॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीहरिविजय ॥

॥ अध्याय दहावा ॥

गोपालकृष्ण - ब्रह्मदेवाचे गर्वहरण -


श्रीगणेशाय नमः ॥
जय जय सिंहाद्रिवासा । त्रिगुणातीता परमपुरुषा ।
अत्रिनंदना परमहंसा । लीलावेषा दिगंबरा ॥१॥
जय जय सर्गस्थित्यंतकारणा । दत्तात्रेया मुनिमानसरंजना ।
अमलदलराजीवनयना । जगद्‌भूषणा जगद्‌गुरो ॥२॥
कैवल्यज्ञानदायका अवधूता। अवयवरहिता मायातीता ।
भक्तजनपालका अव्यक्ता । अपरिमिता निरंजना ॥३॥
सकळ योगियांत शिरोमणी । सच्चिदानंद मोक्षदानी ।
तो दिगंबर कटीं कर ठेवुनी । पंढरीये उभा असे ॥४॥
जें वेदांचें निजसार । जें सकळ शास्त्रांचें जिव्हार ।
तो हा भीमातीरीं दिगंबर । अति उदार सर्वात्मा ॥५॥
स्तंभें न उचले गगन । न करवे अवनीचें वजन ।
समुद्राचें किती जीवन । नव्हे प्रमाण सर्वथा ॥६॥
तैसे तुझे अपार गुण । शिव विरिंचि नेणती महिमान ।
तेथें मी एक एकजिव्हेंकरून । काय गुण वर्णूं तुझे ॥७॥
हरिविजयग्रंथसार । अवधूतांचें निजमंदिर ।
तेथें दूषणश्वान अपवित्र । प्रवेशेल कोठोनियां ॥८॥
असो नवमाध्यायीं कथन । गोपी नावेंत बैसोन ।
नौका बुडतां जगज्जीवन । रक्षी पूर्ण गोपींतें ॥९॥
जो पांचां साहांवेगळा जाणा । न ये पंचास्याच्या ध्याना ।
तो वैकुंठपीठींचा राणा । पांचां वर्षांचा जाहला ॥१०॥
गोपी म्हणती यशोदे सती । वत्सें चाराया धाडी श्रीपती ।
सवें देऊनि धाकुटे सांगाती । वनाप्रती धाडीं कां ॥११॥
गांवांत असतां मुरारी । घरोघरीं करितो चोरी ।
सवें देऊनि सिद्ध शिदोरी । पाठवावा वनातें ॥१२॥
असो प्रातःकाळीं उठोनियां । माता म्हणे ऊठ प्राणसखया ।
जाई वत्सें चारावया । काननाप्रतीं गोविंदा ॥१३॥
सवें घेऊनि धाकुट्या गोवळां । सकळ वत्सें करूनि गोळा ।
राजबिदीवरूनि सांवळा । वना चालिला जगदात्मा ॥१४॥
वाद्यें वाजताती गंभीर । मोहर्‍या पांवे सुस्वर ।
टाळ-मृंगांचे झणत्कार । करिती गजर स्वानंदें ॥१५॥
तेथें मृगांकमरीच्याकारें । ढाळिताती दोहींकडे चामरें ।
हरीवरी पल्लवछत्रें । चिमणे गोपाळ धरिताती ॥१६॥
चिमणा श्रीकृष्ण सांवळा । चिमणा पीतांबर कांसे कसिला ।
चिमणी बरी कटीं मेखळा । विद्युत्प्राय झळकतसे ॥१७॥
चिमण्या वांकी नेपुरें रुणझुणती । मजा पाहात वेदश्रुती ।
न वर्णवे निर्गुणाची कीर्ती । म्हणोनि सगुणीं जडल्या त्या ॥१८॥
चिमणीच हातीं मुरली । तेथें चित्तवृत्ति समूळ मुराली ।
मिथ्या माया सकळ हरली । चिमणी सांवळी मूर्ति पाहतां ॥१९॥
चिमणीच घोंगडी शोभली । दशियांप्रती मोत्यें ओंविलीं ।
चिमणाच वेत करकमळीं । कमलनयनें धरिलासे ॥२०॥
चिमणे गळां मोत्यांचे हार । चिमण्या क्षुद्रघंटांचा गजर ।
गळां वनमाळांचे भार । शोभे किशोर नंदाचा ॥२१॥
मूर्ति सांवळी गोमटी । अंगीं शोभे केशराची उटी ।
टिळक रेखिला ललाटीं । रत्‍नें मुकुटीं झळकती ॥२२॥
कर्णीं कुंडलें मकराकार । नेत्र आकर्ण अतिसुकुमार ।
मंदास्मितवदन सुंदर । रमावर शोभतसे ॥२३॥
भोंवते सखे गाती निर्भर । मृदंग वाजती सुस्वर ।
मध्यें पांवा वाजवी श्रीधर । महिमा अपार न वर्णवे ॥२४॥
गोपिका आणि यशोदा सती । हरीस बोळवीत जाताती ।
माता म्हणे श्रीपती । झडकरीं येईं माघारा ॥२५॥
गोपांसमवेत जगन्निवास । आला तमारिसुतेचे तीरास ।
नाना खेळ लीलाविलास । पुराणपुरुष दावीतसे ॥२६॥
यावरी काननीं जगदुद्धार । दिवस आला दोन प्रहर ।
शिदोर्‍या मेळवूनि समग्र । काला थोर मांडिला ॥२७॥
***********
कमलपत्राकार गोपाल । मध्यें मिलिंद तमालनीळ ।
कीं निधानाभोंवते साधक सकळ । साधावया बैसती ॥२८॥
कीं फणिवरीं वेष्टिला चंदन । कीं विबुधीं वेष्टिला सहस्रनयन ।
कीं वराभोंवते संपूर्ण । वर्‍हाडी जैसे बैसले ॥२९॥
कीं अनर्घ्य रत्‍नाजवळी । मिळाली परीक्षकमंडळी ।
कीं कनकाद्रीभोंवते सकळी । कुलाचल बैसले ॥३०॥
कीं मानससरोवर निर्मळ । त्याभोंवते बैसती मराळ ।
कीं वेष्टूनियां जाश्वनीळ । तपस्वी बैसती प्रीतीनें ॥३१॥
कीं श्रीकृष्ण सूर्यनारायण । गोप ते किरण प्रकाशघन ।
कीं हरिचंद्रासी वेढून । उडुगण गोप बैसले ॥३२॥
आपुल्या शिदोर्‍या संपूर्ण । हरीपुढें ठेविती आणून ।
एकीं मांडेच आणिले जाण । अंतर्बाह्य गोड जे ॥३३॥
एकीं आणिली गुळवरी । एकाचा दहींभात भाकरी ।
एकाची ते शिळीच शिदोरी । सोडोनियां बैसले ॥३४॥
कोंड्याची भाकरी एक सोडीत । एकाचा ताकभात झिरपत ।
एकाची शिदोरी विटली समस्त । चवी न लागे जेवितां ॥३५॥
सकळांसी म्हणे हरि तेव्हां । आपुलें वाढिलें उगेंचि जेवा ।
दुसर्‍याचा नका करूं हेवा । मनोभावापासुनी ॥३६॥
आपुलें पूर्वकर्म नीट नाहीं । दुसर्‍याचा हेवा करूनि कायी ।
जें पेरिलें तें लवलाहीं । बाहेर उगवोनि ठसावे ॥३७॥
असो काला करितां मुरारी । त्यांतून पेंधा उठे झडकरी ।
आणिक वृक्षच्छायेसी निर्धारीं । जाऊनियां बैसला ॥३८॥
वेगळेंचि थोंब तयानें केलें । गोप आपणाकडे फोडिले ।
एक एक अवघेच गेले । टाकून एकले हरीसी ॥३९॥
गोपाळ म्हणती हृषीकेशी । काय सुख तुझे संगतीसी ।
नसतें जीवित्व आम्हांस देसी । फेरे चौर्‍यायशीं भोगावया ॥४०॥
तूं आधीं एकला निर्गुण । तुज पुसत होतें तरी कोण ।
मग आम्हीं तुज सगुण । करूनि आणिलें आकारा ॥४१॥
आम्हीं तुज नांवरूपा आणिलें । महत्त्व चहूंकडे वाखाणिलें ।
तुज थोरपण आम्हीं दिधलें । तुंवा वेगळें केलें आम्हां ॥४२॥
तूं परब्रह्म मायेपरता । आणि जीवदशा आमुचे माथां ।
तूं अक्षय अचल अनंता । नाना पंथां पिटिसी आम्हां ॥४३॥
तूं जाहलासी निर्विकार । आम्हांसी लाविले नाना विकार ।
तूं ब्रह्मानंद परात्पर । निरय घोर आम्हांसी कां ॥४४॥
तूं देवाधिदेव आत्माराम । तूं चराचरबीजफलद्रुम ।
आमुच्या पाठीं क्रोध काम । दुर्जन परम लाविले ॥४५॥
तूं अज अजित अचल । आम्हां केलें सदा चंचल ।
तूं ज्ञानरूप अतिनिर्मळ । अज्ञान सबळ आम्हांसी कां ॥४६॥
तूं महाराज नित्यमुक्त । आम्हां केलें विषयासक्त ।
तूं मायेहूनि अतीत । अविद्यावेष्टितत्व आम्हांसी कां ॥४७॥
महामुनी सोंवळे मुरारी । ते तुज चिंतिती अंतरीं ।
आम्हांसी न शिवती क्षणभरी । ऐसी परी तुवां केली ॥४८॥
तूं मदनमनोहर पुतळा । आम्ही वांकडे विरूप अवकळा ।
तुझे बोल गोड लागती सकळां । आमुच्या बोला हांसती ॥४९॥
ऐसें बोलोनि गोवळे । अवघे पेंध्याकडे गेले ।
मग तेणें घननीळें । काय केलें ऐका तें ॥५०॥
आपण येऊनि गोपांजवळी । उभा ठाकला वनमाळी ।
तंव ते मिळोनि सकळी । बळें दवडिती हरीतें ॥५१॥
म्हणती तूं नलगेसी आम्हांतें । म्हणोनि माघारें लोटिती हातें ।
हरि काकुळती ये तयांतें । मी तुम्हांतें न विसंबें ॥५२॥
तुम्ही बोलाल जें वचन । त्यासारिखा मी वर्तेन ।
सांगाल तेंचि मी करीन । तुम्हांविण न गमे मज ॥५३॥
मत्स्य-कूर्मादि अवतार । तुम्हांलागीं घेतले साचार ।
सूकर-नरसिंहरूपें सुंदर । तुम्हांलागीं धरिलीं म्यां ॥५४॥
पाळावया तुम्हांलागुनी । म्यां निःक्षत्री केली अवनी ।
पौलस्त्यकुळ निर्दाळुनी । रक्षिलें म्यां तुम्हांतें ॥५५॥
ऐसा मी निजभक्त साहाय्यकारी । मज कां दडवितां ये अवसरीं ।
ऐसें बोलतां हरीचे नेत्रीं । अश्रु वाहती भडभडां ॥५६॥
ऐसें तें क्षणीं देखोनी । पेंधा धांवोनि लागे चरणीं ।
आपुल्या नेत्रोदकेंकरूनी । हरिपदीं केला अभिषेक ॥५७॥
गडी स्फुंदत बोलती तेव्हां । वैकुंठपाळा गा माधवां ।
आम्हीं तुज दडवूनि केशवा । ठकलों होतों सर्वस्वें ॥५८॥
असो हरीस मध्यें बैसवूनी । काला मांडिला ते क्षणीं ।
आपुल्या हातें चक्रपाणी । कवळ देत निजभक्तां ॥५९॥
गडी म्हणती जगन्मोहना । आधीं ग्रास घे तूं जनार्दना ।
हरि म्हणे तुम्हांविना । ग्रास न घें मी सर्वथा ॥६०॥
मग म्हणती गोपाळ । तुजविण ग्रास न घेऊं सकळ ।
रुसोनि चालिला घननीळ । जो वेल्हाळ वैकुंठींचा ॥६१॥
गोपाळ धांवोनि लागती पायां । बैसे बैसे रे भक्तसखया ।
तुझेंच ऐकूं म्हणोनियां । कान्हयालागीं बैसविलें ॥६२॥
आधीं भक्तीं घेतला ग्रास । तैं शेष सेवी जगन्निवास ।
जो परात्पर पुराणपुरुष । लीला अगाध दावीतसे ॥६३॥
ऐसा नित्यकाळ यमुनातीरीं । काला करीत पूतनारी ।
आपुल्या हातें शिदोरी । वांटी हरि सकळांतें ॥६४॥
गडी म्हणती ते समयीं । आमुचा ग्रास तूं घेईं ।
तुझा ग्रास लवलाहीं । आम्हीं घेऊं गोविंदा ॥६५॥
मीपण आणि तूंपण । या दोहींचा ग्रास करून ।
मग रुचि कैंची संपूर्ण । अनुभवेंकरून पहावें ॥६६॥
गोपाल करिती करपात्रें । त्यांत कवळ ठेविले राजीवनेत्रें ।
आलें लोणचीं चित्रविचित्रें । अंगुलिकासंधीं धरिताती ॥६७॥
मजा पहात ते परमहंस । भोंवतें बैसले सदा उदास ।
जैसें मानस वेष्टितीं राजहंस । मुक्त सेवूं बैसले ॥६८॥
मध्यें बैसला भुवनसुंदर । भोंवते गोपाळ दिगंबर ।
मानापमान समग्र । दोन्ही नेणती सर्वथा ॥६९॥
जैसी श्वानाची विष्ठा । तैसी त्यांत वाटे प्रतिष्ठा ।
तरीच पावले वरिष्ठा । श्रीवैकुंठा हरीतें ॥७०॥
असो हरिमुखीं कवळ । सकळ घालिती गोपाळ ।
उरलें तें शेष गोवळ । स्वयें घेती प्रीतीनें ॥७१॥
तों सकल निर्जर ते वेळीं । विमानीं पाहती अंतराळीं ।
तो ब्रह्मानंद वनमाळी । काला कैसा करीतसे ॥७२॥
ब्रह्मा म्हणे ब्रह्मपद जाळावें । गोकुळीं निरंतर वसावें ।
इंद्र म्हणे रमाधवें । कां येथें गोविलें आम्हांसी ॥७३॥
बोलती शसी सूर्य दोघेजण । आम्हां कृष्णें लाविलें भ्रमण ।
आपण गोकुळीं अवतरोन । भक्तजन मुक्त केले ॥७४॥
तेथींचा प्रसादकवळ । जरी आम्हांसी प्राप्त केवळ ।
तरी मुक्त होऊं तत्काळ । मायाचक्रापासूनि ॥७५॥
मग देव म्हणती एक करावें । मत्स्य होऊनि अवघीं जावें ।
मित्रकन्याहृदयीं रहावें । प्रेमें तळपावें सादर ॥७६॥
गडियांसमवेत श्रीधर । हस्तप्रक्षालना येईल जगदुद्धार ।
तें शेष सेवूनि उद्धार । सर्वहीं करूं आपुला ॥७७॥
सुरवर ऐसें बोलोन । कालिंदीजीवनीं जाहले मीन ।
तें एक जाणे जगज्जीवन । अंतरखूण तयांची ॥७८॥
तों गडी म्हणती जगज्जीवना । चला जाऊं यमुनाजीवना ।
मग तो वैकुंठपीठींचा राणा । काय बोले तयांतें ॥७९॥
म्हणे तृषा लागली जरी । तरी तक्र प्यावें निर्धारीं ।
अथवा दुग्धचि प्यावें वरी । परी नव जावें यमुनेतें ॥८०॥
हरि म्हणे गडियांतें । हात पुसावे घोंगडियांतें ।
ऐसें म्हणतां कान्हया तें । तेंचि सर्वांते मानले ॥८१॥
गडी म्हणती जगज्जीवना । कां आवर्जिली बा यमुना ।
कोण्या विचारें मधुसूदना । कोप धरिला तिजवरी ॥८२॥
मग म्हणे हृषीकेशी । बा रे तेथें आली आहे विवशी ।
ते धरूनि नेईल सकळांसी । मी जावया भितों तेथें ॥८३॥
तंव पेंधा बोले वचन। तरी मी यमुनेसी जाईन ।
जीवन अगत्य सेवीन । आपुल्या करें करोनियां ॥८४॥
हरि म्हणे रे पेंधिया । नसताचि घेऊं नको थाया ।
तंव तो म्हणे प्राणसखया । मी सर्वथा न राहें ॥८५॥
हरि म्हणे पेंधियासी । तुज ग्रासील रे विवशी ।
तरी गेळ्यानें कडेसी । पाणी काढूनि सेविंजे ॥८६॥
मग पेंधा ते अवसरीं । वेगें आला यमुनातीरीं ।
न्याहाळूनि पाहे यमुनानीरीं । विवशी कोठें म्हणोनियां ॥८७॥
तों यमुनाजीवनाचा खळाळ । कानीं पेंधा ऐके तुंबळ ।
गेळ्या खालता ठेविला तत्काळ । जाळें माजीं आंवळिलें ॥८८॥
पेंधा म्हणे यमुनेसी । तूं बायको होऊनि आम्हांसीं ।
हमामा आजि घालिसी । कैसी तगसी पाहीन आतां ॥८९॥
जरी मी कृष्णदास असेन सत्य । तरीच तुज करीन शांत ।
म्हणोनि हमामा त्वरित । मांडियेला यमुनेसीं ॥९०॥
मग खळाळासीं पेंधा । हमामा घालितां न राहे कदा ।
तें कदंबातळीं गोविंदा । आनंदकंदा समजलें ॥९१॥
कृष्ण म्हणे गडियांसी । पेंधा गेला यमुनेसी ।
तेथें आधींच होती विवशी । गति कैसी जाहली ॥९२॥
समाचारासी गडी धाडिले । तेही पेंधियासीं साह्य जाहले ।
म्हणती आम्हांसी इणें लाविलें । कृष्णभक्तांसी खळखळ ॥९३॥
आणिक समाचारासी गडी धाडिले । तेही तेथेंचि गुंतले ।
आणिक मागून पाठविले । तेही जाहले साह्य पैं ॥९४॥
आले अवघे नव लक्ष गडी । बळकाविली यमुनाथडी ।
हमामा घालिती कडोकडीं । मेटाखुंटीं येऊनियां ॥९५॥
पेंधियासी पाठिराखे । मिळाले नव लक्ष सखे ।
घाई हमाम्याची देखें । एकसरें मांडिली ॥९६॥
जैसी मांडे रणधुमाळी । तैसी हमाम्याची घाई गाजली ।
सर्वांच्या मुखांस खरसी आली । परी न सांडिती आवांका ॥९७॥
प्राण जाहले कासाविस । परी कदा न येती हारीस ।
जे सकळ सुरांचे अंश । गोपवेषें अवतरले ॥९८॥
हे रामावतारीं वानर होऊन । केलें लंकेसी रणकंदन ।
जिंहीं दशकंधर त्रासवून । रामचंद्र तोषविला ॥९९॥
तेचि हे गोकुळीं गोपाळ । पुन्हां अवतरले सकळ ।
जरी राहील यमुनेचें जळ । तरी उगे राहतील हे ॥१००॥
कदंबातळीं नंदनंदन । एकला उरला जगज्जीवन ।
मुरली हातीं घेऊन । वेगे आला यमुनातीरा ॥१०१॥
कौतुक पाहे श्रीहरी । गडी नाहींत देहावरी ।
मग म्हणे मुरारी । कां रे व्यर्थ शीणतां ॥१०२॥
आतां कां करितां श्रमा । खळाळासीं घालितां हमामा ।
तेथें नाहीं स्त्रीपुरुषप्रतिमा । कैसें तुम्हां न कळेचि ॥१०३॥
ऐसें बोले शेषशायी । परी प्रत्युत्तर ते समयीं ।
कदा न देती कोणी कांहीं । थोर घाई हमाम्याची ॥१०४॥
कृष्ण म्हणे जरी न राहे यमुना । तरी तेथें समर्पिती प्राणा ।
ऐसें जाणोनि वैकुंठराणा । काय करिता जाहला ॥१०५॥
जो निजजनप्राणरक्षक मुरारी । जो त्रिभुवनमोहन पूतनारी ।
तत्काळ मुरली वाजविली अधरीं । नादें भरी गगनातें ॥१०६॥
मुरली वाजवितां मुरलीधर । सकळांची वृत्ती मुरली समग्र ।
मुराले सकळांचे अहंकार । मुरहरें थोर वेधिलें ॥१०७॥
मनोहर ध्वनि उमटती । जैशा वेदश्रुती गर्जती ।
नकुल भोगी विचरती । एके ठायीं तेधवां ॥१०८॥
व्याघ्र आणि गाई । निर्वैर चरती एके ठायीं ।
गज-केसरींस वैर नाहीं । थोर नवलाई हरीची ॥१०९॥
प्राणी स्थिर राहिले चराचर । शांत जाहलें यमुनेचें नीर ।
मुरलींत म्हणे मुरहर । गडे हो स्थिर रहा आतां ॥११०॥
यमुना भिऊनि पळाली । सावध होऊनि पहा सकळी ।
तें पेंधियानें ऐकिलें ते वेळीं । शांत जाहली यमुना ते ॥१११॥
मांडी थापटोनि पळाली सहजीं । पेंधा आपणातें नांवाजी ।
मग म्हणे भला मी पेंधाजी । बळिया आढ्य जन्मलों ॥११२॥
पेंधा म्हणे पहा चक्रपाणी । यमुना पळविली येच क्षणीं ।
मग बोले त्रिभुवनज्ञानी । तुमची करणी अगाध ॥११३॥
तुम्ही बळकट गोपाळ । तुम्हांसी देखतां विटे काळ ।
ऐसें बोले वैकुंठपाळ । गडी हांसती गदगदां ॥११४॥
गडियांसमवेत वनमाळी । वेगें परतला सायंकाळीं ।
देव मत्स्य जाहले यमुनाजळीं । तेही गेले स्वस्थाना ॥११५॥
गोधनें घेऊनि सांजवेळे । परतला परब्रह्म सांवळें ।
सवें वेष्टित गोवळे । नाना वाद्यें वाजवती ॥११६॥
कल्याण गौडी श्रीराग । मुरलींत आळवी श्रीरंग ।
वसंत पावक पद्म सुरंग । नीलांबर राग वाजवीत ॥११७॥
कनकदंडश्वेतचामरें । गोप ढाळिती वरी आदरें ।
झळकताती पल्लवछत्रें । एक तुंगारपत्रें वाजविती ॥११८॥
आरत्या घेऊनि गोपिका । सामोर्‍या येती वैकुंठनायका ।
निंबलोण उतरिती देखा । हरीवरूनि प्रीतीनें ॥११९॥
निजमंदिरांत येतां जगजेठी । टाकोनियां घोंगडी काठी ।
धांवोनि यशोदेच्या कंठीं । घातली मिठी श्रीहरीनें ॥१२०॥
बळिरामें रोहिणीच्या गळां । मिठी घातली ते वेळां ।
एक गौर एक सांवळा । दाविती लीला भक्तांतें ॥१२१॥
ते साक्षात शेष नारायण । यशोदेनें पूजिले दोघेजण ।
दोघांसी करवूनि मार्जन । माया आपण टिळक रेखी ॥१२२॥
रत्‍नजडित पदकमाळा । घातल्या दोघांचियां गळां ।
चिमणा पीतांबर पिंवळा । कांसे कसिला मायेनें ॥१२३॥
षड्रस अन्न वाढूनी । आणिती जाहली रोहिणी ।
माया आपुल्या हातेंकरूनी । ग्रास घाली दोघांतें ॥१२४॥
नाना क्रतु करितां करितां । जो न घे अवदानें सर्वथा ।
तो यशोदेच्या हाता । पाहुनि मुख पसरीत ॥१२५॥
झाडोनियां मंचक । वरी पाटोळा क्षीरोदक ।
शेष नारायण देख । दोघे तेथें पहुडती ॥१२६॥
क्षीरसागरींचीं निधानें । शेजे निजविलीं मायेनें ।
अनंत जन्में तपाचरणें । केली होतीं याचलागीं ॥१२७॥
असो उठोनि प्रातःकाळीं । माया जागें करी वनमाळी ।
कोमलहस्तें तें वेळीं । थापटीत यशोदा ॥१२८॥
ऊठ वेगें गोविंदा । जगन्माहेना आनंदकंदा ।
पुराणपुरुषा ब्रह्मानंदा । गडी पाहती वाट तुझी ॥१२९॥
जागा जाहला त्रिभुवनपती । माता धरीं हृदयीं प्रीतीं ।
तों बळिभद्र महामती । उठता झाला ते क्षणी ॥१३०॥
मुख प्रक्षालूनि ते क्षणीं । दोघां जेववी नंदराणी ।
हरीनें पांवा करीं घेऊनी । आळवीत गोपाळां ॥१३१॥
प्राणसखे हो चला त्वरित । वेगें जाऊं काननांत ।
वत्सें गोळा करूं समस्त । गोप धांवती तेधवां ॥१३२॥
गौळिणींसहित यशोदा । बोळवीत जाय सच्चिदानंदा ।
ज्याचें स्वरूप शेष-वेदां । ठायीं न पडे सर्वथा ॥१३३॥
वाद्यें वाजविती गोवळे । मध्यें पूर्णब्रह्म मिरवलें ।
पाहतां गोपींचे डोळे । पातीं ढाळूं विसरले ॥१३४॥
पुढें जाती वत्सांचे भार । ते वत्सरूपें सकल ऋषीश्वर ।
पाळूनियां सर्वेश्वर । उद्धरीत तयांतें ॥१३५॥
तंत वितंत घन सुस्वर । वाद्यें वाजविती परम मधुर ।
मध्यें नाचत श्रीधर । जें त्रिभुवनसुंदर रूपडें ॥१३६॥
देवांचे अवतार गोप । वत्से तितुके ऋषीश्वररूप ।
सवें घेऊनि यादवकुलदीप । वनांतरीं हिंडतसे ॥१३७॥
धन्य गोपाळांचें तप थोर । वश केला जगदुद्धार ।
जो योगिमानसहृदयविहार । न कळे पार वर्णितां ॥१३८॥
मध्यें श्रीकृष्ण पांवा वाजवी । जो आदिपुरुष मायालाघवी ।
नाना अवतारभाव दावी । नृत्य करितां स्वानंदें ॥१३९॥
टाळ मृदंग मोहरिया । पांवे शृंगें घुमरिया ।
रुद्रवीणे पिनाकिया । वाजविती सुस्वरें ॥१४०॥
घमंडी टाळांची घाई । करटाळिया फडकती पाहीं ।
गाती नाना गती लवलाहीं । नाकें वाजविती वीणा एक ॥१४१॥
नाना श्वापदें बाहती वनीं । त्यांसीच देती प्रतिध्वनी ।
एक वृक्षावरी वानर होऊनी । बळें शाखा हालविती ॥१४२॥
एक देती बळें भुभुःकार । तेणें नादावलें अंबर ।
एक म्हणती लंकानगर । आम्हींच पूर्वीं जाळिलें ॥१४३॥
नाना परींचे टिळे रेखिले । वृक्षडाहाळे शिरीं खोंविले ।
एक वृक्षावरी गाती चांगले । लीला अपार हरीची ॥१४४॥
एक गायनाचा छंद पाहोन । तैसीच तुकाविती मान ।
एक टिरीचा मृदंग करून । वांकुल्या दावीत वाजवीत ॥१४५॥
खालती लक्षूनियां एक । वरूनि फळें हाणिती देख ।
मयूरपिच्छें शिरीं कित्येक । अति सतेज झळकती ॥१४६॥
एक बैसोनि वृक्षावरी । मयूराऐसाचि ध्वनि करी ।
एक मंडूक होऊनि निर्धारीं । अवनीवरी उडताती ॥१४७॥
एक मांजराऐसा गुर्गुरी । एक कच्छ होऊनि रांगती पृथ्वीवरी ।
एक वृषभ होऊनि धरणीवरी । धांवताती तुडवावया ॥१४८॥
एक दृढ आसन घालिती । चरणांगुष्ठ करीं धरिती ।
दोघे उचलोनि त्यास नेती । मग बैसती दुजे स्थानीं ॥१४९॥
गुंजमाळा गळां आरक्त । वनमाळा डोलती पादपर्यंत ।
तुळसीमाळा सुवासित । परिमळत वन तेणें ॥१५०॥
एक खेळती चेंडूफळी । एक वावडी उडविती निराळीं ।
एक लपंडाई ते वेळीं । नेत्र झांकून खेळती ॥१५१॥
भोंवरा विटीदांडू चक्रें । एक हमामा घालिती गजरें ।
हुतुतु हुमली एकसरें । गोप घालिती आवडीं ॥१५२॥
एक बळें झोंबी घेऊनी । एक एकासी पाडिती मेदिनीं ।
एक सुरवाती टाकूनी । म्हणती शोधूनि काढा रे ॥१५३॥
हे रामवतारीं बहु श्रमले । युद्ध करितां लंकेसी भागले ।
म्हणोनि गोकुळीं ये वेळे । ब्रह्मानंदें क्रीडती ॥१५४॥
पूर्वीं हे निराहार होते । म्हणोनि जेविती हरीसांगातें ।
आपुल्या हातें रमानाथें । ग्रास त्यांस घातले ॥१५५॥
असो वनीं खेळे जगदात्मा । वृक्ष भेदीत गेले व्योमा ।
त्या छायेसी शिव-ब्रह्मा । क्रीडा करूं इच्छिती ॥१५६॥
अशोक वृक्ष उतोतिया । रायआंवळे आंबे खिरणिया ।
निंब वट पिंपळ वाढोनियां । सुंदर डाहाळिया डोलती ॥१५७॥
डाळिंबी सुपारी सायन मांदार । चंदन मोहवृक्ष अंजीर ।
चंपक जाई परिकर । बकुल मोगरे शोभती ॥१५८॥
शेवंती जपावृक्ष परिकर । तुळसी करवीर कोविदार ।
कनकवेली नागवेली सुंदर । पोंवळवेली आरक्त ॥१५९॥
कल्पवृक्ष आणि कंचन । गरुडवृक्ष आणि अर्जुन ।
वाळियाचीं बेटें सुवासें पूर्ण । कर्पूरकर्दळी डोलती ॥१६०॥
द्राक्षामंडप विराजती । शतपत्रें कल्हारें विकासती ।
वृक्षांवरी चढती मालती । बदरी डोलती फलभारें ॥१६१॥
शाल तमाल पारिजातक । शिरस आणि रायचंपक ।
फणस निंबोणी मातुलिंग सुरेख । कळंब महावृक्ष सुंदर ॥१६२॥
नारिंगी बिल्व देवपाडळी । देवदारवृक्ष नभमंडळीं ।
अगरु कृष्णागरु सुवासमेळीं । नभःस्थळीं परिमळती ॥१६३॥
जायफळवृक्ष सुंदर । लवंगी नाना लता परिकर ।
येत सुंगध मलयसमीर । रुंजती भ्रमर कमलांवरी ॥१६४॥
कपित्थ ताड सुंदर वाढले । सूर्यवृक्ष टवटवले ।
औंदुबर सदा फळले । इक्षुदंड रसभरित ॥१६५॥
मयूर चातकें बदकें । कस्तूरीमृग जवादी बिडलकें ।
राजहंस नकुळ चक्रवाकें । अतिकौतुकें विचरती ॥१६६॥
कोकिळा आळविती पंचमस्वर । विपिन तें सुवासिक मनोहर ।
ऐसिया वनांत श्रीधर । वत्सभार चारीतसे ॥१६७॥
दिवस आला दोन प्रहर । वृक्षच्छायेसी समग्र ।
वत्सें गोळा करूनि जगदुद्धार । कदंबातळीं बैसला ॥१६८॥
काला मांडिला घननीळें । गोप भोंवतें वेष्टूनि बैसले ।
सकळ सुरवर पातले । विमानीं बैसोनि पाहावया ॥१६९॥
वत्सें जीं होतीं गोळा केलीं । तीं चरत चरत दूर गेलीं ।
कमळासनें देखोनि ते वेळीं । मनामाजी आवेशला ॥१७०॥
म्हणे श्रीकृष्ण पूर्ण अवतार । किंवा अंशरूप आहे साचार ।
हा पुरता पाहूं विचार । मांडिलें चरित्र कमलोद्‌भवें ॥१७१॥
येऊनियां वृंदावनीं । परमेष्ठी अवलोकी नयनीं ।
म्हणे वत्सें न्यावीं चोरूनी । करील करणी कैसी पाहूं ॥१७२॥
हा पयःसागरनिवास । जरी असे पुराणपुरुष ।
तरी प्रताप दावील विशेष । अति अद्‌भुत मजलागीं ॥१७३॥
जरी हा असेल माझा जनिता । तरी प्रत्यया येईल मज आतां ।
ऐसें कल्पूनि विधिता । वत्सें नेलीं क्षणमात्रें ॥१७४॥
आपली माया वरी घातली। सत्यलोकीं नेऊनि लपविलीं ।
तों इकडे सच्चिदानंद वनमाळी । काला वांटीत बैसला ॥१७५॥
नाना प्रकारचीं लोणचीं । ज्यांची देवही नेणती रुची ।
चवी पहावया दध्योदनाची । लाळ विरिंचि घोंटीतसे ॥१७६॥
गोप मुखीं घालिती ग्रास । वरतें दाविती देवांस ।
तें शेष प्राप्त नव्हे कोणास । बहु तपे तपतां हो ॥१७७॥
धन्य धन्य गोकुळींचे गोप । अनंत जन्में केलें तप ।
तें एकदांचि फळलें अमूप । चित्स्वरूप वश्य केलें ॥१७८॥
कीं पूर्वीं बहुत मख केलें । कीं अनंत तीर्थीं नाहले ।
कीं वातांबुपर्ण सेवूनि तप केलें । शीत उष्ण सोसूनियां ॥१७९॥
कीं त्रिवेणीसंगमीं पाहीं । शरीर घातलें कर्वतीं त्यांहीं ।
त्या पुण्यें क्षीराब्धीचा जांवई । वश केला गोपाळीं ॥१८०॥
असो ब्रह्मा तेथें येऊनि गुप्त । हरिलीला विलोकीत ।
म्हणे येणें पूतना तृणावर्त । शकटासुर मारिला ॥१८१॥
इतुकेनि हा पुरुषार्थी । आम्ही न मानूं श्रीपती ।
ऐसें परमेष्ठी मनीं चिंती । तों गडी बोलती हरीतें ॥१८२॥
वत्सें बहु दूर गेलीं । घेऊनि येईं वनमाळी ।
आतां वळावयाची पाळी । तुझीच असे ये वेळीं ॥१८३॥
ऐसें ऐकतां वचन । उठिला इंदिरामनमोहन ।
जो मायातीत निरंजन । चैतन्यघन जगद्‌गुरु ॥१८४॥
वेणु खोंविलासे पोटीं । कक्षेसी धरी शृंग आणि काठी ।
दध्योदन वाम करपुटीं । ग्रास जगजेठी घालीतसे ॥१८५॥
वत्सें पहात दूरी । गेला वैकुंठपुरविहारी ।
इकडे गोपाळ कवळ घेऊनि करीं । वाट पाहती कृष्णाची ॥१८६॥
हातींचा ग्रास राहिला हातीं । मुखींचा कदा न गिळिती ।
तटस्थ हरीची वाट पाहती । म्हणती श्रीपती कां न ये ॥१८७॥
तो ब्रह्मदेवें केलें विंदान । वासरें नेलीं चोरून ।
इकडे वनीं यादवकुलभूषण । वत्सें शोधीत हिंडतसे ॥१८८॥
वत्सें न दिसती ते वेळां । म्हणोनि पूर्वस्थळासी हरि आला ।
तों न दिसे गोपमेळा । घेऊनि गेला विधाता ॥१८९॥
कळलें विरंचीचें विंदाण । मग मनीं हासे नारायण ।
म्हणे कमलोद्‌भवाचा अभिमान । दूर करावा तत्त्वतां ॥१९०॥
मग काय करी रमाजीवन । सर्वस्वरूपें जाहला आपण ।
ज्या ज्या वत्साचा जैसा वर्ण । मनमोहन तैसा होय ॥१९१॥
चितारें भिंगारें खैरें । मोरें सेवरें आणि कैरें ।
तांबडें काळें पांढरें । अवघीं वासरें आपण जाहला ॥१९२॥
ढवळें सांवळें चितळें । पोवळें पारवें डफळें ।
तैसींच रूपें घननीळें । असंख्यात धरियेलीं ॥१९३॥
वडजे वांकडे गोपाळ । एक धाकुटे एक विशाळ ।
एक रोडके एक ढिसाळ । होय सकळ आपण ॥१९४॥
मोडके कुब्जे काणे बहिर । गोरे सांवळे सुंदर ।
तितुकीं स्वरूपें श्रीधर । आपण नटला एकदांचि ॥१९५॥
त्यांची घोंगडी पायतण पांवे । तितुकीं स्वरूपें धरिलीं कमलाधवें ।
कटिसूत्र वनमाला शृंग सर्वें । मयूरपिच्छें जाहला ॥१९६॥
वेत्र घुमरिया शिदोरी जाळें । लघु दीर्घ सूक्ष्म विशाळें ।
अनंतब्रह्मांडगोपाळें । रूपें सकळ धरियेलीं ॥१९७॥
सायंकाळीं हृषीकेशी । परतोनि आला गोकुळासी ।
ज्याची ज्याची सवे जैसी । तैसाचि होय जगदात्मा ॥१९८॥
कोणासी न दिसे विपरीत । कृष्णमाया परमाद्‌भुत ।
एक संवत्सर निश्चित । याच प्रकारें लोटला ॥१९९॥
ब्रह्मा मनीं वाहे अभिमान । म्हणे आतां गोकुळ पाहूं जाऊन ।
काय करीत असे कृष्ण । गोप-वत्सांविण तो ॥२००॥
ब्रह्मा गुप्तरूपें पाहे । तों पूर्ववत बैसला आहे ।
शिदोरी वांटीत लवलाहें । गोपाळांसी निजकरें ॥२०१॥
पांचां वर्षांची मूर्ती । आकर्ण नेत्र विराजती ।
कंठीं मुक्तमाळा डोलती । पदकें झळकती अतितेजें ॥२०२॥
चिमणाच कांसे पीतांबर पिंवळा । दशांगुलीं मुद्रिका वेल्हाळा ।
चिमणी झळके कटीं मेखळा । नेपुरें खळखळां वाजती ॥२०३॥
असो गोपाळ जेविती स्वानंदें । गदगदां हांसती ब्रह्मानंदें ।
त्यांच्या मुखीं ग्रास गोविंदें । आपुल्या हस्तें घालिजे ॥२०४॥
तों गडी म्हणती नारायणा । वत्सें दूर गेलीं कानना ।
तुझीच पाळी मनमोहना । लौकर घेऊनि येइंजे ॥२०५॥
ब्रह्मा गुप्तरूपें पाहे अवलोकुनी । म्हणे अगाध श्रीहरीची करणी ।
अभिमान होता माझें मनीं । सृष्टिकर्ता मीच असें ॥२०६॥
महा अद्‌भुत वर्तलें । दों ठायीं वत्सें आणि गोवळे ।
सत्यलोकीं आपण नेले । ते तों संचले तैसेचि ॥२०७॥
हा होय माझा जनिता । आदिमायेचा निजभर्ता ।
जो अनंतब्रह्मांडकर्ता । करून अकर्ता तोचि हा ॥२०८॥
तों इकडे कैवल्यदानी । वत्सें शोधीत हिंडे वनीं ।
दध्योदन करीं घेऊनी । ग्रास वदनीं घालीतसे ॥२०९॥
शिरीं मयूरपिच्छें साजिरीं । घोंगडी शोभे खांद्यावरी ।
वनीं हिंडे पूतनारी । अति तांतडी चहूंकडे ॥२१०॥
काखेसी शिंग आणि वेत्र । जो मायालाघवी राजीवनेत्र ।
हांसतसे श्रीधर । ग्रास घेत हिंडतसे ॥२११॥
ऐसें देखोनि विधाता । म्हणे हा क्षीराब्धिशायी माझा पिता ।
ज्याचा महिमा वर्णितां । वेदशास्त्रां अतर्क्य ॥२१२॥
याच्या नाभिकमळीं जन्मलों । दिव्य सहस्र वर्षें मी श्रमलों ।
कमलनालामाजी उतरलों । जाचावलों बहुत मी ॥२१३॥
मग अत्यंत निर्बुजोनी । कमलावरी बैसलों येऊनी ।
मग या जगद्‌गुरुनें तेचि क्षणीं । दिव्यज्ञान उपदेशिलें ॥२१४॥
म्यां हरिस्वरूप नेणोनियां । गेलों वत्स गोप घेऊनियां ।
आतां शरण रिघावें याच्या पायां । प्रेमभावें अनन्य ॥२१५॥
निरंजनीं सांपडला श्रीधर । समोर येऊनि चतुर्वक्‍त्र ।
साष्टांग घातला नमस्कार । प्रेमें अंतर सद्‌गदित ॥२१६॥
जैसा कनकदंड पृथ्वीवरी । हरिचरणीं शिरें ठेविलीं चारी ।
नेत्रोदकें अभिषेक करी । अष्टभाव उमटले ॥२१७॥
मागुती करी प्रदक्षिणा । वारंवार घाली लोटांगणा ।
सवेंचि उठोनि विलोकी ध्याना । तों दहींभातें वदन माखलेंसे ॥२१८॥
मग जोडोनि दोन्ही कर । स्तविता जाहला चतुर्वक्त्र ।
म्हणे जय जय जगदुद्धार । निर्विकार निर्गुण तूं ॥२१९॥
नमो महामाया आदिकारणा । अज अजिता विश्वभूषणा ।
पुराणपुरुषा जगन्मोहना । गुणागुणातीत तूं ॥२२०॥
जय जय नागेंद्रदेहशयना । कमलपत्राक्षा विश्वपालना ।
परात्परा शुद्धनिरंजना । भवमोचना भवहृदया ॥२२१॥
जय जय कृष्णा करुणार्णवा । हे केशवा देवाधिदेवा ।
हे नारायणा अपारवैभवा । हे माधवा गोविंदा ॥२२२॥
हे विष्णो मधुप्राणहरणा । हे त्रिविक्रमा बलिबंधना ।
हे श्रीधरा हृत्पद्मशयना । पद्मनाभा परेशा ॥२२३॥
हे दामोदरा संकर्षणा । हे वासुदेवा विश्वरक्षणा ।
हे प्रद्युम्नजनका मनमोहना । हे अनिरुद्धा अधोक्षजा ॥२२४॥
हे पुरुषोत्तमा नरहरे । हे अच्युत जनार्दन मुरारे ।
हे उपेंद्र मधुंकैटभारे । हे पूतनारे श्रीकृष्णा ॥२२५॥
हे कृष्णा सजलजलदवर्णा । हे कृष्णा अमलनवपंकजलोचना ।
हे कृष्णा इंदिरामनरंजना । हे भक्तरक्षका यादवेंद्रा ॥२२६॥
हे कृष्णा ब्रह्मानंदमूर्ति । हे कृष्णा अनंतकल्याण अनंतकीर्ति ।
हें कृष्णा जगद्‌भूषण जगत्पति । अतर्क्य गति वेदशास्त्रां ॥२२७॥
हे कृष्णा परममंगलधामा । हे कृष्णा मृडमानसविश्रामा ।
हे कृष्णा जलजनाभा अनामा । सकलकामातीत तूं ॥२२८॥
अपराध आचरे बालक । परी क्षमा करी निजजनक ।
भुवनसुंदर लक्ष्मीनायक । सुखदायक सकळांतें ॥२२९॥
सर्व अपराध तूं क्षमा करीं । पीतवसना असुरारी ।
माझिये मस्तकीं श्रीहरी । वरदहस्त ठेवीं तुझा पैं ॥२३०॥
पुढती घाली लोटांगण । सप्रेम धरिले कृष्णचरण ।
याउपरी नंदनंदन । व्रजभूषण काय बोले ॥२३१॥
ऊठ ऊठ चतुरानना । सोडोनि देहबुद्धि अभिमाना ।
आपुल्या स्वस्वरूपस्मरणा- । माजी विलसें सर्वदा ।२३२॥
ऐसें बोलतां जगज्जीवन । सत्वर उठला कमलासन ।
कृष्णें दृढ हृदयीं आलिंगून । करी समाधान तयाचें ॥२३३॥
मनमोहन पूतनारी । कृष्ण हस्त ठेवी त्याचें शिरीं ।
विरिंचि तृप्त झाला अंतरीं । सुखसमुद्रीं निमग्‍न ॥२३४॥
वत्सें गोप हरि झाला होता । सादर विलोकी जों विधाता ।
तंव त्या कृष्णमूर्ति तत्त्वतां । पाहतां जाहला तन्मय ॥२३५॥
लक्षानुलक्ष कृष्णमूर्ती । शंख-चक्रादि आयुधें हातीं ।
श्रीवत्सादि चिन्हें झळकती । श्रीनिकेतनासमवेत ॥२३६॥
शृंग वेत्र पांवे पायतण । सर्व स्वरूपें नटला नारायण ।
असंख्य मूर्ती घनश्यामवर्ण । दुसरेपण दिसेना ॥२३७॥
असंख्य नाभिकमलें विराजमान । तेथें असंख्य विरिंचि शिव सहस्रनयन ।
चंद्र सूर्य कुबेर वरुण । सृष्टि संपूर्ण चालविती ॥२३८॥
कमलाप्रति भिन्न भिन्न ब्रह्मांड । चित्रविचित्र परम प्रचंड ।
वैकुंठ कैलासादि उदंड । पदें दिसती कमलाप्रति ॥२३९॥
समाधिस्थ झाला विधाता । अहंकृति गेली पाहतां पाहतां ।
वाचा राहिली बोलतां । वृत्ती समस्त निमाल्या ॥२४०॥
मुख्य मूर्ति त्यांत कोण । न दिसे कांहीं दुजेपण ।
वृंदावनींचे द्रुम पाषाण । श्वापदें कृष्णरूप दिसतीं पैं ॥२४१॥
भू आप तेज वात नभ । दिसती कृष्णरूप स्वयंभ ।
सरिता सिंधु चराचर सुप्रभ । श्रीवल्लभरूप दिसताती ॥२४२॥
हरली सकल अहंकृति । अनंत ब्रह्मांडें अनंत कीर्ति ।
अनंत वेद अनंत शास्त्ररीति । कीर्ति गाती अनंत ॥२४३॥
अनंत पुराण अनंत कला । अनंत अवतार अनंत लीला ।
अनंत स्वरूपें आपण नटला । दावी तो सोहळा विधातया ॥२४४॥
बहुत आकृती नाना याती । स्त्री पुरुष नपुंसक व्यक्ती ।
अवघा ओतला वैकुंठपती । नाहीं स्थिति दूसरी ॥२४५॥
विराट हिरण्यगर्भ महत्तत्त्व जाण । न दिसे स्थूल लिंग कारण ।
न चले तर्काचें विंदाण । अवघा जगज्जीवन ओतला ॥२४६॥
जागृति स्वप्न सुषुप्ति तुर्या । अवस्था गेल्या हरोनियां ।
सृष्टि-स्थिति-प्रलय सर्वसाक्षिणीया । न उरे माया समूळीं ॥२४७॥
विश्व तेजस प्राज्ञ प्रत्यगात्मा । ब्रह्मा विष्णुरुद्र परमात्मा ।
अवघा एक जगदात्मा । नामानामातीत जो ॥२४८॥
अकार उकार मकार । चवथा अर्धमात्रा ओंकार ।
रज-तम-सत्त्वविकार । सर्व यादवेंद्र ओतला ॥२४९॥
वैखरी मध्यमा पश्यंती परा । वाचा खुंटल्या नयनीं धारा ।
पाहतां ब्रह्मानंदा उदारा । ब्रह्मा जाहला समाधिस्थ ॥२५०॥
अवस्था जिरवूनि पोटीं । नेत्र उघडोनि पाहे परमेष्ठी ।
तों श्वापदें सर्व सृष्टीं । निर्वैर तेथें खेळती ॥२५१॥
गाई व्याघ्र निर्वैर देख । खेळे नकुळ दंदशूक ।
वारण मृगेंद्र होती एक । हरिप्रतापेंकरूनि ॥२५२॥
पुढती ब्रह्मा घाली लोटांगण । म्हणे धन्य धन्य आजि जाहलों पूर्ण ।
काय करूं ब्रह्मपद घेऊन । सदा राहों वृंदावनीं ॥२५३॥
पदाभिमानें आम्ही नाडलों । निजस्वरूपा विसरलों ।
कामक्रोधचोरीं नागवलों । अंतरलों हरिपायां ॥२५४॥
नाहीं आमुची आत्मशुद्धी । दृढ धरिली देहबुद्धी ।
वेष्टित सदा आधिव्याधी । आत्मशुद्धि कैंची मग ॥२५५॥
सांडूनि सकल अभिमान । होऊनि वृंदावनीं तृण-पाषाण ।
तेथें लगती कृष्णचरण । तेणें उद्धरोन जाऊं आम्ही ॥२५६॥
विधि जाहला निरभिमान । मग बोले जगत्पालन ।
म्हणे निजपदीं राहें सावधान । दुरभिमान टाकूनियां ॥२५७॥
ब्रह्मा करी प्रदक्षिणा । पुढती मिठी घाली चरणा ।
आज्ञा मागोनि रमाजीवना । निजस्थाना विधि गेला ॥२५८॥
गोप-वत्सें जी चोरूनि नेलीं । तीं अवघीं सोडूनि दिधलीं ।
कृष्णें आपुली रचना झांकिली । आपणामाजी सत्वर ॥२५९॥
वत्सें गोप ब्रह्म्यानें नेलें । मागुती फिरोनि आणिले ।
परी हें चरित्र कोणास न कळे । हरीवांचोनि सर्वथा ॥२६०॥
विधीनें पूर्वीं गोपाळ नेले होते । तैसेचि मागुती बैसविले तेथें ।
कृष्ण घेऊनि वत्सांतें । सत्वर आला त्यांजवळी ॥२६१॥
एक संवत्सरपर्यंत । नेले होते गोप समस्त ।
परी हरिमाया अद्‌भुत । न कळे चरित्र तयांसी ॥२६२॥
गडी म्हणती श्रीहरी । लौकर येईं तूं पूतनारी ।
आम्ही ग्रास घेऊनि निजकरीं । वाट तुझी पाहतों ॥२६३॥
गदगदां हरि हांसला । त्यांमाजी येऊनि बैसला ।
तों वासरमणी अस्ता गेला । सत्वर परतला गोकुळा ॥२६४॥
वत्सें आणि गोवळे । जाती परम उल्लाळें ।
बळिरामासी कांहीं न कळे । हरीनें केलें चरित्र जें ॥२६५॥
कृष्णमुखाकडे पाहे बळिराम । तों ईषद्धास्य मेघश्याम ।
गुज कळोनि सप्रेम । बळिभद्र तेव्हां जाहला ॥२६६॥
गोवर्धनीं ज्या गाई चरती । त्या ओरसा येऊनि वत्सें चाटिती ।
गौळी गोकुळींचे धांवती । हृदयीं धरिती बाळकांतें ॥२६७॥
तें कौतुक पाहोन । हांसती शेष-नारायण ।
शचीरमणा न कळे ही खूण । इतर कोठून जाणती ॥२६८॥
थोर दाविलें कौतुक । विरिंचि पोटींचें बालक ।
त्यासी कृपेनें वैकुंठपालक । रमानायक बोलिला ॥२६९॥
दिधलें अद्‌भुत दर्शन । हरिला सकळ अभिमान ।
गोकुळींचें सर्व जन । ब्रह्मानंदें डुलती ॥२७०॥
आरत्या घेऊनि गोपिका । सामोर्‍या येती त्रिभुवननायका ।
निजमंदिरा आला भक्तसखा । यशोदा माता आलिंगी ॥२७१॥
केलें जेव्हां वत्सहरण । तेव्हां पांच वर्षांचा श्रीकृष्ण ।
पुढिले अध्यायीं कालियामर्दन । सावधान परिसावें ॥२७२॥
गोकुळीं अवतरला यादवेंद्र । तोचि पंढरीं ठेऊनि कटीं कर ।
भीमातीरीं दिगंबर । ब्रह्मानंद उभा असे ॥२७३॥
हरिविजयग्रंथ वरिष्ठ । हेंचि षड्रसअन्नें भरिलें ताट ।
ज्यांसी भक्तिक्षुधा उत्कट । तेचि जेविती प्रीतीनें ॥२७४॥
जे निंदक रोगिष्ठ सहजीं । कुटिलता कुपित्त उदरामाजी ।
परम दुरात्मे भक्तकाजीं । देह कदा रुळेना ॥२७५॥
ऐसे अभक्त क्षयरोगी जाण । त्यांस न जिरे हें अन्न ।
असो क्षुधार्थी जे भक्तजन । त्यांहींच भोजन करावें ॥२७६॥
जो आनंदसंप्रदायभूषण । तो ब्रह्मानंद यतिराज पूर्ण ।
श्रीधर तयासी अनन्य शरण । जैसें लवण सागरीं ॥२७७॥
इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंशभागवत ।
श्रोते चतुर परिसोत । दशमोऽध्याय गोड हा ॥२७८॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीगणेशाय नमः । कृष्ण थोडा मोठा झाल्यावर गोपी यशोदेला म्हणू लागल्या की "आता या कृष्णाला गाई राखायला रानात पाठवावे म्हणजे तो आम्हाला तरी त्रास देणार नाही. यशोदेने कृष्णाच्या वयाचे आणि काही थोडेसे मोठे गोपबालक बोलावले. त्यांना सांगितले की, "याला पण रानात घेऊन जा. त्याच्याबरोबर तुम्ही इथे घरोघर भटकतां, दही, लोणी खातां, ते जरा गवळ्यांची कामे तरी कराल !" सवंगड्यांना खूप आनंद झाला. दुसर्‍या दिवशीच सकाळी यशोदेने कृष्णाला पाठविले. त्यांच्या हातातही एक वेताची काठी दिली, दुपारी खाण्यासाठी शिदोरी बांधून दिली. त्याचे रूप जास्तच खुलून दिसू लागले कारण त्याला आईने छोटेसे वस्त्र नेसविले होते. वर कमरेला शेला बांधला होता. एका सवंगड्याने त्याचा हात हाती धरला आणि म्हटले- "चल, कान्हा ! आपण गाईवासरांच्या मागे दौडूं, दुपारी यमुनेच्या तीरी बसून शिदोरी खाऊं !"

कृष्ण उड्या मारीतच चालला. तो गोपबालकांचा राजाच होता ! तसाच शोभून दिसत होता. सवंगड्यांनी त्याला थाटाने नेले. त्याला पहायला, हातातली कामे टाकून गोपी दाराशी आल्या !

त्यांचा सारा वेष चिमणासा होता. मेखला, वाकी, नुपूर, खांद्यावर छोटीशी घोंगडी- तिच्या दशांत गुंफली होती खरी मोती ! गळ्यात फुलांचे हारही छोटेच होते. अंगाला तर केशराची उटी लावली होती - रानात ती किती टिकणार ते तो कान्हाच जाणे ! कानांत मकराकृती कुंडले घातलेली होती; अणि हातात छोटीशी मुरली घेतलेली होती. त्याच्याकडे पाहता पाहता गोपी तटस्थ झाल्या. सवंगड्यांसह कृष्ण वनात शिरला तेव्हा वनाला नवी शोभा आली.

बाळगोपाळ दुपारपर्यंत गाई राखीत होते. मग दमले आणि कदंब वृक्षाच्या सावलीत कृष्णाला मधे बसवून त्याच्या भोवती सारेजण आपापल्या शिदोर्‍या उघडून बसले. प्रत्येकाच्या शिदोरीत वेगवेगळे पदार्थ होते. एकाची शिदोरी विटून गेली होती. त्याला वाईट वाटले तेव्हा कृष्ण म्हणाला, "आपले कर्म चांगले नाही ! त्याला दुसरा काय करणार ! ज्याने त्याने आपापली शिदोरी खावी. दुसर्‍याची मिळणार नाही."

कृष्णाच्या बोलण्याचा पुष्कळांना राग आला. पेंद्यासह ते दुसरीकडे जाऊन बसले. ते कृष्णावर रुसले होते. ते त्याला अनेक प्रकारचे बोल लावू लागले. त्या साध्या बोलात जीव आणि शिव यांचाच संवाद होता ! कृष्ण त्यांना म्हणाला, "अरे, मी तुमचाच आहे. मला टाकू नका. तुमच्यासाठीच मी अनेक अवतार घेतले. तुमच्याशिवाय मला दुसरं कोण आहे ! आता मी बोलणार नाही. तुमचे ऐकेन ?"

मग सर्वांची समजूत पटली. पेंद्‌याने क्षमा मागितली. सगळे शिदोर्‍या खायला बसले. एकमेकांना आधी खायचा आग्रह करू लागले. हट्ट करू लागले. तळहातावर दहीभात आणि लोणचे घेऊन कृष्ण सवंगड्याना भरवू लागला. हसत खिदळत सर्वांनी शिदोर्‍या खाल्या. देवांनी गुपचूप जलचर प्राण्यांची रूपे घेतली व ते यमुनेत शिरले. गोप हात धुतील तेव्हा त्यांचे उष्टे तरी खायला मिळेल अशी त्यांना आशा होती. पण कृष्णाच्या ते लक्षात आले. त्याने मुलांना यमुनेकडे न जाता घोंगड्याना हात पुसायला सांगितले. आणि पाणी न पिता ताक प्यायला सांगितले. तो म्हणाला, "यमुना नदीत एक पिशाचिनी आहे. ती तुम्हाला पकडून ठेवील." सर्वांनी कृष्णाचे ऐकले, पण पेंद्या यमुनानदीकडे गेलाच. त्या बावळटाला वाटले की, यमुना खळखळाट करून आपल्याला हसते. तेव्हा तो पाण्यात उतरला व थापट्या मारून प्रवाह अडवू लागला. त्याच्या नादाने इतरही तसेच करू लागले. कृष्ण मागे राहिला. तो म्हणाला, "पहा, गुंतलात ना ! तरी मी सांगत होतो." मग त्याने बासरी वाजविण्यास प्रारंभ केला. मुले तल्लीन झाली. त्याच्या जवळ आली. यमुनेचा प्रवाहसुद्धा शांत झाला. देवांनी स्वतःची रुपे घेऊन स्वर्गात प्रयाण केले. संध्याकाळ झाली. गुरांना घेऊन सवंगड्यांसह कृष्ण गोकुळात परत आला. गुरांच्या हंबरण्याचे ध्वनी, मुलांच्या ओरडण्याचा आवाज, बासरीचे उंच स्वर त्यांच्या आधीच गोकुळात आले. रस्त्यातील धूळ आनंदानेच जणू वर उडत होती. कृष्णाला पहायला गोपी आणि यशोदा बाहेर धावली. तिने बलरामाची व कृष्णाची दृष्ट काढली. धुळीने सर्वांग माखलेल्या मुलांना जवळ घेऊन यशोदा व रोहिणी आनंदाने रडण्याच्या बेतात होत्या. मुलांनी तर आईला मिठ्याच मारल्या. त्या दिवशी संध्याकाळी यशोदेने भरवलेल्या घासाने कृष्णाची जी तृप्ती झाली ती यज्ञातील आहुतींनीसुद्धा झाली नव्हती.

दुसर्‍या दिवशीही लवकर उठून सारी मुले हौसेने वनात गेली. वनात गाईंना चरायला सोडून सर्वजण अनेक खेळ खेळले. वृक्षावर चढणे, प्राण्यांच्या नकला करणे, लपंडाव खेळणे, पारंब्यांचे झुले करणे, मोरपिसांचे व फुलांचे मुकुट किंवा गुच्छ करणे, फळांचे चेंडू करणे असे खेळ मुले खेळत होती, तोपर्यंत गुरे फार दूर गेली. त्यावेळी कृष्णाची कसोटी पहावी असा विचार ब्रह्मदेवाच्या मनात आला. त्याने आपल्या मायेने वासरे लपवून ठेवली. काही वेळाने गोपांच्या लक्षात आले. गुरे शोधायला ते निघाले. त्यांना गाई सापडल्या पण वासरे सापडेनात. ते म्हणाले, "कान्हा, अरे गाई तर दिसतात पण वासरे कुठे आहेत ?" ते ऐकून कृष्ण उष्ट्या हातानेच उठला आणि वासरे शोधीत दूर गेला. मुले त्याची वाट पाहू लागली. ब्रह्मदेवाने वासरे लपविली आहेत हे कृष्णाला कळले. त्याने मनाशी काहीतरी ठरविले आणि तो परत आला तो काय, सारे गोप बालकही अदृश्य झालेले !

कृष्णाला वाटले, ब्रह्मदेव आपली परीक्षा पहातो काय ! मी पण त्याला धडा शिकवितो. त्याने स्वतःच्याच शरीरातून सर्व गोप बालक आणि सर्व वासरे निर्माण केली. शिदोर्‍या खाण्याचा कार्यक्रमही त्याने त्या गोपांबरोबरच पार पाडला. तरीही ब्रह्मदेवाने मूळची वासरे व गोप बालक परत दिले नाहीत. पुढे काय होते ते त्याला पहायचे होते.

सायंकाळ झाली. गोप बालक व वासरे यांच्या अनेक रूपांनी नटलेला कृष्ण गाईंसह गोकुळात आला. बलरामही मायेचा, सारेच मायेचे, पण कुणालाही कळले नाही. गोपींना आपल्या मुलांबद्दल फारच प्रेम वाटू लागले. गाईंनाही दूध जास्त आले. कारण काय ? कृष्णच गोपाळांच्या व वासरांच्या रूपाने वावरत होता. हरीची ही अघटित माया एक वर्षभर अशीच चालली. मग ब्रह्मदेव यमुनातीरी आला. त्याला काय दृश्य दिसले ? वासरे हरवली म्हणून गोपाळ त्याला शोधायला जा असे सांगत आहेत. आणि कृष्ण निघाला आहे. तेच दृश्य वारंवार दिसू लागले तेव्हा तो कृष्णाला शरण आला. तो काय ! सारी सृष्टीच त्याला कृष्णमय दिसू लागली. त्याचा अभिमान नष्ट झाला. आपणच एकटे सृष्टीकर्ते असे त्याला पूर्वी वाटत होते. त्याने स्वर्गात लपवून ठेवलेली वासरे व गोपाळ परत आणून दिले. पण मधे एक वर्ष गेले ही स्मृती त्यांना नव्हती. इकडे कृष्णानेही सर्व मायावी रूपे नष्ट केली. ही हरीची विलक्षण माया बलरामालासुद्धा कळली नव्हती. कृष्णाने त्याला गुप्तपणे ते सांगितले तेव्हा तो हसू लागला.

संध्याकाळी गोपाळांचा मेळा कृष्ण-बलरामासह घरी आला. आनंदी आनंद झाला. पण आपण जवळ घेतलेले मुलगे मायावी आहेत की खरे आहेत हे गोपींना कळलेच नाही. आणि वासरांना पाजणार्‍या गाई ! त्यांनाही काही कळले नाही !
अध्याय १० समाप्त
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


GO TOP