|
॥ श्रीहरिविजय ॥ ॥ अध्याय सातवा ॥
कृष्णाच्या बाललीला -
श्रीगणेशाय नमः ॥
जय जय सच्चिदानंद सगुण । अतीसीकुसुमभास तूं पूर्ण । वाटे त्याच रंगेंकरून । नीलोत्पलें रोविलीं ॥१॥ नभासी चढला तोचि रंग । त्याचे प्रभें रंगले मेघ । इंद्रनीळ हरिरंग । त्याच प्रकाशें जाहलें ॥२॥ तेथींचें सौंदर्य अद्भुत । गरुडपाचूंसी तेज चढत । मर्गजासी बीक दिसत । तनु सांवळी देखोनियां ॥३॥ लावण्यामृतसागराद्भुत । कीं कोटिमकरध्वजांचा तात । तो पुष्पधन्वा उदरीं जन्मत । अंकीं खेळत जयाच्या ॥४॥ श्यामलांगी अतिनिर्मळ । वरी डोले वैजयंतीमाळा । पुष्करीं शक्रचाप सुढाळ । सुरंग जैसें मिरवे पैं ॥५॥ कीं मेघीं स्थिरावली क्षणप्रभा । तैसी वैजयंतीची शोभा । सहस्रमुखाचिया जिभा । शिणल्या गुण वर्णितां ॥६॥ इंद्रनीळाचा मेरु प्रभाघन । वेष्टिला शातकुंभतगटेंकरून । तैसें झळकत वसन । हरिजघनीं सर्वदा ॥७॥ कीं सकळ चपळा गाळून । रंगविले हे पीतवसन । वाटे द्वादश भानु येऊन । कटीं मेखळेवरी जडियेले ॥८॥ पांघरावयाचा क्षीरोदक । कीं शुभ्र यशा चढलें बीक । कीं शुभ्र श्वेत मृडानीनायक । कर्पूरेंकरूनि उटिला ॥९॥ कीं शुद्धरजततगटीं घडिलें । कीं पारदें कैलास डवरिलें । कीं जान्हवीतीरीं वोपिलें । दिनकरनाथें स्वहस्तें ॥१०॥ अंगीं उटी दिसे सुढाळ । कीं इंदुबिंब उकललें निर्मळ । कीं मुक्ताफळांचा गाळून ढाळ । इंद्रनीळ चर्चिला ॥११॥ त्रिभुवनसौंदर्य एकवटलें । तें हरिमुखीं येवोनि ओतिलें । आनंदाचें स्वरूप उजळलें । रूपा आलें हरिमुखीं ॥१२॥ हरिअंगींचा अखिल सुवास । भेदूनि गेला महदाकाश । कीं ब्रह्मानंद भरोनि निःशेष । सगुण सुरस ओतिलें ॥१३॥ आनंदसरोवरींचीं कमळदळलें । तैसे आकर्णनेत्र विकासले । ते कृपादृष्टीनें निवाले । प्रेमळ जन सर्वही ॥१४॥ अहो तें स्वानंदरूप सगुण । कीं कमलेचें सौभाग्य पूर्ण । कीं सद्भक्तांचें निजधन । ठेवणें हें आकारलें ॥१५॥ तो वैकुंठीचा वेल्हाळ सुंदर । कीं भक्तमंदिरांगणमंदार । पद्मोद्भवाचा तात उदार । गोकुळामाजी अवतरला ॥१६॥ मत्स्य कच्छ रूपें धरीं श्रीपती । परी तेथें न बैसे लोकांची भक्ती । म्हणोनि गोकुळीं आला व्यक्ती । मानववेष धरूनियां ॥१७॥ जे कां विषयपर जन । न ऐकती हरीचे गुण । त्यांसी शृंगाररस दावून । वेधी मन आपणाकडे ॥१८॥ भक्तांसी विघ्नें येती प्रबळ । तीं निजांगीं सोशी तमाळनीळ । मर्दूनियां दुर्जन खळ । भक्त प्रेमळ रक्षीतसे ॥१९॥ सबळ काष्ठें भ्रमर कोरी । पिष्ट करी क्षणाभीतरी । परी कमळास निर्धारीं । धक्का न लावी सर्वथा ॥२०॥ कमळआकोचें कोंडे भ्रमर । परी तें न फोडीच अणुमात्र । तैसे दासांचे अन्याय समग्र । सोसूनि रक्षी तयांतें ॥२१॥ तिळमात्र पाषाण । जळीं न तरे देखती जन । तेथेंचि सबळ काष्ठ तरे पूर्ण । कदा जीवन न बुडवी ॥२२॥ जीवनीं हाचि अभिमान । कीं आपण वाढविलें काष्ठ पूर्ण । तें न बुडवीं मी कदा जाण । कालत्रयीं सहसाही ॥२३॥ त्या काष्ठाच्या नौका होती । आणिक जड जीवां तारिती । तैसे भगवद्भक्त उद्धरिती । बहुतांसही समागमें ॥२४॥ आणि जलकाष्ठन्यायें निश्चित । शरणागतां तारी भगवंत । नाना चरित्रें अद्भुत । दावी भक्तां तारावया ॥२५॥ असो षष्ठाध्यायीं कथा । गौळणीनें ठकविलें कृष्णनाथा । गोरस मथुरे विकूं जातां । अति अनर्थ पावली ॥२६॥ गोरस न देऊनि वनमाळी । गौळणचि परम ठकली । सच्चिदानंदमूर्ति सांवळी । महिमा न कळे तियेतें ॥२७॥ नवल एक गोकुळीं वर्तलें । एका गौळियानें स्त्रियेसी सांगितलें । म्हणे दधि दूध जें सांचलें । अनसूट धरीं येथूनि ॥२८॥ भगवंताचा नवस पुरवीन । करीन ब्राह्मणसंतर्पण । तरी घृत ठेवीं सांचवून । अवश्य म्हणे नितंबिनी ॥२९॥ घृत सांचलें बहुत । स्त्रीनें अर्ध चोरिलें त्यांत । शेजारिणीच्या घरीं त्वरित । घट भरूनि ठेविला ॥३०॥ स्त्रियांचें कर्तृत्व न कळे भ्रतारां । महाअनृता अविचारा । सकळ असत्याचा थारा । भय न धरिती पापाचें ॥३१॥ अनृत साहस माया मूर्खत्व । अतिलोभ अशौच निर्दयत्व । हे स्वभावगुण सत्य । स्त्रियांच्या ठायीं असती हो ॥३२॥ गौळियानें महोत्सव केला । नवस श्रीहरीचा फेडिला । परी घृतघट जो ठेविला । तो कळला श्रीरंगातें ॥३३॥ बाहेर गेली घरची सुंदरी । कृष्ण प्रवेशला तिचें मंदिरीं । घृतघट काढोनि झडकरी । नेला दूरी ते वेळीं ॥३४॥ मेळविलीं गौळियांचीं बाळें । घृत तें सकळांसी वांटिलें । कृष्णें आपण भक्षिलें । पूर्ण केलें नवसासी ॥३५॥ वसुधारा घृतावदान । येथें तृप्ति न पावे नारायण । तो गौळियांचें घृत चोरून । भक्षून तृप्त जाहला ॥३६॥ कमलासन मीनकेतनारी । सदा ध्याती तो कैटभारी । तो बळेंचि गौळियांचें घरीं । चोरूनि घृत भक्षीत ॥३७॥ असो घरा गेला वैकुंठराणा । यशोदा म्हणे जगज्जीवना । खोडी करूनि मनमोहना । कोठूनि आलासी सांग पां ॥३८॥ कडे घेतला कृष्णनाथ । माता हर्षें मुख चुंबीत । तों अंगासी माखलें घृत । माता पुसत हरीसी ॥३९॥ घृत लागलेंसे अंगा । कोठें गेला होतासी श्रीरंगा । आतां गार्हाणीं अतिवेगा । गौळिणी सांगों येतील ॥४०॥ येरीकडे गौळण ते पाहीं । सेजीच्या गृहा येत लवलाही । म्हणे माझा घृतघट देईं । आणूनियां सत्वर ॥४१॥ घरांत गौळण पाहत । तों आपलीं शिंकीं तैसींच समस्त । तो घृतघट नाहीं तेथ । नवल वाटलें तियेतें ॥४२॥ म्हणे बाई शिंकीं आणि घागरी । न दिसती कोठें मंदिरीं । आळ घालावी कृष्णावरी । तरी मागही कोठें दिसेना ॥४३॥ ते म्हणे तुझा गोरस उरला । माझाचि घृतघट कां गेला । नष्टे तुवांचि अभिलाषिला । कलह माजला अद्भुत ॥४४॥ ते गौळण वाहे आण । म्यां घृतघट ठेविला असेल चोरून । तरी हे हस्त जाऊं दे झडोन । कां तुवां आणोनि ठेविला ॥४५॥ मनीं गौळण विचारीत । कलह माजवावा बहुत । कळेल भ्रतारासी मात । तोही अनर्थ दुसरा ॥४६॥ मग ते म्हणे मृगनयनी । गलबला न करीं वो साजणी । माझ्या भ्रताराच्या श्रवणीं । गोष्टी जाईल सर्वथा ॥४७॥ बरें गेलें तरी जाऊं दे घृत । कृष्णार्पण झालें निश्चित । ऐसें बोलोनि त्वरित । गौळण गेली गृहातें ॥४८॥ गोकुळीं एक दंपत्यें । राखिती बहुत गोरसातें । राजीवनेत्रें तेथें । कौतुक केलें अद्भुत ॥४९॥ दोघें निजलीं मध्यरातीं । तेथें प्रकटोनि रमापती । एक मुंगूस निश्चितीं । दोघांमध्यें सोडिलें ॥५०॥ गृहींचा सर्व गोरस । स्वहस्तें काढी जगन्निवास । तृप्त झाला सर्वेश । शेषशायी परमात्मा ॥५१॥ मुंगूस दोघांमध्यें उकरी । तंव तीं होतीं निजसुरीं । एकाएकीं घाबरीं । हांक फोडीत ऊठलीं ॥५२॥ न सांवरत वसन । बाहेर आलीं भिऊन । म्हणती भूत उरावरी येऊन । बैसलें होतें दोघांच्या ॥५३॥ धांवा धांवा म्हणती कोणी । लोक मिळाले चहूंकडोनी । दीपिका लाविल्या तत्क्षणीं । पुसती दोघांसी तेधवां ॥५४॥ तंव तीं म्हणती भूत आलें । आम्हां दोघांमध्यें बैसलें । आम्हीं तत्काळ ओळखिलें । सदनाबाहेरी मग आलों ॥५५॥ पंचाक्षरी घेऊनि विभूती । द्वाराबाहेरचि फुंकिती । परी सदनीं कोणी न प्रवेशती । भय वाटे मनीं तयां ॥५६॥ तों घरांत हिंडे नकुळ । लोक म्हणती भूत सबळ । मग धीट गौळी जे तत्काळ । निःशंक आंत प्रवेशती ॥५७॥ तंव तें मुंगूस देखिलें । तत्काळ बाहेर आणिलें । लोक गदगदां हांसिले । नवल जाहलें तेधवां ॥५८॥ एक म्हणती मुंगूस सकाळीं । कांखेस घेऊनि वनमाळी । हिंडत होता आळोआळीं । त्याणेंच आणूनि सोडिलें ॥५९॥ एक म्हणती मोठा नष्ट । करणी करतो अचाट । गोकुळींचीं मुले चाट । तेणें समस्त केलीं पैं ।६०॥ जन गेले सदना सत्वर । तो उदय पावला सहस्रकर । मग ते गौळण चतुर । नंदमंदिरीं गेली हो ॥६१॥ मग म्हणे सुंदरी यशोदे । थोर पीडिलें मुकुंदें । मुंगूस सोडिलें गृहामध्यें । नवल गोविंदें केलें हो ॥६२॥ गदगदां हांसे नंदराणी । हरिवदन पाहे नयनीं । तों एक बोले गौळणी । तुज चक्रपाणी लावीन शिक्षा ॥६३॥ हरि तूं माझ्या घरा येसी । मी तुज बांधीन खांबासी । मग बोले हृषीकेशी । बांध कैसी पाहूं आतां ॥६४॥ गृहासी गेली गौळिणी । रात्रीं दृढ कपाटें देऊनी । भ्रतारासहित नितंबिनी । निद्रार्णवीं निगग्न ॥६५॥ पतीपुढें निजली कामिनी । तों पातला पंकजपाणी । पतीची दाढी तिची वेणी । धरूनि ते क्षणीं गांठी देत ॥६६॥ कृष्णें गांठी दिधली हटें । जे ब्रह्मादिकां न सुटे । जे न जळे हव्यवाटें । तीक्ष्ण शस्त्रें न कापेचि ॥६७॥ ऐसें करूनि जगन्मोहन । घरींचा गोरस सर्व भक्षून । नेला तेथूनि न लगतां क्षण । अतर्क्य विंदान हरीचें ॥६८॥ तों सरली अवघी रजनी । धार काढूं उठे कामिनी । तों ओढतसे तिची वेणी । मृगनयनी हांसतसे ॥६९॥ पतीस म्हणे सुंदरा । कांहीं तरी लाज धरा । मी काढूं जातें धारा । वेणी सत्वर सोडिजे ॥७०॥ अजूनि काय भोगव्यसन । उदय करूं पाहतो सहस्रकिरन । अद्यापि न धायेचि मन । वेणी सोडोनि द्यावी जी ॥७१॥ तंव तयाची दाढी ओढत । जागा जाहला पति त्वरित । स्त्रियेसी म्हणे तुझें चित्त । अजूनि इच्छीत कामातें ॥७२॥ सोडीं वेगीं माझी दाढी । जाय वेगीं धारा काढीं । बहु माजलीसी धांगडी । ओढीओढी करितेसी ॥७३॥ सोडीं दाढी गे तरुणी । उदयाद्रीवरी आला तरणी । पुढें अरुणोदय होवोनी । प्रकाश आरक्त पडियेला ॥७४॥ कीं पूर्वदिशेनें मुख धुतलें । निढळीं कुंकुम रेखिलें । तेंचि आरक्तवर्ण नभ जाहलें । अरुणोदय वाटतसे ॥७५॥ सूर्याआधीं उगवे अरुण । ज्ञानाआधीं जैसें भजन । कीं भजनाआधीं नमन । श्रेष्ठ जैसें सर्वांसी ॥७६॥ कीं तपाआधीं शुचित्व । कीं बोधाआधीं सत्त्व । कीं सत्त्वाआधीं अद्भुत । पुण्य जैसें प्रकटलें ॥७७॥ साक्षात्काराआधीं निजध्यास । कीं मननाआधीं श्रवण विशेष । कीं श्रवणाआधीं सुरस । आवडी पुढें विराजत ॥७८॥ कीं वैराग्याआधीं विरक्ति । कीं आनंदाआधीं उपरति । कीं महासुखासी शांति । पुढें आधीं ठसावे ॥७९॥ तैसा जाहला अरुणोदय । सोडीं मूर्खे दूरी राहें । दोघें उठोनि लवलाहें । बोलताती सक्रोध ॥८०॥ पति म्हणे चांडाळिणी । गांठ कां दिधली दाढीवेणी । येरी आण वाहे ते क्षणीं । माझी करणी नव्हे हे ॥८१॥ म्यां गांठ दिधली असेल । तरी हे नेत्र जातील । पति म्हणेल जिव्हा झडेल । जरी म्यां गांठ असेल दिधली ॥८२॥ नानाप्रकारें होती कष्टी । परी न सुटेचि कदा गांठी । सोडितां भागल्या चिमटी । अति हिंपुटी दोघेंही ॥८३॥ तो मायालाघवी जगजेठी । त्याची कोणा न सुटे गांठी । जरी आलिया परमेष्ठी । तरी न सुटे त्याचेनि ॥८४॥ भ्रतार म्हणे आणीं शस्त्र । वेणी कापूं तुझी सत्वर । येरी म्हणे दाढीच अणुमात्र । कातरूनि काढावी ॥८५॥ सौभाग्यदायक हे वेणी । कातरूं पाहतां ये क्षणीं । पति म्हणे कोणी करणी । केली ऐसी न कळे पां ॥८६॥ उदय पावला चंडकिरण । कोण करील गोदोहन । पति म्हणे शस्त्रेंकरून । दाढी माझी छेदी तूं ॥८७॥ तंव ते शस्त्रें न कापे सर्वथा । न तुटे न सुटे पाहतां । न जळे कदा अग्नि लावितां । विचित्र गति जाहली ॥८८॥ पति म्हणे ते वेळे । तुज जरी मरण आलें । तरी म्यांही मरावें वो वहिलें । पूर्वकर्म कैसें हें ॥८९॥ दीर्घस्वरें दोघें रडती । मग बिदीस येऊनि उभीं ठाकती । आल्यागेल्यास येती । काकुळती तेधवां ॥९०॥ व्याही जांवई पिशुन । भोंवते मिळाले बहुत जन । जे ते पाहती गांठी सोडून । परी ते जाण न सुटेचि ॥९१॥ कोणी कातरूनि पाहती । परी ते न कापे कष्टी होती । तो समाचार नंदाप्रति । एक सांगती कौतुकें ॥९२॥ नंद चावडिये बैसला । घेऊनि गौळियांचा मेळा । इंद्र जैसा मिरवला । देवसभेंत श्रेष्ठ पैं ॥९३॥ अंकीं बैसविला जगन्मोहन । जो अमलदलराजीवनयन । तो ब्रह्मानंद सगुण । गोकुळीं खेळे निज लीला ॥९४॥ जो सर्वांतर्यामीं वसे । जो सर्वांचीं मनें जाणतसे । जें जें प्राणी राहटतसे । हृषीकेशी जाणत ॥९५॥ जग नग हा कनक जाण । जग पट हा तंतु पूर्ण । जग तरंग हा सागर खूण । अभेदपण मोडेना ॥९६॥ असो नंदें ते वेळीं । दोघें चावडिये आणिलीं । पुढें स्त्री मागें गौळी । देखोनि सकळ हांसती ॥९७॥ नंदें पुसिलें वर्तमान । कोणीं गांठी दिधली येऊन । तंव तीं दोघें करिती रुदन । गहिंवरून करुणस्वरें ॥९८॥ म्हणती न कळे ईश्वरकरणी । गदगदां हांसे चक्रपाणी । म्हणे काल माझी शेंडी धरूनी । बांधीन म्हणत होतीस कीं ॥९९॥ तुज प्रचीत दाखविली भगवंतें । व्यर्थ बांधीन म्हणसी आम्हांतें । तंव तीं म्हणती हरीतें । आमुची गति काय आतां ॥१००॥ दीनवदनें भाकिती करुणा । कृपा आली जगज्जीवना । जो परब्रह्म वैकुंठराणा । वेद्पुराणां अगम्य जो ॥१०१॥ मग पाहतांचि कृपादृष्टीं । तत्काळ सुटली मायागांठी । आनंद न माये सकळ सृष्टीं । जगजेठी लाघवी हा ॥१०२॥ असो तीं दोघें जाहलीं सद्गदित । श्रीहरीचें वदन अवलोकीत । अहंकृति समस्त । बुडोनि गेली तेधवां ॥१०३॥ काम क्रोध जाहले लज्जित । मद मत्सर उठोनि पळत । दंभ मोह अनर्थ । जाहले गलित तेधवां ॥१०४॥ नमस्कारूनि यादवेंद्रा । दोघें गेलीं निजमंदिरा । सुख न माये अंतरा । दोघांचेही तेधवां ॥१०५॥ आणिक एके दिवशीं श्रीरंगें । नवल केलें भक्तभवभंगें । एके गोपीचें घरीं सवेगें । प्रवेशला गोविंद ॥१०६॥ तंव ते बोले मृगनयनी । कां आलासी येथें चक्रपाणी । काय पाहसी पाळती घेऊनी । जातोसी तें कळेना ॥१०७॥ चित्तचोरा सकळचाळका । जगन्मोहना महानाटका । संचितगोरसभक्षका । जगद्रक्षका जगदीशा ॥१०८॥ गोपी म्हणे कृष्णा बैस । तों करें नेत्र चोळी हृषीकेश । हळूंच बोले जगन्निवास । गौळणीस तेधवां ॥१०९॥ माझे दुखती वो नयन । मग बोले गोपी वचन । कांहीं औषधेंकरून । व्यथा दूर करावी ॥११०॥ मग बोले घननीळ । जे पुत्राचि माता असेल । तिचें दुग्ध तत्काळ । डोळियांमाजी घालिजे ॥१११॥ तंव ते कुरंगनयनी बोले वचन । माझे स्तनींचे दुग्ध जा घेऊन । मग बोले राजीवनयन । हास्यवदन करूनि ॥११२॥ म्हणे ते दुग्ध कामा न ये जाण । तूं मागसी तेंचि देईन । परी मी आपुल्या करयुगेंकरून । पिळीन स्तन तुझे वो ॥११३॥ ऐसें ऐकतांचि वचन । गोपी हांसली गदगदोन । म्हणे ऊठ चावटा येथून । नसतेंच वचन बोलसी ॥११४॥ पुढें पुढें वाढतां । बहु शहाणा होशील अच्युता । तुझे मातेपासीं तत्त्वतां । चाल अनंता सत्वर ॥११५॥ म्हणोनि धरावया धांविन्नली । उठोनि पळे वनमाळी । गोपी दारवंटा उभी ठाकली । तंव तो गेला सत्वर ॥११६॥ येऊनि मायेजवळी । गार्हाणें सांगे वेल्हाळी । यशोदा हांसे वनमाळी । कडियेवरी बैसलासे ॥१७॥ कृष्णाकडे माता पाहे । मुख चुंबीत लवलाहें । म्हणे हरि करूं काय । खोडी तुझ्या अनिवार ॥११८॥ असो कृष्ण एके दिवसीं । बाहेर गेला खेळावयासी । मुलें मिळालीं सरसीं । क्रीडताती हरीसवें ॥११९॥ सखयांसी म्हणे हरी । तुमची माता जातांचि बाहेरी । सांगा मज लौकरी । तेचि मंदिरीं रिघों वेगें ॥१२०॥ ज्या घरीं प्राप्त नोहे गोरस । ताडन करी त्यांच्या मुलांस । कां रे न सांगा आम्हांस । पाळती तुमच्या गृहींची ॥१२१॥ वासरांच्या पुच्छीं बांधी अर्भकें । आळोआळी पिटी कौतुकें । आक्रोशें रडती बाळकें । माता धांवती सोडावया ॥१२२॥ बाळें सोडोनि गौळिणी । मायेसी सांगती गार्हाणीं । म्हणती जावें गोकुळ टाकोनी । तुझ्या पुत्राचेनि त्रासें ॥१२३॥ घरीं राखीत बैसल्या जरी नारी । तरी वांसरें सोडितो बाहेरी । वत्सांपाठीं जातां झडकरी । मागें हरि गोरस खातो ॥१२४॥ ताक सांडी मडकीं फोडूनी । खापरें पसरितो आंगणीं । असार सांडी सार भक्षूनी । विचित्र करणी हरीची ॥१२५॥ सारूनि कर्मजाळ समस्त । स्वरूपप्राप्तीसी पावती संत । कीं शब्द टाकूनि अर्थ । सार जैसें घेइजे ॥१२६॥ शुक्ति सांडोनि घेइजे मुक्त । कीं प्रपंचत्यागें परमार्थ । क्रोधत्यागें जैसें समस्त । शांतिसुख हाता ये ॥१२७॥ भूस टाकूनि घेइजे कण । कीं धूळ टाकूनि घेइजे रत्न । कीं विषयत्यागें संपूर्ण । स्वानंदसुख सेविजे ॥१२८॥ ऐसें कृष्णें केलें सत्य । सार सेविलें नवनीत । ताक असार समस्त । लवंडोनि फोडी भाजनें ॥१२९॥ कोणीएक गजगामिनी । चालिली सूर्यकन्येच्या जीवनीं । घट भरूनि निजसदनीं । मृगनयना जातसे ॥१३०॥ तों ते वाटे आला गोंविंद । सवें शोभला बाळांचा वृंद । कृष्णाकडे पाहूनि छंद । लेंकरें बहुत करिताती ॥१३१॥ कृष्णें तेव्हां काय केलें । गोपीचें वस्त्र वेगें असुडिलें । तत्काळ धरेवरी पडिलें । उघडें जाहलें सर्वांग ॥१३२॥
कर गुंतले घागरीं । वस्त्र घेऊनि पळाला हरी ।
चोहटां ते नग्न नारी । सकळ लोक पाहती ॥१३३॥ काकुळती येत गोपिका । कृष्णा माझें वस्त्र देईं कां । हरीनें वृक्षावरी एका । वस्त्र तिचें टाकिलें ॥१३४॥ आपण पळाला सत्वरा । नग्न गोपी जात मंदिरा । तिचें पाठीं अर्भकें एकसरा । हांसतचि धांवती ॥१३५॥ गोपी प्रवेशली मंदिरीं । दुजें वस्त्र नेसे सुंदरी । गार्हाणें सांगावया झडकरी । घरा आली यशोदेच्या ॥१३६॥ म्हणे कोठें तुझा हृषीकेशी । माझें वस्त्र फेडिलें वाटेसी । माता म्हणे कृष्णासी । काय खोडीसी करूं तुझ्या ॥१३७॥ एक सांगे तरुणी । मी भरीत होतें यमुनेचे पाणी । मागें येऊनि चक्रपाणी । नेत्र माझे झांकिले ॥१३८॥ मी भयभीत होऊनी । मागे पाहे परतोनी । अदृश्य जाहला तेचि क्षणीं । नवल करणी हरीची ॥१३९॥ एक म्हणे मी उदक आणितां । मागूनि आला अवचिता । थै थै म्हणोनि त्वरितां । नितंब करें थापटीत ॥१४०॥ पाहूनियां जैसे पर्जन्यकाळीं गंगेचे पूर । लोटावरी लोट येती अनिवार । तेवीं गार्हाणियांचे चपेटे थोर । एकावरि एक पडताती ॥१४१॥ पाहूनियां श्रीरंगा । गोपी चित्तीं सानुरागा । मृषा कोप वाउगा । बाह्यदृष्टीं दाविती ॥१४२॥ अंतरीं सप्रेम वरी कोपती । फणस आंत गोड वरी कांटे दिसती । जेवीं नारिकेल वरी कठिण भासती ॥ परी अंतरी जीवन तयांच्या ॥१४३॥ कीं ज्ञानी वर्तती संसारीं । परी सर्वदा निःसंग अंतरीं । तैशा गोपी क्रोधायमान वरी । परी हृदयीं सप्रेम ॥१४४॥ ऐशा त्या सकळ नारी । दृष्टीं लक्षूनि पूतनारी । गार्हाणें देती सुंदरी । ऐकतां दूरी शोक होय ॥१४५॥ हाता न ये ज्या घरचा गोरस । तरी ताडन करी त्यांचिया मुलांस । त्यांच्या गळां काठमोरे हृषीकेश । घालोनियां हिंडवी ॥१४६॥ निद्रिस्तासी तुडवी चरणीं । बाळकें उठवितो रडवूनी । म्हणे अग्नि लावीन ये सदनी । तृप्त नव्हें मी येथें ॥१४७॥ जेथें न लाभो गोरस पूर्ण । म्हणे हें घर मसणवटीसमान । जेथें मी तृप्त नव्हें मधुसूदन । तेंचि स्थान अपवित्र ॥१४८॥ मी तृप्त न होत जगन्निवास । तें घर नांदतचि ओस । तेथें अवदशा ये बहुवस । आसमास कष्ट होती ॥१४९॥ ऐसिया खोडी बहुत । जननीस गोपी सांगत । कृष्ण्मुखाकडे पाहूनि हांसत । यशोदादेवी तेधवां ॥१५०॥ तें वैकुंठींचें निधान । मातेकडे पाहे राजीवनयन । म्हणे या गौळिणी संपूर्ण । असत्य जाण बोलती ॥१५१॥ मजवरी घालिती व्यर्थ आळ । मी सर्वातीत निर्मळ । जैसें आकाश केवळ । घटमठांशीं वेगळें ॥१५२॥ मी ब्रह्मानंद निर्मळ । मज म्हणती हा धाकुटा बाळ । यांच्या खोडी सकळ । तुज माते सांगेन मी ॥५३॥ ह्या मज नेती गृहांत । कुचेष्टा शिकविती बहुत । मज हृदयीं धरूनि समस्त । कुस्करिती निजबळें ॥१५४॥ माते माझे चावोनि अधर । चुंबन देती वारंवार । मज कष्टविती थोर । सकळ धमकटी मिळोनि ॥१५५॥ बहुतजणी मिळोन । घरांत होताती आपुल्या नग्न । मज मध्यें बैसवून । नाचताती सभोंवत्या ॥१५६॥ म्हणती कृष्णा असतासी थोर । तरी होता बरवा विचार । तुजजवळी हा समाचार । सांगेन म्हणतां दाबिती ॥१५७॥ ऐसें बोले पूतनाप्राणहरण । गोपी लटक्याचि क्रोधें पूर्ण । म्हणती यशोदे तुझा नंदन । तुजचि गोड वाटतसे ॥१५८॥ अवघ्या मिळोनि गौळिणी । गोफाटली नंदराणी । म्हणती काय कौतुक नयनीं । निजपुत्राचें पाहसी ॥१५९॥ अगे हा परम नष्ट अनाचारी । नसतीच आळी घेतो आम्हांवरी । पुढें बहुतांचि घरें निर्धारीं । हा बुडवील यशोदे ॥१६०॥ हंसतां हंसतां कौतुकें । ब्रह्मांड लपवी कांखे । सप्त समुद्र क्षण एकें । नखाग्रांत जिरवील ॥१६१॥ याच्या एक एक गोष्टी सांगतां । तरी धरणी न पुरे लिहितां । काल आमुच्या मंदिरांत तत्त्वतां । अकस्मात पातला ॥६२॥ आम्ही बोलिलों कौतुकरीतीं । तुज नवरी कैसी पाहिजे श्रीपती । येणें प्रतिउत्तर कोणे रीतीं । दिधलें तें ऐक पां ॥१६३॥ अनंतब्रह्मांडांच्या गती । जिच्या इच्छामात्रें होती जाती । जे परब्रह्मींची मूळस्फूर्ती । तेचि निश्चितीं नोवरी माझी ॥१६४॥ ब्रह्मा विष्णु महेश्वर । इंद्र चंद्र वरुण दिनकर । हीं बाहुलीं नाचवी समग्र । एकसूत्रेंकरूनियां ॥१६५॥ जगडंबर हा दावी नेटें । सवेंचि झांकूनि म्हणे कोठें । ते माझी नोवरी भेटे । तरीच करणें विवाह ॥१६६॥ ते पतिव्रताशिरोमणी । नांवरूपा आणिलें मजलागुनि । माझी योगनिद्रा मोडोनी । जागविलें मज तिनें ॥१६७॥ मज न कळतां जागें केलें । अवघें मोडोनि मजमाजी मिळविलें । माझ्या सत्तेनें खेळ खेळे । परी मी नेणें तियेतें ॥१६८॥ ऐशा लबाड गोष्टी फार । रचितो गे तुझा कुमार । तों एक कुरंगनेत्री सुकुमार । गार्हाणें सांगे ऐका हो ॥१६९॥ काल माझ्या मंदिरा येऊनी । शिंकीं पाहे अवलोकूनि । तंव तीं न दिसती नयनीं । म्हणे लपवोनि ठेवियेलीं ॥१७०॥ मजभेणें लपवितां लोणी । परी मी काढीन धुंडोनी । म्यां समुद्रांत शोधूनी । शंखासुर काढिला ॥१७१॥ असुर वेद घेऊनि गेला जेव्हां । विधि माझा धांवा करी तेव्हां । धांवें धांवें कमलाधवा । हे केशवा दीनबंधो ॥१७२॥ ब्रह्मा माझें पोटींचें बाळ । मज बहुत त्याची कळकळ । मी मत्स्यरूप होऊनि तत्काळ । वेदशोधना निघालों ॥१७३॥ तों असंभाव्य समुद्रजळ । सवालक्ष गांवें रूंद विशाळ । तितुकाच खोल सबळ । पृथ्वीभोंवता असंभाव्य ॥१७४॥ मी जाहलों मत्स्यरूप विशाळ । असंभाव्य समुद्रजळ । पुच्छघायें जळ सकळ । आकाशपंथें उडविलें ॥१७५॥ जैसें विहिरियाचें पाणी । एकाच हस्तचपेटेंकरूनी । बाहेर पडे येऊनी । तैसा सागर उडविला ॥१७६॥ सवालक्ष गांवें समुद्र । आकाशीं उडविला समग्र । मग पायीं धरूनि शंखासुर । ओढूनियां काढिला ॥१७७॥ असुरासी बाहेर काढिलें । मग समुद्रजळ खालीं पाडिलें । शंखासुरासी वधिलें । करीं धरिलें कलेवर ॥१७८॥ ते काळीं ब्रह्मादिक इंद्र । स्तुतिस्तोत्रें करिती अपार । वेद देऊनि समग्र । म्यां मान रक्षिला देवांचा ॥१७९॥ याकारणें ऐक चतुरे कामिनी । जेणें प्रळयजळीं वेद शोधूनी । काढिलें त्यापुढें लोणी । लपवाल कोठें अबला हो ॥१८०॥ ऐक यशोदे सुंदरी । लटक्याचि कथा उत्पन्न करी । मी घुसळितां मंदिरीं । हरि येऊनि बोलिला ॥१८१॥ म्हणे घुसळितां गोपी समस्ता । परी न ये माझिया चित्ता । म्यां कूर्मअवतारीं तत्त्वतां । क्षीरसागर मथिला हो ॥१८२॥ एकादश सहस्र योजनें सबळ । रवी केली मंदाराचळ । जो अवक्र उंच सरळ । सुवर्णमय प्रभा त्याची ॥१८३॥ वासुकीची त्यास बिरडी । मग समुद्र मथिला कडोविकडीं । सुर आणि असुर प्रौढीं । दोहींकडे सम धरिती ॥१८४॥ मग चालिला भेदीत पाताळतळ । मी कूर्म जाहलों घननीळ । चतुर्दश रत्नें निर्मळ । नवनीत तेंचि काढिलें ॥१८५॥ तुम्ही दूध पाजितां बाळकांस । तैसाचि मी सुरांस पाजीं सुधारस । मोहिनीस्वरूप विशेष । मीच नटलों तेधवां ॥१८६॥ म्यां मोहिनीस्वरूप धरिलें जाण । म्हणोनि मोडूनि दाखवी नयन । तें कूर्मचरित्र संपूर्ण । आपुलें आंगीं दावितो ॥१८७॥ आणिक नवल एक साजणी । मी कुंभ भरितां तमारिकन्याजीवनीं । तों हळूंच माझा कर धरूनी । काय बोलिला गोपाळ ॥१८८॥ तुम्ही गे घागरी उचलितां । बहुत गोपी कष्टी होतां । म्यां दाढेवरी तत्त्वतां । पृथ्वी उचलोनि धरियेली ॥१८९॥ तो मी वराहवेषधारी । हिरण्याक्ष मारिला क्षणाभीतरी । अद्यापि दाढेवरी धरित्री । म्यां धरिलीसे निजबळें ॥१९०॥ म्यां दाढेवरी धरिली अवनी । कुंभ न उचले तुमचेनी । मी ब्रह्मांड नखाग्रीं धरूनी । नाचवीन म्हणतसे ॥१९१॥ ऐकें यशोदें शुभकल्याणी । आम्ही फळें कांकड्या चिरतां सदनीं । म्हणे हिरण्यकश्यपा चिरूनी । आंतडीं ऐशीं काढिलीं म्यां ॥१९२॥ तो मी नृसिंहवेषधारक । असुरकुळकाननपावक । माझ्या क्रोधापुढें ब्रह्मादिक । उभे न ठाकती सर्वथा ॥१९३॥ क्रोधें विदारिला असुर । रक्षिला प्रल्हाद किंकर । तो नरसिंहअवतार समग्र । लीला अपार दाविली ॥९४॥ ऐकें यशोदें सुताचें विंदाण । नसतेंच करितो निर्माण । एके दिवशीं मी पतीचे चरण । धूत होतें निजगृहीं ॥१९५॥ हळूंच बैसला येऊन । म्हणे बळीनें धुतलें माझे चरण । मज त्रिपादभूमी दान । प्रल्हादपौत्रें दिधली पैं ॥१९६॥ दोन पाद जाहलें त्रिभुवन । मम बळीनें केलें आत्मनिवेदन । बळी माझें रूप विलोकी पूर्ण । तों असंभाव्य लक्षवेना ॥१९७॥ सप्तपाताळांखालीं चरण । प्रपद तें रसातळ पूर्ण । गुल्फद्वय तें महातळ जाण । पोटरिया तें सुतळ ॥१९८॥ अतळ आणि वितळ । त्या जानु जंघा निर्मळ । कटिप्रदेश तें भूमंडळ । मृत्युलोक वसे वरी ॥१९९॥ सप्त समुद्र पोटांत । जठराग्नि वडवानळ धडधडीत । नाभिस्थान नभ निश्चित । ज्योतिर्लोक वक्षःस्थळ ॥२००॥ महर्लोक तो कंठ जाण । मस्तक तें विधिभुवन । दोहों हस्तरूपें शचीरमण । माझ्या अंगीं वसतसे ॥२०१॥ नेत्र ते सूर्यनारायण । चंद्रमा ते माझें मन । दिशा ते माझे श्रवण । विष्णु अंतःकरण जाण पां ॥२०२॥ विरिंची बुद्धि साचार । शंकर माझा अहंकार । यम माझ्या दाढा समग्र । वरुण जिव्हा जाणिजे ॥२०३॥ ऐसें माझें स्वरूप अद्भुत । देखोनि बळी माझा भक्त । तेणें शरीर निश्चित । मज केलें अर्पण ॥२०४॥ मग मी स्थापिला रसातळीं । अद्यापि उभा आहें जवळी । त्याचें द्वार राखें मी वनमाळी । तोच गोकुळीं अवतरलों ॥२०५॥ जान्हवी माझें चरणजळ । मस्तकीं वाहे तो जाश्वनीळ । ऐशा गोष्टी घननीळ । सांगे आम्हांतें जननीये ॥२०६॥ जें पोर मोडी पितृआज्ञेतें । त्यासी ताडन करी स्वहस्तें । मी मारीं आपुले मातेतें । पितृआज्ञेंकरूनियां ॥२०७॥ एकवीस वेळां निःक्षत्री । म्यां परशुधरें केली धरित्री । तोचि गोकुळाभीतरी । अवतरलों मी म्हणतसे ॥२०८॥ रामावतारीं मी पितृभक्त । वना जाई चरणीं चालत । खर दूषण त्रिशिरा समस्त । वधिले अद्भुत विरोधें ॥२०९॥ माझी सीता नेली रावणें । सवेंच म्यां केलें धांवणें । वाली वधूनि सुग्रीवाकारणें । किष्किंधा ते समर्पिली ॥२१०॥ माझा प्राणसखा हनुमंत । सीताशुद्धि करूनि येत । मी दळभारें रघुनाथ । समुद्रतीरा पातलों ॥२११॥ पाषाणीं पालाणिला समुद्र । सुवेळेसी गेलों मी राघवेंद्र । देवांतक नरांतक महोदर । अतिकाय प्रहस्त वधियेले ॥२१२॥ कुंभकर्ण इंद्रजित सर्व । शेवटीं मारिला दशग्रीव । सोडविलें बंदींचे देव । निजप्रतापेंकरूनियां ॥२१३॥ तोचि मी आतां गोकुळीं येथें । कंस वधीन निजहस्तें । मी क्षीरसागरीं असतां तेथें । शरण देव मज आले ॥२१४॥ ब्रह्मा शंकर प्रजा ऋषी । गार्हाणीं सांगती मजपासीं । मग मी मारावया कंसासी । नंदगृहीं अवतरलों ॥२१५॥ मुष्टिक चाणूर अघासुर । दैत्य अवघे मारीन दुर्धर । मी बायका सोळा सहस्र । पुढें करीन म्हणतो कीं ॥२१६॥ होईन मी भक्तांचा सारथी । उच्छिष्ट काढीन स्वहस्तीं । दुष्ट मारूनि निश्चितीं । भूभार सर्व हरीन ॥२१७॥ ब्रह्मयाचा बाप म्हणतो बाई । म्हणवी क्षीराब्धीचा जांवई । परमात्मा शेषशायी । म्हणवी पाहीं यशोदे ॥२१८॥ ज्यांचें घरीं न लाभे चोरी । त्याचिया अर्भकांसी करीं धरी । म्हणे तुमचे शिरींचे निर्धारीं । केश लुंचीन अवघे पैं ॥२१९॥ पोरें केश लुंचिती । चिमटी मुलांच्या भागती । म्हणे मी बौद्ध निश्चितीं । कलियुगीं गति दावीन हो ॥२२०॥ पोरें न सांगती पाळती । त्यांसी जाची नानागती । एके मुलावरी बैसे श्रीपती । ताट हातीं घेऊनियां ॥२२१॥ मुलांस म्हणे म्लेंच्छ तुम्ही । मरोन पडा रे रणभूमीं । कलंकी अवतार पुढें मी । ऐसाचि होईन जाण पां ॥२२२॥ करीं घेऊनियां कुंत । म्लेंच्छ संहारीन सत्य । मी वैकुंठीचा नाथ । यादवकुळीं अवतरलों ॥२२३॥ ऐसे माझे अवतार किती । भोगींद्रासही नेणवती । मेघधारा मोजवती । परी अंत नाहीं अवतारां ॥२२४॥ मी आद्य निष्कलंक अचळ । अरूप निर्विकार निर्मळ । मी ब्रह्मानंदस्वरूप अढळ । नाहीं चळ मजलागीं ॥२२५॥ मी अच्युत अनंत । मी नामरूपातीत । मी गुणागुणरहित । करूनि सत्य अकर्ता मी ॥२२६॥ मी सर्वांचें निजमूळ । परी नोळखती लोक बरळ । जीवदशा पावोनि सकळ । अविद्येनें वेष्टिले ॥२२७॥ अहंकारमद्य पिऊनि । भ्रमती मायाघोरविपिनीं । आपुली शुद्धि विसरोनी । आडफांटा भरले हो ॥२२८॥ काम क्रोध मद मत्सर । हे अनामिक दुराचार । यांचे संगतीं जीव समग्र । भ्रष्टोनि मज विसरती ॥२२९॥ मी सर्वांजवळी असें । परी कोणासही पाहतां न दिसें । मृगनाभीं कस्तूरी वसे । परी न गवसे तयातें ॥२३०॥ एक दर्पणांचें निकेतन । त्यांत सोडिलें जैसें श्वान । प्रतिबिंबें असंख्यात देखोन । भुंकोन प्राण देत जैसें ॥२३१॥ कां स्फटिकाचे पर्वतीं । प्रतिबिंब द्विरद देखती । झाडां व्यर्थ हाणितीं दांती । परी न येती मरणावरी ॥२३२॥ कां चणियाच्या आशें वानर । गोवूनि बैसे दोनी कर । कां नळिकेच्या योगें पामर । शुक बद्ध जाहले ॥२३३॥ कीं आंधळें हातरूं माजलें । कीं सिंहानें प्रतिबिंब देखिलें । कूपामाजी व्यर्थ मेलें । जीवा झालें तैसेंचि ॥२३४॥ कां उडुगणप्रतिमांसी देखोन । हंस पावे व्यर्थ मरण । तैसें अविद्यायोगें भुलोन । जन्म-मरण भोगिती ॥२३५॥ स्फटिक सर्वदा निर्मळ असे । परी काजळावरी काळा दिसे । कां केशावरी भासे । चिरफळिया जाहल्या ॥२३६॥ असो आतां यशोदे माय । गोष्टी याच्या सांगों काय । ऐकतां चित्ता उपरम होय । प्रेम सये नावरे मज ॥२३७॥ एक म्हणे नाटकी मोठा । पुत्र तुझा बहुत गोटा । मिथ्या गोष्टी गे अचाटा । घेऊनियां ऊठतो ॥२३८॥ जितुक्या सांगितल्या गोष्टी । तितुक्या मिथ्याचि चावटी । नसती क्रियाकर्मरहाटी । आपुलें आंगीं लावितो ॥२३९॥ पूर्वीं जे अवतार झाले । ते आपुलेचि आंगीं लावितो बळें । जें जें हा जननीये बोले । तितुकें मिथ्या मृगजल ॥२४०॥ रांजणींचें पाणी देखतां । भय वाटे तुझ्या सुता । तो प्रळयसमुद्रीं तत्त्वतां । मत्स्य कैसा झाला गे ॥२४१॥ थापटोनी निजवितां जगजेठी । म्हणे हळूचि थापटीं माझी पाठी । तो म्हणतो मंदराचळ उठाउठीं । पृष्ठीवरी धरिला म्यां ॥२४२॥ चेंडू न उचले लवकरी यातें । म्हणे म्यां दाढेवरी धरिलें धरेतें । पृथ्वी रक्षिली म्यां अनंतें । वराहवेषें म्हणतसे ॥२४३॥ अंगडियाचा कसा सोडितां । म्हणे नखें दुखती माझीं आतां । आणि म्हणतो असुर तत्त्वतां । विदारिला निजहस्तें ॥२४४॥ शिंकें यासी न पवे वाहिलें । तो म्हणतो ब्रह्मांड नखें भेदिलें । जान्हवीजळ काढिलें । त्रिविक्रम होऊनियां ॥२४५॥ मारूं जातां शिपटी । भेणें पळतो जगजेठी । तो म्हणतो तीन सप्तकें सृष्टी । निःक्षत्री म्यां केली हो ॥२४६॥ इक्षु न मोडे यासी जाण । म्हणतो मोडिलें भवसायकासन । जो पळतो बागुलाच्या भेणें । सांगें रावण मारिला म्यां ॥२४७॥ मागील गोष्टी मिथ्या सर्व । आतां मारीन म्हणतो कंसराव । दावितो अवताराचा भाव । निजांगींच आपुल्या ॥२४८॥ उडत उडत होय मासा । म्हणे हा मत्स्यावतार ऐसा । अर्भक पायीं धरूनि ऐसा । शंखासुर हाचि पैं ॥२४९॥ चक्रवत फिरे घननीळ । म्हणे ऐसा भ्रमविला मंदराचळ । खडे घेऊनि तत्काळ । म्हणे रत्नें काढिलीं ॥२५०॥ दांतांवरी काडी धरूनी । वस्त्रघडी त्यावरी ठेवूनी । म्हणे म्यां असे धरिली अवनी । दावी रांगोनी सूकर ऐसा ॥२५१॥ बाहुल्यांचें पोट फोडी । म्हणे हिरण्यकश्यपाचीं काढितों आंतडीं । पोरें पळती तांतडीं । भिती देखोनि तयातें ॥२५२॥ गुडघे टेंकूनि होय वामन । म्हणे म्यां त्रिपद घेतलें भूमिदान । एका पोरावरी उभा राहोन । म्हणे बळी पाताळीं घालितों ॥२५३॥ करीं घेऊनि कंदुक । म्हणे हेंचि माझे फरश देख । निःक्षत्री करीन धरणी सकळिक । म्हणोनि हिंडे सैराचि ॥२५४॥ चुईचें धनुष्य करूनी । हरि ठाण मांडी मेदिनीं । आकर्ण ओढी ओढूनी । मारीत म्हणे राक्षसां ॥२५५॥ घडीभर घेतो मुरली । ऐकतां आमुची वृत्ति मुराली । अहंकृति समूळ हरली । गातो वनमाळी सुंदर ॥२५६॥ ऐकें यशोदे जननी । अवघी लटकीच याची करणी । आम्हांवरी इटाळी घेऊनी । नसतीच उठतो गे ॥२५७॥ याची गोष्ट न मानींच खरी । परम चक्रचाळक मुरारी । याच्या भेणें निर्धारी । जावें टाकूनि गोकुळ ॥२५८॥ यशोदा म्हणे अनंता । सोसूं किती खोडी आतां । क्षणभरी पाय तत्त्वतां । घरीं तुझा न राहे ॥२५९॥ परघरीं मी न करीं चोरी । म्हणवोनि आण वाहें मुरारी । तुज मी बांधीन हृदयमंदिरीं । ना सोडींच सवर्था ॥२६०॥ पहा हरिविजयग्रंथ । हाचि त्र्यंबकराज उमाकांत । भावसिंहस्थी यात्रा येत । त्यासी जगन्नाथ नुपेक्षी ॥२६१॥ कीं ब्रह्मगिरी हाचि ग्रंथ । जो पारायणप्रदक्षिणा करीत । त्याचे बंध समस्त । जन्मोजन्मींचे तुटती ॥२६२॥ ब्रह्मानंदकृपामेघ सुरवाडे । हें हरिविजयक्षेत्र वाढे । श्रीधर म्हणे निवाडे । अर्थ सज्जनीं पाहिजे ॥२६३॥ इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंशभागवत । चतुर श्रोते परिसोत । सप्तमोऽध्याय गोड हा ॥२६४॥ ॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्रीगणेशाय नमः । श्रीहरीच्या अवताराचे रहस्य काय वर्णावे ? आणि त्याच्या सौंदर्याचे वर्णन तरी किती करावे ? कसली उपमा द्यावी ? त्याच्यापासूनच आकाशाला निळा रंग मिळाला, इंद्रधनुष्याला सप्तरंग मिळाले. पीतांबराने विजेला तेज दिले, उत्तरीयाने शंकराला शुभ्रवर्ण मिळाला ! उटीचा सुगंध पृथ्वीने घेतला, नेत्रांकडून कमळांना शोभा मिळाली, आणि रूपसौंदर्याने मानवांना दृष्टी आली ! मत्स्यादि अवतारांचे ज्ञान व गोडी भक्तांना लागत नाही म्हणून रामकृष्णांचे मानुष रूप व मानुष लीला करून त्याने भक्तांचे सर्व भाव विकसित केले ! त्याच्या सत्तेने संकटे दूर जातात, तो तर अनन्य भक्तांचा दास होतो, त्यांची चिंता तो वहातो. लाकडाच्या नौकेत बसून पाषाणही पैलतीराला जातात तसे संतांच्या व भक्तांच्या संगतीने जडमूढ लोकही तरून जातात. मग भगवंताचा आश्रय घेणार्यांना कोठले भय ? त्या हरीची कृष्णावतारातील लीला वर्णन करण्यास तोच मला प्रेरणा व शक्ती देवो !
एकदा एका गवळ्याच्या घरी ब्राह्मणभोजन होते. गोपीने सर्व तयारी केली, पण तुपाची एक घागर लपवून शेजारणीकडे ठेवली. नंतर ती तिथेच राहिली होती. गोपीला व शेजारणीला फक्त ठाऊक असणारी ही गोष्ट ! पण कृष्णाने ती जाणली, आणि गुप्तपणे सोबत्यांबरोबर जाऊन ती घागर घेतली, तिच्यातील तूप सर्वांनी खाऊन टाकले. मग कृष्ण घरी आला. यशोदेला कृष्णाच्या या प्रतापाची बातमी गवळ्याच्या मुलांकडूनच कळली. कृष्णाचे शरीर तर तुपाने माखलेच होते ! त्याला यशोदेने स्वच्छ स्नान घातले. "ती गोपी आता येईल तक्रार करायला ! मग मात्र तुला मार मिळणार आहे !" असे तिने बजावून सांगितले. ती गोपी पुढे शेजारणीकडे गेली, तो तुपाची घागरच नव्हती. ती शेजारणीला म्हणाली- "तुपाची घागर तू कुठे ठेवली आहेस का ?" शेजारीण नाही म्हणाली. त्या वाद करू लागल्या, पण स्वतःच्या नवर्यापर्यंत ही गोष्ट जाऊ नये म्हणून त्या गोपीने समेट केला. ती म्हणाली- "जाऊ दे ! माझे तूप कृष्णार्पण !" एक गोप-गोपी दुधाबाबत फारच दक्ष असत. कृष्णाला त्यांनी कधीच दूध दिले नाही. कृष्णाने एक मुंगूस रात्री त्यांच्या घरात सोडले. खुडबूड ऐकून जोडपे जागे झाले. त्याना वाटले "ही काहीतरी भुताटकी असावी" घाबरून ते बाहेर पडले. शेवटी एका गोपाने आत जाऊन मुंगूस पकडून आणून दाखवले तेव्हा त्यांची भीती गेली; सारे हसू लागले- 'हे कृष्णाचेच काम, मी त्याला मुंगूस घेऊन इकडे तिकडे फिरताना पाहिला होता काल ?' असे एकजण म्हणाला. इकडे दांपत्य बाहेर पडल्यानंतर कृष्णाने त्यांच्याकडील दूध दही दुसर्या मार्गाने आत शिरून सवंगड्यांच्या मदतीने संपवून टाकले होते. कृष्णाने एक गोपी व तिचा पती झोपलेला असताना तिची वेणी व त्याची दाढी बांधून ठेवली ! कारण काय तर गोपीने त्याला धाकदपटशा करून, 'तुला शेंडीनेच खांबाशी बांधते बघ ?' असे म्हटले होते ! ते जोडपे मध्येच जागे झाल्यावर हिसकाहिसक करू लागले ! एकमेकांवर पतिपत्नी आळ घेऊ लागली ! खरा प्रकार वेगळाच होता. ते कृष्णाचेच काम असे त्यांच्या लक्षात आले. पण गाठ सुटेना; वेणी व दाढी कापून कशी चालेल ? एवढी पक्की गाठ ! कोणी मारलेली असेल ? भगवंतानेच ! ते जोडपे व त्यांच्याबरोबर इतर गोपगोपी यशोदेकडे आल्या. कृष्ण यशोदेजवळ होताच. तो त्या गोपीला म्हणाला "तू माझी शेंडी बांधणार म्हणून दम भरलास ना ! मग मीच तुझी वेणी बांधून ठेवली पहा सुटते का ? ती काही सुटेना ! जोडपे शरण आले. मग कृष्णाने गाठ सोडवून त्यांना मोकळे केले ! त्यांचा अहंपणाही गेला. मग कृष्णाला त्यांच्या घरी दूध दही मिळू लागले ! जो कृष्णाला दूध देण्यास नकार देई त्याच्या घरात कृष्ण दूध चोरीत असे. त्याचे सोबती त्याच्या अगदी आज्ञेत वागत असत. त्यांच्यापुढे कंजूष गवळ्यांचे काही चालत नसे. गोपींना कृष्णाने अहंममता सोडायला लावली. त्याच्या खोड्यांचे प्रकार तरी किती ! तो एखाद्याच्या गळ्यात फुटक्या मडक्याचा गळा अडकवी ! गाईची वासरे दाव्यापासून सोडून देई, नदीवर घडा घेऊन गोपी चालल्या की खडे मारून घडेच फोडी, एखादीच्या पाठीवर थपथप थापा मारी, एखादीची देहबुद्धीच नाहीशी करून मग दिव्य रूपात तिला दर्शन देई. एकदा एका गोपीने चेष्टेत त्याला विचारले- "कान्हा, तुला बायको कशी हवी ?" तो म्हणाला- "सर्व सृष्टी चालविते व सूर्यचंद्र हे जिचे खेळ आहेत, जिने मला नांव दिले, माझ्या सत्तेने जी ब्रह्माण्ड चालविते, ती माझी नवरी व्हावी !' कोणी गोपी भांडी लखून ठेवी तिला चिडवून म्हणे- "अशी भांडी लपवून ठेवता काय ? मी शोधून काढीन ! राक्षसांनी पूर्वी वेद पळवून नेले ते मी शोधून काढले ! मग तुमची भांडी ती काय ?" विष्णूच्या पूर्वावतारातील पराक्रम आपणच केले असे सांगे. "ताक काय घुसळता ? माझ्या पाठीवर पर्वत ठेवून देवासुरांनी क्षीरसागर घुसळला होता ! चौदा रत्ने आम्ही काढली ! तुम्ही तर इवलेसे लोणी काढता आणि ऐट करतां ! घागर उचलतांना तुम्ही दमतां तर मी दाढेवर पृथ्वी उचलली होती ! तुम्ही भाजी चिरतां तर मी हिरण्यकशिपूला नखांनी चिरला होता ! तुम्ही पतीचे पाय धुतां- बळीने माझेही पाय धुतले होते ! परशूराम व राम यांचे पराक्रम स्वतःच केले असे म्हणून "तोच मी आता आलो आहे." असे म्हणे ! गोपी थक्क होऊन ऐकत. यशोदेला येऊन एकेक गप्पा सांगत ! कृष्ण स्वतःचे वर्णन आद्य, अचल, अनंत, अविकारी, अनिकेत, सर्वव्यापी, असे करी. ते ऐकून गोपी त्याची चेष्टा करीत. त्या यशोदेला सांगत- "अग यशोदे, रांजणातल्या पाण्याला जो भितो तो मत्स्य होऊन सागर काय ढवळणार ? चेंडू उचलत नाही नि म्हणे दाढेवर पृथ्वी उचलली ! अग, अंगरख्याचे बंद सोडताना नखे दुखतात एवढा हा नाजूक आणि म्हणे हिरण्यकशिपूचे पोट चिरले ! एक छडी उगारली तर वेशीपर्यंत घाबरून पळतो, हा म्हणे भार्गवराम- कुर्हाड पेलणार ! उसाचे कांडे मोडता येत नाही ! याने जनकाकडे जाऊन शंकराचे धनुष्य मोडले हे कसे पटणार ? नकला तरी किती करतो बघ ! अवतारांच्या सगळ्या नकला करतो पण त्यासाठी सवंगड्यांनाच हाताशी धरून छळतो. मुलाला ओणवा करायचा, त्याच्या पाठीवर उभे रहायचे- झाला 'वामन !' काडीचे धनुष्य घेऊन रावणाला मारण्याचे नाटक करतो. चेंडूचाच परशू ! मुलांचे केस उपटून म्हणतो- पुढे मी बौद्धावतारात लोकांना असेच मुण्डण करायला लावणार ! घेतो काडीची तरवार, मुलाच्या पाठीवर होतो स्वार- झाला कल्कीचा अवतार. मुलांनी मेल्याचे सोंग करायचे- ते म्लेंच्छ- ह्याने कलकी अवतारात त्यांना मारायचे आहे म्हणे. अशा याच्या नकला आणि खोड्या. पण यशोदे, एवढ्या लहानपणी हा बासरी किती गोड वाजवतो ! त्यामुळेच आम्ही गुंग होतो. त्याच्याकडे पहात बसावे. त्याचा पांवा ऐकत बसावे ! यापेक्षा बाकी सारे नकोच ! त्या पाव्याच्या मंजुळ मधुर स्वरात आमचा मीपणाच विरघळून जातो ! गोपींची यशोदेजवळ रोज रोज अशी गार्हाणी चालत असत ! अध्याय ७ समाप्त ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ |