॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ लघुवाक्यवृत्ति ॥


श्लोक क्र. ९ वा

॥ श्रीरामसमर्थ ॥

श्लोकः क्षणे क्षणेऽन्यथाभूता धीविकल्पाश्चितिर्न तु ॥ ९ ॥
(पूर्वार्ध)
अर्थः बुद्धीत होणारे विकल्प क्षणोक्षणी बदलत असतात तसे शुद्ध चैतन्याचे नसते. ॥९।। (पूर्वार्ध)

हे बत्तीस ईशादि तृणान्त । होती क्षणक्षणां अन्यथाभूत ।
ब्रह्मात्मा चिद्‌रूप सदोदित । अन्यथा नव्हे ॥ ७८ ॥
ईशापासून ते तृणापर्यंतची ही बत्तीस तत्त्वे क्षणोक्षणी आपले रूप पालटतात. पण ब्रह्मात्मा मात्र सदैव चैतन्यरूप असून तो कधीही बदलत नाही. (२४७८)

मूळ श्लोकीं बुद्धीचे विकल्प । अन्यथा होती बोलिले अल्प ।
त्यावरी ईशादि तृणान्त केला जल्प । कासया कोणी मानील ॥ ७९ ॥
मूळ श्लोकात बुद्धीचे विकल्प बदलतात असे म्हटले आहे. त्याऐवजी आम्ही ईश्वरापासून ते तृणापर्यंत असे विनाकारण वाढवले आहे, असे कदाचित कोणी मानील. (२४७९)

तरी बुद्धीपासून तों ऐलीकडे । देहांत विकल्पांत सांपडे ।
जीवही तेथें स्फूर्तित्वें आतुडे । एवं हे सर्व आलें ॥ ८० ॥
तरी बुद्धीपासून तो दुसऱ्या टोकाच्या देहापर्यंत सगळा विस्तार विकल्पांमध्ये अंतर्भूत आहे. जीवही त्यामध्ये स्फूर्तीमुळे अडकतो. त्यामुळे आम्ही निर्देशिलेली सर्व तत्त्वे श्लोकार्थात आली. (२४८०)

बुद्धीचे कारण जें आनंदमय । तेंही बुद्धीवीण कोठे जाय ।
तस्मात् कारणासी घेऊन कार्य । वर्ते व्यापारी ॥ ८१ ॥
बुद्धी (विज्ञानमय कोशाचे) आनंदमय कोश हे कारण आहे. पण बुद्धीला सोडून आनंदमय कोश कोठे जाणार ? त्यामुळे कार्य कारणाला घेऊनच व्यापारास प्रवृत्त होते. (२४८१)

आरंभी मायास्फूर्ति उठे । तेव्हांचि बुद्धिकार्य उमटे ।
तेव्हां विद्या अविद्या जीवेश गोमटे । कां न येती ॥ ८२ ॥
प्रथम मायास्फूर्ती उत्पन्न होते. त्यानंतरच बुद्धिरूप कार्य प्रगट होते. त्याबरोबर विद्या, अविद्या, जीव आणि ईश्वर हेही का येणार नाहीत ? तात्पर्य, तेही प्रगट होतात. (२४८२)

तस्मात ईशादि तृणान्त बत्तीस । विकल्परूपताचि असे यास ।
हेचि क्षणक्षणां अन्यथा भास । होती पावती विकारा ॥ ८३ ॥
त्यामुळे ईश्वरापासून तृणापर्यंत सर्व बत्तीस तत्त्वे विकल्परूपच आहेत. तेच क्षणाक्षणाला बदलतात, जन्मतात आणि विकारही पावतात. (२४८३)

पृथ्वी आप तेज वायु गगन । हे तों जड पहिलेच संपूर्ण ।
याही वरी पालट धरिती क्षणक्षण । एकत्र पांच होतां ॥ ८४ ॥
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे तर प्रथमपासूनच जड आहेत. त्यातही ती पाचही एकत्र मिळाली म्हणजे क्षणाक्षणाला विकार पावत असतात. (२४८४)

पांच खाणी तों मुळी विकारी । पुढें जन्मादि मरणान्त विकार करी ।
क्षणक्षणां पालटती सारी । देहधारी सान थोर ॥ ८५ ॥
पाच खाणी तर मूळच्याच विकारी प्रकृतीच्या आहेत. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्यांच्यात विकार होत असतात. सर्वच लहान थोर देहधारी क्षणाक्षणाला पालटत असतात. (२४८५)

देहाअंतरीं पंचप्राण । हे तो उघड विकारी क्षणक्षण ।
तैसाचि दशेंद्रियांचा गण । अन्यथा विकारा पावे ॥ ८६ ॥
देहामध्ये पंचप्राण असतात. ते तर उघड उघड क्षणाक्षणाला विकार पावतात. त्याप्रमाणेच दहा इंद्रियांचा समुदाय निराळ्या प्रकारे विकार पावत असतो. (२४८६)

मनबुद्धीचे तों सर्वदा विकल्प । क्षणक्षणां होती संकल्प ।
विकारावीण न राहती अल्प । गुणाचे की कामादिकांचे ॥ ८७ ॥
मन आणि बुद्धीचे विकल्प तर सतत चालू असतात. संकल्प क्षणाक्षणाला होत असतात. विकार न होता ते क्षणभरही राहू शकत नाहीत. त्यांचे विकार गुणांचे असोत की कामादिकांचे, ते सतत चालूच असतात. (२४८७)

ऐशीच मायास्फूर्ति क्षणक्षणां । उठे मुरे सर्वदा स्फुरणा ।
तिजसवें विद्या अविद्या विक्षेप आवरणा । करिती विकार ॥ ८८ ॥
मायास्फूर्ती ही अशीच आहे. ती क्षणाक्षणाला उठते आणि विरते. म्हणून ती सर्वदा स्फुरणशील आहे. तिच्याबरोबरच अविद्या आणि विद्या निर्माण होतात. अविद्या आवरणाचा विकार करते आणि विद्येमुळे विक्षेपाचा विकार होतो. आवरण म्हणजे मूळ वस्तूचे अज्ञान आणि विक्षेप म्हणजे मूळ वस्तूच्या जागी दुसरी भासमान वस्तू निर्माण करणे. (२४८८)

जीव तो मायास्फूर्तीपासून । विषयांत आदळे जाऊन ।
यासी विकारी ह्मणतां क्षणक्षण । किमपि दोष नाहीं ॥ ८९ ॥
जीव माया स्फूर्तीपासून विषयांपर्यंत जाऊन आदळतो आणि परत येतो. त्याला क्षणाक्षणाला विकार पावणारा असे म्हटल्यास काही दोष नाही. (२४८९)

ही असो जीवत्वाची कथा । परी ईशही विकारी सर्वथा ।
मुळीच प्रतिबिंबत्वे जाहला अन्यथा । वरी विकार प्रेरणेचा ॥ ९० ॥
जीव विकारी हे स्पष्ट झाले. पण ईश्वरही सर्वप्रकारांनी विकारी आहे. मुळात तो प्रतिबिंब रूपात असल्यामुळे ब्रह्मापासून तो वेगळा पडला आहे. आणि प्रेरणेचे कार्य करतो. तो तर विकारच होय. (२४९०)

तस्मात् ईशादि तृणान्त । क्षणक्षणां होती मिथ्याभूत ।
कारण की सर्वही मायाजनित । विकाराचे विकारी ॥ ९१ ॥
म्हणून ईश्वरापासून तृणापर्यंत सर्व पदार्थ क्षणाक्षणाला विकार पावून मिथ्या होत असतात. कारण ते सर्वही मायेपासून निर्माण झालेले आहेत. मूळ मायाच विकार आहे आणि हे पदार्थ तिच्यापासून झालेले असल्यामुळे ते विकारांचे विकार ठरतात. (२४९१)

प्रेरक ईश मायेंत आला । मा प्रेर्य जीव तो विकाराचा आथिला ।
येथे शंका वाटेल कोणाला । ते आधी अवधारा ॥ ९२ ॥
प्रेरक ईश्वरही मायेच्या विकारामध्येच आला आणि प्रेर्य जीव तर विकारांचाच बनलेला आहे. आता या संदर्भात कोणाच्या मनात शंका उत्पन्न होईल. प्रथम ती शंका समजून घ्या. (२४९२)

की प्रेरक मायातीत आत्मा ब्रह्म । बुद्धीचा असे हा श्रुतीचा नेम ।
आणि सर्वांसी असे विश्राम । अधिष्ठानत्वें ॥ ९३ ॥
मायातीत असा ब्रह्मात्मा हा खरा प्रेरक आहे. तो बुद्धीला प्रेरणा देतो. अशी श्रुतीची व्यवस्था आहे. तो सर्वांचे अधिष्ठान असल्यामुळे सर्वांचे विश्रांतिस्थानही आहे. (२४९३)

चुंबकासन्निध लोह चळे । तेव्हां चालक चुंबक या युक्तीच्या बळें ।
आणि अनुभवही बोलती सकळे । ज्ञाते कवि वेदांती ॥ ९४ ॥
चुंबकाच्या सानिध्यामुळे लोखंड हालचाल करते. तेव्हा या दृष्टान्ताच्या (अथवा युक्तिवादाच्या) आधारावर चुंबक हा चालक ठरतो. आणि सगळे ज्ञाते, कवी वेदान्ती आपलाही अनुभव असाच आहे, असे सांगतात. (२४९४)

तस्मात् श्रुति युक्ति अनुभवेंकडून । ब्रह्म आत्माचि करी प्रेरण ।
येथे प्रेरक स्थापिला ईशान । तरी विरोध वाटे ॥ ९५ ॥
तेव्हा श्रुती, युक्ती आणि अनुभव यांच्या पुराव्यांवरून ब्रह्मात्माच प्रेरणा देण्याचे कार्य करतो. पण आता तर तुम्ही येथे ईश्वराची प्रेरक म्हणून स्थापना केली आहे. त्यामुळे या दोन्ही मतात विरोध जाणवतो. (२४९५)

ऐसिया आशंकेसी उत्तर । कीजेल सत्यत्वेंसी निर्धार ।
ब्रह्मात्मा प्रेरक जो प्रकार । याचे रहस्य भित्र ॥ ९६ ॥
आता या आशंकेचे उत्तर देतो. त्यावरून सत्याचा उलगडा होईल. ब्रह्मात्मा हा प्रेरक ठरवण्यात आलेला आहे. त्याचे रहस्य वेगळे आहे. (२४९६)

ईश्वरादिही सर्व जाहले । जाहले ते स्वधर्मी व्यापारले ।
या इतुकियांच प्रेरण कोणी केलें । ईशादि तृणान्त ॥ ९७ ॥
ईश्वर इ. सर्व उत्पन्न झाले. जे उत्पन्न झाले ते स्वतःच्या गुणधर्मानुसार व्यापार करू लागले. या सर्व ईश्वरापासून ते गवतापर्यंतच्या पदार्थांना प्रेरणा कोणी दिली ? (२४९७)

तेव्हां श्रुतीसीही विचार पडिला । की हा आळ घालावा कोणाला ।
ब्रह्मात्मा तो असंग संचला । ईश तो प्रेर्य असे ॥ ९८ ॥
तेव्हा श्रुतीलाही विचार पडला की आता हा आळ (आरोप) कोणावर घालावा ? ब्रह्मात्मा तर असंग आहे, आणि ईश्वर तर प्रेर्य (दुसऱ्याकडून प्रेरणा घेतो तो) आहे. (२४९८)

मागुती पाहतां विचार । हे जाहलेच नसतां सविस्तर ।
मिथ्यात्वा प्रेरक जरी निर्विकार । ह्मणतां बाध नाहीं ॥ ९९ ॥
त्यानंतर नीट विचार केल्यानंतर लक्षात आले वरीलपैकी कोणीच निर्माण झाले नाहीत. मग एवीतेवी सर्वच मिथ्या आहेत. मग त्या मिथ्या पदार्थांचा प्रेरक म्हणून निर्विकार परब्रह्माचे नाव पुढे केले तर काही बाध येत नाही. (२४९९)

चुंबक स्वतां हालवीना । सन्निधानत्वें लोहो पावे भ्रमणा ।
तरी तो विकार न पावतां आरोपणा । केली तरी निर्बाध ॥ २५०० ॥
ज्याप्रमाणे चुंबक स्वतः लोखंडाची हालचाल करीत नाही, पण त्याच्या सान्निध्यामुळे लोखंड हालचाल करते. तेव्हा चुंबक निर्विकारी आहे. त्याच्यावर आरोप केला तरी काही बाधा येत नाही. (२५००)

तैसे हे माया ईशादि तृणान्त । सत्यत्वें नसोनि जाहलें समस्त ।
यासि प्रेरणा निर्विकारत्वें होत । ब्रह्मात्मयाची ॥ १ ॥
त्याप्रमाणे मायेपासून ते गवतापर्यंतचे सर्व पदार्थ वस्तुतः झाले नसूनही झाले असे आपण म्हणतो. त्याला निर्विकारी अशा ब्रह्मात्म्याचीच प्रेरणा होत असली पाहिजे. (२५०१)

परी यासी स्वतां चेष्टवीना । ना न चेष्टवी हेही असेना ।
हेंचि उद्भवून पावतें अवसाना । तया अधिष्ठान मात्र ॥ २ ॥
तो ब्रह्मात्मा स्वतः प्रेरणा देत नाही. पण तो प्रेरणा देत नाही असेही म्हणता येत नाही. हे पदार्थच उत्पन्न होऊन लोप पावत असतात. ब्रह्म हे केवळ अधिष्ठान म्हणून असते. (२५०२)

सर्पविकारा जेवीं दोरी । तेवीं सर्वां आधार निर्विकारी ।
मग प्रेरी अथवा न प्रेरी । परी आळ अधिष्ठानीं ॥ ३ ॥
सर्पविकार भासण्यासाठी ज्याप्रमाणे दोरी हे अधिष्ठान असते, त्याप्रमाणे सर्व सृष्ट पदार्थांच्या निर्मितीला निर्विकारी ब्रह्मात्मा हाच अधिष्ठान असतो. मग तो प्रेरणा करो वा न करो, आळ मात्र अधिष्ठानावरच येतो. (२५०३)

ऐसिया हेतू श्रुति जाणे । ब्रह्मात्मया प्रेरक म्हणे ।
येन्हवीं पहातां प्रेरणा न होणें । निज परब्रह्मीं ॥ ४ ॥
श्रुतीचा असा अभिप्राय आहे. ती ब्रह्मात्म्याला प्रेरक म्हणते. एरव्ही पाहू गेल्यास स्वस्वरूपाच्या ठिकाणी प्रेरणा देण्याचे कार्य होत नाही. (२५०४)

हेही जग जया सत्य वाटलें । तयासी श्रुति उगीच बोले ।
की हे परमात्मसत्तें वर्तलें । तया स्मरा अखंडिता ॥ ५ ॥
हे जग ज्याला सत्य वाटते, त्याला श्रुतीने उगीच सांगितले की, जगाचा व्यापार परमेश्वराच्या सत्तेने चालतो त्याचे अखंडितपणे स्मरण करा. (२५०५)

जया साधका मिथ्या कळतां । जाहलेंचि नाही वाटे चित्ता ।
तेव्हां प्रेरकत्वाची वार्ता । मिथ्या होय ॥ ६ ॥
ज्या साधकाला हे जग मिथ्या आहे हे कळते,हे झालेच नाही असे मनापासून वाटते, तेव्हा त्याचा प्रेरक कोण इ. गोष्टी ही व्यर्थ ठरतात. (२५०६)

म्हणोनि श्रुति निःशंक बोलिली । परी अंतरीं सारांशता भिन्न भाविली ।
कैशी ही भाविकें समजाविलीं । परी यथार्थ नव्हे ॥ ७ ॥
म्हणून श्रुतीने निःशंकपणे सांगून टाकले. पण मनामध्ये आपला खरा अभिप्राय गृहीत धरला. या भाविकांची समजूत घातली खरी, पण ती यथार्थ नाही. (२५०७)

यथार्थ विकारें जो प्रेरक । हा ईश्वराचाचि धर्म एक ।
कारण की ईक्षणादि शक्ति अनेक । असती विक्षेपादि ॥ ८ ॥
वस्तुस्थिती (खरी गोष्ट ही की) विकारांना प्रेरणा देणे ईश्वराचाच एक धर्म आहे. कारण त्याच्याकडे ईक्षण (अनुप्रवेश) विक्षेप (खोटी सृष्टी निर्माण करणे) इ. अनेक शक्ती आहेत. (२५०८)

यासीही श्रुति बहु प्रमाण । कीं प्रेरक सर्वज्ञ ईशान ।
आणि युक्ति अनुभवेंही कडून । ईशेंविण प्रेरण नव्हे ॥ ९ ॥
यालाही श्रुतीत अनेक प्रमाणे आहेत. ईश्वर हा सर्वज्ञ असून तो प्रेरक आहे अशा अर्थाची श्रुतीची वचने आहेत. युक्ती आणि अनुभव पाहता ईश्वरावाचून प्रेरणा देण्याचे कार्य होत नाही, असेच ठरते. (२५०९)

जयाच्या भीतीनें वायु वाहे । हे श्रुति ईश्वरा प्रमाण आहे ।
बुद्धीचा प्रेरक गायत्री म्हणताहे । ब्रह्म परमात्मा ॥ १० ॥
ज्याच्या भीतीने वारा वाहतो' अशा अर्थाचे वेदवचन ईश्वराच्या सामर्थ्याचा निर्देश करते. सुप्रसिद्ध गायत्री मंत्र बुद्धीचा प्रेरक म्हणून ब्रह्म परमात्म्याचा निर्देश करतो. (२५१०)

ब्रह्मात्मा प्रेरक जे म्हणितलें । हे उगें सहजत्वें बोलिलें ।
ईश्वराचे भीतीने म्हणतां जाहलें । विकाररूप प्रेरण ॥ ११ ॥
त्या गायत्री मंत्रात ब्रह्मात्म्याला प्रेरक म्हणून म्हटले आहे ते उगीच, सहज म्हटले आहे. ईश्वराच्या भीतीने असे म्हटले आहे त्याचा अर्थ ईश्वर विकाररूप प्रेरणा करतो. (२५११)

या सर्वांसी जे भीति होय । ते सामर्थ्याविणे म्हणों नये ।
सामर्थ्य तेंचि विकारी जेणें भय । पावती सर्व ॥ १२ ॥
वायू इ. ना जी भीती आहे ती ईश्वराच्या सामर्थ्याशिवाय असूच शकत नाही. विकारी तत्त्वे त्या सामर्थ्यामुळेच भयभीत होतात. त्यांना दरारा वाटतो. (२५१२)

तें सामर्थ्य ईश्वरीच असे । ब्रह्मी विकाराचे नांव नसे ।
हे विचारें पहावें मानसें । विचारवंतीं ॥ १३ ॥
असे सामर्थ्य ईश्वराचेच असते. ब्रह्माच्या ठिकाणी विकाराचे नाव नसते. विचारवंतांनी याचा मनात विचार करावा. (२५१३)

तस्मात् ईशाचे प्रेरण तें विकारी । ब्रह्मात्मा प्रेरक निर्विकारी ।
हे दृष्टांताचिये अनुकारी । स्पष्ट कळे तो ऐका ॥ १४ ॥
त्यामुळे ईश्वराची प्रेरणा हे विकारी सामर्थ्य होय. ब्रह्मात्मा हा निर्विकार राहून प्रेरणा करतो. हे दृष्टान्ताने स्पष्ट कळेल म्हणून तो दृष्टान्त ऐका. (२५१४)

जैशी राहाटमाळा लोकी करिती । तेणें पाणी येतसे वरुती ।
तयासी चक्रे बहुत असती । ते दाटिती एकमेकां ॥ १५ ॥
लोक रहाटमाळ तयार करतात. तिच्यामुळे विहिरीतील पाणी वर येते. ते अखंड यावे म्हणून पाणी आणणारे लोटे जवळजवळ बांधलेले असतात. ही माळ रहाटावर घालतात. त्या रहाटाला बैल बांधतात तो बैल चालू लागला म्हणजे रहाट फिरून त्यावरची माळही खालून वर जात-येत असते. बैल थांबला म्हणजे माळ स्थिर राहते. बैलाला चालते करण्यासाठी हाकणाराची गरज असते. ज्याप्रमाणे लोक रहाटमाळ तयार करतात त्यायोगाने पाणी वर येते. तिला पुष्कळ चक्रे जोडलेली असतात. ती एकमेकांना गर्दी करतात. (२५१५)

परी ते वृषभ लावितां चाले । नातरी निवांत राहे उगलें ।
तो बैलही न चाले पहिले । हाकणारा विण ॥ १६ ॥
पण ती रहाटमाळ बैल जुंपल्यानंतरच फिरते. तसे न केल्यास ती तशीच स्तब्ध राहते. तिला बैल जंपल्यावरही तो प्रथम जागचा हलत नाही. त्याला हाकणारा कोणीतरी पाहिजे. (२५१६)

ऐसे वृषभ आणि पुरुष हाकितां । आणि राहाटमाळेची सामग्री समस्ता ।
एका असती भूमीवरुता । तिच्या आधारें चालती ॥ १७ ॥
अशा त-हेने बैल, हाकणारा पुरुष आणि रहाटमाळेची सर्व सामग्री यांची जोडी जमताच तिच्यामुळे ती चालू होते. ही सामग्री सर्व एकाच पृथ्वीवर असते. तिच्याच आधाराने ती रहाटमाळ चालते. (२५१७)

हा दृष्टांत पाहता विचारून । दार्टीताचे होय विवेचन ।
अर्थात् विकारी निर्विकारी कोण । कळेल स्पष्ट ॥ १८ ॥
या दृष्टान्ताचे विचारपूर्वक मनन केल्यास दाष्टातिकाचे विवेचन करता येते. त्याद्वारे विकारी कोण, निर्विकारी कोण याचे स्पष्टीकरण होईल. (२५१८)

देहादि प्राण बुद्धि स्फूर्ति । हे येक येकांचे दाट असती ।
जैशी का राहाटमाळेची स्थिति । तेवीं कळासिली ठाई ठाईं ॥ १९ ॥
देहादी प्राण, बुद्धी, स्फूर्ती हे सर्व एकमेकांला दाटीने लागून असतात. रहाटमाळेची जशी रचना असते तशीच जागोजागी त्यांची रचना केलेली असते. (२५१९)

यासी जीव हा वृषभ जुंपिला । साभिमानें खांदा वाहे उगला ।
तेणें चालतसे देहयंत्रमाला । सुखदुःख पाणी उफाळे ॥ २० ॥
या तत्त्वांना जीव हा बैल जुंपला तो अभिमान घेऊन खांद्याने रहाट ओढीत आहे. त्या योगाने देहरूपी रहाटमाळ फिरत असते. तिच्यातून सुखदुःखरूपी पाणी उफाळून वर येते. (२५२०)

हाकिता पुरुष तो ईश्वर । वर्तवीत प्रारब्धानुकार ।
हाचि जीवासी बलात्कार । विक्षेपशक्ति चाबुकें ॥ २१ ॥
या बैलाला हाकणारा पुरुष म्हणजे ईश्वर होय. तो या जीवाकडून त्याच्या प्रारब्धानुसार व्यापार करून घेत असतो. विक्षेप (मिथ्यासृष्टी) रूपी चाबकाने तो त्या जीवरूपी बैलावर बळजबरी करत असतो. (२५२१)

असो राहाटमाळा वृषभ नर । येका असती भूमीवर ।
तेवी देहादि जीव आणि ईश्वर । ब्रह्मात्माधिष्ठानी ॥ २२ ॥
रहाटमाळ, बैल, हाकणारा पुरुष हे सर्व एकाच भूमीवर असतात. त्याप्रमाणे देहादी, जीव आणि हे सर्व एकाच ब्रह्माच्या अधिष्ठानावर असतात. (२५२२)

भूमि निर्विकारें आधार सहज । तेवीं ब्रह्म परमात्मा अचोज ।
तेथें प्रेरणेचें कैंचें व्याज । सर्वाधार मात्र ॥ २३ ॥
भूमी हा रहाटमाळ, बैल, शेतकरी यांचा आधार असली तरी स्वतः निर्विकार असते. त्याप्रमाणे ब्रह्म अथवा परमात्मा त्याच्यावर चाललेल्या विकारांबद्दल उदासीन असतो. तेथे प्रेरणेचे नाटक कसे शक्य आहे ? तो त्या सर्वांचा फक्त आधार असतो. (२५२३)

बैलासी हाकिता पुरुष ईश्वर । विक्षेपशक्ति चाबुकाचा मार ।
तेणें भयें चाले हे जगयंत्र । तस्मात् ईश प्रेरक खरा ॥ २४ ॥
बैलास हाकणारा पुरुष म्हणजे ईश्वर आहे. त्याची नवीन दृश्ये उभारण्याची शक्ती (विक्षेपशक्ती) म्हणजे चाबकाचा मार होय. त्या भयाने हे जगरूपी रहाटमाळेचे यंत्र चालत असते. त्यामुळे हा ईश्वर हाच खरा प्रेरक आहे. (२५२४)

ऐसें विचारून खरे पाहतां । विरोधाची नसे वार्ता ।
आतां सावधान असावें रविदत्ता । चालिला प्रसंग निरोपू ॥ २५ ॥
असा विचार करून पाहिले तर विरोधाचे नावही उरत नाही. आता रविदत्ता, लक्षपूर्वक ऐक. आता प्रस्तुत प्रसंगाचे विवेचन करतो. (२५२५)

पंचभूतें पंचयोनीची शरीरें । त्यांत पंचप्राण दशइंद्रिय सारे ।
मन बुद्धि विषयान्त वावरे । हे जड चंचळपणे ॥ २६ ॥
पंचभूते, पाच योनीतील शरीरे, त्यात पंचप्राण, दहा इंद्रिये, मन बुद्धी यांच्यापासून ते विषयांपर्यंत सर्व जड चंचळ बत्तीस तत्त्वे वावरत असतात. (२५२६)

विद्या अविद्या ईश्वर जीव । पांचवी माया स्फूर्ति स्वयमेव ।
एवं ही बत्तीस तत्त्वे सर्व । क्षणक्षणां अन्यथा होती ॥ २७ ॥
विद्या, अविद्या, ईश्वर, जीव, पाचवी स्वतः स्फर्तिरूप माया आणि ही बत्तीस तत्वे क्षणाक्षणाला बदलत असतात. (२५२७)

ईशचि प्रेरकत्वें विकारी । क्षणक्षणे होत अन्यथा परी ।
मा जीवादि देहांत तो सारी । हे तों अन्यथा मुळींचे ॥ २८ ॥
ईश्वरच प्रेरकत्वाच्या नात्याने स्वतः विकारी आहे. तोही क्षणाक्षणाला वेगळ्या प्रकारचा होतो. मग जीवादी देहापर्यंतची सर्व बत्तीस तत्त्वे प्रत्येक क्षणाला वेगळी भासतील यात नवल काय ? ती मुळातच विकारी तत्त्वे आहेत. (२५२८)

असो हे सारे अन्यथा होती । क्षणक्षणां विकारें पालटती ।
परी सर्वांत अनुस्यूत जे चिती । अन्यथा नव्हे ॥ २९ ॥
असो, तर ही सर्व तत्त्वे बदलतात. क्षणाक्षणाला होणाऱ्या विकारांमुळे ती आपली रूपे पालटतात पण या सर्वात अनुस्यूत असलेले (अव्याहतपणे असलेले) चैतन्य मात्र कधी बदलत नाही. (२५२९)

जैसें आकाश घटीं मठी व्यापून । किंचित् अन्यथा न पावे चलन ।
तैसेंचि ब्रह्म परिपूर्ण सच्चिद्घन । सर्वत्रीं परी अन्यथा नव्हे ॥ ३० ॥
ज्याप्रमाणे आकाश घट,मठ यांत व्यापलेले असूनसुद्धा किंचितही चळत (बदलत) नाही त्याप्रमाणे सच्चिद्घन, परिपूर्ण असे ब्रह्म सर्वत्र असूनसुद्धा त्यात कधीही काहीही बदल होत नाही. (२५३०)

जरी ब्रह्मादि कीटकापर्यंत । कोठे अज्ञान कोठे ज्ञान स्फुरत ।
परी ब्रह्मात्मा अन्यथाभूत । कधी नव्हे सहसा ॥ ३१ ॥
ब्रह्मापासून ते कीटकांपर्यंत कोठे ज्ञान, कोठे अज्ञान स्फुरत असले तरी ब्रह्मात्मा कधीही वेगळा होत नाही. (२५३१)

नाना देहांमध्ये राहन । सक्ष्मासी होय वर्तन ।
त्याचा जीव हा धरी अभिमान । प्रेरकपणे ईशाचे ॥ ३२ ॥
निरनिराळ्या देहांमध्ये राहनसुद्धा जीवाचे वर्तन त्यांतील सूक्ष्म देहानुसार होते. ईश्वराच्या प्रेरणेने जीव त्या सूक्ष्म देहाचा अभिमान धरतो. (२५३२)

साभिमान येथवरी घेतला । की आपणचि देह होऊन बैसला ।
बळं कल्पिलें पापपुण्याला । मीच कर्ता म्हणोनी ॥ ३३ ॥
तो अभिमान इतका दृढ असतो की स्वतःलाच तो देह समजू लागतो. तो बळेच पापपुण्याच्या कल्पना करून मीच त्यांचा कर्ता असे मानू लागतो. (२५३३)

तेणेंचि वारंवार उपजे मरे । नाना योनींची पाऊनि शरीरें ।
उंच नीच स्वर्ग नरक अपारें । भोगी अनंत कल्प ॥ ३४ ॥
त्यामुळेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेऊ लागतो, मरण पावू लागतो. त्याला निरनिराळ्या योनींची शरीरे प्राप्त होतात. त्यामध्ये उच्च, नीच, स्वर्ग, नरक अशा गती अनंत कल्पेपर्यंत त्याला प्राप्त होतात. (२५३४)

आधींच अज्ञानें अन्यथा जाहलें । वरी अन्यथात्वें भ्रमूं लागलें ।
कोठे सान थोर की वाईट चांगुलें । परी अन्यथा क्षणक्षणां ॥ ३५ ॥
मुळात अज्ञानातूनच त्याचा जन्म झालेला आहे. त्यामुळे तो विकारी होतो. त्यानंतरही अन्यथात्व पावून निरनिराळ्या योनीत तो जीव भ्रमण करू लागतो. कधी लहान, कधी थोर, कधी वाईट, कधी चांगला, असा क्षणाक्षणाला तो बदलू लागतो. (२५३५)

इतुकेही अन्यथात्व पावती । परी सर्वत्री व्याप्त जें चिती ।
अन्यथा नव्हेचि कल्पांतीं । आदि अंतीं कां मध्ये ॥ ३६ ॥
जीव, ईश्वर आणि सर्व बत्तीस तत्त्वे हे सर्व असे विकार पावत असले तरी सर्वत्र व्यापून असलेले जे चैतन्य ते आरंभी, मध्ये किंवा अंती अगदी कल्पान्ताच्या प्रसंगीसुद्धा विकार पावत नाही. (२५३६)

अज्ञानकालीं जें निजरूप । अन्यथा विकारी नव्हे अल्प ।
मा जो जाणेल स्वकीय स्वरूप । तेथें अन्यथा कैसें ॥ ३७ ॥
जीवाच्या अज्ञानकाळी निजरूप थोडेसुद्धा विकारी झालेले नसते. मग जो स्वतःचे स्वरूप जाणतो त्याच्या बाबतीत अन्यथात्व अथवा विकार कसे संभवतील ? (२५३७)

अज्ञानी अन्यथा जाहलें नाहीं । परी वाउगेंचि मानिती सर्वही ।
की मीच देह वर्तणूक जें कांहीं । अन्यथा होय माझी ॥ ३८ ॥
खरे तर अज्ञानी माणूससुद्धा अन्यथात्व पावत नाही, पण सर्वच अज्ञानी जीव उगीचच स्वतःला अन्यथात्व कल्पितात. मीच देह असून त्या देहाचे जे व्यापार होतात, त्याचे जे विकार होतात ते सर्व माझेच होत, असे मानतात. (२५३८)

मी हा पुण्य पाप करीतसें । तें भोगिलेंचि भोगीन आपैसें ।
ऐसिये अभिमानाचे ध्यासें । भोगणेचि लागे ॥ ३९ ॥
मी पुण्य आणि पाप करतो त्याची फळे मागे भोगलेली आहेत, पुढेही भोगत राहीन. अशा अभिमानाच्या ध्यासाने त्याला मग ती फळे भोगावीच लागतात. (२५३९)

ऐसा हा अज्ञानाचा जल्प । हाही तोवरीच संताप ।
जोंवरी ब्रह्मात्मा सच्चिद्‌रूप । अपरोक्षें न कळे ॥ ४० ॥
अज्ञानी जीवाची भाषा अशी असते. पण हा संताप तोपर्यंतच भोगावा लागतो जोपर्यंत सच्चिद्घन ब्रह्मात्मा अपरोक्षत्वाने कळत नाही. (२५४०)

तोंवरीच मी जीव मज बंधन । मीच पावें जन्ममरण ।
जोवरी ब्रह्मात्मा सच्चिद्घन । अपरोक्षें न कळे ॥ ४१ ॥
जोपर्यंत सच्चिद्घन ब्रह्मात्मा अपरोक्षत्वाने कळत नाही, तोपर्यंतच मी जीव आहे, मी बंधनात सापडलो आहे, मला जन्म मरण प्राप्त होतात, अशी त्याची भाषा असते. (२५४१)

तोंवरीच षविकार बाधती । क्षणक्षणां अन्यथा होती ।
जोवरी ब्रह्मात्मा सच्चिन्मूर्ति । अपरोक्षें न कळे ॥ ४२ ॥
सच्चिन्मूर्ती ब्रह्मात्मा अपरोक्षत्वाने जोपर्यंत कळत नाही. तोपर्यंत षडविकार बाधत राहतील, आणि क्षणाक्षणाला विकार होत राहतील. (२५४२)

तोंवरीच तूं येक मी येक । माझें तुझें नानात्व सकळिक ।
जोवरी ब्रह्मात्मा आपण येक । अपरोक्षें न कळे ॥ ४३ ॥
जोपर्यंत ब्रह्मात्मा आपण एकच आहोत हे अपरोक्षत्वाने कळणार नाही तोपर्यंत तू एक, मी एक, माझे, तुझे असे नानात्व मानणे चालू राहील. (२५४३)

तोंवरीच हे जग सत्य वाटे । ब्रह्मादि कीटकान्त सान मोठे ।
जोवरी ब्रह्मात्मा घनदाटे । अपरोक्षें न कळे ॥ ४४ ॥
जोपर्यंत ब्रह्मात्मा सर्वत्र घनदाट भरून राहिला आहे, हे अपरोक्षत्वाने कळत नाही, तोपर्यंत हे जग सत्य वाटेल, ब्रह्मदेवापासून ते कीटकांपर्यंत सर्व लहान मोठे सत्य वाटत राहतील. (२५४४)

तोंवरीच दारा पुत्र धनादि । विषय लालचीने संपादी ।
जोवरी ब्रह्मात्मा अनादि । अपरोक्षें न कळे ॥ ४५ ॥
जोपर्यंत अनादी ब्रह्मात्मा अपरोक्षत्वाने कळणार नाही, तोपर्यंत बायको, मुलगा, धनदौलत इ. विषयसुखाच्या लालचीने प्राप्त करण्याचा हव्यास धरील. (२५४५)

तोंवरीच अंकित कर्म धर्माचा । वर्ण आश्रम की देव वेदाचा ।
जोवरी ब्रह्मात्मा अभिन्न साचा । अपरोक्षें न कळे ॥ ४६ ॥
जोपर्यंत अभिन्न असा ब्रह्मात्मा अपरोक्षत्वाने कळणार नाही, तोपर्यंत कर्म, धर्म, वर्ण, आश्रम, देव, देवकार्य यांचा अंकित (सेवक) होऊन राहील.(२५४६)

तोंवरीच स्वजन मोहिती । उपजीवना परतंत्र करिती ।
जोवरी ब्रह्मात्मा स्वानंदमूर्ति । अपरोक्षें न कळे ॥ ४७ ॥
जोपर्यंत स्वानंदमूर्ती ब्रह्मात्मा अपरोक्षत्वाने कळणार नाही, तोपर्यंत स्वजनांचा मोह वाटेल आणि ते उपजीविकेसाठी जीवाला परतंत्र करतील. (२५४७)

तोंवरीच सुखदुःखाचा शीण । पाप पुण्य हे बागुल दोन ।
जोवरी ब्रह्मात्मा सघन । अपरोक्षें न कळे ॥ ४८ ॥
जोपर्यंत सघन असा ब्रह्मात्मा अपरोक्षत्वाने ज्ञात होणार नाही तोपर्यंत सुखदुःखाचे कष्ट उपसत राहील आणि पाप, पुण्य या दोन बागुलबुवांचा मनात धाक असेल. (२५४८)

तोंवरीच उत्तम अधम गति । अधोर्ध्व स्वर्ग नरक भासती ।
जोवरी ब्रह्म परमात्मा निश्चिती । अपरोक्षें न कळे ॥ ४९ ॥
जोपर्यंत ब्रह्म परमात्म्याचे अपरोक्षत्वाने ज्ञान होणार नाही, तोपर्यंत उत्तम गती, अधम गती, अध, ऊर्ध्वः स्वर्ग आणि नरक हे भासत राहतील. (२५४९)

तोंवरीच स्वामिसेवकभाव । मी भक्त तूं अससी देव ।
जोवरी ब्रह्मात्मा स्वानुभव । अपरोक्षें न कळे ॥ ५० ॥
जोपर्यंत ब्रह्मात्मा स्वानुभवाचा विषय होत नाही, आणि त्याचे अपरोक्ष ज्ञान होणार नाही तोपर्यंत मी सेवक, तू स्वामी; मी भक्त, तू देव असे संबंध ठेवावे लागतील. (२५५०)

तोंवरीच देव दानव मानवादिक । स्त्री पुरुष की नपुंसक ।
जोवरी ब्रह्मात्मा निश्चयात्मक । अपरोक्षें न कळे ॥ ५१ ॥
जोपर्यंत ब्रह्मात्म्याचा निश्चय होऊन तो अपरोक्षत्वाने कळणार नाही, तोपर्यंत देव, दानव, मानव इ. स्त्री, पुरुष किंवा नपुंसक इ. भेद तो जीव मानत राहील. (२५५१)

तोंवरीच शब्दाची खटपट । शास्त्रीय लौकिकाचे बोभाट ।
जोवरी ब्रह्मात्मा निघोट । अपरोक्षें न कळे ॥ ५२ ॥
जोपर्यंत परिपूर्ण असा ब्रह्मात्मा अपरोक्षत्वाने कळणार नाही तोपर्यंत शब्दांची खटपट, शास्त्रीय, लौकिक यांचे बोभाट चालू राहतील. (२५५२)

तोवरीच मी कर्ता भोक्ता सकळां । ध्याता ज्ञाता अनुभविता वेगळा ।
जोवरी ब्रह्मात्मा स्वलीळा । अपरोक्षें न कळे ॥ ५३ ॥
जोपर्यंत ब्रह्मात्मा स्वलीलेने अपरोक्षत्वाने कळणार नाही, तोपर्यंत मी सगळ्या गोष्टींचा कर्ता, भोक्ता आहे; मीच ध्याता, ज्ञाता, अनुभविता आहे अशी समजूत कायम राहणार. (२५५३)

तोवरीच किंचिज्ञ हा जीव । ईशा सर्वज्ञपणाचा भाव ।
जोवरी ब्रह्मात्मा स्वयमेव । अपरोक्षें न कळे ॥ ५४ ॥
जोपर्यंत ब्रह्मात्मा स्वतः अपरोक्षत्वाने कळणार नाही तोपर्यंत जीव हा किंचिज्ज्ञ आहे. ईश्वर सर्वज्ञ आहे, अशी भावना राहणारच. (२५५४)

तोंवरीच जीव हा भ्रामक । ईश्वर असे यासी प्रेरक ।
जोवरी ब्रह्मात्मा उभयीं एका अपरोक्षें न कळे ॥ ५५ ॥
जीव हा भ्रामक (लोहचुंबक) असून ईश्वर हा त्याचा प्रेरक आहे अशी कामाची वाटणी जोपर्यंत या दोहींमध्ये एकच ब्रह्मात्मा आहे हे अपरोक्षत्वाने कळणार नाही तोपर्यंत होतच राहणार. (२५५५)

तोवरी संचित प्रारब्ध क्रियमाण । ईश करी बलात्कारें प्रेरण ।
जोवरी ब्रह्म परमात्मा आपण । अपरोक्षें न कळे ॥ ५६ ॥
जोपर्यंत ब्रह्म परमात्मा आपणच आहोत. हे अपरोक्षत्वाने कळणार नाही, तोपर्यंत संचित, प्रारब्ध, क्रियमाण हे कर्मप्रकार आणि ईश्वर त्यांना बलात्काराने प्रेरणा देतो ही व्यवस्था राहणारच. (२५५६)

तोवरीच बंध मोक्ष हे वार्ता । सिद्ध साधक की मुमुक्षुता ।
जोंधरी ब्रह्म परमात्मा तत्त्वता । अपरोक्षें न कळे ॥ ५७ ॥
जोपर्यंत ब्रह्म परमात्मा खऱ्या अर्थाने अपरोक्षत्वाने कळणार नाही, तोपर्यंत बंध, मोक्ष या गोष्टी राहणारच. (२५५७)

तोंवरीच गुरु शिष्य हे दोन । श्रवण मनन निदिध्यासन ।
जोवरी ब्रह्म आत्मा सघन । अपरोक्षें न कळे ॥ ५८ ॥
जोपर्यंत सर्वत्र दाटून राहिलेला ब्रह्मात्मा अपरोक्षत्वाने कळणार नाही, तोपर्यंत गुरू-शिष्य हा भेद, श्रवण, मनन, निदिध्यासन ही साधने राहणारच. (२५५८)

असो ऐसें कोठवरी बोलावें । द्वैत तोंवरीच हे आघवें ।
जोवरी ब्रह्म आत्मा स्वानुभवें । अपरोक्षें न कळे ॥ ५९ ॥
जोपर्यंत ब्रह्मात्मा स्वानुभवाने अपरोक्षत्वाने कळत नाही तोपर्यंत हे सर्व द्वैत असणारच.असो, आता हे कोठवर सांगावे ? (२५५९)

ऐसा अपरोक्ष उत्तमाधिकारी । गुरु शास्त्रविचाराचे अनुकारी ।
विवेचनें पावला निःसंशय अंतरीं । समाधि उत्थानरहित ॥ ६० ॥
अशा त-हेने अपरोक्ष ज्ञानाला उत्तम अधिकारी शिष्य गुरू, शास्त्र आणि विचार यांच्या साहाय्याने विवेचन करून निःसंशय होऊन उत्थानरहित समाधी प्राप्त करता झाला. (२५६०)

ब्रह्मात्मा अपरोक्ष पहिलाचि असे । आजि नवा कवणा करणे नसे ।
परी वाउगेंचि अज्ञाने लाविलें पिसें । भित्रत्व देहबुद्धीचें ॥ ६१ ॥
ब्रह्मात्मा तर प्रथमपासूनच अपरोक्ष (प्रत्यक्ष) आहे तो नव्याने करण्याची कोणाला आवश्यकता नाही. परंतु हे देहबुद्धीने निर्माण केलेले भिन्नत्वाचे (द्वंद्वाचे) खोटे वेड अज्ञानाने लावले आहे. (२५६१)

चित्प्रभा जे अनेकधा बोलिली । आणि हे ईशादि जड बत्तीस उद्भवलीं ।
हे दोन्ही येकचि म्हणून भाविलीं । येकत्र जाहली नसतां ॥ ६२ ॥
अनेक प्रकारे जिचे वर्णन केले आहे ती चित्प्रभा आणि ईश्वर इ. उत्पन्न झालेली जड तत्त्वे ही कधीच एकत्र आली नसताना अज्ञानाने दोन्ही एकच म्हणून कल्पना केली. (२५६२)

हेंचि चिद्ग्रंथीचे रूप । एकचि जाहले दोरी सर्प ।
परी हा वाउगाचि आरोप । अज्ञानकार्य ॥ ६३ ॥
हेच चिद्ग्रंथीचे रूप आहे. तिच्यामुळे दोरी आणि साप हे एकच मानले. पण हा आरोप मिथ्या असून ते अज्ञानाचे कृत्य आहे. (२५६३)

ऐशिया ग्रंथी भेदन । जो करी विचारें निःसंशय पूर्ण ।
तोचि उत्तम अधिकारी आपण । पुन्हां ग्रंथि पडों नेदी ॥ ६४ ॥
अशा या ग्रंथीचा (गाठीचा) भेद जो पूर्ण विचाराने करून निःसंशय होतो, तोच उत्तम अधिकारी समजावा. एकदा ग्रंथिभेद झाल्यानंतर तो पुन्हा असा ग्रंथी पडू देत नाही. (२५६४)

ग्रंथि म्हणिजे पुन्हां जडासी । चिद्‌रूपता न येचि बुद्धीसी ।
आणि चिद्‌रूप ब्रह्म में अविनाशि । तें जडसें न वाटे ॥ ६५ ॥
ग्रंथी म्हणजे पुन्हा बुद्धीला जडाला चिद्‌रूप मानण्याचा विचारही सुचत नाही आणि अविनाशी असे जे चिद्‌रूप आहे ते जड आहे असे कधी वाटत नाही. (२५६५)

चिद्‌रूप ब्रह्म तेंचि आपण । येर हे बत्तीस आपणाहून भिन्न ।
निवडिले तया स्वप्नींही मीपण । येऊ नेदी सहसा ॥ ६६ ॥
जे चिद्‌रूप ब्रह्म आहे तेच आपण आहोत आणि ही बत्तीस तत्त्वे आपणापासून भिन्न आहेत अशी विभागणी एकदा केल्यानंतर त्या बत्तीस तत्त्वांच्या बाबतीत मीपणाचा विचार स्वप्नातसुद्धा येऊ देत नाही. (२५६६)

जरी देहादिकांचे व्यापार होती । परी असंग आपण अचळस्थिती ।
हेचि सहज समाधि निश्चिती । समाधी उत्थानरहित ॥ ६७ ॥
जरी देहादिकांचे व्यापार होत असले तरी त्यांमध्ये आपण अविचलितपणे असंग राहणे हीच निश्चितपणे सहज समाधी असून ही समाधी उत्थानरहित असते. (२५६७)

भलतिये अवस्थेमाझारी । असंग आपण निर्धारी ।
ईशादि तृणान्त हे सारी । मिथ्या परोक्ष ॥ ६८ ॥
कोणत्याही अवस्थेमध्ये निर्धारपूर्वक असंग राहून ईश्वरापासून तृणापर्यंत सर्व पदार्थ मिथ्या आहेत, असे वाटून त्यांचा परोक्षत्वाने त्याग या समाधीत घडतो. (२५६८)

देह जन्मला आपण जन्मेना । देहा ऐसा आपण असेना ।
देह वाढतां आपण वाढेना । स्वयें चिद्‌रूप आत्मा ॥ ६९ ॥
देह जरी जन्माला आलेला असला तर आत्मा मात्र जन्माला येत नाही. तो देहासारखा कधीच असत नाही. देह वाढतो पण आत्मा वाढत नाही. आत्मा स्वतःच चिद्रप (ब्रह्म असतो) (२५६९)

देह तरुण विषय भोगी । आपण असंग विषयालागीं ।
देह क्षीण होतां न होतां न होय प्रसंगी । स्वयें चिद्‌रूप आत्मा ॥ ७० ॥
देह तारुण्यावस्थेत विषयांचा उपभोग घेतो, आत्मा मात्र विषयांच्या बाबतीत असंग असतो. देह क्षीण होतो, अथवा क्षीण होत नाही. आत्मा मात्र त्यापैकी काहीच होत नाही, तो स्वतःच चिद्‌रूप असतो. (२५७०)

देह मरतां आपण न मरे । देहायेवढा नोव्हे साचोकारे ।
तरी होईल कैसा जड आकारें । स्वयें चिद्‌रूप आत्मा ॥ ७१ ॥
देह मरण पावला तरी आत्मा मरत नाही. तो कधीही देहाएवढा होत नाही. स्वतः चिद्‌रूप असल्यामुळे आत्मा जडाचा आकार कसा घेईल ? (२५७१)

देह चालतां आपण चालेना । देह बोलतां आपण बोलेना ।
देतां घेतां न दे घेईना । स्वयें चिद्‌रूप आत्मा ॥ ७२ ॥
देह चालायला लागला तरी आत्मा चालत नाही. देह बोलू लागला तरी आत्मा बोलत नाही. देह देऊ घेऊ लागला तरी आत्मा देवाण-घेवाण करत नाही. कारण आत्मा स्वतः चिद्‌रूप ब्रह्मच असतो. (२५७२)

रति भोगितां आपण अभोक्ता । असंगचि स्वयें विसर्ग करितां ।
भलतिया क्रियेमाजीं समस्ता । स्वयें चिद्‌रूप आत्मा ॥ ७३ ॥
देह रतिसुख भोगत असता आत्मा स्वतः अभोक्ता राहतो. देह मलमूत्र विसर्जन करीत असता आत्मा स्वतः असंगच असतो. देह कोणतीही क्रिया करीत असला तरी आत्मा अलिप्त असतो. तो स्वतः चिद्रप ब्रह्मच असतो (२५७३)

कर्ण ऐके आपण ऐकेना । स्पर्श घेतां आपण स्पर्शेना ।
डोळा देखता आपण देखेना । स्वयें चिद्‌रूप आत्मा ॥ ७४ ॥
कान ऐकतो पण आत्मा ऐकत नाही. त्वचेने स्पर्श करीत असता आत्मा स्पर्श करत नाही. डोळा पाहत असताना आत्मा पाहत नाही. आत्मा स्वतः चिद्रप ब्रह्मच असतो. (२५७४)

जिव्हा रसज्ञ आपण अजिव्ह । घ्राणे सुगंध घेतां आपण स्वयमेव ।
आपण असंग अगंध सदैव । स्वयें चिद्‌रूप आत्मा ॥ ७५ ॥
जीभ रसज्ञ असते. पण आत्मा स्वतः अजिव्ह असतो. नाक सुगंध घेत असता आत्मा स्वतः मात्र अगंध आणि असंगच असतो. कारण तो स्वतःच चिद्‌रूप (ब्रह्म) असतो. (२५७५)

क्षुधा तृषा धर्म प्राणाचे । ते धर्म आपणासी कैंचे ।
जरी संचरतां पोषण देहाचें । स्वयें चिद्‌रूप आत्मा ॥ ७६ ॥
क्षुधा (भूक) आणि तृषा (तहान) हे प्राणाचे धर्म आहेत. ते धर्म आत्म्याचे कसे असतील ? संचार करतानासुद्धा देहाचेच पोषण होते. आत्म्याला त्याचे काय ? आत्मा स्वतः चिद्‌रूप (ब्रह्म)च असतो. (२५७६)

चित्त चिंतितां अचिंत्य आपण । अहंकाराचें न घे अहंपण ।
बुद्धि निश्चयामाजी परिपूर्ण । स्वयें चिद्‌रूप आत्मा ॥ ७७ ॥
चित्त चिंतन करीत असता आत्मा स्वतः अचिंत्य असतो. अहंकारातील अहंपण तो कधी स्वीकारत नाही. बुद्धीला निश्चय करण्यात परिपूर्णता लाभते. आत्मा मात्र स्वतःच चिद्‌रूप ब्रह्म असतो. (२५७७)

मन संकल्पा जरी निकें । परी न पडे कदा संशयात्मकें ।
आपण परिपूर्ण निश्चयात्मकें । स्वयें चिद्‌रूप आत्मा ॥ ७८ ॥
मन संकल्प करण्यात पटाईत असले तरी आत्मा संशयात्मक गोष्टींमध्ये कधी पडत नाही. तो स्वतः निश्चयाने परिपूर्ण असतो. आत्मा स्वतः चिद्‌रूप ब्रह्मच असतो. (२५७८)

हे असो संघ हा जागृत । सर्व क्रिया असती होत ।
परी आपण जागा ना व्यापारत । स्वयें चिद्‌रूप आत्मा ॥ ७९ ॥
हे राहू द्या. हा सर्व तत्त्वांचा मेळावा जागृत असताना त्यांच्या सर्व क्रिया होत असतात. पण आत्मा मात्र ना जागा असतो ना व्यापारात गुंतवून घेतो. कारण तो स्वतः चिद्रप (ब्रह्म) असतो. (२५७९)

ब्रह्मादि तृणान्त सर्वां पाहे । परी सत्यत्व किंचितही न लाहे ।
सर्वाधिष्ठान आहे तें आहे । स्वयें चिद्‌रूप आत्मा ॥ ८० ॥
आत्मा ब्रह्मापासून ते तृणापर्यंत सर्वांना पाहतो. पण त्यापेकी एकातही त्याला सत्यत्व आढळत नाही. तो सर्वांचे अधिष्ठान आहे तो आहेच. तो स्वतःच चिद्रप (ब्रह्म) आहे. (२५८०)

उंच नीच की सान थोर । हा नव्हेचि किमपि उद्गार ।
येकत्वें परिपूर्ण अपार । स्वयें चिद्‌रूप आत्मा ॥ ८१ ॥
उच्च, नीच, किंवा लहान थोर असा काही ही उदार त्याच्याकडून येत नाही. तो एकटा आहे, परिपूर्ण आहे, अपार आहे. तो स्वतःच चिद्‌रूप ब्रह्म आहे. (२५८१)

ऐसा जागृतीमाजीं देह हा क्रीडे । परी कर्तेपणाची न जोडे ।
तरी सुखदुःख भोग कवणा आतुडे । स्वयें चिद्‌रूप आत्मा ॥ ८२ ॥
जागृतीमध्ये देह क्रीडा करतो. परंतु आत्मा त्याचे कर्तृत्व स्वीकारत नाही. त्याचे सुखदुःख कोणाला होणार आहे ? कारण तो स्वतःच चिद्‌रूप (ब्रह्म) आहे. (२५८२)

वाउगें मनन करितां क्षणीं । की स्वप्नभासातें देखोनी ।
भिन्न पाहे सर्व आपणानी । स्वयें चिद्‌रूप आत्मा ॥ ८३ ॥
उगीच मनन करत असता किंवा स्वप्नातील भास पाहत असता आत्मा स्वतःला त्यांच्यापासून भिन्न समजतो कारण तो स्वतः चिद्‌रूप (ब्रह्म) असतो. (२५८३)

गाढ जरी झोंप लागतां । नेणिवेची नसे वार्ता ।
सर्व काळ देखणा तत्त्वतां । स्वयें चिद्‌रूप आत्मा ॥ ८४ ॥
गाढ झोप लागली असतानासुद्धा त्याच्या ठिकाणी नेणिवेचा पत्ता नसतो. तो सर्वकाळ देखणा असतो (पाहणारा असतो). तो स्वतःच चिद्‌रूप (ब्रह्म) असतो. (२५८४)

तैसेंचि समाधिकाळी आपणा । येऊं नेदी ध्यातृध्याना ।
ध्येयरूपचि अनुभवाविना । स्वयें चिद्‌रूप आत्मा ॥ ८५ ॥
तसेच समाधिकाळात तो स्वतः ध्याता किंवा ध्यान होत नाही. तो अनुभवावाचून ध्येयरूपच असतो. तो स्वतःच चिद्‌रूप (ब्रह्म) असतो. (२५८५)

एवं जागृतीमाजीं मी माझिया । स्पर्शों नेदी विश्वाभिमानिया ।
एकरूप पाहतसे अद्वया । स्वयें चिद्‌रूप आत्मा ॥ ८६ ॥
जागृतीमध्ये जीव विश्व अभिमान घेऊन असला तरी आत्मा त्याच्यातील मीपणाचा आणि माझेपणाचा स्पर्श होऊ देत नाही. तो अद्वय अनुभवाशी एकरूप झालेला असतो. कारण तो स्वतः चिद्‌रूप (ब्रह्म) असतो. (२५८६)

ध्यासेंही कर्तृत्वा नातळे । भोक्तेपणाही न उफाळे ।
तैजस ठाईंचा ठाईं गळे । स्वयें चिद्‌रूप आत्मा ॥ ८७ ॥
ध्यासरूप स्वप्नावस्थेत त्या ध्यासाच्या कर्तृत्वाला तो स्पर्श करू देत नाही. भोक्तेपणाही त्याच्यामध्ये उफाळून येत नाही. त्या अवस्थेतील तैजस अभिमानी जागच्या जागी गळून पडतो. आत्मा स्वतःच चिद्‌रूप (ब्रह्म) असतो. (२५८७)

सुप्तीत किंवा समाधीत । भिन्नत्वाची नेणेचि मात ।
प्राज्ञ अभिमानाचा होता निःपात । स्वयें चिद्‌रूप आत्मा ॥ ८८ ॥
सुषुप्तीत किंवा समाधीत असताना भिन्नत्वाची गोष्टच त्याला माहीत नसते. सुषुप्तीतील प्राज्ञ अभिमानाचा निःपात केल्यानंतर आत्मा स्वतःच चिद्‌रूप (ब्रह्म) झालेला असतो. (२५८८)

ऐसा निजांगें ब्रह्म जाहला । संशय ब्रह्मांडाबाहेरी गेला ।
द्वैताचा कांटाचि उपटिला । स्वयें चिद्‌रूप आत्मा ॥ ८९ ॥
असो निजांगाने ब्रह्म झाला म्हणजे त्याचा संशय ब्रह्मांडाबाहेर निघून जातो. (तो जीव संशयरहित होतो) आणि द्वैताचा काटाच त्याने उपटून काढलेला असतो.(२५८९)

स्फूर्तीपासून देहापर्यंत । मी ह्मणोन स्वप्नींही नातळत ।
तेवींच ब्रह्मादि तृणान्त । सत्यत्वें नाढळती ॥ ९० ॥
स्फूर्तीपासून ते देहापर्यंत कोणत्याही अवस्थेचा मीपणा त्याला स्पर्श करू शकत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मदेवापासून ते तृणापर्यंत कोणत्याही गोष्टीत त्याला सत्यत्व आढळत नाही. (त्याला सत्य वाटत नाहीत.) (२५९०)

ब्रह्मचि सत्य तेचि आपण । या सर्वांसि नुद्भवेचि मीपण ।
तरी सत्यत्व कैंचें जरी भासमान । मृगजळापरी जग ॥ ९१ ॥
ब्रह्म हे एकच सत्य असून तो स्वतःच ते झालेला असतो. बाकीच्या तत्त्वांबद्दलचा मीपणा त्याच्यात उत्पन्नच होत नाही. हे जग भासत असले तरी त्याला त्यामध्ये सत्यत्व कसे आढळेल. सर्व जगच त्याला मृगजळाप्रमाणे वाटत असते. (२५९१)

एवं सत्य तें मिथ्या न होय । मिथ्यालागी सत्यत्व न ये ।
अहंगारादि देहान्त न जाय । कदा मीपणे ॥ । ९२ ॥
अशा प्रकारे जे सत्य आहे ते कधीही मिथ्या होत नाही. आणि मिथ्यालाही सत्यत्व येत नाही.आणि अहंकारापासून देहापर्यंत कशामध्येही मीपणाने तो प्रवेश करत नाही. (२५९२)

हेचि सहज समाधीची स्थिती । उत्थानचि नव्हे कल्पांतीं ।
संशय ग्रासून सहजगति । आठवावीण ब्रह्म अंगें ॥ ९३ ॥
हीच सहज समाधीची स्थिती होय. तिचे कल्पान्तीही उत्थान होत नाही. सर्व संशय सहजतेने ग्रासून (नाहीसे करून) तो ब्रह्मत्वाचे भान न ठेवता स्वतः ब्रह्म झालेला असतो. (२५९३)

ब्रह्मीचे अभान असावें । तरी तया अविद्या अज्ञान ह्मणावें ।
अविद्येविण जीवासी रूप नव्हे । तरी साभिमान कैंचा ॥ ९४ ॥
ब्रह्माच्या संदर्भात जर अभान (भानाचा अभाव) असेल तर त्या स्थितीला अविद्या किंवा अज्ञान म्हणावे. अविद्येवाचून तर जीवाला रूपच (अस्तित्व) प्राप्त होणार नाही आणि जीवपणाच नाही तर अभिमान कोण धरील ? (२५९४)

अज्ञान जातां ज्ञानही मावळे । नुसधे विज्ञान ब्रह्मचि निवळे ।
तस्मात् विद्येसहित ईशत्व गळे । प्रेरकत्व त्यागूनी ॥ ९५ ॥
अज्ञान नाहीसे झाले म्हणजे त्याबरोबर ज्ञानही मावळते आणि केवळ विज्ञान म्हणजे ब्रह्मच राहाते. त्यामुळे विद्या जाताच ईशत्वही त्याच्या प्रेरकत्वाच्या गुणाचा त्याग करून गळून पडते. (२५९५)

ऐसे कारणरूपें जीवेश गेले । कार्यरूपें देहादि उरले ।
तया स्फूर्ति मात्रे जीवें स्फुरविलें । परी साभिमान मेला ॥ ९६ ॥
अशा प्रकारे कारणरूप जीव आणि ईश्वर नष्ट होताच त्यांच्या कार्यरूपाने असलेले देहादी उरतात. त्यांना स्फूर्तिरूपाने असलेल्या जीवाकडून स्फुरण मिळते. पण तेथे अभिमान गेलेला असतो. (२५९६)

देह इंद्रिय प्राण बुद्धि मन । आणि स्फूर्तीही तया असे कारण ।
परी अज्ञान गेलेंचि निपटून । आतां उरती मृगजळवत् ॥ ९७ ॥
अज्ञान संपूर्णपणे निपटून नाहीसे झाल्यावर देह, इंद्रिये, प्राण, बुद्धी, मन आणि त्यांचे कारण असलेली बुद्धी ही तत्त्वे केवळ मृगजळाप्रमाणे उरतात. (२५९७)

याची क्रियाही प्रारब्धवशे । तिहीं अवस्थेची होतसे ।
परी कवणेकाळीही न उमसे । ययासी मीपण ॥ ९८ ॥
या साधकाच्या तीन्ही अवस्थांच्या क्रिया त्याच्या प्रारब्धानुसार होत राहातात. पण कोणत्याही काळी त्याच्यामध्ये मीपणा उत्पन्न होत नाही. (२५९८)

तेवींच ब्रह्मादि तृणान्त जग । ज्ञान जाहलियाचि दिसती मग ।
परी सत्यता न येचि असंग । अस्ति भाति प्रिय ब्रह्म ॥ ९९ ॥
त्याचप्रमाणे ज्ञान झाल्यानंतर सुद्धा ब्रह्मदेवापासून तृणापर्यंतचे पदार्थ दिसतच राहतात. पण तो साधक संग (आसक्ती)रहित झाला असल्यामुळे, तो अस्ति भाति प्रियात्मक ब्रह्मच झालेला असल्यामुळे ते पदार्थ त्याला सत्य वाटतच नाहीत. (२५९९)

ऐसा निश्चयचि होऊन गेला । उत्थान नव्हे तिहीं अवस्थेला ।
जग सत्यत्वा की देहाचे मीपणाला । न स्पर्शे ब्रह्मात्माहूनी ॥ २६०० ॥
असा एकदा निश्चयच होऊन गेलेला असल्यामुळे तीन्ही अवस्थांत त्याच्या सहजसमाधीचे उत्थानच होत नाही आणि ब्रह्मात्मा स्वतः झाला असल्यामुळे जगाचे सत्यत्व किंवा देहाचे मीपण यांना तो स्पर्शच करत नाही. (२६००)

जया स्वतां उत्थान असेना । कारण की निश्चय नव्हे उणा ।
भलते अवस्थे सहसा उद्भवेना । संशय कधीं ॥ १ ॥
त्याला स्वतःहन उत्थान नाही, कारण की त्याच्या निश्चयात काही उणेपणा येणार नाही. त्यामुळे तो कोणत्याही अवस्थेत असला तरी त्याच्या मनात कधीही संशय निर्माण होणार नाही. (२६०१)

तया शास्त्रेही सांगों येती । अथवा प्रवृत्ति लोकरीती ।
परी पुन्हां नव्हेचि भ्रांति । ऐसें परतोत्थान नसे ॥ २ ॥
त्याला शास्त्रे दिशाभूल करतील किंवा प्रवृत्तिमार्गी लोक रीतीप्रमाणे त्याला उपदेश करतील. पण तरीही त्याला भ्रांती (भ्रम) कधी वाटणारच नाही. अशा प्रकारचे परतवणारे उत्थान त्याच्या बाबतीत कधीच शक्य नाही. (२६०२)

अखंडैकरस ब्रह्मात्मा । स्वतां निजांगे येर हे अनात्मा ।
यया सत्यत्वचि नये रूप नामा । निखळ अद्वय निश्चयें ॥ ३ ॥
तो स्वतः निजांगाने अखंड, एकरस असा ब्रह्मात्माच झालेला असल्यामुळे या सर्व बाकीच्या गोष्टी त्याच्या दृष्टीने आत्महीन होत (अनात्मा). या नामरूपांना त्याच्या दृष्टीने सत्यत्व नाहीच. तो स्वनिश्चयाने निखळपणे अद्वय झालेला असतो. (२६०३)

याचि नांवें पूर्ण ज्ञान । याचि नांवें पूर्ण समाधान ।
हेंचि कैवल्यमुक्तीचे लक्षण । हेचि सहज समाधि ॥ ४ ॥
यालाच पूर्ण ज्ञान म्हणतात. यालाच पूर्ण समाधान म्हणतात. कैवल्य मुक्तीचे हेच लक्षण आहे. हीच ती सहज समाधी होय. (२६०४)

ययाचि ज्ञानें हरिहर । नित्य मुक्तत्वें निरंतर ।
आणि सनकादि ज्ञाते अपार । मागे जाहले असती ॥ ५ ॥
याच ज्ञानाने युक्त असे श्रीविष्णू आणि श्रीशंकर नित्यमुक्त झाले. सनकादिकही याच ज्ञानाने श्रेष्ठ ठरले. मागेही असे ज्ञाते झाले. (२६०५)

पुढे होणार आतां असती । येणेंचि ज्ञाने पावली तृप्ति ।
हे सत्य सत्य त्रिधा वचनोक्ति । अन्यथा नव्हे ॥ ६ ॥
असे ज्ञानी पुढेही होतील, आताही असतील. ते सर्व याच ज्ञानाने तृप्त झाले, तृप्त होतील. हे त्रिवार सत्य आहे. ते कधीही विपरीत होणार नाही. (२६०६)

ऐसें ज्ञान उत्तमाधिकारी । गुरुमुखें सच्छास्त्रानुकारी ।
विचारें पावती अभेद अंतरीं । निःसंशय होउनी ॥ ७ ॥
या ज्ञानाचे उत्तम अधिकारी असलेले साधक गुरुमुखाने, सत्यशास्त्राच्या अनुकरणाने, आणि विचाराने मनाने निःसंशय होऊन अभिन्न दशा प्राप्त करून घेतात. (२६०७)

शाखा दावितांचि चंद्र लक्षिती । तैसे उपदेशमात्र अभेदा पावती ।
तेचि उत्तमाधिकारी धन्य जगतीं । तीव्रप्रज्ञ जे ॥ ८ ॥
त्यांनी फांदी दाखवायचा अवकाश की ते ताबडतोब चंद्र ओळखतील. त्याचप्रमाणे उपदेश करताक्षणीच अभिन्न स्थिती प्राप्त करतील. तेच या ज्ञानाचे उत्तम अधिकारी असून तीव्रप्रज्ञ होत. तेच जगात धन्य होत. (२६०८)

तस्मात् रविदत्ता सावधान । तूं पाहें स्वतां विचारून ।
ऐसा अधिकार असे की पूर्ण ॥ समाधान आकळावया ॥ ९ ॥
तेव्हा रविदत्ता, लक्ष देऊन ऐक. तू स्वतः स्वतःला विचारून पहा. वर सांगितल्याप्रमाणे पूर्ण समाधान प्राप्त करून घेण्याचा अधिकार तुला प्राप्त झाला आहे का ? (२६०९)

बहु प्रकारे आह्मीं तुजला । विवेचून अर्थ सांगितला ।
उपदेश प्रांजलपणे केला । जेवीं आंवळा हातींचा ॥ १० ॥
आम्ही तुला अनेक प्रकारांनी विवेचन करून अर्थ सांगितला. तळहातावरील आवळ्याप्रमाणे अतिशय सोपा करून उपदेश सांगितला. (२६१०)

परी तुज समाधान बाणलें । नाहीं ऐसें आह्मां कळलें ।
तस्मात् मंदप्रज्ञत्व दिसलें । प्रत्यक्ष आतां ॥ ११ ॥
तरी तुला समाधान प्राप्त झाले नाही, हे माझ्या लक्षात आले आहे. तेव्हा तू मंदप्रज्ञ आहेस हे आता प्रत्यक्षच दिसून आले. (२६११)

तरी तुज विचाररूप ज्ञानासी । अधिकार नसे निश्चयेंसी ।
तुवां कर्म अथवा उपासनेसी । जाऊन संपादावें ॥ १२ ॥
तेव्हा तुला विचाररूप ज्ञानाचा अधिकार निश्चितपणे नाही. तेव्हा तू आता कर्ममार्ग अथवा उपासनामार्ग या मार्गांनी जाऊन ते प्राप्त करून घ्यावेस. (२६१२)

इतुकें बोलून मौन धरिलें । तेव्हां रविदत्ता कैसे जाहलें ।
वज्रचि काय मस्तकी पडिलें । जाहलें शतचूर्ण ॥ १३ ॥
इतके बोलून आचार्यानी मौन धरले. त्या वेळी रविदत्ताची अवस्था आकाशातून जणू वजच मस्तकावर पडून त्याच्या शेकडो ठिकऱ्या उडाल्या आहेत,अशी झाली. (२६१३)

आहे की मेलों आठवेना । अंतःकरणा आली मूर्छना ।
शरीरीं येकवटता जाहली प्राणा । अतिक्रमण करू पाहे ॥ १४ ॥
आपण जिवंत आहोत की मरण पावलो आहोत, हेही त्याला स्मरेना. अंतःकरणाची शुद्ध हरवली. सगळे प्राण शरीरात एकत्र गोळा झाले आहेत आणि आता ते शरीर सोडून जात आहेत की काय, असे त्याला वाटू लागले. (२६१४)

सर्व चळणवळण राहिलें । इंद्रिय ठाईंच्या ठाईं निमालें ।
श्वासही किमपि न चाले । थंड जाहलीं गात्रं ॥ १५ ॥
सर्व शरीराचे चलनवलन थांबले; इंद्रिये जागच्या जागी स्थिरावली. श्वास थोडासुद्धा चालेनासा झाला, सर्व अवयव थंड पडले. (२६१५)

ऐशा लोटतां घटिका दोन । कांहीं प्राण पावला चलन ।
दीर्घ श्वास घ्राणे दाटून । सोडिता जाहला ॥ १६ ॥
अशा स्थितीत दोन घटका लोटल्या. मग थोडेसे प्राणांचे चलनवलन सुरू झाले. पोटात वायू साठवून मग त्याने नाकाने दीर्घ श्वास सोडला. (२६१६)

पुढे चिरकाळे मन उद्भवलें । तेव्हां हळुहळु नेत्र उघडिले ।
परी नेत्रांसी कांही न दिसे पहिलें । मन भ्रमलें ह्मणोनि ॥ १७ ॥
पुढे बऱ्याच वेळाने त्याचे मन जागेवर आले, तेव्हा त्याने हळूहळू आपले डोळे उघडले. पण प्रथम मन अस्थिर झाल्यामुळे त्याला डोळ्यांनी काहीच दिसेना. (२६१७)

नंतर आठवीतसे मानसीं । की सद्गुरुने उपक्षिलें मजसी ।
आतां कोणता उपाय जळचरासी । जेवीं जीवनाविण ॥ १८ ॥
नंतर मनात आठवण झाली की, सद्गुरूंनी माझी उपेक्षा केली आहे. आता जलचरांना पाण्यावाचून दुसरा कोणता आधार असणार ? तसे आपल्याला तरी सदुरूवाचून दुसरा कोणता आधार असणार ? असा विचार त्याच्या मनात आला. (२६१८)

तया तळमळीसी काय पुसावें । तप्तपात्री कण भाजावे ।
शेखीं प्राणाचेही उत्क्रमण नव्हे । उगी चरफड अंतरीं ॥ १९ ॥
त्यासरशी त्याची तगमग अधिकच वाढली. तापलेल्या पात्रात धान्याचे कण भाजावे. त्याप्रमाणे त्याचे झाले. पण प्राणही जात नाहीत अशी त्याची अवस्था झाली. मग अंतःकरणात तो उगीचच चरफडत राहिला. (२६१९)

नेत्रांसीही अंधता आली । वाणीसी तों बोबडी वळली ।
सर्व गाने कापूं लागलीं । मस्तक झाडितसे ॥ २० ॥
डोळ्यांपुढे अंधारी आली. जिभेची बोबडी वळली, सर्व अवयव कापू लागले. तो मस्तकाला हिसके देऊ लागला. (२६२०)

बळें बोलतां येकाचें येक । शब्द होत असती भ्रामक ।
चित्तासी फुटेचिना तर्क । हां हां मेलों ह्मणें ॥ २१ ॥
तसाच जोर करून तो बोलण्याचा प्रयत्न करू लागला, तर चुकीचे शब्द तोंडावाटे बाहेर पडू लागले, मनाला काही तर्क करणे अशक्य झाले, अरे रे ! माझा घात झाला, मी ठार मेलो, असे तो म्हणू लागला. (२६२१)

कंठ सद्गद बाष्पें दाटला । नेत्रद्वारे पूर चालिला ।
तो काहार नव जाय सोसवला । श्रवण करितां मुमुक्षा ॥ २२ ॥
त्याचा कंठ सद्गदित झाला. नेत्रांतून अणूंचा पूर सुरू झाला. सद्गुरूंच्या तोंडचे शब्द ऐकल्यानंतर त्या ममक्ष साधकाला तो त्रास सहन करवेनासा झाला. (२६२२)

ऐसे दोन मुहूर्त लोटल्यावरी । बलात्कारें अवस्था सारी ।
उठोनि लोळे चरणावरी । उपेक्षू नये ह्मणे ॥ २३ ॥
असे दोन मुहूर्त (क्षण) लोटल्यावर त्याने मोठ्या प्रयत्नाने आपली ही अवस्था बाजूला सारली आणि उठून गुरूचरणांवर त्याने एकदम लोळण घेतली. “गुरुमहाराज, माझी अशी उपेक्षा करू नका." असे तो म्हणू लागला. (२६२३)

अहा अहा हो सद्गुरुस्वामी । मी जळालों बाह्य अंतर्यामी ।
उपेक्षू नये पाववा विश्रामीं । अभय शीतळकरें ॥ २४ ॥
"अहो सद्गुरू स्वामी महाराज, मी अंतर्बाह्य होरपळत आहे. तेव्हा उपेक्षा न करता मला आपल्या शीतळकरांनी शांत करून विश्रान्तिस्थानी पोचवा. (२६२४)

मी अन्याई अपराधी परी स्वामीचा । मंदप्रज्ञ अनधिकारी साचा ।
जैसा पुत्र मूर्ख समर्थ मातेचा । परी त्या माता नुपेक्षी ॥ २५ ॥
मी अन्यायी आहे. मी आपला अपराधी आहे; मंदप्रज्ञ आणि मोक्षप्राप्तीला अनधिकारी (अयोग्य) असा आहे; पण एखाद्या समर्थ मातेचा पुत्र मूर्ख निघाला तरी ती माता त्याची ज्याप्रमाणे उपेक्षा करत नाही त्याप्रमाणे आपणही माझी उपेक्षा करू नका. (२६२५)

जरी अन्यथा उपेक्षी माता । तरी तया दुजा उपाय कोणता ।
तेवीं दयाळुवें मज उपेक्षितां । त्राता त्रैलोक्यी नसे ॥ २६ ॥
जर मातेने त्याची उपेक्षा केली तर त्याच्यापुढे दुसरा कोणता मार्ग असेल ? त्याप्रमाणे दयाळू सद्गुरूंनी माझी उपेक्षा केली तर मला या संकटातून सोडविणारा दुसरा कोणी त्राता सर्व त्रैलोक्यात सापडणार नाही. (२६२६)

हरिहर रुष्ट जाहले जरी । तरी तया सद्गुरु असे कैवारी ।
सद्गुरु कोपतां पुरारि मुरारि । संरक्षितीना ॥ २७ ॥
जर विष्णू किंवा शंकर भक्तांवर रागावले तर त्या भक्ताचा कैवार घेण्यास सद्गुरू पुढे सरसावतात, पण त्या भक्तावर जर स्वतः सद्गुरूच रागावले तर पुरारी (शंकर) आणि मुरारी (विष्णू) त्याचे संरक्षण करू शकत नाहीत. (२६२७)

आतां कोणतें मी कर्म करूं । अवघा स्वप्नांतील प्रकारु ।
अथवा जाऊनियां पाय धरूं । कोण्या निर्बळाचे ॥ २८ ॥
आता मी कोणते कर्म करू ? कारण कोणतेही कर्म केले तरी तो सर्व स्वप्नातील प्रकार ठरेल. मी आता कोणत्या दुबळ्या व्यक्तीचे मला वाचव म्हणून पाय धरायला जाऊ ? (त्यातही काही अर्थ नाही.) (२६२८)

गंधर्वनगरी चित्रींची सेना । त्यांत कवण थोर कवण साना ।
तेवीं हरिहरादि उपासना । आतां मज करणे अयोग्य ॥ २९ ॥
गंधर्व नगरी (आकाशातील मेघांचे कल्पित आकार) असो वा चित्रातील सेना असो, त्यात कोण थोर आणि कोण लहान म्हणावा ? कारण ते सर्वच दृश्य भ्रामक आहे. त्याप्रमाणे विष्णू, शंकर इ. देवतांच्या उपासनाही भ्रामक आहेत. त्या करत राहाणे मला अयोग्य वाटते. (२६२९)

मृगजळासी धरण बांधावें । त्यांतील मासोळे अपेक्षावे ।
तैसें म्यां यज्ञादि कर्म करावें । स्वर्गादि अपेक्षूनी ॥ ३० ॥
आता स्वर्गादी लोकांची अपेक्षा धरून यज्ञ इ. कर्मे करावीत म्हणावे तर तो सगळा मृगजळाला धरण बांधण्याचा आणि त्या मृगजळाच्या जलाशयातील मासे पकडत बसण्याचा प्रकार ठरेल. (२६३०)

याची जोवरी वोळखी न होती । तोवरी केलीच केली जनरीती ।
आतां मज अधिकार नसे पुढती । कर्म की उपासनेचा ॥ ३१ ॥
या ज्ञानमार्गाची जोपर्यंत ओळख झाली नव्हती. तोपर्यंत वरीलसारखे प्रकार जनरीतीप्रमाणे मी करीत राहिलो. परंतु आता कर्ममार्गाचा किंवा उपासनामार्गाचा मला अधिकार नाही. (ते माझ्यासाठी उपयोगाचे नाहीत.) (२६३१)

करितां करितां जाहला शीण । भूस बडविलें सांडूनि कण ।
संदिसें प्रारब्धउदयें दर्शन । श्रीचरणांचे जाहलें ॥ ३२ ॥
या गोष्टी (कर्म, उपासना इ.) करता करता केवळ श्रमच झाले. धान्याचे कण सोडून भूस बडवण्याचा उद्योग करावा तसा हा प्रकार झाला. नुकतेच (संदिसें) प्रारब्धाचा उदय झाल्यामुळे श्रीगुरूचरणांचे दर्शन झाले. (२६३२)

मृगजळा देखोनि धांवतां । मृगा पाणी मिळालें अवचिता ।
तेवीं अनंत पुण्यांचिये सुकृता । जोडले श्रीचरण ॥ ३३ ॥
मृगजळ पाहन धावत असताना अचानक खरोखरचे पाणीच मिळावे, त्याप्रमाणे अनंत सुकृतांच्या (चांगल्या कर्माच्या) पुण्यामुळे श्रीगुरूंच्या चरणांची प्राप्ती झाली. (२६३३)

ऐसा मज अलभ्य लाभ जाहला । तो केवीं जाय मनें त्यागिला ।
जरी दयाळुवें ढकलून घातिला । तरी चरण न सोडी ॥ ३४ ॥
असा मला अलभ्य लाभ झाला असता त्याचा त्याग मनाने करणे मला कसे शक्य होईल ? जरी दयाळू गुरूमहाराजांनी मला ढकलून दिले तरी मी गुरूंचे चरण कधी सोडणार नाही. (२६३४)

भुकेलिया अमृतपान । जोडतां केवीं फिरवी वदन ।
तृप्ति जाहलिया सहज आपण । तेथेंचि शयन करी ॥ ३५ ॥
भुकेल्या माणसाला अमृतपान करण्याची संधी मिळाली असता तो तोंड कसे फिरवील ? उलट जेवून तृप्त झाल्यानंतर त्याच ठिकाणी शयन करण्याचीही तो इच्छा करील. (२६३५)

तेवीं भवार्णवीं सद्गुरुपाय । नौका जोडलीसे निर्भय ।
तेथें ब्रह्मामृताचा लाभ होय । जिव्हाग्री अकस्मात् ॥ ३६ ॥
त्याप्रमाणे या संसाररूपी सागरात सद्गुरूंचे चरणरूपी अभय देणारी नाव मिळाल्यावर तेथेच अचानकपणे ब्रह्मामृताचाही जिव्हाग्रावर स्पर्श व्हावा, (२६३६)

तेथूनियां परते कवण । अविष्ट तृप्ति जाहलियाविण ।
तृप्ति जाहलियाहि होय लीन । जेथील तेथें ॥ ३७ ॥
असे झाल्यावर तेथून कोणी, आपले कधीही न विटणारे समाधान झाल्याविना माघारी परत फिरेल का ? उलट तृप्ती झाल्यावर देखील अएल तिथेच लीन होऊन राहील (२६३७)

मध्ये जरी परतें सारिलें । तरी तें मरेल जरी उपेक्षिलें ।
हे उचित नव्हे दीनासी लोटिलें । समर्थ दातिया उदारा ॥ ३८ ॥
मध्येच जर त्याला बाजूला काढले आणि त्याची उपेक्षा केली तर तो मरूनच जाईल. स्मर्थ (श्रीमंत) उदार दातृत्वासाठी प्रख्यात असलेल्या आपल्यासारख्या व्यक्तीने असे माझ्यासारख्या गरिबाला दूर लोटणे शोभा देणार नाही. (२६३८)

हे असो कामधेनूनें वत्सासी । कीं मेघे अनन्य चातकासी ।
अथवा चंद्रे कधीं चकोरासी । उपेक्षिलें न देखों ॥ ३९ ॥
हे राहू द्या, पण कामधेनूने आपल्या वासराला, मेघाने अनन्य अशा चातकाला, अथवा चंद्राने चकोराला उपेक्षित ठेवल्याचे कधी पाहण्यात आले नाही. (२६३९)

दुष्ट जलचरें जाहली जरी । तरी जळें टाकिली बाहेरी ।
ऐशी मातही श्रवणावरी । आली नाही अद्यापि ॥ ४० ॥
आपल्या पोटात दुष्ट जलचर प्राणी जरी झाले तरी पाण्याने त्यांना बाहेर टाकून दिले, अशी गोष्टही कानावर अद्यापि आली नाही. (२६४०)

तेवीं सद्गुरूसी शरण आला । तो दयाळुवें पिटून घातिला ।
ऐसा न देखों न ऐकिला ॥ कवणेही काळीं ॥ ४१ ॥
त्याप्रमाणे एखादा सद्गुरूंना शरण आला असताना त्या दयाळू सद्गुरूंनी त्याला मारहाण करून बाहेर काढला असे कधीही पाहिले नाही अथवा ऐकलेही नाही. (२६४१)

परि मजविशीं उद्भवले काय । हा नेणों कैसा उदेला समय ।
परी मी न जाय हाचि निश्चय । उपेक्षितांही दयाळें ॥ ४२ ॥
पण माझ्याच संदर्भात असे काय घडले ? हा कसला प्रसंग ओढवला हे मला कळतच नाही. पण दयाळू अशा गुरूवर्यांनी माझी उपेक्षा केली असली तरी मी येथून जाणार नाही. हाच माझा निश्चय झाला आहे. (२६४२)

मी मरमरून शत जन्म घेईन । परी न सोडी न सोडी हे चरण ।
हे प्रतिज्ञाचि सत्य प्रमाण । अन्यथा नव्हे नव्हे ॥ ४३ ॥
मी अनेकदा मरून शंभर वेळा जन्म घेईन, पण हे सगुरूचरण सोडणार नाही, ही माझी प्रतिज्ञा आहे. ती कधीही बदलणार नाही. (२६४३)

इतुकियावरीही समर्थे । उपेक्षूनियां दवडितां अनाथें ।
काय उपाय कवणिया अर्थे । घडेसा नाहीं ॥ ४४ ॥
पण त्यानंतरही समर्थांनी (सगुरूंनी) माझी उपेक्षा करून मला हाकलून दिले तर त्यानंतरही त्यावर काही, कोणत्याही प्रकारचा उपाय शक्यच नाही, असे आहे काय ? (२६४४)

परी दयाळुवें ब्रीद रसूनी । स्वीकारावें दीनालागूनी ।
निववावें अभयवचनीं । हेंचि उचित ॥ ४५ ॥
परंतु दयाळू सद्गुरूंनी आपले ब्रीद राखून माझ्यासारख्या गरिबाचा स्वीकार करावा आणि मला आपल्या अभयवचनाने शांत करावे, हेच आता बरे दिसते. (२६४५)

ऐसें विनऊनि पुढतो पुढती । चरणी लोळे नेत्राश्रु वाहती ।
पुन्हां बद्धांजलि मागुती । पुन्हां नमस्कार ॥ ४६ ॥
अशी पुनःपुन्हा विनंती करून त्याने त्यांच्या चरणांवर लोळण घेतली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाह लागले. मग त्याने हात जोडून त्यांना पुन्हा नमस्कार घातला. (२६४६)

ऐसा अनन्य रविदत्त । देखतां स्वामी आनंदभरित ।
उचलूनि आलिंगिला त्वरित । ह्मणती ना भी ॥ ४७ ॥
असा रविदत्त अनन्यगतिक (एकनिष्ठ) झालेला आहे, पाहून स्वामींना खूप आनंद झाला. त्याला त्यांनी उठवून लगेच आलिंगन दिले आणि म्हटले की, 'तू भिऊ नकोस.' (२६४७)

तुजसी वाउगेंचि वाटलें । की मजला गुरूने उपेक्षिलें ।
परी आह्मीं नाहीं गा अंतरीं आणिलें । की त्यागावें ऐसें ॥ ४८ ॥
अरे, आपल्याला गुरूंनी उपेक्षित केले, अशी तू उगीचच समजूत करून घेतलीस. पण खरोखर तुझा त्याग करावा असा विचार आमच्या मनातसुद्धा आला नाही. (२६४८)

अरे शिष्यासी अलभ्य गुरु । तेवींच गुरूसी अलभ्य लेंकरूं ।
तरी आह्मीं उपेक्षा केवीं करूं ॥ परी निर्धारु पाहतसों ॥ ४९ ॥
अरे, शिष्याला गुरू भेटणे हे जसे अलभ्य, त्याप्रमाणेच गुरूंना सुद्धा असा शिष्य भेटणे अलभ्य असते. तेव्हा आम्ही तुझी उपेक्षा कशी करू ? आम्ही फक्त तुझा निर्धार पाहिला. (२६४९)

सद्गुरूसी अनन्यभावें । जरी सर्व त्यागूनि शरण यावें ।
तेणें अबोधे परतोनि जावें । तरी वाहावें ब्रीद कासया ॥ ५० ॥
शिष्याने अनन्यगतिक होऊन, सर्व गोष्टींचा त्याग करून सद्गुरूंना शरण यावे आणि त्याला जर ज्ञान न मिळताच परत जावे लागले तर, सद्गुरूंनी आपले सद्गुरू हे बिरूद कशासाठी मिरवावे ? (२६५०)

अनन्य मात्र शरण यावा । मग मंद की तीव्रप्रज्ञ बरवा ।
तो सद्गुरूनें उद्धरावा । सत्य सत्य त्रिवाचा ॥ ५१ ॥
शिष्याने फक्त अनन्यभावाने सद्गुरूंना शरण यावे, मग तो मंदप्रज्ञ असो वा अतिशय तीव्र प्रज्ञ असो, त्याचा तो कसाही असला तरी, सद्गुरूंनी उद्धारच केला पाहिजे, हे त्रिवार सत्य आहे. (२६५१)

अनन्य म्हणिजे सद्गुरूविना । दुजें दैवतचि असेना ।
आणि अन्य विषयही दिसेना । निस्पृहत्व सर्व जगीं ॥ ५२ ॥
अनन्य याचा अर्थ त्याला सद्गुरूवाचून दुसरे दैवतच असता कामा नये आणि त्याप्रमाणेच इतर कुठलाही विचार त्याच्या दृष्टीसमोर असता कामा नये.जगातील सर्व विषयांच्या बाबतीत तो निःस्पृह असला पाहिजे. (२६५२)

याविण वरपंगी वरी वरी । अनन्यत्व दावी बहुपरी ।
परी भाव नाहींच अंतरीं । असे तरी जायाचा ॥ ५३ ॥
याउलट तो जर वरवर एकनिष्ठता दाखवत असेल आणि त्याच्या अंतःकरणात मात्र तशी भावना नसेल तर तो सोडून जाणार आहे, हे समजावे. (२६५३)

ऐसिया कुचीर शिष्यासी । उपेक्षितां दोष नाहीं गुरूसी ।
मग तो तीव्रप्रज्ञ जरी श्रवणासी । परी तो वंचक ॥ ५४ ॥
असा अंगचोर शिष्याची उपेक्षा केली तर तो गुरूचा दोष ठरत नाही. मग तो तीव्रप्रज्ञ असा श्रोता जरी असला तरी तो वंचक (लबाड) आहे, असे खुशाल समजावे. (२६५४)

तस्मात् सच्छिष्य अनन्य । तो असो मंद की तीव्रप्रज्ञ ।
तोचि गुरूपासूनि होतसे धन्य । श्रवणें की अभ्यासें ॥ ५५ ॥
तेव्हा शिष्य चांगला असला पाहिजे, मग तो मंदप्रज्ञ असो अथवा तीव्रप्रज्ञ असो, पण तो सद्गुरूंजवळ श्रवण करून अथवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करून शेवटी तो त्या सद्गुरूंच्या द्वारा कृतार्थ होणारच. (२६५५)

तीव्रप्रज्ञ जो उत्तम अधिकारी । तो श्रवणामात्रे विवेचन करी ।
दृढ अपरोक्ष समाधान अंतरी । पावे बोलिल्या न्यायें ॥ ५६ ॥
जो शिष्य उत्तम अधिकारी असून तीव्रप्रज्ञही आहे, तो एकदा श्रवण झाले की त्यावर विचार करील आणि सांगितलेल्या प्रकारांनी अंतःकरणामध्ये दृढ अपरोक्ष समाधान प्राप्त करून घेईल. (२६५६)

मंदप्रज्ञासी ऐसें न घडे । अभ्यासें हळुहळु पवाडे ।
दृढ अपरोक्ष समाधान जोडे । तयाचि ऐसें ॥ ५७ ॥
मंदप्रज्ञाच्या बाबतीत असे घडणार नाही, तो अभ्यासाच्या साहाय्याने हळूहळू ते प्राप्त करून घेईल आणि तीव्रप्रज्ञासारखेच दृढ अपरोक्ष समाधान प्राप्त करून घेईल. (२६५७)

जो विचारें अपरोक्षता पावे । तेंचि अभ्यासें समाधान पावावें ।
हे अन्यथा कधीच नव्हे । शेवटी स्थिति एक ॥ ५८ ॥
विचाराच्या साहाय्याने तीव्रप्रज्ञ जे समाधान प्राप्त करून घेईल, तेच समाधान मंदप्रज्ञालाही अभ्यासाच्या मागनि प्राप्त करील. यात काहीही बदल होणार नाही. अखेरची ध्येयरूप समाधानाची स्थिती एकच आहे. (२६५८)

तस्मात् रविदत्ता सावधान । हा खेद टाकी होईं स्वच्छमन ।
तूं जरी अससी मंदप्रज्ञ । तरी अभ्यासें मेळऊं ॥ ५९ ॥
तेव्हा रविदत्ता, सावध हो. हे दुःख टाकून दे, मन स्वच्छ कर. तू जरी मंदप्रज्ञ असलास तरी तुला अभ्यासाच्या मार्गाने दृढ अपरोक्ष समाधान मिळवून देऊ. (२६५९)

ऐसें अभयवचन ऐकतां । आनंद जाहला रविदत्ता ।
सर्व भवदुःखाची सोडून चिंता । श्रवणीं तत्पर होय ॥ ६० ॥
अशा प्रकारचे सद्गुरूंच्या तोंडचे अभयवचन ऐकताच रविदत्ताला आनंद झाला आणि मग संसारातील दुःखाची सर्व चिंता टाकून देऊन तो श्रवणासाठी तयार झाला. (२६६०)

गुरु ह्मणती गा पाडसा । आह्मी तुजसी बोलिलों सहसा ।
की कर्म अथवा उपासना करीं जैसा । अधिकार तुज असे ॥ ६ ॥
तेव्हा सदुरू त्याला म्हणाले, "अरे माझ्या शिष्या, मी तुला असे म्हणालो होतो की, तू तुझ्या अधिकाराप्रमाणे कर्म अथवा उपासना कर. (२६६१)

याचा अर्थ तुज न कळतां । उपेक्षिलें ह्मणून मानिले चित्ता ।
तरी तयाचें तात्पर्य ऐकें आतां । निवांत होऊनी ॥ ६२ ॥
याचा अर्थ तुला कळला नाही आणि उगीचच आम्ही तुझी उपेक्षा केली असे डोक्यात घेऊन बसलास. तर आता माझ्या म्हणण्याचा अभिप्राय निवांत होऊन शांत चित्ताने आता ऐक. (२६६२)

विचारद्वारा जें पावावें । त्या स्थितीतें अभ्यासें पावे ।
त्या अभ्यासाचें लक्षण समजावें । तेचि उपासना ॥ ६३ ॥
विचाराच्या मार्गाने जिची प्राप्ती होते ती स्थिती अभ्यासाने प्राप्त करून घेता येते. त्या अभ्यासाचे स्वरूप समजून घे. अरे, तीच उपासना. (२६६३)

उपासना हणिजे लक्ष्य ब्रह्मात्मा । ऐक्यत्वें निवडिला परमात्मा ।
याचे अनुसधान धरी महात्मा । निदिध्यासरूपें ॥ ६४ ॥
उपासना म्हणजे ब्रह्मात्म्याला लक्ष्य करणे, तोच परमात्मा. तो आणि आपण एकरूपच आहोत. हे जाणून त्याचे निदिध्यासरूपाने अनुसंधान साधकाने करावे, हीच उपासना होय. (२६६४)

अभ्यासा नाम निदिध्यासन । तेंचि बापा ध्यातृध्यान ।
हेंचि की निर्गुण उपासन । कर्तृतंत्ररूपें ॥ ६५ ॥
अभ्यास म्हणजे निदिध्यास. म्हणजेच ध्यानास बसलेल्याने जे ध्यान करायचे ते होय. तेच ध्यातृध्यान होय. कर्तृतंत्राने केलेली हीच निर्गुणोपासना होय. (२६६५)

तयाचेही प्रकार दोन । येक सगुण येक निर्गुण ।
तें पुढे प्रांजळ असे निरूपण । कळेल ऐकतां ॥ ६६ ॥
तिचेही दोन प्रकार आहेत. एक सगुणोपासना आणि दुसरी निर्गुणोपासना होय. या दोहोंचे सुलभ, सोपे विवेचन पुढे येणारच आहे. ते श्रवण करण्याच्या ओघात तला कळेलच. (२६६६)

तेचि उपासना करी जाईं । ऐसें बोलिलों निःसंशयीं ।
यांत उपेक्षिलें कवणें काई । आतां कर्माचे रूप ऐकें ॥ ६७ ॥
तीच उपासना करत जा, असेच मी तुला निश्चितपणे सांगितले होते. आता मी तुझी कोणती उपेक्षा केली ? आता कर्माचेही स्वरूप ऐकून घे. (२६६७)

हाही उपासनेचा अभ्यास । जरी न ठाके निदिध्यास ।
तरी तेणें आदरावें कर्मास । बोलिजें तेवीं ॥ ६८ ॥
हाच उपासनेचा अभ्यास करताना निदिध्यास होत नसेल तर त्याने कर्माचा मार्ग निवडावा, असेच सांगितले पाहिजे. (२६६८)

कर्म हणिजे देहाची क्रिया । मन आणि दशेंद्रियां ।
अर्पण करोनी गुरुपायां । गुरुभक्ति करावी ॥ ६९ ॥
कर्म म्हणजे देहाची क्रिया. आपले मन आणि पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेन्द्रिये अशी अकरा इंद्रिये सद्गुरुचरणी अर्पण करून गुरुभक्ती करावी. (२६६९)

कायिक वाचिक मानसिक । गुरुसेवा हेंचि कर्म एक ।
यावांचून जें यज्ञादिक । तें प्रवृत्तीचें ॥ ७० ॥
कायिक (शरीराने केलेली), वाचिक (शब्दांच्या साहाय्याने केलेली) आणि मानसिक (मनाने केलेली) गुरुसेवा हेच एकमेव कर्म होय. याखेरीज यज्ञयागादी कर्मे ही केवळ प्रवृत्तीची (प्रवृत्ति-संसारातील आसक्ती) कर्मे समजावीत. (२६७०)

तें जेव्हां आरंभी त्यागिलें । तेव्हांचि मुमुक्षुत्व पावलें ।
तेंचि कर्म तया योजिलें । न जाय मुमुक्षा ॥ ७१ ॥
त्या प्रवृत्तींच्या कर्मांचा अगोदरच त्याग करायचा असतो. तेव्हाच मुमुक्षुत्व प्राप्त होते. मुमुक्षूला ते यज्ञयागादी कर्म कर' म्हणून उपदेश करता येत नाही. (अशा मुमुक्षूच्या बाबतीत या प्रकारच्या उपदेशाची योजना करता येत नाही.) (२६७१)

तस्मात् गुरुभक्ति हेंचि कर्म । जेणे सर्व कर्म धर्म पावती विराम ।
आणि झडकरी देतसे विश्राम । जें विचारज्ञाने पाविजे ॥ ७२ ॥
म्हणून गुरुभक्ती हेच त्याच्या बाबतीत कर्म होय. त्या गुरुसेवेने सर्व कर्मे, धर्म यांना विश्रांती मिळते. म्हणजे ती कर्मे, धर्मव्रते करण्याची गरज राहत नाही. आणि ती गुरुसेवाच, विचाराच्या साहाय्याने जे समाधान प्राप्त होते, ते समाधान प्राप्त करून देते. (२६७२)

ऐशिया गुरुभक्तीच्या योगें । अधिकारही पूर्वील नलगे ।
सांग होतसे लागवेगें । अल्पचि काळें ॥ ७३ ॥
या गुरुसेवेचा मार्ग स्वीकारल्यानंतर पूर्वी सांगितलेल्या अधिकाराचीही गरज नाही. आणि अगदी थोड्या अवधीतच हे समाधान प्राप्तीचे कार्य लगोलग होऊन जाते. (२६७३)

मग पूर्वीचे मुमुक्षुत्व जयासी । तो तरी सहज लागे उपासनेसी ।
हे असो वस्तुतंत्रहि ज्ञानासी । पात्र होय ॥ ७४ ॥
ज्याला अगोदरच मुमुक्षुत्व प्राप्त झाले आहे, तो ताबडतोब उपासनेला आरंभ करतो आणि तिच्याद्वारे वस्तुतंत्र ज्ञानाला पात्र होतो. (२६७४)

ऐसें कर्म हे गुरुभक्ति । जया घडे साधकाप्रति ।
बहु काय बोलावें पुढती । मुक्ति तळहाती त्याचे ॥ ७५ ॥
ज्या साधकाला असे गुरुभक्तिरूप कर्म घडेल त्याच्या, जास्त काय पुढे बोलावे, तळहातात साक्षात मोक्षच येईल. (२६७५)

तस्मात् रविदत्ता गुरुभक्ति ऐशी । आदरावी तुवां मानसीं ।
तरी त्वरित ज्ञानासी पात्र होशी । ऐसा हेतु आमुचा ॥ ७६ ॥
तेव्हा हे रविदत्ता, अशा प्रकारची गुरुभक्तीचा तू मनापासून स्वीकार कर. त्यामुळे तू थोड्याच वेळात ज्ञानास पात्र होशील, असा आमच्या बोलण्याचा हेतू होता. (२६७६)

ऐसें ऐकतांचि रविदत्तासी । अति आनंद जाहला मानसीं ।
जेवीं भरतें दाटे समुद्रासी । तेवीं उचंबळे ॥ ७७ ॥
असे ऐकताच रविदत्ताला मनात खूप आनंद झाला. समुद्राला भरती यावी, तसे त्याच्या मनातही आनंदाचे भरते दाटून आले. (२६७७)

आधींच शर्करेची आवडी । वरी वैद्यं दिधली तेचि पुडी ।
तेवीं गुरुभक्तीची अति गोडी । तेचि आज्ञा त्यावरी ॥ ७८ ॥
एखाद्याला साखरेची मुळातच आवड असावी, आणि त्यावर वैद्यांनी औषधासाठी साखरेचीच पुडी त्याच्या हातात द्यावी तसेच त्याला झाले. त्याला गुरुभक्तीची आधीपासून गोडी होती. आणि आता तर तीच आज्ञा त्याला झाली. (२६७८)

पूर्वी जाईं ऐसे उपेक्षिलेंसे ह्मणतां । वरी गुरुभक्ति करी आज्ञापितां ।
तें कैसें जाहलें रविदत्ता । दृष्टान्ते सांगू ॥ ७९ ॥
पूर्वी सद्गुरूंनी 'जा' असे काहीसे उपेक्षा केल्यासारखे सांगितले होते, त्यानंतर आता 'गुरुभक्ती कर' अशी आज्ञा केली. तेव्हा रविदत्ताला कसे झाले, ते दृष्टान्तानेच सांगतो. (२६७९)

कोणी येके परिस मारिला । तेणें शतचूर्ण मस्तक जाला ।
परी लोहाचा वर्ण पालटला । तेणें दुःख नासून सुख होय ॥ ८० ॥
कोणी एकाने लोखंडाच्या पुतळ्याला परिस फेकून मारला तेव्हा त्या पुतळ्याच्या मस्तकाचे शेकडो तुकडे झाले. त्यामुळे त्याला खूप वाईट वाटले पण त्या परिसाने लोखंडाचा रंग बदलला, (म्हणजे तो पुतळा सोन्याचा झाला) हे पाहताच त्याचे दुःख नष्ट होऊन त्याला अपार सुख झाले. (२६८०)

तैसें जा ह्मणतां दुःख वाटलें । तें गुरुभक्ति करीं ह्मणतां गेलें ।
अतिशय सुखची उफाळलें । महा लाभ देखतां ॥ ८१ ॥
त्याप्रमाणे गुरुजींनी 'जा' असे म्हणताच दुःख वाटले; ते 'गुरुभक्ती कर' असे म्हणताच नाहीसे झाले. मोठा लाभ पाहिल्यावर ज्याप्रमाणे अतिशय सुख उचंबळून येते तसे त्याला झाले. (२६८१)

तया आनंदें नाचूं लागे । वस्त्र उडवीतसे वेगें ।
वाहवा ह्मणोन चरणा लागे । प्रदक्षणा करी ॥ ८२ ॥
त्याला अतिशय आनंद झाला. त्या आनंदाने तो नाचू लागला, अंगावरचे वस्त्र हवेत उडविले. 'वाहवा' असे म्हणून तो सद्गुरूंच्या पाया पडला. त्यांच्याभोवती त्याने प्रदक्षिणा घातली. (२६८२)

या लाभापरता लाभ नाहीं । धन्य मी प्राप्त जाहलों पाहीं ।
ह्मणून नाचे उभवून बाही । आनंदे दाटोनी ॥ ८३ ॥
'या लाभासारखा दुसरा कोणताच लाभ नाही आता मी माझे ध्येय गाठलेच, असे म्हणावयास हरकत नाही. त्यामुळे मी धन्य, कृतार्थ झालो' असे म्हणून बाहू उभारून तो नाचू लागला. तो आनंदाने दाटून गेला (तो आनंदाने अंतर्बाह्य व्यापून गेला.) (२६८३)

गुरुभक्ति मज प्राप्त होतां । उपासनाही आली हाता ।
ज्ञानही जाईल केउता । मातेविण पुत्र ॥ ८४ ॥
तो म्हणू लागला, "मला गुरुभक्ती मिळाल्याबरोबर उपासनासुद्धा माझ्या हाताला आली. आता ज्ञान कोठे जाईल ? आईला (सद्गुरूंना) सोडून पुत्र कधी दूर जाईल काय ?" (२६८४)

मिळतां एक वृक्षाचें मूळ । वृक्ष तो हाता आला सकळ ।
पत्रे शाखा पुष्प फळ । जाईल कोठे ॥ ८५ ॥
“एका वृक्षाची मुळी हाताला सहज लागली. तिच्या रूपाने तो सबंध वृक्षच हाताशी आला. मग आता पाने, फांद्या, फुले अथवा फळे कुठे आणि कशी दूर जाणार आहेत ? (२६८५)

तैशी गुरुभक्तीची प्राप्ति । सहपरिवारें मोक्षसंपत्ति ।
ज्ञान साधन विचारादि होती । दास साधकाचे ॥ ८६ ॥
"त्याप्रमाणे एक गुरुभक्ती प्राप्त झाली की, मोक्षाची संपत्ती तिच्या परिवारासहित हाती आलीच म्हणून समजा. ज्ञान, साधना, विचार इ. त्या साधकाचे दास म्हणून राहतील. (२६८६)

अहो केवढा लाभ जाहला । काय हो मोक्षाचा ध्वज उभारला ।
पार नाहीं माझिये भाग्याला । यया त्रिभुवनीं ॥ ८७ ॥
"अहो, मला केवढा मोठा लाभ झाला आहे ! मोक्षाचा ध्वज कसा उभारला आहे ! या सर्व त्रिभुवनात माझ्या भाग्याला अंत नाही. (२६८७)

तस्मात् अहोरात्र गुरुभक्ति । सेवाचि करीन अति प्रीती ।
वोवाळून सांडीन मुक्ति । गुरुचरणावरूनी ॥ ८८ ॥
"तेव्हा आता मी रात्रंदिवस गुरुभक्ती आणि गुरूंची सेवाच करत राहीन. गुरूंच्या चरणावरून मुक्ती ओवाळून टाकीन. (२६८८)

कायेसी अखंड गुरुसेवा । वाणीसी गुरुभजनाचा ठेवा ।
मनासी निदिध्यास सदैवा । गुरुध्यानाचा ॥ ८९ ॥
"शरीराला अखंड सद्‌गुरूंची सेवा, वाणीला गुरुभजनासारखा ठेवा आणि मनाला गुरुध्यानाचा निदिध्यास असल्यावर आणखी काय हवे ? (२६८९)

कायेसी किंवा मनासी । वाणीसी की सर्वेद्रियांसी ।
उसंतचि नेदी कवणासी । गुरुसेवेविण ॥ ९० ॥
"मी आता काया, मन, वाणी आणि सर्वेन्द्रिये यांना गुरूंच्या सेवेखेरीज उसंतच देणार नाही. (२६९०)

आतां मज गुरुसेवेपरतें कांहीं । या त्रैलोक्यीं काज नाहीं ।
प्राप्तव्य नसे सहसा कांहीं । गुरुभक्तीपरतें ॥ ९१ ॥
“आता गुरुसेवेखेरीज या त्रैलोक्यात दुसरे काही कामच नाही. आणि गुरुभक्तीखेरीज अन्य काही प्राप्त करून घेण्यासारखेही नाही. (२६९१)

काय हो सद्गुरूने कृपा केली । माझी मनवांछा पुरविली ।
ऐशी चित्तवृत्ति आनंदली । रविदत्ताची ॥ ९२ ॥
"सद्गुरूंनी माझ्यावर ही केवढी कृपा केली ! माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण केल्या !" रविदत्ताची चित्तवृत्ती याप्रकारे आनंदित झाली. (२६९२)

हे पाहूनी सद्गुरु शंकर । ह्मणती हा आधीच गुरुभक्तीसी तत्पर ।
यासी नाही ह्मणेल अधिकार । ऐसा कवणु ॥ ९३ ॥
हे पाहून सद्गुरू शंकराचार्य म्हणाले की, “हा तर गुरुभक्तीला आधीच तत्पर झाला आहे ! याला अधिकार नाही, असे कोण म्हणेल ? (२६९३)

जरी कांहींशी प्रज्ञा मंद । तेही अभ्यासें होय विशद ।
सहजी ज्ञान होईल अभेद । अपरोक्ष दृढतर ॥ ९४ ॥
जरी याची प्रज्ञा मंद असली तरी तीही अभ्यासाने निर्मळ होईल. आणि नंतर त्याला अद्वैताचे दढ अपरोक्षज्ञान सहज प्राप्त होईल. (२६९४)

तस्मात् यासी आधी अभ्यास । सांगावा उपासनारूप निदिध्यास ।
सत्वरचि पावेल अपरोक्षास । येथे संशय नाहीं ॥ ९५ ॥
तेव्हा याला अगोदर उपासनारूप निदिध्यासाचा अभ्यास सांगितला पाहिजे. त्यायोगाने तो अपरोक्ष ज्ञान प्राप्त करून घेईल यात काही संशय नाही. (२६९५)

परी आधीं यासी पुसावें । जितुकें निरूपण जाहलें बरवें ।
त्यांत कोणतें बाणलें अनुभवें । तें कळलिया पुढे बोलूं ॥ ९६ ॥
तेव्हा आधी याला विचारतो की, जेवढे आतापर्यंत निरूपण झाले, त्यातील किती तुला अनुभवाने बाणले ? त्यातील किती तुझ्या अनुभवास आले ? हे तू सांग. ते कळल्यावर मग काय सांगायचे ते सांगीन. (२६९६)

ऐसें विचारून मानसीं । आचार्य ह्मणती रविदत्तासी ।
काय जें अनुभवलें असेल तुजसी । तें तें बोलूनी दाखवीं ॥ ९७ ॥
असा मनात विचार करून आचार्य रविदत्ताला म्हणाले, "तुला जो काही अनुभव आला असेल, तो तू स्वमुखाने सांग. (२६९७)

पूर्वीपासून जें निरूपण । जैसे जैसें जाहलें विवेचन ।
सत्य मिथ्या हे प्रकार दोन । विचारा आलें तें सांगें ॥ ९८ ॥
प्रथमपासून तुला जे निरूपण झाले असेल, त्याच्यावर तुझे जे काही विवेचन झाले असेल, त्याद्वारे सत्य आणि मिथ्या असे दोन प्रकार तुझ्या लक्षात आले असतील, ते सर्व सविस्तर सांग. (२६९८)

ऐसें सद्गुरुचे वचन ऐकतां । आनंदोनि जाहला साष्टांगें नमिता ।
सवेंचि जाहला विनविता । बद्धांजलि बैसोनि ॥ ९९ ॥
सद्गुरूंचे हे वचन ऐकल्याबरोबर रविदत्ताला आनंद झाला आणि त्याने सद्गुरूंना साष्टांग नमस्कार घातला आणि नंतर तो त्यांच्यापुढे हात जोडून बसला आणि त्याने सद्गुरूंना विनंती केली. (२६९९)

जी जी समर्था कृपा करून । उपदेशिलें दीनालागून ।
तितुकें उच्चारावें केवीं निरूपण । परी यथामती निवेदं ॥ २७०० ॥
अहो, समर्थ स्वामी महाराज, आपण या गरिबावर कृपा करून जो उपदेश केलात तेवढे सगळे निरूपण मला सांगता येणार नाही. परंतु मी माझ्या अल्पमतीप्रमाणे सांगतो. (२७००)

मुख्य प्रत्यगात्मा ब्रह्म पूर्ण । सच्चिदानंद सघन ।
तेंचि निजांगें स्वयें आपण । अखंडैकरस ॥ १ ॥
स्वशरीरात अनुभवाला येणारा जो कूटस्थ प्रत्यगात्मा, तोच ब्रह्म असून तो परिपूर्ण, सच्चिदानंद आणि सर्वव्यापी आहे. आपण स्वतःही तेच अखंड एकजिनसी मुख्य तत्त्व आहोत. (२७०१)

तेथे न होऊन माया उद्भवली । विद्या अविद्यात्मक नाथिली ।
तेचि बत्तिसां प्रकारें विभागली । ईशादि तृणान्त ॥ २ ॥
त्या ब्रह्माच्या ठिकाणी मिथ्यारूप माया उत्पन्न झाली. ती काहीही न होता जन्माला आली म्हणून मिथ्यारूप होय. तिच्यात विद्या आणि अविद्या या दोन शक्तींचा समावेश आहे. ती मायाच ईश्वरापासून तृणापर्यंत सर्वत्र बत्तीस तत्त्वांच्या रूपात विभागली गेली आहे. (२७०२)

त्या बत्तिसांत प्रकार तीन । जड चंचळ तिसरे चेतन ।
परी तें मिथ्यारूप संपूर्ण । रज्जुसापरी ॥ ३ ॥
त्या बत्तिसांमध्ये तीन प्रकार आहेत. जड, चंचळ, आणि चेतन. परंतु ते तीनही प्रकार रज्जूवर (दोरीवर) भासणाऱ्या सर्पाप्रमाणे संपूर्णपणे मिथ्या आहेत. (२७०३)

स्थावरजंगमात्मक पांच खाणी । हे तो केवळ असती जडपणीं ।
चंचळामाजींही प्रकार तिनी । असती वेगळाले ॥ ४ ॥
स्थावर जंगमात्मक ज्या पाच खाणी (जारज, अंडज, उद्भिज्ज, स्वेदज आणि मानसिक) सांगितल्या आहेत त्या जड स्वरूपाच्या आहेत. चंचळामध्येही वेगवेगळे असे तीन प्रकार आहेत. (२७०४)

प्राण आणि कर्मेंद्रिय । हे चंचळत्वें जडमय ।
ज्ञानेंद्रिय आणि मन बुद्धि द्वय । चंचळत्वे जाणती ॥ ५ ॥
प्राण आणि कर्मेन्द्रिये ही जड असून चंचल आहेत. (जड चंचल) ज्ञानेंद्रिये आणि मन आणि बुद्धी अशी दोन तत्त्वे ही चंचल जाणती तत्त्वे आहेत. (चेतन चंचल) (२७०५)

परी जाणणे नव्हे मनबुद्धीचें । तें स्फोरकत्व प्रतिबिंब जीवाचें ।
ह्मणोनि परप्रकाशकत्व साचें । बुद्ध्यादिकां चंचळां ॥ ६ ॥
पण मनबुद्धींचे जाणणे हे खरे पाहता त्यांचे नाही. तर ते प्रतिबिंबरूप जीवाचे स्फुरणरूप आहे. म्हणून ज्ञानेंद्रिये, बुद्धी आणि मन ही चंचळ तत्त्वे परप्रकाशी आहेत. (२७०६)

यया चंचळाचा तिजा प्रकार । वृत्तिरूप स्फूर्तिमात्र ।
ते निर्विकल्पत्वे जाहला विकार । परी ते जडरूप ॥ ७ ॥
या चंचलाचा तिसरा प्रकार म्हणजे केवळ वृत्तींच्या रूपाने असणाऱ्या स्फुरणाचा होय. (वृत्तिरूप कुरण) मुळात ब्रह्म परमात्मा निर्विकल्प असताना त्याच्यात मायिक विकार होऊन वृत्ती निर्माण होतात. - या जड असतात. (२७०७)

विद्या अविद्या तया स्फुरणीं । जडरूप असती दोनी ।
जीवेशास्तव दिसती झळपणीं । चेतनत्वा ऐशीं ॥ ८ ॥
ब्रह्माच्या मूळ स्फुरणामध्ये विद्या आणि अविद्या या दोन शक्ती असतात. - न्ही जडच असतात. त्यामध्ये प्रतिबिंबित होणाऱ्या ईश्वर आणि जीव यांच्यामुळे त्यांच्यामध्ये --- पदार्थाप्रमाणे झळझळीतपणा दिसून येतो. (२७०८)

परी ते स्फूर्ति परप्रकाशक । एवं चंचलाचा प्रकार एक ।
आतां तिसरें चेतन रूपक । जीवेश दोनी ॥ ९ ॥
पण ते मूलस्फुरण (स्फूर्ती) हेच मुळी परप्रकाशक आहे. असा हा एक चंचलाचा प्रकार होय. आता तिसरे चैतन्ययुक्त तत्त्व आहे, ते म्हणजे जीव आणि ईश्वर ही तत्त्वे होत. (२७०९)

हे जरी चेतनत्वे दिसती । परी यांसी रूपचि नसे निश्चितीं ।
वाउगी मुख्य बिंबा ऐशी आकृति । भासली प्रतिबिंबा ॥ १० ॥
ही दोन्हीही तत्त्वे जरी चेतन दिसली तरी त्या दोहोंना निश्चितपणे स्वतःचे असे रूपच नाही. मुख्य बिंबासारखी दिसणारी प्रतिबिंबाची खोटी, भ्रामक आकृती हे या प्रत्येकाचे स्वरूप आहे. (२७१०)

एवं चेतनही जया नांव । तेहि परप्रकाशक ईश जीव ।
मा येर तो चंचळ जड स्वभाव । तया सांगणे नको ॥ ११ ॥
अशा प्रकारे ज्यांना चेतन असे म्हटले जाते ते ईश्वर आणि जीव हे दोघेही परप्रकाशकच आहेत. आणि बाकीचे चंचल आणि जड स्वभावाचे प्राण, इ. पदार्थ आहेत, त्यांच्याबद्दल तर बोलायलाच नको. (२७११)

या रीतीं हे बत्तीस प्रकारें । प्रगटले असती हे सारे ।
ऐशियासी कोण ह्मणे खरें । भ्रमावांचोनी ॥ १२ ॥
अशा प्रकारे ही सर्व बत्तीस प्रकारची तत्त्वे निर्माण झाली. त्या सर्वांना भ्रमजनित असेच म्हणावे लागेल. त्यांना भ्रम न होता खरे असे कोण म्हणेल ? (२७१२)

जैसा प्रवाहीं वृक्षावरी बैसला । तो आपणातें असून विसरला ।
जळी पाहत असे जो पडिला । आपणचि जैसा ॥ १३ ॥
ज्याप्रमाणे प्रवाहाच्या काठावरील वृक्षावर जो बसला होता, तो स्वतः सुरक्षित असूनही स्वतःला विसरला आणि पाण्यात आपल्यासारखा असणारा जो पडलेला दिसला त्यालाच पाहू लागला. (२७१३)

परी पडिला तो खरा असेना । खरा नाहीं तो कदां दिसेना ।
नसे तो प्रियही होईना । ती प्रकारें वृक्षस्थ ॥ १४ ॥
पण जो पडला होता तो खरा नव्हता, जो खरा होता तो कधी दिसत नव्हता. जो नाहीच तो कधीही प्रिय वाटेना. म्हणजे एकच वृक्षस्थ तीन प्रकारचा झाला. (२७१४)

वृक्षस्थ बैसला जो आहे । तयामुळे पडिला दिसत आहे ।
म्यां न पडावें जें वाटताहे । हे वृक्षस्थामुळे ॥ १५ ॥
जो वृक्षावर बसलेला आहे, त्याच्यामुळेच पडलेला दिसत आहे, आणि आपण पडू नये असे जे वाटते तेदेखील वृक्षस्थामुळेच. (२७१५)

तस्मात् आहे दिसे आणि प्रियकर । तो येक वृक्षस्थचि साचार ।
येर जो पडिला तो भासमात्र । नसे न दिसे अप्रिय ॥ १६ ॥
त्यामुळे आहे तो, दिसतो तो आणि प्रिय वाटतो तो या तीन्ही भूमिकांमध्ये एक वृक्षस्थच खरा असतो. जो पडलेला आहे तो केवळ भासमात्र आहे आणि अप्रिय हा नाहीच आणि दिसतही नाही. (२७१६)

ऐसिया दृष्टान्तासम । येक वास्तविक आत्मा ब्रह्म ।
येर हा बत्तीस तत्वांचा भ्रम । दिसे परी जाहला नाहीं ॥ १७ ॥
या दृष्टान्ताप्रमाणे एक ब्रह्मात्मा तेवढा खरा आहे. बाकीची बत्तीस तत्त्वे म्हणजे भ्रम आहे. तो बत्तीस तत्त्वांचा संघ दिसतो पण मुळात तो निर्माणच झालेला नसतो. (२७१७)

तयाचे अस्तित्वे हे आहेती । तयाच्या भासे हे दिसती ।
तयाच्या प्रियास्तव प्रिय होती । उत्पत्तिकाळीही ॥ १८ ॥
त्याच्या (ब्रह्मात्म्याच्या) अस्तित्वामुळे ही बत्तीस तत्त्वे आहेत. त्याच्या प्रकाशामुळे ती भासमान होतात. तो प्रिय असल्यामुळे ती तत्त्वे प्रिय वाटतात. अगदी उत्पत्तिकाळीही ती प्रिय असतात. (२७१८)

वेगळे सत्यत्वचि यासी नसतां । आहे ऐसें ह्मणावें केउता ।
तस्मात् वास्तवीक यासी असत्यता । सप्रत्यय असे ॥ १९ ॥
त्यांना खरे म्हणजे सत्यत्व (आहेपणा) नसताना ती आहेत असे कसे म्हणावे ? म्हणून त्यांचे वास्तवातील असत्यपण अनुभवाने सिद्ध आहे. (२७१९)

नाहीं ते कदा दिसतीना । तरी केवीं वर्तती सचेतनपणा ।
ह्मणोनि जडरूपता संपूर्णा । असे अकृत्रिम ॥ २० ॥
जे नाहीतच ते केव्हाही दिसणारच नाहीत. मग ते चेतन होऊन कसे वावरतील ? म्हणून त्यांची जडरूपता स्वाभाविक आहे. (२७२०)

क्षणां आवडती क्षणां विटती । तरी प्रियत्व कोठे ययाप्रती ।
आणि सदा सुखदुःखें शिणती । ह्मणोनि दुःखरूप ॥ २१ ॥
ही बत्तीस तत्त्वे एकाक्षणी आवडतात तर दुसऱ्या क्षणी त्यांचा वीट येतो. तर मग त्यांना प्रियत्व कसे असेल ? आणि नेहमीच ती तत्त्वे सुखदुःखांनी शिणतात. म्हणून ती खरी दुःखरूपच आहेत. (२७२१)

एवं असज्जड दुःखात्मक । हे अनात्मजात सकळिक ।
जरी जीवेश हे चेतनरूपक । परी समान सर्व ॥ २२ ॥
त्यामुळे ही सर्व तत्त्वे असज्जड दुःखात्मक आहेत. म्हणूनच आत्म्यापासून भिन्न आहेत. जरी ईश्वर आणि जीव हे चेतन भासले तरी त्यांचीही स्थिती इतर तत्त्वांसारखीच आहे. (२७२२)

ब्रह्मात्मा एक सच्चिदानंद । पूर्णपणे येक अभेद ।
या सर्वांमाजीही विशद । अस्ति भाति प्रियरूपें ॥ २३ ॥
ब्रह्मात्मा हा एकमेव आणि सच्चिदानंदस्वरूप आहे. तो पूर्ण असून अभिन्न एकजिनसी आहे. तो या सर्व बत्तीस तत्त्वांच्यामध्ये अस्ति भाति आणि प्रिय या त्याच्या सहज लक्षणांमुळे स्पष्टपणे दिसून येतो. (२७२३)

सर्वत्री असे आहेपणा । सर्वत्री ब्रह्मात्मा देखणा ।
सर्वी प्रिय अकृत्रिमपण । असे स्वतःसिद्ध ॥ २४ ॥
या सर्वांमध्ये आहेपणा आहे, या सर्वांच्यामध्ये देखणेपण, ज्ञातेपण आहे आणि या सर्वांमध्ये अकृत्रिम स्वाभाविक प्रियत्व स्वतःसिद्ध आहेच. अशाप्रकारे ब्रह्मात्म्याची ही स्वाभाविक लक्षणे या सर्व तत्त्वांमध्ये ब्रह्मात्म्याच्या व्याप्तीमुळेच आढळतात. (२७२४)

याचा उत्पत्ति स्थिति संहार । परी तिहीं काळी आत्मा निर्विकार ।
अथवा सुषुप्ति स्वप्न जागर । या तिहींमाजी अखंड ॥ २५ ॥
या तत्त्वांना उत्पत्ती, स्थिती आणि संहार या अवस्था आहेत. पण आत्मा मात्र तिन्ही काळी निर्विकार असतो. अथवा जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये तो अखंड असतो. (२७२५)

पांचचि कोश सर्व तत्वांचे । पंचकोशात्मक देहत्रय साचें ।
देहत्रयीं नाम व्यापाराचें । जागर स्वप्न सुषुप्ति ॥ २६ ॥
सर्व तत्त्वांचे पाचच कोशांत वर्गीकरण होते; स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तीनही देहांचे देखील पाचच कोश असतात. या तीन देहांच्या जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनच अवस्थांमध्ये व्यापार होतात. (२७२६)

देहादि स्फूर्ति यया सर्वी । रूपी व्यापून चिन्मात्र गोसावी ।
इतुकियाची वर्तणूक व्हावी । या गुणदोषींही व्यापक ॥ २७ ॥
देह इ. चे स्फुरण या सर्वांमध्ये असते. या सर्व रूपांमध्ये व्यापलेले असूनही चिद्‌रूप त्यांच्यापासून वेगळे असते. (गोसावी अलिप्त) या सर्वांचे व्यवहार गुणदोषांनी व्यापलेले असतात. (परमात्मा त्यांपासून अलिप्त असतो.) (२७२७)

एवं धर्मधर्मीरूप गुण । सर्वत्री व्यापला सच्चिद्घन ।
परी त्या त्या विकारा न स्पर्श आपण । परिपूर्ण जैसा तैसा ॥ २८ ॥
अशा रीतीने धर्म-धर्मी, गुण-गुणी या सर्वांमध्ये सच्चिद्घन परमात्मा व्यापलेला असतो. परंतु त्यापैकी कुठल्याही विकाराला तो स्पर्श करत नाही. तो सर्वकाळी जसाच्या तसा परिपूर्णच असतो. (२७२८)

तिहीं अवस्थेत एकरूप । कधीच नव्हे अधिक अल्प ।
अवस्थाचि पालटती आपोआप । येक येतां दोनी जाती ॥ २९ ॥
तो तीनही अवस्थात एकरूपच असतो. तो कधी अधिक होत नाही की अल्पही होत नाही. त्या अवस्था आपोआप बदलत जातात एक अवस्था आली की दुसऱ्या दोन अवस्था नाहीशा होतात. (२७२९)

असो रूपी अथवा गुणदोषीं । ब्रह्मात्मा येक निर्विशेषीं ।
व्यापकत्व असोनि अशेषीं । धर्मधर्मी ऐसा नव्हे ॥ ३० ॥
ब्रह्मात्मा रूपांमध्ये असो की, गुणदोषांमध्ये असो, तो कायमचा एकमेव आणि सामान्यत्वाने असतो. तो कधीही विशेषत्वाने अनुभवाला येत नाही. तो सर्वांमध्ये व्यापक असूनही धर्म अथवा धर्मी यांच्याप्रमाणे व्यवच्छिन्न नसतो. (२७३०)

ऐसा असंग ब्रह्मात्मा पूर्ण । असोन कैसें जाहलें विस्मरण ।
व्यर्थ सर्व तादात्म्याचा अभिमान । घेऊनि बंधनीं पडे ॥ ३१ ॥
असा ब्रह्मात्मा असंग आणि परिपूर्ण असताना आणि तो सर्वत्र असताना त्याचे विस्मरण का होते ? तर जीव सर्व तत्त्वांविषयी तादात्म्याचा अभिमान धरून विनाकारण बंधनात सापडतो. (२७३१)

मी माझं आणि कर्ता भोक्ता । हे वाउगीच घेतली अहंता ।
पापपुण्य कल्पून योनी अनंता । भ्रमें जन्मे मरे ॥ ३२ ॥
मी-माझे, कर्ता-भोक्ता असा खोटाच अहंकार घेऊन, पापपुण्यांची कल्पना मनात ठेवून जीव भ्रमाने अनंत योनीमध्ये जन्म घेतो आणि मरतो. (२७३२)

जरी ऐसें अज्ञानेकडून । जीव भोगी जन्ममरण ।
परी ब्रह्मात्मा जो सच्चिद्घन । निर्विकारत्वें सदा ॥ ३३ ॥
जरी जीव अज्ञानामुळे जन्म मरण भोगत राहिला तरी सच्चिद्घन ब्रह्मात्मा सदैव निर्विकारीच असतो. (२७३३)

ऐसा वाउगाच नसोनि बंधनीं । पडिला जीव अभिमान घेऊनी ।
हा भ्रम जाईल जेव्हां निपटूनी । तेव्हांचि मोक्ष ॥ ३४ ॥
अशा प्रकारे अज्ञानामुळे जीव उगीचच अभिमान घेऊन बंधनात नसतानाही बंधनात सापडतो. त्याचा हा भ्रम जेव्हा समूळ नष्ट होईल तेव्हाच त्याला मोक्ष मिळू शकेल. (२७३४)

ऐसा बंधमोक्षाचा निश्चितार्थ । मज बाणविला कृपायुक्त ।
परी मी मंदप्रज्ञ असें जो सिद्धांत । निश्चय बाणेना ॥ ३५ ॥
तेव्हा रविदत्त पुढे म्हणतो, “असा हा बंध-मोक्ष या शब्दांचा निश्चित अर्थ माझ्या मनात गुरुवर्यांनी कृपायुक्त होऊन ठसविला. पण मी पडलो मंदप्रज्ञ. त्यामुळे या उपदेशाचा सिद्धान्तभूत अर्थनिश्चय माझ्या मनात ठसत नव्हता. (२७३५)

कारण की ब्रह्मात्मा जो असंग । सर्वांहून विलक्षण अंग ।
प्रतीतीस आला नाही अभंग । स्फूर्तिअभावीं कैसा ॥ ३६ ॥
याचे कारण असे की, सर्वांहन विलक्षण असा असंग ब्रह्मात्मा स्फूर्तीला सोडून स्वतंत्रपणे पूर्णत्वाने माझ्या अनुभवाला आला नाही. (२७३६)

माया विद्या अविद्यात्मक स्फूर्ति । मावळतां असे जो सच्चिन्मूर्ति ।
तो स्वानुभवें अपरोक्ष रीती । कैसा तो निश्चय नव्हे ॥ ३७ ॥
माया, विद्या आणि अविद्या यासह असलेली स्फूर्ती नाहिशी झाल्यानंतर सच्चिन्मूर्ती असा निखळ ब्रह्मात्मा केवळ स्वानुभवाने अपरोक्षत्वाने कसा आहे, याचा माझा निश्चय झाला नाही. (२७३७)

तो ब्रह्मात्मा तरी आपण । येर हीं अनात्मजात तत्त्वें संपूर्ण ।
येविशीं कांही नसे अनुमान । परी सर्वातीत कैसा न कळे ॥ ३८ ॥
तो ब्रह्मात्मा मीच आहे. बाकीची ही बत्तीस तत्त्वे आत्म्याहन भित्र आणि मिथ्या आहेत. याविषयी माझ्या मनात संशय (अनुमान) नाही, पण तो या बत्तीस तत्त्वांच्या पलीकडचा कसा आहे ते मला कळत नव्हते. (२७३८)

स्फूर्तीपासून ऐलीकडे । ज्या ज्या रीतीं स्वानुभवें आतुडे ।
तें निवेदं गुरुचरणांपुढे । यथामति कळलें तें ॥ ३९ ॥
स्फूर्तीपासून अलीकडे ज्या ज्या प्रकारे स्वानुभवाने तो प्राप्त होतो, ते माझ्या बुद्धीला जसे कळले तसे श्रीगुरुचरणांपुढे निवेदित करतो. (२७३९)

सर्वांमाजी जो आहेपणा । स्वतःसिद्ध असे पूर्णपणा ।
त्यावीण या सर्वांसी असेना । रूपचि कांही ॥ ४० ॥
सर्व पदार्थांमध्ये स्वतःसिद्ध आहेपणा पूर्णत्वाने असतो, त्यावाचून त्या सर्वांना काही रूपच असत नाही. (२७४०)

सर्प नाहीं अंतर्बाह्य दोरी । तैसा सर्वी ब्रह्मात्मा निर्विकारी ।
सर्व नाहींतचि व्यर्थ भासली सारी । भ्रमेंकडोनी ॥ ४१ ॥
सर्प अस्तित्वात नसून ती अंतर्बाह्य दोरीच असते, त्याप्रमाणे या सर्व पदार्थांच्या जागी निर्विकार असा ब्रह्मात्माच केवळ असतो. ते सर्व पदार्थ उगीच भासत असले तरी ते मुळातच नसतात. ते सर्व भ्रमाने भासत असतात. (२७४१)

आहे तें अंतर्बाह्य सघन । सद्‌रूप ब्रह्मचि परिपूर्ण ।
तिहीं अवस्थेतही येकपण । भेदावेना ॥ ४२ ॥
जे आहे ते अंतर्बाह्य अखंडपणे व्यापून आहे. ते सद्‌रूप परिपूर्ण असे ब्रह्मच आहे. त्याचे एकपण तीन्ही अवस्थांमध्ये अभिन्न असते. (२७४२)

ऐशी सद्‌रूपाची प्रतीति । गुरुकृपें बाणली निश्चितीं ।
चिद्‌रूप अनुभविलें तें यथामती । निवेदूं चरणीं ॥ ४३ ॥
श्रीगुरुकृपेने ब्रह्माच्या आहेपणाची मला अशी प्रतीती आली आहे. आता त्याच्या चिद्‌रूपाचा मी कसा अनुभव घेतला, ते माझ्या बुद्धीप्रमाणे श्रीगुरुचरणांपाशी निवेदित करतो. (२७४३)

जागृतीचे पंच व्यापार । शब्दस्पर्शादि विकार ।
ते शब्दस्पर्श सांडून दूर । ज्ञान येक निवडिलें ॥ ४४ ॥
जागृती अवस्थेमध्ये पाच प्रकारचे व्यापार होतात. शब्द स्पर्शादी विकार होतात. त्या अनुभवातील शब्द, स्पर्श इ. यांचा त्याग करून त्यातील केवळ ज्ञान बाजूस काढले. (२७४४)

तेंचि ज्ञान स्वप्नकाळीं । अविछिन्न भास विषयमेळीं ।
तया ज्ञानासी विकार समूळीं । सहसा असेना ॥ ४५ ॥
तेच ज्ञान स्वप्नाच्या अवस्थेच अविच्छिन्न भास आणि विषयांच्या संपर्कान प्राप्त होते. त्या ज्ञानामध्ये ज्ञानेंद्रिये आणि विषय यांचा प्रत्यक्ष संपर्क होत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष संपर्काने होणारे विकार सहसा होत नाहीत. (२७४५)

तेंचि सुषुप्तिकाळी नेणिवेत । नेणपणासी अवलोकित ।
हा प्रत्यय उत्थानकाळी येत । सामान्यत्वाचा ॥ ४६ ॥
तेच ज्ञान सुषुप्तिकाळात जी नेणीव असते त्या नेणिवेत जे अजाणतेपण असते त्याचे अवलोकन करते. हाच अनुभव जागृतीमध्ये आणि उत्थानकाळी (समाधी सोडून भानावर येत असतानाचा काळ) सामान्यत्वाच्या ज्ञानाच्या रूपाने येत असतो. (२७४६)

गुण विकाररहित उगेपणीं । ज्ञान प्रत्यया येतें स्फुरणीं ।
परी स्फुरण जातां मावळूनी । शून्यदशा होय ॥ ४७ ॥
गुणविकारांचा अभाव असताना उगेपणाच्या अनुभवात स्फुरणाच्या रूपाने त्या ज्ञानाचा प्रत्यय येतो. पण ते स्फुरण मावळता क्षणी शून्य स्थिती प्राप्त होते. (२७४७)

दृश्यामाजीं दृश्याचा देखता । तो दृष्टा अनुभविला दृश्यापरता ।
भासामाजील भासाचा जाणता । भासातीत साक्षी ॥ ४८ ॥
दृश्य पाहात असताना ते दृश्य पाहाणारा जो द्रष्टा आहे तो दृष्यापासून वेगळा काढून अनुभवणे अथवा भासामधील भासातीत असा केवळ भासाचा जाणता म्हणजे भासाचा साक्षी ओळखणे म्हणजे ब्रह्मात्म्याच्या चिद्रपाचा अनुभव घेणे होय. (२७४८)

एवं चिद्‌रूपस्फुरण उद्भवतां कळे । परी स्फुरण जेधवां मावळे ।
ते वेळी लयसाक्षी न कळे । तळमळ यास्तव ॥ ४९ ॥
अशा प्रकारे चिद्रप स्फूरण उद्भवल्यावर कळते. पण ते स्फुरण जेव्हा मावळते त्यावेळी लयाचाच साक्षी कळत नाही. त्यामुळे मला तळमळ वाटते. मी अस्वस्थ होतो. (२७४९)

आणीकही येक संशय थोर । स्फूर्तिकाळी जें ज्ञान साचार ।
तें ज्ञान आणि जीवविकार । कालवलें वाटे ॥ ५० ॥
आणखी एक मोठा संशय माझ्या मनात आहे. स्फूर्तीच्या काळी जे ज्ञान होते, ते ज्ञान आणि जीवविकार ही दोन्ही कालवल्यासारखी वाटतात. (२७५०)

येर हे बुद्ध्यादिक वृत्ति । इंद्रियद्वारा विषय घेती ।
अथवा निर्विकल्प जे स्फर्ति । परप्रकाशितत्वें ॥ ५१ ॥
इतर बुद्ध्यादिक वृत्ती इंद्रियद्वारा विषयांचे ग्रहण करतात. अथवा केवळ जी निर्विकल्प स्फूर्ती असते, ती परप्रकाशित असते. (२७५१)

ऐशिया वृत्तीविरहित । जें कां चिद्रप असे व्याप्त ।
तें अनुभवा ये टळटळित ॥ साक्षीरूप जाणतां ॥ ५२ ॥
साक्षीच्या ज्ञानाने वृत्तिविरहित आणि सर्वव्यापक असे चिद्‌रूप स्पष्टपणे अनुभवता येते. (२७५२)

परी जीवाचेंही जाणतेपण । प्रतिबिंबित मिथ्या असून ।
शुद्ध ज्ञानामाजीं असे मिळून । तें निवडितां न ये ॥ ५३ ॥
परंतु जीवाचेही जाणतेपण मिथ्या असूनही प्रतिबिंबित होत असते. ते शुद्ध ज्ञानामध्ये मिसळून जाते. तेव्हा शुद्ध ज्ञान आणि मिथ्या ज्ञान कालवली जातात. ती वेगळी काढता येत नाहीत. (२७५३)

एवं चिद्‌रूपाचे कळणें ऐसें । अनुभविलें तें निवेदिलेंसे ।
आतां आनंदरूपही कळलें जैसें । तैसें निवेदूं ॥ ५४ ॥
अशा प्रकारे चिद्‌रूपाच्या ज्ञानाचा प्रकार जसा अनुभवाला आला तसा निवेदित केला. आता आनंदरूपाचे सुद्धा जसे आकलन झाले, त्याप्रमाणे निवेदन करतो. (२७५४)

देह प्राण इंद्रिय मन । अथवा प्रिय द्वेष्यादि सर्व जन ।
आत्मा आवडता यां सर्वांन । प्रतीति असे ॥ ५५ ॥
देह, प्राण, इंद्रिये, मन अथवा प्रिय, द्वेषार्ह इ. प्रकारचे सर्व लोक या सर्वांपेक्षा आपल्याला आत्माच अधिक प्रिय असतो. असाच अनुभव आहे. (तुळा : बृहदा ० १.४.८) (२७५५)

येरांची आवडी क्षण क्षण । उठे विटत असे ह्मणून ।
हे प्रियचि न होती संपूर्ण । खरा आवडता आत्मा ॥ ५६ ॥
इतर प्रकारांची आवड क्षणाक्षणाला निर्माण होत असते. आणि त्याचप्रमाणे विटतही असते. त्यावरून हे सर्व प्रकार खऱ्या अर्थाने प्रिय नव्हेतच. खरा आवडता अथवा प्रिय म्हणजे आत्माच होय. (२७५६)

सुषुप्तीमाजीं तों सर्वांचा लय । होतां सुखदुःखाचा क्षय ।
येक सुखरूपचि अद्वय । असे निजात्मा ॥ ५७ ॥
सुषुप्तीमध्ये तर या सर्वांचा लयच होत असतो. असा लय झाल्यामुळे सर्व सुखदुःखांचा नाशच होत असतो. फक्त निजात्मा (अंतरात्मा) तेवढा अद्वय आणि सुखरूप स्थितीत असतो. (२७५७)

उगेपणीही सामान्य वृत्तीसी । सुखाकारता वाटे कांहींशी ।
परी सर्वां विलक्षण सुखैकराशी । अनुभवा न ये ॥ ५८ ॥
उगेपणातही सामान्य वृत्तीला काहीशी सुखाकारता असते. (म्हणजेच सुषुप्तीतील सुखासारखा अनुभव येतो.) परंतु या सर्वांहन विलक्षण, एकमेव सुखाची रास असा ब्रह्मात्मा मात्र अनुभवाला येत नाही. (२७५८)

एवं सच्चिदानंद आत्मा पूर्ण । यथामति होय जो वेदन ।
तो श्रीगुरुचरणीं केला निवेदन । आणीक विनंती येक ॥ ५९ ॥
अशा प्रकारे सच्चिदानंद, पूर्ण असा आत्मा माझ्या बुद्धीला जसा कळला, तो मी गुरुचरणापाशी निवेदित केला आहे. माझी आपल्याकडे आणखी एक विनंती आहे. (२७५९)

हे सर्व असज्जड दुःखात्मक । बत्तीस तत्त्वे सर्व माईक ।
उत्पन्नचि नसतां कांहीं येक । मावळती तरी काय ॥ ६० ॥
हे सर्व असत्, जड आणि दुःखात्मक आहे. ही बत्तीस तत्त्वेही मायिकच (खोटी) आहेत. ही जर उत्पन्नच झाली नाहीत तर ती मावळतात (नष्ट होतात) म्हणजे काय ? प्रत्यक्षात कोण मावळते ? (२७६०)

रज्जूवरी सर्प नसतां । दवडावा वधावा केउता ।
तैसा लयचि व्हावा समस्तां । इच्छी कवण ॥ ६१ ॥
दोरीच्या ठिकाणी साप नसताना त्याला घालवून देणे किंवा त्याचा वध करणे कसे शक्य आहे ? त्याप्रमाणे या सर्व तत्त्वांचा लयच व्हावा अशी इच्छा कोण करतो ? (२७६१)

जेवीं असती तेवीं पूर्व रीती । असेनात कां सहजगती ।
अथवा स्वस्वव्यापारी प्रवर्तती । तरीही संशय असेना ॥ ६२ ॥
पूर्वरीतीप्रमाणे ती जशी असतील तशी सहजरीतीने असेनात का ? किंवा ती तत्त्वे स्वतःच्या (आपआपल्या) व्यापारास प्रवृत्त झाली तरीही संशय असण्याचे कारण नाही. (२७६२)

परी आपुलें असंगत्व पूर्ण । क्षणाक्षणां त्याचे विस्मरण ।
या मिथ्यासीच होतसे मीपण । आपण तें नसतांही ॥ ६३ ॥
परंतु आपण निःसंग, परिपूर्ण ब्रह्मात्मा आहोत याचे विस्मरण क्षणाक्षणाला होत असते. या मिथ्या तत्त्वांनाच आपण जे नाही आहोत त्याबद्दल मीपणाचे स्फुरण होत असते. (२७६३)

जेधवां मीपण देहादिकांचें । तेधवां विस्मरण असंगाचें ।
जेधवां विस्मरण आत्मयाचें । तेव्हा मी ह्मणे देहा ॥ ६४ ॥
ज्यावेळी देहादिकासाठी मीपणाचे स्फुरण असते, त्या काळात आपण असंग ब्रह्मात्मा आहोत याचे विस्मरण होत असते. जेव्हा आत्म्याचे विस्मरण होते, तेव्हा देहाला जीव मी असे म्हणत असतो. (२७६४)

एवं मीपणा जो देहादिकांचा । तेव्हांचि घात पूर्णत्वाचा ।
हा विक्षेप निपटून जाईल साचा । ऐसें केले पाहिजे ॥ ६५ ॥
अशा प्रकारे देहादिकांबद्दल मीपणा वाटणे हाच त्या ब्रह्मात्म्याच्या पूर्णत्वाचा घात होय. हाच विक्षेप (सत्याच्या जागी मिथ्याची कल्पना) होय. तो संपूर्णपणे नष्ट होईल, असे केले पाहिजे. (२७६५)

ऐशी प्रार्थना करूनि रविदत्त । साष्टांग नमून प्रदक्षणा करित ।
हे जाणोनि आचार्ये त्वरित । उचलोनि आलिंगिला ॥ ६६ ॥
अशी प्रार्थना करून रविदत्ताने सद्गुरूंना (शंकराचार्यांना) प्रदक्षिणा करून साष्टांग नमस्कार घातला. आचार्यांनी त्याचा भाव जाणून त्याला उठवून त्याला आलिंगन दिले. (२७६६)

बापा तुझा सर्व आशय । कळला कोण कोणता तो संशय ।
आणि बाणला जो जो प्रत्यय । तोही विहित झाला ॥ ६७ ॥
ते म्हणाले, "बाबा रे, तुझ्या म्हणण्याचा आशय आम्हाला कळला. तुला कोणकोणते संशय आहेत आणि तुला कोणकोणते अनुभव प्रत्यक्ष आले, तेही आम्हांस कळले. (२७६७)

जे जे तुज संशय असती । ते ते अनुक्रमें फेडूं भ्रांति ।
आणि तुजला तुझी स्वात्मप्रतीति । यथार्थ बाणवू ॥ ६८ ॥
तुला जे जे संशय आहेत ते ते आता अनुक्रमाने फेडतो आणि तुझा भ्रम नाहीसा करतो. त्यामुळे तुला तुझी आत्मप्रतीती खऱ्या अथनि बाणेल. (२७६८)

आतां निरूपणीं चित्त द्यावें । आणि सांगू तैसें अभ्यासावें ।
तरी तुझें तुजसी बाणवावें । निःसंशय समाधान ॥ ६९ ॥
आता निरूपणाकडे लक्ष दे. आणि आम्ही सांगतो ते अभ्यास कर. त्यामुळे तुझ्या अंगी संशयरहित असे निखळ समाधान बाणेल. (२७६९)

प्रथम तुजला आत्मा जीव । येकचि वाटला उभय स्वभाव ।
स्फूर्ति जीवाची आणि स्वयमेव । चिद्‌रूपता येकवटली ॥ ७० ॥
प्रथम तुला आत्मा आणि जीव एकच वाटले. त्या दोघांचे स्वभावधर्म एकच वाटले, जीवत्वाची स्फूर्ती आणि प्रत्यक्ष चिद्‌रूपता एकच वाटली. (२७७०)

ते आधीं देऊं निवडून । सत्यमिथ्या हे भिन्न भिन्न ।
पुढे आणीकही तुझे प्रश्न । साकल्ये निरोपूं ॥ ७१ ॥
या भ्रमाचा आधी निवाडा करू. सत्य आणि मिथ्या हे भिन्न भिन्न वाटतात आणि यासारखे अनेक प्रश्न तुला जाणवतात. त्या सर्वांचे निरसन करू. (२७७१)

आतां सावधान सावधान । बहु तत्पर ऐकें निरूपण ।
ऐसें ऐकतां रविदत्त आपण ॥ बद्धांजलि बैसला ॥ ७२ ॥
आता सावधान होऊन अतिशय तत्परतेने निरूपणाकडे लक्ष दे.' हे ऐकताच रविदत्त हात जोडून आचार्यांपुढे बसला. (२७७२)

येथे रविदत्ताचिये पांतीं । सावध असावें श्रवणार्थी श्रोतीं ।
आचार्य वोळले कृपामूर्ति । भाग्यार्थ मुमुक्षूच्या ॥ ७३ ॥
येथे रविदत्ताच्या पंक्तीत बसणाऱ्या श्रवणाची इच्छा असलेल्या श्रोत्यांनीही सावध असावे. मुमुक्षूच्या भाग्यासाठी (त्याचा भाग्योदय व्हावा म्हणून) प्रत्यक्ष शंकराचार्य प्रसन्न झाले आहेत. (२७७३)


श्लोकः मुक्तासु सूत्रवद्विद्धि विकल्पेषु चितिस्तथा ॥ ९ ॥ (उत्तरार्ध)
श्लोकार्थ : शुद्ध चैतन्य हे मोत्यांच्या माळेत अनुस्यूत असणाऱ्या दोऱ्याप्रमाणे बुद्धीच्या विकल्पामागे अनुस्यूत असते. ॥९॥ (उत्तरार्ध)

GO TOP