॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ लघुवाक्यवृत्ति ॥


श्लोक क्र. १० वा

॥ श्रीरामसमर्थ ॥

श्लोक: मुक्ताभिरावृत्तं सूत्रं मुक्तयोर्मध्य ईक्षते ।
तथावृत्तिविकल्पैश्चित्स्पष्टामध्यविकल्पयोः ॥ १० ॥

श्लोकार्थ : मोत्यांच्या माळेत मोत्यांनी झाकला गेलेला दोरा दोन मोत्यांमधील अंतरामध्ये दिसतो. त्याप्रमाणे बुद्धीच्या विकल्पांनी झाकलेले शुद्ध चैतन्य दोन विकल्पांमधील अंतरामध्ये स्पष्ट दिसते. ॥१०॥

जैशी मुक्ताफळांची माला । माजीं तंतु असे गोविला ।
तैसा बुद्धिविकल्पामध्ये संचला । सामान्य चित्प्रकाश ॥ ७४ ॥
ज्याप्रमाणे मोत्यांच्या माळेमध्ये सुताचा तंतू गुंतवलेला असतो, त्याप्रमाणे बुद्धिविकल्पांमध्ये सामान्य चित्प्रकाश (सामान्य ज्ञान अथवा जाणीव) गुंतवलेला असतो. (२७७४)

मुक्तें सूत्र जेवीं आच्छादत । तेवीं चिद्‌रूप विकल्पीं गुप्त ।
मोती सारितां सूत्र दिसत । तेवीं विकल्पामध्यें चिद्‌रूप ॥ ७५ ॥
ज्याप्रमाणे मोत्यांनी तंतू आच्छादलेला (झाकलेला) असतो, त्याप्रमाणे चिद्‌रूप (सामान्य जाणीव) विकल्पांमध्ये झाकलेले असते. मोती बाजूला सारले की सुताचा तंतू दिसतो. त्याप्रमाणे विकल्पांमध्ये झाकलेले चिद्‌रूप ते विकल्प दूर करताच अनुभवता येते. (२७७५)

मोती येक उपलक्षण ॥ परी मणिजात संपूर्ण ।
अंतरी सूत्र तें अविच्छिन्न । येकचि असे ॥ ७६ ॥
मोती एक उपलक्षण म्हणून येथे घेतला आहे. परंतु या दृष्टान्तामध्ये कोणतेही मणी घेता येतील. कोणत्याही प्रकारच्या मण्यांच्या माळेमध्ये मणी बदलले तरी सूत्र एकच असते. त्यात वेगळेपणा नसतो. (२७७६)

परी येकेक मणि ठेलून बैसतां । माजील सूत्र न दिसे वरुता ।
तोचि मणि मागे पुढे सारितां । मध्यसंधीसी तंतु दिसे ॥ ७७ ॥
पण माळेतील प्रत्येक मणी एकमेकाला (दाटीने) चिकटून (ठेलून) बसवलेला असेल तर दोन मण्यांमधील सुताचा धागा वरून तरी दिसणार नाही. पण ते मणी मागेपुढे सारले असता दोन मण्यांच्या सांधण्याच्या जागेत (मध्यसंधी) सुताचा धागा दिसतो. (२७७७)

तैसा ब्रह्म आत्मा सर्वी व्यापक । अनंत अपरिमित एक ।
सूत्रा ऐसा दृष्टांत कौतुक । दिधला असे ॥ ७८ ॥
त्याप्रमाणे ब्रह्मात्मा सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. तो अनंत आहे. त्याचं मोजमाप करता येत नाही. तो एकमेव अद्वितीय आहे. वास्तविक पाहता मण्यात ओवलेला धागा हा दृष्टान्त ब्रह्मात्म्याच्या बाबतीत एकदेशी आहे. पण तो येथे सहज कौतुकाने दिला आहे. दोन विकल्पांच्या संधीमध्ये ब्रह्मात्मा अनुभवता येतो हे स्पष्ट करण्यासाठी फक्त तो दिला आहे. (२७७८)

मणी बहु अनेकापरी । परी सूत्र येकचि निर्धारी ।
तैसा ब्रह्मात्मा सर्व तत्त्वांमाझारी । येकचि अनुस्यूत ॥ ७९ ॥
मणी संख्येने पुष्कळ असतात. त्यांचे प्रकारही पुष्कळ असतात. पण त्यात ओवण्याचा सुताचा धागा एकच असतो. त्याप्रमाणे सर्व तत्त्वांच्या मध्ये एकच ब्रह्मात्मा अनुस्यूत (ओवलेला) असतो. (२७७९)

बुद्धि वृत्तीपासून उठती । इंद्रियद्वारा विषयी आदळती ।
तेथून येथवरी चंचळ गति । परी समाप्ति तत्क्षणीं ॥ ८० ॥
निरनिराळे विकल्प बुद्धिवृत्तीपासून उत्पन्न होतात. ते इंद्रियाच्या मागनि विषयांवर आदळतात. हा त्यांचा प्रवास अगदी वेगाने होतो. पण विषयांपाशी पोचताच ते नष्टही होतात. (२७८०)

इकडे तों समाप्ति तत्क्षणीं जाहली । परी दुसरी कल्पना ठेपून आली ।
तेही आदळून जरी मावळली । तरी तिसरी सिद्ध ॥ ८१ ॥
एक विकल्पाचा शेवट तत्क्षणी होते हे खरे, पण तो नष्ट होताच त्याच्या पाठोपाठ दुसरी कल्पना लगेच लगोलग येते. तीही विषयावर आदळून लगेच नष्ट होते. ती नष्ट होताच तिसरी कल्पना लगोलग तयारच असते. (२७८१)

ऐसे विकल्प बुद्धीवृत्तीचे । येका संलग्न येक उठती साचे ।
ह्मणोनि मणि जैसे ठेपले माळेचे । तैसे विकल्पासी विकल्प ॥ ८२ ॥
बुद्धिवृत्तीचे या प्रकारचे विकल्प एकाला जोडून दुसरा या क्रमाने सारखे उठत असतात. माळेचे मणी ज्याप्रमाणे एकाला एक चिकटून असतात. त्याप्रमाणे बुद्धि वृत्तीचे हे विकल्प एकाला एक लागून असतात. (२७८२)

परी मणि असे येकदेशी । विकल्प बुद्धीपासून उठतां वेगेंशी ।
विषयांत आदळतां जाऊन त्यासी । समानता न घडे ॥ ८३ ॥
परंतु वर म्हणल्याप्रमाणे मण्यांचा हा दृष्टान्त एक देशी (अव्याप्त अपुरा) आहे. विकल्प बुद्धीपासून उगम पावतात. ते विषयांवर वेगाने जाऊन आदळतात. त्यांची मण्याशी पूर्णत्वाने समानता होत नाही. (२७८३)

परंतु मणि जैसे बहुत असोनि । येकमेकां राहिले ठेपोनी ।
तैसे विकल्प येकमेकां लागोनी । संधीविण मिळाले ॥ ८४ ॥
परंतु मणी पुष्कळ असतात. माळेत ते एकमेकाला चिकटून असतात. त्याप्रमाणे बुद्धीचे विकल्पही एकमेकाला चिकटून असतात. त्या दोन विकल्पांमध्ये सांधा असा जवळजवळ नसतोच. ते विकल्प सांध्यावाचूनच एकमेकाला चिकटलेले असतात. (२७८४)

म्हणोनि मुक्तं दृष्टांतासी । दिधली असती चमत्कारासी ।
परी तो तंतु आणि मणियासी । साहित्य कैंचें ॥ ८५ ॥
हे सांगण्यासाठीच फक्त मोत्यांचा हा दृष्टान्त दिला आहे. परंतु तो ततूं आणि मणी यांचे बुद्धिविकल्प आणि ब्रह्मात्मा यांच्याशी साम्य (साहित्य) कसे होईल ? (२७८५)

तंतु आंतचि राहिला । आत्मा तो अंतर्बाह्य संचला ।
परी येक ह्मणून दृष्टांत दिधला । येन्हवीं साम्य कैंचें ॥ ८६ ॥
तंतू मण्याच्या छिद्रातच असतो. पण आत्मा हा अंतर्बाह्य दाटून राहिला आहे. पण तंतू एकच असतो, ब्रह्मात्माही एकच असतो. एवढ्या साम्यामुळे तंतूचा दृष्टान्त दिला आहे. एरव्ही त्यांच्यात साम्य कोणते आहे ? (२७८६)

मणीही तैसेच साकार । संकल्प तो आकारेंवीण उद्गार ।
परी दृष्टांत दिधला येकत्र । भिनले मणिया ऐसे ॥ ८७ ॥
वरील दृष्टान्तातील मणीही साकार असतात. पण संकल्प मात्र निराकार आविष्कार असतात. परंतु मणी एकमेकाला लागून असतात. त्याप्रमाणे संकल्पही एकाला जोडून एक असे येत असतात. एवढ्या साम्यावरून मण्यांचा दृष्टान्त दिला. (२७८७)

आणिकही येक असे कारण । सूत्रातें मणि करिती आच्छादन ।
तैसें विकल्पाचे जाळे मिळून । चिद्‌रूप आच्छादिलें ॥ ८८ ॥
या दृष्टान्त देण्यामागे दुसरे एक कारण आहे. मणी सुताला झाकून टाकतात. त्याप्रमाणे विकल्पांच्या जाळ्याने मिळून चिद्‌रूपाला झाकून टाकले आहे. (२७८८)

यास्तव दृष्टांतासी दिधलें । ह्मणून साम्य न पाहिजे कल्पिलें ।
चिद्‌रूप सूत्राऐसें नाहीं वळलें । की मुक्ताऐसे विकल्प असती ॥ ८९ ॥
म्हणून दृष्टान्त दिला खरा, पण तेवढ्यावरून त्या दृष्टान्त आणि दार्शन्तिक यांमध्ये साम्य सिद्ध होत नाही. चिद्‌रूप हे सुताच्या धाग्याप्रमाणे वळलेले नसते. तसेच मोत्याप्रमाणे विकल्पही नसतात. (२७८९)

कोणी मानील शंकाकार । की साम्य दृष्टांत काय नसती येर ।
परी दृष्टांताचा चमत्कार । असे तो बोलूं ॥ ९० ॥
कोणी शंकेखोर म्हणेल की. पूर्ण साम्याचे इतर दृष्टान्त नाहीत की काय ? पण दृष्टान्ताचा एक चमत्कार आहे, तो सांगतो. (२७९०)

मुक्तमाळा असे स्वाधीन । मणि सारितां ये स्वकरेंकडून ।
तंतु दिसतसे संधीमधून । स्पष्ट अपरोक्ष ॥ ९१ ॥
मोत्यांची माळ आपल्या स्वाधीन असते आणि आपण मणी आपल्या हातांनी सरकवू शकतो. आणि दोन मण्यांच्या संधीमधून सुताचा धागा अगदी स्पष्ट आणि अपरोक्षपणे (प्रत्यक्ष) दिसतो. (२७९१)

तैसे विकल्प रोधितां येती । तेव्हां स्पष्ट चिद्‌रूप ये प्रतीती ।
येर दृष्टांत बहु असती । परी पराधीन ॥ ९२ ॥
त्याप्रमाणे विकल्प थांबवून ठेवता येतात त्यावेळी चिद्रपाची स्पष्टपणे प्रतीती येते. इतर अनेक दृष्टान्त आहेत पण ते पराधीन आहेत. या दृष्टान्तामध्ये आपले स्वतःचे मणी अथवा विकल्पांवर नियंत्रण आहे तसे त्या दृष्टान्तांमध्ये नाही. (२७९२)

तेही साम्य जे दृष्टांत । बोलिजेती सावचित्त ।
आणि ते पराधीनही असत । तेंही कळेल ॥ ९३ ॥
आता ज्या दृष्टान्तांमध्ये बुद्धिविकल्प आणि चिद्‌रूप यांच्यातील संबंधाप्रमाणे साम्य आढळते असे दृष्टान्तही सांगतो. तेव्हा ते कसे पराधीन आहेत, तेही ओघाने कळेल.(२७९३)

आकाश एक परिपूर्ण सघन । तैसा आत्मा चिद्‌रूप आपण ।
तया आकाशा बहु मेघ मिळून । आच्छादित असती ॥ ९४ ॥
आकाश परिपूर्ण आणि सर्वत्र दाटून भरले आहे, तसे परब्रह्म स्वतः चिद्‌रूप असते. पण जसे त्या आकाशाला सगळे मेघ मिळून झाकून टाकतात, (२७९४)

विकल्प तैसे बहु मिळून । करिती ब्रह्म आच्छादन ।
अथवा पाणियावरी तरंग ठेपून । आच्छादिती पाणी ॥ ९५ ॥
तसे विकल्पही सगळे मिळून ब्रह्माला आच्छादन करतात अथवा पाण्यावर उठणाऱ्या लाटा कशा एकीला एक जोडून दुसरी अशा दाटीवाटीने येतात, त्यावेळी त्या पाण्याला आच्छादित करतात. (२७९५)

पाणी अथवा गगनासी । सर्व साम्यता घडे आत्मयासी ।
व्यापकत्व आणि निराकारासी । साहित्य पडे ॥ ९६ ॥
पाणी अथवा आकाश यांचे आत्म्याशी सर्व दृष्टींनी साम्य आहे. व्यापकपणा आणि निराकारता या बाबतीत त्यांचे ब्रह्माशी साम्य जुळते. (२७९६)

परी येका पराधीनत्वामुळे । दृष्टांतासी नाहीं योजिलें ।
की मेघ अथवा तरंग जाळें । स्वतां सारितां न येती ॥ ९७ ॥
पण या दृष्टान्तामध्ये पराधीनता हा एक दोष आहे. आकाश आणि पाणी यांच्यावर आपले काहीच नियंत्रण नाही. यामुळे हे दोन्ही दृष्टान्त स्वीकारले नाहीत. मेघ अथवा लाटांचा समूह आपल्या हातांनी आपण दूर करू शकत नाही. (२७९७)

विकल्प रोधून पाहूं येती । मध्ये चिद्‌रूप येतसे प्रतीती ।
मणि जैसे करें चाळिती । तेव्हां टळटळीत सूत्र ॥ ९८ ॥
तसे विकल्पांचे नाही. आपण विकल्प रोखून धरू शकतो. त्यामुळे दोन विकल्पांमधील चिद्‌रूपाची आपल्याला प्रचीती येऊ शकते. हाताच्या बोटांनी मणी बाजूला सारता येतात. त्यावेळी दोन मण्यांमधील सूत स्पष्ट दिसते. (२७९८)

इतुकिया हेतू मुक्ताफळांचा । दृष्टांत दिधला असे साचा ।
की साधकें अभ्यास विकल्पाचा । रोध करोनी पहावें ॥ ९९ ॥
या सगळ्या कारणांमुळे मोत्यांच्या माळेचा दृष्टान्त दिला आहे. हेतू हा की, साधकाने विकल्प थोपवून धरण्याचा अभ्यास करावा. (२७९९)

सर्व साम्य जरी पाहणे । तरी आकाशाचा दृष्टांत घेणें ।
विकल्पाचा जरी रोध करणें । तरी स्वीकार मुक्तांचा ॥ २८०० ॥
सगळ्याच बाबतीतील संपूर्ण साम्य पहावयाचे झाल्यास आकाशाचा दृष्टान्त घ्यावा. पण विकल्पांना थोपवून धरण्याचा अभ्यास करावयाचा झाल्यास मोत्यांचा दृष्टान्त घ्यावा. (२८००)

जलतरंग जरी जाहले । तरी सर्व साम्यत्वा नाही आले ।
येकदेशी आणि पातळ वोले । तस्मात् मुक्तमालेसम ॥ १ ॥
पाणी आणि त्यावरील लाटा यांचा दृष्टान्त घेतला तर संपूर्ण साम्य घडत नाही. कारण पाणी एकदेशी, पातळ आणि ओले आहे. त्यामुळे मोत्यांच्या माळेचा दृष्टान्त उत्तम ठरतो. (२८०१)

मुक्तमाळा जैशी स्वाधीन । तेवींच तरंग होती करें निवारण ।
तस्मात् मुक्तमालेचे समान । गगनमात्र नाहीं ॥ २ ॥
मोत्यांची माळ स्वाधीन (स्वतःच्या नियंत्रणामध्ये) असते. त्याप्रमाणे लाटाही हातांनी थोपवू शकतो. या दृष्टीने मोत्यांच्या माळेचा दृष्टान्त आणि गगनाचा दृष्टान्त यात साम्य नाही. (२८०२)

अथवा मालाशब्दें जरी घेतां । मुक्तमाला उपलक्षितां ।
गगनही आलेंचि दृष्टांता । वेगळे बोलणे नको ॥ ३ ॥
अथवा मोत्यांची माळ (माला) असा शब्दप्रयोग केला आणि तो उपलक्षणात्मक म्हणून घेतला (माळेसारखा कोणताही पदार्थ) तर आकाशाचा त्या दृष्टान्तात समावेश होतो. (ज्याप्रमाणे आकाश आणि मेघमाला) मग त्याबद्दल वेगळे बोलायची गरज नाही. (२८०३)

मुक्तमाळा मणिमाला । तेवींच तरंग मेघमाळा ।
मणियांत तंतु जेवीं वोविला । तेवीं गगन जीवन व्याप्त ॥ ४ ॥
असे मालायुक्त शब्द म्हणजे मुक्तामाला, मणिमाला, तरंगमाला आणि मेघमाला हे होत. मण्यात जसा तंतू ओवला जाऊन मण्यांनी तंतू झाकला जातो त्याप्रमाणे आकाश आणि स्थिर पाणी झाकले जातात. (२८०४)

गगनीं जीवनीं की तंतुवरी । उठती मेघ मणि की तरंगलहरी ।
परी आच्छादित असती झडकरी । गगन जीवन तंतु ॥ ५ ॥
आकाशात, पाण्यावर किंवा सुताच्या धाग्यावर मेघ, लाटा किंवा मणी येतात आणि त्यासरशी आकाश, पाणी आणि सुताचा धागा झाकून टाकतात. (२८०५)

तैशी स्वरूपसागरी कल्पना उठे । अंतरापासून विषयान्त दाटे ।
चिद्‌रूप आच्छादिलें गोमटें । बहुत विकल्पें ॥ ६ ॥
त्याप्रमाणे स्वरूपरूपी (ब्रह्मरूपी) सागरावर कल्पनांच्या लाटा उठतात आणि अंतःकरणापासून विषयांपर्यंत त्या दाटी करतात आणि त्यामुळे त्या अनेक विकल्पांमुळे निर्मळ सुंदर असा ब्रह्मात्मा झाकला जातो. (२८०६)

मणि मागे पुढे सरतां । तंतु स्पष्ट दिसे आंतोता ।
की तरंगाचे संधींत पाहतां । निश्चळ पाणी ॥ ७ ॥
मणी मागे पुढे सरकवल्यानंतर दोन मण्यांच्या मधल्या अंतरामध्ये सुताचा धागा स्पष्ट दिसतो. किंवा दोन लाटांच्या संधिभागात निश्चळ पाणी दृष्टीस पडते. (२८०७)

मेघही आपणचि वितुळती । येकेक ठाईं ढग दिसती ।
तेथें गगन येतसे प्रतीति । निश्चळ पोकळ अवकाश ॥ ८ ॥
मेघदेखील आपले आपणच विरळ होतात. काही ठिकाणी ढग दिसतात. त्या दोन ढगांच्या मधल्या जागेत आकाशाची प्रतीती येते. ते आकाश म्हणजे निश्चळ, पोकळ असा केवळ अवकाशच होय. (२८०८)

ऐसेचि विकल्पाचिये मधीं । कांहींसा अवसर संधीं ।
तया संधीमाजी स्पष्ट आधीं । चिद्‌रूप प्रतीति बाणे ॥ ९ ॥
याच प्रकारे दोन विकल्पांच्या मध्ये जी थोडी मोकळी जागा असते, त्या संधीमध्ये चिद्‌रूपाची स्पष्ट प्रतीती जाणवते. (२८०९)

कोण्याही प्रकारे समजावें । म्हणोनि दृष्टांतालागी द्यावें ।
आणि विचारवंतेंही तेंचि घ्यावें । मनना योग्य जें ॥ १० ॥
कोणत्याही प्रकाराने का होईना, विषय समजावा म्हणून दृष्टान्त द्यावे लागतात आणि विचारशील साधकानेही जे मनन करण्यास योग्य वाटेल त्याचाच स्वीकार करावा. (२८१०)

सर्व साम्य असतां बहु बरें । नातरी येकदेशीही साचारें ।
तेंही घेऊनियां आदरें । कळावें निरूपण ॥ ११ ॥
सर्व प्रकारचे संपूर्ण साम्य जुळत असेल तर फारच चांगले, नाहीतर एकदेशी (एकांगी) साम्यही दृष्टान्त समजण्यास पुरेसे होते. असे साम्य लक्षात घेऊन तो विषय आदरपूर्वक समजून घ्यावा. (२८११)

असो आतां विकल्पाचें रूप । स्पष्ट करूं कांही अल्प ।
पुढें चिद्‌रूप तें आपेआप । स्पष्ट कळे कैसें तें ॥ १२ ॥
असो, तर आता विकल्पांचे स्वरूप थोडेफार स्पष्ट करतो. त्यानंतर चिद्रपाचे स्वरूप आपोआप स्पष्टपणे कसे कळते, तेही सांगतो. (२८१२)

जागृतीमाजी अंतरांतून । विकल्प उठे बुद्धीपासून ।
तोचि इंद्रियद्वारा निघून । विषयावरी आदळे ॥ १३ ॥
जागृतीच्या अवस्थेत अंतःकरणातील बुद्धीपासून विकल्प उठतो. तोच इंद्रियद्वारा निघून विषयांवर जाऊन आदळतो. (२८१३)

आदळतांचि विकल्प मावळे । पुन्हां दुजा अंतरांतून उफाळे ।
तो जों मावळे की झांवळे । तो बळें आदळे तिसरा ॥ १४ ॥
विषयावर आदळताक्षणीच विकल्प मावळतो. पुन्हा दुसरा विकल्प अंतःकरणातून उफाळून येतो. तो मावळतो आणि लगेच गढूळल्यासारखा अस्पष्ट होतो. तेवढ्यात तिसरा विकल्प जोरात येऊन त्यावर आदळतो. (२८१४)

ऐसा उसंत निमिष्य नाहीं । मध्य संधीच न दिसे कांही ।
जैसें चक्र वेगें फिरतां लवलाहीं । भिन्न आरा न दिसती ॥ १५ ॥
अशा प्रकारे क्षणाचीही उसंत न देता विकल्प उठत राहतात. त्यामुळे त्यांच्या मधला संधीच काही दिसत नाही. एखादे चाक वेगाने फिरत असता त्याच्या आरा दिसत नाहीत, त्याप्रमाणे अंतःकरणातून विकल्प वेगाने उठत असल्यामुळे त्यांच्यामधला सांधा दिसत नाही. (२८१५)

चक्राच्या आरा तरी भिन्न भिन्न । फिरतां न दिसती असून ।
मा विकल्पाचें अति चपळपण । तेव्हां संधि कैंच्या दिसती ॥ १६ ॥
चाकाच्या आरा तरी वेगवेगळ्या असतात. चाकाच्या वेगाने फिरण्यामुळे त्या असूनसुद्धा दिसत नाहीत. विकल्प तर त्याहीपेक्षा चपळ असल्यामुळे त्यांचे सांधे कसे दिसतील ? (२८१६)

केव्हां शब्दाकार स्पर्शाकार । की रूप रस गंधाकार ।
केव्हां शब्दाहून शब्दांतर । विकल्प धांवती ॥ १७ ॥
हे विकल्प निरनिराळ्या प्रकारचे असतात. ते केव्हा शब्दरूप असतात, कधी स्पर्शरूप असतात. कधी रूपाकार (रूपांच्या आकाराचे) असतात तर कधी रसाकार असतात तर कधी गंधाकार असतात. कधी शब्दांवरून त्याच्या अंतरंगातील आशयाकडे (किंवा एका शब्दाकडून दुसऱ्या शब्दाकडे) असे विकल्प धावत असतात. (२८१७)

केव्हां कर्मेंद्रियांची क्रिया । बोलणे चालणे आवधिया ।
तेंही अवलोकून लवलाह्या । ज्ञानेंद्रियांकडे धांवे ॥ १८ ॥
केव्हा कर्मेन्द्रियाच्या बोलणे, चालणे इ. सर्व क्रियांचे अवलोकन करून, लगेच ज्ञानेन्द्रियांकडे धाव घेतात. (२८१८)

ऐसा क्षण येक विसांवा न होता । विकल्पजाळे उठती तत्त्वतां ।
जैसे मेघ अंतरिक्ष दाटतां । संधीच न दिसती ॥ १९ ॥
अशा त-हेने एक क्षणभरही विश्रान्ती न घेता विकल्पांची जाळी उठतात आणि मेघांनी अंतरिक्ष दाटल्यानंतर त्यांचे सांधेच जसे दिसत नाहीत, तसे विकल्पांचे संधीच दिसत नाहीत. (२८१९)

ऐशियामाजींही चिद्‌रूप सघन । परिपूर्ण व्यापलें जेवीं गगन ।
अणुप्रायही स्थळ रिते न होणे । आंत किंवा बाहेरी ॥ २० ॥
घनदाट मेघांनी आच्छादित केल्यामुळे आकाश जसे दिसेनासे होते, त्याप्रमाणे दाटीवाटीने सातत्याने उठणाऱ्या विकल्पांमुळे सर्वत्र व्यापलेले चिद्‌रूप परिपूर्णपणे झाकले जाते. त्यामुळे त्याच्या आत किंवा बाहेर एक अंशसुद्धा रिकामे स्थळ आढळत नाही. (२८२०)

परी मेघे जैसे आच्छादिलें । तेव्हां गगन न दिसे कांही केलें ।
तैसे विकल्पचि अवघे दाटले । व्याप्त चिद्‌रूप दिसेना ॥ २१ ॥
परंतु मेघांनी झाकलेले आकाश काही केल्याने जसे दिसत नाही. त्याप्रमाणे चिद्‌रूपावर सर्व बाजूंनी विकल्पांचीच गर्दी झाल्यामुळे ते झाकलेले चिद्‌रूप दिसेनासे होते. (२८२१)

येथे विचारवंत ऐसें पाहती । कीं गगनब्रह्माची नसतां व्याप्ति ।
तरी मेघ विकल्प केवीं राहती । तस्मात् अंतर्बाह्य ब्रह्म ॥ २२ ॥
येथे विचारवंत असा विचार करतात की, आकाश किंवा ब्रह्म यांची व्याप्तीच जर मुळात नसती, तर मेघ किंवा विकल्प कसे राहिले असते ? त्यामुळे ब्रह्म हे अंतर्बाह्य व्यापून राहिले आहे. (२८२२)

परी मंदप्रज्ञा केवीं निवळे । विचाराचे झावळे डोळे ।
ह्मणोनि तया हळुहळू आकळे । साधन अभ्यासें ॥ २३ ॥
पण मंदप्रज्ञ साधकाला हे कसे कळावे ? त्याचे विचारांचे डोळे झापडल्यासारखे झालेले असतात. म्हणून सावकाश केलेल्या अभ्यासानेच त्याला ते कळेल. (२८२३)

तो अभ्यास पुढे बोलणे । प्रस्तुत येथे विकल्प वोळखणें ।
या रीतीं जागृतीमाजी होणें । ऐसाचि स्वप्नीं असे ॥ २४ ॥
तो अभ्यास कसा करावा हे पुढे सांगण्यात येईल. सध्या येथे विकल्प कसे ओळखायचे याचा विचार चालू आहे. जागृतीमध्ये जी परिस्थिती असते (विकल्पाच्या गर्दीमुळे चिद्‌रूप न दिसणे) तशीच परिस्थिती स्वप्नातही असते. (२८२४)

स्वप्न म्हणिजे वाउगी कल्पना । प्रत्यक्ष इंद्रियविषयाविना ।
मग असो की जागेपणा । किंवा झोंपेंत स्वप्न ॥ २५ ॥
स्वप्न म्हणजे प्रत्यक्ष इंद्रियांचा अभाव असताना खोट्या कल्पना उठणे. मग मनुष्य जागा असो की झोपलेला, दोन्ही ठिकाणी स्वप्नावस्था असतेच. (२८२५)

या उभय रीतीं स्वप्ना आंत । विकल्पाचे जाळे उठत ।
बाह्य मात्र न जाती विषयांत । परी अंतरी घोटाळती ॥ २६ ॥
या दोन्ही प्रकारच्या स्वप्नात विकल्पांचे जाळे उठत असतेच. बाह्यात्कारी ते विकल्प बाह्य विषयापर्यंत जात नसले तरी आतल्या आत (अंतःकरणात) मात्र ते घोटाळत असतातच. (२८२६)

तेथेही देह विषय ज्ञानेंद्रिय । आणि क्रिया कर्म कर्मेंद्रिय ।
ध्यासरूपें वासनामय । अंतरीच आठवी ॥ २७ ॥
स्वप्नामध्येही देह, विषय, ज्ञानेंद्रिये, कर्मेन्द्रिये, क्रिया इ. चे वासनांच्या रूपाने ध्यासाच्या साहाय्याने तो अंतःकरणात स्मरण करत असतोच. (२८२७)

येक विषय आठवितां दिसे तो । नासून दुजा विकल्प होतसे ।
तो जों भासे की नासे । तों उद्भवे तिजा ॥ २८ ॥
एका विषयाचे स्मरण केल्यानंतर तो दिसायला लागतो न लागतो तोच तो नाहीसा होतो आणि त्याच्या जागी दुसरा नवीन विकल्प येतो. तो नवीन विकल्प दिसतो की लगेच नष्ट होतो आणि तिसरा विकल्प निर्माण होतो. (२८२८)

ऐसें स्वप्नींही विकल्पजाळें । उठती जैशीं मेघमंडळे ।
तेणें ब्रह्माकाश झांकोळे । व्याप्त परी दिसेना ॥ २९ ॥
अशा प्रकारे स्वप्नातसुद्धा विकल्पांची जाळी आकाशातील मेघमंडळाप्रमाणे उठत असतात. त्यामुळे ब्रह्माकाश (ब्रह्म हेच आकाश) झाकोळून जाते. ते विकल्पांनी व्यापिले जाते पण दिसत नाही. (२८२९)

असो दोही अवस्थांमाझारी । विकल्प असे अति विकारी ।
परी सुषुप्तिमाजीही निर्विकल्प व्यापारी । विकल्प असे ॥ ३० ॥
या दोन्ही अवस्थांमध्ये विकल्प अतिशय विकारी (विकार उत्पन्न करणारे) असतात. एवढेच नव्हे तर झोपेच्या अवस्थेतसुद्धा जेव्हा सर्व विकल्प नाहीसे झाल्यासारखे असतात, तेव्हाही विकल्प असतातच. (२८३०)

तया सुषुप्तीचेही प्रकार दोन । येक झोंप येक उगेपण ।
तेथें बुद्धि किंवा नसे मन । इंद्रियध्यासासहित ॥ ३१ ॥
त्या सुषुप्तीचेही दोन प्रकार असतात. एक म्हणजे झोप आणि दुसरा म्हणजे जागृतीतही निर्मनस्क अवस्थेत येणारा उगेपणा हा होय. तेथे बुद्धी, मन, इंद्रियध्यास ही काही नसतात. (२८३१)

नुसधी स्फूर्ति अंतःकरणाची । विद्या अविद्यात्मक माया तेची ।
कल्पना नसतां विषयादिकांची । असे निर्विकल्प ॥ ३२ ॥
त्या अवस्थेत केवळ अंतःकरणाची स्फूर्ती मात्र असते. तीच विद्या, अविद्या अथवा माया होय. विषयांची कल्पना नसल्यामुळे ती निर्विकल्प आहे, असे वाटते. (२८३२)

नेणपणेंची असे दाटली । वासना गडदपणे बैसली ।
स्फूर्ति मात्र उठे जाय मावळली । येका मागें येक ॥ ३३ ॥
ती अज्ञानाने (नेणतेपणाने) मात्र दाटलेली असते. त्या नेणतेपणाच्या वासनेतच स्फूर्ती मात्र उठते, मावळते, पुन्हा उठते आणि मावळते. असे सारखे एकामागून एक होत असते. (२८३३)

तेंचि विकल्पाचे स्वरूप । वाउगी गडद पडे झाप ।
तेथेही व्याप्त सच्चिद्‌रूप । आच्छादिल्यापरी ॥ ३४ ॥
तेच विकल्पांचे स्वरूप आहे. त्यावेळी दाट गडद अशी खोटी झापडी पडल्यासारखे वाटते. त्या ठिकाणी त्या अवस्थेत सच्चिद्‌रूप व्यापून असले तरी ते या नेणतेपणाच्या झापडीमुळे आच्छादिल्यासारखे असते. (२८३४)

एवं जागृति स्वप्न सुषुप्ति । तीनचि अवस्था जीवाप्रती ।
या तिहींमाजीही विकल्पपंक्ति । असती दाटल्या ॥ ३५ ॥
अशा प्रकारे जागृती, स्वप्न, सुषुप्ती अशा जीवाच्या तीनच अवस्था असतात. त्या तीनही अवस्थांमध्ये विकल्यांच्या मालिका दाटून राहिलेल्या असतात. (२८३५)

ब्रह्मात्मा तो पहिलाचि संचला । आकाशवत् व्यापक कोंदला ।
तयावरी विकल्परूप मेघमाला । तीन अवस्था उठती ॥ ३६ ॥
ब्रह्मात्मा तर प्रथमपासूनच सर्वत्र व्यापून राहिलेला आहे. तो आकाशाप्रमाणे व्यापक असून सर्व चराचरात कोंदून राहिला आहे. या तीन्ही अवस्थांमध्ये वर सांगितल्याप्रमाणे विकल्पांच्या मेघमाला उठत असतात. (२८३६)

नेणीवरूप स्फूर्ति निर्विकल्प । उठे निमे ते उगेपणा झोंप ।
ते मनबुद्धीसी येतां साक्षेप । स्वप्नावस्था होय ॥ ३७ ॥
सुषुप्तीच्या अवस्थेमध्ये नेणीवपणारूप निर्विकल्प स्फूर्ती उठते आणि ओसरते तोच उगेपणा अथवा झोप होय. त्या अवस्थेतून ती स्फूर्ती, मन आणि बुद्धी यांच्यामध्ये त्यांच्या व्यापारांसहित येताच तिला स्वप्नावस्था म्हणतात. (२८३७)

तेचि इंद्रियद्वारा विषयांत । स्फूर्ति जाऊन आदळत ।
तयासी जागृति हा संकेत । एवं व्यापार तीन ॥ ३८ ॥
तीच इंद्रियामार्फत विषयांवर जाऊन आदळते त्या अवस्थेला जागृती असे नाव आहे. असे हे तीन व्यापार आहेत. (२८३८)

परी विकल्प तेथून येथवरी । दाटला असे मेघापरी ।
कोठे स्पष्ट कोठे अस्पष्ट परी । नाहींसा नाहीं ॥ ३९ ॥
पण विकल्प मात्र सुषुप्तीपासून ते जागृतीपर्यंत मेघांप्रमाणे अखंडपणे दाटून भरलेले असतात. ते कोठे अस्पष्ट असतात तर कोठे स्पष्ट असतात. पण ते अमुक ठिकाणी नाहीत असे नाही. (२८३९)

ऐसिया विकल्पं चिद्‌रूप अमुप । आच्छादिलें गगनीं जेवीं झाप ।
म्हणोनि ब्रह्मात्मप्रतीति अल्प । नव्हे साधका ॥ ४० ॥
अशा विकल्पांनी अमर्याद असे चिद्‌रूप आकाशाला मेघांनी झाप पडावी त्याप्रमाणे झाकलेले असते. म्हणून साधकाला थोडीशीसुद्धा ब्रह्मात्म्याची प्रतीती येत नाही. (२८४०)

प्रतीति न व्हावया आणिक । कारण असें तें बोलिजे कौतुक ।
ब्रह्मात्मा जो परिपूर्ण एक । येर माईक वृत्यादि ॥ ४१ ॥
ब्रह्मात्म्याची प्रतीती न येण्याचे आणखी एक कारण आहे. तो प्रकार सांगितला पाहिजे. ब्रह्मात्मा परिपूर्ण असून एकमेव सत्य आहे. बाकीच्या वृत्ती इ. मायिक असतात. (२८४१)

स्फूर्त्यादि देहान्त सर्व जड । यया जाणणेच असे अवघड ।
तरी कोणत्या तत्त्वें आत्मा घबाड । जाणों लाहिजे ॥ ४२ ॥
स्फूर्तीपासून देहापर्यंत सर्व पदार्थ जड आहेत. त्यांचेच ज्ञान होणे कठीण आहे. तर मग एवढा मोठा आत्मा जाणण्याची अपेक्षा कशाच्या आधारावर करावी ? (२८४२)

अन्य विषयमात्रा परप्रकाशें । जाणती बुद्ध्यादि आपैसे ।
त्याविण कल्पिलें की आत्मा न दिसे । तेव्हां आच्छादिला विकल्पें ॥ ४३ ॥
इतर विषयांचे ज्ञान बुद्ध्यादिक परप्रकाशाने सहज मिळवू शकतात. पण आत्म्याचे ज्ञान काही बुद्धी इ. च्या साहाय्याने होऊ शकत नाही. तेव्हा तो विकल्पांनी आच्छादिला आहे, असे सांगण्यात येते. (२८४३)

विकल्में आच्छादिलाही भावितां । चिदात्मा आच्छादेना तत्त्वतां ।
जैशी अस्ति भाति प्रियरूपता । प्रगटचि असे ॥ ४४ ॥
पण या सांगण्यात एक अडचण अशी आहे की, विकल्पांनी आत्मा झाकला जातो हे खरे नाही. चिदात्मा कधीच आच्छादिला जात नाही. कारण त्याची अस्ति, भाति आणि प्रिय ही लक्षणे प्रकटच आहेत. (२८४४)

सर्वांमाजीं जो आहेपणा । तो तरी किंचितही नव्हे उणा ।
प्रियत्वे जैसा आपआपणा । तेंही अन्यथा नव्हे ॥ ४५ ॥
या सर्व पदार्थांमध्ये जो आहेपणा आहे, तो थोडासादेखील कमी होत नाही. आपण आपल्यावर प्रेम करतो म्हणजे आत्म्यावरच प्रेम करतो. तेव्हा ब्रह्मात्म्यावरचे प्रेम तसूभरही कमी होत नाही. (२८४५)

देखणाही जो परिपूर्ण । तेंही विकल्पं नव्हे आच्छादन ।
तरी आच्छादिला ह्मणेल कवण । भ्रामकावांचोनी ॥ ४६ ॥
ब्रह्मात्मा सर्व काही पाहतो. त्याचे हे पाहणे विकल्पांमुळे झाकले जात नाही. मग या ब्रह्मयाला तो झाकला गेला असे भ्रमिष्टावाचून कोण म्हणेल ? (म्हणजे ब्रह्मात्म्याला झाकला गेला असे जो म्हणेल तो भ्रमिष्टच म्हणावा लागेल.) (२८४६)

जैसें मेघे गगन आच्छादिलें । तें मूढ जनीं व्यर्थ भाविलें ।
तळी उपरि जें संचलें । हें तों स्वतःसिद्ध ॥ ४७ ॥
ज्याप्रमाणे मेघांनी आकाश झाकून टाकले असे मूर्ख लोक (किंवा अज्ञानी लोक) उगीचच म्हणतात. कारण आकाश वर, खाली सर्वत्र व्यापून राहिले आहे, हे तर स्वतःसिद्ध आहे. (२८४७)

ऐसेंचि ब्रह्मात्मत्व स्वतःसिद्ध । प्रगटचि असे प्रसिद्ध ।
या विकल्पादिकांचा संबंध । तया नाहींच नाहीं ॥ ४८ ॥
त्याचप्रमाणे ब्रह्मात्मत्व सर्वत्र उघडे प्रकटच आहे, हे स्वतःसिद्ध आहे. ब्रह्मात्म्याचे हे वैशिष्ट्य प्रसिद्धच आहे. विकल्प इ. शी त्याचा काही संबंधच येत नाही. (२८४८)

पहा पहा विचारें झोपेंत । किंवा उगेपणा मनबुद्धिरहित ।
तेथील नेणपणा प्रकाशित । आपुल्या प्रकाशें ॥ ४९ ॥
असे विचार करून पहा की, झोपेत अथवा मनबुद्धिरहित अशा उगेपणाच्या स्थितीत जे अज्ञान (नेणपणा) असते त्या अज्ञानाला आपल्या प्रकाशाने ब्रह्मात्माच प्रकाशित करत असतो. (२८४९)

कांही मनादिक साह्य नसतां । नेणीव स्फूर्तीसी प्रकाशिता ।
तो कवणे काळी होय नेणता । आच्छादे तरी केवीं ॥ ५० ॥
मन, बुद्धी इ. चे काही साहाय्य नसता नेणीव (अज्ञान) रूपी स्फूर्तीला तोच प्रकाशित करत असतो. तो कोणत्याही काळी नेणता (अज्ञानी) होऊ शकत नाही. मग तो विकल्पांनी कसा झाकला जाईल ? (२८५०)

त्या स्फूर्तीपासून मनबुद्ध्यादि । उठतां विषयध्यासातें संपादी ।
तया स्वप्नावस्थेमाजी अनादि । देखणा तया व्यापारा ॥ ५१ ॥
त्या स्फूर्तीपासून मनबुद्ध्यादी उत्पन्न होताच जीव विषयांचा ध्यास घेतो. तीच स्वप्नावस्था होय. त्या स्वप्नावस्थेतील व्यापारांना प्रकाशित करणारा (देखणा) हा अनादी असा ब्रह्मात्माच असतो. (२८५१)

मन बुद्धि चित्त अहंकार । ध्यासें जो जो आठवी प्रकार ।
देहक्रिया विषय समग्र । साक्षित्वें देखे ॥ ५२ ॥
मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांच्या साहाय्याने जीव ज्या ज्या प्रकाराचे स्मरण करतो ते सर्व, देहाच्या क्रिया आणि सर्व विषय हे तो साक्षित्वाने पाहत असतो. (२८५२)

तैसेंचि जागरी प्रत्यक्ष विषय । इंद्रियद्वारा वृत्ति जाय ।
त्यांत ज्ञानाज्ञान हे द्वय । प्रकाशी निजात्मा ॥ ५३ ॥
त्याचप्रमाणे जागृतीच्या अवस्थेत वृत्ती इंद्रियांच्या मार्गाने प्रत्यक्ष विषयांपर्यंत पोहोचते. त्या व्यापारातील ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही तत्त्वांना आपला आत्माच (ब्रह्मात्माच) प्रकाशित करत असतो. (२८५३)

एवं स्फूर्तीपासून जे विकल्प । विषयापर्यंत सर्व संकल्प ।
उठती निमती जे आपेआप । ते ते जाणे प्रकाशें ॥ ५४ ॥
अशा प्रकारे स्फूर्तीपासून ते विषयांपर्यंत जे जे संकल्प विकल्प उठतात आणि आपोआप लय पावतात ते ते सर्व हा ब्रह्मात्मा स्वतःच्या प्रकाशाने जाणतो. (२८५४)

तयासी कोठे असे न कळणे । सर्वासी अकत्रिम देखणें ।
ऐसें असतां साधक अज्ञानें । ह्मणे प्रतीति न ये ॥ ५५ ॥
त्याच्या ठिकाणी न कळणे (अज्ञान) हा प्रकारच नाही. कारण तो सगळ्या पदार्थांचा स्वाभाविक असा द्रष्टा आहे. असे असतानाही साधक म्हणतो की मला प्रतीती येत नाही. (२८५५)

येर तत्त्वे हे न जाणती । ह्मणोनि साधका पडली भ्रांति ।
हाचि मी त्या मज न ये प्रतीति । आत्मप्रकाश कैसा तो ॥ ५६ ॥
इतर तत्त्वांना हे ज्ञान नसते म्हणून साधकाला भ्रांती पडलेली असते, हाच तो मी तरीपण त्या मला प्रतीती येत नाही. आत्मप्रकाश कसा असतो ते मला माहीत नाही. (२८५६)

ऐशिया मंदप्रज्ञ साधकासी । अभ्यास पाहिजे दिननिशीं ।
विकल्प निमतां साक्षेपेंसी । उरे तो आत्मा भेटे ॥ ५७ ॥
अशा त्या मंदप्रज्ञ साधकाला अहोरात्र अभ्यास करण्याची गरज आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर विकल्प नष्ट झाल्यानंतर जो कोणी एकटाच उरतो तो आत्मा. विकल्प नष्ट झाल्यावरच तो आत्मा भेटतो. (२८५७)

जैसे गगन मेघे आच्छादितां । न दिसे असून आहाच पाहतां ।
ते मेघ सर्व वितळून जातां । स्वच्छत्वें दिसे ॥ ५८ ॥
ज्याप्रमाणे मेघांनी आकाश झाकून टाकले असता आकाशाकडे वरवर उगीच (आहाच) पाहिले तर ते (आकाश) दिसत नाही. पण ते मेघ वितळल्याबरोबर आकाश स्पष्ट दिसू लागते. (२८५८)

तैसे विकल्प निमतां समूळ । उरे निर्विकल्प ब्रह्म केवळ ।
तेंचि आपेआप कळे प्रांजळ । साध्य तें साधकां ॥ ५९ ॥
त्याप्रमाणे सर्व विकल्प समूळ नाहीसे झाले म्हणजे केवळ निर्विकल्प ब्रह्मच उरते. ते आपोआप कळून येते. आणि तेच नेमके साधकांचे साध्य आहे. (२८५९)

तस्मात् विकल्प हा मोडावया । अभ्यास पाहिजे शिष्य राया ।
तोचि बोलिजे सहज उपाया । कवणे रीती अभ्यास ॥ ६० ॥
तेव्हा हे शिष्यराया, हे विकल्प मोडण्यासाठी अभ्यासाची गरज आहे. हा अभ्यास कसा करावा, त्याचे सोपे मार्ग कोणते, तेच आता सांगतो. (२८६०)

न लगे प्राणाचा निरोध । नलगे आसनादि मूळबंध ।
सहजी सहजत्वें प्रसिद्ध । विकल्प तरी मावळे ॥ ६१ ॥
त्यासाठी प्राणाचा निरोध (वायू रोखून धरणे) करण्याची गरज नाही, अथवा मूलबंध इ. आसनांची ही गरज नाही. तो अभ्यास सहज सोपा आहे. तो केल्याबरोबर विकल्प आपोआप मावळतात. (२८६१)

ऐसा अभ्यास समाधीचा । जेणे हळुहळु घात विकल्पाचा ।
तोचि बोलिजे स्पष्ट वाचा । त्या रीतीं साधकें अभ्यासावा ॥ ६२ ॥
हा समाधीचा अभ्यास आहे. त्या योगाने विकल्पांचा हळूहळू नाश होतो. तोच अभ्यास मी तुला स्पष्ट करून सांगतो. साधकाने त्या रीतीने त्याचा सरावा करावा. (२८६२)

येथे कोणी चार्वाक ह्मणती । अभ्यासाची जयास भीति ।
की कासया पाहिजे अभ्यासरीती । आत्मा सर्वी व्याप्त असतां ॥ ६३ ॥
येथे ज्यांना अभ्यासाची भीती वाटते (अभ्यासाचे वावडे आहे) असे कोणी चार्वाक (म्ह. नास्तिक) असे म्हणतील की, जर आत्मा सर्वत्र व्यापून राहिलेला आहे, तर अभ्यास, त्याची पद्धत इ. कशासाठी पाहिजे ? (२८६३)

तरी आत्मा पहिलाचि व्याप्त । मग विवेचन तरी कासया अपेक्षित ।
कीटकही ब्रह्मचि परी मुक्त । कल्पांती नव्हे ॥ ६४ ॥
यावर उत्तर असे की, आत्मा अगदी पहिल्यापासूनच सर्वत्र व्यापून राहिला आहे. मग विवेचन तरी कशाला पाहिजे ? तसे पाहिले असता कीटकदेखील ब्रह्मच आहे. पण तो कल्पान्तीही मुक्त होत नाही. (२८६४)

जैसा काष्ठी असोनि दाहक । मथनेंवीण निरर्थक ।
तेवीं सर्वत्रीं ब्रह्मात्मा व्यापक । परी नेणतां मुक्ति कैंची ॥ ६५ ॥
ज्याप्रमाणे काष्ठामध्ये अग्नी सुप्त स्वरूपात असतो, पण मंथनावाचून तो निरर्थक असतो. त्याप्रमाणे सर्वत्र ब्रह्मात्मा व्यापून राहिला आहे. पण न जाणता मुक्ती कशी मिळेल ? (२८६५)

तिळामाजीं तेल असे । परी गाळिल्याविण प्राप्त कैसें ।
तेवीं कीटकही ब्रह्म परी अभ्यासें । विण मोक्ष कैंचा ॥ ६६ ॥
तिळामध्ये तेल असते पण ते गाळल्याशिवाय त्यातून तेल कसे मिळेल ? त्याप्रमाणे कीटकही ब्रह्म आहेच, परंतु अभ्यासावाचून मोक्ष कसा मिळेल ? (२८६६)

नदीचे पात्रांत पाणी आहे । परी खांदिल्याविण केवीं लाहे ।
तैसें ब्रह्मत्व असून प्राप्त नव्हे । अभ्यासाविणें ॥ ६७ ॥
नदीच्या पात्रात पाणी आहे, परंतु पात्रात खांदल्याशिवाय ते पाणी कसे मिळेल ? त्याप्रमाणे ब्रह्मत्व सर्वत्र असूनही अभ्यासाशिवाय ते प्राप्त होत नाही. (२८६७)

दुग्धामध्ये असे घृत । परी क्रियेविण नव्हे प्राप्त ।
तेवीं अभ्यासेंवीण कृतकृत्य । कल्पांती नव्हे ॥ ६८ ॥
दुधामध्ये तूप असते. पण त्यावर काही प्रक्रिया करण्याची गरज असते. ते त्या प्रक्रियेविना मिळू शकत नाही. त्याप्रमाणे अभ्यासावाचून कल्पांतीही कृतकृत्य (ब्रह्मात्मैक्यप्राप्ती) होता येणार नाही. (२८६८)

सर्व हे ब्रह्मचि असती । येथे संशय नाहीं रती ।
तरी जन्मती आणि मरती । कासया नानायोनि ॥ ६९ ॥
हे सर्व पदार्थ ब्रह्मच आहेत यात रतिमात्र (थोडासुद्धा) संशय नाही. असे असताना जीवाच्या अनेक योनी पुन्हा पुन्हा का जन्म घेत असतात आणि का मृत्युमुखी पडतात. (अर्थातच ब्रह्म असूनसुद्धा त्या मुक्त झालेल्या नसतात.) (२८६९)

तस्मात् जयासी खरें तरावें । तेणें बोलिल्या रीतीं अभ्यासावें ।
अभ्यासें यथार्थ ज्ञान पावावें । तोचि मुक्त साधक ॥ ७० ॥
म्हणून ज्याला आपण खरेच या भावसागरातून तरून जावे असे वाटते, त्याने सांगितल्याप्रकारे अभ्यास करावेत, अभ्यासाने ज्ञान प्राप्त करून घ्यावे, तेव्हाच तो साधक मुक्त होतो. (२८७०)

येर शब्दज्ञानेही बडबडितां । दृढ केवीं होय अपरोक्षता ।
अभ्यासेंविण न जाय तत्त्वतां । देहबुद्धि जे दृढ ॥ ७१ ॥
इतर लोक केवळ शब्दज्ञानानेही बडबड करायला लागतात. त्यायोगाने अपरोक्ष ज्ञान कसे प्राप्त होईल ? देहबुद्धी अतिशय पक्की असल्यामुळे ती अभ्यासावाचून जाणेच शक्य नाही. (२८७१)

असो रविदत्ता येर मूढासी । काय प्रयोजन शुष्क उपदेशीं ।
खरी अपेक्षा जरी तुजसी । तरी अभ्यासी यथाक्रमे ॥ ७२ ॥
असो, तेव्हा रविदत्ता, त्या इतर मूढांना शुष्क उपदेश करण्याचा काय उपयोग ? तुला जर खरोखरच ज्ञानप्राप्तीची अपेक्षा असेल तर क्रमशः अभ्यास सुरू कर. (२८७२)

ऐसें ऐकतांचि रविदत्त । साष्टांगें करूनि दंडवत ।
विनविताहे सद्गदित । ह्मणे दयाळा कृपा करीं ॥ ७३ ॥
असे सद्गुरूंचे वचन ऐकताच रविदत्ताने त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि त्याने त्यांना विनंती केली. "दयाळू गुरूराया माझ्यावर कृपा करा.” (२८७३)

ज्या ज्या रीतीं अभ्यास लक्षण । तें तें सांगावें कृपा करून ।
तैसे तैसें मी अभ्यासीन । अंतर न पडतां ॥ ७४ ॥
ज्या ज्या पद्धतीने अभ्यास करावयाचे आहेत ते ते मला कृपा करून सांगा. मी त्याप्रमाणे अभ्यास करीन. ते करताना त्यामध्ये खंड पडू देणार नाही. (२८७४)

ऐसा आदर जाणून रविदत्ताचा । श्रीगुरु बोलते झाले वाचा ।
अनुक्रमें क्रम अभ्यासाचा । समाधीचा प्रकार ॥ ७५ ॥
रविदत्ताची अशी आस्था जाणून घेतल्यानंतर श्रीसद्गुरू शंकराचार्य अभ्यास आणि समाधी यांच्या प्रकारांचे वर्णन करू लागले. (२८७५)

पूर्वार्ध समाप्त
पूर्वार्ध समाप्त



प्रथम येकांत स्थळ असावें । जेथें मनुष्य मात्र नसावें ।
तेथें सहजासनी बैसावें । सुखा पडे तैसें ॥ ७६ ॥
अभ्यासासाठी प्रथम एकान्त स्थळ असावे. तेथे एकही मनुष्य नसावा. अशा त्या ठिकाणी आपल्याला सुखकारक होईल असे अगदी सहजसाध्य असे आसन घालून बसावे. (२८७६)

आरंभी सद्गुरूचें ध्यान । परमादरें करावें नमन ।
मग सन्मुख करावें अवलोकन । पदार्थ दिसती ते ॥ ७७ ॥
आरंभी सद्गुरूंचे ध्यान करावे, त्यांना आदरपूर्वक नमस्कार करावा. मग आपल्यासमोर जे जे पदार्थ दिसतील त्यांचे अवलोकन करावे. (२८७७)

घटपटादि नानापदार्थ । सर्व अवलोकावे यथार्थ ।
निरुपाधिक असावे अर्थ । पांचही पुढे ॥ ७८ ॥
घट, पट इ. निरनिराळे पदार्थ नीट पहावेत. आपल्या पुढील पदार्थ शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध इ. उपाधी विरहित केवळ पदार्थ म्हणूनच असावेत. (२८७८)

स्वकीय जें कां कर्मेंद्रिय । निवांत करावें अक्रिय ।
तैसेंचि चक्षूविण ज्ञानेंद्रिय । करावें स्थिर ॥ ७९ ॥
स्वत:च्या दहा इंद्रियांपैकी एक दृष्टी सोडून बाकीची नऊ इंद्रिये निष्क्रिय करावीत. तसेच डोळ्यांखेरीज इतर ज्ञानेंद्रिये स्थिर करावीत. (२८७९)

नवही इंद्रियांतून मन । काढून नेत्री आणावें पूर्ण ।
सहज नेत्रांसी दिसे संपूर्ण । तें तें अवलोकावें ॥ ८० ॥
नऊही इंद्रियांतून मन काढून ते डोळ्यांमध्ये पूर्णपणे केंद्रित करावे. आता डोळ्यांना जे जे दिसेल त्याचे संपूर्णपणे अवलोकन करावे. (२८८०)

येक पदार्थ पाहून सोडावा । दुजा मग दिसेल तो पहावा ।
तोही सांडोनि अवलोकावा । तिसरा पदार्थ ॥ ८१ ॥
एका पदार्थाचे अवलोकन करावे. नंतर तो पदार्थ सोडून दुसरा जो पदार्थ दिसेल तो पहावा. नंतर तोही सोडावा आणि तिसरा पदार्थ पहावा. (२८८१)

त्या त्या पदार्थी दृष्टि जाता । विकल्प पावे तदाकरता ।
तो संकल्प अवलोकावा पुरता । वृत्तीचा कैसा होय तो ॥ ८२ ॥
त्या त्या पदार्थावर दृष्टी केंद्रित करताक्षणीच विकल्प त्या पदार्थाशी तद्रप होतो. मग वृत्तीच्या त्या संकल्पाचे स्वरूप कसे होते, त्याचे पूर्णपणे अवलोकन करावे. (२८८२)

पदार्थी जाऊन जो आदळे । तो कोठूनियां उफाळे ।
तो अवलोकावा समूळे । येथून तेथवरी ॥ ८३ ॥
जो विकल्प पदार्थावर जाऊन आदळतो. तो कोठून उगम पावतो ते थेट मुळाशी जाऊन पहावे. अगदी मुळापासून ते पदार्थापर्यंत येथून तेथवर समग्र पहावा. (२८८३)

नेत्रद्वारे बाहेरी आला । पदार्थापर्यंत चंचळत्व पावला ।
तो आधी पहावा धांविन्नला । नेत्रापासून जेव्हां ॥ ८४ ॥
नेत्रद्वाराने तो बाहेर येतो. पदार्थापर्यंत पोहोचेपर्यंत तो चंचल (गतिशील) असतो. तो नेत्रापासून कसा धावतो ते प्रथम पाहावे. (२८८४)

तो एकदां उठतां न कळे । तरी पुन्हां पहावा वेळोवेळे ।
केवीं उफाळे कैसा आदळे । नेत्रादि विषयांत ॥ ८५ ॥
तो एकदा उठल्यावर जर कळला नाही, तर पुन्हा-पुन्हा अनेक वेळा त्याचे अवलोकन करावे. तो नेत्रांपासून कसा उगम पावतो आणि विषयापर्यंत जाऊन तो कसा आदळतो हे सर्व पहावे. (२८८५)

ऐसा बाहेरील संकल्प सारा । कैसा करी जो वेरझारा ।
उठे निमे तो येतां त्वरा । अनुभवासी ॥ ८६ ॥
अशा त-हेने हा बाहेरचा सर्व संकल्प नेत्रांपासून ते विषयापर्यंत कसा येरझारा करतो, तो कसा उत्पन्न होतो आणि लगेच कसा लय पावतो याचा अनुभव घ्यावा. (२८८६)

मग पुढे नेत्रांकडे येता । तो कोठून होय उफाळता ।
दृष्टि घालोनि अंतरा आंतोता । चिरकाळ पहावें ॥ ८७ ॥
मग पुन्हा नेत्राकडे येऊन तो कोठून उगम पावतो ते अगदी आतपर्यंत दृष्टी घालून बराच काळ पहावे. (२८८७)

पाहतां पाहतां कळू येतसे । विकल्पाचे रूप दिसे ।
प्राणा सवें जो उठतसे । अंतरांतूनी ॥ ८८ ॥
असे पुन्हा पुन्हा पाहात असता तो विकल्प समजतो. त्याचे स्वरूप आपल्याला दिसायला लागते. तो अंतरातून (उरातून) प्राणांबरोबर उगम पावतो. (२८८८)

येकदां न कळे ह्मणोनी । कदां न बैसावें सोडूनी ।
पाहिलेंचि पहावें अनुदिनीं । प्रत्यया आणावें ॥ ८९ ॥
एकदा कळला नाही म्हणून तो प्रयत्न सोडून देऊ नये. दररोज जे अगोदर पाहिले तेच पहात असावे आणि त्याचा अनुभव पुन्हा पुन्हा घेत रहावे. (२८८९)

उठतांचि कळू जरी आला । तरी जाणावा सुगावा लागला ।
मग तेथून जरी धांवित्रला । तो तों कळे आपेआप ॥ ९० ॥
तो कसा उगम पावतो हे जर कळले तर समजावे की त्याचा सुगावा लागला. मग तेथून तो विकल्प धावत गेला तरी त्याचा प्रवास आपोआप कळायला लागतो. (२८९०)

मग उठतें संकल्पाचें स्थान । आणि विषयी आदळे जाऊन ।
तेथून येथवरी अवलोकन । सहज करावें ॥ ९१ ॥
मग त्या उठणाऱ्या संकल्पाचे स्थान आणि तो विषयावर जेथे जाऊन आदळतो तेथपासून येथपर्यंत ते अवलोकन सहज (स्वाभाविकपणे करावे. ते नेहमीचा सराव असल्याप्रमाणे व्हावे. (२८९१)

संकल्प उठे तो अवलोकावा । आदळून निमे तो पहावा ।
ऐसाचि दृढ अभ्यास व्हावा । आळस नसावा किंचित् ॥ ९२ ॥
संकल्प उगम पावत असताना त्याचे अवलोकन करावे. तो विषयावर आदळून नष्ट होतानाही अवलोकावा आणि हाच अभ्यास दृढ करावा. त्याबाबतीत किंचितही आळस नसावा. (२८९२)

तथापि आळसचि येतां । उठोनि फिरावें बाह्यता ।
फिरोनि बैसावें मागुतां । आळस गेलियावरी ॥ ९३ ॥
तरीसुद्धा आळस आलाच तर उठून बाहेर फिरून यावे. फिरून आल्यानंतर आळस गेल्यानंतर परत ध्यानाला बसावे. (२८९३)

बहु वेळ बैसणे न घडे । तरी येके दिनीं त्रिकाळ कोडें ।
बैसावें जाऊन येकीकडे । अभ्यासासी ॥ ९४ ॥
पुष्कळ वेळ बसणे शक्य होत नसेल तर एकाच दिवशी तिन्ही काळी थोडा थोडा वेळ बसण्याचा अभ्यास करावा. हा अभ्यास मात्र एकीकडे जाऊन एकान्तात बसून करावा. (२८९४)

परी व्यापारही जरी करितां । जितुकें अनुभवा आलें बैसतां ।
तैसेंचि पहावें चालता बोलतां । विकल्पासी ॥ ९५ ॥
ध्यानाला बसल्यानंतर जसे अनुभव आले त्याचप्रमाणे ध्यानातून उठल्यानंतर चालणे बोलणे इ. व्यापार करतानाही विकल्पावलोकनाचे वरील अभ्यास करत रहावे. (२८९५)

सर्वदां ध्यास जो लागे बरवा । तेणें बैसतां अभ्यास प्रांजळ व्हावा ।
अथवा बैसले अभ्यासे पाहतां यावा । व्यापारामाजीं ॥ ९६ ॥
असा सर्वकाळ ध्यास लागणे फार चांगले आहे. त्यामुळे ध्यानाला बसल्यानंतरचा अभ्यास सुलभ (प्रांजळ) होतो. त्याचप्रमाणे आसनावर बसून केलेल्या अभ्यासामुळे व्यापारातला अभ्यासही सुलभ होतो. हे दोन्ही अभ्यास परस्परपूरक असतात. (२८९६)

ऐसें हे साह्यत्वें दोनी । अभ्यासावे आळस टाकोनी ।
जितुकें अनुभविलें आजिचे दिनी । दुजे दिवशीं तें सुलभ ॥ ९७ ॥
असे हे परस्परांना उपयोगी असे दोन्ही अभ्यास आळस टाकून करत जावे. आज जेवढा अनुभव आला असेल त्यामुळे उद्याचा अभ्यास सुलभ होतो. (२८९७)

परी हा अभ्यास केलाचि करावा । आळशी साधक सहसा नसावा ।
असो रविदत्ता तुवां ऐकावा । पुढील प्रकार ॥ ९८ ॥
पण हा अभ्यास केला तसाच पुन्हा पुन्हा करत जावा. साधक याबाबतीत सहसा आळसी नसावा. असो, आता रविदत्ता, पुढील प्रकार ऐक. (२८९८)

बैसतां प्रत्ययासी आले । जे जे उठती विकल्प की निमाले ।
उठते स्थळापासून अनुभविले । विषयापर्यंत ॥ ९९ ॥
अभ्यासाला बसल्यानंतर विकल्प कसे उठतात, कसे लोप पावतात हे अनुभवास येते. तसेच उगमाच्या ठिकाणापासून विषयापर्यंत त्यांचा विषयापर्यंत प्रवास कसा होतो हेही अनुभवास येते. (२८९९)

ते पाहणे येथून तेथवरी । दृढचि करावें दृश्यापरी ।
ऐसें दृढ जाहलियावरी । त्यांतही विवेचावें ॥ २९०० ॥
उगमापासून ते विषयापर्यंत विकल्पांचे अवलोकन अभ्यासाने पक्के करावे. इतर दृश्ये पहातो त्याप्रमाणे हे विकल्पाचे उगम, प्रवास आणि लोप तसे पाहता यावे. हे अवलोकन दृढ झाल्यानंतर त्यांच्यावरही (विकल्पांवर) विचार करावा. (२९००)

संशय करीतसे तें मन । साधकें पहावें वोळखून ।
संशयाचेंचि करी चिंतन । तें चित्त समजावें ॥ १ ॥
संशय करते ते मन. ते कसे असते हे साधकाने ओळखून पहावे. त्या संशयाचेच जे चिंतन करते ते चित्त होय. तेही समजून घ्यावे. (२९०१)

वोळखितां सत्य निश्चय करी । ते बुद्धी जाणावी शोधून अंतरीं ।
उगा भलताचि अभिमान धरी । तो अहंकार ॥ २ ॥
त्यानंतर सत्याची ओळख पटल्यानंतर निश्चय करण्याचे काम जी करते, ती बुद्धी होय. ती अंतःकरणात शोधून जाणून घ्यावी. गाननगेना गीचच भलताच अभिमान बाळगतो तो अहंकार समजावा. (२९०२)

ऐसे विकल्पाचे चार प्रकार । संकल्परूप उठती उद्‌गार ।
ते वेगळा पानिले समजावे निर्धार । रूपासहित ॥ ३ ॥
असे मन, बद्दी, चित्त स्वरूप विकल्पांपेक्षा वेगवेगळे आहे. हेही लक्षात घ्यावे. (२९०३)

यास विकल्पाहीपरतें । निर्विकल्पत्वें स्फुरण उठतें ।
तया अंतःकरणरूप विकल्पातें । वोळखिलें पाहिजे ॥ ४ ॥
हे सविकल्प अभ्यास होत. पण या चे सविकल्प अभ्यासाच्या पलीकडे निर्विकल्प स्थितीतही स्फुरण उठत असते. त्या अंतःकरणरूप विकल्पांनाही ओळखले पाहिजे. (२९०४)

मन बुद्धि चित्त अहंकृति । यांची किंचित् नसतां उत्पत्ति ।
सहज सामान्यत्वें वृत्ति । पदार्थी जाऊन पसरे ॥ ५ ॥
मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांची किंचितही उत्पत्ती झाली नसताना सहज वृत्ती सामान्यत्वाने पदार्थापर्यंत पसरते. (२९०५)

येक स्फूर्ति पसरून वितुळे । तो दुजी जाऊन रूपी मिसळे ।
मागुती तिसरीही उफाळे । जललहरीपरी ॥ ६ ॥
एक स्फूर्ती पसरते आणि लगेच वितळते (लोप पावते) न वितळते तोच दुसरी स्फूर्ती येऊन तिच्या रूपात मिसळते. त्यानंतर तिसरी स्फूर्तीही पाण्याच्या लाटेप्रमाणे लगोलग उफाळून येते. (२९०६)

परी ते मनबुद्धीच्या संकल्पा । न यावी संशय की निश्चयरूपा ।
सहज आदळे उफाळे खेपा । घटादिकांत करी ॥ ७ ॥
पण ही स्फूर्ती मन आणि बुद्धी यांच्या संशय अथवा निश्चयरूपी संकल्पांचे विषय होऊ देऊ नये. ती सहज उफाळून येते आणि पदार्थावर जाऊन आदळते. घटादी पदार्थात तिच्या अशा खेपा चालू असतात. (२९०७)

ते सामान्य वृत्ति साधकें । ओळखावी अभ्यासें निकें ।
तेिचाही प्रकार ऐकें । जाणावयाचा ॥ ८ ॥
साधकाने अभ्यासाच्या साहाय्याने ही सामान्य वृत्ती नीट ओळखून घ्यावी. ती कशी जाणून घ्यावी याचाही प्रकार ऐकून घे. (२९०८)

ते सहज तरी निमे उठे । उगीच अवलोकावी जेव्हां उमटे ।
परी हे जाणिली ऐसें जरी वाटे । तरी संकल्प जाहला ॥ ९ ॥
ती सहजपणे उठते तशीच लोप पावते. साधकाने ती उठत असताना उगीच तिचे अवलोकन करावे. पण ती मी ओळखली असे होऊ देऊ नये. तसे थोडे जरी वाटले की तिचे संकल्पात रूपान्तर होते. (२९०९)

तेचि भन बुद्धि उद्भवली । तेव्हां निर्विकल्पता बुडाली ।
ह्मणून संकल्प नुठतां पहिली । चिरकाळ अनुभवावी ॥ १० ॥
संकल्पात रूपान्तर होणे म्हणजे मन, बुद्धी यांचे उत्थान होय. त्यावेळी तिचे निर्विकल्पपण लोप पावते. म्हणून संकल्प उठण्यापूर्वीच अगोदर तिचा चिरकाळ अनुभव घ्यावा. (२९१०)

सहज उठतां आदळतां । मन बुद्धीचे आकारा न येतां ।
उगी अवलोकावी तत्त्वतां । न पाहतां अमुकशी ॥ ११ ॥
ती सहजपणे उठत असता, आणि विषयावर जाऊन आदळत असता, पण मन बुद्धी यांचे स्वरूप धारण करण्यापूर्वी तिची अमुक अशी ओळख न पाहता, तिचे उगीच निर्हेतुकपणे अवलोकन करावे. (२९११)

पुढे मनबुद्धि उठल्यावरी । अनुमाने पहावी अंतरीं ।
की अमुक वेळां निर्विकल्पता खरी । जाहली होती ते सामान्य ॥ १२ ॥
नंतर पुढे मन, बुद्धी उत्पन्न झाल्यावर मग आपण अंतःकरणात अनुमानाने पाहावे की, जेवढा काळ निर्विकल्पता राहिली, तेवढ्या काळापर्यंत वृत्तीची ही सामान्य अवस्था राहिली. (सामान्य कुठल्याही विशिष्ट जाणिवेचे अस्तित्व नसणे.) (२९१२)

परी निर्विकल्पता जोवरी असे । तोंवरी न कल्पावें अमुकसे ।
ऐशिया सामान्यत्व अभ्यासें । साधकें अभ्यासावें ॥ १३ ॥
पण निर्विकल्पता असेपर्यंत येत असलेला अनुभव कशा प्रकारचा आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू नये. असे हे सामान्यत्व आहे. त्याचा साधकाने अभ्यास करावा. (२९१३)

या रीतीं नेत्र उघडे असतां । पदार्थविषयही दिसतां ।
सामान्य वृत्ति जे सहज तत्वता । अभ्यासें साधावी ॥ १४ ॥
अशा रीतीने डोळे उघडे असताना, पदार्थ, विषय दिसत असताना जी सामान्य वृत्ती निर्माण होते. ती अभ्यासाने साध्य करावी. (२९१४)

तथापि क्षणक्षणां मन बुद्धि । निर्विकल्पत्वीं उठे कधीं ।
तेही आपेआप मावळतां नुसधी । सामान्य वृत्ति उरे ॥ १५ ॥
पण अशा निर्विकल्प अवस्थेत सुद्धा कदी कधी मन, बुद्धी यांचा उद्भवण्याचा क्षणोक्षणी प्रकार घडतो. पण ती दोन्ही लोप पावल्यानंतर जी उरते ती सामान्य वृत्ती होय. (२९१५)

ते सामान्यता वाढवावी । विकल्पता क्षीण व्हावी ।
ऐशी अभ्यासयुक्ति साधावी । जागृतीमाजीं ॥ १६ ॥
ती सामान्यता वाढवावी, विकल्पता क्षीण व्हावी, अशा प्रकारची अभ्यासाची युक्ती जागृती अवस्थेमध्ये अभ्यासाने साध्य करावी. (२९१६)

पुढे नेत्र झांकून बैसावें । पदार्थांचें पाहणे त्यागावें ।
अंतरामाजीं जे संकल्प उमटावे । अवलोकावे तितुके ॥ १७ ॥
त्यानंतर डोळे झाकून बसावे. त्यावेळी पदार्थाकडे पाहण्याचे टाळावे. फक्त अंतःकरणात जे संकल्प उठतील. ते तेवढे अवलोकावेत. (२९१७)

आरंभीं उठे जो संकल्प । पदार्थ उद्भवी ध्यासरूप ।
घटपटादि पदार्थ अमुप । दिसती भासमात्र ॥ १८ ॥
प्रथम जो संकल्प निर्माण होतो तो ध्यासरूप पदार्थ निर्माण करतो. त्या ध्यासामध्ये घट पट इ. अनेक भासमान पदार्थ दिसायला लागतात. (२९१८)

इंद्रिय तों नवही नवते । येक नेत्र मात्र पाहत होते ।
डोळे झांकितां अंतरा आंतौते । पाहणे आलें ॥ १९ ॥
या ध्यानामध्ये बाकीची नऊ इंद्रिये नव्हती. एक नेत्रेन्द्रिय तेवढे पाहात होते. पण ते डोळेही झाकून घेतल्यानंतर आतल्या आत पाहणे चालू झाले. (२९१९)

तेंचि अंतरदृष्टीचे पाहणें । कल्पिला भास वोळखणे ।
नाना पदार्थांचे जे दिसणें । हे स्वप्न अवस्था ॥ २० ॥
त्यालाच अंतर्दृष्टीचे पाहणे होय. त्यामध्ये कल्पित भासाची ओळख पटते. त्यामध्ये अनेक पदार्थ दिसू लागतात. म्हणन ही स्वप्नावस्थाच होय. (२९२०)

येथेही साधकें वृत्ति उठता । अवलोकावी स्वस्थचित्ता ।
कल्पित विषयावरी आदळतां । न आंवरितां पहावी ॥ २१ ॥
या ध्यानातही साधकाने वृत्ती उत्पन्न होताच स्वस्थ चित्ताने तिचे अवलोकन करावे. ती कल्पित विषयावर आदळते. तेव्हा तिला आवर न घालता फक्त तिचे अवलोकन करावे. (२९२१)

उठतें स्थान समजावें । पदार्थी आदळतां अवलोकावें ।
ऐसेंचि चिरकाळ अभ्यासावें । स्वप्न अवस्थेसी ॥ २२ ॥
ज्या स्थानापासून ती वृत्ती उगम पावते ते स्थान समजून घ्यावे. ते पदार्थावर आदळते तेही पहावे. अशा त-हेने या स्वप्नावस्थेचे दीर्घकाळ अवलोकन करावे. त्याचा अभ्यास करावा. (२९२२)

तेथीलही चतुष्टय प्रकार । मन बुद्धि चित्त अहंकार ।
वेगळाली रूपें सविस्तर । जाणावी त्याची ॥ २३ ॥
तेथेही मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे चार प्रकार निर्माण होतात. त्यांची वेगवेगळी रूपे सविस्तर जाणून घ्यावीत. (२९२३)

ऐसा संकल्परूप जो विकल्प । स्पष्ट कळतां आपेआप ।
पुढे साधावें निर्विकल्प । कैसें तें सामान्य ॥ २४ ॥
असा हा संकल्परूप जो विकल्प आपोआप स्पष्ट कळू लागला की नंतर निर्विकल्प सामान्य कसे साध्य करावे ते पाहू. (२९२४)

बुद्धि मन न होतां उत्पन्न । भासविषयाचे दर्शन ।
उगेंचि पोकळीमाजी पसरून । स्फुरण वितळून जाय ॥ २५ ॥
बुद्धी, मन यांची उत्पत्ती होण्यापूर्वी केवळ भास (कल्पित) विषयांचे दर्शन होत असते. ते स्फुरण उगीचच पोकळीमध्ये पसरते आणि वितळून जाते. (२९२५)

चिरकाळ मन बुद्धि जरी उठेना । तेचि सुप्ति स्थिति की उगेपणा ।
तोचि समाधि अभ्यासाविना । प्राप्त नोहे साधका ॥ २६ ॥
असे दीर्घकाळपर्यंत मन, बुद्धी उत्पन्न झाले नाहीत तर ती सुषुप्ती अथवा उगेपणाची स्थिती होय. हीच समाधी होय. ती साधकाला अभ्यासाशिवाय साध्य होत नाही. (२९२६)

या निर्विकल्प स्फूर्तिचा प्रकार । पुढे निरोपिजे सविस्तर ।
प्रस्तुत विकल्परूप साचार । कैसा तो अनुभवावा ॥ २७ ॥
या निर्विकल्प स्फूर्तीच्या प्रकाराचे पुढे सविस्तर निरूपण करण्यात येईलच. तूर्तास या प्रकारातील विकल्पाचे रूप कसे असते त्याचा अनुभव घ्यावा. (२९२७)

मन बुद्धीची तरी विशेष । हानि नव्हेचि निःशेष ।
परी अनुभवावें अशेष । उठणे आदळणें ॥ २८ ॥
मन, बुद्धी यांची निःशेष हानी होत नाही. तरी स्फूर्तीचे उठणे आणि आदळणे यांचा संपूर्णपणे अनुभव घ्यावा. (२९२८)

सहज रीती विकल्प उठे । अंतराळी उठोनि दाटे ।
भास विषय कल्पूनि गोमटे । जाय वितळूनी ॥ २९ ॥
विकल्प सहज रीत्या उठतो, उठून पोकळीत पसरतो आणि कल्पनेने इष्ट भासविषय निर्माण करून तो वितळून जातो. (२९२९)

ऐसे संकल्प नानापरी । उठती निमटी हृदयांतरी ।
तेचि अवलोकावे निर्धारीं । चिरकाळ अभ्यासें ॥ ३० ॥
असे अनेक प्रकारचे संकल्प अंतःकरणात उठतात आणि लोप पावतात. तेच निर्धाराने अभ्यास करून दीर्घकाळ पहावेत. (२९३०)

एवं डोळे उघडितां विषयांपर्यंत । अथवा डोळे झांकिता भास कल्पित ।
या दो स्थळी जाऊनि आदळत । विकल्प जो उठोनी ॥ ३१ ॥
डोळे उघडे असताना विकल्प उठतात आणि प्रत्यक्ष विषयापर्यंत जाऊन आदळतात. आणि डोळे मिटले असताना विकल्प उठतात आणि कल्पित भासापर्यंत जाऊन आदळतात. या दोन्ही ठिकाणी उठलेले विकल्प प्रत्यक्ष अथवा कल्पित विषयापर्यंत जाऊन आदळतात.(२९३१)

तो विकल्प मात्र अनुभवावा । उगाचि उठतां निमतां पहावा ।
या अभ्यासें ह्मणसी स्वभावा । काय प्राप्त साधकां ॥ ३२ ॥
या दोन्ही वेळचे विकल्प तेवढे अनुभवावेत. उगीचच विकल्प उठतो कसा हे पहावे, तो कसा लोप पावतो ते पहावे. या अभ्यासाने साधकाला काय प्राप्त होते, असे म्हणशील तर ऐक. (२९३२)

तरी अवधारी मोती की तरंगे । अथवा जैसें निबिड मेघे ।
सूत्र जल गगन सवेगें । आच्छादिलें असे ॥ ३३ ॥
तर हे लक्षात घे की, मोती, तरंग अथवा दाट मेघ यांनी अनुक्रमे सुताचा धागा, पाणी आणि आकाश झाकून टाकले जाते. (२९३३)

तैसी या सर्व विकल्पजाळीं । आच्छादिली चित्प्रभा आगळी ।
ते या समाधिअभ्यासें सुकाळीं । कळू येतसे ते ऐकें ॥ ३४ ॥
त्याप्रमाणे या विकल्पांच्या जाळ्यांनी चित्प्रभा (म्ह. चिद्रूप) झाकून टाकली. ते कसे होते ते या समाधीच्या अभ्यासाने कळून येते, कसे ते ऐक. (२९३४)

जैसें मोती मणी तरंग सारितां । अथवा मेघ मध्ये मध्ये वितुळतां ।
तंतु पाणी गगन आंतौता । प्रतीतीसी येतसे ॥ ३५ ॥
ज्याप्रमाणे मोती किंवा मणी, अथवा तरंग बाजूला सारल्याबरोबर अथवा मेघ मधे मधे विरळ झाल्याबरोबर त्यामागे झाकलेले धागा, पाणी अथवा आकाश ही स्पष्ट दिसू लागतात. (२९३५)

तैसें या विकल्पाचे संधी आंत । स्पष्ट चिद्‌रूप प्रगटत ।
म्हणून सांगितला अभ्यास जो निश्चित । महत्फल देतसे ॥ ३६ ॥
त्याप्रमाणे या विकल्पांच्या संधीमध्ये चिद्रप स्पष्टपणे प्रकट होते. म्हणून ज्या अभ्यासाने हे महाफळ हमखास भेटते तो हा अभ्यास सांगितला. (२९३६)

उगाचि विकल्प पाहतां पाहतां । संधि कळों येती तत्त्वतां ।
तया संधीमाजीं अवलोकितां । सामान्य प्रकाश कळे ॥ ३७ ॥
विकल्प उगीच पहात असताना त्यांचे संधी आपोआप कळू लागतात. त्या संधीमध्ये पाहिले की सामान्य प्रकाश कळून येतो. (२९३७)

त्या संधीही कैशा आपेआप । होती तें बोलिजे स्वरूप ।
आणि ब्रह्मात्मा कैसा सच्चिद्‌रूप । स्पष्ट असे अंतरी ॥ ३८ ॥
ते संधीही आपोआप कसे कळतात त्यांचे स्वरूप आणि त्यामध्ये सच्चिद्रप ब्रह्मात्मा कसा स्पष्ट कळतो, ते आता सांगतो. (२९३८)

आणि विकल्पामाजीं जो बिंबला । जीवही कळेल अनुभवाला ।
तस्मात् सावधान निरूपणाला । असावें श्लोकींच्या ॥ ३९ ॥
आणि या विकल्पांमध्ये जो प्रतिबिंबाच्या रूपाने अडकला त्या जीवाचाही अनुभव येईल. म्हणून आता पुढील श्लोकाच्या निरूपणाकडे अवधान दे. (२९३९)

GO TOP