॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीहरिविजय ॥

॥ अध्याय एकविसावा ॥

गोकुळवासी जनांचे उद्धवकृत सांत्वन -


श्रीगणेशाय नमः ॥
जय जय पुराणपुरुषा दिगंबरा । अवयवरहिता निर्विकारा ।
मायातीता अगोचरा । वेदसारा श्रीवल्लभा ॥१॥
तूचि जगदानंदमूळकंद । उपाधिरहित अभेद ।
सच्चिदानंदनामे शब्द । हाही राहे आलीकडे ॥२॥
जैसा पुष्करी सतेज मित्र । तेथे नीलिमा न साहे अणुमात्र ।
तैसे ज्ञान राहिलें साचार । तुझा निर्धार करूं जातां ॥३॥
जैसा वसुधामरांच्या देव्हारा । प्रवेश नव्हे अतिशुद्रा ।
तैसा तर्क होय माघारा । मार्ग पुढें न सुचेचि ॥४॥
मृगेंद्र देखितांचि जाण । जैसा देह ठेवी वारण ।
तैसा अहंकृति जाय विरोन । ब्रह्मानंदसागरीं ॥५॥
चंडांशापुढें खद्योत जाण । तेवीं बुद्धीचें शहाणपण ।
अंबुनिधीमाजी जैसे लवण । तैसे मन होऊनि जाय ॥६॥
अस्ति-भाति-प्रियरूप नाम । त्रिपुटीविरहित निष्काम ।
त्रिविधभेदातीत पूर्णब्रह्म । हेंही म्हणणे न साहे ॥७॥
अकळ न कळती याच्या मावा । हालविता न ये जिव्हा ।
ध्येय ध्याता ध्यान तेव्हां । सर्वथाही उरेना ॥८॥
ऐसा निर्विकार चित्समुद्र । यदुकुलभूषण यादवेंद्र ।
गुरुगृहीं राहोनि समग्र । विद्याभ्यास केला हो ॥९॥
विसावे अध्यायीं सुरस । कथा हे जाहली विशेष ।
यावरी मथुरेंत जगन्निवास । काय करिता जाहला ॥१०॥
मथुरेंत असता ऋषीकेशी । गोकुळी नंद यशोदा व्रजवासी ।
कृष्णप्राप्तीलागीं दिवस-निशीं । उतावेळ मानसीं ते ॥११॥
गोकुळींच्या नितंबिनी । श्रीकृष्णलीला आठवूनी ।
सद्गदित होताती मनीं । अश्रु नयनीं वाहताती ।१२॥
वाटती दशदिशा उदास । वसतें गोकुळ वाटे ओस ।
लीलावतारी पुराणपुरुष । लागला निजध्यास तयाचा ॥१३॥
नावडति सर्व विलासभोग । भोग तितुके वाटती रोग । अंतरीं भरलासे श्रीरंग । भक्तभवभंग दयाळू ॥१४॥
चंदन अंगीं चर्चितां देखा । वाटती जैशा शिखीच्या शिखा ।
सुमनहार ते देखा । उरगांसमान भासती ॥१५॥
गगनीं उगवतां रोहिणीवर । म्हणती यामिनींत का उगवला मित्र ।
अंतरीं ठसावतां पंकजनेत्र । विव्हळ होय मानस ॥१६॥
गोपी करूं बैसती भोजन । ग्रासोग्रासीं आठवे कृष्ण ।
करूं जातां उदकपान । जगन्मोहन आठवे ॥१७॥
एवं गोकुळींचे जन । हरिचरणीं ठेवूनि मन ।
करिती सत्कर्माचरण । निराभिमान सर्वदा ॥१८॥
कृष्णप्राप्तीविण करिती कर्म । तरी तोचि तयांसी पडला भ्रम ।
आम्ही कर्मकर्ते हा परम । अभिमान वाहती ॥१९॥
मृत्तिका उदक नासूनी । आम्ही जाणतें ऐसे मिरविती जनीं ।
परि दुरावला चक्रपाणी । जवळी असोनि अप्राप्त ॥२०॥
काष्ठामाजी जैसा अग्न । असोनि नव्हे प्रकाशमान ।
तैसा श्रीरंग हृदयी परिपूर्ण । असोनि जन भुलले ॥२१॥
कृष्णप्राप्तीविण दान केलें । जैसें बीज उकिरडां ओतिलें ।
ते व्यर्थ कुजोनि गेलें । मुक्त टाकिलें अग्नींत जैसें ॥२२॥
हरिप्राप्तीविण पठन । वृथा श्रम काय करून ।
सिकतेचा घाणा गाळून । व्यर्थ जैसी करकर ॥२३॥
हरिप्राप्तीविण गायनकळा दावीत । जैसा गोवारी आरडे अरण्यांत ।
हरिप्राप्तीवीण प्रवृत्तिक ग्रंथ । काय कविता अलवण ते ॥२४॥
कृष्णप्राप्तीविण यज्ञ । व्यर्थ काय डोळे धुम्रें भरून ।
हरिप्राप्तीविण अनुष्ठान । जैसें सोंग नटाचें ॥२५॥
भगवत्प्राप्ती कदा नाहीं । एकांती गुहा सेविली पाहीं ।
जैसा मूषक निघाला वई । व्यर्थ काय एकांत ॥२६॥
हरिप्राप्तीविण जटा । व्यर्थ भार वाहे करंटा ।
एवं सर्व व्यर्थ त्याच्या चेष्टा । हृदयी वैकुंठ न धरितां ॥२७॥
असा हृदयी धरूनि हृषीकेश । गोपी मथुरेसी विकूं जातां गोरस ।
चित्ती आठवूनि रमाविलास । परमपुरुष जगद्वंद्य ॥२८॥
मथुरेच्या चोहटां बैसती । अंतरी आठवूनि यदुपती ।
दधि दुग्ध घ्या म्हणों विसरती । मुखासि येती हरिनामें ॥२९॥
दुग्ध घ्या म्हणावें जों या बोला । तो पूर्वी शक्रें दुग्धाभिषेक केला ।
तैसाचि हृदयी आठवतां सांवळा । गोविंद सकळां घ्या हो म्हणती ॥३०॥
दधि घ्या म्हणावें जों आतां । दामोदर आठवे चित्ता ।
जो दह्यानिमित्त तत्त्वतां । मायेने उखळी बांधिला ॥३१॥
दांवे बांधिले उदरीं जया । म्हणोनि दामोदर नाम तया ।
तें ध्यान गोपी आठवूनियां । दामोदर घ्या हो म्हणती ॥३२॥
तों मथुरेच्या गोरटी । ज्यांची केवळ प्रपंचदृष्टी ।
म्हणती कोठे गे जगजेठी । कायशा गोष्टी बोलतां ॥३३॥
जेणें मीनरूप धरोनी । अवघा समुद्र उडविला गगनीं ।
तो वेदोद्धारक चक्रपाणी । मडक्यांत कैसा सांठविला ॥३४॥
मंदरोद्धारक जगजेठी । जेणें पृष्ठीवरी धरिली सृष्टी ।
ज्यासी ध्याय भार्गव परमेष्ठी । तो मडक्यांत कैसा सांठविला ॥३५॥
जेणे हिरण्याक्ष मर्दूनी । दाढेवरी धरिली अवनी ।
जो क्षीराब्धिवासी मोक्षदानी । तो मडक्यांत कैसा सांठविला ॥३६॥
जो प्रल्हादरक्षक नरहरी । ज्याचा क्रोध न माये अंबरीं ।
हिरण्यकश्यपमर्दन मुरारी । तो मडक्यांत कैसा सांठविला ॥३७॥
जेणें दो पायांमाजी सकळ । आटिल स्वर्ग मृत्यु पाताळ ।
जो बळीदर्पहरण घननीळ । तो मडक्यांत कैसा सांठविला ॥३८॥
त्रिसप्तकें मुळींहूनी । निर्वैर केली जेणें अवनी ।
परमप्रतापवासरमणी । तो मडक्यांत कैसा सांठविला ॥३९॥
जो कमलिनीमित्रकुलभूषण । जो दुष्टपिशिताशनमर्दन ।
जो रावणांतक रघुनंदन । तो मडक्यांत कैसा सांठविला ॥४०॥
तोचि गोकुळीं अवतरला । गोवर्धन नखाग्रीं धरिला ।
अघासुर जेणें उभा चिरिला । तो मडक्यांत कैसा सांठविला ॥४१॥
तों गोकुळींच्या गोपी समाधिस्थ । त्यांसी कृष्णमय जग दिसत ।
कृष्णमय ब्रह्मांड भासत । नाहीं हेत दूसरा ॥४२॥
ऐशा गोपी व्रजवासिनी । बोलती तेव्हा गजगामिनी ।
म्हणती सर्व मडक्यांत चक्रपाणी । परिपूर्ण भरला असे ॥४३॥
सर्वा घटीं बिंबोनि तरणी । अलिप्त जैसा वेगळा गगनीं ।
तैसा सर्वव्यापक मोक्षदानी । बरवें मनीं विचारा ॥४४॥
तुमच्या शरीरघटीं पहा पुरतें । कारणें वर्तती कोणाच्या सत्तें ।
मिरवितां स्त्री-पुरुषनामातें । आणा पुरतें मनासी ॥४५॥
एक सुवर्ण नाना अलंकार । एक सागर तरंग अपार ।
बहुत मंदिरें एक अंबर । तैसा यदुवीर सर्वघटीं ॥४६॥
जें जें भक्त बोलती । तें तें यथार्थ करी श्रीपती ।
सकळ गोपींच्या घटांप्रती । दिसती मूर्ति हरीच्या ॥४७॥
घटाप्रति एकेक सुंदर । श्रीमूर्ति दिसे सुकुमार ।
गोपी तटस्थ पाहती सादर । विवेकदृष्टी करूनियां ॥४८॥
म्हणती नवल केलें यादवेंद्रें । सर्व घटीं व्यापिलें हें तों खरें ।
व्रजवासिनी बोलिल्या उत्तरें । असत्य नव्हती सर्वथा ॥४९॥
भक्तवचना पडतां व्यंग । तेथें आंगे वोडवे श्रीरंग ।
जो क्षीराब्धिहृदयरत्‍नरंग । जो अभंग सर्वदा ॥५०॥
वाल्मीके जें जें भाष्य केलें । तें तें राघवे वर्तोनि दाविलें ।
भक्त जें जें वचन बोलिले । खाली न पडे सर्वथा ॥५१॥
पाकशासनशत्रूनें नागपाशीं । बांधिले श्रीरामसौमित्रांसी ।
भक्तभाष्य सत्य करावयासी । बांधोनि घेतले रघुवीरें ॥५२॥
जो क्षणें ब्रह्मांड रची ढांसळी । तो श्रीराम पडला शरजाळीं ।
जो भक्तांचिया वचनासी पाळी । सर्गस्थित्यंतकाळीं अक्षय ॥५३॥
गोपी बोलिल्या जें वचन । तें साच करीत जगज्जीवन ।
असो गोपी गोरस विकून । गेल्या तेव्हां गोकुळा ॥५४॥
श्रीकृष्णलीला मुखीं गात । गोपी करिती प्रपंचकृत्य ।
आणिक नावडे दुजा हेत । जाहले चित्त कृष्णरूप ॥५५॥
एक घुसळीतां सुंदर । हाती धरिला रवीदोर ।
वृत्ति जाहली कृष्णाकार । दिवस-निशी नाठवे ॥५६॥
हरिरूपीं तन्मय अबला । वृत्ति विरोनि गेल्या सकळा ।
जैसा लवणाचा पुतळा । समुद्रामाजी समरसे ॥५७॥
घुसळिता चळती हस्त । परी त्या आपण समाधिस्थ ।
पंचप्राणाधारें शरीर वर्तत । सत्कर्माचरण करिताती ॥५८॥
जो सुखासनीं जाय बैसोन । त्याचें कदा न चळे आसन ।
परी करी सकळ पर्यटन । भक्त सुजाण तैसेचि ॥५९॥
एवं गोपिका दळितां कांडितां । येतां जातां दुग्ध तापवितां ।
घुसळितां उदक आणितां । कृष्णनाथ न विसरती ॥६०॥
नंद आणि यशोदा । हृदयीं आठविती श्रीमुकुंदा ।
त्याच्या लीला आठवूनि सर्वदा । झुरती भेटीकारणें ॥६१॥
यशोदा करिता मंथन । बाळलीला आठवी संपूर्ण ।
म्हणे हे कृष्ण मधुसूदन । गेलासी टाकूनि आम्हांतें ॥६२॥
हे पूतनाप्राणशोषणा । हे तृणावर्तासुरच्छेदना ।
हे मुरारे शकटभंजना । गेलासी टाकूनि आम्हांतें ॥६३॥
हे गोपीमानसराजाहंसा । हे कालियामर्दना पुराणपुरुषा ।
हे गोवर्धनोद्धारणा हृषीकेशा । गेला टाकूनि आम्हांतें ॥६४॥
हे कृष्णा कमळपत्राक्षा । हे मधुकैटभारे सर्वसाक्षा ।
हे केशिप्राणांतका गोपवेषा । गेलासी टाकूनि आम्हांतें ॥६५॥
माझे सांवळे डोळसे सुकुमारे । कृष्णाबाई श्यामसुंदरे ।
उदारबदन मुरलीधरे । गेलीस टाकूनि आम्हांतें ॥६६॥
ऐसे आठवूनि हरिगुण । यशोदादेवी करी मंथन ।
नयनीं वाहे अश्रुजीवन । प्रेमेंकरूनि सद्गदित ॥६७॥
ऐसा वृत्तांत गोकुळींचा । जाणोनियां सखा प्रेमळांचा ।
जो का नृप वैकुंठपुरीचा । काय करिता जाहला ॥६८॥
जो सकळदेवाधिदेव । भक्तवल्लभ करुणार्णव ।
तेणे जवळीं बोलाविला उद्धव । गुजगोष्टी सांगावया ॥६९॥
तद्धव परम चतुर ज्ञाता । सात्त्विक प्रेमळ उदार तत्त्वतां ।
त्याहीवरी हरीचा आवडता । प्राणाहूनि पलीकडे ॥७०॥
हरि म्हणे उद्धवा एक ऐकावें । आपण गोकुळाप्रति जावें ।
गोपिकांप्रति बोधावे । निर्वाणज्ञान अगम्य जें ॥७१॥
माझा नंद पिता यशोदा जननी । दोघे कंठीं प्राण ठेवूनी ।
वाट पाहती दिन-रजनीं । चकोरचंद्रन्यायेसीं ॥७२॥
परम गोपिका प्रियकरा । सद्‌भाविका सगुणा उदारा ।
वाट पाहात असतील सुकुमारा । चातक-जलदन्यायेंसीं ॥७३॥
माझे गोकुळींचे गडी । ज्यांचीं निरसिलीं सांकडीं ।
माझी त्यांवरी बहुत आवडी । धेनुवत्सन्यायेसी ॥७४॥
त्यांसी मी सांडोनि आलो सकळिकां । मागें दुःखी जाहल्या गोपिका ।
जैसें कृपणाचे धन जाय देखा । त्यांच्या दुःखा पार नाहीं ॥७५॥
जा म्हणतां माघार्‍या न सरती । अक्रूरासी येती काकुळती ।
त्यापुढें पदर पसरिती । एक पडती मूर्च्छागत ॥७६॥
म्हणती कां नेतोसी आमुचा प्राण । घालिती रथापुढें लोटांगण ।
एक म्हणती अक्रूर नामाभिधान । कोणें तुज ठेविलें ॥७७॥
तुझें नाम परम क्रूर । निर्दया नेऊं नको यदुवीर ।
गोकुळींच्या हत्या समग्र । तुजवरी पडतील पैं ॥७८॥
ऐसें गोपिकांचें वर्णिता प्रेम । सद्गद जाहला मेघश्याम ।
जो भक्तकामकल्पद्रुम । आत्माराम श्रीकृष्ण ॥७९॥
सांगतां गोपिकांची प्रीती । नेत्रीं अश्रुधारा स्रवती ।
उद्धवाच्या कंठी श्रीपति । मिठी घालोनि स्फुंदत ॥८०॥
उद्धवा तूं आतां वेगें जायें । त्यांची दृढभक्ति कैसी ते पाहें ।
जे धरिती सदा माझी सोये । मी स्वप्नींही न विसंबे तयांसी ॥८१॥
जे मज न विसरती सर्वथा । मी अखंड भोवें त्यांभोवता ।
मत्स्य-कूर्मादि अवतार तत्त्वतां । घेतले भक्तांकारणें ॥८२॥
उद्धवा त्यांची भक्ति पडली सगुणीं । वियोगे प्राण त्यागिती कामिनी ।
त्यांसी संपूर्ण ज्ञान उपदेशूनी । ब्रह्मवादिनी कराव्या ॥८३॥
अध्यात्मविद्या दुर्लभ पूर्ण । उद्धवा तारी त्यांसी सांगोन ।
संतांवेगळें निर्वाणज्ञान । कोण उपदेशील दूसरें ॥८४॥
ऐसे बोलोनि रमानाथ । उद्धवाच्या मस्तकीं ठेविला हात ।
जेणें पूर्वी देवगुरूपाशीं बहुत । विद्याभ्यास केला पैं ॥८५॥
आधींच बोलका विचक्षण । वरी वाचस्पतीपाशीं अध्ययन ।
विशेष कृष्णकृपा परिपूर्ण । परम सज्ञान उद्धव ॥८६॥
हरिचरणीं माथा ठेवूनी । उद्धव निघाला तेचि क्षणीं ।
दिव्य रथीं आरूढोनी । गोकुळपंथें चालिला ॥८७॥
पहिल्याचि प्रेमळा गोकुळींच्या गोरटी । विशेष उद्धव चालिला त्यांच्या भेटी ।
आधींच वाराणसी नगरी गोमटी । त्यावरी जान्हवी आली तेथें ॥८८॥
सुदैवासी सांपडे परिस । पुण्यवंता जोडे निर्दोष यश ।
दिव्य अंजन पायाळास । अकस्मात लाघे जेवीं ॥८९॥
आधींच वन शोभिवंत । त्याहीवरी आला वसंत ।
पहिलेचि चतुर पंडित । प्रेमळ भक्त त्याहीवरी ॥९०॥
आधींच कौस्तुभ तेजागळा । वरी विष्णूच्या वक्षःस्थळीं मिरवला ।
आधींच उदार दाता भला । त्याहीवरी सांपडला धनकूप ॥९१॥
तैसा ओढवेल आतां रस । उद्धव आवडता श्रीकृष्णास ।
विशेष बोधूं चालिला गोपीकांस । तो सुरस रस अवधारा ॥९२॥
असो वातवेगें रथ चालिला । उद्धव गोकुळासमीप आला ।
तो गाई परतल्या गोकुळा । गोरजें झांकिला रथ तेथें ॥९३॥
गोरजस्नान पुण्यागळें । रथासमवेत उद्धवें केलें ।
गोभार चहूंकडे दाटले । उद्धवे थोपिलें रथातें ॥९४॥
जे जे कृष्णें लाविली रीती । तैसेचि नित्य गोपाळ वर्तती ।
वेदाज्ञेप्रमाणें चालती । विद्वज्जन जैसे कां ॥९५॥
पुढे गाईंचे भार चालती । मागें गोप हरिलीला गाती ।
एक कृष्णवेष घेऊनि हातीं । मुरली धरुनि उभा असे ॥९६॥
घुमर्‍या पांवे टाळ मृदंग । मधुर गायन राग उपराग ।
हरिपदी धरूनि अनुराग । लीला गाती हरीची ॥९७॥
कृष्णवेष जेणें धरिला । केवळ कृष्णचि ऐसा भासला ।
भोंवता गोपाळांचा मेळा । चामरें वरी ढाळीत ॥९८॥
मुख दिसे त्याचें सांवळें । गोचरणरज त्यावरी बैसले ।
पांडुरवर्ण मुख शोभलें । ते वर्णिलें नच जाय ॥९९॥
श्रीधर म्हणे मज येथें दृष्टांत । स्फुरला तो ऐका प्रेमळ भक्त ।
भीमातटविहारी पंढरीनाथ । बुका उधळत त्यावरी ॥१००॥
उदार मुख चांगलें । त्याहीवरी शुभ्रवर्ण मिरवलें ।
जैसे इंद्रनीळासी घातलें । काश्मीराचें सतेज कवच ॥१॥
असो उद्धवें देखोनि तो महोत्साह । अंगीं दाटले अष्टभाव ।
म्हणे धन्य धन्य या जनांचें दैव । अद्‌भुत पुण्य आचरलें ॥२॥
धन्य वृंदावनींचे तृण-पाषाण । लागले जेथे कृष्णचरण ।
जन्मसार्थक परिपूर्ण । केलें याचि लोकांनी ॥३॥
गोकुळांत प्रवेशला रथ । राजबिदीनें सत्वर जात ।
घरोघरीं कृष्णलीला गात । श्रवणीं ऐकत उद्धव ॥४॥
गाई वाड्यांत प्रवेशतीं वेगेंसी । जे जे गाईसवें जैसी ।
गोपीका रीती दाविती तैसी । उद्धव जातां लक्षीतसे ॥५॥
श्रीकृष्णलीला कानीं ऐकतां । गाईंसी पान्हा फुटे तत्त्वतां ।
कृष्णध्यानगीत गातां । ऐकतां गाई हुंबरती ॥६॥
यालागीं हातीं भरणा घेऊनी । हरिलीला गाय एक कामिनी ।
म्हणे वैकुंठपति चक्रपाणी । नंदसदनीं अवतरसी तूं ॥७॥
हे रमापते निजकुळभूषणा । हे राधावल्लभा गोवर्धनोद्धारणा ।
हे मुरलीधरा पूतनाप्राणहरणा । दुर्जनभंजना केशवा ॥८॥
ऐशा घरोघरीं गोपी गाती गीत । मग गाईंसी पान्हा फुटत ।
तें तें उद्धव विलोकीत । प्रेमभरित जाहला ॥९॥
ऐकिल्याविण मुरलीस्वर । एक गाई काढूं नेई धार ।
असो उद्धव नंदद्वार । एकाएकीं पावला ॥११०॥
नंदें उद्धव देखिला । परमहर्षें पुढें धाविन्नला ।
क्षेमालिंगन ते वेळां । प्रेमभरें दिधलें ॥११॥
रथ सोडिला बाहेर । नंदें उद्धवाचा धरिला कर ।
प्रवेशोनि निजमंदिर । उत्तमासनीं बैसविला ॥१२॥
उद्धवाची पूजा करून । मग नंद पुसे वर्तमान ।
म्हणे सखी कीं मनमोहन । बोलतां नयनीं जल भरे ॥१३॥
उद्धवा कृष्ण आतां न ये येथें । उपेक्षूनि गेला आम्हांतें ।
सर्पमुखींहूनि मातें । कृष्णनाथें सोडविलें ॥१४॥
पूतना तृणावर्त अघासुर । कालिया मर्दूनि प्राशिला वैश्वानर ।
गोवर्धन उचलूनि थोर । पराक्रम दावियेला ॥१५॥
सद्गद होवोनि नंद सांगत । तों यशोदाही आली तेथ ।
मथुरेचा हरिप्रताप समस्त । उद्धव सांगे तयांसी ॥१६॥
गेलिया दिवसापासूनि आघवे । जे जे पुरुषार्थ केले माधवें ।
ते ते सक्ळ वर्णिलें उद्धवें । ऐकतां दोघें तटस्थ ॥१७॥
माया म्हणे काय करूं विचार । हरीविण शून्य दिसे मंदिर ।
उद्धवा या स्थळीं श्यामसुंदर । जन्मला साचार जाण पां ॥१८॥
या पालखीं हरि निजविला । येचि न्हाणिये म्यां न्हाणिला ।
याचि मंचकावरी पहुडला । मजपुढें उद्धवा तो ॥१९॥
याचि डोल्हारां घडीघडी बैसे । पहा शिरींची मयूरपिच्छें ।
वनमाळांचे भार ज्या सुवासें । मंदिर अवघें दुमदुमित ॥१२०॥
कृष्णाची घोंगडी पांवा काठी । हेचि गुंजांचे हार झळकत होते कंठीं ।
कृष्णाचीं बाळलेणीं गोमटीं । माया दावीत उद्धवातें ॥२१॥
पदक वाघनखे बिंदलीं । काढूनि उद्धवासी दाविलीं ।
मग करुणास्वरें हांक फोडिली । म्हणे वनमाळी कधीं येसी ॥२२॥
गोविंदा कृष्णा यादवा । जगन्मोहना हरि माधवा ।
तुजविण आम्ही करुणार्णवा । काय येथें करावें ॥२३॥
माझिया श्रीरंगा डोळसा । सुकुमारा सांवळ्या पाडसा ।
गेलासी टाकूनि राजसा । पुराणपुरुषा श्रीहरे ॥२४॥
तुज म्यां बांधिले उखळीं । म्हणोनि रुसलासी वनमाळी ।
तुजहातीं गुरें राखविलीं । नेणोनियां सर्वेशा ॥२५॥
तुज पायांवरी न्हाणिलें । मृत्तिका भक्षितां ताडिलें ।
माझे हात हे जळाले । कैसी भ्रांत झाल्यें मी ॥२६॥
तुझें स्वरूप नेणो हृषीकेशी । म्हणोनियां रुसलासी ।
तू क्षीरसागरविलासी । दाटविती गोपी तूतें ॥२७॥
तुझ्या पोटीं जन्मला परमेष्ठी । हृदयीं ध्याय धूर्जटी ।
तू सर्वांवरिष्ठ जगजेठी । झिडकारिती गोपी तूतें ॥२८॥
उद्धवा नलगे घरदार आतां । मी कोठे जाऊ सांग तत्त्वतां ।
उद्धव या गोष्टी ऐकतां । हृदयीं जाहला सद्गद ॥२९॥
उद्धव म्हणे धन्य तुमचा भाग । तुमच्या मंदिरीं क्रीडला रमाधव ।
नाना विलास कौतुकलाघव । दाविले सर्व तुम्हांतें ॥१३०॥
जे गजास्यजनकाचें हृदयरत्‍न । जें पद्मोद्‌भवाचे देवतार्चन ।
जें नारदादिकांचे गायन पूर्ण । सनकादिकांची ध्येय मूर्ति ॥३१॥
जे मूळप्रकृतीचें निजमूळ । जें निगमवृक्षाचें सुपक्व फळ ।
तो ब्रह्मानंद वैकुंठपाळ । तुमचे घरीं क्रीडला ॥३२॥
ऐसें बोलतां सरली यामिनी । घरोघरीं जाग्या जाहल्या कामिनी ।
उद्धव प्रातःस्नानासी ते क्षणी । जाता जाहला यमुनेसी ॥३३॥
तों घरोघरीं हरिस्मरण होत । दीप लाविले लखलखीत ।
सडासंमार्जन करूनि प्रशस्त । वास्तुपूजा करिताती ॥३४॥
मुखीं गात हरीच्या लीला । गोपी घालिती रंगमाला ।
अंग प्रक्षाळूनि अबला । कनकांबरें नेसती ॥३५॥
दिव्य अलंकारांची प्रभा फांकली । आरक्त कुंकुम शोभे निढळीं ।
अंजन विराजे नेत्रकमळीं । मुक्तजाळी शिरीं शोभे ॥३६॥
जडित ताटंकें कर्णीं दिसती । घुसळितां सतेज तळपती ।
कर्णीं मुक्तघोस ढाळ देती । कृत्तिकापुंज जेवीं गगनी ॥३७॥
विद्युत्प्राय झळकती चुडे । मंदिरीं घुसळितां प्रभा पडे ।
कंठीं एकावळी डोलती कोडें । बाहुभूषणें शोभती ॥३८॥
माजी रत्‍नजडित कांची । प्रभा फाके मुद्रिकांची ।
पायीं नुपुरें पैंजणांची । ध्वनि उमटे चालतां ॥३९॥
देखतां त्यांचा वदन चंद्र । देवांगना लाजती समग्र ।
हंसगमना त्या परम चतुर । घरोघरीं घुसळिती ॥१४०॥
घरोघरीं डेरे घुमघुमती । नाना कृष्णलीला गोपी गाती ।
तें श्रवण करीत यमुनेप्रती । उद्धव भक्त जातसे ॥४१॥
तमारिकन्येचें तीर । उद्धव विलोकी समग्र ।
म्हणे हे धन्य पाषाण तरुवर । कृष्णदृष्टी उद्धरले ॥४२॥
तों वासरमणिचक्र प्रकटलें । मंथन गोपिकांचे संपले ।
यमुनाजीवनालागीं ते वेळे । घट घेवोनि चालिल्या ॥४३॥
नंदद्वारावरूनि गोपी जात । तों तेथें देखिला दिव्य रथ ।
म्हणती कोणाचा स्यंदन येथ । कोण आला न कळेचि ॥४४॥
म्हणती निर्दय तो अक्रूर । जेणें नेला जगदुद्धार ।
आतां कोण आला तो समाचार । नेणवेचि साजणी ॥४५॥
ऐशा गोपी तेव्हां बोलती । कृतांतभगिनीप्रति जाती ।
तों येतां देखिली दिव्य मूर्ती । उद्धवाची तेधवां ॥४६॥
मित्रकन्यातीरीं स्नान केलें । शुद्ध द्वादश टिळे रेखिले ।
नेसला वसन पिवळें । उत्तरीय वस्त्र रुळे दिव्य ॥४७॥
कृष्णाचसारिखे कृष्णभक्त । अलंकार तैसेचि शोभत ।
गोपिका निरखूनि पाहत । तों तेथें उद्धव ओळखिला ॥४८॥
जैसा विद्युल्लतेचा भार । तैसा अलंकारमंडित समग्र ।
गजगामिनी मिळाल्या अपार । उद्धवाभोंवत्या ते वेळां ॥४९॥
अत्रिपुत्रवेष्टित तारागणें । की मित्रवेष्टित जेवीं किरणें ।
उद्धव वेष्टिला प्रकारें तेणें । सर्व कामिनी मिळोनियां ॥१५०॥
मस्तकीं उदकें पूर्ण घागरी । कोणी रित्याचि घेतल्या शिरीं ।
देहभाव विसरोनि नारी । कृष्णउपासक वेष्टिला ॥५१॥
उद्धवाचे चरण धरोनि भावें । म्हणती पाठविलासी श्रीमाधवें ।
गोकुळ टाकोनि मथुरेसी रहावें । बरवें केशवें हें केलें ॥५२॥
माता-पितयांचा वृत्तांत । घ्यावया तुज पाठविलें येथ ।
येर्‍हवी आणिक त्याचा आप्त । येथें कोणी दिसेना ॥५३॥
तो तेथें एक भ्रमर । अकस्मात सुंदर ।
रुंजी घालीत क्षणमात्र । गोपिकांनीं देखिला ॥५४॥
अन्योक्तीनें गोपी बोलत । कृष्णापासूनि आलासि त्वरित ।
तूंही कृष्णवर्ण दिसतोसी सत्य । पाहसी चित्त गोपिकांचें ॥५५॥
कळलासी तूं कृष्णाचा हेर । पाळती घेतोसी समग्र ।
तू शठाचा मित्र शठ साचार । कासया येथे रुणझुणसी ॥५६॥
एका कमळावरी चित्त । न बैसे तुझें सावचित ।
दशदिशा हिंडसी व्यर्थ । चंचळ मन सदा तुझें ॥५७॥
तूं ज्यापासूनि आलासी पाहीं । त्याचें मन न बैसे एके ठायीं ।
भ्रमरा तूं मथुरेसी जाईं । सांग हरीसी जाऊनियां ॥५८॥
म्हणावें मथुरेच्या नारी । आतां भोगीं तूं पूतनारी ।
आम्हांहूनि कुब्जा सुंदरी । तुवां निवडिली डोळसा ॥५९॥
परम अपवित्र कुब्जा । तिशीं रतलासी विश्वबीजा ।
तुझ्यायोग्य जोडा अधोक्षजा । दासि सर्वथा नव्हेचि ॥१६०॥
सोनें आणि शेण साच । जोडा नव्हे कांच आणि पाच ।
तैसीं कुब्जा आणि परब्रह्म साच । जोडा नव्हे सर्वथा ॥६१॥
कीं हिरा आणि गार । की वायस आणि खगेंद्र ।
तैसीं कुब्जा आणि कमलनेत्र । जोडा नव्हे सर्वथा ॥६२॥
समुद्र आणि सौंदणी । की खद्योत आणि वासरमणी ।
तैसीं कुब्जा आणि चक्रपाणी । जोडा नव्हे सर्वथा ॥६३॥
कीं ओहळ आणि भागिरथी । कीं अजा आणि ऐरावती ।
तैसीं कुब्जा आणि जगत्पती । जोडा नव्हे सर्वथा ॥६४॥
कीं पेंड आणि कर्पूर । की हंस आणि घुबड अपवित्र ।
तैसीं कुब्जा आणि श्रीधर । जोडा नव्हे सर्वथा ॥६५॥
कीं कोळसा आणि कस्तूरी । कीं दरिद्री आणि विष्णूची अंतुरी ।
तैसीं कुब्जा आणि कंसारी । जोडा नव्हे सर्वथा ॥६६॥
संत आणि निंदक । पंडित आणि अजारक्षक ।
तैसीं कुब्जा आणि जगन्नायक । जोडा नव्हे सर्वथा ॥६७॥
कीं वेदांत आणि कोकशास्त्र । कीं रंक आणि सहस्रनेत्र ।
तैसीं कुब्जा आणि घनश्यामगात्र । जोडा नव्हे सर्वथा ॥६८॥
कीं अमृत आणि धुवण । कीं परीस आणि पाषाण ।
इतर खेडीं आनंदवन । जोडा नव्हे सर्वथा ॥६९॥
कीं भूत आणि कर्पूरगौर । कीं षंढ आणि प्रतापशूर ।
तैसीं कुब्जा आणि कमलावर । जोडा नव्हे सर्वथा ॥१७०॥
परमचतुर जगज्जीवन । भाळला कुब्जानारी देखोन ।
डोळे पिचके मुडे कान । मध्ये नासिक बैसलें ॥७१॥
कोळशाहुनि कुब्जा गौरी । उवा सदा बुजबुजती शिरीं ।
गुडघे घांसीत जाय चांचरी । तीस मुरारी भाळलासी ॥७२॥
रडत रडत सदा बोले । टांचा उलल्या खिरडत चाले ।
लंबस्तन अंग वाळलें । वस्त्र फाटलें चहूंकडे ॥७३॥
जैसा मृदंगमध्य देख । तैसा माज तिचा बारीक ।
मर्कटाऐसें तिचें मुख । तीस रमानायक भाळला ॥७४॥
हा तरी नंदाचा गुराखा । ते कंसाची दासी देखा ।
शोधूनि जोडा नेटका । बरा पाहिला विधीनें ॥७५॥
एक बोले बरवंटा । कुब्जा वृद्ध हरि धाकुटा ।
जो हरि वंद्य नीलकंठा । तिजशीं तो चेष्टा करीतसे ॥७६॥
एक म्हणे कुब्जेनें लाविला चंदन । त्यांत कांहीं घातलें मोहन ।
तरीच भुलला जगज्जीवन । कौटिल्य पूर्ण केलें तिनें ॥७७॥
गदगदां हांसती गोरटी । ब्रह्मा उद्‌भवला ज्याचे पोटी ।
तो कुब्जेसीं एकांतगोष्टी । करिताहे हें नवल पैं ॥७८॥
कीं तिने केला प्रेमाचा फांसा । त्यांत गोंविलें हृषीकेशा ।
तिचा भाव देखोनि परमपुरुषा । प्रीति बहुत वाढली ॥७९॥
एक म्हणती तिनें तप केलें बहुत । तरीच वश जाहला भगवंत ।
आम्ही हीनभाग्य यथार्थ । काय व्यर्थ गोष्टी ह्या ॥१८०॥
ऐसें बोलता गोपाळा । टपटपां आंसुवें आलीं डोळां ।
म्हणती रे भ्रमरा चंचळा । जाय गोवळ्या सांगावया ॥८१॥
म्हणावें गोपिका समस्त । हरि तुझ्या वियोगें पावल्या मृत्य ।
प्रेतें तरी येऊनि त्वरित । विलोकी तूं दयाळा ॥८२॥
सांग गोपिका जाळिल्या सकळिक । जाहली समस्तांची राख ।
त्या स्थळावरी येऊनि नावेक । मुरली वाजवीं एकदां ॥८३॥
एक म्हणती सांगावें वनमाळी । गोपींची रक्षा उदकीं टाकिली ।
तूं येऊनि त्या जळीं । स्नान करी भगवंता ॥८४॥
आम्हांसी जाळिलें ज्या स्थळावरी । तेथें क्षणभरी उभा राहें तरी ।
पांवा वाजवूनि मुरारी । पाववीं पदा आपुल्या ॥८५॥
ऐसी गोपिकांची भक्ति देखोनी । उद्धव सद्गद जाहला मनी ।
अश्रु पातले नयनीं । म्हणे धन्य कामिनी गोकुळींच्या ॥८६॥
धन्य यांची भक्ति साचार । वश केला कमलावर ।
तों भ्रमर गेला तेथूनि दूर । स्वइच्छेनें तेधवां ।८७॥
मग उद्धवासी गोपबाळा । सद्गद बोलती ते वेळां ।
श्रीरंग आम्हांसी कंटाळला । टाकूनि गेला मथुरेसी ॥८८॥
गोपिका आम्ही वज्राच्या कठिण । अजूनि आमुचे वांचले प्राण ।
आम्हांसी न ये कदा मरण । कृष्णवियोग होतांचि ॥८९॥
आम्हांसी काळ न मारीच देख । भोगवीत वियोगाचें दुःख ।
अंतरला वैकुंठनायक । किती कष्ट भोगावे ॥१९०॥
उद्धवा तूं जाय मथुरापुरा । आठव देई यादवेंद्रा ।
म्हणावें विसरूं नको गोपदारा । परम उदारा श्रीपति ॥९१॥
उद्धवा अक्रूर तो परम क्रूर । तूं तरी भेटवीं यादवेंद्र ।
निर्दोष यश जोडेल साचार । तुजलागी प्राणसखया ॥९२॥
उद्धवा गोकुळ आहे जों जीवंत । तोंवरी भेटवीं रमानाथ ।
नरदेह गेलिया भगवंत । कैचा मग आम्हांतें ॥९३॥
घेऊनि तुजदेखतां पाषाण । मस्तक फोडूनि देऊं प्राण ।
मग तूं श्रीहरीसी सांग जाऊन । पावल्या मरण गोपिका ॥९४॥
तूं जगद्वंद्याचा आवडता बहुत । यालागीं तुज सांगितला वृत्तांत ।
तुझ्या वचनें कृष्ण वर्तत । हे आम्हांसी पूर्ण कळलेंसे ॥९५॥
उदकाविण जैसा मीन । तळमळी जाऊं पाहे प्राण ।
तैसें यदुकुलटिलकाविण । आम्हांसी जाहलें जाण पां ॥९६॥
जैसें कृपणाचें धन गेलें । कीं जन्मांध अरण्यांत पडलें ।
अक्रूरें आमुचें राज्य बुडविलें । हरीसी नेलें मथुरेसी ॥९७॥
श्रीकृष्ण हाचि रोहिणीवर । तमोमय कुहू तोचि अक्रूर ।
आम्हां चकोरांसी निराहार । पाडिलें साचार उद्धवा ॥९८॥
आम्ही चातकें परम दीन । श्रीरंग वोळला कृपाघन ।
अक्रूर दुष्ट प्रभंजन । मेघश्याम दुरी नेला ॥९९॥
कृष्णवियोगाचा महापूर । त्यांत लोटुनि गेला अक्रूर ।
उद्धवा तूं चतुर पोहणार । काढीं बाहेर आम्हांते ॥२००॥
हरिवियोगवणवा सबळ । त्यांत जळतों आम्ही सकळ
उद्धवा तू जलद दयाळ । वर्षें आम्हांवरी पैं ॥१॥
आमुचे निधान हृषीकेशी । मध्यें अक्रूर आला विवशी ।
उद्धवा तूं पंचाक्षरी होसी । निधान घरासी आणीं तें ॥२॥
हरिवियोगरोग दारुण । तेणें सकळही जाहलों क्षीण ।
कृष्णकृपारसराज देऊन । अक्षय करी आम्हांतें ॥३॥
उद्धवा तूं जोशी सुजाण । कृष्णप्राप्तीचें देईं लग्न ।
पांचही पंचकें निरसोन । साधीं कारण हें आधी ॥४॥
तन-मन-धनेंसीं अनन्य । उद्धवा तुज आलों शरण ।
कृष्णप्राप्तीसी कारण । सद्‌गुरु तूं आम्हांतें ॥५॥
ऐसें बोलोनि कामिनी । लागल्या दृढ तयाच्या चरणीं ।
तें देखोनि उद्धवाच्या नयनीं । प्रेमांबुधारा लोटल्या ॥६॥
उद्धव म्हणे यांलागून । कैसें सांगूं ब्रह्मज्ञान ।
यांनी दृढ धरिली मूर्ति सगुण । ते कैसी उडवून टाकूं मी ॥७॥
सगुण उच्छेदितां देखा । आतांचि प्राण देतील गोपिका ।
मग म्हणे विरिंचीच्या जनका । बुद्धिदाता तूं होईं ॥८॥
उद्धवें नेत्र झांकून । मनीं आठविले कृष्णचरण ।
आतां गोपिकांसी दिव्य ज्ञान । उपदेशी तू श्रीरंगा ॥९॥
उद्धवें अष्टभाव सांवरोन । म्हणे ऐका वो तुम्ही सावधान ।
कृष्ण दाखवा सत्वर म्हणोन । कोण म्हणती तुम्हांमाजी ॥२१०॥
कोण इंद्रियांचा चालक । कोण आहे बुद्धीचा प्रेरक ।
अंतःकरणीं आठवा सकळिक । कोण धरवी विचारा ॥११॥
तुमच्या नेत्रां कोण दाखवी । पदीं गमनागमन कोण करवी ।
श्रवणीं गोष्टी ऐकावी । तोचि बरवा शोधावा ॥१२॥
पंचवीस तत्त्वांचा जाणता । तो कोण विचारा पुरता ।
जो स्थावर-जंगम जीव निर्मिता । व्यापूनि वेगळा कोण तो ॥१३॥
तुमचा देह स्त्रियांची आकृती । परी आंत कोण नांदे निश्चितीं ।
स्त्री पुरुष नपुंसक व्यक्ती । कोणती स्थिती विचारा ॥१४॥
बहुत घागरी रांजण । स्त्री पुरुष नामाभिधान ।
परी आंत बिंबला चंद्र पूर्ण । स्त्री पुरुष नव्हे ती ॥१५॥
जैसे एकाचि सकळ गुणीं । ओंविले नाना जातींचे मणी ।
परी सूत्र एक अभेदपणीं । चक्रपाणी तैसा असे ॥१६॥
ऐसें ज्ञान ऐकतां ते क्षणीं । गदगदा हांसल्या नितंबिनी ।
म्हणती हे सांगावयालागूनी । पाठविलें काय हरीनें ॥१७॥
काय करावें कोरडें ज्ञान । नसतेंचि दाविती आम्हांलागून ।
प्रत्यक्ष हातींचे देऊन । पळत्यापाठीं लागावें ॥१८॥
प्रत्यक्ष श्यामसुंदर टाकून । कोठें पाहूं निर्गुण ।
अचिंत्य अव्यक्त म्हणोन । सांगावया आलासी ॥१९॥
हातींचा परिस टाकोनियां । साधूं जावें धातुक्रिया ।
सगुणमूर्ति सांडूनियां । निर्गुण वायां कां कथिसी ॥२२०॥
उद्धव म्हणे ऐका साचार । एक कांचन नाना अलंकार ।
तैसा व्यापक एक यदुवीर । चराचर भरलासे ॥२१॥
तोचि संचला तुमचे हृदयीं । सर्व व्यापूनि जो सदा विदेही ।
त्याहूनि रिता ठावचि नाहीं । नसते प्रवाहीं पडों नका ॥२२॥
दिसती मायेचे विकार । तितुके स्वयेंचि निराकार ।
क्षणिक दिसे जळगार । तत्काळ नीर होय पैं ॥२३॥
गोपी म्हणती ते अवसरीं । हातीं घेवोनि सुरस मोहरी ।
नाचे रासमंडळामाझारी । तोचि हरी दावीं कां ॥२४॥
खोडी करितो वनमाळी । यालागी माया बांधी उखळीं ।
मंद मंद रडे नेत्र चोळी । ते मुर्ति सांवळी दावीं कां ॥२५॥
आमुच्या घरासी येत घडीघडी । करी नानापरींच्या खोडी ।
आमुची जडली नावडी । याच रूपी जाण पां ॥२६॥
उद्धव म्हणे ऐका एक । सर्वां घट-मठीं निराळ व्यापक ।
नाना उदकें परी एक अर्क । जगन्नायक तैसा असे ॥२७॥
सर्व मातृकांत एक ओंकार । तैसा सर्वव्यापी सर्वेश्वर ।
परी तुम्हांसी नकळे साचार । भ्रम थोर पडियेला ॥२८॥
गळां मोतीं असोनि निवाडें । लोकांचिया गळां पडे ।
तैसे तुम्हांसी पडिलें सांकडें । जवळी हरि असोनियां ॥२९॥
गोपी म्हणती ऐका गोष्टी । पीतवसनावरी कांस गोमती ।
वनमाळा रुळती कंठीं । आपादपर्यंत साजिर्‍या ॥२३०॥
उदार श्रीमुख सांवळें । आकर्ण विकासलीं नेत्रोत्पलें ।
जो वना जाय घेवोनि गोवळे । बिदीवरूनि मिरवत ॥३१॥
जाय छंदें पांवा वाजवीत । हुंबरी घाली गडियांसवेत ।
यमुनेच्या वाळवंटी लोळत । तोचि दावीं आम्हांते ॥३२॥
हांसे घडीघडी पाहे आम्हांकडे । सुंदर डोळे मोडी वांकडे ।
तेचि परब्रह्म रोकडें । दावीं आम्हांसी उद्धवा ॥३३॥
उद्धव म्हणे तुम्हांजवळी असतां । दाखवूं कोणीकडे मागुता ।
मृगनाभीं कस्तूरी असता । परी तत्त्वतां न कळे तया ॥३४॥
केले दर्पणाचें निकेतन । बहुत बिंबें दिसती जाण ।
आत्मस्वरूप एक असोन । चराचर तैसें भासलें ॥३५॥
एक भिंती चित्रें नाना । तैसी दिसे चराचररचना ।
अविनाश एक वैकुंठराणा । सर्गस्थित्यंतकाळींही ॥३६॥
गोपी बोलती ते वेळां । अघासुर जेणें उभा चिरिला ।
कालियामस्तकावरी नाचला । तो घननीळ दावीं कां ॥३७॥
अंगुलीवरी गोवर्धन । उभा उचलोनि सप्त दिन ।
द्वादश गांवें अग्नि गिळून । कमळपत्राक्ष अक्षयी ॥३८॥
ठाण मांडूनि वाजवी मुरली । आमुची चित्तवृत्ति तेथें मुराली ।
संसारवासना सकळ हरली । परी नाहीं पुरली असोसी ॥३९॥
उद्धव म्हणे ऐका विचार । शरीरविरहित यादवेंद्र ।
त्यासी नाहींत चरण-कर । मुरली कोठें वाजविली ॥२४०॥
सप्त धातूंविरहित । चहूं देहांसी अतीत ।
जो पिंड-ब्रह्मांडातीत । मुरली कोठें वाजवी ॥४१॥
क्षणिक दावावया लीला । सगुण वेष हरीनें धरिला ।
परि तो सकळ रंगांवेगळा । काळा सांवळा नसे तेथें ॥४२॥
मायेनें रचिलें जगडंबर । परी त्यासी ठाऊक नाहीं समाचार ।
पुढें होईल निराकार । हाही हेतु नसेचि ॥४३॥
त्याच्या सत्तेनें जग चाले समस्त । परी तो मन न घाली तेथ ।
ऐसा तो अवयवरहित । त्यासी सगुणत्व लावूं नका ॥४४॥
गोपी म्हणती उद्धवाप्रती । नागवे उघडे बैसले एकांतीं ।
तुझें ज्ञान त्यांजप्रती । सांगे जाय उद्धवा ॥४५॥
गुदद्वारी टांच लावून । कोंडूनि बैसले प्रभंजन ।
त्यांसी सांगे तुझें ज्ञान । आम्हां सगुण हरि दावी ॥४६॥
ऐकें उद्धवा एक वचन । तूं ज्याच्या कृपेनें बोधितोसि ज्ञान ।
तो पूतनाप्राणशोषण । दावी आम्हां एकदां ॥४७॥
जो श्रीकुचदुर्गविहार । जो भक्तमंदिरांगणमंदार ।
मुख सुहास्य अति उदार । यादवेंद्र दावीं तो ॥४८॥
कौस्तुभ झळके वक्षःस्थळी । दिव्य टिळक विलसे भाळी ।
कोटि अनंगांहूनि आगळी । तेचि सांवळी मूर्ति दावीं ॥४९॥
जो वृंदावनभुवनविलासी । विश्वरूप मुखीं दावी मातेसी ।
ज्याची लीला वर्णितां सौख्य सर्वांसी । तोचि आम्हांसी दावीं कां ॥२५०॥
उद्धवा कृष्णप्राप्ति होय । ऐसा सांग आम्हांसी उपाय ।
कोण्या साधनें यदुवर्य । हातासी ये सांग पां ॥५१॥
उद्धव म्हणे हेचि साधन । दृढ धरावे संतांचे चरण ।
त्यांच्या वचनीं विश्वास धरून । करावें श्रवण भावार्थें ॥५२॥
करितां सारासारविचार । तेणें शुद्ध होय अंतर ।
आत्मरूप चराचर । सहजचि मग दिसतसे ॥५३॥
गोपी म्हणती उद्धवासी । तुवां जे ज्ञान बोधिलें आम्हांसी ।
ते सर्व आलें प्रत्ययासी । दृष्टांतेंसीं समजलो ॥५४॥
परी सगुणरूप वेल्हाळ । आकर्ण राजीवनयन विशाळ ।
अतिवेधक तमालनीळ । कैसा विसरूं उद्धवा ॥५५॥
येरू म्हणे जाणोनि निर्वाणज्ञान । मग सगुण निर्गुण दोन्ही समान ।
अलंकाररूपें मिरवे सुवर्ण । दुजेपण तेथें काय ॥५६॥
तंतुरूपें अंबर साचार । तरंगरूपें एक सागर ।
तैसा सगुणअवतार सर्वेश्वर । नाहीं विचार दूसरा ॥५७॥
बचकेंत पाणी न सांपडे । परी गाररूपें हाता चढे ।
तैसें सगुण हरीचें रूपडें । भक्तांलागीं जाहले ॥५८॥
सुवास दाटला मंदीरी । परी अबलांसी न कळे निर्धारीं ।
तों दृष्टीं देखिली कस्तूरी । मग अंतरीं समजलें ॥५९॥
कस्तुरी दिसतसे सगुण । सुवास तो केवळ निर्गुण ।
थिजलें विघुरलें घृत पूर्ण । सगुण निर्गुण तैसेंचि ॥२६०॥
सोन्याचें कडें घालविलें । तरी काय सोनें मोलासी तुटलें ।
तैसे सगुण अवतरलें । परी ते संचले परब्रह्म ॥६१॥
गुरुमुखें जाणावें निर्गुण । सगुणीं भजावें आवडीकरून ।
ऐसे गोपींनीं ऐकोन । धरिले चरण उद्धवाचे ॥६२॥
प्रार्थूनियां उद्धव सखा । चारी मास राहविती गोपीका ।
ज्या सदा अंतरीं सद्‌भाविका । यदुनायका न विसरती ॥६३॥
उद्धवाच्या मुखें ब्रह्मज्ञान । गोपी करिती नित्य श्रवण ।
तेणें चित्ताचे मळ तुटोन । दिव्य ज्ञान ठसावलें ॥६४॥
गोपींचा चित्ततवा जाहला । त्रिविधतापमळ बैसला ।
त्याचाचि उद्धवें आरसा केला । त्यांत स्वरूप बिंबले ॥६५॥
उद्धव परम पंचाक्षरी । पंचभूतें झांकूनि निर्धारीं ।
गोपी आणिल्या स्वरूपावरी । साक्षात्कारेंकरूनियां ॥६६॥
उद्धव वैद्य परम सतेज । अर्धमात्रा दिली रसराज ।
संशयरोग निरसोनि तेजःपुंज । सर्व गोपिका त्या केल्या ॥६७॥
घरोघरीं गोपी नेती । उद्धवाची पूजा करिती ।
नित्य कीर्तन ऐकती । त्याच्या मुखेंकरूनियां ॥६८॥
उद्धव उठोनि लवलाहें । नित्य गाईंसवें वना जाये ।
अवलोकूनि हरीचे ठाये । आश्चर्य करी अंतरीं ॥६९॥
जे जे स्थळीं कृष्णें क्रीडा केली । तेथे उद्धव नमस्कार घाली ।
नित्य सोहळा गोकुळीं । चारी मास जाहला ॥२७०॥
नंद-यशोदेचा निरोप घेतला । पुसोनियां गौळियां सकळां ।
उद्धव मथुरेसी चालिला । भेटावया हरीतें ॥७१॥
वस्त्रें अलंकार हरीलागीं देखा । देती आणूनि गोपिका ।
म्हणती उद्धवा सांगें यदुनायका । आम्हांसी कदा न विसरावें ॥७२॥
नंद यशोदा गोपिबाळा । उद्धव समस्तीं बोळविला ।
म्हणती उत्तम काळ क्रमिला । उद्धवाचे संगतीनें ॥७३॥
रथी बैसोनि सत्वर । उद्धव पावला मथुरापुर ।
दृष्टीं देखिला यदुवीर । साष्टांग नमस्कार घातला ॥७४॥
अहेर सकळांचे अर्पून । सांगितले सर्व वर्तमान ।
मग उद्धव आपुलें सदन । प्रवेशता जाहला ॥७५॥
हरिविजयग्रंथ सुरस । एकविसावा अध्याय सुधारस ।
सज्जननिर्जर रात्रंदिवस । सावकाशें सेवोत का ॥७६॥
अहो हा अध्याय एकविसावा । केवळ संतांचा प्राणविसांवा ।
सदा सर्वदा हाचि पाहावा । सकळ कार्य टाकूनियां ॥७७॥
ब्रह्मानंदे हा बरवा । केला अध्याय एकविसावा ।
सांडूनियां सकळ धांवा । येथें विसांवा भक्त हो ॥७८॥
ब्रह्मानंदा परात्परा । पुराणपुरुषा दिगंबरा ।
भक्तपालका श्रीधरवरा । अढळ अचळ अभंगा ॥७९॥
इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंशभागवत ।
निजभक्त सदा परिसोत । एकविंशतितमोऽध्याय गोड हा ॥२८०॥
॥अध्याय एकविसावा समाप्त ॥ ओंव्या ॥२८०॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीगणेशाय नमः । मथुरेतून रामकृष्ण सांदीपनी-आश्रमात गेले होते ते विद्या पूर्ण करून परत आले. पुष्कळ दिवस कृष्णाचा विरह झाल्यामुळे गोकुळात मात्र गोप-गोपी, नंद-यशोदा यांना फार शून्य शून्य वाटत होते. सर्वजण त्याच्या आठवणी काढीत होते. गोपींच्या डोळ्यांत आसवे व मनात कृष्णदर्शनाची आस होती. अन्नाची त्यांना गोडीच वाटेना. कोणत्याही साजशृंगाराच्या वस्तू त्यांना तापदायक वाटत होत्या. हार सर्पवत् चंदन अग्निवत् चंद्र सूर्यवत् वाटत होता. सुख दुःखवत् भोग रोगवत् वाटत होते. घास गिळण्यापूर्वी शोक गिळावा लागत होता. गोठ्यात कृष्णगोष्टी आणि आठवणींत दुःखीकष्टी हेच सर्वत्र झाले होते. कृष्णाचे आभास होऊन निःश्वास टाकणार्‍या गोपी कुणावरही विश्वास टाकायला तयार नव्हत्या. कृष्णाचा स्वतःला विरह झाला त्याला कोणीतरी कारणीभूत आहे - म्हणून कधी त्या अक्रूराला नांवे ठेवीत होत्या तर कधी नशिबालाच !

धन्य त्या गोपी ! नाहीतर वरून भक्तीचे ढोंग करणार्‍या कित्येकांच्या मनात हरीचे स्मरणच नसते. स्वतःच्या कर्तृत्वाचाच गर्व ! हरी अंतःकरणात गुप्त आहे. तो न ओळखता लोक बाह्यतः किती तरी पुण्यकृत्ये करतात, दाने, तीर्थयात्रा, गुहेत जाऊन एकांतसेवन - सारे वरवरचे असते. लोणी विकताना गोपी म्हणत- 'गोविंद घ्या हो ! कृष्ण घ्या हो' मग मथुरेतील ग्राहक स्त्रिया त्याMना म्हणत- "तुमच्या या मडक्यात कृष्ण कसा काय मावला ? मत्स्य, कूर्म, वराह असे अवतार घेऊन ज्याने म्हणे प्रचंड पराक्रम केला तो भगवंत तुम्ही या डेर्‍यात, या माठांत कसा काय ठेवला ? अघासुराला फाडून मारणारा, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणारा हाच का कृष्ण ? हे तर दही आहे ! लोणी आहे ?" पण या प्रश्नांनीच त्या गोपी भावसमाधीत जायच्या ! त्यातल्या त्यात एक गोपी भानावर होती ती म्हणाली- "एकच काय, प्रत्येक घटात कृष्ण आहे, सूर्याचे प्रतिबिंब नाही का कित्येक जलाशयांत पडत ? तसाच श्रीहरी घटांत आहे, प्रत्येक मूर्तीत आहे ! पहा !"

आणि त्या गोपीचा भाव एवढा उत्कट की मथुरेतील स्त्रियांना प्रत्येक मडक्यात कृष्णाची सुंदर बालमूर्ती, गोपवेषात दिसू लागली. गोपीचे वचन खरे करण्यासाठी कृष्णाने त्या मथुरेतील स्त्रियांना असेही दर्शन दिले.

गोकुळात परत जाऊन गोपी पुन्हा गृहकृत्ये करू लागल्या तरी त्यांचे चित्त काही कामांत नसे. कृष्ण आपल्याला सोडून गेला याचे भान झाले की त्या कृष्णाला हाका मारीत आणि रडत रहात. कृष्णाची मुरली, त्याची काठी, वगैरे सार्‍या वस्तु पाहून यशोदा रडे. ताक घुसळताना मन कृष्णाकडे लागलेले असे. दळणकांडण करताना कृष्ण हात धरायला येईल की काय असे वाटे.

तिकडे मथुरेतही कृष्णाला गोपांच्या विरहाची कल्पना होती. त्याने उद्धवाला - आपल्या परमभक्ताला बोलावले व म्हटले- 'उद्धवा, किती तरी दिवस झाले. अक्रूराबरोबर मी इकडे आलो त्यावेळी गोकुळातील लोक फार शोक करीत होते. त्यांना माझा विरह फार जाणवत असेल. त्यांना तू भेटून माझे कुशल सांग, त्यांचे सर्वांचे कुशल विचार, त्यांचे सांत्वन कर. गोपींना चार ज्ञानाच्या गोष्टी सांग ? विवेक शिकव, नंदबाबा आणि यशोदामाई यांना भेट. गोपींना भेट, गोपबालक - माझे मित्र - त्यांना भेट - सारे माझी वाट पाहात असतील, त्यांचे सांत्वन कर. माझे एवढे काम कर.'

कृष्णालाही सर्वांच्या आठवणी आल्या. त्याचे मन भरून आले. त्याने उद्धवाचा हात हाती धरला आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. मग म्हणाला- "मी सुद्धा पहा, त्यांच्या भक्तिभावनेने हळवा झालो. तू जा. त्यांच्या भक्तीची उत्कटता स्वतः पहा. मी त्यांना कधी विसरणार नाही. पण उद्धवा, सगुण भक्तीतून त्यांना ज्ञानदृष्टीने माझ्या परमात्मरूपाच्या भक्तीकडे तू वळव. त्यांचे दुःख व अज्ञान तू दूर कर. तूच ज्ञानी आहेस. त्यांना तूच ज्ञान देऊ शकशील. तुला तर देवगुरूंनी पूर्वीच ब्रह्मज्ञान दिले आहे."

कृष्णाने उद्धवाच्या मस्तकी आपला कमलसदृश हात ठेवला. उद्धवाचे ज्ञान जागृत झाले. मग तो निघाला. आपल्या स्वामीचे काम, सख्यभक्तीतून निर्माण झालेल्या आपुलकीने तो करायला निघाला. तो कृष्णासारखाच दिसत असे. त्याला बृहस्पतीकडूनच ज्ञान प्राप्त झालेले होते. अक्रूरासारखाच तो कृष्णाचा ज्ञानी भक्त होता.

आणि आता तो गोकुळात - सगुण भक्त गोपगोपींना भेटायला चालला होता. भक्तीला - गंगेला - ज्ञानरूपी यमुना भेटणार होती ! आपण गोपींना असा विवेक सांगू तसे ज्ञान सांगू असा विचार करीत तो चालला होता. पण जेव्हा तो गोकुळात शिरला तेव्हा तेथील वातावरणाचा प्रभाव पडून त्याचे अंग थरथर कापू लागले, अनामिक आनंदाने त्याचे हृदय धडधडू लागले, अंगाला घाम आला, अश्रुपात होऊ लागला, 'कृष्ण कृष्ण' म्हणतां म्हणतां तो बेभान होऊन मार्गावरील धूळ कपाळी लावीत, पायीच नाचत पुढे जाऊ लागला !

संध्याकाळची वेळ होती. गवळ्यांची मुले गुरांना घेऊन गोकुळात परत येत होती. गाई वासरांसमवेत ते गोपबालक पाहून उद्धवाचे मन आनंदाने भरून आले. ते सारे आनंदाने नाचत होते, गाणी गात होते, कोणी कोणी कृष्णासारखा वेष केला होता. मार्गात धूळ उडत होती. हाच 'गोरज'- भक्तीचा मुहूर्त ! उद्धवाचे मन 'त्या गोपांबरोबर नाचत येताना कृष्ण कसा दिसत असेल' याची कल्पना करू लागले. आणि पुन्हा रथात बसून तो नंदाच्या घराजवळ केव्हा कसा पोहोचला तेही त्याच्या लक्षात आले नाही. घरोघरी गोपगोपी कृष्णाचे नाव घेत, त्याच्या आठवणी काढीत आपापली कामे करीत आहेत हे पाहून या लोकांचे सांत्वन कसे करावे, असा प्रश्नच त्याला पडला.

नंदाने उद्धवाचा रथ दुरूनच पाहिला. मथुरेत त्याची उद्धवाशी ओळख झालेलीच होती. त्याने उद्धवाचे स्वागत केले. पाहुणचार केला. "उद्धवा ! कृष्ण कसा आहे ?" असा प्रश्न त्याने आधी विचारला ! उद्धवाला पाहाताच नंद व यशोदा यांना कृष्णस्मरणाने हुंदके येऊ लागले. नंद तर कृष्णाचे नाम वारंवार उच्चारू लागला.

उद्धव त्याला सावरू लागला. मथुरेत कृष्ण कुशल आहे असे सांगितले. मग मथुरेतून कृष्ण बलरामासह सांदीपनी- आश्रमात विद्याभ्यासासाठी गेला होता वगैरे सांगून त्याने कृष्णाचे कार्य, दिनक्रम, देवकी-वसुदेव यांचे कुशल, देवकीचे कृष्णप्रेम, अक्रूराचे कुशल, बलरामाचे कुशल - सारे काही अगदी तल्लीन होऊन सांगितले, ते ऐकताना नंदयशोदा अत्यंत आनंदित झाली.

"उद्धवा, ही पहा कृष्णाची काठी, हा पहा त्याचा लहानपणचा खेळ ! ही त्याची बासरी ! हा त्याचा मोरपिसांचा मुकुट, ही पाहिलीस का त्याची छोटी घोंगडी ? मुद्दाम त्याच्यासाठी तयार केली आहे. वाटते, आता येईल आणि म्हणेल, "आई मी वनात चाललो." ज्या उखळीशी कृष्णाला बांधून ठेवले होते ती उखळीसुद्धा तिने दाखवली, आणि विरहाने रडूं लागली. भक्ताला ती जणू देवाची माता होऊन वात्सल्याने त्याची सेवा कशी करावी तेच शिकवीत होती ! 'उद्धवा, कृष्ण असला तर सारे गोड ! कृष्ण नसला तर सारे कडू ! तो माझ्यावर रागावला असेल ! आम्ही त्या भगवंताला आमची संसारातली कामे करायला लावली ! त्याला गुरे राखायला सांगितली ! त्याने माती खाल्ली म्हणून त्याला मार दिला. गोपींनी गार्‍हाणी आणली म्हणून त्याला मी रागावले ! छेः असे काही करायला नको होते ! देवाला सांभाळायचे काम, उद्धवा, फार अवघड असते ! त्याच्या लहानपणी तर जास्तच अवघड ! एकीकडे वाटते तो आपला मुलगा आहे, पण त्याचे सामर्थ्य, त्याची लीला पाहिली की वाटते, छे, हा तर सगुण ब्रह्म आहे, आणि वात्सल्याचा ज्ञानाशी झगडा होतो ! उद्धवा, माझ्या वात्सल्याने ज्ञानाचा पराभव केला आहे ! आता ही खेळणी पाहिली की भडभडून येते !'

उद्धव म्हणाला- 'रडू नका, यशोदामाई ! तुम्ही खरोखरच धन्य आहात ! नारद ज्याचे नाव घेऊन त्रैलोक्यात संचार करतो, ब्रह्मदेव ज्याची पूजा करतो आणि कैलासनाथ ज्याचे ध्यान करतो, तो भगवान विष्णू - तुमच्या घरी लहानपण घेऊन खेळला, बागडला, या घरातील, या अंगणातील मृत्तिका, ही धूली किती पवित्र ! तुम्ही त्याचे लालनपालन केलेत. तुम्ही किती थोर ! तुम्ही मला वंदनीय आहात ! मी त्या प्रभूचा दास आहे, तो मला गौरवाने सखा म्हणतो, पण त्याच्याशी हमामा, हुतुतू लपंडाव खेळणारे, ज्यांना त्याने आपल्या हाताने दहीभात भरवला ते गोपच त्याचे सखे ! धिक् आहे माझे ज्ञान ! इथे आलो नि वाटले, कृष्ण मथुरेत गेला तो फक्त शरीराने ! त्याचे मन, चित्त, त्याचा सर्व कृपा-भाव तर साक्षात् इथेच आहे ! आणि तुमचे सांत्वन करण्यासाठी मला तो पाठवतो ! मलाच भक्ति शिकविण्यासाठी त्याने पाठविले आहे असे मला वाटते ! नंदबाबा ! त्या परात्पर भगवंताचे कुशल मी काय सांगू ? त्याच्याच विरहात इतर लोक व्याकुळ होतात, पण तो तुमच्या आठवणी काढून गोरामोरा होतो !

अशा तर्‍हेने रात्री पुष्कळ वेळ उद्धव, नंद, यशोदा, जागत व 'कृष्ण' गोष्टी करीत होते. पहाटे पहाटे त्यांना थोडी झोप लागली, पण कृष्णाचीच स्वप्ने दिसत होती त्यांना.

सकाळी उठून उद्धव यमुना नदीवर स्नानासाठी गेला. जाताना वाटेत ! घरोघरी लोक प्रातःकाळची कामे करताना त्याला दिसले. कोठे कोठे अजून रात्रीचे दीप तसेच तेवत होते. कुठे दही घुसळणे, कुठे अंगणात सडा घालणे, कुठे गाईची धार काढणे, कुठे रांगोळ्या काढणे - पण सर्व कामे करताना लोक एक प्रकारच्या तंद्रीत होते, कृष्णाचे नाव गाण्यात गुंफून गाणी म्हणत होते, आणि गोपी तर एकमेकींशी कृष्णाच्याच गोष्टी बोलत होत्या.

उद्धव स्नान करून परत येत होता. काही गोपी यमुना नदीवर पाणी भरण्यासाठी चालत्या होत्या. उद्धव कृष्णासारखाच दिसत होता. त्यामुळे प्रथम त्यांना वाटले की तोच आहे; पण जवळ येताच त्यांनी ओळखले. त्याला त्या म्हणाल्या- "उद्धवा, कृष्णाची खुशाली तरी सांग. आम्हाला सोडून तो मथुरेत गेला, त्याची ही निष्ठूर करणी त्यालाच शोभते, नाही का ? तो इकडे येण्याचे नावच काढीत नाही आणि आम्ही त्याचे नाव घेत बसलो आहोत. ज्या नंदबाबांनी त्याचे तर्‍हेतर्‍हेचे लाड पुरविले, ज्या यशोदेने त्याच्या खस्ता काढल्या, त्याचे हट्ट पुरविता पुरविता जी बिचारी दमून जात होती, त्या मातापितरांची स्वतः भेट घ्यायला कां आला नाही ? आणि तुझ्या भेटीवर आम्ही समाधान मानायचे का ? आमची आठवणसुद्धा त्याला नसेल. आम्ही त्याच्यासाठी घरदार सोडून रानात गेलो आणि तो मात्र निघून गेला ! उद्धवा, त्याचे तरी बरे चालले आहे ना ?" गोपी त्याला अनेक प्रकारे छेडीत होत्या ? त्यावेळी एक भ्रमर तिथे आला आणि गुणगुण करीत गोपींच्या भोवती उडू लागला. कृष्णविरही गोपींनी आपले शब्दशस्त्र त्या भ्रमरावरच चालविले.

त्या म्हणू लागत्या - अरे कृष्णा ! (भुंगा काळा असतो, त्यालाच 'कृष्ण' असे म्हटले आहे) तुला इथे गुंजन करायचे काय काम आहे ? आमच्याजवळ कशाला लाडीगोडी लावतोस ? तुझा स्वभाव किती चंचल आहे हे आम्हांला माहीत नाही कां ? तो कृष्णसुद्धा तुझ्यासारखाच, तुझा मित्रच की तो ! तू कुठल्याही फुलावर स्थिर बसत नाहीस, तो तरी कुठे स्थिर आहे ? गेला ना आम्हाला सोडून ? हो ! मथुरेत कितीतरी सुंदर स्त्रिया त्याला भेटल्या असतील ! मग आम्हाला गावंढळाना कोण विचारतो ? अरे, त्याला तर उटी तयार करणारी कुब्जा आवडली ! सुगंध तुला आवडतो आणि त्यालाही आवडत असणार, बहुतेक तुला त्याने हेर म्हणूनच पाठविले असेल. तू कपटी तसाच तोही कपटी. कुब्जा वाकडी आणि तोही एक पाय वाकडा करून, मान वाकडी करून, कमरेत वाकडा-त्रिभंगी उभा राहातो ! त्यांची जोडी चांगली जमली असणार ! कुब्जेने सुगंधात काहीतरी मोहिनी टाकली आणि तो फसला असेच झाले असेल. पण नाही ! तिने आमच्याहून फार मोठे तप केले असेल म्हणूनच तो तिला वश झाला ! आपण तरी या उद्धवाला कशाला हे ऐकवायचे ? याला तरी त्याचे रहस्य काय आहे ते कळले आहे का ? उद्धवा, तुला तरी त्या काळ्याचा खरा स्वभाव कळलाय का ? अरे भ्रमरा ! तू मथुरेत उडत जा आणि त्याला सांग, "तुझ्यासाठी तळमळून गोपी गतप्राण झाल्या ! आता येणार असलास तर त्यांची मृतशरीरे पहायला ये. लवकर नाही आलास तर तीही पहाता येणार नाहीत. अरे ! गोपींच्या शरीराची रक्षा जिथे पडलेली असेल तिथेच आता तुझा पावा वाजव. ज्या पाण्यात गोपींची रक्षा टाकली आहे तिथे तू स्नान तरी कर ! इथे बासरी वाजवलीस तर आमची रक्षा तरी तुझ्या पायांना लागेल ?"

व्याजोक्तीने, वक्रोक्तीने, गोपी आपला शोक, आपली व्यथा बोलून दाखवीत होत्या. ऐकता ऐकता उद्धवाचे मन भरून आले तेवढ्यात भ्रमर उडून दुसरीकडे गेला. तेव्हा गोपी पुन्हा उद्धवाजवळ बोलू लागल्या. "उद्धवा, तो कृष्ण तिकडे कां गेला ? आमचे काय अपराध झाले म्हणून तो आम्हाला कंटाळला ? त्याच्या विरहाने आमची हृदये विदीर्ण होत नाहीत, आम्हाला मरण येत नाही - म्हणजे आमची मने कठोरच, नाही का ? त्याला न्यायला जो आला त्याचे नाव म्हणे अक्रूर - अतिशय क्रूर माणसाचे नाव असे कसे ? त्या कृष्णाची आणि आमची ताटातूट करणारा तो म्हणे अक्रूर ! उद्धवा, तू त्या कृष्णाची व आमची भेट घडवून आण ! आम्हाला एवढे कळले आहे की मित्रत्वाने तुझे तो ऐकतो. आम्ही विरहनदीत बुडत आहोत ! तुला शरण आहोत. तू आम्हाला उद्धरून घे ?"

गोपी सारा अभिमान सोडून उद्धवाच्या पायावर लोळण घेऊ लागल्या. तो संकटात पडला. आता या गोपींचे सांत्वन तो कसे करणार ? त्याने मनोमन कृष्णाचा धावा केला. मग त्याला गोपींजवळ काय बोलावे ते सुचू लागले. तो गोपींना आश्वासन देत म्हणाला- "सगुण साकार अशा श्रीकृष्णाची तुम्ही उत्कट भक्ती करता, त्याच्या शरीराला, त्याच्या बोलण्याचालण्याला तुम्ही सर्वस्व समजतां, तुम्ही जेवढा त्याला लहान समजता तेवढा लहान तो नाही. सकल ब्रह्मांडाचा तो पालनकर्ता आहे ! तो स्वतः तिन्ही गुणांपलीकडचा आहे, सर्व- भूतमात्रांच्या पलीकडचा आहे. तोच स्व-स्वरूपी आहे. चिरंतन, सनातन, सत्‌, चित् व आनंरूप तोच आहे. त्यानेच साधूंचे रक्षण करण्याकरता, दुष्टांना शासन करण्याकरता मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, भार्गवराम, दाशरथी राम, असे अवतार घेतले ! त्याची लीला अतर्क्य आहे. ब्रह्मदेव आणि इंद्र यांनाही त्याच्या सामर्थ्याचा थांग लागत नाही. तो खरा शरीरधारी, तुमच्या माझ्यासारखा देहधारी नाही. तो अवतार घेतो तेव्हा भक्त प्रेमासाठी देह धारण करतो. गोपींनो ! तुम्हाला ज्या बालरूपाची ओळख झाली आहे त्यापेक्षा कृष्ण फार व्यापक आहे. पंचेंद्रियांना कळेल असे त्याचे स्वरूप नाही. तोच जगाची उत्पती करतो, तोच पालन करतो आणि विलय पावलेले जग त्याच्याच ठायी सुप्त होते. तेहतीस कोटी देवता, पंचमहाभूते, सर्व प्राणी, मानव, यक्षकिन्नर, सर्प, नाग, गंधर्व, अप्सरा, ऋषी, मुनी, यांचा तोच मूलाधार आहे. तो वृक्षांत आहे, यमुनेत आहे, गाईवासरांत आहे, तोच वृंदावनात आहे, पर्वतांत आहे. वायू, अग्नी, जल, पृथ्वी आणि अमर्याद असे आकाश तोच आहे." गोपी प्रथम प्रथम सगुण कृष्णाच्या स्मरणांत दंग होत्या, पण उद्धवाचे ज्ञानमय वचन श्रवण करता करता त्यांचे मन देहाच्या मर्यादा सोडून व्यापक व सूक्ष्म होऊ लागले. त्यांची विरह वेदना विरून जाऊ लागली. त्या पुष्कळ वेळ ऐकत राहिल्या. मग उद्धव नंदाकडे आला. त्याने नंदयशोदा यांसही कृष्णाचे व्यापकत्व आणि ईश्वरत्व समजावून सांगितले. त्याच्या उपदेशाने नंदाचे मन निवळले, यशोदेचे चित्त स्थिर होऊ लागले.

उद्धवाला नंदाने व गोपाळांनी गोकुळात ठेवून घेतले. तो चार महिने राहिला. ज्या ज्या ठिकाणी कृष्ण खेळला, जिथे जिथे त्याने अद्‌भुत लीला दाखविली, तिथे तिथे उद्धव गेला. त्या ठिकाणची धूळ त्याने मस्तकी धारण केली ! त्या वृक्षांखाली तो बसला, त्या वातावरणात त्यालाही सगुण भगवंताच्या भक्तीची प्रचीती आली !

शेवटी उद्धव चार महिन्यांनी मथुरेस जायला निघाला. गोकुळवासी लोकांनी कृष्णासाठी अनेक भेटीच्या वस्तू त्याच्याजवळ दिल्या. आता गोपींना कृष्णाचा विरह थोडाफार सहन होऊ लागला होता. कृष्णाचे सवंगडी उद्धवाभोवती जमले. जो तो "माझी ही वस्तू कृष्णाला द्या" म्हणून उद्धवाला सांगत होता. रथात त्या वस्तू ठेवता ठेवता उद्धव आनंदाने रडू लागला, अणि नंदयशोदांचा निरोप घेताना तर त्याला अष्ट सात्त्विक भाव उत्पन्न होऊन गळा अवरुद्ध झाल्यामुळे बोलताच येईना.

ज्ञानाचा उपदेश देऊन ज्याने गोपगोपींना विवेक शिकविला त्याचे स्वतःचे चित्त मात्र कृष्णाच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी व्याकुळ झाले, कोणी कोणाला उपदेश केला ? श्रीहरीची लीला !
अध्याय २१ समाप्त
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


GO TOP