॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीहरिविजय ॥

॥ अध्याय आठवा ॥

राधाकृष्ण प्रेम - कृष्णलीला -


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीविठ्ठलाय नमः ॥
ज्याचें करितां स्मरण । तुटे जन्मसंसारबंधन ।
प्रकाशे पूर्ण आत्मज्ञान । जाय निरसोन देहबुद्धि ॥१॥
ज्याची ऐकतां लीलाकथा । निरसे समूळ मोहममता ।
निर्दोष पद ये हाता । श्रवण करितां वर्णितां हो ॥२॥
जो विश्वबीज विश्वालय । क्षीराब्धितनयेचा परम प्रिय ।
जो निर्विकार अज अव्यय । जो सच्चिदानंदघनतनु ॥३॥
श्रोता आणि वक्ता । साहित्यकथा कविता ।
श्रवणअर्थबोधकर्ता । जगन्नाथा तूंचि सर्व ॥४॥
भीमातीरवासा पंढरीनाथा । पुढें बोलें हरिविजयग्रंथा ।
तुझी अद्‌भुत लीला समर्था । तूंचि बोले रसाळ ॥५॥
मी केवळ मतिमंद आळसी । मजहातीं हा ग्रंथ करविसी ।
जरी सकळ साहित्य पुरविसी । तरीच रसीं ग्रंथ चढे ॥६॥
मागें सप्तमाध्यायाचे अंतीं । गार्‍हाणें गौळिणी सांगती ।
दशवतारांची लीला रीती । दाविली गति अद्‌भुत ॥७॥
आपुली लीला वर्णिली भगवंतें । परी ते मिथ्यां वाटे गोपिकांतें ।
तीं दशावतारचरित्रें अद्‌भुतें । गोपींनीं सांगितलीं यशोदे ॥८॥
म्हणती यशोदे सुंदरी । बहु खोडी करितो मुरारी ।
याचीं गार्‍हाणीं वर्णितां वक्त्रीं । शेषही भागे जाण पां ॥९॥
गोपी म्हणती यशोदे सती । तूं व्रत घेईं संकष्टचतुर्थी ।
गणेश गुण देईल याप्रती । निश्चयेंसीं जननीये ॥१०॥
गणेश देईल उत्तम गुण । मानीं आमुचें वचन प्रमाण ।
यशोदा म्हणे अवश्य करीन । संकष्टचतुर्थीव्रत आतां ॥११॥
गजवदनासी म्हणे यशोदा । गुण देईं माझिया मुकुंदा ।
संकष्टचतुर्थी सर्वदा । न सोडीं मी जाण पां ॥१२॥
वचन ऐकोनि कृष्णनाथें । सत्य करावया गणेशातें ।
खोडी नाहीं केली अनंतें । एकमासपर्यंत ॥१३॥
यशोदा म्हणे आली प्रचीती । धन्य धन्य देव गणपती ।
तों सवेंचि आली चतुर्थी । संकटहर्त्री सर्वांचें ॥१४॥
इंदिराबंधूचा उदय होय । तंववरी यशोदा उपवासी राहे ।
पूजासामग्री लवलाहें । करी माय सिद्ध तेव्हां ॥१५॥
थोर थोर लाडू एकवीस । शर्करामिश्रित केले सुरस ।
सिद्धलाडू विशेष । आणि बहुवस मोदक ते ॥१६॥
ऐसा नैवेद्याचा भरून हारा । माता नेऊन ठेवी देव्हारां ।
तों उदय जाहला निशाकरा । पडिला अंबंरीं प्रकाश ॥१७॥
मातेसी म्हणे हृषीकेशी । लाडू मज कधीं देसी ।
माता म्हणे गजवदनासी । नैवेद्य दावून देईन ॥१८॥
आणिक धूप दीप सामग्री । माता आणूं गेली बाहेरी ।
देव्हारियाजवळी श्रीहरी । एकलाचि उभा होता ॥१९॥
एकांत देखोनि ते वेळां । श्रीकृष्ण हारा उचलिला ।
नैवेद्य सर्वही स्वाहा केला । क्षणमात्र न लगतां ॥२०॥
मौनेंचि करूनि सर्व ग्रास । उगाच बैसला जगदीश ।
श्रीवैकुंठपुरविलास । लीला भक्तांस दावीतसे ॥२१॥
धूप दीप घेऊनि त्वरित । माता आली सदनांत ।
तों रिताचि देखिला हारा तेथ । देव्हारियावरी पडियेला ॥२२॥
विस्मय मायेसी वाटला । म्हणे रे कृष्णा घननीळा ।
नैवेद्य अवघा काय झाला । हारा पडिला रिता कां ॥२३॥
श्रीकृष्ण म्हणे वो माते । सत्य मानीं वचनातें ।
एक सहस्र उंदीर येथें । आले होते आतां हो ॥२४॥
त्यांत एक थोरला मूषक । त्यावरी बैसला विनायक ।
सोंडेनें लाडू सकळिक । एकाएकीं आकर्षिले ॥२५॥
सर्वांगीं चर्चिला शेंदूर । सोंड हालवी भयंकर ।
उदर त्याचें भ्यासुर । देखोनि थोर भ्यालों मी ॥२६॥
बोबडी वळली वदनीं । न बोलवे माझेनि जननी ।
क्षुधा लागली मजलागूनी । लाडू देईं सत्वर ॥२७॥
जननी बोले क्रोधायमान । उघडूनि दावीं तुझें वदन ।
जगन्निवास करी रुदन । दीन वदन करूनियां ॥२८॥
लाडू होते बहुत । कैसे जातील माझिया मुखांत ।
विचार करूनि निश्चित । मग मज शिक्षा करीं वो ॥२९॥
गणेश गेला लाडू घेऊन । मजवरी आलें विहरण ।
माता म्हणे वदन उघडून । दावीं मज मुकुंदा ॥३०॥
हरि म्हणे मारूं नको माते । उघडूनि दावितों वदनातें ।
मातेपुढें वैकुंठनाथें । मुख पसरूनि दाविलें ॥३१॥
तों ब्रह्मांड देखिलें संपूर्ण । वैकुंठ कैलास आदिकरून ।
असंख्य दिसती गजवदन । जननी पाहोन तटस्थ ॥३२॥
कृष्णमुखांतूनि गजवदन । मातेसी म्हणे ऐकें वचन ।
हा देवाधिदेव सनातन । तुझें उदरीं अवतरला ॥३३॥
आम्ही समस्तही देव । या श्रीकृष्णाचे अवयव ।
पूर्णब्रह्मानंद केशव । भजें यासी जननीये ॥३४॥
यशोदा जाहली समाधिस्थ । अहंकृति विराली समस्त ।
आपआपणा विसरत । लीला अद्‌भुत देखोनि ॥३५॥
नेत्र उघडोनि सवेंचि पाहे । तो कृष्ण पुढें उभा आहे ।
म्हणे लाडू देईं जननीये । क्षुधा बहुत लागली ॥३६॥
माता सद्गदित होवोन । कृष्ण कडिये घेतला उचलोन ।
हरि सांगाते घेऊन । करी भोजन यशोदा ॥३७॥
एकदां बळिभद्र चक्रपाणी । खेळत असतां आंगणीं ।
कृष्णें मृत्तिका घेऊनी । आपुल्या वदनीं घातली ॥३८॥
बळिराम म्हणे हृषीकेशी । आतां सांगतों मातेपाशीं ।
म्हणोनि संकर्षण वेगेंसीं । मंदिरांत प्रवेशला ॥३९॥
मग म्हणे जननीसी । मृत्तिका भक्षितो हृषीकेशी ।
मग ते शिपटी घेऊनि वेगेंसी । हरीपासीं पातली ॥४०॥
कृष्णासी बोले दटावून । म्हणे मुख दावीं उघडून ।
तों भयभीत जगज्जीवन । दीन वदन करी तेव्हां ॥४१॥
जननी मारील म्हणोन । वर हस्त करी जगज्जीवन ।
माते बळिराम येऊन । लटकेंचि सांगे तुजपासीं ॥४२॥
याचे मनींचा भाव पूर्ण । कीं मज तुवां करावें ताडन ।
पाहें जननी माझें वदन । कैसी मृत्तिका भक्षिली ।४३॥
मुख हरीनें पसरिलें । तो ब्रह्मांड सकळ देखिलें ।
हा पूर्णब्रह्म ऐसें ओळखिले । यशोदेनें निजमनीं ।४४॥
असो एके दिनीं कमलोद्‌भवपिता । स्फटिकभूमींत खेळतां ।
लीला दाविली ते आतां । सादर ऐका भाविक हो ॥४५॥
स्फटिकभूमींत प्रतिबिंब । घननीळें देखिलें स्वयंभ ।
मातेसी म्हणे निजभक्तवल्लभ । मज काढूनि देईं तें ॥४६॥
तों हांसोनि बोले माता । तो न ये हरि काढितां ।
ऐसे ऐकतांचि जगत्पिता । लोळणी तेव्हां घालीत ॥४७॥
गडबडां लोळे धरणीं । प्रतिबिंब दे काढूनी ।
नानाप्रकारें समजावी जननी । परी रडतां न राहे ॥४८॥
दिधलीं बहुत खेळणीं । परी तीं न घे चक्रपाणी ।
घातला पाळणां नेऊनी । परी कदापि न राहे ॥४९॥
माता म्हणे श्रीहरी । नीज घेईं तूं क्षणभरी ।
प्रतिउत्तर दे पूतनारी । निजस्वरूपीं मीच असे ॥५०॥
माया म्हणे किती रडतोसी । गोष्टी गोड सांगे मजसी ।
हरि म्हणे बोलावयासी । दुसरेपण दिसेना ॥५१॥
ऐसे रडतां करी बोल । परी समजेना तमाळनीळ ।
तैसाचि सोडून भक्तवत्सल । माय गेली स्वकार्या ॥५२॥
तों कार्यप्रसंगें त्या अवसरीं । राधा येत यशोदेच्या मंदिरीं ।
तों पालखामाजी जगदुद्धारी । रडतां देखिला तियेनें ॥५३॥
म्हणे कां रडती रे चावटा । गोष्टी सांगसी कीं अचाटा ।
ऐसें बोलोनि देववरिष्ठा । कडेवरी घेतलें ॥५४॥
तों राहिला उगाच रडतां । माय म्हणे ऐक राधे आतां ।
नेईं घरासी कृष्णनाथा । येथें रडतां न राहे ॥५५॥
राधा म्हणे भुवनसुंदरा । चाल आतां माझ्या मंदिरा ।
कडिये घेवोनि विश्वोद्धारा । राधा त्वरें चालिली ॥५६॥
डोल्हारियावरी नेऊनी । बैसविला कैवल्यदानी ।
तों भ्रतार नव्हता सदनीं । असे गौळवाड्यां सदा तो ॥५७॥
तों राधेची सासू म्हातारी । तीही नसे कदा घरीं ।
सदा राहे घोषमंदिरीं । दधिमंथनाकारणें ॥५८॥
असो घरीं एकांतीं राधा । हालवी डोल्हारां वेदवंद्या ।
तिचिया स्वरूपाची मर्यादा । कोणासही न वर्णवे ॥५९॥
जैसा कां इंदु संपूर्ण । तैसें राधेचें सुहास्यवदन ।
नासिक सरळ शोभायमान । आकर्णनयन सुरेख ते ॥६०॥
कर्णीं जडित ताटंकें । अत्यंत तळपती सुरेखें ।
नक्षत्रपुंजांसारिखे । मुक्ताघोंस डोलती ॥६१॥
जैसे कां हिरे तळपती । वदनीं तैशा द्विजपंक्ती ।
सकळ अलंकारांची दीप्ती । सदनामाजी न समाये ॥६२॥
असो ऐसी राधिका सुंदरा । डोल्हारां हालवी जगदुद्धारा ।
मग म्हणे यादवेंद्रा । तूं धाकुटा बहुत अससी ॥६३॥
जरी असतासी निमासुर । तरी होता बरवा विचार ।
मग म्हणे ब्रजराजकिशोर । थोर होईन आतां मी ॥६४॥
गदगदां हांसे राधा । कैसा थोर होसी गोविंदा ।
ऐसें बोलतां ते मुग्धा । स्वरूप थोर धरियेलें ॥६५॥
जो अनंतब्रह्मांडकर्ता । जो आदिमायेचा निजभर्ता ।
त्यासी थोर व्हावया अशक्यता । सहसाही नसेचि ॥६६॥
निमासुर मुख सुंदर । जाहला वैकुंठींचा सुकुमार ।
राधा म्हणे हा ईश्वर । गोकुळामाजी अवतरला ॥६७॥
सुखशेजे नित्य राधा । भोगीतसे परमानंदा ।
त्यजोनिया द्वैतभेदा । कृष्णरूपीं मीनली ॥६८॥
तों तेच समयीं भ्रतार अनया । आला घृतकावडी घेऊनियां ।
वाडयांत प्रवेशला लवलाह्यां । तों कपाट दिधलेंसे ॥६९॥
अनया म्हणे राधेसी । द्वार उघडी वेगेंसी ।
कोणासीं बोलतेसी । गुजगोष्टी घरांत ॥७०॥
ऐकोनि भ्रताराचिया शब्दा । भयभीत जाहली राधा ।
मग म्हणे श्रीगोविंदा । लहान होईं सत्वर ॥७१॥
माझी लाज राखीं आतां । पूर्ववत होई मागुता ।
तंव तो मायाचक्रचाळिता । पांच वर्षांचा जाहला ॥७२॥
ऐसें देखोनि ते अवसरीं । राधेचा हर्ष न माये अंबरीं ।
दहींभात आणूनि झडकरी । कृष्णापुढें ठेविला ॥७३॥
भ्रतारासी म्हणे सुंदर । कृष्ण जेविताहे समोर ।
तुम्ही क्षण एक धरा धीर । द्वार आतां उघडितें ॥७४॥
सवेंचि द्वार उघडिलें । तों देखिलें रूप सांवळें ।
अनयानें कृष्णास पुढें घेतलें । मुख चुंबिलें प्रीतीनें ॥७५॥
अनया म्हणे राधेसी पाहीं । तुज न गमेचि निजगृहीं ।
कृष्णासी नित्य आणीत जाई । खेळावया निजमंदिरा ॥७६॥
याचें पाहतां श्रीमुख । अनंत जन्मींचें हरे दुःख ।
तुज काळ क्रमावया आणिक । कृष्णाविण असेना ॥७७॥
राधा वंदी भ्रताराचे चरण । तुमची आज्ञा मज प्रमाण ।
मायेनें घरासी नेतां जगज्जीवन । करी रुदन आक्रोशें ॥७८॥
ऐसें बहुत दिवस जाहलियावरी । गुजगुज उठली गोकुळाभीतरीं ।
कृष्ण राधेच्या घरीं । थोर होतो म्हणोनियां ॥७९॥
एक म्हणती गोष्टी नोहे । लहानाचा थोर कैसा होय ।
एक म्हणती नवल काय । कृष्ण नाटकी बहु असे ॥८०॥
कोणी म्हणती सगुण । एक म्हणती निर्गुण ।
एक म्हणती गुणागुण । याचे ठायीं नाहींत ॥८१॥
वेदांती यास ब्रह्म म्हणती । मीमांसक याचिलागीं कर्में करिती ।
सर्वकर्ता हाचि म्हणती । नैयायिक ययातें ॥८२॥
सांख्यशास्त्र गर्जत । प्रकृतिपुरुष सांगत ।
तोचि हा कृष्णनाथ । गोकुळांत अवतरला ॥८३॥
भाष्यकार शब्द साधून । याचिया नामाचा अर्थ करून ।
तेंचि शास्त्र व्याकरण । हरिगुण वर्णीतसे ॥८४॥
योगसाधन पतंजली । साधून पाहती वनमाळी ।
ऋगवेदीं कर्में स्थापिलीं । याचिलागी पावावया ॥८५॥
यजुर्वेदीं दिव्य ज्ञान । औपासन सांगे अथर्वण ।
सामवेदी करीत गायन । याचिलागीं पावती ॥८६॥
शैव म्हणती सदाशिव । वैष्णव हा म्हणती रमाधव ।
सौर म्हणती स्वयमेव । सूर्यनारायण जयातें ॥८७॥
गाणपत्य म्हणती गजवदन । तोचि हा राधामनमोहन ।
शाक्त भजती शक्तीलागून । तोचि हा जाण प्रकृतिरूपें ॥८८॥
एक म्हणती यासी काळा । कोणी म्हणती आहे सांवळा ।
परी तो सकळवर्णांवेगळा । जो डोल्हारां बैसविला राधेनें ॥८९॥
शचीनें तप केलें बहुत । सप्त जन्मापर्यंत ।
भोगावया भगवंत । तेचि राधा सत्य गोकुळीं ॥९०॥
पद्मपुराणीं असे ही कथा । श्रोतीं शब्द न ठेविजे या ग्रंथा ।
मूळावेगळी सर्वथा । कथा तत्त्वतां वाढेना ॥९१॥
जयदेव पद्मावतीरमण । बोलिला राधाकृष्णआख्यान ।
जो पंडितांमाजी चूडामणिरत्‍न । व्यासअवतार कलियुगीं ॥९२॥
बिल्वमंगलादि कवींद्र । कथिती राधाकृष्णचरित्र ।
तेंच वर्णीत श्रीधर । नसे विचार दुसरा ॥९३॥
असो गुजगुज उठली गोकुळीं । राधागृहीं थोर होतो वनमाळी ।
ते यशोदेनें कर्णकमळीं । ऐकियेली जनवार्ता ॥९४॥
गौळिणी सांगती यशोदेसी । कृष्ण न धाडी राधेच्या गृहासी ।
माता म्हणे हृषीकेशी । राधागृहासी न जावें ॥९५॥
तथापि तूं जासी रडोन । तरी मी तुज शिक्षा करीन ।
मग बोले जगज्जीवन । न जाईं आतां सर्वथा ॥९६॥
राधेची सासू म्हातारी । तीस एक सांगती सुंदरी ।
तुझ्या सुनेस तूं आवरीं । घरास हरि न आणिजे ॥९७॥
सासू म्हणे राधे परियेसी । कृष्ण जरी घरासी आणिसी ।
तरी मी शिक्षा निश्चयेसीं । तुज करीन निर्धारें ॥९८॥
ऐसी लोकीं पाडिली तुटी । नव्हे राधेसी कृष्णभेटी ।
स्फुंदस्फुंदूनि रडे गोरटी । म्हणे जगजेठी अंतरला ॥९९॥
नावडे अन्न उदकपान । नावडे मार्जन आणि भूषण ।
नावडे अंजन चंदन शयन । मोहिलें मन हरीनें ॥१००॥
नावडे कदा दिव्यांबर । काढूनि टाकिले अलंकार ।
नावडती सुमनहार । केवळ विखार भासती ॥१०१॥
चंद्रकिरण शीतळ थोर । ते वाटती परम तीव्र ।
हृदयीं आठवे श्रीधर । चिंता थोर वाटतसे ॥१०२॥
एके दिवशी कुरंगनयना । चालिली कृतांतभगिनीजीवना ।
चाले हंसगती शुभानना । नंदसदनावरूनि जातसे ॥१०३॥
तों ते वेळीं प्रातःकाळ । धारा काढूं निघे घननीळ ।
हातीं भरणा घेऊनि गोपाळ । धारा काढी त्वरेनें ॥१०४॥
भरणा भरूनि घरांत । यशोदा डेरियांत ओतीत ।
मागुती येई त्वरित । दुसरा भरणा न्यावया ॥१०५॥
ज्या गाईस स्पर्शे गोविंद । तीस अमर्याद फुटे दुग्ध ।
भरणा भरतांचि मुकुंद । तो ब्रह्मानंद काय करी ॥१०६॥
आपुलिया मुखीं धारा । कृष्ण ओढीत भरभरां ।
तो माता म्हणे श्रीधरा । ऐसें काय करितोसी ॥१०७॥
कृष्ण म्हणे भरला भरणा । आडखेल गाईचा पान्हा ।
म्हणोनिया माझिया निजवदना । माजी धार काढितो ॥१०८॥
यशोदा गेली घरांत । पुढें भरणा घेऊनि कृष्णनाथ ।
द्वाराकडे जंव पाहत । तंव तेथें राधा उभी असे ॥१०९॥
देखूनि राधेचें वदन । तन्मय झाला मधुसूदन ।
विसरूनि गोदोहन । वृषभाखालीं बैसला ॥११०॥
राधेकडे करूनि वदन । इकडे ओढी वृषभाचा वृषण ।
भुलला राधेसी देखोन । नाहीं स्मरण कदापि ॥१११॥
राधावदनशशांक । देखोनि भुलला व्रजपालक ।
दोन्ही नेत्रचकोर सुरेख । स्नेहेंकरूनि पाहती ॥११२॥
यशोदा आली आंगणी । तो वृषभ दुहिताहे चक्रपाणी ।
माता म्हणे ते क्षणीं । काय करितोसी गोपाळा ॥११३॥
राधेकडे लावूनि नेत्र । मातेसी देत प्रत्युत्तर ।
म्हणतो काढितों गायीची धार । भरणा समग्र भरला हो ॥११४॥
माता म्हणे बरवें पाहें । दुहितोसी वृषभ कीं गाय ।
खालीं पाहे निजभक्तप्रिय । तो वृषभ दृष्टीं देखिला ॥११५॥
मातेसी म्हणे कमलानायक । देवाचा नवस चुकलीस बहुतेक ।
चौंथानांचें थान एक । इतुक्यामाजी जाहले ॥११६॥
माता म्हणे श्रीहरी । तुझें मन नाहीं थारीं ।
तंव द्वारीं देखिली कुरंगनेत्री । राधा सुंदरी तेधवां ॥११७॥
माता म्हणे घट घेऊनि शिरीं । कां गे येथें उभी द्वारीं ।
येरी चालली झडकरी । यमुनानीर आणावया ॥११८॥
गेली घेऊनि यमुनाजीवन । तों खेळावया आला जगज्जीवन ।
राधेच्या द्वारीं येऊन । मुलें मेळवून उभा असे ॥११९॥
तों राधिका ओसरीवरी । मंथनासी आरंभ करी ।
तों नेत्रीं देखिला श्रीहरी । जलदवर्ण साजिरा ॥१२०॥
तिकडे वेधले राधेचें नयन । विसरली गोरसमंथन ।
रित्या डेर्‍यांत रवी घालून । घुसळी पूर्ण निजछंदें ॥१२१॥
श्रीहरीनें मोहिलें मन । नाठवे देहगेहअभिमान ।
वृत्ति गेली मुरोन । ब्रह्मानंदसागरीं ॥१२२॥
समरस झालीं आत्मप्रकाशीं । नाठवेचि दिवसनिशी ।
लवण मिळतां जळासीं । परी तैसीच जाहली ॥१२३॥
नलगे पातया पातें । वृत्ती आकर्षिल्या रमानाथें ।
हृदयीं दाटोनि आनंदेभरतें । आपणातें विसरली ॥१२४॥
तों खडखडां वाजे डेरा । सासू धांवूनि आली द्वारा ।
सक्रोध बोले ते अवसरां । राधेलागीं वृद्धा ते ॥१२५॥
कां गे मंथतेसी रिक्तपात्र । काय गेले तुझे नेत्र ।
काय न ऐकती तुझे श्रोत्र । रिता डेरा खडबडितां ॥१२६॥
राधा म्हणे ऐका मामिसें । डेरा धड कीं फुटका असे ।
रिता घुसळोनि पाहतसें । तगेल कीं न तगेल म्हणूनियां ॥१२७॥
सासू म्हणे मन नाहीं स्थिर । तों द्वारीं उभा श्यामसुंदर ।
वृद्धा म्हणे तुझें चित्त व्यग्र । खंजनाक्षी जाहलें ॥१२८॥
वृद्धा म्हणे कृष्णासी । कां रे तूं येथें उभा अससी ।
येरू म्हणे आम्ही खेळतों बिदीसी । तूं कां दवडिसी थेरडे ॥१२९॥
वांकडे तोंड करून । वृद्धेसी वेडावी जगज्जीवन ।
वृद्धां धांवे क्रोधेंकरून । पळे मनमोहन तेथूनि ॥१३०॥
घरीं नंदासवें जेविला । तों दोन प्रहर दिवस जाहला ।
पुढें घेऊनि सांवळा । यशोदा निजे मंचकावरी ॥१३१॥
म्हणे कृष्णा खोडी न करीं । जाऊं नको कदा बाहेरी ।
पुढे घेऊनि पूतनारी । निद्रा करी सावकाश ॥१३२॥
तों इकडे राधिका सुंदरा । उदका आली यमुनातीरा ।
मनीं म्हणे यादवेंद्रा । कधीं आतां भेटसी ॥१३३॥
वस्त्र लावूनियां नेत्रां । स्फुंदत उभी राधा सुंदरा ।
म्हणे गुणसमुद्रा जगदुद्धारा । प्राण देईन मी आतां ॥१३४॥
जगन्नायका जगज्जीवना । यमुनाजीवनीं देईन प्राणा ।
माझ्या वेधका मनमोहना । तुझ्या चरणां अंतरलें ॥१३५॥
ऐसें राधेचें अंतर । जाणोनियां करुणाकर ।
हळूच उठोनियां सर्वेश्वर । यमुनातीरा पातला ॥१३६॥
तों जाहली खरी दुपारी । दुजें कोणी नसे यमुनातीरीं ।
सवेग येऊनि मुरारी । धरिली निरी राधेची ॥१३७॥
राधा म्हणे चक्रपाणी । संसारा माझ्या पाडिलें पाणी ।
माझें नांवरूप बुडविलें जनीं । विपरीत करणी तुझी कृष्णा ॥१३८॥
तूं दिसतोसी किशोर । तुझी करणी गगनाहूनि थोर ।
विपरीत तुझें चरित्र । ब्रह्मादिकां कळेना ॥१३९॥
जागी जाहली नंदराणी । तों पुढे न दिसे कैवल्यदानी ।
म्हणे कोठें गेला उठोनी । कळी घेऊनि येईल आतां ॥१४०॥
श्रीकृष्णाचा माग काढीत । माता चालिली शोधीत ।
जैसी वेदश्रुति निर्वाणपंथ । सूक्ष्म काढीत शोधून ॥१४१॥
यमुनातीरा आली यशोदा । तों उभीं कृष्ण आणि राधा ।
राधा म्हणे सच्चिदानंदा । आली माया तुझी पैं ॥१४२॥
आतां तुज आणि मज येथें । ताडन करील स्वहस्तें ।
तों यशोदा म्हणे हरीतें । कैसें तूतें वाटतें पैं ॥१४३॥
तों हरि स्फुंदस्फुदोनि रडत । माते मी बिदीस होतों खेळत ।
इनें माझा कंदुक सत्य । उचलोनियां आणिला ॥१४४॥
मी रडत लागलो पाठीसीं । माते कंदुक आहे इजपाशीं ।
तो देववीं म्हणे हृषीकेशी । लोळणी तेथें घातली ॥१४५॥
राधेसी म्हणे यशोदा । कां ओरडविसी गोविंदा ।
नसतेच अपवाद सदा । बाळावरी घालितां गे ॥१४६॥
राधा म्हणे ते वेळीं । मामिसें अकल्पित घेतो किटाळी ।
चेंडू नाहीं मजजवळीं । नसतीच आळी घेतो हा ॥१४७॥
कृष्ण म्हणे मातेसी । झाडा घेईं तूं इजपाशीं ।
चेंडू निघेल निश्चयेंसीं । जननीये आतांचि ।१४८॥
राधिका गदगदां हांसे । वस्त्र चहूंकडे झाडीतसे ।
सच्चिदानंदें परमपुरुषें । थोर केलें लाघव ॥१४९॥
घेतला नसतां एकाएक । अवचितां पडला कंदुक ।
गदगदां हांसे वैकुंठनायक । अकळ देख लीला त्याची ॥१५०॥
राधा अधोमुख पाहात । म्हणे याची करणी अद्‌भुत ।
अष्टभावें सद्गदित । राधा जाहली तेधवां ॥१५१॥
माया म्हणे तुम्ही गौळिणी । महानष्टा व्यभिचारिणी ।
माझा ब्रह्मचारी चक्रपाणी । बोलिजे जनीं विपरीत ॥१५२॥
पांच वर्षांचें तान्हें बाळ । त्यावरी घेतां नसतीच आळ ।
टाकूनि जावें गोकुळ । या लोकांभेणें पैं ॥१५३॥
सद्गदित माया जाहली । अष्टभावें पूर्ण दाटली ।
कडेवरी घेऊनि वनमाळी । माया चालिली मंदिरा ॥१५४॥
कडे घेतला ब्रह्मांडनायक । करी झेलीतसे कंदुक ।
वारंवार माया देख । मुख चुंबीत हरीचें ॥१५५॥
राधेनें घटीं भरूनि जीवना । घरासी गेली पद्मनयना ।
पूर्णब्रह्म वैकुंठराणा । मनीं कळलें राधेसी ॥१५६॥
लोकांत फुटों नेदी शब्द । नित्य भोगीत परमानंद ।
सांडूनियां विषयभेद । निजबोधा पावली ॥१५७॥
राधा केवळ निजभक्ती । तीस वश झाला जगत्पती ।
अनंत जन्मींचें तप निश्चितीं । एकदांचि फळा आलें ॥१५८॥
हे इंद्राची इंद्राणी । इनें विष्णु अभिलाषिला मनीं ।
सप्त जन्म तप घोर करूनी । चक्रपाणी पावली हे ॥१५९॥
इकडे माया म्हणे मुरारी । जाऊं नको तूं बाहेरी ।
चोरीचाही आळ तुजवरी । घेती सुंदरी गोकुळींच्या ॥१६०॥
गौळिणींस म्हणे यशोदा । चोरी करितो म्हणतां गोविंदा ।
तरी सणगावरी मुकुंदा । धरूनि एकदां आणा गे ॥१६१॥
कृष्णासी धरावया गौळिणी । जपत असतां दिनरजनीं ।
तों एकीलागीं चक्रपाणी । गोरस भक्षितां सांपडला ॥१६२॥
एकलाचि निघाला घरांत । दधिभाजन वरूनि फोडीत ।
मुखेंकरूनि दधि भक्षीत । वैकुंठनाथ निजलीलें ॥१६३॥
दधिचर्चित वदन । दिसे परम शोभायमान ।
तों अकस्मात गौळण येऊन । करीं धरिलें हरीसी ॥१६४॥
चाल रे तुझ्या मातेपासीं । म्हणोनि ओढूनि आणिला बिदीसी ।
सांगे समस्त गौळिणींसी । या गे हृषीकेशी सांपडला ॥१६५॥
जे जे गौळण येई घरांतून । तिचे हातीं एक एक कृष्ण ।
लक्षानुलक्ष स्वरूपें पूर्ण । एकासारिखीं चहूंकडे ॥१६६॥
पंचवर्षी सांवळ्या मूर्ती । एकसारिखीं खापरें हातीं ।
दधि मुखीं माखलें निश्चितीं । ओढूनि नेती मायेपाशीं ॥१६७॥
यशोदेपाशीं आल्या सांगावया । तों तिचे कडेवरी असे कान्हया ।
तटस्थ होवोनियां माया । चहूंकडे विलोकी ॥१६८॥
जिकडे पाहे तिकडे कृष्ण । असंख्यात स्वरूपें परिपूर्ण ।
बोलावयासी वचन । ठाव कोठें असेना ॥१६९॥
मागें पुढें यशोदा पहात । तों अवघा व्यापिला जगन्नाथ ।
तो ब्रह्मानंद सदोदित । नाहीं अंत स्वरूपासी ॥१७०॥
माया पाहे घरांत बाहेरी । पाळणां आणि ओसरीवरी ।
अवघा कृष्णचि निर्धारीं । मायादेवी पाहतसे ॥१७१॥
देवापासीं एक बैसलासे । डोल्हारीं एक खदखदां हांसे ।
एक तो पाळण्यांत रडतसे । स्तन देईं म्हणोनियां ॥१७२॥
एक कृष्ण घरांत जेवीतसे । एक आंगणीं रांगे हर्षें ।
एक स्तनपान करीतसे । मायेपुढें निजोनि ॥१७३॥
एक आंगणीं गडबडां लोळत । एक देहावरी धुळी घालीत ।
एक पदरीं धरूनि ओढीत । मातेलागीं ते वेळीं ॥१७४॥
यशोदा समाधिस्थ स्वानंदें । ब्रह्मांड भरिलेंसें गोविंदें ।
विश्व कोंदलें ब्रह्मानंदें । न दिसे दुजें सर्वदा ॥१७५॥
माया जों खालीं घाली दृष्टी । तंव कृष्णरूप दिसे सृष्टी ।
अवघाचि विश्वंभर जगजेठी । दुजेविण एकला ॥१७६॥
सकळ गौळिणी तन्मय झाल्या । ठाव नाहीं गार्‍हाणीं द्यावया ।
गेलिया देहभाव विसरोनिया । न दिसे मायाओडंबर ॥१७७॥
अवघा भरला हरि एक । वेदांचेहि मावळले तर्क ।
शास्त्रें भांबावलीं देख । सहस्रमुख लाजला ॥१७८॥
कवणासी सांगावें गार्‍हाणें । सर्वही व्यापिलें नारायणें ।
राहिलें सर्वांचें बोलणें । दृष्टीचें पाहणें विरालें ॥१७९॥
एकीकडे एक गोपी पहाती । तंव त्या अवघ्याचि कृष्णमूर्ती ।
नाहीं स्त्री-पुरुषव्यक्ती । त्रिजगतीं हरिरूप ॥१८०॥
न दिसती लोक गोकुळ । अवघा एक घननीळ ।
पूर्णब्रह्मानंद निर्मळ । अचल अढळ अव्यय ॥१८१॥
योगी करिती अष्टांगसाधन । त्यांसीही नव्हे ऐसें दर्शन ।
साधिती पंचाग्निसाधन । त्यांसही खूण न कळेचि ॥१८२॥
तीर्थें करितां परम श्रमले । जे शास्त्रश्रवणीं बहु भागले ।
त्यांस या सुखाचे सोहळे । कदाकाळीं न लाभती ॥१८३॥
धन्य भाग्य गौळियांचें त्रिशुद्धि । लाविली केवळ पूर्णसमाधि ।
निरसल्या सकळ आधि व्याधि । ब्रह्मानंदीं निमग्न ॥१८४॥
निरसला सकळ भेद । ओतिला सकळ गोविंद ।
गौळियांचें पुण्य अगाध । न समाये ब्रह्मांडीं ॥१८५॥
ऐसे जाणोनि कृपानिधी । म्हणे अवघ्यांसी लागली समाधी ।
आतां हे विरतील ब्रह्मानंदीं । अव्ययरूप अभेद ॥१८६॥
मग ऐशा प्रेमळ निश्चितीं । मज पुन्हां कैंच्या मिळती ।
मी वेधलों यांचे भक्तीं । कायशा मुक्ती यांपुढें ॥८७॥
यांचा देहभाव गेला विरून । हरीनें योगमाया घालून ।
आपली रचना संपूर्ण । झांकिली हो तेधवां ॥१८८॥
तो एकलाच मायेपाशीं । उभा असे हृषीकेशी ।
मौनेंचि गौळिणी गेल्या गृहासी । बोलावयासी ठाव नाहीं ॥१८९॥
सर्वही व्यापिलें यादवेंद्रे । बोलायला नाहीं दुसरें ।
सच्चिदानंद सर्वेश्वरें । थोर दाविलें लाघव ॥१९०॥
हरिविजयग्रंथ थोर । हेचि कृष्णवेणी वाहे साचार ।
भक्तिकन्यागतीं सादर । भाविक नर धांवती ॥१९१॥
येथींच्या अर्थीं बुडी देऊन । जे सदा करिती अघमर्षण ।
ते मायेस मागें लोटून । पावती पूर्ण ब्रह्मानंद ॥१९२॥
ब्रह्मानंदें विनवी श्रीधर । पुढें रसाळ कथा असे परिकर ।
संतश्रोतीं व्हावें सादर । कृपा करूनि मजवरी ॥१९३॥
इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंश भागवत ।
चतुर श्रोते परिसोत । अष्टमोऽध्याय गोड हा ॥१९४॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीगणेशाय नमः । आपल्या मुलाच्या द्वाडपणावर उपाय म्हणून यशोदेला संकष्ट चतुर्थी व्रत करायला एका गोपीने सांगितले. तिने ते व्रत केले. कृष्णाने त्या दिवशी एकही खोडी केली नाही. यशोदेला वाटले, "खरेच गजानन पावलाच म्हणायचा !" दुसर्‍या संकष्ट चतुर्थीला तिने एकवीस लाडवांचा नैवेद्य दाखविला. मोदकही भरपूर केले होते. लाडू आणि मोदक तिने एका बाजूस ठेवले होते. मला भूक लागली लाडू खायला दे असे म्हणून कृष्ण हट्ट धरून बसला. यशोदा म्हणाली आधी देवाला नैवेद्य आणि मग तुला लाडू. त्याला तिने दटावून गप्प बसविले. जरा वेळाने ती पूजेचे साहित्य आणण्यास दुसर्‍या दालनात गेली. तेवढ्यात कृष्ण देव्हार्‍यात शिरला आणि मोठे रूप धारण करून त्याने सर्व लाडू आणि मोदक फस्त केले. टोपली देव्हार्‍यावर उपडी टाकली. यशोदा आली, पाहते तो रिकामी टोपली देव्हार्‍यावर पडलेली !

"कृष्णा, एवढा नैवेद्य कोठे रे गेला ? तुझेच काहीतरी कारस्थान दिसते." कृष्ण म्हणाला- "माझ्यावर कशाला आळ घेतेस ? खरे सांगू का ? तू गेलीस आणि येथे मोठ्या उंदरावर बसून गणेशदेव आला. खूप मोठे पोट होते त्याचे. मला तर भीतीच वाटली. त्याने सगळे लाडू आणि मोदक सोंडेने तोंडात टाकले. इथे मला भूक लागली आहे पण त्याने मला एक सुद्धा लाडू दिला नाही !" यशोदेला काही हे पटले नाही. तिने त्याच्यावर आळ घेतला आणि तोंड उघडून दाखवायला सांगितले. आई मारील या भीतीने त्याने तोंड उघडले. तो काय ! यशोदेला त्याच्या मुखात सर्व देवता आणि सप्तलोक दिसले. गणपतीही त्यात होता. तिला भास झाला - गणपती बोलत आहे- "यशोदे, कृष्ण हाच विष्णू आहे. आम्ही त्याचे सर्व देव सेवक आहोत. तू ह्याची सेवा कर. ह्यालाच भरव, म्हणजे सर्व देव संतुष्ट होतील." तिचे देहभान हरपले समाधी लागली. मग भानावर आली. समोर कृष्ण दिसला. भूक भूक करत होता. तिला अत्यानंद झाला. भावावस्थेत ती थरथर कापू लागली. आनंदाश्रू ओसंडू लागले. तिने कृष्णाला उचलले आणि भरविले. देवाला खरा नैवेद्य हाच झाला !

एकदा कृष्ण आणि बलराम बाहेर खेळत होते. कृष्णाने माती खाल्ली. बलरामाने यशोदेला येऊन ते सांगितले. हातात छडी घेऊन यशोदा अंगणात गेली. कृष्णाला दरडावून म्हणाली, "मार पाहिजे का आता ? माती खाल्लीस ना ? तोंड उघडून दाखव ?" मार चुकवीत कृष्ण म्हणाला, 'दादा उगाच आळ घेतो ! मी मुळ्‌ळीच माती खाली नाही. बघ.' असे म्हणून त्याने आपले तोंड उघडले तेव्हा पुन्हा तिला त्याच्या मुखात सारे विश्व दिसले. तिला कसलेच भान उरले नाही. तटस्थ होऊन ती मायेचा विलास पहात राहिली. कुठली छडी आणि कुठला मार !

कृष्ण स्कटिकभूमीत पडलेले स्वतःचे प्रतिबिंब काढून मागायचा. ते कसे काढू देणार ? थोपटून निजवावे तर मुळीच निजत नसे. राधा म्हणून एक गोपी होती. तिच्याजवळ मात्र चांगला रहायचा. राधा म्हणजे आराधना. राधा म्हणजे भक्ती. वैष्णवांची ती खरी गुरू होय.

कृष्णाला घेऊन ती झोपाळ्यावर बसे. झोके देई. त्यावेळी तिच्या भक्तीमुळे कृष्ण पुरुषोत्तमाचे रूप घेई. तो लहान मूल रहात नसे. विष्णूचे साक्षात रूप तिला दिसत असे. ती त्याच्याशी अंतःकरणाने मिसळून जाई. तिच्या सर्व इच्छा व कामना त्याच्या चरणी विलीन झालेल्या होत्या. झोपाळ्यावर बसताना तिने दाराला आतून कडी लावून घेतली होती. बाहेरून तिचा पती अनय हा आला आणि जोरजोरात कडी वाजवू लागला. राधेसाठी विष्णूरूप झालेला कृष्ण पुन्हा बालरूप झाला. राधा भानावर आली. कडी उघडून तिने पतीला आत घेतले. अनय राधेला म्हणाला, "राधे, कृष्ण तुझ्याजवळ रमतो नाही का ? तू एकटीच असतेस. त्याला रोज घरी आणीत जा. आई आणि मी कामात गुंतलेले असतो तुला तेवढाच विरंगुळा होईल." त्यानेही कृष्णाला उचलून घेतले. त्याचे कौतुक केले व राधेजवळ परत दिले.

तेव्हापासून रोज राधा कृष्णाला खेळविण्यासाठी घरीं घेऊन येऊ लागली. रोज तो तिच्यासाठी प्रौढरूप धारण करीत असे. होता होता कोणाला तरी हे रहस्य कळले. इकडे राधेला कृष्णशिवाय चैन पडत नसे आणि कृष्णाला राधेचे वेडच लागले होते. राधा आपल्या मैत्रिणींजवळ आपल्या भावावस्थेतील गोष्टी सांगे. त्याही शृंगारिक होत्या. सगळ्यांना हे अनुचित वाटले. राधेच्या सासूने राधेला आणि यशोदेने कृष्णाला एकमेकांना भेटायची बंदीच केली. गोकुळात राधेची दुष्कीर्ती झाली. तिला कृष्णाचा विरह सहन होईना. अन्नपाणी गोड लागेना. सासू तिला कधी कधी कोंडून ठेवी. राधा रडत बसे. ती दागिने घालीनाशी झाली. फुलांचा दुस्वास करू लागली. रात्ररात्र जागून काढी. कृष्णाच्या आठवणी काढून कुढत बसे. न पतीशी बोलणे न सासूशी. तिची तळमळ काय ती तिलाच माहीत ! एकदा काय झाले, ती नंदाच्या घरासमोरूनच चालली होती. कृष्णाला ती दिसली. तिला तो दिसला. कृष्ण त्यावेळी गाईची धार काढत होता. एका गाईची धार काढून झाली होती. राधेकडे पाहता पाहता कृष्ण चुकून चरवी घेऊन बैलाखाली जाऊन बसला. राधा सुद्धा डोक्यावर घडा घेऊन तटस्थ राहिली. तेवढ्यात यशोदा आली. तिने दोघांची अवस्था पाहिली. राधेला घालवून दिले. कृष्णाला विचारले हे काय चाललेय. कृष्णाने पाहिले आणि वेळ मारून नेली. म्हणाला," आई, बहुतेक तुझा एखादा नवस चुकला असावा. गाईची आचळे जाऊन नुसतीच कास कशी राहिली ?" यशोदेने त्याची बकोटी धरली आणि त्याला गाईखाली नेऊन बसविले.

एकदा कृष्ण रस्त्याने जात होता. राधेला तो दिसला. तिला त्यावेळी ताक करायचे होते पण भान कुठले ? रिकाम्या घटात रवी घालून ती फिरवू लागली. सासूने विचारले, "काय घुसळते आहेस ?" तेव्हा भानावर आली आणि म्हणाली, "रागावू नका, घडा पक्का आहे की नाही ते पहात होते." त्यावर सासू काय बोलणार ? खरेच ! कुटुंबातल्या एखाद्याला भगवंताचे वेड लागले की इतरांची परिस्थिती फार बिकट होते. काय करावे ते त्यांना कळतच नाही. सासूने कृष्णाला पाहिले आणि घालवून दिले. तिला वाकुल्या दाखवीत तो निघून गेला.

एकदा काय झाले; राधा यमुनेवर गेली होती. कृष्ण तिथे एकटाच होता. त्याला पहाताच ती धावत गेली आणि त्याला बिलगली. मनाचे सारे बांध तोडून ती हमसाहमशी रडू लागली. त्याला पोटाशी धरून निर्वाणीचे बोलू लागली. "कृष्णा, मी या यमुनेत आता जीव देणार. तुझ्याशिवाय मी आता जगू शकत नाही. तू माझ्या संसाराचा विचका करून टाकलासः काय तुझी ही करणी ! माझे नाव तूच बुडविलेस. तुझ्यासाठी लोकलज्जा गुंडाळून ठेवली. आता मी जगू शकणार नाही." कृष्ण तिची समजूत घालीत होता तेवढ्यात यशोदा कृष्णाचा शोध घेत तेथे आली. राधेला कृष्ण बिलगून बसला होता. नदीतीरावर दुसरे कोणीच नव्हते. यशोदा पहातच राहिली. मग भानावर येऊन तिने विचारले, "तुम्ही दोघे इथे काय रे करता या अवेळी ?" तेव्हा कृष्णाने पटकन उत्तर दिले, "या राधेने माझा चेंडू पळवून आणला आहे. तो ती देत नाही म्हणून मी झगडत होतो." हे ऐकून राधासुद्धा चकित झाली. तेवढ्यात कृष्णाने आपल्या मायाशक्तीने चमत्कार केला. राधेच्या वस्त्राला त्याने हिसका दिला तो त्याचा चेंडू जमिनीवर पडला ! राधा थक्क झाली. यशोदेला सारे पटले होते. कृष्णाला उचलून घेऊन ती परत आली. येताना म्हणाली, 'स्वतःच माझ्या मुलाच्या खोड्या काढतात आणि माझ्या मुलावर आळ घेतात !'

भक्ताची लाज राखण्यासाठी भगवंत स्वतः दुसराच आळ भक्तावर घेतो तो पहा ! या प्रभूची लीला विचित्र आहे ! राधा हीच शची होय. विष्णूने तिच्या भक्तीने संतुष्ट होऊन कृष्णावतारात तिला आपले नितांत प्रेम दिले होते.

एकदा यशोदेने कृष्णाला घरातच थांबवून ठेवले. "कृष्णा, तुझ्यावर चोरीचे आळ घेतात त्या गोपी आज येऊं देत ! तू इथेच आहेस असे दिसले की बसतील गप्प ! कृष्णाने ते एकदम मान्य केले.

पण झाला प्रकार भलताच ! एका गोपीने आपल्या घरी लोणी चोरताना कृष्णाला पकडले (तो मुद्दामच सापडला होता कारण त्याला आणखीच एक लीला दाखवायचे मनात होते) त्याला धरून ती यशोदेकडे तरातरा चालत आली. पण वाटेत तिला काय दिसले ? प्रत्येक घरातून गोपी कृष्णाला घेऊन, यशोदेजवळ त्याच्या खोड्यांबद्दल गार्‍हाणे सांगायला निघालेली ! सार्‍याजणी थक्क ! पण धीर करून सर्व कृष्णांना घेऊन यशोदेकडे आल्याच. तिथे पहातात तो यशोदेजवळ कृष्ण अगदी साळसूदपणे बसलेला त्यांना दिसला ! सर्वजणींना अशी काही प्रेमभावावस्था आली की त्यांचे भानच हरपले ! त्यांना सर्वच हरिमय झाले ! पहावे तिकडे लोणी हातात घेऊन खाणारा बालकृष्ण दिसू लागला ! आणि नंतर तर प्रत्येकीला तो वेगवेगळ्या खोड्या करताना दिसू लागला ! यशोदेचेही देहभान सुटले ! हरीने अघटित मायाच दाखविली ! सार्‍या कठीण व्रतांनी जो प्राप्त होत नाही तो त्या ऋजु मनाच्या गोपींसाठी बालरूप घेऊन अनेक प्रकारे क्रीडा करीत होता !

पुन्हा गोपी पहातात तो यशोदेजबळ एकटा कृष्ण बसलेला आहे आणि आपण सगळ्याजणी उगीच हात हलवीत आलो असे दिसले ! काय करणार आतां ? मनच कृष्णमय झालेल्या त्या गोपी परत गेल्या ! कृष्ण हसत होता आणि यशोदा प्रेमाने अश्रुमोचन करीत होती !
अध्याय ८ समाप्त
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


GO TOP