|
॥ श्रीहरिविजय ॥ ॥ अध्याय पाचवा ॥
शकटासुरवध - बाललीला - तृणावर्तवध -
श्रीगणेशाय नमः ॥
जय जय जगदंकुरकंदा । सत्यज्ञाना श्रीब्रह्मानंदमूर्ति । सच्चिदानंदमूर्ति अभेदा । जगद्वंद्या श्रीहरे ॥१॥ जय जय गलितभेद अखिला । परमपुरुषा अतिनिर्मळा । अनंतकोटिब्रह्मांडपाळा । तुझी लीला अगम्य ॥२॥ नमो अनंगदहनप्रिया अनंगा । सकलांगांगचालका श्रीरंगा । निर्विकारा निर्द्वंद्वा अभंगा । अक्षय अव्यंगा जगद्गुरो ॥३॥ नमो महामायाआदिकारणा । जय वेदनिलया वेदरक्षणा । अविनाश तूं वैकुंठराणा । विष पिऊनि अक्षय ॥४॥ चौथा अध्याय संपतां तेथें । पूतना शोषिली जगन्नाथें । यशोदा कडे घेऊनि कृष्णातें । सद्गद जाहली सप्रेम ॥५॥ म्हणे थोर अरिष्ट टळलें । भगवंतें बाळ वांचविलें । माझें पूर्वपुण्य फळासी आलें । विघ्न टळलें तरीच हें ॥६॥ नंद तेव्हां नव्हता गोकुळीं । घेऊनि संगें श्रेष्ठ श्रेष्ठ गौळी । राज्यद्रव्य द्यावया ते वेळीं । मथुरेसी गेला होता तो ॥७॥ असो पूतनेचें प्रेत पडिलें । असंभाव्य कोणासही न ढळे । गौळी बहुत मिळाले । परी न उचले कोणासी ॥८॥ विशाळ प्रेत घोर थोर । न निघे मंदिराबाहेर । मग आणूनि तीक्ष्ण कुठार । खंडें केली तियेचीं ॥९॥ वृक्ष शाखा तोडिती बळें । तैसे हस्तचरण केलें वेगळें । गांवाबाहेर सरण रचिलें । बहुत काष्ठें आणूनि ॥१०॥ चेतविला वैश्वानर । माजी घातलें प्रेत थोर । अग्निशिखा प्रचंड तीव्र । अंबर कवळूं धांवती ॥११॥ गौळी पाहती ते वेळां । अग्निसंगें सुवास सुटला । जनघ्राणदेवता सकळा । तटस्थ जाहल्या सुवासें ॥१२॥ येवढा सुवास अद्भुत । कासयाचा असंभावित । तरी पूतनेच्या हृदयीं जगन्नाथ । क्रीडला अतिप्रीतीनें ॥१३॥ हरि सच्चिदानंदतनु । जो मायातीत निर्गुण अतनु । जो निर्विकार पुरातनु । सकळ तनूंचा साक्षी पैं ॥१४॥ जो अयोनिसंभव श्रीहरी । जगन्निवास लीलावतारी । तो पूतनेच्या हृदयमंदिरीं । अंतर्बाह्य पूर्ण भरला ॥१५॥ म्हणोनि अग्निसंगें सुवास येत । गोकुळीं जन जाहले तटस्थ । नंद आला अकस्मात । मथुरेहुनि ते वेळां ॥१६॥ लोकीं वर्तमान सांगितलें । बाळ पूर्वभाग्यें वांचलें । नंद आला ते वेळे । सकळ गौळियांसमवेत ॥१७॥ तों यशोदा बैसली कृष्ण घेऊन । सद्गदकंठ सजलनयन । नंद जवळी गेला धांवोन । हरीस उचलोन आलिंगी ॥१८॥ वदन सर्वानंदसदन । नंद पाहे अवलोकून । म्हणे विघ्न चुकलें दारुण । उत्साह पूर्ण मांडिला ॥१९॥ मंडप द्वारींउभवोन । मेळवून सकळ ब्राह्मण । गो-भू-हिरण्य-अन्नदान । उत्साह संपूर्ण नंद करी ॥२०॥ नंदास कैसें वाटलें । कीं जहाज बुडतां कडे लागलें । कीं अमृतमेघ वर्षले । आपणावरी निजभाग्यें ॥२१॥ मरणकाळीं सुधारस जोडला । कीं आनंदाचा ध्वज उभारिला । नंद ब्रह्मानंदें धाला । तो सोहळा न वर्णवे ॥२२॥ कळलें कंसास वर्तमान । पूतना पावली मोक्षसाधन । दचकलें कंसाचें मन । भयेकरूनि व्यापिला ॥२३॥ मनीं म्हणे काय करूं विचार । वैरी होतो हळू हळू थोर । पेटत चालिला वैश्वानर । मग नाटोपे विझवितां ॥२४॥ वाटे क्षयरोग लागला । काळसर्प गिळतो मला । आयुष्यवृक्ष कडाडिला । उन्मळोनि पडे आतां ॥२५॥ वाटे महाविषें अंग करपलें । गमें काळें बोलावूं धाडिलें । माझ्या बळसिंधूचें जळ शोषिलें । निस्तेज झालें सर्वांग ॥२६॥ असो गोकुळीं नंदमंदिरीं । हरि निजविला माजघरीं । तो कलथला सव्य अंगावरी । आरंभ करी रांगावया ॥२७॥ एका अंगावरी कलथला । नंदें उत्साह थोर केला । वस्त्रें भूषणें द्विजकुळा । वांटितां जाहला नंद पैं ॥२८॥ एके दिवशीं प्रातःकाळीं । सूर्यदर्शन करविलें वनमाळी । अंगणीं निजविला ते वेळीं । मायादेवीनें प्रीतीनें ॥२९॥ चिमणाच घातला तल्पक । वरी पहुडविला वैकुंठनायक । उदरावरी सुरेख । वस्त्र झांकी यशोदा ॥३०॥ जगाचें कवच जगज्जीवन । माया त्यासी घाली पांघरूण । ऐसा कृष्ण आंगणीं निजवून । माया गेली घरांत ॥३१॥ नंदही गेला बाहेरी । आंगणीं एकलाच श्रीहरी । तों शकटासुर दुराचारी । कंस तया पाठवीत ॥३२॥ कंसासी म्हणे शकटासुर । मी तुझा शत्रु वधीन साचार । मी गाडा होऊनि दुर्धर । जाईन नंदआंगणीं ॥३३॥ कृष्ण आंगणीं क्रीडतां । वरी लोटेन अवचितां । कंसाऐसें ऐकतां । गौरविला दुरात्मा ॥३४॥ तो आंगणीं गुप्तरूपें येऊनी । जपत होता पापखाणी । एकांत देखोनि ते क्षणीं । कृष्णावरीं लोटला ॥३५॥ सरसावोनि बळें सवेग । रगडूं पाहें हरीचें अंग । जवळी येतां श्रीरंग । चरण झाडी अवळीला ॥३६॥ नगमस्तकीं पडतां वज्र । चूर होवोनि जाय समग्र । तैसा चरणघातें शकटासुर । पिष्ट केला हरीनें ॥३७॥ लागतां हरीचा चरणप्रहार । प्राण सोडी शकटासुर । उद्धरीला दैत्य दुराचार । चरणस्पर्शें भगवंतें ॥३८॥ पूर्वीं केला अहल्योद्धार । आतां चरणीं उद्धरिला शकटासुर । गाड्याचा झाला चूर । तों माया बाहेर पातली ॥३९॥ नंद आला बाहेरून । तों गाडयाचें झालेंसें चूर्ण । मिळाले सकळ गौळीजन । आश्चर्य करिती तेधवां ॥४०॥ म्हणती कैंचा गाडा कोणें आणिला । बाळासमीप चूर्ण जाहला । जरी असता वरी लोटला । तरी उरी कांहीं न उरती॥४१॥ नंद म्हणे यशोदे सुंदरी । विघ्नें येतात कृष्णावरी । तूं यांस न विसंबे अहोरात्रीं । हृदयीं धरीं सर्वदा ॥४२॥ आसनीं शयनीं भोजनीं । विसंबूं नको चक्रपाणी । जागृतीं सुषुप्तीं स्वप्नीं । विसरूं नको हरीतें ॥४३॥ दळितां कांडितां घुसळितां । विसरूं नको कृष्णनाथा । यशोदेसी तें ऐकतां । परम सुख वाटलें ॥४४॥ परी गाडा कोणी चूर केला । कोणास न कळे हरिलीला । असो आंगणीं सांवळा । रांगूं लागला हळू हळू ॥४५॥ चिखली रांगें वनमाळी । दाटूनि लोळे आंगणीं धुळी । बळिरामही आला जवळी । खेळावया पाठिराखा ॥४६॥। साक्षात् शेष-नारायण । ते हे यादववंशीं बळिराम-कृष्ण । गोष्ठांगणीं दोघेजण । रांगताती कौतुकें ॥४७॥ एक गौर एक श्यामवर्ण । कीं एक विष्णु एक मदनदहन । तैसे रांगती दोघेजण । चरणीं नेपुरें रुणझुणती ॥४८॥ दोघे लोळती नंदांगणीं । जैसे उडुपति आणि दिनमणी । दोघेही धुळी घेऊनी । जावळामाजी घालिती ॥४९॥ धुळीनें भरलें अंग वदन । हांसती एकाकडे एक पाहोन । झळकती लघु लघु दशन । आकर्णनयन दोघांचे ॥५०॥ कीं ते बाळ दिगंबर । दोघेही डोलती सुकुमार । कीं ते तपस्वी निर्विकार । नंदांगणीं शोभले ॥५१॥ यशोदा आणि रोहिणी । येऊनि पाहती जों आंगणीं । तों दोघे दोहींकडे धांवोनी । हांसतचि पातले ॥५२॥ मातेचें जें जानुयुगुळ । तेथें मिठी घालूनि घननीळ । वरी करूनि मुखकमळ । गदगदां हांसतसे ॥५३॥ धुळीनें भरलें निजांग । मातेनें उचलिला सवेग । पूर्णब्रह्मानंद श्रीरंग । हृदयीं दृढ धरिला ॥५४॥ पदरें पुसिली अंगींची धुळी । मातेचें वदन विलोकी वनमाळी । धन्य ते यशोदा वेल्हाळी । चुंबन देत हरीतें ॥५५॥ शेष-नारायण उचलिले । दोघे गृहांत नेऊनि सोडिले । तों गौळणी पातल्या ते वेळे । खेळवावया कृष्णातें ॥५६॥ तों श्रीरंग दुडदुडां धांवत । रांगत बैसोनि पिरंगत । सवेंचि बळरामाकडे पाहात । गदगदां हांसती दोघेही ॥५७॥ आकर्णनेत्र कर्णीं कुंडलें । कंठीं वाघनखपदक शोभलें । वांकी मणगट्या बिंदलीं सुढाळें । झळकताती मुद्रिका ॥५८॥ कटीं झळके कटिसूत्र । क्षुद्रघंटा किणकिणित सुस्वर । जैशा वेदश्रुती गंभीर । सूक्ष्म अर्थ बोलती ॥५९॥ नेपुरें रुणझुणती साजिरीं । मातेनें कृष्ण धरूनि करीं । पाचूबंद भूमीवरी । हळू हळू चालवीत ॥६०॥ मंद मंद चाले गोविंद । हळूच नेपुरें करिती शब्द । तों जवळी पातला नंद । हस्त धरीत हरीचा ॥६१॥ नंदहस्ताश्रयेंकरून । चाले वैकुंठींचें निधान । सवेंचि पडतो अडखळोन । नंद सांवरोन धरीतसे ॥६२॥ बळिराम आणि जगज्जीवन । एक एकाचा आश्रय करून । कांपत कांपत दोघेजण । उठोनि उभे राहती ॥६३॥ सवेंचि आदळती धरणीं । गदगदां हांसे चक्रपाणी । सवेंचि उभे राहोनी । दुडदुडां नाचताती ॥६४॥ नंद आणि यशोदा जननी । भोंवत्या मिळाल्या नितंबिनी । शेष आणि चक्रपाणी । नाचती दोघे पाहती तें ॥६५॥ लास्य आणि तांडव । दोन्ही नृत्यांचे भाव । लास्यकळा माधव । दावीतसे तेधवां ॥६६॥ करटाळिया नितंबिनी । वाजविती कौतुकेंकरूनी । म्हणती नाच नाच रे चक्रपाणी । नंद नयनीं पाहात ॥६७॥ हस्तसंकेत दावी भगवंत । नृत्य करी डोलत डोलत । भोंवत्या गौळिणी हांसत । हरि पाहात त्यांकडे ॥६८॥ वेष्टित गौळिणी सुकुमार । त्याच कमळकर्णिका सुंदर । मध्यें श्रीरंग भ्रमर । नीळवर्ण रुणझुणे ॥६९॥ सूर्याभोंवतीं जैसीं किरणें । कीं शशिवेष्टित तारागणें । कीं मुगुटाभोंवतीं रत्नें । तैशा कामिनी विलसती ॥७०॥ कीं देवीं वेष्टिला सहस्रनयन । कीं प्रेमळ भक्तीं उमारमण । कीं ऋषिवेष्टित कमलासन । जगज्जीवन तेवी शोभे ॥७१॥ नृत्य करी जगज्जीवन । मंद मंद हांसे उदारवदन । ते नृत्यकला देखोन । सकळा गौळिणी विस्मित ॥७२॥ विचित्र कला दावी माधव । दशावतारींचा हावभाव । देखतां सद्गद सर्व । गौळिणी तेव्हां जाहल्या ॥७३॥ नंद यशोदा गौळिणी । नाचती तेव्हां प्रेमेंकरोनी । तों आकाश आणि धरणी । नाचूं लागलीं तेधवां ॥७४॥ तेज वायु जळ । नाचों लागती सुरवर सकळ । नाचे कैलासा जाश्वनीळ । भवानीसहित आदरें ।७५॥ नाचे वैकुंठ सत्यलोक । चंद्र सूर्य शचीनायक । गण गंधर्व वसु अष्टक । ऋषिमंडळ नाचतसे ॥७६॥ स्वर्ग मृत्यु पाताळ । नाचती चतुर्दश लोक सकळ । नाचती पृथ्वीचे नृपाळ । परीवारेंसीं तेघवां ॥७७॥ नव खंडें सप्त द्वीपें । नाचताती हरिप्रतापें । छप्पन्न देश अनुतापें । नाचताती तेधवां ॥७८॥ मेरु पर्वत थोर थोर । वनस्पती नाचती अठरा भार । वेद शास्त्रें पुराणें समग्र । कृष्णच्छंदें नाचती ॥७९॥ नाचती गोकुळींचीं मंदिरें । नाचती उतरंडी देव्हारें । धातुमूर्ति एकसरें । नाचतचि त्या येती ॥८०॥ उखळें जांतीं मुसळें । पदार्थमात्र एकेचि वेळे । नाचों लागलीं घननीळें । कौतुक भक्तां दाखविलें ॥८१॥ नंद धांवोनि जवळी आला । म्हणे सुकुमार माझा भागला । हृदयीं धरूनि आलिंगिला । चुंबन दिधलें तेधवां ॥८२॥ नंदें अनंत जन्में तप केलें । तें एकदांचि फळा आलें । कीं यशोदेचें सुकृत प्रगटलें । एकदांचि ये वेळे ॥८३॥ त्या दोघीं मातापितरीं । वाटे तप केलें हिमकेदारीं । तरीच मांडीवरी श्रीहरी । रात्रंदिवस खेळतसे ॥८४॥ कीं शरीर कर्वतीं घालून । टाकिलें प्रयागीं त्रिवेणीं । तरीच हरिमुख चुंबूनी । वारंवार पाहती ॥८५॥ कीं साधिले पंचाग्निसाधन । कीं निराहार तृणशेजे शयन । तरीच त्यास पुढें घेऊन । यशोदा नंद निजताती ॥८६॥ कीं महाक्रतु केलें थोर । विपुल हस्तें पूजिले धरामर । तरीच सांगाते घेऊनि सर्वेश्वर । नंद यशोदा जेवीत ॥८७॥ कीं सप्रेम केलें हरिकीर्तन । कीं केलें संतांचें अर्चन । तरीच नवपंकजदलनयन । मिठी घाली निजगळां ॥८८॥ जो ब्रह्मानंद परात्पर । तो जाहला नंदाचा कुमार । कीं गौळियांचे तपतरुवर । उंचावले ब्रह्मांडीं ॥८९॥ जो नाकळे वेदश्रुती । त्यास गौळिणी बोलूं शिकविती । बोबडें बोलूनि श्रीपती । मन मोही तयांचें ॥९०॥ जो बोल बोले हृषीकेशी । अर्थ न कळे ब्रह्मादिकांसी । गौळिणी म्हणती कृष्णासी । गूढ बोलणें न कळे तुझें ॥९१॥ शेष आणि नारायण । आंगणीं धांवती दोघेजण । यशोदेच्या गळां येऊन । मिठी घालिती साक्षेपें ॥९२॥ एक गौर एक सांवळे । यशोदेसी दृढ धरिले । बळिभद्र म्हणे ते वेळे । माझी माय यशोदा ॥९३॥ कृष्ण म्हणे माझी माय । बळिभद्र म्हणे माझी होय । कृष्ण गे माय । बळिभद्रासी सांग कांहीं ॥९४॥ तंव तो बळिभद्र उगा न राहे । मागुती म्हणे माझी माये । कृष्णे लोळणी लवलाहें । घातली तेव्हां रडतचि ॥९५॥ यशोदा हरीस हृदयीं धरून । म्हणे मी जननी तुझीच पूर्ण । मागुती खेळावया दोघेजण । गृहाबाहेर चालिले ॥९६॥ भलतीकडे दोघे धांवती । गारी कंटक न पाहती । एकामागें एक पळती । अडखळती वाटेसी ॥९७॥ मागुती दोघे उठोन । भलतीकडे जाती धांवोन । बळिरामासी म्हणे जगज्जीवन । पक्षी धरून नेऊं चला ॥९८॥ रावे काग साळिया । दोघे धांती धरावया । तों पक्षी जाती उडोनियां । क्षणमात्र न लगतां ॥९९॥ मग ऊर्ध्व वदनें करोनी । तटस्थ विलोकिती नयनीं । कृष्ण म्हणे उडोनी । पक्षी आणीन अवघेचि ॥१००॥ हरि म्हणे मी आकाशीं उडेन । येरू म्हणे मी पृथ्वी उचलीन । ऐसे ते शेष-जगज्जीवन । बाळलीला दाविती ॥१०१॥ सोडिती तान्हीं वांसरें । तीं उडती नानाविकारें । वात्सांसारिख्या उड्या निर्धारें । दोघे घेती एकदांचि ॥१०२॥ वांसरें हुंबरती नाना गती । आपणही तैसेंचि करिती । वत्सें कौतुकें नाचती । थै थै म्हणती दोघेजण ॥१०३॥ आळोआळीं पिटिती वांसरें । धांवतां धापा टाकिती त्वरें । तों एक बाळ बोले चांचरें । त्यासी तैसेंचि वेडाविती ॥१०४॥ धाकुटे मेळवूनि गोपाळ । मध्यें शोभतो वैकुंठपाळ । खेळतसे नाना खेळ । बाललीला करोनियां ॥१०५॥ इकडे मथुरेसी कंस चिंताक्रांत । म्हणे वैरी वाढतो गोकुळांत । आतां कोण जाऊनि अकस्मात । वधूनि येईल तयातें ॥१०६॥ तों तृणावर्त म्हणे कंसातें । मी वधीन तुझ्या अरीतें । वायुरूपें गगनपंथें । अकस्मात आणीन मी ॥१०७॥
जैसा पक्षी आमिष उचलीत । तैसा उडवीन अकस्मात ।
कीं सुधारसघट त्वरित । उरगरिपु नेत जैसा ॥१०८॥ तैसा अकस्मात शत्रूसी । उचलूनि आणीन तुजपासीं । तृणावर्त बोलतां मानसीं । कंसरावो संतोषला ॥१०९॥ वस्त्रें भूषणें देऊनि गौरविला । तृणावर्त वायुरूपें चालिला । गोकुळासमीप पातला । वात सुटला अद्भुत ॥११०॥ इकडे यशोदा आपलें आंगणीं । कडे घेऊनि चक्रपाणी । उभी ठाकली ते क्षणीं । गौळिणींसी बोलत ॥१११॥ जगदात्मा मनमोहन । तृणावर्त येतो जाणोन । काय करी जगज्जीवन । जड बहुत जाहला ॥११२॥ जड बहुत हरि वाटला । यशोदेनें खालीं उतरिला । हरि दुडदुडां बाहेर गेला । तों सुटला वात प्रचंड ॥११३॥ सुटला हो प्रलयसमीर । धुळीनें भरलें अंबर । त्यामाजी गोकुळ समग्र । दिसेनासें जाहलें ॥११४॥ एक मुहूर्तपर्यंत । हलकल्लोळ गोकुळीं होत । वृक्ष उन्मळोनि जात । आकाशमार्गें द्विज जैसे ॥११५॥ न दिसे कोणी कोणातें । माता नोळखे बाळकांतें । नेत्र झांकोनि निजहस्तें । जन जाहले मूर्च्छित पैं ॥११६॥ वाटे पृथ्वी जाते रसातळांत । कीं गोकुळ उडालें आकाशपंथें । कीं गगन आलें खालतें । अवनी वरी गेली पैं ॥११७॥ चहुंकडे वृक्ष उडोन । पडती गोकुळावरी कडकडोन । मंदिरें जाती मोडून । विदारती प्रळयवातें ॥११८॥ तृणावर्त हरीसी उचलोन । निराळमार्गें गेला घेऊन । तें जाणोनि मनमोहन । स्वरूप अदभुत प्रकटवी ॥११९॥ ग्रीवेसी धरिला तृणावर्त । श्रीहरीचें बळ अदभुत । शिरकमल अकस्मात । पिळूनि खुडिलें केशवें ॥१२०॥ गोकुळप्रदेशीं अरण्यांत । पडिलें तृणवर्ताचें प्रेत । मागुती कमलदलाक्ष गोकुळांत । प्रवेशला तेधवां ॥१२१॥ वायु राहिला अद्भुत । लोक झाले सावचित । यशोदा म्हणे कृष्णनाथ । काय जाहला येथूनि ॥१२२॥ यशोदा चहूंकडे धांवत । आळोआळीं कृष्ण पाहत । धबधबां वक्षःस्थळ बडवीत । थोर आकांत जाहला ॥१२३॥ नंद धांवे बिदोबिदीं । गौळी हुडकिती सांदोसांदीं । यशोदेभोंवतीं मांदी । गौळिणींची मिळाली हो ॥१२४॥ गोकुळींचे जन समस्त । बुडाले शोकसमुद्रांत । तों दुडदुडां धांवत । कृष्ण येतां देखिला ॥१२५॥ मायेनें धांवोनि उचलिला । सप्रेम हृदयीं आलिंगिला । नंद गौळी ते वेळां । परमानंदें धांवती ॥१२६॥ नंदें हरि कडे घेतला । म्हणे कोठें गेला होतासी बाळा । इंदिरावर मंदिरीं आणिला । मोठा सोहळा नंद करी ॥१२७॥ गो-भू-हिरण्य-रत्नदानें । द्विजांसी दिधलीं नंदानें । मग यशोदेसी नंद म्हणे । न विसंबें कृष्णासी ॥१२८॥ असो कंसासी कळला वृत्तांत । प्राणासी मुकला तृणावर्त । कंस परम चिंताक्रांत । धगधगीत मनामाजी ॥१२९॥ गात्रें जाहलीं विकळें । जैसा सर्प वणव्यानें आहाळे । कीं महाव्याघ्र आरंबळे । कपाळशूळेंकरूनियां ॥१३०॥ कीं पंकगर्तेमाजी वारण । कीं कूपीं अडकला पंचानन । कीं इंद्रजित पडलियावरी रावण । चिंताक्रांत जैसा पैं ॥१३१॥ असो इकडे गोकुळीं । वोसंगी घेऊनि वनमाळी । स्तनपान करवी वेल्हाळी । यशोदादेवी एकदां ॥१३२॥ पिंपळपान नीट केलें । जावळ मागें सरसाविलें । तों जांभई दिधली ते वेळे । मुख विकासलें हरीचें ॥१३३॥ कानामागील मळी । काढीत यशोदा वेल्हाळी । जांभई देतां ते वेळीं । मुखामाजी विलोकीत ॥१३४॥ तों ब्रह्मांडरचना समस्त । मुखामाजी तेव्हां दिसत । असंख्य कृष्णमूर्ति तेथ । घवघवीत दिसती हो ॥१३५॥ द्वीपें खंडें शैल सागर । सप्त पाताळ उरगेंद्र । गंगा काननें मनोहर । मुखामाजी दिसती पैं ॥१३६॥ वैकुंठ कैलास क्षीरसागर । अनंतशायी सर्वेश्वर । दिसती असंख्य हरीचे अवतार । दिसती भार ऋषींचे ॥१३७॥ इंद्र अग्नि यम नैर्ऋत्यपती । वरुण समीर कुबेर उमापती । लोकसमवेत निश्चितीं । मुखीं दिसती हरीच्या ॥१३८॥ गोकुळ गोपाळ यशोदा नंद । मुखामाजी दिसती विशद । तेथे स्तनपान करी गोविंद । मायेपुढें दिसतसे ॥१३९॥ तेथेंही जांभई जगज्जीवन । देतसे मुख पसरून । त्यांत दुसरें ब्रह्मांड पूर्ण । यशोदा तें पाहातसे ॥१४०॥ अनंतब्रह्मांडनाथ । लीला त्याची परमाद्भुत । यशोदा झाली तटस्थ । बोलों चालों विसरली ॥१४१॥ अनंत यशोदा अनंत कृष्ण । अनंत नामें अनंत गुण । पाहतां यशोदेचें मन । झालें उन्मन ब्रह्मानंदीं ॥१४२॥ सवेंचि घातलें मायाजाळ । जैसें सूर्याआड जलदपटळ । मागुती स्तनपान गोपाळ । पूर्ववत करीतसे ॥१४३॥ मुखीं दाविलें विश्वरूप । धन्य धन्य जननीचें तप । ब्रह्मानंद तो अररूप । मायेनें पुढें घेतलासे ॥१४४॥ जो लावण्यामृतसागर । जो आदिमायेचा प्रियकर । जो भक्तमंदिरांगणमांदार । जलजोद्भवजनक जो ॥१४५॥ जो भक्तमानसचकोरचंद्र । अज्ञानतिमिरच्छेदक दिवाकर । जो षड्गुणैश्वर्यसमुद्र । लीला दावी भक्तांतें ॥१४६॥ यशोदेनें उचलिला । रत्नजडित पालखीं निजविला । गीत गातसे वेल्हाळा । यशोदादेवी तेधवां ॥१४७॥ श्रीरामचरित्र चांगलें । यशोदेनें तेव्हां गाइलें । ऐकतां जें सकळें । कलिकिल्मिषें न होती ॥१४८॥ पाळणां सावध कृष्णनाथ । आपुली पूर्वलीला कौतुकें ऐकत । यशोदा स्वानंदें डुल्लत । पालखा हालवीत हरीच्या ॥१४९॥ जो कमळिणीमित्रकुळभूषण । अनंगदहनहृदयजीवन । विद्वज्जनमानसमांदुसरत्न । तो रघुनंदन साजिरा ॥१५०॥ जो ब्रह्मानंद निर्मळ । तो झाला दशरथाचा बाळ । लीलावतारी तमालनीळ । अयोध्येमाजी अवतरला ॥१५१॥ जो जलजनाभ जलदवर्ण । जलधिशायी जलजलोचन । भवजलतारक जलजवदन । जगत्प्राण जगद्गुरु ॥१५२॥ जो कमलोद्भवाचा गुरु पूर्ण । तो वसिष्ठासी रिघाला शरण । गुरुमुखें निजज्ञान । रघुनंदन श्रवण करी ॥१५३॥ दशरथासीं मागे विश्वामित्र । म्हणे दे तुझा राम राजीवनेत्र । पिशिताशन अपवित्र । क्रतु माझा भंगिती ॥१५४॥ सौमित्रासमवेत स्मरारिमित्र । घेऊनि चालिला गाधिपुत्र । वाटेसी ताटिका दुर्धर । राक्षसी उभी ठाकली ॥१५५॥ दशसहस्र कुंजरांचें बळ । येवढी ताटिका सबळ । गाई ब्राह्मण देखतां तत्काळ । दाढे घालूनि रगडीत ॥१५६॥ ऐसिये ताटिकेसी राजीवनयनें । निर्दाळिलें एकेचि बाणें । पुढें सिध्दाश्रमीं रघुनंदनें । कीर्ति केली अगाध ॥१५७॥ वीस कोटी सेनेसहित सुबाहु । तत्काळ मारी आजानुबाहु । पिशिताशनांचे समूहु । राजीवनेत्रें भंगिले ॥१५८॥ मिथिलेसी येतां रघुनंदन । वेष्टित समागमें विद्वज्जन । जैसा श्रुतिवेष्टित वेदोनारायण । तैसा रघुनंदन जातसे ॥१५९॥ कीं निर्जरांसमवेत सहस्राक्ष । कीं तापसवेष्टित विरूपाक्ष । तैसा राम कमलपत्राक्ष । धरामरीं वेष्टिला ॥१६०॥ तो पद्मजातकन्यका सुंदरी । पद्माक्षीवर वाटेस उद्धरी । चरणरजें ते पद्मनेत्री । पावन झाली तेधवां ॥१६१॥ जे गौतमाची प्रिय ललना । ते नमस्कारूनि रविकुळभूषणा । म्हणे सजलजलदवर्णा । उद्धरिलें मजलागीं ॥१६२॥ पुढें त्र्यंबकधनु भंगूनि रघुवीरें । जानकी पर्णिली प्रतापशूरें । पुढें भार्गव जिंकोनि त्वरें । अयोध्येसी राम आले ॥१६३॥ कैकेयीवरदानानिमित्त । वना चालला रघुनाथ । सीता-सौमित्रांसमवेत । राम जात तपोवना ॥१६४॥ वनासी गेलिया रघुनंदन । मागें दशरथ पावला मरण । चौदा वर्षें महा अरण्य । कौसल्यात्मजें सेविलें ॥१६५॥ श्रीराम आला पंचवटीं । सौमित्रासमवेत गोरटी । रणरंगधीर जगजेठी । राहिला तटीं गौतमीच्या ॥१६६॥ तेथें कपटें येऊनि रावण । करी जानकीचें हरण । तों श्रीकृष्णें पाळण्यांतून । गर्जोनि हांक फोडिली ॥१६७॥ पाळण्याखालीं उडी टाकून । हातीं घेऊनि धनुष्यबाण । सुंदर निमासुर वदन । रघुनंदन उभा तेथें ॥१६८॥ आरक्त दिसती राजीवनयन । चाप ओढिलेंसे आकर्ण । म्हणे कोठें दावीं तो रावण । टाकीन छेदून क्षणार्धें ॥१६९॥ कोठें नल नीळ सौमित्र । कोठें निराळोद्भवपुत्र । कोठें जांबुवंत तरणिकुमर । वालिसुत कोठें आहे ॥१७०॥ पाषाणीं झांका रे समुद्र । सुवेळेसी जाऊं द्या दळभार । लंकेसी अग्नि लावा सत्वर । रजनीचर संहारा ॥१७१॥ बाहेर रावण आणा रे त्वरें । छेदितों आतां दाही शिरें । हांक दिधली आवेशें थोरें । पंकजनेत्रें तेधवां ॥१७२॥ यशोदा भयभीत तटस्थ । म्हणे काय मांडिला कल्पान्त । एकाएकीं रघुनाथ । अकस्मात प्रकटला ॥१७३॥ ऐसें कौतुक यादवरायें । दाविलें आपुले जननीये । सवेंचि यशोदा पाळण्यांत पाहे । तों रडत आहे स्वच्छंदें ॥१७४॥ यशोदेसी नवल वाटलें । म्हणे मीं काय स्वप्न देखिलें । अद्भुत हरिलीला न कळे । भव-विरिंचींसी पाहतां ॥१७५॥ कृष्ण म्हणे वो जननीये । मज घेईं वेगें कडिये । अंगणीं तूं उभी राहें । मी खेळेन क्षणभरी ॥१७६॥ धन्य धन्य तें नंदाचें आंगण । जेथें क्रीडे मनमोहन । तों नीलबंद भूमीवरी जगज्जीवन । सहज जाऊनि बैसला ॥१७७॥ कृष्ण केवळ घननीळ । नीलबंद भूमिका सुढाळ । दोहींचें एकरूप निर्मळ । दुसरेपण दिसेना ॥१७८॥ जवळी असोनि घननीळ । माय म्हणे काय जाहला बाळ । घाबरली यशोदा वेल्हाळ । मंदिरामाजी पाहात ॥१७९॥ मागुती धांवे आंगणीं । म्हणे कोठें गेला चक्रपाणी । आळोआळीं नंदराणी । धुंडीत हिंडे हरीतें ॥१८०॥ हिंडली संपूर्ण गोकुळ । परी ठायीं न पडे घननीळ । गोपी धांवल्या सकळ । नंदमंदिरीं तेधवां ॥१८१॥ यशोदा परतोनि आली मंदिरीं । हृदय पिटीत दोहीं करीं । म्हणे मी आतां कडेवरी । घेतला होता श्रीकृष्ण ॥१८२॥ पृथ्वीमाजी अदृश्य जाहला । कीं गधर्वीं उचलोनि नेला । म्हणोनि यशोदा वेल्हाळा । शोक करीत अद्भुत ॥१८३॥ आंगणीं असोनि श्रीहरी । परी न दिसे तिच्या नेंत्रीं । जन भुलले याचिपरी । नाना साधनें भजती हो ॥१८४॥ जवळी असोन जगज्जीवन । कां सेविती थोर विपिन । निराहार पंचाग्निसाधन । नाना यज्ञ करिती एक ॥१८५॥ एक घेती वायुआहार । एक नग्न मौनी जटाधर । एक हिंडती दिगंबर । परी श्रीधर न सांपडे ॥१८६॥ शम दम अष्टांगसाधन । नानाव्रताचरण तीर्थाटन । एक वेदाभ्यासीं शास्त्रीं निपुण । परी तें निधान न सांपडे ॥१८७॥ ब्रह्मचर्य गृहस्थाश्रम । वानप्रस्थ चतुर्थाश्रम । परी ठायीं न पडे मेघश्याम । व्यर्थ श्रम पावती ते ॥१८८॥ न करितां सारासारविचार । टांगून घेती पिती धूर । संतास न पुसती पामर । व्यर्थ गिरिकंदर सेविती ॥१८९॥ अभ्यासिल्या चतुर्दश विद्या । परी नेणती त्या जगद्वंद्या । तरी विद्या तेचि अविद्या । ब्रह्मविद्या जया नाहीं ॥१९०॥ हरिप्राप्तीविण कोरडें ज्ञान । तयाचें नांव अज्ञान । भगवत्प्राप्तीविण दावी भजन । तें सोंग जाण नटाचें ॥१९१॥ कृष्णप्राप्तीविण कर्म । तो तयासी पडिला भ्रम । हरिप्राप्तीविण धर्म । तोच अधर्म जाणावा ॥१९२॥ हरिप्राप्तीविण कीर्तन । वाउगेंच काय करून । कोल्हाटी शस्त्र दावी झळकावून । परी रणपंडित नव्हे तो ॥१९३॥ जैसी मैंदाची शांति जाण । कीं बकाचें जैसें ध्यान । कीं पारध्याचें गायन । कीं मुखमंडण वेश्येचें ॥१९४॥ कीं बेगडीचे केले नग । कीं पतंगाचा क्षणिक रंग । तैसी कृपा न करितां श्रीरंग । सर्व साधनें व्यर्थचि ॥१९५॥ आंगणीं असोन जगज्जीवन । व्यर्थ गोपी गेल्या भुलोन । मृगनाभीं कस्तूरी असोन । तया ज्ञान नव्हे तें ॥१९६॥ नाकीचें मोतीं सुढाळ । गळां घाली एक वेल्हाळ । तें विसरूनि तत्काळ । घरीं केर शोधीतसे ॥१९७॥ तैसी यशोदा म्हणे सकळ सदनें। शोधिलीं म्यां हरिकारणें । स्थूल लिंग कारण महाकारणें । शोधोनियां पाहिलीं ॥१९८॥ अवस्था भोग गुणखाणी । चारी अभिमान चारी वाणी । पिंडब्रह्मांडींचीं तत्त्वें शोधूनी । हरीलागीं पाहिलीं म्यां ॥१९९॥ वेदशास्त्रें पुराणें । नाना ग्रंथ नाना साधनें । उपरमाडिया हरीकारणें । षट्चक्रांच्या शोधिल्या ॥२००॥ यशोदा म्हणे करूं काय । कैसी मज हरिप्राप्ती होय । कोणाचे गे धरूं पाय । कृष्णप्राप्तीकारणें ॥२०१॥ नंद आला अंगणांत । तों यशोदा करीतसे आकांत । भोंवत्या गौळणी रडत । कृष्णनाथ पाहातसे ॥२०२॥ मग म्हणे जगज्जीवन । माया तत्काळ सोडील प्राण । नीलबंद भूमीवरून । दुडदुडां हरि धांविन्नला ॥२०३॥ तों नंदें देखिला अकस्मात । धांवोनि सप्रेम हृदयीं धरीत । यशोदा गौळिणी समस्त । जवळी धांवती तेधवां ॥२०४॥ मायेसी फुटला प्रेमपान्हा । आडवें घेतलें राजीवनयना । म्हणे बापा जगज्जीवना । कोठें गेला होतासी ॥२०५॥ कृष्ण म्हणे वो जननी । मी येथेंचि होतों आंगणीं । यशोदेचें निजमनीं । ब्रह्मानंद उचंबळला ॥२०६॥ घरांत घेऊन गेली कृष्णा । पहुडविला हृदयपाळणां । शुक म्हणे कुरुभूषणा । हरिलीला अद्भुत ॥२०७॥ जनमेजयासी म्हणे वैशंपायन । अगाध गौळियांचें पूर्वपुण्य । अवतरला इंदिराजीवन । पावन केलें समस्तां ॥२०८॥ श्रीकृष्णकथा रत्नखाणी । उघडली पूर्वपुण्येंकरूनी । येथींचे जोहारी संतज्ञानी । निजनयनीं पाहती ते ॥२०९॥ नाना दृष्टांत साहित्यरचना । हीं रत्नें अमोलिक जाणा । सभाग्य पाहोनि नयनां । निजहृदयीं संग्राहिती ॥२१०॥ जे अभाविक अभाग्य अत्यंत । त्यांस नावडे हरिविजयग्रंथ । ग्रंथरूपें यथार्थ । भीमरथी केवळ हे ॥२११॥ हरिविजयग्रंथ भीमा पूर्ण । चंद्रभागा मध्यें निजजीवन । तो हा पंचमाध्याय जाण । येथें स्नान भक्त करिती ॥२१२॥ या तीर्थीं करितां स्नान । प्रत्यक्ष होय पांडुरंगदर्शन । उभा कटीं कर ठेवून । स्वामी माझा तिष्ठतसे ॥२१३॥ भीमातीरीं दिगंबरा । श्रीब्रह्मानंद विश्वंभरा । जगद्वंद्या श्रीधरवरा । निर्विकारा अभंगा ॥२१४॥ इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंशभागवत । चतुर श्रोते परिसोत संत । पंचमोऽध्याय गोड हा ॥२१५॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
पूतनेच्या देहाला अग्नी देणे क्रमप्राप्त होते. पण तो देह उचलणे शक्यच नव्हते. लोकांनी कुर्हाडीनी त्याचे तुकडे केले, दूर नेले आणि चिता रचून जाळले. त्यावेळी एक आश्चर्य घडले. पूतनेच्या देहाचा सुगंध पसरला ! साहजिकच आहे. कृष्णमय झाली होती ती ! कपटाने का होईना, तिने कृष्णाला स्तन्य दिले होते ! पूतनेच्या देहाला अग्नी दिला तोपर्यंत नंद परत आला. त्याने सारा प्रकार कळताच कृष्णाला घेतले. त्याचा आनंद काय वर्णावा ! त्याची नौकाच तरली आणि तीराला लागली ! संकट टळले म्हणून त्याने गोपांना आनंदाने भोजन दिले, विप्रांना दाने दिली.
तिकडे पूतनेचा अंत झाल्याचे वृत्त जेव्हा कंसाला कळले तेव्हा त्याला भय वाटले. एवढे विषही शोषण करून नंदबाल जगला म्हणजे काहीतरी अघटित आहे हे त्याने ओळखले. कृष्णाचा नाश करण्यासाठी त्याने शकट नांवाच्या दैत्याला पाठविले. गोकुळात येऊन त्या दैत्याने एका गाड्यांत आपण स्वतः सूक्ष्म रूपाने प्रवेश केला. अंगणात पर्यंकावर कृष्णाला ठेवून यशोदा थोडा वेळ घरात गेली होती. तो गाडा त्याच अंगणात होता. तो आपोआप सरकत कृष्णाजवळ आला. दैत्याच्या प्रेरणेने तो गाडा कृष्णावर कोसळणार होता. कृष्णाने ते ओळखले. गाडा जवळ येताच कृष्णाने एकदम पायाने लाथ झाडली. तिचा फटका बसताच गाडा उलट्या बाजूस कलंडून पडला आणि मोडला ! त्याच्या आवाजाने यशोदा पटकन् बाहेर आली ! लगेच धावत जाऊन तिने कृष्णाला उचलले. 'जरा दृष्टीआड झालास की काय काय संकटे येतात रे कृष्णा ! केवढा तो गाडा ! दुरून घरंगळत कसा काय आला न कळे ! तुला लागले नाही हे बरे !' असे म्हणत यशोदा थरथर कापत तिथेच उभी राहिली. सारे नवल करीत होते. गाड्यात शिरलेल्या शकटासुराला त्यातून दूर जाताच आले नाही. त्याचेही प्राण गेले ! त्याला कृष्णाने पदस्पर्शाने मुक्तीच दिली ! यशोदेला नंद म्हणाला- ' कृष्णाला आता क्षणभरही दृष्टीआड करू नकोस, विसरू नकोस, दुर्लक्ष करू नकोस. कृष्णावर संकटे येतात असे दिसते ! प्रभूची लीला अगाध आहे !' यशोदेचा कृष्ण व त्यापेक्षा थोडा मोठा असलेला, रोहिणीचा बलभद्र - दोघे मोठे होऊ लागले. अनेक प्रकारे प्रगती करू लागले. बलभद्र चालत असे तर कृष्ण अजून रांगणाराच होता. दोघे अंगणात खेळत, अनेक प्रकारे खोड्या करीत, यशोदेला आणि रोहिणीला आनंद देत असत. बलभद्र गोरा होता, कृष्ण सावळा होता. एक सूर्य तर दुसरा चंद्र ! एक शंकर तर दुसरा विष्णू ! हळूहळू दोघे धावत, बागडत, खेळ खेळू लागले. अर्थहीन बोबडे शब्द बोलता बोलता, समजून उमजून बोलू लागले, आईबाबांना हाका मारू लागले. यशोदेकडे गवळणी कृष्णाला खेळवण्यासाठी येऊ लागल्या. तो हातावरून हातावर नाचविला जाऊ लागला. रोहिणी आणि यशोदा यांची त्यांना आवरता आवरता पुरेवाट होऊन जाई. बाळलेणी तर किती होती. खोटी खोटी लाकडाची वासरे घेऊन ते छोट्या काठ्यांनी त्यांना हाकलीत. गोप त्यांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवीत. उंच उचलून झेलीत, तेव्हा ते खदखदा हसत. लपंडाव खेळत, कुठे वासरांच्या मागे धावत, कधी मोरासारखे नाचत, विहिरीजवळ गेले की यशोदा भरकन् धावे आणि पटकन् उचलून घेई. कृष्ण नाचू लागला की गोकुळातल्या सर्वांचे मन आनंदाने नाचू लागे, सृष्टी हसू लागे, सूर्याचे कोवळे किरण अंगावर घेत लतावेली व वृक्ष डोलत, पक्षीगण गाणी गात ! दूर जाऊन अंगणातून दोघे धावत येत आणि यशोदेला भिडत तेव्हा वाटे पराक्रम आणि धर्मच प्रकृतीला भेटायला आले ! चौदा भुवनांतील देवता विष्णूच्या बालरूपाचे दर्शन करण्यासाठी सूक्ष्म रूपाने गोकुळाच्या आसमंतात जमत; इंद्र त्याना कर्तव्याची जाणीव देऊन स्वस्थानी पाठवता पाठवता स्वतःच ते वैभव पहात तटस्थ होई. नंदयशोदेचे पूर्वजन्मींचे केवढे पुण्य ! प्रत्यक्ष शेष व विष्णू त्यांच्या अंगणात आणि अंगाखांद्यावर खेळत आणि परमोच्च आनंद देत ! अहो, वेदांना अगम्य विराटपुरुष गोकुळात गोपांकडून बोबडे बोल शिकत होता ! आणि ज्याचे रहस्यमय वचन देवांना आकलन होत नाही त्याचे बोबडे बोल गोपगोपींना कळत नव्हते ! ते दोघे ज्या क्रीडा करीत त्यांनी शहाणी शहाणी माणसेही त्यांच्यासाठी वेडी होत. इकडे आनंदाला भरती आली होती पण तिकडे कंसाच्या सभेत तृणावर्त नांवाचा दैत्य कृष्णाचा घात करण्याची प्रतिज्ञा करीत होता ! झंझावाताचे रूप घेऊन कृष्णाला आकाशात उडवून न्यावे व खाली फेकून मारून टाकावे असा त्याचा बेत होता. कंसाची आज्ञा घेऊन तो सूक्ष्म रूपाने गोकुळात आला. कृष्ण अंगणात खेळत होता. अचानक वावटळ उठली. धूळ उडून काही दिसेनासे झाले. तृणावर्ताने वायूच्या झोताबरोबर बालकृष्णाला आकाशात उंच नेले ! कृष्णाला हे दैत्याचे रूप कळले. त्याने आपले शरीर अत्यंत जड केले आणि आपल्या अचिंत्य योगशक्तीने तृणावर्ताला त्याचे स्वतःचे रूप घ्यायला लावले; तो तृणावर्ताच्या मानेला मिठी मारून खांद्यावर बसला; त्याची मान आवळू लागला. गोकुळापासून दूरवर तृणावर्ताने त्यावेळी कृष्णाला वाहून नेले होते. कृष्णाची अशी काही घट्ट मिठी त्याच्या गळ्याला बसली की त्याचा गळा आवळला जाऊन तो गतप्राण झाला. उंचावरून धाडकन भूमीवर कोसळला ! वावटळ शमली, धूळ खाली बसली. वादळाने वृक्ष मोडून पडले होते, तृणावर्ताच्या प्रचंड शरीराखाली आणखीनच पुष्कळ वृक्षांचा चुराडा झाला ! कृष्ण मात्र त्या दैत्याच्या खांद्यावर बसून राहिला होता ! गोकुळवासी भराभर घराबाहेर पडले ! वृक्षांची, गोठ्यांची नासधूस झालेली ! दैत्य पडताच झालेल्या आवाजाने सगळे अरण्याकडे धावले ! पहातात तो मोठा दैत्य आडवा पडलेला, आणि कृष्ण त्याच्या खांद्यायर बसलेला ! गोपांनी त्याला उचलून आणले ! यशोदा धावतच येत होती ! तिच्या हाती कृष्णाला देत गोपांनी सर्व प्रकार तिला दाखविला ! कृष्ण यशोदेच्या जवळ बसून दैत्याकडे बोट दाखवून हसत होता ! तृणावर्त दैत्याचे हे आणखी एक संकट ! गोकुळवासी चिंतातुर झाले ! निसर्गातील विध्वंसक शक्तीचे रूप घेऊन दैत्य कृष्णावर हल्ला करीत होते ! "किती वेळा तुला आंघोळ घालू ? पुन्हा पुन्हा मातीत खेळतोस !" असे लाडाने म्हणत यशोदा कृष्णाचे अंग पुशीत होती. त्यावेळी अचानक कृष्णाला आली जांभई. यशोदेने पाहिले तो त्याच्या तोंडात अनेक विश्वे ! तिचे भानच हरपले ! काय झाले ते कृष्णाला कळले ! त्याने पटकन् तोंड मिटले. आईला शुद्धीवर आणले. तिने जे पाहिले त्याचा तिला विसर पाडला. तिने एकदा त्याला पाळण्यात निजवून गाणी म्हटली. विष्णूच्या पूर्वीच्या अवतारांची गाणी. त्यात मत्स्यावतार, कूर्मावतार वगैरे वर्णने आली. पुढे रामावताराचे वर्णन आले. तेव्हा तिला एकदम दिसले की कृष्ण पाळण्यात नाही. रामाच्या रूपात आपल्यापुढे उभा आहे. बाण मारत आहे. तो भास जाऊन तिला कृष्ण पुन्हा पाळण्यात आहे असे दिसले ! तिला कोठले खरे तेच कळेना. एकदा तर यशोदेला कृष्ण घरात असूनही दिसेना. तिने शोधले पण सापडेना. झाले होते ते असे की निळासावळा कृष्ण निळ्या स्कटिकमय भूमीवर गप्प बसला होता. तो कसा दिसणार ? परब्रह्म जवळ आणि जीव करतो धावपळ अशीच स्थिती झाली ! तेवढ्यात कृष्णच जागचा उठला. आईला हाका मारू लागला. तेव्हा दिसला. कृष्ण हरवला म्हणून तिने गोपींनाही शोध करायला बोलायले होते. सर्वांना आपली फसगत झालेली कळताच हसू आले. मग यशोदेने कृष्णाला मांडीवर घेऊन स्तनपान करविले. श्रोतेहो ! त्याचे वर्णन शुकमुनी वैशंपायनाजवळ करीत होता. त्यांचेही भान हरपून कृष्ण कृष्ण असे तो म्हणू लागला. कथा सांगण्याचे तो क्षणभर विसरूनच गेला ! अध्याय ५ समाप्त ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ |