|
॥ श्रीहरिविजय ॥ ॥ अध्याय नववा ॥
यशोदा, कृष्ण गोप, गोपी, गोकुळ -
श्रीगणेशाय नमः ॥
जय जय यादवकुलावतंसा । लीलावेषधारका जगन्निवासा । गोकुलपालका बालवेषा । हृषीकेशा जगद्गुरो ॥१॥ लोक वर्णिती विविध शास्त्रें । मनरंजनकारक विचित्रें । परी भवच्छेदक पवित्रें । कदाकाळीं न होती ॥२॥ हरिगुणलीला न वर्णितां । व्यर्थ काय ते अलवण कविता । जैसा वाळूचा घाणा गाळितां । तेल न पडे कांहींच ॥३॥ नळी फुंकिली सोनारें । इकडून तिकडे जाय वारें । तैसी तीं व्यर्थ शास्त्रें । हरिलीला न वर्णितां ॥४॥ न वर्णितां हरिचरित्र । व्यर्थ वटवट कायसे ग्रंथ । जैसीं अर्कफळें क्षुधार्थ । रुचि उडे भक्षितां ॥५॥ धन्य धन्य तेचि जन । जे श्रीहरिध्यानपरायण । जे श्रीहरिलीला करिती श्रवण । धन्य तेचि संसारीं ॥६॥ पाखंडी जे कुतर्कवादी । त्यांस ही सांगों नये कधीं । जसे नवज्वरिता दुग्ध बाधी । मरण आणी तत्काळ ॥७॥ असो अष्टमाध्यायीं भगवंतें । विश्वरूप दाविलें कृपावंतें । असंख्य रूपें मातेतें । रमानाथें दाविलीं ॥८॥ यावरी काय झालें वर्तमान । ते साजरें ऐका भक्तजन । जेणें कलिकिल्मिषें दारुण । भस्म होती ऐकतां ॥९॥ एके दिवशीं प्रातःकाळीं । उठोनि यशोदा वेल्हाळी । शेजेसी निजला वनमाळी । मुख न्याहाळी तयाचें ॥१०॥ मुखावरूनि वस्त्र काढिलें । मायेनें हरिमुख न्याहाळिलें । पातीं ढाळूं विसरले डोळे । रूप सांवळे देखोनि ॥११॥ सुकुमार घनश्याममूर्ती । कर्णीं कुंडलें झळकती । ते पाहतां यशोदा सती । चित्तवृत्ति तन्मय ॥१२॥ श्रीकृष्णाच्या मुखावरूनी । निंबलोण करी जननी । म्हणे धन्य मीच त्रिभुवनीं । निजभाग्य परिपूर्ण ॥१३॥ याउपरी यशोदा सुंदरी । मंथन आरंभीं निजमंदिरीं । जिचें उदरीं जन्मला हरी । स्वरूप तिचें कोण वर्णी ॥१४॥ मणिमय स्तंभ विराजित । पुढें मंथनडेरा घुमत । अवक्र रवी असे फिरत । मांजिरीं तळपत कनकवर्णी ॥१५॥ छंदें घुसळी यशोदा सती । कनककंकणें रुणझुणती । पुढें रत्नजडित दोरे झळकती । तेजें तळपती रत्नकिळा ॥१६॥ माथां मोतियांची जाळी । त्यांत चंद्रसूर्यांची प्रभा आगळी । दिव्य कुंकुम निढळीं । विशाळनेत्रीं यशोदा ॥१७॥ कदन वेल्हाळ गौरवर्णी । मुक्तघोंस डोलती श्रवणीं । नासिकीं मोतीं सुपाणी । उणें आणी नक्षत्रां ॥१८॥ जे जननी होय कमलावरा । तिच्या निढळीं झळके बिजवरा । हिरे खाणीं जैसे अवधारा । वदनी द्विज झळकती ॥१९॥ चपळा झळके अंबरीं । तैसें दिव्य वस्त्र नेसली सुंदरी । रत्नजडित कंचुकी करीं । मंथितां सांवरी यशोदा ॥२०॥ कृष्णमाय ते ज्ञानगळा । जिचें पोटीं हरि अवतरला । तिनें मंथना आरंभ केला । विचार मांडिला सारासार ॥२१॥ पिंडब्रह्मांड अवघें असार । हरिस्वरूप खरें निर्विकार । मिथ्या माया ओडंबर । नव्हे स्थिर कदापि ॥२२॥ जैसी गारुडियाची विद्या । क्षणिक अवघी अविद्या । शरण रिघावें जगद्वंद्या । तरी ब्रह्मविद्या ठसावे ॥२३॥ असो ऐसे माया मंथित । सार वरी आलें नवनीत । सोहंभावें डेरा घुमत । विपरीतार्थ सांडोनि ॥२४॥ ऐसे मंथित असतां जननी । जागा जाहला कैवल्यदानी । यशोदेजवळी येऊनी । रविदंड धरियेला ॥२५॥ आधीं मज देईं स्तनपान । म्हणोनि खोळंबविले मंथन । यशोदा तेथेंचि पुढें घेऊन । पाजी स्तन यादवेंद्रा ॥२६॥ आला प्रेमाचा पान्हा । पाजितां अवलोकी कृष्णवदना । धन्य धन्य ते नंदांगना । राजीवनयनाकडे पाहे ॥२७॥ मनीं विचारीं भगवंत । म्हणे मातेचें मजवरी आहे चित्त । किंवा प्रपंचीं असे गुंतत । हेंचि सत्य पाहूं आतां ॥२८॥ त्रिभुवनचालक जगन्मोहन । मायातीत शुद्धचैतन्य । तेणें जातवेद चेतवून । दुग्ध उतोन दवडिलें ॥२९॥ अग्निसंगें दुग्ध करपतां । जननीस तो वास येतां । लोटोनि दिल्हें कृष्णनाथा । गेली माता त्वरेनें ॥३०॥ कृष्ण परब्रह्म रूपडें । माया टाकोनि गेली दुग्धाकडे । परमार्थ टाकूनि प्रपंचाकडे । प्रीति जैसी जनांची ॥३१॥ टाकूनि सुवर्ण सुंदर । जन जतन करिती खापर । सुरतरू सांडोनि पामर । कंटकवृक्ष आलिंगिती ॥३२॥ परमामृत टाकूनि पूर्ण । बळेंचि जाऊनि पिती धुवण । तैसाचि टाकूनि नारायण । माया गेली घरांत ॥३३॥ तों दुग्ध गेलें उतोन । यशोदा जाहली क्रोधायमान । तों बाहेर क्षीराब्धिजारण । कौतुक करी तें ऐका ॥३४॥ कीं प्रेमपान्हा न पाजूनी । मज टाकूनि गेली जननी । म्हणोनि कृष्णें पाषाण घेऊनी । मंथनडेरा फोडिला ॥३५॥ दहीं वाहूनियां गेलें । पुढें जगन्नाथें काय केलें । चिमणे बाळक मेळविले । आपणाभोंवते तेधवां ॥३६॥ काष्ठाचें उंच उखळ । पालथें घाली तमाळनीळ । यशोदेनें नवनीत निर्मळ । संचित ठेविलें होतें पैं ॥३७॥ शिंकी घालोनि हात । कवळ नवनीताचे काढीत । भोंवते अर्भकांसी देत । आपण सेवीत लवलाहें ॥३८॥ गडियांसी म्हणे लवकर भक्षा । माय येतां करील शिक्षा । ऐसें बोलतां कमळपत्राक्षा । काय अपूर्व वर्तलें ॥३९॥ मंथनडेरा फोडिला घननीळें । नवनीतही सकल सारिलें । दुग्ध घरांत उतोन गेलें । कार्य नासले चहूंकडे ॥४०॥ यशोदा न सोडिती भगवंता । तरी हा नाश कासया होता । श्रीकृष्णासी अंतर पडतां । मग अनर्था उणें काय ॥४१॥ भगवंतीं मिठी घालितां सप्रेम । प्रपंचचि होय परब्रह्म । तो भक्तांचा पुरवी काम । आत्माराम सर्वेश ॥४२॥ असो दुग्ध उतलें म्हणोनी । परम क्रोधायमान जननी । म्हणे कृष्णें बाहेर काय करणी । केली असेल कळेना ॥४३॥ म्हणोनि वेताटी हातीं घेऊनी । बाहेर आली नंदराणी । तों दहीं वाहोनि गेलें आंगणीं । आणि नवनीतही सारिलें ॥४४॥ देखतांचि जननी । उडी टाकोनि चक्रपाणी । पळाला बाळें घेऊनी । नंदपत्नी पाठीं लागे ॥४५॥ वेताटीं घेऊनि हातीं । बिदीं धांवे यशोदा सती । तंव तो चपळ श्रीपती । कोणासही न सांपडे ॥४६॥ शोधितां न सांपडे वेदशास्त्रां । ठायीं न पडे द्विसहस्रनेत्रा । न पवे चतुर्वक्त्रा । पंचमुखा दुर्लभ ॥४७॥ निराहारी फलाहारी । नग्न मौनी जटाधारी । बहु शोधिति गिरिकंदरीं । परि श्रीहरि न सांपडे ॥४८॥ नाना तीर्थें हिंडतां । बहु विद्या अभ्यास करितां । पंचाग्निसाधन साधितां । परी तो कदा न लाभेचि ॥४९॥ हरि नातुडे बळवंता । न चढे धनवंताच्या हाता । चतुःषष्टि कला दावितां । ठायीं तत्त्वतां पडेना ॥५०॥ एक सद्भावाविण । हातीं न लाभे जगज्जीवन । प्रेमाविण मनमोहन । कोणासही न सांपडे ॥५१॥ प्रेमाविण कायसें ज्ञान । प्रेमाविण व्यर्थ ध्यान । प्रेमाविण जें गायन । व्यर्थ जैसें गोरियाचें ॥५२॥ प्रेमाविण व्यर्थ पूजा । कदा नावडे अधोक्षजा । प्रेमाविण अभ्यास सहजा । व्यर्थ सर्व विद्येचा ॥५३॥ एक नसतां प्रेमकळा । त्याविण अवघ्या त्या विकळा । शरण न रिघतां तमाळनीळा । सकळ साधनें व्यर्थचि ॥५४॥ स्त्री सर्वलक्षणीं सुंदर पूर्ण । परी पतिसेवेसी नाहीं मन । तिचें चातुर्य शहाणपण । व्यर्थचि काय जाळावें ॥५५॥ गळसरीविण अलंकार । भूतदयेविण आचार । कीं रविशशीविण अंबर । तमें जैसें व्यापिलें ॥५६॥ कीं गुरुकृपेविण ज्ञान । कीं आवडीविण भजन । कीं गृहस्वामिणीविण सदन । व्यर्थ जैसें भणभणित ॥५७॥ कीं रायाविण परिवार । कीं नासिकेविण जैसें वक्त्र । तैसा प्रेमाविण स्मरारिमित्र । कदाकाळीं न सांपडे ॥५८॥ असो धांवता यशोदा सती । कदा नाटोपे श्रीपती । म्हणे हरि आतां गृहाप्रती । कैसा येसील तें पाहूं ॥५९॥ माता धांवतां श्रमली । स्वदेबिंदु दिसती भाळीं । तें देखोनि वनमाळीं । कृपा दाटली हृदयांत ॥६०॥ इणें बहुत जन्म तप केलें । जन्मोजन्मीं प्रेमें बांधिलें । म्यां सगुणरूप धरिलें । भक्ति देखोनि इयेची ॥६१॥ श्रीकृष्ण सुहास्यवदन । मातेकडे पाहे कृपेंकरून । तों यसोदेनें धांवोन । हस्त धरिला हरीचा ॥६२॥ हस्तीं धरूनि वेताटी । केली परम क्रोधदृष्टी । तें देखोनि जगजेठी । कांपतसे थरथरां ॥६३॥ करूनियां दीन वदन । जगज्जीवन करी रुदन । नेत्रींच्या जीवनेंकरून । जात वाहून काजळ ॥६४॥ वेत उगारितां जननी । वरी पाणी करी चक्रपाणी । श्रीमुख करूनि दीनवाणी । स्फुंदस्फुंदोनी रडतसे ॥६५॥ वेत उगारीत जननी । परी न हाणवे तियेनी । तो ब्रह्मानंद कैवल्यदानी । जो श्रुतीचेनि न वर्णवे ॥६६॥ मग करीं धरूनि चक्रपाणी । निजमंदिरा गेली जननी । म्हणे यासी उखळीं बांधोनी । शिक्षा लावीन मी आतां ॥६७॥ तों बहुत गौळिणी आल्या तेथें । म्हणती दृढ बांधा या चोरातें । दावें आणोनि स्वहस्तें । नंदराणी बांधीतसे ॥६८॥ झाली गौळिणींची दाटी । मंदमंद रडे जगजेठी । दावें वेष्टिलें कटीं । उखळासमवेत मायेनें ॥६९॥ काकुळती येतो हरी । म्हणे आजिच्यानें मी न करीं चोरी । म्हणोन वैकुंठपीठविहारी । दीनवदन बोलतसे ॥७०॥ जो अनंत पुराण पुरुषोत्तम । जो अनादि निर्गुण अनाम । जो मायातीत अगम्य । त्यासी कोण बांधील ॥७१॥ तो दावें न पुरें बांधाया । दुसरें जोडी त्यासी माया । तेंही न पुरे म्हणोनियां । तिसरें आणोनि लाविलें ॥७२॥ दोन बोटें उणें येतें । म्हणोनि लाविलें दावें चौथें । नाकळेचि चौघांतें । सहा त्यातें न पुरती ॥७३॥ बारा सोळा अठरा । न पुरतीच जगदुद्धारा । पंचविसांच्या विचारा । न ये खरा गोविंद ॥७४॥ गोपिका दावें आणूनि देती । हांवे पेटली यशोदा सती । नवलक्ष दावीं न पुरती । अगाध कीर्ति हरीची ॥७५॥ पावावया स्वरूपप्राप्ती । असंख्य वेदश्रुती गर्जती । तैशा गौळिणी हरीस बांधिती । बहुत करिती गलबला ॥७६॥ मातेकडे पाहे गोविंद । नेत्र चोळी रडे मंद । भोंवता गौळिणींचा वृंद । दाटोदाटी झोंबतो ॥७७॥ बांधिती नवलक्ष गोकंठपाश । तरी नाकळेचि परमपुरुष । हा पूर्णब्रह्म सर्वेश । हें मायेस न स्मरे ॥७८॥ माता न करीच विचारा । बांधीन म्हणे विश्वोद्धारा । कृपा आली यादवेंद्रा । बांधो द्यावें म्हणे आतां ॥७९॥ तों दावें पुरलें अकस्मात । दृढ ग्रंथि माया देत । गौळिणी भोंवत्या हांसत । कैसें आतां निजचोरा ॥८०॥ बहुत लोकांसी तुवां पीडिलें । त्याचें उटें आजि निघालें । मातेनें तुज बांधिलें । आतां कैसा जासील ॥८१॥ गौळिणींस म्हणे नंदांगना । तुम्ही जा आपुल्या सदना । आंगणीं टाकूनि मनमोहना । माया गेली गृहांत ॥८२॥ कोणी न दिसे आंगणीं । पुराणपुरुष कैवल्यदानी । उखळ ओढीत मेदिनीं । हळूहळू नेतसे ॥८३॥ चंडवृक्ष नंदांगणीं । यमलार्जुननामें दोन्ही । ते नारदें पूर्वीं शापोनी । वृक्षजन्मा घातले ॥८४॥ हे पूर्वीं कुबेरपुत्र । नांवें यांची नलकूबेर । परम उन्मत अविचार । सारासार कळेना ॥८५॥ नग्न होऊनि स्त्रियांसमवेत । जलक्रीडा दोघे करीत । तों नारदमुनि अकस्मात । त्याचि पंथें पातला ॥८६॥ दृष्टीं देखिला ब्रह्मसुत । परी ते विषयांध उन्मत्त । परम अविचारी शंकरहित । नारदें ते देखिले ॥८७॥ आधींचि तारुण्यमदें मातले । त्याहीवरी मद्यपान केलें । विशेष शब्दज्ञान शिकले । बोलों न देती कोणातें ॥८८॥ त्याहीवरी भाग्यमंद । स्त्रीसंगमे झाले विषयांध । तेचि चांडाळ भाग्यमद । जे अपमानिती साधूंतें ॥८९॥ आम्ही जाणते सर्वज्ञ । म्हणोनि संतांसी ठेविती दूषण । ऐसियांसी संतीं दंडून । शुद्धमार्गीं लावावे ॥९०॥ जो पिशाच जाहला निश्चितीं । त्यासी पंचाक्षरी दृढ बांधिती । तैसे दुष्ट दंडून संतीं । भजनस्थितीं लावावे ॥९१॥ असो नारदें कोपोनी । ते दुष्ट शापिले तेचि क्षणीं । म्हणे दोघे वृक्ष होवोनी । जडमूढदशा पावाल ॥९२॥ ऐसे ऐकतांचि वचन । दोघीं धरिले नारदाचे चरण । म्हणती स्वामी शापमोचन । देऊनि वरदान करावें ॥९३॥ मग नारद बोले ते वेळीं । तुम्ही वृक्ष व्हाल गोकुळीं । रांगत येईल वनमाळी । उद्धरील उभयांतें ।९४॥ त्यांचा करावया उद्धार । उखळ ओढीत यादवेंद्र । दोन्ही वृक्षांतून सर्वेश्वर । रमावर चालिला ॥९५॥ वृक्षसंधीं अडकलें उखळ । एकांत देखोनि वैकुंठपाळ । दोन्ही वृक्ष सबळ । बळें उन्मळोनि पाडिले ॥९६॥ तो दोन्ही वृक्षांमधूनी । दोन पुरुष निघाले तेच क्षणीं । उभे ठाकले कर जोडोनी । हरिस्तवनीं प्रवर्तले ॥९७॥ वैकुंठपालका परमपुरुषा । क्षीरसागरहृदयविलासा । सच्चिदानंदा सर्वेशा । जगदानंदा मूळकंदा ॥९८॥ जय जय गोपालवेषधारका । अनंतब्रह्मांडप्रतिपालका । जय जय हरि वेदरक्षका । मत्स्यरूपा केशवा ॥९९॥ नारायणा आदिकूर्मा । वराहरूपा पुरुषोत्तमा । नरहरिरूपा परब्रह्मा । वामनवेषा त्रिविक्रमा ॥१००॥ निःक्षत्रिय केली धरणी । पंचवटीवासिया चापपाणी । तोचि तूं गोकुळीं अवतरोनी । लीला दाविसी भक्तांतें ॥१०१॥ ऐसें दोघे स्तवन करोनी । ऊर्ध्वपंथें गेले तेचि क्षणीं । पावले आपुल्या स्वस्थानीं । हरि चरणप्रसादें ॥१०२॥ असो बाहेरून आला नंद । तंव दोन्ही वृक्ष सुबद्ध । उन्मळोनि पडिले गोविंद । वृक्षसंधींत सांपडला ॥१०३॥ ते देखोनि नंद गजबजिला । धांवा धांवा म्हणे सकळां । वृक्षाखालीं कृष्ण सांपडला । सोडूनि उचलिला नंदानें ॥१०४॥ वार्ता ऐकोनि श्रवणीं । हृदय पिटी धबधबां जननी । धांवती सकळ गोपाळ गौळणी । नदांगणीं दाटी जाहलीं ॥१०५॥ नंदाजवळी होता हरी । मायेनें घेतला कडेवरी । सद्गदित यशोदा नारी । अश्रु नेत्रीं वाहती ॥१०६॥ स्फुंदस्फुंदोनि यशोदा रडत । हे जळोत गे माझे हात । म्यां बांधिला कृष्णनाथ । मोठा अनर्थ चूकला ॥१०७॥ नंद म्हणे नसतां चंड प्रभंजन । कां वृक्ष पडिले उन्मळोन । आश्चर्य करिती सकळ जन । अनर्थ गहन चूकला ॥१०८॥ तेथें मुलें धाकुटीं होतीं । तीं सांगती नंदाप्रती । कृष्णेंच वृक्ष निश्चितीं । बळेंचि मोडून पाडिले ॥१०९॥ त्यांतूनि दोन पुरुष निघाले । श्रीकृष्णासीं काय बोलिले । तें आम्हांलागीं न कळे । मग गेले ऊर्ध्वपंथें ॥११०॥ हांसती सकळ ते अवसरीं । मुलांची गोष्ट न वाटे खरी । यशोदा म्हणे मुरारी । थोर दैवें वांचला ॥१११॥ नंदें केला सोहळा थोर । मेळवूनियां धरामर । आनंद जाहला अपार । गोकुळामाजी घरोघरीं ॥११२॥ निंबलोण तेचि क्षणीं । कृष्णावरूनि उतरी जननी । हृदयीं दृढ धरोनी । चुंबन देत प्रीतीनें ॥११३॥ एके दिवशीं मेघश्याम । देव्हारां खेळे पुरुषोत्तम । नंदाचे सकळ शालिग्राम । वदनी घालोनि गिळियेले ॥११४॥ नंद आला स्नान करून । करूं बैसला देवतार्चन । तों शालिग्राम न दिसती पूर्ण । मग यशोदेसी बोलतसे ।१५॥ देव्हारीं शालिग्राम नसती । येरी म्हणे तेथें खेळत होता श्रीपती । आपण पुसावें तयाप्रती । शालिग्राम देईल तो ॥१६॥ नंद म्हणे राजीवनेत्रा । शालिग्राम देईं चारुगात्रा । कडेवरी घेतले इंदिरावरा । चुंबन देऊनि पुसतसे ॥११७॥ मग तो नीलोत्पलदलवर्ण । मायातीत शुद्धचैतन्य । परम उदार सुहास्य वदन । नंदाप्रती बोलत ॥११८॥ शालिग्राम मी नेणें तत्त्वतां । मजवरी वृथा आळ घालितां । मी सर्वातीत अकर्ता । करणें न करणें मज नाहीं ॥११९॥ नंद म्हणे न देखतां देवतार्चन । मी कदापिही न घें अन्न । देखोनि नंदाचें निर्वाण । पसरी वदन जगद्गुरु ॥१२०॥ तो असंख्य शालिग्राममूर्ति । असंख्य सूर्य असंख्य शक्ति । असंख्य गणेश उमापति । अगाध कीर्ति हरीची ॥१२१॥ अनंतब्रह्मांडरचना ते क्षणीं । नंदे आनंदें देखतां नयनीं । गेला देहभाव विसरोनी । शब्द न फुटे बोलतां ॥१२२॥ विसरला कार्यकारण । विसरला स्नान देवतार्चन । नाठवे भोजन शयन । मन निमग्न हरिरूपीं ॥१२३॥ सवेंच घातलें मायाआवरण । दिधलें नंदाचें देवतार्चन । मनांत नंद भावी पूर्ण । यासी मूल कोण म्हणेल ॥१२४॥ देवतार्चनविधि सारून नंद । कडिये घेतला सच्चिदानंद । जो भोजना बैसतां आनंद । गगनामाजी न समाये ॥१२५॥ करिती नाना याग-यजन । तेथें कदा न घे अवदान । त्याच्या मुखीं नंद आपण । ग्रास घाली स्वहस्तें ॥१२६॥ असो एके दिवशीं प्रातःकाळीं । माया मंथन आरंभी ते वेळीं । जवळ येऊनि वनमाळी । मातेलागी बोलत ॥१२७॥ मातेसी म्हणे वैकुंठनायक । मी घुसळीन क्षण एक । मग नंद म्हणे पहा कौतुक । बिरडें हातीं देईं कां ॥१२८॥ हातीं दिधला रविदोर । घुसळण आरंभी श्रीधर । मातेसी म्हणे श्रमलीस थोर । विश्रांति घेईं क्षणभरी ॥२९॥ कौतुक पाहती तात-माता । घुसळीतसे सरसिजोद्भवपिता । तेणें आनंद झाला बहुतां । कित्येकां चिंता प्रवर्तली ॥१३०॥ देव सुखावले देखोन । आतां करूं सुधारसपान । इंद्र म्हणे रत्नें संपूर्ण । हातां येतील चतुर्दश ॥१३१॥ वासुकी जाहला दीनवदन । कूर्मे पाठी देत सरसावून । शिव म्हणे हालहाल पूर्ण । पुढती कोठें सांठवूं ॥१३२॥ लक्ष्मी म्हणे दुजी निघेल कमळा । मजहून सुंदर वेल्हाळा । तीच प्रिय होईल गोपाळा । मोठा मांडिला अनर्थ ॥१३३॥ नंद म्हणे यशोदेसी । पुरे मंथन भागला हृषीकेशी । नंद उचलोनि हृदयासी । भगवंतासी धरी तेव्हां ॥१३४॥ ऐका नवल वर्तलें एकें दिनीं । मिळती बारा सोळा गौळणी । म्हणती पुरुषार्थ करूनी । गोरस रक्षूं सर्वदा ॥१३५॥ दृढ गृह एक पाहूनी । गोरस ठेविती सांठवूनी । दृढ कुलपें घालूनी । राखिती गौळणी सर्वदा ॥१३६॥ आपण ओसरिये राहती । कुलपें कदा न काढिती । तों राजबिदीं ये जगत्पती । खेळे गडियांसमवेत ॥१३७॥ वडजे वांकुडे गोवळ । तयांसी म्हणे तमाळनीळ । एके घरीं गौळिणी सकळ । गोरस रक्षिती मज भेणें ॥१३८॥ बहुत ठकविती आम्हांतें । चला अवघे जाऊं तेथें । गडी म्हणती कोण्या पंथें । जावें सांग गोविंदा ॥१३९॥ हरि म्हणे एक ऐका । अवघे तुम्ही नेत्र झांका । ऐसे बोलतां वैकुंठनायका । नेत्र झाकिले समस्तीं ॥१४०॥ आपुली योगमाया स्मरोनि हरी । क्षण न लागतां ते अवसरीं । सौंगडे नेले सदनांतरीं । न कळे बाहेरी कोणातें ॥१४१॥ दधि घृत नवनीत । भक्षिले गडियांसमवेत । खांबासी पुसिले हात । भोजनें समस्त फोडिलीं ॥१४२॥ इतुकें घरांत वर्तलें । परी बाहेर गौळिणींसी न कळे । जैसें जीवासी नेणवे वहिलें । स्वरूप आपुलें सर्वथा ॥१४३॥ कृष्ण म्हणे गडे हो ऐका । आतां फोडा अवघेचि हांका । ऐसें बोलतां यदुनायका । कोल्हाळ केला समस्तीं ॥१४४॥ गौळिणी चमकल्या बाहेरी । म्हणती कोण्या द्वारें गेला भीतरी । सबळ कुलपें तैसींचि द्वारीं । बरा अंतरीं सांपडला ॥१४५॥ एक बोलती गोपीका । कुलपें कदा काढूं नका । एक यशोदेप्रती देखा । सांगो गेल्या तेधवां ॥४६॥ वेताटी घेऊनि करीं । सक्रोध बोलती सुंदरी । आतां पोरें येतां बाहेरी । शिक्षा बरी लावूं तयां ॥१४७॥
एक म्हणती पोरें सोडावीं । एक बोलती स्तंभीं बांधावीं ।
मुख्य चोर जो मायालाघवी । त्यास सर्वथा सोडूं नये ॥१४८॥ माया करूनियां पुढें । आपण मागें मागें दडे । जैसा वारिजकोशांत पहुडे । भ्रमर जेवीं कळेना ॥१४९॥ ऐसें गोपी सक्रोध बोलत । पोरें आंत रडती समस्त । एक चळचळां कांपत । बोलती स्फुंदत हरीसी ॥१५०॥ एकदां काढीं येथूनी । दुसर्यानें हे न करूं करणीं । म्हणोनि लागती हरिचरणीं । चक्रपाणी हांसत ॥१५१॥ गडी म्हणती हसतोसी गोविंदा । उखळीं तुज जैं बांधील यशोदा । सकळ गौळिणी तुज परमानंदा । शिक्षा आतां करितील ॥१५२॥ आम्हां ताडितील गौळिणी । घरीं मारिती पिता-जननी । भुवनसुंदरा गदापाणी । काढीं येथूनि आम्हांसी ॥१५३॥ हरि म्हणे एक ऐका । पुढती आतां नेत्र झांका । कदा डोळे उघडूं नका । नेतों सकळिकां बाहेरी ॥१५४॥ सकळीं नेत्र झांकिले । गवाक्षद्वारें बाहेरी काढिले । पेंध्यानें किंचित डोळे उघडिले । माया हरीची पहावया ॥१५५॥ डोळे उघडितां त्वरित । पेंधा अडकला साहण्यांत । अंतरिक्षी पाय लोंबत । म्हणे धांव आतां गोविंदा ॥१५६॥ कुलपें काढूनि त्वरित । गोपी आल्या मंदिरांत । तों पेंधा देखिला लोंबत । गोपी सडकीत पाय त्याचे ॥१५७॥ म्हणे धांव धांव मधुसूदना । बहुत मारिती गजगामिना । मी अन्यायी मनमोहना । जगज्जीवना सोडवीं ॥१५८॥ हरि म्हणे पेंधियासी ते वेळे । त्वां नेत्र बहुतेक उघडिले । येरू म्हणे थोडेसें पाहिलें । तरी झालें ऐसें हें ॥१५९॥ हात देऊनि पंकजपाणी । पेंधा नेला तेच क्षणीं । तों यशोदेसी घेऊनि गौळिणी । निजमंदिरीं प्रवेशल्या ॥१६०॥ तो बोलें यशोदा जननी । कोठें दावा गे चक्रपाणी । मग बोलती नितंबिनी । करूनि करणी गेला हो ॥१६१॥ माग दिसतसे घरांत । गौळिणी यशोदेसी दावीत । येरी म्हणे कृष्णनाथ । कोंडिला कोठें तुम्हीं हो ॥१६२॥ चहूंकडे पाहती डोळसां । आला गेला न कळे कैसा । ज्याची लीला न कळे महेशा । सहस्रक्षा विरंचीतें ॥१६३॥ यशोदा म्हणे ते अवसरीं । प्रातःकाळपासून निजमंदिरीं । खेळत होता मुरारी । तुमच्या घरीं कैंसा आला ॥१६४॥ कुलपें द्वारीं तैसींचि सबळ । तरी कोण्या द्वारें आला तमाळनीळ । नसतीच घेतां हरीवरी आळ । जावें गोकुळ टाकोनि ॥१६५॥ एक बोले गजगामिनी । गवाक्षद्वारें येतो चक्रपाणी । यशोदा हांसे ऐकोनी । गोष्टीं घडे कैसी हे ॥१६६॥ इतुकीं मुलें घेऊनि सरसीं । आला गेला हृषीकेशी । येरी म्हणे ब्रह्मादिकांसी । चरित्र न कळे कृष्णाचें ॥१६७॥ तटस्थ जाहलिया व्रजसुंदरी । माया म्हणे मज दावा गे श्रीहरी । असो तुमचें खादलें किती तरी । सांगा तितुकें देईन ॥१६८॥ मग सकळ भाजनें दावीत । तों तोंडावरी भरलें नवनीत । रांजणी माथरी समस्त । घृतेंकरोनि भरियेल्या ॥१६९॥ जें जें पात्र पाहती उघडून । त्यांत भरिले गोरस पूर्ण । आंगणी आड दुग्धेंकरून । उचंबळोन आला असे ॥१७०॥ कृष्णमुखीं गोरसबिंदु अर्पिता । कोटिगुणें वाढे तत्त्वतां । जैसें वटबीज सूक्ष्म पेरितां । सहस्रगुणे वाढत ॥१७१॥ कीं सत्पात्रीं देतां दान । कोटिगुणें वाढे संपूर्ण । तैसें बिंदुमात्र सेवून । सिंधुसमान तो देत ॥१७२॥ कृष्णमुखीं जें अर्पिलें । अनंतमखफळ हातां आलें । गौळिणी म्हणती प्रकटलें । भाग्य आमुचें अगाध ॥१७३॥ यशोदा म्हणे नष्टा समस्त । गौळिणी तुम्ही परम असत्य । नानापरींचें आळ बहुत । बाळावरी घेतां गे ॥१७४॥ घरा गेलिया यशोदा । खेळतां देखिलें आनंदकंदा । माया हृदयीं धरूनि गोविंदा । मुख चुंबीत प्रीतीनें ॥१७५॥ आणि एके दिवशीं वनमाळी । एके गृहीं प्रवेशे माध्यान्हकाळीं । दधि भक्षितां ते वेळीं । घरा आली गौळिणी ते ॥१७६॥ तिणें दृढ मनगटीं धरूनी । ओढूनि आणिला जेथें जननी । दहीं माखलेंसे वदनी । भाजनपात्र हातीं तें ॥१७७॥ यशोदे बहुत दिवस जपतां । आजि सांपडला अवचिता । माया म्हणे कृष्णनाथा । काय केलें तुवां हें ॥१७८॥ कृष्ण म्हणे ऐक माते । मी यथार्थ सांगतों तूंतें । ही जितुकीं वचनें बोलते । तितुकीं व्यर्थ असत्य ॥१७९॥ माया म्हणे वदनीं पाहीं । माखलेंसें तुझ्या दहीं । खाऊनि म्हणसी नाही । राजसा तूं कैसा रे ॥१८०॥ हरि म्हणे ऐक सावचित्त । मी राजबिदीसी होतों खेळत । तों गोवळे आले बहुत । इच्या गृहांत प्रवेशले ॥१८१॥ पोरें म्हणती ते अवसरीं । हरि येतोसी काय करूं चोरी । बळेंचि मज धरूनि करीं । घेऊनि गेले जननीये ॥१८२॥ त्यांहीं गोरस भक्षिला समस्त । मी उगाचि दूर होतों पाहत । चोरावें इचें नवनीत । हेंही मज कळेना ॥१८३॥ ही येतांचि मंदिरांत । गोवळे पळाले समस्त । इणें मज धरिलें त्वरित । अन्याय कांहीं न करितां ॥१८४॥ माझ्या मुखीं दहीं इणें चर्चिलें । दटावूनि मडकें हातीं दिधलें । तुजजवळी ओढूनि आणिलें । बळेंचि मज जननीये ॥१८५॥ जे दहीं हरोनि गेले गोवळे । त्यांसी न धरवे इचेनि वहिलें । ज्यांहीं चोरिले त्यांसी सोडिलें । विरहण आलें मजवरी ॥१८६॥ मातेच्या पदरें मुख पुसिलें । भाजनपात्र भिरकाविलें । कंठीं मिठी ते वेळे । दृढ गोपाळें घातली ॥१८७॥ गदगदां हांसोनि गोपिका । आपुल्या गृहा गेल्या देखा । मनीं म्हणती हरिलीला ब्रह्मादिकां । न कळे सहसा निर्धारें ॥१८८॥ मातेसी म्हणे गोविंद । मज जेवूं घालीं भातदुग्ध । मातेचे कंठीं वेदवंद्य । मिठी घालीत पुढती पैं ॥१८९॥ माया म्हणे श्यामसुंदरा । आतां निकेतनपति येती मंदिरा । त्यां सांगातें जेवीं सुकुमारा । तों गोदोहन करितें मी ॥१९०॥ ऐसी ऐकतांचि गोष्टी । उठे हांसत जगजेठी । त्याचा महिमा वर्षकोटी । वर्णितांही सजेना ॥१९१॥ एके दिवशीं कमलासनपिता । प्रातःकाळ जाहला असतां । मातेसी म्हणे तत्त्वतां । दूध प्यावयासी दे मज ॥१९२॥ माता म्हणे आजि मित्रवार । दुग्ध अनसूट असे समग्र । खंडेराव दैवत तीव्र । पुसे रमावर कोठें आहे ॥१९३॥ माता म्हणे देव्हारां । पाहें जाय सुकुमारा । डोळसा मदनताता सुंदरा । सर्वेश्वरा गोविंदा ॥१९४॥ देव्हारां येऊनि गोपाळ । पाहे देवाधिदेव निर्मळ । तंव ते टांक देवांचे सकळ । दोरियेनें गोंविले ॥१९५॥ मातेसी म्हणे क्षीराब्धिजाकांत । येवढें देवांचें सांगसी सत्त्व । तरी ह्या दोरीनें निश्चित । कां आकळूनि रक्षिले ॥१९६॥ काय तुझा देव करील । म्हणोनियां वैकुंठपाळ । बळेंचि दुग्ध सकळ । तमालनीळ पीतसे ॥१९७॥ त्याउपरी ते रात्र क्रमिली । प्रातःकाळीं उठोनि वनमाळी । मातेसी म्हणे ते वेळीं । कडेवरी घेईं मज ॥१९८॥ माझी वांकडी झाली मान । दोन्ही दुखताती नयन । माता म्हणे मल्लारी पूर्ण । हरि तुजवरी क्षोभला ॥१९९॥ खंडेराव दैवत दुरळ । प्रचीत दाविली तत्काळ । मातेचे नेत्रीं वाहे जळ । म्हणे आतां काय करूं मी ॥२००॥ कडेवरी घेतला कृष्ण । मायेचे खांदां टाकिली मान । जैसा भ्रमर बैसे संकोचून । कमलकोषीं प्रीतीनें ॥२०१॥ देव्हारां येऊनि माया । म्हणे मार्तंडा खंडेराया । हरिवरी कृपा करीं लवलाह्या । म्हणोनि लावी आंगारा ॥२०२॥ तों अकस्मात म्हाळसापती । देदीप्यमान दिव्यमूर्ती । तडिदंबरप्रभा फांकती । कैलासपति साक्षात ॥२०३॥ खंडा झळके दक्षिणकरीं । हरिद्राचूर्ण उधळे वरी । तुरंगवहन त्रिपुरारी । उमानाथ प्रकटला ॥२०४॥ दिव्य तेजें भरलें गगन । जो मणिमल्ल-प्राणहरण । तो साक्षात शिव हयवाहन । यशोदेसी बोलत ॥२०५॥ तुझें पूर्वपुण्य अद्भुत । उदरा आला त्रैलोक्यनाथ । त्याच्या अंगीं दैवतें समस्त । देव आम्ही यशोदे ॥२०६॥ ब्रह्मानंद हा साक्षात । यासी भजें घरीं भावार्थ । यासी पूजितां देव समस्त । तृप्त होतीं निर्धारें ॥२०७॥ ऐसें बोलोनि तये वेळां । खंडेराव गुप्त जाहला । मातेसी हृदयीं कळला । हरिप्रताप अद्भुत ॥२०८॥ एके दिवशी अधोक्षज । म्हणे आधीं जेवूं घालीं मज । जो मायातीत विश्वबीज । आदिपुरुष परात्पर ॥२०९॥ त्यासी माया म्हणे कान्हया । आधीं देवपूजा करोनियां । मग मी तुज रे बा तान्हया । जेवूं घालीन निर्धारें ॥२१०॥ हरि म्हणे मातेप्रती । देव तरी आहेत किती । माता म्हणे भगवती । परम दैवत दारुण ॥२११॥ खंडेराव महाखडतर । भैरव दैवत महातीव्र । गणेश पावतो सत्वर । नाम घेतां आरंभीं ॥२१२॥ ऐसें बोलतां माता ते । गदगदां हांसोनि जगन्नाथें । म्हणे भज देवाधिदेवातें । ते म्हणे आम्हांतें कैसा दिसे ॥२१३॥ तत्काळ चतुर्भुज घनश्याम । शंख चक्र गदा पद्म । पीतांबरधारी पुरुषोत्तम । यशोदेनें देखिला ॥२१४॥ यशोदा नमस्कारी तत्काळ । सवेंचि घालोनि मायाजाळ । जैसा पूर्वीं होता बाळ । दीनदयाळ तैसा झाला ॥२१५॥ एके दिनीं जगत्पती । बोलावी देव्हार्याच्या मूर्ती । म्हणे सांगा तुम्हीं मातेप्रती । कीं कृष्णास आधीं वाढिजे ॥२१६॥ माया आली देव्हारियाजवळी । तों धातुमूर्ती बोलती ते वेळीं । म्हणती सच्चिदानंदवनमाळी । भजें यासी सद्भावें ॥२१७॥ कृष्णासी आधीं जेवूं घालीं । तरी तुझी पूजा आम्हांसी पावली । ऐसें ऐकतां माया ते वेळी । तटस्थ जाहली सप्रेम ॥२१८॥ असो एके दिनीं श्रीहरी । खेळत असतां ओसरीवरी । माया म्हणे मुरारी । दुग्धपान करीं कां ॥२१९॥ हरि म्हणे मी दुग्धपान न करीं । माता म्हणे बळिराम गेलां बाहेरी । तोंवरी तूं पूतनारी । दूध झडकरीं पिईं कां ॥२२०॥ बळिराम बाहेरूनि आलिया । तुज वांटा मागेल तान्हया । हरि म्हणे दुग्ध प्यालिया । काय होतें मज सांगा ॥२२१॥ बा रे शिखा वाढते साचार । काळे आंग होतें गौर । ऐकोनि हांसे यादवेंद्र । म्हणे पाहूं प्रचीत याचा ॥२२२॥ दुग्धाची वाटी मुखीं लाविली । शेंडी धरूनि पाहे वनमाळी । म्हणे कां शिखा नाहीं वाढली । तनू काळीं दिसतसे ॥२२३॥ माता म्हणे जगन्नायका । आजचि कैसी वाढे शिखा । हांसे येतसे वैकुंठनायका । बोल मातेचे ऐकोनि ॥२२४॥ एके दिवशीं राम आणि कृष्ण । आंगणीं खेळती दोघेजण । हरीसी म्हणे संकर्षण । तुज हें कळलें नाहीं कीं ॥२२५॥ कोंडा देऊनियां जाणा । तुज पोसणें घेतलें कृष्णा । याची प्रचीत जगज्जीवना । पाहें तुज सांगतों ॥२२६॥ मायबापें गोरीं तुझी गोपाळा । त्यांचे पोटींचा तूं तरी काळा । कोंडा देऊनि घेतलें तुला । तैसेंच मजला कळलें पैं ॥२२७॥ ऐसे बोलतां बळिभद्र । स्फुंदस्फुंदोनि रडे यादवेंद्र । माता येऊनि सत्वर । हृदयीं धरी गोपाळा ॥२२८॥ पल्लवें पुसी राजीवनयन । म्हणे तुज बोलिलें कोण । स्फुंदस्फुंदोनि सांगे जगज्जीवन । मज पोसणा म्हणे दादा ॥२२९॥ माता म्हणे माझ्या उदरीं । तूं जन्मलासी मुरारी । बळिराम चाळवितो निर्धारीं । तुजलागीं गोपाळा ॥२३०॥ मातेनें कडेवरी घेतला । मुख चुंबीत वेळोवेळां । निंबलोण उतरी वेल्हाळा । कृष्णावरूनि झडकरी ॥२३१॥ एके दिवसीं उषःकाळीं । उठोनियां वनमाळीं । एके गोपीचें घरीं ते वेळीं । कौतुक केलें अद्भुत ॥२३२॥ ब्राह्मीं मुहूर्तीं उठोनि जाणा । गोपी गेलिया माघस्नाना । मागें सकळ गाई राना । लावूनियां दीधल्या ॥२३३॥ बैल आणूनियां सकळ । तिच्या वाडियांत बांधी घननीळ । गोपी गृहा आली तत्काळ । धारा काढूं धांवतसे ॥२३४॥ भरणा घेऊनि बैसे खालती । तों वृषण हातासी लागती । सर्व गाईंच्या कांसा धरीत हातीं । एकचि गति चहूंकडे ॥२३५॥ विस्मित जाहली बाला । तों तमांतक उगवला । तो वृषभांनीं वाडा भरला । एकही गाय दिसेना ॥२३६॥ कळली कृष्णाची करणी । गार्हाणीं सांगों येती गौळणी । माया वेताटी घेऊनी । शिक्षा करावया धांवत ॥२३७॥ वेगें पळाला गोविंद । तों त्याचि वाटेनें आला नंद । तों यशोदा म्हणे मुकुंद । धरा धरा वेगेंसी ॥२३८॥ तों नंएं धरिला ते समयीं । दृढ आलिंगिला निजहृदयीं । चुंबन देऊनि लवलाहीं । यशोदेसी बोलत ॥२३९॥ नंद म्हणे कां हो धांवसी । माया म्हणे सोडूं नका यासी । याणें पीडिलें गौळिणींसी । याचे खोडीसी अंत नाहीं ॥२४०॥ नंदापाशी सांगे सांवळा । ह्या धमकटी गौळिणी सकळा । मातेपाशीं वेळोवेळां । लटकींचि देती गार्हाणीं ॥२४१॥ घेती नसतीचि मजवरी आळ । मातेसी खरें वाटे सकळ । हांसे यशोदा वेल्हाळ । नंदमुख विलोकूनि ॥२४२॥ घरासी आणिलें जगन्नाथा । नंद म्हणे मजपरता । भाग्याचा नाहीं तत्त्वतां । त्रिभुवनीं शोधितां हो ॥२४३॥ एकदां बळिरामासीं हरि खेळे । गोपाळ दोहींकडे वांटले । तों कृष्णाकडे ते वेळे । डाव लागला खेळतां ॥२४४॥ ऐसें देखोनि चक्रपाणी । बळिरामाची दोघे मुलें धरूनी । त्यांच्या शिखा परस्परें बांधोनी । वृक्षावरी घालीत ॥२४५॥ मुलें ठेवूनि वृक्षावरती । आपण लपाला श्रीपती । बाळें सोडविलीं निश्चितीं । बळिरामें येऊनियां ॥२४६॥ यशोदेजवळी गार्हाणी । सांगों येती गजगामिनी । म्हणती मुलांच्या शिखा बांधोनी । वृक्षडहाळीवरी ठेवी ॥२४७॥ माता म्हणे पूतनारी । किती सोसाव्या खोडी तरी । ऐक शास्त्र तरी पुढें मुरारी । यावरी हरि बोलतसे ॥२४८॥ हरि म्हणे मातेसी । शास्त्र जें मज पढविसी । तें कोणाचें शास्त्र निश्चयेंसीं । सांग मजसी जननीये ॥२४९॥ माता म्हणे देवाचें शास्त्र । मग बोले राजीवनेत्र । तें शास्त्र पढतां साचार । काय देतो देव पैं ॥२५०॥ माता म्हणे देतो मुक्तीतें । हरि म्हणे ते तुजचि होऊं दे माते । मी न सोडीं चोरीतें । नवनीताच्या कदापि ॥२५१॥ यशोदा म्हणे कृष्णनाथा । आण वाहें तूं तत्त्वतां । जे मी चोरी न करीं सर्वथा । शपथ आतां बोलें पैं ॥२५२॥ गोरसावांचोनि न करीं चोरी । माते आण तुझी निर्धारीं । ऐसें बोलतां कैटभारी । माता हांसे गदगदां ॥२५३॥ एके दिवशीं यशोदा । जेवूं घाली परमानंदा । दहींभात पुढें मुकुंदा । कालवोनि दीधला ॥२५४॥ लोणचें आणींमाते झडकरी । येरी म्हणे आहे सोंवळ्याभीतरी । लोळणी घालीत मुरारी । म्हणे न जेवीं सर्वथा ॥२५५॥ मग सोंवळें विटाळोनी । आलें निंबें घाली जननी । गौळी भुलले अहंममतेंकरूनी । नेणती करणी हरीची ॥२५६॥ गोकुळींची एक म्हातारी । सुनेसी राखी दिवसरात्रीं । म्हणे कृष्णाचा वारा निर्धारीं । पडों नेदीं सर्वदा ॥२५७॥ यासी येऊं देशील जरी मंदिरा । तरी मुकलीस आपुल्या संसारा । नांवरूपा न उरे थारा । झणीं यदुवीरा ऐक्य होसी ॥२५८॥ तों वृद्धा दिवशीं मंदिरीं । एकलीच होती सुंदरी । वृद्धा गेली बाहेरी । तों मागें हरि पातला ॥२५९॥ त्या गोपीस हरि भोगीत । तों वृद्धा पातली घरांत । दोघांजणां हातीं धरीत । बिदीस नेत ओढूनि ॥२६०॥ वृद्धा सांगे अवघ्यांजणां । हीं दोघें धरिलीं पहा नयनां । लोक म्हणती सून पुत्र दोघांजणां । कोठें नेतीस म्हातार्ये ॥२६१॥ वृद्धा म्हणे हा घननीळ । तुम्ही नेणां काय लोक सकळ । नंदगृहासी तत्काळ । दोघां घेऊनि पातली ॥२६२॥ तों तेथें खेळे हृषीकेशी । विस्मय वाटे वृद्धेसी । नंद म्हणे पुत्रसुनेसी । कां आणिलें चावडिये ॥२६३॥ वृद्धा म्हणे या दोघांसी धरिलें । नंद म्हणे तुझें काय गेलें । अवघ्यांनीं वृद्धेसी गोफाटिलें । निर्भर्त्सिलें सकळिकीं ॥२६४॥ यशोदा म्हणे बाळावरी आळ । ऐसेचि घेती जन सकळ । पूर्णब्रह्मानंद निर्मळ । कृष्ण माझा निर्धारीं ॥२६५॥ मग आपुल्या घरा गेली वृद्धा । सोडूनि दिधलें परमानंदा । ज्याचिया गुणाची मर्यादा । शिव स्वयंभू नेणेचि ॥२६६॥ एकदां कडे घेऊनि हृषीकेशी । गोपी आल्या रविकन्यातीरासी । जैसा विद्युल्लताभार आकाशीं । तैसा दिसे समुदाय ॥२६७॥ तों तेथें नाव खुंटली । घरास गेले तारक सकळी । गोपिकांनीं नाव सोडिली । आंत बैसल्या सर्वही ॥२६८॥ एक नौकादंड करीं घेती । सव्य अपसव्य आवलिती । तों धारेमाजी निश्चितीं । नाव गेली तेधवां ॥२६९॥ जुनी नाव अत्यंत पाहीं । छिद्रें पडलीं ठायीं ठायीं । माजी उदक आलें लवलाहीं । धरवत अतिवेगेंसीं ॥२७०॥ उदक देखतां युवती । परम भयभीत होती । म्हणती काय करावें श्रीपती । नौका बुडेल कीं आतां ॥२७१॥ हरि म्हणे कंचुक्या काढूनी । बोळे घालोनि कोंडा पाणी । ऐसें ऐकोनि गजगामिनी । नावेचीं छिद्रें कोंडिती ॥२७२॥ बोळे निघोनियां गेले । अधिकच पाणी आंत भरलें । गोपी म्हणता ये वेळे । काय सांग करावें ॥२७३॥ हरि म्हणे वस्त्रें काढून बुजा । तैसेंचि करिती आरजा । म्हणती काय करावें अधोक्षजा । संकट थोर मांडलें ॥२७४॥ तों तेथें सूर्य मावळला । असंभाव्य पर्जन्य वळला । तमें नभमंडप भरला । मोठा सुटला प्रभंजन ॥२७५॥ भयानक लाटा उचंबळती । जळचरांचे पोळे धांवती । भ्यासुर मुखें पसरिती । प्रळयगति ओढवली ॥२७६॥ गोपी म्हणती वैकुंठनाथा । विश्वव्यापका रमाकांता । पुराणपुरुषा अव्यक्ता । धांवें आतां ये वेळीं ॥२७७॥ आमुचे प्राण गेले तरी काय । परी हरि बुडेल कीं आतां सये । प्रळय करील कीं याची माय । प्राण देईल ऐकतां ॥२७८॥ पाहोनियां कृष्णमुखा । सद्गद रडती गोपिका । धांवें पावें इंदिरानायका । कृष्ण आमुचा वांचवी ॥२७९॥ जानूइतुकें नीर गोपिकांसी जाहलें । श्रीकृष्णास नाभीपर्यंत आलें । हरीस कडियेवरी घेतलें । कंठ दाटले गोपिकांचे ॥२८०॥ हृदयपर्यंत जाहलें जीवन । स्कंधीं घेतला जगज्जीवन । आकंठ उदक जाहलें पूर्ण । म्हणती मरण आलें कीं ॥२८१॥ देहांत आला जवळी । गोपिकांनीं मूर्ति सांवळी । हृदयीं तैसीच रेखिली । वृत्ति मुराली हरिरूपीं ॥२८२॥ गोपी म्हणती सांवळे कान्हाई । जगन्मोहने कृष्णाबाई । ऐसें जन्मोजन्मीं देईं । दर्शन तुझें राजसे ॥२८३॥ आम्ही अनंत घेऊं जन्मां । परी तूं आम्हांसी खेळे मेघश्यामा । भक्तकामकल्पद्रुमा । ऐसाचि भेटें पुढती तूं ॥२८४॥ आपणां आलें निकट मरण । परी गोपिका न सोडिती स्मरण । निर्वाणींचे भक्तां जाण । राजीवनयन तुष्टला ॥२८५॥ पर्जन्य अकस्मात उघडला । अभ्र वितळलें सूर्य प्रगटला । जळचरांचा मेळा दूर गेला । समीर राहिला स्थिर पैं ॥२८६॥ अकस्मात नाव कडेसी । लागली देखोनि गोपिकांसी । आनंद जाहला न माये आकाशीं । निजगृहासी पातल्या ॥२८७॥ यशोदेसी सांगती कृष्णचरित्र । आजि हरीनें केलें विचित्र । पापारण्य सर्वत्र । भस्म करी जाळूनि ॥२८८॥ नाव तीरास लागली जेव्हां । गोपींचीं वस्त्रें तैसींच तेव्हां । तो जगद्गुरु त्याचिया भावा । ब्रह्मादिकां न कळती ॥२८९॥ जो अनंतब्रह्मांडनायक । लीलावतारी जगद्व्यापक । वस्त्रें निर्मावया काय अशक्य । दीनबंधु सर्वात्मा ॥२९०॥ हरिविजयग्रंथ हाचि समुद्र । साहित्यमुक्तें अतिपवित्र । त्यांचे शोधक सज्जन नर । बुडया देती स्वानंदें ॥२९१॥ बुडी दिधल्याविण हाता । मुक्तें न येती सर्वथा । अविंध होती जीं तत्त्वतां । गुरुकृपें विंधिलीं तीं ॥२९२॥ तीं ओविलीं सद्गुणगुणीं । समसमान चहूंकडूनी । ते मुक्तामाळ सतेजपणीं । संतांचे कंठीं डोलत ॥२९३॥ ब्रह्मानंदा परात्परा । गोकुळपाळका दिगंबरा । वेदवंद्या श्रीधरवरा । निर्विकारा अभंगा ॥२९४॥ इति श्रीहरिविजयग्रंथ ॥ संमत हरिवंशभागवत । चतुर श्रोते परिसोत ॥ नवमाध्याय गोड हा ॥२९५॥ श्रीकृष्णार्पणमस्तु॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
एकदा काय झाले, सकाळी यशोदा लवकर उठली. कृष्ण अजून निजलेला होता. त्याच्या अति मनोहर मुखाकडे पाहून, "जरा वेळ निजलाय तेवढ्यात ताक घुसळावे" असा विचार करून ती दुसर्या दालनात डेर्यात दही घालून ताक घुसळण्यासाठी गेली. त्याच कामात दंग झाली. मनात कृष्णाचेच ध्यान आणि मुखी त्याचेच नाम होते. पण कृष्ण तिकडे उठून बसला तरी तिचे लक्ष नव्हते. "आई, मला भूक" असे म्हणून तो रडू लागला. तिकडे यशोदेने दुधही तापत ठेवले आहे. तिने पटकन येऊन "उठला का बाळ ! ये रे घेते हं बाळाला ?" असे म्हणत तिने त्याला स्तनपान देण्यास घेतले. पण काही वेळाने दूध उतू गेले. यशोदेचे लक्ष तिकडे जाताच ती उठली. कृष्णाला खाली ठेवून ती आत गेली. दूध खाली उतरून ठेवले. दूध सांडलेले होते. चूल पुसून मग कृष्णाला घ्यावे असा विचार करून ती ते काम करू लागली.
इकडे कृष्ण रागावला. आईचे आपल्याकडे लक्ष नाही हे त्याला आवडले नाही. त्याने एक माठ फोडून टाकला. तेवढ्यात गोपाळांचे बालक तिथे आले. एका उखळीवर चढून कृष्णाने पटकन शिंक्याचे मडके काढले, त्यातले लोणी काढून सवंगड्यासह खायला सुरुवात केली. आई येण्याच्या आत लोणी संपवा म्हणून तो मुलांना घाई करू लागला ! तोच यशोदा तिथे आली ! झालेला लोण्याचा राडा पाहून ती कृष्णाला पकडायला धावली. तो अंगणात धावला. तिला त्याने दमविले. शेवटी दया येऊन आपणच सापडला ! त्याचे दोन्ही हात धरून तिने डोळे वटारले व त्याला छडीचा मार देणार तो कृष्णाने अशी केविलवाणी मुद्रा केली की तिला छडी मारवेना. तोपर्यंत गवळणी आणखी कालपरवांच्या खोड्या सांगायला आल्या ! तेव्हा त्याच उखळीला कृष्ण बांधून ठेवावा असे तिने ठरविले. तिने एक दावे घेतले व उखळीला बांधून कृष्णाच्या पोटाला ते बांधू लागली ! पण ते अपुरे पडले. मग तिने आणखी एक दावे आणले. तेही दोन बोटे कमी पडले. होता होता कितीतरी दावी जोडून तिने कृष्णाच्या कमरेला बांधण्याचा प्रयत्न केला, पण अपुरे ते अपुरेच. तेव्हा आईची दमछाट झालेली पाहून कृष्णाला तिची दया आली. त्याने स्वतःला उखळीशी बांधून घेतले. मुकाट्याने बसला. आईला वाटले, 'भली खोड मोडली ?' पण आईचे लक्ष नाही असे पाहून कृष्णाने उखळी आडवी पाडली व ती ओढीत अंगणात नेली. अंगणाच्या सीमेवर दोन अर्जुनवृक्ष जवळ जवळ होते. कृष्णाने ती उखळी त्यांच्या मधून पलीकडे नेण्याचा प्रयत्न चालविला. त्याने एवढ्या जोराने उखळी ओढली की ते दोन्ही वृक्ष उन्मळून पडले ! धाडदिशी आवाज झाला ! वृक्ष पडतांच दोन गंधर्व त्यांतून प्रकट झाले. कृष्णाची त्यांनी स्तुती केली, त्याला वंदन केले. उखळी त्या वृक्षातच अडकलेली होती. ते गंधर्व अंतर्धान पावले ! कुबेराचे नल व कूबर असे दोन पुत्र होते ते ! ते पूर्वी आपल्या स्त्रियांसह जलक्रीडा करीत होते तेव्हा नारदमुनी तेथे गेले पण त्यांनी नारदांना योग्य तो मान दिला नाही म्हणून त्यांनी त्या दोघांना 'तुम्ही झाडे व्हाल' असा शाप दिला होता. आणि हरी हाच कृष्णावतारात तुमची त्या वृक्षरूपातून सुटका करील असा उःशापही दिला होता. तेच गंधर्व आता मुक्त झाले होते. कृष्णाला व त्याच्या काही सवंगड्याना ते दिसले होते. इतरांना मात्र दिसले नाहीत. वृक्ष पडल्याचा आवाज ऐकून यशोदा व नंदही धावत आला. शेजारच्या गोपी धावत आल्या, गोप पुढे आले. नंदाने कृष्णाला उचलून घेतले. उखळीचे दावे सोडले. तेव्हा यशोदेला वाटले, 'मी कितीतरी दावी बांधली ती कुठे गेली ! एवढासा कान्हा, वृक्ष कसे हे उन्मळून पडले, काही कळत नाही !' नंदयशोदा आपल्या बाळावरचे संकट टळले म्हणून मोठा आनंद मानू लागली. उखळी बंधनावरूनच कृष्णाला दामोदर नांव पडले ! आपल्या मुखांत कृष्णाने यशोदेला जसे विश्व दाखविले तसेच ते नंदालाही एकदा दाखविले. नंद शाळिग्रामाची पूजा करीत असे. कृष्णाने तो उचलून तोंडात लपवून ठेवला. नंदाने ते ओळखले. त्याने कृष्णाला तोंड उघडायला सांगितले. कृष्णाने आपले मुख पसरले तो त्यात नंदाला असंख्य लिंगे, बाण, शाळिग्राम, देव दिसले. तो थक्क झाला. मग कृष्णाने त्याला देहभानावर आणले व आपल्या तोंडातील शाळिग्राम काढून दिला ! मग आनंदाने मन भरून येऊन नंदाने स्वहस्ताने कृष्णाला जेवू घातले - तो आनंद काय वर्णावा ! एकदा कृष्णाने आईला मदत म्हणून छोड्याशा मडक्यात दही घुसळण्यास सुरुवात केली. नंद कौतुक पहात होता, पण क्षीरसागराचे मंथन केले तेव्हा जशी रत्ने निघाली तशीच आताही निघतील अशी देवांना आशा वाटू लागली ! हलाहलासाठी नीलकंठ, अंगाला तिढे पडण्यासाठी वासुकी व पाठीवर मंदर पर्वत पेलण्यासाठी कूर्म सज्ज झाले ! लक्ष्मीला वाटले, आता आपल्याला दुसरी सवत येणार ! एकदा काही गोपींनी दूध दही वगैरे एका खोलीत बंद करून ठेवले होते. कृष्णाला ते आवडले नाही. त्याने सवंगड्याना म्हटले- 'तुम्हाला जर भरपूर दूध, दही, लोणी, तूप खायला हवे असेल तर तुम्ही डोळे मिटा ! मी तुम्हाला आत नेतो.' सर्वांनी डोळे मिटले. कृष्णाने मायाशक्तीने त्यांना त्या खोलीत नेले. तिथे सारे फस्त करून मग मुलांनी कृष्णाच्या सांगण्यावरून एकदम आरडा ओरडा केला. गोपींना हे कसे झाले ते काहीच कळेना. पण 'या पोरांना चांगली शिक्षा केली पाहिजे' असे त्या आपसात बोलू लागल्या. मुले घाबरली. पण कृष्ण म्हणाला- "तुम्ही पुन्हां डोळे मिटा, परत मी बाहेर नेतो पहा." मुलांनी डोळे मिटले. लगेच खिडकीतून सर्व मुले आपोआप बाहेर आली. पण पेंद्या जास्त चौकस ! कृष्ण काय युक्ती करतो ती पहावी म्हणून त्याने एक डोळा किलकिला केला. तो मात्र नेमका त्या खोलीच्या खिडकीत अडकला आणि गोपींनी त्याला मार दिला. पण कृष्णाने त्याला सोडविले. मग म्हटले- 'तू मजवर विश्वास ठेव. तू शंका घेतलीस म्हणूनच अडकलास !' गोपींनी यशोदेकडे तक्रार केली. छोट्याशा खिडकीतून कृष्णाने पोरांना आत नेले आणि सारे गोरस फस्त केल्यावर बाहेरही आणले अशी त्यांची तक्रार ! पण यशोदेने ती छोटी खिडकी पाहून त्यांना म्हटले- "तुम्ही कल्पनेनेच हे सारे सांगता. कृष्ण सगळा वेळ इथेच आहे !" घरातून कृष्ण बाहेर आलाही ! कृष्ण गोपींना म्हणाला- 'खरंच का ? मग आता दूध दही सारे भरून दे ग आई ! यशोदेने म्हटले- "भरूनच द्यायला हवे ! गोपींनो, किती रांजण आणि मडकी रिकामी केली आहेत ते पहा !" पहातात तो सार्या पदार्थात जराही कमतरता नव्हती. एकदा कृष्ण लोणी चोरून खात होता. त्याला पकडून गोपी यशोदेजवळ आली. कृष्ण म्हणाला- "मी स्वतः काही केले नाही." वाटेत माझ्या मित्रांनी मला म्हटले- "चल कान्हा, लोणी खाऊया." 'तर मला घेऊन गेले. ते मग पळाले मी मात्र सापडलो. माझ्या तोंडाला या बाईनेच हे दही लावले, आता मजवर खोटा आळ आणत्ये ! पण आई, मला भूक लागल्ये ना ! पुष्कळ वेळ पोटात काही नाही ?' यशोदा आणि ती गोपी - दोघी हसू लागल्या ! 'देव कोणते ? देवघरातले ? ते तर तुझ्या तालावर नाचतात ! त्यांना नैवेद्य कशाला. ? मीच पिऊन टाकतो' असे म्हणून तो नैवेद्याचे दूध पिऊन टाकी. सकाळी उठला की मानच दुखते, डोळेच दुखतात असे बोलून यशोदेला म्हणे "मला कडेवर घे." मग पुन्हा झोपे. देवांना कृष्ण हसला म्हणून यशोदेने देवघरातल्या देवांची क्षमा मागितली तर साक्षात शंकराने यशोदेला दर्शन देऊन सांगितले की "आम्ही बालकृष्णांतच सामावलेले आहोत. त्याची पूजा कर. ती आमचीच पूजा होईल." "देवांच्या देवाची पूजा कर" असे तो आईला म्हणे आणि चतुर्भुज विश्वरूप तिला दाखवी ! तेव्हा ती त्या रूपाला नमस्कार करी. त्याला दूध प्यायचा सुद्धा कधी कधी आग्रह करावा लागे. "दूध पिऊन काय होते ? " असे विचारी. यशोदा म्हणे "डोक्यावरची शिखा वाढते, अंग गोरे होते !" तर दूध पिता पितां केस आणि अंग तपासून म्हणे- 'केस नाही वाढत ! मी तर काळाच आहे ! कुठे झालोय मी गोरा !" यशोदा म्हणे- "लगेच नाही होत ! अरे त्याला वेळ लागतो." कृष्ण काळा होता, बलराम गोरा होता. बलराम कृष्णाला चिडवून म्हणाला- "कान्हा, तू काही यशोदेचा मुलगा नाहीस. तुला कोंड्यावर विकत घेतलाय् " तेव्हा त्याची समजूत काढता काढतां यशोदेची पुरेवाट झाली. एकदा कृष्णाने एका गोपीच्या गाई गोठ्यातून सोडून तिथे बैल बांधले. गोपी दूध काढायला गोठ्यात गेली तो काय ! सगळे बैल ! यशोदेकडे तक्रार करायला आली तेव्हा कृष्ण धूम पळत सुटला ! नंदाने त्याला जवळ घेतले आणि सारे हसत सुटले. आईजवळ तो मध्येच विश्वरूपानुसार, प्रभु म्हणून बोले ! तिची त्यावेळी समाधी लागे. एकदा यमुना नदीत एका होडीत कृष्णाला घेऊन गोपी बसल्या आणि होडी वल्हवू लागल्या. पण त्या जुन्या होडीला भोके होती. पाणी आत येऊन होडी बुडू लागली. गोपींनी आपली वस्त्रे काढून ती भोके बुजविण्यास सुरूवात केली पण काही उपयोग झाला नाही. तेवढ्यात वादळ झाले. पाऊस थैमान घालू लागला. गोपींना भीती वाटू लागली. कृष्णाला उगीच आणले, आता यशोदा काय म्हणेल याचे त्याना भय वाटले. एक वेळ आमचे प्राण जाऊ देत पण या कृष्णाला वाचव अशी प्रार्थना त्या करू लागल्या. पण होडी वाटेल तशी हेलकावे खाऊ लागली ! आता सर्वजणी बुडणार असे त्यांना वाटू लागले ! तेव्हा त्या कृष्णाला शरण गेल्या. रडू लागल्या ! आक्रोश करू लागल्या. त्यावेळी कृष्णाने वादळ आवरले, पाऊस थांबविला. शरणागत भक्तांचे तोच रक्षण करतो ! सूर्यप्रकाशात नौका डुलत चालू लागली ! नौका अखंड झाली. गोपींच्या अंगावर पुन्हा जशीच्या तशी वस्त्रे आली ! मृत्यू सन्मुख आला तेव्हांही गोपी कृष्णाला शरण गेल्या ! यशोदेला हा सारा प्रकार कळला तेव्हा तिला जो आनंद झाला त्याचे वर्णन करणे शक्य नाही ! अध्याय ९ समाप्त ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ |