|
॥ श्रीहरिविजय ॥ ॥ अध्याय बारावा ॥
गोवर्धनाचा उद्धार, इंद्राचे गर्वहरण, व्योमासुराचा
श्रीगणेशाय नमः ॥
जय जय यादवकुळदीपका । त्रिभुवनजनहृदयप्रकाशका । अंतःकरणचतुष्टयचाळका । दारुकायंत्रन्यायेंसीं ॥१॥ आम्ही जग आणि तूं जगदीश्वर । नाहीं द्वैतभेदविकार । तूंचि नटलासी चराचर । कनक-कटकन्यायेंसीं ॥२॥ मित्र आणि रश्मी देख । स्फुलिंग आणि दाहक । तैसा तूं सर्वांत श्रेष्ठ एक । लोहखड्गन्यायेंसीं ॥३॥ धातु आणि पात्र । तंतु आणि वस्त्र । कीं तरंग आणि नीर । तैसा श्रीधर व्यापक तूं ॥४॥ मधुसंहारका यादवेंद्रा । मुरहरा श्रीकुचदुर्गविहारा । कालियामर्दना गुणसमुद्रा । ब्रह्मानंदा यतिराया ॥५॥ तुझें चरित्र तूंचि बोले । यावरी गोकुळीं काय वर्तलें । तें कृष्ण परब्रह्म सांवळे । अवतरलें प्रत्यक्ष भक्तकाजा ॥६॥ एकादश अध्यायाचें कथन । केलें दुर्धर कलियामर्दन । द्वादश गांवें महा अग्न । हरि प्राशून अक्षयी ॥७॥ प्रातःकाळीं एके दिनीं । हरिसमीप येऊनि नंदराणी । कोमल हस्तेंकरूनी । थापटोनि उठवीत ॥८॥ उठीं उठीं माझे आई । सांवळे राजसे कृष्णाबाई । राजीवनेत्रा वदन धुईं । वना जाईं राजसा ॥९॥ उदया आला चंडकिरण । ताटीं वाढिलें दध्योदन । वना जाईं जेवून । गाई घेऊन कान्हया ॥१०॥ मायालाघवी ते समयीं । उठूनियां देई जांभई । मातेनें धरिला हृदयीं । वदन चुंबी प्रीतीनें ॥११॥ इंद्रादिकां दृष्टी न पडती चरण । त्याचें यशोदा धूतसे वदन । कपाळीं रेखिला चंदन । उटी दिधली सर्वांगीं ॥१२॥ ऐसा पूजिला यादवेंद्र । तैसाचि रोहिणीनें अर्चिला बळिभद्र । पदकें माळा परिकर । दोघां कंठीं शोभती ॥१३॥ प्रत्यक्ष ते शेष-नारायण । बाहेर आले जेवून । मुरली वाजवितां चहूंकडोन । गाई गोप मिळाले ॥१४॥ तंव गौळी मिळाले असंख्यात । नंद त्यांसीं विचार करीत । म्हणती पूजावा शचीनाथ । मेघ समस्त त्याहातीं ॥१५॥ करावा जी महायज्ञ । तें ऐकूनि जगन्मोहन । नंदास पुसे नारायण । हास्यवदन करूनियां ॥१६॥ कासयाचा करितां विचार । पूजासामग्री मेळविली अपार । नंद म्हणे सहस्रनेत्र । प्रतिवर्षीं पूजितसों ॥१७॥ तो मेघवृष्टि करी धरणीं । तेणें वांचती सर्व प्राणी । तृण जीवन गाईंलागुनी । यथेष्ट अवनीं होतसे ॥१८॥ अष्टादश धान्यें षड्रस । तेणेंचि होती बहुवस । इंद्राहूनि विशेष । श्रेष्ठ नसे दूसरा ॥१९॥ पुराणपुरुष गोकुळीं अवतरला । तंव पाकशासनें गर्व केला । अहंपणेंचि व्यापिला । दंभअहंकारेंकरूनियां ॥२०॥ पांचवें वर्षीं वत्सहरण । करी कमलोद्भव येऊन । केलें त्याचें गर्वच्छेदन । रूपें अपार दावूनियां ॥२१॥ सहावें वर्षीं कालियामर्दन । सातव्यांत गोवर्धनोद्धारण । सहस्राक्षाचें गर्वहरण । याच मिषें मांडिलें ॥२२॥ असो नंदासी म्हणे व्रजभूषण । काय आहे इंद्राधीन । आपुलाल्या कर्मेंकरून । प्राणी वर्तती संसारीं ॥२३॥ ज्यांचें पूर्वकर्म उत्तम नाहीं । त्यांस आखंडल करील कायी । विपरीत नव्हे कदाही । ब्रह्मादिकां कर्म तें ॥२४॥ उत्तम कर्में उत्तम फळ प्राप्त । तें शक्रासी नव्हे विपरीत । आपुले सत्कर्म पूर्वकृत । देव सत्य तोचि पैं ॥२५॥ आपुलें जें दुष्कर्म । त्याचेंचि नांव काळ यम । सुखदुःखफळें परम । कर्माकर्म भोगवीं ॥२६॥ आपण जें केलें बीजारोपण । तोचि अंकुर येत तरतरोन । तैसें आपुलाल्या कर्मेंकरून । जन्म-मरण प्राणियां ॥२७॥ आपुल्याचि पूर्वकर्मेंकरूनी । इंद्र आरुढला राज्यासनीं । कर्म ब्रह्मादिकांलागोनी । न सुटेचि निर्धारें ॥२८॥ तरी एक ऐका सत्य वचन । पूजा गाई आणि ब्राह्मण । हेचि सामग्री नेऊन । अर्चा गोवर्धन प्रीतीनें ॥२९॥ आमुच्या गाई तेथें चरती । तरी तो पर्वत पूजावा निश्चितीं । बुध्दीचा चालक श्रीपती । मानलें चित्तीं सर्वांच्या ॥३०॥ कुटुंबासहित गौळी निघाले । लक्षानुलक्ष गाडे भरिले । नंदराणी तये वेळे । निघे सकळ स्त्रियांसह ॥३१॥ वत्सांसमवेत गोभार । त्याचि पंथें जाती समग्र । नंद निघाला सत्वर । करीत गजर वाद्यांचा ॥३२॥ पुढें जाती गोभार । मागें गोपाळांसमवेत श्रीधर । त्यामागें शकट समग्र । वरी बैसल्या गौळिणी ॥३३॥ कीं त्या उतरल्या देवांगना । किंवा आल्या नागकन्या । तैशा त्या खंजरीटनयना । मिरवत जाती उल्हासें ॥३४॥ दधि घृत नवनीत । अन्नांचे गाडे भरले समस्त । तों मूर्तिमंत गोवर्धन दिसत । कृष्ण दावीत सर्वांसी ॥३५॥ सकळांनीं गोवर्धन पूजिला । अन्नांचा पर्वत पुढें केला । आपुल्या हातें ते वेळां । गोवर्धन जेवीतसे ॥३६॥ विशाळ पुरुष बैसला । गौळियां विस्मय वाटला । कोणास न कळे हरिलीला । आपणचि नटला स्वरूप तें ॥३७॥ सर्वांसी म्हणे मनमोहन । पहा कैसा जेवी गोवर्धन । तुम्ही उगेंचि अन्नें जाळून । व्यर्थ यज्ञ करीतसां ॥३८॥ याउपरी गाईंची पूजा करिती । सकळ जन भोजनें सारिती । सुगंध चंदन चर्चिती । गौळी एकमेकांतें ॥३९॥ किंचित उरला दिनमणी । मग बोले चक्रपाणी । आतां गोवर्धनासी प्रदक्षिणा करूनी । मग गोकुळा चलावे ॥४०॥ सिद्ध झाले सकळ जन । शकटावरी आरोहण करून । गोपाळ गाई आदिकरून । करिती प्रदक्षिणा समग्र ॥४१॥ कृष्णास मध्यें वेष्टून । गोप करिताती कीर्तन । तो उत्साह देखोन । मनीं क्षोभला सहस्राक्ष ॥४२॥ प्रळयमेघांच्या तोडिल्या शृंखळा । तयांसी आज्ञा देत ते वेळां । म्हणे वर्षोनियां चंडशिळा । सर्वही मारा व्रजवासी ॥४३॥ गौळी माजले समस्त । मज न लेखिती उन्मत्त । करावा समस्तांचा घात । कृष्णासमवेत आतांचि ॥४४॥ तामसगुणें इंद्र वेष्टिला । हरीचा प्रताप नेणवेचि त्याला । असंभाव्य मेघ वोळला । एकाएकीं चहूंकडे ॥४५॥ हस्तिशुंडेऐशा धारा । नभींहूनि सुटल्या सैरावैरा । त्यांत वर्षों लागल्या चंडधारा । पडती अनिवारा सौदामिनी ॥४६॥ चहूंकडोनि पूर चालिले तुंबळ । बुडालें न दिसे कोठें गोकुळ । जैसे समुद्रांत पडले ढेंकूळ । मग ते कोठें पहावें ॥४७॥ थरथरां कांपती सर्व जन । गारा मस्तकावरी पडती येऊन । गौळिणी बाळांसी पोटीं धरून । आक्रंदती तेधवां ॥४८॥ कडकडोनि वर्षती चपला । महाप्रळय गौळियां ओढवला । मग दीनवदनें ते वेळां । धांवा मांडिला सकळांनीं ॥४९॥ आक्रोशें एक फोडिती हांका । हे दीनबंधो वैकुंठपालका । हे अनाथनाथा जगदुद्धारका । ब्रीदें आपुलीं सांभाळीं ॥५०॥ इंद्रें मांडिला प्रळय फार । तूं जरी न धांवसी श्रीकरधर । तुझे कृपेचें निकेतन थोर । करूनि आम्हां रक्षीं कां ॥५१॥ कोठें ठाव नाहीं लपावया । धांव धांव भक्तकैवारिया । गाईंच्या कांसे रिघोनियां । वत्सें लपती पोटांतळीं ॥५२॥ नंद यशोदा गौळिणी सवेग । वरी टाकूनि आपुलें अंग । तळीं आच्छादिती श्रीरंग । रक्षिती भवभंग जगद्गुरु ॥५३॥ अनंत ब्रह्मांडांचें पांघरुण । जो मायाचक्रचाळक निरंजन । त्यास निजांगाखालीं घालून । गौळीजन झांकिती ॥५४॥ यशोदा करी रुदना । कैसे वांचवूं जगज्जीवना । मग तो वैकुंठीचा राणा । काय करिता जाहला ॥५५॥ जो इंद्राचा इंद्र तत्त्वतां । जो हर-विधींसी निर्माणकर्ता । जो प्रळयकाळीं शास्ता । तो गौळियां नाभीं म्हणतसे ॥५६॥ निजभक्तकैवारें ते वेळां । धांवोनि गोवर्धन उचलिला । गौळियांसी म्हणे सांवळा । तळीं या रे सर्वही ॥५७॥ गोवर्धनाखालीं समग्र । आले नरनारी गोभार । पर्वत रुंदावला थोर । जीव समग्र झांकिले ॥५८॥ अद्भुत हरीची करणी । जीवनावरी धरिली धरणी । शेष-कूर्मादिकांलागोनि । चक्रपाणी आधार ॥५९॥ उभविला ब्रह्मांडाचा डेरा । स्तंभ न देचि अंबरा । उडुगण - मित्र - रोहिणीवरां । वायुचक्रीं चालवी ॥६०॥ भू आप अनल अनिल निराळ । यांसी परस्पर वैर केवळ । तीं मित्रत्वें वर्तती सकळ । श्रीघननीळप्रतापें ॥६१॥ सप्तावरण हें ब्रह्मांड । माजीं सांठवले सकळ पिंड । ऐशा ब्रह्मांडभरी उदंड । रची प्रचंड माया याची ॥६२॥ द्वादश गांवें अग्नि गिळिला । महाविखार कालिया मर्दिला । पूतना शोषिली अवलीला । तेणें उचलिला गोवर्धन ॥६३॥ गोवर्धनाखालीं सकळ लोक । निवांत राहिले पावले सुख । मग तो निजजनप्राणरक्षक । वचन काय बोलिला ॥६४॥ म्हणे भार बहुत मज झाला । अवघे मिळोनि पर्वत । तंव धांविन्नला गौळियांचा मेळा । स्थळीं स्थळीं उचलिती ॥६५॥ एक मस्तकें उचलोनि देती । एक डांगामुसळे उभारिती । मध्यें सप्त वर्षांची मूर्ति । अगाध कीर्ति जयाची ॥६६॥ गौळी बळें बहु उचलिती । स्वेदपूर सर्वांगें जाती । कष्टें श्वासोच्छ्वास टाकिती । हरीस बोलती तेधवां ॥६७॥ आम्ही उचलिलें चंड पर्वता । तुवां करांगुळी लाविली वृथा । आम्ही कासावीस समस्त होतां । तूं हांसतोसी गदगदां ॥६८॥ तुझी घाई जाणूं आम्ही वनमाळी । लटकीचि लाविली त्वां करांगुळी । चोरी करूनि आळी । अम्हांवरी घालिसी ॥६९॥ शिदोर्या आमुच्या चोरुनि खासी । पर्वत उचलावया कां भितोसी । नवनीताचे गोळे तूंचि गिळिसी । आतां कां होसी माघारा ॥७०॥ वत्सें वळावया धाडिसी आम्हां । मागें शिदोर्या भक्षिसी पुरुषोत्तमा । व्यर्थ करांगुळी मेघश्यामा । कासया त्वां लाविली ॥७१॥ मग बोले वनमाळी । मी काढूं काय अंगुळी । महिमा नेणोनि गौळी । काढीं काढीं म्हणती आतां ॥७२॥ दाखवावया चमत्कार । अंगुळी ढिलाविली अणुमात्र । तंव तो पर्वत समग्र । एकाएकीं करकरिला ॥७३॥ दडपतांचि गोवर्धन । हांक फोडिती गौळीजन । हरि उचलीं वेगेंकरून । आम्ही दीन तुझे पैं ॥७४॥ पर्वत उचलीं रे दयाळा । भक्तवरदायका तमालनीळा । ब्रह्मानंदा अतिनिर्मळा । उचलीं ये वेळा पर्वत ॥७५॥ अद्भुत न कळे तुझी करणी । लिहितां न पुरे मेदिनी । वेदशास्त्रीं पुराणीं । नव जाय कीर्ति वर्णितां ॥७६॥ आम्ही म्हणों नंदाचा किशोर । परी करणी ब्रह्मांडाहूनि थोर । तूं जगदात्मा निर्विकार । प्रत्यया आलासी आम्हांतें ॥७७॥ द्वादश गांवें गिळिला अग्न । मूर्ख आम्ही नेणों महिमान । इंद्रादि देव समस्त गण । आज्ञाधारक तुझे पैं ॥७८॥ ऐसें वदती गौळीजन । ऐकोनि संतोषे पद्माक्षीरमण । सव्य करांगुलीकरून । गोवर्धन उचलिला ॥७९॥ उचलोनि दिधली अंगुळी । कृष्ण म्हणे तुम्ही रहावें सकळीं । अवघेचि बैसोनि भूतळीं । ऊर्ध्ववदनें विलोकावें ॥८०॥ सहस्रशीर्षाचिये शक्ती । सर्षपप्राय वाटे क्षिती । क्षितिधरशयनें तेचि रीतीं । क्षितिधर धरियेला ॥८१॥ कीं पूर्वीं निरालोद्भवनंदन । करतळीं धरूनि आणी द्रोण । व्रजभूषणें तेंचि रीतीं जाण । नगोत्तम धरिलासे ॥८२॥ कीं अंडजप्रभु सुधारसघट नेतां । क्लेश न मानीच तत्त्वतां । कीं लीलाकमळ हातीं धरितां । खेद चित्ता न वाटे ॥८३॥ जो सप्त धातूंविरहित । जो सप्तवर्षी जगन्नाथ । तो सप्तस दिन सप्त रात्रपर्यंत । उभा तिष्ठत भक्तकाजा ॥८४॥ मूर्ति पाहतां दिसे लहान । पुरुषार्थें भरलें त्रिभुवन । चिमणाच दिसे चंडकिरण । परी प्रभा पूर्ण चराचरीं ॥८५॥ घटीं जन्मला अगस्ती । पाहतां धाकुटी दिसे आकृती । आचमन करूनि अपांपती । हृदयामाजी सांठविला ॥८६॥ वामनरूप चिमणें भासलें । परी दोन पाद ब्रह्मांड केलें । तेवीं नंदात्मजें आजी केलें । गोवर्धन उचलोनि ॥८७॥ असो अद्भुत प्रताप देखोनी । अश्रु वाहती गौळियांचे नयनीं । ऊर्ध्व वदनें करूनी । कृष्णवदन विलोकिती ॥८८॥ अद्भुत प्रताप देखोन । यशोदा आली धांवोन । कंठीं मिठी घालोन । कृष्णवदन पाहातसे ॥८९॥ बा रे तुजवरून ओंवाळूनियां । सांडीन आतां माझी काया । मी तुझी म्हणवितें माया । लाज वाटे सर्वेशा ॥९०॥ तूं माझी जनकजननी । मी उद्धरलें तुझे गुणीं । अश्रु वाहती नंदाचे नयनीं । म्हणे त्रिभुवनीं धन्य मी ॥९१॥ यशोदा आणि रोहिणी । निंबलोण उतरिती हरीवरूनी । सकळ गोपिका लागती चरणीं । धन्य करणी दाविली ॥९२॥ आपुल्या कुरळ केशेंकरून । झाडिती श्रीहरीचे चरण । एकीं चरणीं भाळ ठेवून । आंसुवें पाय धुतले पैं ॥९३॥ असो सात दिवस अखंडगती । जलद शिलावृष्टि करिती । मनीं भावित निर्जरपती । गौळी निश्चितीं सर्व मेले ॥९४॥ अमरेंद्र म्हणे मेघांतें । पुरे करा रे आतां वृष्टीतें । तत्काळ उघडलें तेथें । शुद्ध जाहलें नभोमंडल ॥९५॥ कीं गुरुकृपें प्रकटतां ज्ञान । तेव्हांचि अज्ञान जाय निरसोन । तैसाचि उगवला सहस्रकिरण । गौळीजन सुखावती ॥९६॥ सकळांसी म्हणे कैटभारी । निघा आतां वेगें बाहेरी । क्षण न लागतां ते अवसरीं । व्रजजन सर्व निघाले ॥९७॥ खालीं ठेवूनि गोवर्धन । सकळांसी भेटे जगज्जीवन । गौळी सद्गद प्रेमेकरून । म्हणती ब्रह्म हेंचि खरें ॥९८॥ श्रीकृष्णाची स्तुति करीत । गोकुळा आले जन समस्त । तंव गोकुळ तैसेंचि संचलें स्वस्थ । नाहीं विपरीत कोठेंही ॥९९॥ विमानीं पाहे पुरंदर । तों गोकुळ गजबजिलें समग्र । गाई गोपाळ सर्वत्र । अतिआनंदें क्रीडती ॥१००॥ आपण जे उपाय केले । ते सर्वही व्यर्थ गेले । जैसे उदकातें घुसळिले । तक्र ना नवनीत कांहींच ॥१०१॥ मनीं विचारी वज्रधर । म्हणे श्रीकृष्ण पूर्णब्रह्मावतार । पडलें मजपासूनि अंतर । जगद्गुरु क्षोभविला ॥१०२॥ असंख्य ब्रह्मांडें असंख्य शक्र । क्षणें निर्मील मायाचक्र । तो क्षोभला जगदुद्धार । कैसा विचार करुं आतां ॥१०३॥ ज्या श्रीहरीचें म्यां करावें पूजन । त्यावरी उचलोनि घातले पाषाण । बुडालों अभिमान धरोन । आतां शरण जाईन तयातें ॥१०४॥ दिव्य सुमनें पूजिजे गोपाळा । त्यावरी सोडिल्या प्रलयचपळा । तनुमनधनेंसीं या वेळा । शरण घननीळा जाईन ॥१०५॥ अहंकारें बहु माजलों । चित्स्वरूपासी अंतरलों । विपरीतज्ञानें उन्मत्त झालों । विसरलों जगदात्मया ॥१०६॥ दिसती नाना विकार भेद । तेणें अंतरला ब्रह्मानंद । हृदयीं ठसावेना बोध । न लागे वेध हरिपायीं ॥१०७॥ वित्तआशा न सोडी चित्त । योषितांसंगें सदा उन्मत्त । हा खेद कांहीं न वाटे मनांत । तरी अनंत अंतरला ॥१०८॥ जैसें कां पिशाच श्वान । तैसें चित्त गेलें भ्रमोन । न धरी क्षमा दया मौन । द्वेषेंकरून वेष्टिलें ॥१०९॥ धरितां योग्यता अभिमान । सत्संग नावडे मनांतून । चित्त उठे कुतर्क घेऊन । तरी हरिचरण अंतरले ॥११०॥ चित्त न बैसे सदा भक्तीं । कैंची तितिक्षा उपरति विरक्ती । ऐसा अनुतापें अमरपती । सद्गद चित्तीं जाहला ॥१११॥ ब्रह्मा ऋषि भृगु देवगण । तुंबर मरुद्गण । संगें घेऊनि शचीरमण । चालिला शरण श्रीकृष्णा ॥११२॥ अष्टवसु अष्टनायिका । किन्नर गंधर्व गाती देखा । वाजत वाद्यांचा धडाका । चतुर्विध प्रकारें ॥११३॥ जाहली विमानांची दाटी । व्रजासमीप उतरे भूतळवटीं । तों गाई चारीत जगजेठी । गोपांसमवेत आनंदें ॥११४॥ देखोनियां पुराणपुरुषा । कनकदंड पडे जैसा । साष्टांग पृथ्वीवरी तैसा । इंद्रें घातला नमस्कार ॥११५॥ इंद्र आला कृष्णासी शरण । पाहावया धांवती गोकुळीं जन । म्हणती हें पूर्णब्रह्म सनातन । नेणों आम्ही कांहींच ॥११६॥
रत्नजडित मुकुट इंद्राचा पाहीं । रुळत श्रीकृष्णाचे पायीं ।
मग हरि बोले ते समयीं । उठीं त्रिदशेश्वरा ॥११७॥ व्यर्थ पेटलासी अभिमाना । कासया तूं शचीरमणा । तुज हे आठवण दिधली जाणा । सावध येथूनि वर्तावें ॥११८॥ स्वरूपी होऊनि सावधान । करावें सृष्टिकार्य संपूर्ण । क्रोध दुष्टांवरी चढवोन । साधुजन पाळावे ॥११९॥ संतांचा न करावा मानभंग । हरि भजनीं झिजवावें अंग । सांडोनि सकळ कुमार्ग । सन्मार्गेंचि वर्तावें ॥१२०॥ ऋषींचे आशीर्वाद घ्यावे । वर्म कोणाचें न बोलावें । विश्व हें अवघें पाहावें । आत्मरूपी केवळ ॥१२१॥ सत्संग धरावा आधीं । न ऐकावी दुर्जनांची बुद्धी । काम-क्रोधादिक वादी । दमवावे निजपराक्रमें ॥१२२॥ मी जाहलों सज्ञान । हा न धरावा अभिमान । विनोदेंही परछळण । न करावें कधींही ॥१२३॥ शम-दमादि साधनें । दृढ करावीं साधकानें । जन जाती जे आडवाटेनें । सुमार्ग त्यांसी दाविजे ॥१२४॥ क्षणिक जाणोनि संसार । सांडावा विषयांवरील आदर । असावें गुरुवचनीं सादर । चित्त सदा ठेवूनि ॥१२५॥ ऐसें बोलतांचि श्रीधर । उभा राहोनियां अमरेंद्र । स्तवन करीत अपार । सकलदेवांसमवेत ॥१२६॥ हे अनंतकोटिब्रह्मांडपालका । हे विश्वकारणा विश्वरक्षका । हे देवाधिदेवा जगन्नायका । मायातीता अगम्यां ॥१२७॥ तूं क्षीरसागरविलासी । अवतरलासी यादववंशीं । ब्रह्मानंद अविनाशी । कर्माकर्मासी वेगळां तूं ॥१२८॥ अवतरलासी ज्याचें सदनीं । धन्य तो नंद आणि यशोदा जननी । आम्हांलागीं चक्रपाणी । अवतार तुवां धरियेला ॥१२९॥ चहूं मुखीं स्तवी ब्रह्मदेव । पंचमुखीं वर्णी सदाशिव । बृहस्पति नारदादि ऋषी सर्व । अपार स्तोत्रें करिताती ॥१३०॥ शक्रें कामधेनु आणविली ते वेळे । कांसेखालीं कृष्णासी बैसविलें । पूर्णब्रह्म घनसांवळें । सप्तवर्षी मूर्ति पैं ॥१३१॥ कामधेनूच्या दुग्धधारा । श्रीहरिवरी सुटल्या सैरा । गोविंदनामाचा घोष अंबरा । गाजविला सुरवरीं ॥१३२॥ गोविंद गोविंद हें नाम । सकळ नामांमाजी उत्तम । देव बहुत संभ्रम । या नामाचा करिताती ॥१३३॥ कल्पपर्यंत प्रयागवासी । मख अयुत मेरुसम सुवर्णराशी । पुण्य आचरतां गोविंदनामासीं । तरी तुलना नाहीं सर्वथा ॥१३४॥ ऋषी वेदघोषें गर्जती । किन्नर गंधर्व आनंदें गाती । अष्टनायिका नृत्य करिती । प्रेमें डुल्लती भक्तजन ॥१३५॥ दुग्धाभिषेकें ते वेळे । पाहतां सकळांचे नेत्र निवाले । धन्य धन्य तेचि जाहले । हरिमुख पाहिलें जयांनीं ॥१३६॥ उदार सुहास्य मुख चांगलें । वरी दुग्धाभिषेकें कैसें शोभलें । जैसें इंद्रनीळावरी घातलें । काश्मीराचें कवच पैं ॥१३७॥ किंवा मित्रतनयेवरी । लोटे जैसी जन्हुकुमारी । दुग्धाभिषेकें ते अवसरीं । पूतनारी तैसा दिसे ॥१३८॥ मंदाकिनीचें उदक त्वरित । घेऊनि आला ऐरावत । शुध्दोदकें स्नान निश्चित । इंद्र घालीत निजकरें ॥१३९॥ जें पूर्ण परब्रह्म निर्मळ । त्याचें अंगीं कैंचा मळ । परी भक्तीनें भुलला गोपाळ । साकारला म्हणोनियां ॥१४०॥ दिव्य अलंकार दिव्य वस्त्रें । हरीस वाहिलीं तेव्हां शक्रें । अर्चूनियां षोडशोपचारें । रमावर तोषविला ॥१४१॥ ऐसा करोनियां सोहळा । प्रदक्षिणा करीत घननीळा । इंद्र आज्ञा मागोनि ते वेळां । जाता जाहला निजपदा ॥१४२॥ हें गोवर्धनोद्धारण ऐकतां । हरे सकळ संकट दुःखवार्ता । ब्रह्मानंदपद ये हाता । श्रवण करितां भावार्थें ॥१४३॥ असो गोकुळीं झाला आनंद । उत्साह करिती परमानंद । विलोकितां गोविंदवदनारविंद । तृप्ति नव्हे कोणातें ॥१४४॥ असो एके दिवशीं मुरारी । गाई चारीत यमुनातीरीं । तों वर्तली एक नवलपरी । ते चतुरीं परिसिजे ॥१४५॥ मयासुराचा एक पुत्र । त्याचें नांव व्योमासुर । तो दुरात्मा निर्दय क्रूर । कंसासुर धाडी तया ॥१४६॥ व्योमासुरासी म्हणे ते अवसरीं । थोर जाहला आमुचा वैरी । गाई चारावया यमुनातीरीं । नित्याकाळ येतसे ॥१४७॥ तरी तुवां सत्वर जाऊनी । वधावा तो प्रयत्न करोनी । तेणें वचन शिरीं वंदोनी । वृंदावना पातला ॥१४८॥ तेणें गोपाळरूप धरोनी । मिळाला कृष्णदासांत येऊनी । जैसा दांभिक आचार दावूनी । मैंद माना मोडीत ॥१४९॥ कीं कडुवृंदावन जैसें । वरीवरी शोभिवंत दिसे । कीं बिडालक शांत बैसे । मूषकालागीं जपतचि ॥१५०॥ असुर हरीस म्हणे ते समयीं । गोप वांटूनि दों ठायीं । वाघ-मेंढी लवळाहीं । खेळूं म्हणे कृष्णातें ॥१५१॥ आपण वाघ जाहला ते वेळे । गोपाळांसी घेऊनि पळे । पर्वतीं घोर विवर कोरिलें । त्यांत गोपाळ कोंडी पैं ॥१५२॥ परम कपटी दुराचार । गोप एक एक नेले समग्र । गाई-वत्सांचेही भार । कोंडी विपरीं दुरात्मा ॥१५३॥ गाई गोवळे नेले समस्त । एकलाचि राहिला रमानाथ । तटस्थ चहूंकडे विलोकित । म्हणे विपरीत केलें येणें पैं ॥१५४॥ भक्तांकारणें चक्रपाणी । चहूंकडे हिंडे रानोरानीं । महापर्वतदरीं ते क्षणीं । मोक्षदानी पाहतसे ॥१५५॥ मग मुरलीस्वरें वनमाळी । गाई पाचारित तये वेळीं । गंगे जान्हवी भीमरथी सकळी । या गे वेगीं धांवोनियां ॥१५६॥ धांव गे तुंगभद्रे वैतरणी । वेणी पिनाकी पयोष्णी । नर्मदे सरस्वती यमुने कृष्णे वेणी । गोदे मंदाकिनी या वेगें ॥१५७॥ रेवा तापी भोगावती । प्रवरे चंद्रभागे पूर्णावती । कावेरी प्रतीची सावित्री सती । या गे वेगें सत्वर ॥१५८॥ सुवर्णमुखी ताम्रपर्णी । क्रतुमाले शिशुमाले पयोष्णी । तुंगभद्रे सुवर्णोदके यक्षिणी । धांव आतां सत्वर ॥१५९॥ तंव त्या पर्वताचे अंतरीं । गाई आक्रंदतीं एकसरीं । धांवें धांवें कां मुरारी । सोडवीं झडकरी येथूनियां ॥१६०॥ मुरलीस्वरें गोपाळां । आळवीतसे सांवळा । या रे या रे म्हणे सकळां । मांडूं काला आतांचि ॥१६१॥ वडज्या सुदाम्या वांकड्या । दोंदिल्या सुंदर रोकड्या । वाल्या कोल्या बोबड्या । वेड्या बागड्या संवगडे तुम्ही ॥१६२॥ खुज्या मोठ्या रोडक्या कान्ह्या । चपळचपळा वेधकारण्या । प्रेमळ चतुरा सगुण ज्ञान्या । प्राणसखे हो या वेगीं ॥१६३॥ तंव पर्वताअंतरीं गोपाळ । आक्रंदती करिती कोल्हाळ । श्रीकृष्णनाम तें वेल्हाळ । घेवोनि बाहती एकदांचि ॥१६४॥ धांव आनंदकंदा गोविंदा । हे कमळपत्राक्षा उदारा मुकुंदा । सगुण-निर्गुण-ब्रह्मानंदा । स्वानंदबोधा अद्वया ॥१६५॥ कोंडिलों संसारपर्वतीं । पडिलों जन्ममरणविषयावर्तीं । सांपडलों अहंकारदैत्याचे हातीं । म्हणवूनि बाहतों कृष्णा तूतें ॥१६६॥ मग तो भक्तकैवारी श्रीधर । मुखावाटे काढूनि चक्र । पर्वत फोडिला सत्वर । गो-गोप-वत्सें सोडविलीं ॥१६७॥ तंव प्रळयहांक देऊनी । व्योमासुर धांवे तत्क्षणीं । अतिविशाळ मुख पसरोनी । ग्रासीन म्हणे हरीतें ॥१६८॥ परमपुरुषें भक्तवत्सलें । चक्रें कंठनाळ छेदिलें । व्योमपंथें उडविलें । व्योमासुराचें शिर पैं ॥१६९॥ ऐसा करोनि पुरुषार्थ । गाई-गोपाळांसमवेत । पूर्वस्थळा आले समस्त । काला करिती ते क्षणीं ॥१७०॥ कळला कंसासी समाचार । व्योमासुर पावला परत्र । धगधगलें कंसाचें अंतर । म्हणे विचार कैसा करूं ॥१७१॥ तंव अकरा सहस्र दैत्य । उभे होते अविचारी उन्मत्त । त्यांसी कंस तेव्हां सांगत । जा रे धांवत वृंदावना ॥१७२॥ एक गोरा एक सांवळा । दोघां धरूनि आणा ये वेळां । ऐसें ऐकतां दैत्यमेळा । वेगें चालिला वनातें ॥१७३॥ पिशाचवत धांवती ते वेळां । गोपाळांभोवता वेढा घातला । पुसती बळिराम सांवळा । कोठें आहेत सांगा रे ॥१७४॥ ऐसें देखोनि ते अवसरीं । भयभीत गोप अंतरीं । म्हणती कृष्णा लपें त्वरीं । घोंगडी तुजवरी घालितों ॥१७५॥ तुजला हे धरोनि नेती । आम्हीं कैसें जावें गोकुळाप्रती । हरि म्हणे रे कांहीं चित्तीं । भिऊं नका सर्वथा ॥१७६॥ मग श्रीकृष्ण म्हणे तयांतें । कोण्या पुरुषें धाडिलें तुम्हांतें । ते म्हणती कंसें उभयांतें । धरुं तुम्हांसी पाठविले ॥१७७॥ ऐसें ऐकोनि ते वेळे । गदगदां हांसिजे गोपाळें । म्हणे कंसें मूर्खत्व केलें । इतुके पाठविले कासया ॥१७८॥ आम्हां दोघांसी दोघे जण । नेतील कडेवर घेऊन । व्यर्थ आलेती इतुके धांवोन । जा परतोन सर्वही ॥१७९॥ दोघे जणें येथें रहावें । आम्ही जेवूनि येतों तयांसवें । ऐसें बोलतां केशवें । तें मानलें तयांसी ॥१८०॥ म्हणती कंस मूर्ख साचार । कां व्यर्थ पाठविले अकरा सहस्र । मग दोघांसी ठेवूनि समग्र । मथुरापंथें परतले ॥१८१॥ ऐसा क्षण एक जाहलियावरी । विचार करिती बळिराम -मुरारी । म्हणती या दोघांसी ये अवसरीं । पूजा बरवी समर्पावी ॥१८२॥ जन्मपर्यंत न विसरती । ऐसी पूजा करावी निगुती । तंव ते दोघे हरीस म्हणती । त्वरितगती चला आतां ॥१८३॥ जरी तुम्ही न याल ये क्षणीं । तरी नेऊं दोघांस उचलोनी । ऐसें ऐकतांचि कर्णीं । शेषावतार क्षोभला ॥१८४॥ बळिभद्रें आपुल्या हातेंकरून । दोघांस केलें बहुत ताडण । भोंवते गोवळे मिळोन । डांगांखालीं मारिती ॥१८५॥ दोघे काकुळती करिती बहुवस । आम्ही न येऊं म्हणती सोडा आम्हांस । बहुत झालों कासावीस । सोडा हृषीकेश म्हणे तयां ॥१८६॥ श्रीकृष्ण म्हणे दोघांसी । जाऊनि सांगा कंसापाशीं । जीवदान दिल्हें आम्हांसी । बळिराम आणि श्रीकृष्णें ॥१८७॥ दोघे मथुरापंथे पळती । असंख्य गोपाळ पाठीं लागती । वाटे अडखळोनि पडती । मग राम वारीत गोपाळां ॥१८८॥ दोघांचें अंग झालें चूर । जवळी केलें मथुरापुर । पुढें जात होते अकरा सहस्र । मागें परतोनि पाहाती ॥१८९॥ तंव कुंथतचि दोघे येती । समस्त पुसती तयांप्रती । कां रे आलेत रिक्तहस्तीं । राम श्रीपती कोठें दोघे ॥१९०॥ तंव ते बोलती दोघेजण । आम्हांसी तिहीं घातलें भोजन । जन्मवरी हें अन्न । नाहीं जाणा जेविलों ॥१९१॥ तडस भरोनि येती तिडका । मोदक बहु चारिले देखा । जेवितां आमुचा आवांका । गलित झाला तेधवां ॥१९२॥ आम्ही बहुत आलों काकुळती । पुरे म्हणूं तरी न सोडिती । अवघेचि आग्रह करिती । घ्या घ्या म्हणोनि एकदां ॥१९३॥ बळिभद्रेंचि स्वहस्तें । बहुत वाढिलें आम्हांतें । पुरे पुरे म्हणतां नंदसुतें । तरी कदा सोडिच ना ॥१९४॥ सांवळा उगाचि पाहत होता । तो जरी वाढावया उठता । मग आमुचा अंत न उरता । तेणें पुरे म्हणतां राहविलें ॥१९५॥ त्यांहीं आम्हांस ऐसें जेवूं घालावें । मग त्यांस कैसें धरावें । ऐसें ऐकतांचि आघवे । अकरा सहस्र बोलती ॥१९६॥ परम नीच दैत्यजाती । अन्नाकारणें लाळ घोंटिती । म्हणती सांगा रे त्वरितगती । भोजन देती आम्हां काय ॥१९७॥ अन्न त्यांजवळी आहे कीं नाहीं । सांगा आम्ही जातों लवलाहीं । तंव ते दोघे तये समयीं । बोलती काय ऐका तें ॥१९८॥ म्हणती अन्न कदा न सरे । तुम्हांसी पुरोनि तुमच्या पितरांस उरे । तुमच्या देवांचें पोट भरे । जा माघारे आतांचि ॥१९९॥ आतां यावें तुमचे सांगातीं । तरी आणीक आग्रह करिती । जुनी ओळख काढिती । मग न सोडिती आम्हांतें ॥२००॥ एक भोजनें झालें अजीर्ण । दुसरें त्यावरी होय प्राणोत्क्रमण । ऐसें ऐकतां अवघेजण । आले सत्वर हरीजवळी ॥२०१॥ देखिला दैत्यभार सकळ । भयभीत जाहले गोपाळ । म्हणती कृष्णें अनर्थ प्रबळ । येथें आतां मांडिला ॥२०२॥ हरि म्हणे सखे हो ऐका । काळत्रयीं भिऊं नका । पाठीसी मी असतां शंका । धरुं नका मनांत ॥२०३॥ ऐसें बोलोनि जगन्नाथें । मग विलोकिलें ऊर्ध्वपंथें । तंव अकस्मात गंधर्व तेथे । एकादश सहस्र उतरले ॥२०४॥ त्यांत मुख्य गंधर्व चित्रसेन । तेणें वंदिला जगद्भूषण । पुढें ठाकला कर जोडून । म्हणे आज्ञा द्यावी मज ॥२०५॥ श्रीकृष्ण म्हणे सकळां । या दैत्यांसी भोजन घाला । तंव गंधर्व धांवले ते वेळां । प्रळय मांडिला दैत्यांसी ॥२०६॥ गंधर्व तोडिती नाककान । हस्तपाय टाकिती मोडून । कितीकांच्या ग्रीवा पिळून । गतप्राण ते केले ॥२०७॥ ज्यांचे कां उरले प्राण । तिंहीं समर्पूनि नासिका कर्ण । मथुरेमाजी आले पळून । शंख करिती एकदां ॥२०८॥ वाहती रक्ताचे पूर । हडबडिलें मथुरानगर । लोक घाबरले समग्र । चाळवती तेव्हां भलतेंचि ॥२०९॥ म्हणती आणा रे वेगें घोडे । त्यांवरी सत्वर जुंपा गाडे । मांजरें आणि माकडें । रथीं जुंपा सत्वर ॥२१०॥ उचला उखळें झडकरी । चुली बांधा घोडयावरी । कोथळ्या आणि आड विहिरी । घेऊनि शिरीं चला रे ॥२११॥ नेसा वेगीं दृढ मुसळें । डोईस गुंडाळा रे पाळें । चाटू आणिक चौपाळें । पांघरुनियां पळा वेगीं ॥२१२॥ म्हैशी बांधा वांसरांवरी । गाई बांधा कुतर्याशिरीं । नेसतीं वसनें झडकरी । सांडोनिया पळा रे ॥२१३॥ स्त्रियांस म्हणती तेच क्षणीं । वोंटिस घ्या हो केरसुणी । पळा सत्वर येथूनी । नासिक कर्ण सांभाळा ॥२१४॥ असो लोक जाहले भयभीत । गंधर्व परतले समस्त । श्रीकृष्णासी वंदोनि त्वरित । आज्ञा मागती जावया ॥२१५॥ म्हणती जय जय पुराणपुरुषोत्तमा । अज अजित मेघश्यामा । सच्चिदानंदा पूर्णब्रह्मा । न कळे सीमा वेदांसी ।२१६॥ तूंचि सूत्रधारी सत्य होसी । आम्हां बाहुलियां नाचविसी । इंद्र विधि सकळ हृषीकेशी । शरण चरणांसीं पैं आले ॥२१७॥ ऐसें स्तवोनि पूतनाप्राणहरणा । गंधर्व गेले निजस्थाना । असो इकडे घायाळ कंससदना । बरळतचि पळताती ॥२१८॥ म्हणती कंसराज्य बुडालें । तुमचें मरण जवळ आलें । चित्त कंसाचें घाबरलें । धगधगलें हृदयांत ॥२१९॥ कंसास सांगाती घायाळ । ते दोघे प्रतापसूर्य केवळ । नखाग्रीं हा ब्रह्मांडगोळ । चालविती क्षणमात्रें ॥२२०॥ एक सांवळा एक गौर । दोन्ही परब्रह्म निर्विकार । ते मनुष्यवेषें निर्धार । शेष-विष्णु अवतरले ॥२२१॥ कंस टाकी श्वासोच्छ्वास । आतां काय करणें तयांस । असो गोकुळीं नंदास । श्रुत जाहलें तेधवां ॥२२२॥ कीं अकरा सहस्र वीर येऊनी । गेले राम-कृष्णांस घेऊनी । नंद गौळी यशोदा रोहिणी । धांवती वनीं आक्रंदत ॥२२३॥ यशोदा पिटी वक्षःस्थळ । नंद वाटेसी पडे विकळ । तंव अकस्मात तमालनीळ । गाई घेऊनि परतला ॥२२४॥ पुढें गाईंचे येती भार । मागें हलधर आणि श्रीधर । भोंवते गोप करती गजर । नाना वाद्यांचे तेधवां ॥२२५॥ तें देखोनियां यशोदा नंद । हृदयीं उचंबळला आनंद । ते समयीं जो जाहला ब्रह्मानंद । तो कवण वर्णूं शके पैं ॥२२६॥ मंदिरा आला इंदिरावर । नंदें समारंभ केला थोर । मेळवूनियां धरामर । दानें अपार दिधलीं ॥२२७॥ उत्तम हरिविजयग्रंथ । हाचि जाणिजे शेषाद्रिपर्वत । श्रीव्यंकटेश श्रीभूसहित । परब्रह्म वसे तेथें ॥२२८॥ श्रवणीं आवडी विशेष । भावार्थ हाचि आश्विनमास । सुप्रेम हे विजयादशमीस । भक्त येती धांवोनियां ॥२२९॥ विजयादशमी विजयदिवस । हरिविजय पाहतां सावकाश । शेषाद्रिवासी तो रमाविलास । निजदासांतें रक्षीतसे ॥२३०॥ ब्रह्मानंदकृपा पूर्ण । तेंचि निर्मळ निकेतन । जेथें नलगे द्वैत वात उष्ण । श्रीधर अभंग सेवीतसे ॥२३१॥ इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंशभागवत । संत श्रोते परिसोत । द्वादशोऽध्याय गोड हा ॥२३२॥ श्रीकृष्णार्पणमस्तु॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्रीगणेशाय नमः ॥ हे श्रीकृष्णा ! तुझे गुण काय वर्णावे ! तूच आमच्या अंतःकरणाचा चालक आहेस. तू सुवर्ण आम्ही दागिने, तू जगाचा ईश्वर तर आम्ही जग. तू अग्नी तर आम्ही तुझ्या ठिणग्या, तू सागर आम्ही त्यावरीत लाटा. तुझे चरित्र तूच वर्णन करवून घेतोस तुझ्याच कृपेने मी हे लिहितो !
श्रोतेजनहो, कृष्णाने ब्रह्मदेवाचा जसा गर्वहरण केला तसाच इंद्राचाही गर्व दूर करून त्याला शरण आणले. त्याची कथा आता ऐका. गोकुळातील लोक दरवर्षी इंद्राची पूजा करीत असत. त्याप्रमाणे एक दिवस नंदाने भरपूर पूजेचे साहित्य जमविले. कृष्णाने उठल्यावर ते पाहिले. त्याने नंदाला विचारले, "बाबा, हे काय काय जमविले आहे ? कशासाठी ?" तेव्हा त्याला नंद म्हणाला, "कृष्णा, आपण दरवर्षी मेघांचा राजा इंद्र याची पूजा करतो. कारण तोच आपल्याला पाऊस देतो. त्यामुळे पिके पिकतात. गुरांना चारा मिळतो. आपल्याला प्यायला पाणी मिळते, अन्न मिळते. म्हणून इंद्र प्रसन्न रहावा यासाठी त्याची पूजा करावी." कृष्ण म्हणाला, " असे कसे ? इंद्र काय करणार ? आपल्याला आपल्या कर्माप्रमाणे फळ मिळते. ज्याचे कर्म चांगले नसेल त्याला इंद्रही काही देऊ शकणार नाही. आपण बी पेरतो तसेच पीक येते. कर्म करतो तसे भोगावे लागते. हा गोवर्धन पर्वतच आपला खरा आधार आहे. आपण त्या पर्वताचीच पूजा करावी." नंद ऐकतच राहिला. एवढासा लहान कृष्ण ! एवढे ज्ञान त्याला कोठून आले ! त्याने सर्व गोपांना बोलावले. कृष्णाने आपले म्हणणे सर्वांना सांगितले. ज्याच्या अंगी अद्भुत सामर्थ्य आहे त्या मुलाचे हे बोल ! गोपांचा त्याच्यावर विश्वास होताच. त्यांना ते पटले. आणि सर्वजण गोवर्धनाची पूजा करायला गेले. ते पूजा करीत असता कृष्णाने आपली माया दाखविलीच. गोवर्धन पर्वत एका मोठ्या पुरुषाचे रूप घेऊन पूजेचा स्वीकार करीत आहे आणि नैवेद्य भक्षण करीत आहे असा देखावा सर्व गोपांना त्याने दाखविला. आणि म्हणाला, "पहा, गोवर्धन स्वतः नैवेद्य घेत आहे. हे सारे अन्न यज्ञात तुम्ही जाळून टाकले असते !" गोवर्धनाची पूजा झाल्यावर गाईंचीही पूजा केली गेली. संध्याकाळ झाल्यावर सर्वजण कृष्णाबरोबर पर्वताला प्रदक्षिणा करू लागले. गोपबालक आनंदाने गाणी म्हणत नाचत चालले होते. इकडे आकाशात काय झाले ! आपली पूजा न करता गोप कृष्णाचे ऐकून डोंगराची पूजा करतात याचा इंद्राला राग आला. त्याने मेघांना आज्ञा केली, "सतत पाऊस पाडा. सारे वाहून गेले पाहिजेत ! गारांचा वर्षाव करून सार्यांना झोडपून काढा ! या कृष्णाच्या नादाने गवळी फार उन्मत्त झाले आहेत." इंद्राच्या आज्ञेप्रमाणे मुसळधार पाऊस पडू लागला सगळीकडे पाणीच पाणी झाले. विजा चमकू लागल्या. गडगडाट होऊन गारा पडू लागल्या. मुलांना उचलून घेऊन गोप-गोपी ओरडू लागल्या. गाईवासरे पुरात वाहू लागली. नंदयशोदा व बलराम कृष्णाला धरून उभे राहिले. पुन्हा सर्वांनी कृष्णालाच शरण जाऊन वाचवण्याची प्रार्थना केली. इंद्र वरून गंमत पहात होता. कृष्ण म्हणाला, 'चला, लवकर गोवर्धनाच्या पायथ्याशी चला.' कसेबसे सारेजण तिकडे गेले. कृष्णाने आपल्या योगशक्तीने पर्वतच हातावर उचलला. आणि हाताच्या करंगळीवर तो तोलून धरला. सर्व गोपांना त्याने आधार दिला. पावसाने संत्रस्त झालेले, भिजून थंडीने कुडकुडणारे गोप, गोपी, गाई गुरे धावत धावत पर्वताखाली शिरली. आता सारे पाऊस थांबण्याची वाट पाहू लागले पण इंद्राने सतत सात दिवस पाऊस पाडला. कृष्णाने मधेच गोपाळांची परीक्षा पहायचे ठरविले. तो म्हणाला "माझी करंगळी दुखू लागली आहे. मला थोडे सहाय्य करा. तुम्ही तुमच्या काठ्या वर करा. म्हणजे मी थोडावेळ हात खाली घेतो." गोपाळांना वाटले आपण सर्वांनी काठ्या वर केल्या की पर्वताला आधार देऊ शकू. त्याप्रमाणे आपल्या जवळील काठ्यांनी त्यांनी आधार दिला. गवळ्यांना मोठा अभिमान वाटला. आपल्या काठ्यांमुळे पर्वत तोलून धरला गेला आहे, असे त्यांना वाटले. पण कृष्णाने करंगळी हालवली नव्हती. तोच सर्व भार सहन करीत होता. गोप कृष्णाला म्हणाले, "कृष्णा आमच्या इतक्या काठ्यांनीच पर्वत तोलून राहिला आहे. तुझी तर काय नुसती करंगळीच आहे ?" कृष्णाने विचारले, "पहा हो, मी करंगळी काढतो. चालेल का ?" तेव्हा गवळी म्हणाले, 'चालेल ! काढ !' कृष्णाने करंगळी मुडपली. तो काय ! प्रचंड भार गवड्यांच्या काठ्यांवर पडून ते मटकन खाली बसले. आणि ओरडू लागले, "मेलो मेलो ! कृष्णा वाचव वाचव तुझे काम तूच कर ! आम्ही तुला शरण आहोत. तुझा महिमा कळूनही आम्ही वेडेपणा करतो. क्षमा कर !" कृष्णाला त्यांची दया आली. "आता गर्व करणार नाही ना ?" असे त्यांना विचारले. आणि म्हटले "तुम्ही सारे बसूनच रहा. मी पर्वत तोलून धरला आहे. तुम्ही नुसते पहात रहा. कितीही दिवस पाऊस पडू दे, तुम्ही काळजी करु नका. " असे सात दिवस गेले. पण गवळ्यांना तहानभूक लागलीच नाही. देहधर्म सारे विसरलेच होते. हा कृष्ण प्रत्येक घटकेला आईजवळ "भूक लागली" म्हणून रडत असे ! तोच आता सात दिवस पर्वत तोलून उभा होता. यशोदा आणि रोहिणी कृष्णाच्या पाया पडत होत्या. त्यालाच जनक, जननी, सर्वस्वी आधार, प्राणांचाही प्राण, म्हणत होत्या. गोप गोपी कृष्णाची स्तुती करीत होत्या. इंद्राचा गर्व नष्ट झाला. कृष्णाने पाऊस काही थांबविला नव्हता. रहाव्या शक्तीचीच त्याने परीक्षा घेतली. इंद्राजवळचे मेघच संपले. तो काय करणार ! दिशा मोकळ्या झाल्या. आकाशात एकही मेघ दिसेना. लख्ख सूर्यप्रकाश पडला. कृष्णाने सर्वांना पर्वताखालून बाहेर पडण्यास सांगितले. पूर ओसरू लागला होता. सारे गोकुळात परत आले. पाहतात तो गोकुळात पाऊस पडलाच नव्हता. इंद्राने फक्त पर्वतावरच पाऊस पाडला होता. इंद्र कृष्णासमोर येऊन त्याची स्तुती करू लागला. त्याच्याबरोबर ब्रह्मदेव आला. तेहतीस कोटी देव आले. भृगु नारद वगैरे ऋषि आले. जणू सारा स्वर्ग कृष्णाच्या चरणी लागला. कृष्णानेही इंद्राला हात धरून उठविले आणि म्हटले, "देवराज, सात दिवस कशाला एवढे कष्ट केलेस ? आता यापुढे सावधानतेने आपले कर्तव्य कर ! सज्जनांचे पालन व दुष्टांना दंड करताना आपल्या बळाचा व ज्ञानाचा गर्व करू नको." त्यानंतर इंद्राने कामधेनू आणली. कृष्णावर तिने दुधाचा अभिषेक केला. त्याच्या पूजेसाठी सृष्टीने सर्व सामग्री दिली. देवांनी त्याचे पूजन केले. त्याचे 'गोविंद' असे नामकरण करण्यात आले. हेच त्याचे शास्त्रपुनीत नाम ! याचे उच्चारणही पापनाशक आहे. सर्व देव 'गोविन्द' नामाचा घोष करू लागले. इंद्र कृष्णाची आज्ञा घेऊन परत गेला. या गोवर्धनोद्धारणाची कथा श्रवण केल्यास अहंकाराचा नाश होऊन मनुष्य ब्रह्मरूप होईल ! पुढे एकदा वृंदावनात गोपबालक कृष्ण-बलरामाबरोबर खेळत असताना व्योमासुर तेथे आला. कृष्णाला मारण्याचे काम कंसाने त्याच्यावर सोपविले होते. व्योमासुर हा मयासुराचा पुत्र ! त्याने एका गोपाळाचे रूप घेतले. तो खेळात सामील झाला. कृष्णाने त्याला ओळखले, पण तसे दाखविले नाही. काही गोपाळ वाघ झाले, काही शेळी. व्योमासुराने वाघ होण्याचे ठरविले. वाघांनी मेंढे पळवून न्यायचे, पण मेंढे जोरदार प्रतिकार करणार होते. व्योमासुराने काय केले, एकेक गोपाळाला उचलले, आणि सर्वांना एका विवरात कोंडून ठेवण्यास सुरूवात केली. गाई वासरेसुद्धा त्याने नेली. कृष्ण एकटाच उरला होता. कृष्णाने बासरी वाजविण्यास सुरुवात केली. त्यामुळे गाईवासरे हंबरू लागली. गोपाळ हाका मारू लागले. ते कुठे आहेत ते कळले. कृष्णाने सुदर्शन चक्राने पर्वत फोडून सर्वांना सोडविले. तेव्हा प्रचंड जबडा पसरून व्योमासुर कृष्णाला गिळण्यासाठी धावला, पण कृष्णाने सुदर्शनचक्रानें त्याचा शिरच्छेद केला. त्याचे मस्तक दूर जाऊन पडले. कंसाला ते कळले. त्याला वाटले, एकेक राक्षस कृष्णाला मारू शकत नाही. हजारो राक्षस त्याने पाठविले. अकरा हजार राक्षस त्याने कृष्ण व बलरामाला धरून आणण्यासाठी पाठविले. गोप घाबरले. कृष्ण व बलरामाला त्यांनी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण कृष्ण पुढे झाला. राक्षसांना सामोरा गेला. हसत हसत म्हणाला- "आपण कोण ? आपल्याला काय पाहिजे ?" त्याचा सरळपणा पाहून राक्षस चकित झाले. त्यांनी सांगितले, तुम्हा दोघांना कंस महाराजांनी मथुरेत बोलावले आहे. न्यायला आम्ही आलो आहोत. कृष्ण युक्तीने म्हणाला - ’मी कृष्ण. हा बलराम. आम्हाला दोघांना न्यायला इतके लोक कशाला ? कंसाने तुम्हाला उगीच त्रास दिला. तुमच्यातले दोघे सोबतीला पुरेसे आहेत. आम्ही येतो की. बाकीचे सारे परत गेलात तरी हरकत नाही. कंसाला सांगा, आम्ही येतो. आम्ही तर इतके लहान आहोत ?' त्याच्या बोलण्याची मोहिनी पडून सगळे दैत्य परत गेले. ते जातांना कृष्ण त्यांना म्हणाला- "दोघेजण थांबा. त्यांना आम्ही जेवण देऊ आणि बरोबरच येऊं." त्याप्रमाणे फक्त दोघे उरले. तेव्हा बलरामाने त्यांना यथेच्छ मार दिला आणि ते मरायला टेकले तेव्हा म्हटले- "जा आणि कंसाला सांगा की आम्ही तुम्हाला जिवंत सोडले ही कृपाच समजा." ते मथुरेकडे जाताना वाटेत त्यांना अगोदर निघालेले दैत्य सैन्य भेटले. त्यांनी विचारले- "असे कां लंगडतां ? काय झाले तरी काय ? कृष्ण बलराम कुठे आहेत ?" ते दोघे काय बोलणार ? ते म्हणाले, "आम्हाला त्यांनी फार आग्रहाने भोजन दिले ते हातीपायी आले ?" त्या दैत्यांना हे बोलणे कळले नाही. ते परत वृंदावनाकडे निघाले. आपल्याला पण जेवायला मिळेल अशी त्यांना आशा वाटू लागली. अकरा हजार दैत्यसेना विस्तीर्ण वृंदावनात घुसली. गोपांना आता फारच भय वाटू लागले, पण कृष्णाने काय केले ? चित्रसेन गंधर्वाला आवाहन केले. त्याचेही अकरा सहस्र गंधर्व सैन्य वृंदावनात उतरले. त्या सैन्याने कंसाच्या दैत्यसेनेला मार दिला. नुसत्या लाथाबुक्क्यांनी मारले. सळो की पळो केले. सारे मथुरेत पळून गेले. अकरा हजार दैत्य मथुरेच्या मार्गात पळत असता, लोकांना भय वाटले ! एकच गडबड उडाली ! नगरातील लोकही त्यांच्या मागोमाग पळू लागले ! कंसाला जेव्हा सारा प्रकार कळला तेव्हा तो संतापला, आणि भयभीतही झाला ! इकडे गोकुळात अशी वार्ता गेली की वृंदावनात हजारो राक्षस शिरले, त्यांनी बलराम व कृष्ण यांना धरून नेले ! सारे गोकुळ घाबरून गेले, पण सर्व गोपबालक गाई-वासरे घेऊन गोकुळात परत आले. कृष्णबलरामही आनंदाने सवंगड्यांसह येत होते. त्यांना पहाताच सर्व गोकुळवासी फार आनंदित झाले. नंदाने तर मोठा उत्सव केला आणि दानेही वाटली ! बलरामाचे व कृष्णाचे दर्शन त्या दिवशी मोठे पुण्यप्रदच होते ! अध्याय १२ समाप्त. ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ |