून तो विघ्नकर होत नाही. (३५५०)

तस्मात् साधकें ध्येयाकारता । सामान्यत्वें रमावें तत्त्वतां ।
ध्यान आणि नावलंबावा ध्याता । तरी विशेषत्वें मोडे ॥ ५१ ॥
म्हणून साधकाने ध्येयाकार होऊन सामान्य वृत्तीने त्या स्थितीत रममाण व्हावे. ध्यान आणि ध्याता यांचा स्वीकार करू नये. (फक्त ध्येयाकार असावे) ध्यान आणि ध्याता यांचे स्मरण केले की विशेषाच्या उठावामुळे ती ध्येयाकारता मोडते. (३५५१)

हेचि ब्रह्मविद्या वृत्ति व्याप्ति । अज्ञानाची करी समाप्ति ।
शीघ्र मेळवी दृढ अपरोक्षाप्रति । वस्तुतंत्र समाधाना ॥ ५२ ॥
ही वृत्तिव्याप्ती म्हणजेच ब्रह्मविद्या होय. तिच्यामुळे अज्ञानाची समाप्ती होते. आणि ती दृढ अपरोक्ष ज्ञानाशी लवकर भेट घडवून आणते. आणि साधकाला वस्तुतंत्र समाधान देते. (३५५२)

हेचि ब्रह्मविद्या सदोदित । सेविती साधक मुनि संत ।
जयेच्या योगें अति त्वरित । सुटती संसारांतूनी ॥ ५३ ॥
साधक, मुनी आणि संत याच ब्रह्मविद्येचा सदोदित आश्रय करतात आणि तिच्या सहाय्याने संसारातून अतिशय लवकर सुटका करून घेतात. (३५५३)

तस्मात् रविदत्ता ब्रह्मविद्या हे । तुज निरोपिली यथार्थ पाहें ।
या अभ्यासें पावें लवलाहें । दृढ अपरोक्ष ज्ञाना ॥ ५४ ॥
तेव्हा हे रविदत्ता, मी या ब्रह्मविद्येचे तुझ्यापुढे यथार्थ स्वरूप सांगितले आहे. आणि आता ब्रह्मविद्येची प्राप्ती करून घे आणि अभ्यास करून दृढ अपरोक्ष ज्ञान प्राप्त करून घे. (३५५४)

हे सामान्यवृत्ति जे सुखकर । उगीच राहे चिद्गगनाकार ।
हाचि बापा असे प्रकार । वासनानंदाचा ॥ ५५ ॥
ही सामान्य वृत्ती सुखकर असून उगीच चिद्गगनाकार होऊन राहते. अरे हाच वासनानंदाचा प्रकार आहे. (३५५५)

जो जागृतीचिये समाप्ती । सुषुप्तीही नव्हे पुरती ।
ते समयीं ब्रह्मानंदाची प्राप्ति । वृत्तीसी होय ॥ ५६ ॥
जागृती संपलेली आहे. सुषुप्तीही म्हणता येणार नाही अशी स्थिती असताना, वृत्तीला वासनानंदाची प्राप्ती होते. (३५५६)

बुद्धिमन निःशेष मावळलें । वृत्तीने माघारां अवलोकिलें ।
ते समयीं ब्रह्मानंदाचें पडिलें । प्रतिबिंब वृत्तीमाजीं ॥ ५७ ॥
बुद्धी आणि मन ही निःशेष मावळल्यानंतर वृत्तीने माघारी वळून पाहिले असता, त्यावेळी ब्रह्मानंदाचे प्रतिबिंब वत्तीमध्ये पडते. (३५५७)

सहजत्वें सुखाची लहर । झाक येतसे आनंदाकार ।
तेव्हां वासना सुखीं सुखाकार । या नांव वासनानंद ॥ ५८ ॥
आणि मग सहजच सुखाच्या लहरीची आनंदाकार झाक तिच्यावर येते. तेव्हा त्या सुखात वासना त्या सुखाशी तद्रूप होऊन तदाकार होते. त्यालाच वासनानंद असे म्हणतात. (३५५८)

पुढे गाढ जेव्हां झोप लागतां । नुसधा ब्रह्मानंद उरे तत्वतां ।
तो वृत्तीसी न ये अनुभवितां । असे केवळपणें ॥ ५९ ॥
पुढे गाढ झोप लागल्यानंतर केवळ ब्रह्मानंद उरतो. तो वृत्तीला अनुभवता येत नाही. तो ब्रह्मानंदच केवळपणाने उरतो. (३५५९)

तोचि वासनानंद कोणी । बळें उठवितां निजेल्यालागूनी ।
प्रगटे मागुती झोंप उल्लंघोनी । पुरता जागा नव्हे तो ॥ ६० ॥
तोच वासनानंद होय. एखाद्याने झोपलेल्या माणसाला झोपेतून बळेच उठवल्यानंतर तोच वासनानंद त्याहीवेळी प्रगट होतो. त्यावेळी तो झोपलेला माणूस आपली झोप सोडतो, तरी पण पुरता जागा झालेला नसतो. (३५६०)

एवं सुप्तीचिया आदिअंतीं । वासनानंदाची प्रतीति ।
असे सर्वही जनांप्रति । साधनेंहीविण ॥ ६१ ॥
अशा प्रकारे झोपेच्या आरंभी आणि शेवटी वासनानंदाचा अनुभव येतो. हा अनुभव कुठल्याही प्रकारची साधना न करता सर्व लोकांना सहज घेता येतो. (३५६१)

तोचि वासनानंद उगेपणीं । गुणाचे विकार नसती जये स्थानीं ।
जे मांगा सांगितलें निरूपणीं । तयाचिये परी ॥ ६२ ॥
सहज उगे बसले असताना ज्यावेळी गुणांचे कोणतेही विकार उद्भवलेले नसतात अशा वेळी तोच वासनानद मागे सांगितल्याप्रमाणे (पहा ओ. १००१ ते १००९) अनुभवाला येतो. (३५६२)

तोचि आतां समाधि अभ्यासें । विकल्पाचें मोडतां पिसें ।
वृत्ति व्याप्ति तदाकारें होतसे । प्रतीति साधका ॥ ६३ ॥
तोच आता समाधीचा अभ्यास करत असताना विकल्पाचे बंड मोडून काढल्यानंतर वृत्तिव्याप्तीने तदाकार (ब्रह्माकार) झाले असताना साधकाच्या प्रत्ययाला येतो. (३५६३)

येथेही मनबुद्धि परततां । सामान्यवृत्ति ब्रह्माकार होतां ।
तया वृत्तीचिया आंतौता । प्रतिबिंबे आनंद ॥ ६४ ॥
येथेही मनबुद्धी मावळल्यानंतर सामान्य वृत्ती तदाकार झाल्यानंतर त्या वृत्तीमध्ये जे ब्रह्मानंदाचे प्रतिबिंब पडते, तोच वासनानंद होय. (३५६४)

वृत्ति उठोनि जेव्हां पसरे । तेव्हांचि वासनानंद आविष्करे ।
सामान्यता सुख सुखीं थावरे । तेणें सुखावे वृत्ति ॥ ६५ ॥
वृत्ती उठून जेव्हा पसरते तेव्हाच वासनानंदाचा प्रादुर्भाव होतो. सामान्यत्वाचे सुख सुखामध्ये स्थिर होते. त्यायोगाने वृत्ती सुखावते. (३५६५)

तें सुख ह्मणून उद्गार न होतां । उगी स्तब्धपणे तदाकारता ।
तोचि वासनानंद तत्त्वतां । प्रतिबिंब ब्रह्मानंदाचें ॥ ६६ ॥
ते सुख आहे असा शब्द उमटू न देता, उगीच स्तब्धपणाने वृत्ती तदाकार होते. तोच वासनानंद म्हणजे ब्रह्मानंदाचे प्रतिबिंब होय. (३५६६)

येथे कोणी शंका करिती । कीं इतुकें अभ्यासें साधितां स्थिति ।
नव्हेचि ब्रह्मानंदाची प्राप्ति । प्राप्त तो वासनानंद ॥ ६७ ॥
येथे कोणी शंका करतील की, इतका अभ्यास करून देखील इथपर्यंतच स्थिती प्राप्त होते. ब्रह्मानंदाची तर प्राप्ती होतच नाही. प्राप्त होतो तो हा वासनानंद. (३५६७)

तरी मग कासया अभ्यास करावा । कासया विकल्पही मोडावा ।
मुख्यानंदचि प्राप्त न व्हावा । काय होतें वासनानंदें ॥ ६८ ॥
तर मग अभ्यास करायचाच कशासाठी? विकल्प तरी का मोडावा? मुख्यानंद तर मिळत नाही तो नाहीच! अन् या वासनानंदाने काय मिळते? (३५६८)

यांचे उत्तर सावधपणें । ऐकावें साधके आदरानें ।
अभ्यासें वासनानंद दृढ होणे । तरी ब्रह्मानंद समीप ॥ ६९ ॥
याचे उत्तर साधकाने आदरपूर्वक ऐकावे. अभ्यासाने वासनानंद दृढ होतो. त्यामुळे ब्रह्मानंद जवळ येतो. (३५६९)

स्फुरण उठतां की पसरतां । लय होय की उठे मागुता ।
परी तें द्रष्ट्याचे दृष्टीसी तत्त्वतां । टळटळीत दिसावें ॥ ७० ॥
स्फुरण उठो अथवा पसरो, लय होवो की त्यानंतर उठो, यापैकी काहीही झाले तरी द्रष्ट्याच्या दृष्टीला ते स्पष्टपणे दिसले पाहिजे. (३५७०)

जेवीं हातींचिया कांकणा आरसा । पहावया नलगे सहसा ।
इतुका टळटळीत स्फूर्तीचा ठसा । प्रतीतीस यावा ॥ ७१ ॥
हातातील काकणे पाहायला आरशाची गरज नसते. तसा स्फूर्तीचा ठसा टळटळीतपणे स्पष्ट असा प्रत्ययास यावा. (३५७१)

सहज वृत्ति उठतां पहावी । पसरून मावळता दिसावी ।
इतुकी अभ्यासें वृत्ति खलावी । तरीच अभ्यास सफळ ॥ ७२ ॥
यासाठी वृत्ती सहज उठली की ती पहावी, ती पसरलेली पहावी आणि ती मावळतांनाही पहावी. इतका अभ्यासाने वृत्तीचा खल करावा. एवढे झाले तरच अभ्यास सफळ झाला असे समजावे. (३५७२)

ऐसा अभ्यास दृढतर व्हावा । जैसा कां दरवाजियाचा दिवा ।
आंतून की बाहेरून पहावा । कांही श्रम न लगतां ॥ ७३ ॥
असा अभ्यास दरवाजातील दिव्याप्रमाणे दृढ झाला पाहिजे. तो आतूनही विनासायास पाहावा, बाहेरूनही सहज पहाता यावा. (३५७३)

तैसा वासनानंद टळटळीत । अनभवा यावा साधनविरहित ।
तरी मग ब्रह्मानंद व्हावया प्राप्त । विलंब नलगे ॥ ७४ ॥
त्याप्रमाणे वासनानंद काही साधनांच्या मदतीशिवाय अनुभवाला आला पाहिजे. तेव्हा मग ब्रह्मानंद प्राप्त होण्यासाठी काही विलंब लागणार नाही. (३५७४)

जैसा सुप्तिआरंभी मध्यस्थानीं । वासनानंदाची प्राप्ति होवोनी ।
वृत्ति मिळे ब्रह्मानंदी पूर्णी । अभ्यासेंवीण सहज ॥ ७५ ॥
ज्याप्रमाणे सुषुप्तीच्या आरंभी काही अभ्यास न करता देखील वासनानंदाची प्राप्ती होते. त्यानंतर वृत्ती सहजपणे ब्रह्मानंदात मिळून जाते. त्यासाठी काही वेगळा अभ्यास करावा लागत नाही. (३५७५)

तेचि वृत्ति निपटून मावळे । वासनानंदही एकत्र मिळे ।
तेचि ब्रह्मानंदाचे सोहळे । आपेआप सर्व जनां ॥ ७६ ॥
तीच वृत्ती संपूर्णपणे लय पावते. वासनानंदही तिच्या बरोबरच मिसळून मावळतो. आणि सर्व लोकांना आपोआप ब्रह्मानंदाचे सोहळे भोगता येतात. (३५७६)

तैसा अभ्यासें वासनानंदाचा । अनुभव जाहला असे साचा ।
ध्येय ध्याता ध्यान या त्रिपटीचा । विकार असे ॥ ७७ ॥
त्याप्रमाणे अभ्यासाने वासनानंदाचा अनुभव प्राप्त होतो, तेव्हा ध्येय, ध्याता, ध्यान या त्रिपुटीचा विकार शिल्लक राहिलेला असतो. (३५७७)

अंतःकरण वृत्ति अवच्छिन्न । चैतन्यसाक्षी हा ध्याता आपण ।
पाहतसे ओतप्रोत चिद्गगन । हेंचि ध्येय संचलें ॥ ७८ ॥
म्हणजे अंतःकरण वृत्ती अविच्छिन्न राहून स्वतः चैतन्यच साक्षी होऊन ध्यात्याची भूमिका घेते. आणि ते ओतप्रोत चिद्गगन पाहात असते. सर्वव्यापी चिद्गगन हेच त्यावेळी ध्येय असते. (३५७८)

या ध्येयाचे सुख तेणें । घेऊनियां सुखाकार होणे ।
ऐशिये त्रिपुटीचे वेगळेपणे । म्हणावा वासनानंद ॥ ७९ ॥
या ध्येयाचे सुख घेऊन ते सुखाकार होते. अशी वेगळेपणाने त्रिपुटी जोपर्यंत असते तोपर्यंत त्या अनुभवाला वासनानंद म्हणावे. (३५७९)

तेचि ध्याता ध्यान मावळूनी । ध्येय मात्र चिद्गगन पूर्णपणीं ।
उर्वरित उरे स्वानुभवावांचोनी । तोचि ब्रह्मानंद ॥ ८० ॥
त्यानंतर त्या अनुभवातील ध्याता, ध्यान ही दोन्ही मावळून जातात आणि ध्येयरूप संपूर्ण चिद्गगनच तेवढे अनुभवावाचून शिलुक राहते. तोच ब्रह्मानंद होय. (३५८०)

तो ब्रह्मानंद प्राप्त व्हावया । पुससी साधन शिष्यराया ।
तरी तो सहसा विचारावांचोनियां । अभ्यासें प्राप्त नव्हे ॥ ८१ ॥
तो ब्रह्मानंद प्राप्त होण्यासाठी कोणते साधन आहे असे विचारशील तर हे शिष्या, तो ब्रह्मानंद विचाराशिवाय केवळ अभ्यासाच्या मार्गान प्राप्त होत नाही, हे लक्षात घे. (३५८१)

अभ्यासाचे इतुकेंचि कार्य । वासनानंदचि प्राप्त होय ।
पुढे अभ्यासाचा उपाय । ब्रह्मानंदासी न चले ॥ ८२ ॥
अभ्यासाच्या मार्गाने वासनानंदांची प्राप्ती होते, एवढेच त्याचे कार्य असते. पण ब्रह्मानंदाच्या बाबतीत अभ्यासाचा उपाय लागू होत नाही. (३५८२)

तस्मात् वासनानंद वृत्तिव्याप्ति । जे विस्तारें निरोपिली अति ।
ययाची टळटळीत व्हावी प्रतीति । अभ्यासेंकडोनी ॥ ८३ ॥
म्हणून अभ्यासाच्या साहाय्याने वासनानंद, वृत्तिव्याप्ती यांची स्पष्टपणे प्रचीती यावी. वासनानंद आणि वृत्तिव्याप्ती यांचे सविस्तर वर्णन आतापर्यंत झाले. (३५८३)

इतुकें अभ्यासें दृढ जाहलिया । विचारही होय साधका तया ।
जेवीं शाखेचा पल्लव त्यागोनियां । चंद्र लक्षी सहज ॥ ८४ ॥
एवढे अभ्यासाने पक्के झाले तर त्या साधकाला विचारही साध्य होतो. वृक्षाच्या फांदीच्या साहाय्याने चंद्राचा वेध घेताना फांदीचा आधार सोडल्यानंतर चंद्र ठसठशीतपणे सहज दिसू शकतो. (फांदीमुळे प्रथम चंद्राचा अंदाज येतो. पण जोपर्यंत फांदीतच लक्ष गुंतलेले असते तोपर्यंत चंद्र दिसत नाही. त्यासाठी फांदीचा आधार सोडून त्या दिशेने आपली दृष्टी आकाशात झेपावली की चंद्र आपोआप दिसतो. तसे येथे वासनानंदांच्या कुबड्या टाकून विचाराच्या साहाय्याने ब्रह्मानंदाची प्राप्ती होऊ शकते, असा अभिप्राय) (३५८४)

वासनानंद वृत्तिव्याप्ति । जे ब्रह्मविद्या नांवें म्हणती ।
इतुकी शाखा जाणावी निश्चितीं । ब्रह्मानंद तो चंद्र ॥ ८५ ॥
वासनानंद आणि वृत्तिव्याप्ती यांना ब्रह्मविद्या असे म्हणतात. ब्रह्मविद्या ही या दृष्टान्तातील शाखा होय. आणि प्रत्यक्ष ब्रह्मानंद हा चंद्र होय. (३५८५)

चंद्र जैसा जयाचा तेणें । शाखा त्यागूनियां पाहणें ।
तैसा ब्रह्मानंद विचारें पावणे । त्रिपुटीरहित साधकें ॥ ८६ ॥
सद्गुरू फक्त शाखा दाखवण्याचे काम करतात. पण चंद्र मात्र ज्याचा त्यानेच शाखेचा त्याग करून पहावयाचा असतो. त्याप्रमाणे साधकाने त्रिपुटीचा पदर सोडून केवळ विचाराच्या मार्गाने ब्रह्मानंदाची प्राप्ती करून घ्यायची असते. (३५८६)

असो जो ब्रह्मानंद परिपूर्ण । याचे पुढील श्लोकीं निरूपण ।
आणि विचारही कैसा तो विवरण । यथार्थ होईल ॥ ८७ ॥
ते असू दे. तर त्या परिपूर्ण ब्रह्मानंदाचे विवरण पुढील श्लोकात निरूपण केले आहे. तेथेच विचार कसा करायचा याचेही यथार्थ विवरण होईल. (३५८७)

या श्लोकीं इतुकें केलें । अभ्यासासी स्पष्ट दाविलें ।
चारी विघ्नांतेंही निरसिलें । विक्षेपलयादि ॥ ८८ ॥
या श्लोकात अभ्यासाचे स्वरूप स्पष्ट करून सांगितले. तसेच विक्षेप, लय इ. चारही विघ्नांची स्वरूपे आणि त्यांचे निरसन यांचेही विवेचन केले. (३५८८)

तस्मात् साधकं ययाऐसा । वृत्तिव्याप्तीचा अभ्यास जैसा ।
क्षणक्षणां वाढवूनि सहसा । रोधावा विकल्प ॥ ८९ ॥
म्हणून साधकाने येथे सांगितल्याप्रमाणे वृत्तिव्याप्तीचा अभ्यास करून तो क्षणाक्षणाने वाढवत न्यावा आणि विकल्पाचे निरोधन करावे. (३५८९)

ब्रह्मानुभवाची आकांक्षा जया । तेणें प्रवर्ता या उपाया ।
हा अभ्यास अति यत्नेकडोनियां । क्रमेंचि अभ्यासावा ॥ ९० ॥
ज्याला ब्रह्मानुभवाची आकांक्षा असेल त्याने या उपायांचा मार्ग अवलंबवावा आणि अतिशय प्रयत्नपूर्वक (नेटाने) हा अभ्यास क्रमशः करावा. (३५९०)

अंतर्बाह्य संधि साधन । चारीही विघ्नें निरसन ।
स्वानुभवें पहावें चिद्गगन । स्फूर्तीसहित ॥ ९१ ॥
अंतर्बाह्य संधी साधून, चारी विघ्नांचे निरसन करून, स्वतःच्या अनुभवाने स्फूर्तिसहित चिद्गगन न्याहाळावे. (३५९१)

सामान्यवृत्तीनें चिद्गगन घ्यावें । चिद्गगनामाजीं स्फूर्तीते पहावें ।
इतुकें अनुसंधान वाढवावें । क्षणक्षणीं अधिक ॥ ९२ ॥
सामान्यवृत्तीच्या साहाय्याने चिद्गगन गाठावे, नंतर त्या चिद्गगनामध्ये स्फूर्तीचे अवलोकन करावे, आणि एवढे अनुसंधान क्षणाक्षणाने अधिक वाढवत जावे. (३५९२)

गगनामाजी वायूची झुळूक । की वायुयोगें व्यापे गगन एक ।
तैसें वृत्तीने चिद्गगन कौतुक । की चिद्गगनीं वृत्ति ॥ ९३ ॥
आकाशामध्ये वाऱ्याची झुळूक कशी उत्पन्न होते अथवा वाऱ्याची झुळूक आकाशाला कशी व्यापते, हे पहावे. त्याप्रमाणे वृत्तीने चिदगगनाचे कौतुक पहावे अथवा चिदगगनात वृत्ती कशी झेपावते हे पहावे. (३५९३)

येथवरी अभ्यासें पायवाट । विषयापासून व्हावी नीट ।
पुढे त्रिपुटीविरहित जे घनदाट । तेणेंसी अभिन्न होणे ॥ ९४ ॥
अभ्यासाच्या साहाय्याने विषयापासून ते वृत्तीच्या चिदगगनात झेपावण्यापर्यंत पायवाट प्रथम रुळावी, त्यानंतर त्रिपुटीविरहित घनदाट अशा चिद्रपाशी अभिन्न होऊन रहावे. (३५९४)

तरी अभ्यास त्यागून विचारद्वारा । पावावें अपरोक्ष साक्षात्कारा ।
अनुभवेंविण अनुभाव्य निर्धारा । वस्तुतंत्र विज्ञाना ॥ ९५ ॥
त्यासाठी अभ्यासाची कास सोडून विचाराच्या साहाय्याने अपरोक्ष साक्षात्काराची स्थिती प्राप्त करावी. त्या स्थितीत अनुभवावाचून अनुभाव्य निर्धार असतो. आणि तेच वस्तुतंत्र विज्ञान होय. (त्रिपुटीरहित ज्ञान होय.) (३५९५)

तेंचि आतां एक श्लोकीं । विचारें ऐक्यता व्हावी निकी ।
तरी तेंचि निवडावें साधकीं । जीव आणि ब्रह्मात्मा ॥ ९६ ॥
तेच आता एका श्लोकात सांगितले आहे. विचाराने जर पूर्ण ऐक्याची स्थिती प्राप्त करायची असेल तर साधकाने जीव आणि ब्रह्मात्मा यांची स्वरूपे जाणून घेऊन त्यांमध्ये निवड करावी. (३५९६)

ब्रह्मात्मा तोचि निर्विकल्प । जीव तोचि विकारी सविकल्प ।
या दोहींचे येथे प्रांजळरूप । निवडिलें असे ॥ ९७ ॥
ब्रह्मात्मा हा निर्विकल्प असतो आणि जीव मात्र विकारी असून सविकल्प असतो. येथे या दोघांचे स्वरूप एकमेकांपासून भिन्न कसे आहे ते स्पष्ट केले आहे. (३५९७)

GO TOP