॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीहरिविजय ॥

॥ अध्याय विसावा ॥

गुरुगृही विद्याभ्यासासाठी गमन -


श्रीगणेशाय नमः ॥
जय जय कमललोचना कांचनांबरा । कमनीयरूपा कमलाधरा ।
कर्ममोचका किल्मिषहरा । अरिसंहारा कमठरूपा ॥१॥
परमानंदा परमपुरुषा । परात्परा पयोब्धिवासा ।
पद्मजजनका परमहंसा । पंढरीशा परमात्मया ॥२॥
गोपविहारा गोवर्धनोद्धारणा । गोपीवल्लभा गोपपाळणा ।
गोकुळपालका गोरक्षणा । गोरसचोरा गोविंदा ॥३॥
राधारंगा रासविहारा । राघवा रजनीचरसंहारा ।
रावणांतका राजेंद्रा । राजीवाक्षा ऋणमोचका ॥४॥
मकरकुंडला मणिमयहारा । मदनारिप्रिया मुरसंहारा ।
मंगलधामा मंदरोद्धारा । मणिकंधरा मनवेधका ॥५॥
ब्रह्मानंदा यदुकुळभूषणा । पुढे बोले ग्रंथरचना ।
मथुरेसी जाऊनि वैकुंठराणा । काय करिता जाहला ॥६॥
एकोणिसावे अध्यायी कथन । कंस मारूनि केले बंदिमोचन ।
त्यावरी जाहले मौजिबंधन । मग नंद गेला गोकुळा ॥७॥
यावरी सुदामनाना ब्राह्मण । संकर्षण आणि कृष्ण ।
गुरुगृहाप्रति तिघेजण । विद्याभ्यासा चालिले ॥८॥
अवंतीनगरीमाजी जाण । महाऋषि नाम सांदीपन ।
जो शांत दांत ज्ञानी निपुण ।चारी वेद मुखोद्गत ॥९॥
जो सर्वज्ञ परिपूर्ण । ज्यासी नाही ज्ञानभिमान ।
जो वेदाज्ञा मानी प्रमाण । त्यासी शरण आधीं जावें ॥१०॥
परदारा आणि परधन । येथे पराङ्‌मुखचित्त पूर्ण ।
जो कदा नुच्चारी परदोषगुण । त्यासी शरण आधीं जावें ॥११॥
जो सर्वज्ञ दयाळु उदास । जो सदाचारवृत्ति जैसा चंडांश ।
सर्वांभूतीं दया विशेष । त्यासी शरण आधीं जावें ॥१२॥
जो तरोनि दुसर्‍यासी तारिता होये । शिष्या जो ब्रह्मरूप पाहे ।
मानापमानी चित्त सम राहे । त्यासी शरण आधीं जावें ॥१३॥
आपण ज्यासी विद्यादान केलें । ते शिष्य दुजिया शरण गेले ।
चित्त्त क्रोधें न खवळे । त्यासी शरण आधीं जावें ॥१४॥
जन झुगारिती निंदेचे पाषाण । पुढे केले क्षमाओडवण ।
मनात नुपजे द्वेष पूर्ण । त्यासी शरण आधीं जावें ॥१५॥
पुत्राहूनि विशेष गाढें । शिष्यावरी प्रेम चढे ।
जो शिष्या न घाली सांकडें । त्यासी शरण आधीं जावें ॥१६॥
वर्ते आपुल्या वर्णाश्रममेळीं । न चाले कदा वांकुडे पाउलीं ।
सदा आत्मरूपीं वृत्ति रंगली । त्यासी शरण आधीं जावें ॥१७॥
पिंड-ब्रह्मांड नाशिवंत । आत्मरूप एक शाश्वत ।
हें जाणोनि सदा विरक्त । त्यासी शरण आधीं जावें ॥१८॥
शरीरप्रारब्धें भाग्य आले । अथवा एकदांचि सर्व बुडाले ।
परी हर्शामर्षपंके मन न मळे । त्यासी शरण आधीं जावें ॥१९॥
पिपीलिका आणी कमलासन । इंद्र आणि दरिद्री दीन ।
राजा रंक अवघे समान । त्यासी शरण आधीं जावें ॥२०॥
वैकुंठापासोनि नागलोकपर्यंत । भूताकृति ज्या ज्या दिसत ।
त्या त्या हरिरूप भासत । त्यासी शरण आधीं जावें ॥२१॥
जैसा नाना घागरी आणि एक रांजण । त्यांत भासे एक चंडकिरण ।
तैसें ज्यासी न दिसत स्त्रीपुरुषभान । त्यासी शरण आधीं जावें ॥२२॥
जो बोले जनीं हिंडे । परि ज्याची समाधि न मोडे ।
वाद-प्रतिवाद नावडे । त्यासी शरण आधीं जावें ॥२३॥
पृथ्वीचे राजे भाग्यवंत । नित्य ज्याच्या दर्शना येत ।
परी मी थोर हा नुपजे हेत । त्यासी शरण आधीं जावें ॥२४॥
भाग्यवंतांचें करावें स्तवन । दीनदुर्बळांचें हेळण ।
हें ज्यापाशीं नाहीं लक्षण । त्यासी शरण आधीं जावें ॥२५॥
प्रपंच जाहला किंवा नाहीं । हें स्मरण नसे कांहीं ।
जो बुडाला ब्रह्मानंदडोहीं । त्यासी शरण आधीं जावें ॥२६॥
इतुक्या लक्षणी अलंकृत । त्यावरी गुरुभजनी नित्य हेत ।
प्रेमभरे सदा डुलत । त्यासी शरण आधीं जावें ॥२७॥
ज्यासी हरिकीर्तनीं आवडी । संतदर्शना घाली उडी ।
तीर्थक्षेत्रमहिमा न खंडी । त्यासी शरण आधीं जावें ॥२८॥
इतुक्या चिन्ही मंडित पूर्ण । महाराज ऋषि सांदीपन ।
त्याच्या आश्रमापुढे शेष-नारायण । लोटांगण घालिती ॥२९॥
सांदीपन करितां अनुष्ठान । तों कळलें आले राम-कृष्ण ।
तात्काळ बाहेर आला धांवोन । सद्गद मन जाहले ॥३०॥
जन्मादारभ्य अनुष्ठानाचें फळ । घरा आला वैकुंठपाळ ।
ऋषीच्या नेत्री वाहे प्रेमजळ । धांवोनि घननीळ पाय धरी ॥३१॥
सांदीपने कृष्णासी उचलून । हृदयीं धरिला मनमोहन ।
म्हणे बा रे तुझें दुर्लभ दर्शन । ब्रह्मादि देवां समस्तां ॥३२॥
ऋषीनें बळिभद्रासी दिधलें क्षेम । सुदामा आलिंगिला सप्रेम ।
आसनीं बैसवोनि विप्रोत्तम । वार्ता क्षेम पुसतसे ॥३३॥
हरीनें सांगितलें वर्तमान । म्हणे स्वामींसी आम्ही आलो शरण ।
तन-मन-धनेसीं अनन्य । म्हणोनि चरण धरियेले ॥३४॥
सांदीपन म्हणे कृष्णनाथा । तूं जगद्‌गुरु जगत्पिता ।
तुझें नाम वदनीं गातां । सकळ दुरित संहरे ॥३५॥
तुवा हंसरूपेंकरून । उपदेशिला चतुरानन ।
सनकादिकांसही ज्ञान । उपदेशूनि उद्धरिलें ॥३६॥
तू मायानियंता हृषीकेशी । पूर्णब्रह्मानंद ज्ञानराशी ।
तो तू मज शरण आलासी । हेंचि आश्चर्य वाटतें ॥३७॥
तूं सकळ देवांचा निर्मिता । अज अजित कर्ता हर्ता ।
त्या तुज देवकी माता वसुदेव पिता । हेंचि आश्चर्य वाटतें ॥३८॥
तू निर्गुण निःसंग निर्विकारी । सदा तृप्त बाह्यांतरीं ।
तो तू गोकुळीं करिसी चोरी । हेंचि आश्चर्य वाटतें ॥३९॥
तू ऊर्ध्वरेता ब्रह्मचारी । महातापसी वंदिती शिरीं ।
तो तूं रासमंडळीं भोगिशी नारी । हेंचि आश्चर्य वाटतें ॥४०॥
तू काळासी शासनकर्ता । मायेनें बागुल आला रे म्हणतां ।
भयभीत होसी अनंता । हेंचि आश्चर्य वाटतें ॥४१॥
तुज जे अनन्यशरण । त्यांचे संकट वारिसी तूं भगवान ।
तो तूं यज्ञपत्‍न्यांसी मागसी अन्न । हेंचि आश्चर्य वाटतें ॥४२॥
तुवां त्रिविक्रमरूप धरिलें । पूर्वी बलिदर्पहरण केलें ।
त्या तुज मायेनें पाळण्यांत निजविलें । हेंचि आश्चर्य वाटतें ॥४३॥
योगयाग जे साधित । त्यांसी दर्शन देसी तूं अनंत ।
तो तूं गोवळ्यांसवें खासी भात । हेंचि आश्चर्य वाटतें ॥४४॥
मज द्यावयासी थोरपण । आश्रमा आले शेष - नारायण ।
लोकसंग्रहाकारण । गुरुभजन वाढवावया ॥४५॥
ऐका श्रोते हो सावधान । गुरुभक्तांचे कैसें लक्षण ।
परमात्मा आदिनारायण । तोही शरण गुरूसी रिघे ॥४६॥
जे तन-मन-धनेसीं शरण । गुरुवचन ज्यांसी प्रमाण ।
न पाहती गुरूचे दोषगुण । हेंचि लक्षणे शिष्याचें ॥४७॥
गुरु सांगती तेंचि आचरती । गुरुसमान आपण न म्हणती ।
दिवसेंदिवस चढे भक्ती । हेंचि लक्षण शिष्याचें ॥४८॥
गुरु हा केवळ ईश्वर । मजलागीं धरिला अवतार ।
ऐसा मनीं दृढ निर्धार । हेंचि लक्षण शिष्याचें ॥४९॥
मी एक जाणता सर्वज्ञ । गुरुसन्निध न मिरवी योग्यपण ।
घडोघडी आठवी गुरुचरण । हेंचि लक्षण शिष्याचें ॥५०॥
सकळ देवांहूनि आगळे । गुरुस्वरूप जेणें निर्धारिलें ।
मन गुरूपदींच लंपट जाहलें । हेंचि लक्षण शिष्याचें ॥५१॥
सारासारविचार । गुरुमुखें ऐकती निरंतर ।
आवडे अद्वैतशास्त्र कीं हरिचरित्र । हेंचि लक्षण शिष्याचें ।५२॥
गुरुवचनाकारणें सत्य । प्राण वेंचावया उदित ।
तेथें धनाची कायसा मात । हेंचि लक्षण शिष्याचें ॥५३॥
जें जें दिसे चराचर । तें तें गुरुरूप पाहे निर्धार ।
गुरुवचनीं नुपजे तिरस्कार । हेंचि लक्षण शिष्याचें ॥५४॥
गुरु सांगे जे हितगोष्टी । ते सदा धरी हृदयसंपुटी ।
प्रवृत्तिशास्त्रावरीं नाही दृष्टी । हेंचि लक्षण शिष्याचें ॥५५॥
गुरुनामस्मरणाचा ध्वज । अखंड उभारिला तेजःपुंज ।
गुरुसेवा करितां नुपजे लाज । हेंचि लक्षण शिष्याचें ॥५६॥
अनुष्ठान गुरुमूर्तीचे ध्यान । पूजेचे मूळ ते गुरुचरण ।
गुरुनाममंत्र ते जपकारण । हेंचि लक्षण शिष्याचें ॥५७॥
गुरुतीर्थ करी प्राशन । सदा गुरुगौरवगायन ।
हरि गुरुरूप देखे समान । हेंचि लक्षण शिष्याचें ॥५८॥
माझे शरीर असो बहुकाळ । मज गुरुसेवा घडो निर्मळ ।
गुरुभेटीलागीं उतावेळ । हेंचि लक्षण शिष्याचें ॥५९॥
गुरुनिंदा ऐकतां जाण । बोटे घालूनि बुजी कान ।
पुन्हां न पाही त्याचें वदन । हेंचि लक्षण शिष्याचें ॥६०॥
जारण-मारण-अनुष्ठान । वादविवाद पैशुन्य ।
कुटिलता निंदा नावडे मनातून । हेंचि लक्षण शिष्याचें ॥६१॥
अद्‌भुत प्रज्ञा जवळी असे । चातुर्यकला हृदयी वसे ।
अंगी सद्‌भाव विशेष दिसे । हेंचि लक्षण शिष्यांचें ॥६२॥
सर्वस्वेंसीं अतिउदार । गुरुकार्यासी सदा सादर ।
लौकिकावरी नाहीं भार । हेंचि लक्षण शिष्याचें ॥६३॥
जे देशीं वसे गुरुनाथ । तिकडून जरी आला मारुत ।
त्यासी क्षेम द्यावया धांवत । हेंचि लक्षण शिष्याचें ॥६४॥
सदा जपे सद्‌गुरुनाम । तेणें वितळे क्रोध काम ।
गेले लोभ मत्सर मोह भ्रम । हेंचि लक्षण शिष्याचें ॥६५॥
नाना मतें कुमार्ग अनाचारी । तेथें न बैसे क्षणभरी ।
वेदाज्ञा वंदी जो शिरी । हेंचि लक्षण शिष्याचें ॥६६॥
गुरु-शिष्याचें लक्षण । सांगितले बहु निवडून ।
ही भूषणे लेइली संपूर्ण । त्यांचे दर्शन दुर्लभ ॥६७॥
ही चिन्हे अंगीं नसती । नसतेंचि गुरुत्व भोगिती ।
सदा अंतरी पापमती । त्यांची संगति न धरावी ॥६८॥
अंगी नसे किंचित ज्ञान । परसंगें दाविती डोलोन ।
सरड तुकावी जैसी मान । त्यांची संगति न धरावी ॥६९॥
संतमूर्ति सदा निंदी । नसतेंचि शास्त्र प्रतिपादी ।
कुमार्ग दावूनि भोळे भोंदी । त्याची संगति न धरावी ॥७०॥
हरिहरचरित्रें पावन सर्वथा । म्हणे हें व्यर्थ काय गातां ।
मीच सर्वांत म्हणे जाणता । त्याची संगति न धरावी ॥७१॥
नावडे हरिकीर्तन कधी । तीर्थक्षेत्रमहिमा उच्छेदी ।
मज पूजा म्हणे सर्वांआधीं । त्याची संगति न धरावी ॥७२॥
माझे शिष्य व्हा म्हणवोनी । भलत्यासी आणी ओढोनी ।
नसतेचि मंत्र सांगे कर्णीं । त्याची संगति न धरावी ॥७३॥
मद्यपी जैसा बडबडत । वाचाळ बळें भाविका गोंवीत ।
आपुले अंगीं नाही प्रचीत । त्याची संगति न धरावी ॥७४॥
शिष्यांसी सांगे दटावून । माझें करावें बरवें पूजन ।
नाहींतरी तुम्हां शापीन । त्याची संगति न धरावी ॥७५॥
म्हणे आम्ही ज्ञानी मुक्त । जाहलों सकळ कर्मातीत ।
वेदविरुद्ध तेचि स्थापीत । त्यांची संगति न धरावी ॥७६॥
नाहीं इंद्रियांसी कदा शांती । जवळ काम क्रोध दुमदुमती ।
तरलों म्हणोनी लोकां सांगती । त्यांची संगति न धरावी ॥७७॥
प्रत्यया न येतां श्रीरंग । लटकेचि दावी वरतें सोंग ।
त्याचा न तुटे भवरोग । त्याची संगति न धरावी ॥७८॥
सर्पाच्या माथां मणि दिसत । परी घेऊं जातां बहुत अनर्थ ।
तैसा तो जाहला जरी विद्यावंत । त्याची संगति न धरावी ॥७९॥
इतर संतांची निंदा करी । देखतां दुःख उपजे अंतरी ।
चढला अहंकृतीच्या गडावरी । त्याची संगति न धरावी ॥८०॥
ज्ञानहीन गुरु त्यजिजे । ऐसें गुरुगीतेचें वचन गाजे ।
दयाहीन देश देखिजे । तोही त्यजिजे सर्वथा ॥८१॥
स्नेहाविण बंधुवर्ग । दुर्मुखी स्त्रियेचा करिजे त्याग ।
तैसे जे दुष्ट दाविती कुमार्ग । त्यांचाही त्याग करावा ॥८२॥
शिष्य आचरती अधर्म । करिती व्यभिचारिक कर्म ।
ज्यांसी नावरती क्रोध काम । तेही शिष्य त्यजावे ॥८३॥
गुरु सांगे हितोपदेश । तो ज्यांसी वाटे जैसे विष ।
गुरुहूनि म्हणती आम्ही विशेष । तेही शिष्य त्यजावे ॥८४॥
गुरुदेखतां दाविती मर्यादा । मागें सदा जल्पती निंदा ।
स्वामीसीं प्रवर्तती जे वादा । तेही शिष्य त्यजावे ॥८५॥
असो जैसा पुत्र भ्रष्टला । तो सर्वीं जैसा बहिष्कारिला ।
तैसा तो शिष्य आपुला । न म्हणावा कदाही ॥८६॥
म्हणोनि सद्‍गुरु एक सांदीपन । शिष्य ते शेष-नारायण ।
जरी परीस लोह मिळती पूर्ण । तरीच सुवर्ण होय तेथें ॥८७॥
असो ज्याचे श्वासीं जन्मले वेद । त्यासी गुरूनें काय करावा बोध ।
परी लोकसंग्रहार्थ गोविंद । दावी विशद गुरुसेवा ॥८८॥
चौसष्ट दिवसपर्यंत । गुरुगृही राहिला रमाकांत ।
चौसष्ट कला समस्त । अभ्यासिल्या श्रीरंगें ॥८९॥
चौदा विद्या चौसष्ट कळा । सकळ अभ्यासीत मेघसांवळा ।
जैसा करतळींचा आवळा । तैशा विद्या आकळीत ॥९०॥
परी सर्वांत आत्मज्ञान । त्याविण सकळ कळा शून्य ।
ते आत्मकळा सांदीपन । श्रीकृष्णासी उपदेशी ॥९१॥
जो साधनचतुष्टयसंयुक्त । अनुतापी जो शिष्य विरक्त ।
तेथे ज्ञान सद्‌गुरुनाथ । सर्व ठेवी आपुलें ॥९२॥
भंगल्या घटांत जीवन । कायसें व्यर्थचि घालून ।
जैसी सुंदर राजकन्या नेऊन । षंढाप्रति दिधली ॥९३॥
म्हणोनि पूर्ण पात्र जगज्जीवन । तो त्रिभुवनाचे सांठवण ।
त्यासी उपदेशी सांदीपन । निजज्ञान ऐका तें ॥९४॥
तिघे समोर बैसवून । सांदीपन वर्षे कृपाघन ।
म्हणे सर्वद्रष्टा तूं श्रीकृष्ण । दुजेपण नाहीं तुज ॥९५॥
तूं अज अव्यय निर्मळ । तुझिया स्वरूपा नाहीं चळ ।
जगडंबर पसारा सकळ । अविद्यामय लटकाचि ॥९६॥
गुरूसी म्हणे श्रीकृष्ण । स्वरूपीं स्फुरण व्हावया काय कारण ।
वस्तु निर्विकार निर्गुण । तेथे त्रिगुण कां जाहले ॥९७॥
ऐकोनि श्रीकृष्णाचे बोल । ऋषीस येती सुखाचे डोल ।
ऐका ते निरूपण रसाळ । जे अधिकारी ज्ञानांचे ॥९८॥
ऋषि म्हणे हरि ऐक सावधान । तुझे तुजचि सांगतों ज्ञान ।
जैसें पयोब्धीचें क्षीर घेऊन । त्यासीच नैवेद्य दाविजे ॥९९॥
तुवां पुसिलें स्फुरण कैसें । तरी स्वसुखीं असतां परमपुरुषें ।
'अहं ब्रह्मास्मि' ध्वनि विशेषें । उठती झाली स्वरूपीं ॥१००॥
जैसी सागरीं उठे लहरी । तैसी ध्वनि उठली चिदंबरी ।
कीं पहुडला सुखशेजेवरी । तो जागा होय स्वइच्छें ॥१०१॥
मुळीं उठली जे ध्वनी । परमपुरुषापासूनी ।
प्रकृति म्हणती तिजलागूनी । आदिजननी ज्ञानकळा ॥१०२॥
जैसा दीप आणि ज्योती । कीं शातकुंभ आणि कांती ।
कीं रत्‍न आणि कळा निश्चिती । अभेदस्थिति न मोडे ॥१०३॥
कीं तरंग आणि नीर । कीं तंतु आणि वस्त्र ।
कीं धातु आणि पात्र । लोह आनणि शस्त्र अभेद कीं ॥१०४॥
गूळ आणि गोडी अभेद । कीं वाद्य आणि नाद ।
कीं ओंकार आणि ध्वनि विशद । एकरूपें वर्तती ॥१०५॥
तैसीं प्रकृति-पुरुष निर्धारी । अभेदरूप निर्विकारी ।
तिचे पोटीं इच्छाशक्ति सुंदरी । जाहली गुणक्षोभिणी ते ॥१०६॥
इच्छादेवी कर्णकुमारी । पुरुषसत्तें जाहली गरोदरी ।
सृष्टि करावी अंतरीं । अहंकृति धरिली तिणें ॥१०७॥
तीन्हीं देव त्रिविध अहंकार । तिजपासोनि जाहले साचार ।
त्रिशक्तिस्वरूपें चतुर । तेचि जाहली तीं ठायीं ॥१०८॥
सत्त्वगुणें ज्ञानशक्ति जाहली । रजोगुणें क्रियाशक्ति विरूढली ।
तमोगुणें द्रव्यशक्ति बोलिली । तीन्ही नटली स्वरूपें ते ॥१०९॥
द्रव्यशक्तिआधारें तमोगुण । पंच विषय निर्मिले जाण ।
शब्द स्पर्श रूप रस गंध गुण । पंचतन्मात्रा याचि पैं ॥११०॥
क्रियाशक्तीच्या सहवासेंकरून । रजोगुण व्याला पंचकें तीन ।
ज्ञानेंद्रियपंचक पहिलें पूर्ण । कर्मेंद्रियपंचक दूसरें ॥१११॥
प्राणपंचक तीसरें । आतां सत्त्वें ज्ञानशक्तिआधारें ।
अंतःकरणपंचक एकसरें । ज्ञानमय ओतिलें ॥११२॥
ऐसीं पंच पंचके विशेषें । ती मिळाली परस्परानुप्रवेशें ।
मग कर्दम करूनि परमपुरुषें । दोन विभाग पैं केले ॥११३॥
उत्तम भाग तो हिरण्यगर्भ केवळ । असार भाग विराट ढिसाळ ।
पंचभूतात्मक निखिल । पिंडब्रह्मांड रचियेलें ॥११४॥
जैसी पार्‍याची कोटी फुटली । तेथे कोट्यवधि रवाळ जाहली ।
कीं अग्नि स्फुलिंगकल्लोळीं । बहुत जैसा पसरला ॥११५॥
कीं आकाशीं मेघ एक धार सोडी । त्याचे बिंदु होती लक्ष कोडी ।
अहंध्वनीसरिसे परवडी । जीव उठिले अपार ॥११६॥
जीव शिव हे दोन्ही पक्षी । बैसले या प्रपंचवृक्षीं ।
शिव पूर्णज्ञानी सर्वसाक्षी । जीव लक्षी विषयांतें ॥११७॥
तेणें जीवासी जाहला भ्रम । विसरला आपुलें निजधाम ।
चौर्‍यायशीं लक्ष योनिग्राम । हिंडता कष्टी होतसे ॥११८॥
त्या जीवाची करावया सोडवण । श्रीकृष्णा तूं झालासी सगुण ।
तुझ्या कृपावलोकनेंकरून । जीव सकळ उद्धरती ॥११९॥
तूं सर्वातीत सर्वश्रेष्ठ । तुजहूनि कोणी नाही वरिष्ठ ।
तुझ्या मायेचा खेळ उत्कृष्ट । हा जगडंबर पसारा ॥१२०॥
स्थूळ लिंग कारण महाकारण । विराट हिरण्यगर्भ चालक पूर्ण ।
महत्तत्त्व मायेहूनि भिन्न । स्वरूप निर्वाण हरि तुझें ॥१२१॥
जागृति स्वप्न सुषुप्ति तुर्या । सृष्टि-स्थिति-प्रलय-सर्वसाक्षिणी माया ।
याहूनि स्वरूप तुझें यादवराया । वेगळेंचि जाण पां ॥१२२॥
विश्व तैजस प्राज्ञ प्रत्यगात्मा । ब्रह्मा विष्णु रुद्र परमात्मा ।
यांहूनि वेगळा तूं आत्मारामा । यादवकुळटिळका ॥१२३॥
नेत्र-कंठ-हृदय-मूर्ध्नि । सूर्य ज्योतिर्लोक आदिकरूनी ।
महर्लोक ब्रह्मस्थानीं । यांसी चक्रपाणी वेगळा तूं ॥१२४॥
अकार उकार मकार । तीन्ही मिळोनी पूर्ण ओंकार ।
त्याहूनि स्वरूप तुझें निर्विकार । पूतनाप्राणशोषका ॥१२५॥
रज सत्त्व तमोगुण । चौथा शुद्ध सत्व निरसोन ।
तू सच्चिदानंद निर्वाण । कंसांतका श्रीरंगा ॥१२६॥
वैखरी मध्यमा पश्यंती परा । चहूं वाचातीत क्षराक्षरपरा ।
तो तूं परात्परसोयरा । कालियामर्दना श्रीकृष्णा ॥१२७॥
जारज अंडज उद्‌भिज्ज । चौथी खाणी नांव स्वेदज ।
त्याहूनि वेगळा तूं तेजःपुंज । गोपीमानसराजहंसा ॥१२८॥
ऋग्वेद यजुर्वेद सामवेद । चौथा अथर्वण प्रसिद्ध ।
त्यांहूनि वेगळा तू ब्रह्मानंद । वृंदावनविलासिया ॥१२९॥
स्थूळ प्रविविक्त स्वरूपभाव । स्वरूपानंदादि भोग सर्व ।
त्याहूनि वेगळा तूं स्वयमेव । गोवर्धनगिरिधरा ॥१३०॥
सलोकता समीपता । सरूपता सगुणसायुज्यता ।
त्यांहूनि वेगळा तूं तत्त्वतां । अघ-बकनाशका गोपाळा ॥१३१॥
विजाति स्वजाति स्वगत भेद । त्यांहूनि वेगळा तूं जगदंकुरकंद ।
अज अजित तूं शुद्धबुद्ध । राधिकामानसमोहना ॥१३२॥
जहल्लक्षण अजहल्लक्षण । तिसरें जहदजहल्लक्षण ।
त्यांहूनि स्वरूप तूं निर्वाण । क्षीरसागरविहारिया ॥१३३॥
द्वैत अद्वैत महाद्वैत । भू नीर अनळ अनिळ नभातीत ।
तोचि पूर्णब्रह्म शाश्वत । कमलोद्वभजनक तूं ॥१३४॥
तूं पंचविषयांवेगळा । गंधविषय उर्वीपासून जाहला ।
याहूनि तूं निराळा । इंदिरावरा श्रीहरे ॥१३५॥
रसविषय आपापासूनी । रूपविषय तेजस्थानीं ।
त्याहूनि वेगळा तूं मोक्षदानी । वैकुंठपुरनिवासिया ॥१३६॥
स्पर्शविषय समीरीं । शब्दविषय जाहला पुष्करीं ।
याहूनि वेगळा तूं निर्विकारी । गोपीवसनहारका ॥१३७॥
अन्नमय प्राणमय मनोमय । विज्ञानमय आनंदमय ।
पंचकोशाहूनि तूं अव्यय । जगद्वंद्या सर्वेशा ॥१३८॥
अन्नापासूनि स्थूळदेह । तो कोश जाण अन्नमय ।
याहूनि वेगळा तूं निश्चिय । गजास्यजनकप्रियकरा ॥१३९॥
प्राण आणि अपान । व्यान समान उदान ।
हा प्राणमय कोश नव्हेसी तूं पूर्ण । मधु-मुर-नरकनाशना ॥१४०॥
वाचा पाणि पाद शिश्न गुद । मनसहित मनोमयकोश प्रसिद्ध ।
याहूनि वेगळा तूं पूर्णानंद । गोपीकुचकुंकुमांगमर्दना ॥१४१॥
श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण । बुद्धिसहित विज्ञानमय कोश जाण ।
यांहूनि वेगळा तूं नारायण । श्रीकुचदुर्गविहारा ॥१४२॥
सर्वांचे जें कां कारण । अविद्याचातुर्य अज्ञान ।
हा आनंदमय कोश तूं यांसीं भिन्न । गोरसचोरा गोपते ॥१४३॥
त्याग अत्याग त्यागात्याग । त्यांहून परता तूं सारभाग ।
निर्विकार तूं अज अव्यंग । मुरलीधरा ॥१४४॥
साकार साभास आभास । चौथें जाणिजे निराभास ।
याहूनि पर तूं परात्पर हंस । तृणावर्तप्राणहरणा ॥१४५॥
अविद्यामय चारी प्रलय । पांचवा केवळ ज्ञानमय ।
यांहूनि वेगळा तूं अद्वय । गोपीनयनाब्जदिनेशा ॥१४६॥
पिंडींच नित्य प्रळय ते निद्रा । मरणसम ते अवधारा ।
निद्रेविरहित तूं यादवेंद्रा । समरधीरा केशवा ॥१४७॥
महाप्रळय तें मरण । स्थूळदेह जाय नासोन ।
तूं षड्‌विकाररहित पूर्ण । जन्म-मरणमोचका ॥१४८॥
अस्ति जायते वर्धते । विपरिणमते अपक्षीयते ।
हे दामोदरा यादवपते । यांहूनि परतें स्वरूप तुझें ॥१४९॥
विनश्यति विकार सहावा । षड्‌विकाररहित तूं कमलाधवा ।
जगद्‌व्यापका तूं आदि सर्वां । मायाचक्रचालका ॥१५०॥
असो ब्रह्मांडींचा नित्य प्रळय पाहे । चारी युगें सहस्र वेळां जाय ।
तो एक दिन ब्रह्मयाचा होय । दानवशिक्षाकारणा ॥१५१॥
याचप्रमाणें रात्रि निद्रा । परमेष्ठी करी अवधारा ।
तों सृष्टि बुडे एकसरा । ऐक उदारा श्रीपते ॥१५२॥
बत्तीस लक्ष गांवें चढे पाणी । इतुकें ब्रह्मांड जाय बुडोनी ।
सप्त चिरंजीव शशि-तरणी । जाती लोपोनि सर्वेशा ॥१५३॥
मागुती ब्रह्मा जागा होत । यथापूर्वमकल्पयत ।
पुन्हां तैसेंचि रची निश्चित । तुझा सुत परमात्मया ॥१५४॥
हा ब्रह्मांडीचा नित्यप्रळय जाण । ऐक महाप्रळयाची खूण ।
तेथें ब्रह्मादिकां संहरण । होय ऐक श्रीकरधरा ॥१५५॥
आधीं अनावृष्टि शतसंवत्सर । तेणें होईल जीवसंहार ।
द्वादशार्क निरंतर । तपती तेव्हां शकटांतका ॥१५६॥
सप्त सागर शोषूनि वडवानळ । जाळील सर्व उर्वीमंडळ ।
सप्त पाताळें जळतील । शेषमुखाग्नीनें सर्वेशा ॥१५७॥
मग वारणशुंडेऐसी धार । मेघ वर्षतील शतसंवत्सर ।
पृथ्वीची राखाडी समग्र । विरेल प्रळयीं यादवेंद्रा ॥१५८॥
त्या जळासी तेज गिळील । तेजासी प्रभंजन प्राशील ।
त्या समीरासी निराळ । क्षणें ग्रासील पद्यनाभा ॥१५९॥
नभासी ग्रासील तमोगुण । तम होय रजीं लीन ।
रज जाय सत्त्वीं मिळोन । कमलपत्राक्षा मुरारी ॥१६०॥
सत्व सामावे महत्तत्त्वांत । तेंही हारपे मूळमायेंत ।
मूळमाया पुरुषांत मिळत । वेदवंद्या माधवा ॥१६१॥
पुरुष तोचि ओंकार । माया तेचि ध्वनि निर्धार ।
हे स्वरूपीं लीन होती साचार । तेंचि निर्विकारस्वरूप तूं ॥१६२॥
वैकुंठ कैलास क्षीरसागर । विरोनि जाहलें निर्विकार ।
तें स्वरूप हरि साचार । आतां पुरे काय पूससी ॥१६३॥
ऐसे सांगतां सांदीपन । समाधिस्थ जाहला जगज्जीवन ।
ब्रह्मानंदसागरीं लीन । ऋषीही जाहला तेधवां ॥१६४॥
राहिलें गुरु-शिष्यपण । राहिले वेदांतनिरूपण ।
स्वरूपार्णवीं निमग्न । अवघे जाहले एकदांचि ॥१६५॥
निरसोनि सकळ आधि । लागली केवळ अक्षय समाधि ।
हरपलीं मन चित्त बुद्धि । सर्व उपाधि विराली ॥१६६॥
स्वानंदलहरी जिरवून । सावध जाहला सांदीपन ।
म्हणे हे कृष्ण वसुदेवनंदन । समाधि ग्रासोनि सावध होईं ॥१६७॥
राजीववत् नेत्र चांगले । हरीनें तेव्हां उघडिले ।
अष्टभाव अंगीं दाटले । वेदांसी न कळे सौख्य जें कां ॥१६८॥
मग उठोनि पूतनाप्राणहरण । ऋषीसी साष्टांग केलें नमन ।
हृदयी दृढ धरी सांदीपन । मनमोहनासी तेधवा ॥१६९॥
सकळ विद्यांमाजी मुकुटमणी । ते हे अध्यात्मविद्या रत्‍नखाणी ।
हे ब्रह्मविद्या नेणती ते प्राणी । नाना योनी भोगिती ॥१७०॥
आत्मविद्या नेणती गूढ । नरक भोगिती अनेक मूढ ।
नाना शास्त्रांचे काबाड । काय व्यर्थ करूनियां ॥१७१॥
जरी केलीं नाना तीर्थें । भस्म लाविलें शरीरातें ।
काय करूनियां तपातें । आत्मप्राप्ति नाहीं जों ॥१७२॥
केले जरी कोटि यज्ञ । मेरूइतकें सुवर्णदान ।
तरी आत्मप्राप्तीवांचून । प्राणी न तरती सर्वथा ॥१७३॥
तेणें केलें देहदंडन । पुराणपठण अथवा गायन ।
काय जटाभार राखोन । आत्मप्राप्तीवांचूनि ॥१७४॥
असो संपूर्ण ब्रह्मविद्या । सांदीपन देत जगद्वंद्या ।
ज्याचें नाम घेतां सकळ अविद्या । तुटोनि जाती क्षणमात्रें ॥१७५॥
यावरी स्त्रियेसी सांदीपन । सांगे एकांती जाऊन ।
घरा आले शेष-नारायण । यांसी सेवाकारण सांगूं नको ॥१७६॥
आमुचें पूर्वपुण्य समर्थ । घरा आला रमानाथ ।
हा त्रिभुवननायक समर्थ । यासी कार्य सांगूं नको ॥१७७॥
एके दिवशी सांदीपन । करावया गेला अनुष्ठान ।
मागे आश्रमी शेष-नारायण । सुदामासहित बैसले ॥१७८॥
तों घरात गुरूपत्‍नी बोलत । सप्तदिन पर्जन्य वर्षत ।
काष्ठें नाहींत घरांत । कैसें आतां करावें ॥१७९॥
कानीं ऐकतांचि ऐसें वचन । तात्काळ उठिले तिघेजण ।
शास्त्रपुस्तकें ठेविलीं बांधोन । अरण्याप्रति चालिले ॥१८०॥
शुष्क काष्ठें मोडूनी । मोळ्या बांधोनि तिघांजणीं ।
आश्रमा परतले तेचि क्षणीं । तो पर्जन्य पडिला असंभाव्य ॥१८१॥
चहूंकडून दाटले पूर । वोहळ गंगा भरल्या समग्र ।
तिघे मस्तकीं घेऊनि काष्ठभार । तैसेचि येती त्वरेने ॥१८२॥
सांदीपन आला आश्रमासि । तो न दिसती राम-हृषीकेशी ।
मग पुसे स्वस्त्रियेसी । कोठें गेले राम कृष्ण ॥१८३॥
कीं तुवां कांहीं सांगितले कारण । तो ते ऋषिपत्‍नी बोले वचन ।
गृहांत काष्ठें नाहींत म्हणोन । मी बोलिले स्वभावेंचि ॥१८४॥
ऋषि म्हणे याचि कार्यातें । उठोनि गेले अरण्यपंथें ।
अहा मूर्खे वैकुंठपतीतें । काय कार्य सांगितलें ॥१८५॥
परम नष्टा तुम्ही स्त्रिया । महा अशौचा निर्दया ।
वना धाडिलें यादवराया । अनर्थ थोर केला हो ॥१८६॥
महानिर्दय स्त्रियांची जाती । कपटनाटकी असत्य बोलती ।
कार्याकार्य नोळखती । अहंमती भुलोनियां ॥१८७॥
अहा मूर्खे काय केलें । शेष-नारायणां वना धाडिलें ।
बोलतां ऋषीच्या डोळां अश्रू आले । कंठ दाटला सद्गदित ॥१८८॥
अरण्यपंथे ऋषि जात । अष्टभावें सद्गदित ।
नाम घेऊनि हांका फोडीत । करुणा भरित हृदय जाहले ॥१८९॥
हे रामा हे कृष्णा । हे मुरहरे हे जनार्दना ।
हे कंसांतका मधुसूदना । कालियामर्दना कैटभारि ॥१९०॥
हे भक्तजनमानसराजहंसा । हे कृष्णा अविद्याविपिनहुताशा ।
हे वैकुंठपते रमाविलासा । कोणे वनीं पाहूं तूतें ॥१९१॥
अहा कमलपत्राक्षा श्रीरंगा । मनमोहना कोमलांगा ।
पुराणपुरुषा मम हृत्पद्मभृंगा । कोणे वनी पाहू तूतें ॥१९२॥
तो वर्षत घोर घन । दुरूनि येतां देखिला जगज्जीवन ।
सवें सुदामदेव संकर्षण । काष्ठें घेऊनि येती तिघे ॥१९३॥
जैसी धेनु धावें वत्स देखोन । तैसा धांवला सांदीपन ।
हरीच्या कंठी मिठी घालोन । स्फुंदस्फुंदोनि रडतसे ॥१९४॥
कृष्णा तुज पूजिती योगीश्वर । आम्हीं माथा दिधले काष्ठभार ।
तैसेचि आश्रमा आले सत्वर । उतरती भार काष्ठांचे ॥१९५॥
तो ऋषिपत्‍नी बाहेर धावत । हरीच्या कंठी मिठी घालीत ।
स्फुंदस्फुंदोनि रडत । म्हणे अन्याय केला म्यां ॥१९६॥
अहा वत्सा माझिया श्रीकृष्णा । कोमलगात्रा शतपत्रनयना ।
म्यां न सांगता पीतवसना । कां तूं गेलासी वनाते ॥१९७॥
श्रीकृष्ण म्हणे ऐक माते । आम्ही सेवा करावी भावार्थें ।
आम्हांसी थोर गुरुदास्यापरतें । आणिक कांहीं नावडे ॥१९८॥
ज्यासी गुरुसेवा नावडे यथार्थ । काय जाळावा त्याचा परमार्थ ।
गुरुसेवेविण विद्या समस्त । अविद्या होती जाण पां ॥१९९॥
जो कंटाळे गुरुसेवेसी । किडे पडले त्याच्या ज्ञानासी ।
जो स्वामीसी आपुल्या द्वेषी । तो महानरकासी जाईल ॥२००॥
तो साही शास्त्रें आला पढोन । तेणें केलें दान तप कीर्तन ।
त्यासी देव जरी आले शरण । न करितां गुरुभजन तरेना ॥२०१॥
काय कोरडा करूनि जप । व्यर्थ ध्यान खटाटोप ।
काय जाळावा त्याचा प्रताप । गुरुस्वरूप नाठवी जो ॥२०२॥
सद्‌गुरूचें स्मरण न करी । नाठवी गुरुमुर्ति अंतरीं ।
तो बुडाला अघोरीं । चंद्रार्कवरी दुरात्मा ॥२०३॥
सद्‌गुरूचें नाम सांगता । लाज येत ज्याच्या चित्ता ।
त्या चांडाळाचें मुख देखतां । सचैल स्नान करावे ।२०४॥
गुरुचरणी मन न ठेवितां । व्यर्थ काय चाटावी कविता ।
तो ज्ञान सांगे ते तत्त्वतां । मद्यपियाचें भाषण ॥२०५॥
असो कृष्णें गुरूचे गृहीं । अपार संपत्ति भरिली ते समयीं ।
जे शक्राचे येथें वस्तु नाही । ते ते आणूनि पुरवीतसे ॥२०६॥
वस्त्रें आभरणें धनाच्या राशी । श्रीकृष्ण देत गुरुपत्‍नीसी ।
चौसष्ट दिवस गुरुगृहवासी । शेष-श्रीहरि जाहले ॥२०७॥
मग जोडोनि दोनी कर । उभे राहिले गुरूसमोर ।
सद्गद होवोनि अंतर । सांदीपनीसी बोलती ॥२०८॥
कांहीं मागा जी गुरुदक्षिणा । ऐसें बोले वैकुंठराणा ।
सांदीपनी बोले जगद्‌भूषणा । कांही वासना नसेचि ॥२०९॥
तूं आम्हांसी गुरुदक्षिणा देऊनी । जाऊं पाहसी चक्रपाणी ।
तुज सोडूनि मन ठेवील जो धनीं । तोचि अभागी जाणिजे ॥२१०॥
सोडूनियां तुझें ध्यान । क्षुद्र देवतांचें करी भजन ।
तुझे नामीं विन्मुख पूर्ण । तोचि अभागी जाणिजे ॥२११॥
शुभदायक तुझें जन्मकर्म । जो सर्वथा न आयकेचि अधम ।
तुज टाकूनि इच्छी धनकाम । तोचि अभागी जाणिजे ॥२१२॥
जगद्वंद्या तुझे विलोकिता मुख । हारपे अपार जन्मींचें दुःख ।
तुज टाकूनि इच्छी स्वर्गसुख । तोचि अभागी जाणिजे ॥२१३॥
तूं परम पुरुष निर्गुण । भक्तांलागी जाहलासी सगुण ।
तुज टाकूनि करी आणिकांचे ध्यान । तोचि अभागी जाणिजे ॥२१४॥
असो गुरूपत्‍नी खेद करी । कृष्णा तू आमचा पूर्ण कैवारी ।
माझा पुत्र बुडाला सागरीं । तो आणून देईं दक्षिणा ॥२१५॥
तेवढाच पुत्र होता जाण । पुढे नाहींच मग संतान ।
हरि पुत्राविण शून्य सदन । देईं आणून तेवढा ॥२१६॥
अंधार पडला आमुचे कुळीं । हरि तेवढा दीप उजळीं ।
सांदीपन म्हणे वनमाळी । करीं आज्ञा येवढीच ॥२१७॥
हाती धरूनि सांदीपना । समुद्रतीरीं आला वैकुंठराणा ।
तो सागर येऊनि लागला चरणा । काय ती आज्ञा मज सांगा ॥२१८॥
हरि म्हणे गुरुसुत देईं वहिला । तिमिंगिल मत्स्य बोलविला ।
तो म्हणे पांचजन्यदैत्यें भक्षिला । त्यासी पुसे श्रीहरि ॥२१९॥
मग समुद्रांत रिघोन । हरीने शोधिला पांचजन्य ।
तयासीं युद्ध करून । शिर त्याचें छेदिलें ॥२२०॥
पोट तयाचें विदारीत । तो आंत नाही गुरुसुत ।
मग म्हणे हा मारिला व्यर्थ । वर मागत पांचजन्य ॥२२१॥
हरि इतुकाच देईं वर । तूं करीं धर माझें कलेवर ।
मजविण जे तुजवरी घालिती नीर । त्यांचे पूजन व्यर्थ व्हावें ॥२२२॥
हरि म्हणे वर दिधला । मग तो पांचजन्य हातीं घेतला ।
पुढे मृत्युपुरीसी हरि गेला । गुरूपुत्राचियाकारणें ॥२२३॥
सूर्यसुतें हरीची पूजा करून । उभा ठाकला कर जोडून ।
हरि म्हणे गुरुसुत आणून । देईं सत्वर आतांचि ॥२२४॥
मग त्याचें आतिवाहिक देह होते । लिंगदेह म्हणती त्यांते ।
यमें शोधूनि निजहस्ते । हरीपासीं आणिले ॥२२५॥
हरीने इच्छामात्रेंकरूनी । दिव्य देह निर्मिला तेचि क्षणीं ।
गुरूपुत्र हातीं धरूनी । गुरुआश्रमा पातला ॥२२६॥
संतोशला सांदीपन । कृष्णासी दिधलें आलिंगन ।
गुरुकांता करी लिंबलोण । कृष्णावरूनि तेधवां ॥२२७॥
म्हणे हरि तुजवरूनी । मी जाईन ओंवाळूनी ।
अद्‌भुत केली तुवां करणी । ब्रह्मादिकां अगम्य ॥२२८॥
असो आज्ञा घेऊनि गुरूपासीं । श्रीकृष्ण आले मथुरेसी ।
आतां उद्धव जाईल गोकुळासी । गोपिकांसी बोधावया ॥२२९॥
हा अध्याय जो विसावा । तो केवळ संतांचा प्राणविसांवा ।
अर्थ घेता जो विसावा । मंत्र हृदयी ठसावे ॥२३०॥
हरिविजयग्रंथ वैरागर । त्यांत विसावा हा हिरा थोर ।
प्रकाशमय निर्विकार । जोहरी याचे निजभक्त ॥२३१॥
ऐसा हा विसावा हिरा । हृदयपदकीं जडावा बरा ।
जन्म-मरण येरझारा । तेणें तुमच्या चुकतील ॥२३२॥
कां घेतां जन्ममरणाच्या धांवा । या विसाव्यांत घ्या विसांवा ।
पूर्ण करवील मनोभावा । आपण श्रीहरि येऊनियां ॥२३३॥
जे करित सद्‌गुरुसेवा । त्यांच्या हाता चढे हा विसांवा ।
या विसाव्याचा अर्थ घ्यावा । सर्व कार्यें टाकूनियां ॥२३४॥
नाना विसावा हाचि शेष । यावरी पहुडला रमाविलास ।
जिंहीं सांडिले आशापाश । तेचि विसाव्या झोंबती ॥२३५॥
कीं विसावा हें पंढरीनगर । येथे विसांवला रुक्मिणीवर ।
भाव पुंडलिकासमोर । उभा तिष्ठत सर्वदा ॥२३६॥
जैसी भारतामाजी गीता थोर । तैसा हरिविजयी विसावा सार ।
की नक्षत्रामाजी रोहिणीवर । तैसा साचार विसावा ॥२३७॥
की रसांमाजी थोर अमृत । तैसा विसावा सुरस बहुत ।
की त्रिदशांमाजी शचीनाथ । विसावा सत्य तैसाचि हा ॥२३८॥
कीं भोगियांमाजी दशशतवक्त्र । कीं नवग्रहांमाजी दशशतकर ।
तैसा विसावा सुंदर । हरिविजयामाजी पैं ॥२३९॥
जे प्रवृत्तिशास्त्रें ऐकतां । भागले बहुत ग्रंत वाचितां ।
ते विसाव्यांत तत्त्वतां । विसांवती हें साच ॥२४०॥
ब्रह्मानंदा यादवेंद्रा । जगद्‌व्यापका श्रीकरधरा ।
हाचि वर देई सत्वरा । विसावा अंतरामाजी भरो ॥२४१॥
इति श्रीहरीविजयग्रंथ । संमत हरिवंशभागवत ।
श्रोते चतुर पंडित परिसोत । विंशतितमोऽध्याय गोड हा ॥२४२॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

कृष्ण व बलराम मथुरेत राहू लागले होते. त्यांच्या मुंजी झाल्या होत्या. मथुरेत उग्रसेनाचे राज्य आले होते. वसुदेव व देवकी दोन्ही मुलांच्या सहवासात आनंदात होती. कारावासांतच लग्नापासून राहिलेल्या देवकीबद्दल व वसुदेवाबद्दल सर्वांना उग्रसेनाबरोबरीने आदर होता. सुज्ञ लोक कृष्णाला व बलरामाला देवासमान मानूं लागले. त्या दोघांच्या ठिकाणी बल, ओज, धृती, क्षमा, बुद्धि, युक्ति, प्रेमळपणा यांचा उत्कर्ष होता. परंतु माणूस कितीही ज्ञानी असला तरी त्याला सद्‌गुरूला शरण जाऊन उपदेश घेऊन, सेवा करून शास्त्र व धर्म यांचे ज्ञान रीतीनुसार मिळवावे लागते. वसुदेवाने ठरविले की मुलांना अवंती नगरीतील सांदीपनी आश्रमात पाठवावे.

कृष्ण व बलराम यांनी त्याप्रमाणे अवंतीस प्रयाण केले. सांदीपनींकडे आधी वृत्त गेलेले होते. त्या दोघांची कीर्तीही त्यांच्या कानी होती. सांदीपनींना फार आनंद झाला. तपस्वी, शांत, ज्ञानी अशा त्या ऋषींना भगवंताच्या पूर्णावतारी जीवदशेतील चैतन्याला 'शिक्षण' देण्याचा मान मिळणार होता. आणि राम-कृष्ण जेव्हा येऊन त्यांच्या समोर प्रणाम करू लागले तेव्हा सांदीपनींनी, गळा दाटून येऊन प्रेमाने त्यांना उठवले व पोटाशी धरले.

"कृष्णा ! देवदुर्लभ दर्शन आहे तुझे ! तू मजजवळ रहाणार ! याहून परमभाग्य ते काय ! धन्य तो वसुदेव, धन्य ती देवकी- देवमाताच ती ! आणि ज्यांनी तुझे व बलभद्राचे बालपणी संगोपन केले ते नंदयशोदाही परमसुखाचे अधिकारी ! धन्य ते गोपगोपी ! ज्यांच्याशी तुम्ही खेळलात ते गोपाल-बालक किती भाग्यवान् ! मुलांनो, या सर्वांचे कुशल आहे ना ?"

सांदपिनींनी मुलांना आसनांवर बसविले. आश्रमात इतर काही मुले होती. त्यांचा परिचय करून दिला. त्यात सुदामा नावाचा एक ब्राह्मण मुलगा होता. त्याचे त्याच क्षणी कृष्ण-बलरामाशी सख्य जमले.

रामकृष्ण म्हणाले- "गुरूदेव ! आम्ही तनमनधनाने आता आपल्याला शरण आलो आहोत. आम्हांवर कृपा करावी व उपदेश देऊन विद्या शिकवावी."

सांदीपनी म्हणाले- ' कृष्णा ! मला गुरुपद देऊन तूं ही वैष्णवी मायाच दाखवीत आहेस ! तू ब्रह्मदेवाला ज्ञान दिलेस, सनकादिकांना शिकविलेस ! तू सगुण ब्रह्मच आहेस. सदा तृप्त व परिपूर्ण असणारा तू गोकुळात गोपांच्या घरी दुधाची, लोण्याची चोरी करीत होतास असे ऐकले ! ही तुझी मायाच ! आणि जो खरा परात्पर गुरू आहे तोच शिष्यत्व घेऊन मजकडे येतो ही पण तुझी मायाच. पण तूही लोकांना रीत घालून देतोस म्हणूनच हा गुरूंच्या घरी निवास व विद्याभ्यास आहे !

कृष्ण म्हणाला- "होय ! गुरुजी ! आम्ही बालभाव धरून शरण आलो आहोत. तुम्ही वेद, वेदान्त, सांख्य, व्यवहार, राजकारण, यांचा यथासांग अभ्यास आमच्याकडून करून घ्यावा, हीच आमची विनंती आहे."

सांदीपनींनी त्यांना आश्रमात रहायला सांगितले. ऋषींची पत्‍नी हीच आता त्यांची माता व सांदीपनी हेच पालनकर्ते पिता ! सुदामा व इतर विद्यार्थी यांच्या समवेत कृष्ण व बलराम त्या आश्रमात राहिले. दोन महिने व चार दिवस एवढ्या थोड्या अवधीत कृष्ण व बलराम यांनी लौकिक व अलौकिक ज्ञान, अपरा विद्या व पराविद्या आत्मसात केल्या. सर्व दर्शने, सर्व वेद, सर्व उपनिषदे यांचा त्यांनी अभ्यास केला. योगी असूनही योगाभ्यास केला. सांदीपनींनी त्यांची अभ्यासातील तीव्र गती पाहून मनापासून सर्व ज्ञान दिले. पराविद्या सांगता सांगता गुरु व शिष्य या दोघांची समाधी लागे, तेव्हा सांदीपनी कृष्णाला देहबुद्धीवर परत आणीत.

सांदीपनींनी पत्‍नीला असे सांगितले होते की तू कृष्ण बलराम यांना काही काम सांगू नको. तरीही ते सेवाधर्म पालन करण्यासाठी कामे मुद्दाम मागून घेत व करीत.

एकदा काय झाले, खूप पाऊस पडत होता. आश्रमात इंधनाला लाकडे होती ती सर्द ! गुरूपत्‍नी सहज बोलली- 'काय करावे ! घरात लाकडे ओली आहेत. स्वयंपाक कसा करायचा हा प्रश्नच आहे.

त्यावेळी कृष्णाने ते ऐकून बलराम व सुदामा यांना गुपचूप बरोबर घेतले. पावसातच ते तिघे बाहेर पडले. वनात गेले. त्यांनी कुर्‍हाडी बरोबर घेतल्या होत्या. त्यांनी लाकडे तोडली. लाकडाच्या मोळ्या बांधून त्या डोक्यावर घेऊन ते आश्रमाकडे परत येऊ लागले. तिकडे तिघे विद्यार्थी आश्रमात नाहीत हे पाहून सांदीपनी चौकशी करू लागले. पत्‍नीने सहज लाकडांचा विषय काढला होता हे कळताच रामकृष्ण अरण्यातच गेले असणार असा गुरुंनी तर्क केला. "तू उगीच बोललीस. त्या मुलांनी पावसात वनांत जाणे बरे नाही." असे बोलून ते मुलांना शोधण्यासाठी स्वतःच बाहेर पडले. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. त्यांना काही अंतरावर सुदामा, कृष्ण व बलराम डोक्यावर लाकडे घेऊन येत असलेले दिसले. सांदीपनींना पहाताच ते लवकर लवकर चालत पुढे आले आणि आश्रमात शिरले. भिजलेले गुरू आणि ओलेचिंब शिष्य ! त्यातच आनंदाश्रूची भर ! "मुलांना काम करायला लावलेस ?" म्हणून सांदीपनींचा पत्‍नीवर रोष झाला. ती तर गरीब बिचारी मुलांची क्षमा मागू लागली. तेव्हा कृष्ण म्हणाला- "आई ! तू क्षमा मागू नको, डोळ्यात पाणी आणू नकोस. आम्ही इथे शिष्य व विद्यार्थी म्हणून आलो आहोत. गुरूसेवा करणे हे आमचे कर्तव्यच आहे. गुरूसेवेसारखे पुण्य कशातही नाही. जो गुरुसेवेला कंटाळतो त्याची विद्या असून नसून सारखीच, त्याला अज्ञानीच म्हणायचे. त्याचा जप, त्याचे तप, तीर्थयात्रा यांचा काहीही उपयोग नाही. त्याने ध्यान करणे म्हणजे श्रम करणे होय. गुरुंचे नाव सांगायलासुद्धा कोणीकोणी लाजतात. व्यर्थ त्यांचे जिणे ! तुझ्या सहज बोलण्यातून आम्ही सेवेची संधी घेतली. माते ! मी सर्व लाकडे कोरडी करून देतो ! म्हणजे आश्रमांतील सर्वांना अन्न शिजवून मिळेल.

असे म्हणून कृष्णाने मायाशक्तीने लाकडे कोरडी केली. इतकेच नव्हे तर आश्रमात सर्व प्रकारचे वैभव निर्माण केले, सर्व सुखसोयी निर्माण केल्या.

विद्या पूर्ण झाली. कृष्ण बलराम व सुदामा गुरुपाशी बसले होते. गुरुदक्षिणा द्यायची होती. कृष्णाने आश्रमात आधीच वैभव आणले होते. आता तो गुरूदक्षिणा देतो असे म्हणत होता. "गुरूजी, आपण आमच्याकडून विद्या पूर्ण करून घेतलीत. आता आम्ही मथुरेला जाऊं. सुदामा माझा मित्र आहे. तोही आता घरी जाईल. तो पुन्हा मला केव्हा भेटेल ? आपणाला मी केव्हा भेटेन ? आम्ही गुरुदक्षिणा काय देऊं ? 'कृष्णा ! मला काहीच नको. तुझ्यापेक्षा जगात अन्य काय आहे की जे मी मागू ?' सांदीपनी म्हणाले- "तुला, धन दे, संपत्ती दे, वगैरे सांगणे म्हणजे दुर्दैव होय." गुरुपत्‍नी म्हणाली- "कृष्णा, आमचा एक मुलगा होता. तो अल्पायुषी ठरला. सागरतीरावर तो गेला असता त्याला बुडून मृत्यू आला. आम्ही त्यामुळे दुःखी आहोत, निपुत्रिकच आहोत. तो पुत्र तू आम्हाला आणून देशील का ? "

कृष्ण म्हणाला- "गुरुवर्य, कृपा करून आपण मजबरोबर समुद्रतीरी चलावे."

ते दोघे समुद्राजवळ गेले. कृष्णाला पाहतांच समुद्राने देवतारूप घेतले व तो सामोरा आला, कृष्णाला नमन करून म्हणाला- "स्वामी ! आपण येथे कोणत्या प्रयोजनाने आला आहात ? मी आपली कोणती कोणती करूं ?"

कृष्णाने विचारले- "सागरा ! हे माझे गुरू सांदीपनी. यांचा पुत्र तुझ्या जलरूपांत मरण पावला. तो कोठे आहे ? " सागर म्हणाला- 'मत्स्यराज तिमिंगल याला मी बोलावतो. त्यालाच हे माहीत आहे.' सागराने बोलावले तेव्हा तो मत्स्यराज आला. त्याने सांगितले- "पंचजन नांवाचा जो दैत्य आहे त्याने तो गुरुपुत्र गिळला आहे हे मला माहीत आहे."

कृष्णाने पंचजन दैत्याचा शोध घेतला. तो सापडताच त्याला आव्हान दिले. त्याच्याशी लढाई करून त्याचे पोट चिरले. पण गुरूपुत्र त्यात नव्हता. पंचजन मरणासन्न झाला होता ! गुरुपुत्र तर सापडला नाही आणि त्याचा मात्र व्यर्थ प्राणान्त ! तो कळवळून म्हणाला- "देवा ! तुमच्या हातून माझा मृत्यू व्यर्थच होत आहे. माझ्या या देहाचे सार्थक करा ! आपण माझे हे मध्यभागी चिरलेले शरीर शंखरूपाने आपल्या हाती धारण करावे. माझ्या या देहरूपी पात्रांतील जलाने तुमची पूजा केली तरच ती सफल व्हावी असे वरदान मला द्यावे."

कृष्णाला हे योग्य वाटले. त्या दैत्याला मुक्ती देऊन त्याने शंखरूपाने त्याचे शरीर हातात घेतले. मग तो यमाकडे गेला. कृष्णाला यमाने गुरूपुत्राचा सूक्ष्म देहासह जीवात्मा आणून दिला. मग कृष्णाने गुरुपुत्राला सुंदर देह दिला. भूलोकी समुद्रतीरावर त्याला आणले, सांदीपनींना पुत्रभेट घडविली !

सांदीपनी, कृष्ण व गुरूपुत्र आश्रमात आले. गुरूपत्‍नीनें धावत येऊन मुलाला उचलून घेतले ! तिचा आनंद गगनात मावेना ! आश्रमात सर्वत्र आनंदी आनंद झाला !

नंतर सुदाम्याने गुरूंचा निरोप घेतला. कृष्ण व बलरामही गुरूंचा आशीर्वाद घेऊन मथुरेस परत आले !

पंचजनाच्या शरीराचे शंखरूप म्हणजेच कृष्णाचा पांचजन्य शंख आणि शंखोदकाने विष्णूला सार्थ व सफल ठरते ती त्याला दिलेल्या वरदानामुळेच !

गुरुभक्ती, गुरुसेवा, आणि कृष्णाचा पराक्रम यांनी दिव्य झालेला हा अध्याय फार बोधप्रद आहे ! त्याच्या वाचनाने व श्रवणाने दुरिते दूर होवोत.
अध्याय २० समाप्त.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


GO TOP