|
॥ श्रीहरिविजय ॥ ॥ अध्याय सहावा ॥
कृष्णाच्या बाललीला -
श्रीगणेशाय नमः ॥
जय जय निजजनमानसमराळा । अनंतवेषा त्रैलोक्यपाळा । भक्तजनांसी अगाध लीला । गोकुळामाजी दाविसी ॥१॥ जय जय पूतनाप्राणशोषका । तृणावर्त-शकटांतका । जांभई देतां रमानायका । विश्वरूपा दाविलें ॥२॥ जय कृष्णा निगमागमसारा । अनंतरूपा नंदकुमारा । जय पयोब्धिहृदयविहारा । दिगंबरा बाळवेषा ॥३॥ घननीळा नीळबंधभूमीसी । जवळी असोनि न दिससी । जरी तूंच कृपावंत होसी । तरीच येसी प्रत्यया ॥४॥ असो पंचमाध्यायाचे अंतीं । नीळबंधभूमीवरी श्रीपती । खेळोनि लीला विलासरीतीं । मायेप्रती दाविली ॥५॥ एके दिवशीं प्रातःकाळीं । कृष्ण घेऊनि बैसला आळी । मातेसी म्हणे वनमाळी । सूर्य आणीं खेळावया ॥६॥ बरा वर्तुळ दिसतो तरणी । कंदुक करूनि दे मज जननी । म्हणवोनि लोळणी धरणीं । धराधरशयन घालीतसे ॥७॥ यशोदा म्हणे माझे आई । सूर्य कैसा देऊं गे कान्हाई । म्हणवोनि कडेवरी लवलाहीं । यशोदेनें घेतला ॥८॥ माता म्हणे सखया । आणिक मागें खेळावया । तरी चंद्रबिंब लवलाह्या । काढूनि देईं रांजणींचें ॥९॥ तों माता म्हणे कृष्णातें । तें कैसें मी देऊं तूतें । तरी डेरियामाजी घुमतें । तेंच काढूनि देईं कां ॥१०॥ नलगे रविदंड डेरा । काढूनि दे आंतील घुमारा । माता म्हणे रे सुकुमारा । काढितां न ये सर्वथा ॥११॥ तरी पर्वत उचलोनि आणवीं । देव देव्हारींचे बोलवीं । समीराच्या दाखवीं । झुळुका मज नयनीं वो ॥१२॥ दे नयनांतील बाहुली । तूं जाईं ठेवूनि सांउली । आरशांतील मुख ये वेळीं । काढूनि देईं जननीये ॥१३॥ काढूनि दे मुक्तांचा ढाळ । वेगळी करीं रत्नांची कीळ । आकाश जें घटांतील । काढूनियां मज दावी ॥१४॥ पुढती लोळण घाली घननीळ । माता म्हणे आला रे बागुल । महाभ्यासुर विक्राळ । पांच तोंडें तयासी ॥१५॥ माथां जटांचे भार । तृतीयनयनीं वैश्वानर । शिरीं झुळझुळ वाहे नीर । भयंकर महाजोगी ॥१६॥ चंद्रकळा तयाचें शिरीं । नीळकंठ खट्वांग करीं । भस्म चर्चिलें शरीरीं । गजचर्म पांघुरला ॥१७॥ नेसलासे व्याघ्रांबर । गळां मनुष्यरुंडांचे हार । सर्वांगीं वेष्टिले फणिवर । दश भुजा मिरवती ॥१८॥ त्यास देखतांचि सळिजे । कां उठोनि तत्काळ पळिजे । कृष्णा तूं उगाचि निजें । जोगी बाहेरी उभा असे ॥१९॥ जोगी तो काळाचाही काळ । क्रोधी जैसा वडवानळ । मुष्टींत हें ब्रह्मांड सकळ । धरूनियां रगडी पैं ॥२०॥ हरि म्हणे वो जननी । मी रडतों त्याचलागोनी । ऐसा तो जोगी नयनीं । मज आतांचि दाखवीं ॥२१॥ जो क्षीराब्धिवासी शेषशायीं । तो गडबडां लोळे ते समयीं । माय हरीसी धरी हृदयीं । समजावीत सप्रेम ॥२२॥ परी न राहे सर्वथा । म्हणे मज जोगी दावीं आतां । मग म्हणे यशोदा माता । कैसें यास करावें ॥२३॥ मग तळघरीं अंधारीं । त्यामाजी गुंफा ओवरी । श्रीकृष्णासी झडकरी । नेलें तेथें मायेनें ॥२४॥ माता म्हणे जोगी आहे तेथें । हरि म्हणें त्यापासी नेईं मातें । यशोदा म्हणे तेथें । भयभीत होसी तूं ॥२५॥ मग म्हणे कमलोद्भवपिता । मी न भीं माते सर्वथा । परी मज जोगी आतां । कैसा आहे दाखवीं ॥२६॥ मातेनें हरीसी आंत नेलें । तों ब्रह्मांड अवघें उजळलें । कैंचा अंधार प्रकाशलें । कृष्णरूप चहूंकडे ॥२७॥ गृहस्तंभ उथाळीं भिंती । पाहतां मायेसी न दिसती । जगन्निवासें निश्चितीं । चहुंकडे व्यापिलें ॥२८॥ पृथ्वी आप अंबर । अग्नि समीर समुद्र । नाना जीवजातिविकार । कृष्णरूप दिसताती ॥२९॥ आपआपणासी यशोदा विसरे । सर्वही व्यापिलें यादवेंद्रें । तळघराबाहेरी त्वरें । माय आली तेधवां ॥३०॥ मायेवरी माया घातली । अद्भुत महिमा ते विसरली । मग म्हणे रे वनमाळी । नसती आळी घेऊं नको ॥३१॥ पुढें दिधलें खेळवणें । कृष्ण म्हणे न घें चालवणें । मज तो जोगी दाखवणें । पंचवदन विरूपाक्ष ॥३२॥ तों बळिभद्र पातला । श्रीरंगास म्हणे ते वेळां । चाल बाहेर गोपाळा । खेळ खेळों विचित्र ॥३३॥ ऐकतांचि ऐसें वचन । गदगदां हांसे जगज्जीवन । कडेखालीं उतरोन । हात धरी बळिरामाचा ॥३४॥ दोघे दुडदुडां धांवती । राजबिदीस उभे राहती । धाकटे गोपाळ मिळती । रामकृष्णांभोंवते ॥३५॥ लपंडाई चेंडू चक्रें विचित्र । खेळ खेळे पंकजनेत्र । जो पद्माक्षीवल्लभ उदार । जलजनाभ श्रीहरी ॥३६॥ जो अनंतब्रह्मांडनायक । जो निजमोक्षाचा परिपाळक । जो अनंतवेषधारक । जगव्यापक जगगुद्रु ॥३७॥ जो भक्तवत्सल भयहारक । जो भवहृदय भवभयनाशक । जो भगवंत निजभाग्यदायक । अभंग अक्षय पद ज्याचें ॥३८॥ सवें गोपाळांची मांदी । खेळत जात ते राजबिदीं । शचीनायक भर्ग वा विधी । लीला न कळे तयांतें ॥३९॥ खेळ खेळतां श्रीहरी । रिघे एके गोपीचें मंदिरीं । दधि दूध क्षणाभीतरीं । चोरोनियां भक्षिलें ॥४०॥ घृत नवनीत साय । गोपाळांसी देत लवलाहें । तेथूनि नकळत जाय । आणिकीचे गृहाप्रती ॥४१॥ घरोघरींचें संचलें लोणी । हरी परी नेणेचि कोणी । अद्भुत तयाची करणी । वेदशास्त्रांसी अगम्य ॥४२॥ तें नंद-यशोदेचें तप पूर्ण । कीं कमलोद्भवाचें देवतार्चन । कीं तें नीलग्रीवाचें ध्यान । कृष्णरूप प्रकटलें ॥४३॥ तें इंदिरेचें निजजीवन । तें वैकुंठपीठींचें निधान । कीं गौळियांचें पूर्वपुण्य । फळा आलें एकदांचि ॥४४॥ कीं तें निगमागमांचें सार । कीं तें भक्तांचें निजमंदिर । कीं तें संतांचें प्रियकर । निजधन ठेवणें ॥४५॥ कीं तें योगियांचें विश्रामधाम । कीं निजजनमंगलपूर्णकाम । तो ब्रह्मानंद मेघश्याम । चोरी करी गोकुळीं ॥४६॥ एके गोपीच्या मंदिरांत । गडियांसमवेत जगन्नाथा । रिघतां बोले मात । गोपाळांसी तेधवां ॥४७॥ म्हणे सखे हो एक ऐका । पाउलें वाजूं देऊं नका । सांचोळ ऐकोनि गोपिका । जाग्या होतील निर्धारें ॥४८॥ गडी म्हणती पूतनारी । वाळे नेपुरें वाजती गजरीं । चरणींची आंवरी मुरारी । ऐकती सुंदरी मंदिरींच्या ॥४९॥ आम्हांसी म्हणसी न वाजवा पाऊल । तव पदींच्या वांक्या करिती कोल्हाळ । हें ऐकोनि घननीळ । कर्णीं घाली आंगोळिया ॥५०॥ कर्णीं घालितां गोपाळें । बैसली त्रैलोक्याचीं टाळें । कृष्ण झांकी जेव्हां डोळे । तरी त्रिभुवन आंधळें होय पैं ॥५१॥ एकचि सूत्रमेळें । नाचवी ब्रह्मांडींचे पुतळे । जो अक्षय अभंग न चळे । काळ वेळ नाहीं जया ॥५२॥ जैसी अनेक जलचरें एक समुद्र । अनेक पक्षी परी एक अंबर । अनेक रस परी एक नीर । व्यापक श्रीवर तैसा हा ॥५३॥ नाना अलंकार एक सुवर्ण । नाना घट एक मृत्तिका जाण । नाना पट परी एक तंतु पूर्ण । तैसा श्रीकृष्ण व्यापक ॥५४॥ नाना दीप एक अग्नी । नाना किरण परी एक वासरमणी । नाना तरंग एक पाणी । शार्ङ्गपाणी तेवीं दिसे ॥५५॥ ऐसा श्रीकृष्ण चाळक । जगद्वंद्य जगव्यापक । तेणें गोपीचें घृत लोणी सकळिक । भक्षिलें तीस न कळतां ॥५६॥ सवें घेऊनि गोपाळां । आणिक गृहीं प्रवेशला । कोणासही न कळे लीला । श्रीकृष्णाची अगम्य ॥५७॥ एके दिवशीं माध्यान्हकाळीं । एके गोपीचें घरीं वनमाळी । रिघाला तंव ते वेल्हाळी । उदका गेली यमुनेतें ॥५८॥ उदक घेऊनि आली सुंदरी । प्रवेशली जों निजमंदिरीं । तों एकलाचि पूतनारी । नवनीत भक्षीतसे ॥५९॥ म्हणे कोण रे तूं येथें । चोरूनि भक्षिसी नवनीतातें । तों बोलिलें वैकुंठनाथें । चोरटीं निश्चित तूंचि पैं ॥६०॥ माझें मी भक्षीत नवनीत । तूं कोण पुसावया येथ । गोपी गदगदा हांसत । घर माझें कीं चोरटिया ॥६१॥ कृष्ण म्हणे माझें म्हणतीस घर । परी बरवा करी विचार । आपुलें नव्हे शरीर । मग घरदार कोणाचें ॥६२॥ ऐसें बोले चक्रपाणी । गोपी विचार करी मनीं । कृष्ण बोलिला सत्य वाणी । नाशवंत सर्वही ॥६३॥ जें जें दिसे तें तें नाशवंत । माझें म्हणावया मी कोण येथ । अविनाश एक भगवंत । अज अव्यय अढळ जो ॥६४॥ नाशवंत अविद्यामय पिंड । क्षणिक सकळ ब्रह्मांड । अवघें मायामय वितंड । स्वप्नवत् क्षणिक हें ॥६५॥ शुक्तिकेचें रूपें काढिलें । वंध्यासुतें पात्र घडिलें । मृगजळींचे मासे भरिले । निशीमाजी जाऊनि ॥६६॥ अंवसेचे अंधारे काळें । दिवा दोप्रहरां वाळों घातलें । सिकतां कांतोनि सूत केलें । पाय बांधिले रज्जुसर्पाचे ॥६७॥ जितुकें दिसतें तितुकी कल्पना । अवघी मायिक दृश्यरचना । अविनाश वैकुंठराणा । नित्य नूतन अक्षयीं ॥६८॥ ऐसा गोपी करितां विचार । वृत्ति झाली तदाकार । इकडे गोरस समग्र । भक्षूनि सिद्ध पळावया ॥६९॥ सावध होऊनि गोपी बोले । माझें गृह नव्हे कळलें । तरी हें कोणाचें गृह वहिलें । सांग मज गोपाळा ॥७०॥ श्रीहरि म्हणे माझें सदन । गोपी बोले कासयावरून । सांग कांहीं घराची खूण । आपुलें जरी म्हणतोसी ॥७१॥ हरि म्हणे ऐक सुंदरे । आकाशें व्यापिली जितुकीं घरें । तितुकीं माझीं समग्रें । चराचर सर्वही ॥७२॥ हांसोनि बोले नितंबिनी । बरवी जाणतोसी संपादणी । घृतघट पुढां घेऊनी । हात कां माजी घातला ॥७३॥ मग बोले भक्तसखा । माजी बहुत पडल्या पिपीलिका । त्या वेंचूनियां देखा । टाकीतसें जाण पां ॥७४॥ गोपी म्हणे शेजेसीं । बाळें निजलीं सावकासीं । त्यांसी चिमटे कां घेतोसी । हृषीकेशी सांग पां ॥७५॥ उद्यां प्रातःकाळीं उठोनियां । म्हणतों वत्सें नेऊं चरावया । कोणत्या वनासी पुसावया । जागें करीं मी तयांतें ॥७६॥ ऐसें बोलोन लवलाह्या । कृष्ण पळाला उठोनियां । गोपी म्हणे रे लाघविया । ठकवूनियां गेलासी ॥७७॥ गार्हाणें सांगावया तेचि क्षणीं । येत्या झाल्या नितंबिनी । परमा लालसा कृष्णदर्शनीं । यशोदेसी बोलती ॥७८॥ मग हांसोनि बोलिल्या युवती । खोडी करितो तुझा श्रीपती । काय सांगों तुजप्रती । लिहितां क्षिती पुरेना ॥७९॥ गार्हाणें सांगता सुंदरी । त्यांचे डाव मनीं धरी । चित्तीं विचारी मुरारी । करीन बोहरी गोरसाची ॥८०॥ एक सांगे कामिनी । हरि प्रवेशला आमुचें सदनीं । तों शिंकीं बांधिलीं उंच स्थानीं । मग चक्रपाणी काय करी ॥८१॥ पाटावरी पाट रचुनी । त्यावरी तिवई दृढ ठेवूनी । त्यावरी गडी उभा करोनी । त्याच्या खांदा कृष्ण बैसे ॥८२॥ तरी शिंके नपवेचि करीं । मग रविदंड उभा करी । छिद्र पाडूनी घागरी । धारा लावी अखंड ॥८३॥ औट मातृका निरसूनि विशेष । संत सेविती स्वानंदरस । तैसाचि वैकुंठविलास । प्रेमें गोरस सेवीतसे ॥८४॥ कां सत्रावीचें स्वानंदनीर । सेविती जैसे योगेश्वर । त्याचिपरी यादवेंद्र । गोरस सुरस सेवीतसे ॥८५॥ गडियांसी म्हणे अवधारा । माझ्या कोंपरांच्या दुग्धधारा । अवघे तुम्ही प्राशन करा । द्वैतविचार टाकोनि ॥८६॥ ज्यावरी बैसला भगवंत । तो कृष्णचरणासी चिमटे घेत । म्हणे अवघे तूंचि खासी निश्चित । आम्हांस देईं सांवळिया ॥८७॥ मग भरोनि गोरस अंजुळी । सखयांसी पाजी वनमाळी । वरी मुख करोनि ते वेळीं । विलोकिती हरिवदन ॥८८॥ चकोर पाहती जैसा चंद्र । कीं चक्रवाकें लक्षिती दिनकर । कीं भूचरीमुद्रा योगेश्वर । ऊर्ध्वदृष्टीं पाहती ॥८९॥ गोपाळांचे नेत्र तेचि षट्पद । सेविती रविमुखकमलमकरंद । कीं स्वरूप देखोनि स्तब्ध । वेदश्रुती ज्यापरी ॥९०॥ ऐसें अवलोकितां कृष्णवदन । जैसा चातकां वर्षें घन । तैशा दुग्धधारा पूर्ण । गडियांलागीं वर्षतसे ॥९१॥ गडी बोलती हर्षेंकरून । कृष्णा घट दिसतो कीं लहान । सर्वांची दुग्धें तृप्ति होऊन । धार चाले अखंड ॥९२॥ असो आतां तेचि क्षणीं । जागी जाहली गौळिणी । गडियांसी म्हणे चक्रपाणी । पळा वेगें येथोनि आतां ॥९३॥ अवघे पळाले गोपाळ । एकला सांपडला वैकुंठपाळ । गौळिणीनें द्वार तत्काळ । जाऊनियां धरियेलें ॥९४॥ गौळण म्हणे रे चित्तचोरा । गडी पळविले सत्वरा । परी तूं सांपडलासी सुंदरा । आतां कैसा जासील ॥९५॥ काय वरकडांसी कारण । तूं मुख्य सांपडलासी जगज्जीवन । जैसें जिंकिलिया निजमन । करणें सहज आकळती ॥९६॥ हातीं लागल्या मुख्य धुर । सहजचि सांपडला परिवार । कीं घरांत आलिया दिनकर । किरणें कोठे पळती पां ॥९७॥ झालिया स्वरूपप्राप्ती । शांति दया क्षमा उपरती । सहजीं सहज सांपडती । सायास न करितां सत्वर ॥९८॥ मुख्य तूं सांपडलासी मज । आतां सकळांसी काय काज । हाता आलिया स्वरूप निज । नाना साधनें कासया ॥९९॥ हृदयीं बिंबला नारायण । मग क्षुद्रदैवतांचें काय कारण । सुधारस समुद्रीं होतां निमग्न । थिल्लरीं मन कां धांवें ॥१००॥ जो झाला वेदांतज्ञानी । त्यास काय कारण क्षुद्रसाधनीं । साधलिया अमृतसंजीवनी । मग औषधी कां व्यर्थचि ॥१०१॥ हातीं सांपडतां हिरा । मग कां वेंचाव्या अरण्यगारा । कल्पतरु आलिया घरा । मग बाभुळा कां भजावें ॥१०२॥ तैसा कृष्णा तूं सांपडलासी । तुज नेईन यशोदेपासीं । शिक्षा लावीन निश्चयेंसी । हृषीकेशी तुज आतां ॥१०३॥ ऐसें बोलतां गौळिणी । गदगदां हांसे मोक्षदानी । दुग्धगुळणी मुखीं धरोनी । कामिनीपासी पातला ॥१०४॥ गदगदां हांसे अबला । तुज जावों नेदीं गोपाळा । कृष्णगुळणी घातली डोळां । क्षणमात्र न लगतां ॥१०५॥ येरी जंव नेत्र चोळी । तो पळाला वेगें वनमाळी । ऐसा गोपी ते वेळीं । गार्हाणें सांगे मायेतें ॥१०६॥ तों एक बोले गजगामिनी । परवां कृष्ण आला आमुचें सदनीं । मी करीत होतें मंथनी । हरि अंगणांत उभा असे ॥१०७॥ मग मी म्हणे हृषीकेशी । चोरा काय पाळती पहातोसी । येरू म्हणे वत्सें पाहावयासी । सहज आलों मी येथें ॥१०८॥ तान्ह्या वत्सांचे कळप ते क्षणीं । बांधिले होते गोष्ठांगणीं । त्यांत जावोनि चक्रपाणी । वासरें करें कुरवाळी ॥१०९॥ कोणत्या गाईचें वासरूं कोण । म्हणोनि पुसे मजलागून । तों मी करीत होतें मंथन । पुढें पाहूनि यशोदे ॥११०॥ तों श्रीकृष्णें काय केलें । कळप वत्सांचे सोडिले । द्वाराबाहेर लावूनि दिधले । क्षणमात्र न लागतां ॥१११॥ पुच्छें वाहोनि हुंकारे । आळोआळीं पळती वासरें । ऐसें करूनि सर्वेश्वरें । मज येऊनि सांगतसे ॥१२॥ म्हणे तुझीं वत्सें सुटलीं । काननाप्रति पळोन गेलीं । ऐसें ऐकतां म्यां ते वेळीं । मंथन तैसेंचि टाकिलें ॥११३॥
ग्रामाबाहेर वासुरें गेलीं । तीं मज न वळती ते वेळीं ।
तों घरामध्यें वनमाळी । दधि नवनीत भक्षीत ॥१४॥ दूधही सकळ प्याला । डेरा मंथनाचा फोडिला । गोरस वाहत गेला । ओसरीखालता यशोदे ॥११५॥ केला दुधाणियाचा चूर । गोरस न उरे आणुमात्र । ऐसें करोनिया पंकजनेत्र । पळोनि गेला क्षणमात्रें ॥११६॥ घृत नवनीत दधि दुग्ध । खाऊनि केलें शुद्धबुद्ध । ऐसें करोनि मुकुंद । पळोनि आला तुजजवळी ॥१७॥ वासुरें घेऊनि तिसरे प्रहरा । मी आलें वो निजमंदिरा । तों खापरांचा चुरा । ओसरीवर झालासे ॥११८॥ ऐसें पीडिलें येणें माये । आतां मी बांधीन याचे पाये । कदा न सोडीं जननीये । बोलों काय बहुत आतां ॥११९॥ बाहेर कळों नेदीं कोणा । हृदयमंदिरीं वैकुंठराणा । दृढ बांधीन याचिया चरणा । कोणाकारणें कळो नेदीं ॥१२०॥ मायेसी कळों नेदीं मात । लोकांसी बोलों नेदीं निश्चित । काया वाचा मनें सत्य । माये यातें न सोडीं ॥१२१॥ हा घडामोडी दावूनि वदन । सवेंच पळतो न लगतां क्षण । ऐकोनि गोपीचें वचन । खदखदां हांसे श्रीरंग ॥१२२॥ मग बोले प्रेमळ सखा । मी न सांपडें ब्रह्मादिकां । चतुरे तुज कैंचा आवांका । कोंडावया मजलागीं ॥१२३॥ कृष्णवचन ऐकोनियां । गदगदां हांसतसे माया । तों आणिक गार्हाणें सांगावया । दुजी गोपी सरसावली ॥१२४॥ तंव ते म्हणे यशोदे सुंदरी । कृष्ण प्रवेशला एके मंदिरीं । तों ते गवळण गेली बाहेरी । सून घरीं एकलीच ॥१२५॥ तीस म्हणे वो नवनीत । कोठें ठेविलें सांग सत्य । तंव ते जाहली भयभीत । कृष्ण प्रवेशे अंतरीं ॥१२६॥ घृत नवनीत भक्षिलें । थोडेंसें निजकरीं घेतलें । तें सुनेच्या मुखीं गिडबिडीलें । आपण पळाला ते क्षणीं ॥१२७॥ सासू आली बाहेरूनी । तों सून मुख पुसी देखे नयनीं । म्हणे गे चोरटे लोणी । नित्य तूंचि भक्षिसी ॥१२८॥ आम्ही म्हणों भक्षितो कृष्ण । परी आज कळलें तुझें विंदान । दोघींत झोटधरणी होत दारुण । बाहेर कृष्ण पाहतसे ॥१२९॥ सून म्हणे मामीसें ऐका । लोणी कृष्णें लाविलें मुखा । तो परम नष्ट देखा । करोनि करणी पळाला ॥१३०॥ गौळण पाहे बाहेरी । तों उभा असे श्रीहरी । तंव ते म्हणे मुरारी । बरी चोरी करितोसी ॥१३१॥ सुनेच्या मुखीं लावूनि नवनीत । पळालासी हरि त्वरित । येरू म्हणे वो तिनें निश्चित । माझ्या मुखीं लाविलें ॥१३२॥ हे खात होती चोरूनि लोणी । मी खेळावया आलों आंगणीं । माझ्या मुखीं लावूनि लोणी । हेच पळाली घरांत ॥१३३॥ मजवरी आळ घालिती वृथा । बोलतां हांसें आलें जगन्नाथा । येरी म्हणे हे गोष्टी यथार्था । भक्षिलें इणेंचि साच पैं ॥१३४॥ पुढती कोपली सुनेवरी । कां गे ऐसी करितेसी चोरी । आळ घालिसी बाळावरी । कुडी खरी तूंचि पैं ॥१३५॥ ऐसी लावूनि कळी । पळोनि आला वनमाळी । तों आणिक एक गौळण उठिली । गार्हाणें सांगावया ॥१३६॥ म्हणे ऐक यशोदे सुंदरी । परवां बिदीस खेळतां मुरारी । एक गोपी देखोनि ते अवसरीं । काय हरि पुसतसे ॥१३७॥ म्हणे तुझ्या वक्षःस्थळीं । हिंगुरडें कां वाढलीं । कीं आमुचे चेंडू चोरूनि वेल्हाळी । चोळीमाजी लपविले ॥१३८॥ आमुचा चेंडू दे झडकरी । म्हणोनि रळी करी हरी । तिनें झिडकारितां मुरारी । पळोनियां गेला हो ॥१३९॥ एकीचें घरीं गोरस खाऊनी । शिंकीं आणि रितीं दुधाणीं । नेऊनि बांधी दुसरें सदनीं । न कळतांचि अकस्मात ॥१४०॥ तंव ते गोपी प्रातःकाळीं । शेजारणीच्या गृहा आली । म्हणे आमुचीं शिंकीं गुप्त जाहलीं । दुधाणियांसमवेत ।१४१॥ जों वरतें पाहे सुंदरी । तों आपुली शिंकीं तिचें घरीं । मग म्हणे गे चतुर नारी । माझी शिंकीं येथें कां ॥१४२॥ तुमचा बरा गे शेजार । आम्हांसी फळला साचार । आम्ही कृष्णावरी चोरी समग्र । मूर्ख व्यर्थचि घालितों ॥१४३॥ परब्रह्म केवळ गे श्रीहरी । त्यावरी कोण घालील चोरी । तो ब्रह्मानंद निर्विकारी । चराचरीं व्यापक ॥१४४॥ आम्ही म्हणों कृष्ण बाळ । परी तो परब्रह्म निर्मळ । त्यावरी कोण घालील आळ । निर्मळा मळ न लागे ॥१४५॥ शेजारी झाले चोर । मग काय राखील राखणार । कुंपणें शेत खादलें समग्र । तरी मग कोणें राखावें ॥१४६॥ माझीं शिंकीं आणि दुधाणीं । कैशीं प्रवेशलीं तुझ्या सदनीं । दोघींसीं मांडली झोटधरणीं । हरीची करणी ऐसी हे ॥१४७॥ एके गौळिणीची सून । परसांत आंग धुतां नग्न । तों एकाएकीं मनमोहन । गृहामाजी पातला ॥१४८॥ म्हणे आमुचा चेंडू अकस्मात । उडोनि आला तुमचें परसांत । म्हणोनि गेला धांवत । आंग धूत कामिनी ते ॥१४९॥ तीस हरि म्हणे ते समयीं । ऊठ वेगें चेंडू देईं । आमुचे कंदुक धरूनि हृदयीं । बैसलीस गे चोरटे ॥१५०॥ तीस हातीं धरूनि उठवीत । तों सासू आली परसांत । ते म्हणे तूं नष्ट बहुत । तुज शिक्षा लावीन मी ॥१५१॥ धरावया धांवली म्हातारी । तों वेगें पळाला पूतनारी । तो वैकुंठपीठविहारी । निर्विकार जगदात्मा ॥१५२॥ एक गोपी म्हणे हरीसी । जरी तूं आमुच्या गृहा येसी । मी तुज बांधीन रे खांबासीं । हृषीकेशी जाण पां ॥१५३॥ तिचा डाव धरिला मनीं । रात्रीं तिच्या गृहांत जाऊनी । तिच्या वस्त्रांत नेऊनी । वृश्चिक सोडिले गोपाळें ॥१५४॥ नग्न गौळण करी कोल्हाळ । वस्त्रें टाकिलीं तत्काळ । सवेंचि जवळी येऊनि घननीळ । पुसतसे तिजलागीं ॥१५५॥ म्हणे काय गे वर्तमान । हरि झालें रे वृश्चिकदंशन । कृष्ण म्हणे आतां मी उतरीन । क्षणमात्र न लागतां ॥१५६॥ तूं नग्न बिदीस येईं । विंचू उतरीन लवलाहीं । येरी म्हने परता होईं । चक्रचाळका गौळिया ॥१५७॥ हरि म्हणे मज खांबासी । बांधीन गौळिणी तूं म्हणसी । तुज प्रचीत निश्चयेंसी । देवें दाविली जाण पां ॥१५८॥ ते म्हणे जगज्जीवना । सर्वांगा चढल्या वेदना । प्राण जाती मनमोहना । उतरीं वेगें वृश्चिक ॥१५९॥ मग कृष्ण येऊनि जवळी । कृपादृष्टीं तीस न्याहाळी । वेदना राहिल्या सकळी । क्षणमात्र न लागतां ॥१६०॥ जो अहंकाराविंचू उतरिता । काळव्याळभय दूर करिता । जो ब्रह्मादिकांचा नियंता । मायेपरता सर्वसाक्षी ॥१६१॥ जो भवसागरजलतारक । जो सकळसृष्टिसंहारक । जो विश्वजनकजनक । नामरूपातीत जो ॥१६२॥ असो यशोदा ऐके सादर । गार्हाणियांचे चपेट थोर । गौळिणी सांगती समग्र । नाना चरित्रें हरीचीं ॥१६३॥ एक म्हणे येणें सर्प नेला । एक दंपत्यांत सोडिला । तीं बाहेर येऊनि सकळां । लोकांलागीं सांगती ॥१६४॥ धांवा धांवा म्हणती ते क्षणीं । सर्प निघाला अंथरुणीं । एक म्हणती मघां चक्रपाणी । सर्प घेऊनि जात होता ॥१६५॥ ही त्याचीच वो करणी । कैंचा सर्प येईल सदनीं । त्या म्हणती गोकुळा टाकूनी । कृष्णभेणें जाऊं पैं ॥६६॥ जित सर्प कांखे घेऊन । बिदोबिदीं पळे तुझा नंदन । विंचू मुष्टीमाजी धरून । भेडसावी बाळांतें ॥१६७॥ एक गौळण देखोनि गरोदर । तिजजवळी येऊनि यादवेंद्र । म्हणे कां गे तुझें उदर । येवढें वाढलें सांग पां ॥१६८॥ ते म्हणे गर्भिणी मी हृषीकेशी । कृष्ण म्हणे कैसी जाहलीसी । येरी म्हणे भलतेंचि पुससी । चावट होसी बहुत तूं ॥१६९॥ हरि म्हणे नवल देवाची करणी । जाहलीस वो गर्भिणी । येरी झिडकावी ते क्षणीं । परता होईं गोवळ्या ॥१७०॥ तूं आतां दिसतोसी लहान । पुढें बहुत शिकसी शहाणपण । तुझे मातेस सांगोन । शिक्षा करवीन तुज आतां ॥१७१॥ एक गौळण पुरुषार्थें । राखी आपुल्या गोरसातें । म्हणे मी बिंदुमात्र कृष्णातें । लागों नेदीं घरीं माझ्या ॥१७२॥ गोरस सांचवूनि कावडी भरली । बरी कसूनि दृढ बांधिली । उद्यां मथुरेसी नेऊनि सकाळीं । विकूनि येईन क्षणमात्रें ॥१७३॥ कृष्णमुखीं गोरस जाण । पडों नेदीं मी वाघीण । कृष्णासी शिक्षा लावीन । जरी येईल गृहा माझ्या ॥१७४॥ ऐसी अभिमानें ती गौळणी । निजे उशा कावडी घेऊनी । तों रजनीमाजी चक्रपाणी । करी करणी विपरीत ॥१७५॥ जो सकळ देहींचा साक्षी एक । जो सकळ चित्तपरीक्षक । जो सच्चिदानंद निष्कलंक । दावी कौतुक भक्तांसी ॥१७६॥ रजनीमाजी कृष्णनाथ । प्रवेशला तिच्या गृहांत । तीस निद्रा लागली अद्भुत । हरि सोडी कावडीतें ॥१७७॥ गोरस सर्वही भक्षूनी । रितीं केलीं दुधाणीं । त्यांमाजी सर्प विंचू भरूनी । पुढती बांधिलीं तैसींच ॥१७८॥ पाली सरड बेडूक । अवघीं मडकीं भरलीं देख । खूणगांठ तैसीच निष्टंक । जगदुद्धारें बांधिली ॥१७९॥ घरा गेला वनमाळी । गौळण उठली प्रातःकाळीं । कावडी खांदां घेतली । मथुरेसी गेली तेधवां ॥१८०॥ गांवचे लोक आले ते क्षणीं । गोरस पुसती गौळणी । येरी म्हणे दहीं दूध लोणी । चारी जिन्नसा आहेती ॥१८१॥ एक म्हणती गोरस कैसा आहे । येरी म्हणे द्रव्य आणा लवलाहें । कावडी सोडूनियां पाहे । मडकीं जंव उघडोनि ॥१८२॥ तों सर्प विंचू ते वेळे । भरभरां आंतून निघाले । लोकांवरी धांवले । डंखावया तेधवां ॥१८३॥ सरड पाली चहूंकडे धांवती । लोक बिदोबिदीं पळती । एक म्हणती कुडी पापमती । गौळण आहे दुष्ट हें ॥१८४॥ आमच्या गांवावरी विघ्न । विंचू सर्प कावडी भरोन । इणें सोडिले आणून । कौटाळीण मोठी हे ॥१८५॥ महाचांडाळीण गौळिणी । ईस ताडण करावें धरूनी । तंव ती कावडी टाकूनी । पळे उठोनी सत्वर ॥१८६॥ लोक धांवती क्रोधेंकरोनी । कावडी टाकिली फोडोनी । सर्प विंचू धरोनी । लोक मारिती ठायीं ठायीं ॥१८७॥ एक म्हणती गौळिणीसी धरा वेगें । येरी पळे गोकुळमार्गें । ते निस्तेज होवोनि सर्वांगें । वाटे पडे अडखळोनि ॥१८८॥ धांपा दाटे वाटे रडे । उलथोनि चिखलामाजी पडे । लोक मारिती धोंडे खडे । एक शेण हाणिती ॥१८९॥ यमुना उतरोनि गोपी गेली । गोकुळामाजी प्रवेशली । तीस पुन्हां मथुरा वर्ज्य जाहली । लोक टपती मारावया ॥१९०॥ कृष्णास जरी देती गोरस । तरी शतगुणें वाढे विशेष । ते गृहीं दशा न ये आसमास । गोरस हरीस अर्पितां ॥१९१॥ हरिमुखीं बिंदुमात्र पडे । शतगुण तत्काळ वाढे । जरी कृष्ण न ये घराकडे । तरी गौळिणी कष्टी होती ॥१९२॥ कृष्ण आजि आला नाहीं घरा । म्हणोनि चिंताक्रांत गोपदारा । बिंदुमात्र अर्पितां श्रीवरा । गोरस वाढे असंभाव्य ॥१९३॥ वटबीज मोहरीयेवढें । परी पर्वताकार वृक्ष वाढे । तैसा हरिमुखीं गोरस पडे । दशा चढे गृहासी त्या ॥१९४॥ गार्हाणें सांगती गौळिणी । त्या उग्याचि कौतुकेंकरोनी । परी मनामाजी चक्रपाणी । नित्य यावा गृहातें ॥१९५॥ भलत्या कार्यमिषेंकरोनी । यशोदेच्या गृहा कामिनी । क्षणक्षणां येती फिरोनी । कृष्ण नयनीं पाहावया ॥१९६॥ पूर्णब्रह्म वैकुंठनायक । त्यासी ते गौळण जाहली विन्मुख । गोरस न देऊनियां दुःख । मथुरेमाजी पावली ॥१९७॥ प्रपंच ना परमार्थ । गौळण श्रमी व्यर्थ । जैसा निर्भागी उदिमा जात । त्यास नागवीत तस्कर पैं ॥१९८॥ भगवंतीं पडलें अंतर । वर्ज्य जाहलें मथुरापुर । खुंटला प्रपंचव्यवहार । द्रव्य अणुमात्र लाभेना ॥१९९॥ तेंच कृष्णमुखीं अर्पित । तरी सहस्रगुणें वाढत । कृपा न करितां भगवंत । विघ्नें बहुत येती हो ॥२००॥ भगवंत झालिया पाठमोरा । नसतींच विघ्नें येतीं घरा । महारत्नें होती गारा । कोणी न पुसे तयांतें ॥२०१॥ आपुलें द्रव्य लोकांवरी । तें बुडोनि जाय न लाभे करीं । ज्यांचें घ्यावें ते द्वारीं । बैसती आण घालूनियां ॥२०२॥ वैरियां करीं सांपडे वर्म । अवदशा येऊनि बुडे धर्म । विशेष वाढले क्रोध-काम । तरी देवक्षोभ जाणिजे ॥२०३॥ आपुले जे कां शत्रु पूर्ण । ज्यांसी आपण पीडिलें दारुण । अडल्या धरणें त्यांचे चरण । तरी देवक्षोभ जाणिजे ॥२०४॥ लाभाकारणें निघे उदिमास । तो हानीच होय दिवसेंदिवस । पूज्यस्थानीं अपमान विशेष । तरी देवक्षोभ जाणिजे ॥२०५॥ सुहृद आप्त द्वेष करिती । नसते व्यवहार येऊनि पडती । सदा तळमळ वाटे चित्तीं । तरी देवक्षोभ जाणिजे ॥२०६॥ आपुलें राज्य संपत्ति धन । शत्रु भोगूं पाहे आपण । देह पीडे व्याधीविण । तरी देवक्षोभ जाणिजे ॥२०७॥ विद्या बहुत जवळी असे । परी कोणीच तयासी न पुसे । बोलो जातां मति भ्रंशे । तरी देवक्षोभ जाणिजे ॥२०८॥ ठेविला ठेवा न सांपडे । नसतीच व्याधि अंगा जडे । सदा भय वाटे चहूंकडे । तरी देवक्षोभ जाणिजे ॥२०९॥ असो गौळण सर्वस्वें ठाकली । भगवंतीं ते अंतरली । प्रपंच-परमार्थां मुकली । ते पडली भवसागरीं ॥२१०॥ पुरुष अथवा नारी । कृपा न करितां श्रीहरी । व्यर्थ कष्टती संसारीं । नाना दुःखें भोगिती ॥२११॥ असो मग तेच गौळणी । यशोदेच्या गृहा येऊनी । लागली कृष्णाचे चरणीं । म्हणे हरि दया करीं कां ॥२१२॥ तुजसी अंतर पडतां । मुकलें इह-परत्र स्वार्था । कृपा करीं कृष्णनाथा । निरसीं चिंता सर्वही ॥२१३॥ कृष्ण म्हणे राहें स्वस्थ । भगवंतीं ठेवीं चित्त । तेणें प्रपंच आणि परमार्थ । ब्रह्मरूप भासे हो ॥२१४॥ ऐसा निजभक्तमानसविहारी । नाना लीला दावी मुरारी । तो ब्रह्मानंद निर्विकारी । दावी चरित्र दासांतें ॥२१५॥ पाहतां हरिविजयग्रंथ । ग्रंथरूपें श्रीभगवंत । हृदयीं राहे अखंडित । नाठवत दुजें कांहीं ॥२१६॥ पाहीन म्हणतां हा ग्रंथ । पापें होती भयभीत । आधींच पळती समस्त । पुढती न येत फिरोनी ॥२१७॥ जन्मोजन्मींचीं पापें बहुतें । लिहिलीं होतीं चित्रगुप्तें । तो तटस्थ राहे तेथें । लेखणी न चले पां ॥२१८॥ हें म्हणतां हरिचरित्र । परम सुखावे विष्णुपुत्र । तो पूजा घेऊनि सत्वर । सामोरा येत तयातें ॥२१९॥ अवलोकितां हरिविजय । सर्वकाळ पावे जय । कळिकाळाचें नाहीं भय । रक्षी स्वयें हरि त्यातें ॥२२०॥ या ग्रंथरूपें गोदावरी । वाहे निरंतर भक्तांवरी । सत्यवतीसुत ब्रह्मगिरी । येथूनि इचा उगम ॥२२१॥ वैराग्य आणि भक्ती । या दोन्ही थड्या शोभती । ज्ञानरूपें गोदा निश्चितीं । वाहे अभय निर्मळ ॥२२२॥ वरकड नदियांमाजी जीवन । या ग्रंथगोदेमाजी जगज्जीवन । प्रेमपूर येती भरोन । नाहीं वोसाण दूषणांचें ॥२२३॥ वरकड नद्यांचें डहुळ पाणी । येथें निर्मळ सदा चक्रपाणी । भक्तराज बैसले श्रवणीं । अनुष्ठानीं सादर ॥२२४॥ ते गंगेमाजी बुडतां मरिजे । हे गंगेमाजी बुडतां तरिजे । वृत्ति जळसावजें । माजी निमग्न तळपती ॥२२५॥ श्रीकृष्ण जगदानंदकंद । तोचि स्वामी ब्रह्मानंद । त्याचे चरणलक्षणमृगमद । श्रीधरमिलिंद सेवींत ॥२२६॥ इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंशभागवत । चतुर परिसोत प्रेमळ भक्त । षष्ठोऽध्याय गोड हा ॥२२७॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्रीगणेशाय नमः । श्रोतेहो ! कृष्णलीला वर्णन करताना जो आनंद होतो तो काय वर्णावा ? भगवंता ! तुझी कृपा झाली तरच तू दिसतोस ! यशोदेला सुद्धा दृष्टिभ्रम झाला ना !
कृष्णाचे वय आणि खोड्या-दोन्ही वाढत होते ! सूर्योदय पाहून तो म्हणे- "आई, तो लाल चेंडू आकाशात कुणी नेला ? मला तोच खेळायला हवा ?" ती काय समजूत घालणार ? तो हट्ट करून रडू लागला, भूमीवर पडून आकांडतांडव करू लागला. मग आपणच म्हणाला- "रात्री पाण्याच्या रांजणात चांदीचा चेंडू पडला होता- मी पाहिला- तो तरी दे ?" कृष्णाने पाण्यात तर चंदाचे प्रतिबिंब पाहिले होते ! यशोदेला हसू आले तर तो चिडला- ती काय देणार चंद्र काढून ! मग म्हणाला- "तू ताक घुसळतेस ना, तेव्हा डेर्यात घुरघुर आवाज येतो. तो तरी माझ्या हातात काढून दे. लोणी काय, मीच घेतो काढून ! कधी म्हणे- "आई, तू सारखी कामात असतेस- माझ्याकडे दुर्लक्ष करतेस ! दिव्यांच्या प्रकाशात तुझी सावली पडते तीसुद्धा तू बरोबर नेतेस. ती तरी मला ठेव. मी तिच्याशी बोलेन !" तो काय काय मागे ते आई काही देऊ शकत नव्हती ! रत्नांची चमक वेगळी काढून मागे, मडक्यातली पोकळी काढून मागे. त्याच्या विलक्षण मागण्या ! मुलखावेगळे हट्ट. ती एकदा कंटाळून म्हणाली, "कृष्णा, अरे तू नाही नाही ते मागतोस ! मला त्रास देतोस. मी तुला आता बागुलबुवासच देऊन टाकणार !" तर विचारी "तो बागुलबुवा कुठे असतो ? कसा असतो ? " यशोदेने भयंकर बागुलबुवाचे काल्पनिक वर्णन केले, तो अंधार्या खोलीत असतो असे सांगितले. तर तो म्हणाला- "मला घेऊन चल". कृष्णाला धाक वाटावा म्हणून तिने काळोखाच्या एका खोलीत त्याला नेले. तो काय, तिथे कृष्ण जाताच लख्ख प्रकाश पडला ! सर्वत्र कृष्णच भरलेला दिसू लागला ! कृष्णाला घेऊन बाहेर येते तो कृष्ण म्हणाला- "हे काय ? दाखव ना बागुलबुवा ?' तो रडतच बसला. तेवढ्यात बलरामाने त्याला खेळायला बोलावले तेव्हा सारे विसरून गेला धावत !
इतर गोपबाल मिळाले. निरनिराळे खेळ खेळू लागले. चेंडू, लपंडाव, शिवाशिवी ! मग गेले एका गोपीच्या घरात. दही, लोणी मटकावले. अशी ती सारी मुले धांगडधिंगा करीत कित्येक गोपींच्या घरात गेली. दह्यादुधाचा फन्ना उडविला. कृष्णाच्या नादाने पोरे उंडारली होती. कृष्णाच्या पायात चाळ होते ते वाजत असत, पण ते मात्र कोणाही गोपींना ऐकू येत नसत. मुलांना तो सांगे- "अगदी आवाज करू नका" त्याचे चाळ वाजतात म्हणून मुलांनी दाखवून दिले तर स्वतःच्या कानात तो बोटे घाली- त्यावेळी सर्वजण बहिरे होत ! मग मुले त्याच्या कानातून त्याचीं बोटे काढायला लावत असत. एकदा एक गोपी यमुनेवरून पाणी आणायला गेली होती. कृष्ण तेवढ्यात तिच्या घरात शिरला. लोणी खाऊ लागला. ती आली तरी तो तिथेच होता- "बरा सापडला चोर ! माझे लोणी चोरून खातोस ?" म्हणून तिने दटावले. तर म्हणाला "तुझे लोणी ? मी चोर ? छे ! तूच चोरटी. लोणी माझेच आहे." गोपी रागावून म्हणाली- "माझ्याच घरात शिरून वर शिरजोरी ?" तेव्हा म्हणाला- 'हे तुझे घर ? तुझे म्हणजे काय ग ? तुझा हा देह तरी नक्की तुझा आहे का ?" गोपीच्या मनाला त्याने अचानक ज्ञानबोध दिला. तिची समाधीच लागली. तेवढ्यात स्वारी बाहेर निघाली तोच ती भानावर आली. मग विचारले- 'मग हे घर कुणाचे ?" तर म्हणाला- "माझेच- सगळे जगच माझे आहे." "एवढ्या गप्पा मारतोस, तर मडक्यातले लोणी का खातोस ? गोपबालकांना झोपले असताना चिमटे का काढतोस ?" "ते होय ? अगं तुझ्या त्या लोण्यात मुंग्या होत्या त्या काढल्या बरं का ! मुलांना आपण नाही बा चिमटे काढले ! मी नुसते विचारले- "गायी चारायला कुठे न्यायच्या ?" उगाच काहीतरी आळ घेतेस ?' अशा खोड्या तो वारंवार करी. गोपी यशोदेच्या घरी त्याच्याविरुद्ध गार्हाणी घेऊन येत; पण खरा हेतू असे त्या सावळ्या बाळाला पुन्हा एकदा पहाण्याचा. कृष्ण आईच्या पाठीशी लपून बसे. सगळया तक्रारी ऐके. हसत म्हणे- मी कुठेही गेलो नाही, लोणी खाल्ले नाही. यशोदेला नवल वाटे. कृष्णाच्या तोंडाला तर लोणी लागलेलेच असायचे ! चोर सापडायचा ! तर तो म्हणे- "मुद्दाम मला लोणी भरवतात. घरचे रागावतील म्हणून मलाच चोर म्हणतात ?" जी गोपी तक्रार करी तिच्या घरी दुसर्या दिवशी नक्की गडबड करी. गोपींचे ऐकून यशोदा म्हणे- "मी आता तुमच्या देखत याला छडीने मारते" तर गोपी म्हणत- "त्याला मारू नकोस. आम्हालाच रडायला येईल ?" एका घरात सवंगड्याना घेऊन तो शिरला. दूध दही सारेजण फस्त करू लागले. तोच गोपी आली. कृष्णाचे दोन्ही हात पकडून त्याला दटावू लागली. तेव्हा तोंडात दूध होते त्याचीच चूळ त्याने त्या गोपीच्या डोळ्यांवर पटकन् मारली ! काय करणार ती ? संधी साधून सारे पळाले ! एका गोपीच्या घरी जाऊन त्याने गोठ्यातली वासरे स्वतःच सोडली. गोपीला जाऊन सांगितले- "अहो ! तुमची वासरे दावी तोडून पळाली ! धावा !" ती धावत बाहेर गेली. दूर गेलेली वासरे तिने त्यांच्या मागे धावपळ करून कशीबशी परत आणून बांधली. तोपर्यंत कृष्णाने घरात जाऊन दूध, लोणी खाऊन मडके फोडून ठेवले. ती परत आली तो तो पळाला. गोपी हातात खापरे घेऊन यशोदेकडे आली आणि तक्रार करू लागली ! यशोदेला त्या गोपींच्या तक्रारी ऐकून राग येई पण कृष्ण नंतर इतका सालस वागे की तो राग निवळून जाई. एका घरी सासूसुनेचे पटत नसे. सून कृष्णाला काही देत नसे. कृष्ण संधी साधून एकदा तिच्या घरी गेला. लोणी चोरून खाऊन, सुनेचे लक्ष नसताना पटकन तिच्या तोंडाला लोणी फासून पळाला. तोच सासू आली. सुनेवर तिने लोणी चोरून खाण्याचा आळ घेतला. मग लागले दोघीचे भांडण ! कृष्ण लपून ते ऐकत होता. तो पुढे झाला नि म्हणाला- "अहो माई, तुमच्या सुनेने लोणी चोरून खाल्ले आणि मला चोरीत सामील केले ! मी तुम्हाला सांगू नये म्हणून तिने मला पण भरविले ! मी नको नको म्हणत होतो हं ! मला काय कमी आहे ?" एका गोपीच्या घरची मडकी शिंकाळ्यासकट दुसर्या गोपीच्या घरी नेऊन बांधी आणि त्यांचे हा भांडण लावी. एक गोपी म्हणाली- "तुला मी एका खांबाशी बांधून ठेवते ?" तर कृष्णाने अद्भुत माया केली ! तिला कितीतरी विंचू चावल्यासारख्या वेदना होऊ लागल्या ! मग ती शरण आली तेव्हा कृष्णाने क्षमा मागायला लावली. तिच्याकडे एकदा कृपेने पाहिले आणि वेदना लगेच थांबल्या ! एका गोपीने कृष्णाला दूध दही न देतां मडकी कुलुपांत बंद करून ठेवली ! पण कृष्णाने अघटित माया केली ! ती गोपी दुसर्या दिवशी दूध दही विकायला मथुरेस गेली व मडकी उघडली तो त्यांत साप आणि विंचू ! लोकांनी तिला मथुरेतून पिटाळून लावले ! देवाला थेंबभर तरी नैवेद्य द्या- मग सुखाने रहा ! त्याला अर्पण न करतां भोगू जाल तर सुखाचा लवलेशही मिळणार नाही, उलट, दुःख मात्र वाट्याला येईल ! एवढे त्रास सहन करूनही गोपगोपी कृष्णावर अपार प्रेम करीत. तो दिसला नाही तर कोणाला चैनच पडत नसे. यशोदेकडे यावे, कृष्णाच्या गोष्टी बोलाव्या आणि त्याचे दर्शन डोळे भरून घेऊन मग घरी जावे असेच पुष्कळ गोपी करीत. रोज नव्या खोड्या, नव्या तक्रारी आणि तितकेच नवे कौतुक ! श्रोतेहो ! भगवंत आपलासा करा. त्याच्याच गोष्टी बोला, त्याचेच दर्शन घ्या. तो पाठ फिरवील तर संसारही सरळ होणार नाही ! षड्रिपू वाढतील, संपत्तीचा नाश होईल, विद्येचा लोप होईल, दुखणी जडतील. सर्व प्रकारचे भय उत्पन्न होईल ! जो भगवंताला आपले तन मन धन अर्पण करणार नाही त्याचे जीवित व्यर्थ ! ज्या गोपीच्या घटात दुधा दह्याऐवजी साप, विंचू निघाले ती कृष्णाला शरण आली. तिने कृष्णाकडे दयेची याचना केली. तेव्हा कृष्णाने तिला त्याग व भक्ती, ध्यान व दान यांचा बोध केला ! ही हरिलीला म्हणजे-व्यास हेच ब्रह्मगिरी, त्यावर उगम पावलेली गोदावरी नदी आहे ! भक्तीची ही गंगा ! हीत जो बुडी मारील तो तरेल असे हे कोडे आहे ! अध्याय ६ समाप्त ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ |